सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

छत्रपतींच्या स्वातंत्र्याचा वारसा




    ' स्वातंत्र्य ' केवळ या एका शब्दात जागतिक महाकाव्याचे अर्थ सामावले आहेत. जगातील कोणताही वाद, लढा या संकल्पनेपासून अलिप्त नाही. आपल्या मध्ययुगीन काळापुरते बोलायचे झालं तर प्रथम सुलतानी, नंतर बादशाही सत्तेला आव्हान देत . शिवाजीने स्वातंत्र्याची गुढी उभारली. या स्वातंत्र्य गुढीच्या रक्षणास्तव संभाजी सोबत कवी कलशने प्राणांची आहुती दिली. पाठोपाठ राजारामाने धावपळीचे वनवासी जीवन स्वीकारले पण स्वातंत्र्यलढ्याची आग मंदावू दिली नाही. राजारामाच्या पश्चात ताराबाईने स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवण्याचा निकराचा प्रयत्न केला या प्रयत्नास अखेर नियतीने . शाहू बालाजी विश्वनाथच्या हस्ते खीळ घालण्याचे ऐतिहासिक कार्य करत दोन पिढ्यांच्या अविश्रांत उद्योग, साहसावर पाणी फिरवले.

    स. १७१९  मध्ये शाहूने आपला पेशवा बाळाजी विश्वनाथ मार्फत दिल्लीच्या तुर्की बादशाहकडून स्वतःस शिवाजीच्या राज्याचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता प्राप्त करून घेत असतानाच सोबत चौथाई सरदेशमुखीच्या सनदाही पदरात पडून घेतल्या. या कृत्याने दोन गोष्टी घडून आल्या. प्रथम छत्रपतींच्या राज्याला तुर्की बादशाहची मान्यता मिळाली, अर्थात ते तुर्कांच्या मांडलिकत्वात जमा झाले. दुसरे असे कि, जी चौथाई - सरदेशमुखी . शाहू त्याचा हस्तक बाळाजी विश्वनाथ वसूल करू घेऊ पाहत होता ती, त्यांस दख्खन सुभेदार -- जो कोणी बादशहाकडून नियुक्त होऊन येईल त्याच्या अधीन राहून करायची होती. याचा अर्थ ते सुभेदाराची नोकर होत.
    परिणामी शिवाजीने महत्प्रयासाने स्वातंत्र्याची जी आग मराठ्यांमध्ये तसेच मराठी जनतेच्या मनी प्रज्वलित केली होती त्यास एकप्रकारे फुंकर घालून विझविण्याचा अनिष्ट उपक्रम त्याच्याच वंशजाकडून घडून आला.

    छ. शाहूने तुर्कांच्या अंकित्वाचे धोरण जर राजकीय स्थितीमुळे स्वीकारले असेल तर पुढे सुस्थितीचा काळ येताच -- विशेषतः महाराणी येसूबाईची तुर्कांच्या नजरकैदेतून सुटका झाल्यावर शाहूला तुर्कांशी एकनिष्ठ राहण्याची काहीच गरज नव्हती. परंतु असे घडून आले नाही. शिवाजीच्या नातवाने ज्येष्ठत्वाचा अधिकार दर्शवत राज्यावर आपला ताबा बसवला खरा परंतु त्याला आपल्या आजोबांची वा पित्याची राजकीय दृष्टी लाभू शकली नाही.
    
    पुरंदरचा तह, आग्रा भेट . प्रसंगांनी शिवाजीला सार्वभौम सत्तेचे महत्त्व पटलेलं होतं त्यामुळेच त्याने . १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला होता. समाजात किंवा राजकारणात क्रांती घडून येत असताना तिची चाहूल, परिणाम आणि तीव्रता यांबाबत फारच थोडक्या लोकांना अंदाज बांधता येतो. शिवराज्याभिषेक घडून आला त्यावेळीही असेच झाले. सजातीय मराठ्यांना शिवाजीच्या राज्याभिषेकाचे महत्त्व कितपत वाटले तो भाग जरी आपण सोडून दिला तरी खुद्द औरंगजेबास मात्र या घटनेचा मतितार्थ चांगलाच उमगला होता. शिवाजीने स्वतःस राज्याभिषेक करवून घेणे म्हणजे तो आता हिंदुस्थानात तुर्की बादशहा प्रमाणेच सार्वभौम सत्ताधीश बनून एकप्रकारे त्याचा दर्जा बादशहाच्या बरोबरीचा झाला होता. हि बाब औरंगजेबास सहन होण्यासारखी नव्हती. त्यातच शिवाजीने संभाजी मार्फत खुद्द औरंगजेबालाच सत्तेवरून खाली खेचण्याचा डाव खेळून त्याच्या जिव्हारी घाव घातला. यामुळेच औरंगजेब चिडून दख्खनमध्ये प्रवेशला प्रथम त्याने संभाजीचा निकाल लावत राजारामास केवळ राजधानीतुनच नव्हे तर राज्यातूनही परागंदा होण्यास भाग पाडले. त्याही स्थितीत राजाराम आपले ध्येय विसरला नव्हता.

    शिवाजीने औरंगजेबास गादीवरुन खेचण्याचे कारस्थान रचले होते. याच राजकारणाचा पुरस्कार पुनरुच्चार संभाजीने आपल्या कारकिर्दीत केल्याचे दिसून येते. परंतु राजारामाने यावरच थांबता थेट दिल्लीचे राज्य घेण्याची आकांक्षा मनी धरल्याचे ' निजाम पेशवे संबंध ' मध्ये त्र्यं. शं. शेजवलकर नमूद करतात.
    परंतु राजारामांचे अल्पायुषी होणे व औरंगजेबाच्या पश्चात शाहूची तुर्कांच्या नजरकैदेतुन सुटका होऊन त्याचे देशी आगमन होताच ताराबाई सोबत राज्याच्या अधिकार पदासाठी संघर्ष उद्भवणे यामध्ये राजारामाच्या आकांक्षेचा, स्वप्नांचा साफ चुराडा झाला.
    ताराबाई समोर टिकाव धरण्यासाठी शाहूला तुर्कांची साथ करावी लागली तर विरुद्ध पक्षानेही थोड्याफार फरकाने त्याच मार्गाचा अवलंब केला. मिळून शिवाजी स्थापित स्वतंत्र मराठा पातशाही, चौथाई सरदेशमुखी आणि स्वराज्याचा उत्तराधिकारी इ. करता तुर्कांची अंकित बनली. परंतु इथे हे नमूद करणे आवश्यक आहे कि, बादशहाने कागदावर दिलेली चौथाई सरदेशमुखी, बादशाही प्रांतांतून बिनबोभाटपणे छत्रपती व पुढे पेशव्यांना कधीच मिळू शकली नाही. तात्पर्य, जे हक्क केवळ मनगटाच्या बळावर वसूल करायचे होते त्याकरता मांडलिकत्व स्वीकारण्याची काहीएक गरज नव्हती.

    बाळाजी विश्वनाथाच्या पश्चात त्याचा मुलगा बाजीराव पेशवा झाला. त्यानेही बापाच्याच धोरणाचा धडा गिरवला. बाळाजी विश्वनाथाच्या पश्चात त्याचा मुलगा बाजीराव पेशवा झाला. त्यानेही बापाच्याच धोरणाचा धडा गिरवला. पालखेडवर निजामाला पूर्णतः नष्ट करणे त्यास शक्य नसले तरी पुढे भोपाळला त्याचा पुरता संहार उडवण्याची संधी चालून असतानाही त्याने ती साधली नाही. उलट पालखेड ते भोपाळ दरम्यानच्या काळात बाजीरावाचे हिंदुस्थान प्रांती लागोपाठ मोहीमा काढणे व याच काळात कर्नाटक प्रांती बद्धमूल होण्यास निजामास मोकळीक मिळणे, हा निश्चितच योगायोग नाही. यासंबंधी शेजवलकरांनी फक्त प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी त्याचा पाठपुरावा त्यांनी, त्यांच्या अनुयायांनी अथवा इतर अभ्यासकांनी अजिबात केलेला दिसत नाही.  
     बाजीरावाच्या हिंदुस्थान मोहिमा पाहिल्या तर काय दिसते ? माळवा प्रांत त्याने शिंदे - होळकरांच्या मदतीने सपाट्यासरशी जिंकून घेतले पण तिथे जम बसवण्यासाठी व पुढे पाय टाकण्याकरता त्याला राजपुतांकडे मदतीचा हात पुढे करावा लागला. जयपूरकर सवाई जयसिंगास स्वतःसाठी माळवा प्रांत हवा होता.  पण दरबारातील गटबाजीच्या राजकारणामुळे हा प्रांत त्याच्या हातून निसटू लागला तेव्हा त्याने बाजीरावास आमंत्रित करून विरोधकांवर परस्पर शह बसवण्याचा यत्न केला. परंतु मदतीसाठी आलेला पेशवा आणि त्याचे सरदार पुढे त्याच्यासह इतर राजपुतांच्या बोकांडी बसले. सालोसाल खंडण्या वसूल करून त्यांनी राजपुतांची आर्थिक आणि लष्करी शक्ती पार खच्ची करून टाकली. इतकी कि, यापुढे ते मराठी सरदारांपेक्षा तुर्की मनसबदार आणि अब्दालीसारख्या परक्यांच्या मदतीची अपेक्षा बाळगू लागले.  

    बाजीरावाच्या पश्चात बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा बनला. याच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीचे दोन भाग पडतात. पहिल्या दहा वर्षांच्या भागात त्याच्यावर . शाहूचे नियंत्रण होते, ते त्याच्या मृत्यूनंतर संपुष्टात आले शाहूच्या पश्चात गादीवर बसलेल्या रामराजास ताराबाईच्या कृपेने पेशव्याने गुंडाळून ठेवत एकप्रकारे अनियंत्रित सत्ता उपभोगली. या काळात आधीच्या दोन पेशव्यांनी राजकारणात अपरिहार्य कारणांनी स्वीकारलेली तुर्की अनुनयाची किंवा मांडलिकत्वाची वाट सोडून स्वबळावर स्वतंत्र राज्याची, किमान छत्रपतींच्या नावे तरी, घोषणा  करण्याची अत्युत्कृष्ट संधी दवडली. प्रादेशिक आणि सांपत्तिक लोभामुळे बंगालमध्ये बद्धमूल होऊ पाहणाऱ्या बागपूरकर भोसल्यांना त्याने विनाकारण चेपले तर शक्य असूनही अब्दालीशी समझोता करता पानिपत अंगावर ओढवून घेतले.

    नानासाहेब पेशव्याच्या पश्चात त्याचा मुलगा माधवराव पेशवा बनला. याची संपूर्ण कारकीर्द राज्य आणि घरातील बंडाळी मोडून काढण्यात तसेच पानिपतच्या झटक्याने डळमळू लागलेल्या मराठी सत्तेला सावरण्यात खर्ची पडली.

    माधवरावानंतर नारायणरावाच्या कारकीर्द अल्पजीवी ठरून चुलत्याने ( रघुनाथराव ) त्याचा काटा काढला. रघुनाथरावाची कारकीर्दही अल्पकालीन ठरून राज्याची सूत्रे नाना फडणीस, सखारामबापू प्रभूती कारभाऱ्यांच्या हाती गेली. त्यांनी मृत नारायणरावाच्या गरोदर पत्नीच्या नावे राज्यकारभार हाती घेतला पुढे ती प्रसूत होऊन तिला पुत्र होताच त्याच्या नावे पेशवाईचा कारभार आरंभला.

    नारायणरावाच्या मुलाची -- सवाई माधवरावाची कारकीर्द इतर पेशव्यांच्या मानाने दीर्घ असली तरी खरी हुकूमत कारभाऱ्यांकडे -- विशेषतः नाना फडणवीसकडे असल्याने तीत आधीच्या पेशव्यांचा जोर राहिला नाही. स्वतः नाना फडणवीस कारकुनी वृत्तीचा इसम असल्यामुळे शक्य तितक्या तडजोडी करून आपले महत्त्व आणि पेशव्यांचे राज्य, अधिकार रक्षण करण्यापलीकडे त्याचे लक्ष गेले नाही.
    याचा दुष्परिणाम सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर रघुनाथरावाचा मुलगा बाजीराव ( दुसरा बाजीराव ) पेशवा बनल्यावर प्रत्ययास आला.

    रघुनाथराव किंवा त्याच्या वंशजांस पेशवाई मिळू नये यासाठी नानाने बरीच खटाटोप केली असली तरी शेवटी त्याला बाजीरावासच गादीवर आणणे भाग पडले. एका सामान्य वैदिक कुटुंबातील मुलास जे काही धार्मिक दैंनदिन जीवनास उपयुक्त शिक्षण मिळते त्यापलीकडे बाजीराव आणि त्याच्या बंधूंस कसलेच राजकीय शिक्षण मिळण्याची नानाने व्यवस्था केलेली नव्हती. शिवाय बाजीराव आणि त्याची भावंडं बराच काळ नजरकैदेत असल्याने त्यांचा बाह्य जगाशी तितकासा संपर्क राहिल्याने जेव्हा पेशवाईसारखे महत्त्वाचे पद बाजीरावास प्राप्त झाले, तेव्हा नेमके कसे वर्तावे, काय करावे आणि काय करू नये याची त्यास उमज पडेनाशी झाली. ज्या नानाने त्याला गादीवर आणले तो नानाच आपल्या बापास नजरकैदेत टाकण्यास कारणीभूत झाला हे बाजीराव कधी विसरला नाही. परिणामी नाना फडणीस हयात असेपर्यंत बाजीरावाने त्याच्याशी वैर धरल्याने समस्त पुणे दरबार घरच्या कलहात गुंतून पडला या संधीचा फायदा घेत हिंदुस्थानच्या राजकारणात मराठी सत्तेचं जे काही महत्त्वाचं स्थान होतं ते इंग्रजांनी बळकावून घेतलं. पुढे पेशव्यांच्या गृहकलहाचा फायदा उचलत . १८१८ मध्ये इंग्रजांनी पेशवाई नष्ट करत छ्त्रपतीस मर्यादित स्वराज्याचा धनी बनवत त्यास लौकिकात स्वतंत्र अधिपती पण वास्तवात आपला मांडलिक बनवून काही काळ त्या सत्तेस जिवंत ठेवत अखेर . १८४८ साली खालसा करून टाकले. साधारणपणे दोनशे वर्षांची भोसले घराण्याची सत्ता अशा प्रकारे अनेक स्थित्यंतरे पाहून संपुष्टात आली.

    या दोनशे वर्षांच्या कालावधीत आरंभी शिवाजी, संभाजी आणि राजाराम - ताराबाई या दोन पिढ्यांचा अपवाद वगळता उर्वरित छत्रपती तसेच त्यांच्या मुख्य सरदारांनी आपल्या स्वतंत्रतेची चुणूक क्वचितच दाखवली. त्यापैकी इतिहासात नमूद अशा एक दोन प्रसंगांची आपण येथे चर्चा करणार आहोत.
. १७५३. दिल्लीत तुर्की बादशहा अहमदशहा त्याचा वजीर सफदरजंग यांच्यात तंटा निर्माण होऊन उभयपक्ष वर्दळीवर येतात. दिल्लीतील पेशव्यांचा वकील आणि सरदार बादशाही पक्षास मदत करतात. शिवाय रोहिले - पठाण देखील बादशाही पक्षाचा अवलंब करतात. तरीही बादशाही पक्षास विजयाची खात्री नसल्याने ते याचवेळी दक्खनमधून हिंदुस्थान प्रांती येऊ लागलेल्या रघुनाथरावास आणि त्याच्या समवेतील शिंदे - होळकरास त्वरेने येण्याची पत्रे पाठवतात.

    इथे थोडा तत्कालीन राजकारणाचा संदर्भ समजावून घेणे अत्यावश्यक आहे. इतिहासाचार्य राजवाडे पासून आत्ता अलीकडच्या नवोदित इतिहास संशोधकांस ढीगभर संदर्भ साधने उपलब्ध होऊनही पानिपतपूर्व राजकारणाचा अदमास अद्यापि लावता आलेला नाही. शे सव्वाशे वर्षांपूर्वी अपुऱ्या साधनसामग्रीवर काढलेल्या निरुपयोगी, कालबाह्य निष्कर्षांवर त्यांच्या इतिहासलेखनाची इमारत उभी राहत असते. त्यामुळे या काळातील अंतिम सत्याप्रत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न साहजिकच अयशस्वी होऊन जातो.

    छ. शाहूच्या निधनानंतर सातार दरबारचे बदललेलं राजकारण, छत्रपती नाममात्र राहून पेशव्यांचे सर्वाधिकारग्रहण . अंतस्थ बाबी घडत असताना नानासाहेब पेशव्याची बाह्य राजकारणावरील दृष्टी हिंदुस्थानपेक्षा दख्खनमध्येच जास्त गुंतली होती.
    निजामाला कायम ठेवत त्याच्याकडून चौथाई - सरदेशमुखी वसूल करून घेणे शक्य तितका कर्नाटकचा भाग हाताखाली घालणे हे काहीसं परस्परविरोधी राजकारण पेशवा या काळात खेळत होता.
    इथे पुन्हा हि बाब लक्षात घेणे गरजेचे आहे कि, दख्खनची सुभेदारी निजामाच्या घराण्यात वंशपरंपरागत आहे अशी पेशव्याची ठाम समजूत होती. आणि हि समजूतच किती विरोधाभासी होती हे तत्कालीन स्थिती आणि राजकारण पाहता लक्षात येते.

    सातारकर छत्रपती तुर्की बादशाहचा मांडलिक. दख्खनमधील चौथाई - सरदेशमुखीचे हक्क दख्खन सुभेदाराच्या मदतीने, त्याच्या अधीन राहून वसूल करायचे होते. आणि  ते देखील सुभेदार - सुभ्याच्या रक्षणास्तव देण्यात आले होते. याबदल्यात छत्रपतींना बादशहा समोर आपली कोणतीही अर्जी या दख्खन सुभेदारामार्फत दिल्ली दरबारात पेश करता येणार होती. म्हणजे सुभेदाराच्या शिफारसीवर बादशहा छत्रपतींच्या अर्जीचा विचार करणार. आणि याच कारणास्तव नानासाहेब पेशव्याला दख्खनमध्ये निजामाचे घराणे सुभेदार म्हणून हवे होते. या घराण्यातील आपल्या पसंतीचा व्यक्ती नेमून दख्खन हाती घालण्याचा त्याचा डाव होता.
    आता यातील आणखी विरोधाभास असा कि, दिल्ली दरबारात पेशव्यांचा वकील होता. . १७५२ मध्ये बादशाही संरक्षणाचा करार केल्याने तिथे कायम मुक्कामी एक सरदार  होता. असे असताना पेशव्याला हि निजामाची निरर्थक धोंड गळ्यात बांधण्याची गरजच काय ?
    दुसरे असे कि, याच निजामी राजकारणासाठी दिल्लीतील आपल्या हितकारक राजकारणास पेशव्याने तिलांजली देत पानिपतच्या वैधव्याचा टिळा कपाळी लावून घेतला. केवळ निजामाचा एक वंशज आपल्या लगामी असावा, या हट्टास्तव निजामाचा नातू मीर शहाबुद्दीन उर्फ इमादउल्मुल्क उर्फ धाकटा गाजीउद्द्दीन याचा पक्ष धरल्याने पुढे त्याच्या सर्व दृष्कृत्यांची जबाबदारी पेशव्यावर येऊन पडली. पानिपतचे राजकारण यामुळेच तर नासले. असो.

     स. १७५३ च्या उत्तरार्धात रघुनाथराव शिंदे - होळकरांसह दख्खन स्वारीवर निघाला असता त्यास हिंदुस्थानातून बादशहा आणि सफदरजंग, दोन्ही पक्षांची मदतीस येण्याची पत्रे मिळाली. परंतु पेशव्याच्या आज्ञेनुसार रघुनाथरावाने कोणत्याच पक्षाचा  अवलंब करता तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारत राजपुतान्याकडे प्रयाण केले. फक्त निजामी राजकारणचा संदर्भ म्हणून धाकट्या गाजीउद्दीनच्या विनन्तिवरून मल्हारराव होळकराचा मुलगा -- खंडेराव यास चार हजार स्वारांसह दिल्लीला रवाना केले. तसेच कोणत्याही स्थितीत दिल्लीतील संघर्षात सहभाग घेण्याची आज्ञा त्यास देण्यात आली.

    खंडेराव दिल्लीस आला त्यावेळी बादशाह - सफदरजंग यांच्यातीळ तंटा मिटून सफदरजंग अयोध्याच्या सुभ्याकडे निघून गेला होता. परंतु दरबारात आता नवीन वजीर इंतिजामुद्दौला आणि गाजीउद्दीन यांच्यात लढा निर्माण होऊन दोघेही खंडेरावास आपापल्या पक्षास खेचायला पाहू लागले. पॆकी इंतिजामुद्दौला हा निजामाच्याच घराण्यातील असून गाजीउद्दीन हा त्याचा नात्याने चुलत पुतण्या लागत होता. शिवाय सध्याच्या दरबारी संघर्षात बादशाहचा पाठींबा नव्या वजिरास होता. परंतु पेशव्याची आणि वडिलांची सक्त आज्ञा असल्याने खंडेरावाने गाजीउद्दीनचा पक्ष सोडण्यास नकार दिला. तेव्हा या तरुण सरदाराचे मन वळवण्यासाठी इंतिजामने त्यास २२०० सोन्याची नाणी, मानाचे पोशाख अन्य काही देणग्या बादशहा तर्फे पाठवून दिल्या. परंतु खंडेरावाने तुच्छतापूर्वक मानाची वस्त्रे स्वीकारण्यास नकार दिल्याचे जदुनाथ सरकार नमूद करतात.

    इंतिजामुद्दौलाच्या प्रयत्नांना अपयश आल्यावर बादशाहने गाजीउद्दीन मार्फत खंडेरावाची भेट घेण्याचे योजलेत्यानुसार दि. २६ डिसेंबर १७५३ रोजी सायंकाळी बागेत बादशहा आणि खंडेरावच्या भेटीचा बेत ठरला. भेटीच्या प्रसंगी खंडेरावाने शक्य तितके तुर्की शाही रितीरिवाजांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले. भेटीची आगाऊ कल्पना असूनही भेटीसाठी त्याने सोबत कोणताही नजराणा नेला नाही. तेव्हा बादशहाच्या खाजगीकडील कारभाऱ्याने पदरच्या मोहरा खंडोजीच्या ( खंडेराव ) वतीने बादशहास नजर केल्या. बादशहाने त्यास खिलत आणि तलवार देऊ केली असता ते स्वीकारण्यासही त्याने बरीच आडकाठी केली.

    बादशाही संरक्षक करारानुसार अंताजी माणकेश्वरास पेशव्याने दिल्लीस नियुक्त केले होते. प्रसंगानुसार बादशाहने अंताजी माणकेश्वरावर कृपा दर्शवत त्यास वस्त्रे आणि दरबारात भेटीची परवानगी दिलेली होती. खंडेरावास नेमकी तीच गोष्ट खटकली. कारण हा अंताजी एकेकाळी होळकरांचा नोकर होता. जर अंताजीची शाही दरबारात एवढी उठबस होत असेल तर मग त्याचा आणि खंडोजीचा दर्जा बादशाह एकच समजतो कि काय ? हा प्रश्नच त्याने एकप्रकारे उपस्थित करत, बादशहा जर अंताजीस भेट देणार नसतील तरच खिलत स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे कळवले. तेव्हा बरीच चर्चा होऊन अखेर बादशाहने त्याची हि अट मान्य केली.

     त्यानंतर रिवाजानुसार बादशहाने त्यास तलवार देण्याची आज्ञा केली असता, जर बादशहा स्वहस्ते ती तलवार आपल्या खांद्यास अडकवणार असतील तरच स्वीकारू असा खंडेरावाने खोडा घातला. खंडेरावाची हि अट मान्य करायची झाल्यास बादशहाला त्याच्यासमोर येऊन उभे राहावे लागणार होते. शाही रितीरिवाजांच्या विपरीत हि मागणी होती. शिवाय खंडेराव हा लौकिकात पेशव्याच्या सरदाराचा मुलगा होता. तेव्हा बादशाहचा दर्जा तो काय राहणार होता ?
     अखेर खंडेरावाची मुश्किलीने समजूत काढून त्यास शस्त्र स्वीकारण्यास तयार  केले. भेटी नंतर खंडेरावाने रिवाजानुसार चार ऐवजी दोनच वेळा बादशहास सलाम केला.

    खंडोजी आणि बादशाहच्या भेटीचा हा तपशीलवार वृत्तांत दिल्यानंतर जदुनाथ सरकार लिहितात कि, '.. खंडोजीला आपले सैन्य त्याचे शौर्य याबद्दल फाजील घमेंड असून शिवाय तो, रात्रंदिवस दारूच्या अमलाखाली, तंद्रीतच राहत असे. त्याला यावेळी बादशहाशी सभ्य, विनयशील संभाषण करणे काही शक्य झाले नाही. '  ( मुघल साम्राज्याचा ऱ्हास - भाग )
     सरकारांना खंडेरावाची दारू, घमेंड वगैरे दिसली परंतु त्याने तुर्की बादशहाला त्याची वास्तविक जागा, दर्जा दाखवून दिल्याचे दिसले नाही. असो. हा पाहणाऱ्याच्या दृष्टिकोन असू शकतो. अन्यथा याच सरकारांनी औरंगजेब चरित्रात इराणी वकिलाची हकीकत देताना औरंगजेबाने त्याजकडून कशाप्रकारे शाही रीतिरिवाज पार पाडून घेतले होते, याचा विसर पडला नसता.
     बरे, खंडेरावाच्या बादशाही भेटीचा वृत्तांत देऊन स्वतःच पुढे सांगतात कि, खंडेरावास वजिराच्या घरी नेण्यात आले तिथे मध्यरात्रीपर्यंत त्याचा आतिथ्यपूर्वक पाहुणचार करण्यात आला. आता जर खंडेराव रात्रंदिवस दारूच्या अंमलात राहत असेल आणि बादशाहची भेट घेतानाही तो दारू प्यायलेलाच होता तर मग वजिराने त्यास आपल्याकडे भेटीस का बोलावून घेतले ? शिवाय मध्यरात्रीपर्यंत तो वजिराकडे काय करत होता ? कारण वजीर इंतिजामुद्दौला हा गाजीउद्दीनचा प्रतिस्पर्धी होता तर खंडेराव गाजीउद्दीनचा पक्षपाती. असो.

    अशीच एक दुसरी घटना, ती पण होळकर कुटुंबाशीच निगडित आहे. . १७८२ साली हैदरअलीचा वकील दिल्लीहून दख्खनकडे यायला निघाला होता. मार्गातील संस्थानिकांनी त्यांस आपापल्या हद्दीतून संरक्षणपूर्वक वाट द्यावी याकरता बादशाही परवानापत्र अथवा फर्मान त्याच्यासोबत होते. होळकरांच्या स्वामित्वाखालील प्रदेशात आल्यानंतर हैदरच्या वकिलाने शाही फर्मान सोबत देऊन एका मनुष्यास लवाजम्यासहित अहिल्याबाईच्या भेटीस रवाना केले. त्यावेळी बादशाही फर्मान सोबत असल्याने रितीनुसार अहिल्याबाई किंवा इतर कोणत्या खाशाने फर्मानास सामोरे जाऊन उभे राहून पत्र घेतले पाहिजे असे त्या फर्मान वाहकाचे म्हणणे पडले. तेव्हा अहिल्याबाईने दिलेला जबाब अस्सल पत्रांत नमूद आहे तो असा :- ' बाई म्हणाली जे, " ज्या श्रीमंतांच्या लोकांनी पातशाहाची तगीरी बहाली केली आहे, त्यांच्या पत्रास इतकी आडस पत्री नाही. यांस कोण पुसतो ? " लोक म्हणाले जे, " पातशाही कैदकानू आहे. आपण मान्य करीत, तर आणीख कोण करील ? " मग मुकुंदराव दिवाणास सांगितले जे, उभे राहून पत्र घ्या. मग मुकुंदराव उभे राहून दोन पावले पुढे होऊन पत्रे घेतली. '
( महेशवर दरबारची बातमीपत्रे - भाग )
    यातील आडस पत्री शब्दाचा अर्थ लागत नाही, परंतु एकूण मजकुरावरून अनुमान होते कि, ज्यांनी तख्तावरील बादशहांची मन चाहेल तशी उचलबांगडी केली त्यांच्या पत्रांना जर इतका मान मिळत नसेल तर या शाही म्हणवल्या जाणाऱ्या पत्रांचा आम्ही का सन्मान करावा ? शेवटी हे बादशाह म्हणवले जाणारे इसम म्हणजे  आमचेच स्थापित !

    अहिल्याबाईने आपल्या सासऱ्याची एकूण कारकीर्द पाहिलेली. नवऱ्याचा पराक्रमही पाहिलेला. इतिहासकारांनी तिची साध्वी, पुण्यशील अशा शब्दांनी महती गात एकप्रकारे तिच्यातील राज्यकर्ती, राजकारणी व्यक्तीवर अन्याय केला आहे. बाळाजी विश्वनाथच्या दिल्ली स्वारीपासून तख्तावरील बादशहा बदलण्यात पेशवे आणि त्यांच्या सरदारांचा हात असल्याचे तिच्या विस्मृतीत गेले नव्हते. त्याचप्रमाणे होळकर हे नाममात्र पेशव्यांचे सरदार असले तरी व्यवहारात स्वतंत्र सत्ताधीश असल्याचेही तिने कधी नजरेआड केले नव्हते. त्यामुळे बादशहा म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीपुढे वा त्याच्या सत्तेपुढे झुकणे ना तिला मंजूर होते ना तिच्या नवऱ्याला !

    स्वातंत्र्याचा जो बाणा . शिवाजीने आग्रा भेटीनंतर जीवापेक्षाही अधिक जपला, त्याचाच वारसा एकप्रकारे होळकर घराण्याने पुढे चालवला असे म्हणता येते. केवळ अहिल्याबाई किंवा खंडेराव होळकरच नव्हे तर पुढील काळात यशवंतराव होळकर आणि त्याची मुलगी भीमाबाईने देखील आपल्या स्वातंत्र्याशी कधी तडजोड केली नाही.
    दौलतराव शिंद्याच्या होळकरशाही बुडवण्याची लालसा, काशीराव होळकराची राजकीय अपरिपक्वता आणि दु. बाजीरावाचा प्रादेशिक तसेच सांपत्तिक अनिवार लोभ यामुळे समस्त होळकरी दौलत नष्ट होण्याची वेळ आली असता यशवंतराव होळकर पुढे सरसावला. दौलतीची वस्त्रे त्याला किंवा त्याचा मृत भाऊ मल्हाररावाच्या मुलास -- खंडेरावास मिळण्याची शक्यता नाही हे पाहून त्याने स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. त्यानंतर त्याने शिंद्यांच्या सोबत झगडून आपल्या राज्याचा ताबा मिळवला. पेशव्याची भेट घेऊन त्याच्याकरवी खंडेराव होळकरास सरदारीची वस्त्रे मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतु दु. बाजीरावाने शिंद्यासोबत हातमिळवणी करत हडपसर येथे त्याच्याशी संग्राम करून पदरात पराभव पाडून घेत इंग्रजांच्या कुशीत आश्रयार्थ धाव घेत वसईचा तह करून आपले राजकीय स्वातंत्र्य गमावून घेतले.

    बाजीरावास इंग्रजांच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी शिंदे, होळकर आणि भोसले पुढे सरसावले असता शिंद्याची दगाबाजी आणि इंग्रजांची मुत्सद्देगिरी यामुळे होळकर या युतीतून बाहेर पडला दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धात सलामीलाच शिंदे - भोसल्यांना पराभव पत्करून इंग्रजांचा जोडा शिरावर धारण करावा लागला. त्यानंतर मोकळ्या झालेल्या ब्रिटिश फौजा यशवंतरावावर धावून गेल्या असता त्याने त्यांस पराभूत करत इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या तुर्की बादशाहची सुटका करण्यासाठी दिल्लीला वेढा घातला.
    या वेढ्यात त्यास अपयश आले असले तरी बादशहाने त्याच्या स्वतंत्र राज्यास आपली अधिकृत मान्यता देत ' अलिजाबहाद्दर ' अशी पदवीही प्रदान केली. यानंतर लवकरच बरोबरीच्या नात्याने इंग्रजांनी यशवंतरावासोबत तह करून कसेबसे युद्ध आवरते घेतले. होळकर - इंग्रज युद्धात यशवंतराव पराभूत झाला असे आंग्ल - भारतीय इतिहासकार सांगत असले तरी तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर ऑफ जनरल रिचर्ड वेलस्लीला या युद्धामुळेच इंग्लंडला निघून जावे लागले, हि घटनाच युद्धाचे नेमके फलित स्पष्ट करते हे दुर्लक्षित करता येत नाही.

    यशवंतरावाच्या मृत्यूनंतर . १८१७ महित्पूर लढाईत होळकरी सैन्याचा फितुरीच्या बळावर इंग्रजांनी पराभव केला. सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या तुळसाबाईचा लढाईच्या आधी खून करण्यात आला तर ऐन लढाईतून गफुरखानसारखे सरदार लढताच निघून गेले. यानंतर भीमाबाई होळकरने आपल्या स्वातंत्र्यरक्षणार्थ इंग्रजांशी लढा मांडला. तिच्या पेंढारी सैन्याने इंग्रज सेनानी माल्कमला अक्षरशः पिसाळून सोडले. अखेर माल्कमने फितुरी करत भीमाबाईस कैद करून रामपुरा येथील गढीत बंदिस्त केले. या स्थळीच ब्रिटिशांच्या कैदेत असताना . १८५८ मध्ये भीमाबाईचा मृत्यू झाला.
    केवळ होळकरच नव्हे तर नागपूरकर भोसल्यांनीही अशाच प्रकारे आपल्या स्वातंत्र्याकरता सर्वस्वाचा होम केला होता. अशी कित्येक मराठी सरदारांची घराणी आहेत ज्यांनी आपल्या जीवित्व, संसाराची स्वहस्ते अक्षरशः राखरांगोळी करून घेतली. इतिहास यांच्याविषयी उदासीन आहे, मौन आहे. परंतु त्यास बोलतं करण्याची इतिहास अभ्यासक, वाचकांची जबादारी आहे.