Friday, August 29, 2014

गंगाधर शास्त्र्याच्या खुनाचे रहस्य ( भाग - २ )


    मागील लेखात आपण सालबाईच्या तहापर्यंतच्या घटनांचा थोडक्यात आढावा घेतला. सालबाईच्या तहानंतर वरवर जरी गायकवाड इंग्रजांच्या ताब्यातून  निसटल्यासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे नव्हते. गायकवाडांच्या घरात पुढे अनेक उलाढाली झाल्याने इंग्रजांना त्यांच्यात हस्तक्षेप करण्याची संधी नेहमी मिळत गेली. स. १७८९ मध्ये फत्तेसिंहाचे अपघाती निधन झाले तेव्हा त्याचा भाऊ मानाजी हा पुढे आला. सयाजीच्या नावे तो कारभार पाहू लागला. यासाठी त्याने पेशव्यांना ६० लक्ष रुपये भरण्याचे कबूल केले.परंतु, अल्पवधीतच म्हणजे स. १७९३ मध्ये मानाजी मरण पावला आणि गोविंदरावाने अधिकारपदासाठी दावा पेश केला. तेव्हा सुमारे सव्वा कोटीहून अधिक रुपयांचा पुणे दरबारी भरणा करण्याचे त्याने मान्य केले. तसेच तापीच्या दक्षिणेकडचा मुलुख, सुरत बंदराच्या जकातीच्या उत्पन्नातील हिस्सा देण्यासही गोविंदरावाने कबुली दिली. गोविंदरावाने पेशव्यांच्या मागण्या भराभर मान्य केल्या खऱ्या पण इंग्रजांनी तापीच्या मुद्द्यावर हरकत घेतली. कारण, त्यामुळे सालबाईच्या तहातील अटीचा भंग होत होता. असो, गोविंदरावाची नानाने गुजरातला रवानगी केली. सोबत रावजी आपाजी यास आपल्या तर्फेने गोविंदरावाचा कारभारी म्हणून नेमून दिले. तसेच अहमदाबाद सुभ्याची पेशव्यांच्या हिश्याची व्यवस्था पाहण्यासाठी आबा शेलकूर यास नियुक्त करण्यात आले. या ठिकाणी एक अतिशय गैरलागू ठरणारी पण महत्वाची नोंद नमूद करणे योग्य ठरेल व ती म्हणजे रावजी आपाजी सोबत गंगाधरशास्त्रीचे वडील व गंगाधरशास्त्री गुजरातला रवाना झाले होते. असो. 

    स. १७९७ पर्यंत गोविंदरावाने ७८ लक्ष रुपयांचा भरणा करून ६० लक्ष रुपयांची सुट मिळवली. तरीही पेशव्यांचे ४० लाख रुपयांचे देणे अजून बाकी होते. अशात नाना फडणीसचे निधन होऊन बाजीरावाच्या अंतस्थ चिथावणीवरून गोविंदरावाने आबा शेलूकरास पकडून अहमदाबाद ताब्यात घेतले. आबाच्या सुटकेसाठी बाजीरावाने विशेष प्रयत्न केले नाही. तसेच अहमदाबाद सुभ्याची वहिवाट दरसाल ५ लक्षांच्या बोलीवर ५ वर्षांसाठी भगवंतरावाच्या नावे करून देण्यात आली. { वि. सु. :- भगवंतराव गायकवाड विषयी निश्चित अशी विश्वसनीय माहिती मिळत नाही. काहींच्या मते तो गोविंदराव गायकवाडचा मुलगा होता तर काहींच्या मते आनंदराव गायकवाड हा त्याचा बाप होता. मुद्दाम लक्षात घेण्याची बाब म्हणजे आनंदराव हा गोविंदरावाचा पुत्र असल्याचे उल्लेख मिळतात. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा हि विनंती ! }   इकडे स. १८०० च्या दिनांक १९ सप्टेंबर रोजी गोविंदराव गायकवाड मरण पावला व त्याचा ( तत्कालीन समजुतीनुसार वेडसर )  आनंदराव गादीवर आला. गोविंदरावाचा पराक्रमी पण अनौरस पुत्राने -- कान्होजीने आनंदरावास नजरकैदेत टाकून कारभार आपल्या हाती घेतला. हा प्रकार गायकवाड कुटुंबीयांस पसंत पडला नाही. त्यांनी रावजी आपाजीच्या मार्फत कान्होजीला पकडण्याचे कारस्थान रचले व ते सिद्धीसही गेले. परंतु त्यामुळे मूळ प्रश्न सुटला नाही. कान्होजी कैदेत पडला तरी गोविंदरावाचा आणखी एक मुलगा मुकुंदराव व दमाजी गायकवाडचा पुतण्या मल्हारराव यांनी आनंदरावाच्या विरोधात दंड थोपटले आणि  इंग्रजांकडे मदतीची याचना केली व इंग्रजांना हव्या असलेल्या सुरत चौऱ्यांशी परगण्याची त्यांना लालूच दाखवली.  ईस्ट इंडिया कंपनीने यावेळी हिंदुस्थानची जबाबदारी वेल्स्ली बंधूंच्या खांद्यावर सोपवली असून त्यांनी अधिकारपदाची सूत्रे हाती घेताच ' ठोकून काढण्याचे ' धोरण स्वीकारले होते. सर जॉन शोअरच्या तटस्थ धोरणाने अंगी शक्ती असूनही खर्ड्याच्या समर प्रसंगी निव्वळ माशा मारत बसलेल्या उपद्व्यापी इंग्रज अधिकाऱ्यांना अधिकार पदावरील या बदलाने नवा जोम प्राप्त झाला. त्यांनी वेल्स्लीच्या धोरणास अनुकूल अशी पावले उचलण्यास आरंभ केला. त्यानुसार मुंबईचा गव्हर्नर डंकन याने मेजर वॉकर यांस बडोद्याला प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा अंदाज घेण्यास पाठवले. वॉकरला प्रसंगी लष्करी बळाचा आधार असावा म्हणून खंबायतमधून दोन हजार फौजही त्याच्या दिमतीला दिली. इकडे वॉकर येण्यापूर्वीच रावजी - मल्हारराव यांचा झगडा जुंपला. मल्हाररावास तोंड देणे शक्य नसल्याने रावजीने दौलतराव शिंद्याकडे मदत मागितली पण तो यशवंतरावाशी लढण्यात गुंतल्याने रावजीने इंग्रजांच्या समोर पदर पसरला. स. १८०२ च्या जानेवारीत वॉकर बडोद्यास आला. आनंदरावाची भेट घेताच त्याला पुढील उपक्रमाची दिशा गवसली.  

    ता. २३ फेब्रुवारी १८०२ रोजी वॉकर गायकवाडांची फौज सोबत घेऊन मल्हाररावावर चालून गेला. मल्हाररावाने दोन महिने संघर्ष करून शरणागती पत्करली. वॉकरने त्याचे समाधान करून त्यास नडियाद येथे स्थायिक केले. पुढे किरकोळ बंडखोरांचा बंदोबस्त करून सहा महिन्यांत वॉकरने आनंदरावाचा --- पर्यायाने रावजीचा जम बसवून दिला. याबदल्यात ता. २९ जुलै १८०२ रोजी आनंदरावाने आपले सर्व अधिकार मेजर वॉकरच्या स्वाधीन केले. वॉकरच्या विरोधात खुद्द स्वतःच्या हातचा लेख असला तरी तो आपल्या अधिकाऱ्यांनी मानू नये अशा आशयाचे कलम या तहान्वये आनंदरावाने मान्य केले. या तहाने वॉकर, रावजी व त्याचे कुटुंबीय यांचा एक गट झाला. अशा प्रकारे गुजरात इंग्रजांच्या घशात जात असताना बाजीराव पेशवा शिंदे - होळकरांची राज्यविनाशक झुंज बघत बसला होता. वॉकरचा ठराव झाल्यावर वर्षभरातच रावजी मरण पावला. दरम्यान इकडे बाजीरावाने वसईचा तह करून इंग्रजांचा आश्रय घेतला होता. या तहानुसार गायकवाड हा इंग्रजांचा तह असल्याचे बाजीरावाने मान्य केले. तसेच इथून पुढे गायकवाडासोबत जो काही पेशव्यांचा तंटा असेल त्याचा निकाल इंग्रजांच्या दरम्यानगिरीने करण्याचे बाजीरावाने कबूल केले. सारांश, स. १७८०, १७८३, १८०२ व १८०३ च्या तहांनी गायकवाड हे इंग्रजांच्या पूर्णतः कह्यात गेले. गादीवरील नवीन वारसास मान्यता देण्याखेरीज पेशव्यांचा गायकवाडांसोबत आता फारसा संबंध उरला नव्हता. 

    रावजीला पुत्र नसल्याने मृत्युच्या आधी दि. २२ मे १८०३ रोजी त्याने वडील बंधूचा धाकटा पुत्र सीताराम यास दत्तक घेतले. या प्रकारास वॉकरची संमती होती. सीताराम व गंगाधरशास्त्री समवयस्क असून रावजीच्या सांगण्यानुसारच वॉकरने शास्त्रीला स. १८०३ च्या फेब्रुवारी महिन्यात गायकवाड दरबारच्या वतीने इंग्रज रेसिडेंटशी बोलणी करण्याच्या कामी --- वकीलीवर नियुक्त केले होते. वरकरणी रावजीच्या तंत्राने वॉकर कारभार पाहत असल्याचे चित्र असले तरी प्रत्यक्षात सर्व कारभार इंग्रजांच्याच तंत्राने चालल्याचे बडोदेकर मुत्सद्दी मंडळीच्या लक्षात आले. दरम्यान इकडे आणखी एक वेगळीच घटना घडून आली. आनंदरावास फत्तेसिंह नावाचा भाऊ असून त्यास जेजुरीच्या खंडोबास वाहिलेलं असल्याने तो व त्याची आई जेजुरी येथे राहत होते. यशवंतराव होळकर जेव्हा पुण्यास आला तेव्हा त्याने फत्तेसिंहास जेजुरीवरून काढून गुजरातमध्ये रवाना केले. गायकवाड अभिमानी मंडळींनी इंग्रजांचा वरचष्मा कमी करण्याच्या हेतूने फत्तेसिंह व सीताराम यांना आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न केला. वॉकरला याची कुणकुण लागताच त्याने फत्तेसिंहाला आपल्या पक्षास मिळवून घेतले पण सीताराम मात्र वॉकरच्या पक्षातून फुटला. यामुळे गायकवाड दरबारात इंग्रजधार्जिण व इंग्रजविरोधी असे दोन पक्ष निर्माण झाले. इंग्रजविरोधी मंडळाने पेशव्याकडे मदतीची याचना केली. परंतु यावेळी स्वतः पेशवाच इंग्रजांच्या सोनेरी जाळ्यात अडकलेला असल्याने तो त्यांची मदत काय करणार ?  

    तरीही स. १८०४ मध्ये वसईच्या तहात गमावलेल्या गायकवाडीला परत मिळवण्याचा बाजीरावाने प्रयत्न केला. आधी सांगितल्यानुसार बाजीरावाने भगवंतरावास अहमदाबादची वहिवाट पाच वर्षांसाठी मक्त्याने दिली होती. त्याची मुदत स. १८०५ मध्ये भरत होती परंतु, तत्पूर्वीच --- म्हणजे ता. २ ऑक्टोबर १८०४ रोजी सालीना साडेचार लक्षांचा पुणे दरबारी भरणा करण्याच्या बोलीवर दहा वर्षासाठी अहमदाबादची वहिवाट बाजीरावाने भगवंतरावाच्या नावाने करून दिली. बाजीरावाची हि चाल हाणून पाडण्याचा वॉकरने उपक्रम आरंभला. भगवंतराव हा अनौरस असला तरी हुशार होता व त्यासच आपला वारस म्हणून नियुक्त करण्याची आनंदरावाची इच्छा होती. परंतु, यामुळे पेशव्याचा पक्ष बळावेल हे जाणून वॉकरने फत्तेसिंहास हाताशी धरले. लहानपणी त्यास देवाला वाहिलेलं असल्याने स. १८०६ मध्ये त्याची तुला करून त्यास शुद्ध करण्यात आले. तसेच गायकवाडांचा कारभार चालवण्यासाठी जे रीजन्सी कौन्सिल बनवण्यात आले त्याचे अध्यक्षपद वॉकरने स्वतःकडे ठेवून फत्तेसिंहास रिजंट, नेटिव्ह असिस्टंट गंगाधरशास्त्री, दिवाण बाबाजी आपाजी व मुजुमदार अशा नियुक्त्या केल्या. बाबाजी आपाजी हा मयत रावजी आपाजीचा बंधू असून तो इंग्रजांना अनुकूल होता व सीतारामाची कोंडी करण्यासाठीच वॉकरने त्यास अधिकार मंडळावर नेमले होते. 

                                                                               ( क्रमशः )

Thursday, August 28, 2014

गंगाधर शास्त्र्याच्या खुनाचे रहस्य ( भाग - १ )    ता. २७ जुलै १८१५ रोजी पंढरपूर येथे गायकवाड दरबारचा पेशवे दरबारातील वकील गंगाधरशास्त्री पटवर्धन याचा खून झाला. खुनाचे कारण व मारेकरी अज्ञात होते व राहिले. गंगाधरशास्त्री हा गायकवाडांचा वकील असला तरी गायकवाड व पेशवे दरबार दरम्यान इंग्रज सरकार अर्थात ईस्ट इंडिया कंपनी असल्याने एकप्रकारे त्यांच्या अभयवचनावर / भरवशावर विसंबून शास्त्री महोदय पुण्यास आले होते. खुनाच्या प्रसंगी पंढरपूर शहरात खुद्द दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे वास्तव्य असून घटनास्थळाजवळ पेशव्यांचा मुख्य कारभारी त्रिंबकजी डेंगळे हा उपस्थित होता. ज्या इंग्रज सरकारच्या भरवशावर शास्त्री पुण्यास आला होता, त्या इंग्रज सरकारने आपल्या मित्र दरबारच्या वकिलाच्या संरक्षणाची कसलीच तरतूद केली नव्हती. परंतु असे असूनही पेशवा व त्याच्या मुख्य कारभाऱ्याच्या उपस्थितीत गायकवाडांच्या वकिलाचा खून झाल्याने संशयाची सुई पेशवे दरबारकडे वळली. लोकचर्चेत म्हणा किंवा लोकांत पसरवून दिलेल्या अफवांमुळे म्हणा या खुनाचा संबंध पेशवे दरबारशी जोडला जाऊन त्रिंबकजीस कटाचा सूत्रधार मानण्यात आले. हिंदुस्थानात आपले हात - पाय पसरण्यास आतुर असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने राजकीय कुरघोडीची हि संधी दवडली नसल्यास नवल ! मात्र त्यांची पंचाईत अशी होती कि, या खुनाचा आळ थेट पेशव्यावर घेता येत नसल्याने त्रिंबकजी डेंगळ्यास बळीचा बकरा करण्यात आले. राजकीय खुनात ज्याच्या हाती प्रबळ अशी लष्करी सत्ता असते त्याचाच पक्ष न्यायाचा म्हटले जाते. त्यानुसार त्यावेळी इंग्रजांचे आरोप खरे असून बाजीरावानेच त्रिंबकजीच्या मार्फत गंगाधरशास्त्र्याचा खून घडवून आणला असे मानले जाऊ लागले व त्याचेच प्रत्यंतर मराठी - इंग्रजी इतिहासकरांच्या इतिहास लेखनात - कथनात दिसून येते. प्रस्तुत लेखांत उपलब्ध संदर्भ साधनांच्या आधारे सुमारे १९९ वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे.


    गंगाधर शास्त्र्याच्या खुनाचे मूळ तत्कालीन घटनांत न शोधता स. १७७९ मध्ये झालेल्या पहिल्या इंग्रज - मराठा युद्धातील तळेगावच्या तहानंतरच्या घडामोडीत शोधण्याचा मी प्रयत्न केला. स. १७७९ च्या तळेगाव - वडगावच्या तहानंतर खऱ्या अर्थाने इंग्रज - मराठा युद्धास रंग चढला. इंग्रजांना वडगावचा तह तर पाळायचा नव्हताच. त्यांचा सेनानी गॉडर्ड यावेळी गुजरातमध्ये ठाण मांडून बसला होता. मुंबईची फौज वडगावातून परत माघारी गेली व विजयी मराठी सेना पुण्यास परतली. इंग्रजांचा वडगावी पराभव झाला असला तरी त्यांच्या फौजा शाबूत असल्याने युद्ध इतक्यात संपणार नाही याची पुणे दरबारास जाणीव होतीच. त्यानुसार गॉडर्डला गुजरातमधून बाहेर काढण्याची व इंग्रजांच्या संभाव्य आक्रमणाला तोंड देण्याची तयारी त्यांनी चालवली. यातूनच निजामाचे इतिहासप्रसिद्ध कारस्थान उदयास आले. इंग्रजांचे चढाईचे धोरण सर्वच एतद्देशीय सत्तांना बाधक ठरू लागल्याने निजामाने पुणे दरबाराकडे एक प्रस्ताव मांडला. त्यानुसार हैदर, पेशवे, निजाम व भोसले यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारायचे होते. कारस्थानाची कल्पना सुचवून निजाम गप्प बसला तर नाना फडणीसने हि योजना मनावर घेऊन चौकडीचा संघ उभारण्याची खटपट केली. इंग्रजांचे लक्ष या घडामोडींवर होतेच. त्यांनीही नानाचा व्यूह ढासळून पाडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करून चौकडीच्या राजकारणातून निजाम व भोसल्यांना फोडण्यात यश मिळवले. यामुळे हैदर व पुणे दरबार इंग्रजांविरुद्ध एकाकी पडले. असो, हा विषय प्रस्तुत लेखाच्या मर्यादेत येत नसल्याने त्याची चर्चा येथे करत नाही.  

    नाना फडणीस चौकडीचे कारस्थान उभारत असताना संभाव्य राजकीय कोंडीवर मात करण्यासाठी उपलब्ध पर्यायांची चाचपणी करण्याचा इंग्रजांचा प्रयत्न सुरूच होता. मराठी राज्य हे मराठी सरदारांचे संघराज्य असल्याने मराठी सरदारांना परस्परांपासून अलग पाडल्यास त्यांचे सामर्थ्य खच्ची होईल असा इंग्रजांचा अचूक अंदाज असल्याने त्यांनी त्यादृष्टीने पावले उचलली. अनायसे गॉडर्ड गुजरातमध्ये बसला होता व वडगावच्या तहानुसार पुणे दरबारास शरण गेलेला रघुनाथराव महादजी शिंदेच्या हातावर तुरी देऊन गॉडर्डच्या आश्रयास आला होता. चालून आलेली सुवर्णसंधी दवडण्याइतपत गॉडर्ड दुधखुळा नसल्याने दादास हाताशी धरून पुणेकरांना खिजवले व आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर गायकवाड दरबारावर दडपण आणायला सुरुवात केली. गायकवाड दरबारची स्थिती यावेळी इंग्रजांच्या हस्तक्षेपासाठी अगदी आदर्श अशीच होती. 

    स. १७६७ मध्ये दमाजी गायकवाड मरण पावल्यावर त्याच्या पाठीमागे वारस म्हणून सयाजी गायकवाडच्या मार्फत फत्तेसिंहाने दावा दाखल केला तर गोविंदरावने आपणांस सरदारकी मिळावी यासाठी पुणे दरबारकडे अर्ज केला. वास्तविक दमाजीनंतर सयाजी हा गादीचा वारस असला तरी भोळसट / वेडसर स्वभावाने तो या पदास अयोग्य होता. तेव्हा त्याच्या ऐवजी फत्तेसिंह यास सरदारी देणे आवश्यक होते. परंतु खुद्द फत्तेसिंहास सयाजीच्या नावे सरदारी घेऊन कारभार हाती घेण्याची इच्छा असल्याने तसेच दमाजीच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा गोविंदराव हा आपल्या नावाने सरदारी घेण्यास उत्सुक असल्याने बऱ्याच विचारांती थोरल्या माधवरावाने सयाजीला गादीचा वारस ठरवून फत्तेसिंहास कारभार सोपवला. परंतु, हा निवाडा गोविंदरावास मान्य झाला नाही. त्याचे व फत्तेसिंहाचे तंटे सुरूच राहिले. दरम्यान माधवराव मरण पावल्यावर गारद्यांनी नारायणाची गठडी वळवली तर बारभाईंनी दादास पदच्युत करून सवाई माधवरावाच्या नावाने कारभार हाती घेतला. पेशवे कुटुंबाच्या या कलहात गायकवाड बंधूही खेचले गेले. फत्तेसिंह कारभाऱ्यांच्या पक्षास मिळाला तर गोविंदराव दादाच्या ! पैकी, पुण्याच्या पाठिंब्यावर फत्तेसिंहाने गोविंदरावाचा पराजय केला व नानाने गोविंदरावाकडील सेनाखासखेल पद काढून फत्तेसिंहास बहाल केले. या वेळी झालेल्या करारनुसार फत्तेसिंहाने १८ लक्ष पेशव्यास नजराणा म्हणून देण्याचे मान्य करून रोख पाच लक्षांचा भरणा केला. मात्र उर्वरीत रक्कम भरण्यास तो टाळाटाळ करु लागला. पेशव्यांचा अहमदाबादचा सरदार आपाजी गणेश बाकी रकमेचा भरणा लवकर करण्यासाठी तगादा लावू लागला तेव्हा उभयतांचे वैमनस्य आले. त्यातच पेशव्यांचे गुजरातमधील सरदार गणेश बेहरे व अंताजी नागेश हे आपाजी गणेशच्या मदतीस आल्याने फत्तेसिंह एकाकी पडला. गायकवाड दरबार आता पुणेकरांच्या कह्यात जाणार हे सर्वांनाच स्पष्ट दिसू लागले. गुजरातमध्ये अशी परिस्थिती असताना गॉडर्ड गुजरातमध्ये आला होता. त्यातच दादाचे  आगमन गुजरात प्रांती होताच त्याच्या हस्तकांना नवा जोम प्राप्त होऊन त्यांनी पुणेकर सरदारांविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले. फत्तेसिंह हा नानाच्या पक्षातील असल्याने त्याने दादाच्या सरदारांना पराभूत करण्यासाठी पुणेकर सरदारांना मदत करावी असे पुणे दरबारचे मत होते. परंतु नाना व दादाच्या कलहात गायकवाडांची गुजरात लुटली जात होती. त्याशिवाय गायकवाडांना आपल्या मूळ मालकाप्रमाणे --- दाभाड्यांप्रमाणेच पेशव्यांचा गुजरातमधील हस्तक्षेप कधीच मंजूर नव्हता. त्यामुळे फत्तेसिंहाने धरसोडीचे धोरण स्वीकारून आपला निभाव करण्याचे तंत्र स्वीकारले. परंतु, गॉडर्ड त्याला असा सोडणार नव्हता. त्याने दादास भर देऊन त्याच्या हस्तकांकरवी पुण्याच्या सरदारांचा उच्छेद चालवला. तसेच फत्तेसिंहाचा कारभारी गोपाळ गोविंद कामतेकर उर्फ गोंदबा यासही त्याने वश करून घेतले. परिणामी गायकवाडीत इंग्रजांचा हस्तक्षेप आता अनिवार्य असा बनला होता. खुद्द फत्तेसिंह इंग्रजांच्या कह्यात जाण्यास फारसा उत्सुक नव्हता. परंतु पेशव्यांचा गृहकलह, इंग्रजांचे आक्रमक धोरण आणि गायकवाड घराण्यातील भाऊबंदकी यांमुळे गायकवाडांची सत्ता धोक्यात येऊ लागल्याने आपली सरदारकी रक्षण्यासाठी फत्तेसिंह तऱ्हेने प्रयत्न करू लागला.  

    दादा व गॉडर्डच्या उद्योगास हाणून पडण्यासाठी त्याने नानाकडे मदत मागितली. नानाने इंग्रजांची चाल ओळखून स. १७७९ च्या दसऱ्यास शिंदे - होळकरांना गुजरातमध्ये पाठवण्याचे निश्चित केले व तसे फत्तेसिंहास कळवले देखील होते. परंतु, याच काळात नाना - महादजीचे मानपान नाटक रंगल्याने सुमारे तीन - चार महिन्याचा काळ व्यर्थ वाया गेला.  गॉडर्डने याच काळात प्रत्यक्ष लष्करी कारवाई करून फत्तेसिंहास गुडघ्यावर आणायचा प्रयत्न केला. पुण्याच्या मदतीकडे डोळे लावून वाट बघत बसलेल्या फत्तेसिंहाने अखेर ता. २६ जानेवारी  कुंधेला येथे गॉडर्ड सोबत तह केला. या तहानुसार (१) फत्तेसिंहाने तीन हजार स्वारांसह इंग्रजांना चालू युद्धात मदत करावी. (२) गुजरात प्रांताची पेशवे - गायकवाडांची वाटणी गैरसोयीची असल्याने महीच्या उत्तरेस पेशव्याच्या ताब्यात असलेला प्रदेश फत्तेसिंहास मिळावा यासाठी इंग्रज मदत करतील. त्याबदल्यात फत्तेसिंहाने तापीच्या दक्षिणेकडील गायकवाडांचे सुरत अठ्ठाविशीचे महाल इंग्रजांना द्यावेत. (३) पुणे दरबार - इंग्रजांचा तह होईल तेव्हा इंग्रजांनी फत्तेसिंहाच्या हितास जपावे. यासाठी भडोच व सिनोर हे परगणे इंग्रजांना कायमचे देण्यात यावे. या तहाची अंमलबजावणी अहमदाबाद फत्तेसिंहाच्या ताब्यात येताच होणार होती. या तहाच्या निमित्ताने गॉडर्डने सुरतजवळ सलग प्रदेशात इंग्रजांच्या सत्तेचा पाया सलग करून घेतला व तहाची अंमलबजावणी करण्यासाठी तो दि. १० फेब्रुवारी रोजी फत्तेसिंहाच्या सोबत अहमदाबादला येउन धडकला. पेशव्यांच्या सरदारांनी शहर लढवण्याची शर्थ केली पण गॉडर्डच्या तोफांनी ३ दिवसांत शहर शरण आले.  

 इकडे पुण्याच्या फौजा सोबत घेऊन शिंदे - होळकर मार्च आरंभी गुजरातमध्ये आले. फत्तेसिंह आयत्या वेळी दगा देईल या धास्तीने गॉडर्डने त्यास आपल्या सोबतच छावणीस ठेवले. पुढे इंग्रजांची शिंदे - होळकरांशी गुजरातमध्ये ठिकठिकाणी चकमक उडू लागली. पुणेकरांच्या फौजाही हिरीरीने झुंजू लागल्या. परंतु इंग्रजांच्या तोफांना तोडीस तोड देईल असा प्रभावी तोफखाना मराठी सरदारांजवळ नसल्याने त्यांनी निर्णायक संग्राम टाळला. इकडे शिंदे - होळकरांच्या उत्तरेतील प्रदेशांवर इंग्रजांचे हल्ले होऊ लागल्याने व पावसाळा तोंडावर आल्याने हे सरदार उत्तरेत निघून गेले. तेव्हा गॉडर्डला मोकळे रान मिळून त्याने थेट वसई - साष्टी पर्यंत मुसंडी मारून किनाऱ्यावरील मराठी राज्याची बळकट ठाणी आपल्या ताब्यात घेतली. पुढे आणखी काळ युद्ध चालून ता. २४ फेब्रुवारी १७८३ रोजी सालबाईच्या तहाने पहिले इंग्रज - मराठा युद्ध समाप्त झाले. यात गायकवाडांशी संबंधित दोन अटी होत्या. (१) फत्तेसिंह व सयाजी गायकवाड यांनी इंग्रजांस जो प्रदेश दिला असेल तो सर्व ज्याचा त्याला परत द्यावा (२) गायकवाडांकडे पूर्वी असलेला मुलुख कायम राहील. पूर्वीच्या करारान्वये त्याने पेशव्यांना खंडणी देऊन त्यांची नोकरी करावी. तसेच पूर्वीच्या सालांबद्दल पेशव्यांनी त्याच्याकडे खंडणी मागू नये. सालबाईच्या तहाने इंग्रजांचे गायकवाड संबंध संपुष्टात आल्याचा कित्येक इतिहासकारांचा दावा असला तरी सालबाईच्या तहातील इतर अटी पाहिल्यास गायकवाड - इंग्रज हे संबंध अबाधित राहिले होते. गायकवाडांना फिरून पेशव्यांच्या दावणीला बांधून देखील इंग्रज बडोदा दरबारचे मित्र बनून राहिले. 

                                                                                    ( क्रमशः )

Saturday, August 23, 2014

पेशवाईतील खाद्यजीवन


    आमचे उत्साही व अभ्यासू ब्लॉगर मित्र श्री. ' कोहम महोक ' यांनी एकदा चर्चेदरम्यान पेशवेकाळात छत्रपती, पेशवे व त्यांच्या सरदारांना कोणते खाद्य पदार्थ आवडत असत अशा आशयाचा एक प्रश्न विचारला होता व याच विषयावर एक लेख लिहिण्याची सूचनावजा आज्ञाही केली होती. तेव्हा त्या आज्ञेस स्मरून हा लेख लिहिण्याचा खटाटोप करीत आहे.

    ऐतिहासिक पत्रांमध्ये लढाया, राजकीय कट - कारस्थाने, मानपान, जमाखर्च, वतन - निवाडे याशिवाय काही प्रमाणात घरगुती बाबी इत्यादी गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. त्यामानाने  आवडीच्या खाद्यपदार्थांच्या मागणी विषयी किंवा संबंधित असे आवर्जून केलेले उल्लेख फारसे आढळत नाही. पण त्यातूनही जे काही उल्लेख वाचनात आले ते या ठिकाणी नमूद करत आहे. यातून तेव्हाच्या खाद्य संस्कृतीची वाचकांना तोंडओळख व्हावी हाच यामागील हेतू.

    इतिहास अभ्यासकांना वैद्य दप्तराविषयी अधिक काही सांगायची गरज नाही. परंतु सर्वसामान्य वाचकांसाठी थोडी माहिती देणे गरजेचे आहे. वैद्यांच्या घराण्याचा उल्लेख शिवछत्रपतींच्या काळातील पत्रांमधून आढळत असला तरी खऱ्या अर्थाने त्यांचा राजकारणाशी संबंध संभाजीपुत्र शाहूच्या काळात आला. शाहूच्या विश्वासू राजकीय सल्लागारांत या घराण्यातील पुरुषांचा समावेश होतो. शाहूजवळ यांचे असलेले वजन लक्षात घेऊन आंग्रे, भोसले इ. प्रमुख वजनदार सरदारांनी या घराण्यातील पुरुषांना सातार दरबारी एकप्रकारे आपले वकील म्हणून नेमले होते. त्याशिवाय वेळप्रसंगी वैद्य घराण्यातील पुरुष मराठी सरदारांना मोहिमांसाठी कर्जही देत असत. त्यामुळे त्यांचा मराठी राज्यातील बव्हंशी प्रमुख सरदारांशी जवळचा संबंध होता. प्रस्तुत विषयाच्या मर्यादेत एवढी माहिती पुरेशी आहे. वैद्यांच्या दप्तरांत जी काही पत्रे प्रसिद्ध करण्यात आली, त्यांपैकी त्यांच्या घरगुती पत्रांमध्ये कोकणातून ज्याप्रमाणे वारंवार तांदूळ मागवल्याचे उल्लेख आढळतात त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या परिचयाची फणसपोळीही मागविल्याचे उल्लेख आढळतात. फणसपोळीचा एकदम जुना उल्लेख स. १७४३ च्या पत्रांत आढळतो. 

    छत्रपती घराण्यातील पुरुषांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांचे तपशील फारसे वाचनात आले नाहीत. अपवाद छत्रपती शाहूचा.  वैद्य दप्तरांत जी आंग्रे व इतरांची पत्रे प्रकाशित करण्यात आली आहेत त्यानुसार शाहूच्या मागणीस्तव तसेच त्याची मर्जी राखण्यासाठी आंगऱ्यांनी त्यांस वारंवार पुढील खाद्यपदार्थ पाठवल्याचे उल्लेख मिळतात :- नारळ, सुपारी, खजूर, केळी, तसेच मासे, सोडे, बोंबील इ. तत्कालीन राजकीय मुत्सद्द्यांप्रमाणे शाहूलाही बागांची बरीच आवड होती. अशाच एका शाहूच्या बागेकरिता तुळाजी आंग्रेने सुपारी, नारळ, अननस, केळी, भुईचा चाफा, मीरवेल, अशोक इ. ची मिळून सुमारे साडेचारशे रोपे पाठविली होती. 

    छत्रपती प्रतापसिंहाच्या कारकिर्दीतील एका मेजवानीचा उल्लेख मराठी दफ्तर मध्ये आढळतो. त्यानुसार तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धांत इंग्रजांनी सातारा ताब्यात तेथे छत्रपतींची पुनर्स्थापना केली. त्यावेळी इंग्रज मुत्सद्दी एल्फिन्स्टन यांस प्रतापसिंहाने बकऱ्याची मेजवानी दिली होती.

    पेशवे घराण्याचा पुरंदऱ्यांशी असलेला संबंध सर्वांच्या परिचयाचा आहे. स. १७४८ साली रघुनाथरावाने नाना पुरंदरेस पाठवलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यानुसार त्यावेळी रघुनाथ आजारी होता व वैद्यांनी त्यास पथ्यही सांगितले. रघुनाथाने वीस दिवस पथ्य पाळले पण नंतर कणसे खाण्याचा मोह होऊन पथ्याचा भंग झाला. त्यामुळे प्रकृती बिघडली. तेव्हा नानासाहेबाने त्याची कडक शब्दांत हजेरी घेतली होती. या पत्रानुसार पठ्ठ्याला कणसे पचत नव्हती व खाल्ल्याशिवायही राहवत नव्हते असे दिसून येते. 

    नाना पुरंदरेच्या घरगुती पत्रांत काही नोंदी आढळतात. त्यानुसार एका पत्रात ब्राम्हणांना भोजनात दही व दुध देण्याची सूचना केल्याचे दिसून येते. तसेच स. १७६८ च्या वसंतपूजेच्या वेळी जेजुरीच्या म्हाळसाकांतास जो नैवद्य अर्पण करायचा तो कसा बनवायचा याचेही निर्देश नाना पुरंदरेने दिल्याचे आढळतात ते पुढीलप्रमाणे :- नैवद्यात जो भात बनेल तो उत्तम बारीक तांदळाचा असावा. दह्यात मीठ घालून मग ते भातावर टाकावे. त्याशिवाय वांग्याचे भरीत बनवताना फोडणीसाठी जिरे, हिंग, मिरे इ. चा वापर करून थोडे तिखट टाकण्याची सूचना आहे. तसेच नैवद्याच्या जितक्या वाट्या बनतील त्या प्रत्येक वाटीवर एक पापड ठेवण्याची दक्षता घेण्याचीही आठवणीने सांगितले आहे. देवाच्या पूजेनंतर ब्राम्हणांना भोजनात पोळ्यांची खीर देण्याचेही निर्देश दिले आहेत.

    स. १७७० साली थोरल्या माधवरावास स्वारीच्या प्रसंगी पुरंदरे घराण्यातील व्यक्ती भेटावयास गेली. त्यावेळी माधवरावास पेश केलेल्या जिनसांत भाजीपाल्याचाही समावेश होता. त्यापैकी वांगी व घेवड्याच्या शेंगांची भाजी लगेच करण्याचा करण्याचा माधवरावाने हुकुम केला. वांग्यावरून आठवले. त्यावेळी वांगी हि बहुतेक सर्वांच्या आवडीची असावी. कारण, सवाई माधवराव पेशव्याला देखील खास कृष्णाकाठची वांगी आवडत असल्याचे उल्लेख खऱ्यांच्या लेखसंग्रहात वाचल्याचे स्मरते.

    पेशवाईतील प्रख्यात मुत्साद्द्यांपैकी एक नाना फडणीस --- जो आपल्या हिशेबी कारभारासाठी व गुप्त कारस्थानासाठी प्रसिद्ध आहे -- त्याच्या खाण्याच्या आवडीविषयी पुढील माहिती मिळते :- समशेरबहाद्दरचा मुलगा अलीबहाद्दार बुंदेलखंडात होता. नाना त्याच्याकडून द्राक्षे, डाळींब मागवून घेत असे. तसेच त्याला तोंडली व कोवळ्या कोथिंबीरीचीही आवड होती. खेरीज त्याने कित्येक फळ - फुलबागांची निर्मितीही केली होती.

    सवाई माधवरावाचा प्रथम विवाह समारंभ हा उत्तर पेशवाईत अनेक कारणांनी जरी गाजला असला तरी या विवाहाच्या प्रसंगी जो काही थाटमाट करण्यात आला होता तसा पूर्वी आणि नंतरही झाला नसल्याचे उल्लेख आढळतात. या प्रदीर्घ काळ चाललेल्या लग्नसमारंभात पाहुण्यांच्या फराळाची, भोजनाची व्यवस्था कशी असावी याची सूचना असणारे एक दीर्घ पत्र काव्येतिहाससंग्रहात प्रकाशित केले आहे. त्या समारंभातील फराळ व भोजनाच्या पदार्थांची यादी खालीलप्रमाणे :- 

    फराळाचे पदार्थ :- पाच प्रकारचे लोणचे, १० प्रकारच्या कोशिंबिरी, लाडू, पोहे आंबेमोहर बारीक भात. मातबरांस लाह्या, खानदेशातून नवीन पोहे मागवण्याची सूचना. तसेच खजूर, खारीक, खोबरे, बदाम, पिस्ते, मेवा, मिठाई, मुरांबे, नारळ, दही - दुध, साजूक व मध्यम प्रकारचे तूप.

    ब्राम्हण भोजनातील पदार्थ :- वरण, भात, दोन ते तीन प्रकारच्या भाज्या, सांबार, आवळे गाजराचे लोणचे, कढी, पुरणपोळी व तूप, बुंदीचे लाडू     मुख्य भोजन समारंभातील पदार्थ :- खासा व मध्यम असे भाताचे दोन प्रकार ; साखरभात, वांगे भात ; तुरीचे वरण ; दोन प्रकारचे सांबार ; दोन प्रकारची आमटी ; १० प्रकारचे लोणचे , साखरेचे लोणचे ; कढी ; सार दोन प्रकारचे ; दहा ते बारा प्रकारच्या भाज्या. त्यात तोंडली, पडवळ, वांगी इ. चा समावेश ; पूरणपोळ्या ; साधे वडे व वाटल्या डाळीचे कडिवडे ; ओल्या हरभऱ्याच्या डाळीची खिचडी ; चांगले - मध्यम साजूक तूप ; मठ्ठा, चख्खा, अंबरस, श्रीखंड ; पापड, सांडगे, फेण्या, तिळवडे, चिकवड्या, मीरगोडे बोंडे मेक्यांच्या काचऱ्या तळून ; कोशिंबीरीचे २० प्रकार. 


    असो, असे अनेक तुरळक उल्लेख अनेक ऐतिहासिक पत्रांत आढळून येतात. परंतु इतिहासकारांना केवळ राजकीय उलाढाली व लढायांमध्ये अधिक रस असल्याने या नोंदींची दखल फारशी घेतली जात नाही. वास्तविक खाद्यसंस्कृती हे इतिहासाचे एक अंग आहे. परंतु, काही कारणांनी आपल्याकडे अजूनही ते दुर्लक्षित आहे. निदान या लेखाच्या वाचनातून कोणास या विभागावर संशोधन वा तपशीलवार लेखन करण्याची प्रेरणा मिळेल असा आशावाद व्यक्त करून हा लेख समाप्त करतो.

    संदर्भ ग्रंथ :-
१) वैद्य दप्तर - खंड २ व ४
२) मराठी रियासत - खंड ८
३) पुरंदरे दप्तर - खंड ३
४) मराठी दप्तर - भाग दुसरा
५) काव्येतिहास संग्रह पत्रे व यादी Wednesday, August 20, 2014

चालण्याच्या कामांत घोड्याशी माणसे स्पर्धा करीत


    ' पेशवाईच्या सावलीत ' हा श्री. नारायण गोविंद चापेकर संपादित संदर्भ ग्रंथ वाचत असताना दोन महत्त्वाच्या नोंदी मला आढळल्या त्या येथे देत आहे.
१]

  

खाजगीवाले }                                                                        { श. १७०५
                   }                                                                        { इ. १७८३
           ६ इनाम खास बारदार अ।। २ सातारियाहून एके दिवशी पुणियास आले दुसरे दिवशी माघारी पोचले सबब दिल्हे ( नाना पुरंधरे याजला वैद्य आणावयास )
                    
               १ इनाम बयाजी पारधी सातारियास जाउन दोहों दिवसांत आला सबब     

२]
        तुळशीबागवाले }                                                         { श. १७११
                                                                                           { इ. १७८९

  १ ।।. प्यादे जासूद नेवाशाहून जलद आले स।। इनाम .॥. रायभान ; १ कृष्णाजी झोडगा दो दिवसांत आले स।।
    ५ रु. धर्मादाय शु।। ११ भाद्र्पद शु।। पर्वतीचे तळ्यांतून दक्षिणेकडे उडी घालून उत्तरेकडे निघाले त्यास. १७२१ 


    विवेचन :- प्रस्तुत ग्रंथाच्या संपादकांनी जी प्रस्तावना दिली आहे त्यात खासगीवाल्यांच्या दप्तरातील पत्राचा उल्लेख करून ते म्हणतात कि, "…. चालण्याच्या कामांत घोड्याशी माणसे स्पर्धा करीत. पुण्याहून सातारा ७० मैल आहे. हा सत्तर मैलांचा प्रवास एका दिवसात करणारे लोक होते. " तसेच तुळशीबागवाले दप्तरातील पत्राच्या उल्लेखावर संपादकांचे मत पुढीलप्रमाणे :- " … नेवाशाहून दोन दिवसांत जासूद चालत आले म्हणून त्यांना १।। रुपया इनाम मिळाले आहे."  प्रस्तुत ग्रंथ हा श. १८५९ - स. १९३७ च्या सुमारास प्रकाशित झाला. माझ्या मते, ब्रिटीश राजवटीत पुणे - सातारा दरम्यान वाहतुकीसाठी जो रस्ता बनला होता त्याचे अंतर त्यावेळी ७० मैल -- सुमारे ११० - ११२ किलोमीटर्स इतके होते. सध्याचा पुणे - सातारा हा गाडीरस्ता देखील जवळपास एवढ्याच अंतराचा आहे. तेव्हा संपादकांचे मत प्रमाण मानन्यास काही हरकत नाही. परंतु, ' बाबा वाक्यं प्रमाणं ' या सूत्रावर माझा विश्वास नसल्याने मला अशी एक शक्यता वाटते कि, स. १७८३ मध्ये सातारा - पुणे दरम्यान जो काही वाहतुकीचा रस्ता होता तो ७० मैलांचा नसावा. त्यावेळी बातम्या जलद पोहोचवण्यासाठी आडमार्गांचा, प्रचलित नसलेल्या वाटा - चोरवाटांचा देखील उपयोग केला जायचा. हि शक्यता लक्षात घेतली असता सातारा - पुणे हे ७० मैलांचे अंतर एका दिवसात पार केले या विधानात काही तथ्य नसल्याचे दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे सदर पत्रात सातारा येथून पुण्यास एका दिवसात आल्याचा उल्लेख आहे पण अंतराचा उल्लेख मात्र केलेला नाही. तेव्हा संपादकांचे मत माझ्या मत अग्राह्य ठरते.  अर्थात, २४ तासांत एखाद्या व्यक्तीने ७० मैल चालण्याचे ठरवले तर दर तासाला चार - साडेचार किलोमीटर्स अंतर कापणे भाग आहे. म्हणजेच, हि अशक्य अशीही गोष्ट नाही. परंतु, अस्मादिकांना पदयात्रेचा विशेष अनुभव नसल्याने याविषयी ठामपणे काही सांगू शकत नाही.
    तुळशीबागवाल्यांच्या दप्तरातील नेवाशाहून आलेल्या जासूदजोडीचा जो उल्लेख आहे, त्यावरून नेवासे ते पुणे हे अंतर नकाशात पाहिले असता १८० ते २०० किलोमीटर्स असल्याचे दिसून येते. परंतु, ज्याप्रमाणे खाजगीवाले दप्तरातील पत्रात जसा पुणे - सातारा अंतराचा उल्लेख नाही, त्याचप्रमाणे या पत्रात देखील पुणे - नेवासे दरम्यान किती अंतर होते याचा उल्लेख नसल्याने याविषयी अधिक काही लिहिता येत नाही. 


संदर्भ ग्रंथ :-
१) पेशवाईच्या सावलीत :- संपादक - नारायण गोविंद चापेकर

Tuesday, August 19, 2014

पेशवे कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था

                                                 श्री
    राजश्रियाविराजित राजमान्य बाबूराव राम स्वामी गोसावी यांसी पो।। बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंती उपरी चिरंजीव राजश्री जनार्दन याणी आम्हांस पत्र लिहिले कीं " आमच्याने पढवत नाही, अन्न द्याल तर द्या " म्हणोन रागें करून लिहिले. ऐसियास याप्रकारे ल्याहावयास कारण काय जाहाले ते सविस्तर मनास आणून लिहिणे. भीड न धरणे. या दिवसामधे याणीं या प्रकारे आम्हांस लिहावे तस्मात आम्ही कोणी सिक्षेची शिकवणूकच न ल्याहावी, असा सिद्धांत जाहालासा दिसतो. तर तुम्ही त्यास एकांती दोगांस घेऊन बसून साफ पुसणे की आम्ही लिहिण्या पढण्या बोलण्याविसी न ल्याहावे, त्यांचे मनास येईल ते त्यांणी करावे, ऐसाच सिद्धांत करून उत्तर पाठविणे. ( म्हणजे ) आम्ही सर्व सोडून देऊं, उगेच बसूं. जे त्याचे प्राक्तनी असेल ते होईल. जर आमचे सिकणे ऐकणे आहे तर आपले मनात येईल ते बरे वाईट येकीकडे ठेवून, सिष्यपणे चाकरपणे राहावे ; जे सांगू ते त्याप्रमाणे करावे ; विस्तार याचा काय ल्याहावा ? कलयुग प्रधान असे हे विनंती.
     बाळकृष्णशास्त्री हे नीट पढत नाहीत, भलतीकडे पाहातात, मधे बोलतात, येकाग्रचित करीत नाही यास्तव रागे भरले. यास्तव विद्येचा त्याग करावा असे नाही. गुरु आहेत. त्यांनी रागे भरले पाहिजे. कोणीही काम येकचित्त करून केलियावांचून सहसा होत नाही. येखादे समयी त्याणी शासन केले तरी सोसून गुरुमर्यादापूर्वक जो सिष्य सहन करतो तोच महापात्र होतो. तुम्हीही जाणता. हे सिष्य होत्साते रागे भरुं लागले तेव्हां त्याणी त्यास सिकवणे उचित नव्हे. विस्तार काय लिहिणे. 


    विवेचन :- प्रस्तुत पत्र हे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याने स्वारीतून बाबूराव फडणीस यांस लिहिले आहे. या पत्राची तारीख श्री. केळकरांनी न दिल्याने काही प्रश्न हे अनुत्तरीत राहतात पण त्यास इलाज नाही. असो, नानासाहेब पेशव्यास रघुनाथ व्यतिरिक्त रामचंद्र व जनार्दन हे दोन सख्खे बंधू होते.  रामचंद्राचा जन्म स. १७२३ चा असून तो १७३३ मध्ये वारला तर जनार्दनचा जन्म दि. १० जुलै १७३५ चा असून तो रघुनाथरावापेक्षा वयाने लहान होता.असो, दि. २८ एप्रिल १७४० रोजी बाजीराव पेशव्याचे निधन झाल्यावर बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबाकडे पेशवेपद तर आलेच पण लवकरच चिमाजीआपाचा मृत्यू झाल्याने कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे स्थानही त्यास प्राप्त झाले. तेव्हा घरातील मुलांच्या शिक्षणाची वगैरे सर्व जबाबदारी त्याच्या गळ्यात येऊन पडली. तत्कालीन प्रघातानुसार जे काही ब्राम्हण कुटुंबातील मुलांचे शिक्षण होते त्या पलीकडे जाऊन पेशवे कुटुंबातील मुलांना शिक्षण घ्यावे लागे. यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जात असे. परंतु , कितीही झाले तरी हि पेशव्यांची मुले !  यांना सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे गुरुजींनी रागावले अथवा बरे वाईट बोलले असता कसे सहन होईल ? असाच प्रकार जनार्दनाच्या बाबतीत झाला. जनार्दनाच्या शिक्षणासाठी बाळकृष्णशास्त्रीची नेमणूक करण्यात आली होती. जनार्दनपंताची लहर सांभाळून तो त्यास शिकवायचे काम करी, परंतु जनार्दनाचा हूडपणा अधिक वाढला तेव्हा शिक्षकीपेशास अनुसरून बाळकृष्णशास्त्री त्यास रागवला तेव्हा आपण शिकणार नाही असे आपल्या वडीलबंधूस लिहून कळवले. त्यावेळी नानासाहेब पेशवा मोहिमेत असून त्याने बाबूराव फडणीसास उपरोक्त पत्र लिहून सर्व प्रकाराची माहिती तर मागवलीच पण सोबत जनार्दनालाही कशा प्रकारे समजावून सांगायचे हे देखील त्याने बाबूरावास पत्राद्वारे कळवले.    


संदर्भ ग्रंथ :-
१) काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे :- श्री. य. न. केळकर

Sunday, August 17, 2014

पेशवाईतील फर्मानबाडीचे समारंभ


    सन १७९२ मध्ये महाजी शिंद्याने सवाई माधवराव पेशव्याच्या नावे   मोगल बादशाहकडून मिळवलेल्या वकील - इ – मुतलकी पदाचा व नालखीचा बहुमानाचा स्वीकार करण्यासाठी फर्मानवाडीचा पुण्यामध्ये समारंभ आयोजित करण्यात आला होता. पेशवाईमधील हा जणू काही पहिलाच समारंभ असल्याचे अनेक इतिहासकार सांगत होते आणि माझाही असाच समज होता. परंतु यापूर्वीही असे तीन प्रसंग होऊन गेले होते, त्यांची माहिती खालीलप्रमाणे :-

१) सन १७४५ मध्ये नानासाहेब पेशव्याचा भेलशा येथे मुक्काम असताना फर्मानवाडीचा पहिला दरबार झाला. दिल्लीतील पेशव्याचा वकील हिंगणे याने मोगल बादशाहकडून आणलेल्या बहुमानाचा नानासाहेब पेशव्याने स्वीकार  केला. [ राजवाडे खंड ६,लेखांक १७५ ]

२) सन १७५४ मध्ये रघुनाथरावाने मोगल बादशाकडून नालखीचा सन्मान मिळवला. [   शिंदेशाही इतिहासाची साधने खंड -२, लेखांक २, संपादक - आनंदराव फाळके  ]

 ३) सन १७७२ साली विसाजी कृष्ण बिनीवाले याने नारायणराव पेशव्याकरिता मीरबक्षीगिरीचा बहुमान मोगल बादशाकडून मिळवला. [ मराठी राज्याचा उत्तरार्ध - य. वा. खरे ] 


            या वरून हे निर्विवादपणे सिद्ध होते कि, सन १७९२ च्या आधीपासून पेशवाईत मोगल बादशाहतर्फे मिळालेले बहुमान स्वीकारण्यासाठी फर्मानवाडीचा समारंभ करण्याची प्रथा प्रचलित होती.