शनिवार, २३ एप्रिल, २०२२

नवं पानिपत, कच्चा खर्डा - १

  प्रास्ताविक :- गेल्या काही वर्षांत वाचकांकडून ' पानिपत असे घडले ' च्या प्रतींची सातत्याने मागणी होत असल्याने सदर ग्रंथाची दुसरी आवृत्ती काढण्याचा विचार होता. परंतु दशकभराच्या कालावधीत बऱ्याच दुर्मिळ संदर्भ साधनांची उपलब्धतता झाल्याने आहे त्याच लेखनाची ( आमच्या मते ) दोषपूर्ण आवृत्ती काढण्यापेक्षा सुधारित आवृत्ती काढण्याचा विचार मनात आला. वास्तविक हे काम आतापर्यंत हातावेगळं व्हायला हवं होतं पण अनेक कारणांनी रखडत गेलं. ती रडकथा येथे न देता यास्थळी प्रस्तावित ग्रंथाचे पहिले प्रकरण, कच्चा खर्डा येथे सादर करत आहे. यात काही उणिवा असतील तर त्या जरूर सांगाव्यात हि अभ्यासू वाचकांना विनंती आहे. 



 प्रकरण १)


कोणतीही घटना म्हणजे तिच्यामागील कार्यरत कारणांचा दृश्य परिणाम असतो. या अनुषंगाने पाहिल्यास पानिपतच्या तिसऱ्या युद्धास कारणीभूत ठरलेल्या बाबींचा आपणांस मुळातून शोध घेणे भाग आहे. 


सामान्यतः अब्दालीचे हिंदुस्थानवरील आक्रमण किंवा स. १७५२ मध्ये होळकर - शिंद्यांनी पुणेकर पेशव्याच्या वतीने दिल्लीकर तुर्की बादशहाच्या वजीरासोबत केलेल्या बादशाही संरक्षक कराराकडे पानिपतचे आद्य कारण म्हणून पाहिले जाते. परंतु अधिक अभ्यासांती हे अर्धसत्य असल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. याचं महत्वाचं कारण म्हणजे अब्दालीचा हिंदुस्थानच्या राजकारणातील प्रवेश वा स. १७५२ चा बादशाही संरक्षक करार या सर्व तात्कालिक घटना होत, कारणे नव्हेत. या घटनांमगील कारणपरंपरा -- किमान अब्दालीच्या हिंदुस्थानातील राजकारणातील हस्तक्षेपाची -- अगदीच निराळी आहे.

त्यामुळे उपरोक्त दोन कारणांकडे पानिपतच्या बनावाचे मूळ म्हणून पाहणे आम्हांस आत्मसंतुष्टता -- जी अत्याधिक मेहनती अभावी येते -- वाटते.


अलीकडच्या काळात पेशव्याचा माळव्यातील प्रवेश हे पानिपतचे आद्य कारण असावे असे आम्हांला वाटत होते. परंतु अभ्यासांति हा निष्कर्ष देखील त्याज्य वाटला. तीच गत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यास ओढ वाटणाऱ्या बंगाल स्वारीची.

अखेर प्रदीर्घ चिंतनानंतर आम्ही या निष्कर्षास आलो की, अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात भोसलेशाहीची -- ज्यावर पुढे पेशवाईचे कलम लावण्यात आले -- राज्यघटना सिद्ध करणाऱ्या स. १७१८ - १९ मधील दिल्लीकर तुर्की बादशहा व छ. शाहूच्या दरम्यान झालेल्या चौथाई व सरदेशमुखीच्या करारात पानिपत स्वारीची बीजं लपलेली आहेत. कित्येकांना हा निष्कर्ष वा सिद्धांत धक्कादायक वा मुर्खपणाचा वाटेल. परंतु सदर ग्रंथात यासंबंधी जे साधार विवेचन करण्यात आले आहे, त्याचे अभ्यासपूर्वक चिंतन, मनन केल्यास कोणताही वाचक आमच्या मताशी सहमत होईल अशी आशा आहे. किमान अंशतः जरी त्यांस आमच्या निष्कर्षांत तथ्य आढळले तरी घेतल्या परिश्रमाचे आम्हांस सार्थक वाटेल.


स. १७१८ - १९ मध्ये सातारकर छ. शाहू व दिल्लीचा तुर्की बादशहा रफीउद्दराजत  यांदरम्यान अनुक्रमे शंकराजी मल्हार, बाळाजी विश्वनाथ व सय्यद बंधूंच्या विद्यमाने झालेल्या चौथाई व सरदेशमुखी करारानुसार सातारकर शाहूला भोसलेशाही संस्थापक छ. शिवाजीच्या राज्याचे कायदेशीर वारस म्हणून दिल्लीच्या तुर्की बादशहाने मान्यता दिली. {१} **

यांमुळे भोसलेशाहीत अनिवार झालेल्या सातारा - कोल्हापूर या दोन गाद्यांच्या वारसा कलहास थोड्याफार प्रमाणात आळा बसला. 


** टीप :-  तांत्रिकदृष्ट्या रफीउद्दराजतने शाहूला दिलेल्या स्वराज्य, चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा बाद ठरतात. बाळाजी विश्वनाथ सनदा घेऊन दक्षिणेत परतल्यावर दिल्लीत राज्यक्रांती होऊन रफीउद्दराजतच्या जागी रोशन अख्तर मुहम्मदशाह तख्तावर बसला. यावेळी निघालेल्या आदेशान्वये फर्रुखसेयर नंतर मुहम्मदशाहची कारकीर्द धरण्यात आल्याने रफीउद्दराजतची कारकीर्द बाद ठरून त्याने दिलेल्या सनदांना कसलाही कायदेशीर आधार राहत नाही. मात्र राजकीय हक्कांमागे नैतिक - अनैतिकतेपेक्षा शस्त्रबळाचे महत्त्व अधिक असल्याने शाहूने या सनदांची अंमलबजावणी लष्करी सामर्थ्याच्या जोरावर करण्याचा प्रयत्न केला. 

दिल्ली दरबारातील गटबाजीच्या राजकारणामुळे दख्खनमध्ये निजामाने शाहूला दिलेल्या सनदांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा त्यांस सिंहासनावरून खाली खेचणे श्रेयस्कर मानले. पालखेडचा संग्राम ही त्याचीच फलनिष्पत्ती होय.

(  उत्तरकालीन मुघल, निजाम - पेशवे संबंध )





करारातील मुख्य अटी :- 

(१) शिवाजीच्या वेळचे स्वराज्य, तमाम  गडकोट सुद्धा शाहूचे हवाली करावे.

(२) अलीकडे मराठे सरदारांनी जिंकलेले प्रदेश म्हणजे खानदेश, गोंडवण, वऱ्हाड, हैद्राबाद, कर्नाटक या भागातले यादीत नमूद केल्याप्रमाणे मोगलांनी सोडून देऊन ते मराठ्यांच्या स्वराज्यात दाखल करावे.

(३) मोगलांच्या दक्षिणेतील मुलुखांवर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतः वसूल करावे. या चौथाईचे बदल्यात आपली पंधरा हजार फौज मराठ्यांनी बादशहाचे मदतीस ठेवावी आणि सरदेशमुखीच्या बदल्यात मोगलांचे मुलखांत मराठ्यांनी चोऱ्या वगैरेंचा बंदोबस्त करावा. 

(४) कोल्हापूरच्या संभाजीस शाहूने उपद्रव करू नये. 

(५) मराठ्यांनी दरसाल बादशहास दहा लाख रुपयांची खंडणी द्यावी. 

(६) शाहू राजांची मातोश्री, कुटुंब, छत्रपती संभाजीचा दासीपुत्र मदनसिंग वगैरे दिल्लीस बादशहाचे कबजात आहेत, त्यांस सोडून स्वदेशी पावते करावे. {२} 



विवेचन :- उपरोक्त करारान्वये शाहू हा तुर्कांचा मांडलिक बनल्याची टीका अनेकांनी केली असली तरी वास्तविकता वेगळीच आहे.

शाहू औरंगजेबाच्या नजरकैदेत असताना बादशहाने त्याला सात हजार मनसबदारी व राजा ही पदवी बहाल केली होती. {३} 

महत्वाची बाब म्हणजे तुर्की साम्राज्यात शाही परिवारातील सदस्या व्यतिरिक्त व्यक्तीस दिली जाणारी ही सर्वोच्च मनसबदारी होती. {४} 

यावरून भविष्यात पुढे मागे शिवाजीच्या राज्याचा काही भाग त्याच्या वारसांना आपले अंकित करून द्यायचा झाल्यास तुर्कांची पहिली पसंती शाहू असणार हे ओघानेच आले. यदाकदाचित शाहू मरण पावला तरच बदलत्या राजकारणाचा विचार करून त्यांना इतर पर्याय अवलंबता येणार होते. ज्यामध्ये तुर्कांचे अधिपत्य मान्य केल्यास ताराबाईपुत्र देखील शिवाजीच्या राज्याचे कायदेशीर वारस म्हणून घोषित केले जाऊ शकत होते.


एखादी पुरातन राजवट नष्ट झाल्यावर त्या जागी तितकीच समर्थ सत्ता येणे अत्यावश्यक असते. अन्यथा मुलखांत अंदाधुंदी निर्माण होते.

औरंगजेबाच्या महत्वाकांक्षी दख्खन मोहिमेत विजापूर, गोवळकोंडा या विस्तीर्ण भूभागावर शासन करणाऱ्या दोन पुरातन ( किमान दीड दोन शतक ) सत्ता नष्ट झाल्या खऱ्या, परंतु त्या जागी आपले प्रतिनिधी नेमून त्या प्रदेशांत शांतता व सुव्यवस्था राखण्यात औरंगजेबास अपयश आले. परिणामी निर्माण झालेल्या या पोकळीचा फायदा घेण्यास अनेक महत्वकांक्षी, धाडसी तरुण पुढे सरसावले. ज्यामध्ये औरंगजेबाचा मृत्यू व भविष्यातील आपल्या हितावर दृष्टी ठेऊन असलेले झुल्फिकारखान सारखे बादशाही उमराव देखील होते. 


अफगाण, राजपुताना व दख्खन या तीन मुख्य प्रांतांत दीर्घकाळ चाललेल्या लष्करी मोहिमांवर तुर्की साम्राज्याचा खजिना व लष्करी बळ खर्ची पडले होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर उसळलेल्या वारसा युद्धांनी त्यात भरच पडली. दख्खन स्वबळावर सांभाळण्याची कुवत आता तुर्कांच्या लष्करी सामर्थ्याबाहेर होती. अशा वेळी त्यांना एका सहाय्यकाची गरज होती, जी शाहूच्या रूपाने त्यांस लाभली. सदर करारावर टीका करताना या सर्व बाबी लक्षात घेतल्यास शाहूने बदललेल्या राजकीय स्थितीचा अधिकाधिक फायदाच घेतल्याचे दिसून येते.


या करारान्वये शाहूला भोसलेशाहीचा कायदेशीर वारस म्हणून हिंदुस्थानच्या सार्वभौम सत्तेकडून मान्यता मिळाली. दख्खनच्या सहा सुभ्यातून चौथाई व सरदेशमुखी वसुलीचे अधिकार मिळाले, जे दख्खनमध्ये तुर्की सत्ता बलवान असती तर कधीच मिळाले नसते. खेरीज शाहूच्या सरदारांनी, शाहूला मिळालेल्या भोसलेशाहित मोडणाऱ्या प्रदेशाव्यतिरिक्त, जे भूप्रदेश आपल्या ताब्यात घेतले होते त्यांस तुर्कांनी मान्यता दिली. याबदल्यात शाहूने दिल्ली दरबारास दरसाल दहा लाख रुपये खंडणीदाखल देण्याचे मान्य केले. तसेच बादशहाचा दख्खनमधील प्रतिनिधी -- दख्खन सुभेदाराच्या हाताखाली काम करण्याचे मान्य केले. 

दख्खनमध्ये शाहू तसेच पुढील काळात पेशवे निजामाला उखडून का काढू शकले नाहीत किंवा निजामाने आपणांस स्वतंत्र सत्ताधीश म्हणून अधिकृत घोषणा का केली नाही, याचे गुपित या करारात दडलेलं आहे.

त्याचप्रमाणे कोल्हापूरकरच्या संभाजीला तुर्कांकडून परस्पर संरक्षण लाभल्याने जर शाहू कराराविरुद्ध वागल्यास कोल्हापूरच्या संभाजीला त्याच्या जागी शिवाजीच्या राज्याचा वारस म्हणून नियुक्त करण्याची मोकळीक बादशहाने स्वतःकडे ठेवली. 

एवंच, सातारकर छत्रपतींनी स्वतःच्या नावाने स्वतंत्र नाणी का पाडली नाहीत किंवा बादशाही अंमल पूर्णतः का झुगारून दिला नाही इ. प्रश्नांची उत्तरे आपणांस उपरोक्त करारात मिळतात.


प्रस्तुत करारातील चौथाई व सरदेशमुखी या संज्ञांचे अल्पसे विवेचन आवश्यक वाटते.

चौथाई :- एखाद्या दुर्बल सत्तेच्या रक्षणार्थ केलेल्या मदतीच्या बदल्यात बलवान सत्तेने घेतलेला मोबदला म्हणून त्या दुर्बल सत्तेच्या एकूण उत्पन्नापैकी चौथा हिस्सा असे याचे थोडक्यात वर्णन करता येईल. विचाराधीन कालखंड व प्रकरणात मात्र या चौथाईचा अर्थ वेगळाच दिसतो.

दख्खनच्या सहा सुभ्यांना परचक्राची धास्ती कोणाकडून होती ? किंवा या सुभ्यांना उपद्रव प्रामुख्याने कोण देणार होते ? या प्रश्नाचे सर्वात जास्त संभवणारे उत्तर म्हणजे सातारकर व कोल्हापूरकर छत्रपतींच्या नावे मुलखांत फिरणारे फौजबंद मराठी सरदार. यांना आळा घालण्याचे म्हणजेच आपसांत झुंजण्याचे काम देऊन सय्यदांनी एकप्रकारे मराठी सत्तेला दुर्बल करण्याचाच डाव आखला असे म्हणावे लागते. त्यामुळे शाहूला चौथाई देणे म्हणजे दिल्लीकर तुर्कांनी भोसल्यांची प्रबळ सत्ता मान्य करणे वा त्यांना आपले संरक्षक म्हणून बरोबरीच्या नात्याने किंवा किंचित वरचढ मानणे असा केवळ आत्मप्रौढीस्तव अल्प अर्थ गृहीत धरणे आम्हांस योग्य वाटत नाही. मात्र त्याचबरोबर या चौथाई मान्यतेमुळे दख्खनमध्ये तुर्क दुर्बल असल्याच्या समजुतीस खुद्द तुर्की सम्राटानेच कबुली दिल्यासारखे झाले, हेही दृष्टीआड करता येत नाही. याचा फायदा शाहूच्या सरदारांना आपापल्या संघराज्यांतर्गत सत्ता विस्तारार्थ कसा झाला याचे विवेचन पुढे येणारच आहे.


सरदेशमुखी :-  {५} सरदेशमुखी संबंधी विवेचन करण्यापूर्वी आपणांस प्रथम हे लक्षात घ्यावे लागेल की, मराठी राज्याच्या अंमलात सुमारे साठ गावांचा एक तर्फ ; दीडशे ते दोनशे गाव म्हणजे दोन ते चार तर्फ मिळून एक महाल अथवा परगणा बनत असे आणि काही परगणे मिळून एक सुभा. 

देशमुख हा परगण्यावरील अधिकारी, वतनदार असून सरकारी वसूल गोळा करणे; परगणा वा महालात शांतता, सुव्यवस्था राखणे ही त्याची मुख्य दोन कामे. याबदल्यात त्यांस वसुलाचा एक दशांश भाग देशमुखास प्राप्त होई. त्याची विभागणी शेकडा पाच टक्के धान्य वा रोख रकमेच्या रुपात व पाच टक्के जमिनीच्या रूपाने अशी होती.

खेरीज प्रसंगोत्पात मुख्य सत्तेच्या मदतीकरता परगण्यातून  लष्कर भरतीचे कामही त्याला करावे लागे.

या देशमुखांवरील मुख्य अधिकारी म्हणजे सरदेशमुख. 

सुक्ष्मार्थाने पाहिलं तर तुर्कांकडून मिळणाऱ्या अधिकाराच्या जोरावर तुर्की साम्राज्यावर आपल्या राज्याचे कलम लावण्यासाठी या सरदेशमुखीचा वापर करता येऊ शकत होता. 

आता या सरदेशमुखी वतनप्राप्तीतून शाहूने नेमके काय साधलं हे पाहू गेल्यास आपणांस फक्त दोन गोष्टी आढळून येतात व त्या म्हणजे (१) दिल्लीची तुर्की बादशाही, देशाची सार्वभौम सत्ता असून त्यांनी दिलेल्या इनाम - वतनांच्या सनदाच कायम राहतात, कायदेशीर समजल्या जातात.

(२) सरदेशमुखी वतनातून शाहूने आपल्या व राज्याच्या निश्चित उत्पन्नाचा एक स्रोत सुरक्षित करून ठेवला.


स. १७१८ - १९ च्या शाहू - तुर्की बादशहा दरम्यान झालेल्या चौथाई करारानुसार शाहूला दख्खन मधील पुढील सहा सुभ्यांतून चौथाई वसुलीचे अधिकार मिळणार होते :- खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद, बिदर, विजापूर आणि हैद्राबाद


या सहा सुभ्यांतून चौथाई वसुली तसेच राज्यसंरक्षण - वृद्धीकरता शाहूने आपल्या प्रमुख सरदारांना पुढीलप्रमाणे कार्यक्षेत्र विभागून दिले होते :- पेशवे - खानदेश व बालाघाटचा काही भाग ; सेनासाहेब सुभा भोसले - वऱ्हाड, पाईनघाटचा प्रदेश व गोंडवनच्या पूर्वेकडील भाग ; सरलष्कर - गंगथडी व औरंगाबाद ; फत्तेसिंग भोसले - कर्नाटक ; प्रतिनिधी - नीरेपासून वारणेपर्यंतचा प्रदेश व हैद्राबाद - बेदर कडील मुलुख ; चिटणीस व आंग्रे - कोकण ; सचिवाने आपली जहागिरी सांभाळून साहोत्राचा अंमल करावा.


दिल्ली दरबारातील गटबाजीच्या राजकारणात मराठी सत्तेचा प्रवेश :- इतिहासात जर तरला स्थान नसते. त्याचप्रमाणे व्यवहारात सर्व घटना आपल्या मनानुरूप घडतील असेही नसते. सय्यदांच्या मार्फत शाहूने दिल्लीकर तुर्की बादशाही सोबत करार केल्यानंतर मराठी सत्तेच्या चालकाच्या मनी असो नसो, त्याचा दिल्ली दरबारातील गटबाजीच्या राजकारणात प्रवेश झाला होता. एक बलदंड नसले तरी बऱ्यापैकी उपद्रवमूल्य असलेल्या शाहूची उपेक्षा करणे दिल्ली दरबारच्या मुत्सद्द्यांना आता शक्य नव्हते.


दिल्ली दरबारचे राजकारण समजावून घेण्यासाठी प्रथमतः आपणास त्या दरबारातील प्रमुख गट, त्यांचे प्रमुख व उद्दिष्टांची तोंड ओळख करून घेणे भाग आहे.


दिल्ली दरबारातील मुख्य गट तुराणी तुर्कांचा असून प्रामुख्याने निजाम व त्याचे नातलग या गटाचे एकप्रकारे अध्वर्यू होते. खुद्द निजामाची महत्वाकांक्षा, दरबारी राजकारणाच्या गटबाजीत अडकण्यापेक्षा वेगळी होती. त्याला दख्खनचे सहा सुभे व गुजरात आणि माळवा हे दोन सुभे मिळून एक भले मोठे राज्य स्थापन करायचे होते. बाकी त्याचा चुलतभाऊ मुहम्मद अमीनखान व त्याचे वंशज मात्र दरबारी कट कारस्थाने व दरबारातील आपल्या घराण्याचा वरचष्मा टिकवण्याच्या धडपडीत असल्याचे आपणांस दिसून येते. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे, तख्तावर बसलेले बाबर व त्याचे वंशज देखील तुराणी तुर्क होते. 


दरबारातील दुसरा महत्वाचा गट इराणी तुर्कांचा होय. इराणी व तुराणी या प्रादेशिक संज्ञा असून सामान्यतः इराणातील ते इराणी तर इराणच्या उत्तरेकडील व सैबेरियाच्या दक्षिणेकडच्या प्रदेशातील ते तुराणी अशी सामान्यतः विभागणी केली जाते. {६} 

या इराणी गटाचा म्होरक्या सादतखान असून पुढील काळात त्याचा भाचा व जावई सफदरजंग व पश्चात त्याचा मुलगा सुजाउद्दौला यांनी या गटाचे पुढारपण केले. विशेष म्हणजे हे शिया पंथीय होते. 


दरबारातील तिसरा गट हिंदू सरदारांचा असून त्यामध्ये राजपूत संस्थानिकांचा खूप मोठा भरणा होता. बाबर - अकबरचे तुर्की साम्राज्य विस्तारले, स्थिरावले ते या राजपुतांच्या बळावरच ! परंतु औरंगजेबाची कारकीर्द राजपुतांना भोवल्याने हा गट वरवर साम्राज्याप्रति राजनिष्ठ तर आतून कट्टर विरोधी बनू लागला होता. दरबारात या गटाचे नेतृत्व अंबरचा सवाई जयसिंह व जोधपूरचा अजितसिंह करत होते. हे दोघेही वरकरणी बादशाही तख्ताशी एकनिष्ठता दर्शवत आतून साम्राज्यविरोधी कारवाया करत आपापल्या राज्यांच्या विस्तारात गुंतले होते. 


खेरीज अफगाणांचा एक छोटा परंतु शक्तिशाली गट असून या गटाच्या मनात देखील दिल्लीच्या तख्ताप्रति तितकीशी आदराची, निष्ठेची भावना नसल्याचे आपणांस उपलब्ध इतिहासावरून दिसून येते. 


या चारही गटांतील प्रमुख उमरावांना तुर्की बादशाहीचा पोकळ डोलारा राखून आपापलं स्वतंत्र संस्थान थाटायचं होतं, थाटलेलं विस्तारायचं होतं. वरवर ते सम्राट, साम्राज्याविषयी निष्ठावान असल्याचा देखावा करीत असले तरी मनात साम्राज्याचे लचके तोडून आपापल्या राज्यांना कसे जोडता येतील याचे डावपेच अहर्निश घोळत असत.

परंतु एक गोष्ट नाकबूल करता येत नाही व ती म्हणजे तुर्की बादशाहीचा जर थोडाफार अभिमान कोणास असेल तर देशबंधुत्व या नात्याने फक्त तुराणी गटासच. 

अशा या अंतस्थ गटबाजीने ग्रासलेल्या दिल्लीकर तुर्की दरबारात सय्यदांनी घडवून आणलेल्या चौथाई - सरदेशमुखीच्या तहा निमित्ताने शाहूचा -- पर्यायाने मराठी सत्तेचा प्रवेश झाला.  


आरंभी, म्हणजे मराठी सत्तेचा माळव्यात शिरकाव होऊन तिथे तिचा अंमल प्रस्थापित होईपर्यंत राजकारणी पटावरील एक सोंगटी, यापलीकडे फारसा उपयोग असल्याचे प्राप्त इतिहासावरून दिसत नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे दरबारातील दोन बलिष्ठांचे -- जयपूरकर सवाई जयसिंह व चीनकिलीचखान उर्फ निजाम उल्मुल्क या दोघांचे माळव्यात गुंतलेले हितसंबंध. {७} 


जयसिंहाला आपल्या राज्याचा विस्तार यमुना ते नर्मदेच्या किनाऱ्यापर्यंत करायचा होता. माळव्यातील अंतर्गत स्थिती त्याच्या महत्वाकांक्षेस प्रेरक अशीच होती. माळव्यातील बव्हंशी संस्थानिक, जमीनदार घराणी राजपुतांची असून त्यावर मेवाड, जयपूर, जोधपूरकरांचा -- विशेषतः जयपूरच्या जयसिंहाचा प्रभाव होता. त्यामुळे जयसिंहाला माळव्याप्रति अभिलाषा उत्पन्न होणे स्वाभाविक होते.


स. जयसिंह प्रमाणेच माळव्यावर निजमाचीही दृष्टी खिळलेली होती. दख्खनमध्ये स्वतंत्र सत्ता स्थापायची तर माळव्यावर नियंत्रण -- संरक्षण व आक्रमण, दोन्ही दृष्टीने -- अत्यावश्यक होते. त्यामुळे माळवा घशात घालण्यासाठी तो टपून बसला होता.


प्राचीन काळापासून आर्थिक, सामरिकदृष्ट्या असलेलं माळव्याचं महत्त्व या दोन बलाढ्य तुर्की मनसबदारांनी पुरेपूर ओळखलं असल्यानं माळव्याबाबत या दोघांचीच मुख्य स्पर्धा सुरु असली तरी या दोघांचे डाव हाणून पाडण्याच्या इतरही घटना घडत होत्या. परिणामी आपला बेत सिद्धीस नेण्यासाठी यांनी तिसऱ्या पक्षाचा -- माळव्यात औरंगजेबाकडून बीजगड येथे जहागीर प्राप्त व दख्खनच्या चौथाईची सनद मिळण्यापूर्वीच माळव्यावर चढाई करण्यास उत्सुक असलेल्या सातारकर शाहूचा वापर करण्याचे योजले.


निजाम आणि जयसिंहाचे माळव्यासंबंधी कारस्थानी बेत व शाहूचा त्यांनी केलेला वापर समजण्यासाठी आपणांस माळव्याचे सुभेदार, विचाराधीन कालखंडात कोण कोण होते, हे पाहणे आवश्यक आहे.


स. जयसिंह :- फेब्रु. स. १७१३ - नोव्हें. १७१७

मुहम्मद अमीनखान :- नोव्हें. स. १७१७ - डिसें. १७१८

निजाम :- फेब्रु. स. १७१९ - ऑगस्ट १७२२    

गिरधर बहादूर :- ऑगस्ट स. १७२२ - मे १७२३

निजाम :- मे स. १७२३ - जून १७२५   ( निजामाने नायब सुभेदार म्हणून अजीमुल्लास नियुक्त केले. ) 

गिरधर बहादूर :- जून स. १७२५ - १७२८ {८}


या जोडीला आणखी तीन नोंदींची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे व त्या म्हणजे :-  स. १७२० मध्ये निजामाला दख्खनची सुभेदारी प्राप्त झाली.

दि. १० ऑगस्ट १७२० रोजी बाळापूरच्या लढाईत सय्यद बंधूंचा पुतण्या आलम अली - निजामाचा मुकाबला होऊन आलमअली मारला गेला व निजाम विजयी झाला. ही घटना सय्यद बंधूंचा विनाशारंभ म्हणूनही ओळखली जाते.

दि. १३ फेब्रु. १७२२ रोजी निजामास दिल्लीच्या तुर्की बादशाहने आपली वजिरी बहाल केली व दि. ७ डिसें. १७२३ रोजी निजामाने वजिरीचा राजीनामा देत दख्खनची वाट धरली. {९}


या सर्व घटनाक्रमांवरून स्पष्ट होणारी बाब म्हणजे -- स. १७२० मध्ये निजामास प्राप्त झालेली दख्खन सुभेदारी व बाळापूरच्या लढाईत आलमअली मारला जाऊन सय्यद पक्षीयांचा झालेला पराभव, या दोन घटनांचा दृश्य एकत्रित परिणाम म्हणजे शाहूचा कल सय्यद बंधूंकडून वळून निजामाच्या बाजूने झुकला. अर्थात, चौथाई करारानुसार तो दख्खन सुभेदाराचा ताबेदार होता, तेव्हा त्याला निवडीकरता पर्यायच नव्हता.


बाळापूरच्या लढाईने निजामाचे दख्खनमधील आसन स्थिर झाले. या लढाईनंतर अवघ्या काही महिन्यांत दिल्ली दरबारातून सय्यदांचा नायनाट झाल्यानंतर तुराणी गटास महत्व क्रमप्राप्त होते. तेव्हा या बड्या तुराणी उमरावास दुखावण्याची जोखीम शाहू व त्याचे सरदार उचलणे शक्य नव्हते. यामुळेच की काय, निजामाच्या माळवा सुभेदारीच्या काळात ( स. १७१९ - २२ व स. १७२३ - २५ ) शाहूच्या सरदारांनी माळव्यावर प्रखर हल्ले चढवले नाहीत. {१०} 


स. १७२४ च्या  मध्ये निजामाने शाहूच्या मदतीने बादशाह तर्फे घोषित दख्खन सुभेदार मुबारिझखानाचा साखरखेडल्याच्या लढाईत पराभव केला. युद्धात मुबारिझखान मारला गेल्याने हताश बादशहाने निजामासच दख्खन सुभेदार म्हणून फेरनियुक्त केले. 

साखरखेडल्यावर मुबारिझखान -- पर्यायाने बादशाही पक्षास धूळ चारून निजामाने दख्खनमधील आपले आसन बळकट करत पुढील काळात शाहूच्या वाढत्या सत्तेला आळा घालण्याचा प्रयत्न केला. 



साखरखेडल्यावर निजामाची मदत करण्यामागे, तो आपणांस दख्खनमधील आपल्या चौथाई - सरदेशमुखी हक्क वसुलीस अडथळा करणार नाही व त्याच्या मार्फत माळवा - गुजरात मधून चौथाई व सरदेशमुखी मिळेल अशी शाहू पक्षीयांची अपेक्षा होती. परंतु निजाम मोठा धूर्त राजकारणी होता. प्रथम त्याने शाहूच्या मदतीने आपली सत्ता निष्कंटक केली. नंतर  कोल्हापूरकर संभाजीला पुढे करून शाहूच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. ज्याची परिणती पुढे पालखेडच्या रणभूमीवर निजामाच्या पराभवात झाली. ( फेब्रु. - मार्च स. १७२८ )



इकडे माळव्याच्या सुभेदारीत बदल होऊन निजामाच्या जागी गिरधर बहादूरची नियुक्ती झाली. नव्या सुभेदाराकडे शाहूच्या हस्तकांनी रीतसर चौथाई व सरदेशमुखी वसुलाची मागणी केली असता त्याने ती धुडकावून लावली. दरम्यान निजामाचा माळव्यातून उठावा झाल्यावर स. जयसिंहास आपले राजकारण खेळण्याची मोकळीक मिळून त्याने माळव्यातील जमीनदार - संस्थानिकांना गिरधर बहादूर विरुद्ध -- पर्यायाने बादशाही सत्तेविरुद्ध चिथावणी देत दुसरीकडे शाहू व मुत्सद्द्यांना माळव्यावर आक्रमणाची भर दिली. 

यामागे त्याचा प्रधान हेतू, गिरधर बहादूर वा अन्य कोणा तुर्की मनसबदारास माळव्याच्या सुभेदारीवर काम करणे अशक्य होऊन ती जबाबदारी आपल्यास प्राप्त व्हावी व शाहू आपला स्नेही असल्याने त्यांस वार्षिक निश्चित एक रक्कम भरून माळव्यातील आपली सत्ता निष्कंटक व दृढ करावी असा होता.


स. जयसिंहाचा प्रेरणेने पेशवे बंधू हिंदुस्थानची वाट चालू लागले. बाजीराव बुंदेलखंड तर चिमणाजी आपा माळव्यात उतरला. यावेळी माळव्यात अमझेरा वगैरे ठिकाणी झालेल्या संघर्षात गिरधर बहादूर, दया बहादूर हे मातबर शाही उमराव मारले जाऊन बादशाही पक्षाचा पराभव झाला. ( दि. २९ नोव्हेंबर १७२८ )


वस्तुतः माळव्यात इतकं यश मिळेल अशी खुद्द पेशवे बंधूंनाही अपेक्षा नव्हती. उलट राज्याचे कर्ज निवारण्यासाठी व कुठून तरी चौथाई, सरदेशमुखीच्या रकमा वेळेवर वसूल व्हाव्यात यासाठी त्यांनी आपले प्रयत्न आरंभले होते. {११}


गिरधर बहादूरचा नाश झाल्यावर अपेक्षेप्रमाणे दिल्ली दरबारने माळव्याच्या संकटावर उतारा म्हणून स. जयसिंहास माळव्याची सुभेदारी देऊ केली. 

मनाशी आखलेल्या डावाप्रमाणे जयसिंहाने शाहूकडे वकील पाठवून गुजरात - माळव्याकरता अनुक्रमे पंधरा व अकरा लक्ष देण्याचे कबूल केले. बदल्यात मराठी सरदार नर्मदा पार करून उपरोक्त प्रांतांना तसदी देणार नाही याची ग्वाही शाहूने दिली. {१२} 

परंतु ही बोलणी, तहनामा आकारास येण्यापूर्वीच स. जयसिंहाकडून माळव्याची सुभेदारी काढून घेत महंमद खान बंगशला देण्यात आली. परिणामी माळव्याच्या बाबतीत शाहू - बादशाह दरम्यान समझोता होण्याची आशा दुरावली.



महंमद खान बंगशने स. १७३०सप्टें. ते १७३२ सप्टेंबर अशी जवळपास दोन वर्षे माळव्याची सुभेदारी केली. दरम्यान मराठी सरदारांना माळव्यातून बाहेर काढण्याचे त्याने शर्थीचे प्रयत्न केले. आरंभी त्यांस यश येण्याची चिन्हे दिसत होती.


सातार दरबारातील पेशवे - सेनापती दरम्यान चुरस विकोपास गेली होती. सेनापती त्रिंबकराव दाभाडेने पेशव्याचा बंदोबस्त करण्यासाठी निजामाची मदत मागितली. खेरीज कोल्हापूरकर संभाजी सोबत देखील त्याचे राजकारण खेळू लागले. पालखेडचा पराभव निजामाच्या मनाला लागून राहिला होता. तो गमावलेला डाव, स्वतःस अधिक तोशीस न पडता, भरून काढण्यासाठी त्याने संभाजी व दाभाड्याला चिथावणी देण्याचे काम केले.


या तिघांनी आखलेल्या नव्या मसलतीनुसार दाभाडे, कंठाजी कदम बांडे, उदाजी पवार वगैरे मंडळी बाजीरावाचा बंदोबस्त करणार होती. इकडे कोल्हापूरकर संभाजी शाहुवर चढाई करणार होता. अशा प्रकारे छत्रपती व पेशव्याला एकेकटे गाठून त्यांचा निकाल लावण्याचा या त्रिकुटाचा बेत होता. तो साधल्यास कोल्हापूरकर संभाजी छ. शिवाजीच्या राज्याचा कायदेशीर वारस बनणार होता. तख्तावरील धनी बदलला उत्तम, न बदलल्यास व पेशव्याचा बंदोबस्त झाला तर दरबारात सेनापतीचा वरचष्मा राहणार होता. या दोघांचेही मनोरथ साधल्यास चौथाई - सरदेशमुखीच्या जोखडातून आपली सुटका होईल बहुधा निजामास आशा असावी. 

सारांश, आपले अस्तित्वच धोक्यात आल्याने माळव्याकडे शाहू व पेशव्याचे दुर्लक्ष होणे स्वाभाविक होते. 

या काळात बंगशने आरंभी आक्रमक भूमिका घेत उज्जैन पर्यंत धडक मारली. परंतु ही उभारी शेवटपर्यंत टिकू शकली नाही.


स. १७३० च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत शाहूने चढाई करून कोल्हापूरकर संभाजीस तहाची याचना करण्यास भाग पाडले.  तेव्हा पेशव्याविरोधात एक दाभाडेच हुकमी बाण राहिला होता. 


राजकारणाचा बदलता रंग पाहून निजाम मार्च महिन्याच्या उत्तरार्धात नर्मदेकिनारी आला. इथे पूर्वसंकेतानुसार बंगशने त्याची भेट घेतली. दहा बारा दिवस दोघांची गुप्त खलबतं चालून निजाम दाभाड्याच्या मदतीसाठी गुजरातकडे वळणार त्यापूर्वीच दि. १ एप्रिल १७३० रोजी डभईच्या लढाईत बाजीराव पेशव्याने त्रिंबकराव दाभाड्यास ठार करून निजामाच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले.


यानंतर पेशवा व त्याच्या सरदारांनी माळव्यावर आपले लक्ष केंद्रित केले. परिणामी बंगशची पीछेहाट होऊन त्याने मराठी सरदारांशी तडजोड आरंभली. {१३} 

दिल्ली दरबारास बंगशची भूमिका न पटल्याने माळव्याच्या सुभेदारीवर त्याच्या जागी स. जयसिंहाची फेरनियुक्ती करण्यात आली. ( सप्टें, स. १७३२ ) 


स. जयसिंहाची सुभेदारी ( स. १७३२ - ३७ ) विशेष संस्मरणीय आहे. या पाच वर्षांच्या काळात तुर्की सम्राटाने माळव्यातून मराठी सरदारांना बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्व प्रयत्न करून पाहिले. परंतु अंती त्याच्या निराशाच पदरी पडली. माळव्याची सुभेदारी लाभताच स. जयसिंहाने देखील राजकारणाचा बदलता रंग पाहून प्रथमतः मराठी सरदारांवर शस्त्र धरण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु मंदसोर जवळ होळकर शिंद्याने त्यांस घेरून तहास भाग पाडले. सहा लाख रुपये व माळव्यातील अठ्ठावीस परगणे देण्याच्या शर्तीवर त्याची सुटका झाली. ( स. १७३३ फेब्रु. ) {१४}

याच काळात आणखी एक महत्वाची घटना घडून आली, ज्यामुळे राजपुतांशी असलेल्या मराठी सत्तेच्या संबंधांना एक निराळेच वळण लाभले.


राजपुतान्यातील आपलं महत्व व राज्य वाढवण्याची जयसिंहाची मोठी हाव होती. त्यामुळे संधी मिळताच आपल्या राज्याशेजारील लहान लहान संस्थानं या ना त्या प्रकारे गिळंकृत करण्याचा त्याने सपाटा लावला होता. त्याच्या याच विस्तारवादी धोरणातून बुंदीचे प्रकरण उद्भवले.

बुंदीला त्यावेळी बुधसिंह राज्य करत होता. स. जयसिंहाने अनुकूल संधी साधून बुधसिंहास पदच्युत करत त्याजागी दलीलसिंह हाडाची स्थापना करत त्याला आपली मुलगी देत त्याच्याशी नातेसंबंधही प्रस्थापित केले. दलीलसिंहाच्या थोरल्या भावास -- प्रतापसिंहास हा प्रकार आवडला नाही. त्याने बुधसिंहाचा पक्ष घेत छ. शाहूकडे मदत मागितली. तेव्हा शाहूच्या हुकुमावरून स. १७३४ च्या एप्रिलांत शिंदे, होळकर, पवार इ. नी बुंदीवर हल्ला चढवून ते संस्थान बुधसिंहास बहाल केले. याप्रसंगी बुधसिंहाच्या पत्नीने होळकरास राखी बांधून त्यांस आपले भाऊ मानले. मात्र मराठी सरदारांची पाठ फिरताच स. १७३४ स. जयसिंहाने फिरून बुंदीचा ताबा घेत दलीलसिंहास तेथील गादीवर बसवले. {१५}


बुंदी प्रकरणाने स. जयसिंहाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. भविष्यातील संकटावर उतारा म्हणून स. १७३४ च्या जुलैमध्ये प्रमुख राजपूत राजांची एक बैठक बोलावली. त्या बैठकीत पावसाळ्यानंतर मराठी सरदारांविरुद्ध एकत्रित मोहीम आखण्याचे निश्चित झाले खरे, परंतु करारानुसार कारवाई मात्र झाली नाही. इकडे जयसिंहाने देखील यावेळी दुटप्पी राजकारण खेळत एकीकडे राजपूत राजांची मराठी सरदारांविरुद्ध फळी उभारत दुसरीकडे अंतस्थरित्या पेशव्यासोबत तहाची बोलणी आरंभली. {१६}


इकडे दिल्ली दरबारात माळव्यातून मराठी सरदारांना हाकलून लावण्यासाठी जोरदार तयारी चालली होती. खासा वजीर कमरुद्दीनखान, मीरबक्षी खानडौरा इ. बडे उमराव स्वतः सैन्याचे नेतृत्व करत मैदानात उतरले. 


स. १७३४ च्या पावसाळ्यापासून ते स. १७३८ च्या जाने. पर्यंत माळव्याकरता तुर्क व मराठी सरदारांत बराच संघर्ष झाला. तटस्थपणे पाहिले असता या प्रचंड मोठ्या भासणाऱ्या झगड्यातून पेशव्याच्या पदरी पडलेला फायदा अत्यंत अल्प होता.


प्रथमतः त्यांस माळव्याची नायब सुभेदारी मिळाली. बादशहाकडून जहागीर व मनसबदारीचे फर्मान प्राप्त झाले. {१७}

पैकी पेशव्याची नायब सुभेदारी, स. १७३८ मध्ये माळव्यावर  निजामाच्या मोठ्या मुलाची -- गाजीउद्दीनची सुभेदार म्हणून नियुक्ती झाल्यावर आपोआप संपुष्टात आली तर मनसबी बद्दल माहिती मिळत नाही.


बादशहा - पेशवा संघर्षातील बाजीराव पेशव्याची दिल्ली स्वारी ही अत्यंत महत्वाची घटना मानली जाते. वस्तुतः पेशव्याच्या या स्वारीने राजकारण वा संघर्षावर कसलाही परिणाम न होता उलट बादशहाने दख्खनमधून निजामास आपल्या मदतीकरता बोलावत त्याच्यामार्फत माळव्यावर आणखी एक स्वारी करवली. दिल्लीला धडक मारून दख्खनला परतलेल्या पेशव्यास पुनः माळव्याच्या बचावार्थ नर्मदापार यावे लागले. भोपाळ येथे त्याने निजामाला कोंडीत पकडून तहास भाग पाडले.

पेशव्याच्या यावेळी मुख्य मागण्या -- (१) माळव्याच्या सुभेदारी व जहागिरीची सनद बादशहाकडून मिळवून देणे. 

(२) पेशव्याच्या खर्चासाठी पन्नास लक्ष बादशाहकडून मिळवून देणे. 


भोपाळचा संग्राम आटोपल्यावर निजाम दिल्लीला परतला. त्यावेळी हिंदुस्तानच्या सरहद्दीवर इराणचा सम्राट नादिरशहा येऊन थडकल्याने दिल्ली दरबाराचे लक्ष तिकडेच गुंतून राहिले व त्यामुळे भोपाळच्या तहातील अटी कागदावर राहून बाजीरावाच्या पदरी पोकळ लौकिक व सैन्याचा खर्च यापलीकडे फारसे काही पडले नाही. 


नादिरशाहची हिंदुस्थान स्वारी {१८}:- स. १७३८ पासून ते स. १७३९ च्या मे पर्यंत नादिरशहाची हिंदुस्थान स्वारी चालली.

यामध्ये त्याने -- दि. १३ फेब्रुवारी १७३९ रोजी कर्नाळच्या रणभूमीवर बादशाही सैन्याचा पराभव करत महमदशहास नजरकैदेत टाकून दिल्लीस प्रस्थान ठेवले.

दि. मार्च रोजी नादिरशाहने दिल्लीत स्वतःस हिंदुस्थानचा बादशहा घोषित करत आपल्या नावाची द्वाही फिरवली, नाणी पाडली.

नादिरशाह कदाचित माळव्यात उतरेल या धास्तीने बाजीराव पेशवा मार्च - एप्रिलांत बुऱ्हाणपुरास येऊन दाखल झाला. मात्र दि. १ मे रोजी महमदशहास हिंदुस्थानची बादशाही सोपवून नादिरशाहने मायदेशीचा रस्ता धरल्याने पेशव्यास पुढे जाण्याचे प्रयोजन उरले नाही.


नादिरशाहच्या स्वारीतून प्रकर्षाने उठून दिसणाऱ्या मुख्य बाबी म्हणजे -- राजपुतांनी तुर्की साम्राज्याचे खड्ग - ढाल ही आपली पूर्वपरंपरा पूर्णतः त्यागली. कर्नाळची लढाई शाही फौजांनी लढली असली तरी त्यात स. जयसिंहासारख्या मातबर मनसबदारांनी भाग घेतला नव्हता.

दुसरे असे की, नादिरशाहच्या हल्ल्याचा मुकाबला करताना शाही सैन्याची जी हानी झाली, ती लगेचच भरून न निघाल्याने इतउत्तर बादशाहीचा केवळ पोकळ डोलाराच शिल्लक राहिला.

काळाची पावलं ओळखण्यास यावेळीही मराठी मुत्सद्द्यांना खूपच उशीर झाला. अर्थात, यामागे स. १७४० मध्ये झालेला बाजीराव पेशव्याचा अनपेक्षित मृत्यू जरी गृहीत धरला तरी आपलं नर्मदोत्तर राजकारण दिल्ली दरबारातील घडामोडींवर अवलंबून ठेवावं की स्वतंत्र चालवावं याची निश्चिती त्यांना लवकर करता आली नाही. याचा परिणाम म्हणजे सफदरजंगच्या मार्फतीने स. १७५२ चा बादशाही संरक्षक करार करेपर्यंत दिल्ली दरबारात त्यांचे स्थान दुय्यमच राहिले. ज्याचा फटका त्यांच्या राजकीय भूमिकेस चांगलाच बसून संधीसाधू लुटारू ही त्यांची प्रतिमा कायम राहिली.


नादिरशाहच्या आक्रमणाचा व त्याने यावेळी केलेल्या तुर्की बादशाह सोबतच्या तहाचा थेट फटका जवळपास एक दशकानंतर मराठी सत्तेस बसला. यासंबंधी अधिक विवेचन पुढे योग्य स्थळी येईलच. तूर्त नादिर व तुर्की बादशाही दरम्यान झालेल्या तहाची, आपल्या विषयमर्यादेस उपयुक्त तेवढी कलमे येथे देत आहे :- 

(१) काबुलचा सुभा तसेच सिंधू नदीच्या पश्चिम काठावरील दक्षिणेस समुद्र किनाऱ्यापर्यंतचा तुर्की साम्राज्यात मोडणारा सर्व प्रदेश -- ज्यामध्ये दक्षिण सिंधमध्ये मोडणारा सागरी किनारा व त्यावरील बंदरे तसेच पंजाबच्या काही भागाचा समावेश होता -- नादिरशाहने आपल्या साम्राज्यास जोडून घेतला.

(२) खेरीज, काबुलचा सुभा आर्थिकदृष्ट्या तोट्याचा असल्याने तुर्कांनी या सुभ्याच्या खर्चाकरिता सियालकोट, पसरूर, औरंगाबाद व गुजरात या चार महालांचा शिलकी वसूल लावून दिलेला होता. नादिरशाहने काबुल ताब्यात घेतल्यानंतर याच कारणांस्तव उपरोक्त चार महालांचा सालीना २० लाखांचा महसूल स्वतःकडे लावून घेतला.





हिंदुस्थान स्वारी आटोपून नादिरशाह मायदेशी परतल्यानंतर दिल्ली दरबारच्या अंतर्गत गटबाजीस उत आला. नादिरशाह विरुद्ध लढ्यात निजाम तटस्थ राहिल्याने दरबारातील निजामविरोधी गट सक्रिय झाला. या गटाचे नेतृत्व यावेळी महमदशहा बादशहाच्या खास मर्जीतील उमराव अमीरखान याने स्वीकारले. हा इराणी असून यासमयी दरबारातील इराणी शिया पंथीयांचे नेतृत्व याच्याकडे होते. 

अमीरखानाने निजामाचा चुलतभाऊ कमरुद्दीनखान यांस वजिरीवरून दूर करून ते पद स्वतःस मिळवण्याचा देखील पर्याय चालवला होता. 


या द्विपक्षीय भांडणापासून दरबारातील हिंदुस्थानी उमरावांचा -- राजपुतांचा पक्षही तटस्थ राहू शकला नाही. नादिरशाहच्या हल्ल्यात मीरबक्षी खानडौरा मारला गेल्याने दरबारात एकाकी पडलेल्या स. जयसिंहाने बादशहाचे निजामाविरुद्ध कलुषित झालेले मत ओळखून त्याच्या विरोधात मोर्चेबंदी आरंभली. ज्यामध्ये त्याला बाजीराव पेशव्याचे सहाय्य अपेक्षित होते व तत्संबंधी त्याची पेशव्यासोबत बोलणीही सुरू होती.

पेशव्याच्या मार्फत निजामाचा काटा काढण्याचा यावेळी जयसिंहाचा डाव असून त्याबदल्यात तो पेशव्याला, शाही खजिन्यातून काही लाख रुपये मदतखर्च व कर्ज निवारण्यासाठी मिळवून देणार होता. अर्थात बादशहाच्या मंजुरीनेच जयसिंहाने पेशव्यास हे आश्वासन दिले होते.


इकडे आपल्या विरोधात दरबारी मानकऱ्यांनी चालवलेली कट - कारस्थाने लक्षात घेऊन निजामानेही प्रसंग जाणून पेशव्यासमोर मैत्रीचा हात पुढे करत त्यांस कित्येक गोड वचनं देऊ केली. परंतु यावेळी निजामाचा पुरता बंदोबस्त करण्याची पेशवे बंधूंची -- बाजीराव व चिमाजीआपाची इच्छा असल्याचे दिसून येते. त्यामुळेच त्यांनी निजामाचा पक्ष न घेता बादशाही पक्षाचा स्वीकार केला खरा परंतु दि. २८ एप्रिल १७४० रोजी बाजीराव पेशव्याचा अनपेक्षित मृत्यू झाल्याने या मसलतीस प्रथम हादरा बसला. तदोपरांत चिमाजीने जरी ही मसलत पेशव्याच्या वतीने उचलून धरली असली तरी खुद्द दिल्ली दरबारात बादशहाचे मन फिरून त्याने अमीरखानास निजाम व कमरुद्दीनसोबत मिळतंजुळतं घेण्याची आज्ञा करत कमरुद्दीनची वजिरी कायम ठेवली. निजामाने संधीचा फायदा उचलत अमीरखानास दिल्ली सोडून त्याच्या सुभ्याच्या ठिकाणी -- अलाहाबादेस जाण्याची सूचना करून त्यांस राजधानीतून बाहेर काढले. पेशव्याला दहशत बसवण्यासाठी त्याने आपल्या तर्फेने अजीमुल्लाखानास माळव्यावर नियुक्त करत स्वारीची हुल उठवली. त्यामुळे पेशव्यास माळव्याच्या बंदोबस्ताची फिकीर पडून तो त्यातच गुंतून पडला. खेरीज बाजीरावाच्या पश्चात पदावर आलेल्या बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यास अनेक कारणांनी लगोलग हिंदुस्थान स्वारी हाती घेणे शक्य नसल्याने पाहता पाहता निजामाविरोधी उभारलेला व्यूह साफ ढासळून गेला.


परंतु राजकारणाचा प्रवाह इतक्यावरच थांबणारा नव्हता. निजामाचा मुलगा नासिरजंग याने दख्खनमध्ये बापाविरुद्ध बंड पुकारल्याने निजामास घाईघाईने दिल्लीतून दख्खनला निघून यावे लागले. यावेळी पिता - पुत्र मदतीसाठी पेशव्याकडे आले असता त्याने निजामाचा पक्ष घेतला. परिणामी नासिरजंगाचा पराभव होऊन निजामाचे दख्खनमधील डळमळीत झालेले आसन पुन्हा एकदा स्थिरावले. शेजवलकरांच्या मते पेशव्यास ही मसलत शिंदे, होळकर, पुरंदरे, जाधव प्रभूती सरदार - मुत्सद्द्यांकडून मिळाली असावी. खुद्द नानासाहेब पेशव्याने या संदर्भात लिहिलेल्या पत्राचा आधार घेतला तरी त्याच्या या भूमिकेबाबत आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. {१९} 


या प्रसंगी निजाम नेस्तनाबूत झाला असता तर नासिरजंग व निजामाचा थोरला मुलगा गाजीउद्दीन फिरोजजंग -- जो यावेळी दिल्लीत होता -- यांचा सामना जुंपण्याची शक्यता होती. निजामाच्या वारसांत कलह पेटवून आपलं स्वतंत्र राजकारण चालवण्याची एक अमूल्य संधी पेशवा आणि त्याच्या सल्लागारांनी दवडली असेच म्हणावे लागेल.


धूर्त निजामाने या आणीबाणीच्या प्रसंगीही आपली कावेबाज बुद्धी वापरत स. जयसिंह व पेशव्यात कलह उत्पन्न करण्याची संधी सोडली नाही. पेशव्यास पाठवलेल्या एका पत्रात त्याने, नादिरशाह विरोधी लढ्यात राजपुतांनी बादशहास मदत न केल्याने क्रुद्ध बादशाह त्यांना धडा शिकवणार असल्याचे सांगत त्याने पेशव्यास असे सुचवले की, या समयी पेशवा जर निजामाशी हातमिळवणी करेल तर त्यांस माळवा सुभा, शाही खजिन्यातून वीस लक्ष रुपये, प्रयाग येथे हिंदू यात्रेकरूंना करमाफी, वाराणसी येथे पेशव्यास जहागीर तसेच बादशाह सोबत भेट घडवून आणण्याची आश्वासनं देऊ केली. {२०} 


अर्थात या पोकळ वचनांना जरी पेशवा भुलला नाही तरीही प्रत्यक्ष भेटीनंतर आदरातिथ्य सत्कारादी उपायांनी त्याने नानासाहेबास इतके भारून टाकले की, रोहरामेश्वरच्या भेटीनंतर बाजीरावाने निजामाला कर्नाटकात मोकळीक देण्याची जी चूक केली, तिचीच उजळणी त्याच्या पुत्राने या प्रसंगी करत स. १७४६ पर्यंत सातार दरबारातून कर्नाटकची स्वतंत्र मोहीम मिळेपर्यंत तिकडे अजिबात लक्ष घातले नाही. इतकेच नव्हे तर याच काळात कर्नाटकांत मोहिमा करून मराठी सत्तेची जरब बसवू पाहणाऱ्या रघुजी भोसलेच्या कामगिरीवरही अप्रत्यक्षरित्या पाणी फिरवण्याचे पुण्य त्याने गाठीशी जोडून घेतले. यासंबंधी विस्तृत विवेचन त्र्यं. शं. शेजवलकरांनी आपल्या निजाम - पेशवे संबंध ग्रंथात केले असून जिज्ञासू वाचकांनी ते लक्षपूर्वक वाचावे अशी मी सूचना करतो.





संदर्भ ग्रंथ :- 


१) मराठी रियासत खंड ३ :- संपादक -  गो. स. सरदेसाई, पॉप्युलर प्रकाशन, नवीन संपादित आवृत्ती स. १९८९  

उत्तरकालीन मुघल खंड दुसरा, वुइल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित “ LATER MUGHALS “ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा अनुवाद, अनुवादक – प्रा. प्रमोद गोविंद ठोंबरे, प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रथमावृत्ती ऑगस्ट १९९८  

महाराष्ट्राचा इतिहास, मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८१८ :- डॉ. वि. गो. खोबरेकर, प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रकाशन वर्ष स. १९८८


२) मराठी रियासत खंड ३ :- संपादक -  गो. स. सरदेसाई, पॉप्युलर प्रकाशन, नवीन संपादित आवृत्ती स. १९८९ 

महाराष्ट्राचा इतिहास, मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८१८ :- डॉ. वि. गो. खोबरेकर, प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रकाशन वर्ष स. १९८८



३) महाराष्ट्राचा इतिहास, मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८१८ :- डॉ. वि. गो. खोबरेकर, पृ. क्र. ३२१  


४) दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास ( डॉ. ब. प्र. सक्सेना लिखित History of shahajahan of Delhi चा अनुवाद ) :- श्री. भ. ग. कुंटे, प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, प्रथमावृत्ती जानेवारी १९८९


५) प्रस्तुत कलमास मुख्य आधार :-

गावगाडा :- त्रिंबक नारायण आत्रे

महाराष्ट्राचा इतिहास, मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८१८ :- डॉ. वि. गो. खोबरेकर

मराठी रियासत खंड ३ :- संपादक -  गो. स. सरदेसाई


६) मुसलमानी रियासत खंड १, गो. स. सरदेसाई पृ. क्र. ३७ - ३८, पॉप्युलर प्रकाशन, पुनर्मुद्रण २०१२  

खेरीज यांच्यात पंथीय भेद असून तुराणी सुन्नी तर इराण्यांत शिया पंथियांचा मोठा भरणा होता.


७) मालवा में युगान्तर या अराजकतापूर्ण शताब्दी, पूर्वकाल १६९८ - १७६५ ई. :- रघुबीरसिंह, 

प्रकाशक :- श्री मध्य भारत हिंदी साहित्य समिती इंदौर, प्रथमावृत्ती स. १९३८, पृ. क्र. १४३-४४   


८)  उक्त 

९)  उक्त 

१०) मालवा में युगान्तर :- रघुबीरसिंह

वुइल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित “ LATER MUGHALS “ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा मराठी अनुवाद :-  प्रमोद ठोंबरे 

निजाम - पेशवे संबंध १८ वे शतक :- प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर, प्रकाशक - पुणे विद्यापीठ, प्रथमावृत्ति जानेवारी १९५९

मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा भाग १ ला ( १७२० - १७४० ) :- विश्वनाथ गोविंद दिघे, प्रकाशक - विश्वनाथ गोविंद दिघे, प्रकाशन वर्ष १९३३ 


११) मालवा में युगान्तर :- रघुबीरसिंह

     पेशवे दप्तर खंड १३ :- लेखांक क्रमांक :- १५, १७, १८, १९, २२ - २३, २९. ३०, ३३     


१२) पेशवे दप्तर खंड १० :-  ले.  क्र. ६६   


१३)   मालवा में युगान्तर :- रघुबीरसिंह, पृष्ठ क्र. २५०  


१४)  उक्त,  पृ. क्र. २५५ 

१५)  उक्त


१६) उक्त पृ. क्र. २६० - ६१

१७) पे. द. खंड १५ :- पृ. क्र. ८६, ८८, ९२, ९३

       मालवा में युगान्तर :- रघुबीरसिंह, पृ. क्र. २७४ - ७६

 माळव्यातील राजपूत संस्थिकांनी पेशव्याच्या खर्चाकरता सुमारे साडेदहा लक्ष रुपये द्यावेत,अशी नोंद पे. द. १५ पृ. क्र. ९४ वर आढळते. परंतु या रकमांची प्रत्यक्षतः वसुली करण्यात आली, न आली याची माहिती मिळत नाही. 

१८) प्रस्तुत कलमास मुख्य आधार - 

      वुइल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित “ LATER MUGHALS “ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा मराठी अनुवाद :-  प्रमोद ठोंबरे 

मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- ( मूळ लेखक सर जदुनाथ सरकार ) मराठी अनुवादक - ग. श्री. देशपांडे, प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, प्रथमावृत्ती मे १९९० 


१९) हिंगणे दफ्तर १ ला खंड :- संपादक - ग. ह. खरे, ले. क्र. २०


२०) उक्त ले.  क्र. १९

      तसेच ले. क्र. २३ नुसार आरंभी नानासाहेब पेशव्याने स. जयसिंहाचाच पक्ष घेण्याची भूमिका अंमळ डळमळीत झालेली दिसते. तसेच या लेखांकातून – जो नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दी आरंभीचा आहे – पेशव्याचा द्रव्यलोभ हा दुर्गुण आपल्या निदर्शनास येतो, जो उत्तरोत्तर वाढत गेल्याचे इतिहास सांगतो.