शुक्रवार, २५ मार्च, २०१६

उदगीर स्वारी संबंधी काही नवीन माहिती




    स. १७५९ - ६० साली निजाम - पेशवे यांच्या उदगीर येथे झालेल्या संग्रामावर प्रकाश टाकणारी दोन पत्रे नुकतीच वाचनात आली. यापूर्वी उदगीर मोहिमेसंबंधी एका लेखात आम्ही अस्सल पत्रे व संदर्भ ग्रंथांच्या सहाय्याने विवेचन केलेले आहेच. त्यामध्ये पूर्णतः नसला तरी थोडाफार बदल करण्याची आवश्यकता या दोन पत्रांमुळे झाली असली तरी ते कार्य सध्या तरी लांबणीवर टाकत आहे व तूर्तास नुकतीच वाचनात आलेली दोन पत्रे या स्थळी देत आहे.
( उदगीर स्वारीसंबंधी जुना लेख वाचण्यासाठी - http://peshwekalinitihas.blogspot.in/2012/09/blog-post.html )

सदाशिवरावाचे नानासाहेब पेशव्याला पत्र.

 क्र ११ )                              [ १६-१२-१७५९

विनंती उपरी
जानोजी भोसले थोडे. त्यावर मुधोजी उलटून गेला. जूज होणार हे खबर आली आहे. येविसी पेशजी लिहिले. आज्ञा होईल तसे लेहून पाठऊ.

तोफखानाकडील नेमणुकेची दारू वगैरे किरकोल जिनस स्वारीचा राहिला, त्याविसी गोविंदपतास आज्ञा व्हावी कीं, सत्वर येऊन पावे व नगरचे ही नेमणुके प्रमाणे लौकर यावे.

ऐवज येथे तीन लाख आणविला तो यावा. खासा स्वारी ब|ााहि [ बरोबर / बराबर ] दोन लाख यावे. दीड लाख ब|| [ बराबर / बरोबर ] आणिले. त्यांतला विजयनगरची खरीदी गाडदी, काही नालबंदी किरकोळ असेच जाले. रोजमराहि चालीस पंनास हजार आला. सिलक उडाली. तेव्हा पैठणाहून यैवज आणावा लागला.

नगरास येणे जालीयावर तेथील काम सर्व पाहून आज्ञा त्यांस करावी. येथून सांगितले ते विनति करतील. हवालदार राणोजीराव खानवीलकर अगर तसाच कोणी ठेवावा. इमारत चाली लागली पाहिजे. फराबाग बहुत उत्तम आहे. तेथे जवळ राहणे यासहि स्थळ चांगले आहे.

स्वामींनी शरीरप्रकृत लिहिली त्यांत क्षीण आहे. त्यास बहुत प्रकारे पथ्य चांगले करावे. जवळ मजल करावी याप्रमाणे महिनाभर करावे. पुण्याहून कूच जाले. भिवरेथडीचे व नगरचे पाणी मानेलसें वाटते प्रकृतीस पडेल तेव्हां खरे. आणाजी साटम याचा काहींतरी निकाल काढून त्यास आम्हाकडे पाठऊ (न) द्यावे घरींच राहिले आहेत. वतनाचे गाणे सेवटा न जाई, तरी उमेदवार करून ठेवावे. त्यास घरी राहू न द्यावे.

येथे फौज खडीगणती गंगेवर येते दिसी घेतली. ते सा हजार जाली. बिनीची पथके हजारेक होते. अजून जमा होत. येथें आलियावर नलवडे ख तल घाटगे वगैरे पांचसे पर्यंत आले. फिरून पत्रे पाठविली आहेत.

खासास्वारीब|| हजार दोन हजार फौज नेमणे ते नेमून त्यास आज्ञा व्हावी. आगदी लोक नाही हे उत्तम नाही. चौकीचा बंदोबस्त उत्तम प्रकारे आसावा. पुण्यासहि दोन तीनशे राऊत नेमून ठेवावे.

आवरंगाबाजेत पाचसासे फौज हजार दोन हजार प्यादा आहे. तेथे काही घ्यावे तर फार करून आपलेच लोक आहेत. फौज जमा वीस हजार असती तर सहजांत कांही तरी काम होते. प्रस्तुत घासदाणे घेतो. शहरास काही प्रकार करावा की काय किंवा दौलताबाजचे होईल ते आपन करणे ते. येक नि - - य नाही ते - -

माझी प्रस्तुत बरीच आहे. दोहो तिही दिसांआड येकदां जेवतो. संभाळून जेवावे लागते. पथ्य अगदी नाही. जड मात्र फार खात नाही. औषध पहिले चालते तेच आहे. जखमेचे कातडे अजून वळकट जाले नाही. शिरेवर म्हणून आंग दुखत थोडेसें असते. वरकड पहिलेहून सर्व प्रकारे बरें आहे. शक्त अजून चांगली येत नाही. पाठीमुळे दंड नमस्कार नाही. ते चाली लागल्या याहून बरे वाटेल. थोडा थोडा प्रारंभ आहे.

दादांची व रायाची शरीर प्रकृत बरीच आहे.

बाबूजी नाइक विठलपंत बाबाचे वगैरे पथके आजून दोनही फौजांतील कोणी जमा होत नाहींत. बहुधा एकदांच सारे येतील तर नकळे. गंगातीरीं वैरण मिळत नाही. एके जागा दोन चार दिस जालीया कूच करावे लागते. येथून जावे तिकडे रोख पडतो हे तिवंधा ( त्रेधा ? ) आहे.
रा| छ २५ रा|कर हे विनंती.

विठ्ठल शिवदेव विंचूरकराचे पत्र
क्र १२]                                       [ १२-१-१७६०
                                श्री
                 छ २३ जमादिलौ ...
                 वल रविवार तिसरा प्रहर
विनंती सेवक विठल सिवदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती विज्ञापना. येथील कुशल ता| छ २१ जमादिलौवल मंदवार मु|| हेर जाणून स्वामीचे कृपेकरून येथास्थित असे विशेष. काल छ २० रोजी वर्तमान सेवेसी लिहिले होते की मोगल उदगिरीपलीकडे दों कोसावर घाटाखाले होता. जाधवरायाचा मुकाम मात्र फौजेचा उदगिरीवर होता. आम्हाकडील लोक जाऊन कहीची उटे सत्रा आठरा काही तटे येसी घेऊन आले. काल मोगलाचे कूच होणार होते ते मुकामच जाला. खासे जाधवराव काही फौजेत नवते. माग मौजे मृगावर होते. ते आज प्रहरा दिवसा आम्ही तयार होऊन त्याच्या गोटा सेजारी माळावर जाऊन उभे राहिलो. तो तेहि पलिकडून येऊन दाखल जाले होते. तो आम्ही गेलो. मग त्याचे कूच होऊन ढाला पाडून गावात शेहरात राहिले. किल्ल्यावरील तोफा जाल्या. मग आम्ही मोगलाचे रोखे गेलो. उजवे होते जाधवराव, उदगीर डावे होते लस्कर ऐसी जागा पाहून डोंगर होता तेथे उभे राहिलो. लुगारे डोंगर आड दरा होता. आम्हास चालून जाता नये ना. त्यास येता नये. यैसे बांकी जागा हो (ती)
लुगारे राऊत डावे उजवे होऊन नवाबाच्या लस्कारासेजारी जाऊ (न) तीस चालीस बईल दोन च्यार बंदुखा येक बाण लगीचा येसा घेऊन आले. तो पावणे दोन प्रहर जाले असता नवाबाचे येकाकीच डेरे पडू लागले. फौजा तयार होऊन पुढे आल्या मागून कूच होऊन फौजा हरोल आला. मागून बुनगे नवाब यैसे जो दरा वाटेचा त्या माथ्यावर आम्ही करोल उतरून आवाज केले. मग त्या पलीकडे दुसरी वाट आडवाटेने हरोल चढून त्या पलीकडील रस्ता त्याने तोफखाना यैसे चढोन आले नवाब आले. तेव्हा हरोल किल्ल्या से जारी आला मागोन चडोल चालिला येसी सर्व फौजसुद्धा मुकाम उदगीरीपाठीसी देऊन मुकाम जाला. ढाला जाल्या नवत्या. हरोल मात्र आला. दिवस सा सात घडी राहिला. मग आम्ही सरोन माघारे आलो. छेबिन्यास व रात्री कहीवर घालावे. याकरिता आम्हाकडील लोक व दारकोजी निंबालकर यैसे ठेविले. आम्ही आलो. मोगल दाहा हजारपर्यंत आहे. सिवाये प्यादा गारदी बुनगे येकचे (?) होते. दाहा हजार पर्यंत तेहि असतील. सिवाये तोफा येण प्रमाणे आहे. उदईक कूच होईल की मुकाम होईल ते पाहावे. त्याप्रोा सेवेसी लिहून कलऊ. श्रुत होये हे विज्ञापना.                
( पत्रे ज्या स्वरूपात छापण्यात आली तशीच उतरवून घेण्याचा प्रयत्न केल्याची नोंद घ्यावी. )

विश्लेषण :- ILLUSTRATIVE MODI DOCUMENTS या B. G. Kunte संपादित संदर्भ ग्रंथातील पत्र क्र. ११ हे सदाशिवराव भाऊच्या हस्ताक्षरातील असून उदगीर स्वारीतून दि. १६ डिसेंबर १७५९ रोजी त्याने  नानासाहेब पेश्व्यास लिहिले आहे.

    प्रस्तुत पत्राच्या आरंभी भोसले बंधूंच्या झगड्याची अल्प माहिती आहे. त्यानंतर स्वारीसाठी आवश्यक तो दारुगोळा वगैरे किरकोळ गोष्टी नसल्याने त्यांच्या पाठवणी विषयीचा उल्लेख आहे.
त्यानंतर स्वारीच्या खर्चाचा मजकूर असून नंतर नगरच्या किल्ल्यावरील बांधकामाचा तसेच पेशव्याच्या तब्ब्येतीविषयी चौकशी करणारा मजकूर आहे. यावरून असे दिसते कि, स. १७५९ पासूनच पेशव्याच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरु झाल्या होत्या. असो.

    पुढील परिच्छेदात सोबत असलेल्या फौजेचा उल्लेख आहे. निजामावरील स्वारीकरता पेशवेबंधू बाहेर पडले असले तरी डिसेंबरच्या मध्यावर त्यांच्यासोबत पुरते दहा हजार सैन्य नाही. विशेष म्हणजे हि मोहीम उद्भवली नसती तर रघुनाथराव उत्तरेत दत्ताजी शिंदेच्या मदतीला जाणार होता.

    त्यानंतर खासा स्वारीबरोबर हजार दोन हजार फौज नेमून देण्याचा उल्लेख आहे. हा बहुधा भाऊने तो, रघुनाथ व विश्वासराव यांना उद्देशून केला असावा.

    त्यानंतरच्या परिच्छेदात मोहिमेविषयीची चर्चा आहे. औरंगाबाद अथवा दौलताबादेकडे रोख करावा या विचारात भाऊ असला तरी पदरी पुरेशी फौज नसल्याचा उल्लेख विशेष लक्षणीय आहे.

    त्यानंतर भाऊ, रघुनाथ व विश्वासराव यांच्या प्रकृतीचे वर्तमान आहे. पैकी भाऊच्या ज्या जखमेचा उल्लेख आला आहे ती जखम मुजफरखान गारदीने दि. २८ ऑक्टोबर १७५९ रोजी गारपीर मुक्कामी केलेल्या हल्ल्यामुळे झाली होती.

    अखेरच्या परिच्छेदात बाबूजी नाईक, विठलपंत वगैरे थोर पथके जमा न झाल्याचा उल्लेख असून गंगातीरी  वैरण मिळत नसल्याने एका जागी चार दोन दिवसांहून अधिक मुक्काम करता येत नसल्याचे भाऊने लिहिले आहे. या पत्रात उल्लेखलेली गंगा म्हणजे कोणती नदी हे स्थळ निर्देशाअभावी स्पष्ट अवघड आहे.

    दुसरे पत्र विठ्ठल विंचूरकराचे असून ते दि. १२ जानेवारी १७६० रोजी लिहिले आहे. यावेळी निजामाविरुद्धची मोहीम सुरु झाली असून तिचा तोपर्यंतचा वृत्तांत प्रस्तुत पत्रात आहे. त्यानुसार रामचंद्र जाधव व निजाम उदगीर पर्यंत पुढे चालून आले होते. विठ्ठल शिवदेव बहुधा पेशव्याची आघाडी सांभाळत होता वा निजामावर छापे मारण्याचे काम त्याजवर सोपवण्यात आले होते. निजामाचा उद्देश धारूर येथील त्याच्या कुमकेकरता गोळा झालेल्या व्यंकटराव निंबाळकर प्रभूती सरदारांशी हातमिळवणी करण्याचा होता. पैकी या सरदारांच्या शहावर दमाजी गायकवाडाची नियुक्ती केली होती.

    प्रस्तुत मोहिमेशी संबंध नसलेले परंतु पेशव्याचे लष्करी दौर्बल्य उघड करणारे एक महत्त्वाचे पत्र शिंदेशाही इतिहासाची साधने ( भाग - ३ ) मध्ये छापलेलं आहे. त्याचा लेखांक क्रमांक १०१ असून दि. २४ फेब्रुवारी १७५९ रोजी नानासाहेब पेशव्याने शिंद्याच्या कारभाऱ्यास --- रामाजी अनंत दाभोळकरास लिहिले आहे. त्यामध्ये पेशव्याने कर्जामुळे आपली बरीचशी फौज कमी केली असून जरुरीपुरती वीस हजार फौज पदरी बाळगल्याचे नमूद केले आहे. उदगीर स्वारीतील भाऊचे पत्र तसेच या मोहिमेसंदर्भात मागील लेखात उदगीर स्वरीतील मराठी सैन्याविषयीचा वृत्तांत सांगणारी य. न. केळकर संपादित पत्रातील मजकूर लक्षात घेतला तर पेशवा कोणत्या बळावर अब्दालीचा सामना करून बंगाल वगैरे प्रांत ताब्यात घेण्याची स्वप्नं बघत होता व उदगीर स्वारीनंतर भाऊ, सारी दक्षिण मोकळी असल्याचा उल्लेख करतो हे समजायला मार्ग नाही.

संदर्भ ग्रंथ :-
(१) ILLUSTRATIVE MODI DOCUMENTS :- संपादक - Capt. Dr. B. G. Kunte
(२) शिंदेशाही इतिहासाची साधने ( भाग ३ रा ) :- संपादक - आनंदराव भाऊ फाळके
(३) मराठी रियासत ( खंड - ४ ) :- गो. स. सरदेसाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: