शनिवार, २७ जानेवारी, २०१८

प्रकरण १९) सम्राट शिवाजी :- काही दुर्लक्षित बाबी


    महाराष्ट्रात शिवाजी व कर्नाटक - तामिळनाडूत व्यंकोजीने चालवलेला उपक्रम म्हणजे शहाजीने आरंभलेल्या उद्योगाची एकप्रकारे पूर्तताच होती. दोघांत फरक इतकाच कि, शिवाजीचा उद्योग स्वतंत्रपणे वर्तण्याचा तर व्यंकोजीचा, शहाजीप्रमाणेच बादशाही चाकरीत राहून आपले महत्त्व वाढवण्याचा होता.

    शिवाजीच्या कर्नाटक मोहिमेची चर्चा करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे कि, आदिलशाहीत चाकरी करताना शहाजीने जो जो प्रदेश तुडवून आदिलशाहीला जोडण्याचा प्रयत्न केला, त्या भागासह इतर प्रदेशही शिवाजीने आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला व त्यात तो काही प्रमाणात यशस्वीही झाला.

    इतिहासकारांच्या मते कर्नाटक प्रांतातील स्वारी हाती घेण्याचे विचार शिवाजीच्या मनात स. १६७६ पासून घोळत होते. तर काहींनी या स्वारीच्या कल्पनेचे श्रेय रघुनाथपंत हणमंतेला दिलेलं आहे. परंतु उपलब्ध पुरावे लक्षात घेता, शहाजी जिवंत असल्यापासून शिवाजीचा कर्नाटकाकडे आपली सत्ता विस्तारण्याचा प्रयत्न चालला होता. उदाहरणार्थ, अफझलखानाला मारून टाकल्यावर वेगाने त्याने पन्हाळयापर्यंतचा प्रदेश काबीज केला व नेताजी पालकर गदग, लक्ष्मेश्वरपर्यंत गेला, तो याच कारणासाठी.
    परंतु अनेक कारणांनी -- विशेषतः तुर्कांशी उद्भवलेल्या झगड्यामुळे स. १६७३ पर्यंत शिवाजीला कर्नाटकात उतरण्याची संधीच मिळाली नाही.

    स. १६७२ मध्ये अली आदिलशाहचा मृत्यू व पाठोपाठ विजापूर दरबारात उफाळलेल्या दख्खनी - पठाणी संघर्षामुळे स. १६७३ मध्ये शिवाजीला कर्नाटकात जाण्याची संधी प्राप्त झाल्यासारखे वाटले. परंतु राजाचे धोरण सेनापतीत नसल्याने उंबराणीच्या लढाईत कोंडीत सापडलेल्या विजापुरी सरदारास --- बहलोलखानास प्रतापराव गुजराने शिवाजीच्या आज्ञेविरुद्ध परत जाण्याची मोकळीक दिल्याने हा बेत काहीसा लांबणीवर पडला. ( स. १६७३ पूर्वार्ध )
   
    स. १६७३ च्या उत्तरार्धात कर्नाटकात शिरण्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शिवाजीने कारवारकडे स्वारी केली. परंतु उंबराणीस बचावलेल्या बहलोलने त्याला माघार घेण्यास भाग पाडले.

    स. १६७४ च्या फेब्रुवारीत आदल्या वर्षीची चूक दुरुस्त करण्याची संधी प्रतापरावास मिळाली. नेसरी येथे त्याने फिरून बहलोलखानास गाठले. परंतु या प्रसंगी झालेल्या लढ्यात प्रतापराव व त्याचे पाच सात साथीदार मारले गेल्याचे इतिहासकार सांगतात.
    माझ्या मते हा सर्व बनाव संशयास्पद आहे. प्रतापरावसारखा व्यावसायिक सेनानी केवळ राजाने ठपका दिला म्हणून मूठभर साथीदारांसह खानाच्या फौजेवर तुटून पडेल हेच असंभवनीय आहे. परंतु या लढ्याचे तपशील माझ्याकडे नसल्याने तूर्तास केवळ प्रश्नचिन्ह उपस्थित करूनच हा मुद्दा संपवतो.

    स. १६७४ च्या पावसाळ्यात शिवाजीने स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. त्यानंतर त्याने तुर्की प्रदेशात लुटालूट करत वर्षाखेर विजापुरी कोकणात --- फोंडा, कारवारकडे स्वारी केली. स. १६७५ च्या मे मध्ये त्याने हा प्रदेश आपल्या राज्यास जोडून घेतला.
    दरम्यान राज्याभिषेकापासून शिवाजीचे बहादूरखानासोबत तहाचे प्रयत्न चालले होते. जे दोनवेळा अयशस्वी झाले. इतिहासकारांनी याचे विश्लेषण करताना शिवाजीने खानास, पर्यायाने औरंगजेबास फसवल्याचे म्हटले आहे. परंतु उपलब्ध पुरावे पाहता इतिहासकारांना तत्कालीन राजकारणाचे आकलनच न झाल्याचे दिसून येते.

    स. १६७२ मध्ये अली आदिलशहाचा मृत्यू होऊन अल्पवयीन सिकंदर गादीवर बसल्यानंतर दरबारात दखनी - पठाणी हे दोन पक्ष प्रामुख्याने निर्माण झाले. दख्खनींमध्ये मुख्यतः दक्षिणी मुसलमान, ज्यात बव्हंशी धर्मांतरित व सिद्दीचा समावेश होता. 

    आदिलशाहीत पठाणी पक्ष बळावणे कुतुब व तुर्कांना विशेष जाचक होते. कुतुबशाहीतही दखनी - परदेशी झगडा असून त्यांचा सुलतान आदिल प्रमाणे अल्पवयीन नसल्याने हा वाद अजून चव्हाट्यावर आला नव्हता. तुर्कांच्या दृष्टीनेही पठाण बळावणे घातक होते. हिंदुस्थानची सार्वभौम सत्ता एकेकाळी पठाण - अफगाणांनी गाजवल्याचा उभय पक्षीयांना केव्हाही विसर पडला नव्हता. त्यामुळेच आदिलशाहीत वाढणारा पठाणांचा प्रभाव, हे आदिलशाही नष्ट करण्यासाठी  तुर्कांच्या दृष्टीने चांगले कारण होते.

    राजकीय पत्रांच्या आधारे पाहिले तर शिवाजी हा पठाणांपेक्षा दखनींना अनुकूल असल्याचे दिसते. परंतु माझ्या मते हे अनुमान चुकीचे आहे. शिवाजी व औरंगसारखे धूर्त, पाताळयंत्री मुत्सद्दी लिखित पत्रांत आपलं अंतर्मन व्यक्त करतीलच असे नाही. व राजकीय पत्रांत तर अजिबात नाही !
    माझ्या मते, शिवाजीला दख्खन मधील उर्वरित सर्व सत्ता नेस्तनाबूद करून वा त्यावर आपलं मांडलिकत्व लादून आपलं राज्य साम्राज्याप्रती पोहोचवायचं होतं व शिवाजीसारखी पराक्रमी व्यक्ती अशी महत्वाकांक्षा न बाळगेल तरच नवल !

    कर्नाटक स्वारीमागील शिवाजीच्या हेतूंचीही चर्चा येथेच करणे योग्य ठरेल. इतिहासकारांत शिवाजीच्या दक्षिण दिग्विजयामागील हेतूंविषयी मतभिन्नता असली तरी राज्यविस्ताराचे त्याचे धोरण सर्वमान्य आहे. त्याखेरीज लक्षात घेण्यासारखी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटकातील शहाजीच्या जहागिरीत शिवाजीचा असलेला वाटा !
    या संदर्भात डॉ. नभा काकडे संपादित ' छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे ' मधील पत्र क्र. ७७ अतिशय महत्वाचे आहे. ( पसासं ले. क्र. २६१५ ) यानुसार शिवाजीने दि. १५ एप्रिल १६५७ रोजी तिरुमल राय गोसावी यास कर्नाटक प्रांती काही तालुके रौप्यपटावर करार करून दिले आहेत. या संदर्भात उद्भवणारी महत्वाची शंका म्हणजे, सदर रौप्यपटात वर्णिलेला राजा श्रीरंग वा त्याचा मुलगा तिरुमल राय हे चंद्रगिरीचे संस्थानिक होत का ? अभ्यासूंनी यावर अधिक प्रकाश टाकावा. असो.
     उपरोक्त पत्राच्या अनुषंगाने डॉ. काकडेंच्या ग्रंथातील पत्र क्र. ९७ ( पसासं ले. क्र. २३३२ ) हा देखील चिंतनीय आहे. यामध्ये शिवाजीने व्यंकोजीकडे कर्नाटकातील शहाजीच्या जहागिरीतील आपला निम्मा वाटा मागितला आहे. इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे स. १६७६ मध्ये व्यंकोजीने तंजावर जिंकून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला होता. या कृत्यास नंतर त्याने विजापूर दरबारची संमती मिळवली असली तरी अशा प्रकारचा स्वतंत्र अभिषिक्त राजा --- पितृक सत्तेतील का होईना, सावत्र भावाचा रास्त वाटा सोडून देईल हे व्यवहारतः संभवत नाही.
    तात्पर्य, कर्नाटकात मोहीम आखतानाच वाटणीच्या वा अन्यनिमित्ताने व्यंकोजीला हाताखाली घालून त्यास आपल्या मांडलिकांत समाविष्ट करण्याचा शिवाजीचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो.
    खेरीज कुतुबशहाचा नाकर्तेपणा, व्यंकोजीचा पायापुरते पाहण्याचा स्वभाव आणि कर्नाटकातील लहान - मोठ्या संस्थानिकांची लाथाळी... या सर्वांचा फायदा घेत बहलोलखानाच्या पाठींब्याने शेरखान लोदी वलिगंडपुरं येथून कर्नाटकात स्वतंत्र पठाणी सत्ता उभारण्याचा उपक्रम करत होता. ज्यामध्ये गरज पडल्यास युरोपियनांकडून मदत घेत कुतुबशाहीलाही उखडून काढण्याचा त्याचा विचार होता. औरंग वा त्याच्या अधिकाऱ्यांना याची कितपत जाणीव  होती याची माहिती मिळत नसली तरी शेरखानचे बेत हणून पाडत तिथे आपली सत्ता स्थापित करण्याचा शिवाजीचा निश्चय ठरला असून त्याकरताच त्याने आदिल - कुतुब सोबत तह केले होते. असो. 

    स. १६७६ च्या अखेरीस शिवाजी कर्नाटक स्वारीसाठी रायगडाहून बाहेर पडला. तत्पूर्वी त्याने संभाजीला शृंगारपुरास पाठवून दिले होते. संभाजीच्या शृंगारपूर येथील नियुक्तीवरून इतिहासकारांनी केलेली विविध अनुमानं व उपलब्ध पुरावे तसेच संभवनीय शक्यता लक्षात घेऊन असे म्हणता येते कि, प्रसंग पडल्यास समस्त राजपरिवार एकाच स्थळी -- रायगडी -- नसावा या हेतूने शिवाजीने संभाजीला शृंगारपुरी पाठवले. तिथला प्रदेश रायगडासारखाच दुर्गम असल्याने संभाजी तिथे सुरक्षित होता. तसेच गरज पडल्यास रायगड - शृंगारपूर परस्परांना मदत करू शकत होते. खेरीज शिवाजीकरता रायगडापेक्षा शृंगारपूर हे मदतीकरता जवळचे ठाणे बनू शकत होते.
    खेरीज संभाजी संबंधाने प्रामुख्याने लक्षात घेण्यासारख्या दोन महत्त्वाच्या बाबी म्हणजे :- (१) पसासं ले. क्र. १८८२ नुसार शिवाजीने गोव्याकडचे काही कामकाज संभाजीकडे सोपवल्याचे दिसून येते.  (२) अण्णाजी दत्तोकडे शिवाजीने राज्याचा दक्षिण भाग -- दाभोळ सुभा सोपवला असून संभाजीची नियुक्ती याच क्षेत्रात मोडणाऱ्या शृंगारपूरी करण्यात आली होती. जर संभाजी आणि अण्णाजी यांच्यात वितुष्ट होते व हे शिवाजीला माहिती होते तर, आपल्या गैरहजेरीत या दोघांना तो एकाच प्रदेशात का नियुक्त करेल ? याचाही विचार होणे आवश्यक आहे.

    कर्नाटक मोहिमेची फलनिष्पत्ती :- स. १६७६ च्या अखेरीस कर्नाटक स्वारीकरता बाहेर पडलेला शिवाजी स. १६७८ च्या एप्रिलमध्ये पन्हाळ्यास दाखल झाला. सुमारे सव्वा वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या स्वारीत शिवाजीला संमिश्र स्वरूपाचे यश लाभल्याचे दिसून येते.
    जिंजीचा किल्ला ताब्यात येईपर्यंत कुतुबशहाने शिवाजीला आर्थिक, लष्करी मदत केली परंतु हा किल्ला कुतुबशाही सैन्याच्या हवाली न करता त्याने स्वतःच्या ताब्यात ठेवल्याने कुतुबशहाने त्याची साथ सोडली. त्यामुळे यापुढील सर्व मोहिम त्याला स्वबळावर पार पाडावी लागली. ( मे - जून १६७७ )

    जदुनाथ सरकारांच्या मते स. १६७७ - ७८ मध्ये शिवाजीने कर्नाटकात जिंकलेल्या प्रदेशाची लांबी १८० तर रुंदी १३५ मैल इतकी असून या प्रदेशाचे वार्षिक उत्पन्न २० लक्ष होन एवढे होते. खेरीज या प्रदेशातील किल्ल्यांची संख्या १०० एवढी होती.
    खेरीज सरकारांनी शिवाजीच्या कर्नाटक स्वारीतील लुटीविषयक दिलेली माहिती अशी, " शिवाजीने अतिशय संघटितपणे कर्नाटकची जी लूट केली आणि तेथून जबरदस्तीने जे द्रव्य वसूल केले, त्यामुळे कर्नाटकची परिस्थिती रस शोषून घेतलेल्या एखाद्या हाडाच्या तुकड्याप्रमाणे झाली. " ( सरकार कृत, औरंगजेबाचा इतिहास )
    याशिवाय शेरखानाचा बंदोबस्त झाल्याने कर्नाटकात पठाणी सत्ता मूळ धरण्याचा धोका नाहीसा झाला. व्यंकोजीला नरम करून त्याच्या राज्याचा काही भाग शिवाजीने आपल्या राज्यास जोडला. तसेच कर्नाटकात नव्याने जिंकलेल्या प्रदेशाच्या संरक्षण व्यवस्थेची तरतूद करण्यासाठी त्याने तिकडे आपले काही अंमलदार, लष्करी पथके नेमून दिले.

    शिवाजीच्या कर्नाटक स्वारीतील यशापयशाची चर्चा करताना असे दिसून येते कि, या स्वारीत त्याने जिंजी, वेलोर सारखे जिंकलेले मजबूत किल्ले हीच त्याची या मोहिमेतील मुख्य कमाई म्हणावी लागेल. सरकारांच्या म्हणण्यानुसार जरी २० लक्ष होन वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश शिवाजीच्या ताब्यात आला असला तरी त्यावर त्याचा पूर्णतः अंमल बसला नव्हता. किंबहुना या स्वारीत फक्त मोक्याची स्थळं ताब्यात घेऊन मागाहून परत एकदा कर्नाटक प्रांती मोहीम काढून हा सलग भूप्रदेश ताब्यात घेण्याचा शिवाजीचा मानस असावा असे दिसते. परंतु अशी स्वारी पुढे त्याच्याने किंवा नंतर संभाजीकडूनही होऊ शकली नाही. असो.

    कर्नाटकात शिवाजीने केलेल्या लुटी संदर्भात असे म्हणता येते कि, कुतुबशहाकडून मिळणारी आर्थिक मदत बंद झाल्याने यापुढील मोहिमेचा सर्व खर्च चालवण्याची जबाबदारी शिवाजीवरच येऊन पडली. आणि मोहिमांचा खर्च परस्पर बाहेर भागवण्याचे त्याचे आरंभापासून धोरण असल्याने कर्नाटक प्रांताची त्याला शक्य तितकी लूट करणे भाग पडले. परंतु या लुटीतून त्याला आर्थिक फायदा कितपत झाला असावा हा संशोधनाचा प्रश्न आहे. कारण या स्वारीत व्यतीत करावा लागलेला काळ, पदरी असलेलं सैन्य, ताब्यात आलेल्या किल्ल्यांच्या डागडुजीचा खर्च व नवीन बांधकामे यावर झालेला खर्चही विचारात घेणे भाग आहे. असो.

    स. १६७८ च्या एप्रिलांत शिवाजी कर्नाटक स्वारीतून पन्हाळ्यास येऊन दाखल झाला. तेथून जवळच शृंगारपूर असलेल्या संभाजीला भेटीस न बोलावता तो तडक मे महिन्यात रायगडी निघून गेला.
                                                                                                                    ( क्रमशः ) 

मंगळवार, ९ जानेवारी, २०१८

महारांचा इतिहास :- एक संक्षिप्त आढावा



    नुकत्याच घडलेल्या वढू येथील गोविंद गोपाळ समाधी नासधूस प्रकरण व भिमा - कोरेगाव दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर नवबौद्ध तसेच महारांच्या पुर्वेतीहासाचा ऐतिहासिक संदर्भ साधनांच्या आधारे धांडोळा घेण्याचे प्रस्तुत लेखात योजले आहे.

    हिंदू धर्म म्हणजे जातींचे कडबोळे असून या जाती संस्थेला हजारो वर्षांनी परंपरा असल्याचे सरधोपट विधान केले जाते. परंतु अलीकडेच श्री. संजय सोनवणींनी आपल्या एका लेखात कुशाण कालीन ' अंगविज्जा ' ग्रंथाच्या आधारे असे सिद्ध केले आहे कि, इ. स. च्या दुसऱ्या शतकापर्यंत या देशात जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती.

     जातीसंस्थेची निर्मिती वर्णव्यवस्थेतून झाली हा देखील असाच एक तकलादू सिद्धांत. यासंदर्भातही सोनवणींनी जातींची निर्मिती श्रेणीसंस्थेतून झाल्याचे सिद्ध करत जाती या व्यवसायातून जन्मल्याचे सिद्ध केले आहे.

    या दोन सिद्धांतांच्या आधारे हे स्पष्ट होते कि, समाजास उपयुक्त सेवा पुरवणाऱ्या उद्योग - व्यवसायांतून त्या त्या जातीची निर्मिती झाली असून जातीसंस्था हा वांशिक आधारावर बनलेला गट नाही. तसेच जाती अपरिवर्तनीय देखील नाहीत. अर्थात यामुळे बव्हंशी सामाजिक शास्त्रज्ञांचे सिद्धांत कोलमडून पडत असले तरी हेच सत्य आहे व वस्तुस्थिती दर्शक पुराव्यांच्या आधारे त्याचा स्वीकार करणे आवश्यक ठरते.

    जातीसंस्था व्यवसायातून जन्मलेली असल्याने महार ही जात कोणत्या व्यवसायातून निर्माण झाली ? या प्रश्नाचे उत्तर श्री. सोनवणींनी आपल्या ' महार कोण होते ? ' या प्रबंधवजा ग्रंथात दिले आहे.
त्यानुसार मनुष्य वसाहती करून राहू लागला तेव्हा वस्त्यांच्या रक्षणार्थ जे सैनिक, रक्षक नेमले जात -- तोच महारांचा मुख्य व्यवसाय होता व या रक्षक संस्थेची मुळे पार सिंधू संस्कुती पर्यंत जातात.

    सातवाहन काळात प्रचलित महाराष्ट्री प्राकृत भाषेत या रक्षकांस रक्ख व त्यांच्या मुख्यास महारक्ख हे पदनाम होते. विशेष म्हणजे याच काळात महारठी हे पद प्रचलित असून हि दोन पदनामेच पुढील काळात महार व मराठा या प्रचलित जातींत परावर्तीत झाली.

    सातवाहन साम्राज्य सुमारे साडेचारशे वर्षे टिकून राहिल्याने व त्याचा दक्षिण भारतात -- विशेषतः महराष्ट्र - कर्नाटक प्रांती विस्तार झाल्याने याच परिसरात आपणांस महार जात प्रामुख्याने आढळून येते.

     भारतावरील इस्लामी आक्रमणानंतर येथील समाजजीवनात मोठी उलथापलाथ झाली. त्याचा फटका रक्षक संस्थेलाही बसणे स्वाभाविक होते. सामान्यतः १२ व्या १३ व्या शतकात दक्षिण भारतात बलुतेदारी पद्धती अस्तित्वात आल्याचे मानले जाते. या बलुतेदारीचे तीन प्रतीत वर्गीकरण तत्कालीन समाजाने केले असून महार हा पहिल्या प्रतीचा वतनदार होता.

    या काळातील त्याच्यावरील मुख्य जबाबदाऱ्या म्हणजे गावाचे रक्षण, व्यापारी तांड्याचे संरक्षण, चोरांचा बंदोबस्त इ. असून जोडीला गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर नजर ठेवणे, गावातील जमीन खरेदी - विक्री व्यवहार तसेच जमिनीविषयक तंट्यात साक्ष देणे, गोळा केलेला सरकारी महसूल मुख्य ठाण्यावर जमा करणे, गावातील जन्म - मृत्यूची नोंद ठेवणे इ.

    सिंधू संस्कृती मध्ये जवळपास निमलष्करी वा पोलिसांप्रमाणे असलेली हि रक्षक संस्था देशाच्या आर्थीक, राजकीय,, सामाजिक अवनतीच्या काळात हरकामी जात बनून राहिली. परंतु या प्रवासात अजून एक मोठा टप्पा बाकी होता व तो म्हणजे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात पडलेला भीषण दुष्काळ.

    या दुष्काळात घडलेल्या -- मह्रांच्या इतिहासाशी संबंधित काही घटना आजही दुर्लक्षित राहिल्या आहेत.
बहामनी सम्राट दुसरा महंमदशहाच्या काळात पडलेल्या दुष्काळात त्याचा एक अधिकारी -- दामाजीपंत याने शाही हुकुमाविरुद्ध आपल्या अखत्यारीत सरकारी गोदामातील धान्य दुष्काळग्रस्त जनतेत वाटून टाकले. परिणामी बादशहाने त्याच्यावर जबर आर्थिक दंडाची आकारणी केली. दामाजीपंतास हा दंड भरण्याचे सामर्थ्य नसल्याने त्याच्यावतीने अंबरनाक महाराने दंडाचा भरणा करून त्याबदल्यात दामाजीची सुटका व महार समजास ५२ हक्कांची सनद पदरात पडून घेतली.

    उपरोक्त सनद श्री. अनिल कठारेंनी आपल्या ' शिवकाळ व पेशवेकाळातील महारांचा इतिहास ' ग्रंथात संपूर्ण स्वरूपात दिली असून तिचा अभ्यास केला असता पुढील गोष्टी स्पष्ट होतात :-
१) दामाजीपंतास झालेला जबर आर्थिक दंड भरण्याइतपत महार मंडळी श्रीमंत होती.
२) दुष्काळामुळे तत्कालीन सर्वच जातीतील लोक मृताहारी बनले होते.
३) बावन्न हक्कांच्या सनदेत त्यांनी ज्या ज्या सेवा करण्याचे काही विशिष्ट हक्कांच्या बदल्यात मान्य केले आहे, त्या सेवा महारांनी करण्यापूर्वी इतरही लोक करत होते. परंतु महारांनी त्या सेवांवर आपली एकाधिकारशाही निर्माण केली.
परंतु केवळ या सेवा स्वीकारण्याने महार अस्पृश्य बनले असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. कारण या ५२ हक्कांतील कित्येक बाबींवर नंतरच्या काळात इतर जातींनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचे इतिहासात नमूद आहे.

    महार समाजातील संत चोखामेळा या काळाच्या आसपासचा. त्याचा नमूद असलेला इतिहास पाहता महार मंडळी शिक्षणात मागे असल्याचे दिसून येत नाही. अर्थात हे अनुमान तर्कावर आधारित असून याचे खंडन, चोखोबांचे अभंग ब्राह्मणांनी लिहून ठेवले असे केले जाते.
     परंतु यावरील मुख्य आक्षेप असे :- १) जर याकाळात महार अस्पृश्य होते तर ब्राह्मणांनी चोखोबांचे अभंग लिहून ठेवण्याचे कारण काय ?
२) या बदल्यात चोखोबा त्यांना फुकट सेवा देत होते असे म्हणता येत नाही. कारण खुद्द चोखोबांना आपले साहित्य लिखित स्वरूपात असावे असे -- जर ते अशिक्षित असतील तर वाटणे कितपत संभवनीय आहे ?
३) चोखोबा या बदल्यात ब्राह्मण लेखनिकास पैसे देत होते.

    पैकी, पैसे देऊन अभंग लिहून घेण्याइतपत चोखोबा धनिक नव्हते हे त्यांच्या अंत कथेवरून स्पष्ट होते. सेवाचाकरीच्या बदल्यात ब्राह्मणाने त्यांचे अभंग लिहिले हेही मत अग्राह्य दिसते. मग चोखोबा व त्यांच्या कुटुंबीयांनीच आपले अभंग लिहून ठेवले हे मान्य करावे लागते.
परंतु आश्चर्याची बाब अशी कि, प्रस्थापित व महार - नवबौद्ध मंडळी चोखोबांचे अभंग ब्राह्मणांनीच लिहिले यावर विश्वास ठेवतात. असो.

    शिवकाळ व पेशवाई पाहिली तर लष्करात महारांचा समावेश असल्याचे दाखले आहेत. त्याचप्रमाणे शिवकाल - पेशवाई दरम्यानच्या काळात तुरळक प्रमाणात का होईना महारांना पाटीलकी वतन असल्याकी कागदोपत्री नोंद आहे. जर महार अस्पृश्य असते तर समाजाच्या विरोधात जाऊन महारास पाटीलकी वतन देण्याचा निर्णय येथील राज्यकर्त्यांनी घेतला असता का ? याचा विचार व्हावा.

    ज्या दुसऱ्या बाजीरावाच्या काळात घडलेल्या भिमा - कोरेगावच्या अनिर्णीत संग्रामावरून सध्या जातीय तेढ माजली आहे त्या बाजीरावाच्या कारकिर्दीतही महारांच्या स्थानावर फारसा फरक पडल्याचे दिसून येत नाही. गावातील तसेच लष्करातील त्यांचे स्थान पूर्ववत होते.
     अपवाद फक्त वैदिकांनी बळकावलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा. सवाई माधवराव पेशव्याच्या काळातच विठ्ठल मंदिराच्या निकट अतिशुद्रांनी येण्यास प्रतिबंध घातला होता. व तो देखील ब्राह्मण तथा वैदिकांना त्यांचा स्पर्श होतो म्हणून. पुढे बिनडोक हिंदूंनी त्याचेच मंदिरप्रवेश बंदीत रुपांतर केल्याचे अनुमान संभवते. परंतु याबाबतीत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

    पेशवाई अखेरीस रायगड लढवणाऱ्या रायनाक महारास वैदिक व वैदिकानुयायी मंडळींनी फितूर, देशद्रोही ठरवण्याचा यत्न केला असला तरी इतिहास संशोधक श्री. शांताराम विष्णु आवळसकर यांनी आपल्या ' रायगडची जीवनकथा ' या संदर्भग्रंथात याचे खंडन केले आहे. तसेच प्रास्ताविकात त्यांनी रायनाक संबंधी पुढील माहिती दिली आहे :- ' रायनाकाचे टाक करून टिपणीस, कारखानीस इत्यादी रायगडशी संबद्ध असणाऱ्या प्रभु घराण्यांनी पूजेत ठेविले आहेत, याचा काय अर्थ करायाचा ? नाते येथे रायनाकाचे एक ' मंदिर ' आहे. शेतीस प्रारंभ करण्यापूर्वी रायनाकापुढे काही बळी देण्याचा रिवाज आहे. रायगडचा रायनाईक व मंदिरातील रायनाईक एकच आहेत. ही देशद्रोहयाची पूजा मानणे सर्वथा चूक होईल. या प्रकरणी संशोधनाने सिद्ध होईपर्यंत रायनाकास देशद्रोही मानणे योग्य नव्हे, असे मत मी मांडले आहे. '
     एका फितूर अस्पृश्याचा टाक स्पृश्यांनी आपल्या पूजेत का ठेवावा ? त्यास दैवत्व का प्राप्त व्हावे ? याचा विचार करणे जसे आवश्यक आहे तसेच यासंबंधी अत्याधिक संशोधन होणेही गरजेचे आहे. असो.

    कल्पित सिद्धांतांपेक्षा वास्तविक ऐतिहासिक पुरावे अधिक बोलके असतात. परंतु महार समाज व अस्पृश्यता यांचा संबंध जोडण्यात व कालनिश्चतीत मात्र हे पुरावे मौन बाळगून आहेत. याविषयी सध्या अनुमानाने इतकेच म्हणता येते कि, धर्मांतरित वैदिकांनी स्पृश्य - अस्पृश्यतेचे खूळ माजवले व बिनडोक हिंदूंनी ते जसेच्या तसे स्वीकारत त्याची अत्याधिक अंमलबजावणी करण्याकडे लक्ष दिले. याचा दृश्य परिणाम म्हणजे लष्करातील स्पृश्य जातींच्या दबावामुळे ब्रिटिशांनी स. १८९५ मध्ये महारांसह इतर कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातींना पेन्शनीत काढत लष्करातून बरखास्त केले.

    त्यानंतर लष्करांत महारांना पूर्ववत प्रवेश मिळावा याकरता निवृत्त महार लष्करी अधिकाऱ्यांनी कागदोपत्री सरकारदरबारी प्रयत्न केले तसेच महारांच्या लष्करी, शौर्यशाली परंपरेचेही त्यांनी गौरवगान आरंभले. यातूनच भीमा - कोरेगावच्या मिथकाची निर्मिती झाली. ज्यामध्ये महारांच्या शौर्याचे उदात्तीकरण व ब्रिटीश सरकारला त्यांच्या संकटकालीन सेवेची आठवण करून देणे या दोन्ही गोष्टी साध्या होणार होत्या व परिस्थितीनुरूप त्या घडूनही आल्या.

    स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नव्याने निर्मित राज्यघटनेनुसार अस्पृश्यता हि कायद्याचे निर्बंध लादून दूर करण्यात आली. मात्र यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महार तसेच अनुसूचित जाती- जमातीत मोडणाऱ्या कित्येक जातींतील व्यक्तींनी बौद्ध धर्माचा आश्रय घेतला. यानंतर बौद्ध धर्मात प्रवेशलेल्या पुर्वास्पृश्यांचे -- विशेषतः महारांचे एक नवे पर्व सुरु झाले. जे मानसिकदृष्ट्या दुभंगलेले होते, आहे. या पर्वातील सहभाग्यांनी स. १९५६ पूर्वीच्या प्रत्येक श्रद्धा, परंपरेशी असलेला आपला संबंध तोडला. इतका कि, सध्या महार शब्द उच्चारणेही अनुसूचित जाती - जमाती बाहेरील व्यक्तीस शक्य न व्हावे. परंतु त्याच वेळी महारांची शौर्यगाथा समजल्या जाणाऱ्या भीमा - कोरेगावशी ते आपली नाळ तोडू शकले नाहीत. तसेच तत्पूर्वीच्या बव्हंशी कल्पित सामाजिक गुलामगिरीच्या मिथकातून ते स्वतःला मुक्त करू शकले नाहीत. अन्यथा आपला पूर्वेतिहास त्यांनी स्वतःहून शोधला असता, मांडला असता. परंतु डॉ. आंबेडकरांनी शुद्र तसेच अस्पृश्य विषयक प्रबंधवजा ग्रंथांत केलेली मांडणी अंतिम मानत त्यांनी या कार्यास पूर्णविराम दिल्याचा अद्यापही त्यांचा समज आहे. व या घातक समजातून महार तसेच नवबौद्ध मंडळी वैचारिक संघर्षाची प्रशस्त वाट सोडून सशस्त्र बंडाळीचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या भीमा - कोरेगावकडे अधिक भावनिक दृष्टीकोनातून पाहताहेत. यातून सामाजिक शांतता, सलोखा भंग होण्याचा मोठा धोका आहे.

    अर्थात यास केवळ तेच एक जबाबदार ठरत नसून त्यांच्या विरोधात दंड थोपटून उब्या राहणाऱ्या मराठा समाजातील मंडळींचाही तितकाच मोठा वाटा आहे. वैदिकांच्या अनुकरणाने त्यांनीही स्वतःसं अनुकूल अशा इतिहासाचे पुनर्लेखन आरंभले असून त्याचा सातत्याने प्रचार चालवला आहे. ज्यास इतिहास म्हणजे काय ? हेच मुळी माहिती नसणारे तरुण मोठ्या संख्येने बळी पडताहेत. यातून साध्य काय होणार ? मुठभरांचे हित साधले जाईल तर बहुसंख्यांकांचे संसार उध्वस्त होतील, आयुष्यं बरबाद होतील. त्याचप्रमाणे देशाच्या प्रागतिक वाटचालीवरही अनिष्ट परिणाम होईल.

    सारांश, इतिहास हा प्रेरणादायी, स्फूर्तीदायी नसून ते केवळ गतकालीन सामाजिक वस्तुस्थिती दर्शवणारे एक माध्यम आहे. याचा विसर पडल्यास त्याचे विकृतीकरण होत आपला वर्मानच नव्हे तर भविष्यकाळही बरबाद होऊ शकतो.

संदर्भ ग्रंथ :-
१) अस्पृश्य मुळचे कोण ? आणि ते अस्पृश्य कसे बनले :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) शुद्र पूर्वी कोण होते ? :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) महार कोण होते ? :- संजय सोनवणी
४) अस्पृश्यांचा लष्करी पेशा :- चांगदेव भ. खैरमोडे
५) महार एक शूर जात :- शि. भा. गायसमुद्रे
६) रायगडची जीवनकथा :- शां. वि. आवळसकर
७) शिवकाळ व पेशवेकाळातील महारांचा इतिहास :- अनिल कठारे