सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - ४ )


    बाजीराव पेशवा बनला. नानाकडे कारभारीपद आले पण राज्यकारभाराचे गाडे काही सुरळीतपणे चालेना. खराडीच्या लष्करी छावणीतून बाजीराव शनिवारवाड्यात आला खरा पण आल्याबरोबर त्याने वाड्याभोवतीचे नानाने नियुक्त केलेले हुजुरातीचे जुने पहारेकरी काढून त्यांच्या जागी नवीन लोकं व शिंद्याची पथके उभी केली. याचा योग्य तो अर्थ घेऊन नानाने पेशव्याच्या भेटीला जाण्याचे बंद करून आपल्या वाड्याभोवती अरबांची पलटणे तैनात केली. दोन्ही बाजूंची मंडळी रात्रंदिवस लढाईच्या पवित्र्यात उभी राहू लागली. इकडे महाडचे कारस्थान फळास येऊन बाजीराव - नानाच्या मनोकामना पूर्ण झाल्या पण शिंद्याला मात्र अजून हवा तसा मदतीचा मोबदला मिळाला नव्हता. त्यासाठी त्याने नानाच्या पाठीमागे लकडा लावला. परंतु, नानाने करारातील शब्दांकडे बोट दाखवत, " करार केल्याप्रमाणे पैसे देईन. परंतु ठरल्याप्रमाणे पुण्यातून जांबगावी पोहोचल्यावर ५० लक्ष व गोदावरी पार केल्यावर उर्वरित ५० लाख देण्यात येतील. तोवर एक छदामही देणार नाही. " अशा आशयाचे उत्तर दिले. त्यामुळे शिंदे भडकला. महाडचे कारस्थान रचताना नानाने प्रथमच एक काळजी घेतली होती व ती म्हणजे शिंद्याची लष्करी मदत घेऊन आपले आसन बळकट करायचे व त्याला त्वरित उत्तरेत पाठवून द्यायचे. जर तो दक्षिणेतच पाय मुरगाळून बसला तर आपल्याला त्याच्याकडून कधीही दगा होऊ शकतो. त्यामुळे मूळ करारातच नानाने अशा अटी घातल्या कि, पैशांच्या प्राप्तीसाठी का होईना शिंदे पुण्यातून बाहेर पडेल. परंतु, शाब्दिकदृष्ट्या नानाची बाजू कितीही बरोबर असली तरी दौलतराव त्याचे काही एक ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हता. स. १७९२ पासून ९६ - ९७ पर्यंत जवळपास चार - पाच वर्षे शिंदेशाही फौजा पुण्याच्या आसपास तळ ठोकून होत्या. आरंभी महादजीसोबत आलेली फौज तशी जुजुबी होती. परंतु खर्ड्याच्या संग्रामासाठी आणलेली बरीचशी फौज परत उत्तरेत गेली नव्हती. ती व आधीची मिळून सुमारे ५० हजार सैन्याचा खर्च चालवण्याची दौलतरावाची ऐपत व ताकद असली तरी इच्छा नव्हती. स्वतःच्या खजिन्याला तोशीस न पडता परस्पर खर्च निघत असेल तर त्यांस ते हवेच होते. त्यामुळे त्याने पैशांसाठी नानाकडे तगादा लावणे स्वाभाविकच होते. नाना दौलतरावस ओळखून असला तरी त्यालाही फारसे ताणून धरणे शक्य नव्हते. कशाही प्रकारे त्याला दौलतरावाची ब्याद पुण्यातून बाहेर काढायची असल्याने त्याने वीस लाख रुपयांचा तुकडा दौलतरावाच्या तोंडावर फेकला. नानाला वाटले, पैसे मिळाल्यावर शिंदे पुण्यातून हलेल. पण कसचे काय ? शिंदे तर पुण्यातच फतकल मारून बसला.  

    नाना - बाजीराव कराराची यादी :-  याच सुमारास नानाने आपल्या काही प्रमुख मागण्यांची यादी बाजीरावाकडे पाठवली. ती येथे समग्र देतो :-
 
    सेवेसी विज्ञापना ऐसीजे, स्वामींची कृपा मजवर. माझे लक्ष स्वामींपाशी, हे कित्येकास असह्य होऊन त्यांनी राज्यात बखेडा करून आचरु नये ते कर्म स्वामींशीं अमर्यादेचे आचारिले. मी महाडास राहून राजकारणे वगैरे करून राजश्री दौलतराव शिंदे व सेवकाने करावयाचे ते करून, स्वामींचे पुण्य मदत होऊन, सर्व गोष्टी मनोदयानुरूप घडल्या. येणेकरून सेवकास कृतकृत्यता झाली. पुढे सेवा करावी अशी शरीरात ताकद व शक्ती राहिली नाही. यास्तव मागणे हेच की, कृपा करून स्वस्थ स्नानसंध्या करून स्वामींस अभीष्ट चिंतून राहण्याविषयी आज्ञा व येविषयी करार करून देण्याची कलमे ---
(१) दत्तपुत्र घेणेची आज्ञा आहे, त्याप्रमाणे घेणेत येईल. त्याचे हातून पूर्ववतप्रमाणे फडनिशीचे दरकाचे वगैरे काम घेऊन लोभाने सरंजाम वगैरे चालत आल्याप्रमाणे चालवावा. किल्ले लोहगड सरकारांतून व किल्ले केळजा पंत सचिवांकडून आहे, त्याप्रमाणे असावे. माझेविषयी चित्तांत संशय नसावा. कोणी घालू लागल्यास ठेवू नये. 

( श्रीमंतांची मखलाशी ) - येणेप्रमाणे करार    

(२) पहिला सरंजाम स्वारांचा आहे. हल्ली हजार गारदी यांचा जाजती देऊन जेथे राहणे होईल तेथे त्यांनी चौकी पहाऱ्यास असावे. याची परवानगी. 
( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार 

(३) परभारा गाव जहागीर मिळवली त्यापैकी सरकारात घेऊन सरकारांतून पंचवीस हजारांचे गाव सोईचे इनाम करून द्यावे. कै. राव यांनी कृपा करून सर्फराज केले तसे चालवावे.
( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार 

(४) श्रीकाशीस जावयाचा बेत आहे. यास्तव इंग्रजांस सरकारची पत्रे व दौलतराव शिंदे यांची पत्रे द्यावी की, संतोषाने निरोप दिला. संतोषाने येथे राहतील. हरएकविशी साहित्य करीत जावे. 
( या कलमावर श्रीमंतांची मखलाशी नाही. ) 

(५) राजकारणसंबंधे शिंदे, नवाब व भोसले व पन्हाळेकर वगैरे जागा करार व वचने गुंतली त्याच्या तोडी व्हाव्या. राजकारणात ज्याचा जसा उपयोग पडला असेल त्याप्रमाणे तोड पडावी. 
( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार 

(६) सरकारचे कामात मसलत करून कारणासंबंधे खर्च झाला तो सरकारातून उगवे असे व्हावे. 
( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार 

(७) हरिपंत फडके यांनी राज्यात सेवा केली. त्यांचे पुत्रांचे चालवावे. 
( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार 

(८) महाडास सोबत दिली. ते समयी त्यांस वचने दिली आहेत. आबाजी कृष्ण शेलूकर, दादा गद्रे, बजाबा शिरवळकर, धोंडोपंत नित्सुरे मिळून चार. सदरहू मिळोन दोन हजार स्वारांचा सरंजाम सरकारातून देऊन सेवा घ्यावी. 
( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार

(९) दादा गद्रे व आबाजी कृष्ण शेलूकर यांजकडे वसई सरसुभा व किल्ले रायगड व अहमदाबादचा सुभा व पागा सरकारांतून आहे, त्याप्रमाणे चालवावे. तेही एकनिष्ठपणे सेवा करतील. 

( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार

(१०) धोंडोपंत नित्सुरे यांनी सेवा चांगली केली. यास्तव विसापूरचे काम त्यांस सांगावे. 

( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार

(११) राघो विश्वनाथ गोडबोले यांजकडे सरकारांतून तोफखाना व चार हजार गाडदी यांचे काम होते. त्यास हल्ली हजार गाडद्यांचा रिसाला सांगून बंदोबस्त करून देणेची आज्ञा व्हावी. 

( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार

(१२) स्वराज्य व परराज्य यांशी करार व तहनामे आहेत त्याप्रमाणे चाल असावी. मोठी मसलत पडेल त्यास बरोबरीचे सरदार शिंदे, होळकर वगैरे यांचे सल्ल्याने चांगले ते होत असावे. 

( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार

(१३) नारोपंत चक्रदेव व गोविंदराव पिंगळे यांनी श्रमसाहस करून सेवा केली. त्यांस सर्फराज करून पुढे बंदोबस्त स्वरूप वाढवून व्हावा. 

( मखलाशी ) - येणेप्रमाणे करार

एकूण कलमे ( तेरा पैकी काशीस जाण्याचे कलम खेरीजकरून बाकी ) बारा.
                                                     ( दि. १ जानेवारी १७९७ )


[ संदर्भ ग्रंथ :- नाना फडनवीस यांचे चरित्र.  लेखक :- वा. वा. खरे ]   
 

    विश्लेषण :-  बाजीरावाने नानाच्या १३ मागण्यांपैकी १२ मान्य केल्या पण त्याची काशीयात्रेची अट मात्र अमान्य केली. बाजीरावाच्या या कृत्याने मराठीतील मोठमोठे इतिहासकारही बुचकळ्यात पडले व त्यांनी पेशव्याच्या या कृतीचा अर्थ --- बाजीरावाला नानाचा सर्वस्वी नाश करायचा होता असा काढला. सोयीस्कर निष्कर्ष काढण्यात आपल्या इतिहासकारांचा हात जगात कोणी धरू शकत नाही ! जर बाजीरावाला नानाचा नाशच करायचा होता तर त्याने त्याच्या १२ मागण्या तरी मान्य का केल्या असत्या असा साधा प्रश्नदेखील यांना पडू नये ? नानाला जर खरोखरच राजकारणातून निवृत्ती घेऊन काशीवास करायचा होता तर त्याने कारभारीपदाची वस्त्रे का घेतली याचाही विचार करू नये ? नानाचे पक्षपाती इतिहासकार त्यांना अडचणीचे मुद्दे कसे नजरेआड करतात याचे हे एक समर्पक उदाहरण आहे. असो, आपण या ठिकाणी नानाची काशीयात्रेची मागणी बाजीरावाने का नाकारली या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. 

    नानाच्या १३ मागण्यांपैकी त्याच्या स्वतःकरता असलेल्या ६ कलमांपैकी ५ कलमे प्रथम आपण विचारात घेऊ. नाना यावेळी ५४ - ५५ वर्षांचा असून त्याला पुत्रसंतान नसल्याने वंश सातत्यासाठी त्यांस दत्तक पुत्र घ्यायचा होता. आपले पद, अधिकार आपल्या दत्तक पुत्रास मिळावेत अशी त्याची इच्छा होती. बाजीरावाने त्यांस संमती दिली. पण नानाच्या मुलाला नानाचा अधिकार मिळणार कधी ? तर नानाने स्वखुशीने निवृत्ती घेतली तर वा त्याचा मृत्यू झाला तर ! पैकी निवृत्ती कधी घेणार याविषयी नानाने या ठिकाणी अजिबात उल्लेख केला नाही. असो, नानाला सरकारातून जे किल्ले व सरंजाम मिळाले होते ते तसेच पुढे कायम चालवायचे देखील बाजीरावाने मान्य केले. हजार जादा गारद्यांचा सरंजाम देण्याची व नाना जिथे राहील तिथे त्यांनी चाकरी करण्याची मागणीही पेशव्याने मान्य केली. नानाला परदरबारातून जी गावं जहागीरीदाखल मिळाली होती त्यांपैकी पंचवीस हजार उत्पन्नाची गावं त्यांस सोईची अशी हवी होती. तेव्हा परदरबारातून मिळालेली गावं सरकारांत घेऊन बदल्यात नानाला सोईची पडतील अशा ठिकाणी गावं जहागिरीदाखल द्यावीत. नानाची हि अट चमत्कारिक असली तरी मान्य करण्यात आली. तसेच आजवर राजकारणं करताना नानाने जो काही पदरचा पैसा खर्च केला असेल तो देखील परत देण्याचे बाजीरावाने कबूल केले. त्याशिवाय नानाच्या पक्षपात्यांचे सरंजाम व पदे कायम ठेवून त्यांच्याकडून सेवा घेण्याचेही बाजीरावाने मान्य केले. या सर्व पार्श्वभूमीवर नानाच्या काशीयात्रेचा मुद्दा बाजीरावाने अमान्य करावा यात विशेष नवल ते काय ?

    नाना निवृत्त कधी होणार ते निश्चित नाही. नानाला दत्तक पुत्र घेण्याची परवानगी देऊन त्यांस फडणीशी द्यायची. नानाच्या सोईच्या ठिकाणी जहागीरीची गावं नेमून द्यायची. नानाच्या ताब्यातील किल्ले तसेच ठेवायचे. आणि एवढे करून वर नानाला काशी येथे राहण्यासाठी इंग्रजांनी परवानगी द्यावी यासाठी बाजीराव - शिंद्याने इंग्रजांना पत्रे द्यायची होती. म्हणजे नाना निवृत्त होऊन काशीला जाणार. त्याच्या ताब्यातील किल्ले त्याच्या मुलाच्या --- म्हणजे त्याच्याच ताब्यात राहणार. नानाचे सहाय्यक महत्वाच्या पदांवर कार्यरत राहणार. नानाच्या सोयीच्या जागी म्हणजे नाना राहणार तिथे त्याला २५ हजार उत्पन्नाची गावं जहागिरीदाखल द्यायची. याचा अर्थ नानाला स्वतंत्र राज्य वा संस्थान तोडून देण्यासारखं होतं. नानाच्या या मागण्या आणि इंग्रजांच्या वसई तहातील अटी यांच्यात तसा फारसा फरक दिसत नाही. नानाच्या या मागण्या बाजीरावाने मान्य केल्या असत्या तर नानाचे स्वतंत्र एक असे सत्ताकेंद्र पेशव्याच्या डोक्यावर निर्माण होऊन त्याने पेशव्याला आपल्या मनाप्रमाणे नाचवले असते. माझ्या मते यांमुळेच बाजीरावाने नानाची काशीयात्रा अट अमान्य केली.

    महाडच्या कारस्थानात ठरल्याप्रमाणे बाजीरावाने कबूल केलेले करार अंमलात आणावेत यासाठी निजाम - भोसले नानावर दडपण आणू लागेल. निजाम - भोसल्यांची मागणी नानाने बाजीरावास कळवली असता हे करार पाळण्यास आपण बांधील नसल्याचे बाजीरावाने स्पष्ट केले. अर्थात, यांमुळे नानाची पत कायम राहून उलट बाजीरावाविषयी इतरांच्या मनात अविश्वास निर्माण झाला. याविषयी कित्येक इतिहासकारांनी वचनभंगाबद्दल बाजीरावस सडकून दोष दिला आहे. केलेले करार न पाळण्याची ख्याती असलेल्या निजामाकरता इतिहासकारांनी बाजीरावास दोष देणे थोडे विचित्र वाटते. पण हा मुद्दा बाजूला ठेवू. निजामाबरोबर केलेले करार जसेच्या तसे पाळले गेले असते तर खर्ड्याच्या प्रकरणाने निजामाचे घसरलेले राजकीय वजन पुन्हा वाढले असते. खेरीज या कृत्याने निजामाचा पेशव्यावर नैतिक दाब बसला असता तो वेगळाच. दुसरे असे कि, निजामाने केलेल्या मदतीचा त्वरित मोबदला देण्याचे नाकारून बाजीरावाने आपली विश्वासर्हता गमावली असे आपण समजत असलो तरी त्यावेळचे राज्यकर्ते किंवा खुद्द निजाम तसे समजत होता असे दिसून येत नाही. 

 
    भोसल्यांच्या बाबतीत देखील असेच म्हणावे लागेल. नागपूरकर भोसल्यांचा व पेशव्याचा सख्यभाव थोरल्या बाजीरावापासून जगजाहीर होता. पेशव्यांच्या वा छत्रपतींच्या स्वारीत भोसले कधी मनापासून सामील झाले असे घडले नाही. उलट प्रसंग पडताच त्यांनी मराठी राज्याच्या शत्रूंशी त्यांनी हातमिळवणी केल्याची उदाहरणे ढीगभर आढळतात. त्यामुळे भोसल्यांचीही मागणी तडकाफडकी मान्य न करता काही काळ वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारण्याचा बाजीरावाचा विचार असावा. पण बाजीरावाचे हे धडपडत राज्यकारभार, राजकारण शिकणे म्हणजे ऐन युद्धात तलवारीचे हात शिकण्यासारखे होते. याचा व्हायचा तो परिणाम राज्यकारभारावर झाला. होऊ लागला.

 
    नानाने दिलेला शब्द पाळण्याचे पेशवा नाकारू लागताच चिडलेल्या मशीरने हैद्राबादेस प्रस्थान ठेवले व तिकडून पुण्यावर स्वारी करण्यासाठी लष्कर पाठवण्याची सुचनाही त्याने केली. त्यानुसार निजामाच्या फौजा व मुसा रेमूच्या हाताखालील कवायती पलटणे सरहद्दीवर गोळा होऊ लागली. इकडे नागपूरकरांचीही वीस हजारांची सेना माहूरजवळ आली. लष्करी कारवाईचा धाक दाखवून निजाम - भोसले आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा डाव खेळत असल्याचे पाहून शिंद्याने उत्तरेतून अंबाजी इंगळ्याची फौज व एक कवायती कंपू दक्षिणेत बोलावला. मिळून पुण्याच्या आसपास लढाई जुंपणार असा रंग दिसू लागला. तेव्हा बाजीरावाने माघार घेऊन नानाच्या मार्फत निजाम - भोसल्यांची समजूत काढून त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. पण तिथेही त्याने आपला शह राखला. निजामाला बत्तीस ऐवजी चोवीस लाखांचा मुलुख व दोन कोट रुपयांऐवजी दीड कोटींची माफी देऊन आपला चौथाईचा अधिकार शाबूत राखला. याला नादानपणा कसा म्हणायचा ? ( स. १७९७ )

                                    
                                                                                    ( क्रमशः )

1 टिप्पणी:

अभय मधुकर शृंगारपुरे म्हणाले...

दुसरा बाजीराव व नाना फडणवीस यांच्यातील राजकिय खेळीचे यथार्थ विवेचन