Sunday, January 25, 2015

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग – १३ )


    स. १८१५ मधील गंगाधरशास्त्र्याच्या खून प्रकरणाने पेशवा आणि इंग्रजांमधील उरले सुरले स्नेहसंबंध साफ संपुष्टात येऊन दोन्ही पक्ष परस्परांच्या नाशासाठी प्रवृत्त झाले. पेशवा आणि इंग्रजांच्या या निर्णायक लढ्यात विजय नेमका कोणाचा होणार हे अद्यापही निश्चित होत नव्हते. कागदोपत्री तहांनी मराठी सरदारांचा राज्यसंघ इंग्रजांनी जरी खिळखिळा केला असला तरी त्यांचे आतून परस्परांशी पक्के असलेले संघटन इंग्रज तोडू शकले नव्हते. लष्करीदृष्ट्या मराठी सरदारांच्या फौजा इंग्रजी सैन्याच्या तुलनेने अधिक सामर्थ्यशाली होत्या. केवळ रणभूमीवर या झगड्याचा निकाल लावू म्हटल्यास सामना जड जाण्याची इंग्रजांना खात्री होती. तेव्हा त्यांनी लष्करी सामर्थ्याला राजकीय बुद्धिबलाची जोड देत मराठी सरदार व पेशव्याच्या चुकांचा भरपूर फायदा उठवत संभाव्य संघर्षातील विजयाचा पाया रचण्यास आरंभ केला.

१] सातारकर छत्रपती :- स. १८०८ च्या पूर्वार्धात छत्रपतीपदी बसलेल्या प्रतापसिंहाचे बाजीराव पेशव्यासोबत आरंभी तरी संबंध तसे सलोख्याचे होते. परंतु, स. १८११ मधील चतुरसिंग ( चतरसिंग ? छ्त्रासिंह ? ) भोसल्याच्या प्रकरणापासून हळूहळू पेशवा - छत्रपतीमध्ये बेबनाव निर्माण होऊ लागला होता. या काळातील प्रचलित पद्धतीनुसार पेशव्याच्या विरोधात दाद मागण्याचे ठिकाण म्हणजे कंपनी सरकार असल्याने, प्रतापसिंहाने त्यांच्याकडे धाव घेतली. जिथे दिल्लीकर बादशाह, खुद्द पेशवा व त्याचे भाऊबंद आणि सरदार आपापल्यावरील अन्यायाच्या तक्रारींचा पाढा वाचण्यास जात होते, तिथे सातारकरांनी जाऊ नये असा नियम थोडाच होता ?


    प्रथम इंग्रजांनी सातारकरांच्या बाजीरावविरोधी कागाळ्यांची दखल घेतली नाही. कारण, स. १८११ पासून पुढील चार पाच वर्षांचा काळ कंपनी सरकार आणि समस्त इंग्लंड राष्ट्राच्या दृष्टीने बराचसा अडचणीचा होता. या काळात युरोपांत नेपोलियनने इंग्रजांच्या तोंडाला अगदी फेस आणला होता. त्यात सातारकरांच्या निमित्ताने पेशव्याला दुखवून हिंदुस्थानातील आपल्या सत्तेला धोका पोहोचेल असे कृत्य करण्याचे धाडस इंग्रजांमध्ये अजिबात नव्हते. त्यामुळे पेशव्याला न दुखावता त्यांनी सातारकरांना मधाचे बोट लावून ठेवण्याचा अवघड पण राजकारणातील अपरिहार्य मार्ग स्वीकारला. पुढे स. १८१५ मधील गंगाधरशास्त्री व त्रिंबकजी प्रकरणानंतर पेशवा - छत्रपती प्रकरणी निश्चित भूमिका घेणे भाग असल्याचे एल्फिन्स्टनला कळून चुकल्याने पेशव्याच्या अपरोक्ष त्याने छत्रपतीकडे अंतस्थरित्या संधान बांधायला सुरवात केली.


    दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धाचा अनुभव गाठीशी असल्याने एल्फिन्स्टन व त्याच्या समविचारी अधिकाऱ्यांनी आपल्यापुरते युद्धधोरण निश्चित केले होते. त्यानुसार (१) संभाव्य युद्ध मर्यादित प्रदेशातच होईल असे प्रयत्न करणे (२) युद्ध अल्पावधीत संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करणे (३) शक्यतो पेशव्याला राजधानीतच कोंडून दीर्घकालीन युद्धाचा प्रसंग टाळणे. हि सर्व वा यातील कोणतेही एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी छत्रपती हाताशी असणे आवश्यक असल्याने एल्फिन्स्टनने प्रतापसिंहाभोवती जाळे विणायला आरंभ केला व दुसरा बाजीराव तसेच त्याच्या पूर्वजांनी छत्रपतींना दिलेल्या आजवरच्या वागणुकीचा परिणाम म्हणून प्रतापसिंहाने इंग्रजांचा आश्रय घेण्याचा स्वाभाविक निर्णय घेतला. याबाबतीत त्यांस सर्वथा दोष देणे गैर आहे.

 
२] गुजरातवर इंग्रजांचा ताबा :- गंगाधरशास्त्र्याच्या खुनाच्या निमिताने ज्याप्रमाणे इंग्रजांनी पेशव्याला चेपण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे, बडोदेकर गायकवाडांनाही त्यांनी गुडघ्यावर आणले. बडोद्याच्या इंग्रजविरोधी गटाचा प्रमुख --- सीताराम रावजी यांस त्यांनी कैदेत बसवले. त्यामुळे इंग्रजविरोधी खटपट बरीचशी थंडावली. तसेच ता. १३ जून १८१७ च्या तहान्वये एल्फिन्स्टनने पेशव्याचा बडोदेकरांशी असलेला राजकीय संबंध साफ तोडून टाकला. यामुळे जरी गायकवाड पेशव्याला द्याव्या लागणाऱ्या आर्थिक भरपाईतून बचावले असले तरी या करारानुसार गायकवाडीवरील इंग्रजी वर्चस्वास कायद्याचे नैतिक पाठबळ प्राप्त झाले.

३] पेंढाऱ्यांना पेशव्याचे उत्तेजन, त्रिंबकजीचे कैदेतून पलायन :- पंढरपूरचा जहागीरदारांचा तह झाल्यापासून बाजीराव वसईच्या तहातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या सुदैवाने त्रिंबकजी डेंगळे सारखा कल्पक साथीदार त्यांस प्राप्त झाला. इंग्लिश पलटणी व एल्फिन्स्टनसारखा जागरूक रेसिडेंट छाताडावर बसलेला असताना इंग्रजविरोधी लढ्यासाठी उघड फौजा जमवणे शक्य नाही हे ओळखून त्रिंबकजीने पेशव्याला पेंढाऱ्यांच्या ' भाडोत्री फौजा ' सेवेत घेण्याची कल्पना सुचवली. अर्थात हि युक्ती अगदीच नवीन नसून दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धांत मराठी सरदारांनी या पर्यायाचा वापर केल्याचे खुद्द ऑर्थर वेल्स्लीने नमूद केले आहे. या ठिकाणी ' पेंढारी ' या संकल्पनेची अगदी थोडक्यात माहिती घेऊ.

    हिंदुस्थानात काय आणि जगभरात काय, पूर्वापारपासून नियमित लष्करासोबत लुटमारीचा व्यवसाय करणारा एक वर्ग सैन्याबरोबर सेवेत सहभागी असल्याचे आढळून येते. हिंदुस्थानातील विशेषतः, पेशवेकाळातील पेंढारीही यांस अपवाद नव्हते. या पेंढाऱ्यांची स्वतःची शस्त्रे आणि घोडे असत. यांना पगार देण्याची गरज नसे. लुटीवरच यांचा निर्वाह असल्याने व तोच त्यांच्या उपजीविकेचा मुख्य स्त्रोत असल्याने लुटीच्या वेळी ते अजिबात दयामाया दाखवत नसत. अर्थात, युद्धकर्मांत ते अगदीच निरुपयोगी असले तरी भारी मजला मारण्यात त्यांची बरोबरी करणारे फारच थोडे हिंदुस्थानात होते. पेशव्यांचे व त्यांच्या सरदारांचे कार्यक्षेत्र जसे विस्तारले तशी त्यांना पेंढाऱ्यांची गरज जास्ती भासू लागली. साम्राज्यविस्ताराची आकांक्षा ठेवणाऱ्या सत्तेला आपल्या शेजारील राज्यांसोबत  सदासर्वदा शांतता नांदावी असे थोडीच वाटणार ? पेंढाऱ्यांच्या मार्फत पेशवे आणि त्यांचे सरदार विरुद्ध पक्षाला त्रस्त करून आपला कार्यभाग साधून घेत.


    अर्थात, पेंढारी हे दुधारी शस्त्राप्रमाणे असल्याने मोहिमा वा कामगिरी नसल्यास प्रसंगी आपल्याच नाममात्र मालकाच्या प्रदेशांत लुटालूट करण्यास मागे - पुढे पाहत नसत. पहिल्या इंग्रज - मराठा युद्धापर्यंत पेंढाऱ्यांचे स्वरूप सामान्यतः असेच होते. त्यानंतर मात्र, ज्याप्रमाणे हिंदुस्थानातील लष्करी व्यवस्थेची पद्धती बदलत गेली, त्याचप्रमाणे पेंढारीही बदलत गेले. काळाची पावलं ओळखून पूर्वीच्या विस्कळीत टोळ्या आता संघटीत होऊ लागल्या होत्या. अमीरखानसारखे महत्त्वकांक्षी व युद्धकुशल पेंढार सरदार कवायती पलटणे व तोफखाना बाळगून ' भाडोत्री सैन्याची ' भूमिका बजावू लागले होते. एकप्रकारे कंपनी सरकारच्या तैनाती फौजेची हि देशी भ्रष्ट नक्कलच होती !


    दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धाच्या काळात ब्रिटीश सत्ता देशात विस्तारली जाऊन तुलनेने एतद्देशीय संस्थाने आकुंचित होऊ लागली. पैशांअभावी कित्येकांनी आपापल्या नियमित फौजांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली. आयुष्यभर शिपाईगिरी केलेल्या कित्येकांना निर्वाहासाठी दुसरा कोणताच पर्यायी व्यवसाय उपलब्ध नसल्याने त्यांनी ' पेंढारी ' टोळ्यांत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पेंढारी बनण्यातील प्रमुख फायदे म्हणजे भयंकर रक्तपाताचे फारसे युद्धप्रसंग नसणे व हमखास लुट मिळण्याची शक्यता ! अर्थात, यांमुळे पेंढाऱ्यांची संख्या देशात न वाढल्यास नवल !  


    राजकीय आघाडीवर इंग्रजांकडून माती खाल्लेल्या मराठी सरदारांनी ' पेंढार ' व्यवस्थेचा पुरेपूर वापर करत त्यांच्या म्होरक्यांना पैसा पुरवून कंपनी सरकार व त्यांच्या ताटाखालील संस्थानिकांच्या प्रदेशाला उपद्रव देण्याची मसलत सांगितली. अमीरखान सारख्यांच्या दृष्टीने हि सुवर्णसंधीच होती ! त्यांनी यात वाटेल तसे हात धुवून घेतले. उत्तरेतील पेंढाऱ्यांची वर्तमाने ऐकून दक्षिणेत त्रिंबकजीने पेशव्यालाही पेंढाऱ्यांना पाठीशी घालण्याची सूचना केली. परिणामी, दख्खनमध्येही पेंढाऱ्यांच्या मोठ मोठ्या टोळ्या घिरट्या घालू लागल्या. या ' पेंढाऱ्यांत ' कित्येक व्यावसायिक सैनिकांचा भरणा असल्याने यांच्या दौडीही पूर्वीपेक्षा मोठ्या वेगाने होत जाऊन दिवसाला ५० - ६० किमी अंतर ते सहज पार करू लागले.


    दक्षिणेतील पेशवाविरोधी, विशेषतः निजामाच्या राज्याला त्यांचा फारच उपद्रव होऊ लागला. पेंढाऱ्यांच्या मार्फत स्थानिक सत्ताधीशांना उपद्रव देण्याच्या पेशव्याच्या राजकीय खेळीमागील उद्दिष्ट स्पष्ट होते. ब्रिटीश अंकित संस्थानिकांच्या फौजा पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करण्यास उपयुक्त नसल्याने त्यांना स्वतःहून फौज भरती करण्याची सूचना इंग्रजांनी करावी किंवा तैनाती फौजेत वाढ करावी हे दोनच पर्याय उपलब्ध होते. पैकी, सरसकट दुसऱ्या पर्यायाचा अवलंब कंपनी सरकार करू शकत नव्हते. कारण, कित्येक संस्थानिकांनी करार करतेवेळी ठरलेल्या तैनाती पलटणांपेक्षा अधिक न ठेवण्याचे कलम आधीच मंजूर करून घेतले होते. तेव्हा कित्येक तैनाती फौज वाढवण्याचा पर्याय बाद ठरत असल्याने पहिलाच उरतो. आणि जर तो अवलंबला व तैनाती फौजेपेक्षा संस्थानिकाची लष्करी ताकद तुलनेने वाढली तर तो इंग्रजांच्या अधीन का म्हणून राहील ? सारांश, इतिहासकार समजतात तितके दुसरा बाजीराव आणि त्याचे सल्लागार मंडळ मूर्ख नव्हते !


    स. १८१५ साली नाईलाजाने स्वतःहून इंग्रजांच्या स्वाधीन झालेल्या त्रिंबकजीला अलाहाबाद वा चुनारगड येथे कैदेत ठेवण्याची एल्फिन्स्टनची शिफारस फेटाळून गव्हर्नर जनरलने त्यांस मुंबई प्रांतातील ठाण्याच्या किल्ल्यात बंदिवान म्हणून ठेवले. परिणामी, सर्व प्रकारची खबरदारी घेऊनही ता. १२ सप्टेंबर १८१६ रोजी रात्रीच्या वेळी त्रिंबकजी ठाण्याच्या किल्ल्यातून पळून गेला. त्रिंबकजीच्या पलायनामागे पेशव्याचा हात असल्याचे एल्फिन्स्टनने ताडले. त्याने पेशव्याकडे त्रिंबकजीला फिरून आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. परंतु, त्रिंबकजी पळाला असला तरी तो आपल्या राज्यात आश्रयास्तव न आल्याची सबब सांगत बाजीरावाने आपली असमर्थता व्यक्त केली. अर्थात, पेशव्याची हि लबाडी ओळखून देखील एल्फिन्स्टनला त्याच्यावर तसा उघड आरोप करता येईना. इकडे त्रिंबकजीने कैदेतून सुटका होताच प्रथम काही दिवस अज्ञातवासात व्यतीत करून मग इंग्रजविरोधी निर्णायक लढ्यासाठी फौजांची जुळवाजुळव आरंभली. यामागे अर्थात पेशव्याची सक्रिय मदत होतीच ! एल्फिन्स्टनने याबाबतीत पेशव्याकडे आपली नापसंती वारंवार कळवली. परंतु, पेशव्याला आता इंग्रजांच्या राजी - नाराजीची थोडीच पर्वा होती ?

[४] एक हुकलेली संधी :- बाजीराव त्रिंबकजीला पाठीशी घालत असल्याचे पाहून एल्फिन्स्टनने जनरल स्मिथला शिरूर येथे लढाईसाठी सज्ज होण्याचे आदेश देत गव्हर्नर जनरलकडे पेशव्याविरोधात युद्ध पुकारण्याची परवानगी मागितली. एल्फिन्स्टनचा यावेळी बेत उघड व बराचसा धाडसी होता. पेशव्याची गुप्त व उघड फौज पुण्याजवळ नसताना प्रकरण वर्दळीवर आणून थेट पेशव्यालाच ताब्यात घेण्याचा त्याचा डाव होता. त्यासाठी मुद्दाम त्याने पेशव्याला सांगितले कि, ' महिन्याच्या आत त्रिंबकजीला आमच्या स्वाधीन करावे. जोवर त्रिंबकजी पकडला जात नाही तोवर जामीन म्हणून गुजराथ प्रांत आणि रायगड, सिंहगड, त्रिंबक व पुरंदर हे चार किल्ले आमच्या ताब्यात द्यावेत.' ( ता. ६ एप्रिल १८१७ )
पाठोपाठ आसपासच्या इंग्लिश पलटणीही त्याने पुण्याच्या सरहद्दीवर आणायला आरंभ केला.


    दरम्यान गव्हर्नर जनरल हेस्टिंग्सने एल्फिन्स्टनच्या खलित्याला आशादायक जबाब पाठवला. त्यानुसार (१) पेशव्याने त्रिंबकजीला पकडून दिले वा त्या कार्यात मनापासून सहभाग घेतला तर पेशव्यासोबत पूर्ववत मैत्रीचे संबंध ठेवावेत. (२) पेशवा लढाईला उभा राहिला तर त्यांस कैद करून राज्य जप्त करावे. (३) पेशवा काहीच न करता चालढकल करू लागला तर तहाने त्यास बांधून घ्यावे.

 
    पेशव्यासोबत नव्याने तह करावा लागल्यास त्याच्या शर्तीही गव्हर्नरने लिहून पाठवल्या. त्यानुसार --- पेशव्याने परदरबारी आपले वकील ठेवू नये. त्याचप्रमाणे परदरबारच्या वकिलांनाही आपल्या दरबारातून रजा द्यावी. सर्व जहागीरदारांना रजा द्यावी. इथून पुढे मराठी राज्याचा प्रमुख म्हणून न राहता ब्रिटिशांचे मांडलिक म्हणून राहावे. तैनाती फौजेच्या खर्चाकरता काही प्रांत तोडून द्यावा आणि त्रिंबकजी गुन्हेगार असल्याची कबूली द्यावी. ( दि. १२ एप्रिल १८१७ )  गव्हर्नर जनरलच्या या अटींचा अर्थ काय होतो, हे वेगळे सांगायची गरज नाही. 

    गव्हर्नरचा खलिता एल्फिन्स्टनला ता. १० मे रोजी मिळाला. पण तत्पूर्वीच दि. ७ मे रोजी एल्फिन्स्टनने एक धाडसी डाव टाकला. त्या दिवशी त्याने पुण्याला वेढा घालून पेशव्याकडे गुजराथ प्रांत आणि रायगड, पुरंदर, त्रिंबक व सिंहगड या किल्ल्यांच्या सोडचिठ्ठ्यांची मागणी केली. आपल्या मागण्या पेशवा कधीच मान्य करणार नाही, त्याचप्रमाणे पेशव्याच्या फौजा पुण्यापासून लांब असल्याने पुण्यात फार मोठा युद्धप्रसंग न उद्भवता पेशवा सहजरीत्या हस्तगत होईल अशी एल्फिन्स्टनची अटकळ होती. त्यानुसार त्याने सर्व तयारी केली परंतु, पेशव्याने आपली कमहिंमत (?), भित्रेपणा (?) दाखवत एल्फिन्स्टनच्या मागण्या मंजूर करून प्रांत व किल्ल्यांच्या सोडचिठ्ठ्या देऊन टाकल्या. परिणामी एल्फिन्स्टनचा एक कल्पक पण धाडसी डाव याप्रकारे सपशेल हुकला.

५] शिंदे - होळकर - भोसले त्रिवर्गाची स. १८१७ पर्यंतची स्थिती :- दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धांत सडकून खाल्लेल्या मारामुळे दौलतराव शिंद्याचे विलासी नेत्र काहीसे उघडले. इंग्रजांच्या विरोधात वेळीच सावध होऊन काही उपाय योजना न केल्यास आपणांस आपल्या दौलतीला मुकावे लागेल याची त्यांस कल्पना येउन चुकली. मात्र, त्याकरता लागणारी आवश्यक कार्यक्षमता त्याच्या अंगी असल्याचे बिलकुल दिसून येत नाही. इंग्रजांच्या सत्तेविरोधात असंतुष्ट असणाऱ्या एतद्देशीय संस्थानिकांना अंतस्थपणे चिथावणी देण्याचे कार्य तो नेमाने करत होता. परंतु, भविष्यात इंग्रजांशी पुन्हा एकदा सामना जुंपल्यास त्याकरता लागणाऱ्या लष्करी सज्जतेच्या तरतुदीकडे त्याने अक्षम्य दुर्लक्ष केले. पेशवाईचा अस्त होईपर्यंत बाजीरावाशी त्याचा अखंड पत्रव्यवहार सुरु होता. पेशव्याच्या बव्हंशी गुप्त बेतांची --- इतर सरदारांपेक्षां --- त्यांस पुरेपूर कल्पना होती. पुढे - मागे पेशवा इंग्रजांशी लढा पुकारणार असल्याची जाणीव स. १८१४ मध्येच पुण्याच्या निष्ठावंत सरदारांना झाली होती. दौलतरावही त्यांस अपवाद नव्हता ! 

    त्यादृष्टीने पाहता संभाव्य लढ्यासाठी आवश्यक त्या उपाय योजनांची आखणी करून त्या अंमलात आणायचे सोडून दौलतराव आपल्याच विश्वात रममाण झाला. कधीतरी खुळ्या बाजीरावाचे, मूर्ख होळकराचे त्यांस इंग्रजविरोधी आघाडीत सहभागी होण्याचे पत्र येई, त्यावेळी दौलतराव भानावर यायचा.  मग एकाला दहा अशी लांबलचक आश्वासने उलटपत्री रवाना करून आपल्या दुनियेत परत जायचा. सारांश, महादजीच्या या पराक्रमी, कर्तबगार नातवाने वाडवडिलांनी कमावलेल्या राज्याचा, संपत्तीचा उपभोग घेण्यातच आपल्या आयुष्याचे सार्थक केले !
    दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धांत इंग्रजांना अगदी सरंपुरंस्तोर खडं चारणारा एकमेव मराठी सेनानायक यशवंतराव होळकर दि. २७ ऑक्टोबर १८११ रोजी मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा मल्हारराव याची होळकरांच्या गादीवर स्थापना करून यशवंतरावाच्या पत्नीने --- तुळसाबाईने राज्यकारभार हाती घेतला. स्त्री, मग ती कोणत्याही जाती / धर्माची का असेना, तिने कारभार हाती घेताच पुरुषांनी तिच्या ताबेदारीत इमानाने चाकरी बजावल्याची उदाहरणे या देशात अपवादानेच आढळतील ! दुर्दैवाने तुळसाबाईची राजकीय कारकीर्द देखील या नियमास अपवाद निघाली नाही. यशवंतरावाच्या पश्चात त्याच्या सरदारांत दुफळी माजली. होळकरशाहीचा निष्ठावंत पेंढारी सरदार अमीरखान ---  आता होळकरी दौलतीला आपल्या नियंत्रणाखाली आणू पाहात होता तर हडपसरच्या मैदानात गमावलेला डाव भरून काढण्यासाठी सोबत्यांचा दौलतराव कट - कारस्थाने रचत होता. या सर्वांना मोठ्या धीराने तोंड देत तुळसाबाई होळकरी दौलतीचा कारभार मोठ्या दक्षतेने पाहात होती.

    बाजीरावाचे यशवंतरावाशी लाख शत्रुत्व असेल पण, इंग्रजांशी बिघाड करायचे ठरवल्यावर त्याने आपल्या बापाच्या प्रमुख आधारस्तंभाच्या वारसांची उपेक्षा केली नाही. होळकरांकडे गुप्तपणे पत्रे पाठवून भावी युद्धात आपल्या सोबत सहभागी होण्याची त्याने विनंतीवजा सूचना केली. वास्तविक, पेशव्याने आपणहून होळकरांशी अधिकृतरित्या संबंध तोडल्याने बाजीरावाच्या आज्ञेला / विनंतीला मान देण्याची तुळसाबाईस अजिबात आवश्यकता नव्हती. परंतु, दौलतीची पूर्वपरंपरा आणि नवऱ्याची अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने पेशव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्व वैर विसरून दौलतरावासही भावी संग्रामात पेशव्याच्या मदतीला येण्याची विनंतीपत्रे तिने रवाना केली. इकडे बाजीरावाने दि. १३ जून १८१७ रोजी इंग्रजांशी अखेरचा तह करून लगेचच गणेशपंत पिटके * व धोंडोपंत तात्या यांना होळकर, शिंदे, अमीरखान व कोटेकरांना इंग्रज विरोधी मसलतीत मिळवून घेण्यासाठी उत्तरेत रवाना केले.

    नागपूरकर भोसल्यांची कथा शिंदे - होळकरांपेक्षा थोडी वेगळी असली तरी जवळपास त्याच वळणाची आहे. दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धातील पराभवानंतर नागपूरचा दुसरा रघुजी भोसले बराचसा भानावर आला असला व त्याच्या मनी इंग्रजांच्या विषयी कितीही शत्रुभाव वसत असला तरी आपल्या पक्षाची मजबुती करण्याकडे त्याने अक्षम्य दुर्लक्ष केले. त्याच्या सत्तेखालील प्रचंड मोठा, पण दुर्गम प्रदेश असल्याने झटक्यासरशी तो ताब्यात घेणे इंग्रजांना सहजसाध्य नव्हते. त्यात जर रघुजीने आपले लष्कर अधिक सुधारले असते तर दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धानंतरही भोसल्यांचा पूर्वीचा दरारा, इभ्रत राखण्यात त्यांस यश मिळाले असते. परंतु, त्याच्या अंगी आवश्यक त्या गुणांचा अभाव असल्याने हे कार्य त्याच्याकडून घडून आले नाही. मात्र, नागपूरकरांना तैनाती फौजेच्या बंधनांनी बांधून घेण्याची इंग्रजांची मसलत त्याने आपल्या हयातीत सिद्धीस जाऊ दिली नाही, हे देखील विसरता येत नाही. 

    दि. २२ मार्च १८१६ रोजी रघुजीचा मृत्यू होऊन भोसल्यांच्या गादीवर त्याचा मुलगा परसोजी भोसले विराजमान झाला. यासमयी परसोजीचे वय सुमारे अडतीस असून बौद्धिकदृष्ट्या तो या पदास योग्य नव्हता. परसोजी खेरीज भोसल्यांच्या वंशात आणखी एक वारस होता व तो म्हणजे रघुजीचा पुतण्या, व्यंकोजीपुत्र मुधोजी उर्फ आपासाहेब हा होय ! रघुजीच्या निधनसमयी याचे वय वीस वर्षांचे होते. रघुजीच्या मनी आपल्या पुतण्याविषयी अजिबात प्रेमभाव नव्हता. त्याने त्याची जहागीर देखील जप्त करून त्यास जवळपास निष्प्रभ केले होते. परंतु, आपासाहेब बराच महत्वकांक्षी आणि खटपटी प्रवृत्तीचा होता. त्याने नागपूरचा इंग्लिश रेसिडेंट जेन्किन्सनच्या मार्फतीने आपली व्यवस्था लावून घेतली. रघुजीच्या पश्चात परसोजी नामधारी राज्यप्रमुख राहून सर्व कारभार रघुजीचा रक्षापुत्र धर्माजीच्या हाती गेला. त्याने रघुजीच्या मुलीचा मुलगा --- चिटकोजी गुजरला दत्तक घेण्याची योजना आखली. आपासाहेबास याची कुणकुण लागताच त्याने इंग्रजांकडे खटपट करून नागपूरचा कारभार आपल्याकडे आल्यास तैनाती फौजेच्या तहावर सही करण्याची त्यांना लालूच दाखवली.
    त्यानुसार इंग्रजांच्या मदतीने आपसाहेबाने धर्माजीला कैद करून नागपूरचा कारभार आपल्या हाती घेऊन स. १८१६ च्या एप्रिल अखेर इंग्रज रेसिडेंट जेन्किन्सन मार्फत तैनाती फौजेचा करार केला. आपासाहेबाने हा करार करू नये यासाठी नागपूरातील कित्येक वजनदार दरबारी इसमांनी, पेशव्याने त्याच्यावर हस्ते - परहस्ते दडपण आणले. परंतु, आपासाहेबाने त्या सर्वांस झिडकारले. पुढे दि. १ फेब्रुवारी १८१७ रोजी सकाळी परसोजी बिछान्यात मृतावस्थेत आढळून आला. परसोजीच्या खुनाआधी काही दिवस आपासाहेब नागपुरातून बाहेर गेला होता. त्याच्या अनुपस्थितीने संशयाची सुई जरी त्याच्याकडेच वळली असली तरी इंग्रजांच्या दमदार पाठींब्याने त्यातूनही तो निभावून गेला.  

    परसोजीच्या निधनानंतर भोसल्यांची गादी आपासाहेबांस मिळाली. आता त्यांस कायदेशीर मान्यता मिळावयाची बाकी असल्याने, त्याने पेशव्याकडे  वस्त्रांची मागणी केली. इथवर इंग्रजांशी त्याचे वर्तन चांगले होते. परंतु, स. १८१७ च्या जूनमधील तहाने पेशवा आणि नागपूरकरांचा संबंध साफ तुटला. तसेच या घटनेनंतर काही महिन्यांतच बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारल्याने त्याने आपासाहेबाकरता पाठवलेल्या सरदारीच्या वस्त्रांचा स्वीकार करण्यास इंग्रजांनी हरकत घेतली. परंतु, इंग्रजांची आडकाठी न जुमानता ता. २४ नोव्हेंबर १८१७ रोजी मोठ्या समारंभाने हि वस्त्रे स्वीकारण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, महत्त्वकांक्षी आपासाहेबास नागपूरची गादी मिळवण्यापुरतीच इंग्रजांची गरज होती. परंतु, अननुभवामुळे त्याने तैनाती फौजेचे लोढणे गळ्यात बांधून घेतल्याने त्याचा हा डाव सपशेल फसला. तसेच, हाती अधिकार आल्यावर संग्रामाच्या दृष्टीने पुरेशी पूर्वतयारी करण्यास त्यांस फारसा वेळही मिळाला नाही व परसोजी प्रकरणामुळे नागपुरातील एक मोठा गट त्याच्या विषयी नेहमी साशंक राहिल्याने त्याच्या इंग्रजविरोधी लढ्याच्या तयारीस स्वाभाविकच मर्यादा पडत गेल्या.
 
६] दि. १३ जून १८१७ चा तह :- आधीच्या कलमांत सांगितल्यानुसार गव्हर्नर जनरलच्या खलित्यावरून एल्फिन्स्टनने ता. १ जून रोजी वसई व पंढरपूरच्या तहानंतर जे काही पेशव्याचे राजकीय स्वातंत्र्य उरले होते, ते हिरावणाऱ्या अटी पेशव्यास कळवल्या. त्यानुसार, (१) नर्मदेपलीकडील उत्तरेतील पेशव्याच्या ताब्यातील सर्व मुलुख इंग्रजांना देणे (२) स्वतःच्या सरदारांकडे तसेच इतर दरबारी असणारे वकील परत बोलावणे आणि आपल्या दरबारातील सरदार व इतरांच्या वकिलांना रजा देणे, या गोष्टी मुख्य होत्या. या अटी मान्य पेशव्याचे ' पेशवे ' पद फक्त नाममात्र राहून तो त्याच्याच पदरी असलेल्या पटवर्धन प्रभूती जहागीरदारांपैकी एक बनणार होता. म्हणजे छत्रपतींच्या अष्टप्रधानातील मुख्य प्रधानाचा राजकीय दर्जा आता त्याच्या हाताखालील चाकारांच्या बरोबरीचा होणार होता.

    बाजीरावाला आता इंग्रजांशी मैत्रीचे संबंध राखण्यात अजिबात स्वारस्य उरलं नसल्याने त्याने फार आढेवेढे न घेता तहास मंजुरी देऊन टाकली. पेशव्याच्या या वर्तनाचा अर्थ एल्फिन्स्टनलाही समजत होता. परंतु, यावेळी चाणाक्ष एल्फिन्स्टनही पेशव्याच्या कृतीने गोंधळात पडला, हेही तितकेच खरे ! हा तह सहजासहजी घडेल अशी एल्फिन्स्टनची मुळातच अपेक्षा नव्हती. आणि समजा झालाच तर पेशवा तातडीने त्याविरोधात काही तरी हालचाल करेल असाही त्याचा एक अंदाज होता. या हालचाली म्हणजे हस्ते - परहस्ते कंपनी सरकारविरुद्ध लढा पुकारणे, कारस्थाने रचणे इ. होय. परंतु, खासा पेशवा युद्धास उभा राहील असे एल्फिन्स्टनला अजिबात वाटत नव्हते.

    इकडे पेशव्याने इंग्रजांशी केलेल्या नवीन तहाची माहिती मराठी संघराज्यात त्वरेने पसरली. वरकरणी पेशव्याने सरदारांचे व सरदारांनी पेशव्याचे वकील आपापल्या दरबारातून काढून टाकले असले तरी खासगी कामानिमित्त ते नेमलेल्या शहरीच तळ ठोकून राहिले. पेशव्याने लष्कराची सर्व सूत्रे बापू गोखल्याच्या हाती दिली. कारण, त्याबाबतीत नाव घेण्यासारखा दुसरा सरदार त्याच्या पदरी नव्हता आणि दक्षिण हिंदुस्थानात बापू खेरीज इतर मराठी सरदाराची इंग्रजांना अजिबात दहशत नव्हती ! स. १८१७ च्या ऑक्टोबर पूर्वी केव्हातरी पेशव्याने लष्कराची जाबाबरी बापुवर सोपवून राजकीय कारस्थानांची आघाडी स्वतःकडे घेतली. तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धाचे हे एक वैशिष्ट्य मानावे लागेल. नाहीतर आतापर्यंत एकाच व्यक्तीला राजकीय व लष्करी अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत. बाजीरावाने या परंपरेस छेद देऊन एकप्रकारे हि नवीन प्रथा सुरु केली असे म्हणता येईल.

७] कंपनी सरकारची पेंढाऱ्यांविरुद्ध मोहीम :- नेपाळ युद्ध थंडावताच गव्हर्नर जनरल हेस्टींग्सने पेंढाऱ्यांच्या बंदोबस्ताचे प्रकरण हाती घेतले. पेंढाऱ्यांविरुद्धची मोहीम देशभर चालणार असल्याने इंग्लिशांच्या अंकित असणाऱ्या प्रत्येक संस्थानिकाने या स्वारीच्या यशाकरता सक्रिय मदत करावी असे गव्हर्नरचे मत होते. हि मदत प्रामुख्याने आर्थिक व लष्करी स्वरुपाची असून संस्थानिकांनी आपापल्या फौजफाट्यासह स्वतःच्या राज्याच्या सरहद्दींवर युद्धाच्या तयारीने सज्ज राहायचे होते. म्हणजे इंग्रजांकडून मार खाउन पळणाऱ्या पेंढाऱ्यांना कोणत्याच प्रदेशात, राज्यात आसरा मिळू नये अशी यामागील इंग्रजांची राजकीय व लष्करी खेळी होती.  

    इंग्रजांच्या माहितीनुसार उत्तरेतील पेंढाऱ्यांचा वावर मुख्यतः शिंदे - होळकरांच्या राज्यात व राजपुतान्यात प्रामुख्याने होता. तेव्हा या मोहिमेसाठी हेस्टिंग्सने आपल्या लष्कराचे मुख्य दोन भाग करत --- उत्तरेकडील प्रदेशाची जबाबदारी स्वतःकडे घेत बुंदेलखंडातील कलिंजर व यमुना नदीच्या दरम्यान ठिकठिकाणी लष्कराच्या तुकड्या पेरल्या. उत्तर हिंदचा असा बंदोबस्त करून हेस्टिंग्सने दक्षिणेची जबाबदारी सर टॉमस हिस्लॉपवर सोपवत त्याच्या सोबत राजकीय आघाडी सांभाळण्याकरता जॉन माल्कमची नियुक्ती केली. खेरीज डोव्हटन, स्मिथ, फ्लॉयर व प्रिट्झलर हे चार सेनानीही हिस्लॉपच्या हाताखाली तैनात करण्यात आले. जॉन माल्कमला हिस्लॉपच्या सोबत पोलिटिकल एजंट म्हणून नियुक्त केल्याने एल्फिन्स्टनला वैषम्य वाटलं. कारण, पेंढाऱ्यांच्या नावाखाली पेशवाईला तिलांजली देण्याचा जो व्युह त्याने आखला होता, त्याची अंमलबजावणी आता माल्कमच्या परवानगीने करणे आवश्यक बनले. परिणामी, हा एल्फिन्स्टनच्या कार्यक्षेत्रात एकप्रकारचा अधिक्षेप होता. परंतु, कंपनीची नोकरी व राष्ट्राभिमान यांमुळे इंग्रजांच्या आपसांतील मानापमान नाट्यावर मर्यादा पडत ! असो, पेंढाऱ्यांवरील या मोहिमेसाठी कंपनी सरकारने सुमारे १ लक्ष १६ हजार सैन्य जमवले होते. त्याखेरीज ३०० तोफांचा प्रबळ तोफखानाही होता. याव्यतिरिक्त इंग्रजांच्या मांडलिक संस्थानिकांची जी फौज होती ती वेगळीच ! या तुलनेने पेशवा, मराठी सरदार आणि पेंढाऱ्यांच्या फौजेचा आकडा किती होता ?

     इंग्रजांच्या माहितीनुसार स. १८१४ मध्ये सीतू पेंढारी १५ हजार फौजेचा धनी होता. दोस्त / वसील महंमदकडे ६ हजार तर इतर पेंढारी सरदारांकडे मिळून ८ हजार स्वार होते. म्हणजे स. १८१७ मध्ये पेंढाऱ्यांचे सैन्य २० - ३० हजारांहून कमी नव्हते हे निश्चित ! याखेरीज सर्वात मोठा व प्रबळ पेंढारी सरदार म्हणजे अमीरखान होय. याच्याकडे ३० हजार सैन्याचा भरणा असून त्यात प्रशिक्षित कवायती पायदळ आणि तोफखान्याचाही समावेश होता. होळकरांच्या सैन्याची आकडेवारी मला मिळाली नाही, तरीही त्यांची फौज २० - २५ हजाराहून कमी नसावी. शिंद्याकडे ४० हजाराचे लष्कर असून त्यात मुख्यतः कवायती पलटणांचा अधिक भरणा होता. पेशव्याकडे स. १८१५ च्या अखेरीस ११ हजार स्वार आणि ६ हजार पायदळ मिळून १७ हजारांची फौज होती. त्याशिवाय  नागपूरकर भोसले आणि जहागीरदारांची भरती वेगळीच ! सारांश पेंढारी, पेशवा व शिंदे - होळकर मिळून मराठी पक्षाकडे इंग्रजांइतकेच १ लक्षाहून अधिक सैन्य होते.

    परंतु, या सैन्याचे नेतृत्व एकमुखी नव्हते. पेंढारी सरदारांच्या टोळ्या होत्या. अमीरखान ' उगवत्या सूर्याला प्रणाम ' करणाऱ्यांमधला होता. होळकरांच्या सैन्यात फाटाफूट झाली होती. शिंद्याला तर फौजेचा पगार वर्षानुवर्षे कधी देताच आला नाही. नागपूरकरांची तऱ्हा याहून वेगळी होती. आपासाहेबाचे स्वतःच्या सरदारांवर --- पर्यायाने सैन्यावर फारसे नियंत्रण नव्हते. राहता राहिला पेशवा, तर त्याची बव्हंशी फौज नवीन असून मुख्य मदार बापू व इतर जहागीरदारांवर ह्होती. तात्पर्य, इंग्रज - मराठी पक्षांचे पारडे समतोल जरी असले तरी परस्परांच्या गुण - दोषांमुळे त्यांची बल व वैगुण्यं मुख्य युद्धाआधीच उघड होऊ लागली होती. 


                                                                                  ( क्रमशः )      

( * गणेशपंत पिटकेला बाजीरावाने उत्तरेत नेमके कधी रवाना केले याविषयी रियासतकार सरदेसाईंनी आपल्या ' मराठी रियासत खंड ८ ' मध्ये दोन परस्परविरोधी विधाने केली आहेत. पहिल्या विधानानुसार स. १८११ - १२ दरम्यान पेशव्याने पिटकेला यशवंतरावाकडे पाठवल्याचा उल्लेख आहे तर दुसऱ्या ठिकाणी स. १८१७ मध्ये. यातील नेमके कोणते विधान ग्राह्य धरायचे ? मुख्य म्हणजे मराठी रियासतीच्या स. १९९२ च्या द्वितीय आवृत्तीच्या संपदकांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. )Friday, January 2, 2015

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग – १२ )

    दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाच्या समाप्तीनंतर मराठी राज्याचे एकूण स्वरूप व चित्र बदलून गेले. पेशवा आता इंग्रजांच्या अपरोक्ष आपल्याच सरदारांशी कोणताही व्यवहार करण्यास मोकळा राहिला नव्हता. तसेच त्याचे बलवान म्हणवले जाणार सरदारही या युद्धात पार गळाठून गेले होते. सुर्जी – अंजनगावच्या तहाने इंग्रजांनी दौलतराव शिंद्याचे हात – पाय पुरते बांधून टाकले होते. तशीही लष्करी – राजकीय उठाठेवींची त्यांस फार हौस नसली तरी त्याचा आणि पेशव्याचा मिलाफ होऊ न देण्याची खबरदारी इंग्रज घेतच होते. पेशव्याचा दुसरा भरवशाचा सरदार म्हणजे नागपूरचा दुसरा रघुजी भोसले ! पुणे दरबारशी फटकून वागण्याची वृत्ती जानोजी आणि त्याच्या वंशजांनी दाखवल्याने इंग्रजांनी तोच धागा पकडून दुसऱ्या रघुजीसोबत स. १८०३ मध्ये देवगावचा तह करून त्यांस शक्य तितके कागदोपत्री मराठी संघराज्यातून अलग केले. या दोघांना तैनाती फौजेच्या बंधनांनी जखडण्याची गव्हर्नर जनरल रिचर्ड वेल्स्लीची जाम इच्छा होती पण, दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाच्या पूर्वार्धातच ऑर्थर वेल्स्ली इतका टेकीस आला होता कि, शिंदे – भोसल्यांनी तहाची आतुरता दाखवताच त्याने झट कि पट तहाचे सोपास्कार उरकून घेतले होते. पेशव्याचा तिसरा महत्त्वाचा आणि बलवान सरदार म्हणजे बडोद्याचे गायकवाड ! गृहकलह, पुणे दरबारशी फटकून वागण्याची वृत्ती आणि बाजीरावाचे उलट – सुलट राजकीय निर्णय इ. मुळे गायकवाडीत इतका गोंधळ माजला होता कि, स. १८०२ मध्येच त्यांनी इंग्रजांच्या मदतीने आपली व्यवस्था लावून घेतली होती. उत्तर पेशवाईतील आणखी एक अतिशय महत्त्वाचा आणि बलवान सरदार म्हणजे यशवंतराव होळकर ! बाजीरावाने होळकराचा सरंजाम जप्त केल्याने तो बंडखोर बनला होता. परंतु, स. १८०५ च्या अखेरीस इंग्रजांनी त्याच्याशी तह करून एकप्रकारे त्यांस स्वतंत्र संस्थानिक म्हणून मान्यता दिली. यशवंतरावानेही स्वतंत्र सत्ताधीशाप्रमाणे स्वतःला राज्याभिषेक करून स्वतःच्या नावाने देवनागरी लिपीत नाणीही पाडली. स्वतःच्या नावाने नाणी पाडणारा हा छ. शिवाजी नंतरचा दुसरा मराठी सत्ताधीश ! सो. 

    दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धानंतरही ठिकठीकाणचे मराठी सरदार – मुत्सद्दी मोठ्या आशेने पुण्याकडे पाहत होते. मोगल बादशाह जरी शिंद्याचा --- पर्यायाने मराठ्यांचा आश्रय सोडून इंग्रजांच्या छत्रछायेखाली गेला असला तरी दिल्लीतील पेशव्यांचा वकील हिंगणे, पूर्वीच्याच उत्साहाने दरबारातील व आसपासच्या राज्यांतील बारीक – मोठ्या घटना विस्ताराने पेशव्यास कळवत होता. परंतु, पेशव्याची दृष्टीच मुळी आकुंचित असल्याने हिंगण्याची खर्डेघाशी व्यर्थ गेली ! असो, स. १८०३ नंतर स. १८१७ पर्यंत बाजीरावाच्या कारकिर्दीत काही फारशा मोठ्या राजकीय घडामोडी घडून आल्या नाहीत. याचे कारण म्हणजे बाजीरावास बदलत्या परिस्थितीचा व आपल्या कर्तव्याचा अंदाज येण्यास बराच काळ जावा लागला. त्याचप्रमाणे त्याच्या राज्याच्या व पेशवेपदाच्या रक्षणाची जबाबदारी परस्पर इंग्रजांनी उचलल्याने तो आरंभी तरी काहीसा निर्धास्त झाला होता. ‘ काहीसा ‘ शब्दप्रयोग वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे इंग्रजांवरही त्याचा जितक्यास तितका भरवसा होता. 

    स. १८०३ पासून स. १८१७ पर्यंत बाजीरावाच्या कारकिर्दीत घडलेल्या काही प्रमुख घटनांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. 

१] अमृतराव आणि समशेरबहादार दुसरा यांचे वृत्तांत :- वसईचा तह घडून इंग्रज फौजा बाजीरावास घेऊन पुण्यास येऊ लागल्या तेव्हा अमृतराव पुण्यातून नाशिकला रवाना झाला. यावेळी शिंदे – भोसले व होळकर या तिघांची युती होऊन ते इंग्रजांशी एकत्रितपणे सामना देण्याच्या बेतात होते. खुद्द अमृतरावही या योजनेस आरंभी अनुकूल होता. त्याचप्रमाणे बाजीरावही आपल्या सरदारांना अंतस्थरित्या इंग्रजांविरुद्ध चिथावणी देण्याचे कार्य करत होता. परंतु, यावेळी बाजीरावाने एक महत्त्वाची चूक केली. त्रिवर्ग सरदार एकदिलाने इंग्रजांशी लढण्याची तयारी करत असताना त्याने शिंद्याला, होळकराशी तात्पुरती मतलबी जवळीक करून इंग्रजांचे राजकारण आटोपताच यशवंतरावाचा काटा काढण्याची सूचना केली. बाजीरावाची बातमीपत्रे मारण्याचे काम इंग्रजांप्रमाणेच अमृतरावही करत होताच. त्याच्या हाती वरील आशयाची पत्रे पडताच याने ती ऑर्थर वेल्स्लीच्या सल्ल्यावरून यशवंतरावास पाठवून दिली आणि शिंदे – भोसल्यांना मिळण्यासाठी जवळ आलेला होळकर उत्तरेत निघून गेला.

    अमृतरावाच्या या वर्तनावर इतिहासकारांनी विनाकारण टीका केली आहे. पुण्यातील चार महिन्यांच्या कारभारात अमृतरावास राजकारणाची अंतःस्थिती चांगलीच समजून चुकली होती. अशा परिस्थितीत बाजीराव जेव्हा प्राणांवर बेतली तरी दुटप्पी राजकारण खेळत असल्याचे पाहून भवितव्यता लक्षात घेऊनच त्याने इंग्रजांशी मैत्री केल्याचे दिसून येते. इंग्रजांनी अमृतरावाच्या या दोस्तीची कदर करत त्यांस स. १८०४ मध्ये सालीना आठ लक्षांची तैनात बांधून काशी येथे राहण्याची व्यवस्था करून दिली. यानंतर मराठी राज्याशी वा राजकारणाशी त्याचा अजिबात संबंध आला नाही. 

    थोरल्या बाजीरावाला बुंदेलखंडी मिळालेल्या खासगी जहागिरीवर नाना फडणीसने समशेरबहाद्दरच्या मुलाची --- अलीबहाद्दरची नियुक्ती केली होती. तो तिकडे आपला जम बसवत असताना स. १८०२ च्या ऑगस्टमध्ये मरण पावला. यावेळी त्याचा मुलगा समशेरबहाद्दर ( दुसरा ) हा पुण्यास होता. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने समशेरची बुंदेलखंड प्रांती नेमणूक न करता ती जहागीर सरकारजमा करून त्यावर नीलकंठ रामचंद्र प्रभू पागेची नियुक्ती केली. समशेरने या संबंधी पुष्कळ खटपट केली पण, रावबाजीने त्याचे काहीएक ऐकून घेतले नाही. पुढे हडपसरच्या लढाईत समशेर पेशव्याच्या वतीने लढला आणि नंतर महाडपर्यंत त्याच्या सोबतही गेला. तिथून बाजीरावाने त्याची रवानगी पुण्यास केली. यावेळी पुण्यात अमृतराव कारभारावर असून त्याने समशेरला सरंजामाची वस्त्रे देऊन बुंदेलखंडी पाठवून दिले. समशेर आपल्या जहागिरीच्या प्रदेशात पोहोचेपर्यंत दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाचा भडका उडून बुंदेलखंड ताब्यात घेण्यसाठी गव्हर्नर जनरल रिचर्ड वेल्स्लीने आपल्या भावाची --- हेन्री वेल्स्लीची योजना केली होती. 

    इंग्रजांनी यावेळी अलीबहाद्दरच्या प्रमुख सरदारांना --- गनीबेग व अनुपगीर गोसावी उर्फ हिंमतबहाद्दर आणि शिंद्याचा या भागातील बलवान सरदार अंबूजी इंगळे यांना फितूर केले होते. तसेच गोहदच्या राण्यालाही त्यांनी आपल्या पक्षात मिळवून घेतले. सारांश, बुंदेलखंड ताब्यात घेण्याची लष्करी तयारी झाली होती आता राजकीय तयारी बाकी होती, त्याची पण पूर्तता लवकरच झाली. वसईच्या तहानुसार तैनाती फौजेच्या खर्चासाठी पेशवा गुजरात आणि सावनूर प्रांतातील मिळून काही प्रदेश तोडून देणार होता. तेव्हा इंग्रजांनी गुजरात – सावनूर ऐवजी बुंदेलखंडाची मागणी केली आणि पेशव्याने दि. ५ ऑक्टोबर १८०३ रोजी लेखी कराराने ती पूर्ण करून वर समशेरबहाद्दर बंडखोर असल्याचे जाहीर करत त्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी इंग्रजांच्या गळ्यात बांधली. 

    समशेरने शक्य तितका इंग्रजांचा प्रतिकार केला. मदतीसाठी त्याने होळकराशी संधानही बांधले पण यशवंतराव वेळेवर त्या प्रांती जाऊ न शकल्याने समशेरने निरुपाय जाणून शस्त्रे खाली ठेवली आणि दि. १८ जानेवारी १८०४ रोजी इंग्रजांशी तह करून सालीना चार लाखांची तैनात घेऊन बांदा येथे राहण्याचे कबूल केले. अशा प्रकारे उत्तरेतील पेशव्याच्या मालकीची जागा, त्याने आपणहून इंग्रजांच्या स्वाधीन केली. याचे परिणाम तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाच्या वेळी बाजीरावाला अनुभवास आले.                   
२] फत्तेसिंग माने हा होळकराचा पराक्रमी सरदार. त्याला आपल्या पक्षात वळवण्याचे पेशव्याने बरेच प्रयत्न केले पण तो न बधल्याने, तसेच यशवंतराव उत्तरेत निघून गेल्यावर मान्याचा दक्षिणेत धुमाकूळ चालूच राहिल्याने बाजीरावाने चिंतामणराव पटवर्धन आणि प्रतिनिधीचा कारभारी बळवंतराव फडणीस यांना फत्तेसिंगाचा बंदोबस्त करण्याची आज्ञा केली. दि. १७ जुलै १८०४ रोजी पंढरपूर जवळ झालेल्या संग्रामात मान्याचा पराभव होऊन तो मारला गेला.

३] प्रतिनिधीचा बंडावा :- यशवंतरावाच्या पुणे स्वारीपूर्वीच परशुरामपंत प्रतिनिधीचे प्रकरण वर्दळीवर आले होते. पण बाळोजी कुंजीरच्या मार्फत पेशव्याने त्यास पकडून पुण्यातच नजरकैदेत ठेवले. पुढे यशवंतरावाच्या पुणे स्वारीत परशुरामपंत मोकळा झाला व त्याने आपले पूर्वीचेच ढंग सुरु ठेवले. तत्कालीन प्रथेप्रमाणे आपल्या जहागिरीत व सरकारच्या महालांत लुटालूट करणे, प्रसंगी वतनदार व धनसंचय केलेल्या ब्राम्हणांना लुटून घेणे, लग्नाच्या स्त्रियांना टाकून तेली जातीच्या रमा उर्फ ताई तेलीण हिच्यासोबतच जास्त काळ व्यतीत करणे, इ. कागाळ्या बाजीरावाच्या कानी जातच होत्या. पण प्रतिनिधीने जेव्हा छत्रपतींच्या नावा – निशाणाखाली पेशव्याची सत्ता झुगारून दिल्याचे जाहीर केले तेव्हा मात्र बाजीरावाने बापू गोखल्याला प्रतिनिधीचा बंदोबस्त करण्याची स. १८०४ च्या अखेरीस आज्ञा केली. त्यानुसार स. १८०६ मध्ये बापूने प्रतिनिधीला पकडून पुण्यास पाठवले. तिथे त्यांस बाजीरावाने स. १८११ पर्यंत नजर कैदेत ठेवून मुक्तता करून कराड प्रांती रवानगी केली. इकडे परशुरामपंत जरी कैद झाला असला तरी त्याची रक्षा ताई तेलीण हिने प्रांतात बंडावा सुरूच ठेवला. तेव्हा फिरून बापूने तिच्याविरुद्ध मोहीम काढून स. १८०८ मध्ये तिलाही पकडून पुण्यास पाठवून दिले. 

४] सातारच्या छत्रपतीपदी प्रतापसिंहाची स्थापना :- दि. ४ मे १८०८ रोजी सातारचा छत्रपती धाकटा शाहू मरण पावला. तेव्हा त्याचा थोरला मुलगा प्रतापसिंह यांस ता. १६ मे १८०८ रोजी बाजीरावाने आपल्या देखरेखीखाली राज्याभिषेक करविला. यावेळी पेशव्याने मुद्दाम वा अजाणतेपणी दोन गोष्टी घडवून आणल्या. पहिली म्हणजे नवीन छत्रपतीस त्याच्या नावाचा नवीन शिक्का बनवू न देता त्याच्या वडिलांच्याच वेळचा शिक्का वापरण्याचा आग्रह केला आणि राज्याभिषेकापूर्वी मुंजीची असलेली परंपरा देखील यावेळी खंडित करून टाकली. बाजीरावाच्या या दोन निर्णयांमागील कारणपरंपरेचे काही आकलन होत नाही. सातारच्या प्रतापसिंहास राज्याभिषेक झाला तेव्हा तो जवळपास पंधरा वर्षांचा होता. त्यामुळे साहजिकच त्याच्या कारभारावर त्याच्या आईचे म्हणजे माईसाहेबांचे नियंत्रण असणे स्वाभाविक होते. सुरवातीला प्रतापसिंह बरोबर पेशव्याचे राजकीय संबंध चांगले होते पण चार – दोन वर्षांतच परस्परांविषयी अविश्वास निर्माण होऊन सातारकरांनी इंग्रजांशी संधान बांधले.

५] वसईचा तह घडून आल्यावर बॅरी क्लोझने स. १८०९ च्या जुलै पर्यंत पुण्यातील वकिलातीचे काम पाहिले. या काळात त्याने पेशव्याच्या अंतर्गत राज्यकारभारात फारशी ढवळाढवळ न करता आपल्या सत्तेचा बोज राखण्यात जास्त धन्यता मानली. अर्थात या कालावधीत पेशवाही इंग्रजविरोधी कारवायांपेक्षा इतर कामकाजात अधिक गुंतल्याने क्लोझबरोबर त्याचे सालोख्याचेच संबंध राहिले. 

    क्लोझ नंतर स. १८११ च्या फेब्रुवारीत एल्फिन्स्टनची पुण्याचा रेसिडेंट म्हणून नेमणूक होईपर्यंत गोवान, हॅमिल्टन आणि हेन्री रसेल यांनी हंगामी रेसिडेंटची भूमिका बजावली. यांपैकी रसेलने त्यातल्या त्यात दोन वर्षे हि जबाबदारी सांभाळली तर इतरांना चार – दोन महिन्याखेरीज जास्त काळ मिळाला नाही. या सर्वांनी क्लोझ प्रमाणे आपली वागणूक ठेवल्याने पेशव्यासोबत त्या सर्वांचे संबंध चांगले राहिले असले तरी हॅमिल्टनच्या कारकिर्दीत दि. २९ ऑक्टोबर १८०९ रोजी पुण्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे काही काळापुरते इंगज – पेशव्यातील संबंधात कटुता निर्माण झाली.

    त्या दिवशी चार गोरे शिपाई पेशव्याच्या कोथरूड बागेत जबरदस्तीने शिरले. यावेळी बागेच्या बंदोबस्ताची जबाबदारी रुपराम चौधऱ्यावर असल्याने त्याच्या चौकीच्या सैनिकांनी या चार इंग्रजांना पकडून मारझोड करत, गावातून त्यांची धिंड काढत पेशव्याच्या वाड्याकडे जाऊ लागले. धिंडी दरम्यान शहरात घबराट माजून लोकांनी दुकाने – घरे बंद केली. तेव्हा मराठी सैनिकांनी घराघरांत घुसून लोकांना हि धिंड पाहण्यास रस्त्यावर आणले. तसेच एका इंग्रज शिपायास जास्त मार लागल्याने त्यांस चालता येईना तेव्हा शिकार केलेल्या प्राण्याप्रमाणे एका काठीला बांधून त्यांस खांद्यावरून उचलून नेण्यात आले. याशिवाय कैद्याने तहानेने व्याकूळ होऊन पाणी मागितले असता त्यांस मराठी सैनिकांनी मूत्र पिण्यास सांगितले. अशा प्रकारे हि वरात पेशव्याच्या वाड्यात आली. त्याने हे प्रकरण आपला काभारी सदाशिव माणकेश्वर याच्याकडे सोपवले. माणकेश्वर बुवा यावेळी हिराबागेत असल्याने हि वरात तिकडे गेली. तिथे पोहोचल्यावर माणकेश्वरने अधिक चौकशी न करता रेसिडेन्सीत निरोप पाठवून ‘ त्या चार कैद्यांना ‘ घेऊन जाण्याची सूचना केली. तेव्हा इंग्रजांनी डोल्या पाठवून आपली माणसे नेली.

    हा प्रकार घडला तेव्हा हॅमिल्टन पुण्याबाहेर होता. घटनेचा वृत्तांत मिळताच तो तातडीने पुण्यास आला व त्याने सदर प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांना शासन करण्याचा पेशव्याकडे आग्रह धरला. हॅमिल्टन जाऊन त्याच्या जागी हेन्री रसेल रेसिडेंट म्हणून नियुक्त झाला होता. त्याने हि घटना कंपनी सरकार व इंग्रज राष्ट्राचा अपमान असल्याचे कारण पुढे करत तपासकामी पेशव्यास धारेवर धरले. तेव्हा पेशव्याने आपला कारभाऱ्यास शिवीगाळ करून कामात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल ठपका दिला. नंतर कोथरूड बागेतील व कोतवाल चौकीचे १०० शिपाई त्याने कैदेत टाकून त्यांतील ९ जणांना प्रत्यक्ष गुन्हेगार मानून बंदिवासात टाकले तर ५० जणांना राहत्या घरी नजरकैदेत ठेवले. पेशव्याच्या या तातडीमुळे रसेलनेही अधिक ताणून न धरता वादावर पडदा टाकला आणि ता. १८ नोव्हेंबर १८०९ रोजी रेसिडेन्सीत हुकुम काढून पुणे शहरात इंग्रज शिपाई वा अधिकाऱ्यांना जाण्यास बंदी घातली. 

    राजकीयदृष्ट्या या प्रसंगास / घटनेस फारसे महत्त्व नसले तरी परराज्यातील / राष्ट्रांतील सैनिकांविषयी मराठी शिपायांच्या मनात कशा प्रकारची भावना होती, याचे प्रत्यंतर या घटनेतून येते.

६] माउंट स्टूअर्ट एल्फिन्स्टनचे पुणे दरबारी आगमन :-  स. १८११ च्या फेब्रुवारीत हेन्री रसेलच्या जागी माउंट स्टूअर्ट एल्फिन्स्टन उर्फ ‘ अल्पिष्टन ‘ पुण्याच्या वकिलातीवर रुजू झाला. बॅरी क्लोझचा सहाय्यक म्हणून त्याने यापूर्वी पुणे दरबारचे कामकाज पाहिलेलं असल्याने आणि वसईच्या तहात त्याचाही अप्रत्यक्ष सहभाग असल्याने येथील राजकारणाची त्यांस चांगलीच ओळख होती. हिंदुस्थानात असलेल्या समकालीन इंग्रजांप्रमाणेच एल्फिन्स्टनही साम्राज्यविस्तारवादी होता. परंतु, त्याच्या राजकारणाची पद्धत रिचर्ड वेल्स्लीच्या वळणाची होती. त्यामुळे पेशव्याचा व त्याचा प्रसंगोत्पात खटका उडणे स्वाभाविक होते.

    एल्फिन्स्टनच्या स्वभावाची व कामकाजाच्या पद्धतीची माहिती असलेल्या इंग्लिश रेसिडेन्सीतील खुरशेट मोदीने पेशव्याला अंतस्थरित्या सावधगिरीचा इशारा देऊन ठेवला. मोदी जरी कंपनीचा नोकर असला तरी अंतस्थरित्या पैसे खाऊन तो पेशव्याचेही हित सांभाळत असे. तत्कालीन हिंदुस्थानी चाकारांपेक्षा त्याचे वर्तन निराळे होते असे म्हणता येत नाही. मोदीच्या सेवेची कदर म्हणून बाजीरावाने त्यांस स. १८०९ मध्ये कर्नाटक प्रांताची सुभेदारी दिली. मोदीने त्या प्रांती आपला मुतालिक नेमून रेसिडेन्सीतील नोकरी कायम राखली. अर्थात, हे त्यावेळच्या प्रथेस सुसंगत असले तरी एल्फिन्स्टनने या गोष्टीस आक्षेप घेऊन मोदीला पेशवे वा कंपनी सरकार यांपैकी एकाची चाकरी सोडण्याची आज्ञा केली. तेव्हा मोदीने कर्नाटकची सुभेदारी सोडली आणि पेशव्याने त्या जागी त्रिंबकजी डेंगळेची नियुक्ती केली.
 
 ७] वसईचा तह व दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाची समाप्ती झाल्यावर पेशव्याने राज्यकारभार, धार्मिक कृत्यं आणि ऐशोआरामाकडे विशेष लक्ष पुरवले. ठीकठिकाणची बंडाळी संपुष्टात आल्यावर प्रांतात काही प्रमाणात शांतता – सुव्यवस्था प्रस्थापित होऊन सरकारी खजिन्यात महसुलाची भर पडू लागली. याच काळात केव्हातरी पेशव्याने मामलतींचा लिलाव करण्याचा निर्णय अंमलात आणला. त्यामुळे चढ्या बोलीने मामालती घेण्यात धनवानांची चढाओढ सुरु होऊन पाच हजारांच्या मामलतीवर पन्नास हजारांची बोली लागू लागली. बाजीरावाचे या काळात मुख्य उद्दिष्ट खजिन्यात भर टाकण्याचे असल्याने चढ्या भावाने मामलती घेणाऱ्यांनी वसुलीसाठी काहीही केलं तरी त्याकडे तो दुर्लक्ष करू लागला.

    पेशव्याचा सालाचा वसूल सुमारे सव्वा कोट रुपये असून त्यापैकी खर्च वजा जाता तो कमीतकमी पन्नास लाख रुपये शिलकीत टाकत असे. स. १८१२५ मध्ये त्याच्या खजिन्यात सुमारे पाच कोटींचा ऐवज असल्याचा उल्लेख इतिहासकार करतात. यावरून बाजीराव निश्चित एका धोरणाने पैसा गोळा करत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे याच काळात पेशव्याची विलासी व धार्मिक वृत्ती कळसास जाऊन पोहोचली. 

    तमाशा, लावणी, कीर्तनकार, गवई इ. ना भर दरबारी सन्मान देण्यात येऊ लागले. दरबारात, वाड्यात मातबर सरदार मसलती ऐवजी करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी गोळा होऊ लागले. शहरात व पुण्या आसपासच्या भागांत पेशव्याने आपल्या विश्राम – विलासांसाठी शहरांची – वाड्यांची निर्मिती केली. तत्कालीन प्रचलित रीतीस धरून पेशव्याची मर्जी रक्षण्याकरता लहान – मोठे सरदार, सावकार आपापल्या विवाहीत स्त्रियांना पेशव्यासोबत एकांत करण्यासाठी पाठवू लागले. पेशव्याच्या या विलासकृत्यांवर समकालीन एल्फिन्स्टन पासून नंतरच्या देशी – विदेशी इतिहासकारांनी भरपूर टीका केली आहे व आजही कित्येक नवजात इतिहासकार या कृत्यात धन्यता मानत आहेत.

    वास्तविक बाजीरावाचे विलास प्रकरण तत्कालीन प्रचलित रूढी – परंपरांना अनुसरून होते. स्वतः एल्फिन्स्टन पुण्याच्या रेसिडेन्सीत वेगळं काय करत होता ? बाजीरावाचा समकालीन नेपोलियन बोनापार्टचे विलासी आचरण कशा प्रकारचे होते ? बरे, तो जर तत्कालीन सभ्य आणि उच्च युरोपियन संस्कृतीनुसार हलक्या कुळातील होता असे जर मानले तर, राजकीय फायद्यासाठी आपापल्या विवाहित आणि अभिषिक्त बायका शृंगारून या हलक्या कुळातील नेपोलियनच्या बिछान्यात पाठवणाऱ्या उच्च कुलीन युरोपियन राजे – रजवाड्यांचे काय ? हि जर पाश्चिमात्त्य उदाहरणे नको असतील तर दुसऱ्या बाजीरावाच्याच काळात हिंदुस्थानात काय चालले होते ? मुस्लीम संस्थानिकांचे विलास याहून वेगळे होते का ? स्त्रियांविषयीची मुस्लिमांची भोगबुद्धी हा जर दुर्गुण वा दोष मानला जात असेल तर मग स्वधर्मीय दौलतराव शिंदे, नागपूरकर दुसरा रघुजी भोसले यांचे काय ? खुद्द बाजीराव पेशव्याच्या बापाने --- रघुनाथरावाने सुरत मुक्कामी ब्राम्हणाची मुलगी कशासाठी पळवून नेली होती ? नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्यांणा मस्तानी प्रकरणातील राधाबाईच्या निंदनीय भूमिकेचा बरा विसर पडतो ? बाजीराव निदान दुसऱ्यांच्या बायकांना तरी जवळ करत होता पण राधाबाईने नानासाहेबाला आपल्याच पित्याच्या द्वितीय पत्नी – सावत्र माते सोबत फाजील लगट करण्याचा सल्ला कोणत्या नैतिक  भूमिकेतून दिला होता ? कि त्यावेळची नैतिक बंधने फारच सैल असल्याने राधाबाई, चिमणाजी व नानासाहेब यांचे वर्तन सहज खपून गेले, असे समजायचे ? फार लांब कशाला, महात्मा फुलेंनी जो पुण्यात विधवा स्त्रिया व अनाथ मुलांसाठी आश्रम सुरु केला होता, त्यामागील कारणे काय होती ? तत्कालीन समाजातील विधवांचे पाय, आपल्याच घरात कसे घसरवले जात होते ?

    खरोखरच त्यावेळच्या समाजमान्य कल्पनांच्या मर्यादेबाहेर बाजीरावाने वर्तन केले असते तर त्याचे राज्य घेण्यासाठी स.१८१८ पर्यंत इंग्रजांना वाट बघत बसण्याचे काहीच कारण नव्हते. बाजीरावाच्या सरदारांना आपापल्या विवाहित स्त्रिया रावबाजीच्या बिछान्यात पाठवणे गैर वाटले असते तर त्यांनी त्याच्याविरोधात बंड नसते का पुकारले ? किंवा एखाद्या माथेफिरू व्यक्तीने त्याचा खूनच केला नसता का ? सारांश, समकालीन सामाजिक रूढी, परंपरा लक्षात न घेता एखाद्याच्या विशिष्ट आचारणावर बोट ठेवून टीका करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे.
 
    दुसरा बाजीराव जितका विषयासक्त तितकाच धार्मिकही होता. बापाप्रमाणेच तो कट्टर शिवभक्त असून तत्कालीन समजुतीनुसार धार्मिक प्रथा, परंपरांचे शक्य तितके काटेकोरपणे पालन करण्याकडे त्याच्या मनाचा स्वाभाविक कल असे. आपल्या बापाने नारायणरावाचा खून करून मोठं पाप केल्याची भावना सदोदित त्याच्या मनाला सलत होती. त्या पापाचे क्षालन करण्यासाठी तत्कालीन समजुतीनुसार त्याची कर्मकांडे सुरु होती. खेरीज, प्रचलित पद्धतीनुसार त्याचे शिक्षण झालेलं असल्याने यज्ञयाग – पूजापाठ प्रसंगी करावयाच्या मंत्रोच्चारातही तो सहभाग घेत असे.

    जनतेला पीडून त्याने पैसा जमवला व भिक्षुक – ब्राम्हण आणि तमाशा कलावंत व स्त्रियांवर उधळला असा समज आहे. परंतु, बाजीरावाच्या या उधळपट्टी विषयीचे समकालीनांचे अभिप्राय पाहिले असता असे लक्षात येते कि, तो इतर पेशव्यांप्रमाणेच आर्थिक व्यवहारात दक्ष असून त्याचा खर्च बेताचा असला तरी त्यांत कंजूषपणाचा लवलेश नव्हता. त्याखेरीज इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्याने जी काही लष्करी तयारी केली होती, तिच्याकरता लागणारा प्रचंड पैसा पाहता खरोखरच या पेशव्याने भिक्षुक – ब्राम्हण व स्त्रियांवर पैशांची नाहक उधळपट्टी केल्याचा आरोप करणाऱ्या इतिहासकारांच्या बुद्धीची कीव येते.

    बाजीरावाची राजकीय कारकीर्द इतर कोणत्याही पेशव्यापेक्षा अधिक व शांततेची असली तरी त्या शांततेचा उपयोग करून राज्यकारभाराची घडी बसवण्याचा वा त्यात काही फेरबदल करण्याचा त्याने खटाटोप केला नाही. त्याची मुळातच तेवढी कुवत नसल्याने आणि त्याचे याविषयीचे पुस्तकी वा व्यावहारिक शिक्षणच न झाल्याने असे होणे स्वाभाविकच होते. असो, बाजीरावाने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सामाजिकदृष्ट्या काही धाडसी निर्णय घेतले खरे, पण त्यांची अंमलबजावणी फार प्रभावीपणे होऊ शकली नाही. उदाहरणार्थ :- (१) तत्कालीन समाजात विवाह प्रसंगी वधूपिता वराकडून काही रक्कम घेत असे. या कन्याविक्रयास बाजीरावाने बंदी घातली. (२) पेशव्याच्या राज्यातून साष्टी व मुंबई प्रांती गाईंची विक्री होत असे, त्यावर पेशव्याने पूर्णतः बंदी आणण्याचा प्रयत्न केला. (३) एका धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्तीला पुन्हा हिंदू धर्मात घेण्याकरता बाजीरावाने आज्ञा काढल्याचे इतिहासकारांनी नमूद केले आहे.

    बाजीरावाच्या आधीचे पेशवे मुलूखगिरीसाठी मोठ – मोठ्या फौजा घेऊन मोहिमेवर बाहेर पडत. परंतु, वसईच्या तहामुळे बाजीरावाला तो उपद्व्याप करण्याची मोकळीक न राहिल्याने दरवर्षी तो फौजफाटा घेऊन आपल्याच राज्यातून देवदर्शन करण्यासाठी मोहिमा आखू लागला. या देवदर्शन स्वारीत पूर्वपरंपरेनुसार मार्गातील गावांना लष्कराच्या उपद्रवात काही फरक पडला नाही.

८] पंढरपूरचा तह ( स. १८१२ ) :- वसईच्या तहानंतर बाजीरावाने थोडी स्वस्थता लाभताच दक्षिणेतील सरदाराना धारेवर धरण्यास आरंभ केला. त्यामागे प्रांतिक व सांपत्तिक अभिलाषा असल्याचा आरोप इतिहासकारांनी केला असला तरी त्यात फारसे तथ्य वाटत नाही. 

    नाना फडणीसच्या मृत्यूनंतर व यशवंतरावाच्या दक्षिण स्वारीने पुणे दरबारात बरेच घोटाळे माजून अनेकांच्या सरंजामांची घालमेल झाली होती. कित्येकांनी लष्करी बळावर परस्परांचे प्रांत दाबले होते. तेव्हा अशा सरदारांकडून गैरसनदी बळकावलेला मुलुख ताब्यात घेण्याचा सपाटा पेशव्याने लावला. त्याचप्रमाणे जे सरदार त्याच्या दृष्टीने नालायक, आकार्यक्षम होते त्यांचे सरंजाम जप्त करून तो इतरांना देऊ लागला. उदा :- पेशव्यांचा तोफखाना पानशांच्या अखत्यारीतून काढून त्याने त्यावर त्रिंबकजी डेंगळेची नियुक्ती केली. त्याचप्रमाणे अमृतरावाच्या औटघटकेच्या कारभारात ज्यांनी साथ दिली होती अशा बाबा फडके प्रभूतींचा त्याने उच्छेद चालवला.
तसेच कोल्हापूर, सावंतवाडी इ. संस्थानांच्या बाबतीतही पेशवा आपले वाजवी हक्क गाजवू लागला तेव्हा या संस्थानिकांनी व पेशव्याकडून त्रस्त झालेल्या सरदारांनी मदतीकरता एल्फिन्स्टनकडे धाव घेतली. 

    पेशव्याच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करून त्याचे लष्करी बळ खच्ची करण्याची चालून आलेली संधी दवडण्याइतपत एल्फिन्स्टन मूर्ख नव्हता. त्याने आपली सर्व अक्कल – हुशारी पणाला लावून दि. २० जुलै १८१२ रोजी पंढरपूर येथे पेशव्याकडून खालील कलमांवर आधारित तहास मंजुरी मिळवून घेतली :- (१) जागीरदारांवरील पूर्वीचे द्वेष सोडून द्यावे. (२) पूर्वीच्या सनदांस व रिवाजांस सोडून नवीन मागण्या पेशव्याने त्यांजकडे इंग्रजांच्या परवानगीशिवाय करू नयेत. (३) तैनात जाबत्यांत ठरल्याप्रमाणे जागीरदारांनी फौजा बाळगून पेशव्याची नोकरी करावी. (४) इंग्रजांच्या परवानगीशिवाय जागीरदारांचे सरंजाम पेशव्याने जप्त करू नयेत. (५) भेटीच्या व अन्य प्रसंगी पेशव्यांनी त्यांचा योग्य सन्मान ठेवावा. (६) सनदाबाहेर जे प्रदेश जागीरदारांच ताब्यांत असतील ते त्यांनी सोडून पेशव्याचे हवाली करावे. (७) उभयतांमध्ये तक्रार उपस्थित झाल्यास त्याचा निवडा इंग्रज करतील तो पेशव्याने मान्य करावा. (८) जागीरदारांशी कोणताही करार परभारे करण्यास इंग्रज सरकार मुखत्यार आहेत. 

    टीप :- उपरोक्त तहातील ७ क्रमांकाचे कलम शब्दशः नसावे असे मला वाटते. कारण एकाच पक्षाला बंधनकारक अट एल्फिन्स्टन घालेल हे संभवत नाही. ७ वे कलम उभयपक्षी --- पेशवा आणि जागीरदार यांना --- बंधनकारक असावे पण माझ्याकडील सरदेसायांच्या रियासतीत जसा तह दिला आहे तो शब्दशः येथे उतरून घेण्याखेरीज सध्या तरी दुसरा पर्याय नाही.

    पंढरपूरच्या तहातील अटी पेशवा आणि जहागीरदार सहजासहजी मान्य करणार नाहीत याची एल्फिन्स्टनला खात्री होतीच. त्यामुळे तहाचा मसुदा बनवत असतानाच दक्षिणेतील इंग्रजांची व मांडलिक संस्थानिकांची फौज त्याने मोक्याच्या स्थळी आणून ठेवण्याची खबरदारी घेतली होती. त्यामागील प्रमुख हेतू म्हणजे, या निमित्ताने जर युद्धाचा भडका उडाला तर तडकाफडकी पेशव्याचे राज्य गिळंकृत करून टाकायचे. कारण, यावेळी दीर्घकालीन युद्धासाठी पेशव्याची वा त्याच्या सरंजामदारांची बिलकुल तयारी नव्हती. असो, पेशवा आणि त्याच्या जहागीरदारांनी एल्फिन्स्टनचा महत्त्वाचा डाव जरी वाया गेला असला तरी या तहान्वये एल्फिन्स्टनने जहागीरदार व पेशवा यांच्यातील थेट संबंध तोडून त्यात इंग्रजांची दरम्यानगिरी प्रस्थापित करत त्या दोघांवर कंपनी सरकारचे वर्चस्व लादले. 

९] कोल्हापूरकर इंग्रजांच्या पंखाखाली :- स. १८१२ च्या पंढरपूरच्या तहानंतर एल्फिन्स्टनने कोल्हापूरकर, सावंतवाडीकर आणि निपाणकर देसायाला पेशव्याच्या जोखडातून मुक्त करत कंपनी सरकारच्या छत्रछायेखाली घेतले. यांपैकी करवीरचे प्रकरण विशेष महत्त्वाचे होते. 

    इंग्रजांची व्यापाराकरता मालवण बंदर व किल्ला आपल्या ताब्यात घेण्याची बऱ्याच वर्षांची इच्छा होती. परंतु, पुणेकर जबरदस्त असल्याने त्यांना गप्प बसावे लागले होते. वसईच्या तहानंतर मात्र चित्र साफ पालटले. कोल्हापूरकरांना पुणेकरांचे वर्चस्व कधीच मानवले नव्हते. त्यात बाजीराव करवीरकरांवर आपला अधिकार गाजवू लागला तसा कोल्हापूरकरांनी एल्फिन्स्टनकडे मदतीचा धावा केला. दाराशी चालून आलेली सुवर्णसंधी अल्पिष्टनसाहेब कसा दवडेल ? त्याने लगेच करवीरकरांशी स्वतंत्र तहनामा करण्याची तयारी आरंभली. कोल्हापूर प्रकरणी इंग्रजांची वासना ओळखून रावबाजीने मालवण बंदर ताब्यात न घेण्याची विनंती करत, बदल्यात नुकसान भरपाईस्तव ५० लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. परंतु एल्फिन्स्टनने तिकडे साफ दुर्लक्ष केले तेव्हा बाजीरावाने, कोल्हापूरकरांशी स्वतंत्र तह करण्याचा इंग्रजांना अधिकार नसल्याचे ठणकावून सांगताच एल्फिन्स्टनने पेशव्याचे म्हणणे खोडून काढत दि. ८ ऑक्टोबर १८१२ रोजी करवीरकरांशी तह करून मालवण सोबत सर्जेकोट, पद्मगड, राजकोट हि स्थळे देखील आपल्या ताब्यात घेतली. तसेच चिकोडी व मनोळी पेशव्याला देऊन वरकरणी त्यांस खुश केले पण भविष्यात पेशवा – करवीरकरांची युती होण्याची शक्यता बव्हंशी मोडीत काढली. 

    अर्थात, कोल्हापूरकरांनी या तहास राजीखुशीने संमती दिली नाही हे वेगळे सांगायची गरज नाही ! त्याचप्रमाणे हे देखील या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे कि, वसईच्या तहानुसार इंग्रजांना परस्पर करवीरकरांशी तह करण्याचा अजिबात हक्क नव्हता पण, तहाची प्रभावी अंमलबजावणी करवून घेण्यासाठी ज्या लष्करी बळाची आवश्यकता असते, तेच नसल्याने पेशव्याचा दावा कितीही योग्य असला तरी त्यांस विचारतो कोण ? 

    निपाणकर देसायाच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडून आला. सारांश, निव्वळ लष्करी बळावर इंग्रज तहरूपी बंधनांनी एतद्देशीय संस्थानांना झपाट्याने आपल्या कब्जात घेऊ लागले होते व सर्व काही कळत असूनही ‘ मला ना तुला, घाल कुत्र्याला ‘ या वृत्तीने एतद्देशीय संस्थानिकही आपणहून इंग्रजांच्या पंखाखाली जात होते.     

१०] कॅप्टन फोर्डचा कंपू :- पंढरपूरचा तह केल्यावर बाजीरावाने एल्फिन्स्टनच्या मार्फत कॅप्टन फोर्डला आपल्या नोकरीत घेऊन त्याच्यावर एक कवायती कंपू बनवण्याची जबाबदारी टाकली. फोर्ड उर्फ ‘ पोट ‘ साहेबाला सेवेत घेताना २४ कलमी करार करण्यात येऊन त्यांत, कंपनी सरकारची तमा न बाळगता पेशवा सांगेल ती कामगिरी बजावण्याची त्याने मान्य केले होते.

    फोर्डसारख्या इंग्लिश माणसाला आपल्या सेवेत घेतल्याबद्दल सर्वच इतिहासकारांनी बाजीरावास दिलेला दोष योग्य आहे. ज्यांच्याशी आपणांस निर्णायक लढा पुकारायचा आहे, त्यांच्याच माणसास आपल्या सेवेत घेण्याचा मूर्खपणा क्वचितच कोणी करेल ! दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धातील युरोपियन लोकांची दगाबाजी माहिती असतानाही बाजीरावाने अशी चूक करावी याचे आश्चर्य वाटते. मनुष्य अनुभवाने शहाणा होतो असे म्हणतात खरे, पण काही बाबतीत रावबाजी या नियमाला अपवाद असल्याचे दिसून येते !
 
११] त्रिंबकजी डेंगळेचा कारभारात प्रवेश :- वसईच्या तहापासून इंग्रजांविषयी बाजीरावाचे मन कलुषित होऊ लागले होते. त्यातच एल्फिन्स्टन पुण्यास आल्यापासून वा त्यापूर्वीच वसईच्या बंधनातून स्वतःची सुटका करून घेण्याची पेशव्याची धडपड सुरु झाली होती. पेशव्याच्या या ‘ मूर्ख ‘ धडपडीला त्रिंबकजी मनापासून साथ देत होता. पेशव्याच्या सर्व सरदारांशी गुप्त पत्रव्यवहार चालवून त्रिंबकजी इंग्रजांच्या विरोधात मराठी सरदारांचा संघ उभारू लागला. त्रिंबकजीच्या प्रयत्नांना सरदारांचा मनःपूर्वक पाठिंबा किती होता, हा स्वतंत्र संशोधनाचा / लेखाचा विषय असला तरी पेशव्याचे मात्र त्यांस अंतःकरणापासून समर्थन होते. याचे प्रत्यंतर होळकर प्रकरणातून दिसून येते. 

    यशवंतरावा बद्दलची बाजीरावाच्या मनातील तेढ --- निदान यशवंतरावच्या हयातीत तरी गेली नाही. स. १८११ मध्ये यशवंतरावाचा आजार बळावल्याने कुलदेवतेच्या --- जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला येण्याचा त्याचा विचार चालला होता. त्यासाठी त्याने पेशव्याकडे परवानगीही मागितली. परंतु, पेशव्याने ती दिली तर नाहीच, वर इंग्रजांकडे खटपट करून यशवंतरावास दक्षिणेत उतरण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, होळकराच्या दहशतीमुळे इंग्रजांनी या प्रकरणी हात वर केल्याने बाजीरावाने स्वतः विजयदुर्गला जाण्याचा निर्णय घेत सातारकर छत्रपतीला रायगडी जाण्याची सूचना केली. यामागील प्रमुख कारण म्हणजे, यशवंतरावाच्या मागील स्वारीत त्याने छत्रपतींकडून पेशवाईच्या वस्त्रांची जी उठाठेव केली ती करू नये, हे होय !

    अर्थात, पेशव्याच्या सुदैवाने असा काही प्रसंग ओढवला नाही व होळकरही दक्षिणेत उतरला नाही. परंतु, होळकराविषयी इतकी आत्यंतिक शत्रुत्वाची भावना मनी असताना देखील बाजीरावाने निव्वळ त्रिंबकजीच्या आग्रहाखातर त्याच वर्षी होळकराकडे गणेशपंत पिटके नामक वकील आपल्या तर्फेने पाठवला. हि घटना यशवंतरावाच्या हयातीत घडली कि नंतरची याची निश्चिती करण्यास माझ्याकडे पुरेशी साधने नसली तरी यावरून, इंग्रजांविरुद्ध लढा पुकारण्यासाठी पेशवा मंदगतीने पण निर्धाराने तयारी करत असल्याचे काही प्रमाणात सिद्ध होते. 

१२] खुरशेट मोदी व गंगाधरशास्त्र्याचे खून आणि एल्फिन्स्टनची चलाखी :- स. १८१४ मध्ये इंग्रजांचा नेपाळशी तंटा जुंपून त्यांच्यात युद्धाला आरंभ झाला. आरंभीच्या काही महिन्यांत इंग्रजांना नेपाळमध्ये पराभवाचे तडाखे खावे लागले. इंग्रजांच्या पराभवाची वर्तमाने हिंदुस्थानात प्रसिद्ध होण्यास फार वेळ लागला नाही. परिणामी, इंग्रजांचे जोखड नाईलाजाने / स्वखुशीने स्वीकारलेल्या ठीकठिकाणच्या संस्थानिकांची स्वतंत्र होण्यासाठी चुळबुळ सुरु झाली. यावेळी हर एतद्देशीय दरबारातील एल्फिन्स्टन सारखे चढाक वृत्तीचे रेसिडेंट शक्ती ऐवजी युक्ती व कपटनीतीने आपल्या सत्तेचा बोज राखण्यास धडपडू लागले.

    इंग्रजांच्या चढेल वृत्तीने चिडलेला बडोदा दरबारातील इंग्रज विरोधी गट पुणे दरबारशी संधान बांधून भावी बिघाडाची तयारी करू लागला. त्यादृष्टीने इंग्रजांचे बडोद्यातील वर्चस्व मोडून काढण्याकरता गायकवाडांनी आपला वकील व इंग्रजांचा हस्तक गंगाधरशास्त्री पटवर्धन याची पुण्याला रवानगी केली. या वकिलातीसाठी निमित्त होते अहमदाबाद सुभ्याच्या वहिवाटीची संपलेली मुदत वाढवून घेणे व गायकवाडीतून पेशव्याला जे काही मागील देणे बाकी होते त्याचा हिशोब करून घेणे. शास्त्री मजकूर वरकरणी बडोदेकरांचा पण आतून इंग्रजांचा हस्तक बनून स. १८१४ च्या आरंभी पुण्यास आला खरा परंतु, औपचारिक भेटीखेरीज त्याच्या पदरी फारसे काही पडले नाही. 

    दरम्यान याच काळात बाजीरावाने उघडपणे त्रिंबकजीला कारभारात घेऊन त्यावर इंग्रज वकिलाशी व गंगाधर शास्त्र्याशी बोलणी करण्याची जबाबदारी सोपवली. त्रिंबकजी हा तत्कालीन दरबारी परंपरेत मुरलेला मुत्सद्दी नसल्याने त्याची रोखठोक परंतु, न्याय – नीतीला धरून केलेली भाषणे साम्राज्यवादी एल्फिन्स्टनला रुचली नसल्यास नवल ! त्यातच खुरशेट मोदीची अंतस्थरित्या त्रिंबकजीला मदत होत असल्याने त्याची बोलणी अधिकच आक्रमक होऊ लागली. तेव्हा एल्फिन्स्टनने शास्त्र्याला बडोद्यास जाण्याची सूचनाकेली पण, शास्त्र्याने ती जुमानली नाही व स्वतःच्या इभ्रतीखातर तो पुण्यातच पाय मुरगाळून बसला.

    मधल्या काळात त्रिंबकजीने शास्त्र्यालाच आपल्या पक्षात वळवून घेण्याचा प्रयत्न आरंभला व शास्त्रीही त्यांस अनुकूल होत चालला. नेटिव्ह डबल एजंट्सच्या या कृत्यांनी एल्फिन्स्टन चांगलाच चिडला. पण आततातीपणे त्याने त्यांच्यवर कारवाई न करता प्रथम मोदीला स. १८१५ च्या फेब्रुवारीत सक्तीने सेवानिवृत्त करून पेन्शनीत काढले व त्यांस स्वदेशी --- गुजरात प्रांती जाण्याचा हुकुम केला. मोदीने देशांतराचा आदेश न जुमानल्याने ता. २७ फेब्रुवारी १८१५ रोजी एल्फिन्स्टनच्या प्रेरणेने मोदीला विष देऊन ठार करण्यात आले. वास्तविक, मोदीचा खून हा गंगाधरशास्त्र्याकरता धोक्याचा इशारा होता पण, त्याकडे साफ दुर्लक्ष करत शास्त्र्याने उघडपणे पेशव्याशी हातमिळवणी केली. तेव्हा दि. २० जुलै १८१५ रोजी पंढरपूर मुकामी शास्त्र्याचा खून अज्ञात इसमांनी घडवून आणला. या दोन्ही खुनांमागील मुख्य प्रेरणा एल्फिन्स्टनची जरी असली तरी त्यानेच केलेल्या तपासात मोदीच्या मृत्यूमागे सुलेमान मांत्रिकाचा तर शास्त्र्याच्या हत्येच्या कटांत त्रिंबकजीचा हात असल्याचे सिद्ध करण्यात आले. 

    शास्त्री हा बडोद्याचा वकील असल्याने व पुणे – बडोदा दरम्यान इंग्रजांची मध्यस्थी असल्याने, एल्फिन्स्टनने त्रिंबकजीला आपल्या ताब्यात देण्याची पेशव्याकडे मागणी केली. त्याचप्रमाणे, पेशव्यावर दबाव आणण्यासाठी एलफिस्टनने जवळपासच्या प्रदेशातील इंगलिश पलटणी पुण्याजवळ बोलावून घेतल्या. इंग्रजांच्या या आक्रमक पवित्र्याने पेशवा विचारात पडला. रेसिडेंटची मागणी मान्य करण्याचे त्याच्या जीवावर येत होते. त्याने इंग्रजांशी याच वेळी बिघाड करण्याचा निर्णय घेतला पण, बापू गोखल्याने त्यांत मोडता घातला. कारण, पुण्याजवळच्या लढाया मारण्या इतपत पेशव्याची फौज समर्थ असली तरी देशभर युद्धाचा भडका उडाल्यास दीर्घकाळ लढा चालवण्याइतकी लष्कराची तयारी अजून झाली नव्हती. 

    वस्तुतः यावेळी देशातील इंग्रजांची बव्हंशी फौज नेपाळ युद्धांत गुंतल्याने, एल्फिन्स्टनने देखील मोठाच धोका पत्करला होता. यदाकदाचित तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धास याचवेळी प्रारंभ झाला असता तर पेशव्याला विजय मिळण्याची बरीच शक्यता होती. मात्र, पेशव्याने आपला बेत फिरवून त्रिंबकजीला इंग्रजांच्या स्वाधीन करून युद्धाचा प्रसंग तूर्तास तरी टाळला. या समयी एल्फिन्स्टनने केवळ लष्करी हालचालींच्या बळावर आणि युद्धाच्या धमकावणीवर बाजी मारली असली तरी आपल्या डावपेचांतील कमजोर दुवे लक्षात घेऊन त्यांची मजबुती करण्याकडे त्याने इतउत्तर भर दिला.

   
                                           ( क्रमशः )