Tuesday, October 28, 2014

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - ५ )


    बाजीरावाने आरंभी आढेवेढे घेऊन शेवटी निजाम - भोसल्यांचे करार पूर्ण करून दिल्यावर शिंद्यांच्या मागणीचा मुद्दा पुढे आला. महाडच्या करारनुसार त्याला अहमदनगरचा किल्ला व दहा लाखांची जहागीर पेशव्याकडून मिळणे अपेक्षित होते. शिंद्याची मागणी न्याय्य असल्याने ती पूर्ण करण्यासाठी नाना वा बाजीरावाने आढेवेढे घेतले नाहीत. मात्र, नगरचा किल्ला शिंद्याच्या ताब्यात देण्यापूर्वी नानाने आपला चुलतबंधू मोरोबा यांस तेथील बंदीवासातून बाहेर काढून रतनगडावर हलवले. मोरोबा फडणीस पहिल्या इंग्रज - मराठा युद्धांत दादाचा पक्षपाती बनल्याने जो कैदेत पडला तो अद्यापही तसाच होता. आपल्या बापाचा सहाय्यकर्ता या नात्याने त्याची मुक्तता व्हावी --- किमानपक्षी तो नगरच्या किल्ल्यातच राहावा यासाठी बाजीरावाने शक्य तितके प्रयत्न केले पण नानाने त्यांस जुमानले नाही. 

    नाना - बाजीरावाच्या ' शीतयुद्धात ' मराठी राज्याची हानी होऊ लागली होती. याकडे उभयतांचे सारखेच लक्ष असले तरी होणारी राज्याची अधोगती थांबवण्यापेक्षा ती अधिक वेगाने घडवून आणण्याचा जणू काही चंग बांधल्याप्रमाणे दोघेही यावेळी वागत होते. बाजीरावाच्या या काळातील वर्तनासंबंधी असे म्हणता येईल कि, जन्मतः राजकीय बंदीवासात तो वाढल्याने त्याला राज्यकारभाराची, राजकारणाची माहिती नसल्याने तो अनुभवातून शिकत होता. अर्थात, यामुळे व्हायच्या त्या मोठमोठ्या घोडचुका होत राहिल्या. पण नानाच्या कृत्यांचे समर्थन कसे करणार ? नाना अनुभवी, कर्तबगार असूनही धड तो बाजीरावाला गुंडाळून छातीठोकपणे सर्व सुत्रे, सत्ता हाती घेत नव्हता कि बाजीरावाच्या ऐवजी इतर कोणाला गादीवर अणायचाही यत्न करत नव्हता. उलट आपली फडणीशी कायम राहून वर कारभारीपद आपल्याकडेच कसे राहील याचीच त्याला चिंता लागून राहिल्याचे दिसते. परिणामी, बुद्धीसागर नानाचे बुद्धीसामर्थ्य मराठी राज्याला विनाशाच्या गर्तेकडे ढकलू लागले.

     तुकोजी होळकराचा मृत्यू :-  स. १७९७ मध्ये दि. १५ ऑगस्ट रोजी अव्वल पेशवाई पाहिलेला, अनुभवलेला, अटक - पानिपत मोहिमांत वावरलेला पराक्रमी सेनानी तुकोजी होळकर मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर होळकरांची सरदारी कोणास मिळावी यावरून त्याच्या दोन्ही मुलांत --- काशीराव व मल्हारराव यांच्यात --- तंटा निर्माण झाला. काशीराव हा थोरला असला तरी त्याचा एक हात व पाय जन्मतः अधू असल्याने लष्करी कामकाजा विषयी तो उपयुक्त नव्हता. दुसरा मुलगा मल्हारराव हा शूर, धाडसी व पराक्रमी असला तरी विवेकबुद्धी त्यांस नव्हती. त्यामुळे तुकोजी हयात असतानाच काशीरावास मुख्य सरदारी व मल्हाररावास लष्करी प्रमुखपद देण्याचा विचार चालला होता. परंतु असे विभक्त अधिकारपद मल्हार व काशीरावास नको असल्याने तुकोजीचा तोडगाच निकाली निघाला. मल्हाररावाने तर स्पष्ट सांगितले कि, ' तुमच्या माघारी जे होईल ते होईल. ' यामुळे तुकोजीच्या मृत्यूनंतर होळकरांच्या घरात भाऊबंदकी माजणार हे उघड होते व तसेच घडले. तुकोजीला काशी व मल्हार व्यतिरिक्त विठोजी व यशवंत हे दोन उपस्त्रीपासून झालेले पुत्र होते. हे दोघे मल्हारराव प्रमाणेच पराक्रमी व साहसी असून ते नेहमी मल्हाररावाच्या सोबतच राहत असत. तुकोजीच्या निधनानंतर आपणांस प्रमुख सरदारी मिळावी यासाठी मल्हाररावाने प्रयत्न आरंभले तर जेष्ठत्वाचा मुद्दा उचलून दौलतराव शिंद्याने काशीरावाचा पक्ष स्वीकारला. या भांडणात नाना फडणीसने सहेतुक प्रवेश करून शिंदे - होळकरांच्या वैराचा वन्हि अधिक चेतवला.

     मल्हारराव होळकरास शिंद्यांचा दगा :- काशीरावास तुकोजीची सरदारी मिळवून देण्यामागे दौलतरावाचा अंतस्थ हेतू होळकरांची सरदारी आपल्या अंकित करून घेण्याचा होता. मल्हाररावाने त्याचा हा डाव ओळखून काशीरावाच्या विरोधात बंडाचे निशाण उभारले. मल्हाररावाच्या या धडाडीने नानाच्या आकांक्षांना परत पालवी फुटली. वीस लाख रुपये, दहा लाखांची जहागीर व नगरचा किल्ला देऊनही दौलतराव उत्तरेत जात नाही पाहून त्याने दौलतरावाच्या नाकात काड्या घालण्यासाठी होळकर बंधूंना हातशी धरले. जवळचा पैसा त्यांना पुरवून लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी त्यांची मदत केली. परिणामी सात - आठ हजार सैन्यासह मल्हारराव हा आपल्या भावांच्या सोबत भांबुर्ड्याला तळ ठोकून राहिला. मल्हारराव काशीरावास जुमानत नाही वर छातीठोकपणे पुण्यातच स्वतंत्र छावणी ठोकून राहत असल्याचा राग दौलतरावास आला. त्याने काशीरावाकडे टोचणी लावली कि, ' मल्हाररावास पकडून कैदेत टाका ' परंतु फौजबंद मल्हाररावास पकडण्याची काशीरावाची कुवत नसल्याने त्याने ती जोखीम दौलतरावावर सोपवून याकामासाठी रोख रक्कम व काही गावे इनाम देण्याचे मान्य केले. आपल्या खजिन्याची व दौलतीची वृद्धी होण्याची संधी दवडेल तो दौलतराव कसला ? त्याने हि सुपारी स्वीकारली. प्रथम त्याने मल्हाररावास फौजेला रजा देऊन आपण सांगू त्याप्रमाणे राहण्याची सुचना केली. पण जो अहिल्याबाई, तुकोजी, नाना यांना जुमानला नाही तो मल्हारराव दौलतरावाचे काय ऐकणार ?  त्याने दौलतरावाची सुचना धुडकावून लावली. 

    तेव्हा दि. १४ सप्टेंबर १७९७ रोजी रात्री दौलतरावाची काही पलटणे एका बाजूने व दुसऱ्या बाजूने काशीरावाची पथके मल्हाररावाच्या गोटावर चालून गेली. परंतु हल्ल्याची कुणकुण आधीच लागलेली असल्याने सावध मल्हारराव मोर्चे बांधून झुंजाच्या तयारीत राहिला. परिणामी शिंद्यांनी हल्ल्याचा बेत रद्द केल्याची हूल उठवली. पहाटेपर्यंत शिंद्याच्या आक्रमणाची वाट बघत असलेला मल्हारराव पलटणे चालून आली नाहीत म्हटल्यावर मोर्चे सोडून छावणीत परतला. सकाळची आन्हिकं आटोपून डेऱ्याच्या पुढे तो बसला असताना महापराक्रमी दौलतराव शिंदयाची पलटणे चालून आली. बेसावध क्षणी छापा पडल्याने मल्हाररावाची फौज उधळली. खुद्द मल्हारराव मात्र आपल्या निवडक अनुयायांसह शस्त्रे उपसून युद्धात उतरला. त्याला शिंद्याचा अंमलदार मुजफरखानाने ठार केले. मल्हाररावाचे साथीदार लाख्या बारगीर, रविराव शिंदे लोणीकर इ. मारले गेले तर विठोजी व यशवंतराव जीव घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. मल्हाररावाचा मृतदेह काशीरावाने आपल्या ताब्यात घेतला तर मल्हाररावाचा कबिला यावेळी पुण्यात केसोपंत कुंट्यांच्या आश्रयास राहिला. दौलतरावाच्या या भीमपराक्रमाने पुणे दरबार हादरून गेला. नानाच्या पक्षाला तर मोठा धक्काच बसला. काशीरावाची सरदारी त्यावेळी पूर्णतः निर्वेध झाली असली तरी आता होळकरशाही शिंद्यांच्या अंकित झाल्याचे जाणत्यांच्या लक्षात आले.

    अमृतराव - बाजीरावात वैराची ठिणगी :- शिंद्यांच्या विरोधात मल्हारराव होळकरास फूस लावतानाच नानाने अमृतराव पेशव्यालाही चिथावणी देण्यास कमी केलं नाही. नानाच्या पाठिंब्यावर व पैशांच्या बळावर अमृतरावाने हुजुरातीवर नियंत्रण मिळवले. सरदारांची जूट आरंभली व बाजीरावाकडे थेट मागणी केली कि, ' प्रमुख कारभारीपद मला द्यावे. नानाने दुय्यम पद स्वीकारावे आणि शिंद्यांनी याउपर कारभारात हस्तक्षेप करू नये. ' अमृतरावाच्या या मागणीने बाजीराव धास्तावला. अमृतराव नानाच्या पाठींब्याने बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले. परंतु अमृतरावाची मागणी न्याय्य असल्याने त्यांस धुडकावून लावणेही त्याला शक्य नव्हते. तेव्हा त्याने हे प्रकरण तसेच लोंबकळत ठेवले. कारण, अमृतरावास कारभारीपद द्यावे तर त्याच्या मार्फत नाना शिंद्याला पुण्यातून बाहेर काढणार. कदाचित महाड प्रमाणे कारस्थान रचून आपली उचलबांगडीही करेल अशी त्यांस भीती होती. असो, या निमित्ताने अमृतराव आता त्याच्या शत्रूवर्गात मोडला जाऊ हे मात्र खरे !

    अमृतरावाच्या बाबतीत बाजीराव आणि नानाचा अंदाज बव्हंशी चुकला असे माझे मत आहे. आतापर्यंत अमृतराव रघुनाथरावाचा दत्तकपुत्र असल्याने त्याला राजकारणात जितक्यास तितके महत्त्व दिले जात होते. परंतु नानाच्या पाठबळाने त्याचे राजकीय वजन एकदम वाढून त्याच्या महत्वकांक्षांना पालवी फुटू लागली. आपले प्रस्थ वाढवण्यापुरता त्याने नानाचा आधार घेतला खरा पण मनापासून तो काही नानाचा स्नेही नसून शत्रू होता. अर्थात, नानाला याची कल्पना असली तरी ' कालच्या या पोरट्यांना आपण सहज उडवून लावू ' या भ्रमात बहुधा राहिल्याने त्याचा घात झाला. बाजीरावाला अमृतरावाच्या मनातील भाव कधीच ओळखता आला नाही. त्याला फक्त आपल्या प्राणप्रिय पेशवाईची काळजी असल्याने त्याच्या व पेशवेपदाच्या मध्ये जो कोणी येई त्यास तो वैरी मानी. अर्थात यांमुळे राज्याचे अतोनात नुकसान झाले. कारण या तिघांमध्ये --- म्हणजे नाना, अमृतराव व बाजीराव यांच्यात --- एक अमृतराव अपवाद केल्यास राज्याची पर्वा फारशी कोणाला असल्याचे दिसून येत नाही. नानापासून आपला बचाव करण्यासाठी बाजीरावाने दौलतरावास पुण्यात ठेवून घेतले. त्यामुळे पुण्यास त्याच्या लष्कराचा तर दरबारास त्याचा उपद्रव होऊ लागला. नाना तर शिंद्यांना दक्षिणेतून हाकलण्यासाठी निजामाच्या गळ्यात गळे घालू लागला होता. अशा परिस्थितीत स्वबळावर राज्य सांभाळू पाहणाऱ्या अमृतरावाची अयशस्वी झालेली धडपड प्रशंनीयच मानली पाहिजे.     

    नानाच्या शिंदेविरुद्ध कारवाया :- मल्हारराव होळकरास दौलातराव शिंद्याच्या विरोधात फूस लावतानाच नानाने निजामाकडेही आपले संधान बांधून ठेवले होते. प्रसंग पडला तर निजामाची फौज मदतीस घेऊन तिच्या बळावर दौलतरावास पुण्यातून बाहेर काढण्याचा त्याचा विचार होता. लष्कराच्या तयारीकरता नानाने निजामाला बऱ्यापैकी सांपत्तिक रसदही पुरवली. नानाच्या या हालचाली आता गुप्त राहिल्या नव्हत्या. नानाच्या राजकारणाचे रंग बाजीराव - दौलतरावने चांगलेच पाहिले होते. त्यांनी नानावर या निमित्ताने कारवाई करण्याचा विचार चालवला. 

    याच सुमारास महादजीच्या स्त्रियांचा व दौलतरावाचा बेबनाव होऊन त्यांच्यात सडकून वाकडे आले. दौलतराव हा महादजीच्या भावाचा --- पानिपत प्रसिद्ध तुकोजी शिंदेचा नातू. पोटी पुत्रसंतान नसल्याने त्याचा दौलतरावास पुढे - मागे दत्तक घेण्याचा विचार असल्याने त्याने दौलतरावास भावी वारसाच्या दृष्टीने वाढवले होते पण, असे असले तरी पुत्रप्राप्तीच्या आशेने प्रयत्न करणे महादजीने सोडले नव्हते. यातूनच त्याने मृत्यूपूर्वी एक - दोन वर्षे आधी त्याने स्वतःचे लग्नही उरकून घेतले. परंतु मृत्यूने त्याची पुत्रप्राप्तीची धडपड थांबवली. अर्थात, मरणापूर्वी त्याने दौलतरावास रीतसर दत्तक घेतले नव्हते ; परंतु इतर कोणी वारस नसल्याने व महादजीच्या परिवाराचा आपण योग्य तो परामर्श घेऊ असा दौलतरावाने शब्द दिल्याने त्यालाच वारस म्हणून महादजीच्या स्त्रियांनी मान्यता दिली. परंतु विलासी वृत्तीच्या दौलतरावाने तारुण्याचा व वासनेच्या भरात जवळच्या नात्यातील एका स्त्री सोबत संबंध प्रस्थापित केले. खासगीतील हा गुप्त प्रकार आरंभी कोणालाच समजला नाही. परंतु जेव्हा तो शिंद्यांच्या परिवारात सर्वांना समजला तेव्हा महादजीच्या स्त्रियांनी अशा दुर्वर्तनी दौलतरावास दौलतीवरून बेदखल करून त्याच्याऐवजी दुसरा इसम दत्तक घेण्यासाठी पेशव्याची परवानगी घेण्याचा बेत आखला. 

    महादजीच्या स्त्रियांच्या विषयी शिंदेशाही लष्करांत आदरयुक्त धाकचे वजन होते. महादजीच्या कित्येक सरदारांचा --- विशेषतः शेणवी गटाचा त्यांना पाठिंबा होता. हि गोष्ट लक्षात घेऊन नाना व अमृतराव त्यांना दौलतरावाच्या विरोधात चिथावणी देऊ लागले. त्यांच्या पाठबळावर महादजीच्या स्त्रिया दौलतरावच्या विरोधात उभ्या ठाकणार अशा बातम्या दौलतरावास कळल्या तेव्हा याउपर नानाची उपेक्षा केल्यास आपल्याला सरदारीस मुकावे लागेल याची त्यांस कल्पना येउन चुकली. एकतर नानाचा पक्ष घेणे वा त्यांस कैद करणे हेच दोन पर्याय त्याच्यासमोर होते. याबद्दल तो निश्चित काही धोरण आखणार तोच त्याच्या सैन्यात बेदिली माजू लागली. फौजेच्या खर्चासाठी दौलतरावाने जो काही पैसा आजवर बाजीराव - नानाकडून उकळला होता तो त्याने सर्वच्यासर्व लष्कराच्या देण्यासाठी वापरला नव्हता. परिणामी पगारासाठी फौज अनावर होऊ लागली. आपल्यासमोरील कोंडी फोडण्यासाठी दौलतरावाने बाजीरावास कोड्यात टाकले. ' ठरल्याप्रमाणे आम्हांला तुम्ही दोन कोटी रुपये द्या. अन्यथा नानाच्या ताब्यात तुम्हांला देऊन आम्ही हिंदुस्थानात जातो. ' अशा आशयाचा निरोप शिंद्याने पेशव्याला पाठवला. यांमुळे बाजीराव अडचणीत सापडला. शिंदयाची मागणी पूर्ण करण्याची ताकद पेशव्याच्या खासगी तसेच सरकारी खजिन्यात नव्हती. 

    नाना फडणीस कैदेत :- नानाचे महाड कारस्थान सिद्धीस जाऊ बाजीराव पेशवा बनला तेव्हाच सरकारी खजिना जवळपास रिता असल्याचे त्यास समजले. तेव्हा द्रव्यप्राप्तीसाठी त्याने पुणे शहरात (१) कर्जपट्टी (२) सरंजामपट्टी (३) वेतनपट्टी (४) सावकारपट्टी (५) उंबरेपट्टी (६) भाडेपट्टी (७) संतोषपट्टी हे नवीन ७ कर लागू केले. बाजीरावाचे डोकं इतकं सुपीक कि पहिल्या सहा पट्ट्या जर कोणी चुकवल्या तरी सातवी त्यांस चुकवता येऊ नये ! काय होती हि संतोषपट्टी ? तर बाजीराव पेशवा बनल्याबद्दल प्रत्येकास आनंद झाला त्याबद्दलचा हा कर ! पण यातून वसूल ते काय होणार ? जे झाले त्यातून पेशव्याचा खर्च, दक्षिणा समारंभ इ. गोष्टी उरकण्यात येऊ लागल्या. बाळोबातात्याच्या कटात सहभागी होऊन परशुरामभाऊ पटवर्धनाने चिमणाजीस पेशवा केले, या गुन्ह्याबद्दल बाजीरावाने सखाराम घाटग्यामार्फत पटवर्धनांच्या मालमत्तेच्या जप्तीचा उपक्रम चालवला. त्यातून काही आर्थिक फायदा करून घेण्याचा बाजीरावाचा मानस होता. मिळून हवं ते ओरबडून घेण्याच्या वृत्तीस / नीतीस अनुसरून बाजीरावाचा कारभार सुरु झाला होता. अशा कारभारातून त्यांस आर्थिक फायदा तो काय होणार हे दिसतच होते ! अशा परिस्थितीत दौलतरावाची मागणी मान्य करण्यास त्याने असमर्थता व्यक्त केली. पेशव्याने हात वर केल्याने दौलतरावासमोर आता कसलाच पर्याय उरला नाही. बलवान नानाच्या तंत्राने कायम राहण्यापेक्षा दुबळ्या बाजीरावास हाताशी धरून नानाला ठिकाणी बसवण्यातच आपला निभाव असल्याचे त्याने ताडले व त्या दृष्टीने तो आपले डाव रचू लागला. 

     त्यानुसार एकीकडे फौजेचा खर्च देण्यासाठी ताबडतोब कबूल केल्याप्रमाणे रकमेचा भरणा करा नाहीतर मला दुसरा विचार करावा लागेल अशी टोचणी दौलतराव पेशव्यास लावू लागला व दुसरीकडे घाटग्यामार्फत नाना व त्याच्या पक्षातील मंडळींना कैद करून त्यांचे द्रव्य सरकारांत घेण्याची आज्ञा पेशव्याकडून मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. आरंभी बाजीराव कोणत्याच गोष्टीला अनुकूल होईना पण शिंदे निकरावर आल्याने त्याने घाटग्याच्या मागणीला मंजुरी दिली. यामागे त्याचे संधीसाधू वा ' आली वेळ मारून नेण्याचे ' राजकारण कारणीभूत असले तरी नानाचे उपद्व्यापही त्यांस कमी कारणीभूत नाहीत. आधी सांगितल्याप्रमाणे नानाने ज्या काही राजकीय उलाढाली अलीकडे चालवल्या होत्या त्यामुळे त्याच्यावर कोणाचाच विश्वास राहिलेला नव्हता. नानाला पकडण्याचा बाजीरावाचा लेखी हुकूम मिळताच दौलतराव - सखारामची टाळकी नानाला पकडण्याचा डाव रचण्यात खपू लागली.

     युद्धप्रसंग करून नानाला ताब्यात घेणे तितकेसं सोपं नव्हतं. लढाईत गर्दीचा फायदा घेऊन नाना निसटून गेला व त्याला निजाम, भोसले वा इंग्रजांनी आश्रय दिला तर प्रकरण जड जाईल याची त्यांना कल्पना होती. तेव्हा विश्वासघाताने त्यांस पकडण्याचे निश्चित करण्यात आले व त्याकामी शिंद्यांचा एक युरोपियन अंमलदार Michale Philose उर्फ मुकीर साहेबाची मदत घेण्यात आली. युरोपियन लोकांच्या वचनावर नानाचा विश्वास असल्याचे सर्वांना माहिती होते. त्याच्या याच विश्वासाचा फायदा उचलण्याचे शिंदे - घाटगे जोडीने ठरवले. त्यानुसार दि. ३१ डिसेंबर १७९७ रोजी नानाला शिंद्याच्या गोटात भेटीस येण्याचे आमंत्रण पाठवण्यात आले. या भेटीत दगा होणार नाही यासाठी मुकीर साहेब जामीन राहिला व जर शिंद्याने काही वेडंवाकडा प्रकार केला तर ' आपल्या लष्करी तुकडीसह त्याची नोकरी सोडून आपण नानाच्या रक्षणास्तव उभे राहू ' अशी त्याने शपथ घेतली. नानाने अधिक खात्री करून घेण्यासाठी त्याला बायबलवर हात ठेवून शपथक्रिया करण्यास भाग पाडले व मुकीरने देखील त्याचा हा हट्ट पुरवला. तेव्हा कुठे निर्धास्त मनाने नाना शिंद्याच्या गोटात गेला व तिथे जाताच योग्य संधी पाहून मुकीरने नाना आणि त्याच्या साथीदारांना --- आबा शेलूकर, बजाबा शिरोळकर, नारायणराव वैद्य इ. ना कैद केले. दौलतरावाने नानाला पकडताच लगोलग बाजीरावाने बाबा फडके, नारोपंत चक्रदेव, गोविंदराव काळे, गोविंदराव पिंगळे या नानाच्या समर्थकांना शनिवारवाड्यात बोलावून कैदेत टाकले.     

                                                                                     ( क्रमशः )

Monday, October 20, 2014

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - ४ )


    बाजीराव पेशवा बनला. नानाकडे कारभारीपद आले पण राज्यकारभाराचे गाडे काही सुरळीतपणे चालेना. खराडीच्या लष्करी छावणीतून बाजीराव शनिवारवाड्यात आला खरा पण आल्याबरोबर त्याने वाड्याभोवतीचे नानाने नियुक्त केलेले हुजुरातीचे जुने पहारेकरी काढून त्यांच्या जागी नवीन लोकं व शिंद्याची पथके उभी केली. याचा योग्य तो अर्थ घेऊन नानाने पेशव्याच्या भेटीला जाण्याचे बंद करून आपल्या वाड्याभोवती अरबांची पलटणे तैनात केली. दोन्ही बाजूंची मंडळी रात्रंदिवस लढाईच्या पवित्र्यात उभी राहू लागली. इकडे महाडचे कारस्थान फळास येऊन बाजीराव - नानाच्या मनोकामना पूर्ण झाल्या पण शिंद्याला मात्र अजून हवा तसा मदतीचा मोबदला मिळाला नव्हता. त्यासाठी त्याने नानाच्या पाठीमागे लकडा लावला. परंतु, नानाने करारातील शब्दांकडे बोट दाखवत, " करार केल्याप्रमाणे पैसे देईन. परंतु ठरल्याप्रमाणे पुण्यातून जांबगावी पोहोचल्यावर ५० लक्ष व गोदावरी पार केल्यावर उर्वरित ५० लाख देण्यात येतील. तोवर एक छदामही देणार नाही. " अशा आशयाचे उत्तर दिले. त्यामुळे शिंदे भडकला. महाडचे कारस्थान रचताना नानाने प्रथमच एक काळजी घेतली होती व ती म्हणजे शिंद्याची लष्करी मदत घेऊन आपले आसन बळकट करायचे व त्याला त्वरित उत्तरेत पाठवून द्यायचे. जर तो दक्षिणेतच पाय मुरगाळून बसला तर आपल्याला त्याच्याकडून कधीही दगा होऊ शकतो. त्यामुळे मूळ करारातच नानाने अशा अटी घातल्या कि, पैशांच्या प्राप्तीसाठी का होईना शिंदे पुण्यातून बाहेर पडेल. परंतु, शाब्दिकदृष्ट्या नानाची बाजू कितीही बरोबर असली तरी दौलतराव त्याचे काही एक ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हता. स. १७९२ पासून ९६ - ९७ पर्यंत जवळपास चार - पाच वर्षे शिंदेशाही फौजा पुण्याच्या आसपास तळ ठोकून होत्या. आरंभी महादजीसोबत आलेली फौज तशी जुजुबी होती. परंतु खर्ड्याच्या संग्रामासाठी आणलेली बरीचशी फौज परत उत्तरेत गेली नव्हती. ती व आधीची मिळून सुमारे ५० हजार सैन्याचा खर्च चालवण्याची दौलतरावाची ऐपत व ताकद असली तरी इच्छा नव्हती. स्वतःच्या खजिन्याला तोशीस न पडता परस्पर खर्च निघत असेल तर त्यांस ते हवेच होते. त्यामुळे त्याने पैशांसाठी नानाकडे तगादा लावणे स्वाभाविकच होते. नाना दौलतरावस ओळखून असला तरी त्यालाही फारसे ताणून धरणे शक्य नव्हते. कशाही प्रकारे त्याला दौलतरावाची ब्याद पुण्यातून बाहेर काढायची असल्याने त्याने वीस लाख रुपयांचा तुकडा दौलतरावाच्या तोंडावर फेकला. नानाला वाटले, पैसे मिळाल्यावर शिंदे पुण्यातून हलेल. पण कसचे काय ? शिंदे तर पुण्यातच फतकल मारून बसला.  

    नाना - बाजीराव कराराची यादी :-  याच सुमारास नानाने आपल्या काही प्रमुख मागण्यांची यादी बाजीरावाकडे पाठवली. ती येथे समग्र देतो :-
 
    सेवेसी विज्ञापना ऐसीजे, स्वामींची कृपा मजवर. माझे लक्ष स्वामींपाशी, हे कित्येकास असह्य होऊन त्यांनी राज्यात बखेडा करून आचरु नये ते कर्म स्वामींशीं अमर्यादेचे आचारिले. मी महाडास राहून राजकारणे वगैरे करून राजश्री दौलतराव शिंदे व सेवकाने करावयाचे ते करून, स्वामींचे पुण्य मदत होऊन, सर्व गोष्टी मनोदयानुरूप घडल्या. येणेकरून सेवकास कृतकृत्यता झाली. पुढे सेवा करावी अशी शरीरात ताकद व शक्ती राहिली नाही. यास्तव मागणे हेच की, कृपा करून स्वस्थ स्नानसंध्या करून स्वामींस अभीष्ट चिंतून राहण्याविषयी आज्ञा व येविषयी करार करून देण्याची कलमे ---
(१) दत्तपुत्र घेणेची आज्ञा आहे, त्याप्रमाणे घेणेत येईल. त्याचे हातून पूर्ववतप्रमाणे फडनिशीचे दरकाचे वगैरे काम घेऊन लोभाने सरंजाम वगैरे चालत आल्याप्रमाणे चालवावा. किल्ले लोहगड सरकारांतून व किल्ले केळजा पंत सचिवांकडून आहे, त्याप्रमाणे असावे. माझेविषयी चित्तांत संशय नसावा. कोणी घालू लागल्यास ठेवू नये. 

( श्रीमंतांची मखलाशी ) - येणेप्रमाणे करार    

(२) पहिला सरंजाम स्वारांचा आहे. हल्ली हजार गारदी यांचा जाजती देऊन जेथे राहणे होईल तेथे त्यांनी चौकी पहाऱ्यास असावे. याची परवानगी. 
( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार 

(३) परभारा गाव जहागीर मिळवली त्यापैकी सरकारात घेऊन सरकारांतून पंचवीस हजारांचे गाव सोईचे इनाम करून द्यावे. कै. राव यांनी कृपा करून सर्फराज केले तसे चालवावे.
( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार 

(४) श्रीकाशीस जावयाचा बेत आहे. यास्तव इंग्रजांस सरकारची पत्रे व दौलतराव शिंदे यांची पत्रे द्यावी की, संतोषाने निरोप दिला. संतोषाने येथे राहतील. हरएकविशी साहित्य करीत जावे. 
( या कलमावर श्रीमंतांची मखलाशी नाही. ) 

(५) राजकारणसंबंधे शिंदे, नवाब व भोसले व पन्हाळेकर वगैरे जागा करार व वचने गुंतली त्याच्या तोडी व्हाव्या. राजकारणात ज्याचा जसा उपयोग पडला असेल त्याप्रमाणे तोड पडावी. 
( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार 

(६) सरकारचे कामात मसलत करून कारणासंबंधे खर्च झाला तो सरकारातून उगवे असे व्हावे. 
( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार 

(७) हरिपंत फडके यांनी राज्यात सेवा केली. त्यांचे पुत्रांचे चालवावे. 
( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार 

(८) महाडास सोबत दिली. ते समयी त्यांस वचने दिली आहेत. आबाजी कृष्ण शेलूकर, दादा गद्रे, बजाबा शिरवळकर, धोंडोपंत नित्सुरे मिळून चार. सदरहू मिळोन दोन हजार स्वारांचा सरंजाम सरकारातून देऊन सेवा घ्यावी. 
( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार

(९) दादा गद्रे व आबाजी कृष्ण शेलूकर यांजकडे वसई सरसुभा व किल्ले रायगड व अहमदाबादचा सुभा व पागा सरकारांतून आहे, त्याप्रमाणे चालवावे. तेही एकनिष्ठपणे सेवा करतील. 

( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार

(१०) धोंडोपंत नित्सुरे यांनी सेवा चांगली केली. यास्तव विसापूरचे काम त्यांस सांगावे. 

( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार

(११) राघो विश्वनाथ गोडबोले यांजकडे सरकारांतून तोफखाना व चार हजार गाडदी यांचे काम होते. त्यास हल्ली हजार गाडद्यांचा रिसाला सांगून बंदोबस्त करून देणेची आज्ञा व्हावी. 

( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार

(१२) स्वराज्य व परराज्य यांशी करार व तहनामे आहेत त्याप्रमाणे चाल असावी. मोठी मसलत पडेल त्यास बरोबरीचे सरदार शिंदे, होळकर वगैरे यांचे सल्ल्याने चांगले ते होत असावे. 

( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार

(१३) नारोपंत चक्रदेव व गोविंदराव पिंगळे यांनी श्रमसाहस करून सेवा केली. त्यांस सर्फराज करून पुढे बंदोबस्त स्वरूप वाढवून व्हावा. 

( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार

एकूण कलमे ( तेरा पैकी काशीस जाण्याचे कलम खेरीजकरून बाकी ) बारा.
                                                     ( दि. १ जानेवारी १७९७ )


[ संदर्भ ग्रंथ :- नाना फडनवीस यांचे चरित्र.  लेखक :- वा. वा. खरे ]   
 

    विश्लेषण :-  बाजीरावाने नानाच्या १३ मागण्यांपैकी १२ मान्य केल्या पण त्याची काशीयात्रेची अट मात्र अमान्य केली. बाजीरावाच्या या कृत्याने मराठीतील मोठमोठे इतिहासकारही बुचकळ्यात पडले व त्यांनी पेशव्याच्या या कृतीचा अर्थ --- बाजीरावाला नानाचा सर्वस्वी नाश करायचा होता असा काढला. सोयीस्कर निष्कर्ष काढण्यात आपल्या इतिहासकारांचा हात जगात कोणी धरू शकत नाही ! जर बाजीरावाला नानाचा नाशच करायचा होता तर त्याने त्याच्या १२ मागण्या तरी मान्य का केल्या असत्या असा साधा प्रश्नदेखील यांना पडू नये ? नानाला जर खरोखरच राजकारणातून निवृत्ती घेऊन काशीवास करायचा होता तर त्याने कारभारीपदाची वस्त्रे का घेतली याचाही विचार करू नये ? नानाचे पक्षपाती इतिहासकार त्यांना अडचणीचे मुद्दे कसे नजरेआड करतात याचे हे एक समर्पक उदाहरण आहे. असो, आपण या ठिकाणी नानाची काशीयात्रेची मागणी बाजीरावाने का नाकारली या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. 

    नानाच्या १३ मागण्यांपैकी त्याच्या स्वतःकरता असलेल्या ६ कलमांपैकी ५ कलमे प्रथम आपण विचारात घेऊ. नाना यावेळी ५४ - ५५ वर्षांचा असून त्याला पुत्रसंतान नसल्याने वंश सातत्यासाठी त्यांस दत्तक पुत्र घ्यायचा होता. आपले पद, अधिकार आपल्या दत्तक पुत्रास मिळावेत अशी त्याची इच्छा होती. बाजीरावाने त्यांस संमती दिली. पण नानाच्या मुलाला नानाचा अधिकार मिळणार कधी ? तर नानाने स्वखुशीने निवृत्ती घेतली तर वा त्याचा मृत्यू झाला तर ! पैकी निवृत्ती कधी घेणार याविषयी नानाने या ठिकाणी अजिबात उल्लेख केला नाही. असो, नानाला सरकारातून जे किल्ले व सरंजाम मिळाले होते ते तसेच पुढे कायम चालवायचे देखील बाजीरावाने मान्य केले. हजार जादा गारद्यांचा सरंजाम देण्याची व नाना जिथे राहील तिथे त्यांनी चाकरी करण्याची मागणीही पेशव्याने मान्य केली. नानाला परदरबारातून जी गावं जहागीरीदाखल मिळाली होती त्यांपैकी पंचवीस हजार उत्पन्नाची गावं त्यांस सोईची अशी हवी होती. तेव्हा परदरबारातून मिळालेली गावं सरकारांत घेऊन बदल्यात नानाला सोईची पडतील अशा ठिकाणी गावं जहागिरीदाखल द्यावीत. नानाची हि अट चमत्कारिक असली तरी मान्य करण्यात आली. तसेच आजवर राजकारणं करताना नानाने जो काही पदरचा पैसा खर्च केला असेल तो देखील परत देण्याचे बाजीरावाने कबूल केले. त्याशिवाय नानाच्या पक्षपात्यांचे सरंजाम व पदे कायम ठेवून त्यांच्याकडून सेवा घेण्याचेही बाजीरावाने मान्य केले. या सर्व पार्श्वभूमीवर नानाच्या काशीयात्रेचा मुद्दा बाजीरावाने अमान्य करावा यात विशेष नवल ते काय ?

    नाना निवृत्त कधी होणार ते निश्चित नाही. नानाला दत्तक पुत्र घेण्याची परवानगी देऊन त्यांस फडणीशी द्यायची. नानाच्या सोईच्या ठिकाणी जहागीरीची गावं नेमून द्यायची. नानाच्या ताब्यातील किल्ले तसेच ठेवायचे. आणि एवढे करून वर नानाला काशी येथे राहण्यासाठी इंग्रजांनी परवानगी द्यावी यासाठी बाजीराव - शिंद्याने इंग्रजांना पत्रे द्यायची होती. म्हणजे नाना निवृत्त होऊन काशीला जाणार. त्याच्या ताब्यातील किल्ले त्याच्या मुलाच्या --- म्हणजे त्याच्याच ताब्यात राहणार. नानाचे सहाय्यक महत्वाच्या पदांवर कार्यरत राहणार. नानाच्या सोयीच्या जागी म्हणजे नाना राहणार तिथे त्याला २५ हजार उत्पन्नाची गावं जहागिरीदाखल द्यायची. याचा अर्थ नानाला स्वतंत्र राज्य वा संस्थान तोडून देण्यासारखं होतं. नानाच्या या मागण्या आणि इंग्रजांच्या वसई तहातील अटी यांच्यात तसा फारसा फरक दिसत नाही. नानाच्या या मागण्या बाजीरावाने मान्य केल्या असत्या तर नानाचे स्वतंत्र एक असे सत्ताकेंद्र पेशव्याच्या डोक्यावर निर्माण होऊन त्याने पेशव्याला आपल्या मनाप्रमाणे नाचवले असते. माझ्या मते यांमुळेच बाजीरावाने नानाची काशीयात्रा अट अमान्य केली.

    महाडच्या कारस्थानात ठरल्याप्रमाणे बाजीरावाने कबूल केलेले करार अंमलात आणावेत यासाठी निजाम - भोसले नानावर दडपण आणू लागेल. निजाम - भोसल्यांची मागणी नानाने बाजीरावास कळवली असता हे करार पाळण्यास आपण बांधील नसल्याचे बाजीरावाने स्पष्ट केले. अर्थात, यांमुळे नानाची पत कायम राहून उलट बाजीरावाविषयी इतरांच्या मनात अविश्वास निर्माण झाला. याविषयी कित्येक इतिहासकारांनी वचनभंगाबद्दल बाजीरावस सडकून दोष दिला आहे. केलेले करार न पाळण्याची ख्याती असलेल्या निजामाकरता इतिहासकारांनी बाजीरावास दोष देणे थोडे विचित्र वाटते. पण हा मुद्दा बाजूला ठेवू. निजामाबरोबर केलेले करार जसेच्या तसे पाळले गेले असते तर खर्ड्याच्या प्रकरणाने निजामाचे घसरलेले राजकीय वजन पुन्हा वाढले असते. खेरीज या कृत्याने निजामाचा पेशव्यावर नैतिक दाब बसला असता तो वेगळाच. दुसरे असे कि, निजामाने केलेल्या मदतीचा त्वरित मोबदला देण्याचे नाकारून बाजीरावाने आपली विश्वासर्हता गमावली असे आपण समजत असलो तरी त्यावेळचे राज्यकर्ते किंवा खुद्द निजाम तसे समजत होता असे दिसून येत नाही. 

 
    भोसल्यांच्या बाबतीत देखील असेच म्हणावे लागेल. नागपूरकर भोसल्यांचा व पेशव्याचा सख्यभाव थोरल्या बाजीरावापासून जगजाहीर होता. पेशव्यांच्या वा छत्रपतींच्या स्वारीत भोसले कधी मनापासून सामील झाले असे घडले नाही. उलट प्रसंग पडताच त्यांनी मराठी राज्याच्या शत्रूंशी त्यांनी हातमिळवणी केल्याची उदाहरणे ढीगभर आढळतात. त्यामुळे भोसल्यांचीही मागणी तडकाफडकी मान्य न करता काही काळ वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारण्याचा बाजीरावाचा विचार असावा. पण बाजीरावाचे हे धडपडत राज्यकारभार, राजकारण शिकणे म्हणजे ऐन युद्धात तलवारीचे हात शिकण्यासारखे होते. याचा व्हायचा तो परिणाम राज्यकारभारावर झाला. होऊ लागला.

 
    नानाने दिलेला शब्द पाळण्याचे पेशवा नाकारू लागताच चिडलेल्या मशीरने हैद्राबादेस प्रस्थान ठेवले व तिकडून पुण्यावर स्वारी करण्यासाठी लष्कर पाठवण्याची सुचनाही त्याने केली. त्यानुसार निजामाच्या फौजा व मुसा रेमूच्या हाताखालील कवायती पलटणे सरहद्दीवर गोळा होऊ लागली. इकडे नागपूरकरांचीही वीस हजारांची सेना माहूरजवळ आली. लष्करी कारवाईचा धाक दाखवून निजाम - भोसले आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा डाव खेळत असल्याचे पाहून शिंद्याने उत्तरेतून अंबाजी इंगळ्याची फौज व एक कवायती कंपू दक्षिणेत बोलावला. मिळून पुण्याच्या आसपास लढाई जुंपणार असा रंग दिसू लागला. तेव्हा बाजीरावाने माघार घेऊन नानाच्या मार्फत निजाम - भोसल्यांची समजूत काढून त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. पण तिथेही त्याने आपला शह राखला. निजामाला बत्तीस ऐवजी चोवीस लाखांचा मुलुख व दोन कोट रुपयांऐवजी दीड कोटींची माफी देऊन आपला चौथाईचा अधिकार शाबूत राखला. याला नादानपणा कसा म्हणायचा ? ( स. १७९७ )

                                    
                                                                                    ( क्रमशः )

Saturday, October 18, 2014

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - ३ )


    महाड येथे बसून नानाने प्रथम बाजीरावासोबत आपले संधान बांधले. बाळोबा - भाऊच्या हातून कारभार काढायचा तर गादीवरील पेशवा आपल्या पक्षाचा हवा हे नानास ठाऊक होते. भाऊ व शिंद्याकडून पोळला गेलेला बाजीराव यावेळी सहज आपल्या गळाला लागेल अशी त्याची अटकळ होती व तसेच घडले. बाजीराव त्यांस अनुकूल होताच, कारस्थान सिद्धीस नेण्याकरिता परदरबारांशी आपण जे करार करू त्यांस पेशवेपदी
विराजमान झाल्यावर बाजीरावाने मान्यता द्यावी अशी नानाने प्रथमच अट घातली. बाजीरावास काय, यावेळी पेशवेपद मिळण्याशी मतलब ! तेव्हा त्याने ' हो ' ला ' हो ' म्हणून वेळ मारून नेली. बाजीरावाशी संधान जुळताच नानाने निजामाशी सुत जुळवले. खर्ड्याच्या तहातील सांपत्तिक व प्रादेशिक दंडाची अट आपण सोडून देऊ, बदल्यात बाजीरावास पेशवेपद व आपणांस कारभारीपद मिळवून देण्याच्या मसलतीत
निजामाने शरीक व्हावे अशी नानाने मागणी केली. हि मागणी निजाम काय म्हणून नाकारेल ? त्याने लगेच त्यांस मान्यता दिली. निजामापाठोपाठ नानाने नागपूरकर भोसल्यांकडे आपला मोर्चा वळवला. खर्ड्याच्या तहात भोसल्यांना जो कागदावर गढे मंडळचा प्रांत मिळाला होता त्याचा ताबा अजून त्यांना देण्यात आला नव्हता.त्याची लालूच दाखवून नानाने भोसल्यांना आपल्या पक्षात मिळवून घेतले. भोसले - निजाम आपल्या गोटात दाखल होताच नानाने इंग्रजांशी बोलणी आरंभली.

    आपणांस कारभारीपद मिळावे यासाठी इंग्रजांनी मदत करावी अशी नानाने मागणी केली खरी, पण त्याबदल्यात इंग्रजांना काही देण्याचे त्याने मान्य केले नाही वा त्यांना लालूचही दाखवली नाही. अर्थात, इंग्रजही मोठे वस्ताद ! त्यांनी नाना आपल्या आश्रयास येणार असल्याची बातमी उठवली. नानाच्या मुक्कामासाठी साष्टीच्या किल्ल्यात व्यवस्था केली जाऊ लागली. दिल्लीवर शिंद्यांचा ताबा असल्याने दिल्ली
जिंकण्यासाठी कलकत्ता, लखनौ, मुंबई येथे पलटणे गोळा होऊ लागली. वास्तविक, याबाबतीत इंग्रजांचे धोरण प्रत्यक्ष कृतीपेक्षा राजकीय दबावाचेच अधिक होते. यावेळी त्यांचा हिंदुस्थानातील गव्हर्नर जनरल सर जॉन शोअर असून त्याला यावेळी युद्धाची भानगड अजिबात नको होती. कारण, युद्धासारखी खर्चिक बाब अंगावर न घेण्याची त्यांस कंपनीच्या चालकांची ताकीद असल्याने व खुद्द त्याला देखील हि दगदग नको असल्याने निव्वळ कागदी घोडे नाचवण्याचा उपक्रम त्याने स्वीकारला. खेरीज, नानावर त्याचा देखील जितक्यास तितकाच विश्वास होता ! असो, स्वपक्षाची जुट बनवत असताना नानाने प्रतिपक्षात फूट पाडण्याचाही उपक्रम चालवला.

    पटवर्धन भावबंदांत त्याने यशस्वीपणे तेढ निर्माण केली. अर्थात आधीच पटवर्धन मंडळींत मतभेद असल्याने नानाचा हा डाव सहज सिद्धीस गेला हा भाग वेगळा ! खेरीज परशुरामभाऊस पुण्यातून बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरकरा छत्रपतींना त्याने भाऊच्या जहागिरीवर हल्ला चढवण्याची फूस व आर्थिक मदतही देऊ केली. यावेळी छत्रपतींनी नानाला सरळ विचारले कि, ' आज भाऊ व तुमच्यात विरुद्ध आहे. परंतु उद्या तुम्ही एकत्र आल्यावर भाऊ आमच्यावर स्वारी केल्याखेरीज राहणार नाही. त्यावेळी तुम्ही आमचे संरक्षण करणार कि नाही ? ' नानाने यासमयी, भाऊने भविष्यात करवीरकरांवर स्वारी केल्यास कोल्हापूरकरांचे रक्षण करण्याची हमी घेतली. त्यामुळे छत्रपती निःशंक झाले. भाऊचा बंदोबस्त करून नानाने दौलतराव - बाळोबाकडे आपले लक्ष वळवले. बाळोबा हा शेणवी असून शिंदे दरबारात नाही म्हटले तरी शेणवी गटाविरुद्ध काही मंडळींच्या मनात द्वेष होताच. नानाने त्या द्वेषास खतपाणी घातले. परिणामी शिंद्याच्या एकसंध लष्करांत फाटाफूट होऊ लागली. शेणवी विरोधी गटाने दौलतरावाचे कान भरण्यास आरंभ केला. ' शेणवी मंडळींच्या नादी लागून तुम्ही आपल्या सरदारकीचा विध्वंस करत आहात. नानाच्या पक्षाला निजाम, भोसले, इंग्रज सामील असल्याने त्याच्याशी वैर घेणे योग्य नाही.' असे त्यांस सांगू लागले. त्याशिवाय महादजीची केशरी म्हणून उपस्त्री होती. तिच्याही मार्फत नानाने दौलतरावास आपल्या पक्षास मिळवून घेण्याची खटपट केली. परिणामी, दौलतरावाचा कल बाळोबाच्या विरोधात नानाच्या पक्षाकडे झुकू लागला. दौलतरावास पक्के बांधून घेण्यासाठी नानाने त्यांस एक कोट रोख, अहमदनगरचा किल्ला व दहा लक्षांच्या जहागिरीचे आमिष दाखवले. झालं. दौलतरावाची स्वारी पूर्णतः विरघळली व त्याने नानाच्या पारड्यात आपले दान टाकले.    

    नाना फडणीस महाडात बसून एवढे मोठे कारस्थान उभारत होता त्याची परशुराम व बाळोबा जोडीस कल्पना आली नाही असे नाही. नाना निजामाच्या गळ्यात गळे घालतोय म्हटल्यावर भाऊने पुण्यास नजरकैदेत असलेल्या निजामाच्या कारभाऱ्याकडे --- मशीरकडे वाटाघाट आरंभली. मशीरला नानाने खर्ड्याच्या युद्धात राजकीय कैदी म्हणून ताब्यात घेतल्याने त्याच्या मनी नानाविषयी आकस असणार हे गृहीत धरून भाऊने त्यांस कैदेतून मुक्त करण्याची लालूच दाखवली. बदल्यात निजामाला आपल्या पक्षास पाठिंबा देण्यास्तव तयार करण्याची जबाबदारी त्याने मशीरवर सोपवली. वास्तविक भाऊचे हे कृत्य त्याच्या राजकीय अपरिपक्वतेचे उदाहरण समजले पाहिजे. जिथे मशीरचा धनीच --- निजाम नानाला अनुकूल झाला तिथे मशीर भाऊला मिळाला न मिळाला दोन्ही सारखेच ! इकडे नाना - मशीरचे सुत आधीच जुळाले होते. नानाने निजामापाठोपाठ मशीरला आपल्या घोळत घेतले. मशीरने पण आपल्या स्वार्थावर जास्त लक्ष दिले व भाऊच्या पक्षात वरकरणी सामील झाला. भाऊने मशीरची कैदेतून सुटका करताच त्याने पुण्यातच स्वतंत्र तळ ठोकून नानाविरुद्ध लष्करी कारवाईत सहभागी होण्यासाठी लष्कर भरतीचा देखावा उभारला. अशा प्रकारे नानाचे कारस्थान रंगात आले. आता नानाचे पुणे आगमन व बाजीरावाची पेशवेपदी स्थापना या दोनच गोष्टी घडायच्या राहिल्या होत्या. त्या दृष्टीने घटना घडवल्या जाऊ लागल्या. घडू लागल्या. पुण्यात नानाचे काही हितचिंतक होते. त्यांच्या मार्फत ' नवकोट नारायण ' नाना हुजुरातीची फौज फोडू लागला. भाऊ व तात्याला हि बातमी समजताच त्यांनी धरपकड आरंभली. पैकी, हरिपंताचा मुलगा बाबा फडके कैदेत गेला तर मालोजी घोरपडे, नीळकंठराव प्रभू वाईला निघून गेले आणि नारोपंत चक्रदेव मशीरच्या गोटांत लपला. फितुरीच्या या घटनांनी तात्या - भाऊ सावध झाले व या बखेड्याचे मूळ --- बाजीरावास मानून त्याला उत्तरेत बंदोबस्तात ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेऊन अंमलातही आणला. बाळोबातात्याने आपला विश्वासू सरदार तुळजोजीराव उर्फ सखाराम घाटगे याच्या देखरेखीखाली बाजीरावाची रवानगी उत्तरेत केली. बाजीरावास घेऊन घाटगे जांबगावी आला आणि येथेच रावबाजी व घाटग्याचे नशीब पालटले. 
 
    सखाराम घाटगे स. १७७८ पासून ९६ पर्यंत नानाच्या सेवेत शिलेदार म्हणून कार्यरत होता. शिंद्याच्या भीतीने नाना पुणे सोडून गेल्यावर घाटगे शिंद्याच्या सेवेत दाखल झाला. इतिहासकारांच्या मते, यामागे नानाची प्रेरणा होती. परंतु, मला ते मान्य नाही. तसेच घाटगेचे पुढील चरित्र पाहता त्याने नानाच्या सांगण्यानुसार या वेळी हालचाली केल्या असे म्हणणे चुकीचे ठरेल. असो, बाजीरावाने यावेळी स्वयंस्फ़ूर्तीने घाटगेच्या मार्फत दौलतरावासोबत एक गुप्त करार केला. त्यानुसार नानाचे कारस्थान जाऊन बाजीराव पेशवा बनल्यावर दौलतरावाने उत्तरेत परत न जाता जोवर नाना जिवंत आहे तोवर पुणे वा पुण्याच्या आसपास राहून बाजीरावाचे संरक्षण करायचे. या बदल्यात रोख दोन कोट रुपये व पुण्यात जितके दिवस शिंद्याचा तळ राहील --- म्हणजे नाना मरेपर्यंत --- तितक्या दिवसांचा खर्च देण्याचे बाजीरावाने मान्य केले. बव्हंशी इतिहासकारांच्या मते या कराराने मराठी राज्याच्या विनाशास चालना मिळाली, राज्याची कबर खोदली गेली. परंतु इतिहासकारांचे मत - निष्कर्ष एकतर्फी आहेत. बाजीराव नानाला घाबरला असे समजून केलेले हे आरोप आहेत. वास्तविक स. माधवाचा जो अपघाती मृत्यू झाला तो अपघात नसून खून असल्यानेच बाजीरावास हि तरतूद करणे भाग होते. बाजीराव - दौलतराव यांचा करार घडून येण्यामागे सखाराम घाटगेचा मोठा हात होता. बाजीराव - दौलतरावाची मैत्री घडवून आणताना त्याने आपले स्वहित चांगलेच साधून घेतले. या सखारामास बायजाबाई नावाची लग्नाच्या वयाची मुलगी होती. तिच्या सौंदर्यासाठी ती तेव्हा प्रसिद्ध असून तिच्याशी विवाह करण्याची दौलतरावाची इच्छा होती. पण घाटगे हा खानदानी मराठा असल्याने त्याला शिंद्यांचे निव्वळ ' मराठा ' असलेले स्थळ तोलामोलाचे वाटत नव्हते. मात्र हे कारण वरपांगी होते. पुष्कळ पैसा व अधिकारपद मिळाल्यास त्याला दौलतराव जावई म्हणून नको होता असे नाही. बाजीराव नानाच्या कृपेने दौलतरावाचा मित्र बनलेला असल्याने त्याने आपली मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी हे लग्न जुळवण्यात पुढाकार घेतला व घाटग्याचे मन वळवून त्यांस दौलतरावास आपली मुलगी देण्यास राजी केले. बदल्यात दौलतरावाने त्यांस आपली दिवाणगिरी देऊ केली ! सखारामाचा ' सर्जेराव ' केला. घाटग्याचा हा पराक्रम व दौलतरावाची दर्यादिली पाहता पेशवाई संपल्यावर देखील इंग्रजांनी ग्वाल्हेरचे संस्थान जिवंत का ठेवले याचा काहीसा उलगडा होतो.

    सखाराम घाटग्याच्या मार्फत बाजीराव - दौलतरावाचे स्वार्थाधिरित मैत्रीसंबंध प्रस्थापित झाल्याचे नानाला माहिती नव्हते. त्याचे सर्व लक्ष भाऊ - तात्याचा कारभार हाणून पाडण्याकडे केंद्रित झाले होते. आपल्या योजनेनुसार सर्व गोष्टी जुळून आल्याची खात्री पटताच त्याने परशुरामभाऊ व बाळोबातात्याच्या अटकेची योजना आखली. त्यानुसार त्याने दौलतराव व होळकर आणि इतर सरदारांना सुचना दिल्या. निजामाची फौज आपल्या हद्दीत गोळा होऊ लागली. भोसले पुण्याकडे येऊ लागले. तत्पूर्वीच दि. २६ ऑक्टोबर १७९६ रोजी रात्री दौलतरावाने चलाखी करून बाळोबा व त्याच्या सहाय्यकांस कैद केले. इकडे मशीर व होळकर परशुरामभाऊला पकडण्यासाठी तयार झाले. परंतु त्यांच्या दुर्दैवाने कटाची बातमी फुटून उशीरा का होईना भाऊला खऱ्या परिस्थितीची कल्पना आली व त्याच रात्री --- म्हणजे ता. २६ ऑक्टोबर १७९६ रोजी रात्री आपली असेल नसेल तेवढी फौज गोळा करून व बालपेशवा चिमाजीस सोबत घेऊन भाऊ जुन्नरला रवाना झाला. परंतु बापू व यशवंतराव होळकराने त्याची पाठ सोडली नाही. पर्वतीजवळ भाऊ व बापू - यशवंतची गाठ पडून भाऊची फौज त्यांनी उधळून लावली. इकडे मशीरने भाऊचा कात्रजचा तळ साफ लुटून टाकला. पराभूत भाऊ चिमणाजीसह जुन्नरला गेला खरा पण, परिस्थिती पाहून तो रास्त्यांच्या स्वाधीन झाला व नारोपंत चक्रदेवाच्या हवाली त्याने चिमाजीस केले. अशा प्रकारे भाऊ व बाळोबाचा औटघटकेचा कारभार संपुष्टात येऊन चिमणाजीची पेशवाई अळवावरच्या पाण्याप्रमाणे लुप्त झाली. घडल्या प्रकाराची बातमी नाना - बाजीरावास कळवून त्यांना तातडीने पुण्यास येण्याची सुचना दौलतरावाने केली. 

    इकडे जांबगावी बाजीरावाचा मुक्काम असताना त्याला परत पुण्याला घेऊन येण्याविषयी दौलतरावाने सखाराम घाटगेस हुकुम केला. त्यानुसार घाटगे बाजीरावास घेऊन पुण्याच्या दिशेने येऊ लागला. वाटेत कोरेगाव मुक्कामी बाजीरावाने नाना फडणीसला पत्र पाठवून तातडीने पुण्यास येण्याची विनंती केली. त्याला पेशवेपदाची घाई तर झाली होतीच पण कदाचित या मुत्सद्दयांची बुद्धी फिरली तर काय ? हि धास्ती त्यांस असावी. असो, बाजीराव पुण्यास येईपर्यंत दौलतरावाने अमृतराव पेशव्यालाही पुण्यास आणून ठेवले. यावेळी कारभाराचा जो काय सोक्षमोक्ष होईल तो लावण्याचा त्याचा विचार असावा. 

    शिंद्याच्या सुचनेनुसार नाना पुण्यास आला खरा पण त्याची व बाजीरावाची गाठभेट काही लवकर झाली नाही. महाडच्या कारस्थानाचा प्रमुख निर्माता नाना तर हे कारस्थान ज्याच्याकरता उभारले गेले तो बाजीराव --- यांचे एकमेकांविषयी मन साफ नसल्याने उभयतांच्या भेटीचा मुहूर्त काही लागेना. शेवटी निजामाचा दिवाण मशीर व नागपूरकर दुसरा रघुजी भोसले यांनी उभयतां मध्यस्थी केली व नानाच्या जीवास, अब्रूस धक्का लावणार नाही अशी बाजीरावाकडून लेखी कबूली लिहून घेतल्यावर नानाने रावबाजीची भेट घेऊन कारभार हाती घेण्यास संमती दर्शवली.

    परंतु, एवढे होऊन देखील नाना - बाजीरावाची दिलजमाई काही झाली नाहीच. नानाचा भरवसा नसल्याने बाजीरावाने दौलतरावाची पलटणे मुद्दाम आपल्या तळावर ठेवून घेतली. त्यामुळे नानाला त्या दोघांचा संशय येऊन त्याने होळकरांशी सख्य वाढवण्यास आरंभ केला. तेव्हा दौलतरावाने स्वतः नानाची भेट घेऊन त्याची समजूत काढली. इकडे आबा शेलूकराच्या मार्फत नानाने पेशवाईची वस्त्रे साताऱ्याहून मागवली होती. त्यांचा स्वीकार ता. ५ डिसेंबर १७९६ रोजी बाजीरावाने खराडीच्या मुक्कामी केला. या समारंभास भोसले, होळकर वा शिंदे हजर नसल्याचे रियासतकार सरदेसाईंनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे भाऊ, बाळोबा कैदेत पडले असताना व जवळ शिंद्यासारखा प्रबळ पाठीराखा असताना देखील वस्त्रे स्वीकारण्याचा कार्यक्रम शनिवारवाडा वा पुण्यातील इतर सरकारी वाड्यांत न होता खराडीच्या लष्करी तळावर झाला.
                                  
                                                                                     ( क्रमशः )

Sunday, October 12, 2014

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - २ )


    स. १७७४ पासून स. माधवाचा संरक्षक व नंतर एकप्रकारे पालक म्हणून वीस वर्षांहून अधिक काळ पेशव्यांची सत्ता नाना उपभोगत होता. त्यामुळे आपल्या हातातील सत्ता कायम राहावी यासाठी नानाचे प्रयत्नशील असणे स्वाभाविक होते. रघुनाथरावाचे पुत्र हे आपले प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याची खुणगाठ त्याने कधीच आपल्या मनाशी बांधलेली असल्याने ते सोडून इतर कोणाही लायक इसमास --- लायक म्हणजे त्याच्या ऐकण्यातील --- पेशवा बनवण्याची त्याची तयारी होती. त्या दृष्टीने पेशवाईच्या संभाव्य वारसाचा शोध व त्याविषयीच्या वाटाघाटी होऊ लागल्या. नानाच्या राजकारणाचे मुख्य बलिष्ठ स्थान म्हणजे प्रसंगी नियतीवर मात करण्याची क्षमता असलेलं त्याचं बुद्धीचातुर्य व मुख्य वैगुण्य म्हणजे लष्करी सामर्थ्याचा अभाव ! त्यामुळे त्याचे सर्व शहाणपण वाया गेलं. फुकट गेलं. नानाला आपल्या कमकुवत बाजूची जाणीव नव्हती असे नाही. त्यासाठीच त्याने प्रथम महादजी शिंदे नंतर हरिपंत फडके व पटवर्धनांना तसेच आता होळकरांना जवळ केले होते. परंतु, दुसऱ्याच्या सामर्थ्याच्या बळावर उभारलेल्या मसलतींचा पाया हा नेहमी कच्चाच असतो हे नानास प्रथम अनुभवास आले नव्हते. ते यावेळी येऊ लागले. या ठिकाणी एका महत्त्वाच्या गोष्टीची नोंद करणे अयोग्य होणार नाही व ती म्हणजे नाना कारभारी असतान सरकारी फौजेकडे होत असलेलं त्याचं दुर्लक्ष कसं चुकीचं व आत्मघाताचं आहे याविषयी अहिल्याबाई होळकरने त्यांस कित्येकदा सांगितले होते. हमेशा पंचवीस तीस हजार सरकारी फौज जय्यत तयार असल्या खेरीज कोणतंही राजकारण, मनसुबा सिद्धीस जाणार नाही हा तिने नानाला पहिल्या इंग्रज - मराठा युद्धाच्या वेळी दिलेला इशारा नानाने साफ दुर्लक्षित केला. त्याचा दुष्परिणाम काय झाला हे इतिहास अभ्यासकांना - वाचकांना सांगण्याची गरज नाही ! असो, पेशवाईवर नवीन वारसाची स्थापना करण्यासाठी नानाला लष्करी गटाचा पाठिंबा हवा होता व त्यावेळी शिंदे - होळकर हे दोघंच काय त्यादृष्टीने सर्वांत बलिष्ठ होते. पैकी, आरंभी दोघांनीही पेशवेपदी बाहेरचा --- म्हणजे दत्तक वारस नेमण्यास मंजुरी दिली. प्रमुख सेनापतींचा पाठिंबा मिळताच नानाने दत्तक मुलाचा शोध आरंभला. इकडे नानाला पाठिंबा देणाऱ्या व त्याच्या विरोधात असणाऱ्या अशा दोन्ही गटांत त्यामुळे चलबिचल माजू लागली. त्यात जुन्नरास बसलेल्या बाजीरावाचीही भर पडली !  

    नारायणाच्या खुनानंतर ते स. माधवाच्या मृत्यूपर्यंत नानाने आपल्या हाती पेशवाईची सुत्रे कशी ठेवली होती हे सर्वांना दिसले होते. कळून चुकले होते. स. माधवाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस दत्तक देताना परत एकदा राज्याची सर्व सुत्रे नानाच्या हाती जाऊ देण्याइतपत मुत्सद्दी दुधखुळे नव्हते. नानाच्या हातातील कारभार काढून घेण्याचे महादजी शिंदेने केलेले प्रयत्न केवळ स. माधवाच्या मध्यस्थीने अपयशी ठरले होते. परंतु महादजीची हि महत्त्वकांक्षा त्याच्या मृत्यूनंतर का होईना पूर्ण करण्याची हाव त्याच्या सहकाऱ्यांत होती. त्यामानाने होळकरांची भूमिका वेगळी होती. अहिल्याबाईचे नुकतेच निधन झालेलं असल्याने होळकरांची सरदारकी पूर्णतः तुकोजीच्या हाती आली होती. मात्र त्याची वृद्धावस्था व मुलांमधील बेबनाव यांमुळे तसेच महादजीच्या सरदारांच्या मनात होळकरी दौलतीविषयी असलेल्या वैरभावामुळे तुकोजी होळकरास पुण्याचे कारभारीपद हाती घेण्याची इच्छा नव्हती. मात्र आपल्या पाठींब्याने नाना वा इतर कोणी कारभार हाती घेत असेल तर त्यांस ते नको होते असे नाही. म्हणजे सत्तेची प्रत्यक्ष सुत्रे हाती न घेता पडद्यामागून सुत्रचालकत्व करण्याची तुकोजीची इच्छा होती. परंतु, परिस्थिती त्याला फारशी अनुकूल नव्हती. तशी ती इतरांना तरी कुठे अनुकूल होती ? प्रत्येक मुत्सद्दी, प्रत्येक गट दुसऱ्याचे बेत हाणून पाडून आपलंच घोडं पुढे दामटण्याचा यत्न करत होते. नानाने दत्तकाचे प्यादे पुढे ढकलताच विरोधकांनी रघुनाथरावच्या मुलांना पुढे केले. नानाने संभाव्य दत्तक विधानासाठी गोळा केलेल्या मुलांमध्ये एक नानाचा नातलग असून नाना त्यांसच पेशवा बनवणार असल्याची वार्ता उठली. त्यामुळे नानाचे पक्षपातीही दबकले. त्यांनी नानाला समर्थन देण्याच्या बाबतीत फेरविचार सुरु केला. इकडे जुन्नरास बसलेल्या बाजीरावही शांत बसला नव्हता. आपल्या उपजत राजकीय व कारस्थानी बुद्धीचा वापर करून त्याने पेशवेपद प्राप्त करण्याच्या दृष्टीने डावपेच आखण्यास आरंभ केला. त्याचा मोठा भाऊ अमृतराव --- याचा एक मेव्हणा शिंद्यांच्या छावणीत होता. त्याच्या मार्फत बाजीरावाने शिंद्यांचा प्रमुख कारभारी बाळोबा पागनीसला आपल्या पक्षास वळवून, ' आपणांस पेशवेपदी बसवल्यास तुम्हांस सव्वा कोट रुपये व पंचवीस लाखांची जहागीर देऊ ' असे वचन दिले. झाले. बाळोबाने आपल्या धन्यास --- दौलतराव शिंद्यास बाजीरावाच्या पक्षाला पाठिंबा देण्यास तयार केले. अशा प्रकारे शिंदे बाजीरावास सामील होताच नानाचे दत्तकाचे राजकारण खोळंबले. 

    दत्तकाच्या योजनेस आरंभी अनुकूल असलेले शिंदे अचानक विरोधात गेल्याचे पाहून नाना गोंधळून गेला. नंतर त्याच्या लक्षात आले कि, आपल्या योजनेस फक्त शिंदेच नाही तर बव्हंशी लोकांचा विरोध आहे व विरोधाचे प्रकट कारण, भट घराण्याचे औरस वंशज हजर असताना दत्तकाचे काम काय, हे होते. काळाची व मुत्सद्दयांची पावलं ओळखून नानाने आपला पवित्रा बदलला. रघुनाथाच्या वंशाचा गादीला विटाळ होऊ न देण्याची आपली प्रतिज्ञा बाजूला ठेवून दादासाहेबाचा धाकटा पुत्र चिमणाजी आपा यांस स. माधवाची पत्नी यशोदाबाई --- हिला दत्तक देऊन चिमणाजी माधवराव नावाने पेशवा बनवण्याचे त्याने योजले. चिमणाजी यावेळी अवघा १० - १२ व चा असून नात्याने स. माधवाचा चुलत चुलता होता. त्यांस आता आपल्याच सुनेच्या ओटीत जाण्याची पाळी आली होती. राजकारणाचे हे नातेसंबंध पार जाणारे धागेदोरे - डावपेच खरोखर अनाकलनीय असेच आहेत म्हणावे लागेल !

    नव्या डावाची आखणी करून नानाने त्यांस आपल्या व विरुद्ध पक्षाच्या मुत्सद्दयांचा वरकरणी तरी पाठिंबा मिळवला. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याचा नसला तरी बाळाजी विश्वनाथाचा वंशज गादीवर बसणार असेल तर त्यांस विरोध कोण करेल ? नानाचा हा बेत कदाचित तडीसही गेला असता, जर बाजीराव आड आला नसता तर ! 

    चिमणाजी यावेळी आपल्या भावांसह जुन्नरास होता. त्यांस पुण्याला आणायची जबाबदारी नानाने परशुरामभाऊ पटवर्धनवर सोपवली. राजकारणाच्या बदलत्या हवेचा अंदाज बाजीरावास लागल्याने त्याने दौलतराव शिंद्यास त्वरेने पुण्यास येण्याची आज्ञा केली. परंतु यावेळी त्याचा प्रमुख सेनानी जिवबादादा बक्षी मरण पावल्याने व महादजीच्या स्त्रियांनी दौलतरावाविरुद्ध बंड पुकारल्याने त्यांस तातडीने पुण्याला येणे जमले नाही. परंतु, आपले हस्तक वकिलीच्या निमित्ताने जुन्नरास रवाना करून बाजीरावास थोडे निश्चिंत केले. 

    इकडे नानाच्या आज्ञेनुसार परशुरामभाऊ जुन्नरला आला खरा पण तत्पूर्वीच शिंद्यांचा वकील रामजी पाटील तेथे येऊन पोहोचल्याने भाऊ थोडा चपापला. ' बऱ्या बोलाने बाजीरावाने चिमणाजीस स्वाधीन न केले तर प्रसंगी जबरदस्ती करण्याची ' नानाची त्यांस आज्ञा होती. परंतु, शिंद्याचा वकील तेथे येऊन बसल्याने आता बोलाचालीनेच काम पार पाडावे लागणार हे भाऊस कळून चुकले. त्यानुसार त्याने बाजीरावाशी वाटाघाट आरंभली. नानाची मसलत त्याच्या समोर उघड करून चिमाजीला आपल्यासोबत पाठवण्याची भाऊने बाजीरावास विनंती केली. त्यावेळी बाजीरावाने भाऊच्या पायांवर डोकं ठेवून अश्रुपात करून ' थोरल्यास बंदीत ठेवून धाकट्यास गादीवर बसवणे योग्य आहे का ? ' अशा आशयाची भाषणे केली. बाजीरावाच्या या पवित्र्याने भाऊ गडबडला. काय करावे तेच त्याला सुचेना. मुळात तो शिपाईगडी. आपणांस कारस्थानी पुरूष म्हणवून घेण्यापेक्षा लढवय्या म्हणवून घेणे त्यांस भूषण वाटे. त्याच्या गळ्यात नानाने हि भलतीच जोखीम टाकली होती व २० - २१ वर्षीय बाजीरावाने त्याचा स्वभाव ओळखून त्यांस आपल्या राजकीय चतुराईने पुरते हतबल करून ठेवले होते. भाऊने याबाबतीत नानाला कळवले कि, ' बाजीराव ऐकत नाही व शिंद्यांची फौज याच रोखे येत आहे. पुढे काय करावे ? '  भाऊच्या निरोपावरून डाव शिंद्यांच्या हाती जात असल्याचा अंदाज नानाला आला व त्याने भाऊला बाजीरावासह चिमाजीला पुण्यास आणण्याची सुचना केली. एकदा का बाजीराव - चिमाजी पुण्यास आले कि मग आपणांस हवं ते साध्य करता येईल अशी त्याची धारणा होती. 

    नानाच्या सुचनेनुसार भाऊ बाजीराव - चिमाजीला घेऊन पुण्याजवळ दि. ३ मार्च १७९६ रोजी खडकी येथे आला. भाऊच्या मार्फत नाना - बाजीरावाची भेट घडून नानाला ' हे प्रकरण ' साधं नसल्याची जाणीव झाली. त्याने आपला आधीचा बेत बदलून बाजीरावासच पेशवाईवर बसवण्याचे निश्चित केले. यावेळी उभयतांचा एकमेकांच्या बचावाचा, मागील वैरभाव विसरण्याचा आणा - शपथांचा करार घडून आला. बाजीरावाने नानामार्फत पेशवाई स्वीकारताना दोन अटी घातल्या. (१) आपण बाजीराव रघुनाथ याच नावाने मसनदीवर बसणार (२) स. माधवाच्या वेळेस पेशव्यावर जी काही नानाची बंधने होते ती आपण पाळणार नाही. बदल्यात आपण नानांच्याच सल्ल्याने कारभार करू, असे बाजीरावाने मान्य केले.  इकडे नानाने आपल्या हातातील डाव उपटल्याचे पाहून शिंदे चिडला. त्याचा कारभारी बाळोबातात्यावर याच वेळी अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केल्याचा वा त्यांस मारण्यासाठी मारेकरी त्याच्या गोटात दाखल झाल्याचा बोभाटा झाला. तेवढ्यावरून या कृत्यामागे नानाचा हात असल्याची बाळोबाने बोंब ठोकली आणि नानाच्या बंदोबस्तासाठी फौजा घेऊन तो पुण्यास येऊ लागला. शिंद्याच्या स्वारीस तोंड देण्याची नानाने आपल्या परीने राजकीय तयारी केली. बाजीरावास शिंद्यापासून आपला बचाव करण्याची गळ घातली पण जे कार्य करण्यास पेशवाईचा एकेकाळचा सर्वेसर्वा यावेळी असमर्थ होता ते नुकताच बंदीवासातून बाहेर पडलेला बाजीराव काय करणार ? त्याने आपली असमर्थता व्यक्त केली तेव्हा नानाने आपल्या लष्करी सल्लागारांस --- म्हणजे भाऊकडे सल्ला मागितला असता त्याने नानास पुणे सोडण्याची सुचना केली. 

    पुढील घटनाक्रम पाहता भाऊची हि सुचना अयोग्य होती असे म्हणता येईल पण तत्कालीन स्थिती पाहता यावेळी त्याच्या हाती तरी काय होते ? शिंद्याच्या सैन्याशी मुकाबला करण्याची वेळ आली तर त्यांस भाऊची तयारी नव्हती. होळकर कोणत्या पक्षास मिळेल याचा भरवसा नव्हता. त्याखेरीज दरबारचे मुत्सद्दी व सरदार मंडळी कोणता निर्णय घेतील याविषयीही साशंकता होती. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे खुद्द बाजीराव खंबीरपणे कोणाच्या पाठीशी उभा राहतो याचा त्याला अंदाज नव्हता. तेव्हा तो तरी काय करेल ? खेरीज खुद्द नानाकडेही प्रसंगी उपयोगी पडेल असे प्रबळ लष्करी बळ कुठे होते ? तेव्हा भाऊचा नानाला पुणे सोडून जाण्याचा दिलेला सल्ला अयोग्य होता असे म्हणता येत नाही.

    भाऊच्या सल्ल्यानुसार नानाने पुण्यातून मुक्काम हलवण्याची व्यवस्था केली. आपल्या सहकाऱ्यांना पुणे सोडण्याची सुचना करून आपल्या पत्नीची त्याने रायगडी रवानगी केली व तो स्वतः दि. २२ मार्च १७९६ रोजी साताऱ्यास रवाना झाला. नानाचा मुक्काम हलल्यावर बाळोबा शिंदयांची फौज घेऊन पुण्यास येऊन पोहोचला. पाठोपाठ दौलतरावाची स्वारी आली. बाजीराव - दौलतरावाची भेट घडून आली. आता फक्त बाजीरावास पेशवाईची वस्त्रे मिळणे बाकी होते. ती मिळताच बाजीराव आपल्यासोबत केलेला करार पूर्ण करेल अशी दौलतरावाची समजूत होती परंतु, बाजीरावाने शिंदयासोबत केलेला करार पाळण्यास आपण बांधील नसल्याचे स्पष्ट केले.कारण, करारानुसार शिंदयांनी बाजीरावास जुन्नरहून पुण्यास आणलेच नाही व पेशवाई देखील प्राप्त करून दिली नाही. तेव्हा शिंदयांसोबत केलेला करार पाळण्याची आपणांस गरज वाटत नसल्याचे बाजीरावाने सांगितले. यांमुळे शिंदे तोंडघशी पडला. नानाशी त्याने आता उघड शत्रुत्व घेतले होते. तेव्हा आता काय करावे या संभ्रमात तो राहिला.  

    इकडे त्याचा कारभारी बाळोबा मात्र नानाचा सूड उगवण्यास बेकरार झाला होता. रंतु, परशुरामभाऊने त्यांस आवरले. खुद्द बाजीराव देखील यावेळी नानाच्या बचावासाठी पुढे झाला. त्याने दौलतरावास नानासोबत मिळतं - जुळतं घेण्याची सल्ला दिली. इतिहासकार सांगतात कि, बाजीरावास पेशवाईची वस्त्रे हवी होती व नानाचा मुक्काम त्यावेळी साताऱ्यास असल्याने तो छत्रपतींकडून बाजीरावास मिळणाऱ्या वस्त्रांना हरकत करेल अशी त्यांस भीती वाटत असल्याने त्याने नानाचा बचाव केला. परंतु, माझ्या मते यावेळी खरोखरच बाजीरावाची नानाचा बचाव करण्याची इच्छा होती. यामागे त्याचा स्वार्थ नव्हताच असे मी म्हणत नाही. परंतु, राज्यास नानाची गरज आहे याची त्यांस जाणीव अजिबात नव्हती असेही दिसून येत नाही. नाना आपली फडणीशी व मर्यादा रक्षून राहील तर ते बाजीरावास हवे होते पण नानाला नेमकं तेच जमत नव्हतं ! असो, इकडे दौलतरावाला बाजीरावाच्या इच्छे - अनिच्छेशी काही देणं - घेणं नव्हतं. त्याला फक्त प्रादेशिक व सांपत्तिक लोभ होता. बाजीरावाने बोलल्याप्रमाणे पैसा व जहागीर देण्याचे नाकारताच दौलतरावाची दृष्टी पालटली. तो, त्याचा कारभारी बाळोबातात्या व परशुरामभाऊ यांनी नवी मसलत उभारली. 

    बाजीरावास पेशवेपदी न बसवता नानाच्या मूळ बेतानुसार चिमणाजी आपास यशोदाबाईस दत्तक देऊन त्यासच पेशवा बनवायचे आणि कारभार परशुरामभाऊने बघायचा. चिमाजी - भाऊचा जम बसवून देण्याची जबाबदारी शिंद्याने स्वीकारली. बदल्यात भाऊने शिंद्यांना पैसे व जहागीर देण्याचे मान्य केले. तात्या - भाऊ बाजीरावासोबत रोज बसत - उठत होते पण त्याला शेवटपर्यंत या दुकलीच्या कटाचा काही पत्ता लागला नाही. उलट वस्त्रे घेण्यासाठी जेव्हा बाजीराव साताऱ्यास निघाला तेव्हा शिंद्याने फौजेच्या देण्याचा गवगवा पुढे करून बाजीरावास अडवून धरले. त्यावेळी भाऊने उभयतांमध्ये मध्यस्थी केल्याने बाजीरावाची पटवर्धनांवर अधिकच मर्जी बसली. पुढे काही दिवसांनी लष्कराच्या देण्या - घेण्यावरून बाजीराव - शिंद्याचा वाद झाला असता त्याची समजूत काढण्यासाठी बाजीराव शिंद्याच्या गोटात निघाला. त्यावेळी त्याने भाऊला आपल्या बरोबर येण्याची सुचना केली असता पोटात दुखत असल्याचे निमित्त सांगून भाऊ मागे राहिला व बाजीराव शिंद्याच्या छावणीत गेल्याचे समजताच आधी ठरवल्याप्रमाणे भाऊने बाजीरावाच्या गोटात जाऊन चिमाजीला जबरदस्तीने ताब्यात घेतले व पुण्याचा रस्ता धरला. भाऊ चिमाजीस घेऊन पळाल्याचे बाजीरावास समजले तेव्हा त्याने शिंद्यांस भाऊचा पाठलाग करण्याची आज्ञा केली. परंतु रात्र असल्याने सकाळी शोध घेता येईल असे शिंद्याने त्यांस सांगितले. तेव्हा बाजीरावाने त्या रात्री शिंद्याच्या गोटात मुक्काम करण्याचे ठरवले. कारण आपल्या छावणीत परत गेल्यास दगा होण्याची त्यांस भीती होती. परंतु, दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने आपल्या तळावर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांस सर्व डाव उमगला. बाजीरावाच्या भोवती आता शिंद्याचे चौकी - पहारे बसले होते ! पेशवा बनायला निघालेला बाजीराव परत एकदा फिरून राजकीय बंदीवासात पडला !!  

    इकडे भाऊ चिमाजीसह पुण्यास आला. धर्मशास्त्रे धाब्यावर बसवून सासऱ्याला सुनेच्या मांडीवर दत्तक दिले आणि दि. २ जून १७९६ रोजी पेशवेपदी स्थापन केले. भाऊ चिमाजीच्या नावे पेशवाईची व कारभारीपदाची वस्त्रे छत्रपतींकडून घेत असताना नाना शांतपणे बसून राहीला. नव्या राजकीय स्थित्यंतरात आपले भवितव्य नेमके काय असेल याचा तो अंदाज घेत होता. त्यामुळेच त्याने त्या वस्त्रांना अजिबात हरकत घेतली नाही. राजकारणात कधी कधी अशी प्रतिपक्षाला संभ्रमात पाडणारी भूमिका घ्यावी लागते. परंतु, बाळोबातात्यापुढे नानाची हि सहेतुक राजकीय तटस्थतेची मात्रा लागू पडणार नव्हती. चिमणाजी पेशवा बनल्यावर तात्याने नाना फडणीसला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास आरंभ केला. कारण ; नाना जाग्यावर बसल्याखेरीज आपला कारभार सुरळीत चालणार नाही याची त्या राजकारणीपटुस जाणीव होती. परंतु, भाऊने नानासोबतचे आपले पूर्वसंबंध स्मरून नानाच्या बचावाचे प्रयत्न चालवले. नाना राज्यकारभारात हस्तक्षेप करणार नाही. तो त्याची फडणीशी सांभाळून राहील असे वचन त्याने नानाच्या वतीने बाळोबास दिले. तेव्हा बाळोबाने त्यांस संमती दर्शवून नानाच्या ताब्यातील गडकिल्ल्यांच्या सोडचिठ्ठ्यांची मागणी केली. भाऊने याबाबतीत नानाशी बोलाचाली केल्या असता नाना त्याबाबतीत चालढकल करू लागला. तेव्हा बाळोबातात्याने समेटाचे धोरण गुंडाळून नानाला पकडण्यासाठी फौजा रवाना केल्या. यावेळी नाना मेणवलीस होता. नाना बाळोबाच्या तावडीत सापडला तर त्याचे धिंडवडे निघतील हे लक्षात घेऊन भाऊने आपल्या मुलास --- महादजीपंतास नानाला ताब्यात घेण्यासाठी मेणवलीस पाठवले. नानाने संभाव्य धोका ओळखून मेणवली सोडून रायगड गाठला. परंतु, तेथील हवा न मानवल्याने त्याने महाडला आपला तळ ठोकला. तत्पूर्वी कोकणात उतरणारे सर्व घाट रस्ते - वाटा खोदून, झाडे तोडून बंद केले. लष्करी चौक्या बसवून चोख बंदोबस्त ठेवला. या काळात पावसाळा सुरू असल्याने आता लष्करी आक्रमणाची त्यांस भीती नव्हती. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात व थंड हवामानात बसून नानाने एकूण राजकीय स्थितीचा विचार करून एक मोठे कारस्थान रचण्यास आरंभ केला. ज्यास इतिहासात ' महाडचे कारस्थान ' म्हणून ओळखले जाते.    
                      
                                                                  ( क्रमशः )  
     

Wednesday, October 8, 2014

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - १ )


                                       
दुसरा बाजीराव पेशवा
                                                              

    स. १७९५. मराठी राज्याच्या इतिहासातील एक विलक्षण वर्ष. या वर्षारंभी पानिपतनंतर प्रथमच एकवटलेल्या समस्त मराठी सरदारांच्या संयुक्त सैन्याने खर्ड्याच्या रणभूमीवर स. माधवराव पेशव्याच्या नेतृत्वाखाली निजामाला खडे चारले. पेशवा म्हणेल त्या अटींवर तह करण्याखेरीज त्याच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही. इतकेच नव्हे तर पेशव्याच्या संतोषास्तव त्यास आपला प्रमुख कारभारी मशीरउल्मुल्क यांस पेशव्याच्या स्वाधीन करावे लागले. मराठी राज्याच्या वैभवाचा हा उत्कर्षबिंदूच होता. यानंतर झपाट्याने मराठी राज्य विनशाच्या वाटेस लागले. स. माधवरावाच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या पेशवेपदी अटकप्रसिद्ध ' राघोभरारी ' तथा रघुनाथराव पेशव्याचा मुलगा इतिहास प्रसिद्ध ' दुसरा बाजीराव ' विराजमान झाला. नव्हे बनवला गेला ! 

    बाजीराव पेशवा बनल्यावर मराठी राज्य सावरण्याऐवजी मोठ्या वेगाने विनाशाकडे वाटचाल करू लागले. आधीचे पेशवे शत्रूच्या मुकाबल्यासाठी राजधानी सोडून बाहेर पडायचे पण या पेशव्यास स्वतःच्या सरदारांपासून बचावाण्यासाठी राजधानी सोडून इंग्रजांच्या पाया पडावे लागले. मराठी राज्याचा स्वामी लौकिकार्थाने छत्रपती असला तरी त्या राज्ययंत्राचे चालकत्व पेशव्याकडे असल्याने अशा सर्वशक्तीमान पेशव्यास आपल्या मदतीने पुण्यास नेऊन पेशवाईवर स्थापित करण्यात इंग्रजांना मोठी धन्यता वाटली. पेशव्याच्या जीवास राजधानीत कोणी बरे - वाईट करू नये म्हणून त्यांच्या पलटणी पेशव्याच्या आसपास, छाताडावर तैनात करण्यात आल्या. आपल्या मदतीस धावून येणाऱ्या या आंग्ल मित्राच्या राजी - नाराजीकडे पेशवा जातीने लक्ष पुरवू लागला. परिणामी पेशव्याचे अवसान ओळखून इंग्रजांनी समस्त मराठी राज्य गिळण्याचा प्रयत्न आरंभला. इंग्रजांच्या बेतांची जाणीव होताच बाजीराव धडपडून जागा झाला. अंगी असेल नसेल तेवढी शक्ती, कुवत व कारस्थानी बुद्धी पणास लावून इंग्रजांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी धडपडू लागला. परंतु परिस्थिती, नियती समोर मोठमोठे छत्रपती, शहेनशहा नेस्तनाबूद झाले तिथे या ' नादान ', ' उल्लू ', ' मंत्रावेगळा ' बाजीरावाची कथा काय ? स. १८१८ मध्ये सर्व उपाय हरल्यावर, रणभूमीत इंग्रजांकडून मार खाल्ल्यावर, स्वकीयांनी पाठीत खंजीर खुपासल्यावर या अखेरच्या पेशव्याने इंग्रजांकडे शरणागती पत्करली.   राज्यकारभार, कट - कारस्थानांची दगदग करायची सोडून सालीना आठ लाख तनख्याच्या तैनातीवर संतुष्ट होऊन थो. बाजीरावाचा नातू , दुसरा बाजीराव ब्रम्हावर्तला रवाना झाला. कायमचा ! 

    अशा या रंगेल, रगेल, उल्लू, कारस्थानी, विश्वासघातकी, लंपट, शूर व मुत्सद्दी बाजीरावाच्या राजकीय चरित्राचा आपण संक्षिप्त मागोवा घेऊ.    
स. १७७३ मध्ये नारायणराव पेशव्याचा खून झाल्यावर काही काळ रिक्त झालेल्या पेशवेपदी त्याचा चुलता --- रघुनाथराव विराजमान झाला. परंतु, पुणे दरबारातील सखाराम बापू, नाना फडणीस, हरिपंत फडके प्रभूती मुत्सद्दयांनी आपसांत संगनमत करून कारभारी मंडळ स्थापून प्रथम नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई व नंतर तिचा अल्पवयीन पुत्र स. माधवरावाच्या नावे सत्ता आपल्या हाती घेतली व छत्रपतींच्या मार्फत रघुनाथरावास पेशवाईवरून बडतर्फ केले. केवळ यावरच न थांबता कारभाऱ्यांनी नारायणराव पेशव्याच्या खुनाची चौकशी करून रघुनाथरावास त्या कटाचा प्रमुख सुत्रधार व गुन्हेगार म्हणून घोषित केले व त्यांस पकडण्यासाठी फौजा रवाना केल्या. पुणेकर कारभारी मंडळ व त्यांच्या पक्षपाती सदारांच्या सैन्याचा ठिकठिकाणी मुकाबला करत व त्यांना झुकांडी देत रघुनाथराव उर्फ दादासाहेब पुण्याभोवती घिरट्या घालू लागला. दादाची पुरती नाकेबंदी करण्यासाठी कारभाऱ्यांनी मराठी राज्याचा परंपरागत शत्रू निजामालाही आपल्या पक्षात ओढले तर म्हैसूरकर हैदरअली पुणेकरांऐवजी दादाकडे वळला. मात्र कृष्णेच्या पुढे येण्याची त्याची हिंमत नसल्याने त्याच्या मदतीचा दादाला काय उपयोग होणार होता हे दिसतच होते. मराठी राज्याचे स्वाभाविक शत्रू पुणे दरबारास मिळालेले, परंपरागत सरदार सर्व कारभाऱ्यांकडे सामील झालेले. अशा स्थितीत आपल्या निवडक अनुयायांसह दादा नाईलाजाने इंग्रजांच्या आश्रयार्थ सुरतकडे धावला. यावेळी त्याच्यासोबत त्याचा पूर्ण परिवार --- म्हणजे पत्नी आनंदीबाई, दत्तक पुत्र अमृतराव व काही नाटकशाळा होत्या. पैकी, आनंदीबाई गरोदर असल्याने दादाने तिला माळव्यात धार येथे पवारांच्या जवळ ठेवले व उर्वरित कबिल्यासह त्याने सुरत गाठली. इकडे धार येथे गर्भवती आनंदीबाई दि. १७ जानेवारी १७७५ रोजी प्रसूत होऊन तिला पुत्रप्राप्ती झाली व मुलाचे नाव ' बाजीराव ' असे ठेवण्यात आले. मराठी राज्याच्या इतिहासात हा ' दुसरा बाजीराव ' म्हणून ओळखला जातो.
 
    बाजीरावाच्या आयुष्यातील पहिल्या २० वर्षां पैकी पहिल्या तीन चार वर्षांचा अपवाद केला तर त्याचे १५ - १६ वर्षांचे जीवन हे राजकीय नजरकैदेतच गेले. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांस  पितृवियोग सहन करावा लागला तर १९ व्या वर्षी मातृवियोग ! स. १७९४ मध्ये दि. २७ मार्च रोजी आनंदवल्ली येथे आनंदीबाईचे निधन झाले. त्यावेळी कुटुंबाचे प्रमुखपद बाजीरावाकडे आले. या ठिकाणी रघुनाथरावाच्या मुलांची अगदी थोडक्यात माहिती देतो, ज्यामुळे पुढील घटना समजावून घेणे वाचकांना सोयीचे जाईल.    

    बाजीरावाच्या जन्माआधी, आपणांस पुत्र नाही या कारणास्तव रघुनाथरावाने भुस्कुटे घराण्यातील साडेतीन वर्षीय मुलास दि. १९ एप्रिल १७६८ रोजी दत्तक घेऊन त्याचे नाव अमृतराव असे ठेवले. या दत्तकविधानाचा राजकीय अर्थ काय होता हे आपण यापूर्वीच्या थो. माधवराव तसेच रघुनाथराव विषयी लेखांत तपशिलवार पाहिलेच आहे. सबब त्याची चर्चा येथे करीत नाही. बाजीरावाचा जन्म होईपर्यंत दत्तक असला तरी अमृतरावच दादाचा वारस असे मानले जात होते. परंतु बाजीरावाच्या जन्मानानंतर हे चित्र पालटले व दादाचा खरा वारस म्हणून बाजीरावाचे नाव त्याकाळच्या पद्धतीनुसार पुढे आले. सबब, अमृतरावाचा मान मरातब जरी कायम राहिला तरी त्याचा दर्जा, अधिकार मात्र तुलनेने खालावले. असो, बाजीरावानंतर रघुनाथरावास आनंदीबाईपासून आणखी एका पुत्ररत्नाचा लाभ झाला. परंतु, दादाच्या नशिबात आपल्या दुसऱ्या पुत्राचे मुखदर्शन नव्हते. आनंदीबाई प्रसूत होण्यापूर्वीच दि. ११ डि १७८३ रोजी कचेश्वर येथे दादा वारला आणि ता. ३० एप्रिल १७८४ रोजी आनंदीबाई प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्याचे नाव चिमणाजी असे ठेवण्यात आले. मराठी राज्याच्या इतिहासात दुसरा बाजीराव कुप्रसिद्ध म्हणून तरी मशहूर आहे परंतु त्याचा धाकटा भाऊ दुसरा चिमाजी आपाची माहिती इतिहास अभ्यासक वगळता फारच थोड्या इतिहास वाचकांना आहे. 

    स. १७९४ मध्ये आनंदीबाईचे निधन झाले अन त्याच वर्षाच्या अखेरीस निजामावरील मोहीम उद्भवली. त्यावेळी खबरदारी म्हणून नाना फडणीसने बाजीरावास त्याच्या संपूर्ण परिवारासह आनंदवल्लीतून काढून जुन्नर येथे आणून ठेवले व निजामाची स्वारी संपल्यावर तुमची काहीतरी व्यवस्था लावून देतो असे आश्वासनही दिले. नानाच्या शब्दावर विसंबून बाजीराव आपल्या भावांसह जुन्नरास आला. जुन्नरला त्याचा मुक्काम असतानाच इकडे स. माधवरावाच्या नेतृत्वाखाली मराठी फौजांनी खर्ड्यावर निजामाला लोळवून शरण येण्यास भाग पाडले. यावेळी निजामाने तीन कोट रुपये खंडणी व बत्तीस लाखांचा मुलुख देण्याचे मान्य करून आपल्या लष्कराचा व राज्याचा बचाव केला. त्याखेरीज त्याचा उपद्व्यापी कारभारी गुलाम सय्यदखान उर्फ मशीरुन्मुल्क हा आपणहून नानाच्या ताब्यात राजकीय कैदी म्हणून राहण्यास तयार झाल्याने खर्ड्याची मोहीम संपुष्टात आली. निजामावरील स्वारीचे भव्य यश संपादून पुण्यास परतलेल्या नानाला जुन्नरवरील बाजीरावादी त्रिवर्गाचा एकतर साफ विसर पडला अथवा त्यांची सोय लावण्याची त्याला इच्छा नव्हती असे म्हणा, पण शब्द दिल्याप्रमाणे त्याने मोहीम संपल्यावर बाजीरावाची पुढील व्यवस्था लावून देण्याकडे दुर्लक्षच केले. परिणामी, बाजीरावाने थेट पेशव्यासोबतच संधान बांधण्याचा प्रयत्न केला.   

    बाजीराव व त्याच्या परिवाराच्या रक्षणाकरता पण आतून त्यांच्यावर नजर ठेवण्याकरिता नानाने बळवंतराव नागनाथ वामोरीकर यांस नियुक्त केले होते. बाजीरावाने या बळवंतरावासच घोळात घेऊन त्याच्याच मार्फत स. माधवाकडे चिठी पाठवून ' भेटण्याची इच्छा ' दर्शवली. बळवंतरावाने बाजीरावाची चिठी पेशव्याकडे पोहोचवली खरी, पण त्याची बातमी नानांस लगेच समजली व त्याने बळवंतराव वामोरीकरास कैदेत टाकून पेशव्याची थोडी कानउघडणी केली. नानाच्या नजरकैदेत राहून नानाच्याच माणसाच्या हस्ते एवढे मोठे राजकारण शिजवणाऱ्या रावबाजीच्या कुटील बुद्धीची नानाला हि पहिलीच सलामी होती. नानाने यावेळपासूनच बाजीराव विषयी आपल्या मनाशी खूणगाठ बांधली खरी पण दरम्यान स. माधवाचा अपघाती मृत्यू झाल्याने व त्यांस पुत्रसंतान नसल्याने पेशव्यांच्या मसनदीवर आता कोणास बसवावे हा प्रश्न नानासह सर्वच मुत्सद्दयांच्या पुढे दत्त म्हणून उभा राहिला.   

                                                                                                                                                                              ( क्रमशः )