रविवार, २७ मार्च, २०१६

अटक स्वारीपूर्वीचे रघुनाथरावाचे एक पत्र

लेखांक [ ८९ ]                           श्री            संवत १८१४ भाद्रपद वद्य १
११२ ]                                                      [ ३० ऑगस्ट १७५७ ]

      राजश्री दत्ताजी सिंदे गोसावी यांसी
    सकलगुणालंकरण अखंडितलक्षी आलंकृत राजमान्य श्नो| ( स्नेहांकित ) रघुनाथ बाजीराव आसिर्वाद उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये लिहीत असिले पाहिजे विशेष. अबदाली पठाण याची आमद आमद गरम आहे. त्यास तो आला नांही तों आपण भारी होउन राहावें म्हणजे उत्तम. तरी तुम्हीं जलदीने येणे येसीं पत्रे पैसजी लिहिलीच आहेत त्याज वरून तुम्ही यावयाची तर्तूद केलीच असेल व हलीही लिहिले असे. तरी याजउपरी तुम्ही जलदी करून लाबलाब मजली करून बहुतच त्वरेने येणे. रा| छ १४ जिल्हेज.                                       
                                                       पो| छ २९ रबिलोवल रविवार
                                                       [ १२ दिसबर १७५७ ]

* आमद आमद गरम आहे - तो जलद चालणारा आहे.

    विश्लेषण :- प्रस्तुत पत्र काव्येतिहास संग्रहात देखील प्रकाशित केले असून त्याची तारीख मात्र चुकीची पडली आहे. काव्येतिहास संग्रहकर्ते हे पत्र दि. २२ - १० - १७५२ चे असल्याचे सांगतात. परंतु यावेळी रघुनाथ उत्तरेत स्वारीवर गेलाच नव्हता. शिवाय शिंद्यांची सरदारी जयाजीकडे असल्याने दत्ताजीला पत्र लिहिण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. तसेच स. १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशाही संरक्षणाचा करार करून पावसाळ्यात शिंदे - होळकर दक्षिणेत आले होते. तेव्हा शिंदेशाही इतिहासाच्या संपादकांनी निश्चित केलेली तारीख ग्राह्य धरणे योग्य वाटते.
    उपरोक्त पत्र तसेच शिंदेशाही इतिहासाच्या संपादकांनी ठिकठिकाणी टिपांमध्ये दिलेली माहिती व प्रस्तावना लक्षात घेऊन काही गोष्टींची स्पष्टता करता येते, ती अशी :-

    (१) कर्जामुळे पेशव्याने सैन्यकपातीचे धोरण आखले होते. त्यामुळे रघुनाथराव उत्तरेतील कोणत्याही स्वारीत पुरेशी फौज घेऊन जाऊ शकला नाही.

    (२) सरदारीची वस्त्रे मिळाल्यावर जयाजीने आपल्या लष्करात वाढ करून तीस ते चाळीस हजारांचा जमाव पदरी बाळगला होता. त्याउलट होळकराने स. १७५९ मध्ये मूळच्या सैन्यात थोडी भर घालून ते वीस हजारापर्यंत वाढवले होते.

    (३) स. १७५७ साली रघुनाथराव आणि होळकर अब्दालीच्या सामन्याकरता उत्तरेत गेले होते खरे पण लष्करी बळ पुरेसे नसल्याने त्यांनी दत्ताजी शिंद्याची प्रतीक्षा करण्याचे धोरण स्वीकारले. इकडे पेशव्याचे निजामाशी याच सुमारास बिनसल्याने सिंदखेडची मोहीम उद्भवून शिंदे दक्षिणेत अडकून पडला. तेव्हा मोगल, शीख व रोहिले मदतीस घेऊन रघुनाथास पंजाब स्वारी करावी लागली.

    (४) शिंदेशाही इतिहासाची साधने, भाग - ३ मधील स. १७५९ मधील पेशव्याची पत्रे अभ्यासली असता असे लक्षात येते कि, शिंदे - रघुनाथ यांची बंगाल प्रांती तर होळकराची राजपुतान्यावर पेशव्याने नियुक्ती केली होती. त्यामुळे शिंदे शुक्रताली का अडकला व होळकर राजपुतान्यात का गुंतला याचे उत्तर मिळते. आक्षेपकांनी यासंदर्भात प्रस्तुत खंडातील लेखांक क्र. ११२ अभ्यासावा मग मत मांडावे.

    (५) पानिपत युद्धात मल्हारराव होळकराची योजना लष्करी गोलाच्या उजव्या बाजूला का करण्यात आली होती याचीची साधार उकल होते. माळव्याच्या वाटणीनंतर मुतालकी शिंद्याकडे आली तेव्हा परस्पर स्नेहांत अंतर न पडावे म्हणून भगव्या झेंड्याच्या उजव्या बाजूस चालण्याचा व तळ ठोकण्याचा मान होळकरास देऊन शिंद्याने डावी बाजू स्वीकारली असे प्रस्तुत संग्रहाच्या संपादकांचे मत आहे. श्री. फाळके तत्कालीन ग्वाल्हेर दरबाराशी संबंधित असल्याने त्यांचे हे मत अग्राह्य धरण्यास काहीच कारण दिसत नाही.

संदर्भ ग्रंथ :-
(१) शिंदेशाही इतिहासाची साधने ( भाग - ३ ) :- संपादक - आनंदराव भाऊ फाळके.
(२) ) काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख :- संपादक – गो. स. सदेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकस्कर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: