शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

प्रकरण १२) सम्राट शिवाजी : काही दुर्लाक्षित बाबी




    शाहिस्तेखानावरील छापा ! शिवचरित्रातील जी अनेक रोमहर्षक, अद्भुत भासणारी प्रकरणं आहेत त्यांपैकी एक. ज्याभोवती अनेक दंतकथा, काल्पनिक गोष्टींचा गराडा पडून मूळ घटनाक्रम अगदीच झाकोळून गेला. तसं पाहिलं तर मूळ घटनाक्रमाची माहिती देणारी साधनं तरी कुठे आहेत ? त्यामुळे हाती लागेल त्या तपशिलावर प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार हे प्रकरण रंगवण्याचा, मांडण्याचा यत्न केला. अशांपैकी हा एक.


    प्रथम आपणांस हे समजावून घेणे आवश्यक आहे कि, स. १६६० पासून स. १६६३ अशी जवळपास दोन - अडीच वर्षं खानाचा पुण्यात मुक्काम असतानाही या अवधीत शिवाजीने असा काही एक धाडसी उपक्रम वा पवित्रा न घेता नेमका याच वेळी का घेतला. याची कारणपरंपरा शोधण्यास फार मागे जाण्याची गरज नाही. मान्यवर इतिहासकारांच्या मते सिंहगडावरील शिबंदीत झालेली फितुरी हा शिवाजीच्या काळजीचा विषय बनली. पुण्याच्या निकट असलेले संरक्षणाच्या दृष्टीने मोक्याचे असे जे निवडक गड होते त्यांपैकी एक म्हणजे कोंडाणा ! या किल्ल्याचे महत्त्व शिवाजीच्या एकूण कारकिर्दीत व पुढे मराठी राज्याच्या इतिहासात किती होते, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे अशा किल्ल्यावरील शिबंदीत जर फितुरी होते तर उद्या हाच धोका सिंहगडानजीकच्या राजगडावरही उद्भवू शकत होता. जिथे खुद्द शिवाजी व त्याच्या परिवाराचे वास्तव्य होते तसेच राज्यकारभाराचे मुख्य केंद्रही. एकप्रकारे राजगड हि शिवाजीची राजधानी असून नजीकच्या सिंहगडावर भेद होणे म्हणजे प्रत्यक्ष राजधानीच धोक्यात येण्यासारखे होते. अशा स्थितीत शिवाजीला खानाच्या कारवायांची गय करून चालण्यासारखे नव्हते. त्याचप्रमाणे सर्व सैन्य एकवटून थेट खानाच्या छावणीवर हल्ला चढवण्याचा जरी उपाय त्याच्या हाती असला तरी एकाच लढाईत सर्वस्व पणाला लावण्याचा जुगार शिवाजी सहसा कधी खेळला नाही व राज्यकर्त्याचा मुळात तो धर्मच नाही ! त्यामुळे असा काहीतरी उपाय योजून ज्यायोगे खानाचा पुण्यातून उठवा होईल, मोगलांना तसेच आपल्या पक्षातील डळमळीत मंडळींना दहशत बसेल असे कृत्य करण्याचा वा उपक्रम स्वीकारण्याच्या दृष्टीने शिवाजीने बेत आखला. त्यानुसार निवडक लोकांनीशी थेट खानाच्या तळावर अकस्मात हल्ला चढवून कार्यभाग साधून बाहेर पडण्याचे ठरले. त्यानुसार दिवस, व्यक्ती, स्थळे यांची निश्चिती करण्यात आली. प्रथम या घटनांचा कालक्रम देतो व मग खानावरील हल्ल्याची माहिती देणाऱ्या साधनांतील वृत्तांत व त्यांची चर्चा आपण करू.


    पसासं ले. क्र. ९२५ हा दि. ३ एप्रिल १६६३ चा आहे. त्यातील मजकुरान्वये मोरोपंत व नोलो सोनदेवावर कोकणात नामदारखानावर चालून जाण्याची शिवाजीने जबाबदारी सोपवली होती. परंतु आयत्या वेळी सिंहगडावर फितूर झाल्याचे कळताच त्यांना तातडीने तिकडे जाऊन गडाचा बंदोबस्त करण्याची आज्ञा देण्यात आली. हेच पत्र डॉ. नभा काकडेंच्या ' छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे ' मध्ये समाविष्ट असून त्याची तारीख २ एप्रिल १६६३ अशी दिली आहे. असो.


    शाहिस्तेखानावरील छाप्याची सुरवात एकप्रकारे या पत्रापासून होते. दि. २ वा ३ एप्रिल रोजी शिवाजी निळो सोनदेव व मोरोपंतास सिंहगडावर जाण्याची आज्ञा देतो. त्यानंतर इतिहासात नोंद होते दि. ६ एप्रिल १९६३ रोजी पहाटेपूर्वी मध्यरात्री केव्हातरी शिवाजीने शाहिस्तेखानाच्या तळावर हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची. मधल्या दोन दिवसांतील शिवाजीच्या हालचाली व छाप्याचे वर्णन यासाठी प्रथम आपण समकालीन साधनांतील माहिती विचारात घेऊ.


    शाहिस्तेखानावरील छाप्याच्या संदर्भात अधिक विश्वसनीय व जवळची माहिती मिळते ती इंग्रजी पत्रात. पसासं ले. क्र. ९३० मधील माहिती पुढीलप्रमाणे आहे :-


इं. फॅ. भाग ११ }     (९३०)     { श. १५८५ चैत्र शु. १५

पृ. २३६ } राजापूर - गिफर्ड - सुरत   { इ. १६६३ एप्रिल १२


रावजी पंडित परत आला आहे. काल राजाने रावजीला स्वतः लिहिलेले पत्र आले [ A letter from the Rajah, written by himself to Raoji ]  त्यांत शिवाजी ४०० निवडक लोकांसह जातीने शाइस्तेखानाच्या तळावर गेला त्याची हकीकत आहे. कांही बहाणा करून तो सलाम करण्यासाठी म्हणून शाइस्तेखानाच्या तंबूंत गेला. आणि लगेच पहारा साफ मारून, शाइस्तेखानाचा वडील मुलगा, त्याचा जावई, त्याच्या १२ बिब्या, ४० मोठे दरकदार, मोंगलांचा सेनापति, इतक्यांचे प्राण हरण करून खुद्द शाइस्तेखानाला आपल्या स्वतःच्या हाताने जखम करून ( त्याला तो मेला असे वाटले होते. परंतु नंतर तो जिवंत आहे असे त्याने ऐकले. ) त्याच्या आणखी ६ बायका, आणि दोन मुलगे, शिवाजीने ठार केले. या सगळ्या भानगडीत त्याचे फक्त ६ सैनिक मेले आणि ४० जखमी झाले ! १० हजार घोडेस्वारांचा अधिपती राजा जसवंतसिंग समीप असून पाठलाग न करितां स्तब्ध राहिला. यावरून त्याचे यांत अंग होते असे सगळ्यांना वाटते. शिवाजी मात्र ' आपल्याला परमेश्वराने हे कृत्य करण्याचा संदेश दिला ' असे आपल्या लोकांना सांगतो.

( कंसातील मजकूर संपादकांनी घातलेला आहे. )

     


    यानंतर क्रम लागतो तो जेधे शकावली - करिना, भीमसेन सक्सेना, सभासद बखर, खाफीखानाचा वृत्तांत याचा. परंतु विश्वसनीय साधनाची कसोटी लावायची झाली तर पसासं मधील उपरोक्त लेखांक व जेधे शकावली - करिना तसेच भीमसेन सक्सेना व खाफीखान यांचेच लेख विचारात घेणे भाग आहे. त्यादृष्टीने प्रथम जेधे शकावलीतली नोंद पाहू.


शके १५८५ शोभकृतसंवछरे

चैत्रश्रुध अष्टमी रविवार शास्ताखानावरी पुणियात सिवाजी राजा खासा जाऊन छपा घातला, शास्ताखानाचा हात तुटला मग पळाला त्याचा लेक आबदुल फते ठार जाला लाल माहलात सिरले तेव्हा कान्होजी नाईक जेधे याचा पुत्र चादजी नाईक समागमे युध्यसमई होते सर्ज्याराऊ स्वाराच्या जमावात नदी पलिकडे ठेविले होते. राजश्री स्वामी लाल माहलचे दिंडीने बाहेर निघताच घोडियावरी बैसोन निघोन स्वारा बराबर कर्यात मावळात निघाले वरकड जागा जागा लस्करच्या टोल्या ठेविल्या होत्या. त्यांही निघाल्या.


    शकावलीच्या या नोंदीची सुधारित वाढीव आवृत्ती म्हणजे करिना. तो येणेप्रमाणे :-

त्यावरी शके १५८५ शोभकृत संवछरी चैत्र श्रुध अष्टमी रविवारी लोकाची निवडी करून पुणीयात  राजश्री स्वामीनी खासा १ दाहा लोकानसी लाल माहालात जाऊन शास्ताखानावरी छपा घातला बा| कान्होजी ना| यांचे पुत्र चांदजी जेधे होते मारामारी जाली तेव्हा शास्ताखानाचा हात तुटला मग पळोन गेला त्याचा लेक अबदुल फते ठार जाला त्या उपरी स्वामी परसातील दिंडीने बहीर निघाले तों सर्जाराऊ जेधे घोडियावरी बैसोन पागेचा घोडा दुसरा खासदारा जवल देऊन दिंडी समीप आज्ञेप्रमाणे राहिले होते राजश्री स्वामी येताच घोडियावरी बैसोन मुळा उतरोन जेरसाकडे निघाले जागाजागा लस्करच्या टोळ्या व करणे नगारे ठेविले होते त्यांची गुली ( आवई, गडबड ) मोगलाच्या लस्करात जाली राजश्री स्वामी हशमाच्या व लस्करच्या जमावानसी दुसरे दिवसी सिहगडास आले


    आता प्रथम भीमसेन सक्सेना व खाफीखानचे वृत्तांत पाहू.     

" शायिस्ताखान हा पुण्यात होता. तेथे त्याने एक हवेली बांधली .... शिवाजीने आपल्या हेरांकरवी शायिस्ताखानाच्या लष्कराच्या बाजाराची आणि वाटांची इतकी बारीकसारीक माहिती काढली की जणू काय त्याने स्वतःच ती स्थळे अनेकदा आपल्या नजरेखालून घातली होती. एके दिवशी ( पाच एप्रिल १६६३ ) शिवाजी हा दोनशे अनुभवी आणि कसलेल्या लढवय्यांना बरोबर घेऊन आणि वीस कोसांचे अंतर पायी कापून रात्रीचे दोन प्रहर झाले असता आला. जसवंतसिंगांच्या बाजाराजवळून तो पुढे सरकला. नंतर तो शायिस्ताखानाच्या मुदपाक - खान्यापाशी आला. खानाच्या जनानखान्याच्या इमारतीच्या भिंतीला त्याने भगदाड पाडले. आपल्यापैकी दोघातिघांना त्याने आत पाठविले. त्यांच्या पाठोपाठ तोही आत आला. इतर दहा माणसे त्याच्या मागोमाग आली. जनानखान्यातील दासींनी शायिस्ताखानाला कळविले की भिंतीत भोक पाडून काही माणसे घुसली आहेत. यावर शायिस्ताखान हा आपले शय्यागृह सोडून वाड्याच्या ओसरीवर आला. अंधारी रात्र होती. कोण माणसे आली समजेना. त्यांच्याकडून शायिस्ताखानाला दोन जखमा जाल्या. वाड्याच्या दुसऱ्या दिवाणखान्यात अनेक दिवे जळत होते. शायिस्ताखानाचा मुलगा अबुल्फतेह हा तेथे झोपला होता. तोच शायिस्ताखान होय असे समजून लोक त्या तरुण माणसावर तुटून पडले. त्याहे डोके कापून घेऊन ते आपल्याबरोबर घेऊन गेले.


या सुमारास शायिस्ताखान हा घाबरलेल्या स्थितीत दिवाणखान्याच्या देवडीवर आला. बरोबर काही शिपाई होते. त्यांना त्याने आत पाठविले. थोडीबहुत मारामारी झाली. शिवाजी हा सुरक्षितपणे निघून गेला. अद्यापपर्यंत कोणाही राजाने मोगल सरदाराविरुद्ध असे युद्ध किंवा धाडस केले नव्हते. " 


    खाफीखानचा वृत्तांत :-

" बादशहांना कळविण्यात आले की शिवाजीने अमीरुल उमरा ( शायिस्ताखान ) याच्यावर त्याच्या राहत्या वाड्यात रात्री छापा घातला. हल्ल्यात शायिस्ताखानाचा मुलगा अबुल्फतेखान हा मारला गेला. आणि शायिस्ताखान हा जखमी झाला. माझे वडील शायिस्ताखानाच्या पदरी होते आणि या ( दक्षिणच्या ) मोहिमेत ते शायिस्ताखानाबरोबर होते. त्यांच्याकडून या हल्ल्याचा तपशील मला जो कळला तो पुढे देत आहे.


नियम असा करण्यात आला होता की कोणीही सशस्त्र अगर निःशस्त्र मनुष्य विशेषतः मराठा, (  जर तो मोगल चाकरीत नसेल तर ) परवान्याशिवाय शहरात अगर लष्करात येता कामा नये. मराठे स्वारांना मोगलांच्या चाकरीत घेण्यात आले नाही.


एके दिवशी मोगलांच्या पदरी असलेले काही मराठे पायदळ शिपाई कोतवालाकडे गेले. लग्नाची मिरवणूक आहे असे सांगून त्यांनी दोनशे मराठ्यांच्यासाठी परवाने मिळविले. एका मुलाला नवरदेवाचा पोशाख घालण्यात आला. त्याच्याबरोबर मराठ्यांची मिरवणूक होती. बरोबर ताशेवाजंत्री होती. ही वरात संध्याकाळच्या सुमारास पुण्यात शिरली.


त्याच दिवशी संध्याकाळी आणखी एका तुकडीला शहरात येऊ देण्यात आले. सांगण्यात असे आले की, मोगलांच्या एका लष्करी ठाण्यावर गानिमांचे ( मराठ्यांचे ) लोक पकडण्यात आले. या लोकांचे हात बांधण्यात आले होते. ते उघडेबोडके होते. पहारेकरी त्यांना दोराने बांधून हाकलीत होते, आणि इरसाल शिव्या मोजीत होते. ते कैदी आणि पहारेकरी लष्करी चौकीच्या समोरूनच शहरात गेले.

लग्नाच्या मिरवणुकीतील माणसे, आणि कैदी आणि पहारेकरी असल्याची बतावणी करणारी माणसे नंतर एका पूर्वीपासून ठरविलेल्या वाड्यात एकत्र झाली. तेथे त्यांनी शस्त्रे धारण केली. माध्यान्ह रात्रीचा नगारा वाजताच ही सर्व तुकडी निघाली आणि खानाच्या वाड्याच्या मुदपाक - खान्याजवळ आली. हा मुदपाकखाना, शायिस्ताखानाच्या जनानखान्याला लागून होता. मुदपाकखान्याच्या भिंतीत आणि जनानखाना यांच्यामध्ये एक लहान खिडकी होती. ती चुना आणि विटा यांनी बुजविण्यात आली होती. मराठ्यांच्या तुकडीला या खिडकीची माहिती होती. मराठे खिडकीकडे गेले. तो रमजानचा महिना होता. सकाळच्या नाश्त्याची तयारी करण्यासाठी म्हणून काही स्वयंपाकी उठले होते बाकीचे झोपले होते. मराठ्यांच्या तुकडीला वाड्यातील वाटा माहित होत्या. मराठे खानाच्या नोकरांवर तुटून पडले. जे नोकर उठले होते त्यांना ठार मारण्यात आले होते. झोपलेल्यांना त्याच अवस्थेत मारून टाकण्यात आले. मराठ्यांनी लोकांना विव्हळू देखील दिले नाही. यानंतर मराठे खिडकीकडे धावले आणि ती बुजविलेली खिडकी फोडू लागले. खिडकीला लागूनच एका दासीची खोली होती. तिला कुदळीचे आवाज आणि जखमी लोकांचे विव्हळणे ऐकू आले. ती शायिस्ताखानाकडे गेली आणि बाहेर गलका चालू असून कुदळीचे आवाज ऐकू येत आहेत असे त्याला सांगितले. खान तिला रागे भरला. तो म्हणाला, " स्वयंपाकी उठून भांडीकुंडी धूत असतील आणि नाश्त्याची तयारी करीत असतील. " पण नंतर एकामागून एक दासी आल्या. त्यांनी सांगितले की भिंतीतील खिडकी उघडण्यात येत आहे. यावर शायिस्ताखान घाबरला. त्याने धनुष्यबाण आणि भाला ही शस्त्रे घेतली. आता तो पूर्णपणे जागा झाला होता. याच वेळेस समोरून काही मराठे आले. त्यांच्या आणि खानाच्या मध्ये पाण्याचा एक हौद होता. शायिस्ताखानाने एका मराठ्यावर बाण मारला. तो मराठा शायिस्ताखानाजवळ आला आणि त्याने खानावर तलवारीचा वार केला. त्या वाराने खानाचा हाताचा अंगठा तुटून पडला. याच वेळेस दोन मराठे समोरच्या पाण्याच्या हौदात पडले. खानाने आपल्या भाल्याने एका मराठयास पाडले.

हा गोंधळ पाहून खानाच्या दासींनी संधी साधली. त्यांनी खानाचा हात धरून त्याला सुरक्षित स्थळी नेले. यानंतर मराठ्यांची एक तुकडी वाड्याच्या पहाराचौकीवर गेली, ' असाच पहारा देत असता काय ' असे म्हणून त्यांनी जागत असलेल्या आणि झोपलेल्या पहारेकऱ्यांना ठार मारले. काही मराठे नगारखान्यावर गेले. ते नगारे वाजविणाऱ्यांना म्हणाले, " नगारे जोरात वाजवा असा खानाने हुकुम दिला आहे. " नगाऱ्यांचा आवाज इतका मोठा होता की दुसरे काही ऐकू येईना. मराठ्यांनी उठविलेला गलकाही विलक्षण होता. मराठ्यांनी वाड्याचे दरवाजे बंद केले होते. अशा परिस्थितीत खानाचा मुलगा अबुलफत्ते घटनास्थळी धावला. त्याने दोघा - तिघांना मारले अगर जखमी केले. अबुलफत्तेही मारला गेला.


खानाचा एक सरदार खानाच्या वाड्याजवळ राहात होता. वाड्यातील हलकल्लोळ त्याने ऐकला. वाड्याची दारे बंद होती. भिंतीला दोराची शिडी लावून त्याने आतील अंगणात उडी घेतली. तो शायिस्ताखानाच्या वयाचा असून त्याच्याप्रमाणेच दिसत असे. तो शायिस्ताखान असे समजून मराठे त्याच्यावर तुटून पडले. त्यांनी त्याचे डोके कापून नेले. शायिस्ताखानाच्या दोन आवडत्या बायका या गोंधळात सापडल्या. एका बाईचे इतके तुकडे झाले होते की ते तुकडे एकत्र ठेवून तिचा देह पेटीत घालून पुरावा लागला. दुसऱ्या बाईला चौतीस जखमा झाल्या होत्या. पण त्यांतून ती वाचली आणि बरी झाली. "


भीमसेन व खाफीखानचा वृत्तांत श्री. सेतू माधवराव पगडी यांच्या ' श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ ' मधून घेतला आहे.


    एकूण पाहता सर्व साधनं परस्परविरुद्ध माहितीने भरलेली दिसून येतात. जेधे शकावली व करिना हा हल्ला लाल महाली झाल्याचे सांगतात. खाफीखान राहत्या वाड्याचा उल्लेख करतो पण तो कोणता हे सांगत नाही. भीमसेनच्या मते शाहिस्तेखानाने पुण्यात स्वतंत्र हवेली बांधली होती. यांपैकी विश्वास तरी कुणावर ठेवायचा व वृत्तांत तरी कोणता खरा मानायचा ?


    उपरोक्त साधनांपैकी माहितीचा मूळ स्त्रोत व लेखनकाल हे दोन निकष लावले असता पसासं ले. क्र. ९३० हाच सध्या तरी अव्वल आहे. घटना घडल्यावर लगेचच शिवाजीने स्वहस्ते लिहिलेल्या पत्रात या घटनेचा वृत्तांत असून तोच रावजी पंडिताने इंग्रजांना सांगितल्याचे दिसून येते. त्यामानाने इतर साधनांतील उणीवा सहज लक्षात येतात.


    मूळ जेधे शकावली कधी लिहिली याचा पत्ता नाही. आज ज्या काही प्रति उपलब्ध आहेत त्या अस्सल नसून नक्कल आहेत. शिवाय शकावली प्रथम व नंतर करीन्याची निर्मिती झाली आहे. तसेच शकावली मूळ घटनेतील सहभागी व्यक्तींनी लिहिली कि त्यांच्या आज्ञेने व त्यांनी पुरवलेल्या माहितीने हा देखील प्रश्न आहेच. खेरिज शकावली व करीन्यातील तपशीलातील फरकही महत्त्वाचा ठरतो. सभासद बखर स. १६९० नंतर रचण्यात आल्याने तिचा येथे विचार अप्रस्तुत आहे. राहता राहिला भीमसेन व खाफीखान !


    पैकी भीमसेनचा चुलता श्यामदास यावेळी खानाच्या बक्षीचा चिटणीस म्हणून पुण्यात कार्यरत असल्याचे तर भीमसेन औरंगाबाद मुक्कामी असल्याचे पगडींनी लिहिले आहे. भीमसेनच्या चुलत्याने लिहिलेला वृतांत माझ्यासमोर नाही त्याचप्रमाणे भीमसेनने या घटनेचे वर्णन नेमके कधी केले याचा कालनिर्देशही मला उपलब्ध नाही. तेव्हा हल्ल्याची पुष्टी होण्यापलीकडे या साधनाचे सध्या तरी महत्त्व नाही.


    खाफीखानाची तर बाबच निराळी ! त्याचा बाप शाहिस्तेखानाच्या पदरी असून हल्ल्याच्या वेळी खानाच्या छावणीत होता असे पगडी सांगतात. त्याने घडली घटना मुलाला सांगितली व त्यावर म्हणजे, पगडींच्या मते स. १७३४ मध्ये खाफीखानाने आपला इतिहास लिहिला, तीन चार दशकांनी खाफिखानाने आपल्या इतिहासात या घटनेची तपशीलवार नोंद केली. त्यामुळे याही वृत्तांताचा हल्ल्याची पुष्टी याखेरीज काही उपयोग नाही.     


    एकूण सर्व उपलब्ध साधने लक्षात घेता दि. ५ एप्रिल रोजी रात्री शिवाजी निवडक लोकांसह पुण्यात शिरला. पुण्यात शिरण्यापूर्वी परतीच्या मार्गावर त्याने काही लष्करी तुकड्या पेरल्या. पुण्यात शिरल्यावर खानाच्या तळावर जाऊन त्याने एकदम हल्ल्यास आरंभ करून सरसकट कत्तल आरंभली व खानाची छावणी सावध होऊ लागल्यावर त्याने तळावरून बाहेर पडत सुरक्षित स्थळी प्रयाण केले.

या संपूर्ण हल्ल्याचे नियोजन, तपशिलाची काळजीपूर्वक आखणी इतकी अचूक, गुप्त होती कि प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांखेरीज इतरांना यासंबंधी कल्पना होती कि नाही याची शंकाच येते. दुदैवाने या अद्भुत, रोमहर्षक घटनेचे तपशीलवार वृत्तांकन उपलब्ध नसल्याने यासंबंधी अधिक काही लिहिणेही शक्य नाही. मात्र या अनुषंगाने प्रचलित काही गोष्टींविषयी माझे मत मांडून या प्रकरणाचा समारोप करतो.


    शाहिस्तेखानावरील हल्ला हा लाल महाल, खानाचा डेरा वा त्याच्या स्वतंत्र हवेलीत झाला, हा थोडा वादग्रस्त मुद्दा आहे. कित्येकांनी लाल महाल स्वीकारलाय तर काहींनी डेरा. बऱ्याचजणांनी लाल महालातच खानाचा डेरा असल्याचे सांगत उपलब्ध साधनांच्या आधारे हल्ल्याचे चित्र रंगवण्याचा निष्फळ प्रयत्न केलाय. परंतु खुद्द शिवाजीच्या पत्राचा संदर्भ घेत लिहिलेलं इंग्लिश पत्र विचारात घेतलं असता हा हल्ला खानाच्या डेऱ्यावरच झाल्याचे निश्चित होते.


    प्रस्तुत हल्ल्याचे उद्दिष्ट खानाला ठारच करायचे होते असं नसून त्यांस दहशत बसून पुण्यातून जाण्यास भाग पाडणे, हे होते. या दरम्यान खान मारला गेला असता तरी शिवाजीकरता ती इष्टापत्तीच होती. परंतु खान मारला जाईलच अशा हेतूने प्रेरित होऊन जर या हल्ल्याचे नियोजन असते तर खानाच्या छावणीवर त्याच रात्री शिवाजीच्या सैन्याने हल्ला चढवला असता. तात्पर्य, खानाला दहशत बसवणे व साधल्यास ठार मारणे असं या मोहिमेचं उद्दिष्ट मानता येईल.


    बाकी, हे प्रकरण लिहीपर्यंत मला व्यक्तीशः हे मान्य नव्हतं कि या हल्ल्यात शिवाजीचा सहभाग असेल म्हणून. कारण अशा हल्ल्याने खान नाहीसा झाला तरी त्यायोगे मोगल बादशाहीस हादरा बसण्याचे काही कारण नव्हते. किंबहुना यानंतरच्या जयसिंगाच्या स्वारीनेही हेच सिद्ध होते. दुसरे म्हणजे अशा हल्ल्यात दगा झालाच तर पुढील नियोजनाची कसलीच तरतूद केली नसल्याचे उपलब्ध साधनांतून दिसून येते. तुलनात्मकदृष्ट्या पाहिले तर अफझल प्रसंगी तसेच आगऱ्यास जाताना शिवाजीने आपल्या अनुपस्थितीत वा पश्चात कारभार कसा करावा याचे नियोजन केल्याचे दिसून येते, तसे इथे काहीच दिसत नाही. तिसरं म्हणजे हल्ल्याचा वृत्तांत पाहता आत शिरलेल्या सैन्याने थेट कापकापीस आरंभ करून लगेच चटका करून माघार घेतलीय. विशिष्ट व्यक्तीचा शोध वगैरे घेण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. तसेच अशा हल्ल्यात शत्रूची नासाडी करतना आपल्या सोबत असलेल्या राजाच्या रक्षणाच्या जबाबदारीही त्यांच्यावर असल्याने हल्ल्याच्या समयी लक्ष विचलित होऊ शकते. त्यामुळे शिवाजी प्रत्यक्ष हल्ल्यात हजर नसून तो छावणीपासून लांब अंतरावर असलेल्या पथकांमध्ये होता, असे माझे मत होते. परंतु उपलब्ध पुरावे पाहता या मतास बिलकुल किंमत नसून घडल्या कृत्यात शिवाजीचा सहभाग असल्याचेच स्पष्ट होते.

                                        ( क्रमशः )    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: