Sunday, July 26, 2015

अटकस्वारी संबंधी नानासाहेब पेशव्याची दोन महत्त्वाची पत्रे
लेखांक [ ९० ]       श्री      * १८१४ अधिक आश्विन वद्य १४
                                   [ १२ अक्टुबर १७५७ ]
चिरजीव राजमान्य राजश्री दादा यांसि   बालाजी बाजीराव प्रधान आसिर्वाद उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहिणे विशेष. राजेश्री बलवंतराव गंनपत [ मेहेंदळे ] याणी कडपेवाले अबदुलमजीदखांन याजकडे राजश्री शामराव भिवराव यांस पाठविले. ते कडपियास गेले. तो खासा तेथे नव्हते. सिघोटास गेले होते. कडपियास गनुमिया व सिलैमखान तेथ होते. लाख रुपयाहून जाजाती जाबसाल न करीत. हे वर्तमान यास कलताच मारनिले कुळतूर कडपेवाले याचा तालुका तेथून सड्या फौजा आपण बुलगियात मागे दबावास राहून राजश्री इद्रोजी कदम व सोनजी भांपकर व हरबा बापु सखाजी विसाजी कृष्ण नरसिंगराव संभाजी घोरपडे खडेराव दरकर भगवंतराव कदम व हैबतराव जाधव यशवंतराव लक्षुमण वगैरे लोकसुधा रवाना केले. ते कडपियास न गेले. मध्येच होते. तो खबर आली की गनीमिया व सिलीमखान पलून कडपियातून गेले. कडपियात काही नाही त्याजवरून हे सारे कडपियांस जाउन लागले. मोर्चे बसविले. हे खबर अबदुलमजीदखान यास सिघोटास कलतांच तेथून आपले फौजेनसी दीड हजारपर्येत त्या होउन जुमामर्दीने मारीत मारीत कडपियात सिरोन मग कडपे भांडवावे या उमेदीने निघाला. ही खबर सरदारांस अवगत होताच हे सारे जमा होउन विचार केला की तो येथे येउ न द्यावा. पुढे जाउन त्यांसि झुजावे  त्याजवरून सारे चालून कडपियापासून तीन कोसावर गाठ घातली. ते पठाण चागले. हत्यार फार तीरतरवार याचे जाहाले. लोकानी आपल्यानी निकड फार खाशाखाशाने केली. उड्या घातल्या. त्या समई खासा अबदुलमजीदखान यास हतीवर गोली लांगली. तो हती हरबानी पाडाव केला. सीर खासियाचे कापून आणले. सरकारचे लोक सदरहु मातबर नामी सरदार थोडथोड जखमी जाहाले परतु सारियाची खैर जाहाली. विसाजी कृष्ण [ बीनीव ले ] याचे घोडीस दोन तीर. बाजीपंत मारनिलेचा त्याचे थनसरीस गोली थोडकी. संभाजी घोरपडे मात्र ठार पडले. वरकड जखमी घोडीमाणसे पंडली त्याची खबर तपसीलवार लिहिली आली नाही. त्याजकडील दोनअडीचसे पठाण कापून काढिले. दोनतीनसे जखमी आहे. नव हती पाडाव जाहाले. तेथून कडपियास आले. येथील प्यादियाने कौल घेतला. सरकारचे निशाण चढून ठाणे बसले. तेथे हाती सात सापडले. पैका नाहीं. तोफा मातबर तीन चार आहेत. गनीमिया व सिलीमखान करनालाकडे गेले. हे फते बलवतराव याणी फारच चागली गे[के]ली. करणाटकात याजबरोबर लडणार मातबर कोण्ही नाहीं. याजवर याप्रमाणे सलाबत पडून विसा लाखाचा मुलुक हाती लागला. यापरी दुसरा कोणी उजरून गोष्ट सागणार नाही. फांरच दहशत पडली. हे कामें खाशे फौजेने करावी ते बलवंतराव मागे राहून सरदाराजवलून काम करविले यामुले तो फारच दांब लोकावर वाढला. पुढेही कामें राहिली ती चागलीच करितील. हे संतोषचे वर्तमान कलावे याजकरिता लिहिले असे. दिलीचे गुत्यामुले रुजू[हुजूरू]तून निघावे. फारच जरूर असेल तरी मल्हारबास त्याचे फौजेसुधा ठेवावे. जर विशेष पैका मिलत असिला तर मात्र राहावे परंतु उगेच [होलकराचे] गपाचे आशेत गुतू नये. याअन्वये पत्रे लिहिली त्याचे उतर येत नाहीं. तरी सविस्तर अर्थ लिहिणे. बसालतजगानी शाहानवाजखानास दंगा करून मारिले यास्तव पचविसाची जहांगीर नगर देउ केले परंतु आता फौजा जमा करुंन काहीसा चड खात आहेत. दतबा [व] चिरजीव पंधरा हजार जमा जाहाले. आता दबउन काम करतील. आम्हींही सत्वरच बाहेर निघोन स्वारीस निघणार आहों. होईल ते लिहून पाठउ. आपण कासी पटणे येथील येथील सिकार येकहाती फौजेने मारावी. उसीर करू नये. दिली कवल कंगाल होउन गेली आहे. आसपास वोस आहे. पैका आकारणार नाही. नावे मात्र माहालाची मोठी. वसूल होणे कठिण पडेल. दिलीची मांमलत तीस लाख जाहाली म्हणून गपा येतात. तुमचे पत्र आले नाहीं परंतु वसूल होणे यास विलंब लागेल सर्व वाटते. छ* २५ मोहरम. हे आसिर्वाद.
                                                            [१९ नवबर १७५७]


=================================================

लेखांक [९२]                  श्री    * संवत १८१५ चैत्र शुद्ध ३
                                    [ १० अप्रेल १७५८ ]
                       
                        राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री
                        सखाराम भगवंत स्वामी गोसावी यास.
पौप    बालाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत जाणे विशेष. सांप्रत तुम्हीं कोठे आहा. काय मनसुबां करिता ते सर्व लिहिणे. ईकडील सर्व सविस्तर चिरंजीव यास लिहिला असे त्यांजवरुंन कलेल. आमचे मते मल्हारबावर दिलीपासून लाहोरपावेतो कामाचा यखतियार देउन चिरंजीवास घेउन भेटीस यावे. विशेष पैका मिळणे नसता खावंदगिरीचे तेज खराब करून गुंतून पडावे हे सहसा न व्हावे. * छ १ साबान. हे विनंती.
                                                      पो| छ ९ रमजान समान.
                              मु|| व्यासनदीपूर्वतीर
                               [ १७ मे १७५८ ]
==============================================
    
    विश्लेषण :- लेखांक ९० चे पत्र अटक स्वारीपूर्वीचे असून यात कर्नाटक मोहिमेची माहिती देऊन नानासाहेब पेशव्याने रघुनाथरावास दिल्लीत पैशांची प्राप्ती होत नसल्यास काशी – पटण्यास जाण्याची सूचना केली आहे तर लेखांक ९२ नुसार रघुनाथराव अटक मोहिमेत असताना दिल्ली ते लाहोरच्या बंदोबस्ताचे काम होळकरावर सोपवून त्यांस माघारी घेऊन येण्याचा आदेश सखारामबापूस पेशव्याने केला आहे.

( संपादकांनी दिल्याप्रमाणे मूळ पत्रे जशीच्या तशी येथे उतरून घेण्याचा प्रयत्न केल्याची नोंद घ्यावी. )संदर्भ ग्रंथ :-
१) शिंदेशाही इतिहासाची साधने, भाग ३ रा :- संपादक – आनंदराव भाऊ फाळके

Friday, July 24, 2015

शिव – पेशवेकालीन राज्यनिष्ठा, राजनिष्ठा व फितुरी : एक चिंतन ( भाग – १ )
    मध्ययुगीन, विशेषतः शिव – पेशवेकालीन इतिहासाचे वाचन करताना राज – राज्यनिष्ठा, फितूर हे शब्द प्रत्येक घटनेच्या संदर्भात वारंवार वाचनात येतात. कित्येकदा तर आत्यंतिक भावनिकतेपोटी अनेक ऐतिहासिक पुरुषांना खलनायक ठरवून त्यांना उपेक्षेच्या अडगळीतही टाकण्यात आले आहे तर कित्येकांच्या नामोच्चारापूर्वी अपशब्दांचे विशेषण जोडण्याचाही प्रघात पडला आहे. प्रस्तुत लेखांत राज्यनिष्ठ व फितुरी आणि काही प्रसिद्ध ऐतिहासिक फितूर प्रकरणांची थोडक्यात चर्चा करण्याचे योजले आहे.

    छत्रपती शिवाजी महाराजाने ज्यावेळी राज्यस्थापनेचा उद्योग आरंभिला त्यावेळी दक्षिणेतील परिस्थिती तशी अंदाधुंदीची होती. उत्तरेत नुकतेच स्थिरावू लागलेले मोगल दक्षिणेत लुडबुड करण्याच्या प्रयत्नात होते. विजापूर व गोवळकोंड्याच्या बादशाह्या मोगलांची कृपा संपादून आपापले अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीत गुंतल्या होत्या. स्वतंत्र सत्ता स्थापून बराच काळ लोटला असला तरी या सत्तांना दक्षिणेत आपली पाळंमुळं कधीच घट्टपणे रोवता आली नाहीत. विशेषतः निजामशाहीतील पुणे व कोकणपट्टीचा परिसर ! या परिसरातील नैसर्गिक दुर्गमतेमुळे येथील स्थानिक वतनदारांना जहागिरी, सरंजाम व सन्मानदर्शक पदव्या देऊन त्यांना आपल्या लगामी लावून घेणे हाच एक पर्याय या भागावर नियंत्रण मिळवू पाहणाऱ्या सत्तेसमोर होता व निजामशाहीच्या पतनानंतर आदिलशाहाने तो अवलंबला होता. अर्थात, हा पर्याय अवलंबणारी आदिलशाही हि काही पहिलीच सत्ता नव्हती हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

    स. १६३४ मध्ये निजामशाही संपुष्टात आली होती. मोगलांचा दक्षिणेत प्रवेश झाला असला तरी त्यांचा पाया अजून उत्तरेतच भक्कम नसल्याने दक्षिणेत तूर्तास तरी त्यांना फारसे काही सध्या करता येण्याजोगे नव्हते. निजामशाहीच्या अंमलातील प्रदेशाची विजापूर व मोगलांत वाटणी होऊन स. १६३६ मध्ये मोगलांनी पुणे व कोकण प्रांत विजापूरकरांना देऊन टाकला. म्हणजे या प्रदेशातील वतनदार, जहागीरदार आता विजापूरचे अंकित बनले. परंतु अनेक कारणांनी या संपूर्ण प्रदेशात आपली दृढ करणे विजापुरकरांना जमले नाही व जेव्हा त्यांनी निर्धाराने यासाठी प्रयत्न करण्याचे योजले तेव्हा शिवाजीने याच परिसरात आपली सत्ता स्थापण्यास सुरवात केली होती. एकूण शिवाजी व विजापूरकरांच्या झगड्याचे प्राथमिक स्वरूप संक्षेपाने असे सांगता येईल परंतु, या झगड्याची तिसरी बाजू म्हणजे मोगल आपण विचारात घेतले पाहिजेत.

    स. १६३६ चा तह गुंडाळून शहजादा औरंगजेबने स. १६५७ मध्ये विजापूरकरांविरुद्ध युद्ध पुकारले. युद्धाचे उद्दिष्ट विजापूरचा नाश अथवा स. १६३६ मध्ये दिलेल्या मुलखाचा ताबा घेणे हे होते. यावेळी आदिलशाही शिवाजी – औरंगजेब या दोघांविरुद्ध लढत होती. परंतु, औरंगजेबाच्या प्राथमिक विजयांनंतर शिवाजीने नुकताच औरंगजेब सोबत केलेला तह गुंडाळून विजापुरकरांची मदत करण्याचे ठरवले. यामागील कारणपरंपरा उघड होती. शहाजी हा विजापूरचा सरदार असून शिवाजीने स्थापलेले राज्य शहाजीच्या जहागीर प्रदेशांत असल्याने एकप्रकारे तो विजापूरकरांच्या अधीन होता. पण हा तात्त्विक भाग झाला. व्यावहारिक भाग पाहता विजापूरचे पाणी शिवाजीने जोखले होते. बलवान मित्रापेक्षा दुबळा शत्रू बरा या न्यायाने त्याने औरंगजेबला विरोध करण्याचे योजले. कारण, विजापूरची सत्ता धुळीस मिळून मोगल द्काशिनेत स्थिर होणे त्यांस सध्या तरी परवडण्याजोगे नव्हते. त्यामुळे शिवाजीने विजापूरच्या मदतीसाठी औरंगजेबविरुद्ध युद्धआघाडी उघडली. शिवाजीच्या या कृत्याने औरंगजेब चिडला. दोन आघाड्यांवर युद्ध खेळावे लागल्याने विजापूरची मोहीम रेंगाळण्याचा संभव दिसू लागला. तशातच शहाजहान आजारी पडल्याच्या बातमीने अस्वस्थ होऊन प्रथम बादशाहीपद हाती घेण्यास प्राधान्य देऊन त्याने स. १६५७ मध्ये विजापुरकरांशी तह केला. तहातील प्रस्तुत विषयाच्या संदर्भातील महत्त्वाचे कलम म्हणजे कोकणातील कल्याण – भिवंडी प्रदेश व पुणे प्रांत आता मोगलांना मिळाला होता. व याच प्रदेशात शिवाजीने स्थापलेले नूतन राज्य होते.

    स. १६५९ मध्ये शिवाजीविरुद्ध अफझलखानाची नियुक्ती केली ती प्रामुख्याने पुणे प्रांतातून शिवाजीचे उच्चाटन करण्यासाठी. वास्तविक स. १६५७ च्या तहान्वये शिवाजीचे राज्य मोगली प्रदेशात मोडत असल्याने हि नसती उठाठेव करण्याची विजापुरकरांना अजिबात गरज नव्हती. परंतु, मोगलांची कृपा संपादण्यासाठी व जमल्यास शिवाजीच्या बंदोबस्ताच्या बदल्यात पुणे प्रांत कब्जात घेण्यासाठी त्यांनी हा अव्यवहारी उपक्रम स्वीकारला. सारांश, निजामशाहीच्या ऱ्हासकालापासून ते अफझलखानच्या स्वारीपर्यंतचा सुमारे २५ वर्षांचा काळ हा पुणे प्रांताकरता कमालीचा अंदाधुंदीचा असल्याचे दिसून येते. या अव्यवस्थेमुळे महत्त्वाकांक्षी व्यक्ती --- विशेषतः वतनदार मंडळी --- आपापली प्रादेशिक सत्ता, महत्त्व वाढवण्यास कसे उद्युक्त झाले असतील याचीही कल्पना करता येते. तात्पर्य, अलीकडच्या २५ वर्षांच्या काय पण तत्पूर्वीच्याही काळात राज्यनिष्ठा या प्रकाराऐवजी व्यक्तीनिष्ठेचेच अधिक स्तोम माजलेले दिसून येते. अर्थात, हे विधान केवळ विशिष्ट प्रांतास उद्देशून नसून समस्त देशातील समाजमनास अनुलक्षून असल्याची नोंद घ्यावी.

    अफझलची स्वारी असो वा शाहिस्ते – जयसिंगाची. शिवाजीने जरी या आक्रमणांना यशस्वीपणे तोंड दिले असले तरी प्रत्येक स्वारीमागे त्याला उपरोक्त व्यक्तीनिष्ठ, व्यक्तिगत स्वार्थांनी प्रेरित असलेल्या प्रांतातील, राज्यातील विरोधकांना, बंडाळीला, फितुरीला तोंड द्यावेच लागत होते. कथा – कादंबऱ्यांमध्ये रंगवल्याप्रमाणे वा टीव्ही सिरीयसल – सिनेमात दाखवल्याप्रमाणे शिवशाही नसून इतर राजवटींप्रमाणेच ती मानवी स्वभाव – विकारांनी बनलेली होती हे आपण लक्षात घ्यायला हवे. आत्यंतिक व्यक्तीनिष्ठा हा त्याकाळचा सद्गुण असून राज्य काय असते हे जरी माहिती असलं तरी राज्यप्रती निष्ठा म्हणजे काय याचा थांगपत्ता नव्हता. यामुळेच कि काय, राज्याभिषेक प्रसंगी युवराजपदाचा मान तसेच राज्याचा भावी वारस म्हणून मान्यता मिळून देखील संभाजीला मोगलांशी हातमिळवणी करण्याची इच्छा झाली. पुढे मोगलांचे धरसोडीचे राजकारण व शिवाजीच्या कारवायांनी संभाजी राज्यात परतला खरा पण दरबारात या घटनांमुळे तट पडू लागल्याची जाणीव शिवाजीला झाली होती. 

    निजामशाही पतनानंतर ज्या प्रदेशांत घरागणिक स्वतःला स्वतंत्र राजे समजणारे महत्त्वाकांक्षी लोक होते त्यांना गोड बोलून, सेवेत घेऊन वा नाहीसे करून शिवाजीने आपले राज्य स्थापले होते. राज्यातील वतनदार, सरंजाम – जहागीरदार हे राज्याचे शत्रू समजून त्याने आरंभी या संस्थांचा उच्छेद करण्याचा उपक्रम स्वीकारला होता परंतु याच मंडळींच्या बळावर शत्रू आपल्यावर वारंवार चालून येतोय म्हटल्यावर त्याने आपल्या तत्वाला मुरड घालून जुनी वतनं सुरु ठेवून त्यांचे महत्व मर्यादित केले तर कित्येकांना प्रसंगी अपरिहार्यता म्हणून वतनाचे वाटप केले. एकूण, आपल्या पाठीमागे लोकांनी आपल्या वारसांशी, राज्याशी निष्ठेने राहावे, वर्तावे यासाठी शक्य तितके उपाय योजून त्यांची अंमलबजावणी करत असताना शिवाजीस मरण आले. पश्चात सत्तेचा वारस कोण यावरून माजणारी रणधुमाळी अपरिहार्य अशीच होती. शिवाजीच्या जबरदस्त व्यक्तीमत्वाने गप्प बसून राहिलेले दरबारी मंडळ आता आपापल्या महत्वकांक्षा साध्य करून घेण्यास्तव पुढे सरसावले. त्यातूनच संभाजीऐवजी राजारामाला शिवाजीचा वारस म्हणून राज्यावर नेमण्याची चाल खेळण्यात आली. अर्थात, व्यक्तिगत आवडी – निवडीच्या त्या जमान्यात राजारामास --- पर्यायाने एका दरबारी गटास विरोध करणारा दुसरा गट पुढे सरसावला व त्यांनी संभाजीला आपला सक्रीय पाठिंबा दिला. परिणामी, संभाजी सत्तेवर आला खरा परंतु, शत्रूहाती कैद होईपर्यंत त्यांस आपल्याच दरबारातील हाताखालच्या असंतुष्ट मंडळींच्या बंडाळीला वारंवार तोंड द्यावे लागले होते. हि मंडळी जरी वरवर राजारामनिष्ठ वा शिवाजीनिष्ठ असली तरी प्रसंगी शहजादा अकबरशी हातमिळवणी करून संभाजीचा बंदोबस्त करण्याची त्यांची चाल पाहता त्यांच्या मनी निष्ठेपेक्षा व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेचा जोर अधिक असल्याचे दिसून येते. हेच विधान संभाजी पक्षीयांनाही लागू पडते याची नोंद घ्यावी.

    पुढे दरबारी असंतुष्ट मंडळी व बलवान शत्रू यांच्या संयुक्त हातमिळवणीमुळे स. १६८९ च्या आरंभी संभाजी शत्रूहाती पडला व राजाराम सत्ताधीश बनला. संभाजीच्या सुटकेचे विशेष प्रयत्न न झाल्याने तसेच तख्ती दुसरा राजा बसल्याने औरंगजेबाने संभाजी व कवी कलशास फुकट पोसण्यापेक्षा ठार करण्याचा पर्याय स्वीकारला अन राजारामला ताब्यात घेण्यासाठी मोहीम नेटाने चालवली. इकडे राजारामास सत्तेवर आणल्यावर दरबारी मंडळींची एक इच्छा साध्य झाली तरी मोगलांचा प्रतिकार करणे बाकी होते. त्यासाठी त्यांनी मसलतीन्वये राजारामास रायगडाहून जिंजीकडे नेले तर रायगडावर संभाजीची पत्नी येसूबाई व पुत्र शिवाजी उर्फ शाहू राहून पुढे ते मोगलांचे राजकीय कैदी बनले.

    दंतकथा, प्रवाद कधी – कधी ऐतिहासिक सत्याला – व्यक्तींच्या प्रतिमांना विकृत, मलीन कसे करतात हे कवी कलश आणि सूर्याजी पिसाळ प्रकरणी आपणांस चांगलेच अनुभवयास मिळते. शत्रूची सावधता व असंतुष्ट स्वकीय मंडळींमुळे संभाजी औरंगजेबाच्या हाती लागला पण दगाबाज म्हणून कवी कलशला बळीचा बकरा बनवण्यात आले. त्याचप्रमाणे ठरल्या बेतानुसार दीर्घकाळ लढवता येण्याजोगा रायगड न लढवता आल्याने मोगलांचा नोकर म्हणून वेढ्यात कार्यरत असलेल्या सूर्याजी पिसाळच्या मध्यस्थीने येसूबाईने शरणागती पत्करली पण फितूर, द्रोही, दगाबाज म्हणून सूर्याजी पिसाळाचा उद्धार करण्यात आम्ही वर्षानुवर्षे धन्यता मानली. मिळून, संभाजी व रायगडसह येसूबाईला दगा करणारी मंडळी राहिली बाजूला अन भरडले गेले भलतेच इसम !

    येसूबाई व राजपुत्र शिवाजी उर्फ शाहू मोगलांचे राजकीय कैदी बनल्यावर तख्ती फक्त राजाराम होता व भोवती घोळका राजाराम तसेच स्वमहत्त्वाकांक्षा निष्ठ लोकांचा. यातून मग कधी मोगलांविरुद्धचा लढा एकजुटीने तर कधी मोगलांच्या मदतीने परस्परांचा गळेकापूपणा जोरात चालला. याच काळात शत्रूपक्षीय मंडळी औरंगजेबाच्या मरणाकडे डोळे लावून बसल्यामुळे शिवाजीच्या राज्याचा वा त्याच्या वारसांना नेस्तनाबूद ( नीस्त – नबूद् ) करण्याच्या कामी कोणी मन घालून काम करत नव्हते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहजाद्यांना हाताशी धरून आपापले स्वार्थ साधण्याकडे मोगल सरदारांचे लक्ष लागून त्यानुसार त्यांची गटबाजी व विरोधकांचे महत्त्व घटवणे, समोरच्याचे बेत हाणून पाडणे वा मोहिमेत व्यत्यय आणणे इ. कारवाया चालू होत्या.

    तुलनेने राजारामाचा दरबारही काही वेगळा नव्हता. एकीकडे छत्रपती कमकुवत असल्याने त्यांस मुठीत ठेवण्याची स्पर्धा सुरु होती. तर कोणी शाहू कैदेतून सुटून येईपर्यंत नाईलाजाने कार्यरत होते तर कोणी राजारामाप्रति निष्ठा ठेऊन स्वतःचे महत्त्व, सामर्थ्य वाढवत होते. या सर्वांचा दृश्य परिणाम म्हणजे धनाजी जाधव व संताजी घोरपडे या दोन बलाढ्य मराठी सरदारांत बेबनाव निर्माण होऊन त्यांच्या परस्परांशी रक्तरंजित लढाया झाल्या व छत्रपतीने जाधवाचा पक्ष घेऊन संताजीला चाकरीतून दूर केले. म्हाताऱ्या औरंगजेबला उतारवयात संताजीची शिकार यांमुळे सहजगत्या सापडली व त्यामुळे त्याची लालसा पूर्ण न होता आणखी भडकली. परंतु, त्यानंतर त्याच्या आसुरी महत्त्वाकांक्षेला फारसे बळी मिळाले नाहीत व अतृप्तावस्थेतचं त्यांस जगाचा निरोप घ्यावा लागला.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दख्खनच्या राजकारणात नाही म्हटलं तरी एक पोकळी निर्माण झाली. मोगल आता दक्षिणेत राहणे शक्य नव्हते. त्यांच्या वारसा युद्धाचा निकाल लागेल व नवा बादशाह तख्तावर स्थिर होईल तेव्हा ते कदाचित दक्षिणेत परततील हे स्पष्ट होतं. उलट मराठी राज्यात तुलनेनं अधिक गोंधळ असल्याचे दिसून येतं. औरंगजेबाच्या आधीच राजाराम मरण पावला होता. सरदार – सैन्यापुढे राजारामपत्नी ताराबाईने आपला मुलगा शिवाजी यांस राजा म्हणून पेश केले होते. याच काळात निर्वाणीचा उपाय म्हणून शाहूला आपला मनसबदार तसेच शिवाजीच्या राज्याचा वारस म्हणून घोषित करण्याचेही औरंगजेबाने प्रयत्न केले. जेणेकरून शत्रूपक्षांत फुट पडून बहुसंख्य सरदार शाहूच्या --- पर्यायाने मोगली छावणीत येऊन शिवाजीचे राज्य मांडलिक तत्त्वावर का होईना आपणांस हस्तगत होईल. परंतु बादशाही चाल त्याच्या हयातीत सिद्धीस न जाता मृत्यूनंतर पूर्णत्वास गेली. कारण मोगलांनी वारसा युद्धांत दख्खन अशांत राहवी म्हणून शाहूला कैदेतून पूर्णतः मोकळे केले. फक्त दबावाकरता त्याच्या परिवारास मात्र कैदमुक्त केले नाही.

    इकडे राजारामाच्या मृत्यूनंतर राज्याची सूत्रे जरी ताराबाईकडे गेली असली तरी तिचे स्वामित्व कित्येकांना मानवले नाही. काहीना शाहूचे स्वामित्व हवे होते तर काहींना स्वस्वर्थाचे अतोनात महत्त्व होते. परिणामी, शाहू कैदेतून मोकळा होताच ताराबाईच्या नेतृत्वाखालील लोकांची फाटाफूट झाली. यानंतर बाळाजी विश्वनाथ मार्फत मोगलांशी तह होऊन शाहूला मराठी राज्याचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता मिळेपर्यंत प्रथम ताराबाई – शाहू व नंतर राजारामाचा द्वितीय पुत्र संभाजी – शाहू असा झगडा जुंपला. याची फलश्रुती शिवाजीच्या मूळ राज्याची सातारा – कोल्हापूर अशी विभागणी होण्यात झाली. याखेरीज निजामाच्या रूपाने मोगल दक्षिणेत स्थिरावला ते निराळंच. 

    मराठी राज्याची दोन शकले पडल्याने सरदारांच्या निष्ठाही दुभंगल्या. कोणी सातारकडे तर कोणी कोल्हापूरकडे रुजू झाले. तर कोणी दोघांच्या नावाने आपले सामर्थ्य वाढवू लागले. करवीर – सातारा रियासतीत चाकरी करणे ज्यांना पसंत नव्हते, तसेच अंगी बेताची कर्तबगारी असलेले चंद्रसेन जाधवांसारखे सरदार मोगलांना --- म्हणजे निजामाला रुजू झाले. या सर्व उदाहरणांवरून शाहूच्या आगमनापर्यंत मराठी राज्यात व्यक्तींच्या मनी फक्त व्यक्ती – स्वहितनिष्ठाच असल्याचे दिसून येते. राज्यनिष्ठा हा प्रकारच आढळून येत नाही.  
                                   ( क्रमशः )
  

संदर्भ ग्रंथ :-
१)      छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे :- डॉ. नभा अनिल काकडे
२)      ऐतिहासिक पत्रबोध :- गो. स. सरदेसाई
३)      काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख :- संपादक – गो. स. सादेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकस्कर
४)      मराठी रियासत ( खंड १ ते ८ ) :- गो. स. सरदेसाई
५)      मराठ्यांची लष्करी व्यवस्था :- डॉ. एस. एन. सेन – मराठी अनुवाद :- डॉ. सदाशिव शिवदे
६)      मराठेशाहीतील वेचक – वेधक :- य. न. केळकर
७)      भूतावर भ्रमण : ऐतिहासिक लेखसंग्रह :- य. न. केळकर
८)      काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे :- य. न. केळकर
९)      नाना फडनवीस यांचे चरित्र :- वा. वा. खरे
१०)  मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( खंड १३, १४ ) :- वि. का. राजवाडे
११)  मराठी दफ्तर रुमाल पहिला (१) :- वि. ल. भावे
१२)  मराठी दफ्तर ( रुमाल २ ) :- वि. ल. भावे
१३)  फार्शी – मराठी कोश :- प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन
१४)  मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( खंड ८ ) :- वि. का. राजवाडे
१५)  दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास :- मराठी अनुवाद – भ. ग. कुंटे
१६)  छत्रपती शिवाजी :- सेतू माधवराव पगडी
१७)  ताराबाई – संभाजी ( १७३८ – १७६१ ) :- गो. स. सरदेसाई
१८)  ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर ( चरित्र व पत्रव्यवहार ) :- द. ब. पारसनीस
१९)  पुरंदरे दफ्तर भाग ३ रा :- कृ. वा. पुरंदरे
२०)  नागपूर प्रांताचा इतिहास :- या. मा. काळे
२१)  सरदेसाई स्मारक ग्रंथ :- श्रीपाद रामचंद्र टिकेकर
२२)  मराठी सत्तेचा उत्कर्ष :- न्या. महादेव गोविंद रानडे
२३)  शिंदेशाही इतिहासाची साधने, भाग ३ रा :- आनंदराव भाऊ फाळके                                          

Sunday, July 19, 2015

बुराडी घाट तसेच पानिपत मोहिमेवर प्रकाश टाकणारे महत्त्वाचे पत्र                                      
                                      श. १६८१ (?)
                                      इ. १७५९ (?)

                        
                           श्री

    पौ| छ १४ माह जमादिलावल
    पु|| श्रीमत राजश्री --------------- बापूसाहेब
    स्वामीचे सेवेसी 

    विनती सेवक बालाजी गोविद ऐसीजे दोन जोड्या कासिदाच्या समागमे पत्रे पाठविली त्यातून येकाही पत्राचे उत्तर न पाठविले याचा अर्थ काय सेवकावर इतकी अवकृपा करणे हे साहेबास विहीत नाही साहेबानी तो सदैव पत्रोतरी सेवकाचा सांभाळ केला पाहिजे यानंतर येथील प्रसंग तो पूर्वी श्रीजीनी श्रीमंतास खलिता पाठविला होता त्याचेही उत्तर किमपि न पाठविले यावरून आश्चर्ये वाटले की स्वामीसारखे आमचे मुरबी असोन दरजवाबही देत नाही याचे कारण काय त्यास मागती तेच जोडी पाठविली आहे तर खलीताचा जवाब वरकड जवाब सवाल उगवून प|| पाहिजे यानंतर या दिवसात राजश्री मल्हारजी होळकर यानी प्रगणियात धूम मांडली व – गाजुदीखान वजिरानी महबूबसिंग व सैफुदी महमदखानास आलाबत महमुदाचा बंधू उभयेतास राजश्री मल्हारबाकडे पाठविले की तुम्ही जाऊन सिघ्र घेऊन येणे तेही उभयेता काल छ २० माहे मजकुरी श्रीजीची मुलाजमत केली श्रीजीनी बहुत त्यासी येकांत केला बहुत राजी जाले की आजची बलाये साहा महिन्यावर जाऊन पडली नकले पठाण याजला मारून घेतो किंवा हे त्याजला मारून घेतात सध्या ......... भक्षायास मिलेल – तुवर तो पाहत नाहीत बहुधा मलारबा तिकडे जाऊन पठाणास सिक्षा देतील यात संदेह न जाणावा राजश्री जनकोजी सिंदे याज शामील वजीर जाला रोहिल्याची मामलतीचा ठहराव रोहिला तो आंतरवेदातील प्रगणे व बाकीचे रुपये तो देतो सरदार मानीत नाहीत सरदार म्हणतात की पारचा मुळुक तुमचा आंतरवेदातील आमचा इतकी भांजगड मात्र लागली आहे दो चौ रोजात निकाल होऊन जाईल शुजायेदौलाही सरदारास भेटीची इच्छा ठेवितो कुल बाकी बेबाक करून देतो तरी सरदार म्हणतात की कुल बाकी व प्रयागचा किला इतके देत असला तर सळूक आहे नाही तर नाही या प्रकारचे तिकडील जवाब सवाल आहेत श्रीमंत नानासाहेब प्रगणे साहरपुर हवेलीत आहेत वरकड वजिराचे जवाब सवालात रा| त्रिंबकपंत बाबा म्हणून तेथून लिहिले आले दुबराऊन आलिया सेवेसी विनंती केले जाईल स्वामीनी सदैव जोडीसमागमे प्रत्योत्तरी सेवकाचा सांभाळ घेतलां पाहिजे बहुत काय लिहिणे कृपा लोभ कीजे हे विज्ञप्ति.


    टीप :- पत्राची तारीख संपादक श्री. सदाशिव आठवले यानी मजकुरावरून अंदाजे दिली आहे. पत्रांत ज्याचा उल्लेख ‘ श्रीजी ‘ आला आहे तो कोण याची स्पष्टता होत नाही. पत्राच्या अखेरीस ‘ श्रीमंत नानासाहेब ‘ म्हणून उल्लेख आहे तो पेशव्याला नसून बहुधा पुरषोत्तम हिंगणे यास अनुलक्षून असावा. कारण याचेही टोपणनाव ‘ नाना ‘ असेच होते. संपादकीय कालनिश्चितीनुसार पत्र बुराडी घाटच्या आधीचे असल्याने त्यांस अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

सदर पत्र संदर्भ ग्रंथात दिल्यानुसार जसेच्या तसे उतरवून घेण्याचा प्रयत्न केल्याची नोंद घ्यावी. )    संदर्भ ग्रंथ :-
१)      हिंगणे दफ्तर : तिसरा खंड :- संपादक - सदाशिव आठवले