शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

प्रकरण ९) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी





    मागील प्रकरणात आपण अफझलखानाच्या स्वारीच्या प्रसंगाची चर्चा करत शिवाजीने पन्हाळा काबीज केल्याचा वृत्तांत पाहिला. आता त्यापुढील घटनाक्रमाची माहिती घेऊ.

    शिवाजीवरील इतिहास लेखनातील मुख्य वैगुण्य म्हणजे समकालीन मराठी साधनांतील माहितीचा अभाव वा अपुरी माहिती. यामुळे बऱ्याचदा शिवाजीच्या इतिहास लेखनाकरता तत्कालीन विरुद्धपक्षीय अशा विजापुरी, मोगल तसेच युरोपीयनांच्या साधनांचा आधार घ्यावा लागतो. ज्यात शत्रुता, कटुता, स्वपक्षीयांविषयी अतिरंजित प्रशस्ती तसेच विरुद्ध पक्षाच्या नालस्तीचे भरपूर वर्णन असते. अशा अडथळ्यांमधून मार्ग काढत आपल्याला शिवाजीच्या चरित्रातील काही गोष्टींचा आढवा घ्यायचा आहे, ज्या पुराव्यांच्या अभावी तसेच इतिहासकारांच्या विशिष्ट दृष्टीकोनामुळे आजवर दुर्लक्षित राहिल्या. उपेक्षित राहिल्या.

    अफझलखानाला गुंडाळण्याची योजना ज्यावेळी शिवाजी आखत होता, त्याचवेळी त्याच्या विजापूर स्वारीची तयारीही चालली होती. कशाही प्रकारे विजापूरचा सामर्थ्य असलेल्या अफझलचा फडशा पाडून थेट आदिलशाही राजधानीवर धडक देणे व जमल्यास तिचा कब्जा घेण्याच्या दृष्टीने शिवाजीने आपल्या डावपेचांची आखणी केली. शिवाजीच्या या योजनांची, बेतांची त्याच्या समकालीन चरित्रकारांना जशी जाणीव झाली नाही तद्वत अलीकडच्या काळातील इतिहासकारांनाही त्याची कल्पना येऊ शकली नाही. यासंदर्भात पसासं मधील ले. क्र. ७९१ अतिशय महत्वाचा आहे. राजापूरच्या इंग्रजांनी कंपनीला पाठवलेल्या दि. १० डिसेंबर १६५९ च्या या प्रदीर्घ पत्रात अनेक राजकीय घडामोडींचा, अफवांचा उल्लेख केला आहे. त्यातला आपल्या संदर्भापुरता महत्वाचा उल्लेख म्हणजे, " .. एका महिन्यात हि दंगल शांत होईल असं वाटते. कारण शिवाजीचा बाप शहाजी दक्षिणेकडे आहे ; तो १७००० सैन्य घेऊन आठ दिवसांत येईल अशी अपेक्षा आहे. तो राजधानी ( विजापूर ) वर चालून जाईल आणि तेथील सैन्य अपुरे असल्यामुळे हे राज्य बुडेल. " अशाच प्रकारचा उल्लेख पसासं मधील ले. क्र. ७९२, ८१० या गोवेकर पोर्तुगीज गव्हर्नरच्या पत्रात आहे. फरक फक्त इतकाच कि, यात शहाजीचा उल्लेख नाही. परंतु शिवाजी विजापूर बुडवण्याइतपत समर्थ असल्याची पोर्तुगीजांनी यात कबुली दिली आहे. तीच गोष्ट याच पसासं ले. क्र. ८१२ या वेंगुर्ल्याच्या डचांच्या पत्राची. शिवाजी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकण्यापूर्वी - नंतरची हि पत्रे असून या सर्वांचं सारांश, इत्यर्थ हाच आहे कि, स. १६६० मध्ये शिवाजी विजापुरी सत्ता समूळ उखडून काढण्याइतपत समर्थ होता, बलवान होता. मग हि गोष्ट आधुनिक शिवचरित्रकारांच्या लेखनातून का दृष्टीस पडत नाही ?

    स. १६५९ च्या अफझल प्रकरणानंतर शिवाजीने आदिलशाही प्रदेशात चढाईचे धोरण स्वीकारले. त्यानुसार सैन्याचे दोन भाग करत एक मोठी तुकडी घेऊन तो पन्हाळ्यास निघून गेला तर दुसरी कोकणातून खाली दक्षिणेला राजापूरपर्यंत गेली. या सैन्यदलाच्या अधिकाऱ्याच्या नाव जरी मिळत नसले तरी दोरोजी म्हणून एक अधिकारी या मोहिमेत सहभागी असून त्याने राजापूर पर्यंत धडक मारल्याचे स्पष्ट होते. कोकणातील या स्वारीचे मुख्य प्रयोजन म्हणजे अफझलच्या आगमनामुळे दक्षिण कोकणातील शिवाजीचे जे अंकित संस्थानिक विजापूरकरांना पुन्हा एकदा रुजू झाले होते, त्यांना नरम करणं हे होय. घाटावर पसरलेल्या इतर तुकड्यांच्या मानाने कोकणातील सैन्य जरी फार मोठं नसलं तरी या मोहिमेत शिवाजीच्या एका राजकीय मुत्सद्देगिरीची, राजकारणाव्यतिरिक्त मैत्रीचीही एक बाजू होती. विजापुरी सरदार रुस्तमजमान हा शिवाजीचा मित्र. त्याच्या हुकेरीच्या जहागिरीला लागूनच बांदा, कुडाळ, वाडी व देवगड तसेच आचरे हि स्थळे असून कुडाळ, वाडी प्रांत देसाई लखम सावंताचा होता. नजीकचे वेंगुर्ला बंदर विजापुरी सरदार खवासखानाच्या अंमलाखाली होते. आचरे हे संस्थान विजापूरचे मांडील होते. म्हणजे उत्तरेतून येणारे शिवाजीचे सैन्य व राजापूरपर्यंतचा प्रदेश जहागिरीदाखल कमवून बसलेला रुस्तम यांच्या एकप्रकारे चिमट्यात विजापुरी मांडलिक, बंदरे अडकली होती.

    शिवाजीच्या कोकणातील हालचालींकडे शक्य तो दुर्लक्ष करणे हा रुस्तमचा वर्तनक्रम म्हणा वा त्याच्या धोरणाचा भाग असल्याने शिवाजीनेही आपल्या सरदारांना रुस्तमच्या प्रदेशास उपद्रव न देण्याची ताकीद दिली होती. याचा परिणाम म्हणजे शिवाजीचं सैन्य कुडाळ पर्यंत येऊन धडकलं व तो भाग त्यांनी ताब्यात घेण्यास आरंभ केला. लखम सावंताने यावेळी इतर लहान मोठ्या संस्थानिकांची मदत घेऊन शिवाजीच्या सैन्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत शिवाजीच्या पथक्यांनी कुडाळचा किल्ला जिंकून घेतला. परंतु शत्रूचा फिरून प्रतिहल्ला आल्याने व जवळचे युद्धोपयोगी सामान संपत आल्याने तसेच शिवाजीही पन्हाळ्यावर अडकून पडल्यामुळे कुमकेची आशा खुंटून त्यांनी किल्ला सोडून दिला. हाच प्रकार थोड्या फार फरकाने आचऱ्यास घडून तेथील राजाने शिवाजीच्या लोकांना पिटाळून लावले. मात्र याच सुमारास रुस्तमने कोकणात स्वारी काढून फोंडा व कुडाळ ताब्यात घेत विजापुरास कळवले की, कोकांतील शिवाजीच्या सैन्याचा पराभव माझ्या मदतीने व हुकमाने झाला आहे. रुस्तमचे यावेळचे धोरण, वर्तन शिवाजीला अनुकूल असेच होते. त्याने कुडाळकराला मदत करण्याऐवजी त्यालाच रगडून काढण्यास आरंभ केला. कोकणातील या वृत्तांताचा मुख्य आधार पसासं मधील ले. क्र. ८१२ असून स. १६६० च्या एप्रिल मधील या डच पत्रात मराठी साधनांच्या तुलनेने शिवाजीच्या हालचालींची बरीच तपशीलवार माहिती आली आहे.
आता याच काळातील शिवाजीच्या हालचालींची आपण थोडक्यात माहिती पाहू. शिवाजीने पन्हाळा घेताच आदिलशहाने अफझलपुत्र फाझलखान व रुस्तमजमानच्या नेतृत्वाखाली मोडलेली फौज पुन्हा उभी करून पन्हाळ्यावरून शिवाजीला हाकलून लावण्यासाठी पाठवले खरे परंतु शिवाजीने त्यांच्याशी खुल्या मैदानात जुंज देत त्यांनाच पिटाळून लावले. यावेळी शक्य असतानाही मित्रसंबंधांमुळे शिवाजीने रुस्तमला कैद वा ठार न करता सुखरूप जाऊ दिले. ( दि. २८ डिसेंबर १६५९ )

    फाजल व रुस्तमची फौज उधळून लावल्यावर शिवाजीने आपल्या सैन्याचे दोन भाग करत तो स्वतः पन्हाळ्यास राहिला तर नेताजी पालकरकडे एक तुकडी देऊन त्यांस विजापूरच्या रोखाने रवाना केले. यावेळी नेताजी बोरगाव, कुंडल वगैरे ठिकाणे घेत मिरजेला येऊन धडकला. इथल्या भुईकोट किल्ल्याने झुंजण्याची हिंमत बांधल्याने त्यांस पुढे सरकता येईना. तेव्हा खासा शिवाजी मिरजेस आला व वेढ्याचे काम आपल्या हाती घेत त्याने नेताजीस पुढे पाठविले. नेताजी तसाच पुढे सांगलीवरून रायबाग, अथणी, तेलसंग करत तिकोट्यास येऊन ठेपला.

    शिवाजीच्या फौजा झपाट्याने मुलूख व किल्ले काबीज करू लागल्याने आदिलशाही दरबारात चिंतेचे वातावरण पसरले. अफझल व रुस्तमच्या लागोपाठ दोन सैन्यदलांचा शिवाजीने अल्पावधीत पराभव केल्याने आता नव्या स्वारीकरता पाठवण्यास सरदार व सैन्य, दोन्हींची त्यांना कमतरता भासत होती. किंबहुना शिवाजीच्या झपाट्यापुढे राज्याचा, राजधानीचा बचाव कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला असता सिद्दी जौहर त्यांच्या मदतीस आला.

    सिद्दी जौहर हा कर्नूलचा जहागीरदार तसेच सरदार असून अलीकडे बंडखोरीमुळे तो आदिलशहाच्या मर्जीतून उतरला होता. परंतु याचवेळी त्याने आपल्या सेवेची पेशकश देऊ केल्याने आदिलशहानेही उदार, दिलदार मनाचा आव आणत त्यांस मागील कृत्यांबद्दल माफी देत शिवाजीवरील मोहीम त्याच्या हाती सोपवली. जौहरवरील आपली कृपा दर्शवण्यासाठी आदिलने त्यांस सलाबतखान किताब तसेच वाई परगण्याचा दिवाण, खटाव परगण्याचा लष्कर सर हवालदार इ. पदे शिवाय अफझल प्रमाणेच याच्याही जवळ शाही सहीशिक्का असलेले फार्मानाचे कोरे कागद देण्यात आले. जेणेकरून विरुद्ध पक्षीयांना प्रलोभनं देत फोडता यावे. खेरीज शक्य तितके दरबारी सरदार व मांडलिकांनाही जौहरच्या कुमकेस जाण्याचे आदेश देण्यात आले. सर्व तयारी होताच सलाबतखान सिद्दी जौहर मोठ्या उमेदीनं शिवाजीच्या बंदोबस्तासाठी निघाला.

    सिद्दी जौहरकडे यावेळी त्याचे स्वतःचे सैन्य अपवाद केल्यास इतर सरदार व मांडलिकांचे मिळून सुमारे वीस ते तीस हजार सैन्य असावं असा अंदाज करता येतो. उपलब्ध साधनांत अर्ध्या पाउण लाखाच्या भरतीचे आकडे आहेत खरे पण त्यात बुनगे व लढाऊ मनुष्य अशी विभागणी न केल्याने हा आकडा ग्राह्य धरणे इष्ट वाटत नाही. उलट साठ ते सत्तरचा मध्य म्हणून वीस ते तीस हजार वा जास्तीत जास्त पस्तीस हजार हि संख्या योग्य वाटते. असो.

    सिद्दी जौहर आपल्यावर चालून येत असल्याचे समजताच शिवाजीने मिरजेचा वेढा उठवून पन्हाळ्याचा आश्रय घेतला. यावेळी उभयपक्षांची बहुधा एखाद दुसरी चकमक उडाली असावी असं मराठी रियासत खंड १ मध्ये दिलेल्या एका आदिलशाही फर्मानाच्या आधारे म्हणता येते परंतु त्याची तारीख पाहता तसेच या गोष्टीस प्रत्यंतर पुरावा नसल्याने यासंदर्भात अधिक काही लिहिणे शक्य नाही.

    मिरजेचा वेढा उठवून शिवाजी ज्यावेळी पन्हाळ्यास आला त्यावेळी त्याच्यासोबत आठ हजार पायदळ व साठ घोडेस्वार असल्याचे पसासं ले. क्र. ८२६ मध्ये नमूद आहे. शिवाजीने पन्हाळ्याचा आश्रय घेताच जौहरनेही त्या किल्ल्यास वेढा घालून मोर्चेबंदी केली व पन्हाळा जेरीस आणण्याकरता इंग्रजांकडे तोफा व दारूगोळ्याची मागणी केली. यावेळी राजापूरकर इंग्रजांनी आर्थिक नफ्याची संधी सोडली नाही. त्यांनी जौहरला शक्य तितका तोफखाना व दारुगोळा तर उपलब्ध करून दिलाच परंतु वर तोफ डागण्याकरता प्रशिक्षित गोलंदाजही सोबत दिला. ( स. १६६०, मार्च - एप्रिल )

    पन्हाळ्याचा वेढा, त्यातील समर प्रसंग वगैरेंची तपशीलवार चर्चा इतरांनी पुष्कळ केलेली असल्याने त्याविषयी अधिक खोलात न जाता शिवाजीच्या या काळातील राजकारणाची येथे मी चर्चा करणे आवश्यक समजतो.

    अफझलचा निकाल लावण्यापूर्वीच शिवाजीने विजापूर स्वारीची योजना आखली होती. अफझलच्या पराभवामुळे त्या योजनेस अकल्पित यश लाभले असावे असे याक्षणी तरी माझे मत आहे. कारण पसासं ले. क्र. ७९१ नुसार स. १६५९ च्या डिसेंबर अखेर वा स. १६६० च्या जानेवारी पर्यंत कर्नाटकातून शहाजीने ससैन्य पुढे चालून येणं अपेक्षित होतं. परंतु शहाजी यावेळी विजापूर वा पन्हाळ्यास शिवाजी सोबत हातमिळवणी करण्यासाठी आल्याचे दिसून येत नाही. त्याचप्रमाणे कर्नाटकातील त्याच्या हालचालींचीही माहिती मिळत नाही. पन्हाळा ताब्यात घेऊन शिवाजीने प्रथम किल्ल्याचा बंदोबस्त केला. त्यानंतर फाजल व रुस्तमच्या नेतृत्वाखाली चालून आलेल्या फौजांचा फडशा पाडला. यानंतर त्याने आपल्या सैन्याचे दोन भाग करून विजापूरचा घास गिळण्यास आरंभ केला. परंतु याच ठिकाणी त्याच्या राजकीय धोरणास अकल्पित तसेच काहीशा अतिआत्मविश्वासपूर्वक हालचालींचा फटका बसला.

    लागोपाठ मिळणाऱ्या विजयांमुळे आपण ताब्यात राखू तेवढाच प्रदेश जिंकण्याचे भान त्यांस न राहता त्याने आपली आगेकूच कायम ठेवली. अर्थात त्याच्या या निर्णयाचा चांगला परिणाम म्हणजे विजापुरी प्रदेशाची धुळदाण उडून त्यांची आर्थिक स्थिती थोडीफार खालावली. परंतु अशा मोहिमांत सैन्य विखुरलं जाण्याचा जो धोका असतो, तो यावेळी शिवाजीने बहुधा दुर्लक्षिला असावा. त्याचप्रमाणे दैवाने विजापूरकरांना हात देत सिद्दी जौहर त्यांना अनुकूल झाला. हि बाब तशी अकल्पित असल्याने जौहरचे रणभूमीवरील आगमन शिवाजीच्या आगाऊ आखलेल्या डावपेचांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. परंतु याच वेळी मोगलांनी शिवाजीवर चढाई करण्यास आरंभ केली, याकडे शिवाजीचा एक फसलेला राजकीय डाव अथवा मोगलांच्या मैत्रीवरील विश्वास अथवा त्याचा अतिआत्मविश्वास असेही म्हणता येईल. यास्थळी आपण शिवाजी - मोगल संबंधांची थोडक्यात माहिती घेऊ.    

    स. १६५९ मध्ये औरंग बादशहा बनला त्यावेळी शिवाजीचा वकील दरबारात हजर झाला असता औरंगने एक पत्र व पोशाख शिवाजीकरता देऊन त्याची बोळवण केली. या पत्रान्वये मोगलांच्या दख्खन सुभेदाराच्या हाताखाली, हुकुमाखाली राहून शिवाजीने आपली सेवा बजवायची होती. अर्थात मांडलिकी नात्याने. परंतु अशी ताबेदारी शिवाजीने कधीच स्वीकारली नाही. आदिलशाही विरोधात त्याची मोहीम स्वतंत्र पद्धतीनेच चालली होती. यावेळी दख्खनचा सुभेदार शहजादा मुअज्जम होता कि त्याच्या बदली नियुक्ती झालेला शाहिस्तेखान मार्गात होता याविषयी माहिती मिळू शकली नाही. परंतु औरंग मुअज्जमच्या कामगिरीवर खुश नव्हता हे उघड आहे. वारसायुद्धापूर्वीच्या विजापूर स्वारीत त्या सत्तेचा पोकळपणा औरंगच्या लक्षात चांगलाच आल्याने त्या सत्तेला व सोबत इतरांनाही नामशेष करून मोगली साम्राज्य वृद्धिंगत व्हावं यासाठी शहजाद्याने आवश्यक ते प्रयत्न करावेत अशीच औरंगची इच्छा असणार व याबाबतीत मोगलांच्या दक्षिणेतील हालचाली पाहता मुअज्जमने असा दगदगीचा उपक्रम स्वीकारल्याचे दिसून येत नाही. माझ्या मते, मुअज्जमची हि निष्क्रियता जमेस धरूनच शिवाजीने विजापूर स्वारीची आखणी केली होती. परंतु तिकडे विजापूरच्या मदतीस सिद्दी जौहर व मोगलांचे राजकीय धोरण बदलण्यास शाहिस्तेखान अशी दोन अकल्पित संकटं उद्भवली. पैकी, जौहरचा वृत्तांत आपण पाहिला आहेच. शाहिस्तेखान दक्षिणेत कधी आला हे समजायला मार्ग नसला तरी दि. २८ जानेवारी १६६० रोजी तो औरंगाबादेतून नगरला जायला निघाला व तेथून दि. १६ एप्रिल रोजी शिरवळला दाखल झाला. या दरम्यान केव्हातरी मोगलांनी शिवाजी सोबतचा तह बाजूला ठेवून युद्ध पुकारलं.

    मोगलांनी शिवाजीसोबत युद्ध नेमकं याचवेळी का पुकारलं असावं ? शिवभारतनुसार आदिलशहाच्या विनंतीमुळे औरंगने शाहिस्तेखानास शिवाजीवर चालून जाण्याचा आदेश दिला. परंतु शिवभारत व्यतिरिक्त इतर समकालीन राजकीय पत्रांत याची स्पष्टता झाल्याचे मला आढळून आले नाही. तार्किकदृष्ट्या पाहिले असता बद्धमूल विजापुरी सत्तेपेक्षा नव्याने उदयास येणारी शिवाजीची सत्ता मागाहून चिरडणे मोगलांना शक्य होते. परंतु तसे न करता प्रदेश सानिध्य व विजापूर - शिवाजीच्या बलाबलाचा योग्य अंदाज असल्याने औरंगने शिवाजीचा काटा काढण्यास प्राधान्य दिलं.

    शाहिस्तेखानासोबत असलेल्या लष्कराचे विश्वसनीय आकडे जरी मिळाले नसले तरी जी काही अवाढव्य सैन्यसंख्या मराठी साधनांत दिली आहे त्यावरून त्याची फौज जास्तीत जास्त तीस ते चाळीस हजार इतकी असावी असा माझा अंदाज आहे. कारण याच काळात मोगलांच्या आसम, कुचबिहार प्रदेशात मोठ्या मोहिमा सुरु होत्या. तसेच चंपतराय बुंदेल्याचा बंडावाही सुरु होता. शिवाय शहाजहानपुत्र सुजावर चालून गेलेल्या फौजाही बंगालमध्येच अडकून पडलेल्या होत्या. तसेच प्रचंड प्रमाणात नरसंहार घडवून आणणारी वारसायुद्धे याच काळात झाल्याचेही लक्षात घ्यावे लागते. याशिवाय प्रांतिक प्रशासन, सरहद्दींवरील ठाण्यांत तैनात असलेलं सैन्यबळ लक्षात घेता औरंगजेब याहून अधिक सैन्य या स्वारीत ओतू शकत नव्हता. असो.

    शिवाजीच्या अनुपस्थितीत खान त्याच्या राज्यात घुसला खरा व शक्य तितका मोगली मोगली सरहद्दीला लागून असलेला पुण्याचा प्रदेशही त्याने आपल्या ताब्यात घेतला. परंतु मैदानी मुलखाच्या रक्षण व वर्चस्वाकरता किल्ल्यांची आवश्यकता होती व बव्हंशी किल्ले शिवाजीच्या ताब्यात होते. त्यांपैकी मार्गात असल्यामुळे शाहिस्तेखानाने जूनच्या उत्तरार्धात चाकणला वेढा घातला. चाकणचा किल्ला भुईकोट असला तरी खानास तो अपेक्षेप्रमाणे सहजासहजी जिंकता आला नाही. तब्बल दीड दोन महिने मोगलांना झुंजवून अखेर निरुपाय जाणून आतील मराठी शिबंदीने शरणागती स्वीकारली. ( दि. १५ ऑगस्ट १६६० ) तोपर्यंत शिवाजी पन्हाळ्यावरून निसटून राजगडला येऊन दाखल झाला होता. असो.

    आता आपण पन्हाळ्याच्या वेढ्याची चर्चा करू. जौहरची स्वारी येताच शिवाजीने बहुधा पावसाळा तोंडावर आल्याचे हेरून पन्हाळ्याचा आश्रय घेतल्याचा अंदाज तत्कालीन पत्रांत वर्तवल्याचे दिसून येते. त्यासोबत विजापुरी कर्नाटकात शिरलेल्या त्याच्या मुख्य फौजा मदतीसाठी मागे वळल्या तर पन्हाळाच त्यांच्याकरता सोयीचं ठिकाण ठरत होतं. पुढील बनाव पाहता शिवाजीचे बरेचसे अंदाज यावेळी फोल ठरल्याचे दिसून येते. पावसाळा तोंडावर आला तरी त्याची पर्वा न करता जौहरने वेढा चालवण्याचाच निर्णय घेतला. शिवाय पाउस आरंभ होण्यापूर्वीच त्याने राजापूरकर इंग्रजांकडून तोफा व दारुगोळा मागवून घेतला होता. खेरीज विशाळगडाकडे त्याने आपली काही पथके पाठवून त्यासही वेढण्याची व प्रसंगी शिवाजीला तिथेही आधार मिळू न देण्याची खबरदारीही आपल्या परीने घेतली होती. त्याच्या सुदैवाने याच काळात शाहिस्तेखान शिवाजीच्या राज्यात शिरल्याने तिकडच्या बाजूने त्यांस उपद्रव होण्याची शक्यता कमी झाली होती. धास्ती होती ती फक्त कर्नाटकात गेलेल्या मराठी फौजांची ! शिवाजीही काही प्रमाणात कर्नाटकांत गुंतलेल्या नेताजीच्या कामगिरीकडे डोळे लावून बसला होता. प्राप्त स्थितीवर तोच एक उतारा होता.

    नेताजीने शिवाजीपासून फारकत झाल्यापासून गदग लक्ष्मीश्वर पर्यंत मजल मारून खंडण्या वसूल केल्या होत्या. व विजापूरच्या आसपास तो घिरट्या घालत होता. पन्हाळ्याची बातमी लागल्यावर वा शिवाजीच्या आज्ञेने त्याने थेट विजापूरला धडक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो विजापूर नजीक शहापूर पर्यंत गेलाही. तिथे त्याला रोखण्यासाठी आदिलशाही सेनापती मुल्ला महंमद काही सरदार व पथकांनिशी आडवा आला परंतु नेताजीचं सैन्य अधिक असल्याने विजापुरी फौजांना माघार घ्यावी लागली. मराठी फौजांची धाड विजापूरच्या वेशीनजीक येऊन धडकल्याने राजधानीत गोंधळ माजला खरा परंतु, नेताजीकडे यावेळी पाच हजारांच्या घरात सैन्यबळ असून विजापूरकरांना त्याच्या सामर्थ्याचा अंदाज येताच खवासखान आपल्या जवळील पाच हजार लोकांसह त्याच्यावर चालून गेला. यावेळी झालेल्या झटापटीत नेताजीला पराभव पत्करून माघार घ्यावी लागली. विशेष म्हणजे यासमयी आदिलशाही वाचवण्यासाठी कुतुबशहानेही आपली फौज पाठवली असून या सैन्याने विजापुरी सैन्याच्या मदतीने कुडाळ प्रांतात किंवा विजापूर जवळ खवासखानाच्या साथीने मराठी फौजांचा पराभव केल्याची नोंद मिळते. स. १६६० चा पावसाळा आरंभ होण्यापूर्वीच या सर्व घटना घडल्यामुळे शिवाजी अक्षरशः कोंडीत सापडल्यासारखा झाला होता.

    अंतस्थ बोलाचाली करून त्याने जौहरला वश करण्याचा प्रयत्नही करून पाहिला. पण जौहर आपल्या सेवेशी एकनिष्ठ राहिला. त्यातल्या त्यात जमेशी एक बाजू म्हणजे शत्रू छावणीत वेढ्याच्या प्रसंगी हजर असलेला रुस्तम, होता होईल तितकी शिवाजीची मदत करत होता.

    विजापुरास धडक देऊन शिवाजीची सुटका होण्याजोगी स्थिती निर्माण करण्यात अपयश आल्यावर नेताजी राजगडास आला. तिथे इतर मंत्री, सरदार व जिजाबाईच्या विचाराने नव्याने रणनीतीची आखणी होऊन नेताजीवर शिवाजीच्या सुटकेची जबाबदारी सोपवण्यात येऊन उर्वारीतांनी मोगलांचा प्रतिकार करण्याचे ठरले.
त्यानुसार निवडक फौजफाटा घेऊन नेताजी पन्हाळ्यास आला खरा परंतु यावेळी सिद्दी जौहर हा नेताजीसह सर्वांनाच गुरु भेटला. मूळ वेढ्याला जराही धक्का लागू न देता त्याने नेताजीची अलीकडेच गाठ घेऊन त्यांस सडकून काढले. या झटापटीत शिवाजीच्या सरदाराचा --- सिद्दी हिलालचा पुत्र जखमी होऊन शत्रू हाती कैद झाला. असो.

    सुटकेचे सारे मार्ग तात्पुरते तरी बंद झाल्यासारखे झाल्याने शिवाजीने वेढा लढवण्याचा निर्णय घेतला. पुढे पावसाळा सुरु झाल्यावर वेढ्यात जरी खंड पडला नसला तरी उभयपक्षी वाटाघाटी कमी अधिक प्रमाणात सुरु होऊन दि. १३ जुलै १६६० रोजी शिवाजी व सिद्दी जौहरच्या भेटीचा बेत ठरला !
                                      ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: