शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

प्रकरण १५) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी




 
    पुरंदरचा तह म्हटलं तर जुलमाचा रामराम होता किंवा मिर्झाच्या दिखाऊ मुत्सद्देगिरीचा विजय ! त्यापासून फारतर मोगलांचा तात्कालिक, क्षणिक फायदा झाला. स्वतः औरंग या तहास नाखूष असून मंजुरीकरता त्याने बरेच आढेवेढे घेतल्याचा उल्लेख पगडी करतात. शिवाजीबरोबर तह घडत असतानाच विजापूर स्वारीची तयारी करण्यात आली. स. १६६५ च्या नोव्हेंबर मध्ये शिवाजी - मोगलांच्या संयुक्त फौजा विजापुरकरांवर चालून गेल्या.

    तत्पूर्वी मोहिमेच्या खर्चासाठी शिवाजीने एक लक्ष होन वार्षिक उत्पन्नाच्या खालसा निजामशाहीतील महालाची मागणी केली. स. १६३६ मधील निजामशाही महालांचा वसूल काय होता व त्या तुलनेने स. १६६५ मधील त्या प्रदेशाचा वसूल व चलनाची घटती - वाढती किंमत या गोष्टी लक्षात घेत मिर्झाने त्यांस दोन लाख रुपये खर्चासाठी देत शिवाजीच्या ताब्यातील प्रदेश वजा करून उर्वरित निजामशाही प्रदेशाची बादशाही खात्यातून वहिवाट होईल तेव्हा मग एक लक्ष होनाचा मुलूख देण्याचे मान्य केले. शिवाय शिवाजीने बादशहाला भरण्याच्या वार्षिक खंडणीचा मुद्दाही असाच काहीसा अधांतरी राहिला. शिवाजीने विजापुरी कोकण व बालाघाटातील मिळून नऊ लक्ष उत्पन्नाच्या प्रांताच्या बदल्यात ४० लक्ष होन वार्षिक हप्तेबंदीने देण्याचे मान्य केले होते. परंतु औरंगने त्याची फक्त विजापुरी कोकणची मागणी मान्य करत बालाघाटातील प्रदेशासंबंधी अप्रत्यक्ष नकार दिला. त्यातही त्याने विजापुरी कोकणची सनद दिली नाही. फक्त आश्वासन देण्यात आले व शिवाजी समर्थ असेल तर त्याने विजापुरी बालाघाट घ्यावा असेही कळवण्यात आले.

    शिवाजी - औरंग यांच्यात नुकत्याच बनलेल्या तहातील अटींचा आपापल्या फायद्यानुसार अर्थ लावण्याची स्पर्धा चालली असता जयसिंगाने ४० लाखांच्या खंडणीचा विषय काढत त्याचा निश्चित पहिला हप्ता मिळत नसल्यास संभाजीला मनसबीखातर मिळणारा मोबदला दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तेव्हा शिवाजीने असा बूट काढला कि, बादशहा त्यांस जी जमीन देणार आहे व जिचे आज उत्पन्न जरी निश्चित नसले तरी संभाजीच्या मनसबीला लागणारे सैन्य तो पुरवील मात्र त्या सैन्याच्या पगाराची रक्कम खंडणीच्या हप्त्यादाखल समजावी. मिर्झाने या सूचनेला संमती दर्शवली व शिवाजीने आपला कार्यभाग साधून घेतला.

    संभाजीच्या मनसबीत जर मोगली सैन्य असले असते तर त्याच्या वतीने काम पाहणाऱ्या नेताजी पालकरने जो काही प्रदेश ताब्यात घेतला असता त्यावर मोगलांचा अधिकार बनत होता. परंतु खंडणी व लष्करी खर्चाच्या कारणास्तव मिर्झाने शिवाजीची सूचना मान्य केल्याने संभाजीच्या नावे आता शिवाजीचे सैन्य लढणार असून जिंकलेला प्रदेश संभाजीच्या --- म्हणजेच शिवाजीच्या ताब्यात राहणार असून तो सोडणे न सोडणे हे त्याच्या मर्जीवर अवलंबून असणार होते.

    विजापुरी स्वारीकरता जयसिंग - शिवाजीत वाटाघाट सुरु असतानाच आदिलशहाने प्रतिकाराची तयारी करतानाच शिवाजीला आपल्या पक्षास वळवून घेण्यासाठी खटपट आरंभली. त्यानुसार शिवाजीला विजापूरकरांच्या प्रदेशाला जिंकून घेत मोगलांच्या मान्यतेची आवश्यकता होती, गरज होती ; तोच मुलूख विजापुरकरांनी त्यांस देऊ केला परंतु त्याने आपल्या पुतण्याला विजापुरी चाकरीस पाठवावे अशी अट घातली. शिवाजीने यांस नकार देत विजापूरकरांनी चालवलेल्या  वाटाघाटींची जयसिंगास कल्पना दिली व त्याने हा वृत्तांत बादशहास कळवला. एकूण दख्खनचे राजकारण शिवजी सोबतच्या तहाने अधिकाधिक गुंतागुंतीचे बनत चालल्याचे दिसून येते.

    शिवाजीला फोडण्याचा प्रयत्न करत असतानाच आदिलने कुतुबच्या मैत्रीस कौल लावला व गोवळकोंडेकरानेही नेहमीप्रमाणे आपल्या शेजाऱ्याची उपेक्षा केली नाही. नेकनामखानासोबत बारा हजार स्वार व काही हजार पायदळ त्याने विजापुरास रवाना केले. तोपर्यंत इकडे विजापूर आघाडीवर युद्ध पेटलं होतं.

    डिसेंबर १६६५ मध्ये शिवाजी - जयसिंग फलटण, ताथवड, खटाव ताब्यात घेत दि. १८ डिसेंबर १६६५ रोजी मंगळवेढ्यास आले. तिथे विजापुरी सैन्याशी त्यांचा सामना झाला. सर्जाखान, खवासखान, व्यंकोजी, घोरपडे वगैरेंनी शिकस्त करूनही त्यांना पराभूत होऊन मागे हटावे लागले. तेव्हा जवळपासचा मुलूख ताराज करत, पाणवठे विषारी करत आदिलशाही सेना मागे सरली. त्यांचा पाठलाग कारत मोगलही विजापुरास आले त्यावेळी जयसिंगास आदिलशहाने आपल्या बचावाची केलेली भक्कम व्यवस्था दिसून आली. किल्ल्याबाहेरील विजापुरी सैन्याचा प्रतिकार करत राजधानीचे स्थळ जिंकण्याचे सामर्थ्य जयसिंगाकडे नव्हते. त्याची फौज व तोफखाना यासाठी बिलकुल पुरेसा नव्हता तरी आहे त्या सामर्थ्यानिशी त्याने डाव मांडला. परंतु सर्जाखानाने विजापुरी बचावाची सूत्रे हाती घेत मोगल सैन्याला सपाटून मार दिला. शिवाजी, दिलेर व जयसिंगासारखे कसलेले मुत्सद्दी व सेनानी त्याच्यापुढे हतबल ठरले. इतक्यात गोवळकोंड्याची फौज विजापूरच्या मदतीस येत असल्याचे कळताच इथे राहून सर्वनाश पत्करण्यापेक्षा माघार बरी म्हणत जयसिंग परतला. परंतु याचा अर्थ असा नव्हे कि त्याने विजापूरचा नाद सोडला.

     यावेळी शिवाजी - जयसिंगाने विजापूरविरुद्ध दोन आघाड्यांवर चढाई करण्याचे ठरवले व त्यानुसार शिवाजी पन्हाळा जिंकून घेण्यासाठी त्या प्रांती रवाना झाला. परंतु दि. १६ जानेवारी १६६६ रोजी मध्यरात्री / पहाटेच्या सुमारास केलेल्या हल्ल्यात शिवाजीला जबर प्राणहानी सोसून पन्हाळ्यावरून माघार घेणे भाग पडले व तो विशाळगडी निघून गेला. यानंतर काही दिवसांनी त्याचा मुख्य सेनापती नेताजी पालकर विजापूरच्या नोकरीत दाखल झाला. नेताजी विजापुरकरांना सामील झाल्याने त्यांचे बळ वाढले तर मिर्झाला मोठा हादरा बसला. कारण नेताजीने मोगली सैन्यावर छाप्यांचे सत्र तर आरंभलेच पण कुतुब, आदिल व नेताजी या त्रिकुटाला शिवाजीही जाऊन सामील होतो कि काय अशीही भीती वाटून गेली. अशा स्थितीत जयसिंगाने नेताजीला आपल्याकडे वळवून घेण्याची शिकस्त करत अडतीस हजार होन बक्षीस, जहागीर व पाच हजारी मनसब देऊ केली. त्याबरोबर नेताजीने पगडी बदलली. ( दि. २० मार्च १६६६ )

    नेताजी पालकर मोगली गोटात येण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडून आल्या. आदिलशहाने शिवाजीच्या ताब्यातील दक्षिण कोकणावर चढाई आरंभली व कुडाळ, वेंगुर्ले फिरून ताब्यात घेतले. मात्र राजापूर - खारेपाटण ह्या प्रदेशात त्याने आक्रमण केले नाही. आदिल - शिवाजी यांच्या दक्षिण कोकणातील झुंजी संहारकही होया व दिखाऊ देखील. आदिलने आपल्या स्वार्थापुरता शिवाजीच्या राज्याचा लचका तोडून दक्षिण कोकणवर पुन्हा रुस्तमेजमानची नियुक्ती केली. जेणेकरून त्या बाजूने आदिल व शिवाजी या उभयतांचेही परस्परांच्या हल्ल्यापासून एक प्रकारे संरक्षणच झाले. कारण रुस्तम - शिवाजी यांची मैत्री तशी जगजाहीर होती. हा सर्व प्रकार शिवाजीच्या हजेरीत व नंतर गैरहजेरीत घडून आला.

     आता आपण शिवाजीच्या आग्रा भेटीचा वृत्तांत पाहू. स. १६६६ च्या जानेवारीत शहाजहानचा आजारपणात मृत्यू झाला व औरंग आता खऱ्या अर्थाने हिंदुस्थानचा सार्वभौम बादशहा बनला. बापाच्या मृत्यूनंतर औरंग सुमारे महिनाभराने आगऱ्यास आला व तेथेच त्याचा काही काळ मुक्काम झाला. याच दरम्यान शिवाजीची आग्रा भेट व पलायन हे प्रकार घडून आले.

    पुरंदर तहाने शिवाजीला बांधून घेतल्यावर औरंगच्या आज्ञेनुसार मिर्झाने विजापूर मोहीम हाती घेतली. परंतु त्यात सलामीलाच पराभवाचे फटके बसल्याने व आदिल - कुतुब - नेताजी असे त्रिकुट जमा झाल्याने चिंतीत झालेल्या मिर्झाने शिवाजीला दख्खन मधून बाहेर काढण्याचे योजले. कारण सध्याच्या राजकरणात जर शिवाजीचा बेत फिरला व तो आदिलच्या पक्षास मिळाला तर मोगलांचा पराभव निश्चित असल्याचे मिर्झा जाणून होता. तेव्हा हर प्रयत्ने शिवाजीला उत्तरेत --- बादशहाच्या भेटीस पाठवण्याचे त्याने मनाशी निश्चित केले व त्यानुसार अशा भेटीसाठी तो दोघांचेही --- औरंग व शिवाजीचे मन वळवू लागला. शिवाजीने आपल्या भेटीस उत्तरेत यावे अशी औरंगची बिलकुल इच्छा नव्हती. त्याचप्रमाणे शिवाजीलाही अशा भेटीची आवश्यकता वाटत नव्हती. औरंगचे धोरण तो चांगलेच जाणून होता व अशा भेटीने पदरात फार काही पडण्याची आशाही नसल्याने त्याने शक्य तितके भेटीस जायचं टाळलं परंतु अखेर मिर्झाने अशी काही जादूची कांडी फिरवली कि, औरंग - शिवाजी परस्परांच्या भेटीस तयार झाले. दुदैवाने या प्रकरणाचे तपशील सध्या तरी अज्ञात असल्याने शिवाजीच्या आग्रा भेटीचे प्रयोजन सांगणे शक्य नाही. परंतु एक आहे, आपल्या गैरहजेरीत राज्याचा कारभार व्यवस्थित चालावा अशी शिवाजीने योजना केली. त्याचप्रमाणे शिवाजीच्या जीवास अपाय होणार नाही अशी व्यक्तिगत हमी मिर्झा राजाने घेतलेली होती. त्यानुसार दि. ५ मार्च १६६६ रोजी शिवाजीने संभाजी व आपल्या निवडक अधिकारी - सैन्यासह आगऱ्यास प्रयाण केले.

    शिवाजी हा स्वतंत्र संस्थानिक म्हणून बादशहाच्या भेटीस येत असल्याने त्याप्रमाणेच त्याचा मान राखण्याची ताकीद औरंगने आपल्या अधिकाऱ्यांना दिली होती. त्याचप्रमाणे त्यांस प्रवासखर्चाकरता एक लक्ष होन शाही खजिन्यातून मंजूर केले असून ५०० स्वारांचा मनसबदार गाझीबेग हा आगऱ्यापर्यंत शिवाजीच्या सोबत असणार होता. शिवाजी सोबत संभाजीच्या आग्रा भेटीविषयी अनेक तर्क इतिहासकारांनी केले असले तरी माझ्या मते, संभाजी हा मोगल मनसबदार असल्याने व अनायासे शिवाजी आगऱ्याला बादशहाच्या भेटीस्तव जाणार असल्याने नव्या मनसबदाराने बादशहाचे दर्शन / भेट घेणे तसे अप्रस्तुत ठरणार नव्हते.

    मिर्झाच्या योजनेप्रमाणे दि. १२ मे १६६६ रोजी चांद्रमासी कालगणनेनुसार औरंगचा पन्नासावा वाढदिवस असल्याने त्या दिवशी भरणाऱ्या दिवाण - इ - आमच्या दरबारात शिवाजीने हजर व्हायचे होते. अर्थात औरंगचीही यांस संमती होती. त्यानुसार सर्व बेत आखण्यात आला खरा परंतु भेट सुरळीत व्हावी अशी बहुधा नियतीचीच इच्छा नसावी.

    मिर्झा राजाने आगऱ्यातील शिवाजीच्या रक्षणाचा जिम्मा आपल्या मुलावर --- रामसिंगावर सोपवला होता. शिवाजीच्या आग्रा भेटीचा वृत्तांत व त्यातील रामसिंगाची वर्तणूक पाहता अशा खोल राजकारणात मुरलेल्या राजकारणी व्यक्तींच्या सोबत वागण्यास रामसिंग तितकासा लायक नव्हता. बापाने आपल्या काय राजकारण खेळलंय, त्याची इच्छा काय ; औरंगचा बेत काय व हे सर्व लक्षात घेऊन शिवाजीसोबत वर्तावे कसे याचा त्याला बिलकुल पोच दिसत नाही.

    दि. ११ मे रोजी शिवाजी आगऱ्यास आला त्यावेळी त्यांस सामोरे जाऊन मुक्कामाला नेण्याची जबाबदारी औरंगने फिदाईखान व रामसिंगावर सोपवली होती. परंतु प्रत्यक्षात यावेळी त्यांस कोणीच सामोरं न आल्याने त्याने आपला तळ मुलूकचंदाच्या धर्मशाळेत ठोकला. रामसिंगला शिवाजीच्या आगमनाची बातमी उशिरा मिळाली तेव्हा त्याने आपला मुन्शी गिरधरलाल यांस त्याच्या भेटीस पाठवून दुसऱ्या दिवशी दरबारात होणाऱ्या बादशाही समारंभाची व भेटीची कल्पना दिली. यावेळी शाही रिवाजानुसार दरबारातील निवडक उमरावांपैकी एकाला आठवड्यातून संपूर्ण एक दिवस बादशाही निवासस्थानाच्या रक्षणाचे काम बघावे लागत असून दि. ११ मे रोजी सकाळीच रामसिंगाची या कामी वर्णी लागल्याने तो दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत --- किमान दहा वाजेपर्यंत या कामातून मुक्त होऊ शकत नव्हता. यामुळे पुढील घटनाक्रमास अनिष्ट वळण प्राप्त झाले.

    दि. १२ मे रोजी सकाळी दिवाण - इ - आमचा दरबार भरण्याचा समय नजीक आला. पहाऱ्याची वेळ संपली नसल्याने रामसिंगाने गिरधरलालला पुन्हा एकदा शिवाजीकडे पाठवून त्यांस आपल्या मुक्कामच्या स्थळी --- फिरोजबागेत आणण्याची सूचना केली. यावेळी, दरबार भरण्यापूर्वी आपली पहाऱ्यातून सुटका होईपर्यंत शिवाजी फिरोजबागेत येईल व आपण त्यांस घेऊन दरबारात हजर राहू अशी रामसिंगाची कल्पना असावी. परंतु नियोजनशून्यता, गलथानपणा यांचा फटका यावेळी सर्वांनाच बसला !

    रामसिंगची पहाऱ्याच्या कामातून सुटका होऊन तो मुखलीसखानासह आपल्या मुक्कामाकडे निघाला तरी शिवाजी अजून निम्म्या वाटेत नव्हता. मग त्याने माणसं पाठवून शिवाजीला प्रवासाचा मार्ग बदलवला व नूरगंज बागेजवळ या दोघांची भेट घडून आली. तोपर्यंत दिवाण - इ - आमचा दरबार उलगडून दिवाण - इ - खासचा दरबार सुरु झाला होता, वा होणार होता. त्यामुळे जलदी करून शिवाजीला दिवाण - इ - खासच्या दरबारात हजर करण्याची रामसिंगाने निकड केली. परंतु शिवाजीसह तो दरबाराच्या स्थळी पोहोचेपर्यंत दिवाण - इ - खासचा दरबारही समाप्त होऊन औरंगजेब घुसलखान्यात --- खलबतखान्यात निवडक मनसबदारांच्या दरबारात आसनस्थ झाला होता.
 
    रामसिंगाने शिवाजी भेटीस आल्याची बातमी आत पाठवून प्रवेशाची परवानगी मागितली असता बादशहाने बक्षी असदखानास शिवाजीला घेऊन येण्याची आज्ञा केली. त्यानुसार असदखान शिवाजीला घेऊन बादशहासमोर हजर झाला. तेथे रिवाजाप्रमाणे शिवाजी व संभाजीने नजर व निसार म्हणून काही रुपये अर्पण केले. त्यानंतर शिवाजीला राजा रायसिंगाच्या पुढे ताहीरखानाच्या जागेवर उभे करण्यात आले, जो पंधरवड्यापूर्वी पंच हजारी मनसबदार बनला होता. त्यानंतर समारंभाच्या रिवाजानुसार सर्वांना विडे देण्यात आले. त्यात शिवाजीला अपवाद करण्यात आले नाही. नंतर मानाची वस्त्रे शहजादे, वजीर जाफरखान व जसवंतसिंगास देण्यात आली. शिवाजीला नाही. यानंतर मग शिवाजीचा राग उफाळून आला व त्याने बादशहाला उद्देशून काही विधानं केली. औरंगकडे पाठ फिरवून तो दरबारातल्या एका बाजूला गेला. तिथे त्याची समजूत घालण्याकरता रामसिंग गेला असता, त्याने त्यासही धुडकावून लावले. घडत्या प्रसंगाकडे सर्वांप्रमाणेच औरंगचेही लक्ष गेले. त्याने रामसिंगला जवळ बोलावून शिवाजीच्या नाराजीचे कारण विचारत मुल्तफितखान, मुखलीसखान व आकीलखान यांना आज्ञा केली कि, शिवाजीची समजूत काढून त्यांस मानाची वस्त्रे देऊन भेटीस आणा. परंतु शिवाजी बधला नाही. सरदारांनी घडला वृत्तांत बादशहास सांगताच औरंगने रामसिंगला शिवाजीस घेऊन मुक्कामाच्या जागी नेण्याची आज्ञा केली.

    शिवाजी - औरंगची हि पहिली व अखेरची भेट. या भेटीची असंख्य वर्णनं सर्वच शिवचरित्रांत कमी - जास्त फरकाने आल्याने भेटीचा फक्त सारांश दिला आहे. औरंग - शिवाजीच्या भेटीचे जे काही तपशील मला उपलब्ध झाले त्यावरून असे दिसून येते कि, औरंगने शिवाजीला भेटीस बोलावून मुद्दाम त्याचा अपमान केला, यात तथ्य नाही. आधी ठरल्याप्रमाणे शिवाजी सोबत त्याची भेट दिवाण - इ - आम मध्ये होणार होती. परंतु रामसिंगाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हि भेट दिवाण - इ - आम मध्ये न होता घुसलखान्यात झाली. घुसलखाना म्हणजे एकांताची, खलबतखान्याची जागा वा स्नानगृह. यास्थळी हा शब्द स्नानगृह या अर्थाने योजला नाही. जर तसे असते तर अनोळखी व्यक्तीस तिथे प्रवेशच मिळाला नसता किंवा मग वर्णनच वेगळे आले असते. तेव्हा हे स्थळ खलबतखानाच समजले पाहिजे व यास्थळी फक्त निवडक लोकांनाच प्रवेश मिळायचा हे लक्षात घेता पूर्वनियोजित नसतानाही औरंगने शिवाजीस आत येण्याचा परवाना दिला व त्यांस आणण्यासाठी बक्षीला रवाना केले यावरून शिवाजीचा उपमर्द करण्याचे त्याच्या मनी होते असे म्हणवत नाही.  तीच बाब शिवाजीला रांगेत उभं करण्याची. मुळात शिवाजी मोगलांचा मनसबदारच नव्हता. त्यामुळे हा प्रश्नही तसाच निकाली निघतो. जर तो मोगली चाकर असता व त्यांस चुकीच्या स्थळी उभे करण्यात आले असते अथवा बादशहा समोर उभं केल्यावर त्यांस मनसबदारी दिल्याचे जाहीर केले असते तर गोष्ट वेगळी. परंतु शिवाजीने मोगलांचे स्वामित्व मान्य केल्याचे कुठेच नमूद नसल्याने यावर काथ्याकुट करणे चुकीचे आहे.

    मानाच्या विड्यांचे वाटप झाले असता त्यात सर्वांचाच समावेश झाला परंतु खिलत वाटपा वेळेस फक्त शहजादे, वजीर व जसवंतसिंग यांनाच त्याचा लाभ झाल्याचा उल्लेख इतिहासकार करतात. ज्याच्या पुढेशिवाजीला उभे करण्यात आले त्या राजसिंग वा रामसिंगास खिलत मिळाल्याचा उल्लेख नाही. यावरून हा बहुमान प्रथेप्रमाणे ठराविक व्यक्तींकरताच असावा असे अनुमान निघते. यानंतर शिवाजीने तत्कालीन दरबारी रिवाजाविरुद्ध रागाने बडबड केली, बादशहास पाठ दाखवली वगैरे वगैरे. तरीही औरंगने आपले अधिकारी पाठवून त्याची समजूत काढण्याचा यत्न करून पाहिला परंतु काम झाले नाही, तेव्हा त्यांस रजा दिली.

    घटनाक्रम पाहता औरंगच्या हातून विशेष काही अपराध घडल्याचे दिसून येत नाही. मिर्झाने शिवाजीची बादशाही भेटीबाबत काय कल्पना करून दिली होती हे मला समजू शकले नाही पण शिवाजीचा अपेक्षाभंग झाल्यामुळेच त्याने दरबारी प्रथेविरुद्ध आचरण केले. दोष इथे द्यायचा कोणाला ? शिवाजी स्वतंत्र सत्ताधीश असला तरी औरंग सार्वभौम बादशहा असल्याने बरोबरीच्या नात्याने भेट केवळ अशक्य. तसेच नियमाबाहेर जाऊन शिवाजीचा मान सन्मान करणेही शक्य नाही. खुद्द शिवाजीनेही पूर्वनियोजित नसता राजगड वा रायगडच्या खलबतखान्यात इतरांस प्रवेश दिला असता का, याचाही विचार व्हावा ! असो.    

     शिवाजी - औरंग वादाची व शिवाजीने बादशहाच्या तसेच बादशहाने शिवाजीच्या केलेल्या अपमानाची, उपेक्षेची चर्चा सर्वदूर होण्यास वेळ लागला नाही. कर्णोपकर्णी बातमी सर्वत्र झाली. बादशहाने मात्र संध्याकाळी सिद्दी फौलादखान व पर्तीतराय हरकारा यांस रामसिंगाकडे पाठवून शिवाजीची समजूत घालण्यास सांगितले. रामसिंगाने याबाबतीत शक्य तितके प्रयत्न आधीच केले होते. त्यात बादशाही आज्ञेची भर पडली. इकडे शिवाजीलाही वास्तव स्थितीची जाणीव झाली. त्याने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संभाजीला रामसिंगाबरोबर दरबारी पाठवण्याचे निश्चित केले. खरे पाहता हीच औरंग - शिवाजीच्या राज्कार्ण्जी शह - प्रतिशहांची सुरवात होती. शिवाजीला आपण कुठे आहोत व आपल्या हातून काय घडलंय याची जाणीव झाली होती. दरबारी दंग्यात एखाद्या संस्थानिकाचा वा सेवकाचा खून पडणे हि त्यावेळी सामान्य बाब असल्याने त्याने दरबारात जायचं टाळणे स्वाभाविक होतं. संभाजी हा अल्पवयीन तसेच मोगल मनसबदार असल्याने त्याच्या बाबतीत औरंग कसा वागतोय यावर शिवाजीचे पुढील डावपेच अवलंबून होते.

    ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी --- दि. १३ मे रोजी सायंकाळच्या दरबारात संभाजी हजर झाला. औरंगने त्यांस एक शिरपाव, हिरेजडीत कट्यार व मोत्यांचा कंठा दिला. तत्पूर्वी सकाळच्या दरबारात त्याने रामसिंगास शिवाजीच्या दरबार आगमनाविषयी विचारले असता रामसिंगाने त्यांस ताप आल्याचे सांगितले.

    नंतर चौदा तारखेलाही शिवाजी दरबारी गेला नाही त्यावेळी मात्र दरबारात हा चर्चेचा विषय बनून शिवाजी व मिर्झा राजा विरोधी गटाने --- विशेषतः जसवंतसिंग, जाफरखान व बादशहाची बहिण जहांआरा बेगम आणि इतर सरदारांनी शिवाजीच्या गैरवर्तनाबाबत त्यांस शिक्षा करण्याचा बादशहाकडे आग्रह धरला. घडल्या प्रकाराने औरंगलाही नाही म्हटलं तरी राग आलेलाच होता. परंतु सरळ निकरावर येणं त्यालाही शक्य नसल्याने त्याने शिवाजीला राजअंदाजखानाच्या हवेलीत नेण्याची सिद्दी फौलादखानास आज्ञा केली. यामागे शिवाजीला अटक वा ठार करण्याचा त्याचा हेतू होता. परंतु रामसिंगास हे समजताच त्याने बक्षी महंमद अमीनखानास गाठून त्यांस स्पष्ट शब्दांत सांगितले कि, बादशहाला जर शिवाजीचा घात करायचा असेल तर सर्वप्रथम त्याने मला व माझ्या मुलाला ठार करावे. अमीनखान बादशहाच्या मर्जीतला गृहस्थ असला तरी त्यांस राजकारणाची यथायोग्य समज होती. त्याने औरंगची भेट घेऊन रामसिंगाचा निरोप त्यांस सांगितला. बादशहाने खडा टाकून राजपुतांची --- विशेषतः जयसिंग व रामसिंगाची निष्ठा एकप्रकारे आजमावून पाहिली. त्याने अमीनखानाच्या हस्ते रामसिंगास उलट निरोप पाठवला कि, शिवाजी आगऱ्यातून पळून जाणार नाही वा बिघाड करणार नाही यासाठी तो जमीन राहील का ? रामसिंगाने तात्काळ होकार दिला. घडला प्रकार शिवाजीस कळून त्याने दुसऱ्या दिवशी रामसिंगास पळून न जाण्याचे वा गैरकृत्य न करण्याचे वचन दिले. तेव्हा लगेच रामसिंगाने आपला लेखी जामीन बादशहास दिला. ( दि. १५ मे १६६६ )

     शिवाजी आगऱ्याहून पळून जाणार नाही वा काही गडबड करणार नाही याविषयी रामसिंग जामीन होऊनही औरंग संतुष्ट नव्हता. त्याने फिरून यत्न म्हणून दुसऱ्या दिवशी रामसिंगास कळवले कि, शिवाजीला तुझ्या मुक्कामापासून दूर ठेवावे. रामसिंगाने यासही हरकत घेतली. तेव्हा शिवाजी संबंधी निर्णय घेण्यासाठी मिर्झाला सल्ला विचारण्याकरता बादशहाने पत्र पाठवले व या पत्राचा जबाब येईपर्यंत शिवाजी आगऱ्याहून निघून जाणार नाही यासाठी रामसिंगाकडून आणखी एक जामीन लिहून घेतला. परंतु गोष्टी यावरच न थांबता त्याच दिवशी सायंकाळी त्याने रामसिंगाची काबुल मोहिमेवर नियुक्ती करत सोबत शिवाजीला नेण्याची आज्ञा केली. त्याचप्रमाणे स्वारीत राजअंदाजखानासही सहभागी होण्याचा हुकुम करून त्यावर रामसिंगाच्या सैन्याची आघाडी सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. रामसिंगासहित सर्वजण समजून गेले कि, औरंगजेब शिवाजीला दख्खनमध्ये परत जाऊ देणार नाही. कैद वा मृत्यू हेच आता त्याच्या नशिबी आहे !

     इकडे शिवाजीने आपल्यातर्फे सुटकेचे प्रयत्न आरंभले. दि. १७ मे रोजी त्याने आपला वकील रघुनाथपंत यांस अर्जीसह बादशहाच्या भेटीस पाठवून दख्खन सुभ्याच्या चाकरीची इच्छा दर्शवत घुसलखान्यात भेटीची विनंती केली. यावर बादशहाने फक्त सबुरीचा सल्ला दिला. तेव्हा औरंगचे मन वळवण्याकरता शिवाजी दुसऱ्या दिवशी रघुनाथपंतासह वजीर जाफरखानाच्या भेटीस गेला. त्यावेळी त्याने आपल्या तर्फे बादशहाकडे अर्ज करण्याची वाजीरास गळ घातली. परंतु वजीर - शिवाजी भेटीच्या दरम्यान वजिराच्या पत्नीस दग्याची शंका आल्याने हि भेट अर्धवटच झाली. परंतु दि. १९ मे रोजी जाफरखानाने शिवाजीतर्फे दरबारात खटपट केली असता औरंगने त्यांस काबूल मोहिमेवर पाठवण्याचा हुकुम मागे घेतला.

    यानंतर वातावरण थोडे निवळले. शिवाजी तळावरून बाहेर पडून शहरात फिरू लागला. दरबारी अमीर - उमरावांना मौल्यवान नजराणे, भेटी पाठवू लागला. इकडे संभाजी रामसिंगासोबत दरबारात हजर होतच होता. अशातच महंमद अमीनखानाने शिवाजीतर्फे बादशहासमोर अर्ज ठेवला. ज्यामध्ये शिवाजीने (१) पुरंदर तहात मोगलांना दिलेले किल्ले परत मागत दोन कोट रुपयांचा शाही खजिन्यात भरणा करण्याची तयारी दर्शवली. (२) दख्खनला जाण्याची आज्ञा मागत संभाजीला दरबारी चाकरीस्तव ठेवण्याची तयारी दर्शवली. (३) बादशाही हुकमाने बादशहा सांगेल त्या मोहिमेवर स्वतः जाण्याची तयारी दर्शवत सध्या दख्खनमध्ये सुरु असलेल्या विजापुरी मोहिमेत सहभागी होण्याकरता आज्ञा देण्याची विनंती केली. शिवाजीच्या या अर्जामुळे औरंग चिडला व त्याने शिवाजीला कोणत्याही दरबारी मुत्सद्द्यास भेटण्याची बंदी करत रामसिंगाच्या घरी जाण्यासही आडकाठी घातली व पाठोपाठ त्यांस तळावरच नजरकैदेत ठेवण्याकरता सिद्दी फौलादखानाची नियुक्ती केली. ( दि. २५ मे १६६६ )                            
                                ( क्रमशः )

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

प्रकरण १४) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी




   मिर्झा राजा जयसिंगची शिवाजीवरील स्वारी हि अनेकार्थांनी महत्वपूर्ण आहे. या स्वारीचा मुख्य व प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे शिवाजीचा सर्वनाश हे होतं ! याकरता वाटेल ती किंमत मोजायला मोगल बादशहा तयार होता. परंतु शिवाजीबाबत औरंग इतका मेटाकुटीस वा उतावीळ का व्हावा ? शिवाजीची स्वतंत्र सत्ता उदयास येऊन पुरती वीस वर्षंही उलटली नव्हती व मोगलांशी त्याचा संबंध तर अलीकडील एक दशकाचा ! लौकिकदृष्ट्या पाहिलं तर आदिल व कुतुब मोगलांचे स्वाभाविक, तुल्यबळ व प्रस्थपित शत्रू होते. ज्यांना उखडून काढल्याखेरीज मोगल दख्खनमध्ये हात - पाय पसरू शकत नव्हते. परंतु यांच्या बंदोबस्तास दुय्यमत्व देत औरंगने शिवाजीच्याच नाशास अग्रक्रम का द्यावा ? देशी इतिहासकारांनी या झुंजीकडे परंपरागत हिंदू - मुस्लीम झगड्याच्या चष्म्यातून पाहिले. ज्यांनी हा चष्मा घातला नाही त्यांनी इतर चष्मे चढवून आपली दृष्टी व इतिहास विकृत करुन घेतले. या प्रकरणी मान्यवर इतिहासकारांचे मतमतांतरांतील गोंधळ, अपुरी उपलब्ध साधने व थोडीफार तार्किक पद्धतीचा अवलंब करून बघणे सध्या तरी भाग आहे.


    स. १६६५ च्या दि. ३ मार्च रोजी जयसिंग पुण्यास दाखल होतो. दि. ३१ मार्चला दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली मोगल फौजा पुरंदरास भिडतात व दि. १३ जून रोजी पुरंदरचा तह होऊन शिवाजी - मोगल यांच्यात समझोता होतो. अफझलखान, सिद्दी जौहर, शाहिस्तेखान इ. च्या महिनोन् महिने, वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या मोहिमांच्या पार्श्वभूमीवर अवघ्या दोन - अडीच महिन्यांच्या अल्पवधीत मिर्झा राजाने शिवाजीस गुडघ्यावर आणावे, शिवाजीनेही शरणागती पत्करावी व तहाच्या वेळेस तह उभयपक्षी न होता बहुपक्षी होऊन त्यातून शिवाजीची आग्रा भेट उद्भवली व मिर्झा राजाची अतिमुत्सद्देगिरी पूर्णतः विफल होऊन शिवाजीस महतप्रयासाने औरंगला फसवून मायदेशी येणं भाग पडलं. हा सर्वच घटनाक्रम अद्भुत तर आहेच परंतु तितकाच गुंतागुंतीचाही. निव्वळ शिवाजी - जयसिंग युद्धाचा दोन अडीच महिन्यांचा काळ जरी विचारात घेतला तरी यांत मोगल, शिवाजी, आदिल, कुतुब, डच, पोर्तुगीज, इंग्रज आदींचे त्यात इतके हितसंबंध जडले होते व खुद्द मोगल गटातीलही अनेक फळ्यांचे विचार प्रवाह, हेतूंची समर्थपणे सांगड घालणे व प्रकरण शक्य तो सुसंगत व तपशीलवार लिहिणे अवघड आहे. असो.  


    मिर्झा राजा जयसिंग व त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या शिवाजीवर चालून आलेल्या मोगल उमरावांमध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे औरंगने मिर्झाला त्याच्या मागणीनुसार दिलेले अनिर्बंध अधिकार व स्वातंत्र्य होय ! पसासं ले. क्र. १०५४ नुसार हे स्पष्ट होते कि, यापूर्वी शिवाजीवर नियुक्त केलेल्या सरदारांना दख्खन सुभेदाराच्या आज्ञेत वर्तावे लागे. इतकेच नव्हे तर जे सैन्य त्यांच्या हाताखाली मोहिमेत असे त्या सैन्याच्या सर्वच नाड्या दख्खन सुभेदाराच्या हाती असत. रणांगणावरील सेनापती फक्त लष्करी बाबतीत निर्णय घेऊ शकत असे. परंतु आपल्या शिपायांना शिक्षा वा गौरवण्याचे अधिकार त्यांकडे नसत. त्यामुळे शिवाजीसारख्या एकहाती, एकमुखी सत्ता गाजवणाऱ्या इसमाबरोबर लढणे त्यांस अवघड जात असे. याबाबतीत जयसिंगाने औरंगला विनंती करून सैन्याचे पगार, बढत्या, शिक्षा इ. चे अधिकार आपल्याकडे मागून घेतले.


    शिवाजी विरोधातील मोहीम कशा प्रकारे चालवायची याविषयीचे त्याचे आराखडे पुण्यास येण्यापूर्वीच निश्चित झाले होते असे पसासं ले. क्र. १०५१ वरून दिसून येते. त्यान्वये प्रथम कोकणात उतरून शिवाजीचा तेथून साफ उठावा करून मग त्यांस तसेच पूर्वेकडे रेटत मैदानाकडे वळवण्याचा त्याचा विचार असावा परंतु ज्यावेळी तो जसजसा पुण्याच्या नजीक येऊ लागला तसतशी त्यांस येथील राजकारणाची ओळख पटून शिवाजी - आदिल यांची मोगलांविरुद्ध युती होण्याची शक्यता दिसू लागली. जयसिंगाची सामग्री मर्यादित असल्याने एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्ध चालवणं त्याला परवडण्यासारखं नव्हतं. तेव्हा त्याने शिवाजी - आदिल यांची युती जुळून येण्याच्या आत उभयतांच्या दरम्यान असलेल्या भूप्रदेशात --- म्हणजे पुण्यातच तळ ठोकण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे शिवाजीच्या उरावर मोगलांचे ठाणे बसले तर आदिलवर एकप्रकारे दडपण आले. शिवाय राजकीय आघाडीवरही त्याच्या या उभयतांविरोधी कारवाया सुरूच होत्या. शिवाजीचा मुख्य आधार म्हणजे त्याचे लष्कर, गड - किल्ले, आरमार असले तरी त्याचे स्वाभाविक मित्र / शत्रूही तितकेच महत्त्वाचे होते. डच, पोर्तुगीज, सिद्दी, आदिल यांच्याशी शिवाजीच्या राज्याच्या सीमा भिडल्याने ते तसे परस्परांचे शत्रूही होते व मित्रही. यातील प्रत्येकाशी जयसिंगाने मित्रता व लष्करी बळाच्या धाकावर राजकारण खेळत शिवाजीला यांची प्रत्यक्ष मदत होणार नाही याची खबरदारी घेतली. अर्थात उपरोक्त सत्ताधीशही काही दुधखुळे नव्हते. उदाहरणार्थ पोर्तुगीजांनी मोगलांशी मैत्री दर्शवत अंतस्थरीत्या शिवाजीला दारुगोळा व अन्नधान्य विकत देण्याची तयारी दर्शवत दोन दरडींवर हात तर ठेवलाच पण तसाच प्रसंग आल्यास शिवाजीला गोव्यात आश्रय देण्याचीही त्यांनी तयारी दर्शवली.


    आदिलशहानेही याहून अधिक वेगळं काही केलं नाही. मोगली दडपण शिवाजीवर येताच त्याने स्थितीचा लाभ घेत कुडाळवर फिरून ताबा बसवण्याचा यत्न केला व शक्य तितकं शिवाजीचं खच्चीकरण होताच त्याने अंतस्थरीत्या त्यांस द्रव्य वगैरेची सहाय्यता करून मोगली आक्रमण परस्पर सरहद्दीवरच थोपले जाईल याची दक्षता घेतली. गोवळकोंडेकरही प्रसंग पाहून लष्कराच्या जमवाजमवीस लागला. एकूण पाहता यावेळी स्थिती कोणालाच अनुकूल नव्हती. इथे प्रत्येकजण दुसऱ्याचा मित्र आणि वैरी होता !


    पुण्यातून आपला मुक्काम हलवताना जयसिंगाने विचारपूर्वक आपल्या राजकीय व लष्करी डावपेचांची आखणी केली. पोर्तुगीज, डच, सिद्दी वगैरेंशी बोलणी आरंभून त्यांची शिवाजीला मदत वा आसरा मिळू नये अशी तजवीज आरंभली. शिवाजीवर आपण चाल करताच तो मोगली प्रदेशात आक्रमण करून आपणांस शह देईल हे आधीच लक्षात घेऊन त्याने रामनगर, जव्हार वगैरे संस्थानिकांकडे वकील पाठवून त्यांना आपल्या पक्षात वळवून घेतले. विशेष म्हणजे या संस्थानिकांच्या प्रदेशातूनच शिवाजीने सुरतेवर स्वारी केली होती. असो. उत्तरेची वाट बंद करण्यासोबत दक्षिणेकडेही मिर्झाने लक्ष पुरवत बेद्नुरकर, बसवापट्टण वगैरे संस्थानिकांकडे आपले दूत रवाना केले. औरंगजेबास पत्र पाठवून सुरतेच्या मोगली आरमारास शिवाजीच्या जहाजांची व बंदरांची नाकेबंदी करण्यासंदर्भात सूचना केली. आदिल व कुतुबला लष्करी बळाचा धाक तसेच खंडणीच्या रकमेत सवलतीचा लोभ दाखवत त्यांना तटस्थ राखण्याचा प्रयत्न केला. पैकी, आदिल त्याच्याकरता अतिशय महत्त्वाचा होता व आपण कितीही प्रलोभनं दाखवली तरी आदिल शिवाजीच्याच गळ्यात गळे घालणार हे जाणून त्याने जंजिरेकर सिद्दी --- जो आदिलचा मांडलिक होता --- यांस आपल्या पक्षास वळवण्याची खटपट केली. समुद्रावर सिद्द्याला शिवाजीचा बराच जाच होत असल्याने व आदिलकडून त्यांस म्हणावी तशी मदत मिळत नसल्याने तो काहीसा मोगलांना सामील झाला. अफझलच्या मुलास बापाच्या सुडाकरता उद्युक्त करत त्यांस मोगली चाकरीत येण्याचे आमिष दाखवण्यात आले. जावळीच्या मोऱ्यांनाही त्याने अनुकूल करून घेतले. तसेच खुद्द शिवाजीच्या सैन्यातही त्याने आपली माणसे पेरून फोडाफोड आरंभली. अंबाजी, खारकुली आणि त्याचे दोन भाऊ पुरंदरावर तोफा ओतण्याच्या कामावर असून शिवाजीने त्यांस तीन हजारची मनसब दिली होती. जयसिंगाने त्यांस आपल्याकडे वळवून घेण्यासाठी माणसे पाठवून दिली. तसेच शिवाजीची लष्करी आघाडीवर कोंडी करण्यासाठी त्याने लोहगड - पुण्याचा रस्ता रोखून धरण्यास कुतुबुद्दीनला नेमले. पुण्याचे ठाणे इहतीशामखानाकडे सोपवले. शिवाजीचा प्रदेश अडचणीचा व मोगलांकडे घोडदळाचा अधिक भरणा असल्याने जयसिंगाने पायदळ शिपायांची अतिरिक्त भरती आरंभली. आणि हे सर्व करत असतानाच त्याने शिवाजीवरील मोहिमेचे प्रथम लक्ष्य नियोजित केले, किल्ले पुरंदर !


    जयसिंगाने हल्ल्यासाठी पुरंदरचीच निवड का करावी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुण्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने या गडाचे महत्त्व असले तरी या किल्ल्याला वेढा पडतो काय व नंतर काही दिवसांतच शिवाजी शरणागतीची भाषा करतो काय, सर्वच अनाकलनीय, विचित्र न् गूढ आहे. शाहिस्तेखानाने चाकण वेढला त्यावेळी शिवाजीने असा निर्णय घेतला नाही. जसवंतसिंग सिंहगड घेऊन बसला तरी शिवाजी नरमला नाही. इतकेच काय तर शाहिस्तेखानाने दोन अडीच वर्षात शिवाजीच्या राज्याची --- विशेषतः पुणे प्रांताची अतोनात नासाडी करूनही शिवाजीने शरणागती वा नरमाई स्वीकारली नाही. मग याच वेळेस असे का व्हावे ? पुरंदराचे यावेळी महत्त्व एवढे का असावे ? तसेच शिवाजीच्या डोंगरी किल्ल्यांच्या नादास लागणे म्हणजे मोगलांच्या दृष्टीने तो काहीसा आत्मघाताचाच प्रकार होता. कारण हे किल्ले वेढून बसने व जिंकून घेणे, हे काही चार दोन दिवस वा आठवड्यांचे काम नव्हते. महिनोन् महिने किल्ल्यांना वेढून बसावे तेव्हा कुठे किल्ले ताब्यात येण्याचा तो काळ होता व अशा स्थितीत जयसिंगाने प्रथम आक्रमण पुरंदरसारख्या बळकट किल्यावरच का करावे ?


    पुरंदरच्या वेढ्याची व लढाईची जी काही वर्णनं उपलब्ध आहेत त्यावरून एक गोष्ट लक्षात येते व ती म्हणजे शिवाजीच्या सरदारांचे कबिले त्या गडावर आश्रयार्थ आले होते. किंवा रक्षणाच्या दृष्टीने सरदारांनी वा शिवाजीनेच त्यांना तिथे कबिले ठेवण्याची आज्ञा दिली असावी. मिर्झा राजाला याची कुणकुण लागल्यानेच त्याने पुरंदरसारख्या बलवान गडास पहिल्या सपाट्यात घेरण्याचे योजले असावे. परिवाराच्या काळजीने शिवाजीचे सरदार बेदील होतील व सरदारच नाराज झाल्यावर एकटा शिवाजी तरी काय करणार आहे ! असाही जयसिंगाचा विचार असू शकतो. त्यामुळेच दि. ३१ मार्च १६६५ रोजी दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली मोगलांनी पुरंदरास घेराव घातला व पाठोपाठ जयसिंगही तिथे येऊन धडकला.


    मोगलांच्या या सर्वंकष आक्रमणाला तोंड देण्याची शिवाजीनेही आपल्या परीने सिद्धता चालवली. जयसिंग बऱ्हाणपुरातून पुढे येईपर्यंत शिवाजी बर्यपैकी निर्धास्तपणे मुलूखगिरी करत होता. किंबहुना जयसिंगचे पुण्यात आगमन झाल्यावरही शिवाजीस त्याचे विशेष असे काही वाटलं नाही. परंतु जशी त्याने राजकीय व लष्करी डावपेचांची आखणी करत शिवाजीला घेरण्यास आरंभ केला, त्याबरोबर शिवाजी भानावर येऊन त्याने मोगलांच्या आक्रमणाचा शक्य तितक्या जोराने प्रतिकार आरंभला. माझ्या मते, जयसिंगाबद्दल शिवाजीचा अंदाज बऱ्यापैकी चुकला होता. शाहिस्तेखान वा जसवंतसिंगाप्रमाणे त्याने जयसिंगाची गणना केली असावी परंतु त्याच्या विध्वंसक शक्ती व आक्रमणाचा आवाका लक्षात येताच त्याने उपाययोजना चालवली. मिर्झा राजा पुरंदर घेरण्यास जाऊ लागला तेव्हा त्याने नेताजीला परिंड्यास पाठवून मोगली प्रदेशात चढाई आरंभली. परंतु मिर्झाने वेढ्याच्या कामी बाधा येऊ न देता काही पथकं नेताजीच्या पाठीवर रवाना केली. यावेळी खासा शिवाजीलाही मोगली प्रदेशात घुसण्याची उत्कंठा होती परंतु पुणे - लोहगडादरम्यान मोगलांनी ठाणी उभारल्याने व त्यांची धावती पथके इथे तैनात झाल्याने तो आपल्याच प्रदेशात कोंडल्यासारखा झाला. इकडे शिवाजीचं अस्तित्व आपल्यासाठी महत्त्वाचे जाणून गोवळकोंडेकराने शिवाजीच्या कुमकेची तजवीज केली.


    जयसिंग - शिवाजीच्या राजकारणास खरा रंग चढला तो दि. १२ एप्रिल १६६५ रोजी वज्रगडच्या पाडावानंतर. पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मोगलांना शरण गेल्याने पुरंदरचा बचाव उघडा पडला व किल्ला फार काळ लढवणे अशक्य असल्याचे शिवाजीच्या लक्षात आले. वज्रगडाच्या शरणागतीने दिलेरखान व इतर मोगल सरदारांना अवसान, उमेद प्राप्त होऊन त्यांनी पुरंदर भोवती फास आवळायला आरंभ केला. शिवाजीचे सैन्य जरी गड भांडता ठेवत असले तरी गडावर बहुधा सामग्रीचा तुटवडा भासत असावा. जयसिंगाने शिवाजीची चारीबाजूंनी नाकेबंदी करत त्याच्या गोटात जी फोडाफोड चालवली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवाजीनेही मोगली गोटात फितूर केला. त्यामुळेच दाउदखान कुरेशी असो वा शुभकर्ण बुंदेला, यांनी पुरंदरावर अतिरिक्त सामग्री पुरवण्याच्या शिवाजीच्या कार्यात आपल्याकडून व्यत्यय येऊ दिला नाही. त्याचप्रमाणे वेढा रेंगाळेल याकडेच ते लक्ष देऊ लागले. सैन्यातील ढिलाई लक्षात येताच जयसिंगाने दाउदखानास वेढ्यातून बाहेर काढत त्याला रोहीडा ते राजगड भागातील शिवाजीच्या राजवटीत मोडणारी गावं उध्वस्त करणे व गुरं - माणसं धरून आणायच्या कामी नेमलं. हि कामगिरी दाउदखान व इतरांनी बऱ्यापैकी बजावली.


     मोगलांच्या या दुहेरी आक्रमणामुळे --- विशेषतः पुणे प्रांतातील हैदोसामुळे शिवाजी बहुतेक टेकीस आला. एकतर शाहिस्तेखानाच्या स्वारीपासून त्या प्रदेशाची धूळदाण झाली होती. त्यात आता मिर्झाच्या राजपूत - पठाणांची भर पडली. बरं, विजापूर - गोवळकोंड्याच्या व इतरांच्या खजिना, अन्नधान्याच्या मदतीच्या बळावर शिवाजीने हाही हल्ला निभावून नेला असता परंतु शिवाजीच्या सैन्यांत फितूर करून तसेच गावं उठवून माणसं धरून नेण्याने अधिक लष्कर भरतीचा पर्यायही जवळपास खुंटल्यातच जमा झाला. अशा स्थितीत पुरंदर लढत आहे तोवरच तह करण्यात अर्थ असल्याचे जाणत शिवाजीने वाटाघाटीस आरंभ केला. खंडणी, किल्ले देण्याची पेशकश केली परंतु मिर्झा राजा संपूर्ण शरणागतीवर अडून बसला होता. पुरंदर बद्दलची शिवाजीची अगतिकता त्याच्या ध्यानी आली होती. त्यामुळे त्यानेही याच गडावर आपली बव्हंशी शक्ती एकवटली. वज्रगडाने काही काळ टिकाव धरला असता व पाउस चालू झाला असता तर कदाचित मोहीम रेंगाळलीही असती. परंतु वज्रगडाच्या शरणागतीने सारी गणितं बदलत गेली.


    तहासाठी आतुरता दाखवूनही मिर्झा राजा सलुखासाठी तयार होईना तेव्हा शिवाजीने आदिलला कौल लावला. प्रसंगाचं गांभीर्य जाणून विजापूरकरांनीही आपल्या कट्ट्या शत्रूच्या मदतीकरता हालचाल आरंभली. कारण राजकारणाच्या सोयीनुसार शिवाजी आपला म्हणजे दख्खनी होता तर मोगल उत्तरेतले असल्याने परकीय ! शिवाय, शिवाजी नामशेष होताच मिर्झाची तलवार विजापूरवर फिरणार हेही उघड दिसत होतं.


    यास्थळी पसासं ले. क्र. १०३२ या कारवारकर इंग्रजांच्या दि. २८ जानेवारी १६६५ च्या पत्रातील उल्लेख मला महत्त्वाचा वाटतो. यावेळी मिर्झा राजा बऱ्हाणपुरास होता व कारवारकरांकडे बातमी आली होती कि, शिवाजीचा भाऊ ( व्यंकोजी ), सय्यद इलियास सर्जखान विजापुरात असून बहलोलची आदिलला प्रतीक्षा होती. शिवाजी, रुस्तम व खवासखान अशा दोन वा तीन आघाड्यांनी मोगलांवर आदिलशाही सेना जाणार असल्याची चर्चा असून कारवारकरांना त्यात तथ्य वाटत नव्हते. परंतु या अफवेवरून लोकमनाचा काहीसा अंदाज येतो व त्यासोबतच आजवर शहाजी - शिवाजीचे राजकारण ज्याप्रमाणे परस्परपूरक चालले होते तद्वत शहाजीच्या पश्चात व्यंकोजी - शिवाजीचे चालेल अशी अपेक्षाही त्यातून ध्वनित होते. अर्थात घडले तर काहीच नाही परंतु लोकभावना सजण्यासाठी येथे नमूद केले इतकेच !


    शिवाजी - आदिल यांच्यात मैत्री होण्याची शक्यता दिसू लागताच मिर्झाने थोडी नरमाई स्वीकारत शिवाजीसोबत तहाची अनुकुलता दर्शवली. त्यानुसार दि. ११ जून १६६५ रोजी शिवाजी त्याच्या भेटीस आला. त्यावेळी पुरंदरावरील हल्ले चालूच होते. जयसिंग - शिवाजी भेटीची वर्णने वाचताना जयसिंगाने भेटीदरम्यान पुरंदरावर जोराचा हल्ला करावा व शिवाजीने तो पहावा अशी मुद्दाम योजना केल्याचे प्रथमदर्शनी जरी दिसून येत असले तरी तह बनण्यापूर्वीच युद्धतहकुबी होत नसते हे लक्षात घेता त्याने मुद्दाम असा प्रकार केला असे म्हणवत नाही. व केला असला तरी तो गैर ठरत नाही !


    शिवाजीच्या आगमनानंतर पुरंदरचा लढा फार काळ न चालता त्याने किल्ल्याची सोडचिठ्ठी दिली. त्यानुसार गडावरील सात हजार मनुष्य --- ज्यात सुमारे ४ हजार सैनिक होते -- मोगलांच्या अभयावरून व शिवाजीच्या आज्ञेने खाली उतरले.


    पुरंदरच्या शरणागतीनंतर काही दिवसांतच शिवाजी - मोगलांमध्ये तह घडून आला व त्यान्वये शिवाजीने आपल्या ताब्यातील निम्म्याहून अधिक भूप्रदेश व काही किल्ले देऊन आपल्या उर्वरित राज्याचा बचाव केला. तसेच स्वतः ऐवजी मुलाच्या --- संभाजीच्या नावे मनसबदारी स्वीकारत लौकिकात आपलं स्वतंत्र अस्तित्व  कायम राखलं.


   यास्थळी आपणांस थोडी तपशीलवार चर्चा करणे भाग आहे. शिवाजीने मोगलांना नेमके किती किले दिले ? कोणता भूभाग त्यांना देऊन टाकला ? त्याबदल्यात शिवाजीचा काय फायदा झाला याची चर्चा अत्यावश्यक आहे.


    सरकारकृत औरंगजेब चरित्रात या संदर्भात शिवाजीच्या नावे औरंगने पाठवलेलं पत्र दिलेलं आहे., परंतु सदर पत्राचा आरंभ " मुसलमान धर्मरक्षक शिवाजी राजे यानी बादशाही कृपेचे उमेदवार होऊन जाणावे .. " असा असल्याने मला हे संशयास्पद वाटते. ' मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड - ८ ' मध्येही सदर पत्र प्रकाशित असून संपादक वि. का. राजवाड्यांनी देखील याच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तेव्हा मोगल - शिवाजी दरम्यानच्या तहाच्या नेमक्या अटी काय होत्या यासंबंधी पसासं ले. क्र. १०६४ या जयसिंगाने औरंगजेबास लिहिलेल्या स. १६६५ च्या जून महिन्यातील पत्रावर विसंबून राहावे लागते. ज्यानुसार शिवाजीचे २३ किले व त्याखालील चार लक्ष होन वार्षिक उत्पन्नाचा मुलूख मोगलांना मिळून राजगड वगैरे बारा किल्ले आणि त्याखालील एक लक्ष होन वार्षिक उत्पन्नाचा प्रांत शिवाजीकडे राहिल्याचे स्पष्ट होते. आता शिवाजीने मोगलांना दिलेल्या २३ किल्यंत कशाचा अंतर्भाव होतो व होत नाही याची, किल्ल्यांच्या नावनिशिवार यादीविना चर्चा अशक्य आहे.          


    मोगलांसोबत तह केल्याने शिवाजीला काय फायदा झाला हे जाणून घेण्यासाठी पसासं ले. क्र. १०६६ अतिशय उपयुक्त आहे. त्यानुसार शिवाजीने कोकणातील चार लक्ष होन वार्षिक उत्पन्नाच्या व बालाघाट पैकी पाच लक्ष होण उत्पन्नाच्या विजापुरी भूप्रदेशाची मागणी केली.

     शिवाजीच्या या मागणी मागील मुख्य कारण म्हणजे लवकरच मिर्झा राजा आदिलशाहीवर स्वारी करणार असून शिवाजी देखील या मोहिमेत सहभागी होणार होता. आता तह तर झाला तेव्हा तहात गमावलेल्या भूप्रदेशाचं नुकसान इतरत्र भरून काढणं आवश्यक होतं. तसेच मोगलांना देऊ केल्या मदतीचा मोबदलाही वसूल करून घेणं अत्यावश्यक होतं. गरज फक्त ते नियमात बसवण्याची होती व हे कार्य त्याने न् मिर्झाने मोठ्या कौशल्याने पार पाडलं.


     मोगल फौजा जो काही विजापुरी प्रांत ताब्यात घेतील व ज्या कार्यात मदतीकरता शिवाजीची सेनाही असणार होती, त्या पैकी तो नऊ लक्ष होन वार्षिक उत्पनाचा प्रांत मागत होता व त्याबदल्यात तो ४० लक्ष होन वार्षिक हप्तेबंदीने मोगलांना देण्यास तयार होता. याबद्दल जयसिंगाचे वैयक्तिक मत असे होते कि, मोगलांना चाळीस लक्ष होन म्हणजे दोन कोट रुपये मिळतील. शिवाजी - विजापूरकरांत वैमनस्य वाढेल व शिवाजीला हवा असणारा प्रदेश डोंगराळ, जंगली भागात असल्याने तो भाग लढून ताब्यात घेण्याची जोखीम घेणे शिवाजीला भाग आहे.

     पसासं ले. क्र. १०६६ चा हा सारांश असला तरी पत्रातील मजकुराची अव्यक्त अशी दुसरीही बाजू आहे. शिवाजीने स्वतः मोगलांची नोकरी न स्वीकारल्याने तो बरोबरीच्या नात्याने मोगलांशी वाटाघाट करू पाहतोय व जयसिंगही त्यांस उचलून धरतोय. वास्तविक मोगल मनसबदार बनलेल्या संभाजीच्या वतीने त्याने हि जबाबदारी --- विजापुरी हल्ल्यात सहभागी होण्याची --- विना मोबदला पार पाडणे भाग होते. परंतु असे इथे घडत नाही. म्हणजेच शिवाजीने स्वतःला मोगली चाकरीपासून दूर राखण्यात व अज्ञानी संभाजीस पुढे करण्यात मोठाच डाव जिंकला होता. त्याच्या सुदैवाने त्याचा प्रत्यक्ष प्रतिस्पर्धी मिर्झा राजाही तसाच धोरणी होता.


   शिवाजीला पूर्ण उखडून काढण्याची औरंगची आज्ञा असतानाही निम्मे राज्य व किल्ले ताब्यात देण्याच्या अटीवर त्याने शिवाजीचा बचाव केला. आरंभी तो शिवाजीकडे संपूर्ण शरणागती मागत होता. या शरणागतीचा अर्थ असा कि, मोगल हे शिवाजीला बंडखोर मानतात. परंतु ज्याक्षणी त्याने शिवाजी सोबत वाटाघाट आरंभली त्याक्षणी शिवाजी बंडखोर न ठरता एका स्वतंत्र सत्ताधीशाच्या भूमिकेत आला व त्याच्या सत्तेला एकप्रकारे मोगलांची मान्यता लाभली. औरंगला नेमके हेच नको होते व मिर्झाने तेच केले !


    शिवाजीला समूळ उखडून काढणे मिर्झाला शक्य होते, नव्हते याविषयी मतभेद होऊ शकतात. कदाचित स. १६३६ ची पुनरावृत्ती घडून आली असती अथवा शिवाजी - आदिल - कुतुब यांचा मिलाफ होऊन जयसिंगास माघार घ्यावी लागली असती. परंतु हा तर्काचा, जर - तरचा प्रांत झाला.


    वास्तविकता पाहता पुरंदरच्या वेढ्यातील प्रगती पर्यंत औरंगजेब जयसिंगाच्या प्रत्येक सल्ल्यानुसार, सूचनेनुसार आदेश काढत होता. कारण कोणत्याही स्थितीत त्याला शिवाजीचा नाश हवा होता. याला कदाचित त्याचे धर्मवेड वा हिंदुद्वेष्टा असेही काहीजण म्हणतील. परंतु त्यांनी तत्कालीन राजकारणाचे मर्म न ओळखता अशी आपली समजूत करून घेतली असे म्हणावे लागेल.


    विषयाच्या अनुषंगाने इथं थोडं विषयांतर करणे भाग आहे. देशाच्या विशेषतः महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याचे त्याकाळी व्यापार व राजकारणाच्या दृष्टीने अतोनात महत्त्व होते. शिवाजीने हे ओळखूनच स्वतःचे आरमार उभारले. इराण, बसरा, मक्केशी त्याचे व्यापारी संबंध होते. इथे मुद्दाम लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे इराण हि त्यावेळी एक प्रबळ सत्ता असून हिंदुस्थानच्या सार्वभौम सत्तेला या बलदंड शेजाऱ्याच्या आक्रमणाची नेहमीच धास्ती वाटत आली होती. खासा औरंगही यांस अपवाद नव्हता. मोगल बादशहांना इराणी आक्रमणाची वाटणारी भीती अगदीच निराधार नव्हती. कारण त्यांचे बरेच उमराव, मनसबदार इराणी असून त्यांना नाही म्हटले तरी इराणच्या बादशहाविषयी वा तेथील राजवटी विषयी थोडीफार आत्मीयता होतीच व यामुळेच औरंग काय व इतर मोगल बादशहा काय, सर्वच आपल्या इराणी मनसबदारांच्या निष्ठेविषयी --- किमान इराणी आक्रमणाच्या वेळी साशंक असत.

  
     पसासं ले. क्र. ८८६, ८८८, १०४३ या सुरकर इंग्रजांच्या पत्रांवरून तसेच पसासं ले. क्र. १००२ या डच पत्रानुसार शिवाजी तसेच त्याचा अधिकारी रावजी पंडितचे मक्का, बसरा, मस्कत, काँगो व इराण या देशांशी व्यापारी संबंध होते. त्यामुळेच इराणच्या वकिलातीवर गेलेला मोगल अधिकारी तर्बियतखान दिल्ली दरबारी परतला त्यावेळी त्याच्या सोबत दिलेल्या पत्रात इराणचा बादशहा अब्बासने शिवाजीविषयी पुढील आशयाचे उद्गार काढले आहेत, " ... मला असे कळते की हिंदुस्थानातील बहुतेक जमीनदार ( राजे ) बंड करून उठले आहेत. कारण त्यांचा राज्यकर्ता दुबळा, अकुशल आणि साधनसामग्री नसलेला असा आहे. त्यांचा पुढारी तो नापाक शिवा आहे. हा शिवा इतका काळ जणू अज्ञातवासात राहिला की त्याचे नाव देखील कोणाला माहित नाही. परंतु आता तुमच्याजवळील साधनसामग्रीच्या अभावाचा फायदा घेऊन आणि तुमच्या फौजांनी घेतलेली माघार पाहून एकाद्या पर्वताच्या शिखराप्रमाणे तो आपल्या कृतीने सर्वांच्या समोर आला, अनेक किल्ले त्यांनी बळकाविले, तुमचे अनेक शिपाई ठार मारले वा पकडले, त्या प्रदेशाचा बराचसा भाग त्याने बळकाविला, तुमच्या ताब्यातील अनेक बंदरे, शहरे आणि खेडी लुटली आणि जाळून फस्त केली आणि आता तो तुमच्याशी दोन हात करण्यासाठी उभा ठाकला आहे. "

    तसेच याच पत्रात अब्बासने औरंगजेबा बद्दल जे उद्गार काढले आहेत, ते लक्षात घेता व औरंगची एकूण राजकीय कारकीर्द पाहता, औरंगचे याहून यथार्थ मूल्यमापन क्वचितच कोणी केले असेल. औरंगविषयी अब्बास लिहितो कि, " .. तुम्ही स्वतःला जगज्जेते ( आलमगीर ) म्हणून म्हणवून घेता पण प्रत्यक्षात तर तुम्ही फक्त आपल्या बापाला जिंकलेत आणि आपल्या भावांचा खून करून तुम्ही तुमच्या मनाला शांती मिळविलीत. "           


संदर्भ ग्रंथ : औरंगजेबाचा इतिहास :- जदुनाथ सरकार लिखित व डॉ. भ. ग. कुंटे अनुवादित


    उपरोक्त पत्राची निश्चित तारीख उपलब्ध नसली तरी तर्बियतखान स. १६६६ मध्ये परतला त्यावेळी त्याच्यासोबत हे पत्र होते व इराणात तर्बियतचा एक वर्ष मुक्काम असून या काळात शाहिस्तेखान, सुरत हि प्रकरणे घडून आली होती. जयसिंगची स्वारी व शिवाजीची शरणागती आणि तह यांचा यात उल्लेख नसणे स्वाभाविक आहे. परंतु तत्पूर्वीच्या शिवाजीच्या पराक्रमाची, धाडसी कृत्यांची इराणी शहाने दखल घेतल्याचे स्पष्ट होते. त्यावरून शिवाजीचा इराण सोबत निव्वळ व्यापारच चालू होता, राजकारण अजिबात नव्हते असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल व औरंगजेब शिवाजीच्या नाशास का प्रवृत्त, उत्सुक झाला याचाही थोडाफार उलगडा होऊ शकेल.


    मिर्झा राजाच्या दृष्टीकोनातून या तहाकडे व समग्र मोहिमेकडे पाहिले तर प्रथम हे लक्षात येते कि, या मोहिमेस पूर्णत्वाला नेण्याकरता त्यांस शक्य तितके अधिकार जरी देण्यात आले असले तरी पुरेसं मनुष्यबळ त्याच्याकडे नव्हते. शिवाय पर्याप्त तोफखान्याचीही त्यांस उणीव भासत होती. पुरंदरचे यश म्हणजे दिलेरची दिलेरी व मोगलांची चिकाटी तसेच झपाट्याने त्याने आखलेले डावपेच व त्यांची अंमलबजावणी यांची मिळून ती तात्पुरती होती. परंतु शिवाजीला शेवटास नेण्याकरता एवढं पुरेसं नव्हतं. त्यातही इतर सत्तांची तो जरुरी इतकीही मदत घेऊ शकत नव्हता. कारण मोबदल्याची निश्चिती करण्याचे अधिकार त्याच्याकडे नव्हते. ज्याप्रमाणे स. १६३६ मध्ये शहाजहानने आदिलला बगलेत मारत शहाजी व त्याच्या निजामशाही बाहुल्याचा काटा काढला,तसे मिर्झाही करू शकत होता. परंतु त्यांस औरंगच्या परवानगीची गरज होती व औरंगची वृत्ती पाहता मिर्झाने याची मागणी वा वाच्यता केल्याचे दिसून येत नाही.


    शिवाजीवरील स्वारी हाती घेताना त्याच्या सामर्थ्याविषयी मिर्झाच्या ज्या कल्पना होत्या, त्या अनुभवांती फोल ठरल्याचे दिसून येते. अन्यथा आरंभी शरणागतीची भाषा करणारा मिर्झा तहासाठी तयार होतोच कसा ? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. दुसरे असे कि, आहे त्या बळावर मिर्झा फक्त इतकेच साध्य करू शकत होता. शिवाजीचं उर्वरित राज्य खालसा करण्याची जबाबदारी त्याने आपल्या नंतर कामगिरीवर दाखल होणाऱ्या सरदारावर सोपवल्याचे दिसून येते. इथपर्यंत मिर्झाच्या कार्याविषयी शंका घेता येत नाही. परंतु पुरंदरच्या तहानंतर शिवाजीने  विजापुरी आक्रमणा निमित्त ज्या शर्ती मांडल्या व त्याची तरफदारी मिर्झाने केलेली पाहता मिर्झाचे या प्रकारामागे इतरही अंतस्थ हेतू असावेत असा संशय येतो.


    बऱ्याच शिवचरित्रकारांच्या मते, शिवाजीने मिर्झाशी स्नेहाचे नाते जोडून या प्रसंगी आपला शक्य तितका लाभ साधून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मिर्झा किंवा इतर मोगल मनसबदारांचा स्वभाव लक्षात घेता शिवाजी, विजापूर, गोवळकोंडा हे मोगल बादशहाला सलणारे, खुपणारे काटे तसेच कायम राहावेत अशी त्यांची मनापासून इच्छा होती. कारण हे काट समूळ नष्ट केल्यास बादशहा कंदाहारची मोहीम हाती घेईल वा लष्करात कपात करण्याची धास्ती होती व या दोन्ही गोष्टी यांना नको होत्या. शाहिस्तेखानाने शिवाजीवरील स्वारी रेंगाळत चालवली ती याच धोरणातून व मिर्झा राजाही या धोरणाचा पुरस्कर्ता नसावा असे म्हणणे धारीष्ट्याचं ठरेल ! शिवाय मिर्झाचं चरित्र पाहता तो पुढे पेशवाईत प्रसिद्धीस आलेल्या मल्हारराव होळकर, महादजी शिंद्याच्या परंपरेतला मुत्सद्दी वाटतो. जो धन्याची चाकरी पूर्ण निष्ठेने करतो व त्यावर आपला एक शह देखील कायम ठेवतो.


    शिवाजीच्या दृष्टीने या तहाचा विचार करता असे दिसून येते कि, ज्यावेळी त्यांस मिर्झा राजाच्या प्रचंड आक्रमणाची कल्पना आली तेव्हापासूनच तो त्याच्याशी तहाच्या वाटाघाटी करण्यास आतुरता दर्शवू लागला. उभयपक्षांचे लष्करी बलाबल लक्षात घेता मैदानी युद्धात शिवाजीने मिर्झाला लोळवलेही असते परंतु एक मिर्झाची फौज मारल्याने मोगल मोडत नव्हता व वारंवार अशा भयंकर रक्तपाताच्या लढाया खेळणे शिवाजीलाही शक्य नव्हते. तेव्हा सारासार विचार करून आपल्यावरील हि धाड तो विजापूरकरांवर सरकवू पाहत होता. सेतू माधवराव पगडींच्या मते, शिवाजीने शाहिस्तेखानाशी याच संबंधी बोलणी करत विजापूरवरील चढाईत मोगलांना मदत करण्याची तयारी दर्शवली होती परंतु खानाने नकार दिला. अर्थात, यांस औरंगचे धोरण कारणीभूत होतेच म्हणा ! परंतु काहीही असले तरी मोगली आक्रमणाचा शक्य तितका प्रतिकार करत त्यांची टोळधाड आपल्यापेक्षा आपल्या शत्रूवर वळवण्याची शिवाजीची खटपट नेहमीची होती. अर्थात मिर्झाची स्वारीही त्यांस अपवाद नाही. त्यामुळेच पुरंदरचा तह बनताना त्याने विजापूरचा मुद्दा काढत आपल्या मदतीची पेशकश देऊ करत स्वारीत विशिष्ट भूप्रदेशाचा नफा मागत त्याची रोख किंमत देण्याची तयारी दर्शवली. अर्थात यातही त्याचे अंतस्थ हेतू दिसून येतात कि, आदिलशाही प्रदेश मोगलांच्या मान्यतेने मिळाला कि त्यावर त्याचा ताबा अधिकृत समजला जाईल. बाकी पुढे कोणाची साथ करायची व कोणाची नाही, हे ठरवण्यास तो स्वतंत्र होताच कि !


    पुरंदरचा तह म्हटलं तर जुलमाचा रामराम होता किंवा मिर्झाच्या दिखाऊ मुत्सद्देगिरीचा विजय ! त्यापासून फारतर मोगलांचा तात्कालिक, क्षणिक फायदा झाला. स्वतः औरंग या तहास नाखूष असून मंजुरीकरता त्याने बरेच आढेवेढे घेतल्याचा उल्लेख पगडी करतात. शिवाजीबरोबर तह घडत असतानाच विजापूर स्वारीची तयारी करण्यात आली. स. १६६५ च्या नोव्हेंबर मध्ये शिवाजी - मोगलांच्या संयुक्त फौजा विजापुरकरांवर चालून गेल्या.
                                         
                                     ( क्रमशः )