Thursday, August 16, 2012

शिवाजी - अफझलखान भेट

                             
                        
      
अफझलखानाची स्वराज्यावरील स्वारी, दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगड येथे त्याची व शिवाजीची झालेली भेट आणि त्या भेटीत झालेला खानाचा मृत्यू इ. घटना मराठी इतिहास वाचक व अभ्यासकांच्या अतिशय परिचयाच्या आहेत. प्रस्तुत लेखामध्ये अफझलखान वधाची किंवा शिवाजी - अफझलखान यांच्या भेटीची चिकित्सापुर्वक चर्चा करण्याचा हेतू आहे. वस्तुतः या विषयावर अनेकांनी अनेक अंगांनी विविध भाषेतील अव्वल, दुय्यम व तिय्यम साधनांच्या आधारे विपुल लेखन केले आहे. तेव्हा प्रस्तुत लेखक आता आणखी काय दिवे लावणार अशी वाचकांच्या मनात शंका येणे स्वाभाविक आहे ! परंतु, स्वराज्य संस्थापक शिवाजीचे चरित्र इतके अद्भुत घटनांनी भरले आहे कि कितीही निग्रह केला असता शिवाजीच्या चरित्रावर किंवा त्याच्या कारकिर्दीत घडलेल्या काही घटनांवर निदान चार ओळी तरी खरडण्याचा  मोह सर्वांनाच होतो आणि प्रस्तुत लेखक देखील त्यास अपवाद नाही !
                  
विजापूर दरबाराने शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी अफझलखानाची का आणि कोणत्या परिस्थितीमध्ये निवड केली याची कारणे सर्वांनाच माहिती आहे. तेव्हा त्यांची तपशीलवार चर्चा न करता त्या कारणांचा थोडक्यात येथे आढावा घेतो. स. १६५८-५९ च्या सुमारास शिवाजीचे लष्करी सामर्थ्य, विजापूरच्या तुलनेने अधिक वाढले होते किंवा त्याच्या बरोबरीचे बनले होते. शिवाजीसोबत खुल्या मैदानात टक्कर  देण्याची ताकद आता आदिलशाहीत तितकीशी राहिली  नव्हती. वर्षानुवर्षे चालणाऱ्या अंतर्गत बंडाळ्या आणि निजामशाही, कुतुबशाही व मोगल तसेच कर्नाटकातील लहान - मोठ्या सत्ताधीशांशी वारंवार झुंजण्यात आदिलशाहीचे बरेच नुकसान झाले होते. एकेकाळी असलेला तिचा रुबाब, सामर्थ्य आता पार मोडकळीस आले होते. विजापूरच्या तुलनेने शिवाजीच्या राज्याचा विस्तार जरी लहान असला तरी लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत शिवाजीची तयारी विजापूरकरांच्या तुलनेने अधिक होती. उदाहरणार्थ शिवाजीवरील नियोजित स्वारीत अफझलखानाचे लष्कर  घोडदळ   व पायदळ मिळून सुमारे वीस - पंचवीस हजार इतके होते तरीही आदिलशाही दरबाराने अफझलखानास शिवाजीसोबत प्रत्यक्ष लढाई न देता शक्यतो त्यास भेटीच्या निमित्ताने बोलावून दगा करण्याचा कानमंत्र दिल्याचे उल्लेख मिळतात. यावरून असे दिसून येते कि, यावेळी शिवाजीचे लष्करी सामर्थ्य बरेच वाढले होते. सभासद बखरीचा आधार घेतला असता या मोहिमेच्या वेळी खानाइतकेच सैन्य शिवाजीच्या पदरी होते. परंतु या सैन्यात गड - किल्ल्यांवर असलेल्या शिबंदीचा अंतर्भाव केला आहे कि नाही याची निश्चिती होत नाही. असे असले तरी शिवाजी आणि तत्कालीन सत्ताधीशांच्या लष्करी व्यवस्थेत एक महत्त्वाचा फरक होता व तो म्हणजे त्याचे सैन्य हे खडे सैन्य असून त्यावर प्रत्यक्ष शिवाजीची हुकुमत चाले !  त्याउलट तत्कालीन सत्ताधीशांकडे असे खडे सैन्य तुलनेने कमी असे. मोहीम किंवा युद्धप्रसंग उद्भवल्यास पदरी असलेल्या जहागीरदारांकडून लष्करात खोगीरभरती केली जात असे. या बाबतीत अफझलखानाची फौज देखील अपवाद नव्हती. शिवाजीचे राज्य लहान असल्याने व पदरी बलाढ्य लष्कर असल्यामुळे या सैन्याचा खर्च भागवण्यासाठी त्याला वर्षभर शत्रूप्रदेशात मोहिमा आखाव्या लागत. सधन प्रदेशात लूटमार कारणे किंवा खंडणी गोळा करणे या दोन मार्गांनी शिवाजी आपल्या सैन्याचा बव्हंशी खर्च भागवत असे. याठिकाणी हे नमूद कारणे योग्य होईल कि, पूर्णवेळ पगारी सैन्य पदरी बाळगण्याची आर्थिक ताकद शहाजीमध्ये असल्यामुळेच शहाजीला एकाचवेळी मोगली आणि विजापुरी फौजांचा सामना करून पेमगीरीवर निजामशाहीची उभारणी करता आली होती !
                  विजापूर दरबाराने शिवाजीवरील नियोजित स्वारीसाठी अफझलखानाचीच का निवड केली असावी ? ' शककर्ते शिवराय ' या शिवचरित्राचे लेखक श्री. विजय देशमुख यांच्या मते त्यावेळी एक अफझलखान अपवाद केल्यास विजापूर दरबारी आता कोणी पराक्रमी, स्वामिनिष्ठ व शूर असा सेनानी राहिला नव्हता.
उपलब्ध साधनांतील माहिती पाहता देशमुख यांचे मत अगदीच चुकीचे नसल्याचे दिसून येते. अफझलखान विजापुरातून रवाना झाल्याची बातमी शिवाजीला त्याच्या हेरांकडून मिळाली असे म्हणता येईल. तसेच खानाच्या अंतस्थ हेतूंची कल्पना विजापूर दरबारातील शिवाजीच्या मित्रांनी कळवली असण्याची अधिक शक्यता आहे. त्याशिवाय मोहिमेची सूत्रे हाती घेताच आदिलशहाने व अफझलखानाने मावळातील देशमुख - वतनदारानंना जी काही आज्ञापत्रे पाठवली त्यातील भाषा पाहता खान शिवाजीचा पुरता बंदोबस्त करण्याच्या उद्देशानेच बाहेर पडल्याचे दिसून येते.
                
  इकडे अफझलखानाचा काटा कोणत्याही परिस्थिती काढण्याचा बेत शिवाजीने मनोमन पक्का केल्याचे दिसून येते. कदाचित खानाला मारून टाकण्याची योजना आरंभापासून त्याच्या मनात नसेल पण त्याचा एकदा सडकून समाचार घेण्याची / पराभव करण्याची इच्छा शिवाजीच्या मनात नसेल असे म्हणता येत नाही. अर्थात, खानाचे भोसले घराण्याशी असलेले वैर, विजापूर दरबारातील त्याचे प्रस्थ आणि त्या दरबाराचे त्याच्यावर अवलंबून असणे व शिवाजीचे तिशीच्या आतील वय लक्षात घेता शिवाजीची इच्छा त्याच्या वयानुरूप अशीच होती. 
              
शिवाजी - अफझलखान प्रकरणाचे साधार विश्लेषण श्री. विजय देशमुख यांनी आपल्या ' शककर्ते शिवराय ' या ग्रंथात केले आहे. ज्यांना या प्रकरणातील अधिक तपशील जाणून घ्यायचे आहेत अशा जिज्ञासू वाचकांनी त्या ग्रंथाचे वाचन करावे. श्री. देशमुख यांच्या मते, खान आरंभी जावळीमध्ये उतरण्यास तयार नव्हता. उलट शिवाजीला खुल्या मैदानात खेचण्याचा त्याने भरपूर प्रयत्न केला. परंतु पुढे राजकीय परिस्थती इतक्या झपाट्याने बदलली कि खानालाच जावळी प्रांतात उतरणे भाग पडले. देशमुखांनी आपल्या निष्कर्षासाठी जे काही पुरावे दिले आहेत त्यावरून त्यांचे मत यथायोग्य असल्याचे दिसून येते. कित्येक इतिहासकारांचे देखील देशमुखांप्रमाणेच मत असल्याचे दिसून येते.
                 विजय देशमुख आणि इतर इतिहासकारांचे मत काहीही असले तरी मला जी काही साधने उपलब्ध झाली, त्यांच्या अभ्यासावरून माझा निष्कर्ष हा वेगळाच आहे.
विजापुरातून खान जेव्हा बाहेर पडला तेव्हाच त्याला खुल्या मैदानात किंवा सोयीच्या ठिकाणी घेरून त्याचा नाश करण्याचा शिवाजीचा आरंभीचा बेत होता. परंतु, ' अफझलखान ' या नावाचा दरारा असा होता कि, शिवाजीच्या मुत्सद्द्यांनी, सरदारांनी शिवाजीच्या विरोधात आपले मत व्यक्त केले. खानाशी लढाई न करता तहाच्या वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवावा असे शिवाजीच्या सल्लागारांचे मत होते. त्यामुळे शिवाजीने आपला मूळचा लढाईचा बेत बदलून नवीन डाव टाकला. याविषयी सभासद बखरीमधील उल्लेख मननीय आहे. या बखरीनुसार खान विजापुरातून बाहेर पडला तेव्हाच शिवाजीने त्याला जावळीमध्ये घेरण्याचे ठरवले होते परंतु त्याच्या सल्लागारांनी लढाईच्या विपरीत सल्ला दिल्याने शिवाजीने तो बेत रद्द केला. पुढे भवानीमातेचा त्याला दृष्टांत झाला व हे वर्तमान सर्व मुत्सद्द्यांना समजल्यावर त्यांना एकप्रकारे मानसिक बळ प्राप्त झाले व जावळीमध्येच खानाचा निकाल लावण्याच्या शिवाजीच्या बेतास त्यांनी संमती दिली.
                   
येथून पुढच्या घटनांची सर्वांनाच माहिती आहे. तेव्हा आता शिवाजी - अफझलखान यांच्या भेटीत नेमके काय झाले असावे याच्या चर्चेस आता आरंभ करतो. पण तत्पूर्वी अशी भेट घडून येण्याआधी शिवाजीने कशाप्रकारची खबरदारी घेतली होती याची थोडक्यात माहिती देतो.
               
अफझलखानास मारून टाकण्याची शिवाजीची इच्छा आरंभापासून होती किंवा नव्हती पण, जावळीमध्ये जेव्हा खानाला येण्यास भाग पाडण्याचे ठरले तेव्हाच खानाचा काटा काढण्याचे शिवाजीने नक्की केले होते. या दृष्टीने सभासद बखरीत पंताजी गोपीनाथ व शिवाजी यांचा जो संवाद आलेला आहे तो सूचक आहे. हा संवाद जसाच्या तसा घडला नसला तरी खानाचा निकाल लावण्याचे शिवाजीने आधीच नक्की केले असल्याचे यातून दिसून येते. त्याशिवाय सभासद बखरीमध्ये ज्या पद्धतीने हा संवाद आला आहे तो विकृत पद्धतीने आल्याचे दिसून येते. प्रस्तुत प्रसंगी पंताजी गोपीनाथ हा अनुभवी मुत्सद्दी असून शिवाजी हा वयाने अगदीच तरुण व काहीसा अननुभवी असा आहे. अशा परिस्थितीमध्ये पंताजीसारखा अनुभवी मुत्सद्दी शिवाजीला, खानास एकांगी करून मारण्याचा सल्ला देईल का ? उलट, खानाची प्रत्यक्ष भेट न घेता त्यास हर प्रयत्ने दगा करण्याचाच सल्ला त्याने शिवाजीस दिला असता. परंतु, सभासद बखरीत काही वेगळेच दिसून येते. माझ्या मते, तत्कालीन राजकीय व सामाजिक समजुतींचा या संवादावर प्रभाव असावा.   
                      
सुमारे बारा हजार निवडक सैन्यासह अफझलखान अखेर जावळीत उतरला. प्रतापगडाच्या पायथ्याशी जवळपास दीड - दोन कोसांच्या अंतरावर पार गावनजीक कोयना नदीच्या काठी खानाच्या फौजेचा तळ पडला. खानाची फौज जावळीत येण्यापुर्वीच शिवाजीने आपल्या लष्कराचा पेरा केला होता. त्यानुसार कोयनेच्या पूर्वेस बोचेघोळीच्या घाटात बालाजी शिळमकर याची नेमणूक करण्यात आली होती. प्रतापगडाच्या नैऋत्य दिशेला असलेल्या पार घाटात मोरोपंत पिंगळे, शामराजपंत रांझेकर व त्रंबक भास्कर यांची नियुक्ती करण्यात आली. नेताजी पालकर यास जावळी व वाईच्या दरम्यान घाटमाथा सांभाळण्यास सांगितले होते. प्रसंगी वाई येथील अफझलखानाच्या मुख्य छावणीवर चालून जाण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. भेटीच्या प्रसंगी खानाची फौज प्रतापगडावर जर चालून आली तर तिला रोखण्याची जबाबदारी कान्होजी जेधे व बांदल देशमुखांवर सोपवण्यात आली. तसेच  वेळप्रसंगी शिवाजीला मदत करण्याची जबाबदारी देखील कान्होजी जेधेवर टाकण्यात आली होती. याखेरीज भेट झाल्यावर गडावर तोफांच्या इशारतीचे आवाज करण्यात येतील. तोफेचा आवाज ऐकताच सर्वांनी  खानाच्या छावणीवर हल्ला करावा अशी आज्ञा देखील शिवाजीने आपल्या सरदारांना दिलेली होती.  शिवाजीने आपल्या लष्कराची जी काही रचना केली होती ती पाहता, कोणत्याही परिस्थितीमध्ये खानाच्या सैन्याला बचाव करण्याची संधी मिळू न देण्याची त्याने खबरदारी घेतली असल्याचे दिसून येते. एकूण, नुसता खानच नाही तर त्याच्या लष्कराला देखील बुडवण्याची त्याने पुरेपूर तयारी केली होती. खानाला मात्र याची अजिबात कल्पना नसल्याचे दिसून येते.    
                    
प्रतापगडाजवळ छावणी केल्यावर खानाने शिवाजीला आपल्या भेटीसाठी बोलावले. परंतु, शिवाजीने पंताजी गोपीनाथच्या मार्फत खानालाच प्रतापगडावर येण्यास भाग पाडले. तेव्हा दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या माचीवर दुपारच्या वेळी शिवाजीच्या भेटीस जाण्यासाठी खान तयार झाला. त्यानुसार भेटीचे तपशील देखील आगाऊ ठरवण्यात आले.  भेटीच्या प्रसंगी तंबूमध्ये दोन्ही बाजूंचे वकील आणि प्रत्येकी दोन हुद्देदार ( शस्त्रवाहक, मानकरी ) सोबत हजर असणार होते. तसेच दोघांनीही प्रत्येकी दहा अंगरक्षक सोबतीला आणायचे असून भेटीच्या जागेपासून ते बाणाच्या टप्प्याइतक्या अंतरावर ते उभे असणार होते.
                       
भेटीचा सर्व तपशील ठरल्यावर आणि त्यानुसार वागण्याचे खानाने मान्य केल्यावर शिवाजी पुढील तयारीस लागला. भेटीच्या वेळी सोबत दोन हुद्देदार असणार होते पण अशा प्रसंगी सामान्य मानकरी जवळ बाळगण्याइतका शिवाजी बावळट नव्हता. पट्टा चालवण्यात सराईत असलेल्या जिवा महाल यास त्याने आपल्या सोबत घेण्याचे नक्की केले. तसेच संभाजी कावजी याची देखील आपल्या सोबत येण्यासाठी निवड केली. संभाजी कावजी हा अंगबळाच्या बाबतीत अफझलखानाच्या तोडीचा होता असे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. याशिवाय वैयक्तिक बाबतीत देखील शिवाजीने बरीच खबरदारी घेतल्याचे दिसून येते. भेटीच्या दिवशी पोशाख करताना त्याने मुद्दाम अंगामध्ये चिलखत चढवले होते.  उजव्या हाताच्या अस्तनीमध्ये बिचवा / कट्यार लपवली होती. अर्थात, खानाचा विश्वासघातकी स्वभाव शिवाजीच्या परिचयाचा असल्याने त्याने अशी खबरदारी घेतल्याचे सांगितले जाते पण ते अर्धसत्य आहे. खानाच्या छावणीभोवती शिवाजीच्या सैन्याचा पडलेला विळखा लक्षात घेता आणि खुद्द खानास त्याने प्रतापगडाच्या माचीवर भेटीस येण्यासाठी भाग पडणे याच अर्थ उघड आहे. आरंभापासूनच खानासोबत कसे वागायचे याविषयीचे धोरण शिवाजीने निश्चित केले होते.
                
भेटीच्या दिवशी अफझलखानाला प्रतापगडावर आणण्यासाठी शिवाजीने पंताजी गोपीनाथास पाठवले. पंत ज्यावेळी खानाकडे गेला तेव्हा खान तयार होऊन बसला होता. अशा राजकीय भेटींची खानाला सवय होती. अशा भेटींमध्ये दगाबाजी करण्यात आजवर तो यशस्वी झाला  असल्यामुळे अंगावर शस्त्रे लपवणे, भेटीच्या अटींची पायमल्ली करणे इ. किरकोळ बाबी त्याने त्या दिवशी देखील करण्यास आरंभ केला होता. आधी ठरल्यानुसार सोबत वकील, दोन मानकरी आणि दहा अंगरक्षक नेण्याचे अफझलखानाने मान्य केले असले तरी प्रत्यक्ष भेटीच्या वेळी दीड हजार बंदुकधारी पायदळ सोबत नेण्याची त्याने तयारी चालवली होती. परंतु, पंताजी गोपीनाथ सावध असल्यामुळे खानाचा हा बेत फसला. पुढे प्रतापगडाच्या माचीवर गेल्यावर नियोजित ठिकाणी त्याचे नऊ अंगरक्षक उभे राहिले तर दहावा बडा सय्यद उर्फ सय्यद बंडा हा मात्र खानाच्या सोबत भेट ठरलेल्या तंबूमध्ये घुसला. अर्थात, खानाच्या संमतीनेच हे सर्व घडले होते आणि खानाच्या बरोबर आधी निश्चित केलेल्या हुद्देदारांपेक्षा एकजण अधिक आहे हे पंताजी गोपीनाथच्या लक्षात आले नाही !  
                         
अफझलखान प्रतापगडाच्या माचीवर दाखल होताच शिवाजी गडावरून खाली आला, पण तो तडक  भेट ठरलेल्या ठिकाणी न जाता बराचसा अलीकडेच थांबला व पंताजी गोपीनाथास त्याने बोलावून घेतले. किंवा असेही म्हणता येईल कि शिवाजीला आणण्यासाठी पंताजी गोपीनाथ यावेळी तंबूतून बाहेर आला होता. असो, यावेळी शिवाजीने अफझलखानाविषयी पंताजी गोपीनाथकडे अधिक माहिती विचारले असेल किंवा पंताजी गोपीनाथने त्यास अफझलखानाच्या कारवायांची कल्पना दिली असावी.
                
एकूण, अफझलखानाने भेटीसाठी ज्या काही अटी मान्य केल्या होत्या त्यांना मोडण्यास पद्धतशीरपणे आरंभ केल्याचे शिवाजीच्या लक्षात आले व त्यामुळे तो अधिक सावध झाला. खानाच्या भेटीसाठी पुढे जाण्याआधी त्याने सहजपणे म्हणा किंवा अधिक चौकसपणे, पण पंताजीला विचारले कि, तंबूमध्ये खानासोबत आणखी कोण आहे ? यावेळी गोपीनाथला आठवण झाली कि, खानाने आपल्यासोबत एक मानकरी अधिक आणला आहे. तेव्हा शिवाजीने प्रथम खानासोबत आलेल्या अतिरिक्त हुद्देदारास बाहेर काढण्याची कामगिरी पंताजी गोपीनाथवर सोपवली. सभासद बखरीमध्ये सय्यद बंडाचा उल्लेख येत असला तरी जेधे शकावली किंवा जेधे  करीनामध्ये या सय्यद बंडाचा नामोल्लेख येत नाही. शिवाजीच्या आज्ञेनुसार पंताजी गोपीनाथ पुढे गेला व खानास  सांगून त्याने सय्यद बंडा उर्फ बडा सय्यद यास तंबूतून बाहेर काढून ज्या ठिकाणी खानाचे उर्वरीत ९ अंगरक्षक उभे होते तिकडे पाठवून दिले. या ठिकाणी हे देखील नमूद करणे गरजेचे आहे व ते म्हणजे खानाच्या  सोबत जो वकील होता त्याचे नाव कृष्णाजी  भास्कर असल्याचा  उल्लेख जेधे शकावली, जेधे करीना मध्ये येत नाही. तसेच या भेटीच्या प्रसंगी कृष्णाजी भास्करने शिवाजीवर शस्त्र उचलल्याचा उल्लेख जेधे शकावली मध्ये किंवा सभासद बखरीत न येता जेधे करीन्यामध्ये येतो.  पण त्यात कृष्णाजी भास्कर असे वकिलाचे नाव न येत ' हेजीब ' या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. श्री. विजय देशमुख  यांनी दिलेल्या  माहितीनुसार वाईच्या यादी नाम्यात शिवाजीने कृष्णाजी भास्कर यास पट्ट्याने मारल्याचा उल्लेख येतो.
                
शिवाजी - अफझलखान यांची भेट :- सभासद बखरीमध्ये शिवाजी व अफझल यांच्या   भेटीचे जे वर्णन आलेले आहे किंवा जेधे करीन्यात उभयतांच्या भेटीची जी  माहिती  आलेली  आहे ती  सर्वांनी  जवळपास  जशीच्या तशी गृहीत धरलेली आहे. परंतु अधिक विचार केला असता असे दिसून येते कि, जेधे करीना मध्ये किंवा सभासद आणि तत्सम बखरीत जी काही या घटनेची वर्णने आलेली आहेत ती कपोलकल्पित आणि अतिरंजित अशा स्वरूपाची आहेत. वस्तुतः जेधे करीना किंवा सभासद बखर  सांगते त्यानुसार शिवाजी आणि अफझलखान यांची प्रत्यक्ष अशी गळाभेट झालीच  नाही ! 
            
शिवाजी आपल्या दहा अंगरक्षकांच्या सोबत नियोजित स्थळी आला. ठरवून दिलेली जागी त्याचे दहा अंगरक्षक उभे राहिले आणि दोन हुद्देदारांसह, म्हणजेच जिवा महाल आणि संभाजी कावजी यांच्या संगतीने शिवाजी खानाच्या भेटीसाठी तंबूध्ये शिरला. शिवाजी तंबूध्ये गेल्यावर तत्कालीन रिवाजानुसार खानाने आपल्या जवळ असलेली तलवार सोबतच्या हुद्देदाराच्या हाती दिली व त्यास दूर जाण्याचा इशारा केला. इकडे शिवाजीने देखील आपली तलवार आपल्या हुद्देदाराकडे  सोपवली. शिवाजी आणि अफझल यांच्याकडे जी छुपी शस्त्रे होती, कट्यार / बिचवा, त्यांचा मारा करण्यासाठी उभयतांना एकमेकांच्या निकट, निदान काही अंतरापर्यंत तरी, येणे अतिशय गरजेचे होते. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि याक्षणी अफझलपेक्षा शिवाजी अधिक सावध आणि चपळ असल्यामुळे त्याने आपल्या उजव्या हाताच्या अस्तनीमध्ये लपवलेला बिचवा बाहेर काढून सरळ खानाच्या पोटात खुपसला. शिवाजीचे हे कृत्य अफझलखानास अनपेक्षित असे होते. आश्चर्याचा धक्का आणि प्राणघातक असा हल्ला यांमुळे त्याला शिवाजीवर शस्त्र उगारण्याचे भान राहिले नाही किंवा त्याला तशी संधीही प्राप्त झाली नाही. खानावर एक किंवा दोन घाव घालून शिवाजी मागे सरकला. दरम्यान बिचव्याचा पहिला वार होताच खान किंचाळला आणि त्याबरोबर त्याचे मानकरी सावध झाले व  शिवाजीच्या दिशेने शस्त्रे उपसून धावले. परंतु, ते शिवाजीच्या जवळ पोहोचण्यापूर्वीच जिवा महाल आणि संभाजी कावजी यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. तंबूमध्ये हा गोंधळ सुरु होता त्यावेळी पंताजी गोपीनाथ आणि खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हे काय करत होते ?
      
तत्कालीन प्रघातानुसार राजकीय बोलाचालींसाठी वकील म्हणून जाणारी व्यक्ती जवळ शस्त्र बाळगत असली तरी ती शस्त्र चालवण्यात कुशल असतेच असे नाही. शिवाजी व अफझलखानाच्या भेटीच्या प्रसंगी पंताजी गोपीनाथ आणि  कृष्णाजी भास्कर हे दोघे,  दोन दरबाराचे वकील म्हणून हजर होते. यापैकी कृष्णाजी भास्कर याने या संघर्षात सहभाग घेतल्याचा उल्लेख जेधे करीन्यामध्ये येतो पण त्यात त्याचे नाव न येत वकील या अर्थी हेजीब या शब्दाचा उल्लेख केला गेला आहे. अर्थात, देशमुख यांनी आपल्या ग्रंथात दिलेल्या महितीनुसार कृष्णाजी भास्कर शिवाजीच्या हातून मारला गेल्याचा  जो उल्लेख आहे तो खरा न मानण्याचे  काही कारण दिसत  नाही. कृष्णाजी भास्करने आपल्या जवळील कट्यार सदृश्य शस्त्राने किंवा तलवारीने शिवाजीवर हल्ला केला आणि स्वसंरक्षणार्थ शिवाजीने त्यावर  हत्यार  चालवले असे उपलब्ध माहितीवरून  म्हणता येते. पंताजी गोपिनाथने  देखील या संघर्षात थोडाफार सहभाग घेतला असावा. कारण तो जखमी झाल्याचा  उल्लेख जेधे करीन्यामध्ये येतो पण सभासद बखर व जेधे शकावली याविषयी मौन बाळगून आहेत. यावरून निश्चित असे काही सांगणे अवघड असले तरी  ज्याअर्थी कृष्णाजी भास्कर शिवाजीच्या हातून मारला गेल्याचा अस्सल साधनात उल्लेख आहे त्याअर्थी पंताजी गोपीनाथने या संघर्षात थोडाफार सक्रीय सहभाग घेतला होता असे म्हणता येते.
              
इकडे शिवाजीने खानास जखमी केले त्यावेळी खान शिवाजीला धक्का  देऊन किंवा शिवाजी दूर झाल्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन तंबूतून बाहेर पडला. जखमी अवस्थेत खानाला तंबूतून बाहेर  पडताना पाहताच त्याचे अंगरक्षक तंबूच्या दिशेने धावून गेले. त्याच वेळी शिवाजीचे अंगरक्षक देखील खानाच्या अंगरक्षकांच्या रोखाने चालून गेले व तंबूच्या बाहेर त्यांची झुंज सुरु झाली. बाहेर हातघाईची लढाई सुरु झाली असताना आतमध्ये देखील जोरदार धुमश्चक्री चालू होती. खानाचा वकील शिवाजीवर चालून आला तेव्हा पंताजी गोपीनाथ त्याच्या मदतीस गेला. दरम्यान जिवा महाल व संभाजी कावजीने खानाच्या हुद्देदारांचा पुरता निकाल लावला होता. दुसऱ्या बाजूला शिवाजीला वाचवण्याच्या प्रयत्नात पंताजी गोपीनाथ जखमी झाला. तेव्हा शिवाजीने हाती असलेल्या कट्यारीच्या सहाय्याने किंवा जिवा महालकडून पट्टा घेऊन कृष्णाजी भास्करला कापून काढले.  खानाचे सर्व साथीदार मारले गेल्यावर शिवाजी पंताजी गोपीनाथ, जिवा महाल व संभाजी कावजी यांच्यासह तंबूतून बाहेर पडला आणि गडाच्या दिशेने निघून गेला. दरम्यानच्या काळात खानाचे दहा अंगरक्षक शिवाजीच्या सैनिकांकडून मारले गेले किंवा जखमी अवस्थेत पळून गेले. इकडे खान जेव्हा जखमी अवस्थेत बाहेर पडला तेव्हा काही अंतरावरच त्याची पालखी उभी होती. जखमी खानाचा पालखीत बसून छावणीकडे  जाण्याचा विचार होता. परंतु, शिवाजीच्या सैनिकांनी पालखीच्या भोयांवर हल्ला चढवल्यामुळे किंवा शिवाजी आणि अफझलखानाच्या अंगरक्षकांची हातघाईची लढाई सुरु झाल्यामुळे ते उधळले गेले. अफझलखान जखमी अवस्थेत तिथेच पडून राहिला.  अफझलखानाचे मस्तक संभाजी कावजीने कापल्याचा उल्लेख जेधे शकावली किंवा करीन्या मध्ये येत नाही. माझ्या मते शिवाजीच्या सैनिकांनी खानाचे शीर कापून गडावर नेले असावे. कारण, संभाजी कावजी अशा प्रसंगी शिवाजीला एकटा सोडून खानाचे मुंडके मारण्यासाठी वेड्यासारखा बाहेर धावेल हे संभवत नाही. पुढे शिवाजी गडावर पोहोचल्यावर तोफांची इशारत झाली आणि पाठोपाठ खानच्या कोयनेकाठच्या बेसावध छावणीवर मराठी फौज चारी बाजूंनी तुटून पडली.
                        
संदर्भ ग्रंथ :-
(१) जेधे शकावली
(२) जेधे करीना
(३) शिव छत्रपतींचे चरित्र ( सभासद बखर ) :- कृष्णाजी अनंत सभासद
(४) श्री शिव छत्रपती ९१ कलमी बखर
(५) श्री शिव छत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र :- मल्हार रामराव चिटणीस
(६) शककर्ते शिवराय :- विजय देशमुख