हिंदुस्थानवरील मुस्लीम आक्रमणे - एक चिंतन ( भाग ३ )





    महंमद गजनीच्या सोमनाथ स्वारीनंतर त्या तीव्रतेचे इस्लामी आक्रमण हिंदुस्थानवर झाले नाही. उलट महंमद गजनीच्या मृत्यूनंतर त्याच्या घराण्यातील व राज्यातील संघर्षाचा फायदा घेत महंमदच्या स्वारीत भरडल्या गेलेल्या पंजाबकडील एतद्देशीय सत्ताधीशांनी उचल खात लाहोर पर्यंत आपला अंमल स्थापित केला. फक्त लाहोरचा तेवढा त्यांस ताबा घेता आला नाही.


    महंमद गजनीने ज्या वेगाने आपल्या राज्याचा विस्तार करत त्याचे साम्राज्यात रुपांतर केले त्याच वेगाने त्याचा ऱ्हास होत गेला व याचे श्रेय सेल्जूक तुर्क तसेच अफगानिस्तानातील घोर अफगाणांकडे जाते. पैकी सेल्जूक तुर्कांनी त्याच्या साम्राज्याचा पश्चिमेकडील भाग व्यापला तर अफगाणांनी पूर्वेकडील.


    घोर प्रांतातील बंडखोर अफगाणांचे नेतृत्व कुतुबुद्दीन सूर व त्याचे भाऊ -- सैफउद्दीन, अलाउद्दीन यांच्याकडे असून त्यावेळी महंमद गजनीच्या वंशातील बहराम गादीवर होता. त्याने कुतुबुद्दीन व सैफउद्दीन यांस पकडून ठार केले तेव्हा अल्लाउद्दिनने गजनीवर स्वारी करून बहरामला पळवून लावले व आपल्या भावांच्या खुनाचा बदला त्याने गजनी शहरात लुट, कत्तल, विध्वंस करून घेतला. या संहारातून महंमद गजनीची कबर व दोन मनोरे तेवढे त्याने सोडले.


    अल्लाउद्दिनच्या धास्तीने बहराम हिंदुस्तानात आला पण तो फार काळ जगला नाही. पश्चात त्याचा मुलगा खुश्रूने गजनी वंशाचे पंजाबातील राज्य ताब्यात घेत लाहोर येथे आपली राजधानी स्थापन केली. स. ११६० मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा मलिक खुश्रू गादीवर आला. याचा झगडा अल्लाउद्दिनचा पुतण्या शहाबुद्दीन उर्फ महंमद घोरीशी जुंपला.


    अल्लाउद्दिनला सैफउद्दीन नावाचा मुलगा व ग्यास-उद्दीन, शहाबुद्दीन नावाचे दोन पुतणे होते. आपल्या पश्चात सैफउद्दीनला निर्विघ्नपणे राज्य करता यावे म्हणून त्याने पुतण्यांना कैदेत टाकले. परंतु सत्तेवर येताच सैफउद्दीनने त्यांना कैदमुक्त केले. स. ११५७ मध्ये सैफचा खून होऊन ग्यास-उद्दीन व शहाबुद्दीन एकविचाराने राज्यकारभार पाहू लागले. पैकी ग्यास-उद्दीनने पश्चिमेकडील कारभार स्वीकारला तर शहाबुद्दीनने पूर्वेकडील. या शहाबुद्दीनचा हिंदुस्थानच्या इतिहासाशी संबंध येतो.


    शहाबुद्दीनने स. ११७६ - ७७ च्या आसपास मुलतान ताब्यात घेतले.


    स. ११७८ च्या स्वारीत त्याने खुश्रू मलिकचा पराभव करून त्याच्या मुलास ओलीस धरले.


    स. ११७९ मध्ये सिंधवर स्वारी करून समुद्र किनाऱ्यापर्यंत लुटालुट केली. त्यानंतर मायदेशी परतताना त्याचा व खुश्रू मलिकचा पराभव होऊन खुश्रू मलिकला त्याने कैद करून ग्यास-उद्दीनकडे पाठवले. तिथे कैदेत असताना स. ११८६ मध्ये त्याचा शिरच्छेद करण्यात आला.


    स. ११९१ मध्ये घोरी हिंदुस्थानच्या दिशेने चालून आला. या स्वारीकरता कनोज व अन्हीलवाडा येथील राजांनी त्यास आमंत्रण दिले होते. यामागे पृथ्वीराज चौहानशी असलेला त्यांचा वैरभाव प्रामुख्याने कारणीभूत होता. पृथ्वीराजने आपला मेहुणा व चितोडचा राजा समरसिंह रावळ तसेच इतर राजपूत राजांच्या मदतीने स. ११९१ मध्ये पानिपत नजीक कर्नाळ जवळच्या नारायणगावी घोरीचा पराभव करत त्यांस कैद करून खंडणी घेऊन सोडून दिले. परंतु घोरीच्या कैदेची घटना मुस्लीम इतिहासकार नाकारतात असे सरदेसाईंचे म्हणणे आहे. असो.


    पृथ्वीराज कडून पराभूत झाल्यावर शहाबुद्दीन त्वरेने मायदेशी परतला. त्यानंतर स. ११९३ मध्ये परत एकदा कनोज, अन्हीलवाडा येथील राजांच्या विनंतीवरून घोरीने पृथ्वीराजवर आक्रमण केले. याही खेपेस पृथ्वीराजने चितोड सहित आपल्या पक्षाचे राजपूत राजे रणात आणून घोरीचा सामना केला. परंतु यावेळी घोरीचा विजय होऊन पृथ्वीराज लढाईत मारला गेला किंवा शत्रूहाती सापडून त्याचा खून करण्यात आला.


    पृथ्वीराजचा नाश करून घोरी थांबला नाही. त्याने तशीच पुढे अजमेरवर चढाई करून तेथील राज्यपदी आपल्या पसंतीच्या इसमाची नियुक्ती केली व मायदेशी परतण्यापूर्वी हिंदुस्थानात प्राप्त केलेल्या प्रदेशाचा कारभार करण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबक या गुलाम सरदाराची नेमणुक केली.


    स. ११९४ मध्ये शहाबुद्दीनने कनोजवर स्वारी करून जयचंदचा पराभव केला व त्या शहराची लुट केली. नंतर त्याने काशीतही उच्छाद मांडला. त्याचा सरदार -- कुतुबुद्दीन ऐबकने गुजरात प्रांती अन्हीलवाड्यावर स्वारी करून चालुक्य - सोळंकी राजा भीमचा पराभव केला. यावेळेस ते राज्य खालसा करण्याचा ऐबकचा बेत होता. परंतु शहाबुद्दीनने त्यांस  दिल्लीला परत बोलावल्याने सोळंकी राजवटीचा बचाव झाला.


    स. १२०२ मध्ये ग्यास-उद्दीन मरण पावल्यावर शहाबुद्दीनने महंमद नाव धरण करत राज्यकारभार आपल्या हाती घेतला. स. ११९४ च्या स्वारी नंतर त्याने हिंदुस्थानच्या अंतर्गत भागात मोहीम काढली नाही परंतु पंजाब - काश्मीर प्रांती गक्कर लोकांचा बंडावा वाढून त्यांनी लाहोर ताब्यात घेतल्याने घोरीला त्यांच्यावर स्वारी करणे भाग पडले. गक्करांचा पराभव करून त्याने त्यांचे धर्मांतर केले. परंतु गक्करांनी महंमदचा खून करून आपला सूड उगवला. ( स. १२०६ )


    महंमद घोरीच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या महंमूद गादीवर बसला परंतु खिवाच्या शहाने त्याचा पराभव करून गजनीचे राज्य जिंकून घेतले. ( स. १२१५ )


    जवळपास शतकभराच्या अंतराने महंमद गजनी व महंमद घोरी यांच्या हिंदुस्थानवर स्वाऱ्या झाल्या. या स्वाऱ्यांनी हिंदुस्थानच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक इतिहासावर दूरगामी परिणाम घडवून आल्ने. परंतु या दोन महंमदांच्या स्वाऱ्यांच्या पद्धतीत, हेतुंत भरपूर अंतर होते.


    लुटालूट, धर्मांतर - धर्मप्रसार, युद्धकैदी म्हणून पकडलेल्यांना गुलाम बनवणे हि दोघांची कमी - जास्त फरकाने कार्यपद्धती होती. मात्र हिंदुस्थानच्या अंतर्गत कारभारात फारसा हस्तक्षेप न करण्याचं धोरण महंमद गजनीने स्वीकारलं तर घोरीने येथे राज्यस्थापनेचा उद्योग चालवला.


    या दोघांतील वर्तनक्रमाचा सूक्ष्म फरकही जाणून घेणे आवश्यक आहे. महंमद गजनी व त्याच्या पूर्वसुरींनी अफगाणिस्तान ताब्यात घेण्यापूर्वी तेथे गैर इस्लामी राजवटी होत्या. त्यातील बहुतांशी नष्ट करत वा त्यांना हिंदुस्थान तसेच इतरत्र मागे रेटत त्यांनी आपली सत्ता स्थापन केली होती. विशेषतः हिंदुस्थानच्या हद्दीत रेटले गेलेल्या सत्ताधीशांकडून महंमद गजनीच्या राजवटीस आव्हान दिले जाण्याचा धोका असल्याने त्याने आपल्या राज्याच्या बचाव व आक्रमणासाठी पंजाब प्रांत हाती ठेवणे आवश्यक समजले. पुढे अठराव्या शतकात अहमदशहा अब्दालीनेही हेच धोरण स्वीकारल्याची येथे आठवण होते. त्याउलट घोरीने पंजाबचा वापर एकप्रकारे लष्करी तळासारखा करत आपल्या प्रदेश विस्ताराकरता चढाईचे धोरण तसेच पुढे रेटत दिल्ली, गुजरात, बंगाल, राजपुताना या भागात आपल्या हस्तकांची रवानगी करत ते ते प्रदेश काबीज करण्याचा प्रयत्न करून आपल्या वारसदारांना एकप्रकारे पुढील उद्योगाची दिशा ठरवून दिली.


    महंमद घोरीच्या या उपक्रमानंतर हिंदू, जैन, मुस्लीम सत्ताधीशांतील संघर्ष तीव्र स्वरूपाचा बनला. कारण महंमद गजनी फारतर लुट करी व पराभूत राजाची त्याच्या राज्यावर परत नियुक्ती करून जात असे. अपवाद पंजाबचा. परंतु घोरी सर्वच गिळंकृत करत चालल्याने येथील सत्ताधीश खडबडून जागे झाले. परंतु हि जागृती महंमद घोरीच्या चेल्यांना रोखण्याच्या प्रयत्नांत रुपांतरीत झाल्याचे दिसून येत नाही. असे का व्हावे ?


    हिंदुस्थानवरील मुस्लीम आक्रमकांचा इतिहास सांगताना या झगड्यास नेहमी हिंदू - मुसलमान असेच रूप दिले जाते. परंतु वास्तविकता वेगळी आहे. हा झगडा हिंदू - मुसलमान असा द्विधार्मीय नसून यामध्ये जैन, हिंदू, वैदिक, इस्लाम हे चार धर्म सामील असून यांचा चौरंगी सामना सुरु होता. व तो देखील परस्परांशी.


    समस्त मुस्लीम जगत एकवटून कधीच हिंदुस्थानावर चालून आलं नाही व अपवाद वगळता हिंदू सत्ताधीशांची संयुक्त सेना मुस्लीम आक्रमकांविरुद्ध उभी राहू शकली नाही.

    तसेच जेव्हा आपण मुस्लीम आक्रमक म्हणतो तेव्हा त्यात आपणांस आक्रमकांतील सहभागी सर्व लोक इस्लाम धर्मीय असल्याचे अपेक्षित असते. परंतु वास्तविकता वेगळी आहे. महंमद गजनीची ताब्यात पंजाब येताच तेथील हिंदू त्यांस सामील झाले. पुढे कनोजचा राजा त्याचा मांडलिक बनला असता त्याने संकटसमयी महंमद गजनीला बोलावताच तो त्वरेने धावून आला. त्याहीउपर म्हणजे प्रसिद्ध सोमनाथ स्वारीत अन्हीलवाड्याच्या चुरशीत अजमेरकरांनी त्यास वाट दिली तर अन्हीलवाड्याच्या सोळंकींच्या राज्यात जैनांचा प्रभाव वाढल्याने त्या सत्ताधीशांनी सोमनाथ पर्यंत जाण्यास महंमद गजनीला अडथळा आणला नाही.


    पुढे शहाबुद्दीन घोरीला पृथ्वीराजच्या विरुद्ध आमंत्रित करण्यास कनोज, अजमेरचे सत्ताधीशच पुढारी होते. माझ्या मते, घोरीच्या पृथ्वीराजसोबतच्या दोन्ही युद्धांत त्यांस सैन्य व रसद पुरवठा कनोज आणि अजमेरकरांनी केला होता. त्यामुळेच पृथ्वीराजला इतर राजपूत राजांची मदत घेणे भाग पडले. तात्पर्य, ब्रिटीशांच्या भारत विजयाचे जे रहस्य आहे तेच तत्कालीन मुस्लीम आक्रमकांचे होत.

येथे दुसरा मुद्दा आहे गजनी, घोरी सुलतानांनी केलेल्या कत्तली, धर्मांतरांचा. तर या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण समकालीन मुस्लीम व आधुनिक हिंदू इतिहासकार सांगतात त्याप्रमाणे दशसहस्त्र वा लक्षावधींच्या संख्येने यांनी माणसे कापली, बाटवली असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.


    धर्मान्तराची कारणे जुलूम जबरदस्ती खेरीज इतरही असू शकतात हे आपण गृहीतच धरत नाही व त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गजनी व घोरीच्या आक्रमणादरम्यान जो एक शतकाचा काळ गेला, त्यात सावरकरी भाषेप्रमाणे किती धार्मिक प्रत्याक्रमणं झाली ? हा प्रश्न उपस्थित होतोच. ज्या देवल स्मृतिचे गुणगान सावरकर सहा सोनेरी पानात करतात, तिचा धर्मांतरीतांना पुन्हा स्वधर्मात घेण्यासाठी कितपत उपयोग झाला ? कि हि स्मृति फक्त वैदिकांच्या पुनः धर्मप्रवेशासाठीच झाली होती ? विशेष म्हणजे या स्मृतिचा रचना काल व स्थल या दोहोंची अद्यापही निश्चिती झालेली नाही.

२ टिप्पण्या:

D-hox-x म्हणाले...

जैन हे हिंदू च होते. आतल्या काही वर्षांत पुर्वी त्यांनी कायदेशीर हिंदू धर्मा पासून फारकत घेतली

सरमाया म्हणाले...

सर, भाग 1 व 2 सापडले नाहीत।