गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४

गंगाधर शास्त्र्याच्या खुनाचे रहस्य ( भाग - १ )



    ता. २७ जुलै १८१५ रोजी पंढरपूर येथे गायकवाड दरबारचा पेशवे दरबारातील वकील गंगाधरशास्त्री पटवर्धन याचा खून झाला. खुनाचे कारण व मारेकरी अज्ञात होते व राहिले. गंगाधरशास्त्री हा गायकवाडांचा वकील असला तरी गायकवाड व पेशवे दरबार दरम्यान इंग्रज सरकार अर्थात ईस्ट इंडिया कंपनी असल्याने एकप्रकारे त्यांच्या अभयवचनावर / भरवशावर विसंबून शास्त्री महोदय पुण्यास आले होते. खुनाच्या प्रसंगी पंढरपूर शहरात खुद्द दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे वास्तव्य असून घटनास्थळाजवळ पेशव्यांचा मुख्य कारभारी त्रिंबकजी डेंगळे हा उपस्थित होता. ज्या इंग्रज सरकारच्या भरवशावर शास्त्री पुण्यास आला होता, त्या इंग्रज सरकारने आपल्या मित्र दरबारच्या वकिलाच्या संरक्षणाची कसलीच तरतूद केली नव्हती. परंतु असे असूनही पेशवा व त्याच्या मुख्य कारभाऱ्याच्या उपस्थितीत गायकवाडांच्या वकिलाचा खून झाल्याने संशयाची सुई पेशवे दरबारकडे वळली. लोकचर्चेत म्हणा किंवा लोकांत पसरवून दिलेल्या अफवांमुळे म्हणा या खुनाचा संबंध पेशवे दरबारशी जोडला जाऊन त्रिंबकजीस कटाचा सूत्रधार मानण्यात आले. हिंदुस्थानात आपले हात - पाय पसरण्यास आतुर असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने राजकीय कुरघोडीची हि संधी दवडली नसल्यास नवल ! मात्र त्यांची पंचाईत अशी होती कि, या खुनाचा आळ थेट पेशव्यावर घेता येत नसल्याने त्रिंबकजी डेंगळ्यास बळीचा बकरा करण्यात आले. राजकीय खुनात ज्याच्या हाती प्रबळ अशी लष्करी सत्ता असते त्याचाच पक्ष न्यायाचा म्हटले जाते. त्यानुसार त्यावेळी इंग्रजांचे आरोप खरे असून बाजीरावानेच त्रिंबकजीच्या मार्फत गंगाधरशास्त्र्याचा खून घडवून आणला असे मानले जाऊ लागले व त्याचेच प्रत्यंतर मराठी - इंग्रजी इतिहासकरांच्या इतिहास लेखनात - कथनात दिसून येते. प्रस्तुत लेखांत उपलब्ध संदर्भ साधनांच्या आधारे सुमारे १९९ वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे.


    गंगाधर शास्त्र्याच्या खुनाचे मूळ तत्कालीन घटनांत न शोधता स. १७७९ मध्ये झालेल्या पहिल्या इंग्रज - मराठा युद्धातील तळेगावच्या तहानंतरच्या घडामोडीत शोधण्याचा मी प्रयत्न केला. स. १७७९ च्या तळेगाव - वडगावच्या तहानंतर खऱ्या अर्थाने इंग्रज - मराठा युद्धास रंग चढला. इंग्रजांना वडगावचा तह तर पाळायचा नव्हताच. त्यांचा सेनानी गॉडर्ड यावेळी गुजरातमध्ये ठाण मांडून बसला होता. मुंबईची फौज वडगावातून परत माघारी गेली व विजयी मराठी सेना पुण्यास परतली. इंग्रजांचा वडगावी पराभव झाला असला तरी त्यांच्या फौजा शाबूत असल्याने युद्ध इतक्यात संपणार नाही याची पुणे दरबारास जाणीव होतीच. त्यानुसार गॉडर्डला गुजरातमधून बाहेर काढण्याची व इंग्रजांच्या संभाव्य आक्रमणाला तोंड देण्याची तयारी त्यांनी चालवली. यातूनच निजामाचे इतिहासप्रसिद्ध कारस्थान उदयास आले. इंग्रजांचे चढाईचे धोरण सर्वच एतद्देशीय सत्तांना बाधक ठरू लागल्याने निजामाने पुणे दरबाराकडे एक प्रस्ताव मांडला. त्यानुसार हैदर, पेशवे, निजाम व भोसले यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारायचे होते. कारस्थानाची कल्पना सुचवून निजाम गप्प बसला तर नाना फडणीसने हि योजना मनावर घेऊन चौकडीचा संघ उभारण्याची खटपट केली. इंग्रजांचे लक्ष या घडामोडींवर होतेच. त्यांनीही नानाचा व्यूह ढासळून पाडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करून चौकडीच्या राजकारणातून निजाम व भोसल्यांना फोडण्यात यश मिळवले. यामुळे हैदर व पुणे दरबार इंग्रजांविरुद्ध एकाकी पडले. असो, हा विषय प्रस्तुत लेखाच्या मर्यादेत येत नसल्याने त्याची चर्चा येथे करत नाही.  

    नाना फडणीस चौकडीचे कारस्थान उभारत असताना संभाव्य राजकीय कोंडीवर मात करण्यासाठी उपलब्ध पर्यायांची चाचपणी करण्याचा इंग्रजांचा प्रयत्न सुरूच होता. मराठी राज्य हे मराठी सरदारांचे संघराज्य असल्याने मराठी सरदारांना परस्परांपासून अलग पाडल्यास त्यांचे सामर्थ्य खच्ची होईल असा इंग्रजांचा अचूक अंदाज असल्याने त्यांनी त्यादृष्टीने पावले उचलली. अनायसे गॉडर्ड गुजरातमध्ये बसला होता व वडगावच्या तहानुसार पुणे दरबारास शरण गेलेला रघुनाथराव महादजी शिंदेच्या हातावर तुरी देऊन गॉडर्डच्या आश्रयास आला होता. चालून आलेली सुवर्णसंधी दवडण्याइतपत गॉडर्ड दुधखुळा नसल्याने दादास हाताशी धरून पुणेकरांना खिजवले व आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर गायकवाड दरबारावर दडपण आणायला सुरुवात केली. गायकवाड दरबारची स्थिती यावेळी इंग्रजांच्या हस्तक्षेपासाठी अगदी आदर्श अशीच होती. 

    स. १७६७ मध्ये दमाजी गायकवाड मरण पावल्यावर त्याच्या पाठीमागे वारस म्हणून सयाजी गायकवाडच्या मार्फत फत्तेसिंहाने दावा दाखल केला तर गोविंदरावने आपणांस सरदारकी मिळावी यासाठी पुणे दरबारकडे अर्ज केला. वास्तविक दमाजीनंतर सयाजी हा गादीचा वारस असला तरी भोळसट / वेडसर स्वभावाने तो या पदास अयोग्य होता. तेव्हा त्याच्या ऐवजी फत्तेसिंह यास सरदारी देणे आवश्यक होते. परंतु खुद्द फत्तेसिंहास सयाजीच्या नावे सरदारी घेऊन कारभार हाती घेण्याची इच्छा असल्याने तसेच दमाजीच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा गोविंदराव हा आपल्या नावाने सरदारी घेण्यास उत्सुक असल्याने बऱ्याच विचारांती थोरल्या माधवरावाने सयाजीला गादीचा वारस ठरवून फत्तेसिंहास कारभार सोपवला. परंतु, हा निवाडा गोविंदरावास मान्य झाला नाही. त्याचे व फत्तेसिंहाचे तंटे सुरूच राहिले. दरम्यान माधवराव मरण पावल्यावर गारद्यांनी नारायणाची गठडी वळवली तर बारभाईंनी दादास पदच्युत करून सवाई माधवरावाच्या नावाने कारभार हाती घेतला. पेशवे कुटुंबाच्या या कलहात गायकवाड बंधूही खेचले गेले. फत्तेसिंह कारभाऱ्यांच्या पक्षास मिळाला तर गोविंदराव दादाच्या ! पैकी, पुण्याच्या पाठिंब्यावर फत्तेसिंहाने गोविंदरावाचा पराजय केला व नानाने गोविंदरावाकडील सेनाखासखेल पद काढून फत्तेसिंहास बहाल केले. या वेळी झालेल्या करारनुसार फत्तेसिंहाने १८ लक्ष पेशव्यास नजराणा म्हणून देण्याचे मान्य करून रोख पाच लक्षांचा भरणा केला. मात्र उर्वरीत रक्कम भरण्यास तो टाळाटाळ करु लागला. पेशव्यांचा अहमदाबादचा सरदार आपाजी गणेश बाकी रकमेचा भरणा लवकर करण्यासाठी तगादा लावू लागला तेव्हा उभयतांचे वैमनस्य आले. त्यातच पेशव्यांचे गुजरातमधील सरदार गणेश बेहरे व अंताजी नागेश हे आपाजी गणेशच्या मदतीस आल्याने फत्तेसिंह एकाकी पडला. गायकवाड दरबार आता पुणेकरांच्या कह्यात जाणार हे सर्वांनाच स्पष्ट दिसू लागले. गुजरातमध्ये अशी परिस्थिती असताना गॉडर्ड गुजरातमध्ये आला होता. त्यातच दादाचे  आगमन गुजरात प्रांती होताच त्याच्या हस्तकांना नवा जोम प्राप्त होऊन त्यांनी पुणेकर सरदारांविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले. फत्तेसिंह हा नानाच्या पक्षातील असल्याने त्याने दादाच्या सरदारांना पराभूत करण्यासाठी पुणेकर सरदारांना मदत करावी असे पुणे दरबारचे मत होते. परंतु नाना व दादाच्या कलहात गायकवाडांची गुजरात लुटली जात होती. त्याशिवाय गायकवाडांना आपल्या मूळ मालकाप्रमाणे --- दाभाड्यांप्रमाणेच पेशव्यांचा गुजरातमधील हस्तक्षेप कधीच मंजूर नव्हता. त्यामुळे फत्तेसिंहाने धरसोडीचे धोरण स्वीकारून आपला निभाव करण्याचे तंत्र स्वीकारले. परंतु, गॉडर्ड त्याला असा सोडणार नव्हता. त्याने दादास भर देऊन त्याच्या हस्तकांकरवी पुण्याच्या सरदारांचा उच्छेद चालवला. तसेच फत्तेसिंहाचा कारभारी गोपाळ गोविंद कामतेकर उर्फ गोंदबा यासही त्याने वश करून घेतले. परिणामी गायकवाडीत इंग्रजांचा हस्तक्षेप आता अनिवार्य असा बनला होता. खुद्द फत्तेसिंह इंग्रजांच्या कह्यात जाण्यास फारसा उत्सुक नव्हता. परंतु पेशव्यांचा गृहकलह, इंग्रजांचे आक्रमक धोरण आणि गायकवाड घराण्यातील भाऊबंदकी यांमुळे गायकवाडांची सत्ता धोक्यात येऊ लागल्याने आपली सरदारकी रक्षण्यासाठी फत्तेसिंह तऱ्हेने प्रयत्न करू लागला.  

    दादा व गॉडर्डच्या उद्योगास हाणून पडण्यासाठी त्याने नानाकडे मदत मागितली. नानाने इंग्रजांची चाल ओळखून स. १७७९ च्या दसऱ्यास शिंदे - होळकरांना गुजरातमध्ये पाठवण्याचे निश्चित केले व तसे फत्तेसिंहास कळवले देखील होते. परंतु, याच काळात नाना - महादजीचे मानपान नाटक रंगल्याने सुमारे तीन - चार महिन्याचा काळ व्यर्थ वाया गेला.  गॉडर्डने याच काळात प्रत्यक्ष लष्करी कारवाई करून फत्तेसिंहास गुडघ्यावर आणायचा प्रयत्न केला. पुण्याच्या मदतीकडे डोळे लावून वाट बघत बसलेल्या फत्तेसिंहाने अखेर ता. २६ जानेवारी  कुंधेला येथे गॉडर्ड सोबत तह केला. या तहानुसार (१) फत्तेसिंहाने तीन हजार स्वारांसह इंग्रजांना चालू युद्धात मदत करावी. (२) गुजरात प्रांताची पेशवे - गायकवाडांची वाटणी गैरसोयीची असल्याने महीच्या उत्तरेस पेशव्याच्या ताब्यात असलेला प्रदेश फत्तेसिंहास मिळावा यासाठी इंग्रज मदत करतील. त्याबदल्यात फत्तेसिंहाने तापीच्या दक्षिणेकडील गायकवाडांचे सुरत अठ्ठाविशीचे महाल इंग्रजांना द्यावेत. (३) पुणे दरबार - इंग्रजांचा तह होईल तेव्हा इंग्रजांनी फत्तेसिंहाच्या हितास जपावे. यासाठी भडोच व सिनोर हे परगणे इंग्रजांना कायमचे देण्यात यावे. या तहाची अंमलबजावणी अहमदाबाद फत्तेसिंहाच्या ताब्यात येताच होणार होती. या तहाच्या निमित्ताने गॉडर्डने सुरतजवळ सलग प्रदेशात इंग्रजांच्या सत्तेचा पाया सलग करून घेतला व तहाची अंमलबजावणी करण्यासाठी तो दि. १० फेब्रुवारी रोजी फत्तेसिंहाच्या सोबत अहमदाबादला येउन धडकला. पेशव्यांच्या सरदारांनी शहर लढवण्याची शर्थ केली पण गॉडर्डच्या तोफांनी ३ दिवसांत शहर शरण आले.  

 इकडे पुण्याच्या फौजा सोबत घेऊन शिंदे - होळकर मार्च आरंभी गुजरातमध्ये आले. फत्तेसिंह आयत्या वेळी दगा देईल या धास्तीने गॉडर्डने त्यास आपल्या सोबतच छावणीस ठेवले. पुढे इंग्रजांची शिंदे - होळकरांशी गुजरातमध्ये ठिकठिकाणी चकमक उडू लागली. पुणेकरांच्या फौजाही हिरीरीने झुंजू लागल्या. परंतु इंग्रजांच्या तोफांना तोडीस तोड देईल असा प्रभावी तोफखाना मराठी सरदारांजवळ नसल्याने त्यांनी निर्णायक संग्राम टाळला. इकडे शिंदे - होळकरांच्या उत्तरेतील प्रदेशांवर इंग्रजांचे हल्ले होऊ लागल्याने व पावसाळा तोंडावर आल्याने हे सरदार उत्तरेत निघून गेले. तेव्हा गॉडर्डला मोकळे रान मिळून त्याने थेट वसई - साष्टी पर्यंत मुसंडी मारून किनाऱ्यावरील मराठी राज्याची बळकट ठाणी आपल्या ताब्यात घेतली. पुढे आणखी काळ युद्ध चालून ता. २४ फेब्रुवारी १७८३ रोजी सालबाईच्या तहाने पहिले इंग्रज - मराठा युद्ध समाप्त झाले. यात गायकवाडांशी संबंधित दोन अटी होत्या. (१) फत्तेसिंह व सयाजी गायकवाड यांनी इंग्रजांस जो प्रदेश दिला असेल तो सर्व ज्याचा त्याला परत द्यावा (२) गायकवाडांकडे पूर्वी असलेला मुलुख कायम राहील. पूर्वीच्या करारान्वये त्याने पेशव्यांना खंडणी देऊन त्यांची नोकरी करावी. तसेच पूर्वीच्या सालांबद्दल पेशव्यांनी त्याच्याकडे खंडणी मागू नये. सालबाईच्या तहाने इंग्रजांचे गायकवाड संबंध संपुष्टात आल्याचा कित्येक इतिहासकारांचा दावा असला तरी सालबाईच्या तहातील इतर अटी पाहिल्यास गायकवाड - इंग्रज हे संबंध अबाधित राहिले होते. गायकवाडांना फिरून पेशव्यांच्या दावणीला बांधून देखील इंग्रज बडोदा दरबारचे मित्र बनून राहिले. 

                                                                                    ( क्रमशः )

३ टिप्पण्या:

कौस्तुभ गुरव,अंबरनाथ म्हणाले...

त्रिम्बकजी डेंगळेला अडकवण्यासाठी इंग्रजांनीच शास्त्र्याचा खून करून आळ त्रिम्बकजीवर घेतला असेल असे मला वाटते. ना.स. इनामदार ह्यांच्या मंत्रावेगळा मध्ये असे सुचित करण्यात आले आहे.

sanjay kshirsagar म्हणाले...

कौस्तुभ गुरव,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! इनामदारांची कादंबरी मी वाचली आहे. त्रिंबकजीला या खुनात गोवल्याचे सुचित करण्यात आले असले तरी मी अजून कोणत्याच निष्कर्षांस येऊन पोहोचलो नाही.

Unknown म्हणाले...

वीर सरदार त्रिंबकजी डेंगळे नक्कीच निर्दोष आहेत इंग्रजांनी भांडण लावून हे कारस्थान केलय