गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

प्रकरण ६) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी





    शिवचरित्रातील अनेक वादग्रस्त प्रकरणांपैकी एक म्हणजे दादाजी कोंडदेव होय. दादाजी कोंडदेव शिवरायांचा गुरु असल्यापासून ते शहाजीचा कारभारी तसेच शिवाजीच्या राज्यस्थापनेचा विरोधक असल्यापर्यंतची विधानं इतिहासकारांनी केली आहेत. त्यांपैकी दादाजी हा शिवाजीचा गुरु व मार्गदर्शक हि दोनचं जास्त प्रचलित आहेत. प्रस्तुत प्रकरणात आपण दादाजी कोंडदेव नेमका कोण होता व त्याचे शिवाजीशी कशा प्रकारचे संबंध होते, याचा आढावा घेणार आहोत.

    ज्ञात इतिहासात दादाजी कोंडदेव हा शहाजीचा पुणे जहागीरीतील कारभारी तसेच आदिलशाही नियुक्त कोंडाण्याचा सुभेदार असल्याची माहिती मिळते. पैकी, प्रथम आपण आदिलशाही सुभेदार म्हणून आढळणाऱ्या दादाजीच्या कागदपत्रांची माहिती घेऊ, तसेच दादाजीच्या अधिकारांची --- सुभेदार म्हणून --- व त्याच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती किती होती हे पाहू.

    दादाजीचे अधिकार तसेच त्याचे प्रशासकीय व्यवस्थेतील स्थान समजावून घेण्याकरता प्रथम आदिलशाही राजवटीत सुभेदाराच्या दर्जाचे, हुद्द्याचे नेमके स्वरूप काय होते याची माहिती घेऊ.
आदिलशाही राजवटीच्या प्रशासकीय व्यवस्थेची परिपूर्ण माहिती देणारी साधने उपलब्ध नाहीत. मराठी इतिहासकारांनी याबाबतीत ग्रँट डफच्या बखरीचाच प्रामुख्याने आधार घेतल्याचे, याबाबतीतले लेख वाचल्यावर माझ्या लक्षात आले. तेव्हा विजापुरी प्रशासकीय व्यवस्थेबाबत डफ काय म्हणतो ते प्रथम पाहू.

    डफच्या कथनानुसार गोवळकोंडा, विजापूर व निजामशाही या तिन्ही राजवटींच्या प्रशासकीय 
व्यवस्थेत सर्वांत मोठा प्रांत ' सरकार ' असून त्यानंतर अनुक्रमे परगणा, कर्यात, संमत, महाल, तालुका अशी विभागवार उतरंड आहे. शिवाय प्रांत आणि देश अशी दोन हिंदवी नावे असल्याचाही त्याने उल्लेख केलाय. पण त्यावरून त्या विशिष्ट भूप्रदेशाचे आकारमान समजावून घेता येत नाही.
आता मोकासदारा विषयीची डफची माहिती पाहू :- ' विजापुरचे राज्यांत एक मोठा अमिल होता त्याचे नांव ' मोकासेदार ' ठेविले असे, आणि दुसरे अमिल त्याचे आज्ञेत वागत असत. असे कितीएक मोकासेदार वीस वीस वर्षे कामावर होते ; त्यांत कोणी मेला असतां त्या कामावर त्याचे पुत्रास ठेवावे, अशी चाल होती ; कां की, मोकासदारांस त्या द्रव्याचा कांही विभाग होता. कितीएक वेळां एका वर्षात मोकासेदार पहिला दूर करून दुसरा ठेविला असे झाले. आणखी मोकासेदारी निरंतर मुसलमानांसच द्यावी असे नव्हते, कधी कधी हिंदूंसही देत होते. त्या राज्यांत मोकासेदारीपेक्षा मोठा अधिकार दुसरा बहुतकरून नव्हता. कधी कधी ' सुभा ' मोठा असे, परंतु सुभ्याने नेहेमी त्या प्रांती नसावे, बहुधा दरबारीच असावे. त्याने मुलखाचे वसुलाचे काम न करावे, परंतु त्याचे मुलखाचे दप्तरावर त्याची सही घ्यावी लागत असे. '

    डफच्या माहितीनुसार आदिलशाही प्रशासनात मोकासदार हा श्रेष्ठ असून सुभेदार हा त्याचा कनिष्ठ असल्याचे सिद्ध होते. अर्थात इथे त्याने कधी कधी सुभेदार मोठा असल्याचे सानाग्त शंकेला थोडी जागा ठेवली आहे परंतु उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्या शंकांचे निरसन करता येऊ शकते.

    इतिहास संशोधक ग. ह. खऱ्यांनी ' शिवकालीन राजपत्रांची लेखनपद्धति ' नावाचा एक लेख लिहिला होता. त्यातील आदिलशाही लेखनपद्धतीची माहिती देताना काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केलाय तो असा :- ' ... .. विजापुरी दुय्यम प्रतीच्या म्हणजे सुभेदार वगैरेंनी लिहिलेल्या .... ... ...... हुकुमांचे आरंभी ' अज रख्तखाने ' चा प्रयोग नेहमी असतो. सुभेदारांच्या नांवापाठीमागे खुदायेवेद, खाने अली शान, खाने-अजम-अकरम, मशरूल हजरत (राजविख्यात), मशरूल अनाम (लोकविख्यात), मोतमीद दौलत (विश्वासनिधि) वगैरे उपपदे लावून पुढे खुली-खलद-तुली दयाम-दबाम दौलतहू (अखंडितलक्ष्मी, खंडेश्वरी) हे उपपद हमेशा लाविलेले आढळते.  .... .... ..  ... .... तिय्यम प्रतीचे अधिकारी म्हणजे हवालदार, महालकरी वगैरे. यांनी लिहिलेल्या पत्रांचा ... ... ... सामान्यतः आरंभी ' अज दिवाण ठाणा ' असा प्रयोग येतो. शेवटी ' मोर्तब सुद ' हा शेरा व त्याचाच शिक्का उठविलेला असतो. हवालदाराच्या हाताखाली सुभेदाराप्रमाणे सुरनीस, बारनीस, दफ्तरनीस वगैरे अधिकारी नसल्याने यांच्या पत्रावर ' रुजु सुरु, बार ' वगैरे शेरे सहसा नसतात. '

    खऱ्यांची माहिती, डफचे विवेचन गृहीत धरून शिवकालीन पत्रसार संग्रहातील दि. ११ डिसेंबर १६४५ च्या एका पत्राचा ( क्र. ५०७ ) मायना पाहिला तर त्यात दादाजीचा ' अज दि. दादाजी कोंडदेऊ सुभेदार कोंडाणा ' असा उल्लेख आहे.
    याव्यतिरिक्त दादाजी कोंडदेवची सुभेदार म्हणून आढळणारी सुमारे आठ दहा पत्रे शिवकालीन पत्रसार संग्रहात ( शिपसासं ) प्रकाशित झाली असून त्यांपैकी सर्वात पहिले स. १६३३ च्या डिसेंबर मधील आहे. ( क्र. ३७०, ३७१ ) पैकी, पत्र क्र. ३७० मध्ये दादाजीचा उल्लेख ' रा. दादाजी कोंडदेऊ सुभेदार दिवाण जाले ' असा येतो. पत्र क्र. ३७०, ३७१ एकाच निवाड्याशी संबंधित असून ते एकाच तारखेचे असल्याचे नमूद आहे. पैकी, क्र. ३७० कबूलकतबा असून क्र. ३७१ महजर आहे. कतब्यात दादाजीच्या पुढे सुभेदार दिवाण शब्दप्रयोग असून महजरात फक्त सुभेदार म्हणून उल्लेख आहे.
दादाजी कोंडदेवचा फक्त सुभेदार म्हणून उल्लेख पत्र क्र. ३७१, ४३२, ४५७, २४९२, २५१४ मध्ये येतो. त्याखेरीज दादाजीच्या मृत्यूनंतर शिवाजीच्या पत्रांतही त्याचा उल्लेख काही वेळा सुभेदार असाच येतो.
शिवकालीन पत्रसार संग्रहात काही पत्रे अशीही आहेत ज्यात दादाजीचा निर्देश सुभेदार वा दिवाण म्हणून न येता नुसता दादाजी कोंडदेऊ असाच येतो. ( पत्र क्र. ४५६ ) अर्थात, मूळ पत्र समोर नसल्याने हि पत्रे यास्थळी विचारात घेणे चुकीचे ठरेल.

    प्रथम आपण दादाजीच्या सुभेदार, दिवाण पदाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू. उपलब्ध पत्रांमधील व इतिहासकारांच्या लेखातील माहिती पाहता दादाजी कोंडदेव हा कोंडाण्याचा सुभेदार होता तसेच किल्ले कोंडाणाही त्याच्या ताब्यात होता. दादाजीकडे जो प्रांत आदिलशाहीत सुभा म्हणून आला तो तत्पूर्वी निजामशाहीत मोडत होता. त्यावेळी कोंडाणा विभाग हा सुभा अथवा वेगळा प्रांत असल्याची माहिती मिळत नाही. त्याचप्रमाणे पुढे शिवाजीच्या राजवटीतही कोंडाणा अथवा सिंहगड नावाचा सुभा असल्याचे उल्लेख मिळत नाहीत. यावरून निजामशाही अस्तानंतर निजामशाही भूप्रदेश क्रमाक्रमाने ताब्यात घेत असताना तात्पुरत्या प्रशासकीय सोयीकरता कोंडाणा सुभा निर्माण करण्यात आला असावा असे माझे अनुमान आहे. तसेच दादाजीची ' सुभेदार नामजाद किले कोंडाणा व महालनिहाये ' हि पदवी व डफने दिलेली विजापुरी प्रशासकीय व्यवस्था लक्षात घेता असे दिसून येते कि, त्या काळात आदिलशाहीने काही महालांचा एक गट --- विशिष्ट सुभा बनवून त्यावर दादाजीची नियुक्ती केली होती व प्रांताच्या रक्षण, सोयीसाठी व त्या भूप्रदेशात मोडणारे मजबूत स्थळ म्हणून कोंडाणाही त्याच्याकडे सोपवला होता. अर्थात हि व्यवस्था तात्पुरती असून त्यातील सुभेदार पदासही फारसे मह्त्व नसून केवळ प्रशासकीय सोयीकरता --- जसे शिवाजीने पुढे सरसुभेदार पद निर्माण केले होते तसेच या स्थळी आदिलशहाने कोंडाण्याच्या बाबतीत केल्याचे दिसते. बाकी, दादाजीचा मूळ हुद्दा, अधिकार दिवाणाचेच दिसतात व त्याची मुख्य कामगिरीही याच क्षेत्रातील असल्याचे उपलब्ध पत्रव्यवहारावरून दिसून येते.

    आता आपण दादाजी कोंडदेव हा शहाजीच्या पुणे जहागिरीतील पोटमोकासदार, कारभारी होता कि नव्हता याची चर्चा करू.
    भोसले कुटुंबियांशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांत दादाजीचा प्रथम उल्लेख दि. ३१ जानेवारी १६२० च्या इनामपत्रात येतो. प्रस्तुत इनामपत्र सनदापत्रे तसेच ऐतिहासिक पत्रबोध व मराठ्यांचा इतिहास : साधन परिचय मध्ये छापलेलं असून ऐतिहासिक पत्रबोधच्या संपादकांनी --- रियासतकार सरदेसायांनी या सनदेच्या सत्यतेविषयी साशंकता व्यक्त केली आहे. परंतु त्यांना या इनामपत्राच्या अस्स्लतेविषयी शंका का आली, याचा खुलासा केलेला नाही.

    या इनामपत्रानुसार रंगो गणेश सोनटके हा कुलकर्णी असून हिशेब देण्याकरता किल्ले कोंडाण्यास गेला. तिथे दादो कोंडदेऊच्या घरी भोजनास राहिला. भोजनानंतर खोलीत बिछाना घालून निद्रा केली. पाच सहा घटकांनी अंगाची आग होऊन पाणी पाणी करत प्राण सोडला. विशेष म्हणजे खोलीस बाहेरून कुलूप असून ते दुसऱ्या दिवशी उघडण्यात आले.
    रंगो सोनटके भोसल्यांचा जुना चाकर असल्याने जिजाबाईने रंगो सोनटकेच्या सुनेला एकशेवीस बिघे जमीन चोळी - कांकणास इनाम म्हणून दिली.

    प्रस्तुत सनदेच्या शेवटी लेखनकाल दिला आहे ' शके १५२६ सिध्यर्थीनाम संवत्सरे, माघ शुद्ध सप्तमी रविवार लेखनसीमा '
शकाचे १५२६ चे इ. सनात रुपांतर केल्यास १६०४ वा १६०५ येते. सनद जिजाबाईने दिली हे लक्षात घेता शक लिहिण्यात चूक झाली हे निश्चित. कारण शहाजीचे जन्मवर्षच मुळी इतिहासकारांनी स. १५९४ ते १६०१ दरम्यान धरले आहे. दुसरे असे कि, शक लेखनातील चूक मूळ दान पत्रावर आहे कि नकलेवर आहे, याचा खुलासा कोणत्याच संपादकाने केलेला नाही. खेरीज सनदापत्र कसबे जिंतीमधून देण्यात आले आहे व रंगो सोनटके हिशेब देण्यासाठी कोंडाण्यास गेल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी कोंडाणा हे जिंती परगण्यावरील प्रमुख ठिकाण होते का हा प्रशन उद्भवतो. तसेच जिंती गाव श्रीगोंदा परगण्यात येत असल्याचे याच सनदपत्रात नमूद असताना जिंतीचा कुलकर्णी कोंडाण्यास कसा हाही प्रश्न आहेच. 
    दुसरे असे कि, दादो कोंडदेवचा हुद्दा, अधिकार यात स्पष्ट नाही. तसेच सनद खरी मानल्यास दादो कोंडदेव हा देखील इतरांप्रमाणेच यावेळी निजामशाही नोकर होता असे म्हणावे लागते. ज्यास प्रत्यंतर पुरावा नाही. तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे श्रीगोंद्याचे मूळ नाव चांभारगोंदे असून त्याचे नामांतर यावेळी झाले नव्हते. तेव्हा हे इनामपत्र जमेस धरणे योग्य ठरणार नाही.

    शिवकालीन पत्रसारसंग्रहात क्र. ५१३ मध्ये एक पोटपत्र छापलेलं असून त्याची तारीख २ एप्रिल १६४६ आहे. प्रस्तुत पत्र दादाजी कोंडदेवने शिरवळचा हवालदार विठल गिरमाजी यांस लिहिले असून, त्यातील मजकूर  असा :- " रामाजी विठल देशकुलकर्णी शिरवल हा पुण्यास येऊन सौ. मातुश्री जिजाआऊसाहेब यांच्या समक्ष बोलला की, आपला व तिमाजी पुरुषोत्तम यांच्या वतनाचा निवाडा गोत देऊन करावा. त्यावरून हे पत्र तुम्हास लिहिले आहे. तरी परगण्याचे दे||ख, पाटील व वतनदार यांचे माथा घालून निवडा गोतन्याये करणे शिवापूरचे मुक्कामी वाटणीचा महजर करून दिला आहे त्यावर जाऊं नये. " 

    उपरोक्त पत्रात जिजाबाईचा उल्लेख ' सौ. मातुश्री जिजाआऊसाहेब ' असा केला आहे. अर्थात, संपादकांना हे मूळ पत्र मिळालं होतं कि नक्कल याचा खुलासा होत नाही. त्याचप्रमाणे पत्रातील हा उल्लेख मूळ जसा होता तसाच ठेवला कि नकलकाराने त्यात भर घातली हे समजायला मार्ग नाही. दुसरे असे कि, रामाजी विठल हा जिजाबाईस भेटला असला तरी तिच्या आज्ञेवरून दादाजीने हा हुकुम काढल्याचे यात दिसून येत नाही. तसेच शिरवळ शहाजीच्या मूळ मोकासदारी प्रदेशात मोडत नसून तो स्वतंत्र विभाग होता. बारा मावळातल्या काही भागांची व्यवस्था तिथून पाहिली जात होती, असे काही इतिहासकारांचे मत आहे. शिवाय कोंडाणा प्रांतीचा सुभेदार व दिवाण म्हणून शिरवळशी दादाजी कोंडदेवचा काही संबंध होता कि नव्हता याचीही स्पष्टता होत नाही. त्यावरून भागातील मुख्य मोकासदाराच्या मुतालिकांकडे आपल्या वतनाची तक्रार रामाजी घेऊन गेला असता मोकासदार शहाजी भोसलेची पत्नी या नात्याने व अन्य काही अज्ञात अधिकारांमुळे जिजाबाईने प्रस्तुत प्रकरण प्रशासकीय व्यवस्थेच्या पद्धतीनुसार दादाजीकडे पाठवले व त्यानेही कार्यपद्धतीनुसार शिरवळच्या हवालदारास योग्य ते निर्देश दिले. याहून अधिक याविषयी काही लिहिणे शक्य नाही.

    शिवकालीन पत्रसार संग्रहात क्र. २७४७ वर शिवाजीने पुरंदरचा नाईकवाडी निलो नीलकंठराव यांस फसवून पुरंदरचा किल्ला कसा ताब्यात घेतला याचा वृत्तांत दिला आहे. या कागदाची तारीख संपादकांनी २९ ऑगस्ट १६७४ अशी दिली असून त्यात दादाजी कोंडदेव विषयी असा उल्लेख आहे की, ' शिवाजी राजे याणी निजामशाही किले पुरंधर येथील नाईकवाडी निलो नीलकंठराव त्यांस पत्र पाठविले की, " आम्हाजवळ वडिली दादो कोडदेव ठेऊन दिल्हे होते ते मृत्यु पावले. आता आम्ही निराश्रित जालो. तुमचा व आमच्या वडिलांचा बहुत घरोबा स्नेह यास्तव किल्ल्याचे आश्रयाने माचीजवळ येऊन राहू व तुम्ही सांगाल तैसी वर्तणूक करीत जाऊं. "

    याबाबतीत ' मराठ्यांचा इतिहास, साधन परिचय ' मध्ये शहाजीचे दि. ७ मे १६५४ चे एक पत्र उपलब्ध असून त्यातील मजकूर पाहता मृत निळकंठरावास जो सरंजाम होता, तो तसाच पुढे चालवण्यासंदर्भात शिवाजीने शहाजीला शिफारस केली होती व त्यानुसार शहाजीने निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते. म्हणजे अधिकारात शहाजी हा निळकंठरावाचा वरिष्ठ होता. त्याचा सरंजाम त्याच्या वंशजांना पुढे चालवण्याविषयी शहाजीची परवानगी आवश्यक होती. तसेच शिपसासं मध्ये दि. ९ ऑगस्ट १६५४ चे जे पत्र आहे ( क्र. ६७३ ) त्यातील मजकूर पाहता शिवाजीची भाषा साहेबी अर्थात, वरिष्ठ अधिकाऱ्याची दिसते. तो शिवाजी शिपसासं क्र. २७४७ मधील उपरोक्त अवतरणातील भाषा लिहील हे संभवत नाही. तसेच ज्या शिवाजीने जावळी प्रकरणात स्वबळावर हस्तक्षेप केला असे इतिहासकार मानतात, त्यांनीच उपरोक्त पत्रातील मजकुरास केवळ दादाजीच्या उल्लेखास्तव संमती दर्शवावी यांस काय म्हणावे ?

    दादाजी कोंडदेव व शहाजी भोसले यांचा संबंध दर्शवणारी माहिती देशपांडे करिणा, सहा कलमी शकावली, सभासद बखरीत येते. त्यांपैकी प्रथम देशपांडे करिणा विचारात घेऊ.

    ' पुरंदरे दफ्तर भाग ३ रा ' या कृ. वा. पुरंदरे संपादित ग्रंथात खेडेबारे देशपांडे करिणा प्रकाशित झाला आहे. हा करिणा त्यातील मजकुरावरून शिवकालीन ठरतो. यामध्ये दादाजी साहेबाचा सुभेदार असल्याचा उल्लेख आहे. येथे ' साहेब ' हा शब्द शिवाजीस उद्देशून असल्याची संपादकांची टीप आहे. तसेच शिवाजी लहान असताना शहाजीने त्यांस व जिजाबाईला खेडबारियास दादाजीपतापासी पाठवल्याचा उल्लेख आहे. तसेच शिवापुर पेठ वसवल्याचाही यात उल्लेख आहे.
    पैकी दादाजी हा साहेबाचा --- येथे शिवाजी असे जरी संपादकांनी नमूद केले असले तरी पर्यायाने शहाजीचा सुभेदार होता का हे प्रथम पाहू.
    उपलब्ध माहिती, साधने पाहता कोंडाणा किल्ला शहाजीच्या ताब्यात असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे दादाजीला सुभेदार म्हणून शहाजी नेमूच शकत नाही. कारण अस्सल कागदपत्रांत दादाजी हा कोंडाण्याच्या सुभेदार असल्याचे नमूद आहे. शिवाय, कोंडाणा जर शहाजीच्या ताब्यात होता व दादाजी हा त्याने नियुक्त केलेला सुभेदार होता असं क्षणभर जरी गृहीत धरलं तरी दादाजीच्या मृत्यूनंतर विजापूरने मिया रहीम अहमद यांस कोंडाण्याचा सुभेदार नेमल्याचे उल्लेख मिळतात, त्याचे काय करायचे ? ( शककर्ते शिवराय, पृ. २१० )

    शिवाजीचे अधिकृत काव्यमय चरित्र --- शिवभारत --- त्याच्याच हयातीत परमानंदने रचले. त्यामध्ये शहाजीने दादाजीपाशी शिवाजीची रवानगी केल्याचा उल्लेख नाही. त्याचप्रमाणे शिवचरित्राच्या साधनांत विश्वसनीय साधन म्हणून मानल्या जाणाऱ्या जेधे शकावलीत दादाजी संबंधी याच काय, पण कोणत्याही बाबतीत साधं अवाक्षरही येत नाही, याचा अर्थ काय घ्यायचा ? त्याशिवाय जेधे करीनाही यासंबंधी कसलाच उल्लेख करत नाही.
    दादाजी कोंडदेवचे भोसले कुटुंबियांशी किती जवळचे संबंध होते, हे सिद्ध करण्यापुरताच इतिहासकारांनी देशपांडे करिणा उचलून धरल्याचे माझे मत आहे. अन्यथा याच करिण्यात ' माहादेवभट माहाभास राजेश्री राजियाचे गुरु ' असा जो मजकूर आहे तो दुर्लक्षिला नसता.
दुसरे असे कि, या करिण्यातील घटनांचे कालनिर्देश करिण्यात येणाऱ्या प्रसंगांवरून अनुमानाने ठरवावे लागतात. करिण्याच्या आरंभास दिलेल्या ' सन १०६३ [ श. १५७४ ] ' एवढा कालनिर्देश अपवाद केल्यास संपूर्ण करिण्यात कालनिर्देशाचे उल्लेख येत नाहीत.
    या करिण्यासंदर्भात शिपसासंमध्ये क्र. १२११ हे दि. १० मे १६६८ रोजीचे पत्र छापले असून त्यात वेगळीच माहिती मिळते. या पत्रानुसार ज्या वतनासाठी बरीच वर्षे सखो भिकाजी शिवाजीच्या मंत्रीमंडळाशी, अधिकाऱ्यांशी भांडत होता, त्या वतनाचा निवाडा करण्याचे अधिकार शहाजीकडे असून निवडा निकालार्थ शहाजीकडे गेला असता त्याने त्यासंबंधी निर्देश दिल्याचेही यात नमूद आहे. आणि करिण्यात शहाजीकडे प्रकरण गेल्याचा वा त्याने निर्देश दिल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे करिण्यातील उल्लेख ग्राह्य धरता येत नाही.

    दादाजी - शहाजी संबंधांचा उल्लेख करणारे आणखी एक साधन म्हणजे सहाकलमी शकावली. ' शिवचरित्र प्रदीप ' मध्ये प्रकाशित झालेल्या या शकावलीतील सहाव्या कलमात, " शके १५५७ युव नाम संवत्छरी शाहजी राजे भोसले यांसि बारा हजार फौजेची सरदारी इदलशाईकडून जाली सरजांमास मुलूक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिल्हा राज्यानी आपले तर्फेने दादाजी कोंडदेव मलटणकर यांसि सुभा सागून पुणियास ठाणे घातले तेव्हां सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला शांती केली मग सुभेदार याणी कसब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती केली कोल्याचवषे दिल्हे साहांवे साली तनखा घेतला शाहजी राजे विज्यापूर प्रांती गेले कलम १ "

    यावरील आक्षेप असे :- प्रथम शके १५५७ ऐवजी शके १५५८ हवे आहे. कारण शहाजीने आदिलशाही दरबारची नोकरी शके १५५८ तथा स. १६३६ मध्ये पत्करल्याचे सर्वमान्य आहे. यासंबंधी जेधे शकावलीतही शके १५५८ ऐवजी १५५७ असेच वर्ष नमूद केल्याचे लक्षात येते.
    दुसरा आक्षेप असा कि, दादाजी कोंडदेव मलटणकरास शहाजीने सुभा सांगून पाथ्व्ल्याचा यात उल्लेख आहे. प्रत्यक्षात दादाजी कोंडदेव हा आदिलशाही नियुक्त सुभेदार असल्याचे अस्सल कागदपत्रांधारे सिद्ध झालेलं आहे.
    तिसरा आक्षेप असा कि, प्रस्तुत शकावलीचा रचनाकाल दिलेला नाही. त्यामुळे हिचाही विश्वास धरता येत नाही.

    दादाजी - शहाजी संबंधांचा उल्लेख कृष्णाजी अनंत हिरेपारखी उर्फ कृष्णाजी सभासदच्या बखरीत येतो. प्रस्तुत बखर शिवाजीच्या निधनानंतर राजारामच्या कारकिर्दीत लिहिलेली असून तिचा करता कृष्णाजी सभासद हा शिवाजी तसेच राजारामाच्या दरबारी असल्याचे इतिहासकार सांगतात. प्रस्तुत बखरीत दादाजी संबंधी पुढील उल्लेख येतो :-  " शाहाजी राजे यांसि दौलतेमध्ये पुणे परगणा होता. तेथे दादाजी कोंडदेव शाहाणा, चौकस ठेविला होता. तो बेंगरूळास महाराजांचे भेटीस गेला. त्याबरोबर राजेश्री शिवाजी राजे व जिजाबाई आऊ ऐशी गेली. ते समयी राजियास वर्षे बारा होती. बराबर शामराव निळकंठ म्हणून  पेशवे करून दिले व बाळकृष्णपंत, नारोपंत दीक्षिताचे चुलतभाऊ, मजुमदार दिले व सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजीपंतास व राजे यांसि पुण्यास रवाना केले. ते पुण्यास आले. "
    सभासद शिवाजीच्या काळातील माहितीगार इसम असला तरी दादाजी कोंडदेव हा आदिल का शहाजीनियुक्त सुभेदार असल्याचा बिलकुल उल्लेख करत नाही. याचाच अर्थ असा कि, दादाजी कोंडदेव विषयी त्याला किंवा त्याला माहिती पुरवणाऱ्याला फारशी माहिती नव्हती. त्यामुळे त्याला दादाजी विषयी जितके माहिती होते वा जी माहिती पुरवली गेली तेवढीच नमूद करून तो गप्प बसला. त्याच्या या वृत्तांतास अस्सल कागदपत्रे तसेच जेधे शकावली - करीना, शिवभारत दुजोरा देत नसल्याने सभासद बखरीला दादाजी कोंडदेव प्रकरणी विश्वसनीय मानता येत नाही.

    दादाजी - शहाजी संबंधांविषयीचा एकमेव अस्सल पुरावा म्हणून शिपसासं मधील क्र. २४९८ च्या आदिलशाही फर्मानाकडे निर्देश केला जातो. प्रस्तुत फर्मान ग. ह. खरे संपादित ' ऐतिहासिक फारसी साहित्य प्रथम खंड ' मध्ये तपशीलवार दिले असून ' मराठ्यांचा इतिहास, साधन परिचय ' मध्येही ते प्रकाशित झालेलं आहे. या फर्मानाची तारीख दि. १ ऑगस्ट १६४५ असून यातील मजकुर असा :-

मुहम्मद आदिलशाह --- कान्होजी जेधे ?
ज्या अर्थी शहाजी भोसले दरबारातून निर्वासित व अपमानित झाला आहे व त्याचा मुतालिक दादाजी कोंडदेव कोंडाण्याच्या बाजूस आहे ( त्या अर्थी त्यांस ) दफे करण्यासाठी व ती विलायत ताब्यांत आणण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपडे यांस तुमच्यासह नेमिले आहे. तरी तुम्ही आपल्या हशमासh मशारनिल्हे जवळ जाऊन त्यांच्या संमतीने दादाजी कोंडदेव व त्या हरामखोराचे संबंधी यांना शिक्षा देऊन नेस्तनाबूद करा व ती विलायत ताब्यांत आणा. ते तुमच्या उत्कर्षाचे कारण आहे. ता. ७ जमादिलाखर हि. १०५४

    प्रथम आक्षेप असा कि, फर्मान कान्होजी जेध्यास पाठवले हा संपादकांचा निव्वळ तर्क आहे. फर्मानातील कान्होजी शब्द फक्त निश्चित आहे.

    दुसरा आक्षेप असा कि, स. १६४४ च्या पूर्वार्ध - उत्तरार्धात शहाजीने आदिलशाही दरबार विरोधात काही कृत्य केल्याचा उल्लेख समकालीन कागदपत्रांत मिळत नाही. एका जेधे करीन्यात याविषयी " ... त्यावरी रणदुलाखान मृत्य पावले त्यास संतान नाही म्हणून त्यांची दौलत त्यांचा खीजमतगार अफजलखान कर्ता देखोन त्यास दिल्ही अणी चंदीस रवाना केले त्या बा| माहाराजास ही फौजेनसी रवाना केले बा| कान्होजी ना| ही जमेतीनसी गेले चंदीस वेढा घातला जर केली त्यास चंदीस राचेवार मऱ्हाटे होते त्यांचा व माहाराजाचा घरोबा आहे सामान पुरविताती यैसी बदगोई ( तक्रार ) अफजलखान याणी विजापुरास पातशाहास मुस्तुफाखाना लिहिली त्यावरून माहाराजास धरून विज्यापुरास बोलाऊन नेणे बा| कान्होजी नाईक होते पातशाहानी तहकिकात मनात आणीता तुफानी गोष्टी ( खोट्या गोष्टी ) यैसे जाले त्यावरी पातशाहानी माहाराजाचा सन्मान केला सदर बकसीस दिल्ही सीरपाव दिल्हे बेगरूळ प्रांत पांचा लक्षा होनाची जहागीर देऊन वेगली मसलती सांगितली बा| कान्होजी ना| ही जमावानसी होते .... "  हि माहिती मिळते. परंतु करीन्याचा रचना काल बराच नंतरचा --- शिवाजी व संभाजीच्या मृत्यूनंतरचा --- असल्याने यावर विसंबणे, विशेषतः जेधे शकावलीत यांस दुजोरा देणारा मजकूर नसताना अयोग्य आहे.

    शिवाय करीन्यातील वृत्तांत काही क्षण जर गृहीत धरला तर प्रथम काही गोष्टी लक्षात घेणे भाग आहे. (१) करीन्यानुसार हि घटना रणदुल्लाखानाच्या मृत्यूनंतर व शिवाजीच्या पुणे आगमनापूर्वी घडली आहे. (२) कान्होजी जेधे यासमयी शहाजी सोबत चंदीला होता व तेथून तो शहाजीसह विजापुरी गेला. मग आदिलशहाने उपरोक्त फर्मान कोणत्या कान्होजीला पाठवले ? (३) रणदुल्लाखानाचे मृत्यूवर्ष शिपसासं मधील पत्र क्र. ४८८ नुसार स. १६४३ - ४४ असे आहे. अर्थात, जेधे करीना व उपरोक्त आदिलशाही फर्मानातील मजकूर क्षणभर खराच मानल्यास स. १६४३ - ४४ नंतर शहाजीवर विजापुरी गैरमर्जी ओढवली. नंतर त्यावर कृपा झाली व हे सर्व झाल्यावर शिवाजीची पुणे प्रांती शहाजीने रवानगी केली. याचा अर्थ असा कि, शिवाजीचे पुणे आगमन वर्ष इतिहासकार नमूद करतात त्याप्रमाणे स. १६४१ - ४३ दरम्यान ठरत नसून स. १६४५ नंतरचे ठरते. आणि एकही प्रत्यंतर पुरावा या निष्कर्षास बळ पुरवत नाही.  

    तिसरा आक्षेप असा की, दादाजी कोंडदेवचा यात शहाजीचा मुतालिक म्हणून उल्लेख आलेला आहे. उलट स. १६४४ - ४५ मधील शिपसासं क्र. २४९२ च्या पत्रात दादाजी हा ' सुभेदार नामजाद किले कोंढाणा व महालनिहाये ' असल्याचा उल्लेख आहे. याचा मेळ कसा बसावा ? तारखांतील अंतरामुळे जरी संशयाचा फायदा घेता येत असला तरी दादाजीला कोंडाण्याचा सुभेदार म्हणून नियुक्त करणं, पदच्युत करणं जर आदिलशाहीच्या हाती होतं व कोंडाण्यावर इतर कोणाचीही सुभेदार म्हणून नियुक्ती करण्याचा आदिलशहाला अधिकार होता तर या फर्मानातील दादाजी कोंडदेव शहाजीचा मुतालिक कसा काय होऊ शकतो ? तात्पर्य, उपरोक्त फर्मानातील मजकूर विश्वसनीय मानता येत नाही.

    या स्थळी मुलभूत प्रश्न असा उद्भवतो कि, शहाजीचा मुतालिक म्हणून दादाजी कोंडदेवचं एकही पत्र मान्यवर इतिहास संशोधकांना का प्रसिद्ध करता आलं नाही ? शिवकालीन पत्रसार संग्रहात अस्सल, नक्कल, बनावट अशी तिन्ही प्रकारची पत्रे प्रकाशित आहेत परंतु दादाजी शहाजीचा मुतालिक असल्याचं कोणतंच पत्र प्रसिद्ध झालेलं नाही. याचा अर्थ काय ?

    इथवरच्या चर्चेअंती दादाजी कोंडदेव हा कोंडाण्याचा आदिलशाही नियुक्त सुभेदार दिवाण असल्याचे व शहाजीचा चाकर, कारभारी वा मुतालिक नसल्याचे स्पष्ट होते. आता काही ठिकाणी असेही त्याचे उल्लेख आढळतात, ज्यात त्याच्या पदाचा निर्देश केलेला नाही.

    उदाहरणार्थ, ' शिवचरित्र साहित्य खंड २ रा ' मधील ले. १०४, हा अर्धवट स्वरूपाचा असून यात ' राजश्री दादाजी कोडदेऊ याणी मुलकास कौल देऊन वसाहाती करविली ' असा उल्लेख आहे. तसेच ले. १०५ चा मसुदा शके १७११ ( स. १७८९ - ९० ) मधील असून त्यात ' .. अैस गावसमधे कचे हिसेबास दादा कोडदेवाचे वेलेस किले सिव्हगडास नेऊन तिघांची डोकी मारिली ' असा उल्लेख आहे. असो.

    शिवाजीच्या कित्येक पत्रांत दादाजी कोंडदेवचे उल्लेख आढळतात. त्यावरून काही इतिहासकार दादाजी - शिवाजी किंवा दादाजी - शहाजीचा संबंध असल्याचे मत मोठ्या आवेशाने मांडत असतात. त्या मताचा प्रस्तुत स्थळी परामर्श घेत प्रकरण आटोपते घेतो.

    सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे कि, शहाजी भोसले हा विजापूरचा मोकासदार असून दादाजी हा सुभेदार होता. अर्थात, डफची माहिती गृहीत धरता शहाजी त्याचा वरिष्ठ अधिकारी ठरतो. शहाजी कर्नाटक प्रांती मोहिमेवर असल्याने त्याने आपल्या पुणे व इतर परगण्यांच्या मोकासदारी कारभाराकरिता ठिकठिकाणी पोटमोकासदार नियुक्त केले. कर्यात मावळ शिवाजीकडे, सांडस खुर्द मंबाजीकडे, सुपे परगणा संभाजी मोहित्याकडे अशी विभागणी केली.
    पैकी, पुणे परगण्या अंतर्गत मोडणाऱ्या मोकासदारीची विभागणी वादग्रस्त तसेच संशयास्पद आहे. उपलब्ध माहितीनुसार पुणे परगण्यातील ७ तर्फांत एकूण २९० गावांचा समावेश होता. पैकी कर्यात मावळ ( ३६ ) व सांडस खुर्द ( २० ) अशी छपन्न गावं वजा केली असता उर्वरित २३४ गावांचा ताबा त्याने कोणाकडे सोपवला हा मुख्य प्रश्न आहे. बऱ्याच इतिहासकारांनी यासंदर्भात दादाजी कोंडदेवचे नाव घेतले असले तरी दोनशेहून अधिक गावांचा कारभार करणाऱ्या दादाजीच्या नावे --- शहाजीचा कारभारी वा मुतालिक या अर्थाने एकही कागद उपलब्ध झालेला नाही. त्याउलट तुलनेनं शिवाजी - मंबाजीकडे कमी गावं असूनही त्यांच्या नावचे कागद आज उपलब्ध आहेत. तेव्हा उर्वरित २३४ अथवा पाच तर्फांवरील शहाजीच्या मुतालिकासंबंधीची कागदपत्रे उपलब्ध होणे वा त्यादृष्टीने संशोधन होणे अत्यावश्यक असल्याचे मी येथे नमूद करतो.

     शहाजी व दादाजी हे एकाच प्रांतातील, एकाच दरबारचे नोकर असल्याने शासकीय कामकाजानिमित्त उभयतांचा कागदोपत्री संबंध येणे स्वाभाविक आहे. कारण, शहाजीला अमुक एक गावचा मोकासा दिला असता त्या गावचा तोच एकमेव प्रशासकीय अधिकारी ठरत नाही. त्या गावच्या एकूण उत्पन्नापैकी त्याचा ठराविक वाटा वगळल्यास उर्वरित उत्पन्नाच्या जमाखर्चाची नोंद --- शासकीय कर --- करणारे सरकार नियुक्त दुसरे अधिकारीही असत. म्हणजेच एकाच गावात आदिलशाहीच्याच मोकासदार व महसूल अधिकाऱ्याचे सरकार चाकरीशी निगडीत परस्पर संबंध असू शकतात. नव्हे होते.  या संबंधांत अधिक विवेचनाचे भारुड न लावता डॉ. नभा अनिल काकडे संपादित ' छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे ' या संदर्भ ग्रंथातील दि. २३ नोव्हेंबर १६४७ चे पत्र येथे देत आहे.

                                          श. १५६९ मार्ग शु. ७
                                          सु. १०४८ जिल्काद ६
                                          इ. १६४७ नोव्हें. २३
अजर. रा. सिवाजी राजे दाम. व. कार. ता| कऱ्हे पठार पा| पुणे वि. (सु||) ( रवा सुद ) समान अर्बेन अलफ दरीविले श्री. मोरेश्वर गोसावी सेकिन मोरगाउ ता| मजकूर हुजूर. आपणास इनाम दर सवाद मौजे मजकूर चावर निमे .||. देखील नख्त व खर्चपटी व पायेपोसी व सेलबैल ता| ठाणे व ता| देहाये दिल्हा आहे तेणेप्रमाणे चालत होता दरम्यान सन खमसा कारणे मौजे मजकुरीचे हुदेदारी व मोकदमी इस्कीळ ( इस्कील - खोडी, आडाकाठी ) करून सेलबैल  व मोईन सादिलवार नि|| ठाणे व गाव खर्च तुटपटी वें हकदार व तूप कानूचे व पटीचे व हुमायून पटी व वेले खेडीच्या पटियाची तकसीम मागत होते म्हणौन सदरहू हकीकत मा| दादाजीपंत सुभेदार त्यासी गोशगुजार ( श्रुत ) केली त्यावरून पंडित माइलेने सनद दिधली होता की मौजे मजकुरीचे अज कासेस सदरहू इनाम बाद देऊन ( वजा करणे ) वरकड कासेवरी पटीकरून गावांची उगवणी करीत जाणे कुलबाब पटीया माफ केल्या असेती पेस्तर नव्या होतील त्या सालाबाद माफ केल्या असेती इनाम सेत घरवाहो करितील अगर प्रजेसी लावितील त्यासी वेठी बेगारी हरयेक बाबे येक जरीयाची तसवीस न देणे म्हणोन सनद दिधली होती. तेणेप्रमाणे ता| साल गु|| तसुरफाती ( अधिकार, ताबा ) चालिली हली साल म|| कारणे सदरहू ठाण्याबाबे व गाव नि|| पटिया नख्त व येन जिनस पटी करून इनामतीच्या सेतावरी पटीची ता| घातली आहेत दरीबाब ( दर इबाब = त्या बाबीमध्ये ) सरंजाम होये बिनबा रा. सदरहू इनाम देखील नख्त. व खर्च पटिया व पायपोसी व सेलबैल ता| ठाणे व ता| देहाये दे|| मोईन सादिलवार बाब हाये नि|| ठाणे व गावखर्च तुटपटी व हकदार व तूप कानू व खा| हुमायून पटी कडबे व वेठी व बेगारी व बाजे पटिया हाल व पेस्तर कुल.  दिधला असे ता| साल गु|| सदरहु प्रमाणे चालिले असोन साल मजकुराकारणे इस्कील करणे काये माना ( गोष्ट, अर्थ, हकीगत ) आहे हली एक जरीयाची तसवीस न देणे दर हर. औलाद. पेस्तर फिर्यादी येऊ न देणे असेली श्री मोरेश्वर गोसावी यापासी परतून देणे मौजे मजकुराचे मोकदमे हली पटी घातली आहे त्याची तसवीस न देणे पेस्तर यासि येक जरियाची तसवीस लागो न देणे सदरहू इनाम मौजे मा| चे अजकासेपैकी अजीबाद देऊनबाकी कासेवरी पटी + +
जाणे तालीख मोर्तब सुदु ( ष. को )
                                       रुजू सुरु
                                       नीवीस
तेरीख ६ माहे जिलकादि
जिलकादी

    उपरोक्त पत्रातील " ... म्हणौन सदरहू हकीकत मा| दादाजीपंत सुभेदार त्यासी गोशगुजार केली त्यावरून पंडित माइलेने सनद दिधली होता की .. " या मजकुरास दुजोरा देणारे दादाजी कोंडदेवचे पत्र शिपसासंमध्ये ( क्र. २४९२ ) छापले आहे. या पत्राच्या आरंभी दादाजीचा उल्लेख ' रा. दादाजी कोंडदेऊ सुभेदार नामजाद किले कोंढाणा व महालनिहाये ' असा येत असून त्याने हे पत्र बापुजी मुद्गल हवालदार व पुणे परगण्याच्या कारकुनांस लिहिले आहे. त्यातील मजकूर असा :-

सा. ३ ले. ५१७ }             ( २४९२ )           { श. १५६६ 
सु. १०४५ }                                    { इ. १६४४ - ४५
रा. दादाजी कोंडदेऊ सुभेदार          |         बापूजी मुद्गल हवालदार व कारकून परगणे
नामजाद किले कोंढाणा व महालनिहाये |           पुणे.
श्री मोरेश्वर गोसावि सेकीन वस्ती मोरगौ येही मालूम केले जे महाराजे आपणास मौजे मजकुरी इनाम दिल्हा आहे त्याचे खुर्दखत मजकूर जे, वज बदल धर्मादाऊ इनाम जमीन .||. गजशरायेनी ( २४ तसूंच्या मापाच्या मोजणीनुसार ) देखील नख्त खर्चपटी इ. तरी मौजेमजकुरीचे हुदेदार व मोकदम पटिया मागताती. तरी पटियाची तकसीम सालाबाद नेघणे ( न घेणे ) म्हणोनु कागद देविला पाहिजे. तरी कडकासेवरी पटी करून गांवाची उगवणी करीत जाणे. सदरहु व नव्या पटिया यांसि माफ केल्या असेती. हे आपला इनाम घरवाहो अगर प्रजेसी लावितील तरी याचा उजूर ( अपेक्षा, हरकत, आक्षेप ) न + करणे.

    या पत्राखाली संपदकांनी '+' या चिन्ह खुलासा करता दिलेला मजकूर येणेप्रमाणे :-  [ + याच मजकुराची व तारखेची रुस्तुमजमाने पत्रे लिहिली आहेत. त्यांत मूर्तजाबाद, मुरंजन, इसलामाबाद ह्या परगण्याच्या अधिकाऱ्यास चेऊल, ठाणे, कोरकोडा मुरबाड व देऊचे ह्या गावापैकी लारी २ व एक देण्याबद्दल लिहिले आहे. ]
    त्यानुसार शिपसासं चाळला असता क्र. २५०२, २५०३, २५०४ हि पत्रे त्या संदर्भातली असल्याचे आढळून आले. पैकी २५०२ - ०३ या पत्रातील मजकुरानुसार मलिक सैदने मोरेश्वर गोसाव्यास दिलेल्या खुर्दखतान्वये इनामदाखल बाब पुढे चालवण्याचे रुस्तमजमाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून क्र. २५०४ अर्जदास्त असून त्यात मोरेश्वर गोसाव्याचे इनाम चालवण्याचे आदेश आहेत. परंतु या पत्रांचा दादाजीच्या पत्राशी कसलाही संबंध येत नसून मोरेश्वर गोसाव्यास कोणाकडून काय इनाम मिळाले होते, चालू होते याची माहिती देण्यापुरताच आहे. असो.

    उपरोक्त दोन्ही पत्रांतील मजकूर, दादाजीच्या पत्रातील मायना लक्षात घेता दादाजी हा शहाजीचा नोकर नसून आदिलशाही सेवक असल्याचे सिद्ध होते. त्याचप्रमाणे महसुली बाबतीत एकाच सत्तेच्या दोन नोकरांचे विविध कारणांनी परस्परांशी कागदोपत्री संबंध कसे येतात याचा देखील खुलासा होतो. या गोष्टी इतक्या स्पष्ट, सरळ असतानाही काही इतिहासकारांनी मुद्दामहून दादाजी कोंडदेवचा शहाजी सोबत --- पर्यायने शिवाजीशी संबंध जोडण्याचा निंदनीय प्रयत्न केला. आरंभी साधनांच्या अभावाने, माहितीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अशा चुका झाल्या असतील तर त्या क्षम्य होत्या. परंतु आजच्या काळात शिवचरित्राची पूर्वीच्या तुलनेनं विपुल साधने असतानाही चुकीच्या गृहीतकांना, मतांना चिटकून राहणे खऱ्या इतिहासकारास, संशोधकास, अभ्यासकास शोभून दिसत नाही.      

सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

प्रकरण ५) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी





    प्रस्तुत प्रकरणात आपण शहाजीने निजामशाहीची शरणागती दिल्यावर त्याच्या ताब्यात आलेल्या पुणे जहागीरीची, तेथील कारभाराची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी शहाजीकडे निजामशाहीची शरणागती देण्यापूर्वी कोणता प्रदेश होता याची संक्षेपात माहिती घेऊ.

    शिवकालीन पत्रसारसंग्रहातील स. १६३६ च्या मे महिन्यातील आदिल - मोगल तहानुसार शहाजीकडे जुन्नर, त्रिंबक आदी किल्ल्यांचा ताबा होता. शहाजीच्या शरणागतीचा वृत्तांत पाहता माहुली गडावर असताना त्याने शरणागती पत्करली. तेव्हा उपरोक्त किल्ल्यांत आणखी एकाची भर पडते. त्याचप्रमाणे मराठी रियासत खंड - १ मध्ये याच काळातला एक वृत्तांत असून त्यानुसार शहाजीने पोर्तुगीजांकडे यावेळी खटपट करून चौल येथे आश्रय घेण्याची धडपड चालवली होती. त्यावेळी पोर्तुगीजांनी त्यांस उघड आश्रय देण्याचे नाकारले पण दंडा राजपुरी येथे जाण्यासाठी मदत हवी असल्यास देण्याची तयारी दर्शवली. विशेष म्हणजे दंडा राजपुरी यावेळी शहाजीच्या ताब्यात होते.

    डॉ. ब. प्र. सक्सेना लिखित व भ. ग. कुंटे अनुवादित ' दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास ' मध्ये या संदर्भात थोडी अधिक माहिती मिळते. त्यानुसार, शहाजहान दक्षिणेत उतरला त्या आसपास शहाजीकडे चांभारगोंदा, अष्टी हे महाल होते. शिवाय संगमनेर, नाशिकचाही ताबा त्याच्याकडेच होता. तसेच शहाजीने बादशाही फौजांपासून जुन्नर, चाकण, पुणे हि स्थळे जिंकून घेतल्याचाही उल्लेख आहे. फक्त कालनिर्देश आढळत नाहीत.

    विविध संदर्भ ग्रंथांतील माहिती पाहता शहाजीकडे माहुली, जुन्नर, त्रिंबक, दंडा राजपुरी हे चार किल्ले असल्याचे तरी स्पष्ट होते. चाकण जरी त्याच्याकडे असले तरी तेथील गढीचा ताबा कोणाकडे होता याची माहिती मिळू शकली नाही. चांभारगोंदे व अष्टी महालापैकी चांभारगोंदा हे भोसल्यांच्या पाटीलकी वतनाचे गाव असून स. १५९७ पासून मालोजीने तिथे वास्तव्य केल्याचा उल्लेख ' शककर्ते शिवराय ' मध्ये विजय देशमुखांनी केलाय. असो. नाशिक, संगमनेर, पुणे इ. प्रांतापैकी व उपरोक्त स्थळ - किल्ल्यांपैकी प्रत्यक्ष शरणागती वेळी कशाकशावर शहाजीचा ताबा होता हे समजायला मार्ग नाही. परंतु निजामशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी जो भूप्रदेश शहाजीने तुडवला वा कब्जात घेतला, त्यातीलच बव्हंशी प्रदेशाचा शिवाजीच्या राज्यात पुढे अंतर्भाव झाल्याचे माझे मत आहे.

    स. १६३६ मध्ये शहाजीला प्राप्त झालेल्या जहागिरीचा पूर्ण तपशील मिळत नाही. आदिलशहास लिहिलेल्या त्याच्या एका पत्रावरून, जेव्हा माहुलीवर निजामशाहीची शरणागती देऊन तो विजापूर दरबारच्या सेवेत दाखल झाला तेव्हा त्यांस चार लाखांची जागीर मिळाल्याचा उल्लेख आहे. अर्थात हि जहागीर नव्याने प्राप्त झाली कि त्याची आधीची मिळून आणखी काहीची भर पडून ती चार लाखांची झाली याची स्पष्टता होत नाही. असो. 

    विजापूर दरबारने शहाजीला नोकरीत घेऊन त्याची रवानगी कर्नाटक प्रांतातील मोहिमेवर केली. या स्वारीमागील मुख्य प्रयोजन म्हणजे त्या प्रांतातील संस्थानिकांवर आपलं वर्चस्व बसवत एकतर ती समूळ नष्ट करणं वा खंडणी बसूल करणं. याबाबतीत विजापूर व गोवळकोंडा दरबार दरम्यान करार झाला असून त्यान्वये पूर्व किनारा गोवळकोंड्याकडे तर पश्चिम किनारा विजापूरकडे अशी कर्नाटक प्रांताची विभागणी झाली होती, असे रियासतकार सरदेसाई नमूद करतात. परंतु प्रत्यक्ष घटनाक्रम पाहता विजापूर व गोवळकोंड्यामध्ये हा करार पाळण्याऐवजी तोडण्याचीच स्पर्धा असल्याचे दिसून येते.

    कर्नाटक प्रांताची मोहीम अंगावर पडताच शहाजीने पुणे प्रांतातील आपल्या जहागीरीची व्यवस्था लावण्यासाठी नेमकी कोणती व्यवस्था केली याची विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. दादोजी कोंडदेवची त्याने पुण्याच्या जहागिरीवर देखरेख करण्यासाठी नियुक्ती केल्याचे मोघम विधान बव्हंशी इतिहासकार करतात. याविषयी सविस्तर चर्चा आपण पुढील प्रकरणी करू.  

    शिवाजीच्या हयातीत रचलेल्या शिवभारतानुसार जेव्हा शिवाजी बारा वर्षांचा झाला त्यावेळी शहाजीने त्याची रवानगी बंगळूराहून पुण्याला केली. विशेष म्हणजे शिवभारतात दादोजी कोंडदेव शिवाजीला पुण्याहून बंगळूरला घेऊन गेल्याची वा तिकडून घेऊन आल्याची नोंद नाही. जेधे शकावालीत शिवाजीच्या पुणे आगमनाविषयी अवाक्षर नसले तरी जेधे करीन्यात मात्र " ... त्यावरी माहाराजानी राजश्री सिवाजीराजे यां समागमे राजश्री सामराजपंत पेशवे व माणकोजी दहातोडे सरनोबत व बालाजी हरी मज्यालसी ( सभासद याअर्थी ) व कारकून व स्वाराचा जमाव देऊन पुण्यास पाठविले त्यावरी कसबे खेडेबारे येथे ही वाडे बांधले ... " इतकाच उल्लेख आहे व हि घटना करीन्यानुसार शहाजीच्या प्रथम कैदेनंतरची आहे. अर्थात, यात प्रसंगाचा काल दिलेला नाही.

    शिवाजीचे दादोजी कोंडदेव सोबतचे पुणे आगमन ' पुरंदरे दफ्तर भाग ३ रा ' मधील खेडेबारे येथील देशपांडेच्या शिवकालीन करीन्यात येते. परंतु या करीन्यात विशिष्ट कालाचा वा शकाचा निर्देश नसल्याने तारीख वा साल निश्चितीसाठी करीन्यातील घटनांवर अवलंबून राहावे लागते. दुसरे असे कि, याच करीन्यात माहादेवभट माहाभास हा शिवाजीचा गुरु असल्याचा उल्लेख असूनही ज्याअर्थी तो दुर्लक्षिला गेला आहे त्याअर्थी या करीन्यावर विसंबून दादोजी कोंडदेव सोबत शिवाजीची शहाजीने रवानगी केली असं विधान करणं निश्चितच धारीष्ट्याचं ठरेल. असो.

    सध्या तरी शिवभारतातील अध्यायांवर विश्वास ठेवून वयाच्या बाराव्या वर्षी वा १२ वर्षे पूर्ण झाल्यावर शिवाजी बंगळूरहून पुण्यास आला हे मानणं भाग आहे. शिवाजीला पुण्यास पाठवताना शहाजीने त्याच्यासोबत " काही हत्ती, घोडे व पायदळ, पिढीजाद व विश्वासू अमात्य, त्याचप्रमाणे विख्यात अध्यापक, बिरुदे, उंच ध्वज, विपुल द्रव्य त्याचप्रमाणे अद्वितीय कर्मे करणारे दुसरे परिजन या समवेत त्या पुण्यशील पुत्रास शहाजी राजाने शुभदिनी पुणे प्रांती पाठविले. "
( संदर्भ :- शिवभारत अध्याय १०, श्लोक २५ ते २७ )

    शिवाजीचा जन्म दि. १९ फेब्रुवारी १६३० चा. त्यात अधिक बारा वर्षे धरता साधारणतः स. १६४२ - ४३ च्या सुमारास तो बंगळूराहून पुण्यास आला असं सामान्यतः मानलं जातं. प्रत्यंतर अस्सल साधनांचा पुरावा सध्यातरी उपलब्ध नसल्याने शिवभारताच्या कथनावरच विश्वास ठेवावा लागतो. परंतु त्यासोबत हेदेखील ध्यानात घेतलं पाहिजे कि, १२ म्हणजे बारा वर्षे पूर्ण झाल्याबरोबर लगेच शहाजीने शिवाजीला पाठवलं असं होत नाही. कदाचित यात आणखी काही वर्षे मागं - पुढं झाली असू शकतात. असो.

    शिवचरित्र निबंधावलीनुसार श. १५६७ मध्ये शिवाजीची कारकीर्द सुरु झाली. अर्थात, तोपर्यंत शहाजी कर्नाटक प्रांतातून सवड मिळताच देशी येऊन आपल्या जहागिरीच्या कामकाजाची पाहणी करे. इथे गोंधळात टाकणाऱ्या कित्येक बाबी असून प्रत्यंतर पुरावे नसल्याने या गोंधळाचे निवारण करणे तितकंस सोपं नाही.

    प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे कि, शहाजीकडे पुणे व आसपासचा जो भूप्रदेश जहागिरी दाखल होता, त्याच प्रदेशात त्यास क्रमाक्रमाने सरकारतर्फे --- आदिलशाही दरबाराकडून मोकासदाराचेही अधिकार मिळत गेले. इथे मोकासा व जहागीरदार यातील अंतर जाणून घेण्यासाठी द. वि. आपटे यांची ' शिवभारत ' ची प्रस्तावना अथवा ' शिवचरित्र निबंधावली ' तील लेख पाहावेत. इथे फक्त एवढेच नमूद करतो कि, जहागीर हि वंशपरंपरागत असून मोकासा हा काही वर्षांपुरता वा महिन्यांकरता असतो. जहागीरदार व मोकासदाराची कर्तव्यं जरी जवळपास एकसारखीच असली तरी मोकासदार हा सरकारनियुक्त असल्याने त्याच्याकडे काही खास अधिकारही असतात, जे जहागीरदारास नसतात. उदाहरणार्थ, एखाद्याकडे इनाम चालवायचे झाल्यास त्यासाठी (१) बादशाही फर्मान (२) वजीर वा मोकासदाराची खुर्द्खते आणि (३) सुभेदाराची सनद या तीन पत्रांची गरज असे. यात जहागीरदाराचा संबंध येत नाही.

    बव्हंशी इतिहासकारांच्या मते, शहाजीला पुणे परगण्याचा मोकासा मिळाला त्यावेळी त्याने त्यातील २९०( काही ठिकाणी २८८ गावं दिली आहेत. ) गावांपैकी कर्यात मावळात मोडणाऱ्या ३६ गावांचा मोकासा शिवाजीच्या नावे केला. सांडस खुर्द कडील वीस गावं त्याने आपला चुलत भाऊ मंबाजी भोसलेकडे दिली तर उर्वरित गावांची जबाबदारी दादोजी कोंडदेवकडे सोपवली. विशेष म्हणजे यात जिजाबाईच्या वाटणीस एकाही गावाचा मोकासा नाही. हि बाब मला खटकली असून या निमित्ताने उपलब्ध साधने अभ्यासली असता खेडेबारे प्रांतातील मौजे कामथडी हा गाव जिजाबाईच्या सरदेशमुखीचा असल्याचे समजले. या संबंधातील वतनपत्र, निवाडापत्र सातारकर शाहूच्या ( संभाजी पुत्र ) काळातील आहे. या निवाड्यातील माहितीनुसार स. १६३० च्या आसपास कामथडी गाव जिजाबाईकडे इसाफतीने तथा इनाम म्हणून सरदेशमुखी बाबत चालत होते. जिजाबाईचा शिक्का फारसी असल्याच्या उल्लेख बव्हंशी इतिहासकार करतात. मग जर तिच्याकडे शिक्का आहे तर कामकाजादाखल एखादं गाव का असून नये ? त्याहीउपर म्हणजे खासगी खर्चासाठी एखाद दुसरं गाव आपल्या कुटुंबाकडे लावून देण्याचा तो काळ लक्षात घेता, शहाजीने जिजाबाईकडे गाव सोपवलं नाही असे कशावरून म्हणता येईल ? माझ्या मते, शहाजीने स्वतःस मिळालेला मोकासा --- जो इतरांना पोटमोकासदार म्हणून शिवाजी - मंबाजीत जसा वाटला त्याचप्रमाणे जिजाबाईकडेही काही गावांचा अंमल असावा. यासंदर्भात शिवकालीन पत्रसार संग्रहातील पत्र क्र. ६१४ विशेष उपयुक्त आहे. हे पत्र खुर्दखत स्वरूपाचे असून ते जिजाबाईच्या कचेरीतून गेल्याचे त्यात स्पष्ट दिले आहे. यावरून जिजाबाईकडेही शहाजीने काही अधिकार निश्चितच सोपवल्याचे स्पष्ट होते. यासंदर्भात आणखी कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाल्यास याकाळातील बऱ्याचशा गूढ गोष्टींवर प्रकाश पडेल.            

    मोकासदार म्हणून शिवाजीची मुद्रांकित पत्रं प्रथमतः उलपब्ध होतात ती स. १६४६ सालातली. त्यापूर्वीचा त्याचे नावे आढळणारा पत्रव्यवहार पत्रसारसंग्रह तसेच इतरत्र आहे परंतु अलीकडेच डॉ. नभा काकडे संपादित ' छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे ' मध्ये ज्या पत्रांचा समावेश केला गेला आहे --- जी निःसंशय शिवाजीची असल्याचे डॉ. काकडेंचे मत आहे --- त्यामुळे स. १६४६ सालापूर्वीची पत्रं, ज्यामध्ये शिवाजीच्या नावे आदेश वगैरे गेले आहेत, ती जमेस धरण्याची मला गरज वाटत नाही.

    शहाजीला पुण्याव्यतिरिक्त सुपे, इंदापूर, चाकण परगण्याचाही मोकासा प्राप्त झाला होता. पैकी, सुप्यावर त्याने संभाजी मोहिते या आपल्या द्वितीय पत्नीच्या भावास नियुक्त केले असून चाकण व इंदापूर बाबत खुलासा होत नाही. परंतु स. १६४६ च्या पत्रानुसार इंदापूर परगणा शिवाजीकडे सोपवाल्याचे स्पष्ट होते.

    पुणे, सुपे प्रांतांवर मुख्य मोकासदार तथा मालक म्हणून शहाजीचं उपलब्ध असलेलं शेवटचं पत्र स. १६५५ डिसेंबरचं आहे. त्यानंतरचा त्याचा पत्रव्यवहार निदान पत्रसारसंग्रहात तरी उपलब्ध नाही. हि नोंद तसेच जेधे शकावली - करिना, तसेच शिवभारत व काही अस्सल पत्रांच्या आधारे असं दिसून येतं कि, स. १६५५ पर्यंत शिवाजीच्या ज्या काही हालचाली वा कृत्यं इतिहासात नमूद आहेत, त्या सर्वांमागे शहाजीचा हात आहे. किंबहुना हेच विधान स्पष्टपणे असं करता येईल कि, स. १६३६ मध्ये शहाजीने निजामशाहीची शरणागती दिली असली तरी त्यानुभावाद्वारे त्याचे स्वतःच्या राज्यनिर्मिती / विस्ताराचे प्रयत्न आदिलशाही नोकरीत आल्यावरही चालू होते. त्यामुळेच विजापूर दरबाराची त्याच्यावर स. १६३६ ते ५० दरम्यान दोनदा नाराजी ओढवली. विशेषतः दुसऱ्या वेळी ओढवलेल्या गैरमर्जीमुळे त्यांस कैदही भोगावी लागली. परंतु त्यामुळे त्याच्या प्रयत्नांत खंड पडल्याचे दिसून येत नाही. उलट त्यानंतर त्याने आपल्या डावपेचांत बदल करून आपल्या मुलाचे विशेष कर्तुत्व लक्षात घेत स. १६५५ नंतर शिवाजीला स्वतंत्र हालचालीची मोकळीक दिली. अर्थात, याक्षणी स. १६५५ नंतर पुणे, सुपे आदि प्रांतातील अधिकाऱ्यांना शहाजीच्या नावे / हस्ते गेलेले हुकुम उपलब्ध नाहीत यावर आधारित हे विधान आहे, याची नोंद घ्यावी.

    स. १६५५ पर्यंत जी काही पुणे व आसपासच्या प्रांतात शिवाजीने खटपट केली त्यामागे शहाजीची योजना असल्याचे, विधान स्पष्ट करण्यासठी या काळात घडलेल्या काही घटनांकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. 

    पहिली घटना म्हणजे माहुलीवर निजामशाहीची शरणागती देताना घडलेला शहाजी - कान्होजी जेधे भेटीचा करीन्यातील वृत्तांत. त्यानुसार असे दिसून येते कि, शहाजी निजामशाहीसाठी लढत होता त्यावेळी कान्होजी जेधे विजापूरकरांना रुजू असून रणदुल्लाखानाच्या हाताखाली कार्यरत होता. विजापूरकरांशी तह करून शहाजी त्यांच्या नोकरीत आला त्यावेळी पुणे, सुपे प्रांतासोबत मावळ ( बारा मावळ ) भागही त्याच्या जहागिरीत होता व यातील एका भागात कान्होजी जेधेचे वतन आणि वर्चस्व असल्याने शहाजीने त्यांस आपल्या चाकरीत घेण्याची इच्छा दर्शवली. कान्होजी जेधेही शहाजीच्या इच्छेनुसार त्यांस रुजू झाला.

    दुसरी घटना आहे स. १६४४ ची. या वर्षातील दि. १ ऑगस्ट १६४४ च्या आदिलशाही फर्मानानुसार शहाजीला दरबारातून निर्वासित केले होते -- अर्थात चाकरीवरून दूर केले होते. तसेच त्याचा मुतालिक दादाजी कोंडदेव कोंडाण्याच्या बाजूस असून त्याचा पाडाव करण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपड्याची नियुक्ती केल्याचा उल्लेख आहे. इतिहास संशोधकांच्या मते, हे फर्मान कान्होजी जेध्यास पाठवले असून त्याने घोरपाड्यांना सामील होऊन कोंडाण्याचा प्रांत ताब्यात घेण्याकरता मदत करावी अशी आदिलशाहीची अपेक्षा आहे. आज्ञा आहे.

    उपरोक्त घटनेस / फर्मानास दुजोरा देणारा भाग जेधे करीन्यात आहे. परंतु त्यातील तपशिलात गोंधळ असल्याचे दिसून येते. प्रथम आपण जेधे करीन्यातील नोंद पाहू.
" ... त्यावरी रणदुलाखान मृत्य पावले त्यास संतान नाही म्हणून त्यांची दौलत त्यांचा खीजमतगार अफजलखान कर्ता देखोन त्यास दिल्ही अणी चंदीस रवाना केले त्या बा| माहाराजास ही फौजेनसी रवाना केले बा| कान्होजी ना| ही जमेतीनसी गेले चंदीस वेढा घातला जर केली त्यास चंदीस राचेवार मऱ्हाटे होते त्यांचा व माहाराजाचा घरोबा आहे सामान पुरविताती यैसी बदगोई ( तक्रार ) अफजलखान याणी विजापुरास पातशाहास मुस्तुफाखाना लिहिली त्यावरून माहाराजास धरून विज्यापुरास बोलाऊन नेणे बा| कान्होजी नाईक होते पातशाहानी तहकिकात मनात आणीता तुफानी गोष्टी ( खोट्या गोष्टी ) यैसे जाले त्यावरी पातशाहानी माहाराजाचा सन्मान केला सदर बकसीस दिल्ही सीरपाव दिल्हे बेगरूळ प्रांत पांचा लक्षा होनाची जहागीर देऊन वेगली मसलती सांगितली बा| कान्होजी ना| ही जमावानसी होते .... " येथून पुढे शिवाजीच्या पुणे रवानगीचा वृतांत आहे. असो.

    करीन्यातील माहितीनुसार हि घटना रणदुल्लाखानाच्या मृत्यूनंतर घडली. रणदुल्लाचा मृत्यू स. १६४३ - ४४ चा आहे. तर पत्रसारसंग्रह व शिवचरित्र निबंधावलीनुसार स. १६४४ च्या फेब्रुवारीत शहाजी देशी, अर्थात महाराष्ट्रात आहे. म्हणजे आधीच्या परिच्छेदातील निर्देशित फर्मानाची तारीख गृहीत धरली तर स. १६४४ च्या पावसाळ्यात वा नंतर अथवा तत्पूर्वी शहाजी कर्नाटकात रवाना झाल्यावर त्याच्या कैदेचा --- करीन्यात दिल्याप्रमाणे --- प्रसंग घडून आला. परंतु यानंतर करीन्यात जो उल्लेख येतो, त्यामुळे करीन्यातील प्रसंगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. करीन्यानुसार शहाजीवरील आक्षेप खोटा ठरून आदिलशहाने दरबारात त्याचा सन्मान करत पाच लक्ष होनांची जहागीर बेंगरूळास दिली.

    परंतु शहाजीचे जुलै १६५६ चे पत्र वेगळीच हकीकत सांगते. त्यानुसार माहुलीवर त्याने निजामशाहीची शरणागती दिली त्यावेळीच आदिलशहाने त्यांस चार लक्षांची जहागीर दिली होती. फरक इतकाच आहे कि, शहाजीच्या पत्रात जहागीर दिल्याचा उल्लेख आहे, विशिष्ट भूप्रदेशाचा नाही. त्यामुळे करीन्यातील कथनावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न पडतो.

    तिसरी घटना दि.२५ जुलै १६४८ ची आहे. कर्नाटक प्रांतातील मोहिमेत मुस्तफाखानाने महंमद आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीला कैद केले. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या कान्होजी जेधे व दादाजी कृष्णलाही कैद भोगावी लागली. या घटनेस जेधे शकावली व करिना तसेच पत्रसार संग्रहातील काही पत्रं आणि शिवभारतात दुजोरा मिळतो.

    शहाजीच्या या कैदेची मीमांसा करताना वा कारण सांगताना शिवाजीच्या पुणे प्रांतांतील उद्योगांकडे निर्देश केला जातो. परंतु याच काळातील अब्दुला कुतुबशहाकडून महंमद आदिलशहाला गेलेलं पत्र शिवकालीन पत्रसारसंग्रहात प्रसिद्ध झालेलं आहे. त्यानुसार या सुमारास व तत्पूर्वीही शहाजी आदिलशाही सोडून कुतुबशाहीत जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. ग. ह. खरे, रियासतकार सरदेसाई वगैरे प्रभूतींच्या मते शहाजीची ही धडपडच विजापूरची त्याच्यावर गैरमर्जी होण्यास कारणीभूत ठरली. याखेरीज विजापूरतर्फे कर्नाटक प्रांतातील पाळेगारांना रगडताना शहाजी अंतस्थरित्या त्यांचा बचाव करत असल्याचीही चर्चा त्यावेळी होती. तेव्हा हि दोन कारणं प्रामुख्याने शहाजीच्या अटकेसाठी कारणीभूत ठरल्याचं दिसून येतं.

    शहाजी कैद होताच त्याला जहागिरीदाखल दिलेला प्रदेश जप्त करण्यासाठी आदिलशाहाने बंगळूर व पुण्याकडे फौजा रवाना केल्या परंतु त्यांचा अनुक्रमे संभाजी व शिवाजीने खरपूस समाचार घेतल्याने आदिलशहा थोडा नरमला. या काळात शिवाजीनेआप्ल्या बापाच्या सुटकेसाठी मोगल दरबारीही प्रयत्न करून पाहिले. त्यानुसार उभयपक्षी काही पत्रव्यवहारही झाला. परंतु मोगलांच्या मार्फत विजापूरवर दबाव आणून शिवाजीने शहाजीची सुटका केली असं म्हणता येत नाही. कारण शहाजीच्या सुटकेसाठी संभाजीला बंगळूर, कंदर्पी तसेच शिवाजीला सिंहगडासारखे मजबूत स्थळ आदिलशहास द्यावे लागल्याचे इतिहासात नमूद आहे.

    याबाबतीत तुलनात्मक अवलोकनार्थ एक प्रसंग नमूद करतो. स. १६४२ - ४३ मध्ये काही कारणांनी आदिलशहाने मुस्ताफाखानास कैद केले होते. त्यावेळी शहाजहानने दिल्ली दरबारातील विजापुरी वकिलास कैद करत आदिलशहास मुस्तफाची सुटका करण्याचे आदेश दिले. आदिलशहाने शाही हुकमाची बिनतक्रार अंमलबजावणी केली. हे लक्षात घेता शहाजीच्या सुटकेमागे मोगलांचा हात असावा हे संभवत नाही. उलट आदिलशहाने कर्नाटकातील बंगळूर व कंदर्पी ताब्यात घेऊन तिकडील शहाजीच्या मनसुब्यांना सुरुंग लावत इकडे सिंहगडाचाही ताबा परत मिळवला. हि स्थळे आदिलशहाच्या ताब्यात कधी गेली याचे कालनिर्देश मिळत नाहीत. असो.

    दि. १६ मे १६४९ रोजी आदिलशहाने शहाजीची सुटका करत शाही कृपा दर्शवण्यासाठी बंगळूर प्रांताची जहागीर काही स्थळे वजा करून त्याच्या ताब्यात दिल्याचे जेधे शकावली - करीन्यावरून दिसून येते. यावेळी बहुतेक त्याला ' महाराज ' हि पदवी देण्यात आली असावी असा माझा तर्क आहे. कारण या घटनेपूर्वी कोणत्याही सरकारी पत्रात शहाजीच्या नावाआधी महाराज पदवी लावल्याचे दिसून येत नाही.

    विजापूरच्या कैदेतून शहाजीची जरी सुटका झाली असली तरी त्याच्याविषयी आदिलशहाचे मन पूर्णतः साफ झाल्याचे दिसून येत नाही. याचं प्रत्यंतर तत्कालीन पत्रव्यवहारावरून येते. स. १६४९ ते ५४ दरम्यानचा शहाजीचा जो काही पत्रव्यवहार पत्रसारसंग्रहात प्रकाशित झालाय त्यातील पत्रांवर प्रथम शाह अजम हैदरशाहा व नंतर जैनाखान पीरजादेची ' परवानगी ' दिसून येते. याचाच अर्थ असा कि, सुटका होऊनही शहाजी एकप्रकारे विजापूरकरांच्या नजरकैदेत होता. आणि विशेष म्हणजे याच काळात शिवाजीही पुणे प्रांतात स्वस्थ बसून राहिला होता. अर्थात, राजकीय आघाडीवर या काळात कसलीही हालचाल करणे शक्य नसले तरी हाच काळ अंतर्गत सुव्यव्स्थेकरता कारणी लावून शिवाजीने आपल्या उद्योगाचा, पर्यायाने राज्याचा पाया मजबूत केला.

    विजापूरकरांच्या मेहेरबानीने भोगाव्या लागलेल्या प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कैदेमुळे शहाजीने आपले पूर्वीचे धोरण बदलले. प्रसंग पडला असता व्यक्तीच्या अंगभूत गुणांची पारख होते असं म्हणतात. तशी यावेळी शिवाजीची होऊन योग्य वेळ येताच शहाजीने त्यांस पुर्नाठा मोकळीक दिल्याचे दिसून येते. अर्थात यानंतर जरी शिवाजीने स्वबळावर राजकारणं केली असली तरी बापाचा सल्ला न घेता त्याने महत्त्वाचे निर्णय घेतले असतील हे संभवत नाही दुर्दैवाने शहाजी - शिवाजी मधील पत्रव्यवहार कित्येक कारणांनी आज उपलब्ध नसल्याने याविषयी अधिक काही लिहिणे शक्य नाही. असो.

    स. १६४९ मध्ये शहाजीची त्याच्या सहाय्यकांसh सुटका झाली त्यावेळी त्याने मुद्दामहून भेट घेत व शपथक्रिया करत कान्होजी जेधे व दादाजी कृष्ण लोहकरे यांस शिवाजीच्या मदतीकरता देशी रवाना केले. यासंर्भात जेधे शकावलीतला पुढील उल्लेख विशेष महत्त्वाचा आहे. " शके १५७१ विरोधी संवछर जेष्ट श्रुध पुर्णिमा शाहाजी राजे कोढाणास देऊन सोडिले ते समई कान्होजी नाईक जेधे व दादाजी कृष्ण लोहकरे यांस सोडिले माहाराजांची व त्यांची भेटी जाली ते समई माहाराज बोलिले की तुम्ही आम्हा मुले बंदखानी श्रमी जालेस यां उपरी आम्ही पातशाहीसी तह केला की बारा गांवातून मजुरा करून हुकुम प्रमाणे कर्नाटक प्रांते मसलत करावी त्यावरून बेगरूल प्रांत पांचालक्षा होनाचा जाहागीर दिल्हा आहे यां करिता आपणास कर्नाटकाची मसलत करावी लागली तुमचे वतन मावळात अहे चिरंजीव राजश्री सिऊबा खेड बारी यांत व पुणा अहेत त्याजवल तुम्ही जमावानसी राहावे तुमची जबरदस्ती त्यां प्रांते आहे अवघे मावळचे देशमूख देखील त्यासी रुजू होऊन त्यांचे आज्ञेत वर्तेत येसा विचार करून जबरदस्तीने राहावे येखादी मोगलाईकडील फौज व ईदलशाहीकडील फौज आली तरी आपण ईमान राखा व त्यांसी लढाई करावी यैसी शफत ईमान पुरस्कर बेलरोटीवर हात ठेऊन घेतली तैसीच त्याणी ही कान्होजी नाईकांस शेफत दिल्ही अणी कान्होजी नाईक यांस व दादाजी कृष्ण यांस वस्त्र देऊन बराबर हुजऱ्या व पत्रे देऊन राजश्री सिवाजीराजे याजकडे पाठविले. "
शकावलीतला हा मजकूर नुसता वरवर जरी वाचला तरी लक्षात येते की, नजीकच्या काळात शिवाजीचा मोगल वा आदिलशाहीशी झगडा जुंपणं अपरिहार्य आहे. शहाजीच्या या विधानांना तत्कालीन वस्तुस्थितीचा चांगलाच आधार असून भविष्यात शिवाजीवर येणारं संकट हे शिवाजीच्या नव्हे तर शहाजीच्या कृत्यांमुळे ओढवणार होतं. किंबहुना याच काळातील विजापूर दरबारच्या हालचाली पाहिल्या तर याचा सहज अंदाज बांधता येतो. याकरता आपणांस तत्कालीन घटनांची थोडक्यात माहिती घेणे अत्यावश्यक आहे.
           
    जावळी प्रांतात मोरे घराण्याची सत्ता असून त्यांनी आदिलशाहीचे मांडलिकत्व स्वीकारले होते. या घराण्याच्या प्रमुखास ' चंद्रराव ' किताब असून स. १६४८ मध्ये ' चंद्रराव ' दौलतराव मोरे मरण पावला. तो निपुत्रिक असल्याने मुख्यपद मिळवण्याकरता त्याच्या भावबंदांत चुरस निर्माण झाली परंतु दौलतरावाच्या पत्नीने शिवथरकर मोऱ्यांपैकी एक मुलगा दत्तक घेऊन त्यांस यशवंतराव नाव दिले व त्याच्या मार्फत सत्ता आपल्याच घराण्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. तिच्या या कृत्यास मुख्यतः शिवाजीचा पाठिंबा असल्याचा उल्लेख इतिहासकार करतात.

    स. १६४९ मध्ये अफझलखानाची वाई परगण्याचा मोकासदार म्हणून नियुक्ती झाली. याबद्दलचे उपलब्ध पहिले पत्र, पत्रसार संग्रहात आहे. ( पत्र क्र. ५५३ )

    भौगोलिकदृष्ट्या जावळीचा भाग वाई व शिवाजीच्या पुणे जहागिरीदरम्यानच्या प्रदेशात येतो. जावळीचा ' चंद्रराव  दौलतराव मरण पावल्यावर पश्चात त्याच्या पत्नीने दत्तक पुत्र घेऊन त्याची जहागिरीवर स्थापना केली. परंतु हि गोष्ट मुख्य सत्तेच्या संमतीविना --- विजापूरच्या परवानगी शिवाय --- घडल्याचे पत्रसारसंग्रहातील क्र. ५५७ च्या पत्रावरून लक्षात येते. हे तलबपत्र अफझलने कान्होजी जेध्यास पाठवले असून त्यात " चंद्रराऊ कदीम मयत जालियावरि गैर लोकी पैस करून बलकाविले आहे. याबद्दल त्यावरी नामजादी केली आहे " असा मजकूर आहे. या व इतर आणखी पत्रांवरून असे लक्षात येते कि, दौलतराव मोऱ्याच्या मृत्यूनंतर दरबारास न विचारता यशवंतरावाची गादीवर स्थापना केल्याबद्दल जावळीचा शक्य तितका भाग वा साधल्यास संपूर्ण जावळीच ताब्यात घेण्याचा अफझलचा विचार होता. याकरता त्याने मोऱ्यांच्या ताब्यातील जोहर खोरे कान्होजी जेध्यास मोकासा म्हणून देत त्यावर ताबा बसवण्याचा आदेश दिला. परंतु यानंतर हि स्वारी बहुतेक बारगळ्याचे दिसून येते.

    मात्र या व पुढील काही वर्षांत शहाजीच्या कैद प्रसंगामुळे शिवाजीला या राजकारणात कसल्याही प्रकारे थेट सहभाग घेता आला नाही. दरम्यानच्या काळात शिवाजीच्या पाठिंब्यावर गादीवर आलेला यशवंतराव शिवाजीस जुमानेसा झाला. प्रसंगी शिवाजीच्या प्रदेशातही घुसखोरी करण्यास त्याने मागे - पुढे पाहिले नाही. तेव्हा स. १६५६ च्या जानेवारीत शिवाजीने जावळीवर हल्ला करून मोऱ्यांना उखडून काढले व त्या वर्षाअखेरपर्यंत त्याने तो भाग आपल्या ताब्यात घेतला.

     हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता काही गोष्टींची स्पष्टता होते :- (१) कर्नाटक प्रांती गेलेला शहाजी तिथे आदिलशाहीचा राज्यविस्तार करत स्वतःचेही हितसंबंध प्रस्थापित करत होता. (२) त्याचवेळी इकडे शिवाजीच्या मार्फत आपल्या सत्तेची वाढ करत होता. जावळी प्रकरणी केलेला हस्तक्षेप याचेच एक उदाहरण आहे. इतिहासकार जरी यास शिवाजीचे कृत्य मानत असले तरी त्याकरता सबळ पुरावा नाही. उलट शहाजी हा आदिलशाहीतला महत्त्वाचा सरदार व एकेकाळच्या निजामशाहीचा सूत्रधार असल्याने जावळीकरांनी शिवाजीमार्फत वा थेट त्याच्याशीच संधान बांधल्याचा अंदाज करता येतो. अर्थात इतिहासकारांचे प्रचलित मत व माझे अनुमान केवळ तर्कावर आधारित असले तरी माझ्या अनुमानास बळकटी येण्याचे मुख्य कारण माझ्या मते, शहाजी व शिवाजीच्या तत्कालीन स्थितीत आहे.

    जावळी प्रकरणी शिवाजीने हस्तक्षेप केला असे म्हणताना तत्पूर्वी त्याने अशी कोणती कर्तबगारी, पराक्रम दाखवला होता ज्याआधारे जावळीकरांनी त्याचा आश्रय घ्यावा, हा प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे. त्याउलट शहाजीच्या पराक्रमाची पार्श्वभूमी सर्वज्ञात आहेच. शिवाय त्याचा पुण्याकडील प्रांत जावळीकरांना लागून असल्याने व स्वतः शहाजी विजापूरचा जबाबदार अधिकारी --- मोकासदार असल्याने दरबारात आणि व्यवहारात शहाजीला जेवढ स्थान, मान, अधिकार असणं स्वाभाविक होतं तितकं शिवाजीला नाही. या गोष्टी लक्षात घेता जावळी प्रकरणातला शिवाजीचा हस्तक्षेप शहाजीच्या आज्ञेनेच झाल्याचे दिसून येते.

    शहाजीच्या या कारवाया कितीही अंतस्थरीत्या सुरु असल्या तरी विजापूरचे राज्यकर्ते त्या न समजण्याइतपत दुधखुळे नव्हते. त्यांनी यावर तोडगा म्हणून प्रथम शहाजीच्या अटकेचा पर्याय चोखळला. त्यानंतर त्याची पुणे - कर्नाटक स्थित जहागीर ताब्यात घेण्याचा यत्न केला. पैकी, पहिला उपाय यशस्वी तर दुसरा अयशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी शहाजीला ओलीस धरत पुणे - कर्नाटकातील मजबूत स्थळे त्याच्या मुलांकडून घेत शहाजीची सशर्त सुटका केली. परंतु यावरच न थांबता कैदमुक्त शहाजीवर लक्ष ठेवण्यास शाह अजम हैदरशाहा व जैनाखान पीरजादेला नेमत जावळीच्या व पर्यायाने शिवाजीच्या उरावर अफझलखानास बसवले.

    कैदमुक्त झाल्यावर शहाजी - कान्होजी शपथक्रियेचा वृतांत अफझल वा विजापूरकरांना माहिती होता, नव्हता हे स्पष्ट करता येत नसले तरी वाईच्या परगण्याचा मोकासदार म्हणून अफझलची नियुक्ती होताच जोहर खोऱ्याची मोकासादारी देण्याचे आमिष दाखवत अफझलने प्रस्तावित जावळी स्वारीकरता कान्होजी जेध्यास चाकरीकरता येण्याची आज्ञा केली. कान्होजीचा वतनी मुलूख शिवाजी व जावळीकर मोऱ्यांच्या दरम्यान होता. कान्होजीला मोकासदार केल्यास या दोघांना नवीन प्रतिस्पर्धी उद्भवण्याचे भय घालता येत होते. कान्होजीची शहाजी निष्ठा दुभंग करता येत होती. अखेर कोणत्या वतनदाराला आपल्या सत्तेची वाढ नको असते ? तात्पर्य, कान्होजी प्रभूती वतनदारांना आपल्या पक्षात मिळवून घेत पुणे प्रांती जो उद्योग शहाजीने आरंभला होता त्याला खीळ घालण्याचे, शह देण्याचे अफझलचे धोरण यातून स्पष्टपणे दिसून येते.           

    यावरून शहाजी - विजापूरकरांतील सुप्त व प्रकट संघर्षाची कल्पना येते. म्हणजेच स. १६३६ मध्ये शहाजीने निजामशाहीची शरणागती दिली असली तरी आपल्या महत्त्वाकांक्षेला आवर घातला नव्हता. कैदमुक्त झाल्यावरही त्याने आपले प्रयत्न थांबवल्याचे दिसून येत नाही. कान्होजी जेधेला शिवाजीच्या मदतीकरता पाठवण्याचा हेतू जवळपास अफझल प्रमाणेच होता, याविषयी दुमत होऊ नये. त्याच्या दुर्दैवाने काही वर्षांपुरती का होईना जावळी व इतर प्रांतांतील हालचालींवर हैदरशाहा व जैनाखान --- पर्यायाने विजापूरकरांमुळे बंधनं आली परंतु हि बंधनं दूर होताच त्याने आपल्या धोरणात बदल करत एका स्थळाहून दोन्हीकडचं राजकारण चालवण्याऐवजी कर्नाटक प्रांत आपल्या हाती घेत पुण्याची जबाबदारी शिवाजीवर सोपवली. यामागे एक कारण संभवते व ते म्हणजे शहाजीच्या मोठ्या मुलाचा --- संभाजीचा कनकगिरी प्रसंगातला अपघाती मृत्यू. अर्थात, याविषयीही इतिहासकारांत मतभेद असून संभाजी स. १६५४ मध्ये मरण पावला तसेच स. १६६३ मध्ये मृत झाला असे दोन मतप्रवाह आढळतात. तूर्तास तरी आपणांस त्या वादात शिरण्याचे प्रयोजन नसल्याने त्याची चर्चा येथे करत नाही.
 
                                                                                                  ( क्रमशः )


ता. क. :- प्रस्तुत लेख पूर्ण होत असताना जदुनाथ सरकार कृत ' औरंगजेबाचा इतिहास ' ( मराठी अनुवाद ) मधील पृ. क्र. ४२३ वरील नोंदीनुसार चांभारगोंदा, अष्टी हे परगणे मोगल साम्राज्यात मोडत असल्याचे दिसून येते. (स. १६५७ )
चांभारगोंद्याचे पाटीलकी वतन बाबाजी भोसले --- शहाजीच्या आजोबाकडे असून इथेच मालोजीने मकरंदपुरा वसवत स. १५९७ पासून वास्तव्य केल्याचा उल्लेख ' शककर्ते शिवराय ' मध्ये विजय देशमुख करतात. तसेच डॉ. ब. प्र. सक्सेना लिखित ' दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास ' नुसार चांभारगोंदा, अष्टी हे महाल निजामशाहीची उभारणी केली तेव्हा शहाजीच्या ताब्यात होते.
यावरून स. १६३६ मध्ये झालेल्या मोगल - आदिल तसेच शहाजी - आदिल तहांत उपरोक्त वतन, महालाविषयी काय तरतूद करण्यात आली असावी अशी शंका मनात उद्भवते. सध्या तरी या प्रश्नाचा उलगडा करण्यास माझ्याकडे वेळ न् साधने नसल्याने हि माहिती इथे नोंदवत याविषयी अधिक माहिती संपादण्याची जबाबदारी मी अभ्यासू वाचकांवर सोपवत आहे.