सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास - ग्रंथ परिचय




     नुकतेच श्री. संजय सोनवणी यांचे प्रकाशित झालेले ' हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास ' हे पुस्तक वाचनात आले, त्यानिमित्त चार शब्द ....

    कथा, कादंबरी, ऐतिहासिक, काव्य, विनोद इ. लेखनाचे विविध प्रकार असून कित्येकजण त्यातील एका तर काहीजण बऱ्यापैकी एकाहून अधिक प्रांतात पारंगत असतात. श्री. सोनवणी त्याच कोटीतील.
    लेखनाचे विविध प्रकार अवगत असूनही हि व्यक्ती कादंबरी लेखनात -- त्यातही थरार कादंबऱ्यांत अधिक रमते. त्यामुळेच महारष्ट्रात व देश - परदेशातही ते अशाच कादंबऱ्यांकरता ओळखले जातात. अशा व्यक्तीने त्याच काळात ब्रह्मसूत्रे, नीतिशास्त्र, अवकाश ताण सिद्धांत सारखे लेखन करावे हा एक अजब भाग आहे. अजब यासाठी कि, स्वतःस अनुकूल असे क्षेत्र सोडून व्यक्ती सहजासहजी दुसऱ्या क्षेत्रात उडी मारत नाही. परंतु स्वतःला बांधून न घेणारी एक कलंदर जमात असते. सोनवणी हे त्या जमातीपैकीच !
    तेव्हा अशा विभूतीने अथक परिश्रमपूर्वक संशोधनांती प्राप्त निष्कर्षांची ग्रंथ स्वरूपात मांडणी केल्यावर त्याची दखल विद्वान जगताप्रमाणेच सर्वसामान्य वाचकांनाही करून घेणे भाग पडते.

    वैदिक आणि हिंदू, हे दोन धर्म एक नसून परस्परांहून भिन्न --- अगदी हिंदू - मुस्लिमांइतके --- भिन्न असे स्वतंत्र धर्म असल्याचे मत श्री. सोनवणी गेली कित्येक वर्षे आपल्या प्रासंगिक लेखनातून मांडत होते. हे लेख वाचनात आल्यावर त्याविषयी सोनवणींशी चर्चाही होत असे व दरवेळी आम्हां वाचकांचा त्यांना आग्रह होत असे कि, या विषयावर एक संदर्भ ग्रंथ प्रकाशित होणे अत्यावश्यक आहे. दरवेळी सोनवणी हि बाब हसण्यावारी नेत असत, टाळण्याचा प्रयत्न करत असत. कारण, माय मराठीचे कौतुक करणारी आम्ही लेकरे मराठी भाषेतील पुस्तकं विकत घेऊन किती वाचतो न् किती नाही, हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही. पुस्तकांची निर्मिती, विक्री यातून लेखकास प्रत्यक्ष मिळणारा मोबदला अत्यल्प असला तरी तोदेखील आता त्यास प्राप्त होत नाही. अशा स्थितीत केवळ या एकाच विषयाला वाहून घेत अभ्यासाचे परिश्रम घ्यायचे कोणी ? असा प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे. परंतु सरतेशेवटी विद्वत्तेच्या या बकासुराने ग्रंथ लेखनाच्या कार्यास हात घातला व आपल्या नेहमीच्या संक्षिप्त शैलीस थोडाफार फाटा देत  पृष्ठांचा संदर्भ ग्रंथ रचला.

    प्रस्तुत ग्रंथात ज्या ज्या मुद्द्यांची चर्चा केली आहे, तिथे तिथे त्या मुद्द्यांस देशी - परदेशी तज्ञांची मते नोंदवत लेखकाने आपले निष्कर्ष नोंदवले आहेत. तसेच मूळ संदर्भांची यादीही सोबत जोडल्याने वाचकांना त्यांचा स्वतंत्र अभ्यास करून ज्याप्रमाणे लेखकाचे मत तपासून पाहता येते तद्वत स्वतःचेही स्वतंत्र मत बनवण्यास वाव आहे.
    
    सामान्यतः कोणत्याही पुस्तकाची प्रस्तावना वाचणे, हे माझ्या मते तरी अतिशय कंटाळवाणे काम असते. कारण कित्येकदा लिहिलेल्या प्रस्तावना या प्रतिपाद्य विषयाशी बिलकुल सुसंगत नसतात. त्यामुळे याही पुस्तकाची प्रस्तावना वरवर चाळून पुढे जाण्याचा माझा विचार होता. परंतु प्रस्तावनेस आरंभ करताना श्री. सोनवणींनी थेट मूळ विषयालाच हात घातल्याने तिचे समग्र वाचन अवश्य बनते.
    वाचकांना माझे आवाहन आहे कि, त्यांनीही प्रथम प्रस्तावना समग्र वाचून, नीट समजावून घ्यावी. कारण मूळ हिंदू व वैदिक धर्मातील प्राथमिक, सैद्धांतिक भेद या प्रस्तावनेतच लेखकाने सोप्या, सरळ भाषेत मांडलेला आहे.

    सर्वप्रथम आपण वैदिक धर्म म्हणजे काय ? हे सोनवणींच्या इतरत्र लिहिलेल्या एका लेखानुसार पाहू :- " वेदांनाच एकमेव अंतिम मुलस्त्रोत मानत, यज्ञादि कर्मकांडांद्वारे धर्मकृत्ये करत, वेदधरित स्मृती आणि ब्राह्मण ग्रंथांना धर्मग्रंथ मानत त्यातील तरतुदींप्रमाणे जगणे म्हणजे वैदिक धर्म. या धर्मातील लोकांना सोळा वैदिक संस्कारांचा धार्मिक आधार असून आता पुरुषांनाच उपनयनाचा अधिकार आहे. "  सामान्यतः यातून वैदिक कोण व हिंदू कोण याची कोणासही कल्पना यावी.

    आपल्या प्रास्ताविकात लेखकाने दोन्ही धर्मातील भेद स्पष्ट करत संस्कृती निर्मितीच्या मुद्द्यालाच थेट हात घातला आहे. कारण भटका मनुष्य शेतीचा शोध लागल्यावर स्थिर होऊन ठिकठिकाणी ज्या संस्कृत्या उदयास आल्या त्यातून पुढील काळात त्या त्या स्थळी धर्म उत्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर विविध संस्कृत्यांचे उल्लेख, त्यांची नामनिर्देशित स्थळे चिंतनीय आहेत.
    सिंधू संस्कृतीचा उदय, हर्ष, ऱ्हास या तीन टप्प्यांची तशी विविध कारणे असली तरी बव्हंशी इतिहासकार यामागे दुसऱ्या संस्कृतीच्या टोळ्यांनी आक्रमण केल्याने प्रथम टोळी संस्कृती -- सिंधू संस्कृती नष्ट झाली, याच सिद्धांतावर अत्याधिक भर देत असतात. म्हणजे यामध्ये विस्थापन, आक्रमण हे दोन सिद्धांत अंतर्भूत होऊन वर्चस्ववादी मनोवृत्ती तयार होऊन इतिहासाचे विकृतीकरण होत जाते.
    सोनवणींनी मात्र हा सरधोपट मार्ग सोडत नैसर्गिक आपत्ती, भूशास्त्रीय कारणे इ. वर अधिक भर देत त्यासंबंधी पुराव्यांची जोड आपल्या विधानांना दिली आहे.
    वर्चस्वतावाद हा केवळ धार्मिकच असतो असे नाही तर त्याला वांशिकतेचीही जोड असते व वांशिक वर्चस्वतावादाचे हिडीस स्वरूप हिटलरच्या रूपाने पुढे आल्यानंतर वांशिकतेच्या जागी भाषिकतेची वर्णी लावत तोच सिद्धांत पुढे रेटण्याचे जगभर कसे प्रयत्न सुरु आहेत व या खेळात केवळ ' आर्य ' शब्दामुळे वैदिकांनी स्वतःला त्यात गुंतवून घेत ते देखील त्यांच्यापाठोपाठ कसे फरफटत चालले आहेत, याचेही सोनवणींनी यात दिग्दर्शन केले आहे.
    देशभर तसेच जगभर हि उठाठेव सुरु असताना ज्यांचा या उठाठेवीशी जास्त निकटचा संबंध आहे, ते हिंदू नेमके कुठे आहेत ? त्यांना या सगळ्यांची जाण आहे कि नाही ? आपल्या पूर्वजांचा गौरव, वैभवशाली इतिहासाचे, परंपरांचे त्यांना विस्मरण झाले कि ते त्यांना मुळात माहितीच नाहीत ? आणि माहिती नसल्यास त्यांचा शोध घेण्याची हिंदूंना प्रेरणा तरी होत आहे कि नाही ? या आणि अशाच प्रश्नांच्या मांडणीतून सोनवणींचा ' हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास ' साकार झाला आहे.


    पहिल्या प्रकरणातच सोनवणींनी येथील देशी विद्वानांचा आर्य आक्रमणाचा लाडका सिद्धांत सप्रमाण मुळासकट उखडून काढला आहे. सिंधू येथील मूळ मानवी वसाहतीचे दहा - पंधरा हजार वर्षांपूर्वीचे पुरावे, त्यात प्रासंगिक होत गेलेले बदल, विकास यांची संदर्भासह चर्चा केल्याने कोण कुठल्या कोपऱ्यातले आर्य आक्रमक सिंधू संस्कृतीवर चालून आले व तिचा नाश करून त्यांनी भारतीयांना आपले गुलाम केले किंवा आर्यांनीच सिंधू संस्कृती स्थापित, विकसित केली हि भाकडकथा आता विद्वानांनी रसहीन हाडकाप्रमाणे न चघळलेली बरे !

    दुसऱ्या प्रकरणात लेखकाने असुर, देव संस्कृती ; त्यांचे संघर्ष याविषयी संक्षिप्त परंतु संदर्भासह माहिती दिली असून असुर वा असिरीयन संस्कृती भारतातही कशी अस्तित्वात होती याचेही दाखले दिले आहेत.
    सिंधू संस्कृती नंतर लगेचच असुर संस्कृतीचा उल्लेख आल्याने वाचकांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. तेव्हा त्यातील मुख्य भेद मी येथे स्पष्ट करतो. सिंधू संस्कृतीला सिंधू हे नाव सिंधू नदीच्या खोऱ्यातील प्रदेश याअर्थी लाभले आहे. त्याउलट असुर वा असिरीयन हे उपास्य देवतेवरून पडलेले नाम असून यातील असुर वा असिरीयन म्हणजे असुर्य तथा सूर्य.
    आदिमानवापासूनचा जर इतिहास पाहिला तर तत्कालीन मनुष्याचा मुख्य शत्रू अंधार, रात्र असून उजेड, सूर्य त्याचा मित्र होत. त्यामुळे प्रथम उपास्य दैवत तेच मानता येते. त्यानंतर इतर दैवतांची मानवाच्या विकासासोबत भर पडत गेली. सिंधू संस्कृतीही असुर पूजक होती. परंतु नंतर ती शिव - शक्ती उपासक बनली.
    अशाच प्रकारचा बदल इराण आणि अफगाणिस्तानच्या प्रदेशात होत होता. मूळ असुर संस्कृतीत वा तिच्या समकक्ष अशी देव संस्कृती प्रचलित होती. असुर संस्कृती लयास जात असता झरतुष्ट्राने असुर संस्कृती व धर्माची पुनर्स्थापना केली, त्यालाच पारसी धर्म संज्ञा प्राप्त झाली. जे लोकं झरतुष्ट्राला मानणारे नव्हते व असुर आणि देव संस्कृतीतील मूळ धर्मास चिटकून राहिले वा या दोहोंच्या संघर्षातून त्यांनीही नवीन धर्म स्थापन केला, त्यास वैदिक धर्म संज्ञा प्राप्त झाली.
सारांश, पारसी व वैदिक हे दोन धर्म एकाच भूमीत, एकाच संस्कृतीतून उदयास आले. त्यामुळे परस्परांत द्वेष असणे स्वाभाविक असून त्यायोगे त्यांच्यात जे तंटे झाले, ज्या लढाया झाल्या त्यांची वर्णने वैदिक ग्रंथात देव - असुर युद्धाद्वारे येतात. येथे असुर म्हणजे झरतुष्ट्राचे अनुयायी व देव म्हणजे वैदिक होत. स्वाभाविकच या असुरांचा व भारतीय असुरांचा कसलाही संबंध येत नाही. त्यामुळे ऋग्वेदादी ग्रंथांतील देव - असुर संघर्षात आपण भारतीयांनी आपला पूर्वेतिहास शोधण्याचे काहीच कारण नाही. वस्तुतः हा इतिहास मोठा मनोरंजक असून तो तपशीलवार यायला हवा होता. परंतु त्यामुळे मूळ विषय भरकटून जाऊन पुस्तकाचा विस्तारही वाढला असता म्हणून लेखकाने हे प्रकरण शक्य तितके आटोपशीर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परिणामी वाचकांना येथे बारकाईने वाचून, चिंतन करून स्वतःहून समजावून घेणे भाग आहे आणि ते तितकेसे अवघडही नाही.

    प्रकरण ३ मध्ये वैदिक पूर्व भारतातील असुर संस्कृतीचा मागोवा घेण्यात आला असून यामध्ये हिरण्याक्ष, बळी, नरकासुर या प्राचीन श्रेष्ठ असुरराजांच्या चरित्रांचे वैदिकांनी केलेले विकृतीकरण ; तसेच रामायण - महाभारतादि काव्येतिहास --- ज्यातील मुख्य घटना वैदिक धर्मीय या देशात प्रवेशण्यापूर्वीच घडून गेल्या होत्या, हे कालरेखेच्या सहाय्याने अधोरेखित करण्यात आले आहे.
इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे इराण - अफगाणिस्तानातील असुर संस्कृती व भारतीय असुर संस्कृती याट नामसाधर्म्य वगळता बराच फरक आहे. भारतीय असुर संस्कृतीत समांतर वा कालांतराने यक्ष, नाग, मूषक, राक्षस, भूत इ. उपसंस्कृत्याही नांदत होत्या. भारतीय असुरांचे मुख्य उपास्य शिव - शक्ती युगुल बनले होते. प्राचीन भारतीय असुर संस्कृतीचा समृद्ध वारसा सिंधू संस्कृती पर्यंत चालत येतो. त्यामुळे सिंधू संस्कृतीच्या स्थापनेत, विकासात वैदिकांचे कसलेही श्रेय नाही व त्यानुषंगाने केली जाणारी विधानं हि शुद्ध अनैतिहासिक समजली पाहिजेत.
    भारतात प्रवेशलेल्या वैदिकांनी स्वधर्म प्रसारार्थ जी मोहीम चळवळी त्यात नामसाधर्म्यामुळे भारतीय असुर बदनाम होऊन त्यांचा इतिहास क्रमशः लोप पावत गेला. तसेच भारतीयांच्या इतिहासात एक प्रकारे विकृतीही निर्माण झाली. उदाहरणार्थ :- ऋग्वेदातील पुरू व महाभारतातील पुरू हे दोन वेगवेगळे होत. ऋग्वेदात पुरुनाम हे टोळीवाचक तर महाभारतातील व्यक्तीवाचक होत. हाच प्रकार यदु वगैरेंचा.
    बव्हंशी विद्वान इतिहासकारांच्या लक्षात हा फरकच न आल्याने त्यांनी भारतीय इतिहासाची पाळेमुळे ऋग्वेदात शोधण्याचा यत्न केला व अंती अपयश पदरी पाडून घेतले. कारण, ऋग्वैदिक इतिहास हा मुली भारतीय भूमीचा नसून तो इतरत्र -- इराण - अफगाणिस्तानातील भूमीचा इतिहास आहे.

    यापुढील प्रकरणात वेदपूर्व तत्वज्ञान व त्याच्या विकासाची चर्चा असून त्यान्वये सांख्य, योग दर्शन हे हिंदू परंपरेतील असताना नंतर त्यावर वैदिकत्वाचा शिक्का मारल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. खेरीज उपलब्ध उपनिषदांचे वेदविरोधी व वैदिक असे दोन मुख्य प्रकार स्पष्ट करण्यात आले आहेत. याशिवाय हिंदूंमधील प्रचलित मूर्ति, प्रतिमापूजा पद्धती प्राचीन असून याची मुळे सिंधू संस्कृतीप्रत जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
    याखेरीज महत्त्वाची बाब म्हणजे तंत्र साहित्य, तंत्रांची बदनामी तसेच आद्य शंकराचार्य हे हिंदू असूनही नंतर त्यांचे करण्यात आलेले वैदिकीकरण व शंकराचार्य पीठांमध्ये केलेली वैदिकांनी घुसखोरी याचेही संक्षिप्त दिग्दर्शन या प्रकरणात केलं आहे.

    प्रस्तुत ग्रंथातील सहावं प्रकरण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. किंबहुना सोनवणींच्या सिद्धांताचा हा मुख्य पायाच म्हटले तरी चालण्यासारखे आहे. सदर प्रकरणात ऋग्वेद तसेच मनुस्मृती यातील भूगोलाचा शोध घेत उत्तर अफगाणिस्तानात पारसी तर दक्षिण अफगाणिस्तानात वैदिक धर्माचा उदय झाल्याचे मत मांडण्यात आले असून या मताच्या सिद्धतेकरता भाषिक व ऐतिहासिकदृष्ट्या तुलनात्मक अत्यंत निकटचे साधन म्हणून अवेस्त्याचा वापर करण्यात आला आहे. माझ्या मते, मराठी भाषेत हा प्रथमच प्रयोग करण्यात आला असून उपलब्ध माहिती पाहता यात दोषास्पद असे काही आढळून येत नाही. ज्याप्रमाणे बायबल मधील कथा, व्यक्तिनामे संस्कार होऊन कुराणात येतात जवळपास तसाच प्रकार अवेस्ता व ऋग्वेदात झाल्याचे दिसून येते. देशी हिंदू विद्वानांपैकी डॉ. बी. आर. आंबेडकरांचा अपवाद वगळता या मुद्द्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष केलं. डॉ. आंबेडकरांनी देखील आपल्या ' शुद्र ' विषयक ग्रंथात याची अल्पशी चर्चा केली होती, परंतु नंतर त्यांनाही याचा विसर पडला. अन्यथा हा मुद्दा तेव्हाच निकाली निघाला असता. असो.

    प्रकरण सात हे सोनवणींच्या ग्रंथाचा उत्कर्षबिंदू तथा आत्मा आहे. मुळातून हे प्रकरण समग्र वाचल्याखेरीज व त्यामागील पार्श्वभूमी माहिती असल्याशिवाय याची तितकीशी उमज पडणार नाही.
अहुर ( असुर ) माझ्दा / झरतुष्ट्राच्या धर्माचा दक्षिण अफगाणिस्तानात प्रभाव वाढू लागल्याने वैदिक धर्मियांना तेथून काढता पाय घेणे भाग पडून विदेघ माथवा नामक आपल्या टोळी प्रमुखाच्या नेतृत्वाखाली वैदिकांचा एक गट आपल्या मातृभूमीला कायमचा अंतरून पूर्वेकडे वाटचाल करतो. मार्गात सिंधूच्या पूर्व किनाऱ्यावरील ' शुद्र ' नामक टोळीच्या राज्यात विदेघ माथवाचे वैदिक आश्रय घेतात. येथे स्थिर स्थावर होत वेदांचे संकलन करण्यात आले. याच वसाहत काळात प्रसिद्ध पुरुषसुक्ताची रचना करण्यात आली. त्यानुसार वैदिक व शुद्र यांचे दोन वेगळे, स्वतंत्र धर्म असल्याचे मान्य करण्यात आले. पुढील काळात वैदिकजन येथूनच निर्वाह तसेच धर्मप्रसारार्थ भारतात पसरले. दक्षिण भारतात वैदिकांचा प्रथम प्रवेश इ.स.पू. पहिले ते इ.स. प्रथम शतकाच्या दरम्यान झाला. परंतु इ.स.च्या चौथ्या शतकात गुप्त सम्राटांखेरीज वैदिकांना संपूर्णतः राजाश्रय असा कधीच लाभला नाही. तोपर्यंत स्थानिक राजवटींनी इतर धर्मियांप्रमाणेच वैदिकांकडून धार्मिक कृत्ये करवून घेतली, परंतु त्यांच्या धर्माचा स्वीकार मात्र केला नाही. तथापि, ज्या ज्या राजाने आपल्या कारकिर्दीत वैदिक यज्ञ करवून घेतले त्यास वैदिक धर्मीय राजा म्हणण्याची नंतरच्या काळातील वैदिक इतिहासकारांनी चाल पाडली. या धर्तीवर मुस्लीम पीर - फकिरांना नवस - खैरात करणारे वैदिक पेशवेही इस्लामी ठरतात, हे वैदिकांना खपेल का ?

    आठव्या प्रकरणात सिंधू संस्कृतीची भाषा व त्यानुषंगाने वैदिकांच्या भाषेचीही चर्चा केली आहे. या चर्चेमधील मुख्य उद्देश म्हणजे सध्याच्या काळात भाषाशास्त्राच्या अर्धवट तसेच स्वकल्पित नियमांच्या आधारे सिंधू संस्कृतीचे संस्थापक आर्य ते आपणच, अशा भूमिकेची मांडणी वैदिक धर्मीय करत आहेत. त्यांचा हा दावाही या प्रकरणात सप्रमाण खोडून काढण्यात आला आहे. यामधील मुख्य मुद्दा हा कि, जर सिंधू संस्कृतीची रचना वैदिकांनी केली आहे व संस्कृत हि त्यांची भाषाही तितकीच पुरातन आहे ( इसपू तीन हजारहुन अधिक ) तर या प्रदीर्घ काळातील साहित्यरचना का आढळत नाही ? ऋग्वेदाच्या आरंभी व नंतरच्या रचनेत भाषिकदृष्ट्या इतके अंतर का ? या व अशा इतर अनेक प्रश्नांच्या चर्चेतून संस्कृत हि प्राकृतोद्भव असून आधुनिक भाषा असल्याचे व तिच्या निर्मितीत, उर्दू प्रमाणेच सर्वांचा हातभार लागल्याचे सोनवणींनी सिद्ध केले आहे. 

    नवव्या प्रकरणात जैन, बौद्ध --- विशेषतः महावीर व महावीपूर्व तसेच बुद्ध कालीन आणि त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य तसेच पुष्यमित्र श्रुंग पर्यंत उत्तर भारतातील वैदिक धर्म, भाषा यांचा आढावा घेतला आहे तर याच काळात दक्षिणेतील सातवाहन कालही विचारात घेतला आहे. या प्रदीर्घ काळात वैदिक धर्माला कोणत्याही एका राजाचा संपूर्ण आश्रय लाभला आहे किंवा हिंदू, जैन, बौद्धादी धर्मीयांची पीछेहाट होऊन वैदिक धर्म देशभर पसरला आहे असे कधीच न घडून आल्याचे संदर्भासह स्पष्ट करण्यात आले आहे.

    प्रस्तुत ग्रंथातील दहावं प्रकरण वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल. यामध्ये दहाव्या शतकापर्यंतचा साहित्यिक, राजकीय, सांस्कृतिक अंगाने वैदिक व हिंदू धर्माचा समांतर आढावा घेण्यात आला असला तरी भरपूर माहितीचा मसाला यात ठासून भरल्याने प्रकरण भरगच्ची बनले असून त्यात लेखकाच्या संक्षिप्त लेखनशैलीमुळे वाचकाची जबाबदारी अनेकपटींनी वाढत जाते.
    सदर प्रकरणात स्पष्ट होणाऱ्या मुख्य बाबी म्हणजे :- (१) एक गुप्त काळ सोडला तर वैदिक धर्मास दहाव्या शतकापर्यंत दुसऱ्या कोणत्याही भारतीय वा हिंदू राजवटीने राजाश्रय दिलेला नव्हता. (२) संस्कृत हि वैदिकांची वा वैदिकांनी निर्माण केलेली भाषा नाही. (३) वैदिकांची खरी देव भाषा मूळ अफगाणिस्तानातील प्राकृत असून ती पर्शियन भाषेच्या अधिक निकट होती. (४) संस्कृत हि प्राकृत भाषांतून विकसित झाली असून हिचा जन्म - विकास इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून ते इ.स. तिसऱ्या शतकादरम्यान मानला जातो. (५) संस्कृत भाषेतील ज्ञात पहिला शिलालेख इ.स. दुसऱ्या शतकातील असल्याने तिच्या प्राचीनत्वाचा वैदिकांचा दावा आपोआप कोसळून पडतो. (६) संस्कृतच्या जन्म - विकासानंतर आधीचे प्राकृत भाषांतील ग्रंथ, संस्कृत भाषेत रुपांतरीत करण्याची लाट आली. यामध्ये सर्व धर्मियांसोबत वैदिकही सामील होते. त्यांनी स्वतःच्या ग्रंथांसोबत येथील हिंदूंचे ग्रंथही आपल्या धर्मप्रसाराच्या दृष्टीने भाषांतरित केले. (७) गुप्त राजवटीत वैदिकांना राजाश्रय लाभल्याने या धर्मात प्रवेशणाऱ्यांची -- विशेषतः ब्राह्मण वर्णात शिरण्याची इतर धर्मियांनी धडपड केली, ज्यात हिंदूही होते. या धर्मांतरीतांनी आपल्या मूळ धर्मातील श्रद्धा, चालीरीतींचा त्याग न केल्याने वैदिक धर्मात श्रौत - स्मार्त हे दोन ठळक भेद निर्माण होऊन श्रौतांचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले तर स्मार्त हे कनिष्ठ लेखले गेले. (८) सामाजिकदृष्ट्या पाहिले तर इ. स. दहाव्या शतकापर्यंत तरी हिंदूंना, वैदिक हे परधर्मीय असल्याची जाण होती. इत्यादि.      याखेरीज या प्रकरणी पाणिनी, कौटिल्य आदींचा काळ निश्चित करण्यात आला असून अर्थशास्त्राचे जनकत्व कौटिल्याला देत चाणक्याचे नाव बाद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चाणक्याने चंद्रगुप्त मौर्यास राज्य स्थापना व साम्राज्यविस्ताराकरता मदत केली होती, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

    अकराव्या प्रकरणात श्रेणी संस्थांची निर्मिती, उत्कर्ष, ऱ्हास तसेच वैदिक वर्चस्वतावादाची चर्चा केली आहे. यासंबंधी थोडे तपशीलवार लिहिणे भाग आहे. सिंधू संस्कृती काळात येथील लोकांच्या -- हिंदूंच्या व्यापारी श्रेण्या तथा संघ होते. या संघाचे सदस्यत्व कोणासही प्राप्त हात असून एखादा व्यवसाय मोडीत निघाल्यास वा नको असल्यास दुसऱ्या व्यवसायात शिरण्यास यामध्ये वाव होता. तसेच या श्रेणीसंस्था नाममात्र शासनाच्या वर्चस्वाखाली असून अंतर्गत कारभार, व्यापाराकरता त्या स्वतंत्र मुखत्यार होत्या. थोडक्यात आरंभी व्यापाराकरता उभारलेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जितकी स्वायत्त होती तितक्याच या व्यापारी श्रेण्याही होत्या.
    व्यापार हि खासगी बाब मानत सरकारने त्यास प्रोत्साहन द्यावे परंतु स्वतः त्यात पडू नये, हि भूमिका अगदी आजच्या काळातील अर्थतज्ञही मान्य करतात, जी सिंधू काळात प्रचलित होती गुप्त काळापर्यंत तिचे पालनही झाले. परंतु गुप्त सम्राटांच्या कारकिर्दीत कौटिल्याने रचलेल्या अर्थशास्त्रात याविपरीत मांडणी करण्यात आली. परिणामी गुप्त सम्राटांनी श्रेण्यांचे अधिकार मर्यादित केले श्रेण्यांना पर्याय म्हणून सामंतशाहीस एकप्रकारे उत्तेजन दिले. याचा दृश्य परिणाम म्हणजे गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर सरंजामशाही प्रबळ झाली, परंतु ती मध्यवर्ती सत्तेची सूत्रे हाती घेऊ शकली नाही. परिणामतः प्रभावी केंद्र सत्तेच्या अभावी देशात अंदाधुंदीची स्थिती निर्माण होऊन त्याचा थेट फटका व्यापार, उद्योगधंदे तसेच शेतीस बसून त्यांची अवनती होऊ लागली. या स्थितीत आणखी भर पडली ती दुष्काळ आणि मुस्लिम आक्रमणाची !
या दोन दृश्य आणि तिसऱ्या वैदिक -- अदृश्य अशा तीन शत्रूंशी लढता लढता हिंदू धर्म टेकीस येऊन आपल्या अवनत स्थितीच्या शोधार्थ मूलतत्ववादाकडे वळला इथेच त्याची फसगत झाली. कारण, हिंदूंच्या मूलतत्ववादाचे हिंदूंनाच विस्मरण होऊन ते वैदिक साहित्यातच आपली पाळेमुळे शोधू लागले. ज्याचा परिणाम अनिष्ट अशा सामाजिक विषमता पूर्वक भेदांत झाला. या प्रवासात सांस्कृतिक, ग्रांथिक . क्षेत्रांत हिंदूंच्या तंत्रांचा वैदिकांच्या वेदमहात्म्य सांगणाऱ्या साहित्याशी मुकाबला, श्रेणीसंस्थांचे अवनत होत जातीसंस्थेत परावर्त होणे, हिंदू संतांनी कसलाही संबंध नसताना वेदमाहात्म्य मान्य करणे, वैदिकांकडून हिंदू देवी- देवतांचे अपहरण होणे .अनेक बाबी अंतर्भूत असून त्याचा लेखकाने संक्षेपाने परंतु संदर्भासह आढावा घेतलेला आहे.
किमान जातीसंस्था नष्ट करू इच्छिणाऱ्यांनी या प्रकरणाचा चिकित्सक अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.

      अखेरच्या बाराव्या प्रकरणात ब्रिटिश काळात भारतातील धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच जातीय इतिहासाचा आढावा घेत, आजच्या घडीला सुरु असलेल्या आर्य विषयक भाषिक तसेच वांशिक सिद्धांताच्या धडपडीचा थोडक्यात आढावा घेत समारोप करण्यात आला आहे.
    लेखकाच्या मांडणीनुसार दहाव्या शतकापासून श्रेणीसंस्था जातीसंस्थेत रूपांतरित होत गेली तरी अगदी पेशवाई अस्तापर्यंत तिने आजचे ताठर, अगदीच बंदिस्त रूप धारण केले नव्हते. व्यक्ती स्वेच्छेने व्यवसाय निवडू शकत होता. परंतु ब्रिटिश काळात स्थिती पूर्णतः बदलली. भारताचा वापर इंग्रजांनी कच्च्या मालाचा पुरवठादार पक्क्या मालाची बाजारपेठ म्हणून केल्याने येथील उद्योगधंदे पार रसातलास गेल्याने अर्थार्जनाच्या निश्चितीसाठी लोकं हाती असलेल्या धंद्यास चिटकून राहिली.
    शिवाय सामाजिकदृष्ट्या पाहिले तर येथील परंपरागत जात पंचायती सारख्या न्यायसंस्थांच्या जागी इंग्रजी कोर्टे स्थापित झाली. ज्यामधील हिंदूंसाठी बनवण्यात आलेले कायदे वैदिक धर्मीय पंडितांनी, वैदिक स्मृतीशास्त्राच्या आधारे निर्माण केले होते.
    खेरीज प्रशासनाच्या सोयीकरता इंग्रजांनी येथे प्रथम . १८७२ मध्ये जनगणनेचे काम हाती घेतले. यावेळी झालेल्या शिरगणतीमध्ये धर्म, जात, वंश, राष्ट्रीयत्व . स्थानिक जनतेस परिचित - अपरिचित बाबींची नोंद करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे अशा नोंदणीकरता माहिती देणारे नोंदवून घेणारे, दोघेही अक्षम असल्याने यात बव्हंशी चुकीचीच माहिती नोंदवली गेली. कित्येकांचे व्यवसाय त्यांची जात बनून गेले तर काहींनी सामाजिक स्थान उंचावण्याकरता खोटी माहिती भरली. . १८७२ ची शिरगणती जमेस धरूनच पुढील जनगणना करण्यात आल्याने पूर्वी उघड तसेच लपूनछपून का होईना करता येणारे जाती परिवर्तन आता अशक्य झाले यातून जाती अपरिवर्तनीय असल्याचे समाजमनावर कोरले गेले.
    सांस्कृतिकदृष्ट्या ब्रिटिश अमदानीत येथील समाजजीवनात अनेक स्थित्यंतरे घडून आली. यातील महत्त्वाचे म्हणजे युरोपात प्रचलित होऊ लागलेला आर्य वंश  सिद्धांत !
    युरोपात आर्य सिद्धांताचे वारे वाहू लागताच येथील वैदिकांच्या चलबिचल माजून त्यांनी इंग्रजांशी बंधुत्वाचे नाते जोडण्याचा प्रयत्न आरंभला. परिणामी हिंदूंनी ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादाद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पुढे आर्य वंश थियरी निकाली निघाल्यावर वैदिकांनी ' आम्ही इथलेच, इथून हरियाणातून जगभर पसरलो ' म्हणायला सुरवात केली. ज्याद्वारे ते देशी ठरत होते तसेच हिंदू धर्माच्या बुरख्याआड लपणेही त्यांना सोयीस्कर जात होते. परंतु त्यांचा हाही दावा टिकू शकला नाही. मात्र तरीही हार मानता केवळ शाब्दिक छल करीत, कोलांटउड्या मारीत ते आजही सिंधू संस्कृतीचा विध्वंस ते जनक आर्य आपणच ; घग्गर म्हणजेच ऋग्वैदिक सरस्वती अशा थापा मारत समस्त हिंदू जनांचे तसेच हिंदू धर्माचे पितृत्व घेऊ पाहताहेत.

    सारांश, प्रस्तुत ग्रंथात ग्रंथकर्त्याने अव्वल संदर्भ साधनांच्या आधारे हिंदू आणि वैदिक या दोन स्वतंत्र धर्मांचा बऱ्यापैकी तपशीलवार असा इतिहास सादर केला आहे. यातील सर्वच पुरावे बिनतोड आहेत असे जरी म्हणता येत नसले तरी याच्या अंतिम निष्कर्षात बदल होण्याची बिलकुलही शक्यता नाही. आपापला धर्मेतिहास जाणून घेण्यासाठी वैदिक तसेच  हिंदू धर्मियांनी या ग्रंथाचे अवश्य अध्ययन करावे.

हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास :- संजय सोनवणी
प्रकाशक :- प्राजक्त प्रकाशन, संपर्क क्र. :- ९८९०९५६६९५
मूल्य :- ३२० रु.