Monday, July 16, 2018

इतिहास पुनर्लेखनाची आवश्यकता    इतिहासाचे पुनर्लेखन हि एक आवश्यक बाब असली तरी आपण कोणत्या इतिहासाचे वारंवार पुनर्लेखन करतोय हे तपासून पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे. उदा :- शिवचरित्र वा शिवकालीन इतिहासाचे लेखन करताना शिवाजीच्या सैन्याचा प्रामुख्याने मावळे म्हणून व दुय्यम स्वरूपात मराठे असा उल्लेख होतो. यातला फरक नेमका काय ? याची मात्र चर्चा केली जात नाही. शालेय जीवनापासून मनावर बिंबवत गेलेला हा इतिहास जसाच्या तसा इतिहासकार व बाजारू लेखकांच्या लेखणीतून तरून मनावर कोरला जातो. परिणामी, सामाजिक संघर्ष समयी शिवाजी आमचा कि तुमचा ? इथपासून राजांच्या वेळचे हे गद्दार किंवा आम्हीच खरे लढवय्ये सरदार ! अशी शेखी मिरवली जाते.

    साधी बाब. शिवाजीला जहागीर प्राप्त प्रदेशास त्यावेळी मावळ संज्ञा होती. मावळचे रहिवासी ते मावळे. अर्थात यात गावगाड्याचा सारा जातीसमूह आला. परंतु एखाद्याच्या अलौकिक कार्याचे, चरित्राचे श्रेय संपूर्णतः आपल्या पदरात पाडून घेण्याच्या लालसेपोटी मंत्री ब्राह्मण, सरदार - मराठा / मर्द मराठा गडी आणि मावळे एवढ्यावर बोळवण केली जाते. यातून इतिहासाची तर हानी होतेच पण शिवाय वर्तमान तसेच भविष्यकालीन समाजमनावरही अनिष्ट परिणाम होतात याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. मात्र याचा अर्थ असा नव्हे कि, वर्तमान वा भविष्य लक्षात घेऊन गतकालाची मांडणी करावी.

    अफझलखान शिवाजीवर चालून आला त्यावेळी त्याने मार्गातील हिंदू देवळांचा विध्वंस केला हे एक सरधोपट विधान. किती मंदिरं तोडली याचा पत्ता नाही. मुळात ज्याच्या मुक्कामाचे सर्वच तपशील ज्ञात नाहीत तिथे हि आकडेवारी प्राप्त होणार कुठून ? पण शिवाजीचा विरोधक तो आपला, अशी आम्हां देशी इतिहासकारांची चाल असल्याने आम्हीही दरबारी भाटा प्रमाणे इतिहास लेखन करताना सत्यापलाप करतो व अफझलची स्वारी हि बव्हंशी हिंदू मदतनीसांच्या बळावर -- मराठा सरदारांवर विसंबून होती याकडे डोळेझाक करतो.
    पुन्हा आणखी खान चालून येत आहे समजल्यावर राजे प्रतापगडी जाऊन बसले. त्या जंगलात खानाचा खात्मा करण्याचा मनसुबा रचला. तोही चुनेगच्ची. अगदी बळकट !
    एकदम फिल्मी, नाटकी मांडणी. प्रत्यक्षात तिकडे खान आपल्यावर चालून येत आहे समजताच शिवाजीने खानाची स्वारीच मुळी होऊ नये याकरता कर्नाटकातील खानाच्या जहागिरीवर आपले काही सैन्य रवाना केले होते, हि नोंद  वाचनात आली तरी त्याकडे दुर्लक्ष करायचे. का ? तर सामना बरोबरीचा ठरतो व लोकांना माहिती नाही. आणि माहिती नाही ते खपत नाही ना !
     उलट या नोंदीवर कित्येक प्रश्न उपस्थित करून त्याधारे उपलब्ध माहितीत अधिकाची भर पडू शकते. जसे कि - शिवाजीचे सैन्य कर्नाटकात कोणत्या मार्गे गेले ? मार्गातील आदिलशाही मांडलिक, मनसबदारांनी त्यास वाट कशी दिली ? कि हि तुकडी शहाजीनेच परस्पर तिकडून रवाना केली ? अफझल विरुद्धच्या झगड्यात शिवाजी - शहाजी या दोन आघाड्या होत्या का ? कित्येक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकात पण वेळ न् गरज कोणाला आहे ?

    दुरून डोंगर साजरे अशी म्हण आहे. पण व्यवहारात कधी उलटही होते. उदा. :- आपणांस स्वामिनिष्ठ वाटणारे शिवाजीचे सरदार मिर्झा राजाच्या स्वारीत बेदील झाल्याने शिवाजीला नाईलाजाने तुर्कांसोबत समेट करावा लागला होता, हि बाब आपल्या लक्षात कधीच आली नाही. परंतु दूरच्या श्री. श्रीराम तिवारी या उत्तर भारतीय अभ्यासकास तेव्हाच समजली. किंबहुना त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात हे साधार सिद्ध केलंय कि, ज्या ज्या वेळी तुर्कांना विजापूर वा शिवाजी विरुद्ध यश प्राप्त झाले त्या त्या वेळी तुर्कांना मराठा सरदारांचा पाठिंबा लाभल्याचे निःसंशयरित्या समजावे. आणि ज्यावेळी तुर्क शिवाजी वा विजापूरच्या राज्याविरोधात अपयशी ठरले त्या वेळी मराठा सरदारांनी तुर्कांना मदत न केल्याचे जाणावे. ( संदर्भ :- औरंगजेब कालीन मराठा अमीर - वर्ग की भूमिका )

    आमची जातीयता इतिहासाला कशी विकृत करते याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे संभाजीच्या अटकेचा प्रसंग. संभाजी व त्याच्या मंत्र्यांचे-- ब्राह्मण मंत्र्यांचे वाकडे होते, हि गोष्ट जगजाहीर आहे. परंतु संभाजीला अटक झाली त्यावेळी फितुरी कोणी केली ? आजवर हे बालंट संभाजीच्या मेव्ह्ण्यावर -- गणोजी शिर्क्यावर होते. परंतु उपलब्ध पुरावे पाहता या कटात संभाजीचे मराठा सरदार, ब्राह्मण मंत्री, नातलग सगळेच सहभागी असल्याचे दिसतात त्याचे काय ?
    संभाजीनंतर राजाराम - ताराराणीचा कालखंड म्हणजे अगदी आनंदीआनंद ! या काळातील इतिहासाची अद्यापही सुसंगत मांडणी वा आराखड्याची रचना झालेली नाही. नंतर अवतरते ती थेट श्रीमंत पेशवाई !

    मूळ अफगाणस्थान सोडून भारताच्या आश्रयास आलेल्या वैदिक धर्मियांच्या दोन अडीच हजार वर्षांतील एकमेव वैभवशाली कालखंड म्हणजे पेशवाई ! ज्या काळात ते प्रत्यक्ष राज्यकर्ते नसले तरी राज्यकर्त्या इतकेच अनियंत्रित अधिकाराचे धनी होते. एकाच वेळी मराठा व तुर्की पातशाही चालवणारे दिवाण, प्रधान होते. किमान ५० वर्षे यांनी दिल्ली तसेच प्रथम सातारा नंतर पुणे दरबारचे राजकारण खेळवले. पण पदरी काय ? जो लौकिक शिवा - संभाजीला मिळवता आला तो यांना कधीच प्राप्त करून घेता आला नाही. त्याही उपर म्हणजे हाती आलेलं राज्यही ते व्यवस्थित चालवू शकले नाहीत. राजकारणाच्या बाह्य कटकटी तसेच राज्यांतर्गत हेवेदावे कितीही असले तरी त्याकाळातील राजकारणात त्यांचे स्थान, सामर्थ्य लक्षात घेता पेशव्यांना व त्यांच्या कारभाऱ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव कधीच झाली नाही असे म्हणता येते.

    पेशवाई बद्दल लेखन करतानाही जातीय कंगोरे आडवे येतात. उदा. :- जिंकले कि पेशवे, हरले कि मराठे ! अशी एक शाब्दिक मांडणी पूर्वसुरींनी --- आधीच्या पिढ्यांतील इतिहासकारांनी जाणीवपूर्वक केली व नंतरच्यांनी नेहमीप्रमाणे बिनडोकी अंधानुकरण केले.

    साधारणतः स. १७४९ अखेर पर्यंत राज्याचा प्रमुख म्हणून सातारकर शाहू छत्रपतीपदावर असेपर्यंत या अवधीत प्राप्त झालेले सर्व विजय - पराजय मराठ्यांचे म्हणता येतात. त्यानंतर रामराजा जरी राज्याचा स्वामी असला तरी सर्व सत्ता पेशव्यांच्या हाती एकवटल्याने विजय - पराजयाचे माप पेशव्यांच्या पदरी पडते. परंतु तांत्रिकदृष्ट्या प्रधान हा राज्याचा स्वामी होऊ शकत नाही. याकरता तुलनात्मक उदाहरण समकालीन तुर्की बादशाहीचे आहे. बादशाही कारभार कधी सय्यद तर कधी निजाम, सफदरजंग यांनी केला. नंतरच्या काळात महादजीने दरबारी राजकारण खेळवले. परंतु त्यामुळे या कालखंडातील बादशाही जय - पराजयांना सय्यद, निजाम वा शिंदे / पेशवे / मराठे असे नामाभिमान प्राप्त झाले नाही. तसेच कोणत्याही इतिहासकाराने तसा उल्लेखही केलेला नाही.