गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

भारत इतिहास संशोधन मंडळातील स्मरणीय क्षण ... !



                      
हाच तो ऐतिहासिक क्षण, ज्यावेळी भाऊंनी माइकच्या सहाय्याने मॉन्सनला मुकुंदरा खिंडीतून पळवून लावले !

                   
       ‘ महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठान ‘ तर्फे काल सायंकाळी पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची जेव्हा मला प्रथम माहिती मिळाली त्यावेळी एक प्रेक्षक म्हणून मी त्या समारंभास उपस्थित राहणार असल्याचे म.य.हो.गौ.प्र. चे एक उत्साही कार्यकर्ते व माझे मित्र श्री. सचिन शेंडगे यांना मी कळवले. खरेतर या कार्यक्रमास जाण्याचे निश्चित असे काही ठरलेलं नव्हतं. मनात आले तर जाऊ, नाहीतर आयत्यावेळी काहीतरी कारण सांगून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे टाळू असे मी मनाशी योजले होते. परंतु, माझ्या सर्व लबाड्यांची सचिनभाईला कल्पना असल्याने त्यांनी बेधडकपणे प्रस्तुत कार्यक्रमास श्री. संजय सोनवणी यांच्यासोबत मी देखील उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करून टाकले. हि बातमी फेसबुकवर वाचताच मला प्रथम धक्का बसला. या समारंभास एक प्रेक्षक म्हणून हजर राहणे वेगळे आणि मान्यवर लेखकाच्या सोबत उपस्थित राहणे हि एक वेगळी गोष्ट आहे. श्री. संजय सोनवणी उर्फ भाऊंच्या सोबत या कार्यक्रमास उपस्थित रहायचे म्हणजे भाषण ठोकायचे आणि अस्मादिकांची नेमकी याच बाबतीत असलेली हलाखी जगजाहीर आहे !

         सचिनभाईला मी माझी अडचण सांगितली पण त्यांनी या विषयी चार शब्द सांगून माझी थोडी हिंमत वाढवली. काही वेळ मी देखील विचार केला कि, कार्यक्रमास भाऊ असणार आहेत. त्याशिवाय श्री. प्रकाश खाडेकाका देखील आहेत. हि तशी सर्व घरची मंडळी. पुढे काय चूक घडली तर घेतील सांभाळून. नाहीतरी आपल्याकडे पद्धत आहे की, काही झाले कि देवावर भार घालायचा. तेव्हा म्हटले, आपल्याकडून काही चूक घडली तर आहेत भाऊ संभाळून घ्यायला. नाहीतरी खाडेकाकांनी म्हटलेलं आहेच , ‘ जगी नाही ज्यास कोणी, त्यास आहे संजय सोनवणी !’

         ठरल्याप्रमाणे सर्व तयारी करून काल सकाळी भल्या पहाटे ११.३० वाजता ठाण्याहून पुण्याच्या दिशेने रवाना झालो. दुपारी तीन – सव्वा तीनच्या सुमारास कात्रजजवळ सचिनभाईला सोबत घेऊन भा.इ.सं.मं. कडे प्रस्थान ठेवले. सुमारे अर्ध्या – पाउण तासात आम्ही ऐतिहासिक अशा भा.इ.सं.मं. च्या इमारतीजवळ पोहोचलो. ‘ दगडी बांधणीची ती इमारत पाहिल्यावर माझ्या मनात काही तरी अवर्णनीय अशा भाव – भावना उचंबळून आल्या ‘ अशा टाईपचे वाक्य वाचण्यास मिळेल अशी जर वाचकांची अपेक्षा असेल तर, दुर्दैवाने ( वाचकांच्या ) तसे काही घडले नाही. आणि ते स्वाभाविक आहे. तटस्थवृत्तीने किंवा निगरगट्टपणे लेखन करणाऱ्या माझ्यासारख्या पाषाणहृदयी मनात अशा कोमल भावना कशा बरे अवतरणार ?

      ज्या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या सभागृहात आम्ही गेलो. आतमध्ये जणू काही इतिहाससंशोधकांचा दरबारच भरलेला होता. सभागृहाच्या चारही भिंतींवर जवळपास सर्वच इतिहाससंशोधकांच्या प्रतिमा लावलेल्या होत्या. महाराष्ट्राचे व मराठी भाषेतील इतिहास लेखनाचे आचार्य म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या इतिहासाचार्य वि.का.राजवाड्यांचा फोटो सभागृहाच्या मध्यभागी लावलेला असून शेजारीच त्यांचा अर्धपुतळा देखील बसवलेला आहे. स्टेजवर ज्या खुर्च्या मांडल्या होत्या त्यातील एका खुर्चीवर { कार्यक्रम सुरु झाल्यावर नंतर माझ्या लक्षात आले कि, आयोजकांच्या पूर्वपरवानगी शिवाय स्टेजवर आधीच जाऊन बसणे चुकीचे होते. एकतर मी त्या ठिकाणी येणार हे आधी निश्चित केलेलं नव्हते आणि त्यातून मी भाषण देणार याची देखील कोणाला ( अगदी मलाही !) कल्पना नव्हती. याबद्दल खरेतर मी खाडेकाकांची माफी मागायला हवी होती, पण काल गडबडीत जमले नाही. तेव्हा आज या ठिकाणी मी त्यांची माफी मागतो.} बसल्यावर चटकन माझ्या लक्षात एक गोष्ट आली व ती म्हणजे सभागृहात शिरण्याचे जे प्रवेशद्वार आहे त्या दरवाजावर नरसोपंत केळकरांचा फोटो लावण्यात आलेला होता. एकप्रकारे केळकर आणि राजवाडे याचे फोटो समोरासमोर होते. ज्यांनी या दोघांचे साहित्य वाचले आहे त्यांना या दोघांचे फोटो समोरासमोर असण्यामागील खुबी जरूर समजेल !

       खुर्चीवर बसल्यावर सभागृहाच्या चारही भिंतींवर टांगण्यात आलेल्या थोर इतिहास संशोधकांच्या प्रतिमांकडे मी पाच – सहा वेळा पाहिले. का कोणास ठाऊक, पण मनात आले की ‘ आता माझे चार शब्द ऐकण्याचे भाग्य यांच्या कपाळी आल्यामुळे या सर्व महान विभूतींचे जीव टांगणीला तर लागले नसावेत ? ' आपल्या हातून घडणाऱ्या या पापाच्या कल्पनेनेच मनाचा थोडासा थरकाप उडाला. कार्यक्रमाची वेळ जसजशी जवळ येत चालली होती, तसतशी प्रेक्षकांची संख्याही वाढू लागली होती. सभागृहात प्रवेशणारे प्रत्येकी दोन पाय माझ्या मनावर दडपण आणू लागले होते.

        काही मिनिटांतच समारंभाचे आयोजक श्री. खाडेकाका, प्रमुख वक्ते श्री. संजय सोनवणी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शंकर सारडा यांचे आगमन झाले. हि सर्व मंडळी जेव्हा स्टेजवर येऊन आपापल्या आसनावर विराजमान झाली त्यावेळी मी एक दृष्टीक्षेप त्यांच्याकडे टाकला आणि मनात आले --- या तरुण तुर्कांच्या त्रिकुटात मीच तेवढा एक म्हातारा ! मी या विचारात होतो तोच समारंभाचे निवेदक श्री. गजेंद्रगडकर --- ( यांचे भारदस्त व्यक्तिमत्व पाहता खरोखरच हे कोणत्या तरी किल्ल्याचे किल्लेदार वाटतात. बहुतेक यांचे पूर्वज इतिहास प्रसिद्ध गजेंद्रगडचे गडकरी असावेत. अधिक संशोधन केले पाहिजे अशी मनाशी एक खुणगाठ बांधली. तशा अनेक खुणगाठी मनाशी बांधून विसरायच्या असतात हे सुज्ञांस सांगण्याची गरज नाही.) --- तर गजेंद्रगडकारांनी भाषणासाठी माझे नाव पुकारले आणि मी थोडा गडबडून गेलो. त्यानंतर पुढील काही मिनिटे ( घड्याळ लावायची आपली काय हिंमत झाली नाय ) बाजीप्रभू किंवा मुरारबाजीला देखील आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने मी खिंड ( कि माईक ?) लढवली. { माझ्या सत्यवचनी मना जरा गप्प बैस. संपूर्ण भाषण हे इतके असंबद्ध होते कि तशी स्पर्धा असती तर विजेता मीच ठरलो असतो याची जाणीव का करून देत आहेस ?} सबंध भाषणात मी काय बोलत होतो आणि काय बोललो हे मला आठवत नाही. खून करणाऱ्या व्यक्तीच्या अंगी जसा खून चढतो आणि आपण काय करतो हे त्यास समजत नाही त्याचप्रमाणे माझे देखील झाले होते. बोलतोय ... बोलतोय आपला  .... ( मध्येच समोरच्या दरवाज्यावर टांगण्यात आलेल्या नरसोपंतांनी देखील जांभई दिल्याचा मला भास झाला ) ..... ऐकणारे देखील काय ऐकत होते ते त्यांना माहित ! अधून – मधून आधारासाठी मला भाऊंकडे वळावे लागत होते. कारण, एक गोष्ट मनाशी मी पक्की ठरवली होती. इतिहासातील काही दाखले आठवो न आठवोत .... भाऊंचे गुणगान ( मस्का पॉलिश ) करण्याची एकही संधी सोडायची नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, खास याच कामासाठी पुण्यात आल्यावर दिसेल त्या मिठाईच्या दुकानातून व दूध डेअरीतून मिळेल तितके लोणी गोळा केले होते, ते सर्व भाऊंना लावून टाकले. त्यामुळेच आज ‘ पुण्यात लोण्याची तीव्र टंचाई ‘ असल्याची बातमी ‘ चूक बातमी डळमळीत मत ‘ अशा वृत्तवाहिनीवर झळकली.

     काही मिनिटांचे माझे भाषण ( त्याला भाषण म्हणणे म्हणजे ....... जाऊ द्या, कशाला चारचौघात आपलीच शोभा करून घ्यायची ?) संपुष्टात येताच थोडासा आगाऊपणा ( हा मी नेहमीच करतो ) करत श्री. गजेंद्रगडकरांचे काम मीच पार पाडत भाऊंना भाषणासाठी आमंत्रित केले. महाराज यशवंतराव होळकर यांनी दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धात ब्रिटीश सेनानी मॉन्सनचा जो सडकून पराभव केला त्याचे पुराव्यांच्या आधारे वर्णन करण्यास भाऊंनी आरंभ केला. या मोहिमेचे विविध टप्पे त्यांनी ज्याप्रकारे उलगडून दाखवले ते ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली व ती म्हणजे, दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाविषयी आजवर जे काही मराठी भाषेत लेखन झाले ते सर्व एकांगी आणि पराभूत मनोवृत्तीने करण्यात आले आहे. त्यामुळे असे झाले आहे कि, दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धात आम्ही फक्त मारचं खाल्ला अशीच सर्वसामान्य इतिहास वाचकांनी समजूत झाली आहे. यापासून मी देखील अलिप्त नाही ! भाऊंनी, काल आम्हांला दाखवून दिले की, आपण देखील इंग्रजांना अगदी पोटभरून खडे चारले आहेत. ( यशवंतरावांनी म्हणे घरी आलेल्या मॉन्सनचा इतका काही आदर सत्कार केला कि, खडे खाऊन – खाऊन त्याचे पोट अगदी तुडूंब भरले तरी यशवंतराव काही वाढायचे थांबेनात, तेव्हा संधी साधून मॉन्सन यशवंतरावांचा पाहुणचार चुकवून पळून गेला.)  

    जी पत्रे, जे संदर्भ पूर्वसुरींनी हाताळले तेच भाऊंनी अभ्यासले. पण जे इतरांना दिसले नाही ते भाऊंना उमगले ! वास्तविक आपले बरेचसे इतिहासकार काय करतात कि, अस्सल पत्रांचे दाखले तर ते देतातच पण त्याखाली जो निष्कर्ष काढायचा असतो तो स्वतःहून न काढता इंग्रज इतिहासकारांनी जे अनुमान बांधले आहे त्याचाच एकप्रकारे अनुवाद त्या ठिकाणी नमूद करतात. याचे एक इतिहासप्रसिद्ध उदाहरण म्हणजे, मल्हारराव होळकराने कुरा व काल्पीला इंग्रजांचा मोठा पराभव केला होता. या लढाईचे वर्णन ज्या पत्रात होते ते पत्र रियासतकारांनी आपल्या मराठी रियासतीत छापले आणि त्याखाली आपला निष्कर्ष देखील मांडला कि, मल्हाररावाचा इंग्रजांनी सडकून पराभव केला ! आता ते पत्र इतिहास न जाणणाऱ्या पण मराठी लिहिता – वाचता येणाऱ्या व्यक्तीने जरी वरवर नुसते चाळले तरी त्याच्या लक्षात येईल कि होळकराने इंग्रजांचा पराभव केला होता. पण हि अतिशय सामान्य बाब रियासतकारांच्या लक्षात आली नाही. पुढे त्याच पत्राच्या आधारे प्रसिद्ध इतिहास संशोधक श्री. कृ. वा. पुरंदरे यांनी वस्तुस्थिती नेमकी काय आहे जगाच्या समोर मांडले. पण अजूनही होळकरास इंग्रजांनी बडवले हेच लोकांच्या मनी रुजलेले आहे !      

        भाऊंच्या भाषणानंतर श्री. शंकर सारडा यांचे अध्यक्षीय भाषण पार पडले. श्री. सारडा हे समीक्षक म्हणून तसे देशभरात प्रसिद्ध आहेतच, पण ते एक कुशल वक्ते असल्याचे काल मला अनुभवास आले. समारंभाचा समारोप श्री. गजेंद्रगडकारांनी आपल्या मोजक्या पण समर्पक शब्दांत आणि खुमासदार शैलीत केला.

  या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला ‘ सह्याद्री बाणा ‘ या ब्लॉगचे तरुण लेखक श्री. प्रकाश पोळ यांच्या भेटीचा लाभ घेता आला. त्याचप्रमाणे महाविचारकर्त्या सांगलीकर ‘ महावीरांचे ‘ देखील दर्शन घडले. श्री. सांगलीकरांना पाहिल्यावर त्यांचे लेखन व व्यक्तिमत्व यात परस्परविरोध असल्याचे दिसून येते. त्यांचा स्वभाव  अतिशय शांत आणि सौम्य आहे पण त्यांचे लेखन ज्वलंत आहे ! याशिवाय भाऊंचे कट्टे समर्थक श्री. चंद्रशेखर भुजबळ यांच्याही प्रत्यक्ष भेटीचा योग जुळून आला. त्यांच्याशी हस्तांदोलन करताना खरोखरच ते ‘ भुजबळ ‘ असल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे श्री. अनिल वळसेअनिल सुरवासे यांच्याशीही भेट झाली. अनिल वळसे उर्फ अनिलभाऊंचा आणि माझा परिचय तसा फार जुना नसला तरी नवाही नाही. माझ्या पानिपतविषयक लेखनास ज्यांनी सक्रीय मदत केली अशांपैकी ते एक ! परंतु अनिल सुरवासे सोबत माझी पहिलीच मुलाकात होती. अतिशय भावनाप्रधान मराठी गडी !! केवळ याच शब्दांत सुरवासेंचे वर्णन करता येईल.

          कालच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ समीक्षक व लेखक श्री. शंकर सारडा यांच्याशी काही मिनिटे का होईना पण त्यांच्या शेजारी बसून संवाद साधता आला. खरेतर श्री. सारडांची भेट घडून येणे तसे महाकठीण कर्म ! पण भाऊंच्यामुळे कालचा योग जुळून आला. भाऊंच्या बद्दल मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. भाऊंची व माझी १० महिन्यांपूर्वी भेट झाली होती. नुकताच काही दिवसांपूर्वी त्यांचा ४९ वा वाढदिवस देखील होऊन गेला. परंतु त्यांचे कालचे जे रूप पाहिले, जो उत्साह पाहिला तो खरोखर तरुणाला देखील लाजवेल असा होता. ( हे वाचताना ‘ वयोवृद्ध ‘ भाऊंचा चेहरा कसा होईल याची मला जाणीव आहे.) दहा महीन्यांपूर्वी इतका जोम वा उत्साह मी त्यांच्यात पाहिला नव्हता. बहुतेक वाढत्या वयासोबत त्यांचे तारुण्य अधिकाधिक मुरत चाललेलं आहे. ( कालचा लोण्याचा साठा संपवला पाहिजे !)

     एकूण, कालचा पुण्याचा दौरा सुसंगती योगाच्या दृष्टीने कल्पनातीत यशस्वी झाला असेच मी म्हणणे !

     इतिहास संशोधक मंडळास दिलेल्या या भेटीने माझ्या काही प्रश्नांचे / शंकांचे निरसन झाले तर काही प्रश्न नव्याने उपस्थित झाले. इतिहास लेखन / संशोधन करणाऱ्या व्यक्तीस ऐतिहासिक स्थळांना ( ज्या विषयावर / घटनेवर ते लिहित आहेत त्या ) भेटी देणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. मात्र हे अनिवार्य आहे असे मला बिलकुल वाटत नाही. याचे कारण स्पष्ट व उघड आहे. पेशवेकाळात पुणे शहराने सुमारे अर्धशतकभर तत्कालीन हिंदुस्थानच्या राजकीय राजधानीचा मुकुट मिरवला. ज्या ठिकाणी आजची भा.इ.सं.मं. ची वास्तू आहे, ती सदाशिव पेठ पानिपत प्रख्यात सदाशिवराव पेशव्याच्या नावाने वसवण्यात आली आहे. त्या पेठेत आज अडीचशे वर्षांपूर्वीचे असे काय आहे कि ज्यामुळे इतिहास अभ्यासकास सदाशिवरावाची माहिती मिळेल ? भांबुर्ड्याच्या ज्या मैदानावर दुसऱ्या मल्हारराव होळकराचा लढता लढता मृत्यू झाला ते मैदान कुठे आहे ? पुण्याच्या आसमंतात तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धातील खडकी व येरवड्याच्या लढाया घडून आल्या. आज त्या लढायांचा इतिहास नव्याने लिहिण्यासाठी एखाद्याने त्या स्थळांना शोधून भेट देण्याचा प्रयत्न केला तर त्यास सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची भौगोलिक स्थिती नजरेस पडेल काय ? तात्पर्य, ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन तुमच्या इतिहास लेखनास फारमोठा फायदा होईलच असे नाही. त्यामुळे आपणांस ऐतिहासिक स्थळांना भेटी देता येत नाही तेव्हा आपण इतिहासविषयी लेखन करू नये असा न्यूनगंड बाळगण्याचे काही कारण नाही.   

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१३

ब्रिटीश अधिकाऱ्याचे मोगल बादशहास पत्र



ले. ३५                   श्री      श. १७२४ फा. व. १ बुधवार
No. 99                          इ. १८०३ मार्च ९

नकल

यादी कलमे बितपसील सु|| सलास मयातैन व अलफ
१ आम्ही येथे आलो हजरतीची व आपली भेट जाहाली येनेकरून बहुत सुख जाहालो आपण वडील वडिलाचे दर्शन करू श्रीहरी सर्व नीट करील हा निश्चये आहे हजरतीची व आपली प्रीत कृपा पहिलेपासून आहे ती आवीट आसावी देश काल वर्तमान येक प्रकार याजकरिता हाजरतीचे आपले आत्त:कर्णापासून आभेयवच्यन आसावे येविसी समक्ष खातरजमा हाजरतीनी व आपण करावी --------------------------------- कलम
१ हजरतीचे सरकारातून पूर्वीपासून हमेशा राव व पंतप्रधान याचे दौलतीची मदत होत गेली आहे सांप्रत इंग्रजाचे सरकारासी व आपल्याशी तहनामा सबब जे करणे ते आपण त्याचे विचारे करितात त्यांस इंग्रजासी बोलून कलमबंदी प्र|ओ  होत आसल्या करावे तपसील कलमबंदीची
१ प्रथम कलम हेच की श्रीमंत बाजीरावसाहेब दौलतीचे मालीक बहाल राहून होळकराचे वगैरे मुद्दे कलमबंदी प्र||` व्हावे सर्वविसीची बाहादारी हजरतीची व इंग्रजाची आसे --------------------------------------------- कलम
१ शिंदे याचे व होळकराचे वगैरे याचे नीट हजरतीनी व श्रीमंत बाजीरावसाहेब व इंग्रज यानी करून द्यावे गैर रीतीने कोणाकडून होऊं नये याचे उभयेतानी ध्यानास आणावे -------------------------------------------------- कलम
१ सदरहू कलमाप्रमाने बाजीरावसाहेब मान्ये नसल्यास आगळीक कोणाकडील हे आपणच उभयेतानी ध्यानास आणावे श्रीमंत आपासाहेबास पंतप्रधानाची वस्त्रे द्यावी आणी दौलतीचा क्रम चालवावा हेही होत नसल्यास बाजीरावसाहेब यानी मान्य केले आसेल त्याप्र||` त्याचे हातची यादी पाहून त्या प्र||` सरदाराची इतला आणऊन तुम्हासी बोलू बाजीरावसाहेबाचे जातीचा बंदोबस्त आपण सांगाल त्याप्र||` करून मातुश्री येशवदाबाईसाहेबास दत्तपुत्र द्यावा या प्रकर्णास शिंदे प्रतिकूल होऊन आमान्ये जाल्यास सर्वत्र व आपण इंग्रज येक होऊन त्यास सागोन औकविता येईल  -------------------------------------------------------------------------- कलम
१ हजरतीचे लक्षावर भोसले वगैरे सरदार इकडेच आनकूल होतील

व्यवस्था यादी
  १ हजरती पत्र येशवंतराव सुभेदार यास आले त्यात मजकूर
    १ दत देऊन वस्त्रे देऊ नयेत
    १ आम्ही दरम्यान येऊन तुमचा बंदोबस्त करून देऊ
    १ बाजीरावसाहेब याचे नावे सिका व पद पूर्ववतप्र||` चालवावे
     १ येशवंतराव याचे रफिक व शरीख आसतील त्याचा बंदोबस्त करून देऊ मुत्ता(क्ता)र कोनी पाठऊन द्यावा त्यावरून आमची रवानगी जाहाली आता आम्ही येथे बहुत दिवस राहाने न होता निरोप जाहाला प||` मतलबाच्या यादी पूर्वी येशवंतराव होळकर यानी पाठविल्या आहेत त्यात होते कोनते होत नाही कोनते हे स्पष्ट कळवावे त्याप्र||` श्रेमंत आमृतराव साहेबास लिहून पाठऊ आथवा आम्ही जान जाल्यास जाऊ याचे उत्तर येका दो घटकेत कळवावे -------------------------- कलम 
----
४ 
---
 ३ 
         येनेप्र||` खैरखाचे मनात आले ते लिहिले आहे आपण याचा विचार प्रौढ करून कोनाचा इतला घ्यावयाचा आसल्यास घेऊन उतरे कलवावी आम्ही सदरहू आन्वये पुण्यास लिहून पाठऊ तेथून उतरे येतील त्याप्र||` आम्ही कळऊ व आपली येतील ती आम्हास कळवावी जत्तो ठराव होणे तो होईल
A True Copy                                                         Henry Russell
                                                                                Secretary
ह्या पत्राच्या पाठीवर In No. 227 from the Rest at Hyderabad dated 9th March. Persion & English Tran. असा शेरा आहे.     


टीप :- संपादकांनी या पत्राच्या आधी पुढील माहिती नोंदवली आहे – Mr. Russell informs the Mughal Emperor about the various alternatives for a treaty among Shinde, Holkr, Bhosle, Bjirav II and the EIC
 

संदर्भ ग्रंथ :-
१)      भारत सरकारच्या केंद्रीय ( दिल्ली ) दफ्तरखान्यांतील ऐतिहासिक मराठी साधने :- संपादक - प्रा. गणेश हरी खरे, शंकर नारायण जोशी
 

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

अमृतराव पेशव्याचे मोरोबा फडणीस यास पत्र



ले. ३९                            श. १७२४ फा. व. १२

No. 178                         इ. १८०३ मार्च २०

                       नकल

        राजश्री मोरो बाबुराव स्वामी गोसावी यांसी     

    विनंती उपरी तुम्ही पत्र पाठविले ते प्रविष्ट जाहाले वाईस आल्यावर माधवराव आनत रास्ते याच्या येक दोन बैठका जाहाल्या त्यात वाकडेपणाचा आर्थ किमपी दिसत नाही याविशी संदेहे नसावा याचा आणुभवही येईल आम्ही येथून कूच करून राजश्री पंतप्रतिनिधी याची भेट घेऊन रास्ते सुधा मिरजेस जातो तेथे सर्वाचे ऐक्यता करून ठरेल आर्थ तो सेवेसी लेहून पाठऊ माने पठाण वगैरे फौजा आहेत त्याचा जागा जागा पटवर्धनरास्ते प्रतिनिधी याचे तालुकियात उपद्रव होतो त्यामुळे हे बाशा खातात यास्तव निक्षुण पत्रे होळकर याची यावी येविशी राजश्री बाळाजी विष्णु याणीही विनंती लिहिली आहे म्हणोन लिहिले ते विदित जाहाले म||रनिलेचेही पत्रावरून समजेल ऐशास रास्ते याची व तुमची बोलणी होऊन त्याचे सफाईचा मजकूर लिहिला त्यास च्यार सरदार दौलतीत आहेत हीच सरकारची दौलत आहे इंग्रजास चिरंजीव ----------- राजश्री बाबासाहेब ( दुसरा बाजीराव ) याणी कोकणांतील बंदर किनारा व गुजराथेतील माहाल लेहून देऊन पलटणे चाकरीस ठेविली याचा दौलतीत पाये शिरला मग पुढील स्थीत समजलोच आहे टोपीवाले काबूगार सर्वश्वी आकर्षण करितील शिंदे होळकर याचा तरी परस्परे कलह आहे त्याची याप्रसंगी समेटच आसावी त्यास चिरंजीवानी इंग्रजासी तह केला फरासीस सरदार शिंदे याचे पलटणांत राहू नयेत हा मजकूर राजश्री दौलतराव शिंदे यासी लेहून पाठविला आहे येविशी भोसले यासही पत्र पाठविले आहे आजपरियेत सर्वाचे येकदिली मुळे दौलतीचे संरक्षण जाहाले आता तमाशा पाहू लागल्यास सर्वाची स्थीत राहाणे कठीण आहे त्यापेक्षा फौजेची जूट बाधल्याने बहुत गुण आहेत मीरखानमाने वगैरे होळकराकडील सरदार मुलुक मारतात त्याचा बाशा खाऊन त्याणी आजुर्दे न राहावे आपल्या फौजा साऱ्या जमल्यानंतर त्यासही दबाऊन गोष्ट सांगावयासी येईल चिंता नाही पेशजी प्रतिनिधीरास्ते पटवर्धनविंचुरकर यासी होळकराची खातरजमेची पत्रे गेलीच आहेत तुम्हाकडील लाखोटा होळकर यास आला तो त्याजकडे पाठविले आहे व सरकारातूनहि त्यास लिहिले आहे की मसलतीचे प्रसंगी आपसात फूट न पडावी मीरखानमानेनागो जिवाजी यास पत्रे पाठऊन बोलाऊन घेणे त्याचा उपद्रव प्रतिनिधी रास्ते पटवर्धन याच्या मुलुकास न लागे ते करणे याप्रमाणे लिहिले गेले आहे तेथून उतर येईल ते तुम्हास लेहून पाठविले जाईल. बाबाकडील पत्रे आताच आली सारांष इंग्रज बाजीरावसाहेब येक जाहाले नवाबाचे बोलणे आहे की रास्ते पटवर्धन आदिकरून सर्वाचे येकमत जाले आसता याची सला आम्ही आतून सांगू नाहीतर तुमचे मुद्दे काये आहे ते सांगावे तोडजोड पाडून देऊ त्याजवरून बाबानी याद करून त्याजवळ दिल्ही त्याची नकल इकडे पाठविली आहे ( http://peshwekalinitihas.blogspot.in/2013/08/blog-post_450.html ) ती पाहिली त्यात आम्हास दाहा लक्षाचा सरंजाम द्यावा दोन किले द्यावे नानास दतक देऊन पूर्ववत चालवावे आपण स्नानसंध्या करून स्वस्थ राहावे इतकेच आहे फडक्याचा सरंजाम व आसाम्या पूर्ववत असाव्या याप्रमाणे आहे असो काये घडेल खरे त्यास होळकर वगैरे संमज आम्हास टाकून गेले फतेसिंग माने आमचे लक्षात आहेत पठाण माघारे बोलाविले आहेत येशवंतराव घोडनदीवर राजापूर आहे तेथे आहे आम्हाजवळ ठराऊन गेले आहेत की चांदवडास जातो आपण वाईस पटवर्धन रास्ते आदिकरून समेट करावी नाहीतरी फतेसिंग माने व आपण गारदौडचे सुमारे आसावे पुढे मी आहे याप्रमाणे ठराऊन गेले आता सर्वानी दौलतीकडे पाहावे नाहीतरी दौलत इंग्रजाचे घरी गेली त्यास सर्वानी येकरूप होऊन आम्ही व ते सारे येक होऊन मग सर्वाचे विचारे मसलत करावयासी येईल नाहीच तरी मग आम्हास कसेही आसेल तरी होळकरास सोडून परिणाम नाही तरी येविसीचे ते ल्याहावे आम्ही वर्षप्रतिपदेस कूच करितो खर्चाची वोढ बहुत आहे तुमचे कार्य ते करावे पठाण प्रांतात दंगा करितात त्यामुळे बाशा खातात हे तरी खरे परंतु पठाण कोणाचे आळ्यात आहेत नाहीत याची माहीतगारी आहेच त्यात मनाईची पत्रे येशवंतराव याची पाठविली आहेत परंतु सर्वांनी मजकडे पाहून येकत्र होऊन दौलत सांभाळावी नाही तरी सर्वांनी आम्हासुध आपला बच्याव तरी करून घ्यावा जाणिजे छ २५ जिल्काद हे विनंती



( हे पत्र ता. १ ला निघून ता. २४ एप्रीलला पोचले असे इंग्रजीत लिहिले आहे. ) 
      

टीप :- उपरोक्त पत्र कोणी लिहिले याचा खुलासा पत्राच्या संपादकांनी केला नाही परंतु पत्रातील मजकूर व घटनाक्रम पाहता या पत्राचा लेखक अमृतराव पेशवा असल्याचे अनुमान बांधता येते.  यासाठी आणखी एक प्रमाण असे की, दु. बाजीराव पेशव्याचा ‘ चिरंजीव ‘ म्हणून उल्लेख करणारा वयस्कर असा पुरुष त्यावेळी भट कुटुंबात इतर कोणी नव्हता. तसेच दुसऱ्या बाजीरावाचे टोपण / घरगुती नाव बाबासाहेब असे होते.  



संदर्भ ग्रंथ :-
१)      भारत सरकारच्या केंद्रीय ( दिल्ली ) दफ्तरखान्यांतील ऐतिहासिक मराठी साधने :- संपादक - प्रा. गणेश हरी खरे, शंकर नारायण जोशी