शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

प्रकरण ११) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी




    मागील प्रकरणांत आपण पन्हाळ्याचा वेढा व सुटकेची चर्चा केली. आता त्यापुढील घटनाक्रमाचा आढावा घेऊ. 

    जौहरच्या कचाट्यातून निसटून आल्यावर शिवाजीने आपल्या राजकीय धोरणाची फेरआखणी केली. प्रथमतः त्याने दोन्ही सत्तांशी --- मोगल व आदिल --- संघर्षाची भूमिका कायम ठेवत आपल्या सामर्थ्याची चुकून दाखवत जोर आजमाईश केली व स. १६६० च्या सप्टेंबर अखेर किल्ला शेवटपर्यंत लढवणे शक्य असूनही त्याने पन्हाळ्याचा ताबा सिद्दी जौहरकडे दिला. पन्हाळ्याच्या शरणागतीमुळे आदिलशाही तात्पुरती शांत झाली. या गोष्टीचा फायदा घेत शिवाजीने आपला पुढचा डाव आखला. त्यानुसार स. १६६० च्या नोव्हेंबर मध्ये शाहिस्तेखानाकडे त्याने सोनाजी पंडितला वकिली करता पाठवले. या वकिलातीचा उद्देश वा फलित समजण्यास मार्ग नसला तरी यावेळी विरुद्ध पक्षाच्या हेतूंची चाचपणी करण्याचा किंवा मोगलांशी तडजोड करून हि धाड परस्पर विजापुरावर सरकवण्याचा शिवाजीचा बेत असावा. परंतु खान अधिक धूर्त होता.

    औरंगजेबाने सोपवलेली महत्त्वाची कामगिरी कशा प्रकारे पार पाडायची, याचे आरखडे त्याने मनाशी आखले होते. तडफेने लष्करी कारवाया करण्याची दगदग त्याने न स्वीकारता मुत्सद्देगिरीचा अवलंब केला. मर्यादित सैन्याच्या जोरावर शिवाजी - आदिल सारख्या प्रबळ सत्तांना नमवण्यासाठी त्याने प्रथम त्यांची युती होऊच नये असे प्रयत्न केले. नंतर दोघांवरही राजकीय व लष्करी दाबाचा अवलंब केला. राजकीय दबावाअंतर्गत विरुद्ध पक्षाच्या मंडळींना निरनिराळी प्रलोभनं, आमिषं दाखवत त्यांना फोडण्याचा जोराने प्रयत्न चालवला. या बाबतीत शिवाजीच्या संदर्भात त्यांस विशेष यश लाभल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसून येते. त्यामानाने आदिलशाहीतील माहिती मिळत नाही. परंतु स. १६६० च्या नोव्हेंबरमध्ये त्याने परांड्याचा किल्ला ज्या प्रकारे ताब्यात घेतला व स. १६६१ च्या पूर्वार्धात आदिलशहाने विशेष कृपादृष्टी दाखवूनही सलाबतखान सिद्दी जौहरने बंडाचा झेंडा उभारत आपण मोगली सरदार असल्याचे जाहीर करणे यावरून खानाच्या आदिलशाहीतील कारवायांचा अंदाज करता येतो.

    राजकारण व लष्करी कारवायांच्या हिशोबाने शाहिस्तेखानाच्या पुण्यातील दोन ते तीन वर्षांचा मुक्कामही विशेष लक्षात घेण्यासारखा आहे. अलीकडच्या काळात औरंगाबाद हे जरी दख्खन सुभ्याचे मुख्य स्थळ असले तरी हाती घेतलेल्या मोहिमेस जोर येण्याकरता खान पुण्यात येऊन बसला. पुणे म्हणजे शिवाजीच्या राज्याचा गाभा असल्याने त्याच्या उरावर मोगलांचे दडपण आले. खेरीज येथून आदिलशाही सरहद्द अधिक निकट असल्याने तिथेही वेळीअवेळी धाड घालणे सोयीस्कर होते. तसेच शिवाजीच्या राज्यावर हल्ला चढवण्याकरता हे मध्यवर्ती ठिकाण सोयीस्कर असून तिथून त्यांस कोकणात उतरण्याचे मार्गही निकट होते व कोकणात रवाना केलेल्या पथकांचा पाठपुरावा करणेही !

    शाहिस्तेखानाने शिवाजी विरोधात आखलेली रणनीतीही विचारात घेणे अत्यावश्यक आहे. चाकणच्या अनुभवाने खानाने डोंगरी किल्ल्यांच्या नादास लागण्याचे टाळले. त्याने सपाट मैदानी प्रदेश ताब्यात घेत विविध किल्ल्यांच्या कक्षेत येणारी व आपल्या मुख्य छावणीच्या जवळपास असणारी गावं - खेडी उध्वस्त करण्याचा सपाटा लावला. पैकी, पुणे व आसपासचा परिसर शिवाजीच्या सरदारांनीच खानाच्या आगमनावेळी सहेतुक वैराण केला होता. त्यात खानाच्या कृत्यांची भर पडली !

    इथे उभय पक्षांच्या धोरणातील फरक समजावून घेणेही क्रमप्राप्त आहे. मराठी सरदारांचा हेतू म्हणजे प्रदेश वैराण पाहून खान पुण्यात फार काळ राहणार नाही. परंतु बादशाही प्रांत नजीक असल्याने खानाला रसदेची चिंता नव्हती. त्याउलट शिवाजीच्या राजवटीतील गावं - खेडी उध्वस्त करण्यामागे खानाचे अनेक हेतू होते. गावं, वसाहती उजाड झाल्याने शिवाजीची आर्थिक स्थिती खालावेल. लढाऊ सैन्याला विस्थापित तसेच प्रजेकरता अन्नधान्याचा पुरवठा करणे शिवाजीला शक्य होणार नाही. तिसरे म्हणजे शिवाजी प्रति निष्ठा बाळगून असलेले सैन्य, सरदार, जनता मोगली बळ - आक्रमणाचा आवाका पाहून आपल्या पक्षास येऊन मिळेल. खानाच्या या धोरणास लष्करी तडफेची जोड मिळाली असती तर काय झालं असतं हे मिर्झा राजाच्या स्वारी प्रसंगीच्या वृत्तांतावरून सहज लक्षात येईल. असो.

    शाहिस्तेखानाच्या या कडव्या राजकीय व लष्करी चालीला निष्प्रभ करण्यासाठी शिवाजीही शक्य तितके प्रयत्न करत होता. या उभयतांची मुख्यतः जी झुंज झाल्याचे आपणांस दिसून येते ती विशेषतः कोकण प्रांती !

    स. १६६० चा पावसाळा उलटून गेल्यावर खानाने कल्याण - भिवंडी प्रांताकडे आपली पथके रवाना केली. स. १६६१ च्या आरंभास या सैन्याने कल्याण - भिवंडी प्रांतातील काही भूभागाचा ताबा घेतला. खानाची हि कारवाई म्हणजे शिवाजीच्या नुकत्याच स्थापलेल्या आरमारी सत्तेवर भूमीवरून झालेला मर्मभेदी आघात होता. कल्याण प्रांतात गेलेल्या पथकांना तो समग्र भाग त्वरित ताब्यात घेणे शक्य नसल्याने या कारवाईस अधिक पाठबळ देण्याकरता खानाने दुसरी एक कोकण आघाडी उघडत कारतलबखानास कोकणात पाठवले.

    कारतलबखानाने कोकणात उतरण्यासाठी जो मार्ग निवडला तो त्यावेळी प्रचलित होता वा या मार्गानेच कोकणात उतरण्याची खानाची त्यांस आज्ञा होती हे समजायला मार्ग नाही. परंतु काहीशा अडचणीच्या प्रदेशातून वाटचाल करत कारतलब निघाला असता एका सोयीच्या ठिकाणी गाठून शिवाजीने त्याचा धुव्वा उडवला. ( फेब्रुवारी, स. १६६१ ) उंबरखिंडीच्या या संग्रामानंतर या प्रदेशाच्या रक्षणाची जबाबदारी नेताजी पालकर व इतरांवर सोपवून शिवाजी दक्षिण कोकणात रवाना झाला. बहुधा पावसाळा तोंडावर आल्याने मोगल सैन्य या प्रदेशात मोठी हालचाल करणार नाही असा त्याचा अंदाज असावा व किरकोळ हल्ले मारून काढण्यास नेताजी व इतर मंडळी समर्थ असल्याने त्याने दक्षिण कोकणची स्वारी हाती घेतली असावी.

    उत्तर कोकणात या घडामोडी चालू असताना दक्षिण कोकणातील शिवाजीच्या हालचालींची आपण थोडक्यात माहिती घेऊ. प्रथमतः या स्वारीमागील हेतू लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. शाहिस्तेखानाच्या आक्रमणास तोंड देण्याइतपत मनुष्यबळ शिवाजीकडे जरूर होते परंतु या मनुष्यबळास राजी राखण्याकरता, जगवण्याकरता जे आर्थिक बळ आवश्यक होते त्याची पूर्तता करणे हा या मोहिमेचा एक हेतू असला तरी तोच प्रधान हेतू होता असे नाही. आदल्या वर्षीच्या अफझल नंतरच्या कोकण स्वारीत शिवाजीच्या फौजा कोकणात उतरल्या खऱ्या पण पन्हाळ्याचे प्रकरण उपस्थित होऊन शिवाजी तिकडेच अडकून पडल्याने त्यांना ज्या प्रदेशातून माघार घ्यावी लागली ते प्रदेश फिरून ताब्यात घेणे, या प्रांतातील पूर्वी आदिलशाहिस नंतर शिवाजी व आता फिरून आदिलशाहिस रुजू झालेल्या मांडलिकांना जरब बसवत खंडण्या वसूल करणे अशा विविध हेतूंनी प्रेरित होऊन या मोहिमेची आखणी झाली होती. त्यासोबत लष्करीदृष्ट्या उत्तर कोकणात व देशावर पुण्यात मोगलांचा दाब विशेष वाढू लागल्याने प्रदेशविस्तारासाठी तसेच संरक्षणाच्या दृष्टीने दक्षिण कोकणवर ताबा मिळवणे शिवाजीच्या दृष्टीने अत्यावश्यक बनले होते.     

    शिवाजीने या स्वारीत दाभोळ, संगमेश्वर ताब्यात घेऊन राजापुरातून खंडणी वसूल केली. यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात जौहरच्या मदतीला गेल्याबद्दल इंग्रजांना शासन म्हणून त्यांची वखार लुटून काही इंग्रजांना कैदही करण्यात आले. त्यामध्ये रेव्हिंगटन प्रमुख होता. ज्याने जौहरला तोफ व दारूगोळ्याची मदत पुरवून प्रसंगी आपला ध्वज उभारून पन्हाळ्यावर तोफ डागली होती. राजापूरचा कार्यभाग उरकत असतानाच आसपासच्या सौंदळ, नेवरे, कोतवडे, केळवली, कशेळी, खारेपाटण ह्या प्रदेशातूनही खंडण्यांची वसुली करण्यात आली.

    शिवाजी दक्षिण कोकणात गुंतलेला असताना विजापूरकरांच्या हुकमाने शृंगारपुरच्या सूर्याजीराव सुर्वेने संगमेश्वरच्या ठाण्यावर हल्ला चढवून तेथील शिवाजीची पथके मारून काढण्याचा यत्न केला. हल्ला अनपेक्षित व रात्रीच्या सुमारास असल्याने शिवाजीच्या पथकांत थोडी घबराट उडाली परंतु तानाजी मालुसऱ्याने फळी सावरत सुर्व्याला माघार घ्यायला लावली. शृंगारपूरकारच्या या आगळीकीने शिवाजी तातडीने राजापुरातून मागे फिरला. शिवाजीच्या आक्रमणाच्या भीतीने सूर्याजीराव व त्याचा शेजारी पालवणकर जसवंतराव दळवी कुडाळकर सावंताकडे पळून गेले. परंतु शिवाजीचा दरारा इतका कि, सावंताने त्या दोघांसह कुडाळ सोडून चराठे गावच्या एका डोंगरात आश्रय घेतला. तिथेच पुढे सावंतवाडीचा जन्म झाला. असो.

    इकडे दळवी, सुर्व्याच्या मोकळ्या पडलेल्या प्रदेशाचा शिवाजीने ताबा घेत तो प्रांत आपल्या राज्यात समाविष्ट केला. यावेळी त्याने कुडाळकराकडे आपला मोर्चा न वळवता राजगडी प्रयाण केले. याचे मुख्य कारण म्हणजे याच सुमारास मोगलांनी कल्याण - भिवंडी घेतल्याने त्यांना तेहून हुसकून लावण्याकरता शिवाजीला त्या प्रांती जाणे आवश्यक पडले. मोगलांकडून कल्याण - भिवंडीचा ताबा घेण्याचे यावेळी शिवाजीने अनेक प्रयत्न केले परंतु मोगलांनी त्याचे सर्व हल्ले निष्फळ करत पुढे ते पेण पर्यंत वाढून आले व देईरीगडास त्यांच्या एका तुकडीने बुलाखी नावाच्या सरदाराच्या नेतृत्वाखाली वेढा घातला. शिवाजीने कावजी कोंढाळकरास पाठवून तो वेढा मारून काढला.

    यानंतरच्या काळात शाहिस्तेखानावर दबाव आणण्यासाठी शिवाजीने मोगलाई प्रदेशात चढाईचे धोरण स्वीकारले. त्यानुसार सुपे ते परिंडा या भागात नेताजीने धामधूम माजवली. जुन्नर - आंबेगावात मराठी पथके घुसू लागली. या सर्वांवर खानाने आपल्या लष्करी तुकड्या रवाना केल्या. परंतु उभयतांच्या संघर्षाला खरी धार चढली ती पुढच्या वर्षात !

    स. १६६२ मध्ये खानाचा आळस थोडा कमी झाला. बहुधा औरंगने त्याच्या मदतीकरता पाठवलेला जसवंतसिंग याचे कारण असावा. अतिरिक्त फौजफाटा कुमकेस आल्याने खानाने विशाल रणनीती व राजनीतीची आखणी केली.

    स. १६६१ अखेर त्याने खंडणीचे निमित्त ठेवून कुतुबशहाशी कुरापत काढण्यास आरंभ केला. प्रसंग पाहून गोवळकोंडेकरही लढाईची तयारी करू लागले. इकडे शिवाजीच्या मुलखातही आता खानाचा दबाव वाढू लागला होता. ठिकठिकाणी उभयपक्षांच्या सेना परस्परांशी झुंजत असूनही यश कोणालाच मिळत नव्हते. परंतु खान ठासून पुण्यातच बसल्याने शिवाजीच्या गोटांत बऱ्यापैकी चलबिचल होऊन माणसं फुटून जाऊ लागली.

    या संदर्भात पसासं मधील ले. क्र. ९०१ व ९०४ विशेष उपयुक्त आहे. सर्जेराव जेधे व शिवाजीतील या पत्रव्यवहारातून जेध्यांविषयीही शिवाजीच्या मनात साशंकता निर्माण झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे खानाच्या दहशतीने जेध्यांचे लोक फुटून शिवाजीकडे जात असल्याचेही यावरून कळून येते. शिवाय स. १६६२ च्या पर्जन्यानंतर खान भोर, रोहिड खोऱ्यात घुसखोरी करेल या अंदेशाने सर्जेराव जावळीत सुरक्षित स्थळी माणसं नेण्यास उत्सुक असता शिवाजी त्यांस याबाबत अजिबात परवानगी न देता त्यांस त्याच्याच मुलखातील अडचणीच्या जागी राहण्यास सांगत होता. परंतु पसासं ले. क्र. ९०५ हा दि. २३ ऑक्टोबर १६६२ म्हणजे ले. क्र. ९०४ नंतरच्या पुढच्याच महिन्यातील असून त्यान्वये खानाची पथके जेध्यांच्या मुलखात शिरून वस्त्या उध्वस्त करून माणसं धरून नेण्याचा प्रयत्न करू लागल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे खानाच्या पथकांना चकवून त्या भागातील वस्त्या उठवून लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याची आज्ञा शिवाजी सर्जेरावास देतो. तसेच या कामी कुचराई होऊन मोगलांनी माणसं धरून नेल्यास त्याचे पाप जेध्याच्या माथी बसेल असंही लिहितो.
यावरून असे दिसून येते कि, ले. क्र. ९०४ नुसार सप्टेंबर महिन्यातच सर्जेराव ज्यावेळी गावं उठवून विस्थापनाची आज्ञा मागताना जावळीत जाण्याची परवानगी मागतो, त्यावेळी शिवाजी नकार देतो व ज्यावेळी मोगली आक्रमण सुरु होते त्यावेळी मात्र जलदी करून विस्थापनाची तो जेध्यांना आज्ञा देतो. यावरून दोन शक्यता संभवतात. पहिली म्हणजे खानाच्या अशा चालीची शिवाजीस कल्पना नसावी किंवा मग जेध्यांवर तरी त्याचा विश्वास नसावा. अर्थात पहिल्या शक्यतेमागे प्रत्यक्ष आक्रमणाआधीच विस्थापन केल्यास लोकांत घबराटीचे वातावरण पसरण्याची व शत्रूचे आत्मिक बळ वाढण्याची एक शक्यता असली तरी यास्थळी प्रसंग पाहता जेध्यांविषयी शिवाजीच्या मनी निर्माण झालेली साशंकताच अधिक वाटते. असो.

    स. १६६२ मधील इतिहासात नमूद असलेली परंतु कालनिश्चिती नसलेली एक लढाई म्हणजे खासा शिवाजीने पेण नजीक मिरे डोंगरावर जाऊन नामदारखानावर छापा मारला. या झुंजीचा निकाल समजण्यास मार्ग नाही. याच लढाईत किंवा नंतर याच परिसरात घडलेल्या झुंजीत वाघोजी तुपे व काही माणसं जखमी झाल्याचा उल्लेख जेधे शकावलीत मिळतो.

    स. १६६२ साल सरताना व स. १६६३ च्या आरंभास बऱ्याच घडामोडी घडून आल्या. त्यापैकी एक म्हणजे शिवाजी - आदिल यांच्यातील तह व स. १६६१ च्या कोकण स्वारीत जो प्रांत शिवाजीने जिंकून घेतला त्यांस आदिलशाहीची मान्यता. पसासं ले. क्र. ९१७ या दि. ६ फेब्रुवारी १६६३ च्या इंग्लिश पत्रान्वये हि बाब स्पष्ट होते. त्याचप्रमाणे हा तह कितपत टिकेल याविषयी साशंकताही त्यातून दिसून येते.

    शिवाजी सोबत आदिलने हि नरमाईची भूमिका घेण्यामागील कारणपरंपरेची चर्चा पुरेशा पुराव्यांअभावी करता येत नसली तरी पसासं मधील काही लेखांक, शिवचरित्र निबंधावलीतील विवेचन लक्षात घेता याच काळात आदिलशहा कर्नाटकातील युद्धांत गुंतल्यामुळे कोकण प्रांती मोहीम काढण्यास त्यास पुरेसे सैन्यबळच नव्हते असे म्हणता येते. अर्थात हि एक शक्यता झाली परंतु यास्थळी हे मात्र स्पष्ट होते कि, काही काळ का होईना आदिलने दक्षिण कोकणातील शिवाजीच्या राज्यविस्तारास मान्यता दिली होती व हा एकप्रकारे शिवाजीचा राजनैतिक विजय म्हणता येईल त्याचप्रमाणे त्याच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीकही !

    इकडे मोगलांच्या आक्रमक धोरणाची उपलब्ध साधनांत जी माहिती मिळते ती अशी :- पसासं ले. क्र ९२३ या राजापुरातून लिहिलेल्या इंग्लिश पत्रानुसार स. १६६३ च्या मार्च अखेरपर्यंत मोगलांचे १२००० घोडेस्वार वरच्या चौलमध्ये पावसाळी छावणीची तयारी करत असून सात हजार घोडदल रहिमतपुरास होते. नेताजी मोगलांच्या मुलखात घुसला असता उपरोक्त दोन छावण्यांपैकी एका पथकाने त्याचा जोराचा पाठलाग करून त्यांस हुसकून लावले. यावेळी नेताजी आश्रयासाठी विजापुरी प्रदेशात शिरला. बहुधा रुस्तमेजमानच्या जहागिरीत. कारण रुस्तमने मोगलांशी वाटाघाटी करून नेताजीच्या पाठलागाची जबाबदारी घेत मोगलांना वाटेस लावले. हा प्रकार विजापूर नजीक पंधरा मैलांवर घडून आला. यासमयी आदिलशहालाही मोगलांची दहशत पडून तो आपल्या पत्नीसह १०० घोडेस्वार घेऊन बंकापुरास पळाला. पसासं ले. क्र. ९२७ या मजकुरास पूरक असून या इंग्लिश पत्रानुसार बंकापुर हे बहलोलखानाच्या जहागिरीचे स्थळ असून त्याचे आदिलशहाशी वाकडे व शहाजीशी स्नेहसंबंध असल्याने बहलोलच्या आईने आदिलला शहरात प्रवेश दिला नाही. तसेच मोगलांनी केलेल्या नेताजीच्या पाठलागात त्याचे ३०० घोडे पडून तो स्वतःही जखमी झाल्याचा वृतांत आहे.

    पसासं ले. क्र. ९२५ हा स. १६६३ च्या एप्रिल आरंभाचा असून त्यातील मजकुरावरून असे दिसून येते कि, कोकणात नामदारखानाचा जोर वाढू लागल्याने वा त्यांस हाकलून लावण्यासाठी शिवाजीने मोरोपंत व निळो सोनदेव यांची योजना केली होती परंतु याच सुमारास सिंहगडावरील शिबंदीत फितूर झाल्याची बातमी आल्याने शिवाजीने त्यांना तातडीने कोकणची मोहीम सोडून सिंहगडी जाऊन तेथील बंदोबस्त करण्याची आज्ञा केल्याचे दिसून येते.

    सिंहगडावरील शिबंदीत चलबिचल झाल्याने शिवाजीला खानाच्या बंदोबस्तासाठी एका निश्चित अशा उपक्रमाची, धोरणाची अत्यंत आवश्यकता वाटून त्याने एक धाडसी बेत मनाशी आखला !
                                      ( क्रमशः )

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

सुंदर लेख. अशा मोहिमांमध्ये गावांची, गडांची नद्यांची नावे हवे तिथे बाण दर्शवून आणखीन माहितीपूर्ण होईल.