गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

प्रकरण १३) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी





    शाहिस्तेखानावरील धाडसी हल्ल्यामागील शिवाजीचा प्राथमिक उद्देश लवकरच सफल होऊन खानाने पुण्यातील आपला मुक्काम आवरता घेत औरंगाबादेस प्रयाण केलं. परंतु यामुळे मोगल आघाडीवर शांतता निर्माण झाली असं नाही. उभयपक्षी ठिकठिकाणी चकमकी घडत होत्याच. तसेच याच वर्षी पावसाळयानंतर साधारणतः नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये जसवंतसिंगाने सिंहगडास वेढाही घातला. शिवाय औरंगाबादेस अपमानाने जळफळत असलेला खान आपले उपद्व्याप करतच होता.

    खानावरील हल्ल्याची बातमी औरंगजेबास काश्मीरच्या वाटेवर असता मेच्या आरंभी समजली. त्याने यावर तात्काळ निर्णय घेत आपली प्रतिक्रिया दर्शवली नाही. इकडे खान आपल्या तर्फेने शिवाजी - औरंग या दोन्ही आघाड्यांवर आपल्या प्रयत्नांची शिकस्त करतच होता. शिवाजीचा सडकून समाचार घेऊन तो औरंगची नाराजी दूर करण्याच्या खटपटीत होता. परंतु पुण्यातून आपला तळ उठवून खानाने आपल्या कमहिमतीचे प्रदर्शन केल्याने शत्रू त्याला मोजत नसल्याचे औरंगही समजून चुकला होता. राहता राहिला जसवंतसिंग !
    तर जसवंतसिंग असो वा जयसिंग. या राजपूत राजांनी वरकरणी कितीही मोगली निष्ठेचा आव आणला तरी ते मोगलांशी समरस कधीच झाले नाहीत. नुकत्याच झालेल्या वारसा युद्धांत या दोघांनीही याची प्रचीती आपापल्या कृत्यांद्वारे दिली होती. जसवंतसिंगाने त्यावेळी धरसोडीचे वर्तन जरूर केले परंतु संधी मिळताच मोगल शहजाद्यांना -- मग तो दारा असो वा औरंग -- दगा करण्यास मागे पुढे पाहिले नाही. तीच स्थिती जयसिंगची. फक्त त्याचे वर्तन डोळ्यांत न येण्यासारखे होते. मोगलांच्या वारसा गृहयुद्धात त्याने औरंगच्या शत्रुंचा पराभव जरूर केला पण त्यांना शक्य असूनही कैद वा ठार करण्याची कृती त्याने केली नाही. उलट त्यांना बचावाची संधीच त्याने जास्त मिळवून दिली होती. याची कारणपरंपरा उघड आहे, स्पष्ट आहे. राजपूत हे मोगल साम्राज्याचे आधारस्तंभ असले तरी या आधारस्तंभास नाराज न करण्याचे जे धोरण अकबरने स्वीकारले होते, ते त्याच्या मृत्यू पश्चातच लयास गेले. जहांगीर ते औरंगजेब !  
    
    एकापेक्षा एक कट्टर इस्लामी शासक या बादशाहीवर येऊन दाखल झाले. आपल्या सत्तेचा पाया दृढ करण्यासाठी म्हणा वा आपल्या स्वतःच्या बुद्धीने म्हणा, त्यांनी इस्लामेतरांविषयी नेहमीच विपरीत धोरण अंमलात आणले. शिवाजीमुळे आपल्याला औरंगचा इतिहास माहिती आहे. तोही फक्त शिवाजी पुरताच. त्या तुलनेनं जहांगीर वा शहाजहान बद्दल काय माहिती आहे ? हिंदूंनी नवी मंदिरे बांधू नयेत व जुन्यांचा जीर्णोद्धार करू नये अशी औरंगची आज्ञा असल्याचे सांगितले जाते परंतु डॉ. ब. प्र. सक्सेना लिखित व भ. ग. कुंटे अनुवादित ' दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास ' नुसार हि आज्ञा बादशहा शाहजहाननेच काढल्याचे स्पष्ट होते. तसेच सक्तीची, स्वेच्छेची, प्रलोभनाने केलेली धर्मांतरे तो घडवून आणत होता. जुजहारसिंगाची दोन मुले दुर्गभान -- इस्लामकुली व दुर्जनसाल -- अलीकुली अशीच जबरीने बाटवल्याचे किमान इतिहास अभ्यासकांना तरी माहिती असलेच. परंतु त्याची चर्चा होत नाही. हे कशाचे प्रतीक म्हणायचे ? एकाच शहाजहानची अशी कित्येक उदाहरणे येथे देता येतील परंतु विस्तारभयास्तव आवरते घेतो.

    मोगल बादशहांच्या या धोरणांचा परिणाम म्हणजे राजपूत उत्तरोत्तर बेदील होत गेले. याचा स्फोट औरंगपुत्र अकबरच्या बंडाच्या वेळेस विशेष झाला. परंतु बीजं आधीच पेरली गेली होती. फक्त अजून अंकुर फुटायची देरी होती ! विधर्मीय राजपुतांची हि तऱ्हा तर स्वधर्मीयांची तरी फारशी वेगळी कुठे होती ?

    मोगल बादशहांचे धर्मवेड त्यांच्या सर्वच मुसलमान सरदारांत होते अशातला भाग नाही. कित्येकांना हि कट्टरता पसंत नव्हती. परंतु विरोधाची शक्ती नसल्याने सर्वजण गप्प होते. परंतु संधी मिळताच बादशहाने सोपवलेल्या कामगिऱ्यांत अंगचोरपणा करून ते आपला विरोध दर्शवत होतेच.

    सरकारकृत औरंगजेब तसेच डॉ. ब. प्र. सक्सेना लिखित, दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास, वाचताना औरंगजेबाच्या राज्यारोहण प्रसंगी वा त्याच्या कारकिर्दी आरंभीच मोगल साम्राज्य ऱ्हास पर्वास कशी सुरवात झाली याचे स्पष्ट प्रत्यंतर येते. हा ऱ्हास, विनाश थोपवणे कोणाच्याही आवाक्यात नव्हते. फक्त तो लांबणीवर टाकणे एवढेच शक्य होते व औरंगची आख्खी हयात यातच गेली. परंतु अंती विनाशाच्या वाटेवर तो स्वतःसहित समस्त साम्राज्याला घेऊन गेला ! असो.

    शिवाजी - मोगलांचा संघर्ष रंगात आलेला असतानाच इकडे कर्नाटकांत वेगळेच नाट्य रंगू लागले होते. नेताजीच्या पाठलागावरील मोगल सैन्य विजापूर नजीक आल्याने दहशतीने आदिलशहा बंकापुरास आश्रयार्थ निघून गेला. तिथे बहलोलच्या आईने त्यांस प्रवेश नाकारला. परंतु बहुतेक नंतर गोडीने वा जबरदस्तीने त्याने बंकापुरात प्रवेश मिळवला. यानंतर बंकापुर मुकामातूनच त्याने आपल्या पुढील कार्यक्रमाची आखणी केली. सर्वप्रथम त्याने बहलोलच्या बंदोबस्ताचे प्रकरण हाती घेतले. बंकापुर प्रवेश समयी झालेल्या अपमानास्तव त्याने बहलोलला बंकापुरी येण्याचा आदेश दिला. आदिलच्या आज्ञेमागे निश्चितचं काहीतरी काळंबेरं असेल असं जाणून बहलोलने जायचं टाळलं. तेव्हा आदिलने शहाजीलाच हि कामगिरी सांगितली. बहलोल व शहाजी यांची मैत्री असल्याने एकप्रकारे उभयतांस हा पेच होता. बहलोलने आपल्या रक्षणास्तव शहाजीला सोबत चलण्याची विनंती केली. त्यानुसार शहाजी त्याच्यासोबत आदिलच्या भेटीस बंकापुरास गेला असता आदिलने या दोघांनाही एकदम पकडून कैदेत टाकले. यासंबंधीचा उल्लेख पसासं ले. क्र. ९४६ मध्ये असून या इंग्लिश पत्रानुसार शहाजी दोन दिवस तरी कैदेत होता व हा प्रकार स. १६६३ च्या जून - जुलैत घडला असावा. मराठी साधनांपैकी अतिविश्वसनीय जेधे शकावली याविषयी मूक आहे. असो. आदिलची हि इतराजी केवळ शहाजी - बहलोल पुरतीच मर्यादित नसून रुस्तमेजमान वरही त्याचा वरवंटा फिरला. हुकेरी हे रुस्तमच्या जहागिरीचे स्थळ असूनही आदिलच्या आदेशान्वये त्यांस या शहरात प्रवेश नाकारण्यात आला. हा सर्व प्रकार पाहता यावेळी विजापूर दरबारातील शहाजी विरोधक गट सक्रीय झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे कर्नाटकातील लढाया बहुधा आटोक्यात आल्यामुळेच आदिलने या प्रकरणांस हात घातला असावा असे म्हणता येईल.

    आदिलशहा अशा प्रकारची कारवाई करेल याच शिवाजीला अंदेशा होता कि नव्हता हे निश्चित सांगणं शक्य नसलं तरी बहुधा कर्नाटकातील त्याच्या हालचालींवर शिवाजीचं बारीक लक्ष असावं असं वाटते. कारण याच काळात म्हणजे, शाहिस्तेखानाचे प्रकरण निकाली काढून शिवाजी लगोलग कोकणात उतरला व जूनमध्ये परत मागं फिरला. साधारणतः एप्रिल ते जून अशा दीड - दोन महिन्याच्या या छोट्या स्वारीत शिवाजीने संभाव्य शक्यता लक्षात घेत कुडाळ प्रांत आपल्या ताब्यात घेत रावजी उर्फ राहुजी सोमनाथास तेथील सुभेदार म्हणून नियुक्त केले. तसेच वेंगुर्ले बंदरही त्याने याचवेळी ताब्यात घेतले. शिवाजीचा हा उपक्रम निक्त्याच झालेल्या आदिल - शिवाजी तहास अनुसरून असल्याने केवळ चरफडण्यापलीकडे आदिलशाही यावेळी काही करू शकली नाही परंतु तहात गमावलेला प्रदेश फिरून जिंकण्याचे त्यांनी यावेळीच निश्चित केले होते.

    इकडे कोकण स्वारीत युरोपीयनांच्या झगड्यात पडण्याचा संभव प्राप्त झाला असतानाही शिवाजीने मोठ्या खुबीने डच - पोर्तुगीजांच्या भांडणात पडण्याचे टाळले. साधारणतः मिरजन - कारवार पर्यंत आपली पथके फिरवून शिवाजी जून महिन्यात मोगलांच्या आक्रमणाची बातमी मिळताच मागे फिरला. एकूण या कोकण स्वारीची फलनिष्पत्ती काहीही नसली तरी शिवाजीच्या राजकीय धोरणांवर यामधून चांगलाच प्रकाश पडतो.

    कागदोपत्री तहास, तोंडी वचनास किती किंमत द्यायची हे त्याला चांगलेच कळत होते. आदिलशहाने कोकणातील प्रदेशावरील शिवाजीचं आधिपत्य मान्य केलं तेवढंच धरून शिवाजी चालला. बाकीच्या गोष्टींकडे त्याने दुर्लक्षचं केलं. किंबहुना तह म्हणजे चालू युद्धातून काही काळ विश्रांतीकरता व पुढील तयारी करता मिळणारा मोकळा वेळ वा मध्यंतर अशीच त्याची समजूत असावी. त्यामुळेच त्यांस इतके यश प्राप्त झाले. यशस्वी राज्यकर्त्यांचा इतिहास जर नजरेखालून घातला तरी त्यातूनही हेच दिसून येते. इंग्रज असो वा येथील औरंगजेब. कागदी तह - वचनांना त्यांनी कधीच किंमत दिली नाही. याबद्दल त्यांना समकालीन व्यक्तींनी व इतिहासकारांनी कितीही दूषणं दिली असली तरी ती चुकीची, अन्यायी आहेत. राज्यकर्त्याचे मुख्य धोरण, उद्दिष्ट राज्य संरक्षण व विस्तार हेच असल्याने नीतिमत्तेच्या बंधनात त्यांस बांधणे योग्य नाही. शिवाजीच्या या धोरणाची साथ पुढे पेशवाईतील राज्यकर्त्यांनी अभावानेच केली. परिणाम सर्वश्रुत आहेच ! असो.

    मोगली दबावामुळे शिवाजीला कोकणातून मागे फिरावे लागले असले तरी यावेळी मोगलांनी नेमकी कुठे धडक मारली होती याची स्पष्टता होत नाही. तिकडे उत्तरेत मोगल बादशहाने आपल्या पुरता निर्णय घेत शाहिस्तेखानाच्या बदलीचे आदेश काढत शहजादा मुअज्जम यांस फिरून दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. शाहिस्तेखानावरील आपली इतराजी जाहीर व्हावी म्हणून आपली भेट न घेताच त्याने परस्पर बंगालला जावे असाही आदेश काढण्यात आला. माझ्या मते हा दुसरा आदेश औरंगला प्रतिकूल व शिवाजीला अनुकूल ठरला. शिवाजी नावाच्या संकटाची, धोक्याची मोगलांनी नुसती दखलच नव्हे तर दहशत घेल्याचेच यातून दिसून येते. कारण, ज्या शिवाजीला तो जमीनदार म्हणून उल्लेखतो त्या जमीनदाराने मोगल सुभेदाराची अप्रतिष्ठा केली असता अशी जाहीर इतराजी दर्शवून त्याने एकप्रकारे शिवाजीचं सामर्थ्यचं मान्य केल्याचे सिद्ध होते.
    बंडखोर काय जाहगिरदार काय व राजा काय, सर्व कागदोपत्री संज्ञा. ज्यांचा वापर औरंग सोयीनुसार करत होता. असो.

    शहजादा मुअज्जम दक्षिणेत येताच दि. १ डिसेंबर १६६३ रोजी दख्खनच्या सुभ्याची सूत्रे त्यावर सोपवून शाहिस्तेखानाने बंगालचा मार्ग धरला.

    मोगल सुभ्यांचे बदलीचे राजकारण चालले असता इकडे राजगड व विजापूरच्या दरबारात वेगळीच कारस्थानं शिजत होती. शिवाजी मोगल बादशाहीला हादरा देण्याच्या बेताची आखणी करत होता व आदिल शिवाजीवरील नव्या स्वारीची !

     शिवाजीने मोगल सुभेदार शाहिस्तेखानाचा परस्पर बंदोबस्त केल्याने व त्यामुळे औरंगला त्याची बदली करणे भाग पडल्याने आदिलशाहीवर पडलेली मृत्यूछाया काही काळ दूर झाली. या सवडीचा उपयोग आदिलने आता शिवाजीच्या बंदोबस्तापेक्षा त्याने नुकत्याच जिंकलेला भूप्रदेश फिरून ताब्यात घेण्याकडे केला. त्यानुसार फोंड्याचा सुभेदार, कुडाळचा देसाई व आसपासच्या लाहान संस्थानिकांनी एकत्र येऊन खारेपाटण, राजापूर भागातून शिवाजीच्या सैन्याला हुसकून लावण्याचे आदेश दिले. महमदखानास राजापूर व खारेपाटण हि शहरे देऊन त्यांस ती ताब्यात घेण्याकरता ससैन्य चाल करण्याची आज्ञा झाली. दाभोळ, चिपळूणचा ताबा फाजलखानास देत त्यांस तो प्रांत कब्जात घेण्यास सांगितले व उपरोक्त प्रदेश आपल्या सरदारांच्या हवाली करण्याबाबत आदिलने शिवाजीस पत्रही पाठवले. या सर्व कागदी हालचाली स. १६६३ च्या पावसाळ्यातच घडून आल्या. या स्थळी नमूद करण्यासारखी विशेष बाब म्हणजे फोंड्याचा आदिलशाही सुभेदार व आसपासच्या देसायांना शिवाजी विरुद्ध चिथवून संघटीत करण्याचे कार्य पोर्तुगीजांनी पार पडल्याचे पसासं ले. क्र. ९५९ मध्ये नमूद आहे. एकीकडे शिवाजी विषयी मैत्रीपूर्वक आदरभाव दर्शवित असता दुसरीकडे त्याच्या नाशार्थ पोर्तुगीजांचे प्रयत्न सुरु झाले होते व याची कारणेही स्पष्ट होती. शिवाजी उभारत असलेले नाविक दल व दक्षिण - उत्तर कोकणातील त्यांच्या ताब्यातील प्रदेशानजीक शिवाजीच्या राज्याची भिडू लागलेली सीमा, निश्चितच काळजी उत्पन्न करणारी होती.

    स. १६६३ अखेरची म्हणजे दि. ३ डिसेंबरच्या डच पत्रातील बातमीनुसार यावेळी शिवाजी सोबत लढणारे मोगल सैन्य वसईच्या आसपास आल्याने गोव्याहून तिकडे एक आरमारी पथक रवाना करण्यात आले.

     डिसेंबर अखेर वा मध्यावर खासा शिवाजी सुमारे दहा हजार सैन्यासह सुरतेवर चालून गेला. त्याचे बेत, प्रवासाचे मार्ग, शत्रूप्रदेशातील अस्तित्व याविषयी इतकी गुप्तता पाळण्यात आली कि, शिवाजी सुरतेसमोर अवघ्या काही मैलांवर येऊन ठेपल्यावर दि. ५ जानेवारी १६६४ रोजी तेथील सुभेदारास --- इनायतखानास समजले. शिवाजी मोगली प्रदेशात इतक्या दूरवर असा एकाकी चालून येईल याची कल्पना नसल्याने व कल्पितातही नसलेले संकट समोर येऊन ठाकल्याने इनायतचा धीर खचून त्याने शिवाजीसोबत वाटाघाट, संघर्ष वगैरे करण्याच्या फंदात न पडता सरळ आश्रयार्थ किल्ल्याकडे प्रयाण केले.

    दि. ६ जानेवारी १६६४ रोजी शिवाजी सुरतेच्या अगदी निकट आला व त्याच दिवशी सायंकाळी सुरतेवर त्याचा हल्ला सुरु झाला तो दि. ९ जानेवारी रोजी रात्री पर्यंत चालून त्याच दिवशी रात्री वा पहाटे शिवाजीने सुरतेहून माघार घेतली. सुमारे चार - पाच दिवसांच्या या मुक्कामात त्याने सुरतेतून अगणित खंडणी वसूल केली. शिवाजी निघून गेल्यावर दि. १७ जानेवारी रोजी मोगली सैन्याची पहिली तुकडी मदतीसाठी सुरतेस येऊन दाखल झाली. त्यानंतर ठिकठिकाणाहून मोगल फौजा सुरतेस आल्या परंतु दरम्यान शिवाजी सर्वांना चकवून राजगडी पोहोचला होता. ( दि. ५ फेब्रुवारी १६६४ )

    शिवाजीच्या सुरत स्वारीमुळे बलाढ्य, सार्वभौम मोगल बादशाहीचं दौर्बल्य जसं उघडं पडलं तसंच शिवाजीचं वाढतं बळही सर्वांच्या नजरेस आलं. काही वर्षांमागे शहजादा मुरादने सुरतेची लुट केली असली तरी शेवटी तो मोगल राजपुत्र व गुजरातचा सुभेदार होता. त्यामुळे त्याला हे गुन्हे माफ तद्वत हि कृत्यं करणेही सहजशक्य होते. परंतु कोंडण्यास वेढा देऊन बसलेल्या जसवंतसिंगांच्या अंगावरून शिवाजी सुरतेस जातो, विना प्रतिकार विना हरकत सुरतेची लुट करतो व मोगली फौजा अंगावर येण्यापूर्वीच लुटीसह सुरक्षितपणे स्वस्थळी दाखल होतो यातच त्याचे धाडस, शौर्य, नियोजन, कल्पकता व पराक्रमासह मुत्सद्देगिरी दिसून येते. या स्थळी मुद्दाम लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे सुरतेची लुट भूमार्गाने सुरक्षित नेता येणे शक्य होणार नाही हे गृहीत धरूनच त्याने सर्वांच्या नकळत आपले नाविकदल सुरतेजवळ आणून ठेवले होते व बरीचशी मालमत्ता त्याने जलमार्गाने आपल्या राज्यात रवाना केली. शिवाय प्रसंग पडला तर पोर्तुगीजांच्या मुलखातही आश्रयार्थ जाण्याच्या दृष्टीने त्याने तयारी केली होती. महत्त्वाचे म्हणजे अलीकडे पोर्तुगीज शिवाजीविषयी आदरयुक्त भीती बाळगून होते. उभयतांच्या सीमा परस्परांना भिडल्याने त्यांच्यात कायम मित्रभाव राहणे शक्य नसले तरी शत्रूभावही सदासर्वकाळ असणे शक्य नव्हते. शिवाय मोगलांच्या विषयीही पोर्तुगीजांच्या मनात साशंकता होतीच. एकूण पाहता असे म्हणता येते कि, पोर्तुगीजांच्या या अस्थिर मनःस्थितीची शिवाजीने पुरेपूर फायदा उचलला. शिवाजीचे आरमार सुरतेकडे गेल्याचे किमान त्यांना तरी माहिती असायला हवे, असं माझं मत आहे परंतु पुराव्यांअभावी याविषयी काही लिहिणे योग्य नाही.  

    शिवाजीच्या सुरत स्वारीची जी काही डच, इंग्रजांची वर्णनं पसासं मध्ये छापली आहेत, ती लक्षात घेता काही गोष्टी स्पष्ट होतात. (१) सुरतेकडे जाताना प्रथम आपण बादशाही हुकमाने अहमदाबादला जात असल्याचे व नंतर महाबतखानाकडे जात असल्याची शिवाजीने बतावणी करत आपले स्वरूप प्रगट केले नाही. नंतर सुरत मुक्कामी त्याने आपल्या सोबत शहजादा सुजा असून त्यानेच सुरत आपणांस दिल्याची भुमका उठवली. यावरून प्रतिपक्षाच्या मनात ज्यायोगे चलबिचल निर्माण होईल अशा गोष्टी करण्याची शिवाजीची प्रवृत्ती व या कामातील त्याचा हातखंडाही यावरून दिसून येतो. त्यामुळेच तो विनाप्रतिकार सुरतेस जाऊन मनमुराद लुट करून सुखरूप परत येऊ शकला. (२) शिवाजीचा प्रथम इरादा लुटीऐवजी खंडणी वसुलीचा होता, ज्यास सुरतेच्या मोगल अधिकाऱ्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही. (३) बादशाही मुलखातील इतक्या महत्त्वाच्या शहराच्या रक्षणाची व्यवस्था अगदीच कुचकामी होती. इनायतखान सैन्याकरता मिळणारा पगार स्वतःच्या चैनीकरता वापरत असून शहराच्या सुरक्षेकडे त्याने अक्षम्य दुर्लक्ष केले व मुख्य म्हणजे बादशहाला याची खबर नाही. (४) खंडणीची बोलणी करण्यास व्यक्ती न आल्याने व शत्रू प्रदेशात फार काळ राहणे शक्य नसल्याने शिवाजीने लुटीचा आदेश दिला. सैन्याला कितीही कडक आदेश दिले असले तरी अशा प्रसंगी त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे शक्य नसते हे लक्षात घेऊनच मराठी सैन्याच्या या काळातील कृत्यांकडे बघावे लागते.

    इकडे दि. १८ जानेवारी १६६४ रोजी मोगल बादशहा औरंगजेब काश्मीरहून दिल्लीस दाखल झाला. शाहिस्तेखानावरील हल्ल्यानंतर सुरतेची बातमी त्याची चिंता वाढवून गेली. याहीवेळी त्याने तडकाफडकी निर्णय न घेता काही काळ तसाच जाऊ देत सुरतेचं पुनर्वसन, तेथील व्यापाऱ्यांना आर्थिक संरक्षण वगैरेच्या तरतुदींकडे लक्ष पुरवले. शिवाजीचा बंदोबस्त करण्याची त्याची तीव्र उत्कंठा होती परंतु उरातली आग मनातच ठेवून वरकरणी थंडपणे तो सर्व कारभार बघत होता. शिवाजीच्या हालचालींची नोंद घेत होता. अशातच आणखी दोन बातम्या आल्या. प्रथम म्हणजे जसवंतसिंगाने कोंडाण्यास घातलेला निरर्थक वेढा प्रचंड द्रव्य व प्राणहानी सोसून उठवला व दुसरी बातमी म्हणजे शिवाजीने नगरवर चढवलेला हल्ला. शिवाजीच्या आक्रमक धोरणास आळा घालण्याचे सामर्थ्य जसवंतसिंग तसेच शहजादा मुअज्जम मध्ये नाही हे त्यांस कळून चुकले तेव्हा स. १६६४ च्या सप्टेंबर मध्ये त्याने मिर्झा राजा जयसिंग याची शिवाजीवरील मोहिमेकरता नियुक्ती करत त्यांस दक्षिणेत रवाना केले. शिवाजीचा पूर्ण विनाश हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असून सोबत शक्य झाल्यास गोवळकोंडा व विजापूर यांचे मोगली साम्राज्यात विलीनीकरण करणे, हे हेतूही या मोहिमेमागे होते.

    मोगलांच्या राजकीय आघाडीवर या घडामोडी घडत असताना इकडे शिवाजी नेमका काय करत होता याची संक्षेपात माहिती घेऊन प्रकरण आटोपते घेतो.

    सुरत लुटून राजगडच्या वाटेवर असतानाच शिवाजीला शहाजीच्या अपघाती मृत्यूची बातमी मिळाली. दि. २३ जानेवारी १६६४ रोजी होडीकेरी मुक्कामी शिकारीच्या वेळी घोड्यावरून पडून शहाजी मरण पावला. मृत्यू पश्चात त्याच्या धाकट्या मुलास --- व्यंकोजी / एकोजीला आदिलशाही दरबारातून दुखवटा येऊन रीतसर मनसबदरीची वस्त्रे बहाल झाली. त्याचप्रमाणे काही दिवसांनी परंतु याच वर्षी व्यंकोजी व त्याच्या इतर भावांच्या नावे असलेली कित्येक इनामे काढून फक्त व्यंकोजीच्याच नावे करण्यात आल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानाच्या आधारे मराठी रियासतीत दिला आहे. यावरून असे दिसून येते कि, शहाजी हयात असेपर्यंत भोसले पिता - पुत्रांचे जे राजकारण पुणे - बेंगळूरहून विजापुर विरोधी चालले होते त्यांस शहाजीच्या मृत्यूने खंड पडून पुन्हा असा धोका उद्भवू नये याकरता व्यंकोजीला आपल्या पक्षास मिळवून घेण्यासाठीच आदिलशहाने हा सारा खटाटोप केला व पुढील इतिहास पाहता आदिलशाही दरबार याबाबतीत काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून येते. असो.

    मोगली प्रदेशात शिवाजीने जो धुमाकूळ घातला त्यामागे विजापूर, गोवळकोंडा तसेच पोर्तुगीजांची त्यांस फूस असावी अशी औरंगला शंका आली. त्यानुसार त्याने जयसिंगाची दख्खनला रवानगी करतानाच आदिल व कुतुबवर राजकीय दडपण आणत शिवाजीने सुरतेच्या केलेल्या नुकसानीची भरपाई करणे वा शिवाजी विरोधात मोहिम काढणे हे दोन पर्याय दिले. अन्यथा मोगलांच्या संभाव्य आक्रमणास तोंड देण्याकरता तयार राहण्याची गर्भित धमकीही देण्यात आली.

     मोगली आक्रमणाचा सर्वाधिक धोका विजापूरकरांना असल्याने त्यांनी याबाबतीत मुत्सद्देगिरीचे धोरण अवलंबल्याचे दिसून येते. आदल्या वर्षी तयारीचे आदेश दिलेलेच असल्याने यावर्षी त्यांनी दक्षिण कोकणात शिवाजी विरोधात दिखाऊ आघाडी उघडली. अजीजखानच्या नेतृत्वाखाली दि.८ मे १६६४ रोजी आदिलशाही फौजा बालाघाटातून रावजी पंडितावर चालून आल्या. त्यावेळी रावजीने राजापुरास माघार घेतली. यावेळच्या शिवाजी व विजापूरकरांच्या हालचाली संशयास्पद आहेत. कुडाळ प्रकरणी सगळा भार सावंतावर पडून विजापूरकरांनी त्यांस फक्त शाब्दिक नेट लावत निकराने शिवाजीवर चालून जाण्याचे वा सर्वंकष युद्ध -- अफझल प्रसंगाप्रमाणे खेळण्याचे टाळलेलं दिसून येते.

    अजीजखान दि. १० जून रोजी मरण पावल्यावर तिकडची जबाबदारी रुस्तमेजमानवर सोपवण्यात आली खरी परंतु फत्तेखानाने कुडाळचा ताबा त्याच्याकडे न सोपवल्याने व आदिलची देखील अशीच आज्ञा असल्यामुळे रुस्तमने मोहिमेतून अंग काढून घेतले. यावेळी बहुधा विजापूर दरबारात शिवाजी संबंधी निश्चित एका धोरणाची आखणी झालेली दिसून येत नाही. मुळात शिवाजीवर स्वारी करावी का ? आणि केल्यास तिचं उद्दिष्ट काय असावं हाच विजापुरकरांचा यावेळी गोंधळ असल्याचे दिसून येते. परंतु स. १६६४ च्या पावसाळ्यानंतर स्थिती पालटून अलीकडे दक्षिण कोकणात शिवाजीने जो आदिलशाही प्रदेश जिंकला आहे तो फिरून ताब्यात घेणे एवढे उद्दिष्ट समोर ठेवून आदिलशहाने खवासखान, बाजी घोरपडे, लखम सावंत, खेम सावंत आदींची रवानगी केली. विजापूरकरांच्या या निर्णयामागे मोगली दडपणाचाही काही भाग असावा असे पसासं मधील दि. ७ डिसेंबर १६६४ च्या डच पत्रावरून दिसून येते. यानुसार विजापुरकरांनी शिवाजीवर प्रभावी कारवाई करावी म्हणून मोगलांनी सोलापूर आपल्या ताब्यात घेत विजापूरकरांना शह दिल्याचे दिसून येते.  

    शिवाजीला या हालचालींची बातमी असल्याने सर्व फौजा एकवटण्यापूर्वीच त्याने प्रथम त्वरेने मुधोळवर स्वारी करून घोरपड्यांचा काटा काढला व नंतर खवासखानास घेरून त्यांस पळवून लावले. आदिलशाही फौजांची धूळदाण होताच सावंताने शरणागतीचे बोलणे लावून आपला बचाव साधला. आदिलशाही आक्रमण परतवून लावल्यावर त्याच वर्षाखेर म्हणजे दि. २५ नोव्हेंबर १६६४ रोजी शिवाजीने सिंधूदुर्गच्या उभारणीचे काम चालू केले. यानंतर हुबळी पर्यंत स्वारी करून शिवाजी मागे फिरला परंतु पुढच्याच वर्षी म्हणजे स. १६६५ च्या फेब्रुवारी आरंभी त्याने आरमारी मोहीम काढून दि. १३/१४ फेब्रुवारी रोजी जलमार्गाने बसरूरवर हल्ला केला. बसरूर मारून तसेच पुढे गोकर्ण महाबळेश्वरला जाऊन तिथून भूमार्गाने कारवारला गेला. यावेळी कारवारवर झडप मारण्याचा त्याचा इरादा असला तरी बंकापुरच्या बहलोलचा सरदार शेरखान तिथे आला होता. बहलोल शहाजीचा मित्र असल्याने शेरखानवर शिवाजीने स्वारी केली नाही व शेरखाननेही कारवारातील व्यापाऱ्यांकडून सामुदायिक खंडणी वसूल करून शिवाजीकडे पोचती केली व शहराचा बचाव साधून घेतला. यानंतर शिवाजी स्वमुलखात परतला. तोपर्यंत १४ हजार सैन्यासह राजा जयसिंग दि. ३ मार्च १६६५ रोजी पुण्यास दाखल झाला व त्याच्याकडे सर्व सूत्रे सोपवून दि. ७ मार्च रोजी जसवंतसिंग परत गेला.
                                   ( क्रमशः )

४ टिप्पण्या:

RAJENDRA KARMARKAR म्हणाले...

History needs to be written thru politico-military angle. U r doing a very good job. History should be looked at from a thinker's as well as a general's and politician's angle! - R.V.KARMARKAR

sanjay kshirsagar म्हणाले...

R.V.KARMARKAR,
प्रतिक्रियेबद्दल आभार !

Unknown म्हणाले...

छान माहिती परंतु छत्रपती शिवाजी महाराज असे पूर्ण वाक्य लिहिलं तर बरं होईल एक वाक्यात फक्त शिवाजी हे नाव लिहायला आपली लायकी तरी आहे का. क्षमस्व

Surendra म्हणाले...

इतिहासात नेहमीच कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीचा एकेरी नावाने उल्लेख केला जातो. आपण जेव्हा इतिहासातील पदवीचा अभ्यास कराल तेव्हा ते आपल्या लक्षात येईल.