Monday, September 24, 2012

बाजीराव पेशव्याची निरर्थक दिल्ली स्वारी !            स. १७३७ मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्याने दिल्लीवर चढाई करून एकप्रकारे मोगल बादशाहीचे नाक कापले असे समजले जाते. बाजीरावाच्या या स्वारीविषयी बऱ्याच प्रमाणात लेखन झाले असले तरी या मोहिमेतील कित्येक महत्त्वाच्या गोष्टींकडे / घटनांकडे मराठी इतिहास अभ्यासकांचे दुर्लक्ष झालेले आहे.
         बाजीरावाच्या दिल्लीवरील धडकेचे तारखांनिशी खालील प्रमुख टप्पे मराठी रियासत खंड – ४ मध्ये देण्यात आले आहेत.
(१) ५ – १ – १७३७ :- बाजीराव नर्मदापार झाला
(२) १० – १ – १७३७ :- भेलसा काबीज ; बुंदेलखंडात भदावर स्वारी
(३) १ मार्चच्या सुमारास होळकर व बाजी भिवराव यमुनापार
(४) १२ – ३ – १७३७ :- जळेश्वर नजीक होळकराचा पराभव
(५) १६ – ३ – १७३७ :- सादतखान आगऱ्यासमोर यमुनेवर दाखल
(६) २२ – ३ – १७३७ :- कोटीला येथे होळकर बाजीरावास सामील
(७) २३ – ३ – १७३७ :- सादतखान, खानडौरा व बंगश यांची मथुरेवर भेट
(८) २८ – ३ – १७३७ :- बाजीरावाची दिल्लीवर धडक
(९) २९ – ३ – १७३७ :- रामनवमीस दिल्ली येथील कालिकेची यात्रा लुटली
(१०)        ३० – ३ – १७३७ :- होळकराने बादशाही फौजेचा पराभव केला ; याच दिवशी कमरुद्दीनखानासोबत बाजीरावाचा संघर्ष घडून आला
(११)        १ – ४ – १७३७ :- खानडौरा, सादतखान व महंमदखान बंगश यांच्या फौजा दिल्लीस दाखल
(१२)        ५ – ४ – १७३७ :- बाजीराव जयपूर नजीक दाखल
{ मराठी रियासतीमध्ये सरदेसाई यांनी बाजीरावाच्या या मोहिमेच्या ज्या तारखा दिल्या आहेत, त्या अजिबात विश्वसनीय नाहीत. दुदैवाने मराठी रियासतींचे संपादन करणाऱ्यांनी देखील याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. तूर्तास, अचूक अशा तारखा माझ्याकडे उपलब्ध नसल्याने पुढील विवेचनासाठी मराठी रियासतीमधील काही तारखांचा आधार घेणे भाग आहे. }
        वस्तुतः स. १७३६ मध्येचं बाजीराव दिल्लीवर चालून जाण्याच्या बेतात होता पण परिस्थिती अनुकूल नसल्याने त्याने आपला हात आवरता घेतला.
   स. १७३७ मध्ये बाजीरावाने मागील वर्षी रहित केलेला बेत अंमलात आणण्याचा निश्चय केला. बाजीराव असा काहीतरी धाडसी निर्णय घेईल याची मोगली मुत्सद्द्यांना जाणीव होतीच. त्यानुसार सर्व उमरावांना युद्धासाठी सज्ज होण्याचे इशारे गेले होते. मोगल वजीर कमरुद्दीनखान मोठ्या तयारीनिशी दिल्लीतून बाहेर पडणार होता. आघाडीला त्याने मीरबक्षी खानडौरा व महंमदखान बंगश यांना पाठवले. फैजाबादहून सादतखान आपला पुतण्या अबुल मन्सूरखान सफदरजंग याच्या सोबत आगऱ्याच्या दिशेने निघाला. दक्षिणेत निजामाला देखील बादशाहने फर्मान पाठवून आपल्या मदतीस बोलावले. निजामाला पायबंद देण्याची जबाबदारी बाजीरावने चिमाजीवर सोपवली होती. त्याशिवाय शाहूचे मराठी सरदार देखील याच कामगिरीवर नियुक्त करण्यात आले होते. परंतु, निजाम हेतुपूर्वक निष्क्रिय राहिल्याने त्याच्याकडून बाजीरावास किंवा मराठी राज्यास यावेळी कसलाही उपद्रव झाला नाही.
       बाजीरावाने दिल्ली स्वारीचे वर्णन करणारे एक प्रदीर्घ पत्र आपला धाकटा भाऊ चिमाजी यांस लिहिले आहे ते खालीलप्रमाणे :-
 “ श्रियासह चि. रा. आपा यांसी, बाजीराव बल्लाळ आशीर्वाद उपरी, येथील कुशल तागाईत छ १५ जिल्हेज मु. नजीक सवाई जयनगर. विशेष बुंदेलखंडचा राजा जगतराज याचे हवाली बुनगे बुंदेलखंडांत रवाना करून आम्ही सडे जाहलो. याचे वृत्त सादतखानाचें युद्ध होऊन सरदार आल्याचें वर्तमान विस्तारें लेखन चतुर्भुज कासिदाबरोबर पत्रें पाठविलीं, तीं पावून सविस्तर वर्तमान कळलेंच असेल. सादतखान यमुना उतरोन आगरीयासीं आला. त्यासी गांठ घालावी तरी तो आगरियाचा आश्रय असतां मोडे न मोडे. गंभीर यमुनेच्या संगमीं धीर धरून राहवें तरी ते जागीं जाऊन कोतरखळ्या फार ; खानडवरा व महंमदखान बंगस वगैरे दिल्लीहून आगरियास येत होते ते, व सादतखान एक झालिया मनसबा भारी पडेल. याजकरितां संगमीं राहणें उत्तम नव्हे. दुसरें, सादतखानांनी बादशहास व अमिरास लिहून पाठविलें कीं, मराठ्यांची फौज यमुना उतरोन आली होती ते बुडविली. दोन हजार स्वार मारिले व दोन हजार नदींत बुडाले. मल्हारजी होळकर व विठोबा बुळे कामास आले. बाजीरावाची धाड आली होती तिची गत हे जाहली. आम्ही यमुना उतरोन मराठे बुडवून चमेलीपार करितों. म्हणून कित्येक गप्पा लिहून पाठविल्या. पातशहांनीं खुशाली कळवून सादतखानास वस्त्रें व मोत्यांची माळ व शिरपाव पाठविला ; व वकीलासही शिरपाव दिला. सादतखानांनीं आपली बाजू शेर करून घेतली. वरकड अमीरांसही कित्येक प्रकारें धिक्कारून लिहिले. तें वृत्त रा. धोंडो गोविंद यांनीं वरचेवर लिहून पाठविलें. तात्पर्यार्थ आमचे फौजेंत जीव नाहीं केवळ निर्जीव, बुडवून नेस्तनाबूद केली असें लिहित. लपंडाव करून दाखविले. मोगली कारभार, आपण ऐकत जाणतच आहेत. करावें थोडें, लिहावें फार. पातशहास सत्य भासलें तें मिथ्या केलें पाहिजे. त्याचे विचार दोन. एक सादतखानास बुडवावें, किंवा दिल्लीस जाऊन दिल्लीचे पूर जाळावे तेव्हां मिथ्या होईल. त्यास, सादतखान आगरे सोडीनासे देखोन, आम्ही दिल्लीस जावयाचा निश्चय केला. पुरे जाळावे व मराठे आहेत असें पातशहास अवलोकन करवावें, ऐसा विचार करून, २६ जिल्कादीं ( १८ – ३ – १७३७ ) कूच करून पातशाही रस्ता सोडून लांब मजला करून दमनसिंग चूडामण जाठाचे मुलखांतून नेवातयाचे सरहद्दें डोंगर किनाऱ्यानें चालिलों.
     खानदौरा व बंगस आगरियास गेले. यांची व सादतखानाची भेट २ जिल्हेजीं ( २३ – ३ – १७३७ ) झाली. ( पेशव्यांचा वकील ) धोंडोपंत खानदौरापाशीं होते. सादतखानानें खानदौरास सांगून पाठविलें, कीं ‘ बाजीराव याची फौज आपण मोडली. बुनगे पळाले. ते खासाही चमेल उतरोन गेले. अद्याप तुम्ही त्याची खुशामत करितां ! वकील ठेवून घेतला आहे हें कोण्या विचारे ? वकीलास निरोप देणें.’ त्यावरून धोंडो वकील यासीं निरोप दिल्हा. आम्हांजवळ आले. कमरुद्दीनखान, अजीमुल्लाखान वगैरे आले. आम्हीं त्यांजसीं गांठ न घातली. सातां कोसांवर उजवे बाजूस आमचे हातें त्यांस टाकून लांबलांब मजली वीस कोसांच्या करून दोन मजलींनीं ७ जिल्हेजीं ( २८ मार्च ) दिल्लीस बारापुला व कालिकेचें देऊळ उजवे हातें टाकून जाऊन कुशबंदी नजीक शहर येथें मुक्काम केला. पुऱ्यास आगी देऊन शहर खाक करावें, त्यास दिल्ली महास्थळ, पातशहा बरबात जालियांत फायदा नाहीं. दुसरें, पातशहाचे व खानडौराचे चित्तांत सलूख करावयाचें आहे. मोगल यांस सलूख करुं देत नाहींत. अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो. याकरितां आगी लावायाचें तहकूब करून, पातशहास व राजे बखतमल्ल जयसिंगाचा वकील दिल्ली येथें यांसीं पत्रें पाठविलीं. शहरांतून दोन हत्ती व घोडी उंटें आलीं होतीं तीं सांपडलीं. लष्करचे लोकांनीं शहरचे लोक मंगळवार रामनवमी २९ मार्च रोजीं भवानीचे यात्रेस बाहेर आले होते, त्यांस झांबडाझांबड केलें. दुसरे दिवशीं बुधवारीं ( ३० मार्च ) पातशहाचे आज्ञेनें बखतमल्ल यांनीं उत्तर पाठविलें कीं, धोंडोपंतास पाठविणें. त्यावरून मशारनिल्हेस पाठवावें तरी, आम्ही शहराजवळ आलों, यांमुळें दिल्लीत गलबला झाला, यांमुळें पाठविले नाहींत. भला मनुष्य व स्वार पाठवून देणें. मशारनिल्हेस पाठवून देतों, आम्ही शहरानजीक राहिल्यानें, शहरास उपसर्ग लागेल, याकरितां कूच करून झीलच्या तलावावर जातों.’ म्हणून उत्तर पाठवून आम्हीं कूच केलें.
      शहराजवळून येत असतां, पातशहांनीं नबाब मीर हसनखान कोका दरोगा खास चौकी, नबाब अमीरखान व खोजे रोजअफजूखान, राजे शिवसिंग जमातदार रिसाले अमीर, व मुजफरखान, नायब बक्षीगिरी आहादी व नबाब मुजफरखान, खानीदौराचे बंधु, सात आठ हजार फौजेनिशीं शहराबाहेर रिकाबगंजाजवळ आले. राजश्री सटवाजी जाधव पुढें गेले होते त्यांची व मोगलांची गांठ पडली. झटपटी होत होती. मशारनिल्हेनीं आम्हांस सांगोन पाठविलें त्यावरून रा. मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे व तुकोजी पवार व यशवंतराव पवार, व मानाजी पायगुडे व गोविंद हरि पाठविले. त्यांचें यांचें झुंज होऊन मोगल मोडिले. राजे शिवसिंग वगैरे दहा बारा दरबारी ठार झाले. नबाब मीरहसनखानकोका जखमी झाला. दिगरबादे चौकी पातशहाचे अडीच तीनशें मेले. चारशें माणूस जखमी जालें. रोजअफजूखान व अमीखान व मुज्फरखान वगैरे शहरांत पळोन गेले. रा. राणोजी शिंदे याजकडील इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेली. वरकड नामांकित माणूस कोणी ठार झालें नाहीं. घोडे माणूस जखमी झाले. तदनंतर आम्ही झीलच्या तलावावर मुक्काम केला. ( दिल्लीचे दक्षिणेस तीन मैल. झील म्हणजे सखल जमीन ) संध्याकाळच्या चार घटका दिवस बाकी राहिला, तों कमरुद्दीनखान पातशहापुरावरून आल्याची खबर आली. तेच क्षणीं आम्ही तयार होऊन गेलों. त्यांचे आमचे फौजेचें युद्ध झालें. बारांत गेलेला एक हत्ती रा. यशवंतराव पवार यांणीं घेतला. घोडीं उंटें लष्करांत आलीं, त्यास दिवस अस्तमानास गेला. रात्रींचा दम धरून चौगीर्द मोगल वेढून बुडवावा, तरी झीलचा तलाव सोळा कोस लांब, उजवीकडे कमरुद्दीनखान, पुढें शहर. दुसरें, आम्ही दिल्लीस गेल्याचें वर्तमान नबाब खानदौरा व सादतखान व महंमदखान बंगस यांसी ७ जिल्हेजीं ( २८ मार्च ) मंगळवारीं राधाकुंडाचे मुक्कामीं कळतांच सडेसड होऊन पंचवीस तीस हजार फौजेनें बडेलास बत्तीस कोस येऊन मुक्काम केला. दुसरे दिवशीं ( बुधवारीं ) अलावर्दीच्या नाल्यावर पंचवीस कोस मुक्काम केला.
       गुरुवारीं प्रातःकाळी खानदौरा, सादतखान, बंगस व कमरुद्दीन सारे एक होणार. एक झाल्यावर सोसणार नाहीं, व शहर समीप. यास्तव मोगलांस टाकून चहूं कोसांवर मुक्काम केला. आम्हाकडील फिरंगोजी पाटणकरास गोळी लागोन ठार झाला. वरकडही दहा पांच माणूस व घोडीं जखमी झालीं, मोगलांकडील दहापांच ठार झाले. दहावीस जखमी झाले. गुरुवारीं सादतखान व खानदौरा व बंगस सारे कमरुद्दीनखानाजवळ आले. अलाबर्दीपासून ( सराई अलाबर्दीखान दिल्लीच्या दक्षिणेस १४ मैल ) झीलच्या तलावापर्यंत मुक्काम करून आहेत. आम्ही मोगल पाठीवर घेऊन दाबांत आणून बुडवावे , या विचारें कूच करून रेवाडी, कोटपुतळी, मनोहरपुरावरून आलों. अद्याप सारे मोगल अलाबर्दी व झीलच्या तलावावरी आहेत म्हणोन बातमी वर्तमान आलें. खानदौराची पत्रांवरी पत्रें सवाई जयसिंगजीस गेलीं. त्यांवरून ते पंधरा सोळा हजार फौज व तोफखाना देखील स्वार होऊन बासव्यावर ( जयपूरच्या ईशान्येस ३० मैल ) गेले आहेत. भेटीस जातात. सवाईजींचीं पत्रें ममतायुक्त आपला मुलुख रक्षावा म्हणून येतात. आम्हांकडील व्यंकाजीराम त्यांजपाशीं आहेत, त्यांजपासून लिहीवीत असतात. आम्ही त्यांचे मुलखाचे वाटेस जात नाहीं. वाटेनें दाणादुणा देतील. अभयसिंग जोधपुरास आहेत. आम्ही आतां ग्वालेर प्रांतें बाकीसाकी राहिली आहे, ती वसूल करून, मोगल मागें मागें आले तरी त्यास हैराण करून, पायींची धांपा देऊन, धावतां धावतांच खराब होत तेंच करून, दाबांत आणून, गांठ घालून, राजश्री स्वामींचें पुण्यें, व वडिलांचे आशीर्वादें बुडवितों. आमची चिंता न करणें, मुख्य गोष्टी खानडौराचे व पातशहाचे चित्तांत सलूख करावयाचें आहे. मोगल यांणीं हिंमत धरिली आहे. त्यांतें शीरोपस्थ सादतखान आहे. त्याचा गर्व श्रीसंकल्पें हत जालियास, सर्व मनोदयानुरूप होईल. मनोदयानुरूप सलूख जालिया करुं, नाहीं तरी सलूख करीत नाहीं. दिल्लीभवता मुलूख खालसा केला. पुढें सोनपतपानपत यमुनापार मुलूख राहिला, तोही ताराज करून मोगल अन्नास महाग होत ऐसेंच केलें जाईल. होईल तें वृत्त मागाहून तुम्हांस लिहून पाठवूं. कदाचित मोगल दिल्लीस राहिले, तरी आगरियास जाऊन अंतर्वेदींत उतरून कुल मुलूख तराज करितों. नबाब निजाम उल्मुल्क यांनीं गडबड केली, रेवा उतरले, तरी तुम्हीं मागें शह देणें. पेशजी लिहिलें आहे त्याप्रमाणें करणें. मारून ताराज करणें. इकडेस सक नाहीं. तिकडेसही नाहींसा करणें. निजामास पायबंद असलिया उत्तम आहे. लोभ असों दीजे हे आशीर्वाद.”
        बाजीरावाच्या उपरोक्त पत्रातील तारखांच्या बाबतीत देखील सरदेसाई व रियासत संपादक मंडळाने गोंधळ केला असल्यामुळे ; तसेच सदर पत्राच्या छपाईमध्ये देखील चुका झाल्यामुळे या पत्राची विश्वसनीयता बरीच कमी झाली आहे.
         बाजीरावाने वरील पत्र ता. ५ एप्रिल १७३७ रोजी म्हणजे दिल्लीवरील चढाईनंतर सुमारे ४ - ५ दिवसांनीच लिहिले आहे. मुख्यतः या पत्राच्या आधारेच बाजीरावाच्या या मोहिमेचे विश्लेषण केले आहे.
         नर्मदापार झाल्यावर बाजीरावाने भेलशाचे ठाणे ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने ग्वाल्हेरवरून भदावरप्रांती स्वारी केली. तेथील शासक गोपाळसिंग व त्याचा मुलगा अनिरुद्धसिंग हे मोगल दरबाराशी एकनिष्ठ असल्याने व भदावरकरांच्या ताब्यात चंबळ नदीच्या उतारावरील अटेर  नामक मोक्याचे ठाणे असल्याने त्या राजावर आपला शह बसवणे बाजीरावास आवश्यक वाटले. बाजीरावाने भदावर प्रांतावर स्वारी केल्याचे समजताच सादतखानाने गोपाळसिंगास मदतीचे आश्वासन दिले. तेव्हा मोगली कुमक येईपर्यंत ठाणी लढवण्याचा निर्णय गोपाळसिंगाने घेतला. इकडे पेशव्याने लष्करी व कुटनीतीच्या बळावर भदावर प्रांत ताब्यात घेण्याचा उद्योग आरंभला. गोपाळसिंगाचा एक मुलगा बाजीरावाने हाताशी धरला. याविषयी मराठी रियासतीमध्ये आलेली माहिती पुढीलप्रमाणे :- “ वर्तमान कळतांच सडे फौजेनिशीं शहरावर चालोन घेतलें. शहर घेऊन कोटास मोर्चे लाविले. तेव्हां अनिरुद्धसिंग शरण येऊन भेटला ( १८ फेब्रुवारी १७३७ ), वीस लक्ष खंडणी कबूल केली, पंधरा लक्ष रोख दिले, पांचाबद्दल ओलीस दिले. लुटीनें लष्कर अभर झालें. सर्व प्रांत लुटून ताराज केला. दुसरी फौज पाठवून भदावरही लगोलग घेतलें. सादतखानाकडून राजाचें साह्य कांहीं एक झालें नाहीं.”   मराठी रियासतीमधील हि हकीकत अटेरचे ठाणे घेतले त्या प्रसंगाची आहे.
          भदावरच्या मदतीस सादतखान व त्याचा पुतण्या सफदरजंग फैजाबादहून त्वरेने पुढे येत होते. परंतु ते येऊन पोहोचण्याआधीच गोपाळसिंगाने शरणागती पत्करली. अटेरचे ठाणे बाजीरावाच्या हाती पडले होते. अटेर हाती आल्यावर बाजीरावाने ताबडतोब बाजी भिवराव यास चंबळ व यमुनेच्या उतारांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपवली व ती त्याने चोखपणे पार पाडली ! बाजी भिवरावने नदी उतारांचा बंदोबस्त केल्याने सादतखानास यमुनापार करून बाजीरावावर चालून येणे शक्य होईना. इकडे दिल्लीतून खानडौरा व महंमदखान बंगश आगऱ्याच्या रोखाने रवाना झाले होते. त्यांच्या पाठोपाठ खासा मोगल वजीर कमरुद्दीनखान येत होता. या सर्व मोगल सरदारांची गाठ पडण्याआधीच प्रत्येकाला एकएकटे गाठून त्यांचा समाचार घेण्याचा बाजीरावाने बेत आखला.
        त्यानुसार मार्चच्या आरंभी किंवा फेब्रुवारी अखेरीस केव्हातरी मल्हारराव होळकर, विठोजी बुळे व पिलाजी जाधव यमुना पार करून सादतखानावर चालून गेले. या फौजेचे नेतृत्व बहुतेक मल्हाररावाकडे होते. त्याच्या नेतृत्वाखालील सैन्याने प्रथम शुकोहाबादला वेढा घातला. तेव्हा तेथील किल्लेदार लालजी खत्री याने दीड लाख रुपये व एक हत्ती देऊन आपला बचाव केला. तेथून होळकराने आपला मोर्चा फिरोजाबादच्या दिशेने वळवला. तिथे लुटालूट करून मराठी फौजा जळेश्वर येथे आल्या. या ठिकाणी सादतखानाच्या आघाडीच्या पथकांचा व मराठी सैन्याचा सामना घडून आला. सादतखानाच्या आघाडीची फौज सफदरजंगच्या नेतृत्वाखाली या जळेश्वर नजीक येऊन पोहोचली. शत्रूसैन्याची बातमी मिळताच, होळकराने या सफदरजंगच्या तुकडीला घेरण्यासाठी जाळे विणायला आरंभ केला. परंतु ; सफदरजंग या ठिकाणी लष्करी डावपेचांत होळकरास भारी पडला. होळकरासोबत लढण्याच्या भरीस न पडता त्याने लढत – लढत माघार घेण्याचे ठरवले. सफदरजंगचा कावा होळकराच्या लक्षात आला नाही. तो सफदरजंगच्या पाठीवर त्याला घेरण्यासाठी निघाला. परंतु, जेव्हा सफदरजंग मागे फिरून सादतखानाच्या मुख्य सैन्यास जाऊन मिळाला तेव्हा होळकरास आपली चूक कळून आली. आता माघार घेण्याची पाळी होळकराची होती !
          सादतखानाच्या अवाढव्य लष्करासोबत लढण्याची आपली तयारी नाही हे ओळखून मल्हारराव यमुनेच्या दिशेने जाऊ लागला. पण, होळकरास सहजासहजी जाऊ देण्यास सादतखान तयार नव्हता. सादतखानाच्या फौजेने माघार घेणाऱ्या मराठी सैन्यावर जोरदार हल्ले चढवले. शत्रूचे हल्ले परतवत होळकर वेगाने यमुना नदी जवळ करत होता. अखेर जळेश्वर पासून सुमारे ३० – ३५ किमी अंतरावर असलेल्या इतिमादपूर येथे होळकर व सादतखानाची मोठी लढाई घडून आली. या लढाईमध्ये मराठी सैन्याचा पराभव होऊन सुमारे एक हजार मराठी सैनिक शत्रूहाती कैद झाले. इतिमादपूर पासून जवळपास ४ – ५ किमी अंतरावर यमुना नदी वाहते. होळकराने बहुतेक याच ठिकाणी किंवा जरा वरच्या बाजूला आगऱ्यासमोर यमुना पार केली असावी. सादतखान व मल्हाररावाची हि लढाई १२ मार्च १७३७ रोजी घडून आली. पराभूत झालेली मराठी सेना २२ मार्च १७३७ रोजी ग्वाल्हेरनजीक कोटीला येथे बाजीरावाच्या छावणीत दाखल झाली असे सरदेसाई लिहितात. माझ्या मते, सरदेसाई यांनी तारखांची बरीच गल्लत केली आहे. कारण, लढाई झाल्यावर सुमारे दहा दिवसांनी होळकर बाजीरावाकडे जातो हे तितकेसे पटत नाही. यावेळी बाजीरावाचा तळ तत्कालीन प्रघातानुसार युद्धआघाडीपासून सुमारे १०० – १२५ किलोमीटर्स अंतरावर असावा. सरदेसाई ज्या कोटीला गावी बाजीरावाचा मुक्काम होता असे सांगतात ते स्थळ नकाशामध्ये सापडत नसल्याने याविषयी अधिक काही लिहिता येत नाही.
          होळकर यमुना उतरून गेल्यावर पाठोपाठ सादतखान देखील यमुना नदी पार करून आगऱ्यास दाखल झाला. यावेळी दिल्लीहून निघालेले बंगश व खानडौरा आगऱ्याच्या जवळ आले होते.
               जी गोष्ट टाळण्याचा बाजीरावाने आटोकाट प्रयत्न केला होता अखेर ती घडून आली. बंगश व खानडौरा यांच्या फौजा कोणत्याही क्षणी सादतखानास येऊन मिळण्याची शक्यता होती. ते येण्यापूर्वी सादतखानावर हल्ला करावा तर त्याने आगऱ्याच्या किल्ल्याचा आश्रय घेतला असता. आगऱ्याच्या किल्ल्याला वेढा घालून तो तडकाफडकी ताब्यात घेण्याची बाजीरावाची तयारी नव्हती. तेव्हा त्याने आपली रणनीती बदलली. प्रथम त्याने आपल्या छावणीतील सर्व बुनगे रणक्षेत्रापासून लांब बुंदेलखंडात रवाना केले व सड्या फौजेनिशी दिल्ली गाठण्याचा बेत आखला !
            वस्तुतः आरंभी तरी बाजीरावाचा बेत वेगळाच होता. मोगल सरदारांना एककटे गाठून त्यांचा पराभव करून मग दिल्ली गाठण्याचा त्याचा विचार होता. परंतु, सादतखानाने होळकरास उधळून लावल्यामुळे बाजीरावास आपले डावपेच बदलावे लागले. खरे पाहता, बाजीरावाच्या दिल्ली स्वारीची योजना इतिमादपूर येथील लढाईने पार निकालात निघाली होती. सादतखानाने बाजीरावाचे सर्व मनसुबे उधळून लावले होते. जर इतिमादपूर अथवा इतरत्र सादतखानाचा पराभव झाला असता तर बंगश व खानडौरा यांना झटपट गुंडाळून बाजीरावाने दिल्लीचा घास घेतलाही असता. परंतु, सादतखान व सफदरजंगमुळे त्याची सर्व योजना फिस्कटली !
        लष्करातील बुणग्यांची व्यवस्था लावून झाल्यावर बाजीरावाने मोगल सरदारांच्या मुक्कामांची बातमी काढली. खानडौराच्या छावणीत असलेला बाजीरावाचा वकील धोंडोपंत हा मोठा हुशार व कारस्थानी असून मोगली गोटातील सर्व खडानखडा बातमी तो बाजीरावास कळवत असे. बाजीरावाच्या दिल्ली स्वारीला जे काही यश प्राप्त झाले त्यातील बरेचसे श्रेय या धोंडोपंतास जाते. वकील व हेरांनी दिलेल्या बातमीनुसार सादतखानाचा तळ आगऱ्यास होता तर खानडौरा व बंगश हे मथुरेजवळ राधाकुंड येथे येऊन पोहोचले होते. दिल्ली ते आग्रा हे अंतर सुमारे २०० किमी असून आग्रा ते राधाकुंड हे अंतर जवळपास ८० किलोमीटर्स आहे. तर अटेर ते दिल्ली ३०० किमी असून अटेर – आग्रा हे अंतर जवळपास १०० किलोमीटर्स आहे.
   दिल्ली – राधाकुंड - आग्रा – अटेर या स्थळांमधील अंतरे लक्षात घेतल्याशिवाय बाजीरावाच्या लष्करी करामतीची यथायोग्य कल्पना येणे अशक्य आहे.
       १८ मार्च ते २३ मार्चच्या दरम्यान केव्हातरी बाजीराव दिल्लीच्या दिशेने रवाना झाला. मोगल सरदारांना उजव्या बाजूला टाकून दूरवरूनचं त्याने शत्रू सैन्याला बगल दिली. इकडे २३ मार्च रोजी खानडौरा आणि बंगश, सादतखानास येऊन भेटले. या त्रिवर्ग मोगल सरदारांची भेट नेमकी कुठे झाली याची मराठी रियासतीतून स्पष्टता होत नाही. बाजीरावाच्या पत्रानुसार त्यांची भेट आगऱ्यास झाली तर सरदेसाई यांच्या मते त्यांची भेट मथुरेजवळ झाली. सरदेसाई यांच्या मतापेक्षा या ठिकाणी बाजीरावाच्या पत्रावर विश्वास ठेवणे भाग आहे. बाजीरावाचे पत्र गृहीत धरले असता असे म्हणता येईल कि, ज्यावेळी खानडौरा व बंगश आगऱ्यास येत होते त्याचवेळी बाजीराव त्यांच्या उजव्या बाजूने दिल्ली जवळ करत होता.
      खानडौरा व सादतखान यांची भेट झाल्यावर सादतखानाने खानडौरा यांस बाजीरावाच्या वकीलास रजा देण्याची सूचना केली. बाजीरावाचा वकील, धोंडोपंत यांस बाजीरावाच्या बेतांची कल्पना होती. खानडौराने त्यास छावणीतून जाण्याचा हुकुम करताच तो सरळ बाजीरावाच्या छावणीत दाखल झाला. वस्तुतः, सादतखानाची प्रामाणिक भावना होती कि आपण मराठी फौजेचा मोठा पराभव केला आहे. होळकरासारख्या नावाजलेल्या सरदारास आपण रणभूमी सोडून पळुन जाण्यास भाग पाडल्यामुळे बाजीराव हादरून गेला असावा. अर्थात, त्याची हि समजूत चुकीची असली तरी त्याच्या या समजुतीला बळ पुरवण्यास अप्रत्यक्षपणे बाजीरावच कारणीभूत झाला !
        दिल्लीकडे स्वारी करण्यापूर्वी जेव्हा त्याने आपले बुनगे बुंदेलखंडात पाठवून दिले तेव्हा शत्रूचा असा समज झाला की, बाजीराव घाबरला असून बुनगे लांब पाठवून तो वेगाने दक्षिणेत परत जात आहे. शत्रूचा हा गैरसमज बाजीरावाच्या पथ्यावर पडला.
         शत्रू गाफील असल्याची पक्की खबर बाजीरावास होती. त्याने या संधीचा फायदा उचलून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला. शत्रूसैन्याला बगल देऊन अटेर ते दिल्ली हे सुमारे ३०० किमी अंतर अल्पावधीत कापून २८ मार्च १७३७ रोजी बाजीराव दिल्ली शहराजवळ येऊन ठेपला.
        सामान्यतः असे मानले जाते कि, बाजीरावाने मोगल सरदारांस चकवून दिल्ली गाठली. परंतु, दिल्ली न लुटता किंवा मोगल बादशहावर आपली जरब न बसवताच तो मागे फिरला. पण यात अजिबात तथ्य नाही.
         बाजीरावाचे चिमाजीस पाठविलेले पत्र काळजीपूर्वक वाचेल असता असे दिसून येते कि, बाजीराव दिल्लीकडे जात असल्याची कुणकुण मोगल सरदारांस लागली होती. २८ मार्च १७३७ रोजी बाजीराव जेव्हा दिल्लीस पोहोचला तेव्हाच राधाकुंड मुक्कामाहून सादतखान, खानडौरा व महंमदखान बंगश दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. माझ्या मते, बाजीराव दिल्लीकडे चालल्याची बातमी प्रथम कमरुद्दीनखानास लागली होती. कारण ; खानडौरा व महंमदखान बंगश हे मथुरेच्या आसपास आले असले तरी कमरुद्दीन अजूनही मथुरेच्या वाटेवरच होता. त्यामुळे बाजीराव दिल्लीला जात असल्याची बातमी प्रथम कमरुद्दीनखानालाच प्रथम मिळणे स्वाभाविक आहे. तसेच बाजीरावाच्या पत्राचा आधार घेतल्यास दिल्ली नजीक सर्वप्रथम जे मोगली सरदार येऊन ठेपले त्यांत कमरुद्दीनखानाचे नाव सर्वप्रथम येते.               
             सोमवार २८ मार्च १७३७ रोजी बाजीराव दिल्लीजवळ आला. यावेळी कमरुद्दीनखान दिल्लीपासून सुमारे दीडशे किमी अंतरावर असलेल्या राधाकुंड नजीक होता. वस्तुतः शनिवारी २६ मार्च रोजी किंवा रविवारी २७ मार्च रोजीच त्याचा व बाजीरावाचा सामना घडून आला असता. परंतु, आपल्याला बगल देऊन बाजीराव दिल्लीला जात असल्याची कमरुद्दीनखानास अजिबात कल्पना नव्हती. त्याउलट, कमरुद्दीनखान आगऱ्यास निघाल्याची पक्की खबर बाजीरावास असल्यामुळे त्याने कमरुद्दीनला चकवून दिल्ली जवळ केली.
   माझ्या मते, २६ मार्च रोजी बाजीराव राधाकुंडच्या आसपास होता. माझे हे विधान निव्वळ तर्कावर आधारीत नसून भक्कम अशा पुराव्यावर आधारीत आहे. खुद्द बाजीराव आपल्या पत्रात लिहितो कि, “ कमरुद्दीनखान, अजीमुल्लाखान वगैरे आले. आम्हीं त्यांजसीं गांठ न घातली. सातां कोसांवर उजवे बाजूस आमचे हातें त्यांस टाकून लांबलांब मजली वीस कोसांच्या करून दोन मजलींनीं ७ जिल्हेजीं ( २८ मार्च ) दिल्लीस बारापुला व कालिकेचें देऊळ उजवे हातें टाकून जाऊन कुशबंदी नजीक शहर येथें मुक्काम केला. “ यावरून हे स्पष्ट होते कि २६ मार्च रोजी बाजीराव राधाकुंडच्या जवळ होता. तेथून त्याने दिल्लीपर्यंतचे सुमारे दीडशे किलोमीटर्सचे अंतर अवघ्या दोन दिवसांत कापले. त्याच्या या वेगवान हालचालीमुळे अनुभवी मोगल सरदार देखील काही काळ थक्क झाले !
       बाजीराव आपल्याला बगल देऊन दिल्लीकडे सटकल्याची बातमी कमरुद्दीनला २७ – २८ मार्चच्या दरम्यान केव्हातरी समजली. त्याने आपल्या सहकाऱ्यांना याविषयी सूचना देऊन तडक दिल्लीकडे आपल्या सैन्याचा मोर्चा वळवला. अवघ्या दोन दिवसांत बाजीराव दिल्ली गाठेल याची कोणीच कल्पना केली नव्हती. त्यामुळे मोगली सरदारांचा दिल्लीकडे जाण्याचा वेग हा काहीसा मंद राहिला.
        इकडे सोमवारी दिल्लीजवळ दाखल झालेल्या मराठी सैन्याने मंगळवार २९ मार्च १७३७ रोजी आपल्या अस्तित्वाची जाणीव मोगल बादशहा व दिल्लीच्या नागरिकांना करून दिली. त्या दिवशी रामनवमी असून कालिकेच्या देवळाजवळ यात्रा भरली होती. मराठी लष्करातील काही तुकड्यांनी हि यात्रा लुटली. वस्तुतः सोमवारी दिवसभरात केव्हातरी खासा बाजीराव पेशवा दिल्लीजवळ आल्याची किंवा मराठी सैन्य दिल्लीला येऊन थडकल्याची बातमी मोगल बादशहास मिळाली होती. मराठी सैन्याच्या या चढाईने हादरून जाऊन त्याने तहाची बोलणी करण्याचा निर्णय घेतला व आपल्या सर्व सरदारांना तातडीने बाजीरावाच्या पाठीवर येण्याचा हुकुम केला. मंगळवारचा दिवस मोगल बादशहाने कसाबसा घालवला. अजून मोगली सरदारांचा पत्ता नव्हता व बाजीरावाने आपल्या लष्करी सामर्थ्याची अल्पशी चुणूक दाखवली होती.
             इकडे बाजीरावाने देखील मंगळवारचा अख्खा दिवस एकप्रकारे वाया घालवला असेच म्हणावे लागते. मुळात दिल्लीला येण्यामागे त्याचा नेमका काय हेतू होता याची अजूनही स्पष्टता झालेली नाही. माझ्या मते, बाजीरावची हि स्वारी किंवा दिल्लीला मारलेली धडक पूर्णतः निरर्थक होती. जळेश्वर येथे होळकराचा पराभव झाल्यावर आपल्या लष्कराची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी त्याला एखाद्या चमकदार सैनिकी विजयाची नितांत आवश्यकता होती. त्यासाठीच त्याने दिल्लीवर स्वारी करण्याचा बेत आखला. नाहीतर सोमवारी दिल्लीत दाखल झाल्यापासून मंगळवार रात्रीपर्यंत हाताशी भरपूर फौज व संधी असूनदेखील त्याने दिल्ली लुटण्याचा किंवा मोगल बादशहास जरब बसेल असे एखादे कृत्य करण्याचा त्याने अजिबात प्रयत्न केला नाही याचा अर्थ काय घ्यायचा ?
      बाजीराव याविषयी आपल्या पत्रात लिहितो कि, “ पुऱ्यास आगी देऊन शहर खाक करावें, त्यास दिल्ली महास्थळ, पातशहा बरबात जालियांत फायदा नाहीं. दुसरें, पातशहाचे व खानडौराचे चित्तांत सलूख करावयाचें आहे. मोगल यांस सलूख करुं देत नाहींत. अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो. याकरितां आगी लावायाचें तहकूब करून, पातशहास व राजे बखतमल्ल जयसिंगाचा वकील दिल्ली येथें यांसीं पत्रें पाठविलीं. ” जर बाजीरावाने हा सर्व विचार आधीच केला होता तर मग दिल्लीला जाण्याचा अट्टाहास त्याने का केला ? मोगल बादशहा सोबत त्याला खरोखर तह करायचा होता किंवा आपण सांगू त्या अटींवर मोगल बादशहाने तह करावा अशी बाजीरावाची इच्छा होती तर त्या दृष्टीने त्याने काही वेगळ्याच हालचाली करायला हव्या होत्या पण तसे काही न करता त्याने फुकट आपल्या सैन्याची दमछाक मात्र करून घेतली !
         मोगल बादशहाने मंगळवारचा दिवस विचारात घालवला. तसेच शहरात जी काही हाताशी फौज होती तिच्या सहाय्याने मोगल सरदार मदतीस येईपर्यंत शहराचा बचाव करण्याची योजना आखली. माझ्या मते, आगऱ्याहून सादतखान व राधाकुंडच्या जवळ असलेला कमरुद्दीन वेगाने बाजीरावाच्या पाठीवर धावून येत असल्याच्या बातम्या बादशहाला मिळाल्यामुळे त्याचे खचलेले अवसान पुन्हा बळ धरू लागले होते.
     इकडे मंगळवारी रामनवमीची यात्रा लुटून बाजीराव जरी लष्करी आघाडीवर स्वस्थ बसला असला तरी राजकीय आघाडीवर मात्र त्याची धडपड सुरू होती. त्याने आपला वकील मोगल बादशहा व जयपूरच्या सवाई जयसिंगचा दिल्लीतील वकील राजा बखतमल्ल यांच्याकडे पाठवून तहाची वाटाघाट आरंभली. खुद्द मोगल बादशहा देखील याप्रसंगी धरसोड वृत्तीने वागत असल्याचे दिसून येते. बाजीरावासोबत लढावे कि तह करावा याविषयी त्याचा निश्चय होत नव्हता. दिल्लीच्या वाटेवर असलेल्या खानडौराची देखील अशीच मनःस्थिती असल्याचे दिसून येते. त्याने मोगल बादशहाला बाजीरावाशी तह करण्याचा सल्ला दिला.
          बुधवार ३० मार्च १७३७ रोजी बादशहाच्या आज्ञेनुसार बखतमल्ल याने बाजीरावास सुचवले कि तहाच्या वाटाघाटीसाठी धोंडोपंतास पाठवून द्यावे. परंतु, दिल्लीतील राजकीय बनावाचा अंदाज लागत नसल्यामुळे बाजीरावाने आपला वकील बादशहाच्या भेटीस पाठवला नाही. मोगल बादशहाच्या हेतूंचा अजिबात अंदाज येत नसल्याने बाजीराव देखील यावेळी काहीसा धरसोड वृत्तीने वागल्याचे दिसून येते. आपला वकील बादशहाच्या भेटीस न पाठवता सैन्याचा तळ उठवून शहरापासून ३ – ४ मैल अंतरावर त्याने छावणी टाकली. यामागील त्याचा हेतू उघड होता. संधी मिळताच मोगली मुत्सद्दी दगा करण्यास चुकणार नाहीत याची बाजीरावाला कल्पना होती. अधिक सावधगिरीचा उपाय म्हणून बाजीरावाने आपली मुख्य छावणी व दिल्ली शहर यांच्यादरम्यान सटवोजी जाधवाची नेमणूक केली. बाजीरावाच्या अंदाजाप्रमाणे मोगलांनी आपले बळ आजमावून पाहिले.
       बादशहाच्या आज्ञेनुसार दिल्लीतील मोगल उमराव सुमारे सात – आठ हजार सैन्यासह बाजीरावाच्या छावणीवर चालून गेले. परंतु, छावणीच्या तोंडावर सटवोजी जाधवाची व त्यांची गाठ पडली. प्रसंग पाहून जाधवाने पेशव्याकडे अधिक कुमकेची मागणी केली असता पेशव्याने शिंदे, होळकर, यशवंतराव व तुकोजी पवार, हरि गोविंद यांना जाधवाच्या मदतीस पाठविले. दोन्ही फौजांची मोठी लढाई घडून, बादशाही फौजेची शिकस्त झाली. लढाई झाल्यावर मराठी फौजा आपल्या तळावर मागे परतल्या.
            मिळालेल्या विजयाचा फायदा घेऊन मराठी सैन्य दिल्लीला भिडले असते तर त्यांचा काही प्रमाणात आर्थिक फायदा झाला असता पण यावेळी पेशव्याचे दुर्दैव उभे राहिले !
          बुधवारी दुपारपर्यंत कमरुद्दीनखानाची फौज दिल्लीला येऊन धडकली होती. बाजीराव दिल्ली शहरातील सैन्याशी लढत असल्याची बातमी कमरुद्दीनला होती कि नव्हती हे समजायला मार्ग नाही. तसेच दिल्ली शहरातील मोगल फौज व मराठी सैन्याची लढाई चालू असताना कमरुद्दीन दिल्लीजवळ आला कि लढाई घडून गेल्यावर दिल्लीला पोहोचला याचीही स्पष्टता होत नाही.
            कमरुद्दीनखान दिल्लीजवळ आल्याचे समजताच बाजीरावाने त्याच्यावर चालून गेला. सकाळी दिल्लीतील मोगल फौजेशी लढून थकलेली मराठी पथके देखील या संघर्षात सहभागी झाली. बाजीराव व कमरुद्दीन यांच्यातील लढाई निकाली निघाली नाही. संध्याकाळ झाल्यामुळे उभयपक्षांचा बचाव झाला. बाजीरावाची बव्हंशी फौज लागोपाठ दोन लढाया कराव्या लागल्यामुळे दमली होती तर कमरुद्दीनची सेना प्रवासाने थकली होती.
        कमरुद्दीनची छावणी वेढून त्याला गुडघ्यावर आणण्याचा बाजीरावाचा आरंभी बेत होता परंतु तो त्यास सोडून द्यावा लागला. कारण ; सादतखान, बंगश व खानडौरा दिल्लीजवळ आले होते.
     गुरुवारी कमरुद्दीनखान, सादतखान, बंगश व खानडौरा यांच्या फौजा एकत्र होणार व आपल्यावर हल्ला चढवणार. जर आपण त्यांच्याशी लढत बसलो तर दिल्ली शहरातील मोडलेली फौज आपल्या पाठीवर येणार. अशा स्थितीत तुलनेने अल्प अशा आपल्या मराठी सैन्याचा पूर्णतः चुराडा होऊ शकतो याचा बाजीरावाला अंदाज आला. प्रसंग पाहून त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला. बुधवारी मध्यरात्री किंवा गुरुवारी सुर्योदयापूर्वीच त्याने जयपूरच्या दिशेने कूच केले. रेवाडी, कोटपुतळी, मनोहरपूरमार्गे तो जयपूरजवळ ५ एप्रिलच्या सुमारास पोहोचला.
        आपल्या पाठीवर मोगली फौजा धावून येतील असा बाजीरावाचा अंदाज होता. त्यामुळे अवघ्या ४ – ५ दिवसांत जवळपास अडीचशे किलोमीटर्सचा प्रवास करून त्याने जयपूर गाठले होते. परंतु, मोगल सरदारांच्या विषयी जो काही बाजीरावाने अंदाज बांधला होता तो चुकीचा निघाला. बाजीरावाच्या पाठीवर धावून जाण्यास मोगल सरदार उत्सुक नव्हते. याचा अर्थ असा होत नाही की बाजीरावाची दहशत वा जरब त्यांना बसली होती अथवा बाजीरावाच्या तोडीचे रणचातुर्य त्यांच्याकडे नव्हते.
         वस्तुस्थिती काही वेगळीच होती. बाजीरावाने दिल्ली सोडून सरळ जयपूरचा रस्ता धरला. जयपूरचा सवाई जयसिंग हा बादशाही उमराव असला व बादशहाच्या आज्ञेने तो बाजीरावाच्या बंदोबस्तासाठी ससैन्य दिल्लीकडे येत असला तरी त्याचा व बाजीरावाचा अंतस्थ स्नेह जगजाहीर होता. किंबहुना, त्याच्या नेतृत्वा खाली राजपूत संस्थानिक निष्क्रिय राहिल्यामुळेच मराठी सत्ता आरंभी माळव्यात व पुढे उत्तर हिंदुस्थानात स्थिरावली. जयसिंग उदासीन राहिल्यामुळेच बाजीरावाला दिल्लीला धडक मारता आली. मोगल मुत्सद्दी हि वस्तुस्थिती जाणून होते. अशा परिस्थितीमध्ये बाजीरावाच्या पाठीवर धावून जाण्यात काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी ताडले. तसेच बाजीरावाने दिल्लीची लूट किंवा मोगल बादशहाचा उपमर्द न केल्याने बाजीरावाची दिल्ली स्वारी मोगली मुत्सद्द्यांना फारशी झोंबली नाही. त्याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मोगल मीरबक्षी खानडौरा हा जयसिंग व बाजीराव यांना अनुकूल होता. सारांश, सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन मोगली सरदारांनी बाजीरावाचा पाठलाग करण्याचे टाळले. त्यावेळच्या गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीमुळेच एकप्रकारे बाजीरावाचा बचाव घडून आला. अन्यथा, पानिपतपेक्षाही मोठा बिकट प्रसंग तेव्हा उद्भवलाच नसता असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
  बाजीरावाच्या दिल्ली स्वारीचा फलितार्थ :- उपलब्ध साधने पाहता माझ्या मते, बाजीरावाची हि स्वारी मराठी राज्याच्या दृष्टीने पूर्णतः निरर्थक होती. या मोहिमेमध्ये सैन्याची दमणूक झाली, हानी झाली पण म्हणावा तसा प्रादेशिक लाभ अथवा अर्थप्राप्ती झाली नाही. या मोहिमेतून निदर्शनास येणाऱ्या काही जमेच्या बाबी म्हणजे, मराठी लष्कराची कार्यक्षमता व बाजीरावाचे लष्करी नेतृत्व !  जळेश्वर येथे आपल्या प्रमुख सरदाराचा पराभव झाल्यावर व दिल्लीवर चालून जाण्याचा बेत साफ सोडून देण्याचा प्रसंग उद्भवल्यावर देखील ज्या प्रकारे बाजीरावाने दिल्लीला धडक मारली ते पाहता त्याच्या लष्करी नेतृत्वाची जितकी तारीफ करावी तितकी कमीच आहे ! 
   ज्या वेगाने मराठी सैन्याने दिल्ली जवळ केली व एकाच दिवशी दोन लढाया मारून लगेच दुसऱ्या दिवशी दिल्लीचा मुक्काम गुंडाळून राजपुतान्याकडे प्रस्थान केले, ते पाहून शत्रूसेना देखील त्यांचे सरदार देखील अचंबित झाले असावेत. माझ्या मते, इतक्या वेगाने हालचाली करणारे शिस्तबद्ध व कार्यक्षम असे लष्कर  तत्कालीन मराठी सरदारांच्या शिवाय इतर संस्थानिकांच्या पदरी नसावे !
    

Thursday, September 6, 2012

उदगीर मोहीम - स. १७५९ - ६०


             स. १७५९ च्या उत्तरार्धात उत्तर हिंदुस्थानात दत्ताजी शिंदे नजीबखान व अब्दाली यांच्याशी झुंजत होता त्याच सुमारास दक्षिणेत पेशवा निजामाला गुंडाळण्याच्या उद्देशाने पुण्यातून बाहेर पडला. वस्तुतः निजामावरील स्वारीसाठी पेशव्याकडे काही सबळ असे कारण होते अशातला भाग नाही. परंतु, राज्यविस्तार करणाऱ्या सत्ताधीशाला अशा कारणांची गरज असतेच असे नाही !
           दिनांक ९ नोव्हेंबर रोजी पेशव्याचा सरदार विसाजी कृष्ण बिनीवाले याने, अहमदनगरचा किल्ला ताब्यात घेतला. नगरचा हा किल्ला, निजाम – पेशव्याच्या आणखी एका संग्रामाचे निमित्त बनला. नगरचा किल्ला पेशव्याने घेतल्याचे समजताच सलाबतजंग, निजामअली व बसालतजंग हे त्रिवर्ग बंधू पेटून उठले. खासा सलाबतजंग व निजामअली हे दोघे बेदरमधून सुसज्ज सैन्य व तोफखाना घेऊन पेशव्यावर चालून निघाले. बसालतजंग हा कर्नाटकातून आपल्या भावांच्या मदतीस फौज घेऊन येणार होता.
   वास्तविक निजामबंधूंची हि कृती / हालचाल पेशवेबंधूंना अपेक्षित अशीच होती. निजामाने असा काहीतरी आततायीपणा करून खुल्या मैदानात, सोयीच्या ठिकाणी यावे आणि आपल्या लष्करी बळावर त्यास चिरडून टाकावे किंवा त्याच्या लष्करी सामर्थ्याचा नाश करावा अशी पेशव्याची इच्छा होती. मला जी काही संदर्भ साधने उपलब्ध झाली, त्यातील माहितीवरून असे दिसून येते कि, स. १७५९ च्या पावसाळ्यात किंवा तत्पूर्वीच या मोहिमेची आखणी पेशव्याच्या दरबारात झाली होती. त्यानुसार निजामाच्या दरबारातील मराठा सरदारांना फितूर करण्याचे प्रयत्न पेशव्याने आरंभले होते. या ठिकाणी एक गोष्ट नमूद करणे गरजेचे आहे व ती म्हणजे या मोहिमेचा नामधारी प्रमुख विश्वासराव जरी असला तरी स्वारीची सर्व सूत्र सदाशिव आणि रघुनाथ यांच्या हाती असून या सर्वांवर आजारी परंतु चाणाक्ष नानासाहेब पेशव्याची करडी नजर होती.
               पेशव्याने रचलेल्या कारस्थानानुसार विसाजी कृष्ण बिनीवाले हा सरदार नगरच्या रोखाने रवाना झाला. या किल्ल्याचा किल्लेदार कविजंग हा असून त्याला फितूर करण्यात विसाजी यशस्वी झाला. पन्नास हजारांची जहागीर मिळाल्यास किल्ला पेशव्याच्या ताब्यात देण्यास कविजंग तयार झाला. कारस्थान फळास येताच २९ नोव्हेंबर रोजी नगरच्या किल्यात पेशव्याने आपला मुक्काम हलवला. नगरचा किल्ला परत आपल्या ताब्यात घेण्यासाठी व फितूर सरदार कविजंग याचा सूड घेण्यासाठी निजामबंधू बेदरमधून बाहेर निघाले. रियासतकार सरदेसाई यांच्या मते निजाम सुमारे बारा हजार सैन्य व दहा हजार गारदी आणि १०० तोफा घेऊन लढाईच्या उद्देशाने बाहेर पडला. तर पेशव्याचे चाळीस हजार लष्कर या मोहिमेत सहभागी झाले होते. शेजवलकर आपल्या ‘ पानिपत : १७६१ ‘ या ग्रंथात असे दिले आहे कि, या मोहिमेत निजामाची फौज सर्व मिळून सुमारे वीस हजार असून त्यात दहा हजार गारद्यांचा भरणा होता. निजामाच्या पदरी असलेले कित्येक मराठा सरदार आपापल्या जमावासह धारूर येथे येऊन गोळा झाले.
         उदगीर मोहिमेत एकूण किती मराठी फौज सामील झाली होती याची विश्वसनीय माहिती मिळत नाही. भाऊ परळी येथे आला तेव्हा त्याच्यासोबत पंचवीस हजार सैन्य असल्याचा उल्लेख शेजवलकर करतात. तर सरदेसाई, मराठी सैन्य चाळीस हजार होते असे सांगतात.  या ठिकाणी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो व तो मुद्दा म्हणजे उदगीर मोहिमेतील मराठी पक्षातर्फे जे काही लष्करी डावपेच आखण्यात आले त्यामागे कोणाचा कल्पक मेंदू कार्यरत होता ? रघुनाथराव कि सदाशिवराव ?
       स. १७६० मध्ये सदाशिवराव हा ३० वर्षांचा असून रघुनाथरावाचे वय याप्रसंगी २६ वर्षांचे होते. भाऊने याआधी ज्या काही मोहिमा पार पाडल्या होत्या त्यामध्ये त्याने कल्पक अशा लष्करी योजना आखल्याचे उल्लेख कोणी करत नाही. रघुनाथरावाने भाऊपेक्षा संख्येने अधिक आणि प्रादेशिक / भौगोलिक मर्यादेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हिंदुस्थानच्या विविध भागात आपली बहादुरी दाखवली होती. अर्थात, या दोघांच्याही पदरी अनुभवी असे रणपंडीत असल्याने त्यांना यश मिळाले होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. असे असले तरी उदगीर मोहिमेचा खरा सेनापती कोण होता हा प्रशन अनुत्तरीत राहतोच !
        पानिपतच्या अभ्यासकांनी -- ज्यामध्ये प्रस्तुत लेखकाचा देखील समावेश आहे – उदगीर मोहिमेचा फक्त निकाल लक्षात घेऊन व तहाच्या चर्चेत भाऊचे नाव असल्याचे पाहून या संग्रामाच्या यशाचे सर्व श्रेय भाऊच्या पदरात घातले आहे. परंतु, उदगीर प्रकरणाच्या आधीच्या व नंतरच्या घटनांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास असे लक्षात येते कि उदगीर स्वारीचा खरा नायक रघुनाथराव हाच होता ! निजामाची स्वारी आटोपताच रघुनाथराव उत्तर हिंदुस्थानात जाणार होता. पण मग आयत्या वेळी त्या मोहिमेवर भाऊची नियुक्ती करण्यात आली. उदगीरच्या संग्रामात भाऊसाहेबास यश मिळाल्यामुळेच पानिपत स्वारीवर त्याची नेमणूक झाली असे समजणे मूर्खपणाचे लक्षण होईल ! कारण हाच निकष लावल्यास रघुनाथराव अटक मोहिमेत पराभूत झाला होता व त्यामुळेच त्याला उत्तर हिंदुस्थानात पाठवले नाही असेच म्हणावे लागेल. सारांश, उदगीर मोहिमेच्या यशाचे सर्व श्रेय रघुनाथरावाचे असून तहाच्या बाबतीत भाऊने आपले कसब पणाला लावल्याचे दिसून येते. या ठिकाणी आणखी एक गोष्ट नमूद करणे योग्य होईल व ती म्हणजे उदगीर मोहिमेत जे काही लष्करी डावपेच आखण्यात आले होते त्यानुसार पेशव्याच्या सैन्याच्या हालचाली झाल्याचे दिसून येत नाही. अर्थात, उदगीरच्या संग्रामात रघुनाथरावाने जे काही लष्करी डावपेच आखले होते त्याची माहिती आता उपलब्ध नाही पण त्या संग्रामाचे तत्कालीन लेखांत व कैफियतीमध्ये जे काही वर्णन आले आहे ते पाहता मुळच्या युद्धविषयक धोरणात परिस्थितीनुसार किंवा हेतुपूर्वक फेरबदल करण्यात आल्याचे आढळून येते.   
            नगरचा किल्ला ताब्यात येताच नानासाहेब पेशवा त्या ठिकाणी मुक्कामास गेला. यावेळी रघुनाथ, सदाशिव व विश्वास हे तिघे त्याच्यासोबत होते किंवा यापैकी त्याच्याजवळ कोण होते आणि कोण नव्हते याची स्पष्ट अशी माहिती मराठी रियासत, पानिपत : १७६१ आणि भाऊची कैफियत यामध्ये येत नाही. उदगीर मोहिमेवर मर्यादित प्रकाश टाकणारी दोन पत्रे श्री. य. न. केळकर यांनी आपल्या ‘ मराठेशाहीतील वेचक वेधक ‘ या पुस्तकात प्रसिद्ध केली आहेत. त्यापैकी उदगीर मोहिमेतील मुख्य संग्रामाच्या आधीची माहिती देणारे पत्र या ठिकाणी देत आहे :-
                  श्री                        रामोजयति
            राजश्री हरबाजी बावा स्वामीस विनंती उपरी सांप्रत श्रीमंत नानाची मर्जी पाहता शरीरी वेथा. क्षीण फार जाहाले. लोकास पैसा द्यावा हे बुधी येकंदर नाही. रदबदली केली तर तोडून जाब सांगतात. राजश्री भाऊ व राजश्री रघुनाथपंत मोगलास बुडवावे या उमेदीने गेले, ते गोस्ट राहिली. मोगल बलकट आहे आपल्या जोऱ्याने उदगिरीस आला. तेथे बुनगे ठेऊन सडा झाला. यांची त्याची गाठ पडली. येक जुज मातवर जाहाले. इभ्रामखा गाडदीयाचा भाचा पडला माणूसही फार पडले. तेथून रोज तीन चार कोश मोगल चालत चालत आवशावर आला. हे भोवते आहेत रोज झटपट होते परंतु याची सलाबत मोगलावर पडत नाही. येक इभ्रामखान मात्र जुजतो वरकड मराठे झटत नाही काठ्या घालितात तऱ्ही निकड होत नाही माणूस बेदील. कोणास पैसा दिल्हा नाही रोजमुरे यावर चाकरी घेतात यामुले मन कोणी घालीत नाही. राजश्री दमाजी गायेकवाड परलीवर राहिले होते त्याजवर खंडागले येऊन पडले. त्याणी सारे लस्कर लुटून पस्त केले. दमाजीस दोन तीन जखमा होऊन दोन च्यारसे रावतानसी पलोन श्रीमंताच्या लस्करात गेले. इतके दिवस मोगलापासी मराठे नव्हते सांप्रत जाधव खंडागले आटोले पांढरे बाके वगैरे दाहा दजार ( हजार ) जमा जाले व अलीकडे घारुराजवळ ( धारूर ) मोगल आला असेल. हणवंतराव व जानोजीची फौज तयार आहे बसालतजंग करणाटकची फौज घेऊन आला त्याची भेंट जाली असेल. अगर होईल याउपर मोगल भारी जाला याचा त्याचा तूर्त तह होत नाही. मोगलाचा मनोदये पंढरपुरास येऊन भीमेच्या पाण्याने वरते यावे दुसरे धारुरावरून परांडे यासी येऊन सिनेच्या पाण्याने नगरास अगर पेडगावास यावे ऐसे आहे. या चिंतेत हे श्रीमंत फार हैराण आहेत आशामध्ये छ १३ जमादिलाखरचे प्रहर रात्री सहा दिवसात उजनीहून कासीद आले. दिलीची पत्रे आली की आबदली ( अब्दाली ) फौज घेऊन आला तो व रोहिले जाट सुजायत दौला येकत्र होऊन दिल्लीवर आले. तेथे सिंद्याचे व त्याचे जुज जाहाले. जनकोजी शिंदे यासी जखमा आहेत दत्ताजी सिंदे पाच हजार फौजेनसी मोगलाच्या फौजेत गर्क जाहाले. ते सारे लोक कापून ठार केले. दतबाचा मुर्दा देखील सापडला नाही लस्कर सारे मोगलानी लुटून दिली घेऊन पातशाह मारिला व वजरी मारिले. यांचा आमल ( अंमल ) तमास ( तमाम ? ) उठविला. दिलीची पातशाही आबदली करीत आहे हे विनंती.
       उपरोक्त पत्र वाचताना प्रथम काही गोष्टी स्पष्टपणे लक्षात येतात व त्या म्हणजे पत्राचा लेखक कोण आहे ? पत्र लिहिणारा लेखक नेमका कोणत्या ठिकाणाहून पत्र लिहित आहे ? मुख्य म्हणजे पत्र नेमके कधी लहिले आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे कार्य श्री. केळकर यांनी केलेले नाही. कदाचित प्रस्तुत पत्र त्यांना असेच अर्धेमुर्धे सापडले असावे. असो, पत्राच्या मजकुरावरून हे पत्र नानासाहेब पेशव्याच्या सोबत नगर मुक्कामी असलेल्या व्यक्तीने लिहिले असल्याचे स्पष्ट होते. पत्राच्या आरंभीच नानासाहेब पेशवा हा फारच आजारी असल्याचा उल्लेख आहे. पत्रलेखक हा बहुतेक पेशव्याचा पथक्या किंवा दुय्यम , तिय्यम दर्जाचा लष्करी अंमलदार असावा असा तर्क करता येतो. कारण, पत्रामध्ये नानासाहेब पेशवा लोकांना पगार देत नसल्याचा उल्लेख आहे. अर्थात हे लोक लष्करी वा मुलकी खात्यातील असल्याचे यात स्पष्ट केले नसले तरी पेशवेकाळातील सैन्यविषयक धोरण लक्षात घेता हा उल्लेख लष्करी पेशाच्या व्यक्तींना अनुलक्षून असल्याचे स्पष्ट होते. पुढे निजाम – पेशव्याच्या फौजांच्या मुख्य संग्रमाच्या आधीच्या हालचालींची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार असे दिसून येते कि, निजामबंधू उदगीर येथे येऊन पोहोचले. त्यावेळी मराठी सैन्य अंगावार येत असल्याचे पाहून त्यांनी आपले बुणगे उदगीर येथे ठेवले आणि सडी फौज, तोफखाना घेऊन ते शत्रूवर चालून गेले. ता. १९ व २० जानेवारी १७६०, या दोन दिवसांमध्ये दोन्ही पक्षांचे एक झुंज घडून आले. त्यात इब्राहीमखानचा भाचा मारला गेल्याचा उल्लेख या पत्रात आला आहे. हि लढाई बहुतेक उदगीरच्या आसपास घडून आला असावी. कारण, या संग्रामानंतर निजामाची फौज औसाच्या दिशेने पुढे सरकल्याचा उल्लेख पत्रात आलेला आहे.                
               निजामाच्या सैन्याभोवती मराठी फौजेचा धावता वेढा पडला असला तरी मराठी लष्कराला न जुमानता निजाम औसा येथे येऊन पोहचल्याचे प्रस्तुत पत्रात लिहिले आहे. या पत्रातील ‘ येक इभ्रामखान मात्र जुजतो वरकड मराठे झटत नाही ‘ हि ओळ अतिशय महत्त्वाची आहे.  मराठी रियासतीनुसार ९ ऑक्टोबर १७५९ रोजी इब्राहीमखान निजामाच्या सेवेमधून बाहेर पडला व ता. ११ नोव्हेंबर १७५९ च्या पत्रानुसार इब्राहीम पेशव्याच्या सेवत रुजू झाला. इब्राहीमखानावर भाऊचा अपवाद केल्यास इतर कोणाचा फारसा विश्वास असल्याचे दिसून येत नाही. भाऊने फ्रेंच योद्ध बुसीची कामगिरी जवळून पाहिली होती. तोफखाना व कवायती पलटणींच्या कामगिरीचा त्याच्या मनावर विलक्षण परिणाम झाला असून या नव्या पद्धतीचे अनुकरण करण्यास तो कमालीचा उत्सुक होता. इब्राहीम ११ नोव्हेंबर १७५९ रोजी पेशव्याच्या सेवेत आल्याचा दाखला मिळत असला तरी तो तो नेमक्या कोणत्या ठिकाणी मराठी सैन्यात दाखल झाला याची माहिती मिळत नाही.
      ज्या निजामाच्या विरोधात लष्करी मोहीम सुरु आहे त्याच निजामाच्या एका महत्त्वाच्या सरदारास आपल्या सेवेत घेऊन लढाईमध्ये त्यास आघाडीवर ठेवणे किंवा मुख्य लष्करासोबत बाळगणे हा निश्चितच मुर्खपणा होता व याच मुद्द्यावरून भाऊसोबत असलेले मराठी सरदार काहीसे नाराज झाले असण्याची शक्यता आहे. भाऊचे हे कृत्य त्यांना आत्मघातकीपणाचे वाटले असल्यास नवल नाही. इब्राहीम जरी विश्वासू, प्रामाणिक व इमानी असला तरी तत्कालीन विशिष्ट प्रसंग वा परिस्थिती लक्षात घेता भाऊची हि कृती निश्चितच चुकीची आहे असेच म्हणावे लागते. त्याशिवाय इब्राहीमच्या कवायती पायदळ सैन्याचा युद्धात उपयोग करण्याचे ठरल्यामुळे मराठी सरदारांना आपली पूर्वनियोजित अशी गनिमी काव्याची युद्धरचना बदलावी लागली. या कारणामुळेच मराठी सरदारांनी या संग्रामात मनापसून सहभाग घेतला नसावा. माझ्या मते, इब्राहीमला निजामावरील स्वारीत मुख्य लष्करात सामील करून घेण्याचा निर्णय रघुनाथरावास देखील तितकासा रुचला नसावा. कारण हा त्याच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करणारा निर्णय होता.     
        यापुढील पत्रामधील ‘ काठ्या घालितात तऱ्ही निकड होत नाही माणूस बेदील. कोणास पैसा दिल्हा नाही रोजमुरे यावर चाकरी घेतात यामुले मन कोणी घालीत नाही.’ हि वाक्ये देखील अतिशय महत्त्वाची आहेत. वरवर पाहता असे दिसून येते कि वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे मराठी फौजांचे लढण्यात मन नव्हते. परंतु, हे अर्धसत्य आहे. वस्तुतः निजामाच्या सैन्यात सुमारे दहा हजार गारद्यांचा भरणा असल्यामुळे तो फौजेचा गोल बांधून चालला होता. निजामाचा पराभव करण्यासाठी त्या लष्करी गोलावर चालून जाणे आवश्यक होते व त्यासाठी गारद्यांच्या बंदुकींचा मारा झेलणे गरजेचे होते. आधीच वेळेवर पगार नाही व त्यात गारद्यांसोबत लढायचे म्हणजे प्राणांशी गाठ अशी मराठी सैनिकांची भावना बनली असल्यास नवल नाही. अशा स्थितीत निजामाच्या गारद्यांसोबत झुंजाचा प्रसंग उद्भवताच मराठी फौजा माघार घेत होत्या. तेव्हा लढाईतून पळून मागे येणाऱ्या लोकांना परत युद्धात लोटण्यासाठी भाऊने तत्कालीन प्रचलित पद्धतीनुसार त्यांना काठ्यांनी बडवून परत लढाईत उतरण्यास भाग पाडले असावे. वास्तविक अशी वेळ युद्धप्रसंगात नेहमी उद्भवणारी असल्यामुळे यात विशेष असे काही नाही.
            यापुढे पत्रामध्ये परळीवर असलेल्या दमाजी गायकवाडाचा, निजामाचा मराठा सरदार खंडागळे याने मोठा पराभव केल्याचा उल्लेख आहे.
           उदगीर संग्रामाचे जे काही तपशील मला उपलब्ध झाले त्यानुसार दिनांक ११ जानेवारी १७६० रोजीपासून भाऊच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्याचा व निजामाच्या फौजानाचा मुकाबला सुरु झाला. याचा अर्थ ११ जानेवारी १७६० च्या आधी केव्हातरी भाऊच्या हुकुमतीखाली मराठी फौज उदगीरजवळ आली होती. मराठी फौजांची कोंडी करण्याच्या उद्देशाने निजामाने आपल्या मराठा सरदारांना भाऊच्या पाठीवर येण्यास सांगितले असावे किंवा निजामाच्या मदतीस जाण्याकरता त्याच्या पदरी असलेले मराठा सरदार धारूर येथे गोळा झाले असावेत. काय असेल ते असेल पण उदगीरनजीक भाऊच्या हुकुमतीखाली असलेल्या मराठी फौजेच्या दृष्टीने हा एकप्रकारे सापळा होता !
        धारूर येथील निजामाच्या मराठा सरदारांवर नजर ठेवण्यासाठी व आपली पिछाडी सांभाळण्यासाठी पेशवेबंधुंनी दमाजी गायकवाडाची नियुक्ती केली. त्याचप्रमाणे धारूर येथे जमलेल्या निजामाच्या मराठा सरदारांमध्ये फितूर पेरण्याचे कार्य देखील जोरात चालू होते व त्यात पेशवेबंधूंना काहीसे यश देखील मिळाले. असे असले तरी, निजामाचा मराठा सरदार खंडागळेने दमाजी गायकवाडवर संधी साधून हल्ला चढवला. यावेळी दमाजी काहीसा गाफील असावा किंवा अति आत्मविश्वासाच्या बळावर लढाईत उतरला असावा. परिणामी खंडागळेच्या पथकांनी गायकवाडी फौजेचा साफ धुव्वा उडवला. गायकवाडांची सेना लुटली गेली. खुद्द दमाजी जखमी होऊन मुख्य सैन्याच्या आश्रयास मागे धावला. निजामाच्या मराठा सरदारांनी यावेळी जी चमक दाखवली त्यामुळे पेशवेबंधूंमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली.
           दमाजी व खंडागळे यांच्या लढाईची नेमकी तारीख उपलब्ध नाही. त्यामुळे हि लढाई घडून आल्यावर मराठी फौजेने १९ व २० जानेवारी रोजी निजामावर हल्ला चढवला कि, हि लढाई होण्यापूर्वी निजाम – मराठी सैन्याच्या १९ व २० जानेवारीच्या चकमकी घडून आल्या याची निश्चिती करता येत नाही. 
                    उपरोक्त पत्रातील पुढील भागास -- बुराडी घाटचे वर्तमान अपवाद केल्यास – फारसे महत्त्व देता येत नाही. कारण पुढील घटनाक्रमांची पत्रलेखकास माहिती नसून तो फक्त युद्धविषयक आपले अंदाज व्यक्त करत आहे.
                छ १३ जमादिलाखरचे उज्जैनवरून पेशव्यास नगर येथे पत्र मिळाले. त्यात बुराडी घाटच्या संग्रामाची व दत्ताजीच्या मृत्यूची बातमी आहे. ही गोष्ट पानिपत अभ्यासकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. किंबहुना, अस्सल पत्रातील या एका ओळीने सबंध पानिपत मोहिमेवर बराचसा प्रकाश पडतो. प्रस्तुत पत्र उदगीर मोहिमेचा निर्णायक – म्हणजे ३ फेब्रुवारी १७६० रोजीचा – संग्राम घडण्यापूर्वीचे आहे हे तर उघड आहे.
          दमाजी गायकवाड खंडागळे सोबत लढताना जखमी झाल्याचा उल्लेख, निजाम मराठी फौजांना न जुमानता उदगीरहून औसा येथे आल्याचा उल्लेख, दत्ताजीचे वर्तमान समजल्याचा उल्लेख व त्यानंतर लिहिलेले हे पत्र, हा सर्व घटनाक्रम जर जोडून पाहिला तर दिनांक १० जानेवारी १७६० रोजी झालेल्या बुराडी घाटच्या लढाईचे वर्तमान नानासाहेब पेशव्यास नगरमुक्कामी १९ / २० जानेवारी नंतर किंवा जानेवारीच्या अखेरीस समजले असे ठामपणे म्हणता येते. अर्थात हा निष्कर्ष तर्कावर आधारित आहे हे उघड आहे. परंतु सध्या तरी या तर्कावर भिस्त ठेवण्याखेरीज गत्यंतर नाही. 
               असो, दिल्लीची बातमी मिळून देखील पेशव्याने तिकडे फारसे लक्ष दिले नाही. उत्तरेत मल्हारराव होळकर आहे. तो जनकोजीच्या मदतीला जाईल व दोघे मिळून अब्दाली आणि त्याच्या मदतनीसांचा बंदोबस्त करतील अशी त्यास आशा होती. कदाचित त्याचा आणखी एक छुपा हेतू असण्याची देखील दाट शक्यता आहे व तो म्हणजे शिंदे – होळकर हे बलदंड सरदार परस्पर दुर्बल होत आहेत तर होऊ द्यावेत. नानासाहेब पेशवा आपल्या सर्वच डोईजड सरदारांना चेपण्याची एकही संधी सोडत नव्हता हे इतिहास अभ्यासकांना माहिती आहेच. इतर सरदारांच्या तुलनेने शिंदे – होळकरांचे प्रस्थ जरा मोठे होते. नाही म्हटले तरी खुद्द पेशवा देखील त्यांना वचकून असे. त्याशिवाय त्यांच्या निष्ठेविषयी देखील तो कित्येकदा साशंक असे. याविषयीचे विवेचन श्री. शेजवलकर यांनी आपल्या ‘ निजाम – पेशवे संबंध ‘ या ग्रंथात केले आहे. उपलब्ध साधने लक्षात घेता, यावेळी अब्दालीच्या आक्रमणाकडे नानासाहेब पेशव्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. वस्तुतः दिल्लीची बातमी समजताच त्याने तातडीने उत्तर हिंदुस्थानात सरदारांच्या मदतीसाठी आपल्या दोन भावांपैकी एकाला किंवा एखाद्या सरदाराला पाठवायला हवे होते. पण तसे काही न करता हा बहाद्दर पेशवा निजामाचा पाडाव करण्यात मग्न राहिला. 
          याच ठिकाणी एक महत्त्वाची बाब नमूद करणे योग्य ठरेल व ती म्हणजे, सरदेसाई यांनी आपल्या रियासतीमध्ये असे लिहिले आहे कि, ३ फेब्रुवारी १७६० रोजी -- म्हणजे उदगीरचा निर्णायक संग्राम ज्या दिवशी झाला – त्याच दिवशी नानासाहेबास उत्तरेतील पेचाची वार्ता मिळाली. २० फेब्रुवारी १७६० भाऊला दत्ताजीच्या मृत्यूची बातमी मिळाल्याचा देखील सरदेसाई उल्लेख करतात. पण भाऊला हि बातमी कोणी कळवली ? बातमी मिळाली तेव्हा भाऊचा मुक्काम कोठे होता इ. प्रश्नांची उत्तरे देण्याचे मात्र सरदेसाई यांनी टाळले आहे.
     शेजवलकरांना तर या मुद्द्यांची चर्चाच काय पण नुसता उल्लेख करण्याची देखील गरज भासली नाही. सारांश, निव्वळ सरदेसाईंच्या माहितीवर जरी विसंबून राहायचे म्हटले तरी माझे आधीचे विवेचन चुकीचे ठरत नाही. कारण सरदेसाईंनी दिलेली ३ फेब्रुवारी १७६० हि तारीख जर गृहीत धरली तरीही मूळ प्रश्न किंवा मुद्दा तसाच राहतो व तो म्हणजे पेशवा उत्तर हिंदुस्थानच्या बाबतीत – निदान या काळापुरता तरी – उदासीन राहिला का ? किंवा अशा उदासीनतेमागे नादुरुस्त प्रकृती कारणीभूत होती कि पेशव्याचा स्वार्थ ?    
         असो, उदगीरच्या मुख्य संग्रामाचे वर्णन असलेले पत्र श्री. केळकर यांनी आपल्या ‘ मराठेशाहीतील वेचक वेधक ‘ या पुस्तकात छापले आहे. हे पत्र केळकरांना अर्धवट स्वरूपात मिळाले ते त्यांनी तसेच प्रसिद्ध केले आहे. ते या ठिकाणी देत आहे :-
 ‘     डाव केलरे व लूट बहुत जाली आपले फौजेतील दीड हजारपर्यंत माणूस पडले नवसे हजार घोडे पडले व जखमी जाले. या प्रमाणें मोंगलांस जेहर ( जेर ? ) करून त्याच तलावर मुकाम जाला. या फौजा भोवत्या होऊन तोफांची मारगीर फार केली यामुळे मोगल जेहर देऊन बोलीस वकील पाठविला. साठ लक्षांची जाहागीर व दौलताबाद, बऱ्हाणपूर, आसेरी व विजापूर च्यार ठिकाणे यांसी दिली. तह करार जाला याउपरी रविवारी अथवा सोमवारी द्वितीयेस श्रीमंत या तलावर कूच होऊन पैठणास जाणार. श्रीमंत भाऊसाहेब व दादा तेथे येऊन भेटी होणार. याची रवानगी फौजसुद्धा हिंदुस्थानात व आणखीही जागाजागा फौजाची रवानगी होणे ते होऊन उभयेता श्रीमंत फिरोन येतील. रागश्री ( राजश्री ) जानोजी भोसले व मुघोजी ( मुधोजी ) भोसले श्रीमंत भाऊच्या लष्करात फौज सुद्धा आले आहेत त्यास राजश्री लक्षुमणपंत येथून गेले त्यांस आम्ही आपले कर्जाविसी बहुत निरवण केली ते बोलिले की कर्जाची याद व येक कारकून आप्पाकडे पाठवून द्यावा. प्रस्तुत ते सारे मंडल गंगातीरी येणार यास्तव भोसल्याची हप्तेबंदी दफ्तरी आहे त्याची नक्कल लेहून कृष्णाजी
( पुढील बंद गहाळ आहे. )
          उदगीरच्या मुख्य संग्रामाचे वर्णन भाऊच्या कैफियतीमध्ये विस्तारपूर्वक आले आहे. ते खालीलप्रमाणे :-  ‘ ... ... पहिलें जुंज इभ्रामखान याणें तोंड लाविलें. ते दिवशीं कांहीं जालें नाहीं. मोंगलापाशीं आगेचें बळ भारी. उधळून काढिलें. इभ्रामखान कस्त करून मागें आला. मोंगल बळ धरून मजल दरमजल धारूरचे रोखें चालिला. यांणीं फौजेचा बंदोबस्त करून मध्यें मोंगल, उजवे बाजूस ( भाऊ ) साहेब, डावे बाजूस दादासाहेब ऐसे दररोज जुंजत होते. धारुरानजीक आ ट क. उभयतां फौजा पोंचल्या. पुढें त्रिवर्गही ( भाऊ, दादा व विश्वास ) मिळोन मनसुबा केला कीं, मोगल बळ धरून जबरदस्तीनें मारामार करून धारुरास पोंहचतो. मग हातास येत नाहीं. अशामध्यें कुमक पोंचली नाहीं तों हल्ला करून जुंज द्यावें. यश अपेश ईश्वरसत्ता. परंतु धारूरांत गेल्यावर मग तोलत ( पेलत ; झेपत याअर्थी ) नाहीं. अशी मसलत करून तमाम सरदारांस बोलावून रात्रीस सांगितलें कीं, “ सर्वत्रांनीं हिय्या करून उदईक मोंगलांवर हल्ला करावी. बळकट जुंज द्यावें आणि आम्हांस यश द्यावें.” प्रातःकाळीं कूच जालें तेव्हां रोजच्याप्रमाणें मध्यें मोंगल गोळा करून, गोल किल्ला करून भंवता तोफखाना देऊन चालत होता. सभोंवती आपली फौज नेमणुकेप्रमाणें चालत असे. तों पिछाडीचेच तोंडावर घोडे घातले. सर्वत्रांनीं हिंमत धरून हल्ल्यास उठले. तोफेची रंजक एक झडली. त्याखालीं इभ्रामखान याजकडील व हुजुरातीच्या तोफखान्यांतील गाडद बहुत मारिले. त्यांहीमध्ये बळ धरून मारीतच चालिले. उजवेकडून भाऊसाहेब व रावसाहेब ( विश्वासराव ), व डावेकडून दादासाहेब ऐसे मारामार करीत उठले. तेव्हां मारीत खांशाचे हवद्यापर्यंत ( हौदा :- हत्तीवरील बसण्याची कठडेदार जागा ) जाऊन लोक पोंचले. मोंगलांकडील लोकबहुत पडले. युद्ध उत्तम प्रकारें जालें. एक प्रहरपर्यंत खणाखणी जहाली. मोंगल कचरला. हिंमत सोडली. ते दिवशीं आणीक चार घटका दम धरून जुंज दिल्हे असतें तरि मोंगल बुडवून गर्दीस मेळवून दिल्हा असता. परंतु संध्याकाळ होत आला. बहुत लोक पडिले. बराणजी मोहिते व केशवराव पानसे व आणीक कितेक ते दिवशीं ठार जहाले. बहुत लोक जखमी जहाले. जुंज जालें ते ठिकाणीं मोंगलानें जवळून मुक्काम केला. आपलाही मुक्काम जहाला. यश आलें. बहुत संतोष जहाला.’  
         विश्लेषण :-        भाऊच्या कैफियतीमधील उदगीरच्या संग्रामाचे वर्णन बहुतेक शेजवलकरांनी अभ्यासल्याचे दिसत नाही. त्यांनी जर हे वाचले असते तर पेशव्यांची नालायकी काढायची त्यांना आणखी एक संधी सापडली असती.
       निजामाचा मुक्काम औसा येथे असून त्याच्या मराठा सरदारांचा जमाव धारूर येथे होता. औसा ते धारूर हे अंतर नकाशावर पाहिले असता सुमारे १०० किमी इतके आहे. शेजवलकर यांनी मात्र आपल्या लेखांत हे अंतर वीस कोस म्हणजे ६० - ६५ किलोमीटर्स असल्याचे नमूद केले आहे. औसा येथून नगर सुमारे दोन – अडीचशे किलोमीटर्स अंतरावर आहे. भाऊच्या नेतृत्वाखाली मराठी फौज औसाच्या आसपास गोळा झाली होती. यावेळी भाऊच्या सैन्यात घोडदळासोबत इब्राहीमखानाच्या बंदुकधारी पायदळाचा देखील समावेश होता. तसेच कैफियतीमधील या संग्रामाचे वृत्त पाहिले असता असे लक्षात येते कि, मुजफ्फरखानाच्या हाताखालील गारदी पथकांपैकी काही पथके हुजुरातीच्या तोफखान्यात सामील झाली होती. म्हणजे त्यांच्यावर आता पेशव्यांचा तोफखाना सरदार पानसे याची हुकुमत होती. परंतु, पानसेच्या हाताखालील गारदी हे तोफखान्याचे काम जाणणारे होते कि बंदूकधारी पायदळातील होते याची स्पष्टता होत नाही.
      इब्राहीमखानाची पायदळ पथके सोबत असल्यामुळे व निजाम लष्कराचा गोल बांधून पुढे जायच्या तयारीत असल्यामुळे भाऊने आपल्या मूळच्या युद्धयोजनेमध्ये थोडाफार बदल केला. नव्या योजनेनुसार भाऊ, विश्वासराव हे पानसे आणि इब्राहीमखानाच्या सोबत निजामाच्या लष्करी गोलाच्या एका बगलेवर हल्ला चढवणार होते व त्याच वेळी दुसऱ्या बाजूने रघुनाथरावाने घोडदळाच्या सहाय्याने शत्रू सैन्याच्या दुसऱ्या बगलेवर चढाई करायची असे ठरले.
        नव्या युद्धनीतीनुसार २० जानेवारी १७६० नंतर मराठी फौजांनी निजामाच्या सैन्यावर हल्ले चढवण्यास आरंभ केला. उदगीर येथून औसा येथे येताना निजामाचा काय बेत होता ते समजायला मार्ग नाही पण औसा येथून निघताना त्याने नगरच्या ऐवजी आपला मोर्चा धारूरकडे वळवला. लष्करांत गारद्यांचा मोठा भरणा असल्यामुळे गोलाची रचना त्याला मानवण्यासारखी होती. त्याशिवाय शत्रूपक्षाकडे असलेला इब्राहीमखान हा जरी शूर असला तरी तो कल्पक सेनानी नसल्यामुळे त्याच्याकडून आपल्याला फारसा उपद्रव होणार नाही अशीही त्याची अटकळ असावी. खुद्द सलाबतजंगाच्या मते इब्राहीमखान हा युद्धकलेत मुझफ्फरखानापेक्षा कमीच होता ! या ठिकाणी लक्षात घेण्याची बाब म्हणजे या दोन्ही खानांनी व त्यांचा गुरु बुसी याने सलाबतजंगाच्या पदरी चाकरी केली होती. आणि त्या अनुभवावरून सलाबतजंगाचे इब्राहीमविषयी उपरोक्त मत बनले होते.
       औसा येथून निजामाने धारूरकडे कधी प्रस्थान ठेवले याची माहिती मिळत नाही. निजाम – पेशव्यांचा अखेरचा संग्राम नेमका कुठे झाला याचीही निश्चित अशी माहिती सरदेसाई किंवा शेजवलकर देत नाहीत.
                निजामाने धारूरकडे जायचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी करण्यास आरंभ देखील केला. या ठिकाणी असा एक प्रश्न उद्भवतो व तो म्हणजे निजाम औसा येथून धारूरला निघाला त्यावेळी धारूर येथील निजामाचे मराठा सरदार काय करत होते ? खंडागळेने दमाजीला उधळून लावायचे कार्य पार पाडले पण त्यानंतर त्याने किंवा इतर मराठा सरदारांनी काही विशेष हालचाल केल्याचे दिसून येत नाही. कदाचित पेशव्याच्या फितुरी अस्त्राचा हा प्रभाव असावा.
         भाऊ व दादा यांनी धारूरच्या मराठा सरदारांच्या जमावाकडे दुर्लक्ष करून निजामावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. निजाम लष्कराचा गोल बांधून चालत असल्यामुळे मराठी सैन्याला हा गोल फोडण्यास आरंभी यश मिळत नव्हते. इब्राहीमसारखा कुशल तोफखाना अधिकारी पदरी असूनही भाऊच्या आक्रमणाला यश मिळायची चिन्हे दिसेनात. अशा स्थितीत निजाम निग्रहाने झुंजत निम्मे अंतर पार करून धारूर जवळ करू लागला होता.
   मराठी सैन्याचा या अपयशाला त्यांची सदोष युद्धरचना कारणीभूत होती असे माझे मत आहे. एका बाजूने भाऊ इब्राहीमच्या कवायती पायदळाच्या सहाय्याने निजामाचा गोल फोडण्याचा प्रयत्न करत होता. परंतु निजामाकडे देखील कवायती पायदळाचा भरणा असल्यामुळे इब्राहीमच्या हल्ल्यांना तो थोडीच भीक घालणार ? दुसऱ्या बाजूने रघुनाथराव घोडदळाच्या मदतीने निजामाचा लष्करी गोल भेदण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, निजामाच्या तोफा – बंदुकांसमोर त्याचे घोडेस्वार हतबल झाले होते. तात्पर्य ; भाऊने पूर्वनियोजित युद्धतंत्रात बदल करून एकप्रकारे आत्मघाताचे धोरण स्वीकारले होते असेच म्हणावे लागते.
          अखेर, दिनांक ३ फेब्रुवारी १७६० रोजी निजामाच्या लष्करी गोलाला भगदाड पाडण्यात मराठी फौजांना यश प्राप्त झाले. निजामाच्या डाव्या – उजव्या बगलांवर हल्ले चढवण्यात आले. त्याच सुमारास मराठी सैन्याची एक टोळी शत्रूसैन्याच्या पिछाडीवर चालून गेली. त्यामुळे निजामाच्या अभेद्य भासणाऱ्या लष्करी गोलाला खिंडार पडले आणि प्रचंड नुकसान सोसून अखेर भाऊने ३ फेब्रुवारी १७६० रोजी निजामाचा बऱ्यापैकी पराभव करण्यात यश मिळवले !
          परंतु हे पूर्णतः सत्य नसून फक्त अंशतः सत्य आहे ! आपण पराभूत झालो आहोत अशी निजामबंधूंची अजिबात भावना नव्हती. उलट त्यांच्या सैन्याने मोठ्या शौर्याने लढून निजामबंधूंचा बचाव केला होता. या ३ फेब्रुवारीच्या संघर्षात निजामाची किती माणसे मारली गेली याचा उल्लेख मिळत नाही पण केळकरांनी संशोधित केलेल्या पत्रानुसार मराठी फौजांची बरीच हानी झाल्याचे दिसून येते. सुमारे दीड हजार मनुष्य व हजारभर प्राण्यांना आपले जीव गमवावे लागले. बराणजी मोहिते व केशवराव पानसे सारखे सरदार मारले गेले. मराठी सैन्याची हि हानी लक्षात घेता या संग्रामात निजाम पराभूत झाला असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल !
              भाऊच्या कैफियतीनुसार या लढाईमध्ये इब्राहीमची व सरकारी गारद्यांची बरीच हानी झाली. इब्राहीमच्या लष्करी गुणांविषयी मराठी इतिहासकरांनी / कादंबरीकारांनी जे काही लिहून ठेवले आहे – एक उत्कृष्ट सेनानी, कल्पक लढवय्या, कुशल तोफखाना कामगार अशी  त्याची जी काही प्रतिमा मराठी इतिहास वाचकांच्या मनात उभी केली आहे त्यास तडा देणारीच हि माहिती आहे.
          ३ फेब्रुवारीचा दिवस मावळल्यावर निजामाने पूर्ण विचारांती भाऊकडे वकील पाठवून तहाची वाटाघाट आरंभली. पेशव्याच्या सैन्याशी लढत – लढत त्याने धारूरपर्यंत मजल मारलीही असती पण यादरम्यान त्याची देखील बरीच मनुष्यहानी झाली असती व ती त्याला नको होती.
        केवळ आपली मनुष्यहानी टाळण्यासाठी त्याने तहाची वाटाघाट आरंभली. निजामाने तहाचे बोलणे लावताच पेशवेबंधूंनी देखील फारसे ताणून धरले नाही. वास्तविक निजामाला साफ बुडवण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली होती पण बहुतेक युद्धात झालेल्या मनुष्यहानीमुळे त्यांनाही लढण्यात विशेष अर्थ वाटला नाही. जर खरोखर पेशवेबंधूंना किंवा खुद्द पेशव्याला निजामाचा समूळ नाश करायची इच्छा असती तर कोणत्या ना कोणत्या निमिताने जुळून येणारा तह त्यांनी मोडला असता. परंतु, पेशवेबंधूंनी तसे केले नाही.
        ३ फेब्रुवारी १७६० रोजी निर्णायक संग्राम होऊन ११ फेब्रुवारी रोजी उभयतांचा तह बनून आला. तहाची वाटाघाट सुमारे ७ – ८ दिवस चालली. या अवधीचा फायदा घेऊन निजामाने स्वतःला अनुकूल असा तह घडवून आणला.
 उदगीरच्या तहातील कलमे :-
१)    ‘.. .... ... तेव्हां विठ्ठल सुंदर दिवाण याजपाशीं शिक्के कटार देऊन यांचे डेऱ्यास पाठविला. किल्ले मुलुख मागितला तो कबूल करून पत्रें करून देणें. त्याजवरून मशारनिल्हेनी येऊन बहुत रदबदली करून तह केला कीं, दवलताबाद, बऱ्हाणपूर व सालेर व मुल्हेर, अमदानगर एकूण किल्ले सहा. साठा लक्षांचा मुलुख. त्यामध्यें किल्ल्याखालीं जो मुलुख असेल तो वजा करून बाकी जहागीर करार करून घेतली. ( भाऊसाहेबांची कैफियत )
           केळकरांनी प्रसिद्ध केलेले अती अर्धवट स्वरूपाचे पत्र व भाऊच्या कैफियत मधील उदगीर तहाच्या अटी पाहिल्या असता काही गोष्टी पटकन लक्षात येतात. (१) पेशव्यांनी युद्धखर्च म्हणून निजामाकडून रोख खंडणी घेतली नाही. (२) दौलताबाद, विजापूर, अशीरगड व बऱ्हाणपूर हि चार प्रमुख स्थळे पेशव्याला देण्याचे निजामाने मान्य केले. हि चार स्थळे म्हणजे प्राचीन मुस्लीम वैभवाची ठिकाणे आहेत हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच ! (३) एक कोटी रुपये उत्पन्नाच्या मुलखाची पेशव्याने मागणी केली होती पण निजामाने त्याची साठ लक्ष उत्पन्नाच्या प्रांतावरच बोळवण केली.
            या तहानंतरच्या घटना पाहिल्या असता उपरोक्त ४ स्थळे व साठ लक्षांचा प्रांत पेशव्याकडे आल्यासारखे झाले पण त्यावर पेशव्याचा संपूर्ण ताबा काही बसला नाही. उदगीर तहाच्या वाटाघाटी सुरु असतानाच निजामाला उत्तरेतील घटनांची माहिती समजली असावी. पेशव्याच्या अडचणींचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. तहात मिळवलेला प्रदेश ताब्यात घ्यायचा, त्याचा बंदोबस्त करायचा व त्याच वेळी उत्तरेत एक सैन्यविभाग पाठवायचा या सर्व गोष्टी एकाच वेळी कृतीत आणणे पेशव्यास शक्य नाही असा निजामाचा अंदाज होता. त्यामुळे त्याने पेशव्याच्या सर्व मागण्या कागदावर तरी मान्य केल्या.  पण,  भाऊ उत्तरेत गेल्यावर तहाची अंमलबजावणी करण्यास त्याने टाळाटाळ चालवली. याविषयी मराठी रियासती मधील पुढील उल्लेख चिंतनीय आहे :- ‘ .. .. एकाने अंतस्थ बातमी सदाशिवरावास लिहिली कीं, “ मोगलांची जात काबूची ( काबूची :- नीच, स्वार्थी ), समय पाहून घात करणार, तूर्त मागतील त्या गोष्टी कबूल केल्या, तिघे भाऊ एक जागां जाले, निंबाळकर, खंडागळे वगैरे अमीर लोक बिघडले आहेत. अवघ्यांस मिळवून पुनः एकदां हर्षामर्ष करावा हे गोष्टी निजामअलीखांचे चित्तीं फार आहे. बोलून दाखवीत नाहींत, रंग असा दिसतो.”  भाऊ यावेळी दक्षिणेतच होता. उत्तरेत शिंद्यांच्या मदतीला अजून रघुनाथरावाची रवानगी झाली नव्हती. अशा वेळी निजामबंधूंची कारस्थाने परत एकदा खेळू लागली होती. भाऊचा उदगीर विजय किती पोकळ होता याचा हा उत्तम पुरावा आहे असे म्हणता येईल.
              तात्पर्य ; पानिपत मोहिम उद्भवल्यामुळे व पानिपतावर मराठी सैन्याचा पराभव झाल्यामुळे भाऊचा उदगीर विजय निष्फळ ठरला असा एक गोड गैरसमज आहे. पण मुळात उदगीरच्या संग्रामात मराठी फौजांचा विजय झाला होता का याचा कोणी विचार केल्याचे दिसून येत नाही. निजामाचे लष्करी बळ मोडण्यात यावेळी देखील पेशव्यांना साफ अपयश आले होते ही गोष्ट उघड आहे व चतुर, मुत्सद्दी निजामबंधूंनी तात्पुरती वेळ मारून नेण्यासाठी तहाची हुलकावणी दिलेली होती. जर खरोखर उदगीर येथे मराठी सैन्याचा विजय झाला असता तर तहातील अटी या फार वेगळ्या दिसल्या असत्या किंवा दक्षिणेत निजामाचे राज्यच अस्तित्वात राहिले नसते.