शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

प्रकरण १५) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी




 
    पुरंदरचा तह म्हटलं तर जुलमाचा रामराम होता किंवा मिर्झाच्या दिखाऊ मुत्सद्देगिरीचा विजय ! त्यापासून फारतर मोगलांचा तात्कालिक, क्षणिक फायदा झाला. स्वतः औरंग या तहास नाखूष असून मंजुरीकरता त्याने बरेच आढेवेढे घेतल्याचा उल्लेख पगडी करतात. शिवाजीबरोबर तह घडत असतानाच विजापूर स्वारीची तयारी करण्यात आली. स. १६६५ च्या नोव्हेंबर मध्ये शिवाजी - मोगलांच्या संयुक्त फौजा विजापुरकरांवर चालून गेल्या.

    तत्पूर्वी मोहिमेच्या खर्चासाठी शिवाजीने एक लक्ष होन वार्षिक उत्पन्नाच्या खालसा निजामशाहीतील महालाची मागणी केली. स. १६३६ मधील निजामशाही महालांचा वसूल काय होता व त्या तुलनेने स. १६६५ मधील त्या प्रदेशाचा वसूल व चलनाची घटती - वाढती किंमत या गोष्टी लक्षात घेत मिर्झाने त्यांस दोन लाख रुपये खर्चासाठी देत शिवाजीच्या ताब्यातील प्रदेश वजा करून उर्वरित निजामशाही प्रदेशाची बादशाही खात्यातून वहिवाट होईल तेव्हा मग एक लक्ष होनाचा मुलूख देण्याचे मान्य केले. शिवाय शिवाजीने बादशहाला भरण्याच्या वार्षिक खंडणीचा मुद्दाही असाच काहीसा अधांतरी राहिला. शिवाजीने विजापुरी कोकण व बालाघाटातील मिळून नऊ लक्ष उत्पन्नाच्या प्रांताच्या बदल्यात ४० लक्ष होन वार्षिक हप्तेबंदीने देण्याचे मान्य केले होते. परंतु औरंगने त्याची फक्त विजापुरी कोकणची मागणी मान्य करत बालाघाटातील प्रदेशासंबंधी अप्रत्यक्ष नकार दिला. त्यातही त्याने विजापुरी कोकणची सनद दिली नाही. फक्त आश्वासन देण्यात आले व शिवाजी समर्थ असेल तर त्याने विजापुरी बालाघाट घ्यावा असेही कळवण्यात आले.

    शिवाजी - औरंग यांच्यात नुकत्याच बनलेल्या तहातील अटींचा आपापल्या फायद्यानुसार अर्थ लावण्याची स्पर्धा चालली असता जयसिंगाने ४० लाखांच्या खंडणीचा विषय काढत त्याचा निश्चित पहिला हप्ता मिळत नसल्यास संभाजीला मनसबीखातर मिळणारा मोबदला दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तेव्हा शिवाजीने असा बूट काढला कि, बादशहा त्यांस जी जमीन देणार आहे व जिचे आज उत्पन्न जरी निश्चित नसले तरी संभाजीच्या मनसबीला लागणारे सैन्य तो पुरवील मात्र त्या सैन्याच्या पगाराची रक्कम खंडणीच्या हप्त्यादाखल समजावी. मिर्झाने या सूचनेला संमती दर्शवली व शिवाजीने आपला कार्यभाग साधून घेतला.

    संभाजीच्या मनसबीत जर मोगली सैन्य असले असते तर त्याच्या वतीने काम पाहणाऱ्या नेताजी पालकरने जो काही प्रदेश ताब्यात घेतला असता त्यावर मोगलांचा अधिकार बनत होता. परंतु खंडणी व लष्करी खर्चाच्या कारणास्तव मिर्झाने शिवाजीची सूचना मान्य केल्याने संभाजीच्या नावे आता शिवाजीचे सैन्य लढणार असून जिंकलेला प्रदेश संभाजीच्या --- म्हणजेच शिवाजीच्या ताब्यात राहणार असून तो सोडणे न सोडणे हे त्याच्या मर्जीवर अवलंबून असणार होते.

    विजापुरी स्वारीकरता जयसिंग - शिवाजीत वाटाघाट सुरु असतानाच आदिलशहाने प्रतिकाराची तयारी करतानाच शिवाजीला आपल्या पक्षास वळवून घेण्यासाठी खटपट आरंभली. त्यानुसार शिवाजीला विजापूरकरांच्या प्रदेशाला जिंकून घेत मोगलांच्या मान्यतेची आवश्यकता होती, गरज होती ; तोच मुलूख विजापुरकरांनी त्यांस देऊ केला परंतु त्याने आपल्या पुतण्याला विजापुरी चाकरीस पाठवावे अशी अट घातली. शिवाजीने यांस नकार देत विजापूरकरांनी चालवलेल्या  वाटाघाटींची जयसिंगास कल्पना दिली व त्याने हा वृत्तांत बादशहास कळवला. एकूण दख्खनचे राजकारण शिवजी सोबतच्या तहाने अधिकाधिक गुंतागुंतीचे बनत चालल्याचे दिसून येते.

    शिवाजीला फोडण्याचा प्रयत्न करत असतानाच आदिलने कुतुबच्या मैत्रीस कौल लावला व गोवळकोंडेकरानेही नेहमीप्रमाणे आपल्या शेजाऱ्याची उपेक्षा केली नाही. नेकनामखानासोबत बारा हजार स्वार व काही हजार पायदळ त्याने विजापुरास रवाना केले. तोपर्यंत इकडे विजापूर आघाडीवर युद्ध पेटलं होतं.

    डिसेंबर १६६५ मध्ये शिवाजी - जयसिंग फलटण, ताथवड, खटाव ताब्यात घेत दि. १८ डिसेंबर १६६५ रोजी मंगळवेढ्यास आले. तिथे विजापुरी सैन्याशी त्यांचा सामना झाला. सर्जाखान, खवासखान, व्यंकोजी, घोरपडे वगैरेंनी शिकस्त करूनही त्यांना पराभूत होऊन मागे हटावे लागले. तेव्हा जवळपासचा मुलूख ताराज करत, पाणवठे विषारी करत आदिलशाही सेना मागे सरली. त्यांचा पाठलाग कारत मोगलही विजापुरास आले त्यावेळी जयसिंगास आदिलशहाने आपल्या बचावाची केलेली भक्कम व्यवस्था दिसून आली. किल्ल्याबाहेरील विजापुरी सैन्याचा प्रतिकार करत राजधानीचे स्थळ जिंकण्याचे सामर्थ्य जयसिंगाकडे नव्हते. त्याची फौज व तोफखाना यासाठी बिलकुल पुरेसा नव्हता तरी आहे त्या सामर्थ्यानिशी त्याने डाव मांडला. परंतु सर्जाखानाने विजापुरी बचावाची सूत्रे हाती घेत मोगल सैन्याला सपाटून मार दिला. शिवाजी, दिलेर व जयसिंगासारखे कसलेले मुत्सद्दी व सेनानी त्याच्यापुढे हतबल ठरले. इतक्यात गोवळकोंड्याची फौज विजापूरच्या मदतीस येत असल्याचे कळताच इथे राहून सर्वनाश पत्करण्यापेक्षा माघार बरी म्हणत जयसिंग परतला. परंतु याचा अर्थ असा नव्हे कि त्याने विजापूरचा नाद सोडला.

     यावेळी शिवाजी - जयसिंगाने विजापूरविरुद्ध दोन आघाड्यांवर चढाई करण्याचे ठरवले व त्यानुसार शिवाजी पन्हाळा जिंकून घेण्यासाठी त्या प्रांती रवाना झाला. परंतु दि. १६ जानेवारी १६६६ रोजी मध्यरात्री / पहाटेच्या सुमारास केलेल्या हल्ल्यात शिवाजीला जबर प्राणहानी सोसून पन्हाळ्यावरून माघार घेणे भाग पडले व तो विशाळगडी निघून गेला. यानंतर काही दिवसांनी त्याचा मुख्य सेनापती नेताजी पालकर विजापूरच्या नोकरीत दाखल झाला. नेताजी विजापुरकरांना सामील झाल्याने त्यांचे बळ वाढले तर मिर्झाला मोठा हादरा बसला. कारण नेताजीने मोगली सैन्यावर छाप्यांचे सत्र तर आरंभलेच पण कुतुब, आदिल व नेताजी या त्रिकुटाला शिवाजीही जाऊन सामील होतो कि काय अशीही भीती वाटून गेली. अशा स्थितीत जयसिंगाने नेताजीला आपल्याकडे वळवून घेण्याची शिकस्त करत अडतीस हजार होन बक्षीस, जहागीर व पाच हजारी मनसब देऊ केली. त्याबरोबर नेताजीने पगडी बदलली. ( दि. २० मार्च १६६६ )

    नेताजी पालकर मोगली गोटात येण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडून आल्या. आदिलशहाने शिवाजीच्या ताब्यातील दक्षिण कोकणावर चढाई आरंभली व कुडाळ, वेंगुर्ले फिरून ताब्यात घेतले. मात्र राजापूर - खारेपाटण ह्या प्रदेशात त्याने आक्रमण केले नाही. आदिल - शिवाजी यांच्या दक्षिण कोकणातील झुंजी संहारकही होया व दिखाऊ देखील. आदिलने आपल्या स्वार्थापुरता शिवाजीच्या राज्याचा लचका तोडून दक्षिण कोकणवर पुन्हा रुस्तमेजमानची नियुक्ती केली. जेणेकरून त्या बाजूने आदिल व शिवाजी या उभयतांचेही परस्परांच्या हल्ल्यापासून एक प्रकारे संरक्षणच झाले. कारण रुस्तम - शिवाजी यांची मैत्री तशी जगजाहीर होती. हा सर्व प्रकार शिवाजीच्या हजेरीत व नंतर गैरहजेरीत घडून आला.

     आता आपण शिवाजीच्या आग्रा भेटीचा वृत्तांत पाहू. स. १६६६ च्या जानेवारीत शहाजहानचा आजारपणात मृत्यू झाला व औरंग आता खऱ्या अर्थाने हिंदुस्थानचा सार्वभौम बादशहा बनला. बापाच्या मृत्यूनंतर औरंग सुमारे महिनाभराने आगऱ्यास आला व तेथेच त्याचा काही काळ मुक्काम झाला. याच दरम्यान शिवाजीची आग्रा भेट व पलायन हे प्रकार घडून आले.

    पुरंदर तहाने शिवाजीला बांधून घेतल्यावर औरंगच्या आज्ञेनुसार मिर्झाने विजापूर मोहीम हाती घेतली. परंतु त्यात सलामीलाच पराभवाचे फटके बसल्याने व आदिल - कुतुब - नेताजी असे त्रिकुट जमा झाल्याने चिंतीत झालेल्या मिर्झाने शिवाजीला दख्खन मधून बाहेर काढण्याचे योजले. कारण सध्याच्या राजकरणात जर शिवाजीचा बेत फिरला व तो आदिलच्या पक्षास मिळाला तर मोगलांचा पराभव निश्चित असल्याचे मिर्झा जाणून होता. तेव्हा हर प्रयत्ने शिवाजीला उत्तरेत --- बादशहाच्या भेटीस पाठवण्याचे त्याने मनाशी निश्चित केले व त्यानुसार अशा भेटीसाठी तो दोघांचेही --- औरंग व शिवाजीचे मन वळवू लागला. शिवाजीने आपल्या भेटीस उत्तरेत यावे अशी औरंगची बिलकुल इच्छा नव्हती. त्याचप्रमाणे शिवाजीलाही अशा भेटीची आवश्यकता वाटत नव्हती. औरंगचे धोरण तो चांगलेच जाणून होता व अशा भेटीने पदरात फार काही पडण्याची आशाही नसल्याने त्याने शक्य तितके भेटीस जायचं टाळलं परंतु अखेर मिर्झाने अशी काही जादूची कांडी फिरवली कि, औरंग - शिवाजी परस्परांच्या भेटीस तयार झाले. दुदैवाने या प्रकरणाचे तपशील सध्या तरी अज्ञात असल्याने शिवाजीच्या आग्रा भेटीचे प्रयोजन सांगणे शक्य नाही. परंतु एक आहे, आपल्या गैरहजेरीत राज्याचा कारभार व्यवस्थित चालावा अशी शिवाजीने योजना केली. त्याचप्रमाणे शिवाजीच्या जीवास अपाय होणार नाही अशी व्यक्तिगत हमी मिर्झा राजाने घेतलेली होती. त्यानुसार दि. ५ मार्च १६६६ रोजी शिवाजीने संभाजी व आपल्या निवडक अधिकारी - सैन्यासह आगऱ्यास प्रयाण केले.

    शिवाजी हा स्वतंत्र संस्थानिक म्हणून बादशहाच्या भेटीस येत असल्याने त्याप्रमाणेच त्याचा मान राखण्याची ताकीद औरंगने आपल्या अधिकाऱ्यांना दिली होती. त्याचप्रमाणे त्यांस प्रवासखर्चाकरता एक लक्ष होन शाही खजिन्यातून मंजूर केले असून ५०० स्वारांचा मनसबदार गाझीबेग हा आगऱ्यापर्यंत शिवाजीच्या सोबत असणार होता. शिवाजी सोबत संभाजीच्या आग्रा भेटीविषयी अनेक तर्क इतिहासकारांनी केले असले तरी माझ्या मते, संभाजी हा मोगल मनसबदार असल्याने व अनायासे शिवाजी आगऱ्याला बादशहाच्या भेटीस्तव जाणार असल्याने नव्या मनसबदाराने बादशहाचे दर्शन / भेट घेणे तसे अप्रस्तुत ठरणार नव्हते.

    मिर्झाच्या योजनेप्रमाणे दि. १२ मे १६६६ रोजी चांद्रमासी कालगणनेनुसार औरंगचा पन्नासावा वाढदिवस असल्याने त्या दिवशी भरणाऱ्या दिवाण - इ - आमच्या दरबारात शिवाजीने हजर व्हायचे होते. अर्थात औरंगचीही यांस संमती होती. त्यानुसार सर्व बेत आखण्यात आला खरा परंतु भेट सुरळीत व्हावी अशी बहुधा नियतीचीच इच्छा नसावी.

    मिर्झा राजाने आगऱ्यातील शिवाजीच्या रक्षणाचा जिम्मा आपल्या मुलावर --- रामसिंगावर सोपवला होता. शिवाजीच्या आग्रा भेटीचा वृत्तांत व त्यातील रामसिंगाची वर्तणूक पाहता अशा खोल राजकारणात मुरलेल्या राजकारणी व्यक्तींच्या सोबत वागण्यास रामसिंग तितकासा लायक नव्हता. बापाने आपल्या काय राजकारण खेळलंय, त्याची इच्छा काय ; औरंगचा बेत काय व हे सर्व लक्षात घेऊन शिवाजीसोबत वर्तावे कसे याचा त्याला बिलकुल पोच दिसत नाही.

    दि. ११ मे रोजी शिवाजी आगऱ्यास आला त्यावेळी त्यांस सामोरे जाऊन मुक्कामाला नेण्याची जबाबदारी औरंगने फिदाईखान व रामसिंगावर सोपवली होती. परंतु प्रत्यक्षात यावेळी त्यांस कोणीच सामोरं न आल्याने त्याने आपला तळ मुलूकचंदाच्या धर्मशाळेत ठोकला. रामसिंगला शिवाजीच्या आगमनाची बातमी उशिरा मिळाली तेव्हा त्याने आपला मुन्शी गिरधरलाल यांस त्याच्या भेटीस पाठवून दुसऱ्या दिवशी दरबारात होणाऱ्या बादशाही समारंभाची व भेटीची कल्पना दिली. यावेळी शाही रिवाजानुसार दरबारातील निवडक उमरावांपैकी एकाला आठवड्यातून संपूर्ण एक दिवस बादशाही निवासस्थानाच्या रक्षणाचे काम बघावे लागत असून दि. ११ मे रोजी सकाळीच रामसिंगाची या कामी वर्णी लागल्याने तो दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत --- किमान दहा वाजेपर्यंत या कामातून मुक्त होऊ शकत नव्हता. यामुळे पुढील घटनाक्रमास अनिष्ट वळण प्राप्त झाले.

    दि. १२ मे रोजी सकाळी दिवाण - इ - आमचा दरबार भरण्याचा समय नजीक आला. पहाऱ्याची वेळ संपली नसल्याने रामसिंगाने गिरधरलालला पुन्हा एकदा शिवाजीकडे पाठवून त्यांस आपल्या मुक्कामच्या स्थळी --- फिरोजबागेत आणण्याची सूचना केली. यावेळी, दरबार भरण्यापूर्वी आपली पहाऱ्यातून सुटका होईपर्यंत शिवाजी फिरोजबागेत येईल व आपण त्यांस घेऊन दरबारात हजर राहू अशी रामसिंगाची कल्पना असावी. परंतु नियोजनशून्यता, गलथानपणा यांचा फटका यावेळी सर्वांनाच बसला !

    रामसिंगची पहाऱ्याच्या कामातून सुटका होऊन तो मुखलीसखानासह आपल्या मुक्कामाकडे निघाला तरी शिवाजी अजून निम्म्या वाटेत नव्हता. मग त्याने माणसं पाठवून शिवाजीला प्रवासाचा मार्ग बदलवला व नूरगंज बागेजवळ या दोघांची भेट घडून आली. तोपर्यंत दिवाण - इ - आमचा दरबार उलगडून दिवाण - इ - खासचा दरबार सुरु झाला होता, वा होणार होता. त्यामुळे जलदी करून शिवाजीला दिवाण - इ - खासच्या दरबारात हजर करण्याची रामसिंगाने निकड केली. परंतु शिवाजीसह तो दरबाराच्या स्थळी पोहोचेपर्यंत दिवाण - इ - खासचा दरबारही समाप्त होऊन औरंगजेब घुसलखान्यात --- खलबतखान्यात निवडक मनसबदारांच्या दरबारात आसनस्थ झाला होता.
 
    रामसिंगाने शिवाजी भेटीस आल्याची बातमी आत पाठवून प्रवेशाची परवानगी मागितली असता बादशहाने बक्षी असदखानास शिवाजीला घेऊन येण्याची आज्ञा केली. त्यानुसार असदखान शिवाजीला घेऊन बादशहासमोर हजर झाला. तेथे रिवाजाप्रमाणे शिवाजी व संभाजीने नजर व निसार म्हणून काही रुपये अर्पण केले. त्यानंतर शिवाजीला राजा रायसिंगाच्या पुढे ताहीरखानाच्या जागेवर उभे करण्यात आले, जो पंधरवड्यापूर्वी पंच हजारी मनसबदार बनला होता. त्यानंतर समारंभाच्या रिवाजानुसार सर्वांना विडे देण्यात आले. त्यात शिवाजीला अपवाद करण्यात आले नाही. नंतर मानाची वस्त्रे शहजादे, वजीर जाफरखान व जसवंतसिंगास देण्यात आली. शिवाजीला नाही. यानंतर मग शिवाजीचा राग उफाळून आला व त्याने बादशहाला उद्देशून काही विधानं केली. औरंगकडे पाठ फिरवून तो दरबारातल्या एका बाजूला गेला. तिथे त्याची समजूत घालण्याकरता रामसिंग गेला असता, त्याने त्यासही धुडकावून लावले. घडत्या प्रसंगाकडे सर्वांप्रमाणेच औरंगचेही लक्ष गेले. त्याने रामसिंगला जवळ बोलावून शिवाजीच्या नाराजीचे कारण विचारत मुल्तफितखान, मुखलीसखान व आकीलखान यांना आज्ञा केली कि, शिवाजीची समजूत काढून त्यांस मानाची वस्त्रे देऊन भेटीस आणा. परंतु शिवाजी बधला नाही. सरदारांनी घडला वृत्तांत बादशहास सांगताच औरंगने रामसिंगला शिवाजीस घेऊन मुक्कामाच्या जागी नेण्याची आज्ञा केली.

    शिवाजी - औरंगची हि पहिली व अखेरची भेट. या भेटीची असंख्य वर्णनं सर्वच शिवचरित्रांत कमी - जास्त फरकाने आल्याने भेटीचा फक्त सारांश दिला आहे. औरंग - शिवाजीच्या भेटीचे जे काही तपशील मला उपलब्ध झाले त्यावरून असे दिसून येते कि, औरंगने शिवाजीला भेटीस बोलावून मुद्दाम त्याचा अपमान केला, यात तथ्य नाही. आधी ठरल्याप्रमाणे शिवाजी सोबत त्याची भेट दिवाण - इ - आम मध्ये होणार होती. परंतु रामसिंगाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हि भेट दिवाण - इ - आम मध्ये न होता घुसलखान्यात झाली. घुसलखाना म्हणजे एकांताची, खलबतखान्याची जागा वा स्नानगृह. यास्थळी हा शब्द स्नानगृह या अर्थाने योजला नाही. जर तसे असते तर अनोळखी व्यक्तीस तिथे प्रवेशच मिळाला नसता किंवा मग वर्णनच वेगळे आले असते. तेव्हा हे स्थळ खलबतखानाच समजले पाहिजे व यास्थळी फक्त निवडक लोकांनाच प्रवेश मिळायचा हे लक्षात घेता पूर्वनियोजित नसतानाही औरंगने शिवाजीस आत येण्याचा परवाना दिला व त्यांस आणण्यासाठी बक्षीला रवाना केले यावरून शिवाजीचा उपमर्द करण्याचे त्याच्या मनी होते असे म्हणवत नाही.  तीच बाब शिवाजीला रांगेत उभं करण्याची. मुळात शिवाजी मोगलांचा मनसबदारच नव्हता. त्यामुळे हा प्रश्नही तसाच निकाली निघतो. जर तो मोगली चाकर असता व त्यांस चुकीच्या स्थळी उभे करण्यात आले असते अथवा बादशहा समोर उभं केल्यावर त्यांस मनसबदारी दिल्याचे जाहीर केले असते तर गोष्ट वेगळी. परंतु शिवाजीने मोगलांचे स्वामित्व मान्य केल्याचे कुठेच नमूद नसल्याने यावर काथ्याकुट करणे चुकीचे आहे.

    मानाच्या विड्यांचे वाटप झाले असता त्यात सर्वांचाच समावेश झाला परंतु खिलत वाटपा वेळेस फक्त शहजादे, वजीर व जसवंतसिंग यांनाच त्याचा लाभ झाल्याचा उल्लेख इतिहासकार करतात. ज्याच्या पुढेशिवाजीला उभे करण्यात आले त्या राजसिंग वा रामसिंगास खिलत मिळाल्याचा उल्लेख नाही. यावरून हा बहुमान प्रथेप्रमाणे ठराविक व्यक्तींकरताच असावा असे अनुमान निघते. यानंतर शिवाजीने तत्कालीन दरबारी रिवाजाविरुद्ध रागाने बडबड केली, बादशहास पाठ दाखवली वगैरे वगैरे. तरीही औरंगने आपले अधिकारी पाठवून त्याची समजूत काढण्याचा यत्न करून पाहिला परंतु काम झाले नाही, तेव्हा त्यांस रजा दिली.

    घटनाक्रम पाहता औरंगच्या हातून विशेष काही अपराध घडल्याचे दिसून येत नाही. मिर्झाने शिवाजीची बादशाही भेटीबाबत काय कल्पना करून दिली होती हे मला समजू शकले नाही पण शिवाजीचा अपेक्षाभंग झाल्यामुळेच त्याने दरबारी प्रथेविरुद्ध आचरण केले. दोष इथे द्यायचा कोणाला ? शिवाजी स्वतंत्र सत्ताधीश असला तरी औरंग सार्वभौम बादशहा असल्याने बरोबरीच्या नात्याने भेट केवळ अशक्य. तसेच नियमाबाहेर जाऊन शिवाजीचा मान सन्मान करणेही शक्य नाही. खुद्द शिवाजीनेही पूर्वनियोजित नसता राजगड वा रायगडच्या खलबतखान्यात इतरांस प्रवेश दिला असता का, याचाही विचार व्हावा ! असो.    

     शिवाजी - औरंग वादाची व शिवाजीने बादशहाच्या तसेच बादशहाने शिवाजीच्या केलेल्या अपमानाची, उपेक्षेची चर्चा सर्वदूर होण्यास वेळ लागला नाही. कर्णोपकर्णी बातमी सर्वत्र झाली. बादशहाने मात्र संध्याकाळी सिद्दी फौलादखान व पर्तीतराय हरकारा यांस रामसिंगाकडे पाठवून शिवाजीची समजूत घालण्यास सांगितले. रामसिंगाने याबाबतीत शक्य तितके प्रयत्न आधीच केले होते. त्यात बादशाही आज्ञेची भर पडली. इकडे शिवाजीलाही वास्तव स्थितीची जाणीव झाली. त्याने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संभाजीला रामसिंगाबरोबर दरबारी पाठवण्याचे निश्चित केले. खरे पाहता हीच औरंग - शिवाजीच्या राज्कार्ण्जी शह - प्रतिशहांची सुरवात होती. शिवाजीला आपण कुठे आहोत व आपल्या हातून काय घडलंय याची जाणीव झाली होती. दरबारी दंग्यात एखाद्या संस्थानिकाचा वा सेवकाचा खून पडणे हि त्यावेळी सामान्य बाब असल्याने त्याने दरबारात जायचं टाळणे स्वाभाविक होतं. संभाजी हा अल्पवयीन तसेच मोगल मनसबदार असल्याने त्याच्या बाबतीत औरंग कसा वागतोय यावर शिवाजीचे पुढील डावपेच अवलंबून होते.

    ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी --- दि. १३ मे रोजी सायंकाळच्या दरबारात संभाजी हजर झाला. औरंगने त्यांस एक शिरपाव, हिरेजडीत कट्यार व मोत्यांचा कंठा दिला. तत्पूर्वी सकाळच्या दरबारात त्याने रामसिंगास शिवाजीच्या दरबार आगमनाविषयी विचारले असता रामसिंगाने त्यांस ताप आल्याचे सांगितले.

    नंतर चौदा तारखेलाही शिवाजी दरबारी गेला नाही त्यावेळी मात्र दरबारात हा चर्चेचा विषय बनून शिवाजी व मिर्झा राजा विरोधी गटाने --- विशेषतः जसवंतसिंग, जाफरखान व बादशहाची बहिण जहांआरा बेगम आणि इतर सरदारांनी शिवाजीच्या गैरवर्तनाबाबत त्यांस शिक्षा करण्याचा बादशहाकडे आग्रह धरला. घडल्या प्रकाराने औरंगलाही नाही म्हटलं तरी राग आलेलाच होता. परंतु सरळ निकरावर येणं त्यालाही शक्य नसल्याने त्याने शिवाजीला राजअंदाजखानाच्या हवेलीत नेण्याची सिद्दी फौलादखानास आज्ञा केली. यामागे शिवाजीला अटक वा ठार करण्याचा त्याचा हेतू होता. परंतु रामसिंगास हे समजताच त्याने बक्षी महंमद अमीनखानास गाठून त्यांस स्पष्ट शब्दांत सांगितले कि, बादशहाला जर शिवाजीचा घात करायचा असेल तर सर्वप्रथम त्याने मला व माझ्या मुलाला ठार करावे. अमीनखान बादशहाच्या मर्जीतला गृहस्थ असला तरी त्यांस राजकारणाची यथायोग्य समज होती. त्याने औरंगची भेट घेऊन रामसिंगाचा निरोप त्यांस सांगितला. बादशहाने खडा टाकून राजपुतांची --- विशेषतः जयसिंग व रामसिंगाची निष्ठा एकप्रकारे आजमावून पाहिली. त्याने अमीनखानाच्या हस्ते रामसिंगास उलट निरोप पाठवला कि, शिवाजी आगऱ्यातून पळून जाणार नाही वा बिघाड करणार नाही यासाठी तो जमीन राहील का ? रामसिंगाने तात्काळ होकार दिला. घडला प्रकार शिवाजीस कळून त्याने दुसऱ्या दिवशी रामसिंगास पळून न जाण्याचे वा गैरकृत्य न करण्याचे वचन दिले. तेव्हा लगेच रामसिंगाने आपला लेखी जामीन बादशहास दिला. ( दि. १५ मे १६६६ )

     शिवाजी आगऱ्याहून पळून जाणार नाही वा काही गडबड करणार नाही याविषयी रामसिंग जामीन होऊनही औरंग संतुष्ट नव्हता. त्याने फिरून यत्न म्हणून दुसऱ्या दिवशी रामसिंगास कळवले कि, शिवाजीला तुझ्या मुक्कामापासून दूर ठेवावे. रामसिंगाने यासही हरकत घेतली. तेव्हा शिवाजी संबंधी निर्णय घेण्यासाठी मिर्झाला सल्ला विचारण्याकरता बादशहाने पत्र पाठवले व या पत्राचा जबाब येईपर्यंत शिवाजी आगऱ्याहून निघून जाणार नाही यासाठी रामसिंगाकडून आणखी एक जामीन लिहून घेतला. परंतु गोष्टी यावरच न थांबता त्याच दिवशी सायंकाळी त्याने रामसिंगाची काबुल मोहिमेवर नियुक्ती करत सोबत शिवाजीला नेण्याची आज्ञा केली. त्याचप्रमाणे स्वारीत राजअंदाजखानासही सहभागी होण्याचा हुकुम करून त्यावर रामसिंगाच्या सैन्याची आघाडी सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. रामसिंगासहित सर्वजण समजून गेले कि, औरंगजेब शिवाजीला दख्खनमध्ये परत जाऊ देणार नाही. कैद वा मृत्यू हेच आता त्याच्या नशिबी आहे !

     इकडे शिवाजीने आपल्यातर्फे सुटकेचे प्रयत्न आरंभले. दि. १७ मे रोजी त्याने आपला वकील रघुनाथपंत यांस अर्जीसह बादशहाच्या भेटीस पाठवून दख्खन सुभ्याच्या चाकरीची इच्छा दर्शवत घुसलखान्यात भेटीची विनंती केली. यावर बादशहाने फक्त सबुरीचा सल्ला दिला. तेव्हा औरंगचे मन वळवण्याकरता शिवाजी दुसऱ्या दिवशी रघुनाथपंतासह वजीर जाफरखानाच्या भेटीस गेला. त्यावेळी त्याने आपल्या तर्फे बादशहाकडे अर्ज करण्याची वाजीरास गळ घातली. परंतु वजीर - शिवाजी भेटीच्या दरम्यान वजिराच्या पत्नीस दग्याची शंका आल्याने हि भेट अर्धवटच झाली. परंतु दि. १९ मे रोजी जाफरखानाने शिवाजीतर्फे दरबारात खटपट केली असता औरंगने त्यांस काबूल मोहिमेवर पाठवण्याचा हुकुम मागे घेतला.

    यानंतर वातावरण थोडे निवळले. शिवाजी तळावरून बाहेर पडून शहरात फिरू लागला. दरबारी अमीर - उमरावांना मौल्यवान नजराणे, भेटी पाठवू लागला. इकडे संभाजी रामसिंगासोबत दरबारात हजर होतच होता. अशातच महंमद अमीनखानाने शिवाजीतर्फे बादशहासमोर अर्ज ठेवला. ज्यामध्ये शिवाजीने (१) पुरंदर तहात मोगलांना दिलेले किल्ले परत मागत दोन कोट रुपयांचा शाही खजिन्यात भरणा करण्याची तयारी दर्शवली. (२) दख्खनला जाण्याची आज्ञा मागत संभाजीला दरबारी चाकरीस्तव ठेवण्याची तयारी दर्शवली. (३) बादशाही हुकमाने बादशहा सांगेल त्या मोहिमेवर स्वतः जाण्याची तयारी दर्शवत सध्या दख्खनमध्ये सुरु असलेल्या विजापुरी मोहिमेत सहभागी होण्याकरता आज्ञा देण्याची विनंती केली. शिवाजीच्या या अर्जामुळे औरंग चिडला व त्याने शिवाजीला कोणत्याही दरबारी मुत्सद्द्यास भेटण्याची बंदी करत रामसिंगाच्या घरी जाण्यासही आडकाठी घातली व पाठोपाठ त्यांस तळावरच नजरकैदेत ठेवण्याकरता सिद्दी फौलादखानाची नियुक्ती केली. ( दि. २५ मे १६६६ )                            
                                ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: