बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - १ )


                                       
दुसरा बाजीराव पेशवा
                                                              

    स. १७९५. मराठी राज्याच्या इतिहासातील एक विलक्षण वर्ष. या वर्षारंभी पानिपतनंतर प्रथमच एकवटलेल्या समस्त मराठी सरदारांच्या संयुक्त सैन्याने खर्ड्याच्या रणभूमीवर स. माधवराव पेशव्याच्या नेतृत्वाखाली निजामाला खडे चारले. पेशवा म्हणेल त्या अटींवर तह करण्याखेरीज त्याच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही. इतकेच नव्हे तर पेशव्याच्या संतोषास्तव त्यास आपला प्रमुख कारभारी मशीरउल्मुल्क यांस पेशव्याच्या स्वाधीन करावे लागले. मराठी राज्याच्या वैभवाचा हा उत्कर्षबिंदूच होता. यानंतर झपाट्याने मराठी राज्य विनशाच्या वाटेस लागले. स. माधवरावाच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या पेशवेपदी अटकप्रसिद्ध ' राघोभरारी ' तथा रघुनाथराव पेशव्याचा मुलगा इतिहास प्रसिद्ध ' दुसरा बाजीराव ' विराजमान झाला. नव्हे बनवला गेला ! 

    बाजीराव पेशवा बनल्यावर मराठी राज्य सावरण्याऐवजी मोठ्या वेगाने विनाशाकडे वाटचाल करू लागले. आधीचे पेशवे शत्रूच्या मुकाबल्यासाठी राजधानी सोडून बाहेर पडायचे पण या पेशव्यास स्वतःच्या सरदारांपासून बचावाण्यासाठी राजधानी सोडून इंग्रजांच्या पाया पडावे लागले. मराठी राज्याचा स्वामी लौकिकार्थाने छत्रपती असला तरी त्या राज्ययंत्राचे चालकत्व पेशव्याकडे असल्याने अशा सर्वशक्तीमान पेशव्यास आपल्या मदतीने पुण्यास नेऊन पेशवाईवर स्थापित करण्यात इंग्रजांना मोठी धन्यता वाटली. पेशव्याच्या जीवास राजधानीत कोणी बरे - वाईट करू नये म्हणून त्यांच्या पलटणी पेशव्याच्या आसपास, छाताडावर तैनात करण्यात आल्या. आपल्या मदतीस धावून येणाऱ्या या आंग्ल मित्राच्या राजी - नाराजीकडे पेशवा जातीने लक्ष पुरवू लागला. परिणामी पेशव्याचे अवसान ओळखून इंग्रजांनी समस्त मराठी राज्य गिळण्याचा प्रयत्न आरंभला. इंग्रजांच्या बेतांची जाणीव होताच बाजीराव धडपडून जागा झाला. अंगी असेल नसेल तेवढी शक्ती, कुवत व कारस्थानी बुद्धी पणास लावून इंग्रजांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी धडपडू लागला. परंतु परिस्थिती, नियती समोर मोठमोठे छत्रपती, शहेनशहा नेस्तनाबूद झाले तिथे या ' नादान ', ' उल्लू ', ' मंत्रावेगळा ' बाजीरावाची कथा काय ? स. १८१८ मध्ये सर्व उपाय हरल्यावर, रणभूमीत इंग्रजांकडून मार खाल्ल्यावर, स्वकीयांनी पाठीत खंजीर खुपासल्यावर या अखेरच्या पेशव्याने इंग्रजांकडे शरणागती पत्करली.   राज्यकारभार, कट - कारस्थानांची दगदग करायची सोडून सालीना आठ लाख तनख्याच्या तैनातीवर संतुष्ट होऊन थो. बाजीरावाचा नातू , दुसरा बाजीराव ब्रम्हावर्तला रवाना झाला. कायमचा ! 

    अशा या रंगेल, रगेल, उल्लू, कारस्थानी, विश्वासघातकी, लंपट, शूर व मुत्सद्दी बाजीरावाच्या राजकीय चरित्राचा आपण संक्षिप्त मागोवा घेऊ.    
स. १७७३ मध्ये नारायणराव पेशव्याचा खून झाल्यावर काही काळ रिक्त झालेल्या पेशवेपदी त्याचा चुलता --- रघुनाथराव विराजमान झाला. परंतु, पुणे दरबारातील सखाराम बापू, नाना फडणीस, हरिपंत फडके प्रभूती मुत्सद्दयांनी आपसांत संगनमत करून कारभारी मंडळ स्थापून प्रथम नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई व नंतर तिचा अल्पवयीन पुत्र स. माधवरावाच्या नावे सत्ता आपल्या हाती घेतली व छत्रपतींच्या मार्फत रघुनाथरावास पेशवाईवरून बडतर्फ केले. केवळ यावरच न थांबता कारभाऱ्यांनी नारायणराव पेशव्याच्या खुनाची चौकशी करून रघुनाथरावास त्या कटाचा प्रमुख सुत्रधार व गुन्हेगार म्हणून घोषित केले व त्यांस पकडण्यासाठी फौजा रवाना केल्या. पुणेकर कारभारी मंडळ व त्यांच्या पक्षपाती सदारांच्या सैन्याचा ठिकठिकाणी मुकाबला करत व त्यांना झुकांडी देत रघुनाथराव उर्फ दादासाहेब पुण्याभोवती घिरट्या घालू लागला. दादाची पुरती नाकेबंदी करण्यासाठी कारभाऱ्यांनी मराठी राज्याचा परंपरागत शत्रू निजामालाही आपल्या पक्षात ओढले तर म्हैसूरकर हैदरअली पुणेकरांऐवजी दादाकडे वळला. मात्र कृष्णेच्या पुढे येण्याची त्याची हिंमत नसल्याने त्याच्या मदतीचा दादाला काय उपयोग होणार होता हे दिसतच होते. मराठी राज्याचे स्वाभाविक शत्रू पुणे दरबारास मिळालेले, परंपरागत सरदार सर्व कारभाऱ्यांकडे सामील झालेले. अशा स्थितीत आपल्या निवडक अनुयायांसह दादा नाईलाजाने इंग्रजांच्या आश्रयार्थ सुरतकडे धावला. यावेळी त्याच्यासोबत त्याचा पूर्ण परिवार --- म्हणजे पत्नी आनंदीबाई, दत्तक पुत्र अमृतराव व काही नाटकशाळा होत्या. पैकी, आनंदीबाई गरोदर असल्याने दादाने तिला माळव्यात धार येथे पवारांच्या जवळ ठेवले व उर्वरित कबिल्यासह त्याने सुरत गाठली. इकडे धार येथे गर्भवती आनंदीबाई दि. १७ जानेवारी १७७५ रोजी प्रसूत होऊन तिला पुत्रप्राप्ती झाली व मुलाचे नाव ' बाजीराव ' असे ठेवण्यात आले. मराठी राज्याच्या इतिहासात हा ' दुसरा बाजीराव ' म्हणून ओळखला जातो.
 
    बाजीरावाच्या आयुष्यातील पहिल्या २० वर्षां पैकी पहिल्या तीन चार वर्षांचा अपवाद केला तर त्याचे १५ - १६ वर्षांचे जीवन हे राजकीय नजरकैदेतच गेले. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांस  पितृवियोग सहन करावा लागला तर १९ व्या वर्षी मातृवियोग ! स. १७९४ मध्ये दि. २७ मार्च रोजी आनंदवल्ली येथे आनंदीबाईचे निधन झाले. त्यावेळी कुटुंबाचे प्रमुखपद बाजीरावाकडे आले. या ठिकाणी रघुनाथरावाच्या मुलांची अगदी थोडक्यात माहिती देतो, ज्यामुळे पुढील घटना समजावून घेणे वाचकांना सोयीचे जाईल.    

    बाजीरावाच्या जन्माआधी, आपणांस पुत्र नाही या कारणास्तव रघुनाथरावाने भुस्कुटे घराण्यातील साडेतीन वर्षीय मुलास दि. १९ एप्रिल १७६८ रोजी दत्तक घेऊन त्याचे नाव अमृतराव असे ठेवले. या दत्तकविधानाचा राजकीय अर्थ काय होता हे आपण यापूर्वीच्या थो. माधवराव तसेच रघुनाथराव विषयी लेखांत तपशिलवार पाहिलेच आहे. सबब त्याची चर्चा येथे करीत नाही. बाजीरावाचा जन्म होईपर्यंत दत्तक असला तरी अमृतरावच दादाचा वारस असे मानले जात होते. परंतु बाजीरावाच्या जन्मानानंतर हे चित्र पालटले व दादाचा खरा वारस म्हणून बाजीरावाचे नाव त्याकाळच्या पद्धतीनुसार पुढे आले. सबब, अमृतरावाचा मान मरातब जरी कायम राहिला तरी त्याचा दर्जा, अधिकार मात्र तुलनेने खालावले. असो, बाजीरावानंतर रघुनाथरावास आनंदीबाईपासून आणखी एका पुत्ररत्नाचा लाभ झाला. परंतु, दादाच्या नशिबात आपल्या दुसऱ्या पुत्राचे मुखदर्शन नव्हते. आनंदीबाई प्रसूत होण्यापूर्वीच दि. ११ डि १७८३ रोजी कचेश्वर येथे दादा वारला आणि ता. ३० एप्रिल १७८४ रोजी आनंदीबाई प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्याचे नाव चिमणाजी असे ठेवण्यात आले. मराठी राज्याच्या इतिहासात दुसरा बाजीराव कुप्रसिद्ध म्हणून तरी मशहूर आहे परंतु त्याचा धाकटा भाऊ दुसरा चिमाजी आपाची माहिती इतिहास अभ्यासक वगळता फारच थोड्या इतिहास वाचकांना आहे. 

    स. १७९४ मध्ये आनंदीबाईचे निधन झाले अन त्याच वर्षाच्या अखेरीस निजामावरील मोहीम उद्भवली. त्यावेळी खबरदारी म्हणून नाना फडणीसने बाजीरावास त्याच्या संपूर्ण परिवारासह आनंदवल्लीतून काढून जुन्नर येथे आणून ठेवले व निजामाची स्वारी संपल्यावर तुमची काहीतरी व्यवस्था लावून देतो असे आश्वासनही दिले. नानाच्या शब्दावर विसंबून बाजीराव आपल्या भावांसह जुन्नरास आला. जुन्नरला त्याचा मुक्काम असतानाच इकडे स. माधवरावाच्या नेतृत्वाखाली मराठी फौजांनी खर्ड्यावर निजामाला लोळवून शरण येण्यास भाग पाडले. यावेळी निजामाने तीन कोट रुपये खंडणी व बत्तीस लाखांचा मुलुख देण्याचे मान्य करून आपल्या लष्कराचा व राज्याचा बचाव केला. त्याखेरीज त्याचा उपद्व्यापी कारभारी गुलाम सय्यदखान उर्फ मशीरुन्मुल्क हा आपणहून नानाच्या ताब्यात राजकीय कैदी म्हणून राहण्यास तयार झाल्याने खर्ड्याची मोहीम संपुष्टात आली. निजामावरील स्वारीचे भव्य यश संपादून पुण्यास परतलेल्या नानाला जुन्नरवरील बाजीरावादी त्रिवर्गाचा एकतर साफ विसर पडला अथवा त्यांची सोय लावण्याची त्याला इच्छा नव्हती असे म्हणा, पण शब्द दिल्याप्रमाणे त्याने मोहीम संपल्यावर बाजीरावाची पुढील व्यवस्था लावून देण्याकडे दुर्लक्षच केले. परिणामी, बाजीरावाने थेट पेशव्यासोबतच संधान बांधण्याचा प्रयत्न केला.   

    बाजीराव व त्याच्या परिवाराच्या रक्षणाकरता पण आतून त्यांच्यावर नजर ठेवण्याकरिता नानाने बळवंतराव नागनाथ वामोरीकर यांस नियुक्त केले होते. बाजीरावाने या बळवंतरावासच घोळात घेऊन त्याच्याच मार्फत स. माधवाकडे चिठी पाठवून ' भेटण्याची इच्छा ' दर्शवली. बळवंतरावाने बाजीरावाची चिठी पेशव्याकडे पोहोचवली खरी, पण त्याची बातमी नानांस लगेच समजली व त्याने बळवंतराव वामोरीकरास कैदेत टाकून पेशव्याची थोडी कानउघडणी केली. नानाच्या नजरकैदेत राहून नानाच्याच माणसाच्या हस्ते एवढे मोठे राजकारण शिजवणाऱ्या रावबाजीच्या कुटील बुद्धीची नानाला हि पहिलीच सलामी होती. नानाने यावेळपासूनच बाजीराव विषयी आपल्या मनाशी खूणगाठ बांधली खरी पण दरम्यान स. माधवाचा अपघाती मृत्यू झाल्याने व त्यांस पुत्रसंतान नसल्याने पेशव्यांच्या मसनदीवर आता कोणास बसवावे हा प्रश्न नानासह सर्वच मुत्सद्दयांच्या पुढे दत्त म्हणून उभा राहिला.   

                                                                                                                                                                              ( क्रमशः )                     

८ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

हे छान जमलंय!

Unknown म्हणाले...

हे छान जमलंय!

sanjay kshirsagar म्हणाले...

धन्यवाद सर !

Kiran म्हणाले...

पण किती हि झाले तरी, शेवटी एकटा लढला हा पेशवा इंग्रजांशी . बाकीच्यांनी आपापल्या जहागिरीचा बचाव केला . तसे याला पण करता आले असते.

sanjay kshirsagar म्हणाले...

त्याखेरीज त्याला दुसरा पर्यायही नव्हता !

Nilesh Limbore म्हणाले...

श्रीमंत दुसरे बाजीराव साहेब यां बाबत बरीच असत्यता लेखात आहे.

Admin म्हणाले...

कमेंट वाला लोकांनी सत्य स्वीकारा पेशवा असला तरी तो जेथे जेथे चुकला तेथे तेथे चुकीचे म्हणा
काही बोलताय की बाकीच्या सरदारांनी आपल्या जहागिरीचा सांभाळ केला... नेतृत्व दुसर्‍या बाजीरावाला सारखे असल्यावर नाही करावा तर काय करावे?

Admin म्हणाले...

यानेही जहागिरीचा सांभाळ करण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली परंतु इंग्रजांनी राज्य गिळायला लागल्यावर बुद्धी आली दुसर्‍या बाजीरावाला