शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

भीमा - कोरेगावच्या लढाईतील ब्रिटीशांच्या कागदी विजयामागील रहस्य !

    भीमा - कोरेगाव येथील स्मारक स्तंभावरील पाट्यांचे सचित्र विश्लेषण :-  
 छायाचित्र क्रमांक १) इंग्रजी मजकूर 
  ( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. ) 
            या पाटीवरील मजकुराची पहिली ओळ अतिशय महत्त्वाची आहे. या ओळीचा असा अर्थ आहे कि, कोरेगावच्या लढाईत बचाव केल्याबद्दल स्मारक बनवण्यात येत आहे. या बचावात्मक लढाईत ज्यांनी वीर मरण पत्करले त्यांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आल्याचे पुढील मजकुरात नमूद केले आहे. महत्त्वाचे म्हणजे भीमा - कोरेगाव येथील लढाईत ब्रिटीशांचा विजय झाल्याचा अजिबात उल्लेख करण्यात आला नाही. 

 छायाचित्र क्रमांक २) मराठी मजकूर 
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
      छायाचित्र क्रमांक १)  मध्ये जो इंग्रजी भाषेत मजकूर आहे त्याची हि मराठी आवृत्ती असून या पाटीचे  शीर्षकच मुळी ' जयस्तंभ ' आहे. त्याशिवाय खालील मजकुरात कोरेगावच्या संग्रामाची त्रोटक माहिती असून त्यात इंग्रजी लोकांचा विजय झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

छायाचित्र क्रमांक ३) इंग्रजी मजकूर 
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
  वरील पाटीमधील इंग्रजी मजकुरात भीमा - कोरेगाव युद्धातील जखमी - मृत वीरांचा नामोल्लेख केला आहे. पण या लढाईमध्ये इंग्रज जिंकले असे चुकूनही लिहिले गेलेलं नाही. 

छायाचित्र क्रमांक ४) 
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
  छायाचित्र क्रमांक ३) मधील इंग्रजी मजकुराचा हा मराठी अनुवाद आहे. भीमा - कोरेगाव संग्रामातील मृत - जखमी वीरांची नावे यात दिलेली आहेत. उदाहरणार्थ, मुंबई सरकारच्या दुसऱ्या ग्रेनेडीयर रेजिमेंट मधील मृतांची नावे :-  बापू सिंदा जमातदार, गणोजी गोरे जमातदार, कानसिंग हवालदार, इटमेतखाळमेतर नाईक, सोननाक कमळनाक नाइक, रामनाक येसनाक नाइक, प्रसादशिंग सिफाइ, लक्ष्मण व (ब ?) दोसा सिपाई, बाबु सावंत सिपाई, गोंदनाक कोठे (?)नाक सिपाइ, रामनाक येसनाक सिपाइ, लक्ष्मण कुकडा सिपाइ, भागनाक हरनाक सिपाई, राघोजी मोद्रे सिपाई इ. 
       उपरोक्त नावे वानगीदाखल दिलेली आहेत. या पाटीवरील मजकुरातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पातीच्या आरंभी स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे कि, ' मौजे कोरेगाव येथे इंग्रजी लोक लढाईत जय मेळउन पडले व जखमी जाले त्यांची नावे ' छायाचित्र क्रमांक ३) मधील इंग्रजी मजकुरात या अर्थाची वाक्ये अजिबात लिहिली गेली नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि, भीमा - कोरेगावच्या युद्धात इंग्रजांचा विजय झाला हे लोकांच्या मनी ठसवण्यासाठी इंग्रजांनी मुद्दाम एतद्देशीय भाषेत बनवलेल्या पाटीत - आपण कोरेगाव येथे विजयी झालो - असे खोदवून घेतले.   

   
    विवेचन :-    भीमा - कोरेगावची लढाई इंग्रजांनी जिंकली असाच सर्वांचा समज आहे. परंतु, प्रत्यक्षात ती लढाई ना इंग्रजांनी जिंकली ना पेशव्यांनी ! तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धातील ती एक अनिर्णीत लढाई असल्याचे मी मागील लेखात साधार स्पष्ट केले आहे. ( पहा अथवा पाहू नका :- http://peshwekalinitihas.blogspot.in/2012/06/blog-post.html ) परंतु, असे असले तरी भीमा - कोरेगाव येथील संग्रामात इंग्रजांचा विजय झाला हा लोकांचा समज अजूनही दृढचं आहे. यामागील कारणांचा शोध घेतला असता असे दिसून आले कि, इंग्रज अधिकाऱ्यांनी बनवेगिरी करून, आपण भीमा - कोरेगावचे युद्ध जिंकले असे बळेच उठवून दिले होते. चतुर इंग्रज यावरच थांबले नाहीत तर भीमा - कोरेगाव येथील स्मारक स्तंभाचे त्यांनी जयस्तंभात देखील रुपांतर केले. 
           या स्मारकावर इंग्रजी व मराठी भाषेत  मजकूर खोदलेल्या दोन पाट्या तत्कालीन इंग्रज सरकारने लावल्या आहेत. पैकी इंग्रजी पाटीवरील मजकुरात ते लिहितात कि, भीमा - कोरेगाव येथील संग्रामात बचाव केल्याबद्दल हे स्मारक उभारण्यात येत आहे. अर्थात, त्यावेळी इंग्रजांची भाषा इतद्देशियांपैकी कितीजणांना समजत  होती ? त्यामुळे हाच मजकूर मराठी भाषेत लिहिण्यात आला पण तो लिहिताना एक छोटासा फेरबदल करण्यात आला. त्यानुसार भीमा - कोरेगाव येथील स्मारकस्तंभ ' जय स्तंभ ' बनून भीमा - कोरेगावच्या लढाईत इंग्रजांचा विजय झाल्याचे लिहिण्यात आले. यामागील इंग्रजांचा हेतू उघड होता. 
       पेशवाईचा अस्त नुकताच झाला असला तरी या देशावर, विशेषतः महाराष्ट्रावर,  इंग्रजांची म्हणावी तशी अजून पक्की पकड बसली नव्हती. ( उमाजी नाईकांनी याच काळात इंग्रजांच्या विरोधात उठाव केला होता. ) मराठी संस्थानिक अजून जिवंत होते आणि महत्त्वाचे म्हणजे सातारकर छत्रपतींचा जनसामान्यांमध्ये अजूनही नावलौकिक होता ! तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धात पेशव्यांनी छत्रपतींचे बळकावलेले राज्य सोडवून परत छत्रपतींना देणार असल्याची घोषणा इंग्रजांनी केली होती. या पार्श्वभूमीवर स. १८१९ मध्ये जेव्हा सातारकर व इंग्रजांमध्ये तह घडून आला तेव्हा सातारकरांना पेशव्यांच्या अंमलाखालील असलेले संपूर्ण राज्य न मिळता काही जिल्ह्यांचे नाममात्र स्वतंत्र राज्य मिळाले. बरे, सातारकर आता स्वतंत्र राजे न राहता इंग्रजांचे मांडलिक देखील बनले ! 
        हि घटना लक्षात हेऊन भीमा - कोरेगावच्या स्मारकस्तंभांवरील मराठी भाषेतील मजकुराकडे पाहावे लागेल. इंग्रजी अंमल देशी संस्थानिकांनी किंवा लोकांनी सुखासुखी मान्य केला नव्हता. इंग्रजांचे राज्य तलवार  आणि राजकीय संधिसाधूपणा / धूर्तता यांवर टिकून होते. एतद्देशीय संस्थानिक / लोक आपल्यावर चिडून आहेत हे इंग्रज जाणून होते. त्याचप्रमाणे ते एकसंध नसल्याने व त्यांच्यावर आपली दहशत असल्याने ते गप्प असल्याचे त्यांना माहिती होते. देशी संस्थानिकांवरील / लोकांवरील  इंग्रज सरकारचा हा वचक / जरब असाच कायम राहावा यासाठीच माझ्या मते त्यांनी भीमा - कोरेगाव येथील स्मारकावरील मजकुरात खोडसाळपणा केला. या व्यतिरिक्त मला दुसरे काही सयुक्तिक कारण दिसत नाही.
    या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेले फोटो मला उलपब्ध करून देण्याचे कार्य श्री अनिल सुरवासे व श्री. अनिल वळसे यांनी केले आहे. त्यांच्या या सक्रीय सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.   

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

स्थानेश्वरची लढाई

 

          रघुनाथरावाच्या प्रसिद्ध अटक स्वारीनंतर शिंद्यांची बंगाल मोहीम उद्भवली व त्यातूनच शुक्रतालचा प्रसंग ओढवला हे मराठी इतिहास वाचकांना व पानिपत अभ्यासकांना माहिती आहेच. दत्ताजी शिंद्याची शुक्रताल मोहीम स. १७५९ च्या जुलैपासून ११ डिसेंबर पर्यंत चालली. एकाअर्थी ४-५ महिने चाललेली हि मोहीम फसल्यातच जमा झाली होती. दत्ताजी शिंदे गंगेच्या किनारी शुक्रताल नजीक मीरपूर येथे असताना पंजाबात अफगाण बादशहा अब्दालीचे आगमन झाले होते. स. १७५९ च्या ऑगस्ट महिन्यात अफगाण सरदार जहानखान व मराठी सैन्याचा लाहोरात सामना घडून आला. या संघर्षात मराठी सैन्याने अफगाण लष्कराचा साफ धुव्वा उडवला. विजयी मराठी फौजांचे नेतृत्व साबाजी शिंदे व तुकोजी होळकर यांनी केले. परंतु, पुढे खास अब्दाली या दोघांवर चालून आल्याने व प्रसंग पडल्यास तातडीन कुमक मिळेल असे लष्करी ठाणे जवळपास नसल्याने साबाजी आणि तुकोजीला पंजाबातून मागे फिरावे लागले. पंजाबात ठिकठीकाणी पेरलेल्या बव्हंशी मराठी फौजा नोव्हेंबर अखेरपर्यंत शुक्रताल नजीक शिंद्यांच्या छावणीत दाखल होऊ लागल्या.  अब्दाली पंजाबात आला व तेथील मराठी फौजा मागे हटून शुक्रताल जवळ आल्या तरीही दत्ताजी शिंदे नजीब व सुजा यांच्याशी लढण्यात मग्न राहिला वस्तुतः याच वेळी त्याने माघार घेऊन दिल्ली किंवा आगऱ्याकडे सरकणे गरजेचे होते पण दत्ताजीने हा विचार मनात देखील आणला नाही. यामागील कारण काय असावे
         जुलै महिन्यापासून नजीबखानाचा बंदोबस्त करण्याचा दत्ताजी आटोकाट प्रयत्न करीत होता पण त्याबाबतीत त्याला म्हणावे तसे यश मिळत नव्हते. गोविंदपंताच्या मार्फत नजीबाबादवर केलेल्या चढाईत आरंभी यश मिळाले होते परंतु ऐनवेळी सुजाची फौज नजीबच्या मदतीस आल्याने गोविंदपंतास माघार घ्यावी लागली होती. सारांश , लष्करी बळावर नजीबचा बंदोबस्त करण्यात शिंद्यांना साफ अपयश आले होते. अशा परिस्थितीत नजीबचा पाठीराखा अब्दाली पंजाबात आल्याचे समजल्यावर देखील दत्ताजी शुक्रताल वरुन मागे का हटला नसावा ?
        रघुनाथरावाच्या अटक स्वरीमध्ये एक गोष्ट सिद्ध झाली होती व ती म्हणजे मराठी फौजांच्या समोर अफगाणी सैन्याचा निभाव लागत नाही ! अटक मोहीम संपल्यावर रघुनाथराव पुण्याला निघून गेला. त्यावेळी मागे असलेल्या मराठी फौजांवर हल्ले चढवून त्यांना पळवून लावण्याचे अनेक प्रयत्न गिलच्यांनी केले. परंतु मराठी सैन्याने पराक्रमाची शर्थ करून शत्रूचे सर्व हल्ले निष्फळ केले. पुढे साबाजी व तुकोजी या मराठी सरदारांनी अब्दालीच्या उपस्थितीत त्याचा सरदार जहानखान यास पराभूत केले. या सर्व गोष्टी लक्षात घेता दत्ताजीला अब्दालीच्या आक्रमणाचे भय वाटले नसल्यास नवल नाही.
       या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे व ती म्हणजे रघुनाथरावाच्या अटक स्वारीच्या वेळी अब्दाली इराणी फौजांचे आक्रमण व राज्याअंतर्गत बंडाळीने व्यापला होता. परकीय व स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करण्यात त्याचेही बरेचसे बळ खर्ची पडले होते. अशा स्थितीत स्वबळावर तो एकटा शिंद्यांशी लढण्यात समर्थ होता का ? माझे असे मत आहे कि, दत्ताजी शिंदेने देखील हाच विचार केला होता. याचा तात्कालिक / प्रासंगिक पुरावा म्हणजे त्याने मोगल वजीर गाजीउद्दिन यास, मोगल बादशाहला सोबत घेऊन अब्दालीवर चालून जाण्याची सूचना केली होती. जर अब्दाली तितकासा दुबळा नसता तर अशी सूचना दत्ताजीने अजिबात केली नसती. परंतु ज्याअर्थी दत्ताजीने गाजीउद्दिनला अशी सूचना केली त्याअर्थी अब्दालीचे लष्करी सामर्थ्य बरेचसे कमी झाले असा दत्ताजीचा ग्रह झाला होता. खरे पाहता दत्ताजीचा हा समज चुकीचा होता. शत्रूच्या बळाविषयी दत्ताजीने अगदीच चुकीचा अंदाज बांधला असे म्हणावे लागेल. परंतु, अशा गोष्टी किंवा असे अंदाज हे काही क्षण गृहीत धरावेच लागतात. त्यातील काही खरे ठरतात तर काही खोटे. त्यामुळे याबाबतीत दत्ताजीला दोष देण्यात काही अर्थ नाही. असो, मोगल बादशहा आणि वजीराला अब्दालीवर चालून जाण्याची सूचना दत्ताजीने केली खरी पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. कारण वजीर व बादशाह यांच्यात परस्परांविषयी कमालीचा अविश्वास होता. बादशाह – वजीर यांच्यातील वैमनस्य इतक्यावरच थांबले नाही. गाजीउद्दिन याने मोगल बादशाह आलमगीर याचा २९ नोव्हेंबर १७५९ रोजी खून केला व औरंगजेबपुत्र कामबक्ष याचा नातू मुहीउलमिलात यास शहाजहान सानी या नावाने तख्तावर देखील बसवले. गाजीउद्दिनच्या या कृत्याचा परिणाम दत्ताजीला फारच जाचक झाला. कारण ; गाजीउद्दिनला वजिरी मराठी सरदारांनी मिळवून दिल्यामुळे मराठी सरदारांच्याच सल्ल्यावरून त्याने हे कृत्य केले असा उत्तर हिंदुस्थानातील संस्थानिकांचा व सामान्य जनतेचा समज झाला.
        दिल्लीतील या बातम्या अब्दालीला मिळत होत्याच. तो स्वतः २७ नोव्हेंबर १७५९ रोजी सरहिंद जवळ येऊन ठेपला. पंजाबात आपले वर्चस्व बसवून तो भाग आपल्या राज्याला कायमस्वरूपी जोडण्याचा त्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे चालला होता. या प्रयत्नांना मूर्त स्वरूप येण्यासाठीच तो यावेळी पंजाबात तळ ठोकून राहिला.
         नजीबखान व अब्दाली यांच्यात किती प्रमाणात सौरस्य होते हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. राजकारणी व्यक्ती हि निःस्वार्थी कधीही नसते, हे लक्षात घेऊनच नजीब – अब्दाली यांच्या संबंधांकडे पाहणे भाग आहे. नजीब आपल्या पाठबळाचा वापर करून हिंदुस्थानात स्वतःचे राज्य स्थापू पाहत आहे हे अब्दालीला दिसत नव्हते असे नाही. त्याचप्रमाणे आपल्याला हाताशी धरून पंजाबात आपले पाय रोवण्याचा अब्दाली प्रयत्न करत आहे हे नजीबदेखील ओळखून होता. परंतु असे असले तरी दोघेही काही विशिष्ट कारणांनी एकत्र आले होते. नजीबच्या दृष्टीने अब्दालीचा पाठिंबा महत्त्वाचा होता. त्याउलट अब्दालीला नजीबची तितकी गरज होती का ? जर नजीब अब्दालीला अनुकूल नसता तर गाजीउद्दिन अथवा सुजा किंवा राजपूत संस्थानिक यांपैकी कोणालाही तो हाताशी धरू शकत होता व असे घडून येणे अगदीच अशक्य कोटीतील नव्हते. एकूण, नजीब व अब्दाली यांच्यापैकी याक्षणी तरी नजीबला अब्दालीच्या मदतीची जास्त गरज होती. त्यामुळेच काहीही करून अब्दालीला पंजाबातून पुढे दिल्लीकडे खेचून आणण्यासाठी नजीब आकाश – पाताळ एक करत होता.
        या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे व ती म्हणजे एकटा नजीबचं नव्हे तर मोगल राजघराण्यातील मंडळींना देखील अब्दालीने दिल्लीस यावे असे वाटत होते. याचे कारण उघड आहे. मुस्लीम पातशाही हिंदूंच्या हाती जात होती व त्यांनी स्थापलेला सुन्नी पंथीय मुस्लीम वजीर मन मानेल तसा नंगानाच घालत होता. सारांश, त्यावेळची राजकीय परिस्थिती इतकी विचित्र झाली होती कि, अब्दालीसारख्याला दिल्लीत येण्याचा मोह झाला नसता तर नवल !
      स्थानेश्वरच्या रणभूमीकडे वाटचाल :- २७ नोव्हेंबर १७५९ रोजी अब्दाली सरहिंदला दाखल झाला. त्यावेळी दत्ताजी शुक्रताल जवळ होता. त्यामुळे अब्दालीने सरहिंदवरून कुंजपुऱ्याकडे जाऊन तेथे यमुना नदी पार करून रोहिलखंडात जाण्याचा निर्णय घेतला. यामागील त्याचा आणखी एक हेतू म्हणजे, आपण येईपर्यंत रोहिले दत्ताजीला शुक्रताली रोखून धरतील व दोन फौजांच्या चिमट्यात दत्ताजीचा साफ चुराडा करता येईल. या धोरणानुसार अब्दालीने सरहिंद वरून आपला मुक्काम हलवला. अब्दाली सरहिंद वरून दिल्लीच्या दिशेने पुढे कोणत्या दिवशी सरकला त्याची तारीख उपलब्ध नाही परंतु अब्दाली सरहिंदहून पुढे सरकल्याचे समजल्यावर ११ डिसेंबर रोजी दत्ताजीने आपला मुक्काम आटोपता घेत दिल्लीकडे प्रस्थान ठेवले. सरहिंद ते कुंजपुरा हे अंतर सुमारे १२५ - १५० किमी आहे तर शुक्रताल ते कुंजपुरा हे अंतर शंभर - सव्वाशे किमी आहे. अब्दाली कुंजपुऱ्याजवळ यमुना पार करण्याचा प्रयत्न करणार हे दत्ताजीने ताडले व त्या दृष्टीने त्याने आपल्या सैन्याची मांडणी केली. १५ डिसेंबर रोजी त्याने आपल्या लष्कराचे दोन भाग केले. निवडक सडी फौज त्याने आपल्या सोबत ठेवून बाकीचे जड सामान, बुणगे व उर्वरीत पथके जनकोजी सोबत दिल्लीला ठेवले. जनकोजी सोबत गोविंदपंत बुंदेले, सुरजमल जाटाचा सरदार रुपराम  कोठारी मोगल वजीर गाजीउद्दिन हे देखील होते.
              
दत्ताजीच्या या निर्णयांमागे काही कारणे देखील होती. तो स्वतः कुंजपुरा येथे यमुना पार करून अब्दालीला आडवा जाणार होता. अशा वेळी प्रसंग पडला असता कुमकेसाठी भरवशाचा माणूस पाठीशी असावा म्हणून त्याने जनकोजीला दिल्लीला ठेवले. दत्ताजीचा हा बेत व पानिपत मोहिमेत भाऊने दिल्लीत नारो शंकरची केलेली नियुक्ती यातील विरोधाभास यानिमित्ताने लक्षात येतो. जर अब्दाली आपल्याला चकवून दिल्लीला गेला तर दिल्ली शहर सुखासुखी त्याच्या हाती पडू नये अशी तजवीज करणे दत्ताजीला भाग होते. दिल्ली लढवण्याची जबाबदारी त्याने एकप्रकारे जनकोजीवर सोपविली होती. म्हणजे प्रसंगी दत्ताजीला कुमक करणे आणि दिल्ली लढवणे या दोन महत्त्वाच्या जबादाऱ्या यावेळी जनकोजीवर सोपवण्यात आल्या होत्या. एकूण पाहता, दत्त्ताजीने फारच विचारपूर्वक आपल्या लष्कराची रचना केल्याचे दिसून येते.  
             दिनांक १८ डिसेंबर १७५९ रोजी दत्ताजीने कुंजपुऱ्याच्या दक्षिणेस अंधेरा घाटाने यमुना नदी पार करून एकप्रकारे अब्दालीला मात दिली. ११ डिसेंबर ते १८ डिसेंबर या सुमारे आठवड्याच्या कालावधीत दत्ताजीने १०० - १२५ किमी अंतर कापले. हा फारसा वेगवान प्रवास नसला तरी तत्कालीन परिस्थिती पाहता दत्ताजीने शक्य तितक्या तातडीने कुंजपुरा जवळ केला असे म्हणावे लागते. या ठिकाणी आणखी एक मुद्दा विचारात घेणे आवश्यक आहे व तो म्हणजे दत्ताजी शुक्रतालहून कुंजपुऱ्याकडे निघाला तेव्हा नजीबखान काय करत होता ?
           
हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. दत्ताजी अब्दालीला रोखण्यासाठी जात आहे, अब्दाली आपल्या मदतीसाठी पुढे येत आहे हे नजीबला माहिती नव्हते अशातला भाग नाही. तरीही त्याने कुंजपुऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या दत्ताजीला अडवण्याचा, किमान त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. अर्थात, याविषयी कागदोपत्री काही माहिती मला अजून मिळाली नाही.  त्यामुळे याविषयी निश्चितपणे काही एक विधान करणे धाडसाचे होईल.
         दत्ताजी कुंजपुऱ्यावर यमुनापार झाला तेव्हा त्याला बातमी मिळाली कि, अब्दालीपुत्र तैमुरशहा आघाडीच्या पथकांसह अंबाल्याच्या उत्तरेस लालडू नजीक आला आहे. सरहिंद ते लालडू हे अंतर सुमारे ५० – ६० किमी आहे. २० डिसेंबर पर्यंत दत्ताजीच्या आघाडीच्या फौजा कुरुक्षेत्र – स्थानेश्वरच्या आसपास येऊन पोहोचल्या. कुंजपुरा ते स्थानेश्वर / कुरुक्षेत्र हे अंतर सुमारे ३० – ४० किमी असून कुरुक्षेत्र व स्थानेश्वर यांच्या दरम्यान ४ – ६ किमी अंतर आहे. या ठिकाणापासून लालडू सुमारे ६० – ७० किमी अंतरावर आहे. स्थानेश्वर येथील लढाईच्या विवेचनात वरील ठिकाणांमधील अंतर लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.
       २० डिसेंबरला दत्ताजीच्या सैन्यातील आघाडीची पथके कुरुक्षेत्राच्या आसपास आली तेव्हा अब्दालीच्या आघाडीच्या तुकड्यांशी त्यांची गाठ पडली. उभयपक्षांची एक लहानशी चकमक घडून आली. हि चकमक निकाली निघाली नाही पण कुरुक्षेत्रावर दत्ताजी आडवा आल्यामुळे अब्दालीने आपला बेत बदलला. त्याच्या फौजा थेट दक्षिणेस कुंजपुऱ्यास न जाता यमुनेच्या किनारी असलेल्या जगाध्रीकडे वळल्या. जगाध्री नजीक असलेल्या बुढीया घाटाने यमुना पार करण्याचा अब्दालीने निर्णय घेतला. अब्दालीच्या या बेटांची दत्ताजीला कितपत कल्पना होती हे माहिती नाही. तो कुरुक्षेत्राच्या आसपास युद्धाच्या तयारीत राहिला. या स्थळापासून जवळपास ६० किमी अंतरावर ईशान्येस बुढीया घाट आहे.                  
             २१ डिसेंबर १७५९ च्या पत्रात गोविंदपंत लिहितो कि, ‘ अब्दाली कुरुक्षेत्राहून पंधरा कोसांवर आहे. दत्ताजी सडी फौज घेऊन त्याजवर गेले. जनकोजी, गाजीउद्दिन आम्ही मागे दिल्लीवर राहिलो. अब्दाली न रेटे तर आम्ही व रुपराम कटारे बुनगे चमेल पार करून देऊ. ‘
   दिनांक २३ डिसेंबर १७५९ रोजी अब्दाली जगाध्री मुक्कामी दाखल झाला. या गावापासून जवळच ४ – ६ किमी अंतरावर यमुना नदी पार करण्यासाठी बुढीया नावाचा घाट आहे. अर्थात, हे आजचे अंतर झाले. २००- २५० वर्षांमागे यमुनेचा प्रवाह किती अलीकडे / पलीकडे होता याविषयी भाष्य न केलेले बरे !
      या ठिकाणी काही प्रश्नांची चर्चा करणे मला गरजेचे वाटते. बुढीया घाटाची अब्दालीला पूर्वीपासून कल्पना होती ? कि,  दत्ताजीला टाळून नदीपार करण्याच्या प्रयत्नात त्याला जगाध्री नजीकच्या बुढीया घाटाची माहिती मिळाली ? या प्रश्नांची उत्तरे मिळणे अवघड असले तरी तितकेसे अशक्य देखील नाही. जर तर्काच्या आधारे या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास काही माहिती निश्चितपणे मिळू शकते. नदी उतार ज्या ठिकाणी असतो अशा ठिकाणाच्या जवळपास गावे वसवली जातात हे लक्षात घेतल्यास अब्दालीने जगाध्रीची निवड का केली या कोड्याची उकल होते.
      परंतु तरीही एक प्रश्न बाकी उरतोच कि, लाखोंच्या संख्येने मनुष्य – प्राणी नदी पार करू शकतील अशी व्यवस्था अल्पावधीत अब्दालीने कशी काय केली ? कि रोहील्यांनी या ठिकाणी अब्दालीला सक्रीय मदत केली ? या प्रश्नांची उत्तरे मिळवणे अत्यावश्यक आहे.
       स्थानेश्वरची लढाई :- अब्दाली जगाध्रीच्या दिशेने वळल्याची बातमी दत्ताजीला कधी मिळाली याची नोंद सापडत नाही. तसेच २० डिसेंबर ते २४ डिसेंबर या चार दिवसांमधील दत्ताजीच्या हालचालींची देखील कागदोपत्री माहिती अजून तरी प्रसिद्ध करण्यात आली नाही. या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, २० डिसेंबर रोजी दत्ताजी स्थानेश्वर जवळ नव्हता. तो २० ते २३ डिसेंबरच्या दरम्यान केव्हातरी स्थानेश्वरला आला. स्थानेश्वरपासून दिल्ली सुमारे दिडशे किमी अंतरावर आहे हे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे.  या ठिकाणी अशी एक शंका मनात येते कि युद्धभूमी म्हणून दत्ताजीने कुरुक्षेत्राची निवड का केली असावी ? कदाचित त्यावेळची भौगोलिक परिस्थिती युद्धाच्या दृष्टीने दत्ताजीला अनुकूल वाटली असावी.
          अब्दाली जगाध्री नजीक यमुना पार करत असल्याची बातमी दत्ताजीला कधी मिळाली असावी ? माझ्या मते, २२ – २३ डिसेंबर रोजी अब्दाली यमुना पार करत असल्याचे दत्ताजीला समजले असावे व त्यामुळेच त्याने २४ डिसेंबर रोजी अब्दालीवर चाल करून जाण्याचा निश्चय केला. अर्थात, अब्दालीच्या हालचालींमुळे दत्ताजीला पुढे चालून जाणे भाग पडले हे देखील तितकेच खरे आहे.
      अब्दालीने तातडीने यमुना पार करण्याचे प्रयत्न आरंभल्यामुळे दत्ताजीचा असा समज झाला कि, स्वबळावर आपल्याशी लढण्यास अब्दाली समर्थ नसल्याने तो आपणांस टाळून रोहील्यांच्या प्रदेशात जात आहे. अर्थात, दत्ताजीचा हा ग्रह अगदीच चुकीचा नव्हता पण पूर्णतः खराही नव्हता ! आपल्या या हालचालींचा शत्रू काय अर्थ घेईल हे अब्दाली जाणून होता. त्यामुळेच त्याने एकीकडे जड समान, बुणगे, कबिले नदीपार लावून देण्याची व्यवस्था केली व दुसरीकडे सडी फौज आणि काही तोफा घेऊन तो स्वतः दत्ताजीला रोखण्यासाठी निघाला. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे कि, दत्ताजी कितीही निर्णायक झुंजीसाठी उतावीळ झाला असला तरी अब्दालीला त्या ठिकाणी मोठी लढाई द्यायचीच नव्हती !
       अब्दालीच्या सुदैवाने दत्ताजीच्या सोबत मुख्य तोफखाना नव्हता. उलट अफगाण सैन्य काही तोफा, जंबूरके, सुतरनाळा यांनी सुसज्ज होते. दत्ताजीजवळील तोफांच्या कमतरतेचा शत्रूने पुरेपूर फायदा उचलला. अफगाणी तोफखान्याच्या भडीमारामुळे मराठी सैन्याला शत्रूचे गळे घोटण्यास एकदम पुढे जाता आले नाही. त्यामुळे भरपूर कालपव्यय होऊन त्या दिवशी निर्णायक संग्रामाची आशा मावळली. तरीही, दत्ताजीने हिय्या करून अब्दालीच्या सैन्यावर थेट हल्ला चढवला. या संग्रामाची माहिती तत्कालीन लेखात मिळते ती अशी - चार सहा घटका युद्धप्रसंग झाला. दत्ताजीने अब्दालीस बरेवजेने नरम केलें. त्याचे चारशे लोक मारले गेले. जिवाजी व नाइकजी भोईटे पितापुत्र रणांगणी पडले. उपरांतिक उभयतां आपापले ठिकाणी कायम राहिले.’ यावरून असे दिसून येते कि, सायंकाळच्या आसपास झालेल्या हातघाईच्या लढाईत दत्ताजीचा विजय झाला. परंतु, पोकळ लष्करी विजयाखेरीज त्याच्या हाती काही लागले नाही.
           अब्दालीचे लष्करी सामर्थ्य खच्ची करता आले नाही त्याचप्रमाणे त्याच्या सैन्याची फळी फोडण्यात देखील त्यास साफ अपयश आले. अब्दालीने लढाई झाल्यावर सावधपणे माघार घेऊन त्याच रात्री यमुनापार केली. अफगाण सैन्य यमुनापार करत असताना दत्ताजीकडून त्यांना फारसा उपद्रव झाला नाही. यावरून असे म्हणता येईल कि, अफगाण सैन्याची थोडीफार दहशत दत्ताजीला बसली किंवा अफगाणी तोफांचा मराठी सैनिकांनी काही प्रमाणात धसका घेतला. ते काहीही असो, अब्दालीला यमुनापार करण्यापसून रोखण्यात दत्ताजीला यावेळी साफ अपयश आले हे निश्चित !
   सारांश :- स्थानेश्वरची हि लढाई इतिहासात फारशी प्रसिद्ध नाही व ती तितकीशी महत्त्वाची देखील नाही. परंतु या लढाईच्या निमित्ताने काही गोष्टींवर नव्याने प्रकाश पडतो तर काही नवीन प्रश्न यामुळे उपस्थित होतात.
१)   दत्ताजी कुंजपुरा येथे यमुनापार करत असताना नजीब – सुजा यांनी त्यास अडथळा आणला नाही. यावरून नजीब – अब्दाली तसेच नजीब – शिंदे यांच्या संबंधांकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळू शकेल.
२)     दत्ताजी सोबत ज्या शिंदेशाही सरदारांनी कुंजपुरा येथे यमुना नदी पार केली होती तेच सरदार पानिपत मोहिमेत सहभागी होते. त्यांनी भाऊला यमुना पार करण्यासाठी उपयुक्त अशा नदी उतारांची कल्पना दिली होती कि नव्हती ?  
३)    निव्वळ घोडदळाच्या बळावर अब्दालीसारख्या शत्रूचा समाचार घेता येत नाही हे देखील स्थानेश्वरच्या लढाईने सिद्ध झाले. 

संदर्भ ग्रंथ :- 
१) भाऊसाहेबांची बखर
२) पानिपत १७६१ - त्र्यं. शं. शेजवलकर  
३) पानिपत असे घडले - संजय क्षीरसागर