Monday, June 27, 2016

प्रकरण १) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी


    प्रत्येक व्यक्ती हि आपल्या लेखी नायकच असते व अंगभूत गुणांना भौगोलिक व सामाजिक परिस्थितीची जोड मिळाल्यास अशी व्यक्ती आपल्या कर्तुत्वाचा ठसा त्या काळावर उमटवून जाते. अशा कालखंडास त्या व्यक्तीचे नाव प्राप्त होऊन ती इतिहासात अजरामर होते. या दृष्टीने पाहिले असता मध्ययुगीन हिंदुस्थानच्या इतिहासात शिवाजी हा एकमेवाद्वितीय राजा होऊन गेला, ज्याने साधारणतः तीन साडेतीन दशकं राज्यपद उपभोगले पण या तीन साडेतीन दशकांच्या काळात त्याने आपल्या कर्तबगारीने असा काही कर्तुत्वाचा ठसा जनमानसावर उमटवला कि त्याच्या कारकीर्दीचा इतिहास हा शिवशाही, शिवाजीचा इतिहास म्हणून ओळखला जातो. मोगल, पेशवाई कालखंड हे शब्दप्रयोग जसे इतिहास अभ्यासकांत प्रचलित आहेत त्याचप्रमाणे शिवकाल हि संज्ञाही प्रचलित आहे. परंतु यातला मुख्य भेद म्हणजे मोगल वा पेशवाई या संज्ञा एका संपूर्ण घराण्याच्या कर्तुत्ववान पिढ्यांच्या पराक्रमामुळे त्या ता कालखंडास प्राप्त झाल्या असून शिवशाही वा शिवकाल हि संज्ञा फक्त एकाच व्यक्तीच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. यावरून शिवाजीच्या कर्तबगारीचा, कर्तृत्वाचा अंदाज यावा.

    एखादी व्यक्ती जितकी प्रसिद्ध तितक्या तिच्याविषयी दंतकथा अधिक. शिवाजी देखील त्यास अपवाद कसा असेल. किंबहुना आजवरचा शिवाजीवरील रचित इतिहास हा सत्यापेक्षा कल्पकतेवरच बऱ्यापैकी आधारित असल्याचे दिसून येते. दंतकथा मग ती दादोजी असो वा रामदास स्वामी. तानाजी असो किंवा आगऱ्याहून सुटका. शिवाजीच्या हयातीत त्याने अशी काही धाडसी कृत्यं करून ठेवली कि त्यातील प्रत्येक घटनेवर एकाहून अधिक दंतकथा निर्माण झाल्या. असं होणं स्वाभाविक असलं तरी या कथा - दंतकथांमधून इतिहासाच्या सत्य स्वरूपाच्या जवळपास जाणं इतिहास अभ्यासकांना खूपच अवघड गेलं व जात आहे. यामुळेच कि काय, आजवर शिवाजीवर विपुल लेखन होऊनही त्याचं अधिकृत म्हणता येईल असं एकही चरित्र उपलब्ध नाही. असो.

    एखादी व्यक्ती स्वयंप्रकाशाने तळपू लागली असता तिच्या उत्कर्षकालात वा नंतर त्या व्यक्तीला पुढे आणण्याचे श्रेय घेण्या - देण्याची चढाओढ लागते. शिवाजीच्या बाबतीतही तेच झालं. परंतु त्याच्या हयातीपेक्षा त्याच्या मृत्यूनंतर --- विशेषतः शिवचरित्राचा जसजसा महाराष्ट्रात प्रसार होऊ लागला तसतसा त्याच्या कर्तबगारी, कर्तृत्वाच्या श्रेयाचा वाटा कोणाला द्यावा यावरून वाद निर्माण झाले व आजही आहेत. त्यांपैकी सर्वांच्या परिचयाचा म्हणजे शिवाजीचा गुरु कोण, हा होय.

    शिवाजीचा गुरु कोण हे ठरवताना प्रथम राजकीय व अध्यात्मिक असे दोन भेद लक्षात घेणे आवश्यक आहे. पैकी, राजकीय गुरु पाहता त्याच्या बापाने नियुक्त केलेले शिक्षक व मंत्री हेच त्याचे गुरु होत. परंतु शब्दशः अर्थाने नव्हे. राजकीय व्यवहारांचे शिक्षण दिल्यामुळे कोणी राजनीतीट पारंगत होत नाही. मुळचेच अंगभूत गुण असल्याखेरीज बाह्य शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही. याचे समकालीन प्रसिद्ध उदाहरण म्हणजे दारा शुकोह व औरंगजेब. बापाने शिक्षणाची योग्य ती काळजी घेऊनही एक धर्मपंडित तर दुसरा राजनीतीपटू बनवा यांस काय म्हणता येईल. तात्पर्य, अमुक एका व्यक्तीचे मार्गदर्शन लाभल्याने शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज बनला असं मानणं मूर्खपणाचं आहे.  

    शिवाजीचा आध्यात्मिक गुरु कोण हा मात्र थोडासा किचकट वादाचा प्रश्न आहे. वास्तविक हा तितकासा किचकट का बनावा हेच मोठं आश्चर्य आहे. तत्कालीन समाजाची मानसिकता लक्षात घेता समाजमान्यतेनुसार साधुपुरुष तथा संतमंडळींचा परामर्श घेणे हे सत्ताधाऱ्यांचे एक कर्तव्यच बनलं होतं. जरी हे ऐच्छिक असलं तरी यापासून कोणीही मुक्त नव्हतं. या कर्तव्यपालनामागे नेहमीच त्या संत व्यक्तीविषयी राज्यकर्त्याच्या मनी पूज्यबुद्धी असेलच असं मानायचं काही कारण नाही. शिवाजीने आपल्या हयातीत अनेक संत - साधू मंडळींना वर्षासने, देणग्या दिल्या. त्यामुळे ते त्याचे आध्यात्मिक गुरु होत असं म्हणणं हास्यास्पद ठरेल. त्याऐवजी उपलब्ध समकालीन साधनांत त्याच्या आध्यात्मिक गुरुविषयी काही उल्लेख सापडतो का हे पाहणे आवश्यक आहे.

    यादृष्टीने पाहता कृ. वा. पुरंदरे संपादित ' पुरंदरे दफ्तर भाग ३ रा ' मधील खेडेबारे येथील देशपांडेच्या शिवकालीन करिण्यातील मजकूर पुढीलप्रमाणे :- " .. .. ते वेलस आपले बापापासी काही द्यावयास नव्हते तेधवा राजेश्री माहादेवभट माहाभास राजेश्री राजियाचे गुरु ते आपले माऊस चुलते त्यास वरातदारी उपद्रव केला ... ... "
येथे महादेव भट हि व्यक्ती राजियांची --- शिवाजीची गुरु असल्याचा उल्लेख आहे.

दुसरा समकालीन उल्लेख खालीलप्रमाणे :-

स. ११२}        (६३१)              { श. १५७४ फाल्गुन शु. १ श.}      ' प्रतिपच्चंद्र ' मु.           { इ. १६५३ फेब्रु. १८
वेदमूर्ती गोपाळभट बिन श्रीधरभट, वास्तव्य श्री महाबळेश्वर विद्यार्थी शिवजी राजे दंडवत. [ प्रधानाची मु. ] विनंती उपरी स्वामी भले थोर अनुष्ठाते सूर्य - उपासनी पद्महस्ती ; ऐसे जाणोन आपण मातुश्री जिजाबाई आउसाहेब वेदमूर्ती प्रभाकरभट यांच्या विद्यमाने स्वामीपासून मंत्र उपदेश संपादिला. स्वामी आपले गुरु. स्वामीस आपण आपले अभ्योदयार्थ सूर्यप्रीत्यर्थ अनुष्ठान सांगितले. प्रतिवर्षी वर्षासन द्यावयाची मोईन केली असे. बितपशील वर्षासन पैकी गल्ला नवशेरी. सूर्यप्रीत्यर्थ अनुष्ठान प्रतीवर्षी करावे त्यास नक्त होन १०० याप्रमाणे होन पाछाई एकशे व गल्ला नवशेरी वारुळे मापे खंडी आठ वजन टकबंदी सवा आठरा मण व आरक्त वस्त्रें दोनी व पीतांबर एक शाल एक व आसन एक याप्रमाणे वर्षासन व पूजा सामुग्री मोईन दानपत्रे करुन दिल्ही असे. स्वामींनी आमचे अभ्योदयार्थ सूर्यप्रीत्यर्थ प्रतिवर्षी अनुष्ठान उत्तरोत्तर करावे व मंत्रउपदेशही स्वामींचे वंशपरंपरेने आमचे वंशपरंपरेस करावा. आपण संकल्पपूर्वक प्रतिवर्षी वर्षासन दानपत्र करून स्वामीस दिल्हें. हे आपले वंशपरंपरेने उत्तरोत्तर चालवावयास अन्यथा करूं तरी श्री महादेव साक्ष. स्वामीनी निरंतर देवापाशी आमचे कल्याण इच्छावें. लेखनालंकार मोर्तब.
सूचना :- पत्र जसे छापले तसे येथे उतरवून घेण्याचा प्रयत्न केल्याची नोंद घ्यावी.
संदर्भ ग्रंथ :- १) शिवकालीन - पत्र - सार - संग्रह ( खंड १ )

    उपरोक्त पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे कि, गोपाळभट बिन श्रीधरभट कडून शिवाजीने मंत्रोपदेश घेतला. शिवाय याच पत्रातील अखेरच्या परिच्छेदात गोपाळभटाच्या वंशजांनी शिवाजीच्या वारसांना वंशपरंपरेने मंत्रोपदेश करावा असे लिहिले आहे. त्याबदल्यात गोपाळभटास वर्षासन करून दिल्याचा व ते पुढे वंशपरंपरागत चालवण्याचा महादेवाच्या साक्षीने शब्द दिला आहे.

    उपरोक्त दोन अस्सल समजल्या जाणाऱ्या लेखांत दोन वेगवेगळ्या व्यक्तींचा शिवाजीचा गुरु म्हणून उल्लेख आहे. देशपांडे करिणा विश्वसनीय आहे, नाही हा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी शिवकालीन पत्रसार संग्रहातील पत्राबद्दलही अशाच तऱ्हेचा आक्षेप घेतला जाऊ शकत नाही असेही म्हणता येत नाही.

    प्रश्न असा आहे कि, हे दोन कागदपत्र जर अस्सल व विश्वसनीय आहेत व ज्याअर्थी ते इतिहास संशोधकांनी प्रकाशित केले आहेत त्याअर्थी त्यांच्या नजरेखालून गेले आहेत, असे असता शिवाजीचा आध्यात्मिक गुरु म्हणून रामदासाला पुढे का करण्यात आले ?

    जर उपरोक्त कागदपत्रे विश्वानीय आहेत तर रामदास पुढे का आला व उपरोक्त कागदपत्रे विश्वसनीय नाहीत तर, ती का नाहीत हे देखील त्याच इतिहास संशोधकांना सांगावेच लागेल.
शिवकालीन पत्रसार संग्रहातील पत्राच्या विश्वसनीयतेचं आणखी एका प्रकारे परीक्षण करता येऊ शकते. उपरोक्त पत्रात शिवाजीने गोपाळभटास आपल्या वंशजांनाही मंत्रोपदेश करण्याची विनंती केली आहे. तेव्हा गोपाळभट व त्याच्या वंशजांनी हे कार्य पुढे चालू ठेवले होते, नव्हते याचे उल्लेख असणारे कागदपत्र मिळाल्यास या बाबीवर प्रकाश पडू शकतो. तसेच भोसले घराण्याचे वंशजही या बाबतीत काही प्रकाश टाकू शकतात. जर त्यांची इच्छा असेल तर !       
                                                                  ( क्रमशः )