रविवार, २७ मार्च, २०१६

अटक स्वारीपूर्वीचे रघुनाथरावाचे एक पत्र

लेखांक [ ८९ ]                           श्री            संवत १८१४ भाद्रपद वद्य १
११२ ]                                                      [ ३० ऑगस्ट १७५७ ]

      राजश्री दत्ताजी सिंदे गोसावी यांसी
    सकलगुणालंकरण अखंडितलक्षी आलंकृत राजमान्य श्नो| ( स्नेहांकित ) रघुनाथ बाजीराव आसिर्वाद उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये लिहीत असिले पाहिजे विशेष. अबदाली पठाण याची आमद आमद गरम आहे. त्यास तो आला नांही तों आपण भारी होउन राहावें म्हणजे उत्तम. तरी तुम्हीं जलदीने येणे येसीं पत्रे पैसजी लिहिलीच आहेत त्याज वरून तुम्ही यावयाची तर्तूद केलीच असेल व हलीही लिहिले असे. तरी याजउपरी तुम्ही जलदी करून लाबलाब मजली करून बहुतच त्वरेने येणे. रा| छ १४ जिल्हेज.                                       
                                                       पो| छ २९ रबिलोवल रविवार
                                                       [ १२ दिसबर १७५७ ]

* आमद आमद गरम आहे - तो जलद चालणारा आहे.

    विश्लेषण :- प्रस्तुत पत्र काव्येतिहास संग्रहात देखील प्रकाशित केले असून त्याची तारीख मात्र चुकीची पडली आहे. काव्येतिहास संग्रहकर्ते हे पत्र दि. २२ - १० - १७५२ चे असल्याचे सांगतात. परंतु यावेळी रघुनाथ उत्तरेत स्वारीवर गेलाच नव्हता. शिवाय शिंद्यांची सरदारी जयाजीकडे असल्याने दत्ताजीला पत्र लिहिण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. तसेच स. १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशाही संरक्षणाचा करार करून पावसाळ्यात शिंदे - होळकर दक्षिणेत आले होते. तेव्हा शिंदेशाही इतिहासाच्या संपादकांनी निश्चित केलेली तारीख ग्राह्य धरणे योग्य वाटते.
    उपरोक्त पत्र तसेच शिंदेशाही इतिहासाच्या संपादकांनी ठिकठिकाणी टिपांमध्ये दिलेली माहिती व प्रस्तावना लक्षात घेऊन काही गोष्टींची स्पष्टता करता येते, ती अशी :-

    (१) कर्जामुळे पेशव्याने सैन्यकपातीचे धोरण आखले होते. त्यामुळे रघुनाथराव उत्तरेतील कोणत्याही स्वारीत पुरेशी फौज घेऊन जाऊ शकला नाही.

    (२) सरदारीची वस्त्रे मिळाल्यावर जयाजीने आपल्या लष्करात वाढ करून तीस ते चाळीस हजारांचा जमाव पदरी बाळगला होता. त्याउलट होळकराने स. १७५९ मध्ये मूळच्या सैन्यात थोडी भर घालून ते वीस हजारापर्यंत वाढवले होते.

    (३) स. १७५७ साली रघुनाथराव आणि होळकर अब्दालीच्या सामन्याकरता उत्तरेत गेले होते खरे पण लष्करी बळ पुरेसे नसल्याने त्यांनी दत्ताजी शिंद्याची प्रतीक्षा करण्याचे धोरण स्वीकारले. इकडे पेशव्याचे निजामाशी याच सुमारास बिनसल्याने सिंदखेडची मोहीम उद्भवून शिंदे दक्षिणेत अडकून पडला. तेव्हा मोगल, शीख व रोहिले मदतीस घेऊन रघुनाथास पंजाब स्वारी करावी लागली.

    (४) शिंदेशाही इतिहासाची साधने, भाग - ३ मधील स. १७५९ मधील पेशव्याची पत्रे अभ्यासली असता असे लक्षात येते कि, शिंदे - रघुनाथ यांची बंगाल प्रांती तर होळकराची राजपुतान्यावर पेशव्याने नियुक्ती केली होती. त्यामुळे शिंदे शुक्रताली का अडकला व होळकर राजपुतान्यात का गुंतला याचे उत्तर मिळते. आक्षेपकांनी यासंदर्भात प्रस्तुत खंडातील लेखांक क्र. ११२ अभ्यासावा मग मत मांडावे.

    (५) पानिपत युद्धात मल्हारराव होळकराची योजना लष्करी गोलाच्या उजव्या बाजूला का करण्यात आली होती याचीची साधार उकल होते. माळव्याच्या वाटणीनंतर मुतालकी शिंद्याकडे आली तेव्हा परस्पर स्नेहांत अंतर न पडावे म्हणून भगव्या झेंड्याच्या उजव्या बाजूस चालण्याचा व तळ ठोकण्याचा मान होळकरास देऊन शिंद्याने डावी बाजू स्वीकारली असे प्रस्तुत संग्रहाच्या संपादकांचे मत आहे. श्री. फाळके तत्कालीन ग्वाल्हेर दरबाराशी संबंधित असल्याने त्यांचे हे मत अग्राह्य धरण्यास काहीच कारण दिसत नाही.

संदर्भ ग्रंथ :-
(१) शिंदेशाही इतिहासाची साधने ( भाग - ३ ) :- संपादक - आनंदराव भाऊ फाळके.
(२) ) काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख :- संपादक – गो. स. सदेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकस्कर

शनिवार, २६ मार्च, २०१६

बुराडी घाटच्या संग्रामानंतरचे जनकोजी शिंदेचे पत्र




लेखांक [ २२० ]            श्री     संवत १८१६ पौष वद्य १३ 
                                [ १६ जानेवारी १७६० ]

    राजश्री लालजी बलाल प्रांत कोटे व पा|| पाटण गोसावी यांसि.
अखडित लक्ष्मी आलकृत राजमान्य स्ने||    जनकोजी सिंदे रामराम सुमा सितेन मया अलफ. ' दिलीवरी गिलच्या व रोहिले आले. त्यांची व आमची लडाई जाली. छ २० जमावली गुरुवारे ( १० जानेवारी १७६० ) जाहली. त्यास तीर्थरूप काकाबावा यास गोळ्या लागोन लडाईतच राहिले व आम्हासही उजवे दंडावरी गोली लागली. थोडकीच असे. त्याउपर आम्ही बुनग्यात येउन सर्वही बुनगे साभाळून गांव कोट पुतली प्रांत जेपूर येथे आलो. तो येथेच राजश्री मल्हारजी बाबा होळकरही फौजसहवर्तमान आले. त्याची व आमची भेट जाहली. याउपरी बुनगे येखादे जागा लाउन आम्ही उभयता सडे फौजेनसी दिलीकडे रोहिले व गिलच्यास तबी करावयास येका दो रोजात जातो. शत्रूस नेस्तनाबूत करितो. चिंता न करणे. तुम्ही आपले मामलियात मजबूदीनेच असणे आणि आपले काम काज करीत जाणे. वरचेवरी वर्तमान लिहित जाणे. ' जाणिजे छ २६ माहे ज|ोवल. बहुत काय लिहिणे हे विनंती.
                              पै छ १७ ज|ोवल माघ वद ४
                                      [ ५ फरवरी १७६० ]

    ( पत्र जसे छापले तसे उतरवून घेण्याचा प्रयत्न केल्याची नोंद घ्यावी. )  

    विश्लेषण :- प्रस्तुत पत्र बुराडीचा संग्राम झाल्यावर सहा दिवसांनी जनकोजी शिंदेने कोटा संस्थानच्या दरबारात असलेल्या आपल्या वकिलास लिहिले आहे. यामध्ये बुराडी संग्रामाचे अगदी त्रोटक वर्णन असून स्वतः जनकोजीलाही उजव्या दंडावर गोळी लागल्याचा उल्लेख आहे. परंतु लढाईत शिकस्त होऊनही बुणग्यांसहित व्यवस्थित माघार घेत तो कोट पुतळीस आला. इथेच त्याची मल्हारराव होळकरसोबत भेट झाली. अर्थात उभयतांची प्रत्यक्ष भेट कोणत्या दिवशी व कुठे झाली याचा उल्लेख नसला तरी ज्याअर्थी प्रस्तुत पत्र १६ जानेवारी रोजी लिहिले आहे तेव्हा याच दिवशी वा आदल्या दिवशी कधीतरी उभयतांची मुलाकात झाली असावी.

    यासंदर्भात दत्ताजी शिंद्याच्या मुक्कामाचे तपशील पाहणे आवश्यक ठरेल. दि. ३० डिसेंबर १७५९ रोजी तो सोनपत जवळ होता. १० जानेवारी रोजी बुराडीच्या लढाईत तो मारला गेला तर १६ जानेवारीचे जनकोजीचे उरोक्त पत्र आहे. यावरून असे दिसून येते कि, होळकर शिंद्याच्या मदतीकरता दिल्लीकडेच चालला होता व तो येण्याच्या आत अब्दालीने आपला डाव साधून घेतला.

    बुराडीची लढाई व होळकराची भेट झाल्यावर उभयतांनी अब्दालीविरुद्ध लढण्याची फेरयोजना करून प्रथम बुणगे व कबिले सुरक्षित स्थळी पाठवून मग दिल्लीकडे चाल करण्याचा मनसुबा आखल्याचेही उपरोक्त पत्रातच नमूद केले आहे.

    लक्षात घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे सदर पत्र लालजी बल्लाळला दि. ५ फेब्रुवारी १७६० रोजी मिळाल्याची नोंद आहे.                

संदर्भ ग्रंथ :-

(१) शिंदेशाही इतिहासाची साधने ( भाग १, ३ ) :- संपादक - आनंदराव भाऊ फाळके.                   

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

उदगीर स्वारी संबंधी काही नवीन माहिती




    स. १७५९ - ६० साली निजाम - पेशवे यांच्या उदगीर येथे झालेल्या संग्रामावर प्रकाश टाकणारी दोन पत्रे नुकतीच वाचनात आली. यापूर्वी उदगीर मोहिमेसंबंधी एका लेखात आम्ही अस्सल पत्रे व संदर्भ ग्रंथांच्या सहाय्याने विवेचन केलेले आहेच. त्यामध्ये पूर्णतः नसला तरी थोडाफार बदल करण्याची आवश्यकता या दोन पत्रांमुळे झाली असली तरी ते कार्य सध्या तरी लांबणीवर टाकत आहे व तूर्तास नुकतीच वाचनात आलेली दोन पत्रे या स्थळी देत आहे.
( उदगीर स्वारीसंबंधी जुना लेख वाचण्यासाठी - http://peshwekalinitihas.blogspot.in/2012/09/blog-post.html )

सदाशिवरावाचे नानासाहेब पेशव्याला पत्र.

 क्र ११ )                              [ १६-१२-१७५९

विनंती उपरी
जानोजी भोसले थोडे. त्यावर मुधोजी उलटून गेला. जूज होणार हे खबर आली आहे. येविसी पेशजी लिहिले. आज्ञा होईल तसे लेहून पाठऊ.

तोफखानाकडील नेमणुकेची दारू वगैरे किरकोल जिनस स्वारीचा राहिला, त्याविसी गोविंदपतास आज्ञा व्हावी कीं, सत्वर येऊन पावे व नगरचे ही नेमणुके प्रमाणे लौकर यावे.

ऐवज येथे तीन लाख आणविला तो यावा. खासा स्वारी ब|ााहि [ बरोबर / बराबर ] दोन लाख यावे. दीड लाख ब|| [ बराबर / बरोबर ] आणिले. त्यांतला विजयनगरची खरीदी गाडदी, काही नालबंदी किरकोळ असेच जाले. रोजमराहि चालीस पंनास हजार आला. सिलक उडाली. तेव्हा पैठणाहून यैवज आणावा लागला.

नगरास येणे जालीयावर तेथील काम सर्व पाहून आज्ञा त्यांस करावी. येथून सांगितले ते विनति करतील. हवालदार राणोजीराव खानवीलकर अगर तसाच कोणी ठेवावा. इमारत चाली लागली पाहिजे. फराबाग बहुत उत्तम आहे. तेथे जवळ राहणे यासहि स्थळ चांगले आहे.

स्वामींनी शरीरप्रकृत लिहिली त्यांत क्षीण आहे. त्यास बहुत प्रकारे पथ्य चांगले करावे. जवळ मजल करावी याप्रमाणे महिनाभर करावे. पुण्याहून कूच जाले. भिवरेथडीचे व नगरचे पाणी मानेलसें वाटते प्रकृतीस पडेल तेव्हां खरे. आणाजी साटम याचा काहींतरी निकाल काढून त्यास आम्हाकडे पाठऊ (न) द्यावे घरींच राहिले आहेत. वतनाचे गाणे सेवटा न जाई, तरी उमेदवार करून ठेवावे. त्यास घरी राहू न द्यावे.

येथे फौज खडीगणती गंगेवर येते दिसी घेतली. ते सा हजार जाली. बिनीची पथके हजारेक होते. अजून जमा होत. येथें आलियावर नलवडे ख तल घाटगे वगैरे पांचसे पर्यंत आले. फिरून पत्रे पाठविली आहेत.

खासास्वारीब|| हजार दोन हजार फौज नेमणे ते नेमून त्यास आज्ञा व्हावी. आगदी लोक नाही हे उत्तम नाही. चौकीचा बंदोबस्त उत्तम प्रकारे आसावा. पुण्यासहि दोन तीनशे राऊत नेमून ठेवावे.

आवरंगाबाजेत पाचसासे फौज हजार दोन हजार प्यादा आहे. तेथे काही घ्यावे तर फार करून आपलेच लोक आहेत. फौज जमा वीस हजार असती तर सहजांत कांही तरी काम होते. प्रस्तुत घासदाणे घेतो. शहरास काही प्रकार करावा की काय किंवा दौलताबाजचे होईल ते आपन करणे ते. येक नि - - य नाही ते - -

माझी प्रस्तुत बरीच आहे. दोहो तिही दिसांआड येकदां जेवतो. संभाळून जेवावे लागते. पथ्य अगदी नाही. जड मात्र फार खात नाही. औषध पहिले चालते तेच आहे. जखमेचे कातडे अजून वळकट जाले नाही. शिरेवर म्हणून आंग दुखत थोडेसें असते. वरकड पहिलेहून सर्व प्रकारे बरें आहे. शक्त अजून चांगली येत नाही. पाठीमुळे दंड नमस्कार नाही. ते चाली लागल्या याहून बरे वाटेल. थोडा थोडा प्रारंभ आहे.

दादांची व रायाची शरीर प्रकृत बरीच आहे.

बाबूजी नाइक विठलपंत बाबाचे वगैरे पथके आजून दोनही फौजांतील कोणी जमा होत नाहींत. बहुधा एकदांच सारे येतील तर नकळे. गंगातीरीं वैरण मिळत नाही. एके जागा दोन चार दिस जालीया कूच करावे लागते. येथून जावे तिकडे रोख पडतो हे तिवंधा ( त्रेधा ? ) आहे.
रा| छ २५ रा|कर हे विनंती.

विठ्ठल शिवदेव विंचूरकराचे पत्र
क्र १२]                                       [ १२-१-१७६०
                                श्री
                 छ २३ जमादिलौ ...
                 वल रविवार तिसरा प्रहर
विनंती सेवक विठल सिवदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती विज्ञापना. येथील कुशल ता| छ २१ जमादिलौवल मंदवार मु|| हेर जाणून स्वामीचे कृपेकरून येथास्थित असे विशेष. काल छ २० रोजी वर्तमान सेवेसी लिहिले होते की मोगल उदगिरीपलीकडे दों कोसावर घाटाखाले होता. जाधवरायाचा मुकाम मात्र फौजेचा उदगिरीवर होता. आम्हाकडील लोक जाऊन कहीची उटे सत्रा आठरा काही तटे येसी घेऊन आले. काल मोगलाचे कूच होणार होते ते मुकामच जाला. खासे जाधवराव काही फौजेत नवते. माग मौजे मृगावर होते. ते आज प्रहरा दिवसा आम्ही तयार होऊन त्याच्या गोटा सेजारी माळावर जाऊन उभे राहिलो. तो तेहि पलिकडून येऊन दाखल जाले होते. तो आम्ही गेलो. मग त्याचे कूच होऊन ढाला पाडून गावात शेहरात राहिले. किल्ल्यावरील तोफा जाल्या. मग आम्ही मोगलाचे रोखे गेलो. उजवे होते जाधवराव, उदगीर डावे होते लस्कर ऐसी जागा पाहून डोंगर होता तेथे उभे राहिलो. लुगारे डोंगर आड दरा होता. आम्हास चालून जाता नये ना. त्यास येता नये. यैसे बांकी जागा हो (ती)
लुगारे राऊत डावे उजवे होऊन नवाबाच्या लस्कारासेजारी जाऊ (न) तीस चालीस बईल दोन च्यार बंदुखा येक बाण लगीचा येसा घेऊन आले. तो पावणे दोन प्रहर जाले असता नवाबाचे येकाकीच डेरे पडू लागले. फौजा तयार होऊन पुढे आल्या मागून कूच होऊन फौजा हरोल आला. मागून बुनगे नवाब यैसे जो दरा वाटेचा त्या माथ्यावर आम्ही करोल उतरून आवाज केले. मग त्या पलीकडे दुसरी वाट आडवाटेने हरोल चढून त्या पलीकडील रस्ता त्याने तोफखाना यैसे चढोन आले नवाब आले. तेव्हा हरोल किल्ल्या से जारी आला मागोन चडोल चालिला येसी सर्व फौजसुद्धा मुकाम उदगीरीपाठीसी देऊन मुकाम जाला. ढाला जाल्या नवत्या. हरोल मात्र आला. दिवस सा सात घडी राहिला. मग आम्ही सरोन माघारे आलो. छेबिन्यास व रात्री कहीवर घालावे. याकरिता आम्हाकडील लोक व दारकोजी निंबालकर यैसे ठेविले. आम्ही आलो. मोगल दाहा हजारपर्यंत आहे. सिवाये प्यादा गारदी बुनगे येकचे (?) होते. दाहा हजार पर्यंत तेहि असतील. सिवाये तोफा येण प्रमाणे आहे. उदईक कूच होईल की मुकाम होईल ते पाहावे. त्याप्रोा सेवेसी लिहून कलऊ. श्रुत होये हे विज्ञापना.                
( पत्रे ज्या स्वरूपात छापण्यात आली तशीच उतरवून घेण्याचा प्रयत्न केल्याची नोंद घ्यावी. )

विश्लेषण :- ILLUSTRATIVE MODI DOCUMENTS या B. G. Kunte संपादित संदर्भ ग्रंथातील पत्र क्र. ११ हे सदाशिवराव भाऊच्या हस्ताक्षरातील असून उदगीर स्वारीतून दि. १६ डिसेंबर १७५९ रोजी त्याने  नानासाहेब पेश्व्यास लिहिले आहे.

    प्रस्तुत पत्राच्या आरंभी भोसले बंधूंच्या झगड्याची अल्प माहिती आहे. त्यानंतर स्वारीसाठी आवश्यक तो दारुगोळा वगैरे किरकोळ गोष्टी नसल्याने त्यांच्या पाठवणी विषयीचा उल्लेख आहे.
त्यानंतर स्वारीच्या खर्चाचा मजकूर असून नंतर नगरच्या किल्ल्यावरील बांधकामाचा तसेच पेशव्याच्या तब्ब्येतीविषयी चौकशी करणारा मजकूर आहे. यावरून असे दिसते कि, स. १७५९ पासूनच पेशव्याच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरु झाल्या होत्या. असो.

    पुढील परिच्छेदात सोबत असलेल्या फौजेचा उल्लेख आहे. निजामावरील स्वारीकरता पेशवेबंधू बाहेर पडले असले तरी डिसेंबरच्या मध्यावर त्यांच्यासोबत पुरते दहा हजार सैन्य नाही. विशेष म्हणजे हि मोहीम उद्भवली नसती तर रघुनाथराव उत्तरेत दत्ताजी शिंदेच्या मदतीला जाणार होता.

    त्यानंतर खासा स्वारीबरोबर हजार दोन हजार फौज नेमून देण्याचा उल्लेख आहे. हा बहुधा भाऊने तो, रघुनाथ व विश्वासराव यांना उद्देशून केला असावा.

    त्यानंतरच्या परिच्छेदात मोहिमेविषयीची चर्चा आहे. औरंगाबाद अथवा दौलताबादेकडे रोख करावा या विचारात भाऊ असला तरी पदरी पुरेशी फौज नसल्याचा उल्लेख विशेष लक्षणीय आहे.

    त्यानंतर भाऊ, रघुनाथ व विश्वासराव यांच्या प्रकृतीचे वर्तमान आहे. पैकी भाऊच्या ज्या जखमेचा उल्लेख आला आहे ती जखम मुजफरखान गारदीने दि. २८ ऑक्टोबर १७५९ रोजी गारपीर मुक्कामी केलेल्या हल्ल्यामुळे झाली होती.

    अखेरच्या परिच्छेदात बाबूजी नाईक, विठलपंत वगैरे थोर पथके जमा न झाल्याचा उल्लेख असून गंगातीरी  वैरण मिळत नसल्याने एका जागी चार दोन दिवसांहून अधिक मुक्काम करता येत नसल्याचे भाऊने लिहिले आहे. या पत्रात उल्लेखलेली गंगा म्हणजे कोणती नदी हे स्थळ निर्देशाअभावी स्पष्ट अवघड आहे.

    दुसरे पत्र विठ्ठल विंचूरकराचे असून ते दि. १२ जानेवारी १७६० रोजी लिहिले आहे. यावेळी निजामाविरुद्धची मोहीम सुरु झाली असून तिचा तोपर्यंतचा वृत्तांत प्रस्तुत पत्रात आहे. त्यानुसार रामचंद्र जाधव व निजाम उदगीर पर्यंत पुढे चालून आले होते. विठ्ठल शिवदेव बहुधा पेशव्याची आघाडी सांभाळत होता वा निजामावर छापे मारण्याचे काम त्याजवर सोपवण्यात आले होते. निजामाचा उद्देश धारूर येथील त्याच्या कुमकेकरता गोळा झालेल्या व्यंकटराव निंबाळकर प्रभूती सरदारांशी हातमिळवणी करण्याचा होता. पैकी या सरदारांच्या शहावर दमाजी गायकवाडाची नियुक्ती केली होती.

    प्रस्तुत मोहिमेशी संबंध नसलेले परंतु पेशव्याचे लष्करी दौर्बल्य उघड करणारे एक महत्त्वाचे पत्र शिंदेशाही इतिहासाची साधने ( भाग - ३ ) मध्ये छापलेलं आहे. त्याचा लेखांक क्रमांक १०१ असून दि. २४ फेब्रुवारी १७५९ रोजी नानासाहेब पेशव्याने शिंद्याच्या कारभाऱ्यास --- रामाजी अनंत दाभोळकरास लिहिले आहे. त्यामध्ये पेशव्याने कर्जामुळे आपली बरीचशी फौज कमी केली असून जरुरीपुरती वीस हजार फौज पदरी बाळगल्याचे नमूद केले आहे. उदगीर स्वारीतील भाऊचे पत्र तसेच या मोहिमेसंदर्भात मागील लेखात उदगीर स्वरीतील मराठी सैन्याविषयीचा वृत्तांत सांगणारी य. न. केळकर संपादित पत्रातील मजकूर लक्षात घेतला तर पेशवा कोणत्या बळावर अब्दालीचा सामना करून बंगाल वगैरे प्रांत ताब्यात घेण्याची स्वप्नं बघत होता व उदगीर स्वारीनंतर भाऊ, सारी दक्षिण मोकळी असल्याचा उल्लेख करतो हे समजायला मार्ग नाही.

संदर्भ ग्रंथ :-
(१) ILLUSTRATIVE MODI DOCUMENTS :- संपादक - Capt. Dr. B. G. Kunte
(२) शिंदेशाही इतिहासाची साधने ( भाग ३ रा ) :- संपादक - आनंदराव भाऊ फाळके
(३) मराठी रियासत ( खंड - ४ ) :- गो. स. सरदेसाई

शुक्रवार, ११ मार्च, २०१६

मी मृत्युंजय ..... मी संभाजी :- संजय सोनवणी





                      


    आत्ता थोड्या वेळापूर्वीच श्री. संजय सोनवणी यांची छ. संभाजी राजांच्या अखेरच्या दिवसांवर आधारित ' मी मृत्युंजय .... मी संभाजी ' हि कादंबरी वाचली. शिवपुत्र संभाजीच्या जीवनावर तशा कित्येक कादंबरीकारांनी कादंबऱ्या रचल्या आहेत परंतु त्या सर्वांत जनमानसावर अधिराज्य गाजवलं ते श्री. शिवाजी सावंत यांच्या ' छावा ' ने ! सावंतांनी ज्या काळात संभाजीवर कादंबरी लिहिली त्या काळात जनमानसात संभाजीची वेगळीच प्रतिमा होती. महापराक्रमी बापाने महत्प्रयासाने कमावलेलं राज्य विध्वंसणारा व्यसनी, बदफैली संभाजी असं जे मराठी बखरकारांनी संभाजीचं चित्र लोकांसमोर पेश केलं होतं त्याला प्रथम सावंतांनी तडा दिला. त्यानंतर कित्येकांनी हि वाट चोखाळली परंतु त्यांपैकी कोणालाच सावंतांच्या ' छावा ' ची सर आली नाही.

    या पार्श्वभूमीवर श्री. सोनवणी यांनी संभाजीवर आधारित कादंबरी लेखनाचा प्रयत्न केला आहे. परंतु सावंत आणि सोनवणी यांच्यातील मुलभूत फरक असा कि, सावंतांनी संभाजीचे संपूर्ण जीवन कादंबरीद्वारे उलगडण्याचा यत्न केला तर सोनवणींनी फक्त संभाजीचे अखेरचे दिवस आपल्या लेखनाकरता निवडले.
 
    एक राजा, एक छत्रपती क्षणात शत्रूसैन्याच्या हाती लागतो. तिथून त्याची फरफट होत जाते. कैदेत असताना मार्गाने क्षणाक्षणाला त्याला प्रतीक्षा असते, शत्रूच्या तावडीतून आपणांस सोडवण्याकरता येणाऱ्या इमानी, निष्ठावंत सैनिकांची. सरदारांची. परंतु त्याची हि आशा उलटणाऱ्या क्षणांबरोबर हळूहळू मावळू लागते. असहाय्य, एकाकी परिस्थितीत संकटाने ग्रासलेल्या मनुष्याच्या भावविश्वाचा शोध घेण्याचा सोनवणींनी प्रयत्न केलाय. यापूर्वी श्री. ना. सं. इनामदारांनी छ. शिवाजी महाराजांवरील आधारित ' राजेश्री ' कादंबरीत छत्रपतींमधील व्यक्तीच्या भावजीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही कादंबऱ्या तसेच कादंबरीकारांची तुलना केव्हाही अनाठायी असली तरी तुलनात्मकदृष्ट्या पाहिले असता इतिहासाला दंतकथा, आख्यायिकांद्वारे जे विकृत वळण लागते, ते टाळण्याच्या बाबतीत सोनवणी यशस्वी झाले आहेत. इनामदारांची भूमिका नेहमीच कादंबरीकाराची राहिल्याने अनेकदा त्यांनी दंतकथा, आख्यायिकांचा मुक्तहस्ते वापर केला आहे. परंतु संधी असूनही सोनवणींनी हा मोह टाळून शक्य तितका इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे ! 
    
    या कादंबरीतील मुख्य पात्र संभाजी जरी असलं तरी कथानक पुढे नेण्याकरता मुकर्रबखान, औरंगजेब, रहुल्लाखान प्रत्यक्षरित्या पुढे येतात तर कवि कलश हा अप्रत्यक्षपणे वावरत असतो. फक्त एकाच क्षणी तो दृश्यमान होतो व ते देखील धिंड निघतेसमयी !

    औरंगजेबाच्या दरबारात कलशासह संभाजीला हजर केले जाते व संभाजी तिथे बादशाहला उद्देशून दुरुत्तरे करतो अशा आशयची वर्णने ऐतिहासिक कागदपत्रांत तसेच अनेक ऐतिहासिक कथा - कादंबऱ्यांत वाचायला मिळतात. परंतु त्यामागील राजकीय पार्श्वभूमी फक्त याच कादंबरीत वाचायला मिळते.

   औरंगजेब संभाजीसोबत या तऱ्हेने का वागला, संभाजी - कलशाने त्याचा उपहास का केला याची सकारण कारणमीमांसा संभाजीच्या स्वतःशीच चाललेल्या संवादातून व दरबारातील प्रसंगातून केली जाते. माझ्या मते, इतिहासाचे संदर्भ ग्रंथ वाचनाचा कंटाळा करणाऱ्या व कादंबरीत इतिहास शोधणाऱ्या वाचकांसाठी हि कादंबरी उपयुक्त ठरेल. परंतु छ. संभाजीराजांच्या अखेरच्या दिवसांतील जीवनावर प्रकाश टाकणं हाच या कादंबरीचा प्रधान हेतू आहे का ? याचे उत्तर निर्विवादपणे होकारार्थी वा नकारार्थी देता येत नाही.

    कधी कधी स्वतःलाच पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा वा जीवनात अनुभवलेल्या प्रसंगांना एखाद्या मिथकाच्या वा ऐतिहासिक घटना / व्यक्तिरेखेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये इतिहास व जीवनातील अनुभव यांची यथायोग्य सांगड घातली गेली तरच त्यातून उत्तम कलाकृती सादर होते. याचे सर्वांच्या परिचयाचे उदाहरण म्हणजे इयान फ्लेमिंगचा ' जेम्स बाँड '.

    जेम्स बाँड नावाचं मिथक फ्लेमिंगने जन्माला घालत आपल्या अनुभवांची त्यांस जोड देऊन ते पात्र इतकं जिवंत केलं कि, या नावाचा ब्रिटीश गुप्तहेर अस्तित्वात असलाच पाहिजे यावर लोकांची श्रद्धा बसली. इथं सोनवणींच्या समोर ऐतिहासिक पुरुष संभाजी आहे. ज्याने नऊ वर्षं सत्ता उपभोगलीय. ज्याकरता त्याला आप्तांचा, स्वकीयांचा, शत्रूंचा सतत सामना करावा लागला. जन्माप्रमाणे मृत्यू अटळ आहे. परंतु सदोदित मरणाच्या छायेत असूनही मृत्यूला न जुमानता निधड्या छातीने तोंड देणाऱ्या संभाजीची अखेर नेमकी कशी झाली असेल ? 

    हा प्रश्न गेली अनेक वर्षं, दशकं, शतकं तमाम महाराष्ट्रीयन माणसांच्या मनात एकदा तरी डोकावला असेल. संभाजी धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला हे ऐतिहासिक सत्य आहे परंतु त्याचा हा मृत्यूपर्यंतचा प्रवास व तत्पूर्वी कैदेतील उलाघाल टिपण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. यामध्ये अर्थातच श्री. शिवाजी सावंतांचे नाव येणे क्रमप्राप्त आहे. परंतु सावंतांच्या तुलनेने श्री. सोनवणी याबाबतीत कमालीचे यशस्वी ठरले आहेत. याला प्रामुख्याने कारणीभूत त्यांची विशिष्ट लेखनशैली असली तरी काळाची निवड, पात्रांची अतिमर्यादित संख्या हे दुय्यम घटक  देखील तितकेच सहाय्यक ठरतात.

    सबंध कादंबरीत संभाजी कलशासोबत बोलत आहे. परंतु त्याची खरोखर कलशासोबत चर्चा सुरु आहे का ? याचे उत्तर ठामपणे नकारार्थी वा होकारार्थी देता येत नाही. कलश हे एक निमित्त आहे. त्याच्या माध्यमातून स्वतःच्या मनात उद्भवणाऱ्या नाना शंकांना, प्रश्नांना तोंड फोडण्याचे काम संभाजी करतो. संभाजीचा हा संवाद लांबलचक, अखंड असला तरी तो कुठेही कंटाळवाणा होत नाही. कारण त्यात जसा इतिहास व तत्कालीन राजकारणाचा संदर्भ आहे त्याचप्रमाणे मानवी आशे - निराशेचे गडद प्रतिबिंबही आहे.

    शत्रूने कैद केलेल्या संभाजीला हरघडी असं वाटतं कि, आता माझी माणसं येतील व मला सोडवतील. संकटातून मुक्त होण्यासाठी त्याच्या मनाची होणारी अधीरता त्यातून ध्वनित होते व त्या अधीरतेसोबत वाचकालाही उत्कंठा लागून राहते कि, कोणत्याही क्षणी ' हर हर महादेव ' चा जयघोष होऊन संभाजीचे निष्ठावंत सैनिक त्याच्या सुटकेसाठी जीवावर उदार होऊन शत्रूवर हल्ला करतील. बादशाही छावणीत जाईपर्यंत हा आशे - निराशेचा खेळ चालत राहतो. या खेळात इतिहासातील संभाजी व वास्तव जीवनात प्रत्येक व्यक्तीत असलेला संभाजी यांची बेमालूमपणे सांगड घालण्यात सोनवणी यशस्वी झाले आहेत.

    ज्यावेळी मनुष्य संकटांनी ग्रासतो व त्याचे आप्तही त्याला वाऱ्यावर सोडून देतात, त्यावेळी त्याच्या मनाची होणारी उलघाल कोणी अनुभवली नाही ? परंतु आपल्या प्रमाणेच अशीच किंबहुना याहून मोठी, भयंकर अशी परिस्थिती संभाजी भोसले नामक तरुणावर ओढवली होती. त्यावेळी त्याने त्या स्थितीला कशा प्रकारे तोंड दिले हे शब्दबद्ध करत असताना वाचकाच्या मनावर निराशेचे सावट पडू न देण्याचीही सोनवणी खबरदारी घेतात. संभाजीचा मृत्यू अटळ आहे. त्याची वेदना, त्याचे हाल अटळ आहेत. परंतु त्याचा स्वीकार करत असताना त्याची लढाऊ वृत्ती दाखवताना सोनवणी वाचकाच्याही मनातली जिद्द, लढाऊ वृत्ती कुठेतरी जागृत करतात. हेच माझ्या मते त्यांचे तसेच या कादंबरीचे मोठे यश आहे.
आजवर संभाजीच्या अखेरीवर जितक्या कादंबऱ्या वाचल्या त्यात कुठेही असा अनुभव आला नाही. आली फक्त ती बेचैनी, उदासीनता, निराशा. या पार्श्वभूमीवर सोनवणींचे यश नाकारता येत नाही.

    कलाकृती, मग ती ऐतिहासिक असो वा सामाजिक. ती शोकात्मक वा सुखात्मक बनवण्याचे स्वातंत्र्य लेखकाकडे असते. परंतु एका शोकांतिकेला सकारात्मक पद्धतीने देखील वाचकांसमोर मांडता येऊ शकते हा चमत्कार मी तरी प्रथमच पाहिला आहे.   

पुस्तकाचे नाव :- मी मृत्युंजय ... मी संभाजी
लेखक :- श्री. संजय सोनवणी
प्रकाशक :- जालिंदर चांदगुडे, प्राजक्त प्रकाशन, पुणे
किंमत :- १४० रु.