Monday, April 1, 2013

शहामतपनाह बाजीराव ( भाग - २ )


              जंजिरा स्वारी हे देखील बाजीरावाच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचे प्रकरण आहे. स. १७३३ मध्ये या मोहिमेस आरंभ होऊन स. १७३६ मध्ये तिचा शेवट झाला. जंजिरा मोहीम शाहूच्या आज्ञेने सुरु झाली. या स्वारीत पेशव्यासह प्रतिनिधी, आरमार प्रमुख, सरलष्कर व राजमंडळातील सर्व प्रमुख सरदार सहभागी झाले हे या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य असून तेच तिचे मुख्य वैगुण्य बनले ! पेशव्यासहित राजमंडळातील सर्व प्रमुख सरदार, नामांकित पथके असून देखील त्यावर एका सेनापतीची हुकुमत नसल्याने लवकरचं हि मोहीम रेंगाळली. बाजीरावाने कोकणात उतरून जंजिऱ्यावर चाल केली. एका हबशी सरदारास फितूर करून त्याने जंजिरा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. त्याचवेळी जंजिरेकर सिद्दीच्या ताब्यात असलेला रायगड किल्ला जिंकण्यासाठी देखील बाजीरावाने कारस्थान रचले. इतक्यात प्रतिनिधीने स्वतंत्रपणे कारस्थान रचून ८ जून १७३३ रोजी रायगड ताब्यात घेतला. त्यामुळे प्रतिनिधीचा बोलबाला तर बाजीरावाचा जळफळाट झाला. असूया हि एकाच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दोन वा अधिक व्यक्तींच्या मनात असतेचं. कधी हि असूया चांगल्या रूपाने म्हणजे निकोप स्पर्धेने व्यक्त होते तर अनेकदा ती द्वेष रूपानेचं प्रकट होते. आपण ज्या काळाची चर्चा करत आहोत, तेथे निकोप स्पर्धेला पोषक असे वातावरणचं नव्हते. त्यामुळे असूयेचे पर्यावसान द्वेषात होणे स्वाभाविक होते. प्रतिनिधी - पेशवा यांचे शीतयुद्ध म्हणजे याचेचं एक उदाहारण. रायगड प्रकरणापासून बाजीरावाने जंजिरा मोहिमेतून आपले अंग काढून घेण्यास सुरुवात केली. मुळात बाजीरावसारखी व्यक्ती स्वतंत्रपणे जे कार्य करू शकते तेच कार्य इतरांच्या सहाय्याने करण्यास असमर्थ ठरते. जंजिरा स्वारी यशस्वी होण्यासाठी आंगऱ्यांच्या मदतीची गरज होती. म्हणजे आंगऱ्यांना जेव्हा लढाईची वेळ अनुकूल वाटेल तेव्हाचं ते संग्रामास सिद्ध होणार होते.
                या ठिकाणी आणखी एक मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे व तो म्हणजे आरमारी आणि मैदानी युद्धातील फरक ! मैदानी लढायांचा निकाल चार - दोन चकमकींमध्ये देखील निर्णायकपणे लागेलचं असे नाही. परंतु, आरमारी युद्धांत एका लहानशा चकमकीतील पराभव देखील निर्णायक ठरू शकतो. जंजिरेकरांशी लढताना आपल्या आरमाराचे अधिक नुकसान होऊ नये याची काळजी आंगऱ्यांना घेणे भाग होते. कारण याच आरमाराच्या बळावर त्यांना देशी - विदेशी शत्रूंना तोंड द्यायचे होते. या ठिकाणी फक्त एवढेचं सांगतो कि, आपली सर्व लढाई शक्ती एकवटून एखाद्या आरमारी लढाईत उतरण्यास जिथे पहिल्या व दुसऱ्या जागतिक महायुद्धातील प्रगत देशांचे आरमारप्रमुख देखील धजावले नाहीत, तिथे अठराव्या शतकातील आंगऱ्यांनी थोडाफार बोटचेपेपणा केला तर त्यात त्यांना दोष का द्यावा ?
            स. १७३३ च्या डिसेंबर महिन्यात सिद्दीसोबत तह करून बाजीरावाने जंजिरा प्रकरणातून साफ माघार घेतली. पुढे चिमाजीआपाने आंगऱ्यांच्या मदतीने सिद्द्यांना शरण येण्यास भाग पाडले पण तो भाग प्रस्तुत विषयाच्या चौकटीत बसत नसल्याने त्याची माहिती येथे देत नाही.
               स. १७३५ पर्यंत बाजीराव हा काहीसा स्वस्थ बसला. दिल्लीच्या राजकारणावर त्याची बारीक नजर असून होळकर - शिंदे तिकडचा व्याप सांभाळण्यास समर्थ असल्याने त्याला स्वतःला उत्तरेत जाणे आवश्यक वाटले नाही. दरम्यान चिमाजीआपा व पिलाजी जाधव यांनी माळवा, बुंदेलखंडात काही फेऱ्या मारून तिकडे आपला पाय भक्कम करण्याचे कार्य केले. स. १७३५ मध्ये मात्र आपल्या प्रमुख पथक्यांसह दिल्ली धडक देण्याचे बाजीरावाने निश्चित केले. राजकारणाच्या दोरांनी सर्व राजपूत राजांना त्याने आपल्यासोबत पक्के बांधून घेऊन दिल्ली मोहोम आखली. उत्तरेत गेल्यावर बाजीरावाने आपल्या प्रमुख मागण्या मोगल दरबारासमोर मांडल्या, त्या पुढीलप्रमाणे :- (१) माळव्याच्या सुभेदारीचे फर्मान (२) दक्षिणच्या सहा सुभ्यांच्या सरदेशपांडेगिरीची सनद देणे (३) मांडवगड, रायसीन व धार हे तीन किल्ले आपल्या ताब्यात देणे (४) चंबळपर्यंतच्या प्रदेशापर्यंत मराठी राज्याची हद्द जाणावी (५) पेशव्याच्या कर्जफेडीसाठी बंगाल प्रांतातून पन्नास लक्ष रुपये देणे (६) मथुरा, आग्रा, काशी, प्रयाग हि तीर्थक्षेत्रे पेशव्यांच्या ताब्यात देणे (७) गुजरातची चौथाई देणे. या मागण्यांच्या बदल्यात पुढील अटींचे आपण पालन करू असेही बाजीरावाने कळवले. त्या अटी अशा :- (१) बादशहाची भेट घेऊ (२) माळव्या शिवाय इतर प्रांतास उपद्रव देणार नाही (३) इतर कोणाही मराठ्याची फौज नर्मदा उतरून देणार नाही याची जबाबदारी आमची (४) बादशाही सेवेसाठी एक सरदार ५०० स्वारांसह राहील (५) बादशाही फौज स्वारीस बाहेर पडल्यावर चार हजार स्वारांसह चाकरीस येऊ. मात्र फौजेचा खर्च बादशहांनी दिला पाहिजे. बाजीरावाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मोगल बादशाहने बाजीरावास माळव्याच्या सुभेदारीचे फर्मान देण्याचे मान्य करत बाकीच्या अटी फेटाळून लावल्या. मात्र यादरम्यान बराच काळ लोटल्याने आणि उन्हाळा नजीक येऊ लागल्याने बाजीरावास नाईलाजाने दक्षिणेत परतावे लागले. ( स. १७३६ )
                 मोगल दरबाराने आपल्या अटी अमान्य केल्याचा वचपा भरून काढण्यासाठी स. १७३६ अखेर बाजीराव परत उत्तरेत रवाना झाला. यावेळी बोलाचालीत वेळ न गमवता थेट दिल्लीला धडक देण्याचा त्याचा बेत पक्का झाला होता. त्यादृष्टीने त्याने स. १७३७ च्या आरंभी भेलसा ताब्यात घेऊन अटेरवर आपला अंमल बसवला. मार्गातील हि दोन महत्त्वाची ठाणी कबजांत घेऊन त्याने आपला पाया सुरक्षित बनवून पुढे यमुनापार बाजी भिवराव, मल्हारराव होळकर, विठोजी बुळे यांना सादतखानाच्या मुकाबल्यास पाठवले. अयोध्येहून चालून येणारा सादतखान आगऱ्याजवळ यमुना पार करून दिल्लीहून बाजीरावाच्या अंगावर धावून येणाऱ्या कमरुद्दीनखान व खानडौरा यांना सामील होणार होता. त्यांचा हा बेत उधळून लावण्यासाठी बाजीरावाने आपले डावपेच आखून मोगल सरदारांना एकत्र येऊ न देता त्यांना एकएकटे गाठून त्यांचा फन्ना उडवण्याचा त्याने बेत रचला. परंतु, यमुनापार झालेल्या सरदारांची सादतखानासमोर थोडी गडबड उडाली. सादतखानाच्या सैन्याची आघाडी सांभाळण्याची जबाबदारी सफदरजंगवर असून त्याचा व होळकराचा सामना घडून आला. सफदरच्या नेतृत्वाखालील फौज तुलनेने अल्प असल्याचे पाहून होळकराने त्याच्याभोवती जाळे विणायला आरंभ केला पण सफदर त्याला हूल देत मागे सरकू लागला. त्याचा पाठलाग करण्याच्या नादात होळकर पुढे निघून गेला तोच सफदरची आणि सादतखानाची गाठ पडून मराठी फौजेच्या जीवनमरणाचा प्रश्न उद्भवला. सुदैवाने यमुना नदी जवळ असल्याने होळकराने त्वरीत नदी पार करून आपला बचाव साधला. मात्र या प्रसंगी झालेल्या चकमकीत काही मराठी सैनिक मारले गेले तर काहींना शत्रूने कैद केले. पुढे होळकर व बाजीराव यांची भेट झाली. या भेटीनंतर बाजीरावाने आपल्या डावपेचांत बदल केला.
                मोगल सरदारांशी संग्राम न करता त्यांना चकवून दिल्ली गाठण्याचा बाजीरावाने बेत आखला. इकडे सादतखान यमुनापार करून अलीकडे आला. दिल्लीहून आलेल्या मोगल सरदारांशी त्याची गाठभेट झाली व त्यांच्या मथुरेच्या आसपास छावण्या पडल्या. सादतखानाने मोगल बादशहाला पत्र पाठवून, आपण मल्हाररावास पळवून लावल्याचे कळवले. तसेच लवकरचं बाजीरावाचाही आपण पराभव करून मराठ्यांना नर्मदेपार हाकलून देतो असेही बादशहास आश्वासन दिले. मोगल सरदार कल्पनांच्या दुनियेत मग्न असताना इकडे बाजीरावाने मोगली सरदारांचा तळ उजव्या बाजूला टाकून राजपुतान्याच्या सरहद्दीने दिल्ली गाठली. बाजीरावाने कितीही चलाखी व शिताफी केली असली तरी त्याच्या हालचालींची चाहूल मथुरेजवळ असलेल्या मोगल सरदारांना लागून ते देखील पाठोपाठ शक्य तितक्या वेगाने दिल्ली जवळ करू लागले. दरम्यान दिल्ली जवळ आल्यावर बाजीरावाने शहराभोवतीची जत्रेनिमित्त लागलेली दुकाने वगैरे लुटून आपण येउन थडकल्याची बादशहास जाणीव करून दिली. मोगल बादशहाने शहरातील झाडून सर्व फौज गोळा करून बाजीरावावर पाठवली पण होळकर, पवार, शिंदे, जाधव यांनी मोगल सैन्याला पिटून शहरात घातले. मोगलांच्या सुदैवाने मथुरेहून दिल्लीकडे येण्यासाठी निघालेल्या फौजा दिल्लीजवळ येउन ठेपल्याने बाजीरावाला दिल्ली सोडून बचावासाठी राजपुतान्यात निघून जाणे भाग पडले.
                मोगलांनी याचवेळी बाजीरावाचा पाठलाग न केल्याने त्याचा बराच बचाव झाला. तसेच या मोहिमेस जयपूरच्या सवाई जयसिंगाचा अंतस्थ पाठिंबा बाजीरावास असल्याचे उघड गुपित मोगल मुत्सद्द्यांना माहिती होते. त्यामुळेचं बाजीराव राजपुतान्यात जात असल्याचे पाहून त्यांनी पेशव्याच्या पाठलागाचा नाद सोडला. या दिल्लीवरील स्वारीने बाजीराव देशी - विदेशी सत्ताधीशांमध्ये चर्चेचा विषय ठरला व इतकाचं लाभ पेशव्याच्या पदरी पडला. ना त्याला मोगलांची राजधानी लुटता आली ना मोगल बादशहाकडून त्याला आपल्या मागण्यांना मंजुरी मिळवता आली. फक्त मी कधीही, केव्हाही येउन तुमच्या बादशाहीच्या चिंधड्या उडवू शकतो व तुम्ही मला रोखू शकत नाही अस संदेश मात्र त्याने या आपल्या स्वारीने मोगल बादशहास दिला. ( स. १७३७ )
                   दिल्ली मोहीम आटोपून बाजीराव पुण्यास येण्यासाठी निघाला त्याचवेळी निजाम उत्तरेत जाऊ लागला होता. या उभयतांचा मुक्काम सुमारे पाउण महिना भोपाळ - सिरोंजच्या आसपास होता परंतु ना त्यांनी एकमेकांची भेट घेतली ना परस्परांवर हल्ले चढवले. वस्तुतः बाजीरावाच्या बंदोबस्तासाठीचं निजामाला दिल्ली दरबारने पाचारण केले होते व हि वस्तुस्थिती बाजीरावास माहिती नव्हती अशातला भाग नाही. परंतु, काही कारणांस्तव त्याने लागलीच निजामावर चाल करणे टाळले. बाजीरावाच्या या कृत्याचे समर्थन करताना इतिहासकार लिहितात कि, दिल्ली मोहिमेने बाजीरावाची सेना थकलेली होती. पर्जन्यकाळ जवळ आला होता. गनिमी काव्याचे युद्ध करण्यासाठी वेळ आणि परिस्थिती अनुकूल नव्हती. निजामाचा तोफखाना जय्यत तयारीत होता. त्याशिवाय निजाम असा वाटेत आडवा येईल याची पूर्वकल्पना नसल्याने बाजीरावाने आपल्या सरदारांना ठिकठीकाणच्या कामगिऱ्या आधीचं सोपवल्या होत्या. तसेच हटकून यश येण्याची खात्री असल्याशिवाय बाजीरावाने कधी युद्धप्रसंग अंगावर ओढवून घेतले नाहीत इ. हि कारणे जरी समर्पक अशी असली व वस्तुस्थितीवर कितीही आधारीत असली तरीही पूर्णतः ग्राह्य धरता येत नाहीत. याचे महत्त्वाचे कारण असे कि, निजामाला आपल्या नाशासाठीचं मोगल दरबारने बोलावले आहे तर त्यास दिल्लीला जाउन बळ बांधून आपल्यावर चाल करून येण्याची संधी देणे हे कितपत समर्थनीय व योग्य आहे ?
                याक्षणी निजाम एकटा आहे, इतर मोगल सरदारांच्या फौजा त्यास मिळाल्या नाहीत तोच त्यास बुडवणे त्यामानाने सोपे आहे. पण एकदा का तो दिल्लीला गेला कि, मोगल दरबारातील उमरावांचा पाठिंबा मिळून तो प्रबळ होईल. त्यावेळी त्याचा पराभव करणे हे अतिशय अवघड होणार होते. परंतु बाजीरावाने हा विचार केल्याचे दिसून येत नाही. पण असे म्हणणेही सयुक्तिक होणार नाही. माझ्या मते, बाजीरावाच्या काळात सरंजामशाही मराठी राज्यात चांगली रुजली होती व पन्नास पन्नास हजार फौजांचे जरी बाजीराव नेतृत्व करीत असला तरी त्या फौजेवर अखेरची हुकुमत त्या त्या पथक्यांची होती. लागोपाठ लढाया करण्यास त्याचे सरदार व सैन्य नाखूष असल्याने त्याने याक्षणी तरी निजामाशी संघर्ष टाळला. त्याउलट, निजामाची देखील लढण्याची तयारी नसल्याने त्यानेही प्रकरण निकरावर येऊ दिले नाही.
               स. १७३७ च्या पावसाळ्यात पेशवेबंधू व निजामाने भावी संग्रामाची भरपूर सिद्धता केली. या लढाईत निजामाला दोन ठिकाणाहून मदत मिळणार होती. एक, दक्षिणेतील त्याचा मुलगा नासीरजंग व दुसरा दिल्ली दरबार ! निजामाची रणनीती स्पष्ट होती. बाजीरावास माळव्यात येऊ न देता त्याला नर्मदेच्या पलीकडेचं गाठून बुडवायचे. नासीरजंगाने आणि वऱ्हाड, खानदेशातील सरदारांनी कोणत्याही परिस्थितीत बाजीरावास नर्मदापार करून द्यायची नाही. निजामाचे हे डावपेच हेरून बाजीरावाने आपले बेत पुढीलप्रमाणे आखले :- नासीरजांगास दक्षिणेतचं अडवायचे, त्याला नर्मदापार करून द्यायची नाही हि जबाबदारी बाजीरावाने चिमाजीआपावर सोपवली. निजामाचे काही सरदार वऱ्हाड, खानदेशाकडे होते. त्यांना अडवण्याचे काम शाहूच्या आज्ञेने रघुजी भोसल्याने अंगावर घेतले. निजामावर चालून जाण्याचे मुख्य कार्य बाजीरावाने स्वतःच्या अंगावर घेतले.
                  स. १७३७ च्या ऑक्टोबरमध्ये निजाम दिल्लीकडून माळव्याकडे सरकला तर पुढच्याच महिन्यात बाजीराव नर्मदेवर दाखल झाला. उभयतांचे सैन्यबळ समसमान म्हणजे प्रत्येकी ऐंशी हजार असल्याचे इतिहासकार नमूद करतात. निजामाच्या फौजेत अनेक मोगल सरदारांचा तसेच राजपूत, जाट, बुंदेले संस्थानिकांचा भरणा असून त्यातील बव्हंशी उमराव निव्वळ जुलमाचा रामराम म्हणून मोहिमेत दाखल झाले होते.
              इकडे नासीरजंग पंधरा - वीस हजार फौज जमवून उत्तरेस जाणार तर चिमाजीआपा तापीजवळ वरणगाव येथे तळ ठोकून राहिल्याने त्याचा मार्ग खुंटला. अनपेक्षितरित्या बाजीराव नर्मदापार होऊन पुढे चालून आल्याने निजाम गडबडला. पूर्वानुभव लक्षात घेऊन त्याने आपले जड सामान रायसीनच्या किल्ल्यात ठेऊन निवडक तोफांच्या सहाय्याने बाजीरावाशी गाठ घालण्याचा निर्णय घेतला. परंतु, निजामासोबत खुल्या मैदानात झुंज घेण्याची बाजीरावाची कुठे इच्छा होती ? त्याने नेहमीप्रमाणे निजामाच्या चौगीर्द आपली धावती पथके पेरून त्याची रसद तोडण्यास आरंभ केला. पालखेडची चूक टाळण्यासाठी निजाम भोपाळच्या तटबंदीच्या आश्रयास धावला आणि त्याने नवीन चूक केली. भोपाळ संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत असल्याने व आत पाण्याचा तलाव तुडूंब भरलेला असल्यामुळे निजामाने भोपाळला आपली छावणी ठोकून व सभोवती तोफा पेरून बाजीराव अंगावर चालून येण्याची वाट बघू लागला. परंतु, निजामाच्या तोफांच्या तडाख्यात जाण्यास बाजीराव मुळीच उत्सुक नव्हता. भोपाळवर हल्ला करणे जरी त्यास शक्य नसले तरी भोपाळची रसद तोडणे त्यास सोपे व सहजशक्य होते आणि त्याने तेच केले. त्याशिवाय दिवसा व  रात्री - अपरात्री मराठी सैन्यातून बाणांच्या टोकांना चिंध्या बांधून व त्या पेटवून त्यांचा मारा निजामाच्या छावणीवर केला जात होता तो वेगळाचं ! त्यामुळे निजामच्या सोबत असलेले राजपूत, जाट, बुंदेले वैतागून बेदील झाले. बचावाच्या दृष्टीने भोपाळ हे एक आदर्श ठिकाण असले तरी निजामाने आपल्या छावणीसाठी ते स्थळ आगाऊ निश्चित केलं नसल्यामुळे एवढ्या मोठ्या फौजेला पुरून उरेल इतकी अन्नसामुग्री तिथे नव्हती. त्याशिवाय मराठी फौजांनी रसद तोडल्याने बाहेरून येणारी मदतही खुंटली होती. परिणामी काही दिवसांतचं छावणीतील जनावरे मारून खाण्याचा प्रसंग ओढवला. कोंडी फोडण्याचे निजामाने अनेक प्रयत्न केले. आक्रमणे केली. परंतु, निर्णायक लढाईस बाजीराव उत्सुक नसल्याने युद्धप्रसंग लांबणीवर पडत गेला आणि निजामसुद्धा जिवावर उदार झालेला नसल्याने मारू किंवा मरू या निश्चयाने तो देखील युद्धास तयार झाला नाही. अखेर सर्व उपाय थकलेले पाहून निजामाने भोपाळचा तळ उठवून लष्करी गोलाच्या सहाय्याने उत्तरेची दिशा धरली. तरीही मराठी फौजांच्या धावत्या वेढ्याने त्याची नाकेबंदी कायम राहून त्याने तहाची वाटाघाट आरंभली. ता. ७ जानेवारी १७३८ रोजी दुराईसराई तह होऊन निजामाची कोंडी सुटली. भोपाळच्या संग्रामात चमकदार डावपेच आखण्यात आले तरी निर्णायक असे युद्धप्रसंग घडून आले नाहीत. मराठी घोडदळासमोर आपला उपाय चालत नाही याची निजामाला जाणीव होती तर निजामाच्या तोफखान्यास आपल्याकडे उत्तर नाही हे बाजीराव ओळखून असल्याने उभयतांनी निकराची लढाई टाळली असेच म्हणावे लागते. दुराईसराईच्या तहाने बाजीरावाच्या हाती फारसे काही लागले नाही. हे त्या तहातील मुख्य अटींवरून सिद्ध होते. (१) माळवा प्रांत देणे  (२) नर्मदा व चंबळ यांमधील मुलुख देणे (३) या दोन्ही प्रांतांच्या बाबत बादशाही सनद मिळवून देणे (४) ५० लक्ष रुपये खर्चासाठी मोगल बादशहाकडून मिळवून देणे. या चार अटींचे पालन निजामाने केल्याचा पुरावा कोणी देईल का ?
                 भोपाळचे यश संपादून बाजीराव मागे फिरला. कारण, वसईचे कारस्थान त्यावेळी ऐन रंगात येऊ लागले होते. वसईच्या विजयाचे सर्व श्रेय चिमाजीचे असल्याने त्याविषयीची चर्चा येथे करत नाही. फक्त या ठिकाणी एवढेचं नमूद करतो कि, वसईवर भगवा फडकतांच इंग्रजांच्या पोटात भीती निर्माण होऊन त्यांनी आपला एक वकील साताऱ्यास शाहूच्या भेटीला व दुसरा पेशव्याच्या भेटीसाठी पाठवला. इंग्रज वकीलासोबत झालेल्या भेटीत, आपण आंगऱ्यांशी युद्ध करू त्यावेळी इंग्रजांनी आपणांस मदत करावी असे बाजीरावाने इंग्रजांना कळवले. वस्तुतः स. १७३४ मध्ये पोर्तुगीजांच्या सोबत झालेल्या वाटाघाटीत देखील बाजीरावाने अशीच अट घातली होती पण हि बाजीरावाची फसवी चाल आहे असे समजून पोर्तुगीजांनी तिकडे दुर्लक्ष केले होते. पण वसईच्या पाडवानंतर झालेल्या तहात त्यांनी आंगऱ्यांच्या विरोधात पेशव्याला मदत करण्याचे मान्य केले. हि घटना स. १७३९ ची आहे, हे या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे.
                स. १७३९ च्या आरंभी नादिशहाने केलेल्या आक्रमणाने मोगल बादशाहीला घरघर लागली. चौथाई व सरदेशमुखी करारास जागून शाहूने बाजीराव पेशव्यास मोगलांच्या मदतीस जाण्याचा आदेश दिला. छत्रपतींच्या आदेशानुसार बाजीराव उत्तरेत निघाला पण बाजीराव माळव्यात येण्याआधीचं दिल्ली लुटून नादिरशहा परत गेल्याने बाजीराव मागे फिरला. नादिरशहाच्या विरोधात लढण्यासाठी बाजीरावाने निजामपुत्र नासीरजंगास बोलावले हे विशेष ! अलीकडे कित्येक विद्वानांनी असा शोध लावला आहे कि, बाजीराव उत्तरेत येत आहे केवळ याच बातमीने नादिरशहा गर्भगळीत होऊन दिल्ली सोडून गेला. मात्र या विद्वानांच्या लक्षात हे येत नाही कि, जसा स. १७५९ मध्ये अब्दालीला हिंदुस्थान स्वारीचे निमंत्रण देण्यास उत्तर हिंदुस्थान उत्सुक होता तसाच स. १७३९ मध्ये नादिरशहाला बोलावण्यास आतुर होता. नर्मदा उतरून दरवर्षी येणारी बाजीरावाच्या सैन्याची टोळधाड त्यांना नकोशी झाली होती. त्यामुळे त्यांनी पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचे नक्की केले. जर यदाकदाचित नादिरशहाचा मुक्काम लांबला असता तर उत्तर हिंदुस्थानातील संस्थानिकांनी तटस्थ राहणे वा नादिरशहाला मदत करणे या दोनपैकी एकाच पर्यायाची निवड केली असती. राहता राहिला प्रश्न राजपुतांचा तर त्यांनादेखील मराठी फौजांचे आक्रमण आता असह्य होऊ लागले होते. कारण, मराठी सरदारांच्या सत्ता विस्ताराच्या धोरणाने राजपुतांच्या राज्यविस्तारास मर्यादा पडून ते आत कोंडले जाऊ लागले होते. त्याशिवाय लहान - मोठ्या राजपूत संस्थानिकांच्या वारसा युद्धांत सहभाग घेऊन मराठी सरदार राजपुतान्यात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या लक्षात येऊ लागले होते. असो, नादिरशहाच्या विरोधात लढण्यास एकत्र येण्यासाठी बाजीरावाने उत्तरेतील सर्व सत्ताधीशांना आवाहन केले. परंतु, नादिरशहाचं निघून गेल्याने त्याच्या या आवाहनास प्रतिसाद देण्याची संस्थानिकांवर वेळचं आली नाही.
                     स. १७३९ च्या अखेरीस निजामपुत्र नासीरजंग व बाजीराव यांच्यात कलह उत्पन्न होऊन स. १७४० च्या फेब्रुवारीत मुंगीपैठण येथे उभयतांचा तह झाला. त्यानुसार एकमेकांच्या प्रदेशांना उपद्रव न देण्याचे दोघांनी मान्य केले तसेच हंडिया व खरगोण हे दोन जिल्हे बाजीरावास जहागीर म्हणून मिळाले. या तहात मिळालेल्या जहागीरीची व्यवस्था लावण्यास बाजीराव निघून गेला व या कामात मग्न असताना २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदेकिनारी रावेरखेडी येथे मरण पावला.
                    बाजीरावाच्या अखेरच्या वर्षांत त्याच्या घरातील भांडणे बरीच अनावार झाली होती. बाजीराव - मस्तानी संबंधांची या ठिकाणी चर्चा करण्याची मला अजिबात गरज वाटत नाही. कारण, कितीही झाले तरी -- आणि शतके ओलांडून गेली असली तरी -- बाजीराव - मस्तानीचा विषय म्हणजे ती त्यांची खाजगी बाब आहे. कोणाच्या खाजगी आयुष्यात किती ढवळाढवळ करायची असते याचे भान बाजीरावाच्या कुटुंबियांना अजिबात राहिले नाही. हा त्यांच्या अज्ञानाचा किंवा मूर्खपणाचा भाग समजला गेला तरी मस्तानीचे बाजीरावाच्या आयुध्यातील नेमके स्थान काय यावर हिरीरीने चर्चा करणाऱ्यांच्या शहाणपणास कोणती उपमा द्यायची ? असो, याविषयीचे नैतिक बंधन कोणी पाळो अथवा न पाळो, पण मला तरी या विषयाची चर्चा करणेचं मुळी चुकीचे वाटते.
                 नासीरजंगाची मोहीम उद्भवण्यापूर्वीचं पुण्यातून निघून जाण्याचा बाजीरावाचा विचार चालला असावा. नासीरजंगासोबतचे युद्ध आटोपताचं जहागिरीचा बंदोबस्त करण्यास तो निघून गेला. त्यावरून नर्मदेजवळ कुठेतरी स्थायिक होण्याचा त्याचा विचार असावा. या ठिकाणी मुक्काम केल्यास त्याला सातारा येथील छत्रपतींच्या नियंत्रणापासून व पुण्यातील ' भट ' कुटुंबियांपासून दूर राहता येणार होते. परंतु, त्याचे बेत कृतीत येण्यापूर्वीचं त्याच्यावर काळाने झडप घातली.
 बाजीरावाची एकंदरीत कारकीर्द पाहता त्याच्यासारखा स्वतंत्र वृत्तीचा माणूस, दुबळ्या का असेना पण छत्रपतींच्या हाताखाली सदासर्वकाळ राहणे शक्यचं नव्हते. त्याशिवाय तो काळ लक्षात घेता त्याच्या या स्वतंत्र राहण्याच्या विचारांचा निषेध करणे वा त्यास दुषणे देणे योग्य नाही. जो वर्तनक्रम नागपूरकर भोसले, आंग्रे यांनी स्वीकारला तोच वर्तनक्रम बाजीरावाने स्वीकारण्यास आरंभ केला तर त्यास दोष का द्यावा ? दुसरे असे कि, बाजीराव हा काही ' टिपिकल भट ' वृत्तीचा नव्हता. जीवनातील बराचसा काळ लष्करी मोहिमांमध्ये गेल्याने व अठरापगड जातीच्या सैनिकांच्या साथीने वावरावे लागल्याने तत्कालीन संकुचित ब्राह्मणी वृत्ती त्याच्या अंगी भिनली नाही. यामुळे त्याच्या खाण्या - पिण्याचा बराचसा गवगवा त्यावेळी झाला. केवळ धर्मशास्त्रांचा जर आधार घेतला तर बाजीरावाने खाण्या - पिण्याचे जे निर्बंध झुगारून दिले त्याबद्दल त्यास दोष देताच येत नाही. मात्र अभक्ष्य भक्षणाची व अपेय पानाची जुनी परंपरा मोडण्याचे त्याने कार्य केल्याने एका विशिष्ट गटाने त्यास दोषी मानले. वास्तविक कित्येक ब्राह्मणांनी प्रसंगी मद्यपान व मांसाहार केल्याचे शेकडो प्रकार तत्कालीन कागदपत्रांत आढळून येतात. त्याबाबतीत केवळ बाजीरावास दोषी धरण्याची गरज नाही, पण ब्राह्मण वर्ग त्यास ब्राह्मणी समाजाचा नायक समजत असल्याने त्यांनी त्यास बंधनात अडकवण्याचा प्रयत्न केला.
           असो, राजकीय बाबतीत पाहता बाजीरावाने नवीन अशी काही राजकीय संकल्पना अंमलात आणल्याचे दिसून येत नाही. छत्रपतीस मुठीत ठेवावे कि लांब राहून स्वतंत्र संस्थानिकाप्रमाणे राहावे यातचं त्याची हयात निघून गेली. पुढे त्याच्या मुलाने छत्रपतीला ताब्यात घेऊन या द्विधा अवस्थेतून आपल्या परीने मार्ग काढला. निजामाच्या बाबतीत देखील बाजीरावास आपले निश्चित एक धोरण आखता आले नाही. निजामाचा बचाव शाहूमुळे घडून आला असे जे सांगतात, त्यांनी बाजीरावाकडे तोफखान्याचे बळ नसल्यामुळे पालखेड, भोपाळ येथे निजाम बचावल्याचे साफ दुर्लक्षित केले आहे. इतकेचं काय पण पुढे  उदगीर प्रसंगी तरी निजामाला साफ बुडवण्यात नानासाहेब पेशव्याला तरी कुठे यश प्राप्त झाले ? निजामाची लष्करी ताकद खच्ची करण्याइतकी शक्ती बाजीरावाची नव्हती व त्यामुळेचं निजाम बचावला हेच सत्य आहे !
               मोगल बादशाहीच्या संदर्भात शाहूचा व पेशव्याचा एक निश्चित वर्तनक्रम ठरलेला होता व तो म्हणजे, मोगल बादशाहीचे अस्तित्व कायम राखून आपल्या राज्याचा विस्तार करणे ! याबाबत कित्येक इतिहासकारांनी शाहूला दुषणे दिली असली तरी त्यांनी एका गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करून आपल्या मूर्खपणाचे जाहीर प्रदर्शन केले आहे व ते म्हणजे --- इंग्रजांनी देखील मोगल बादशाहीचे अस्तित्व कायम राखून हिंदुस्थान ताब्यात घेतला होता. जर स. १८५७ चा बंडावा झाला नसता तर मोगल बादशाहीचे अस्तित्व कायम राहिलेचं नसते असे कोणी छातीठोकपणे सांगेल का ?
          सातार दरबारातील इतर मानकऱ्यांचे व बाजीरावाचे फारसे कधी पटलेचं नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याची त्यांची स्पर्धा सतत चालून त्यातून दाभाडेसारखे प्रकरण अनावर होई. आंग्रे - पेशवे यांचा कलह देखील घडून आला असता पण बाजीराव अल्पायुषी निघाल्याने आंगऱ्यांचा बचाव झाला. नाहीतर इंग्रज - पोर्तुगीजांशी संधान बांधून त्याने आंगऱ्यांचा निकाल लावला असता. वसईच्या बाबतीत या ठिकाणी एक माहिती वाचकांना देणे मला या ठिकाणी आवश्यक वाटते व ती म्हणजे वसईचा पाडाव झाल्यावर पोर्तुगीजांशी झालेल्या तहात पेशव्यांनी एक अट घातली कि, पोर्तुगीज अंमलाखालील लोकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य असावे. परंतु, पराभूत पोर्तुगीजांनी पेशव्यांची हि अट अमान्य केली आणि पेशवेबंधूंनी देखील त्यासाठी फारसा आग्रह धरला नाही.
             छत्रपतींचे अधिकार मर्यादित करण्याचा, प्रसंगी छत्रपतींची आज्ञा गुंडाळून ठेवण्याचा बाजीरावाने उपक्रम केला असला तरी प्रत्यक्ष छत्रपतींची अमर्याद करण्यास तो धजावला नाही. तत्कालीन सरदारांप्रमाणे या बाबतीत त्याचे वर्तन घडले. पुढे त्याच्या मुलाने छत्रपतीला लष्करी कारवाईचा धाक घालणे, छत्रपतीचा जामदारखाना लुटणे इ. पुण्यकर्मे केली पण बाजीरावाने मात्र हे उपद्व्याप केले नाहीत.
            सारांश, त्यावेळची परिस्थिती व राजकारण पाहता बाजीराव हा एक अद्वितीय योद्धा होता इतकेचं म्हणता येते. बाजीरावाचे युद्धनेतृत्व लक्षात घेऊन एका पत्रात खुद्द निजामाने त्याचा ' शहामतपनाह ' म्हणजे शौर्यनिधी असा गौरव केला आहे. तेव्हा याबातीत आपण अधिक काय बोलणार ? पण एक गोष्ट स्पष्ट आहे व ती म्हणजे, पेशवाई अंमल स्थिर होऊन त्यास पुढे ब्राह्मणी वळण लागल्याचे जरी खरे असले तरी हा प्रकार बाजीरावाच्या मृत्यूनंतर घडून आल्याने ब्राह्मणी पेशवाईचा जनक म्हणून त्यास हिणवणे अयोग्य ठरेल.

शहामतपनाह बाजीराव ( भाग - १ )


            छ. शिवाजी महाराजांना स्वराज्य संस्थापक म्हटले जाते तर या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करण्याचे श्रेय विसाजीपंतास दिले जाते. कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण जातीतील भट घराण्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी जन्मलेल्या विसाजी उर्फ बाजीरावाने आपल्या उण्यापुऱ्या ३९ - ४० वर्षांच्या हयातीमधील १८ - २० वर्षांच्या कारकिर्दीत जी काही कर्तबगारी दाखवली, त्यामुळे भट घराणे विख्यात होऊन सातारकर छत्रपतींची पेशवाई कायमस्वरूपी त्या घराण्यास मिळाली. बाजीरावाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पेशवा म्हणून कार्यरत असताना देखील त्याची वृत्ती ' विसाजीपंताची ' न राहता ' बाजीराव ' थाटाची राहिली.
           ता. २ एप्रिल १७२० रोजी बाळाजी विश्वनाथाचे निधन झाल्याने रिक्त झालेले पेशवेपद छ. शाहूने बाळाजीच्या मोठ्या मुलास, बाजीरावास दिले. यावेळी बाजीराव केवळ १८ - १९ वर्षांचा असून त्याचा स्वभाव देखील वयाला साजेसा असा उद्दाम आणि बंडखोर प्रवृत्तीचा होता. लहानपणापासून बापासोबत स्वाऱ्या - शिकाऱ्यांमध्ये सहभाग घेतल्याने त्याचा कल फडावरील बैठ्या राजकारणापेक्षा शिपाईगिरीकडे अधिक होता. पुढे जसजसे वय आणि अनुभव वाढत गेले तसतसे त्याचे उद्दाम वर्तन मावळत गेले. लहानपणापासून लष्करी मोहिमांमध्ये व विविध राजकीय घडामोडींमध्ये सहभाग घेतल्याने बाजीरावाची आपल्या बापापेक्षाही वेगळी अशी विशिष्ट विचारसरणी बनली होती. त्याच्या वंशजांनी आपल्या पराक्रमी पूर्वजाची विचारपरंपरा जशीच्या तशी न स्वीकारता आपापल्या स्वभाव मर्यादांनुसार त्यावर संस्कार करून राबवण्याचा प्रयत्न केला. परिणामी ज्या वेगाने मराठी राज्य साम्राज्यावस्थेपर्यंत पोहोचले त्याच वेगाने त्याचा ऱ्हास घडून आला.
                  बाजीरावाच्या कारकिर्दीचे सामान्यतः दोन भाग पडतात. स. १७२० ते २७ व स. १७२८ ते ४०. पैकी पहिल्या सात - आठ वर्षांचा काळ हा तसा चाचपडण्यातचं गेला. स. १७१९ मध्ये प्राप्त झालेल्या स्वराज्याच्या सनदांच्या आधारे प्रांतात आपला अंमल बसवण्याचे कार्य स. १७२० ते २७ पर्यंत बाजीरावाने केले. त्याशिवाय माळव्याच्या स्वारीचा पाया देखील त्याच सनदांनी घातलेला असल्याने अधूनमधून त्याने माळव्याकडेही काही फेऱ्या मारल्या. परंतु, आरंभी तरी त्यास म्हणावे तसे यश काही लाभले नाही. माळव्यात शिरण्यास त्यास मोठा अडथळा मल्हारराव होळकराचा झाला.
         बढवाणीचा संस्थानिक पेशव्याला अनुकूल नसल्याने त्याचा बंदोबस्त केल्याखेरीज बाजीरावास पुढे जाता येईना व बढवाणीच्या बचावासाठी मल्हारराव होळकर उभा होता. वास्तविक, मल्हारराव हा तसा एकांडा शिलेदार असून स्वतंत्र वृत्तीने मोहिम करणारा सरदार होता. बाळाजी विश्वनाथच्या दिल्ली स्वारीत देखील तो सहभागी असून त्या मोहिमेच्या दरम्यान बाजीरावाशी त्याचा खटका उडून त्याने पेशव्याच्या मुलाला ढेकळं फेकून मारली होती. अशा या बाणेदार गृहस्थासोबत तंटा वाढवण्यापेक्षा त्यास आपल्या लगामी लावून माळव्याचे कार्य त्याच्याचं मार्फत उरकून घेण्याचे बाजीरावाने ठरवले व त्याने होळकराशी समेट केला. ( स. १७२१ ) यानंतर बाजीरावाच्या प्रत्येक स्वारीत होळकर सहभागी होऊ लागला. माळव्यावर अल्पावधीत ताबा बसवणे, होळकरामुळेच पेशव्यांना शक्य झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
               माळव्याप्रमाणे कर्नाटकातही बाजीरावाने हात - पाय मारून पाहिले. स. १७२५ - २६ व स. १७२६ - २७ अशा लागोपाठ दोन मोहिमा त्याने शाहूच्या आज्ञेने दक्षिणेत काढल्या. परंतु, स्वतंत्र वृत्तीने काम करण्याची सवय असलेल्या बाजीरावास ' बारभाई ' पद्धतीचा कारभार पसंत नव्हता. कर्नाटक मोहिमेत प्रतिनिधी व सेनापती हि बडी धेंडं त्याच्या सोबत असून त्यांचा दर्जा बाजीरावाच्या बरोबरीचा असल्याने त्यांच्यावर बाजीरावाची हुकुमत नव्हती. सबब, या स्वाऱ्या निष्फळ ठरल्या. 
           परंतु, बाजीरावाच्या भाग्योदयाची वेळ आता नजीक आली होती. बाजीराव कर्नाटक स्वारीत गुंतलेला असताना स. १७२७ मध्ये निजाम - संभाजी यांनी एकत्रितपणे शाहूवर स्वारी केल्याने शाहूने बाजीरावासह आपल्या सर्व प्रमुख सरदारांना कर्नाटक मोहिमेतून मागे बोलावले. आपले लष्करी नेतृत्व व सामर्थ्य आजमवण्याची हि एक संधी चालून आली असून या संधीचे कोणत्याही परिस्थितीत सोनं केलचं पाहिजे या ईर्ष्येने बाजीरावाने निजामावरील मोहीम हाती घेतली. याकामी त्याला आपल्या भावाची - चिमाजीआपाची - बहुमोल मदत झाली. आपल्या सैन्याचे दोन भाग करून चिमाजीवर त्याने नाशिक ते सातारा - मिरजपर्यंतच्या प्रदेशचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली व स्वतः बाजीराव आपल्या वेगवान घोडदळासह निजामाच्या प्रदेशांत शिरला. बाजीरावाचे युद्धविषयक धोरण स्पष्ट होते. आपल्याकडे तोफखाना नाही तर निजामाचा तोफखाना जय्यत तयारीत आहे. अशा स्थितीत निजामासोबत लढाई करायची तर त्याच्या तोफखान्याचा सामना करणे टाळले पाहिजे. याची पक्की खूणगाठ बाजीरावाने मनाशी बांधली. त्यानुसार निजामाच्या प्रदेशांत जाळपोळ, लुटालूट करीत बाजीराव गुजरातकडे निघून गेला. पाठोपाठ त्याचा संहार करण्यासाठी निजामही चवताळून त्याच्यामागे धावला. बाजीरावाचा पाठलाग करताना जड तोफांचा अडथळा होतो म्हणून बव्हंशी तोफखाना मागे ठेऊन निवडक तोफांसह तो बाजीरावाच्या पाठीवर जाऊ लागला. अखेर पालखेडजवळ निजामाला त्याच्या मुख्य तोफखान्यापासून वेगळे करण्यात बाजीरावास यश मिळाले व त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. निजामाच्या फौजेभोवती त्याने आपल्या धावत्या तुकड्यांच्या चौक्या नेमल्या. पालखेडनजीक निजामाचा मुक्काम पडला तेव्हा याच धावत्या तुकड्यांनी निजामाची रसद पूर्णतः तोडून टाकली. त्यामुळे घाबरून जाउन निजाम तहास राजी झाला. तेव्हा ६ मार्च १७२८ रोजी मुंगी शेवगांव येथे उभयतांमध्ये तह घडून आला. या तहानुसार दक्षिणच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याच्या शाहूच्या हक्कांना निजामाने मान्यता दिली.
                 पालखेडची मोहीम म्हणजे बाजीरावाच्या कारकिर्दीतील व आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आहे. या स्वारीनंतर त्याचा आपल्या लष्करी नेतृत्वक्षमतेवरील विश्वास वाढीस लागला आणि या मोहिमेनंतर त्याने मागे वळून कधी पाहिले नाही. हे जरी खरे असले तरी पालखेडच्या विजयाचे सर्व श्रेय एकट्या बाजीरावास देणे अयोग्य ठरेल. त्याला चिमाजी आपाची जशी बहुमुल्य साथ लाभली. त्याचप्रमाणे शिंदे, होळकर, जाधव, पवार इ. सरदारांनीही बरीच मदत घेतली. याबाबतीत पिलाजी जाधव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे हे बाजीरावाचे गुरुचं समजले पाहिजेत. या सर्व अनुभवी योद्ध्यांमुळेचं २७ - २८ वर्षीय बाजीरावास हे यश प्राप्त झाले.
          पालखेड येथे बाजीरावाने निजामाला शरण येण्यास भाग पाडले, त्याचवर्षी होळकर, उदाजी पवार, कंठाजी कदम बांडे इ. च्या साथीने चिमाजी आपाने दयाबहादूर व गिरिधर बहादूर या दोन बलवान मोगल सुभेदारांना युद्धात ठार करून माळवा प्रांत एकदाचा ताब्यात घेतला. चिमाजीच्या विजयाची बातमी मिळतांच स्वतः बाजीराव बुंदेलखंडात छत्रसाल राजाच्या मदतीस धावून गेला. महंमदखान बंगशच्या विरोधात बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याने बाजीरावाची मदत मागितली होती. त्यावेळी चिमाजी माळव्याच्या प्रकरणात अडकल्याने बाजीरावास तातडीने बुंदेलखंडात जाता आले नाही. परंतु दया बहादूर व गिरिधर बहादूरचा बंदोबस्त होताच बाजीरावाने बुंदेलखंड प्रकरण हाती घेतले. यावेळी चिमाजी उज्जैनला वेढा घालून बसला होता व त्याची बातमी महंमदखान बंगशला होती. पण देवगडावरून गढामंडळमार्गे बाजीराव येत असल्याची कल्पना बंगशला नव्हती. परिणामी जैतपुरावर महंमदखान बंगश मराठी व बुंदेल्यांच्या फौजांच्या चिमट्यात कोंडला गेला. त्याने दिल्लीहून कुमक मागवली. मुलगा काईमखान यांस तातडीने मदतीस बोलावले. बापाच्या मदतीला मुलगा धावला खरा पण जैतपूरच्या अलीकडे सुपे येथे मराठी सैन्याने गाठून लुटून घेतले. केवळ १०० स्वारांनिशी काईमखान जीव घेऊन पळत सुटला. सुटकेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे पाहून स. १७२९ च्या मे महिन्यात बंगश शरण आला. पावसाळा तोंडावर आल्याने बाजीरावास परत फिरणे भाग होते. तेव्हा त्यानेही फारसे ताणून न धरता बंगशला सोडून दिले. छत्रसालने बाजीरावास या मदतीच्या बदल्यात पाच लाखांची जहागीर नेमून दिली. या जहागिरीच्या मोबदल्यात मोगलांच्या आक्रमणापासून छत्रसालच्या राज्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी बाजीरावाने उचलली. अशा प्रकारे माळवा - बुंदेलखंडातील विजय संपादून चिमाजी - बाजीराव पुण्यास परतले.
           डभईची लढाई हे बाजीरावाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे प्रकरण असल्याने याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे येथे भाग आहे. सेनापती खंडेराव दाभाड्यास मुलूखगिरीसाठी गुजरात प्रांत नेमून देण्यात आला होता, त्याचप्रमाणे माळवा प्रांत पेशव्यास मिळाला होता. अर्थात हि वाटणी स्वतः छत्रपती शाहूने केली होती. पण पुढे शाहूने गुजरात प्रांतातील निम्मा मोकासा चिमाजीच्या नावे करून निम्मा त्रिंबकराव दाभाड्यास दिला. त्रिंबकरावास शाहूचा निर्णय मंजूर नसल्याने त्याने आपली नाराजी छत्रपतीकडे दर्शवली. इकडे बाजीरावाने त्रिंबकरावची समजूत काढण्यासाठी त्यास, आपण माळवा प्रांती निम्मी वाटणी देतो असे सांगितले. परंतु त्रिंबकराव यास राजी झाला नाही. सेनापतीस नाराज करणे शाहूस योग्य वाटले नाही आणि त्याने चिमाजीला दिलेला निम्मा मोकासा रद्द केला. परंतु, तरीही बाजीराव गुजरातमधील वाटणीसाठी आग्रही राहिला.
          वास्तविक, बाजीरावास जसा स्वतःच्या  पराक्रमाचा, कर्तबगारीचा आत्मप्रत्यय आला होता ; त्याचप्रमाणे आपल्या छत्रपतीचा दुबळेपणा देखील हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागला होता. त्याशिवाय त्याच्या पूर्वसुरींची परंपरा व समकालीन लोकांच्या वर्तनाचाही त्याच्या मनावर थोडाफार परिणाम झाला होता. बलवान छत्रपतींची परंपरा शिवाजी महाराजांपासून सुरु होऊन तिचा शेवट संभाजीसोबत झाला होता. राजारामास संताजी व धनाजीने कित्येकदा रडवले होते. शाहू राजारामाइतका दुबळा नसला तरी संभाजीसारखा प्रखरही नव्हता. त्यामुळे धनाजी - चंद्रसेन या पितापुत्रांनी त्यास बरेच हैराण केले होते. शाहूचे वर्तन पाहता दरबारातील कोणताही मातबर मानकरी पुढेमागे त्यास बगलेत मारणार याचा अंदाज बाजीरावास आला होता. मग हे कार्य आपणचं हाती घेतले तर काय फरक पडतो अशी त्याची भावना बनल्यास नवल नाही.  त्याशिवाय त्याच्या समकालीन पवार, आंग्रे होळकर, भोसले इ. सरदारांचे स्वतंत्र वर्तन त्याच्या नजरेसमोर होते. शाहूची नाममात्र ताबेदारी स्वीकारून ते आपापली स्वतंत्र संस्थाने उभारत असल्याचे त्याच्या नजरेतून सुटले नाही. आपणही यांसारखा एखादा प्रयत्न करावा अशी इच्छा त्याच्या मनी उत्पन्न झाली.त्यानुसार त्याने बुंदेलखंडात एक प्रयत्न करून पाहिला. छत्रसालच्या मदतीस बाजीराव गेला आणि जहागीर मिळवून आला पण ती जहागीर त्याने स्वतःच्या खाजगी दौलतीमध्ये जमा धरली. मराठी राज्यात तिचा अंतर्भाव केला नाही. यावरून त्याचे विचार कोणत्या दिशेने चालले होते याची कल्पना येते.
             इकडे त्रिंबकराव दाभाड्याने बाजीरावाच्या द्वेषाने परिस्थितीचे अवधान सोडून निजामाची मदत मागितली. निजामालाही पालखेडच्या अपयशाचा बदला घ्यायचा होता. त्यानेही सेनापतीला मदतीचे आश्वासन दिले. तसेच बंगशला देखील बाजीराव विरोधी आघाडीत सामील करून घेण्याच्या उद्देशाने नर्मदेच्या किनारी भेटीस बोलावले. संभाव्य धोक्याची हि पूर्वसूचना समजून बंगशला अडवण्याची जबाबदारी बाजीरावाने मल्हाररावावर सोपवली. इकडे निजाम नर्मदेकडे जात असल्याचे पाहून चिमाजीआपा तातडीने मही नदीच्या उत्तरेस मेमदाबाद येथे गेला. त्या ठिकाणी जोधपुरच्या अभयसिंगाशी त्याची भेट होऊन उभयतांचा सलोखा झाला. प्रसंग पडला तर राजपुतांची मदत घेऊन निजाम - दाभाडेचा सामना करण्याचा पेशवेबंधूंचा निश्चय झाला. वास्तविक, या अभयसिंगाला गुजरात प्रांत हवा होता पण दाभाडे जबरदस्त असल्याने त्याची डाळ शिजत नव्हती. तेव्हा पेशव्याच्या मदतीने गुजरात ताब्यात घेण्याचा त्याने डाव आखला तर गुजरात हाताखाली घालण्यासाठी व दाभाडेच्या पक्षाला आणखी एक सत्ताधीश जाउन्न मिळू नये यासाठी पेशवे बंधूंनी अभयसिंगास तात्पुरते जवळ केले. दरम्यान इकडे नर्मदेवर निजाम - बंगश यांची भेट होऊन २८ मार्च १७३१ रोजी बंगश माळव्यात परतला तर निजाम दाभाड्यांच्या मदतीसाठी सुरतेस निघाला.                  
           निजामाचा तोफखाना व दाभाड्यांची फौज एकत्र झाल्यास आपला निभाव लागणार नाही हे ताडून बाजीरावाने त्वरेने १ एप्रिल १७३१ रोजी डभईजवळ भिलापूर येथे दाभाड्यांवर हल्ला चढवला. बाजीरावाने कितीही त्वरा केली असली तरी निजामाची एक तुकडी मोमीनयारखानाच्या नेतृत्वाखाली दाभाड्यांना येउन मिळाली होती. डभईच्या संग्रामात मोमीनयारखानाने सहभाग घेतला व लढत असताना तो मारला गेला. या लढाईमध्ये पेशवा व सेनापती यांचे  बळ काय होते याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही पण, दाभाड्यांच्या तुलनेने बाजीरावची फौज कमी होती हे निश्चित ! तसेच सेनापतीच्या बाजूने उदाजी पवार, कंठाजी कदम बांडे, चिमणाजी दामोदर हे सरदारही लढण्यास सिद्ध झाल्याने बाजीरावास यश मिळणे तसे दुरापास्तचं होते. दरम्यान सेनापती व पंतप्रधानातील तंटा सामोपचाराने मिटावा म्हणून छत्रपती शाहू दोन्ही बाजूला आज्ञापत्रे पाठवत होता. परंतु, उभयतांनी एकमेकांवर फितुरीचे आरोप करून, आपण लवकरचं शत्रूचा पाडाव करून आपल्या भेटीस येतो असे शाहूस कळवले. सारांश, बसल्या जाग्यावरून आज्ञा सोडणाऱ्या छत्रपतीला त्याची जागा दाखवून देण्याचे अप्रत्यक्ष कार्यदेखील या निमिताने दोन्ही प्रधानांनी करून दाखविले.
           दाभाड्यांच्या बखरीनुसार बाजीरावाने त्रिंबकरावाच्या कित्येक शिलेदारांना फितवले होते. हा आरोप खरा आहे कि नाही याची पडताळणी करण्यास प्रत्यंतर पुरावा नाही परंतु, बाजीरावसारखा सेनानी असला काही डावपेच वापरणारचं नाही असे समजणे चुकीचे ठरेल. बाजीरावाला हि लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असल्याने त्याने दाभाड्यांच्या फौजेत फितूर करण्याचा प्रयत्न केला तर त्यात बाजीराव समर्थकांनी वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही. प्रत्यक्ष लढाईच्या वेळी दोन्ही बाजूच्या फौजा मोठ्या हिरीरीने लढल्या. स्वतः त्रिंबकराव हत्तीवर बसून तिरंदाजी करत होता. याप्रसंगी त्याचा माहूत मारला गेला तेव्हा स्वतः पायाने हत्ती चालवत त्याने सैन्याचे नेतृत्व केले. धनुष्य - बाण चालवताना त्याच्या बोटांची कातडी सोलून निघाली तरी त्याकडे दुर्लक्ष करून त्याने युद्ध चालूचं ठेवले. त्रिंबकराव जातीने लढत असल्याने त्याच्या फौजेत बळ संचारले व पेशव्याची सेना मार खाऊ लागली. बाजीरावाने देखील स्वतः आघाडीवर निवडक शिलेदार, बारगीरांसह दाभाड्याच्या फौजेवर अनेक हल्ले चढवले. परंतु त्यास म्हणावे तसे यश मिळाले नाही तेव्हा त्याने त्रिंबकरावास निरोप पाठवला कि, ' अशी लढाई शत्रूसोबत करून महाराजांना संतुष्ट करावे. आम्ही लढाई तहकूब करून भेटीस येतो.' परंतु त्रिंबकरावाने बाजीरावाचा सल्ला फेटाळला. बाजीरावाने आपल्या लोकांना लढाईपूर्वी किंवा लढाईदरम्यान सेनापतीवर शस्त्र न चालवण्याची आज्ञा केल्याचे उल्लेख मिळतात. यात कितपत तथ्य आहे ते या क्षणी सांगणे कठीण आहे. परंतु, दाभाड्यांच्या बखरीचा संदर्भ घेतला असता त्रिंबकरावाचा सावत्र मामा भावसिंगराव टोके हा पेशव्याला फितूर झाला असून त्याने आपल्या बारगिराकरवी त्रिंबकरावावर बंदूक चालवून त्यास ठार केले. त्रिंबकराव मरण पावताच दाभाड्यांची फौज पळत सुटली. पराभूत सेनापतीच्या फौजेची लूट करून करून बाजीराव परत मागे फिरला. कारण, डभईचा संग्राम जरी बाजीरावाने जिंकला असला तरी दभाड्यांची मोडलेली फौज परत एकदा एकत्र करून यशवंतराव दाभाडे बाजीरावावर चालून येऊ लागला. इकडून निजामही सुरतजवळ येउन थडकला होता. मिळून डभईची लढाई मारून देखील म्हणावा तसा लाभ पदरात न पडता बाजीरावाची कोंडी होण्याचा प्रसंग उद्भवला. तेव्हा त्याने दाभाडे व निजामाच्या फौजांना चकवत पुणे जवळ केले. दरम्यान सुरतच्या जवळ बाजीरावाच्या एका सैन्य तुकडीची व निजामाच्या पथकांची चकमक होऊन बाजीरावाच्या तुकडीचा पराभव झाला. परंतु, या क्षुल्लक विजयाचे भांडवल करून निजामाने, आपण माळवा व गुजरातमधून बाजीरावास हाकलून लावल्याच्या बढाया मारणारी पत्रे मोगल दरबारी पाठवली.
              डभईच्या लढाईनंतर स्वतः शाहूने तळेगावी जाउन त्रिंबकरावाची आई -- उमाबाई -- हिची भेट घेऊन तिचे सांत्वन केले. पेशवे - सेनापती यांच्यात दिलजमाई घडून यावी यासाठी प्रयत्न केले पण दाभाड्यांनी मनातील तेढ सोडली नाही. त्याशिवाय त्यांच्या घरातही लवकरचं अव्यवस्था माजून सेनापतीपद मात्र त्यांच्याकडे राहून गुजरातचा कारभार पुढे त्यांचा सरदार गायकवाड, याच्या हाती गेला.
            डभई प्रसंगाची जरा जास्त तपशीलवार चर्चा करण्याचे कारण म्हणजे या लढाईनंतर शाहूच्या उर्वरीत प्रधानांवर आणि इतर मराठी सरदारांवर पेशव्याची जरब बसली. पेशव्याच्या विरुद्ध जाणाऱ्याची आपण कशी वाट लावू शकतो हेच या प्रसंगातून पेशवेबंधूंनी आपल्या विरोधकांना दाखवून दिले. याच ठिकाणी आणखी एक गोष्ट नमूद करणे आवश्यक वाटते कि, दाभाड्यांनी निजामाचा आश्रय घेतल्यामुळे सातारकर छत्रपतींच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पेशव्याला हे कटू कर्तव्य पार पाडावे लागले असे इतिहासकार सांगतात. परंतु दाभाडे, आंग्रे, भोसले इ. प्रकरणांतील पेशव्यांचे वर्तन पाहता वरवर आपण छत्रपतीचे हित साधत आहोत असे दाखवून पेशवे आपल्या डोईजड प्रतिस्पर्ध्यांना संपवत वा दुबळे करत चालले होते. छत्रपतीला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न सुरु असताना हि स्थिती होती तर मग पेशवाईत जेव्हा छत्रपती नामधारी झाले त्यावेळची स्थिती काय वर्णावी ?