गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

उदगीर मोहीम - स. १७५९ - ६०


             स. १७५९ च्या उत्तरार्धात उत्तर हिंदुस्थानात दत्ताजी शिंदे नजीबखान व अब्दाली यांच्याशी झुंजत होता त्याच सुमारास दक्षिणेत पेशवा निजामाला गुंडाळण्याच्या उद्देशाने पुण्यातून बाहेर पडला. वस्तुतः निजामावरील स्वारीसाठी पेशव्याकडे काही सबळ असे कारण होते अशातला भाग नाही. परंतु, राज्यविस्तार करणाऱ्या सत्ताधीशाला अशा कारणांची गरज असतेच असे नाही !
           दिनांक ९ नोव्हेंबर रोजी पेशव्याचा सरदार विसाजी कृष्ण बिनीवाले याने, अहमदनगरचा किल्ला ताब्यात घेतला. नगरचा हा किल्ला, निजाम – पेशव्याच्या आणखी एका संग्रामाचे निमित्त बनला. नगरचा किल्ला पेशव्याने घेतल्याचे समजताच सलाबतजंग, निजामअली व बसालतजंग हे त्रिवर्ग बंधू पेटून उठले. खासा सलाबतजंग व निजामअली हे दोघे बेदरमधून सुसज्ज सैन्य व तोफखाना घेऊन पेशव्यावर चालून निघाले. बसालतजंग हा कर्नाटकातून आपल्या भावांच्या मदतीस फौज घेऊन येणार होता.
   वास्तविक निजामबंधूंची हि कृती / हालचाल पेशवेबंधूंना अपेक्षित अशीच होती. निजामाने असा काहीतरी आततायीपणा करून खुल्या मैदानात, सोयीच्या ठिकाणी यावे आणि आपल्या लष्करी बळावर त्यास चिरडून टाकावे किंवा त्याच्या लष्करी सामर्थ्याचा नाश करावा अशी पेशव्याची इच्छा होती. मला जी काही संदर्भ साधने उपलब्ध झाली, त्यातील माहितीवरून असे दिसून येते कि, स. १७५९ च्या पावसाळ्यात किंवा तत्पूर्वीच या मोहिमेची आखणी पेशव्याच्या दरबारात झाली होती. त्यानुसार निजामाच्या दरबारातील मराठा सरदारांना फितूर करण्याचे प्रयत्न पेशव्याने आरंभले होते. या ठिकाणी एक गोष्ट नमूद करणे गरजेचे आहे व ती म्हणजे या मोहिमेचा नामधारी प्रमुख विश्वासराव जरी असला तरी स्वारीची सर्व सूत्र सदाशिव आणि रघुनाथ यांच्या हाती असून या सर्वांवर आजारी परंतु चाणाक्ष नानासाहेब पेशव्याची करडी नजर होती.
               पेशव्याने रचलेल्या कारस्थानानुसार विसाजी कृष्ण बिनीवाले हा सरदार नगरच्या रोखाने रवाना झाला. या किल्ल्याचा किल्लेदार कविजंग हा असून त्याला फितूर करण्यात विसाजी यशस्वी झाला. पन्नास हजारांची जहागीर मिळाल्यास किल्ला पेशव्याच्या ताब्यात देण्यास कविजंग तयार झाला. कारस्थान फळास येताच २९ नोव्हेंबर रोजी नगरच्या किल्यात पेशव्याने आपला मुक्काम हलवला. नगरचा किल्ला परत आपल्या ताब्यात घेण्यासाठी व फितूर सरदार कविजंग याचा सूड घेण्यासाठी निजामबंधू बेदरमधून बाहेर निघाले. रियासतकार सरदेसाई यांच्या मते निजाम सुमारे बारा हजार सैन्य व दहा हजार गारदी आणि १०० तोफा घेऊन लढाईच्या उद्देशाने बाहेर पडला. तर पेशव्याचे चाळीस हजार लष्कर या मोहिमेत सहभागी झाले होते. शेजवलकर आपल्या ‘ पानिपत : १७६१ ‘ या ग्रंथात असे दिले आहे कि, या मोहिमेत निजामाची फौज सर्व मिळून सुमारे वीस हजार असून त्यात दहा हजार गारद्यांचा भरणा होता. निजामाच्या पदरी असलेले कित्येक मराठा सरदार आपापल्या जमावासह धारूर येथे येऊन गोळा झाले.
         उदगीर मोहिमेत एकूण किती मराठी फौज सामील झाली होती याची विश्वसनीय माहिती मिळत नाही. भाऊ परळी येथे आला तेव्हा त्याच्यासोबत पंचवीस हजार सैन्य असल्याचा उल्लेख शेजवलकर करतात. तर सरदेसाई, मराठी सैन्य चाळीस हजार होते असे सांगतात.  या ठिकाणी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो व तो मुद्दा म्हणजे उदगीर मोहिमेतील मराठी पक्षातर्फे जे काही लष्करी डावपेच आखण्यात आले त्यामागे कोणाचा कल्पक मेंदू कार्यरत होता ? रघुनाथराव कि सदाशिवराव ?
       स. १७६० मध्ये सदाशिवराव हा ३० वर्षांचा असून रघुनाथरावाचे वय याप्रसंगी २६ वर्षांचे होते. भाऊने याआधी ज्या काही मोहिमा पार पाडल्या होत्या त्यामध्ये त्याने कल्पक अशा लष्करी योजना आखल्याचे उल्लेख कोणी करत नाही. रघुनाथरावाने भाऊपेक्षा संख्येने अधिक आणि प्रादेशिक / भौगोलिक मर्यादेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हिंदुस्थानच्या विविध भागात आपली बहादुरी दाखवली होती. अर्थात, या दोघांच्याही पदरी अनुभवी असे रणपंडीत असल्याने त्यांना यश मिळाले होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. असे असले तरी उदगीर मोहिमेचा खरा सेनापती कोण होता हा प्रशन अनुत्तरीत राहतोच !
        पानिपतच्या अभ्यासकांनी -- ज्यामध्ये प्रस्तुत लेखकाचा देखील समावेश आहे – उदगीर मोहिमेचा फक्त निकाल लक्षात घेऊन व तहाच्या चर्चेत भाऊचे नाव असल्याचे पाहून या संग्रामाच्या यशाचे सर्व श्रेय भाऊच्या पदरात घातले आहे. परंतु, उदगीर प्रकरणाच्या आधीच्या व नंतरच्या घटनांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास असे लक्षात येते कि उदगीर स्वारीचा खरा नायक रघुनाथराव हाच होता ! निजामाची स्वारी आटोपताच रघुनाथराव उत्तर हिंदुस्थानात जाणार होता. पण मग आयत्या वेळी त्या मोहिमेवर भाऊची नियुक्ती करण्यात आली. उदगीरच्या संग्रामात भाऊसाहेबास यश मिळाल्यामुळेच पानिपत स्वारीवर त्याची नेमणूक झाली असे समजणे मूर्खपणाचे लक्षण होईल ! कारण हाच निकष लावल्यास रघुनाथराव अटक मोहिमेत पराभूत झाला होता व त्यामुळेच त्याला उत्तर हिंदुस्थानात पाठवले नाही असेच म्हणावे लागेल. सारांश, उदगीर मोहिमेच्या यशाचे सर्व श्रेय रघुनाथरावाचे असून तहाच्या बाबतीत भाऊने आपले कसब पणाला लावल्याचे दिसून येते. या ठिकाणी आणखी एक गोष्ट नमूद करणे योग्य होईल व ती म्हणजे उदगीर मोहिमेत जे काही लष्करी डावपेच आखण्यात आले होते त्यानुसार पेशव्याच्या सैन्याच्या हालचाली झाल्याचे दिसून येत नाही. अर्थात, उदगीरच्या संग्रामात रघुनाथरावाने जे काही लष्करी डावपेच आखले होते त्याची माहिती आता उपलब्ध नाही पण त्या संग्रामाचे तत्कालीन लेखांत व कैफियतीमध्ये जे काही वर्णन आले आहे ते पाहता मुळच्या युद्धविषयक धोरणात परिस्थितीनुसार किंवा हेतुपूर्वक फेरबदल करण्यात आल्याचे आढळून येते.   
            नगरचा किल्ला ताब्यात येताच नानासाहेब पेशवा त्या ठिकाणी मुक्कामास गेला. यावेळी रघुनाथ, सदाशिव व विश्वास हे तिघे त्याच्यासोबत होते किंवा यापैकी त्याच्याजवळ कोण होते आणि कोण नव्हते याची स्पष्ट अशी माहिती मराठी रियासत, पानिपत : १७६१ आणि भाऊची कैफियत यामध्ये येत नाही. उदगीर मोहिमेवर मर्यादित प्रकाश टाकणारी दोन पत्रे श्री. य. न. केळकर यांनी आपल्या ‘ मराठेशाहीतील वेचक वेधक ‘ या पुस्तकात प्रसिद्ध केली आहेत. त्यापैकी उदगीर मोहिमेतील मुख्य संग्रामाच्या आधीची माहिती देणारे पत्र या ठिकाणी देत आहे :-
                  श्री                        रामोजयति
            राजश्री हरबाजी बावा स्वामीस विनंती उपरी सांप्रत श्रीमंत नानाची मर्जी पाहता शरीरी वेथा. क्षीण फार जाहाले. लोकास पैसा द्यावा हे बुधी येकंदर नाही. रदबदली केली तर तोडून जाब सांगतात. राजश्री भाऊ व राजश्री रघुनाथपंत मोगलास बुडवावे या उमेदीने गेले, ते गोस्ट राहिली. मोगल बलकट आहे आपल्या जोऱ्याने उदगिरीस आला. तेथे बुनगे ठेऊन सडा झाला. यांची त्याची गाठ पडली. येक जुज मातवर जाहाले. इभ्रामखा गाडदीयाचा भाचा पडला माणूसही फार पडले. तेथून रोज तीन चार कोश मोगल चालत चालत आवशावर आला. हे भोवते आहेत रोज झटपट होते परंतु याची सलाबत मोगलावर पडत नाही. येक इभ्रामखान मात्र जुजतो वरकड मराठे झटत नाही काठ्या घालितात तऱ्ही निकड होत नाही माणूस बेदील. कोणास पैसा दिल्हा नाही रोजमुरे यावर चाकरी घेतात यामुले मन कोणी घालीत नाही. राजश्री दमाजी गायेकवाड परलीवर राहिले होते त्याजवर खंडागले येऊन पडले. त्याणी सारे लस्कर लुटून पस्त केले. दमाजीस दोन तीन जखमा होऊन दोन च्यारसे रावतानसी पलोन श्रीमंताच्या लस्करात गेले. इतके दिवस मोगलापासी मराठे नव्हते सांप्रत जाधव खंडागले आटोले पांढरे बाके वगैरे दाहा दजार ( हजार ) जमा जाले व अलीकडे घारुराजवळ ( धारूर ) मोगल आला असेल. हणवंतराव व जानोजीची फौज तयार आहे बसालतजंग करणाटकची फौज घेऊन आला त्याची भेंट जाली असेल. अगर होईल याउपर मोगल भारी जाला याचा त्याचा तूर्त तह होत नाही. मोगलाचा मनोदये पंढरपुरास येऊन भीमेच्या पाण्याने वरते यावे दुसरे धारुरावरून परांडे यासी येऊन सिनेच्या पाण्याने नगरास अगर पेडगावास यावे ऐसे आहे. या चिंतेत हे श्रीमंत फार हैराण आहेत आशामध्ये छ १३ जमादिलाखरचे प्रहर रात्री सहा दिवसात उजनीहून कासीद आले. दिलीची पत्रे आली की आबदली ( अब्दाली ) फौज घेऊन आला तो व रोहिले जाट सुजायत दौला येकत्र होऊन दिल्लीवर आले. तेथे सिंद्याचे व त्याचे जुज जाहाले. जनकोजी शिंदे यासी जखमा आहेत दत्ताजी सिंदे पाच हजार फौजेनसी मोगलाच्या फौजेत गर्क जाहाले. ते सारे लोक कापून ठार केले. दतबाचा मुर्दा देखील सापडला नाही लस्कर सारे मोगलानी लुटून दिली घेऊन पातशाह मारिला व वजरी मारिले. यांचा आमल ( अंमल ) तमास ( तमाम ? ) उठविला. दिलीची पातशाही आबदली करीत आहे हे विनंती.
       उपरोक्त पत्र वाचताना प्रथम काही गोष्टी स्पष्टपणे लक्षात येतात व त्या म्हणजे पत्राचा लेखक कोण आहे ? पत्र लिहिणारा लेखक नेमका कोणत्या ठिकाणाहून पत्र लिहित आहे ? मुख्य म्हणजे पत्र नेमके कधी लहिले आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे कार्य श्री. केळकर यांनी केलेले नाही. कदाचित प्रस्तुत पत्र त्यांना असेच अर्धेमुर्धे सापडले असावे. असो, पत्राच्या मजकुरावरून हे पत्र नानासाहेब पेशव्याच्या सोबत नगर मुक्कामी असलेल्या व्यक्तीने लिहिले असल्याचे स्पष्ट होते. पत्राच्या आरंभीच नानासाहेब पेशवा हा फारच आजारी असल्याचा उल्लेख आहे. पत्रलेखक हा बहुतेक पेशव्याचा पथक्या किंवा दुय्यम , तिय्यम दर्जाचा लष्करी अंमलदार असावा असा तर्क करता येतो. कारण, पत्रामध्ये नानासाहेब पेशवा लोकांना पगार देत नसल्याचा उल्लेख आहे. अर्थात हे लोक लष्करी वा मुलकी खात्यातील असल्याचे यात स्पष्ट केले नसले तरी पेशवेकाळातील सैन्यविषयक धोरण लक्षात घेता हा उल्लेख लष्करी पेशाच्या व्यक्तींना अनुलक्षून असल्याचे स्पष्ट होते. पुढे निजाम – पेशव्याच्या फौजांच्या मुख्य संग्रमाच्या आधीच्या हालचालींची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार असे दिसून येते कि, निजामबंधू उदगीर येथे येऊन पोहोचले. त्यावेळी मराठी सैन्य अंगावार येत असल्याचे पाहून त्यांनी आपले बुणगे उदगीर येथे ठेवले आणि सडी फौज, तोफखाना घेऊन ते शत्रूवर चालून गेले. ता. १९ व २० जानेवारी १७६०, या दोन दिवसांमध्ये दोन्ही पक्षांचे एक झुंज घडून आले. त्यात इब्राहीमखानचा भाचा मारला गेल्याचा उल्लेख या पत्रात आला आहे. हि लढाई बहुतेक उदगीरच्या आसपास घडून आला असावी. कारण, या संग्रामानंतर निजामाची फौज औसाच्या दिशेने पुढे सरकल्याचा उल्लेख पत्रात आलेला आहे.                
               निजामाच्या सैन्याभोवती मराठी फौजेचा धावता वेढा पडला असला तरी मराठी लष्कराला न जुमानता निजाम औसा येथे येऊन पोहचल्याचे प्रस्तुत पत्रात लिहिले आहे. या पत्रातील ‘ येक इभ्रामखान मात्र जुजतो वरकड मराठे झटत नाही ‘ हि ओळ अतिशय महत्त्वाची आहे.  मराठी रियासतीनुसार ९ ऑक्टोबर १७५९ रोजी इब्राहीमखान निजामाच्या सेवेमधून बाहेर पडला व ता. ११ नोव्हेंबर १७५९ च्या पत्रानुसार इब्राहीम पेशव्याच्या सेवत रुजू झाला. इब्राहीमखानावर भाऊचा अपवाद केल्यास इतर कोणाचा फारसा विश्वास असल्याचे दिसून येत नाही. भाऊने फ्रेंच योद्ध बुसीची कामगिरी जवळून पाहिली होती. तोफखाना व कवायती पलटणींच्या कामगिरीचा त्याच्या मनावर विलक्षण परिणाम झाला असून या नव्या पद्धतीचे अनुकरण करण्यास तो कमालीचा उत्सुक होता. इब्राहीम ११ नोव्हेंबर १७५९ रोजी पेशव्याच्या सेवेत आल्याचा दाखला मिळत असला तरी तो तो नेमक्या कोणत्या ठिकाणी मराठी सैन्यात दाखल झाला याची माहिती मिळत नाही.
      ज्या निजामाच्या विरोधात लष्करी मोहीम सुरु आहे त्याच निजामाच्या एका महत्त्वाच्या सरदारास आपल्या सेवेत घेऊन लढाईमध्ये त्यास आघाडीवर ठेवणे किंवा मुख्य लष्करासोबत बाळगणे हा निश्चितच मुर्खपणा होता व याच मुद्द्यावरून भाऊसोबत असलेले मराठी सरदार काहीसे नाराज झाले असण्याची शक्यता आहे. भाऊचे हे कृत्य त्यांना आत्मघातकीपणाचे वाटले असल्यास नवल नाही. इब्राहीम जरी विश्वासू, प्रामाणिक व इमानी असला तरी तत्कालीन विशिष्ट प्रसंग वा परिस्थिती लक्षात घेता भाऊची हि कृती निश्चितच चुकीची आहे असेच म्हणावे लागते. त्याशिवाय इब्राहीमच्या कवायती पायदळ सैन्याचा युद्धात उपयोग करण्याचे ठरल्यामुळे मराठी सरदारांना आपली पूर्वनियोजित अशी गनिमी काव्याची युद्धरचना बदलावी लागली. या कारणामुळेच मराठी सरदारांनी या संग्रामात मनापसून सहभाग घेतला नसावा. माझ्या मते, इब्राहीमला निजामावरील स्वारीत मुख्य लष्करात सामील करून घेण्याचा निर्णय रघुनाथरावास देखील तितकासा रुचला नसावा. कारण हा त्याच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करणारा निर्णय होता.     
        यापुढील पत्रामधील ‘ काठ्या घालितात तऱ्ही निकड होत नाही माणूस बेदील. कोणास पैसा दिल्हा नाही रोजमुरे यावर चाकरी घेतात यामुले मन कोणी घालीत नाही.’ हि वाक्ये देखील अतिशय महत्त्वाची आहेत. वरवर पाहता असे दिसून येते कि वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे मराठी फौजांचे लढण्यात मन नव्हते. परंतु, हे अर्धसत्य आहे. वस्तुतः निजामाच्या सैन्यात सुमारे दहा हजार गारद्यांचा भरणा असल्यामुळे तो फौजेचा गोल बांधून चालला होता. निजामाचा पराभव करण्यासाठी त्या लष्करी गोलावर चालून जाणे आवश्यक होते व त्यासाठी गारद्यांच्या बंदुकींचा मारा झेलणे गरजेचे होते. आधीच वेळेवर पगार नाही व त्यात गारद्यांसोबत लढायचे म्हणजे प्राणांशी गाठ अशी मराठी सैनिकांची भावना बनली असल्यास नवल नाही. अशा स्थितीत निजामाच्या गारद्यांसोबत झुंजाचा प्रसंग उद्भवताच मराठी फौजा माघार घेत होत्या. तेव्हा लढाईतून पळून मागे येणाऱ्या लोकांना परत युद्धात लोटण्यासाठी भाऊने तत्कालीन प्रचलित पद्धतीनुसार त्यांना काठ्यांनी बडवून परत लढाईत उतरण्यास भाग पाडले असावे. वास्तविक अशी वेळ युद्धप्रसंगात नेहमी उद्भवणारी असल्यामुळे यात विशेष असे काही नाही.
            यापुढे पत्रामध्ये परळीवर असलेल्या दमाजी गायकवाडाचा, निजामाचा मराठा सरदार खंडागळे याने मोठा पराभव केल्याचा उल्लेख आहे.
           उदगीर संग्रामाचे जे काही तपशील मला उपलब्ध झाले त्यानुसार दिनांक ११ जानेवारी १७६० रोजीपासून भाऊच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्याचा व निजामाच्या फौजानाचा मुकाबला सुरु झाला. याचा अर्थ ११ जानेवारी १७६० च्या आधी केव्हातरी भाऊच्या हुकुमतीखाली मराठी फौज उदगीरजवळ आली होती. मराठी फौजांची कोंडी करण्याच्या उद्देशाने निजामाने आपल्या मराठा सरदारांना भाऊच्या पाठीवर येण्यास सांगितले असावे किंवा निजामाच्या मदतीस जाण्याकरता त्याच्या पदरी असलेले मराठा सरदार धारूर येथे गोळा झाले असावेत. काय असेल ते असेल पण उदगीरनजीक भाऊच्या हुकुमतीखाली असलेल्या मराठी फौजेच्या दृष्टीने हा एकप्रकारे सापळा होता !
        धारूर येथील निजामाच्या मराठा सरदारांवर नजर ठेवण्यासाठी व आपली पिछाडी सांभाळण्यासाठी पेशवेबंधुंनी दमाजी गायकवाडाची नियुक्ती केली. त्याचप्रमाणे धारूर येथे जमलेल्या निजामाच्या मराठा सरदारांमध्ये फितूर पेरण्याचे कार्य देखील जोरात चालू होते व त्यात पेशवेबंधूंना काहीसे यश देखील मिळाले. असे असले तरी, निजामाचा मराठा सरदार खंडागळेने दमाजी गायकवाडवर संधी साधून हल्ला चढवला. यावेळी दमाजी काहीसा गाफील असावा किंवा अति आत्मविश्वासाच्या बळावर लढाईत उतरला असावा. परिणामी खंडागळेच्या पथकांनी गायकवाडी फौजेचा साफ धुव्वा उडवला. गायकवाडांची सेना लुटली गेली. खुद्द दमाजी जखमी होऊन मुख्य सैन्याच्या आश्रयास मागे धावला. निजामाच्या मराठा सरदारांनी यावेळी जी चमक दाखवली त्यामुळे पेशवेबंधूंमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली.
           दमाजी व खंडागळे यांच्या लढाईची नेमकी तारीख उपलब्ध नाही. त्यामुळे हि लढाई घडून आल्यावर मराठी फौजेने १९ व २० जानेवारी रोजी निजामावर हल्ला चढवला कि, हि लढाई होण्यापूर्वी निजाम – मराठी सैन्याच्या १९ व २० जानेवारीच्या चकमकी घडून आल्या याची निश्चिती करता येत नाही. 
                    उपरोक्त पत्रातील पुढील भागास -- बुराडी घाटचे वर्तमान अपवाद केल्यास – फारसे महत्त्व देता येत नाही. कारण पुढील घटनाक्रमांची पत्रलेखकास माहिती नसून तो फक्त युद्धविषयक आपले अंदाज व्यक्त करत आहे.
                छ १३ जमादिलाखरचे उज्जैनवरून पेशव्यास नगर येथे पत्र मिळाले. त्यात बुराडी घाटच्या संग्रामाची व दत्ताजीच्या मृत्यूची बातमी आहे. ही गोष्ट पानिपत अभ्यासकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. किंबहुना, अस्सल पत्रातील या एका ओळीने सबंध पानिपत मोहिमेवर बराचसा प्रकाश पडतो. प्रस्तुत पत्र उदगीर मोहिमेचा निर्णायक – म्हणजे ३ फेब्रुवारी १७६० रोजीचा – संग्राम घडण्यापूर्वीचे आहे हे तर उघड आहे.
          दमाजी गायकवाड खंडागळे सोबत लढताना जखमी झाल्याचा उल्लेख, निजाम मराठी फौजांना न जुमानता उदगीरहून औसा येथे आल्याचा उल्लेख, दत्ताजीचे वर्तमान समजल्याचा उल्लेख व त्यानंतर लिहिलेले हे पत्र, हा सर्व घटनाक्रम जर जोडून पाहिला तर दिनांक १० जानेवारी १७६० रोजी झालेल्या बुराडी घाटच्या लढाईचे वर्तमान नानासाहेब पेशव्यास नगरमुक्कामी १९ / २० जानेवारी नंतर किंवा जानेवारीच्या अखेरीस समजले असे ठामपणे म्हणता येते. अर्थात हा निष्कर्ष तर्कावर आधारित आहे हे उघड आहे. परंतु सध्या तरी या तर्कावर भिस्त ठेवण्याखेरीज गत्यंतर नाही. 
               असो, दिल्लीची बातमी मिळून देखील पेशव्याने तिकडे फारसे लक्ष दिले नाही. उत्तरेत मल्हारराव होळकर आहे. तो जनकोजीच्या मदतीला जाईल व दोघे मिळून अब्दाली आणि त्याच्या मदतनीसांचा बंदोबस्त करतील अशी त्यास आशा होती. कदाचित त्याचा आणखी एक छुपा हेतू असण्याची देखील दाट शक्यता आहे व तो म्हणजे शिंदे – होळकर हे बलदंड सरदार परस्पर दुर्बल होत आहेत तर होऊ द्यावेत. नानासाहेब पेशवा आपल्या सर्वच डोईजड सरदारांना चेपण्याची एकही संधी सोडत नव्हता हे इतिहास अभ्यासकांना माहिती आहेच. इतर सरदारांच्या तुलनेने शिंदे – होळकरांचे प्रस्थ जरा मोठे होते. नाही म्हटले तरी खुद्द पेशवा देखील त्यांना वचकून असे. त्याशिवाय त्यांच्या निष्ठेविषयी देखील तो कित्येकदा साशंक असे. याविषयीचे विवेचन श्री. शेजवलकर यांनी आपल्या ‘ निजाम – पेशवे संबंध ‘ या ग्रंथात केले आहे. उपलब्ध साधने लक्षात घेता, यावेळी अब्दालीच्या आक्रमणाकडे नानासाहेब पेशव्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. वस्तुतः दिल्लीची बातमी समजताच त्याने तातडीने उत्तर हिंदुस्थानात सरदारांच्या मदतीसाठी आपल्या दोन भावांपैकी एकाला किंवा एखाद्या सरदाराला पाठवायला हवे होते. पण तसे काही न करता हा बहाद्दर पेशवा निजामाचा पाडाव करण्यात मग्न राहिला. 
          याच ठिकाणी एक महत्त्वाची बाब नमूद करणे योग्य ठरेल व ती म्हणजे, सरदेसाई यांनी आपल्या रियासतीमध्ये असे लिहिले आहे कि, ३ फेब्रुवारी १७६० रोजी -- म्हणजे उदगीरचा निर्णायक संग्राम ज्या दिवशी झाला – त्याच दिवशी नानासाहेबास उत्तरेतील पेचाची वार्ता मिळाली. २० फेब्रुवारी १७६० भाऊला दत्ताजीच्या मृत्यूची बातमी मिळाल्याचा देखील सरदेसाई उल्लेख करतात. पण भाऊला हि बातमी कोणी कळवली ? बातमी मिळाली तेव्हा भाऊचा मुक्काम कोठे होता इ. प्रश्नांची उत्तरे देण्याचे मात्र सरदेसाई यांनी टाळले आहे.
     शेजवलकरांना तर या मुद्द्यांची चर्चाच काय पण नुसता उल्लेख करण्याची देखील गरज भासली नाही. सारांश, निव्वळ सरदेसाईंच्या माहितीवर जरी विसंबून राहायचे म्हटले तरी माझे आधीचे विवेचन चुकीचे ठरत नाही. कारण सरदेसाईंनी दिलेली ३ फेब्रुवारी १७६० हि तारीख जर गृहीत धरली तरीही मूळ प्रश्न किंवा मुद्दा तसाच राहतो व तो म्हणजे पेशवा उत्तर हिंदुस्थानच्या बाबतीत – निदान या काळापुरता तरी – उदासीन राहिला का ? किंवा अशा उदासीनतेमागे नादुरुस्त प्रकृती कारणीभूत होती कि पेशव्याचा स्वार्थ ?    
         असो, उदगीरच्या मुख्य संग्रामाचे वर्णन असलेले पत्र श्री. केळकर यांनी आपल्या ‘ मराठेशाहीतील वेचक वेधक ‘ या पुस्तकात छापले आहे. हे पत्र केळकरांना अर्धवट स्वरूपात मिळाले ते त्यांनी तसेच प्रसिद्ध केले आहे. ते या ठिकाणी देत आहे :-
 ‘     डाव केलरे व लूट बहुत जाली आपले फौजेतील दीड हजारपर्यंत माणूस पडले नवसे हजार घोडे पडले व जखमी जाले. या प्रमाणें मोंगलांस जेहर ( जेर ? ) करून त्याच तलावर मुकाम जाला. या फौजा भोवत्या होऊन तोफांची मारगीर फार केली यामुळे मोगल जेहर देऊन बोलीस वकील पाठविला. साठ लक्षांची जाहागीर व दौलताबाद, बऱ्हाणपूर, आसेरी व विजापूर च्यार ठिकाणे यांसी दिली. तह करार जाला याउपरी रविवारी अथवा सोमवारी द्वितीयेस श्रीमंत या तलावर कूच होऊन पैठणास जाणार. श्रीमंत भाऊसाहेब व दादा तेथे येऊन भेटी होणार. याची रवानगी फौजसुद्धा हिंदुस्थानात व आणखीही जागाजागा फौजाची रवानगी होणे ते होऊन उभयेता श्रीमंत फिरोन येतील. रागश्री ( राजश्री ) जानोजी भोसले व मुघोजी ( मुधोजी ) भोसले श्रीमंत भाऊच्या लष्करात फौज सुद्धा आले आहेत त्यास राजश्री लक्षुमणपंत येथून गेले त्यांस आम्ही आपले कर्जाविसी बहुत निरवण केली ते बोलिले की कर्जाची याद व येक कारकून आप्पाकडे पाठवून द्यावा. प्रस्तुत ते सारे मंडल गंगातीरी येणार यास्तव भोसल्याची हप्तेबंदी दफ्तरी आहे त्याची नक्कल लेहून कृष्णाजी
( पुढील बंद गहाळ आहे. )
          उदगीरच्या मुख्य संग्रामाचे वर्णन भाऊच्या कैफियतीमध्ये विस्तारपूर्वक आले आहे. ते खालीलप्रमाणे :-  ‘ ... ... पहिलें जुंज इभ्रामखान याणें तोंड लाविलें. ते दिवशीं कांहीं जालें नाहीं. मोंगलापाशीं आगेचें बळ भारी. उधळून काढिलें. इभ्रामखान कस्त करून मागें आला. मोंगल बळ धरून मजल दरमजल धारूरचे रोखें चालिला. यांणीं फौजेचा बंदोबस्त करून मध्यें मोंगल, उजवे बाजूस ( भाऊ ) साहेब, डावे बाजूस दादासाहेब ऐसे दररोज जुंजत होते. धारुरानजीक आ ट क. उभयतां फौजा पोंचल्या. पुढें त्रिवर्गही ( भाऊ, दादा व विश्वास ) मिळोन मनसुबा केला कीं, मोगल बळ धरून जबरदस्तीनें मारामार करून धारुरास पोंहचतो. मग हातास येत नाहीं. अशामध्यें कुमक पोंचली नाहीं तों हल्ला करून जुंज द्यावें. यश अपेश ईश्वरसत्ता. परंतु धारूरांत गेल्यावर मग तोलत ( पेलत ; झेपत याअर्थी ) नाहीं. अशी मसलत करून तमाम सरदारांस बोलावून रात्रीस सांगितलें कीं, “ सर्वत्रांनीं हिय्या करून उदईक मोंगलांवर हल्ला करावी. बळकट जुंज द्यावें आणि आम्हांस यश द्यावें.” प्रातःकाळीं कूच जालें तेव्हां रोजच्याप्रमाणें मध्यें मोंगल गोळा करून, गोल किल्ला करून भंवता तोफखाना देऊन चालत होता. सभोंवती आपली फौज नेमणुकेप्रमाणें चालत असे. तों पिछाडीचेच तोंडावर घोडे घातले. सर्वत्रांनीं हिंमत धरून हल्ल्यास उठले. तोफेची रंजक एक झडली. त्याखालीं इभ्रामखान याजकडील व हुजुरातीच्या तोफखान्यांतील गाडद बहुत मारिले. त्यांहीमध्ये बळ धरून मारीतच चालिले. उजवेकडून भाऊसाहेब व रावसाहेब ( विश्वासराव ), व डावेकडून दादासाहेब ऐसे मारामार करीत उठले. तेव्हां मारीत खांशाचे हवद्यापर्यंत ( हौदा :- हत्तीवरील बसण्याची कठडेदार जागा ) जाऊन लोक पोंचले. मोंगलांकडील लोकबहुत पडले. युद्ध उत्तम प्रकारें जालें. एक प्रहरपर्यंत खणाखणी जहाली. मोंगल कचरला. हिंमत सोडली. ते दिवशीं आणीक चार घटका दम धरून जुंज दिल्हे असतें तरि मोंगल बुडवून गर्दीस मेळवून दिल्हा असता. परंतु संध्याकाळ होत आला. बहुत लोक पडिले. बराणजी मोहिते व केशवराव पानसे व आणीक कितेक ते दिवशीं ठार जहाले. बहुत लोक जखमी जहाले. जुंज जालें ते ठिकाणीं मोंगलानें जवळून मुक्काम केला. आपलाही मुक्काम जहाला. यश आलें. बहुत संतोष जहाला.’  
         विश्लेषण :-        भाऊच्या कैफियतीमधील उदगीरच्या संग्रामाचे वर्णन बहुतेक शेजवलकरांनी अभ्यासल्याचे दिसत नाही. त्यांनी जर हे वाचले असते तर पेशव्यांची नालायकी काढायची त्यांना आणखी एक संधी सापडली असती.
       निजामाचा मुक्काम औसा येथे असून त्याच्या मराठा सरदारांचा जमाव धारूर येथे होता. औसा ते धारूर हे अंतर नकाशावर पाहिले असता सुमारे १०० किमी इतके आहे. शेजवलकर यांनी मात्र आपल्या लेखांत हे अंतर वीस कोस म्हणजे ६० - ६५ किलोमीटर्स असल्याचे नमूद केले आहे. औसा येथून नगर सुमारे दोन – अडीचशे किलोमीटर्स अंतरावर आहे. भाऊच्या नेतृत्वाखाली मराठी फौज औसाच्या आसपास गोळा झाली होती. यावेळी भाऊच्या सैन्यात घोडदळासोबत इब्राहीमखानाच्या बंदुकधारी पायदळाचा देखील समावेश होता. तसेच कैफियतीमधील या संग्रामाचे वृत्त पाहिले असता असे लक्षात येते कि, मुजफ्फरखानाच्या हाताखालील गारदी पथकांपैकी काही पथके हुजुरातीच्या तोफखान्यात सामील झाली होती. म्हणजे त्यांच्यावर आता पेशव्यांचा तोफखाना सरदार पानसे याची हुकुमत होती. परंतु, पानसेच्या हाताखालील गारदी हे तोफखान्याचे काम जाणणारे होते कि बंदूकधारी पायदळातील होते याची स्पष्टता होत नाही.
      इब्राहीमखानाची पायदळ पथके सोबत असल्यामुळे व निजाम लष्कराचा गोल बांधून पुढे जायच्या तयारीत असल्यामुळे भाऊने आपल्या मूळच्या युद्धयोजनेमध्ये थोडाफार बदल केला. नव्या योजनेनुसार भाऊ, विश्वासराव हे पानसे आणि इब्राहीमखानाच्या सोबत निजामाच्या लष्करी गोलाच्या एका बगलेवर हल्ला चढवणार होते व त्याच वेळी दुसऱ्या बाजूने रघुनाथरावाने घोडदळाच्या सहाय्याने शत्रू सैन्याच्या दुसऱ्या बगलेवर चढाई करायची असे ठरले.
        नव्या युद्धनीतीनुसार २० जानेवारी १७६० नंतर मराठी फौजांनी निजामाच्या सैन्यावर हल्ले चढवण्यास आरंभ केला. उदगीर येथून औसा येथे येताना निजामाचा काय बेत होता ते समजायला मार्ग नाही पण औसा येथून निघताना त्याने नगरच्या ऐवजी आपला मोर्चा धारूरकडे वळवला. लष्करांत गारद्यांचा मोठा भरणा असल्यामुळे गोलाची रचना त्याला मानवण्यासारखी होती. त्याशिवाय शत्रूपक्षाकडे असलेला इब्राहीमखान हा जरी शूर असला तरी तो कल्पक सेनानी नसल्यामुळे त्याच्याकडून आपल्याला फारसा उपद्रव होणार नाही अशीही त्याची अटकळ असावी. खुद्द सलाबतजंगाच्या मते इब्राहीमखान हा युद्धकलेत मुझफ्फरखानापेक्षा कमीच होता ! या ठिकाणी लक्षात घेण्याची बाब म्हणजे या दोन्ही खानांनी व त्यांचा गुरु बुसी याने सलाबतजंगाच्या पदरी चाकरी केली होती. आणि त्या अनुभवावरून सलाबतजंगाचे इब्राहीमविषयी उपरोक्त मत बनले होते.
       औसा येथून निजामाने धारूरकडे कधी प्रस्थान ठेवले याची माहिती मिळत नाही. निजाम – पेशव्यांचा अखेरचा संग्राम नेमका कुठे झाला याचीही निश्चित अशी माहिती सरदेसाई किंवा शेजवलकर देत नाहीत.
                निजामाने धारूरकडे जायचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी करण्यास आरंभ देखील केला. या ठिकाणी असा एक प्रश्न उद्भवतो व तो म्हणजे निजाम औसा येथून धारूरला निघाला त्यावेळी धारूर येथील निजामाचे मराठा सरदार काय करत होते ? खंडागळेने दमाजीला उधळून लावायचे कार्य पार पाडले पण त्यानंतर त्याने किंवा इतर मराठा सरदारांनी काही विशेष हालचाल केल्याचे दिसून येत नाही. कदाचित पेशव्याच्या फितुरी अस्त्राचा हा प्रभाव असावा.
         भाऊ व दादा यांनी धारूरच्या मराठा सरदारांच्या जमावाकडे दुर्लक्ष करून निजामावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. निजाम लष्कराचा गोल बांधून चालत असल्यामुळे मराठी सैन्याला हा गोल फोडण्यास आरंभी यश मिळत नव्हते. इब्राहीमसारखा कुशल तोफखाना अधिकारी पदरी असूनही भाऊच्या आक्रमणाला यश मिळायची चिन्हे दिसेनात. अशा स्थितीत निजाम निग्रहाने झुंजत निम्मे अंतर पार करून धारूर जवळ करू लागला होता.
   मराठी सैन्याचा या अपयशाला त्यांची सदोष युद्धरचना कारणीभूत होती असे माझे मत आहे. एका बाजूने भाऊ इब्राहीमच्या कवायती पायदळाच्या सहाय्याने निजामाचा गोल फोडण्याचा प्रयत्न करत होता. परंतु निजामाकडे देखील कवायती पायदळाचा भरणा असल्यामुळे इब्राहीमच्या हल्ल्यांना तो थोडीच भीक घालणार ? दुसऱ्या बाजूने रघुनाथराव घोडदळाच्या मदतीने निजामाचा लष्करी गोल भेदण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, निजामाच्या तोफा – बंदुकांसमोर त्याचे घोडेस्वार हतबल झाले होते. तात्पर्य ; भाऊने पूर्वनियोजित युद्धतंत्रात बदल करून एकप्रकारे आत्मघाताचे धोरण स्वीकारले होते असेच म्हणावे लागते.
          अखेर, दिनांक ३ फेब्रुवारी १७६० रोजी निजामाच्या लष्करी गोलाला भगदाड पाडण्यात मराठी फौजांना यश प्राप्त झाले. निजामाच्या डाव्या – उजव्या बगलांवर हल्ले चढवण्यात आले. त्याच सुमारास मराठी सैन्याची एक टोळी शत्रूसैन्याच्या पिछाडीवर चालून गेली. त्यामुळे निजामाच्या अभेद्य भासणाऱ्या लष्करी गोलाला खिंडार पडले आणि प्रचंड नुकसान सोसून अखेर भाऊने ३ फेब्रुवारी १७६० रोजी निजामाचा बऱ्यापैकी पराभव करण्यात यश मिळवले !
          परंतु हे पूर्णतः सत्य नसून फक्त अंशतः सत्य आहे ! आपण पराभूत झालो आहोत अशी निजामबंधूंची अजिबात भावना नव्हती. उलट त्यांच्या सैन्याने मोठ्या शौर्याने लढून निजामबंधूंचा बचाव केला होता. या ३ फेब्रुवारीच्या संघर्षात निजामाची किती माणसे मारली गेली याचा उल्लेख मिळत नाही पण केळकरांनी संशोधित केलेल्या पत्रानुसार मराठी फौजांची बरीच हानी झाल्याचे दिसून येते. सुमारे दीड हजार मनुष्य व हजारभर प्राण्यांना आपले जीव गमवावे लागले. बराणजी मोहिते व केशवराव पानसे सारखे सरदार मारले गेले. मराठी सैन्याची हि हानी लक्षात घेता या संग्रामात निजाम पराभूत झाला असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल !
              भाऊच्या कैफियतीनुसार या लढाईमध्ये इब्राहीमची व सरकारी गारद्यांची बरीच हानी झाली. इब्राहीमच्या लष्करी गुणांविषयी मराठी इतिहासकरांनी / कादंबरीकारांनी जे काही लिहून ठेवले आहे – एक उत्कृष्ट सेनानी, कल्पक लढवय्या, कुशल तोफखाना कामगार अशी  त्याची जी काही प्रतिमा मराठी इतिहास वाचकांच्या मनात उभी केली आहे त्यास तडा देणारीच हि माहिती आहे.
          ३ फेब्रुवारीचा दिवस मावळल्यावर निजामाने पूर्ण विचारांती भाऊकडे वकील पाठवून तहाची वाटाघाट आरंभली. पेशव्याच्या सैन्याशी लढत – लढत त्याने धारूरपर्यंत मजल मारलीही असती पण यादरम्यान त्याची देखील बरीच मनुष्यहानी झाली असती व ती त्याला नको होती.
        केवळ आपली मनुष्यहानी टाळण्यासाठी त्याने तहाची वाटाघाट आरंभली. निजामाने तहाचे बोलणे लावताच पेशवेबंधूंनी देखील फारसे ताणून धरले नाही. वास्तविक निजामाला साफ बुडवण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली होती पण बहुतेक युद्धात झालेल्या मनुष्यहानीमुळे त्यांनाही लढण्यात विशेष अर्थ वाटला नाही. जर खरोखर पेशवेबंधूंना किंवा खुद्द पेशव्याला निजामाचा समूळ नाश करायची इच्छा असती तर कोणत्या ना कोणत्या निमिताने जुळून येणारा तह त्यांनी मोडला असता. परंतु, पेशवेबंधूंनी तसे केले नाही.
        ३ फेब्रुवारी १७६० रोजी निर्णायक संग्राम होऊन ११ फेब्रुवारी रोजी उभयतांचा तह बनून आला. तहाची वाटाघाट सुमारे ७ – ८ दिवस चालली. या अवधीचा फायदा घेऊन निजामाने स्वतःला अनुकूल असा तह घडवून आणला.
 उदगीरच्या तहातील कलमे :-
१)    ‘.. .... ... तेव्हां विठ्ठल सुंदर दिवाण याजपाशीं शिक्के कटार देऊन यांचे डेऱ्यास पाठविला. किल्ले मुलुख मागितला तो कबूल करून पत्रें करून देणें. त्याजवरून मशारनिल्हेनी येऊन बहुत रदबदली करून तह केला कीं, दवलताबाद, बऱ्हाणपूर व सालेर व मुल्हेर, अमदानगर एकूण किल्ले सहा. साठा लक्षांचा मुलुख. त्यामध्यें किल्ल्याखालीं जो मुलुख असेल तो वजा करून बाकी जहागीर करार करून घेतली. ( भाऊसाहेबांची कैफियत )
           केळकरांनी प्रसिद्ध केलेले अती अर्धवट स्वरूपाचे पत्र व भाऊच्या कैफियत मधील उदगीर तहाच्या अटी पाहिल्या असता काही गोष्टी पटकन लक्षात येतात. (१) पेशव्यांनी युद्धखर्च म्हणून निजामाकडून रोख खंडणी घेतली नाही. (२) दौलताबाद, विजापूर, अशीरगड व बऱ्हाणपूर हि चार प्रमुख स्थळे पेशव्याला देण्याचे निजामाने मान्य केले. हि चार स्थळे म्हणजे प्राचीन मुस्लीम वैभवाची ठिकाणे आहेत हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच ! (३) एक कोटी रुपये उत्पन्नाच्या मुलखाची पेशव्याने मागणी केली होती पण निजामाने त्याची साठ लक्ष उत्पन्नाच्या प्रांतावरच बोळवण केली.
            या तहानंतरच्या घटना पाहिल्या असता उपरोक्त ४ स्थळे व साठ लक्षांचा प्रांत पेशव्याकडे आल्यासारखे झाले पण त्यावर पेशव्याचा संपूर्ण ताबा काही बसला नाही. उदगीर तहाच्या वाटाघाटी सुरु असतानाच निजामाला उत्तरेतील घटनांची माहिती समजली असावी. पेशव्याच्या अडचणींचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. तहात मिळवलेला प्रदेश ताब्यात घ्यायचा, त्याचा बंदोबस्त करायचा व त्याच वेळी उत्तरेत एक सैन्यविभाग पाठवायचा या सर्व गोष्टी एकाच वेळी कृतीत आणणे पेशव्यास शक्य नाही असा निजामाचा अंदाज होता. त्यामुळे त्याने पेशव्याच्या सर्व मागण्या कागदावर तरी मान्य केल्या.  पण,  भाऊ उत्तरेत गेल्यावर तहाची अंमलबजावणी करण्यास त्याने टाळाटाळ चालवली. याविषयी मराठी रियासती मधील पुढील उल्लेख चिंतनीय आहे :- ‘ .. .. एकाने अंतस्थ बातमी सदाशिवरावास लिहिली कीं, “ मोगलांची जात काबूची ( काबूची :- नीच, स्वार्थी ), समय पाहून घात करणार, तूर्त मागतील त्या गोष्टी कबूल केल्या, तिघे भाऊ एक जागां जाले, निंबाळकर, खंडागळे वगैरे अमीर लोक बिघडले आहेत. अवघ्यांस मिळवून पुनः एकदां हर्षामर्ष करावा हे गोष्टी निजामअलीखांचे चित्तीं फार आहे. बोलून दाखवीत नाहींत, रंग असा दिसतो.”  भाऊ यावेळी दक्षिणेतच होता. उत्तरेत शिंद्यांच्या मदतीला अजून रघुनाथरावाची रवानगी झाली नव्हती. अशा वेळी निजामबंधूंची कारस्थाने परत एकदा खेळू लागली होती. भाऊचा उदगीर विजय किती पोकळ होता याचा हा उत्तम पुरावा आहे असे म्हणता येईल.
              तात्पर्य ; पानिपत मोहिम उद्भवल्यामुळे व पानिपतावर मराठी सैन्याचा पराभव झाल्यामुळे भाऊचा उदगीर विजय निष्फळ ठरला असा एक गोड गैरसमज आहे. पण मुळात उदगीरच्या संग्रामात मराठी फौजांचा विजय झाला होता का याचा कोणी विचार केल्याचे दिसून येत नाही. निजामाचे लष्करी बळ मोडण्यात यावेळी देखील पेशव्यांना साफ अपयश आले होते ही गोष्ट उघड आहे व चतुर, मुत्सद्दी निजामबंधूंनी तात्पुरती वेळ मारून नेण्यासाठी तहाची हुलकावणी दिलेली होती. जर खरोखर उदगीर येथे मराठी सैन्याचा विजय झाला असता तर तहातील अटी या फार वेगळ्या दिसल्या असत्या किंवा दक्षिणेत निजामाचे राज्यच अस्तित्वात राहिले नसते.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: