सोमवार, ३० जुलै, २०१२

मराठशाही, पेशवाई, ब्रिटीश अंमल आणि महार समाज

      ' महार ' या जातीचा उगम वा निर्मिती याविषयी श्री. संजय सोनवणी यांनी आपल्या ' महार कोण होते ? ' या ग्रंथात संशोधनाद्वारे जे काही निष्कर्ष नोंदवले आहेत त्याच्याशी मी संपूर्ण सहमत असल्याने महारांच्या पूर्वेतिहासाविषयी या ठिकाणी अधिक तपशीलवार चर्चा करणार नाही.  
              मराठेशाहीच्या इतिहासाचा  आरंभ शिवाजीच्या स्वराज्यस्थापने पासून होतो. तेव्हा तत्कालीन मराठेशाहीत व त्याच्याही आधीच्या स्वराज्यस्थापनेच्या आधीच्या  काळात महारांची सामाजिक स्थिती किंवा दर्जा हा कोणत्या प्रकारचा होता हे आधी आपण पाहू. 
   स्वराज्यस्थापनेच्या आधीच्या काळात व नंतरच्या काळात देखील   ग्रामीण जीवनात महाराचे स्थान हे पहिल्या प्रतीच्या बलुतेदाराचे होते. त्याशिवाय महार हे वतनदार देखील होते. महार समाजास बेदरच्या बादशाहाने सुमारे 52 हक्कांची सनद दिल्याचा उल्लेख मिळतो. ( स. 1475 ) या 52 हक्कांच्या प्राप्तीसाठी महारांना नेमून दिलेली कामे करणे अनिवार्य बनले. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे व ती म्हणजे बेदरच्या बहामनी बादशहाने जी काही 52 हक्कांची सनद महारांना दिली आहे ती फक्त सोमवंशी महारांना दिल्याचे त्या सनदेत नमूद केले आहे. या ठिकाणी काही प्रश्न उद्भवतात ते असे :- महारांना किंवा इतर कोणत्या जातीला अशा प्रकारचे 52 किंवा त्याहून कमी - जास्त हक्क देण्यात आले होते का ? अशा प्रकारच्या हक्कांची मागणी यावेळी बहामनी बादशहाकडे कोणी केली होती का ? कारण, सनदेमधील भाषा पाहता या हकांसाठी इतरही जाती उत्सुक असल्याचे दिसून येते आणि या 52 हक्कांच्या सनदेच्या पाठीमागे अतिशय भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी आहे हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. याखेरीज अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे कि, सोमवंशी महार म्हणजे नेमके कोणते महार ? 52 हक्कांची जी सनद बहामनी बादशाहने महारांना दिली ती फक्त सोमवंशी महारांना दिल्याचे त्याच सनदेमध्ये नमूद केले आहे.
                   वरील निष्कर्षावरून काही नवीन प्रश्न उपस्थित होतात व ते म्हणजे (1) 52 हक्कांची सनद हि महारांच्या अस्पृश्यतेचा जर पाया समजली गेली तर ही अस्पृश्यता फक्त सोमवंशी महारांशी संबंधित असायला हवी. पण तत्कालीन व सद्यस्थितीतील वस्तुस्थिती काय आहे ? 
(2) पहिल्या प्रश्नातच दुसरा प्रश्न अंतर्भूत आहे व तो म्हणजे जर ती 52 हक्कांची सनद फक्त सोमवंशी महारांनाच मिळाली असे गृहीत धरले तर आज हे सोमवंशी महार आहेत कुठे ?  महार समाजातील विचारवंतानी आणि अभ्यासकांनी या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. 
                          शिवपूर्वकाळात महारांना ग्रामीण जीवनात महत्त्वाचे स्थान होते हे निश्चित पण ते अस्पृश्य होते असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. 
                   शिवाजीच्या काळात म्हणजेच मराठेशाहीमध्ये महारांचे स्थान हे पूर्ववत राहिले. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीची नोंद घेणे गरजेचे आहे व ती म्हणजे बहामनी बादशहाने सोमवंशी महारांना जी सनद दिली होती, त्या सनदेला वेगवेगळ्या राजवटींकडून वेळोवेळी मान्यता मिळवून घेण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. सामान्यतः वतनदार ज्याप्रमाणे राजवट बदलली कि शासनकर्त्याकडून आपल्या वतनास मान्यता मिळवून घेतो त्यातलाच हा प्रकार ! परंतु, या ठिकाणी हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे कि, बहामनी बादशहाकडून जी सनद सोमवंशी महारांना मिळाली त्या सनदेस परवानगी देताना त्यातील 52 हक्कांमध्ये आणि त्याबदल्यात महारांनी करायच्या कामांमध्ये प्रसंगानुसार बदल झाला असण्याची दाट शक्यता आहे.      
                  शिवाजीच्या लष्करात महारांना प्रवेश होता किंवा शिवाजीच्या सैन्यात महार लोकं होती असे सर्रास सांगितले जाते पण या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे कि शिवाजीच्याआधी देखील महार लोकं लष्करी वा तत्सम  सेवेत कार्यरत होते. जर अशी पूर्वपरंपरा नसती तर शिवाजीने महारांना लष्करात प्रवेशच दिला नसता. शिवाजी हा लोकोत्तर पुरुष होता हे मान्य ! परंतु, त्याच्या विचारातील पुरोगामीपणा अथवा क्रांती हि फक्त राजकीय आणि लष्करी क्षेत्रापुरतीच मर्यादित होती. सामाजिक बाबतीत त्याने फारशी क्रांतिकारक पावले उचलली नाहीत व हा काही त्याचा दोष नाही. तो ज्या काळात, समाजात वावरत होता त्या काळाची, समाजाची बंधने काही प्रमाणात तरी पाळणे त्यास आवश्यक असेच होते. सामाजिक किंवा जातींच्या बाबतीत शिवाजीचे धोरण कसे होते हे आपल्यास शिवाजीच्या अस्सल पत्रावरून अभ्यासता येऊ शकते. { जातींविषयक शिवाजीचे धोरण वा त्याची आज्ञा पुढील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे :- http://sanjaykshirsagar24.blogspot.in/2012/05/blog-post.html } 
                  शिवाजीचे जातींविषयक धोरण पाहिले असता काही शंका मनामध्ये निर्माण होतात. त्यातील प्रमुख म्हणजे शिवाजीला नेमके काय अपेक्षित आहे ? ब्राम्हणांनी आपला अध्ययन, विद्यादान व भिक्षुकीचा परंपरागत व्यवसाय करायचा कि उपजीविकेसाठी मिळेल तो धंदा करायचा ? कारण ; शिवाजीचे कित्येक मंत्री, सरदार हे ब्राम्हण होते. शिवाजीची जातींविषयक आज्ञा पाहता या सर्व ब्राम्हण सरदार - मंत्र्यांनी आपापल्या नोकऱ्या सोडून परंपरागत व्यवसाय करायला पाहिजे होते परंतु, तसे न करता ते क्षत्रियाचे काम करताना दिसतात. शिवाजीनंतर संभाजी छत्रपती बनला. त्याचा विश्वासू सल्लागार कवी कलश हा स्वतःला ' वर्णाश्रमधर्मप्रतिपालक '  म्हणवतो. { कवी कलशचे आज्ञापत्र :- http://sanjaykshirsagar24.blogspot.in/2012/05/blog-post_28.html } यावरून असेही म्हणता येते कि स्वतः संभाजी हा देखील वर्णाश्रमपद्धतीचा पुरस्कर्ता असावा. अन्यथा, त्याच्या सेवकाने अशा अर्थाची उपाधी स्वतःला लावून घेतली नसती, किंबहुना संभाजीने त्याला अशी पदवी धारणच करून दिली नसती ! 
                  यावरून शिवाजी व संभाजीच्या सामाजिक धोरणांतील अर्थ लक्षात येतो. सामाजिक प्रथांमध्ये फारशी ढवळाढवळ न करता व्यवहारात जातींचे फाजील स्तोम माजू न देण्याकडे त्यांचा कल असल्याचे दिसून येते. अव्वल मराठेशाहीत महारांना लष्करात प्रवेश तर होताच त्याशिवाय किल्य्यावर देखील त्यांची नेमणूक केली जात असे. किल्ल्यावरील मेटेकरी म्हणून जो रक्षक वर्ग असे त्यात महारांचा भरणा असे.  किल्लेदारीचे पद त्यांना दिल्याचे उल्लेख काही लेखकांनी केले आहेत पण त्यासाठी आवश्यक तो पुरावा त्यांनी दिला नाही. अव्वल मराठेशाहीमधील पुढील दोन उदाहरणे महारांचा सामाजिक दर्जा काही प्रमाणात स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत असे मला वाटते. ती 2 उदाहरणे खालीलप्रमाणे :- (1) औरंगजेब दक्षिणेत आल्यावर मराठ्यांचा व त्याचा दीर्घकाळ लढा जुंपला. या लढ्यात मराठ्यांप्रमाणेच अनेक जातींमधील लोकांनी देखील प्रामुख्याने सहभाग घेतला. यापैकी महार समाजातील शिदनाक या महार सरदाराचे उदाहरण या ठिकाणी पुरेसे आहे. त्याने सजातीय लोकांची एक पलटण उभारून मोगलांशी झुंज दिली. त्याच्या या पराक्रमाची दखल संभाजीपुत्र शाहूने घेऊन त्यास कळंबी हे गाव इनाम दिले. हे गाव त्याच्या वंशात पुढे इनाम म्हणून चालू राहिले. पेशवाईमध्ये देखील त्याच्या वंशजांनी सरकार चाकरी बजावली. खर्ड्याच्या प्रसिद्ध लढाईमध्ये उपरोक्त शिदनाकचा नातू शिदनाक  याने पेशव्यांच्या वतीने युद्धात सहभाग घेतल्याचा उल्लेख मिळतो. यावरून असे दिसून येते कि, पेशवाईअखेर पर्यंत तरी महारांना अस्पृश्य समजण्यात येत नव्हते. अन्यथा एका महार व्यक्तीस शाहू छत्रपतीने गाव इनाम दिलेच नसते. तसेच एका अस्पृश्याकडे पेशव्यांनी, छत्रपती नामधारी झाल्यावर, सदर गाव इनाम म्हणून चालू दिले नसते ! 
(2) वाई प्रांतातील नागेवाडी या गावाची पाटीलकी महार घराण्यात असल्याचा उल्लेख अस्सल कागदपत्रांमध्ये आढळून येतो. यावरून पाटीलकी पदावर फक्त मराठा जातीतील लोकांची नियुक्ती केली जात असे असा जो समज आहे तो निराधार असल्याचे दिसून येते. या दोन उदाहरणांवरून अव्वल मराठेशाहीमध्ये तरी महार अस्पृश्य असल्याचे दिसून येत नाही. 
                          पेशवाईमध्ये देखील महारांच्या स्थानास धक्का बसल्याचे किंवा त्यांची अवनती झाल्याचे दिसून येत नाही. अपवाद फक्त पेशवाई अखेरीचा ! पेशवाईमध्ये लष्करी सेवेत महारांचा दर्जा उंचावल्याचे दिसून येते. त्याकाळात लढाईआमध्ये परक्रम गाजवणाऱ्या व्यक्तीस ' उडत रुमाल ' हा बहुमान दिला जात असे व कित्येक प्रसंगी हा बहुमान महार व्यक्तींनी पटकावल्याचे नमूद आहे. याशिवाय शनिवारवाड्याच्या आत पहारेकरी म्हणून देखील महारांची नियुक्ती केली जात असे. यावरून त्यावेळी महारांची अस्पृश्यतेची कल्पना यावी. 
                           पेशवाईमधील महारांच्या या स्थानास एका नाजूक कारणाने धक्का बसला. शनिवारवाड्यातील एका स्त्रीचा व महार रक्षकाचा संबंध जुळून आला. हि बाब उघडकीस येताच पेशव्याने त्या महार पहारेकऱ्यास देहदंडाची शिक्षा दिली. परंतु एवढे करून पेशव्याचा राग शमला नाही तर पुणे शहरात प्रवेश करताना महार जातीच्या लोकांनी गळ्यात मडके  व कमरेस झाडाची फांदी अथवा खराटा बांधावा अशी त्याने आज्ञा देखील काढली. हि आज्ञा नेमक्या कोणत्या पेशव्याने काढली याचा उलगडा होत नाही. जेव्हा ते आज्ञापत्रक मला उपलब्ध होईल त्यावेळी या ब्लॉगवर ते प्रसिद्ध करण्यात येईल. पेशव्याने महार समाजास उद्देशून जी आज्ञा काढली ती बहुतेक पुणे शहरापुरतीच मर्यादित असावी. जर तसे नसते व हि आज्ञा सबंध राज्यात काढण्यात आली असती तर पेशव्याच्या लष्करातील महारांनी आपापल्या नोकऱ्या सोडून पेशव्यांच्या शत्रूंकडे धाव घेतली असती. नारायणराव पेशव्याने प्रभू लोकांच्या विरोधात अशाच प्रकाराची आज्ञा काढून आपला घात ओढवून घेतला होता हे इतिहासात प्रसिद्ध आहेच !  तेव्हा महारांनी देखील अशा पद्धतीचा एखादा प्रयत्न केलाच नसता असे म्हणता येत नाही. असो, यावरून असे सिद्ध होते कि, महारांना अवमानकारक जी आज्ञा पेशव्यांनी काढली होती ती फक्त पुणे शहरापुरती मर्यादित होती. कदाचित आसपासच्या गावांमध्ये देखील याचे पडसाद उमटले असतील. 
                      स. 1817 - 18 मध्ये इंग्रजांशी पेशव्यांनी जो अखेरचा निर्णायक लढा पुकारला त्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातील अठरापगड जातींनी दोन्ही पक्षांच्या वतीने सहभाग घेतला होता. पैकी महारांच्या बाबतीत बोलायचे झाले तर भीमा - कोरेगावच्या अनिर्णीत लढ्यामध्ये इंग्रजांच्या सैन्यातील महारांनी आपल्या पराक्रमाची शर्थ करून निर्णायक पराभव व त्यानंतर होणारी कत्तल टाळली. रायगडावर इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा किल्ल्याच्या बचावासाठी पेशव्याच्या सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. या संग्रामात महारांनी देखील किल्ला लढवताना आपल्या धन्यासाठी, ब्राम्हण पेशव्यासाठी मरण पत्करले !  
                         पेशवाई नष्ट झाल्यावर इंग्रजाची राजवट सुरु झाली. या राजवटीने महारांच्या पदरात फारसे काही पडले नाही. बहामनी बादशहाने त्यांना दिलेल्या सनदेची ब्रिटीश काळात परत एकदा उजळणी झाली. ग्रामीण जीवनात महार हा पहिल्या प्रतीचा बलुतेदार असून तसाच तो वतनदार देखील होता. वतनदारांच्या बाबतीत शिवाजी आणि इंग्रज यांचे धोरण जवळपास एकसारखेच होते. त्यांनी वतने कायम राखली, वतनदार देखील कायम राखले पण त्यांचे अधिकार काढून घेऊन त्यांना सरकारी नोकर बनवले. इंग्रजांच्या या धोरणामुळे महारांचे अधिक नुकसान झाले असे म्हणता येत नाही. याचे कारण म्हणजे, महारांनी बहामनी बादशहाच्या सनदेस इंग्रजांच्या कडून मान्यता मिळवून घेऊन स्वतःचा घात करून घेतला. यामुळे त्यांना 52 हक्कांच्या बदल्यात काही अनिवार्य कामे करणे बंधनकारक बनले. त्याशिवाय बलुतेदार म्हणून जी काही त्यांच्यावर जी काही जबाबदारी होती ती पार पाडणे,  वतनदार म्हणून सरकारी आणि  गावाची कामे पार पाडणे अशा तिहेरी जबाबदाऱ्या पार पाडणे अनिवार्य असे बनले. एकूण, महारांनी स्वतःच्या हातून स्वतःच्या पायात ' गुलामगिरी ' च्या, ' दारिद्र्याच्या ' शृंखला अडकवून घेतल्या असे म्हणता येते !
             ब्रिटीश काळात महारांच्या सामाजिक दर्ज्यात कमालीची घसरण होत गेली. पेशवाई अखेरीस पुणे शहरात त्यांच्यावर गळ्यात मडके व कमरेला फांदी / खराटा बांधण्याची जी शिक्षा किंवा सक्ती केली गेली होती ती ब्रिटीशकाळात देखील कायम राहिली. इतकेच नव्हे तर या प्रथेची अंमलबजावणी पेशवे काळात फक्त पुणे शहरापुरती मर्यादित होती ती ब्रिटीश काळात सर्वत्र प्रचलित झाली ! ब्रिटीश राजवटीने अशा प्रकारे महारांच्या सामाजिक अवनतीस, त्यांच्या अस्पृश्य होण्याच्या क्रियेस एकप्रकारे हातभार लावला असे का म्हणू नये ? 
   
संदर्भ ग्रंथ :- 
1) महार कोण होते ? :-  संजय सोनवणी 
2) शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास :- अनिल कठारे 
 3) मराठे व इंग्रज :- न. चिं. केळकर 

मंगळवार, २४ जुलै, २०१२

इतिहास कोणाचा ? एक चिंतन

            मराठी इतिहास अभ्यासकांना व वाचकांना मराठ्यांचा / ब्राम्हणांचा इतिहास या संकल्पना किंवा विवाद अपरिचित आहेत असे नाही. गतकाळात या दोन जातींनी जो इतिहास घडवला आहे त्याहून अधिक त्यांच्या वंशजांनी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे ग्रंथरूपी लेखन केले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटू नये ! असो, या ठिकाणी आपल्याला हे बघायचे आहे कि मराठी इतिहासात मराठ्यांचा / ब्राम्हणांचा असे इतिहासात काही भेद खरोखर आहेत का ?
               शिवाजीपासून मराठ्यांच्या इतिहासास आरंभ होतो असा एक मतप्रवाह आहे त्याचप्रमाणे शिवपूर्वकाळात देखील मराठ्यांना इतिहास आहे असाही एक मतप्रवाह आढळतो. तसे पाहता दोन्ही मतांमध्ये तथ्य आहे ! मात्र यात फरक इतकाच कि, शिवपूर्वकाळातील मराठ्यांचा इतिहास हा स्वतंत्र मराठा राजघराण्यांचा इतिहास होता असे म्हणता येत नाही.  अर्थात मांडलिक म्हणून जी काही मराठा राजघराणी होती ती एकप्रकारे स्वतंत्रच होती असेही म्हणता येते. नाहीतर मांडलिक या शब्दाचा दुसरा अर्थ  काय  ?  शिवाजीपासून मराठ्यांच्या इतिहासास आरंभ झाला असे जे म्हटले जाते त्यामागील महत्त्वाची भूमिका म्हणजे शिवाजीच्या आधीचे मराठे, परधर्मीय सत्तांच्या व स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांचे गळे कापत. परंतु शिवाजीच्या काळात व नंतर देखील मराठा छत्रपतीसाठी परधर्मियांचे व प्रसंगी सजातीयांचे देखील गळे घोटण्यास मराठ्यांनी मागे - पुढे पाहिले नाही. 
                कोणत्याही काळात, समाजात एक गोष्ट व्यवहारात दिसून येते व ती म्हणजे एखाद्या क्षेत्रात एका विशिष्ट वर्गातील / समूहातील / जातीमधील व्यक्ती अधिकारपदावर असते तेव्हा त्या क्षेत्रात ती व्यक्ती मोक्याच्या आणि अधिकाराच्या जागी स्ववर्गीय / स्वजातीय लोकांची नेमणूक करत असते. या दृष्टीने पाहता शिवाजी देखील या नियमास अपवाद असल्याचे दिसून येत नाही. शिवाजीच्या काळात व त्याच्यानंतर देखील शाहू छत्रपतीपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये लष्करावर मराठा सरदारांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. या काळात दरबारी राजकारणात मराठ्यांचे स्थान जरी दुय्यम असे दिसत असले तरी खुद्द छत्रपती हा मराठा असल्याने व सर्व लष्करी शक्ती मराठा सरदारांच्या हाती असल्याने स. 1630 ते  1749 पर्यंतचा इतिहास हा निर्विवादपणे मराठ्यांचा इतिहास आहे असे म्हणता येते.   
                            स. 1749 ते 1818 पर्यंतचा जो काळ आहे त्या काळाला वरील अर्थाने ब्राम्हणी इतिहास म्हणता येईल का ?  
                 बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीची आरंभीची 10 वर्षे, या काळात कमी - जास्त प्रमाणात लष्करावर मराठा सरदारांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. परंतु, यामध्ये देखील काही भेद आहेत. उदाहरणार्थ -  शिंदे, पवार, भोसले, दाभाडे, गायकवाड या मराठा सरदारांच्या सोबत होळकराचा देखील मराठा सरदार म्हणून उल्लेख होतो. या ठिकाणी ' मराठा ' हि संकल्पना जातीय अर्थाने न घेता व्यापक अशा अर्थाने घेतली जाते असे म्हटले जाते. परंतु जेव्हा, पानिपतच्या रूपाने अपयशाचा तडाखा मराठी राज्याला बसला तेव्हा मात्र केवळ एकट्या होळकराला दोषास पात्र ठरवले जाते. अशा वेळी  ' मराठा ' संकल्पनेचा संकुचित अर्थ घेतला जातो हे उघड आहे. याच धर्तीचे दुसरे उदाहरण म्हणजे, पेशवाईमध्ये विजय मिळाल्यास तो पेशव्याचा, ब्राम्हणांचा किंवा हिंदू धर्माचा असतो आणि पराजय झाला कि तो मराठ्यांचा असतो ! तेव्हा पेशवाईचा इतिहास म्हणजे ब्राम्हणांचा किंवा बामणांचा इतिहास असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा प्रश्न असा पडतो कि, नेमका कोणत्या बामणांचा हा इतिहास ? 
                           आधीच्या परिच्छेदात म्हटल्यानुसार अधिकारी व्यक्ती ज्या वर्गाचे / समुहाचे / जातीचे प्रतिनिधित्व करते, त्या समूहातील / वर्गातील अथवा जातीतील लोकांना योग्य वेळी मोक्याच्या आणि अधिकाराच्या जागा देत असते. या व्यावहारिक नियमास ज्याप्रमाणे शिवाजी अपवाद नव्हता त्याचप्रमाणे पेशवेदेखील अपवाद नव्हते ! कोणत्याही राज्यसत्तेचे बळ तिच्या लष्करी सामर्थ्यात असते. हे लक्षात घेता, पेशव्यांनी संधी मिळताच सजातीय लोकांना या पेशामध्ये येण्यास उत्तेजन दिले त्यात गैर ते काय ! स. 1750 पर्यंत उत्तर हिंदुस्थानात जाधव, पवार, शिंदे, भोसले, होळकर इ. सरदार वावरत होते. त्यांच्या जोडीला हळूहळू विंचूरकर, माणकेश्वर, बुंदेले हे सरदार देण्यात आले. यामागील पेशव्यांचा हेतू काय होता हे अधिक तपशीलवर सांगण्याची गरज आहे का ?
              जे उत्तर हिंदुस्थानात झाले तेच मोठ्या प्रमाणात दक्षिण हिंदुस्थानात झाले. दक्षिण हिंदुस्थानातील मोहिमांमध्ये पेशव्यांची प्रामुख्याने भिस्त सजातीय ब्राम्हण सरदारांवर असल्याचे दिसून येते. याचा असाही अर्थ काढता येऊ शकतो कि, डोईजड मराठा सरदारांना पर्याय म्हणून पेशव्यांनी सजातीय सरदार निर्माण केले. अर्थात, हा केवळ तर्क आहे याची वाचकांनी जाणीव ठेवावी ! नानासाहेब पेशव्याच्या नंतर पुणे दरबारात व लष्करात मराठ्यांचे वर्चस्व कमी होऊन ब्राम्हणांचे वाढू लागले. या पार्श्वभूमीवर पेशवाईचा इतिहास हा ब्राम्हणी इतिहास म्हटला जाऊ शकतो पण अधिक विचार केला असता असे म्हणणे धाडसाचे असल्याचे दिसून येते. 
                     दरबारात व लष्करात ब्राम्हणी सरदारांची संख्या जरी वाढली असली तरी प्रसंग पडला असता पेशव्यांना मुख्य आधार मराठा सरदारांचाच होता. बरे, त्यातही आता निव्वळ मराठा आणि बिनमराठा असाही भेद निर्माण झाला होता. अर्थात, होळकराच्या रूपाने तो भेद आधीपासूनच अस्तित्वात होता आणि होळकर हे नाव त्यामानाने प्रसिद्ध असल्याने ते एकमेव आणि अपवादात्मक उदाहरण असावे असा वाचकांचा ग्रह होण्याची दाट शक्यता आहे. परंतु, पेशवे काळात लष्करी चाकरीत निव्वळ ब्राम्हण अथवा मराठा जातीतील लोकच पुढाकार घेत होते असे नसून महाराष्ट्रातील अठरापगड जातींचा त्यात सहभाग असल्याचे दिसून येते.
                      कित्येक वाचकांना पुढील काही काही विधाने वाचून धक्का बसेल. पेशवेकाळात मोठा / चांगला पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तीस ' उडत रुमाल ' नामक पदवी दिली जात असे. अर्थात हि पदवी मोठ्या बहुमानाची असून,  हि पदवी अथवा हा बहुमान देताना व्यक्तीची जात लक्षात न घेता त्याचा पराक्रम पाहिला जात असे. हा बहुमान आजकाल ज्यांना ' दलित ' म्हटले जाते त्यांना देखील दिला गेल्याचे तत्कालीन लेखांमध्ये नमूद आहे. { वि. सु. : - प्रस्तुत ठिकाणी  ' दलित ' या संज्ञेमध्ये निव्वळ महार / नवबौद्ध समाविष्ट नसून सर्वच अस्पृश्य जातींचा समावेश आहे. }  पेशवाई अखेरच्या काळात तर प्रमुख मराठा सरदार मुख्य सत्तेपासून किंवा प्रवाहापासून अलग राहिल्याचे दिसून येते. या निर्णायक काळात ब्राम्हणांच्या जोडीने सध्याच्या मराठा व्यतिरिक्त  बहुजन समाजातील कर्तबगार व पराक्रमी व्यक्तींनी  सहभाग घेतला होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
           सारांश, स. 1749 ते 1818 हा जो काही 60 - 70 वर्षांचा काळ आहे त्या काळाचे प्रथमदर्शनी नायकत्व ब्राम्हणवर्गाकडे असल्याचे दिसून येत असले तरी त्या काळाचे खरे नायक म्हणजे महाराष्ट्रीयन / मराठी लोक आहेत. ज्यामध्ये महराष्ट्रातील तत्कालीन व सध्याच्या सर्व जाती - जमातीच्या कर्तबगार व्यक्तींचा समावेश होतो. एकूणच, स. 1630 ते 1749 पर्यंतचा इतिहास हा ज्याप्रमाणे मराठ्यांचा इतिहास म्हणून ओळखला जातो त्याप्रमाणे स. 1749 ते 1818 पर्यंतच्या कालखंडातील इतिहास हा निव्वळ ब्राम्हणांचा इतिहास आहे असे न म्हणता तो ब्राम्हण व इतर सर्व जातींचा मिळून संमिश्र असा मराठी लोकांचा इतिहास होता असे म्हणता येईल. 
                              

बुधवार, १८ जुलै, २०१२

सोमवार, १६ जुलै, २०१२

गंगाधर यशवंत चंद्रचूड


           
          इतिहासविषयक लेखन करताना, ते देखील संशोधनात्मक किंवा विश्लेषणात्मक, लेखकाने तटस्थवृत्तीने लेखन करावे असा एक सर्वसाधारण नियम आहे. हा नियम तात्विकदृष्ट्या कितीही योग्य असला तरी व्यवहारात याची शब्दशः अंमलबजावणी करणे शक्य नसते. किंबहुना कितीही मोठा इतिहासकार असला तरी त्याचे इतिहास लेखन हे कधीही १००% निःपक्षपाती भूमिकेतून होत नसते आणि मनुष्यस्वभाव किंवा निसर्गनियम लक्षात घेता अशी अपेक्षा कोणत्याही लेखकाकडून करणे हे अयोग्य आहे. परंतु, असे असले तरी इतिहास लेखन करताना कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीचे जाणते – अजाणतेपणी बदनामीकारक अथवा विकृत चित्रण करणे हे चुकीचे आहे. कित्येकदा अशा गोष्टी नकळत होऊन जातात, पण त्या लक्षात येताच त्याविषयी आपली चूक झाली आहे असे स्पष्टपणे सांगून माफी मागणे व त्या व्यक्तीविषयी लिहिलेला तो विशिष्ट मजकूर आपल्या लेखनातून काढून टाकणे हा मार्ग इतिहास लेखकासमोर उपलब्ध असतो. परंतु दुदैवाने, फार कमी इतिहास लेखक या मार्गाचा अवलंब करत असल्याचे दिसून येते. हा सर्व लेखन प्रपंच करण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्याही हातून जाणते - अजाणतेपणी एक गुन्हा घडला आहे.
       अव्वल पेशवाईतील प्रसिद्ध मराठी सरदार मल्हारराव होळकर, याचा दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड या ऐतिहासिक व्यक्तीचे माझ्या ‘ पानिपत असे घडले ‘ या पुस्तकात विकृत चित्रण जरी केले नसले तरी त्या व्यक्तीच्या पराक्रमाला न्याय देणे, त्याच्या पराक्रमाचा उल्लेख करणे मला शक्य झाले नाही. माझ्या त्या कृत्याचे म्हणा किंवा पापाचे म्हणा, प्रायश्चित्त म्हणून गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबातात्या या व्यक्तीच्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेणारा एक छोटासा लेख मी या ठिकाणी प्रसिद्ध करत आहे. 

           गंगाधर यशवंत चंद्रचूडचा जन्म कधी व कुठे झाला याविषयी मला माहिती मिळाली नाही. तो निंब गावचा रहिवाशी असून मल्हारराव होळकराचा कारभारी किंवा दिवाण म्हणून त्याची नेमणूक बाजीराव पेशवा याने केली. किंबहुना असेही म्हणता येईल की, गंगोबाची नियुक्ती अंबाजीपंत पुरंदरे याने केली. याचे कारण सांगण्यापूर्वी तत्कालीन मराठी राज्यातील अशा महत्त्वाच्या पदांवरील नेमणुका कशा केल्या जात याची माहिती या ठिकाणी देतो.
      चिटणीस (पत्रव्यवहार ), फडणीस ( हिशेब ) व पोतनीस ( खजिन्याचा सांभाळ ) हे कामगार छत्रपतींच्या दरबारी असत व त्यांना दरखदार असेही म्हणत. अर्थात कोणत्याही राज्यचालकाच्या वा सुभेदाराच्या पदरी या तीन अधिकाऱ्यांची आवश्यकता ही असतेच. छत्रपतींकडे जे अष्टप्रधान असत त्या अष्टप्रधानांना देखील राज्यकारभार करण्यासाठी फडणीस, पोतनीस व चिटणीस या अधिकाऱ्यांची गरज लागे. परंतु, अष्टप्रधानांपैकी कोणीही आपल्या मर्जीनुसार उपरोक्त पदांवर व्यक्तीची नेमणूक वा बडतर्फी करू शकत नसे. अष्टप्रधानांकडील चिटणीस, फडणीस व पोतनीस या हुद्द्यांवरील नोकरांची नेमणूक करण्याचे अधिकार छत्रपतींकडे असलेल्या दरखदारांकडे असत. अर्थात यासाठीसुद्धा वशिलेबाजी केली जात असे. उदाहरणार्थ, शाहूने बाळाजी विश्वनाथ यांस जेव्हा पेशवेपदाची वस्त्रे दिली तेव्हा त्याच्या पदरी फडणीस म्हणून रामाजीपंत भानू याची नियुक्ती करण्यात आली. वस्तुतः रामाजीपंत भानू यास पेशव्यांची फडणीशी जरी छत्रपतींच्या दरखदाराकडून म्हणजे फडणीसाकडून झाली असली तरी ती पेशव्याच्या शिफारशीने झाली होती हे लक्षात घेणे गरजेचे आहे. भानू व भट या दोन घराण्यांचे जे काही ऋणानुबंध होते त्यास जागून बाळाजी विश्वनाथाने रामाजीपंत यांस आपली फडणीशी दिली.
         छत्रपतींच्या राज्याच्या रक्षणासाठी व राज्यवृद्धीसाठी अष्टप्रधानांना आपल्या हाताखाली अनेक लहान – मोठे सरदार बाळगावे लागत. त्याचप्रमाणे पेशव्यांच्या हाताखाली देखील कित्येक सरदार होते व कित्येकांना रोख पगार तर काहींना सरंजामी प्रांत तोडून दिले जात. ज्या सरदारांना असे प्रांत तोडून दिले जात त्या सरदारांना, त्या प्रांताच्या कारभारासाठी जे मदतनीस लागत. त्यांची नियुक्ती पेशव्यांच्या मार्फत केली जात असे. जोपर्यंत सातारचे छत्रपती आपला अधिकार रक्षून होते तोपर्यंत या सर्व नेमणुका अप्रत्यक्षपणे त्यांच्या मार्फत केल्या जात. परंतु पुढे पेशव्यांनी छत्रपतींना गुंडाळल्यामुळे अशा नेमणुका करण्याचे अधिकार पेशव्यांकडे आले. म्हणजेच, पेशव्यांच्या पदरी असलेले शिंदे – होळकरांसारखे मोठे सरदार असो की पेठे वा पटवर्धन हे लहान सरदार असो, त्यांना सरंजाम लावून दिल्यास त्यांच्याहाताखाली जे नोकर नेमून दिले जात त्यांची नियुक्ती पेशव्यांच्या मार्फत केली जात असे. ही बाब कित्येक इतिहासकारांनी व अभ्यासू वाचकांनी दुर्लक्षित केलेली आहे. गंगोबा किंवा त्याच्याप्रमाणेच इतर सरदारांच्या पदरी जे काही कारभारी नेमले गेले व त्यांनी प्रसंगी पेशव्यांच्या अथवा मराठी राज्याच्या विरोधात जी काही कारस्थाने केली, त्याबद्दल त्यांना दोष दिला जातो व तो स्वाभाविक आहे. परंतु, त्यांना दोष देण्यापूर्वी, त्या लोकांना अधिकाराची जागा कोणी दिली याचीही दखल घेणे गरजेचे आहे. मुळातच या कारभाऱ्यांची नेमणूक करण्यामागे पेशव्यांचा काय हेतू असे याचीही माहिती घेणे गरजेचे आहे.
    सरदारांच्यामार्फत आपले हेतू साध्य करून घेण्यासाठी आणि सरदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पेशवे आपल्या मर्जीतील इसमांना सरदारांचे कारभारीपद देत असत. हे लक्षात घेता गंगोबाने होळकरांचा कारभारी म्हणून जी काही बरी – वाईट कृत्ये केली त्या सर्वांची जबाबदारी प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्षपणे पेशवा आणि त्याच्या कारभाऱ्यावर येते.
        गंगाधर चंद्रचूड यास होळकरांचे कारभारीपद कधी व कसे मिळाले याची तपशीलवार माहिती माझ्याकडे सध्या तरी नाही. परंतु, होळकरांच्या पदरी गेल्यावर गंगाधर चंद्रचूड मुत्सद्दी व योद्धा म्हणून नावारुपास आला हे निश्चित ! मल्हारराव होळकराने ज्या काही मोहिमा पुढे यशस्वीपणे पार पाडल्या त्या सर्व मोहिमांमध्ये गंगाधर चंद्रचूडने सहभाग घेतला. इतकेच नव्हे तर प्रसंगी होळकरांच्या मुख्य सेनापतीचे कार्य देखील त्याने पार पाडल्याचे दिसून येते.
   या ठिकाणी गंगाधर यशवंत चंद्रचूड या व्यक्तीने ज्या काही महत्त्वाच्या घडामोडींमध्ये सहभाग घेतला त्या घटनांची माहिती थोडक्यात दिली आहे.
(1)  मोगल वजीर सफदरजंग याने देशी – परदेशी रोहिले – पठाणांच्या विरोधात जाट आणि मराठ्यांची मदत मागितली. त्यावेळी शिंदे आणि होळकर सफदरजंगाच्या मदतीस गेले. सफदरजंगच्या मदतीस जाट व मराठी सरदार आल्याचे पाहून अहमदखान बंगशने फरुखाबाद जवळ गंगाकाठी हसनपूर येथे आपली छावणी ठोकली. या ठिकाणाहून त्याने मराठ्यांचा मुकाबला करण्याचा निर्धार केला. हसनपुरा जवळ  किल्ला असून त्यास फत्तेगड असे म्हणत.  फत्तेगडास शिंदे, होळकर, जाट आणि सफदरजंग यांच्या संयुक्त फौजांनी वेढा घातला. त्यावेळी बंगशच्या मदतीस सादुल्लाखान आणि बहादूरखान हे दोन रोहिला सरदार आपापल्या फौजफाट्यासह येऊ लागले. यांना रोखण्याची जबाबदारी गंगाधर यशवंत आणि जवाहीर जाट यांच्यावर सोपवण्यात आली. उभय खानांची व गंगोबा आणि जवाहीर यांची २८ एप्रिल १७५१ रोजी मोठी लढाई घडून आली. रोहील्यांची बव्हंशी फौज कापली गेली. बहादूरखान लढाईत मारला गेला तर सादुल्लाखान जीव घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. मराठी फौजांच्या या विजयाचा परिणाम म्हणजे हसनपूरची छावणी सोडून बंगशने रातोरात पळ काढला.
(2)   कुंभेरी वेढ्याच्या प्रसंगी मल्हारराव होळकराचा मुलगा खंडेराव मारला गेला. ( मार्च १७५४ ) या प्रसंगानंतर मल्हाररावाने प्रत्यक्ष संग्रामात सहभाग न घेता तुकोजी होळकर व गंगाधर यशवंत यांच्यावर युद्धाची जबाबदारी सोपवल्याचे दिसून येते. अर्थात, एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूचे दुःख आणि वृद्धत्व यांमुळे असे होणे स्वाभाविक होते. स. १७५४ नंतर मल्हाररावाने ज्या काही मोहिमा पार पाडल्या त्या सर्वांमध्ये गंगोबा प्रमुख होता. रघुनाथरावाच्या प्रसिद्ध अटक स्वारीत तुकोजी व गंगाधर यशवंत यांनीच प्रामुख्याने होळकरी सैन्याचे नेतृत्व केले.
(3)  बुराडी घाटच्या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे मरण पावल्यावर अब्दालीशी लढण्याची जोखीम मल्हाररावाने आपल्या शिरावर घेतली. त्याप्रसंगी होळकरांच्या सैन्याचे नेतृत्व गंगोबानेच केले होते. रोहिलखंडात शिरून अब्दालीला मिळणारी रोहील्यांची रसद तोडण्याचा डाव मल्हाररावाने आखला. तेव्हा रोहील खंडात स्वारी करण्याची जबाबदारी त्याने गंगोबावर सोपवली. गंगोबाने सिकंदरा आणि आसपासच्या भागात लुटीचा धडाका लावला. अब्दालीने त्याच्या बंदोबस्तासाठी जहानखान व नजीबखान यांची नियुक्ती केली. ४ मार्च १७६० रोजी सिकंदर येथे जहानखान व नजीबखान यांनी गंगोबाचा पराभव केला.
(4)    पानिपत मोहिमेवर भाऊची नेमणूक करण्यात आली. त्यावेळी उत्तरेत अब्दाली शिंदे – होळकरांच्या सोबत तह करून मायदेशी जाण्याच्या विचारात होता. तहाच्या वाटाघाटी करण्याचे काम होळकरांच्या वतीने गंगोबा करत होता.
(5)    १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या युद्धात, आपल्या पक्षाचे सैनिक पळत असल्याचे पाहून व या झुंजीत आपला पूर्ण पराभव झाल्याचे लक्षात आल्यावर गंगाधर यशवंत आणि मल्हारराव होळकर यांनी रणभूमीतून निघून जाण्याचा निर्णय घेतला. परंतु या ठिकाणी मोठ्या खेदाने नमूद करावे लागत आहे की महाराष्ट्रातील विद्वान इतिहास संशोधकांनी व ललित लेखकांनी मल्हारराव आणि गंगोबा यांच्या पराक्रमाची दखल न घेता या दुकलीने ‘ शीर सलामत तो पगडी पचास ‘ या आपल्या धोरणास जागून कसा पळ काढला याचे वर्णन करण्यात धन्यता मानली !

(6)                दिनांक २८ जून १७६१ रोजीचे एक पत्र मराठी रियासत खंड – ४ मध्ये छापलेले आहे. हे पत्र कोणी कोणास लिहिले आहे याविषयी सरदेसाई यांनी कसलाही उल्लेख केलेला नाही.
    ‘ दिल्लीहून गिलचा पठाण आपले देशास गेला. रोहिला नजीबखान फौजेनिशीं दिल्लींत आहे. मल्हारराव होळकर माळव्यांत इंदुरीं आहेत. गंगाधरपंत तात्या कांहींशी फौज घेऊन जाठापाशीं आहे. खासा जाठाची फौज व तात्या व गाजुद्दिन ऐसे त्रिवर्गांनीं मिळून आगऱ्याचा किल्ला सोडविला म्हणून वार्ता आहे. किल्ल्यांत अंमल जाठाचा. आजी जाठ जबरदस्त आहे. उभयतां त्याच्या अनुमतें आहेत. अयोधेयचा नबाब श्री काशीस आला. तेथून आठ – दहा कोस पूर्वेस जाऊन पाटण्यास पातशहा होता त्यास आणविला. त्यानें नबाबास वजिरी दिली. आज तीन दिवस काशींत आहेत.’
(7)  पानिपत युद्धानंतर उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्ता कायम राखण्याची मोठी जबाबदारी मल्हारराव होळकराने पार पाडली. पानिपत नंतर लगेचच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राजपुतांशी शिंदे – होळकरांना लढावे लागले. त्यावेळी झालेल्या युद्धात मराठी फौजांनी राजपूत संस्थानिकांना चांगलेच सडकून काढले.
(8)    नानासाहेब पेशव्याच्या मृत्यूनंतर माधवरावासी पेशवेपद मिळाले आणि पेशवे कुटुंबात गृहकलहास आरंभ झाला. रघुनाथरावाने माधवरावाच्या विरोधात कारवाया सुरु केल्या. परिणामी आळेगाव येथे उभयतांची एक झुंज होऊन माधवराव रघुनाथरावास शरण गेला. त्यानंतर रघुनाथरावाने निजामाशी मैत्रीचा तह केला. परंतु निजामाने एका बाजूला दादाशी मैत्री करत दुसरीकडे नागपूरकर भोसल्यांशी मैत्रीचा गुप्त तह करून पेशव्यांवर आपला शह बसवण्यास आरंभ केला. या घडामोडी चालू असताना मल्हारराव होळकराचा मुक्काम वाफगावी होता. निजाम आणि भोसले यांच्यात युती हे होऊन ते दोघे आपल्यावर चालून येत असल्याचे समजल्यावर रघुनाथराव आणि माधवराव यांच्यात काही काळ सख् निर्माण झाले. शत्रूशी लढण्यासाठी दोघेही मराठी सरदारांना आपापल्या फौजफाट्यासहीत मदतीस येण्यासाठी पत्रे पाठवू लागले. अशाच प्रकारचा पत्रव्यवहार होळकरासोबत देखील झाला. मल्हाररावाने निजाम – भोसले विरुद्धच्या लढ्यात पेशव्यांच्या मदतीला जाण्याचा निर्णय घेतला पण त्या बदल्यात त्याने आपल्या काही मागण्या पेशव्याला कळवल्या. मल्हाररावाच्या काय मागण्या होत्या याची माहिती सध्या तरी मला मिळाली नाही परंतु पेशव्याने त्याला दहा हजारांचा नवीन सरंजाम दिल्याचा उल्लेख मराठी रियासतीमध्ये आढळतो. या वेळी मल्हारराव होळकराच्या वतीने गंगोबातात्या बोलणी करत होता. काही इतिहासकारांच्या मते, पुढे माधवरावाने भर दरबारी गंगोबाला छड्यांनी मारले त्याचे मूळ या घटनेत आहे. काय असेल ते असो, पण पेशव्याने एकदा मागण्या मान्य केल्यावर होळकरांची फौज पेशव्यांच्या मदतीला गेली. राक्षसभुवनच्या संग्रामात निजामाची सेना त्याचा दिवाण विठ्ठल सुंदर याच्या नेतृत्वाखाली लढत होती. या विठ्ठल सुंदरचे मस्तक कापून पेशव्याला नजर करण्याचे कार्य होळकरांच्या पदरी असलेल्या गिलच्यांनी केले असा उल्लेख मराठी रियासतीमध्ये मिळतो. राक्षभुवनचा हा संग्राम दिनांक 10 अगस्त 1763 रोजी घडून आला. या लढाईमध्ये होळकरांच्या फौजेचे नेतृत्व कोणी केले याविषयी निश्चित माहिती मला मिळाली नाही. कदाचित तुकोजी होळकर अथवा गंगोबा यांपैकी एकाने या लढाईत सेनापतीचे कार्य केले असेल किंवा खुद्द मल्हाररावाने देखील आपल्या शौर्याची आणि कल्पक नेतृत्वाची चुणूक या झुंजात दाखवली असेल. 
(9) दिनांक 23 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सारची लढाई घडून आली व इंग्रजांच्याविरोधात सुजा, शहाआलम, मीर कासीम या या त्रिकुटाचा पराभव झाला. या लढाईनंतर इंग्रजांनी सुजा आणि त्याच्या मित्रांच्या विरोधात जास्तच आक्रमक धोरण स्वीकारल्यामुळे त्याने शिंदे - होळकरांकडे मदतीची याचना केली. यावेळी महादजी माळव्यात होता तर होळकर जाट आणि नजीबखान यांच्यात चाललेल्या संग्रामात पेशव्याच्या आज्ञेनुसार जाटाच्या वतीने नजीबासोबत लढत होता.  स. 1765 च्या फेब्रुवारी महिन्यात जाट आणि नजीब यांच्यात तह होऊन त्यांचा लढा मिटला. त्यानंतर सुजाच्या विनंतीनुसार होळकर त्याच्या मदतीला जाऊ लागला.  याविषयीचे 30 मार्च 1765 रोजी गंगोबाने लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे ते पुढीलप्रमाणे :- ‘ जाठाचा सलूख नजीबखानाशीं जाल्या उपरी अंतर्वेदच्या बंदोबस्ताकरितां अनूपशहरीं आलों. तेथें नबाब शुजाउद्दौला येऊन भेटले. कित्येक निखालस भाव बोलून साह्य व्हावयाचा करार करून गेले. त्याउपर सुभेदार इटाव्यास आले. काम उरकोन गंगातीरीं मेहदीघाटास जाणार.' 
       सुजा आणि मल्हारराव यांच्या संयुक्त सैन्याने इंग्रजांशी युद्ध आरंभले. यावेळी कुरा येथे झालेल्या संग्रामात होळकरी फौजेने ब्रिटीश पलटणींचा सडकून समाचार घेतला. या लढाईची तपशीलवार माहिती देणारे पत्र मराठी रियासत खंड 5 मध्ये छापले आहे ते याठिकाणी देत आहे :- तदनंतर फिरंगी चालोन आले, त्यांशीं झुंज मातबर झालें. चारपांचशें घोडे, चाळीस पन्नास उंटें व तीन तोफा आणल्या. तेही दम धरून मुक्कामास आले. आम्ही घेरा घालोन होतों, तों बातमी आली, रोहिले पठाण एकत्र होऊन बुणग्यावर आले. मग तैसेच चालोन काल्पीस बुणगे उतरून पुनः गंगाधरतात्यास फौज देऊन रवाना केलें. तेथें एक लढाई जाली. हरोळ तमाम बुडविला. फिरंग्यांची दोन पलटणें, हजार घोडे, चारशें उंटें, बाणांच्या कैच्या, वीस पंचवीस निशाणें आणलीं. ते गावाचा आश्रय करून राहिले. तेथें चार सहा कोस पावेतों फौजांस पाणी नव्हतें, यामुळें उलटोन ( तात्या ) काल्पीस आले, नाकेबंदी केली. मग चारपांच नावा मेळऊन रातबा धरून ( ते फिरंगी ) यमुना उतरले, तोफाखालीं मोर्चे उधळले. चारपांच घडी युद्ध जालें. परंतु बेदड ( चिखलांत रुतलेली वनस्पतींची मुळें ) भारी त्यामुळें घोड्यांचा नाइलाज झाला. म्हणून गनिमीकावा देऊन बेदड पुढें देऊन उभे राहिलों. इंग्रज काल्पींत ठाणें बसवून माघारे गेले. आम्ही उलटोन त्यांचें ठाणें काढून आपले ठाणें बसविलें. तेथून उमरगडचा बंदोबस्त करून ग्वाल्हेर प्रांतें चाललों आहों.’ हे पत्र आपाजीराम याने 27 जून रोजी पेशव्यास लिहिले आहे असे सरदेसाई सांगतात. या पत्राचे वाचन केले असता सहज लक्षात येते कि या मोहिमेत गंगोबाने होळकरांच्या सेनापतीची भूमिका बजावली होती. या पत्रानुसार होळकरांनी इंग्रजांचा संपूर्ण पराभव केल्याचे सिद्ध होते तरीही सरदेसाई आणि कित्येक इतिहासकार असे लिहितात कि कुरा येथे इंग्रजांनी होळकराचा पराभव केला ! 
(10)     पुढे मल्हारराव होळकर मरण पावल्यावर होळकरांची सरदारकी त्याचा नातू मालेराव यास देण्यात आली. परंतु सरदारकी प्राप्त झाल्यावर काही महिन्यांतच मालेरावाचा मृत्यू झाला. यावेळी रघुनाथराव उत्तर हिंदुस्थानातच होता. होळकरांच्या घरात आता कर्ता  पुरुष कोणी नसल्याने त्यांची सरदारकी कोणाला द्यायची हा प्रश्न आता उद्भवला होता. होळकरांचा दिवाण  गंगोबातात्या यावेळी रघुनाथरावाच्या गोटात होता. मल्हाररावाचे निधन झाल्यावर बहुतेक त्याची कारभारी पदावरून हकालपट्टी झाली असावी. कारण, अहिल्याबाईस दत्तक पुत्र घेण्याची अनुमती देऊन कारभारीपद आपल्यास द्यावे अशी त्याने रघुनाथरावाकडे मागणी केली. अहिल्याबाईच्या विरोधात पुढे रघुनाथरावाने ज्या काही कारवाया केल्या, त्या कारवायांच्या मागे गंगोबाचा कुशाग्र मेंदू कार्यरत होता हे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे.  गंगोबाच्या सल्ल्याने दादासाहेबाने शेट्याजी आयतोळा आणि आनंदराव गोपाळ या आपल्या सरदारांना होळकरांच्या अंमलाखालील प्रांताची जप्ती करण्यासाठी पाठविले. तेव्हा अहिल्याबाईने बुळे नावाच्या सरदारास दादासाहेबाने पाठवलेल्या सरदारांच्या मुकाबल्यासाठी रवाना केले. दोन्ही पक्षांच्या सैन्याची गाठ कधी, कुठे पडली याची निश्चित माहिती मला मिळाली नाही परंतु, या संग्रामात अहिल्याबाईच्या सैन्याचा विजय होऊन शेट्याजी आयतोळा रणात पडला. या पराभवामुळे रघुनाथराव संतप्त झाला तर अहिल्याबाईची छाप सर्व शत्रू - मित्रांवर बसली असे म्हणता येईल.
                      जवळपास दोन - तीन दशके होळकरांची सेवा करणारा गंगोबा अचानक होळकरांच्या विरोधात का उभा राहिला असावा ? त्याची कारभारीपदावरून गच्छंती हे एक कारण असू शकेल पण, निव्वळ हेच प्रमुख कारण असावे असे वाटत नाही. परंतु याविषयी विश्वसनीय अशी माहिती मिळत नसल्याने अधिक न लिहिणे योग्य ! 
(11)  स. 1768 च्या जून महिन्यात माधवराव आणि रघुनाथराव यांच्यातील वाद चिघळला जाऊन दोन्ही पक्ष उघडपणे एकमेकांच्या विरुद्ध लढण्यास उभे राहिले. यावेळी दोघांनीही दौलातीतील सर्व लहान - मोठ्या सरदारांना आपापल्या पक्षात वळवून घेण्याची शिकस्त केली. महादजी शिंदे माधवरावाच्या गोटात गेला तर त्याचा पुतण्या केदारजी दादाच्या छावणीत दाखल झाला. होळकरांची फौज तुकोजीच्या नेतृत्वाखाली होती. माधवरावाचे व रघुनाथरावाचे वकील तुकोजीकडे मदतीच्या मागणीसाठी गेले असता तुकोजीने कोणताही एक पक्ष स्वीकारण्यास साफ नकार दिला आणि  गंगोबाकडे बोट दाखवून तो नामानिराळा राहिला. बहुतेक गंगोबा यावेळी फिरून होळकरांचा कारभारी झाला असावा किंवा तुकोजीच्या पदरी असावा। याविषयी निश्चित अशी काही माहिती मिळत नाही. गंगोबाने मनोनाम दादाचा पक्ष घेण्याचे ठरवले होते. परंतु माधवरावास त्याने स्पष्टपणे नकार न देता जणू काही आपण नाईलाजाने दादाच्या गोटात जात आहोत असेच भासवले. अर्थात, या अनुभवी मुत्सद्द्याचे खेळ माधवराव पुरेपूर ओळखून होता. अखेर 10 जून 1768 रोजी धोडप किल्ल्याजवळ दोन्ही पक्षांची गाठ पडली. स्वतः रघुनाथराव लढाईत सहभागी झालाच नाही. तो धोडप किल्ल्यावर स्वस्थपणे बसून राहिला. त्याच्या सैन्याचे नेतृत्व चिंतो व मोरो विठ्ठल रायरीकर, गणेश विठ्ठल वाघमारे, सदाशिव रामचंद्र इ. केले. होळकरांची फौज गंगाधर यशवंतच्या नेतृत्वाखाली दादाच्या बाजूने लढली. दादाच्या सहाय्यकांनी निकराची झुंज दिली पण अखेर माधवरावाने बाजी मारली. दादाची फौज पराभूत झाली. त्याचे कित्येक सहाय्यक पकडले गेले. खुद्द दादा आता पेशव्यांचा नजरकैदी बनला तर तिथे इतरांची काय कथा !
                माधवरावाने गंगाधर यशवंताची रवानगी प्रथम नगरच्या किल्ल्यावर केली. पुढे त्याच्याकडून दंड म्हणून तीस लाख रुपयांची मागणी केली. या रकमेचा भरणा करण्यास नकार दिल्यामुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे म्हणा, परंतु माधवरावाने भर दरबारात गंगाधर यशवंतास छड्या मारल्याचा उल्लेख जवळपास सर्वच इतिहासकार करतात. 
(12) माधवराव पेशव्याच्या मृत्यूनंतर त्याचा धाकटा भाऊ नारायणराव हा पेशवा झाला. आरंभी काही दिवस त्याचे आणि रघुनाथाचे चांगले पटत होते परंतु पुढे लवकरच दोघांची भांडणे होऊन नारायणाने दादासाहेबास नजरकैदेत टाकले. तेव्हा दादाने आपल्या हितचिंतकांच्या सहाय्याने कैदेतून सुटका करून घेण्याचे प्रयत्न आरंभले. यासाठी कित्येक कटांची आखणी करण्यात आली तर कित्येक कट यशस्वी होता होता राहिले ! यापैकीच एक कारस्थान  म्हणजे नारायणराव पेशव्यास धरण्याचा / मारण्याचा कट ! गंगाधर यशवंत या सर्व कटांमध्ये दादाला सामील होता कि नाही याची स्पष्टता होत नाही पण अखेरच्या कटात मात्र त्याचा सहभाग असल्याचा  उल्लेख मिळतो. अर्थात, नारायणास पकडण्याच्या कटामध्ये तसा बव्हंशी मुत्सद्यांचा सहभाग होता पण प्रसंग पडला तेव्हा गारद्यांनी नारायणरावाचा निकालच लावून टाकला ! नारायणराव मरण पावल्यावर दादाने पेशवेपद धारण केले. त्यावेळी आपला मुख्य कारभारी म्हणून गंगोबाला नेमण्याचा त्याचा विचार असल्याचे सरदेसाई लिहीतात. परंतु, तात्याला पेशव्यांचे कारभारीपद मिळाल्याचा उल्लेख मात्र आढळत नाही.
(13) नारायणरावाच्या खुनानंतर पेशवाईत अनेक घडामोडी झाल्या पण त्यात सहभागी होण्याचे भाग्य तात्याला लाभले नाही. दिनांक 20-2-1774 रोजी तो मरण पावला.