शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - ३ )


    महाड येथे बसून नानाने प्रथम बाजीरावासोबत आपले संधान बांधले. बाळोबा - भाऊच्या हातून कारभार काढायचा तर गादीवरील पेशवा आपल्या पक्षाचा हवा हे नानास ठाऊक होते. भाऊ व शिंद्याकडून पोळला गेलेला बाजीराव यावेळी सहज आपल्या गळाला लागेल अशी त्याची अटकळ होती व तसेच घडले. बाजीराव त्यांस अनुकूल होताच, कारस्थान सिद्धीस नेण्याकरिता परदरबारांशी आपण जे करार करू त्यांस पेशवेपदी
विराजमान झाल्यावर बाजीरावाने मान्यता द्यावी अशी नानाने प्रथमच अट घातली. बाजीरावास काय, यावेळी पेशवेपद मिळण्याशी मतलब ! तेव्हा त्याने ' हो ' ला ' हो ' म्हणून वेळ मारून नेली. बाजीरावाशी संधान जुळताच नानाने निजामाशी सुत जुळवले. खर्ड्याच्या तहातील सांपत्तिक व प्रादेशिक दंडाची अट आपण सोडून देऊ, बदल्यात बाजीरावास पेशवेपद व आपणांस कारभारीपद मिळवून देण्याच्या मसलतीत
निजामाने शरीक व्हावे अशी नानाने मागणी केली. हि मागणी निजाम काय म्हणून नाकारेल ? त्याने लगेच त्यांस मान्यता दिली. निजामापाठोपाठ नानाने नागपूरकर भोसल्यांकडे आपला मोर्चा वळवला. खर्ड्याच्या तहात भोसल्यांना जो कागदावर गढे मंडळचा प्रांत मिळाला होता त्याचा ताबा अजून त्यांना देण्यात आला नव्हता.त्याची लालूच दाखवून नानाने भोसल्यांना आपल्या पक्षात मिळवून घेतले. भोसले - निजाम आपल्या गोटात दाखल होताच नानाने इंग्रजांशी बोलणी आरंभली.

    आपणांस कारभारीपद मिळावे यासाठी इंग्रजांनी मदत करावी अशी नानाने मागणी केली खरी, पण त्याबदल्यात इंग्रजांना काही देण्याचे त्याने मान्य केले नाही वा त्यांना लालूचही दाखवली नाही. अर्थात, इंग्रजही मोठे वस्ताद ! त्यांनी नाना आपल्या आश्रयास येणार असल्याची बातमी उठवली. नानाच्या मुक्कामासाठी साष्टीच्या किल्ल्यात व्यवस्था केली जाऊ लागली. दिल्लीवर शिंद्यांचा ताबा असल्याने दिल्ली
जिंकण्यासाठी कलकत्ता, लखनौ, मुंबई येथे पलटणे गोळा होऊ लागली. वास्तविक, याबाबतीत इंग्रजांचे धोरण प्रत्यक्ष कृतीपेक्षा राजकीय दबावाचेच अधिक होते. यावेळी त्यांचा हिंदुस्थानातील गव्हर्नर जनरल सर जॉन शोअर असून त्याला यावेळी युद्धाची भानगड अजिबात नको होती. कारण, युद्धासारखी खर्चिक बाब अंगावर न घेण्याची त्यांस कंपनीच्या चालकांची ताकीद असल्याने व खुद्द त्याला देखील हि दगदग नको असल्याने निव्वळ कागदी घोडे नाचवण्याचा उपक्रम त्याने स्वीकारला. खेरीज, नानावर त्याचा देखील जितक्यास तितकाच विश्वास होता ! असो, स्वपक्षाची जुट बनवत असताना नानाने प्रतिपक्षात फूट पाडण्याचाही उपक्रम चालवला.

    पटवर्धन भावबंदांत त्याने यशस्वीपणे तेढ निर्माण केली. अर्थात आधीच पटवर्धन मंडळींत मतभेद असल्याने नानाचा हा डाव सहज सिद्धीस गेला हा भाग वेगळा ! खेरीज परशुरामभाऊस पुण्यातून बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरकरा छत्रपतींना त्याने भाऊच्या जहागिरीवर हल्ला चढवण्याची फूस व आर्थिक मदतही देऊ केली. यावेळी छत्रपतींनी नानाला सरळ विचारले कि, ' आज भाऊ व तुमच्यात विरुद्ध आहे. परंतु उद्या तुम्ही एकत्र आल्यावर भाऊ आमच्यावर स्वारी केल्याखेरीज राहणार नाही. त्यावेळी तुम्ही आमचे संरक्षण करणार कि नाही ? ' नानाने यासमयी, भाऊने भविष्यात करवीरकरांवर स्वारी केल्यास कोल्हापूरकरांचे रक्षण करण्याची हमी घेतली. त्यामुळे छत्रपती निःशंक झाले. भाऊचा बंदोबस्त करून नानाने दौलतराव - बाळोबाकडे आपले लक्ष वळवले. बाळोबा हा शेणवी असून शिंदे दरबारात नाही म्हटले तरी शेणवी गटाविरुद्ध काही मंडळींच्या मनात द्वेष होताच. नानाने त्या द्वेषास खतपाणी घातले. परिणामी शिंद्याच्या एकसंध लष्करांत फाटाफूट होऊ लागली. शेणवी विरोधी गटाने दौलतरावाचे कान भरण्यास आरंभ केला. ' शेणवी मंडळींच्या नादी लागून तुम्ही आपल्या सरदारकीचा विध्वंस करत आहात. नानाच्या पक्षाला निजाम, भोसले, इंग्रज सामील असल्याने त्याच्याशी वैर घेणे योग्य नाही.' असे त्यांस सांगू लागले. त्याशिवाय महादजीची केशरी म्हणून उपस्त्री होती. तिच्याही मार्फत नानाने दौलतरावास आपल्या पक्षास मिळवून घेण्याची खटपट केली. परिणामी, दौलतरावाचा कल बाळोबाच्या विरोधात नानाच्या पक्षाकडे झुकू लागला. दौलतरावास पक्के बांधून घेण्यासाठी नानाने त्यांस एक कोट रोख, अहमदनगरचा किल्ला व दहा लक्षांच्या जहागिरीचे आमिष दाखवले. झालं. दौलतरावाची स्वारी पूर्णतः विरघळली व त्याने नानाच्या पारड्यात आपले दान टाकले.    

    नाना फडणीस महाडात बसून एवढे मोठे कारस्थान उभारत होता त्याची परशुराम व बाळोबा जोडीस कल्पना आली नाही असे नाही. नाना निजामाच्या गळ्यात गळे घालतोय म्हटल्यावर भाऊने पुण्यास नजरकैदेत असलेल्या निजामाच्या कारभाऱ्याकडे --- मशीरकडे वाटाघाट आरंभली. मशीरला नानाने खर्ड्याच्या युद्धात राजकीय कैदी म्हणून ताब्यात घेतल्याने त्याच्या मनी नानाविषयी आकस असणार हे गृहीत धरून भाऊने त्यांस कैदेतून मुक्त करण्याची लालूच दाखवली. बदल्यात निजामाला आपल्या पक्षास पाठिंबा देण्यास्तव तयार करण्याची जबाबदारी त्याने मशीरवर सोपवली. वास्तविक भाऊचे हे कृत्य त्याच्या राजकीय अपरिपक्वतेचे उदाहरण समजले पाहिजे. जिथे मशीरचा धनीच --- निजाम नानाला अनुकूल झाला तिथे मशीर भाऊला मिळाला न मिळाला दोन्ही सारखेच ! इकडे नाना - मशीरचे सुत आधीच जुळाले होते. नानाने निजामापाठोपाठ मशीरला आपल्या घोळत घेतले. मशीरने पण आपल्या स्वार्थावर जास्त लक्ष दिले व भाऊच्या पक्षात वरकरणी सामील झाला. भाऊने मशीरची कैदेतून सुटका करताच त्याने पुण्यातच स्वतंत्र तळ ठोकून नानाविरुद्ध लष्करी कारवाईत सहभागी होण्यासाठी लष्कर भरतीचा देखावा उभारला. अशा प्रकारे नानाचे कारस्थान रंगात आले. आता नानाचे पुणे आगमन व बाजीरावाची पेशवेपदी स्थापना या दोनच गोष्टी घडायच्या राहिल्या होत्या. त्या दृष्टीने घटना घडवल्या जाऊ लागल्या. घडू लागल्या. पुण्यात नानाचे काही हितचिंतक होते. त्यांच्या मार्फत ' नवकोट नारायण ' नाना हुजुरातीची फौज फोडू लागला. भाऊ व तात्याला हि बातमी समजताच त्यांनी धरपकड आरंभली. पैकी, हरिपंताचा मुलगा बाबा फडके कैदेत गेला तर मालोजी घोरपडे, नीळकंठराव प्रभू वाईला निघून गेले आणि नारोपंत चक्रदेव मशीरच्या गोटांत लपला. फितुरीच्या या घटनांनी तात्या - भाऊ सावध झाले व या बखेड्याचे मूळ --- बाजीरावास मानून त्याला उत्तरेत बंदोबस्तात ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेऊन अंमलातही आणला. बाळोबातात्याने आपला विश्वासू सरदार तुळजोजीराव उर्फ सखाराम घाटगे याच्या देखरेखीखाली बाजीरावाची रवानगी उत्तरेत केली. बाजीरावास घेऊन घाटगे जांबगावी आला आणि येथेच रावबाजी व घाटग्याचे नशीब पालटले. 
 
    सखाराम घाटगे स. १७७८ पासून ९६ पर्यंत नानाच्या सेवेत शिलेदार म्हणून कार्यरत होता. शिंद्याच्या भीतीने नाना पुणे सोडून गेल्यावर घाटगे शिंद्याच्या सेवेत दाखल झाला. इतिहासकारांच्या मते, यामागे नानाची प्रेरणा होती. परंतु, मला ते मान्य नाही. तसेच घाटगेचे पुढील चरित्र पाहता त्याने नानाच्या सांगण्यानुसार या वेळी हालचाली केल्या असे म्हणणे चुकीचे ठरेल. असो, बाजीरावाने यावेळी स्वयंस्फ़ूर्तीने घाटगेच्या मार्फत दौलतरावासोबत एक गुप्त करार केला. त्यानुसार नानाचे कारस्थान जाऊन बाजीराव पेशवा बनल्यावर दौलतरावाने उत्तरेत परत न जाता जोवर नाना जिवंत आहे तोवर पुणे वा पुण्याच्या आसपास राहून बाजीरावाचे संरक्षण करायचे. या बदल्यात रोख दोन कोट रुपये व पुण्यात जितके दिवस शिंद्याचा तळ राहील --- म्हणजे नाना मरेपर्यंत --- तितक्या दिवसांचा खर्च देण्याचे बाजीरावाने मान्य केले. बव्हंशी इतिहासकारांच्या मते या कराराने मराठी राज्याच्या विनाशास चालना मिळाली, राज्याची कबर खोदली गेली. परंतु इतिहासकारांचे मत - निष्कर्ष एकतर्फी आहेत. बाजीराव नानाला घाबरला असे समजून केलेले हे आरोप आहेत. वास्तविक स. माधवाचा जो अपघाती मृत्यू झाला तो अपघात नसून खून असल्यानेच बाजीरावास हि तरतूद करणे भाग होते. बाजीराव - दौलतराव यांचा करार घडून येण्यामागे सखाराम घाटगेचा मोठा हात होता. बाजीराव - दौलतरावाची मैत्री घडवून आणताना त्याने आपले स्वहित चांगलेच साधून घेतले. या सखारामास बायजाबाई नावाची लग्नाच्या वयाची मुलगी होती. तिच्या सौंदर्यासाठी ती तेव्हा प्रसिद्ध असून तिच्याशी विवाह करण्याची दौलतरावाची इच्छा होती. पण घाटगे हा खानदानी मराठा असल्याने त्याला शिंद्यांचे निव्वळ ' मराठा ' असलेले स्थळ तोलामोलाचे वाटत नव्हते. मात्र हे कारण वरपांगी होते. पुष्कळ पैसा व अधिकारपद मिळाल्यास त्याला दौलतराव जावई म्हणून नको होता असे नाही. बाजीराव नानाच्या कृपेने दौलतरावाचा मित्र बनलेला असल्याने त्याने आपली मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी हे लग्न जुळवण्यात पुढाकार घेतला व घाटग्याचे मन वळवून त्यांस दौलतरावास आपली मुलगी देण्यास राजी केले. बदल्यात दौलतरावाने त्यांस आपली दिवाणगिरी देऊ केली ! सखारामाचा ' सर्जेराव ' केला. घाटग्याचा हा पराक्रम व दौलतरावाची दर्यादिली पाहता पेशवाई संपल्यावर देखील इंग्रजांनी ग्वाल्हेरचे संस्थान जिवंत का ठेवले याचा काहीसा उलगडा होतो.

    सखाराम घाटग्याच्या मार्फत बाजीराव - दौलतरावाचे स्वार्थाधिरित मैत्रीसंबंध प्रस्थापित झाल्याचे नानाला माहिती नव्हते. त्याचे सर्व लक्ष भाऊ - तात्याचा कारभार हाणून पाडण्याकडे केंद्रित झाले होते. आपल्या योजनेनुसार सर्व गोष्टी जुळून आल्याची खात्री पटताच त्याने परशुरामभाऊ व बाळोबातात्याच्या अटकेची योजना आखली. त्यानुसार त्याने दौलतराव व होळकर आणि इतर सरदारांना सुचना दिल्या. निजामाची फौज आपल्या हद्दीत गोळा होऊ लागली. भोसले पुण्याकडे येऊ लागले. तत्पूर्वीच दि. २६ ऑक्टोबर १७९६ रोजी रात्री दौलतरावाने चलाखी करून बाळोबा व त्याच्या सहाय्यकांस कैद केले. इकडे मशीर व होळकर परशुरामभाऊला पकडण्यासाठी तयार झाले. परंतु त्यांच्या दुर्दैवाने कटाची बातमी फुटून उशीरा का होईना भाऊला खऱ्या परिस्थितीची कल्पना आली व त्याच रात्री --- म्हणजे ता. २६ ऑक्टोबर १७९६ रोजी रात्री आपली असेल नसेल तेवढी फौज गोळा करून व बालपेशवा चिमाजीस सोबत घेऊन भाऊ जुन्नरला रवाना झाला. परंतु बापू व यशवंतराव होळकराने त्याची पाठ सोडली नाही. पर्वतीजवळ भाऊ व बापू - यशवंतची गाठ पडून भाऊची फौज त्यांनी उधळून लावली. इकडे मशीरने भाऊचा कात्रजचा तळ साफ लुटून टाकला. पराभूत भाऊ चिमणाजीसह जुन्नरला गेला खरा पण, परिस्थिती पाहून तो रास्त्यांच्या स्वाधीन झाला व नारोपंत चक्रदेवाच्या हवाली त्याने चिमाजीस केले. अशा प्रकारे भाऊ व बाळोबाचा औटघटकेचा कारभार संपुष्टात येऊन चिमणाजीची पेशवाई अळवावरच्या पाण्याप्रमाणे लुप्त झाली. घडल्या प्रकाराची बातमी नाना - बाजीरावास कळवून त्यांना तातडीने पुण्यास येण्याची सुचना दौलतरावाने केली. 

    इकडे जांबगावी बाजीरावाचा मुक्काम असताना त्याला परत पुण्याला घेऊन येण्याविषयी दौलतरावाने सखाराम घाटगेस हुकुम केला. त्यानुसार घाटगे बाजीरावास घेऊन पुण्याच्या दिशेने येऊ लागला. वाटेत कोरेगाव मुक्कामी बाजीरावाने नाना फडणीसला पत्र पाठवून तातडीने पुण्यास येण्याची विनंती केली. त्याला पेशवेपदाची घाई तर झाली होतीच पण कदाचित या मुत्सद्दयांची बुद्धी फिरली तर काय ? हि धास्ती त्यांस असावी. असो, बाजीराव पुण्यास येईपर्यंत दौलतरावाने अमृतराव पेशव्यालाही पुण्यास आणून ठेवले. यावेळी कारभाराचा जो काय सोक्षमोक्ष होईल तो लावण्याचा त्याचा विचार असावा. 

    शिंद्याच्या सुचनेनुसार नाना पुण्यास आला खरा पण त्याची व बाजीरावाची गाठभेट काही लवकर झाली नाही. महाडच्या कारस्थानाचा प्रमुख निर्माता नाना तर हे कारस्थान ज्याच्याकरता उभारले गेले तो बाजीराव --- यांचे एकमेकांविषयी मन साफ नसल्याने उभयतांच्या भेटीचा मुहूर्त काही लागेना. शेवटी निजामाचा दिवाण मशीर व नागपूरकर दुसरा रघुजी भोसले यांनी उभयतां मध्यस्थी केली व नानाच्या जीवास, अब्रूस धक्का लावणार नाही अशी बाजीरावाकडून लेखी कबूली लिहून घेतल्यावर नानाने रावबाजीची भेट घेऊन कारभार हाती घेण्यास संमती दर्शवली.

    परंतु, एवढे होऊन देखील नाना - बाजीरावाची दिलजमाई काही झाली नाहीच. नानाचा भरवसा नसल्याने बाजीरावाने दौलतरावाची पलटणे मुद्दाम आपल्या तळावर ठेवून घेतली. त्यामुळे नानाला त्या दोघांचा संशय येऊन त्याने होळकरांशी सख्य वाढवण्यास आरंभ केला. तेव्हा दौलतरावाने स्वतः नानाची भेट घेऊन त्याची समजूत काढली. इकडे आबा शेलूकराच्या मार्फत नानाने पेशवाईची वस्त्रे साताऱ्याहून मागवली होती. त्यांचा स्वीकार ता. ५ डिसेंबर १७९६ रोजी बाजीरावाने खराडीच्या मुक्कामी केला. या समारंभास भोसले, होळकर वा शिंदे हजर नसल्याचे रियासतकार सरदेसाईंनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे भाऊ, बाळोबा कैदेत पडले असताना व जवळ शिंद्यासारखा प्रबळ पाठीराखा असताना देखील वस्त्रे स्वीकारण्याचा कार्यक्रम शनिवारवाडा वा पुण्यातील इतर सरकारी वाड्यांत न होता खराडीच्या लष्करी तळावर झाला.
                                  
                                                                                     ( क्रमशः )

४ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

खुपच छान लेख आहे

sanjay kshirsagar म्हणाले...

धन्यवाद Anant Zunjarrao साहेब !

umesh म्हणाले...

3260छान

sanjay kshirsagar म्हणाले...

umesh जी ' छान ' समजले पण हे ३२६० काय आहे ?