Friday, June 29, 2012

भीमा - कोरेगावची अनिर्णीत लढाई ( १ जानेवारी १८१८ )

दिनांक 1 जानेवारी 1818 रोजी पुण्याजवळ भीमा नदीच्या काठी कोरेगाव येथे दुसरा बाजीराव पेशवा याच्या नेतृत्वाखालील मराठी फौजेची आणि ब्रिटीश सैन्याची लढाई घडून आली. या लढाईविषयी उपलब्ध मराठी संदर्भ ग्रंथांमधून जी काही माहिती मला मिळाली, त्या माहितीच्या आधारे या लढाईचे विश्लेषण करण्याचा या ठिकाणी एक प्रयत्न करण्यात आला आहे.
          पार्श्वभूमी :- दुसरा बाजीराव पेशवा याने स. 1817 च्या उत्तरार्धात इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारले. यावेळी खडकी आणि येरवडा येथे ब्रिटीश आणि मराठी फौजांचा सामना घडून आला व पेशवा पुणे सोडून गेला. बाजीरावाने पुणे सोडल्यामुळे इंग्रजांनी पुणे शहर आपल्या ताब्यात घेतले व शनिवारवाड्यावर आपले निशाण फडकावले. इंग्रजी फौजांशी निर्णायक झुंज न घेता बाजीराव आपल्या सैन्यासह पुण्याच्या सभोवती घिरट्या घालत असताना भीमा नदी जवळ कोरेगाव येथे त्याची व इंग्रजी फौजांची एक लढाई घडून आली. इतिहास ती कोरेगावची किंवा भीमा - कोरेगावची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे.   
  1)  ' ... ..... ... बाजीराव नासिककडे न जातां ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरून ता. 30 डिसेंबर रोजीं चाकण येथें येऊन पोंचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. त्याचे पूर्वी कोंकणांतून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गांठावें किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावें असा बाजीरावाचा बेत असल्याचें स्मिथ यास दिसून आलें, दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदींच तात्पुरता होता. .... ..... ....... क. बर पुण्याचे बंदोबस्तास होता. त्यानें आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती, त्यावरून कॅ.  Staunton थोडे इंग्रज सैन्य बरोबर घेऊन ता. 31 डिसेंबर 1817 रोजीं रात्रीं 8 वाजतां शिरूरहून निघा, तो दुसऱ्या दिवशीं सकाळी 10 वाजतां कोरेगांवजवळ येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्याची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठीं दिसली. Staunton ची बातमी बापू गोखल्यास होतीच. 
       घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गांठ पडली.  बापू गोखल्यास श्रीमंतांनीं आज्ञा केली, कीं आज लढाई करून आम्हास पुढें जाण्यास मार्ग करून द्यावा. गांवास लहानशी तटबंदी होती तींत इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यांजवर दुसऱ्या बाजूनें मराठ्यांनी तोफांचा मारा सुरु केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील आरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले. इंग्रज शिकस्त झाले. त्यांचे पुष्कळसे ऑफिसर्स व लोक मारले गेले. रात्री 9 वाजेपर्यंत लढाई चालून पेशव्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. इंग्रजांचे 175 जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे 500 लोक पडले. थोडक्या लोकांनी पुष्कळांशी लढून आपला निभाव केल्याबद्दल कोरेगांव येथें इंग्रजांनी स्मारकाचा स्तंभ उभारला आहे. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून ज. स्मिथ येत असतां त्यास ओझरच्या घाटांत त्रिंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की ता. 2 जानेवारी रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोंचला. त्याच दिवशी कॅ. Staunton जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीत गेला.' ( संदर्भ ग्रंथ - मराठी रियासत खंड 8 )
     
      2)  '.... ..... ..... दुसरे दिवशी पेशव्यांनीं तेथोन कुच करून मुळा नदीस मुकामास आले. आणि पुढें न जातां  परत ब्राम्हणवाड्यास आले. आणि जुनरास जाऊन फुलगावावर मुकाम झाला. तेथोन कुच करून पुन्हा सालप्याच्या घाटानें करनाटकांत जाण्याचा विचार ठरविला. कुच करून राजवाडीस मुकामास जावें असा विचार होता, तों प्रथम प्रहर दिवसाचे आंत नगराहून पुण्यास जाण्याकरितां इंग्रजाची फौज एक पलटण व दोनशें स्वार व दोन तोफा घेऊन कोरेगावास मुकामास आले. तेथून फुलगावीं एक कोसावरच पेशव्याचा मुकाम आहे हें त्यांस माहित नव्हते. व पेशव्यांकडील फौजेनें इंग्रजांकडील फौज कोरेगावावर आलेली पाहून त्यांजवर धावा केला. इतक्यांत त्या पलटणींतील साहेबांनी जलदी करून कोरेगावांतील दोनतीन वाड्यांत शिरून तोफ चालू करून पलटणी लोक फेरा मारू लागले. तेणेंकरून पेशवे याजकडील लोक अजमासे दीडशे व इंग्रजाकडीलही सुमारे चारशांवर मेले व जखमी झाले असतील. याप्रसंगी बापूसाहेबानीं बहूत शूरत्व केले. इंग्रजी फौज ही धैर्य धरून अस्तमानपर्यंत लढत होती, रात्र झाल्यावर पेशवे यांजकडील फौजेनें इंग्रजी फौजेला सोडून राजेवाडीस मुकामास गेले. ' ( संदर्भ ग्रंथ :- सरदार बापू गोखलेच्या विषयी लिहिलेल्या दोन बखरींच्यापैकी  विठ्ठल पुणेकर लिखित बखरीमधील हा उतारा आहे. सदर बखरीतील उतारे श्री. सदाशिव आठवले यांच्या ' सरदार बापू गोखले ' या ग्रंथात छापले आहेत. विठ्ठल पुणेकर यांनी बापू गोखले विषयीची बखर कधी लिहिली याविषयी माहिती मिळत नाही. त्यामुळे या बखरीत कोरेगाव येथील लढाईच्या संदर्भात जी काही माहिती आलेली आहे त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे एक कोडंच आहे. परंतु, कोणत्याही बखरीतील सर्वच माहिती सर्वस्वी टाकाऊ नसते हे इतिहासप्रेमी वाचकांना आणि अभ्यासकांना माहिती आहेच. त्यामुळेच या बखरीतील उपरोक्त उतारा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला आहे. )


  3)   '..... ...... ........ ब्राम्हणवाड्याहून पेशवा पुन्हा पुण्याच्याच रोखाने निघाला तो ता. 30 डिसेंबर 1817 रोजी चाकण येथे आला. मात्र  तेथून बापूच्या सूचनेमुळे असो किंवा स्वतःच्याच लहरीप्रमाणे असो पुण्याकडे न जाता जवळपासच पण दुसऱ्याच कोणत्यातरी स्थळाकडे चालू लागला. बाजीराव पुण्यास जाणार, त्याचेबरोबर चांगला फौजफाटा असणार, तिथे कदाचित त्याला आणखी लोक सामील होणार आणि आपला पुण्यावरचा ताबा सुटणार अशी भीती वाटून इंग्रजांची एक फौज शिरूरहून कॅ. Staunton ह्याचे नेतृत्वाखाली पुण्याकडे निघाली. पुण्यास कर्नल बर होता, पण त्याच्याकडे सैन्यही फारसे नव्हते आणि युद्धसामग्रीही बेताचीच होती. कॅप्टन Staunton ची फौज ता. 1-1-1818 रोजी कोरेगावास पोचली तेव्हा पेशव्यांच्या फौजेचा तळ तेथे आधीच पडलेला होता. तिचे आधिपत्य अर्थात बापूकडेच होते. बापूने पेशव्यास साताऱ्याकडच्या मार्गाला लावले आणि स्वतः कोरगावी इंग्रजांविरुद्ध मोर्चेबांधणी सुरु केली. बापूने प्रथम तोफांचा मारा करण्याचे योजिले, परंतु इंग्रजांनी आडोशाच्या सुरक्षित जागा शोधल्यामुळे ते गोळ्यांच्या टप्प्यात येत नाहीत हे लक्षात येताच त्याला युद्धतंत्र बदलावे लागले. बंदुका आणि तलवारी हाती घेऊन मराठे पुढे धावले. इंग्रजांनी चांगला प्रतिकार केला ह्यात शंका नाही. तथापि ह्या ठिकाणी इंग्रजांना काय किंवा मराठ्यांना काय मोठे निकाली युद्ध कोणालाच करायचे नव्हते. इंग्रजांना हे मार्गातील संकट पार करून पुढे पुण्याकडे जावयाचे होते, तर बापूला त्यांना अडवून धरून पेशव्यास दूर जाण्यास अवसर द्यावयाचा होता. दोघांचेही हेतू सिद्धीस गेले. ता. 4 जानेवारी 1818 च्या एका बातमीपत्राप्रमाणे त्या तारखेपर्यंत बाजीराव फुलगावला मुक्कामाला आलेला होता.' ( संदर्भ ग्रंथ :- सरदार बापू गोखले - लेखक :- सदाशिव आठवले )
     विश्लेषण :-  कोरेगावच्या लढाई विषयी मराठी रियासत आणि सदाशिव आठवले यांचे सरदार बापू गोखले हे पुस्तक फारसे विश्वसनीय असल्याचे दिसून येत नाही. तुलनेने विठ्ठल पुणेकर लिखित बापू गोखल्यांची बखर या ठिकाणी अधिक विश्वसनीय अशी वाटते. याचे कारण म्हणजे, बखर लेखकास कोणत्याही पक्षाचे गुणगान करण्यापेक्षा आपल्याला जी माहिती ज्ञात आहे ती लिहून काढणे गरजेचे वाटत होते. त्याउलट सरदेसाई आणि सदाशिव आठवले यांचे लेखन गोंधळात टाकण्यासारखे असल्याचे दिसून येते. कोरेगाव येथील लढाईमध्ये मराठी फौजेचा विजय झाल्याचे सरदेसाई अप्रत्यक्षपणे नमूद करतात परंतु त्यासोबतच इंग्रजांनी मोठ्या शर्थीने आपला बचाव केल्याचे आणि लढाईमधून बाजीराव पेशवा पळून गेल्याचेही त्यांनी नमूद करून वाचकांचा गोंधळ मात्र उडवून दिला आहे.
        सदाशिव आठवले यांनी दिलेली  माहिती देखील जवळपास अशीच आहे.  त्यांच्या मते हि लढाई एकप्रकारे अनिर्णीत अशी  होती. इथपर्यंत ठीक आहे परंतु, 4 जानेवारीच्या बातमीपत्राचा हवाला देत ते लिहितात कि त्या तारखेपर्यंत बाजीरावाचा मुक्काम फुलगावी होता हे काही पटत नाही. याचे कारण म्हणजे फुलगाव हे स्थळ चाकण आणि भीमा - कोरेगाव यांच्या दरम्यान असून या ठिकाणाहून भीमा कोरेगाव अगदीच जवळ म्हणजे 8 - 10 किलोमीटर्सपेक्षाही कमी अंतरावर आहे. बाजीराव पेशव्याच्या पाठीवर जनरल स्मिथची फौज असल्याचे खुद्द आठवले यांनीच लिहिले आहे आणि असे असूनही कोरेगावची लढाई झाल्यावर बाजीरावाचा मुक्काम 4 जानेवारी रोजी फुलगावी होता असे ते लिहितात याला काय म्हणावे ? याउलट विठ्ठल पुणेकर लिखित बखरीमधील माहिती विश्वसनीय वाटते कि लढाई झाल्यावर मराठी फौजा राजेवाडीस निघून गेल्या. राजेवाडी हे स्थळ जेजुरीच्या जवळपास असून भीमा - कोरेगावच्या युद्धक्षेत्रापासून सुमारे 30 - 40 किमी. अंतरावर आहे.
                   भीमा - कोरेगाव येथे पेशव्याची आणि ब्रिटीश फौजेची लढाई घडण्यापूर्वीच्या घटनांचा परत एकदा थोडक्यात आढावा घेणे गरजेचे आहे. खडकी आणि येरवडा येथील लढाया झाल्यानंतर बाजीराव पुणे शहर सोडून निघून गेला. त्याच्या पाठीवर जनरल स्मिथच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश फौजेची एक तुकडी होतीच. स्मिथच्या फौजेला पाठीवर घेऊन बाजीराव पुण्याच्या आसपासच्या दीड - दोनशे किलोमीटर्सच्या परिघात पळत होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ब्रिटीश सैन्याचा एखाद्या ठिकाणी ठासून उभा राहून पराभव करण्याची त्याची इच्छा होती कि नव्हती या वादात या ठिकाणी तरी शिरण्याचे काही प्रयोजन नाही परंतु, इंग्रजांच्या सैन्याशी मोठी लढाई देण्याचे तो टाळत होता हे एक उघड गुपित आहे. कोरेगावची लढाई घडून येण्यापूर्वी बाजीराव  जुन्नरच्या  आसपास ब्राम्हणवाडा  येथे मुक्कामास होता. तेथून तो पुण्याच्या दिशेने निघाला असला तरी पुण्याला जाण्याची त्याची इच्छा कितपत होती याविषयी शंकाच आहे. जनरल स्मिथ हा पेशव्याच्या पाठलागावर होताच. त्याला रोखून धरण्याची कामगिरी बहुतेक त्रिंबकजी डेंगळेवर सोपवण्यात आलेली होती असे दिसून येते. अर्थात, हे कार्य दुसऱ्या  कोणत्यातरी सरदारावर देखील सोपवले असावे. असो, ब्राम्हणवाडा येथून बाजीराव पुण्याचं दिशेने निघाला. त्याच्या हेतूंची / बेताची  इंग्रजाना अजिबात कल्पना नव्हती असेच म्हणावे लागते. मुंबईची इंग्रज फौज पुण्याच्या दिशेने येत होती तिला अडवण्याचा पेशव्याचा बेत असावा किंवा पुणे शहर परत एकदा आपल्या ताब्यात घेण्याचा त्याचा हेतू असावा असा इंग्रजांचा समज झाला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बाजीरावाचे मनसुबे उधळून लावण्याचे त्यांनी ठरवले. पुण्यामध्ये इंग्रजांची फारशी मोठी फौज नव्हती. पुण्यातील इंग्रजांना त्वरीत कुमक करेल असे एक ठाणे जवळच होते व ते म्हणजे शिरूर हे होय ! या ठिकाणी असलेल्या इंग्रज फौजेस तातडीने पुण्यास जाण्याचा आदेश देण्यात आला. इकडे जनरल स्मिथ मराठी सैन्याचा प्रतिकार मोडून काढत बाजीरावास पकडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता. बाजीराव पेशवा ब्राम्हणवाडा येथून चाकणच्या पुढे फुलगावी मुक्कामास आला. शिरूर येथील ब्रिटीश सैन्यावर हल्ला करण्याची त्याची योजना नव्हती त्याचप्रमाणे पुण्यात जाण्याची देखील त्याची इच्छा नव्हती. नाहीतर चाकण येथून तो फुलगावी न जाता तडक पुण्याला जाऊ शकत होता. यावेळी पुण्यात इंग्रजांची फौज अगदीच अत्यल्प अशी होती. जर बाजीराव पुण्यावर चालून गेला असता तर पुणे शहराचे रक्षण त्यांच्या  हातून झालेच असते असे म्हणता येत नाही. परंतु बाजीराव अथवा त्याचे सरदार अधिक व्यवहारी होते.  जनरल स्मिथच्या नेतृत्वाखाली बडी इंग्रज फौज आपल्या पाठलागावर आहे याची त्यांना कल्पना होती. तसेच शिरूर येथे इंग्रजांची एक तुकडी मुक्कामाला असल्याची माहिती त्यांना  होतीच. पुणे ताब्यात घेतल्यावर शिरूर येथील ब्रिटीश तुकडीचा बंदोबस्त त्यांना करावा लागला असता आणि तोपर्यंत ज. स्मिथ पुण्याजवळ येऊन ठेपला असता. किंवा असेही म्हणता येते कि एकाच वेळेस त्यांना ज. स्मिथच्या आणि शिरूर येथील ब्रिटीश सैन्याचा मुकाबला दोन आघाड्यांवर करावा लागला असता.  हे सर्व लक्षात घेता  पुणे ताब्यात घेण्याचं भरीस न पडता स्मिथ पासून शक्य तितके लांब जाण्याचाच निर्णय मराठी सरदारांनी किंवा पेशव्याने घेतला असे म्हणता येते.
                त्यामुळेच पुणे उजव्या बाजूला टाकून फुलगावी  येथे मराठी सैन्याचा तळ पडला. आधी सांगितल्यानुसार ब्रिटिशांना मराठी मुत्सद्यांच्या बेताची अजिबात कल्पना नसल्याने त्यांनी पेशवा कदाचित पुण्यावर चालून जाईल हि शक्यता गृहीत धरून शिरूर येथील ब्रिटीश तुकडीला पुण्याला जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार शिरूर येथील इंग्रज फौज कॅप्टन Staunton च्या नेतृत्वाखाली पुण्याच्या दिशेने रवाना झाली. शिरूर येथील ब्रिटीश फौज आपल्यावर चालून येईल अथवा त्या फौजेचा पुण्याला जाण्याचा बेत असावा अशी कल्पना मराठी सरदारांना होती कि नाही याविषयी ठामपणे सांगणे शक्य नाही.  कारण, त्यांना जर तशी काही कल्पना असती तर भीमा - कोरेगाव नजीक त्यांनी नदीउतार रोखून धरण्याचा किंवा नदी पाठीशी घालून भीमा - कोरेगाव हे स्थळ काही काल आपल्या ताब्यात ठेऊन शिरूरच्या फौजेचा मार्ग रोखून धरण्याचा बंदोबस्त केला असता. परंतु त्यांनी असे काहीच केल्याचे दिसून येत नाही. यावरून शिरूर येथील इंग्रजी फौजेच्या बेताची  त्यांना फारशी माहिती असल्याचे दिसून येत नाही.  इकडे शिरूरच्या इंग्रज पथकाला पेशवा फुलगावी मुक्कामाला असल्याची बातमी मिळाली नव्हती असे दिसून येते. उपलब्ध माहितीवरून शिरूर येथील ब्रिटीश सैन्य 31 डिसेंबर 1817 रोजी सायंकाळी किंवा रात्रीच पुण्याच्या दिशेने रवाना झाला होते. साधारण 35 - 40 किमी. अंतर कापून हि फौज जेव्हा कोरेगाव जवळ येऊन पोहोचली त्यावेळी शत्रू सैन्याला समोर उभे असल्याचे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असावा. परंतु, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी प्रसंग ओळखून कोरेगाव ताब्यात घेण्याची चलाखी केली. मराठी फौजांनी जर यापूर्वीच कोरेगावचा ताबा घेतला असता तर इंग्रजांना या वेळी आपला बचाव करणे अतिशय अवघड गेले असते पण मराठी सरदार याबाबतीत फारच गाफील राहिले असे म्हणावे लागते. इकडे ब्रिटीश लष्कराची निशाणे दृष्टीस पडताच मराठी मुत्सद्द्यांत चलबिचल  झाली असावी. कारण उपलब्ध माहितीवरून त्या दिवशी फुलगाव येथील मुक्काम उठवून साताऱ्याच्या दिशेने  जाण्याचे त्यांचे आधीच ठरले होते व त्यानुसार बरीचशी मराठी पथके पुढे रवाना झाली होती. खुद्द बाजीराव पेशवा आणि बापू गोखले व इतर काही सरदार मागे राहिले होते. सातारचा छत्रपती प्रतापसिंह यावेळी बाजीरावासोबत होता कि मराठी सैन्यासह तो आधीच पुढे गेला होता याची चर्चा या ठिकाणी तशी अप्रयोजक आहे. कारण छत्रपती लढाईच्या ठिकाणी हजर असला काय आणि नसला काय दोन्ही सारखेच होते. असो, रात्रभर प्रवास करून दमलेली ब्रिटीश पथके कोरेगावात पोहोचली त्यावेळी सकाळचे 9 - 10 वाजून गेले होते. तरीही या ठिकाणी मराठी सैन्याशी लढाई दिल्याखेरीज आपला निभाव लागणे शक्य नसल्याचे त्यांनी ओळखले. माघार घेण्याचा किंवा पुढे पुण्याला जाण्याचा आता प्रश्नच नव्हता. कारण, मराठ्यांची सेना पुढे जय्यत तयारीनिशी सज्ज असल्याने पुणे तर दूरच पण सुरक्षितपणे माघार घेणे देखील शक्य नव्हते. असो, इकडे बाजीरावाने आपल्या सरदारांना ब्रिटीश फौजांशी लढण्याची आज्ञा दिली किंवा असेही म्हणता येईल कि मराठी सरदारांनी इंग्रजांना लढाईमध्ये गुंतवण्याचे ठरवून बाजीरावाला सातारा जवळ करण्याचा सल्ला दिला. दोनपैकी काय खरे असेल ते असेल, पण हे निश्चित कि कसलीही पूर्वकल्पना नसताना किंवा आगाऊ डावपेच आखलेले नसताना मराठी व इंग्रजी सैन्याला कोरेगाव येथे एकमेकांशी झुंजणे भाग पडले.
              मराठी सरदारांच्यापेक्षा इंग्रज अधिकारी संधी व भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यात जास्त कुशल असल्याचे या लढाईत दिसून येते. रात्रभर प्रवास केलेला असूनही कोरेगाव हे स्थळ ताब्यात घेण्यात त्यांनी कमालीची तडफ दाखवली. यावेळी ब्रिटीश पथकांच्या सोबत तोफा असल्याने त्यांनी माऱ्याच्या जागा पाहून आपल्या तोफा पेरल्या. मराठी सैन्याचा तोफखाना आधीच पुढे गेल्याने त्यांना आपल्या तोफखान्याचे पाठबळ लाभू शकले नाही किंवा त्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफा पुढे पाठवल्यामुळे मागे राहिलेल्या लहान तोफांचा या प्रसंगी मराठी फौजेला फारसा फायदा झाला नाही असे लढाईच्या उपलब्ध वर्णनावरून लक्षात येते. असो, कोरेगावात घुसलेल्या इंग्रजी फौजांचा समाचार घेण्याची किंवा त्यांना लढण्यात गुंतवण्याची जबाबदारी बापू गोखलेवर येऊन पडली होती. इंग्रजांनी गावाचा आश्रय घेतलेला असल्याने बापूला आपल्या तोफांनी इंग्रज पथकांना सडकून काढता आले नसावे. त्याउलट मराठी फौजा मोकळ्या मैदानावर असल्याने आणि ब्रिटीशांनी मोक्याच्या जागी तोफांचे मोर्चे उभारले असल्यामुळे त्यांच्या तोफा मराठी सैन्यावर आगीचा वर्षाव करत होत्या. इंग्रजांचा तोफखाना बंद पडला नाही तर आपल्या फौजेची बरीच हानी होईल हे ओळखून बापूने लष्कराला कोरेगावावर चालून जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार मराठी पथके कोरेगावावर चालून गेली. परंतु, इंग्रज सैनिकांनी गावातील घरांचा आश्रय घेतलेला असल्याने त्यांच्यावर थेट चाल करणे किंवा हातघाईच्या लढाईत त्यांचा समाचार घेणे त्यांना शक्य झाले नाही. 
              कोरेगावात इंग्रज आणि मराठी सैनिकांची हातघाईची लढाई झाली कि नाही किंवा झाली असल्यास ती कधी झाली ? तसेच बापू गोखल्याने  कोरेगाव ताब्यात घेण्यासाठी किती हल्ले चढवले व इंग्रजांनी ते कसे परतवून लावले  याविषयी सध्या तरी लिहिणे मला शक्य नाही. कारण तितकी माहिती याक्षणी माझ्याकडे नाही. पुढेमागे याविषयी अधिक माहिती मिळाल्यास मी या लढाईचे तपशीलवार वर्णन जरूर देईन. या ठिकाणी लढाईनंतर नेमके काय घडून आले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे व माझ्याकडे जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावरून असे अनुमान बांधता येते कि सदाशिव आठवले लिहीतात त्यानुसार हि लढाई अनिर्णीत राहिली. भीमा - कोरेगाव येथील लढाईमध्ये ना मराठी सैन्य जिंकले ना इंग्रज ! याचे कारण म्हणजे, युद्ध संपल्यावर सामान्यतः विजयी पक्ष रणांगणाचा ताबा घेतो ते या ठिकाणी घडून आले नाही. अर्थात काही अपवादात्मक प्रसंगी विजयी पक्षाला रणभूमी ताब्यात घेण्यात यश मिळत नाही किंवा काही कारणास्तव युद्धभूमी ताब्यात न घेता विजयी पक्षाला त्या ठिकाणाहून निघून जावे लागते हे गृहीत धरून देखील कोरेगाव येथे मराठी किंवा इंग्रजी फौजेचा विजय झाला असे ठामपणे म्हणता येत नाही. समजा, मराठी सैन्य जिंकले असे म्हणावे तर मुठभर इंग्रज फौजेची त्यांनी कत्तल वा लूट का केली नाही हा प्रश्न उद्भवतो. इंग्रजांच्या बाबतीत देखील हेच म्हणता येईल. कदाचित ब्रिटीश पक्षाच्या वतीने असेही समर्थन करता येईल कि, पूर्ण रात्र प्रवास केल्याने आणि दिवसभर युद्धाचा ताण पडल्यामुळे पराभूत मराठी सैन्याचा पाठलाग करणे त्यांना शक्य झाले नसावे. परंतु, हा मुद्दा देखील तितकासा पटण्यासारखा नाही. किंबहुना काहीकाळ  हा मुद्दा जर मान्य केला तर पुढचा प्रश्न उद्भवतो कि, प्रतिहल्ल्यात किंवा माघार घेणाऱ्या मराठी सैन्याची त्यांनी कितपत हानी केली ? लढाईची उपलब्ध वर्णने लक्षात घेतली असता भीमा नदी पाठीशी घेण्यात दोन्ही पक्षांना अपयश आल्याचे दिसून येते. किंबहुना दोघांनाही नदी पाठीशी घेणे त्यावेळी जमले नाही. हे ध्यानात घेता कोरेगावातून माघार घेणाऱ्या व नदीपार करून पळून जाणाऱ्या मराठी सैन्याचा पाठलाग करून त्यांची कत्तल उडवण्याची संधी इंग्रजांनी का दवडली याची उकल होत नाही. म्हणूनच इंग्रज किंवा मराठी फौजा कोरेगाव येथे निर्णायक विजय मिळवू शकल्या नाहीत असे म्हणावे लागते. 
        सूर्यास्तापर्यंत लढाई देऊन बापू गोखलेने जेजुरीच्या मार्गाने साताऱ्याच्या दिशेने कूच केले. लढाई चालू असताना बाजीराव पेशवा त्याच मार्गाने पुढे साताऱ्याच्या रोखाने गेला असल्याने त्याची पिछाडी सांभाळत त्याच मार्गाने जाणे बापूला भाग होते. कोरेगाव येथील लढाईमध्ये सहभागी घेतलेल्या मराठी सैन्याने जेजुरीच्या अलीकडे असलेल्या राजेवाडी या ठिकाणी आपला तळ ठोकला. हे ठिकाण कोरेगावपासून सुमारे 30 - 35 किलोमीटर्स अंतरावर आहे. कोरेगावच्या लढाईने बाजीराव पेशव्याच्या फौजेच्या अनेक उणीवा मात्र परत एकदा प्रकर्षाने जगासमोर म्हणा किंवा शत्रूसमोर आल्या असेच म्हणावे लागते. जरी या संघर्षात मराठ्यांची सर्व फौज सहभागी झाली नसली तरी इंग्रजांच्या एका पथकाचा निःपात करण्यात त्यांना आलेले अपयश ठळकपणे लक्षात येते. पाठीवर असलेल्या जनरल स्मिथच्या प्रचंड फौजेला रोखून धरण्याची जबाबदारी यावेळी मराठी सैन्याने किंवा काही इतिहासकार सांगतात त्यानुसार त्रिंबकजी डेंगळेने पार पाडली नसती तर कोरेगाव येथे बापू गोखलेच साफ निकाल लागला असता असेच म्हणावे लागते.  असो, कोरेगावची लढाई झाल्यावर शिरूरहून पुण्याला निघालेली ब्रिटीश फौज, लढाई झाल्यावर दुसऱ्या दिवशी शिरूरच्या दिशेने मागे वळली. जर कोरेगावची लढाई त्यांनी जिंकली असती तर विजयी पथके जल्लोष करत थेट पुण्याला गेली असती आणि त्या शहरात आपल्या विजयाचा मोठा उत्सव त्यांनी केला असता. यामुळे पुण्यातील पेशव्याच्या व पेशवाईच्या समर्थकांना मोठीच दहशत बसली असती. परंतु कोरेगावात इंग्रजांचा विजय झाला नसल्याने त्यांनी पुण्याकडे जाण्याचे एकप्रकारे टाळले असेच म्हणावे लागते. या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा उद्भवतो कि, जरी इंग्रजांचा कोरेगाव येथे पराभव झाला नसला तरी त्यांनी तसेच पुढे पुण्यात जाण्याचे का टाळले असावे ? माझ्या मते, जनरल स्मिथ 2 जानेवारी 1818 रोजी चाकण जवळ आल्याची बातमी मिळाल्यामुळे आणि कोरेगावच्या झुंजात ब्रिटीश सैन्याची बरीच हानी झाल्यामुळे तसेच नजीकच्या काळात  तरी पुण्यावर बाजीरावाची स्वारी येण्याची शक्यता नसल्याने शिरूरहून आलेली ब्रिटीश पथके परत मागे फिरली असावीत.  
             कोरेगाव येथे इंग्रजांनी जो काही स्तंभ अथवा स्मारक उभारले आहे ते ब्रिटीशांच्या विजयाचे प्रतीक आहे असे म्हणणे धाडसाचे आहे. शत्रूच्या तुलनेने त्यांची फौज अल्प असताना देखील मोठ्या शौर्याने आणि शिकस्तीने सामना करून त्यांनी आपला बचाव केला त्याबद्दल इंग्रजांना अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांनी त्या ठिकाणी एक स्मारक उभारले असल्यास नवल नाही.