Monday, August 14, 2017

नाग, नाक व नाईक या संज्ञांविषयी चार शब्द .. ( भाग २ )

    नाग, नाक व नाईक या संज्ञाविषयी चर्चात्मक लेख मी काही दिवसांपूर्वी याच ब्लॉगवर प्रसिद्ध केला होता. त्या लेखातील अनुमान, निष्कर्षांत बदल करण्याइतपत नवीन माहिती समोर आल्याने पुन्हा एकदा त्या लेखातील प्रामुख्याने ' नाक ' या शब्दाची चर्चा करण्याचे योजले आहे.

    श्री. वासुदेव कृ. भावे लिखित ' मुसलमानपूर्व महाराष्ट्र ( खंड १ ला ) मधील प्रकरण क्र. ३ - महाराष्ट्रांतील समाजस्थिति ( शातवाहन काल ) ' मध्ये लेण्यांतील शिलालेखांत तत्कालीन व्यवसायानुरूप श्रेणीसंस्थांची जशी माहिती मिळते तद्वत ' नाक ' हा प्रत्यय नावांसोबत जोडल्याचेही आढळून येते.

उदा :- ' व्यापारी व गृहपति नाग याने दिलेले लेणे. ' ( कुडे लेणे १६ वे )
'
उदमी पुसनाक याची आई शिवदत्ता हिने दिलेले लेणे. ' ( कुडे २२ वे लेणे )
गृहपति महादेव नाक ( कार्ले, लेख ५ वा व ६ वा )
दुकानदार पुसनाक ( कुडे, लेणे २२ वे )
व्यापारी मसूलनाक ( कुडे, लेणे १६ वे )
नाशिकच्या आनंद शेठीचा पुत्र पुष्यनाक ( बेडसे लेख १ ला )
वैद्य सोमदेव, वैद्य सोमदेवाचा बाप वैद्य भामकविजय. सोमदेवाचे पुत्र नाग, ईश्वररक्षित, ईशपालित, शिवघोष ( कुडे लेणे ७ वे )

    यास्थळी प्रथम काही गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे कि, सातवाहनांच्या राजवटीचा काळ इ. स. पू. २३० ते इ. स. २२० असा, सुमारे साडेचारशे वर्षांचा होता. सातवाहन हे हिंदू धर्मीय असून त्याकाळी संस्कृत भाषेचा जन्म व प्रसार न झाल्याने महाराष्ट्री प्रकृत भाषेचा वापर नाणी व शिलालेखांत केल्याचे आढळून येते.

    दुसरे असे कि, उपरोक्त नावांत असलेल्या गृहपति, नाक या सज्ञांपैकी गृहपति या शब्दाचा श्री. भाव्यांनी दिलेला अर्थ चुकला आहे. त्यांच्या मते, ' गृहपति म्हणजे मराठीतील घरधनी. ही पदवी वैश्यांना लावीत असत. ' हा निष्कर्ष त्यांनी एपिग्राफिया इंडिका, भाग ७ वा च्या आधारे काढला आहे. परंतु नुकतेच श्री. संजय सोनवणींनी सातवाहन समकालीन कुशाण काळात प्रकृत भाषेत लिहिलेल्या ' अंगविज्जा ' या ग्रंथाविषयीच्या लेखात, ' "गृहपती" या संज्ञेने जैन व बौद्ध हे दोन धर्म निर्दिशित होतात. ' असे म्हटले आहे. यामुळे भाव्यांची संस्कृत व वैदिकोद्भव वैश्य थियरी कोलमडून पडते.
परंतु इथे आणखी एक गैरसमज होण्याची शक्यता आहे व ती म्हणजे ' गृहपति ' हा शब्द जर जैन व बौद्धांचा निर्देश करण्यासाठी वापरला जात असेल तर याद्वारे डॉ. आंबेडकरांच्या बौद्ध - महार सिद्धांतास आधार मिळतो. पण प्रत्यक्षात उपलब्ध पुरावे -- सध्या तरी भाव्यांच्या पुस्तकातील -- पाहता आंबेडकरांच्या सिद्धांतास बळकटी येण्यापेक्षा थोडाफार धक्काच बसतो.

कारण :- व्यापारी व गृहपति नाग याने दिलेले लेणे. ' ( कुडे लेणे १६ वे )
' उदमी पुसनाक याची आई शिवदत्ता हिने दिलेले लेणे. ' ( कुडे २२ वे लेणे )
गृहपति महादेव नाक ( कार्ले, लेख ५ वा व ६ वा )
दुकानदार पुसनाक ( कुडे, लेणे २२ वे )
व्यापारी मसूलनाक ( कुडे, लेणे १६ वे )
नाशिकच्या आनंद शेठीचा पुत्र पुष्यनाक ( बेडसे लेख १ ला )
वैद्य सोमदेव, वैद्य सोमदेवाचा बाप वैद्य भामकविजय. सोमदेवाचे पुत्र नाग, ईश्वररक्षित, ईशपालित, शिवघोष ( कुडे लेणे ७ वे )

    उपरोक्त सर्वच नावांच्या आधी ' गृहपति ' शब्द योजल्याचे दिसून येत नाही.

     येणेप्रमाणे गृहपति संज्ञेचा उलगडा होतो परंतु ' नाक ' हा शब्द तसाच अनुत्तरीत राहतो. श्री. भाव्यांनी आपल्या ग्रंथात नाक या शब्दाचा अर्थ, ' नायक ' देत असे म्हटले आहे कि, ' लेण्यांतील लेखांत इतरत्र गण शब्द आढळत नाही. पण नाक हा प्रत्यय सर्वत्र आढळतो. व तोही बहुधा व्यापाऱ्यांच्या नावाला लावलेला असतो. ' उदाहरणादाखल त्यांनी पुढील नावे दिलेली आहेत :- गृहपति महादेव नाक ( कार्ले, लेख ५ वा व ६ वा ), दुकानदार पुसनाक ( कुडे, लेणे २२ वे ), व्यापारी मसूलनाक ( कुडे, लेणे १६ वे )

     यास्थळी भाव्यांच्या तर्कावर भिस्त ठेवायला हरकत नव्हती परंतु त्यांनी बऱ्याच ठिकाणी अर्थाचे अनर्थ करत आपली विश्वासहर्ता गमावल्याने त्यांवर विसंबून राहणे धोक्याचे आहे.

    मध्ययुगीन काळात ' नाक ' हा प्रत्यय विशिष्ट जातीसमूहातील ठराविक लोकांच्या नावामागे जाई, त्यावरून या शब्दाला तेव्हाच्या सामाजिक स्थितीत श्रेष्ठ अथवा पुढारी असा अर्थ प्रचलित होता हे उघड आहे. त्याच काळात ' नाईक ' हि संज्ञाही वापरात असून याद्वारे लष्करी पद, बहुमान दर्शक किताब, सावकारांचा निर्देश होत असे.

     माझ्या मते, नाक या शब्दाचे संस्कृत रूप नाईक आहे. तसेच मध्ययुगात हे दोन्ही शब्द वापरात होते. परंतु प्रश्न असा असा उद्भवतो कि, एकाच काळात मूळ शब्द व त्याचे विकसित वा संस्कृत रूप प्रचलित का राहावे ? याचे उत्तर सद्यस्थितीत तर्काच्या आधारेच देणे भाग आहे व ते असे :-

    मध्ययुगीन काळात समाजमनावर वैदिक धर्म - संकल्पनांचा प्रभाव पडून बव्हंशी हिंदू धर्मीय समाज त्या प्रवाहात वाहवत गेला. त्याचे स्वाभाविक परिणाम वाईटही झाले. उदा :- जातीसंस्थेबाबत. सातवाहन काल तसेच इ.स. च्या चौथ्या - पाचव्या शतकापर्यंत इथे जातीसंस्था अस्तित्वात नव्हती हे वैदिकांच्या मनुस्मृति -- त्या काळातच पूर्णावस्थेस पोहोचलेल्या स्वरूपा -- वरून दिसून येते.
सातवाहन सामाजिक स्थितीचा संदर्भ घेतला तर व्यवसायांच्या श्रेणी होत्या. या श्रेण्या व्यवसायांवर आधारित असून श्रेणीसंस्था मोडीत निघाल्यावर तिचे विघटन जाती - उपजातींत होत गेले.

    हिंदुस्थानच्या राजकीय इतिहासाप्रमाणेच धार्मिक इतिहासातही अनेक चढ - उतार आल्याने वैदिकांचा उत्कर्ष काल येताच येथील हिंदू समाजमन त्याच्या प्रभावाखाली गेलं. त्यांची वर्णसंस्था तीच आपली जातीसंस्था मानून बसलं. अर्थात हा बदल काही वर्षांत, दशकांत न होता यासाठी शतकांचा अवधी लोटावा लागला असला तरी वैदिक धर्मप्रभावाखाली हिंदू समाजांतर्गत बदल झाले हे निश्चित. अशा स्थितीत जे आपल्या मूळ हिंदू परंपरांना चिटकून राहिले त्यांच्या संज्ञा तशाच राहणे अपरिहार्य आहे व ज्यांनी काळानुरूप बदल स्वीकारले त्यांच्या सामाजिक दर्जा, संज्ञांत बदल होणेही स्वाभाविक आहे. परंतु अंतिमतः स्थिती पाहता मध्ययुगापर्यंत मूळ हिंदू परंपरेला चिटकून बसलेले व वैदिक प्रभावाखाली आलेले, आज दोन्ही घटक आपला पूर्वेतिहास, सामाजिक आत्मभान गमावून बसले आहेत. असो.

    प्रस्तुत लेखाचा निष्कर्ष याक्षणी जरी अंतिम असला तरी तो पूर्णतः अंतिम वा निर्णायक नाही. जसजसे नवनवीन पुरावे समोर येतील तसतसे आहे त्या निष्कर्षास बळकटी मिळणे वा बदल होणे स्वाभाविक आहे. परंतु हे कार्य केवळ एका व्यक्तीचे नसून सर्वच स्वतंत्रवृत्तीच्या अभ्यासकांचे आहे, एवढे जरी लक्षात घेतले तरी पुरेसे आहे.       

Friday, August 11, 2017

सुलतान नासिर-उद्दीन उर्फ खुस्रुखान
    मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील अनेक दुर्लक्षित ऐतिहासिक व्यक्तींपैकी एक म्हणजे मलिक खुस्रू उर्फ खुस्रुखान !
    खिलजी सुलतानांचा गुलाम व पूर्वाश्रमीच्या या हिंदू गृहस्थाचा पूर्वेतिहास उपलब्ध नाही. त्याच्या जाती विषयी इतिहासकारांत मतभेद असले तरी तो अस्पृश्य वा अंत्यज जातीसामुहातील होता यावर मात्र त्यांचे एकमत आहे.
    खुस्रु खिलजी सुलतानांच्या सेवेत कधी आला ? धर्मांतरापूर्वीचे त्याचे नाव काय होते ? त्याचा उत्कर्ष व अपकर्ष होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? याविषयी कसलीही तपशीलवार माहिती मिळत नाही. मान्यवर इतिहासकारांच्या ग्रंथांत फक्त त्याचे मुबारक खिलजीचे प्रीतिपात्र, मुबारकचा खून करून सत्ता बळकावणे व सुमारे पाच - सहा महिन्यांच्या शासन काळात इस्लाम विरोधी कारवाया करणे इ. उल्लेख येतात. या व अशा फुटकळ उल्लेखांच्या सहाय्याने व प्रामुख्याने गो. स. सरदेसाईंच्या मुसलमान रियासतीच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात आपण खुस्रुखानाविषयी चर्चा करणार आहोत.

    आधी सांगितल्याप्रमाणे खुस्रुखानाचा पूर्वेतिहास माझ्याजवळील साधनांत फारसा उपलब्ध नाही. जी काही माहिती प्राप्त झाली त्यावरून :- तो गुजरातमधील अंत्यज, अस्पृश्य, परीया, परवारी जातीचा असून दिल्लीवर सत्ता असलेल्या खिलजी घराण्यातील सुलतानांचा तो गुलाम होता. ज्याचे धर्मांतर करून त्यांनी आपल्या सेवेत घेतले होते. धर्मांतरानंतर त्याचे नाव हसन ठेवण्यात आले असून अल्लाउद्दिन खिलजीचा मुलगा -- मुबारक, याची हसनवर विशेष कृपादृष्टी होती.

    अल्लाउद्दिन खिलजी स. १३१६ मध्ये मरण पावल्यावर दरबारातील राज्यक्रांतीत प्रथम अल्लाउद्दिनचा विश्वासू सेनानी -- मलिक काफुरने बाजी मारत उमरखान नावाच्या अल्पवयीन शहजाद्यास हाताशी धरत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मलिक काफूर हा देखील खुस्रुप्रमाणे पुर्वाश्रमीचा हिंदू होता. परंतु राज्यक्रांतीच्या अस्थिर वातावरणात मलिकचा निभाव न लागता त्याचा खून करण्यात आला व अल्लाउद्दिनचा एक वारस -- मुबारक खिलजीने सुलतानपद धारण करत व इतर वारसदारांचा निकाल लावत राज्यपदावरील आपला मार्ग निष्कंटक केला.

    उपलब्ध इतिहासावरून असे दिसून येते कि, मुबारकची वर्तणूक काहीशी विचित्र होती. म्हणजे मान्यवर इतिहासकार त्याच्यावर -- नटव्याप्रमाणे सजून नर्तकींसोबत थोरांच्या घरी नाचकाम करण्याचा, व्यसन - ऐशोआरामात निमग्न राहण्याचा आरोप करतात. त्याचप्रमाणे अल्लाउद्दिनच्या काळात लोकांच्या दृष्टीने असलेले जाचक कर वगैरे बंद केल्याचाही उल्लेख करतात. परंतु या ठिकाणी हे देखील विसरता येत नाही कि, अशी व्यक्ती चार वर्षे का होईना सुलतानपदावर होती व जरी राज्यात बंडे होत असली तरी खुस्रूखानाखेरीज मुबारकला सत्तेवरून खाली खेचणे कोणाला जमले नाही.

    मुबारक खिलजीची इतिहासात नमूद असलेली महत्त्वाची कामगिरी म्हणजे स. १३१८ मध्ये त्याने दक्षिणेत स्वारी करून रामदेव राय जाधवाचा  जावई -- हरपाळदेव हा देवगड उर्फ देवगिरी येथे राज्य करत होता, त्यांस पकडून मुबारकने हाल हाल करून ठार केले व त्याचे राज्य आपल्या सल्तनतीस जोडले.

    मुबारक खिलजी सुलतान झाल्यावर किंवा तत्पूर्वी त्याने हसनला मलिक खुस्रु अशी पदवी दिली. खुस्रुने गुजरातमधून आपल्या जातीचे वीस हजार लोक आणवून त्यांस मोठमोठे अधिकार दिल्याचे रियासतकार सरदेसाई सांगतात. अर्थात, पुराव्याअभावी त्यांच्या विधानाची चिकित्सा करता येणे शक्य नसल्याने फारतर एवढे म्हणता येईल कि, खुस्रुने आणलेले लोक -- मग त्यांची संख्या किती का असेना -- हिंदू धर्मीय असून त्यात प्रामुख्याने खुस्रुच्या सजातीयांचा भरणा अधिक होता.

    स. १३१८ मधील मुबारक खिलजीच्या दक्षिण स्वारीत खुस्रु हजर असून मुबारकने त्याला मलबार प्रांतावरील स्वारीकरता नियुक्त केले होते. ती यशस्वीरित्या पार पाडून व अमाप लुट घेऊन खुस्रु स. १३१९ मध्ये दिल्लीला परतला. त्यावेळी सुलतानाने खुश होऊन त्याच्या हाती सर्व अधिकार सोपवला अशा आशयाचे विधान सरदेसाईंनी केले असले तरी फारतर त्याच्या अधिकारांत वा दर्जात वाढ केली असावी असे माझे मत आहे.  

    मलबार स्वारीहून परतल्यावर खुस्रुने संधी साधून सुलतान मुबारक खिलजीचा एके रात्री खून करून व स्वतः नासिरुद्दीन नाव धारण करत दिल्लीचे तख्त बळकावले. त्याने आपल्या नावाने खुत्बा वाचविला तसेच नाणीही पाडली. तसेच खिलजी घराण्यातील पुरुषांचा निकाल लावत मृत सुलतानाची पत्नी -- देवलदेवी हिच्याशी विवाहही केला.

    आपल्या या राज्यक्रांतीला लष्कराचा पाठिंबा असावा म्हणून त्याने शाही खजिन्यातून सैन्यात पैशाचे वाटप केले. जेणेकरून दरबारी मंडळी जरी त्याच्यावर नाखूष झाली तरी त्यांस त्याविरुद्ध फारशी हालचाल करता येऊ नये. तसं पाहिलं तर अल्लाउद्दिन खिलजीनेही दिल्लीचे तख्त चुलत्याकडून हिसकावून घेताना अशाच युक्तीचा अवलंब केला होता. परंतु परिणाम पाहता खुस्रुचा हा डाव काही प्रमाणातच यशस्वी ठरला असे म्हणावे लागते.

    दिल्लीतील खुस्रोचा सुलतानी अंमल सुमारे पाच महिने टिकला असे इतिहासकारांचे मत आहे. या अवधीत त्याने धार्मिक क्षेत्रात जी काही प्रचंड उलथापालथ केली त्याची तपशीलवार माहिती मिळत नाही. सरदेसाईंच्या रियासतीनुसार, खुस्रुने सत्ता हाती येताच स्वतःस हिंदू समजत त्यान्वये वर्तन चालवले. त्याच्या अनुयायांनी दिल्लीतील मशिदींत मुर्त्यांची स्थापना केली. कुराणावर ते बसू लागले. खिलजी सुलतान तसेच सरदारांच्या जनान्यातील स्त्रिया खुस्रुने आपल्या परीया अनुयायांच्या हवाली केल्या.

    सबळ पुराव्या अभावी सरदेसाईंच्या विधानांची चिकित्सा करता येणे शक्य नसले तरी या अनुषंगाने उद्भवणारे काही प्रश्न येथे उपस्थित करणे मी आवश्यक समजतो. उदा :- (१) खुस्रु व त्याचे अनुयायी कुराण - मशिदींच्या बाबत अनुचित वर्तन करत असताना दिल्लीतील मुस्लीम उमराव काय करत होते ? (२) कुत्बुद्दिन ऐबक पासून सुमारे शंभर वर्षे दिल्ली व आसपासचा प्रदेश मुस्लीम सत्ताधीशांच्या ताब्यात होता. परदेशी मुसलमानांचा यात भरणा अधिक होता. अशा स्थितीत खुस्रु व त्याचे वीस हजार अनुयायी इस्लामविरोधी कर्म करणे शक्य आहे का ? (३) खुस्रुने शाही खजिन्यातून रकमा देऊन फौजेचा पाठिंबा जरी मिळवला असला तरी खुस्रुच्या इस्लामविरोधी कारवायांनी फौजेत बंड वगैरे झाले होते का ? (४) खुस्रु स्वतःला हिंदू समजून वर्तन करू लागला तर त्याने नासिरुद्दीन किताब वा नाव का धारण केले ? कि त्याला पुन्हा हिंदू धर्मात यायचे नव्हते अथवा त्याचे हिंदू धर्मात धर्मांतर करण्यास शास्त्र वा समाज अनुकूल नव्हता ? असो.

    खुस्रुच्या सुलतानीस पंजाबातील खिलजी सुलतान नियुक्त सुभेदार गाजीबेग तुघलकने आव्हान देत दिल्लीवर स्वारी केली. त्याप्रसंगी झालेल्या संग्रामात खुस्रुचा पराभव होऊन तो शत्रूहाती सापडला असता गाजीबेगने त्यांस ठार करून दिल्लीवर तुघलक घराण्याची सत्ता स्थापन केली. ( स. १३२१ )

Saturday, August 5, 2017

छ. संभाजीराजे भोसलेच्या मृतदेहाचे दहन झाले कि नाही ?

    श्री. य. न. केळकर यांच्या ' मराठेशाहीतील वेचक वेधक ' या पुस्तकातील ' संभाजी महाराजांची समाधी ' या लेखात " ... संभाजी महाराजांचा वध औरंगजेबाने केल्यानंतर त्यांचे शव त्याने कोल्ह्या - कुत्र्यांकडून खावविण्याकरता टाकून दिले होते. नंतर त्याच्या शवाचे तुकडे व शीर एकत्र करून, उचलून नेऊन एका मराठा सरदाराने त्यास मौजे वढू येथे विधीपूर्वक अग्नी संस्कार केला व तेथे अर्थातच छोटीशी देवळी पण केली. दहनाची ती जागा निश्चित होती आणि म्हणूनच पुढे शाहू महाराजांनी त्याच स्थळी पक्के वृंदावन बांधले. "

    खेरीज या वृंदावनाची पूजा - अर्चा नित्य व्हावी व अन्नछत्र चालावे याकरता शाहूने माणसे नेमून त्यांना इनामही दिले होते, त्याची नोंद खालीलप्रमाणे :-
" कै. संभाजी राजे स्वामी यांचे वृंदावन दर जागा मौजे वढूत || पाबळ येथे करून शुश्रूषेसाठी व व्यवस्थेसाठी भिकाराम गोसावी, वासुदेवभट, शामभट धर्माधिकारी ठेवून धूपदीप, नैवेद्य, बागतुलसी व अन्नछत्राबद्दल बागाईत जमीन बिघे ५, कोरडवाहू वहीत जमीन बिघे २० आणि बाकीची पडजमीन बिघे १०५ मिळून १२० बिघे जमीन दिली. "
    या संबंधी अधिक चर्चा करण्यापूर्वी हे नमूद करणे योग्य ठरेल कि प्रस्तुत लेख केळकरांनी स. १९६९ च्या नोव्हेंबर मध्ये लिहिला होता.

    आता आपण संभाजीच्या विश्वसनीय चरित्रांपैकी डॉ. सौ. कमल गोखले लिखित ' शिवपुत्र संभाजी ' मधील या संबंधीची माहिती पाहू.

    डॉ. गोखलेंच्या संशोधनानुसार संभाजीला औरंगजेबाने वढू येथे ठार केले. याकरता पुरावा म्हणून धनकवडीच्या कुलकर्ण्याच्या कागदपत्रातील दि. १४ जानेवारी १७१९ चा मजकूर त्यांनी दिला आहे तो असा :- " पातशहा वढू कोरेगावी येऊन मुक्काम केला. तेथून लष्कर पाठवून, सिवाजी राजे पहिलेच गेले होते, त्याचा लेक संभाजी राजे धरून आणिला आणि ( को| किंवा मौजे ) वढू कोरेगावात मारिला. मग त्याचा लेक शाहू राजा व बाईका आपल्या जालीत ठेविली. "

    तसेच वढू - तुळापुर संबंधी टिपेत त्यांनी अधिक माहिती अशी दिली आहे कि :- " वढूला शिरच्छेद केल्यानंतर तुळापुर येथील संगमावर संभाजीराजांचे दहन केले असावे, याला कागदोपत्री आधार मिळत नाही. संभाजीमहाराजांच्या शवाला जे शिवले त्यांना शिवले पाटील हे नाव मिळाले, असा समज असला तरी ती एक भाकड कथाच आहे. शिवपूर्वकाळापासूनच ' सिवले पाटील ' नावाचे उल्लेख आढळतात. "

    संभाजीच्या मृतदेहासंबंधी डॉ. गोखलेंनी असेही लिहिले आहे कि, " .. संभाजी राजांचा छिन्नविच्छिन्न देह वढू बुद्रकात फेकण्यात आला. शाहू आणि येसूबाई औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर त्याच जागी शाहू महाराजांनी १७१५ सालापूर्वी आपल्या वडिलांचे वृंदावन बांधले. "

    खेरीज संभाजीच्या वृंदावनाविषयी दि. १८ जानेवारी १७१५ चा पेशवे दप्तरातील एका कागदातील मजकूरही त्यांनी दिला आहे. त्यानुसार, " राजमंडळ - वृंदावने: वृंदावन महाराज राजश्री कैलासवासी संभाजी राजे स्वामी. दर जागा मोजे वढू, ता|| पाबळ, प्र|| जुन्नर भिकाराम गोसावी व वासुदेवभट बिन शामभट धर्माधिकारीणी वृंदावनाचे शुश्रूषेबद्दल देविले आहेत. नैवेद्य व नंदादीप व धूप बाग करावयास व तुलसी लावावयास व अन्नछत्राबद्दल इनाम जमीन छ २२ मोहरम सन खमस अशर मौजे मजकूरपैकी इनाम जमीन नूतन *५ बागाईत जमीन *१० वहीत जमीन सेत चौसुक वृंदावनानजिक आहे. त्यांपैकी .|||. १५ पड जमीन - तीन प्रतीची १|- असामी इनाम जमिनी घातली आहे. "
 ( चिन्ह '*' खुलासा :- जमिनीच्या मोजमापाबद्दल तत्कालीन प्रचलित चिन्ह दर्शवले असून ते टाईप होत नसल्याने '*' या चिन्हाची योजना केल्याची नोंद घ्यावी. )

    शिवाय संभाजीच्या वृंदावनाची गोविंद गोपाळ ढगोजी मेगोजी हा झाडलोट करत असून शाहूने त्यांस इनाम जमीन दिली होती. त्यासंबंधी पेशवे दप्तरातील दि. १९ मे १७२३ च्या कागदपत्रातील डॉ. गोखलेंनी दिलेली नोंद पुढीलप्रमाणे :- " गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी हे तीर्थरूप राजश्री कैलासवासींचे वृंदावन मोजे वढू तर्फ पाबळच्या राणांत आते तेथे हे राहून वृंदावनाची सेवा करिताती. याजनिमित्य स्वामी याणी कृपाळू होऊन मौजे वढू तर्फ पाबळ येथील खालसा पड जमिनीपैकी अवल दुम सीमती प्रतीची जमीन बिघे कुलबाब कुलकानु इनाम दिली. *५ ..."

    संभाजीच्या वृंदावन सेवेबद्दलच्या दोन सनदांपैकी एक वासुदेवभटादींची सनद श्री. केळकरांनी दिली असून डॉ. गोखलेंनी त्या सनदेसोबतच गोविंद गोपाळच्या सनदेतील काही मजकूर उदधृत केला आहे. इथे हि गोष्ट नमूद करणे आवशयक आहे कि, डॉ. गोखले लिखित संभाजी चरित्राची प्रथम आवृत्ती स. १९७१ साली प्रकाशित झाली होती. असो.

    उपरोक्त माहितीवरून संभाजीच्या समाधीची वा सनदांतील उल्लेखानुसार वृंदावनाची स्थळ निश्चिती जशी होते त्याचप्रमाणे त्याचे सेवेकरी कोण होते याचीही माहिती मिळते. परंतु मूळ प्रश्न असा आहे कि, संभाजीच्या मृतदेहाचे दहन झाले होते कि नाही ?

    श्री. केळकर मोघमपणे मराठा सरदाराचा उल्लेख करतात. पण नाव देत नाहीत. केळकरांसारख्या अभ्यासू संशोधकाकडून असा हलगर्जीपणा अपेक्षित नाही. परंतु त्यांच्या लेखसंग्रहाचे पुस्तक त्यांच्या पश्चात प्रकाशित झाल्याने यासंबंधी त्यांच्यावर टीकाही करता येत नाही. असो.

    संभाजीच्या चरित्रकार डॉ. गोखलेंच्या मतानुसार संभाजीच्या डेड बॉडीचे दहन झालेच नाही. संभाजीच्या खुनाचा विपर्यास्त वृत्तांत पाहता दहनाकरता त्याची बॉडी वा मृतदेहाचे काही अवयव औरंगजेबाने शिल्लक ठेवले होते कि नव्हते याविषयी शंकाच आहे. दुसरे असे कि, संभाजीच्या डेड बॉडीच्या दहनाविषयी कोणत्याही मराठी सरदाराने --- मग तो मोगल छावणीतील का असेना --- बादशहाकडे रदबदली केल्याचा समकालीनच काय पण नंतरच्या काळातीलही उल्लेख मिळत नाही. यावरून डॉ. गोखलेंच्या अनुमानासच अधिक बळकटी प्राप्त होते.

    परंतु यानंतरही प्रश्न शिल्लक राहतोच व तो म्हणजे, अभिषिक्त राजाच्या मृतदेहच्या दहनाची परवानगी मिळवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत ? काही एक दंडादाखल रक्कम भरून गुलाम, कैदी, युद्धबंदी, ओलीस तसेच मृतदेहांची सुटका त्या काळी केली जात असे. मग संभाजीच्या बाबत असे का न घडावे ?
    औरंगजेबाच्या छावणीत कित्येक मराठी सरदार -- त्यातील काही संभाजीचे आप्त व त्याची नोकरी सोडून आलेले -- तसेच प्रतिष्ठित राजपूत सरदार असतानाही हा प्रकार घडावा ? कि संभाजी बद्दल कोणाला आपुलकीच राहिली नव्हती ? शिवाजीच्या मृतदेहास मंत्राग्नी मिळाला वा भडाग्नी दिला यावर वाद होतो. हा कितपत योग्य वा अयोग्य हा भाग जरी बाजुला ठेवला तरी त्याच्या मृतदेहाचे दहन निदान हिंदू परंपरेनुसार तरी झाले. मग संभाजीच्या मृतदेहा नशिबी हा योग नसावा ? याचे थोडे वाईटही वाटते व आश्चर्यही !
 
    इतिहास संशोधन, लेखनाच्या बाबतीत अजून आपण बाल्यावस्थेत आहोत. इतिहासलेखनाची समग्र सामग्रीही आज आपणांस उपलब्ध नाही. पण हे सर्व मान्य करूनही नवा पुरावा समोर येईपर्यंत संभाजीच्या मृतदेहास साधा दहनविधी लाभू देण्यातही मराठी समाजास यश लाभले नाही हा डाग मात्र कायम राहील !  

Thursday, August 3, 2017

नाग, नाक व नाईक या संज्ञांविषयी चार शब्द .. ( भाग १ )
    प्राचीन तसेच मध्ययुगीन भारताच्या, विशेषतः महाराष्ट्रीय इतिहास अभ्यासकास नाग, नाक, नाईक या संज्ञा तशा अपरिचित नाहीत. यांपैकी प्रथम संज्ञा वंशवाचक, द्वितीय जातीवाचक तर तृतीय प्रथम सैन्य वा प्रशासनातील अधिकार पदाची निदर्शक असून आता ती व्यवहारात प्रामुख्याने आडनाव म्हणून वापरात आहे. प्रस्तुत लेखात या तीन संज्ञांची उपलब्ध संदर्भ ग्रंथांच्या आधारे चर्चा करण्याचे योजले आहे.

    प्रथमतः आपण नाग व नाक या दोन संज्ञांचा विचार करू. वस्तुतः या दोन्ही संज्ञा परस्परसंलग्न नसतानाही अर्थनिष्पतीच्या चुकीतून त्यांची परस्परांशी सांगड घालण्यात आली आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.
    उदाहरणार्थ, नाग हा प्राचीन भारतातील एक वंश, संस्कृती मानण्यात येऊन या वंशातील लोकांना नाग असे म्हणण्यात येऊन उच्चारी अपभ्रंशात नागाचे नाक बनण्यात आले अशी एक उपपत्ती मांडली जाते.   

    या सिद्धांतावर येणारा प्रथम आक्षेप म्हणजे नाग वंश / संस्कृतीचे नाक असे भ्रष्ट रूप झाल्याचे क्षणभर गृहीत धरले तर प्रस्तुत वंशाशी / संस्कृतीशी समकालीनांच्या बाबतीत असा अपभ्रंश झाला का ? दुसरे असे कि, नाग वंश, टोळी वा संस्कृतीशी संबंधित किंवा नागाचे प्रतीक वापरणारे सर्वच लोक थेट नागवंशीय किंवा नाक या जातीवाचक घटकांत मोडत नाहीत. उदाहरणार्थ लोणीकर शिंदे घराणे. गुलाबराव रविराव शिंदे लोणीकर वंशावळीनुसार यांचा कुलस्वामी शेष असून ध्वजामध्येही याचा समावेश होता.
    तिसरा मुद्दा असा आहे कि, जो द्वितीय मुद्द्याशीच एकप्रकारे संलग्न आहे व तो म्हणजे नागपूजा हि हिंदूधर्मातील एक संस्कृतीचा भाग आहे, सण आहे. मग हि पूजा करणारे सर्व नाग वंशीय ठरतात का ?

    याच स्थळी आपणांस नाक व नाईक या दोन परस्पर विरुद्ध वाटणाऱ्या संकल्पनांचाही विचार करणे भाग आहे. नाक हि संज्ञा प्रामुख्याने महारांच्या नावामागे लावली जात असे. नाक हे नागाचे अपभ्रष्ट रूप मानले जाते तद्वत ते नाईक या शब्दाचेही संक्षिप्त वा समकक्ष रूप असावे असे माझे मत आहे. माझे विधान स्पष्ट करण्यासाठी आपण प्रथम नाक व नाईक यांचा उपलब्ध पूर्वेतिहास पाहू.

    नाक, नाईक या शब्दांचं इतिहासात धांडोळा घेतला असता स. १४७५ मध्ये बेदरच्या बहामनी बादशहाने जी ५२ हक्कांची सनद महारांच्या नावे महारप्रमुखांना करून दिली त्यामध्ये अंबरनाक / अमरनाकचे नाव येते. महत्त्वाचे म्हणजे विठ्या महाराची कथा कल्पित असून मूळ सनदेत त्याचा उल्लेखही नाही. असो.

    नाक हा शब्द महार व्यक्तीच्या नावामागे जोडला जात असला तरी तो सर्वच महारांना उद्देशून वापरला जात नसे हे ऐतिहासिक कागदपत्रांवरून स्पष्ट होते. उदाहरणार्थ डॉ. नभा अनिल काकडे संपादित ' छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे ' या ग्रंथात लेखांक क्र. ६६ मध्ये शिवाजीने कोट उटळुरच्या नागोजी भोसल्यास तटसरनोबत, बारगीर यांची सरंजामी यादी पाठवली असून त्यात बारगीरांच्या यादीत ' नरसाजी हणवंत राऊ महारावर ' असा उल्लेख आहे. विशेष म्हणजे सात बारगीरांत याचीच जातीसह नोंद असून कानोजी जाऊजी सावंत याचा बारगीर म्हणून उल्लेख असून इतर पाच जणांची पूर्ण नावं देण्यात आली आहेत. तसेच या साठी असाम्यांचे पगार समान आहेत.

    ग. ह. खरे संपादित ऐतिहासिक फारसी साहित्य प्रथम खंडात ले. क्र. ३३ मध्ये बिरवाडी तप्याच्या देशमुखासंबंधी औरंगजेबाच्या अधिकाऱ्याचे पत्र असून त्यात बापुजी साबाजीराव देसाई हा मोगलांची चाकरी सोडून पळून जाऊ नये म्हणून दहा जणांची जामिनदारी असून त्यातील ५ मराठे व ५ परवरील नाउलकर आहेत. मराठ्यांतील दोन बारगीर, एक जमातदार असून उर्वरित दोघांची नावे आहेत. तर परवरील यादीत कोंडनाक वलद लखमनाक सोबत जाविलकर हे बहुधा गावाचे नाव जोडून इतर चौघांची फक्त नावं दिलेली आहेत. विशेष म्हणजे देसाई पळून गेल्यास त्यास पकडून हजर करण्याची व ते न जमल्यास ३१५० रु. दंडादाखल देण्याची जामीनदारांनी कबुली दिलेली आहे.

    नाईक शब्दाचा पूर्वेतिहास पाहता द. ब. पारसनिसंच्या ' मराठे सरदार ' या निबंधानुसार मुसलमान अमदानीत नाईक व बर्गे या नावांत मराठ्यांचा समावेश होत असे. म्हणजेच मराठ्यांना उद्देशून हे पद योजित.

    याखेरीज दक्षिण भारतातील इतिहास पाहता एखाद्या प्रांत वा जहागिरीच्या प्रमुखाला नाईक, नायकवडी असे संबोधण्यात येई. व हा प्रकार अगदी पेशवाईकाळातही प्रचलित होता. उदाहरणार्थ म्हैसूरचं राज्य बळकावणाऱ्या हैदरअलीचा मराठी कागदपत्रांत हैदर नाईक असाच उल्लेख येतो. खेरीज रामोशी, बेरड प्रमुखांनाही नाईक म्हटले जात असे. शिवाय सावकारांनाही नाईक म्हणून संबोधले जात असे. याखेरीज शिवकालीन सैन्यरचनेचा दाखला घेतला तर पायदळातील दहा शिपायांवरील अंमलदारास नाईक म्हणण्यात येई.

    यावरून असे दिसून येते कि, नाक व नाईक हे दोन्ही बहुमान वा अधिकार दर्शक पदनाम होते. परंतु प्रश्न असा आहे कि, नाक हे विशिष्ट जातिवाचक का बनावे व नाईक हे सर्व जातींकरता पदनाम तसेच आडनाव का बनून राहावे ? या प्रश्नाची चर्चा करण्यापूर्वी प्रथम आपण पदनाम व आडनाव बदलतील काही नोंदी पाहू.

    द. ब. पारसनीसांनी आपल्या ' मराठे सरदार ' या निबंधात फलटणच्या निंबाळकर घराण्याचा इतिहास दिला आहे. त्यानुसार यांचे उपनाम पवार असून ते मुळचे उत्तर हिंदुस्थानातील धारा नगरीचे रहिवासी होते. या घराण्याचा संस्थापक निंबराज पवार (मृ.१२९१) हा दक्षिणेत आला व त्याने एके ठिकाणी गाव वसवले त्यांस निंबळक म्हणतात तर त्याचे वंशज त्या गावी कायम झाल्याने त्यांस निंबाळकर म्हटले जाऊ लागले.

    निंबराजचा मुलगा जगदेवराव महंमद तुघलकाच्या सेवेत असून स. १३२७ मध्ये त्याचा एका लढाईत मृत्यू झाल्यावर तुघलकाने जगदेवचा मुलगा निंबराज यांस निंबळक गाव त्या भोवतीचा साडेतीन लक्षांचा मुलूख जहागीर म्हणून देत ' नाईक ' असा किताब दिला. यापुढे या घराण्यात नाईक हा किताब कायम राहून निंबाळकर आधी त्याची योजना केली जाते. उदा :- बजाजी नाईक निंबाळकर 

    नाक, नाईक संज्ञांचा पूर्वेतिहास पाहता त्यांची, माझ्या माहितीनुसार, ज्ञात मुळं चौदाव्या शतकापर्यंत जातात. याचाच अर्थ असा कि, हि पदनामं त्यापूर्वी किमान पन्नास शंभर वर्षे तरी व्यवहारात प्रचलित असावीत. परंतु मूळ प्रश्न असा आहे कि, यातील मूळ रूप कोणते ? कि दोन्ही एकाच वेळी प्रचलित होते ?

    श्री. संजय सोनवणींनी जवळपास याच आशयाचा प्रश्न आपल्या ' महार कोण होते ? ' या ग्रंथात उपस्थित केला आहे. सोनवणींच्या ग्रंथाधारेच आपण या प्रश्नाची उकल करण्याचा यत्न करू.
सोनवणींनी आपल्या ' महार कोण होते ? ' या संशोधनपर ग्रंथात महार शब्दाची व्युत्पत्ती महाराष्ट्री प्राकृतातील ' महारक्ख ' शब्दांत शोधली आहे. संस्कृत हि प्राचीन भाषा मानणाऱ्यांना हि उपपत्ती  पचणे अस्वाभाविक असले तरी याचा निर्णायक प्रतिवाद न झाल्याने मला सोनवणींचेच मत ग्राह्य वाटते. त्याचप्रमाणे सोनवणींच्या ' अंगविज्ज्या ' या कुशाणकालीन पहिल्या - दुसऱ्या शतकातील महाराष्ट्री प्रकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या ग्रंथावरील लेखांत इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत भारतात जातीव्यवस्था नसल्याचे म्हटले आहे. तसेच इसवी सनाच्या चौथ्या पाचव्या शतकात विकृत पूर्णावस्थेत पोहोचलेल्या मनुस्मृतिसारख्या वैदिक ग्रंथातही प्रचलित हिंदू जातींचा उल्लेख येत नसल्याचे मला आढळून आले आहे.

    सोनवणींच्या महारक्ख थियरीनुसार इसपू. २२० ते २३० या सुमारे साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ काळात महाराष्ट्रावर सातवाहनांची सत्ता असून नगर तसेच ग्राम सुरक्षा व्यवस्था प्रमुखास महारक्ख असे प्राकृत पदनाम होते. याच महारक्खाचा पुढे अपभ्रंश होत महार बनले. महत्त्वाचे म्हणजे सातवाहन काळात प्रांत विभागास रठ्ठ म्हणत असून या प्रांतप्रमुखास महारठ्ठी म्हटले जायचे. याच महारठ्ठीचा अपभ्रंश पुढे मराठा शब्दांत झाला. या सिद्धांतान्वये महारक्ख व महारठ्ठी, महारठ्ठ या दोन पदनामांचे अपभ्रंशीत जातीवाचक नावात रुपांतर झाल्याचे दिसून येते. मग हाच नियम नाक व नाईक यांना लागू पडत असेल का ?

    नाक हा शब्द नागाचा अपभ्रंश मानला तरी पाली शब्दकोशानुसार नाग या शब्दाचा अर्थ सर्प, हत्ती, नागवृक्ष, श्रेष्ठ, श्रेष्ठ पुरुष असा असून नाक या शब्दाचा अर्थ स्वर्ग आहे. अर्थात नाग - नाक हि व्युत्पत्ती टिकत नाही. मग नाक हा कशाचा अपभ्रंश वा संक्षेप असावा ?

    मराठी शब्दकोश खंड ४ नुसार नाक या शब्दाचे अर्थ पुढीलप्रमाणे :- स्वर्ग, नाईक याचे संक्षिप्त रूप हे महार, बेरड इ. च्या नावापुढे लावतात.

    तसेच याच शब्दकोशानुसार नायकडा म्हणजे महारजातीचा म्होरक्या, पुढारी म्हटलेलं आहे.
खेरीज नायकवडा, नायकवडी, नाईकवडा, नाईकवडी, नाईकवाडी, नायकवाडा, नायकवाडी या शब्दांचे अर्थ पुढीलप्रमाणे दिले आहेत :- (१) पूर्वीचा जमीन महसूल वसूल करणारा शिपाई (२) रामोशी, बेरड यांचा म्होरक्या, नाईक (३) जासूद (४) पायदळातील किंवा किल्ल्यावरच्या दहा वीस मनुष्यांवरचा अधिकारी (५) सेनापती, नायक (६) मुसलमानातील एक जात

    मराठी शब्दकोषानुसार नाक हे नायकवडाचे संक्षेप मानले तरी यासोबत इतर संज्ञांचा संक्षेप का झाला नाही हा प्रश्न उरतोच. त्याचप्रमाणे नाक हे पद बेरड, रामोशांनाही लावत असल्याचे शब्दकोश सांगत असल्याने याची व्याप्ती महार समाजापुरती राहत नाही हे उघड आहे.

     अर्थात सोनवणींच्या महारक्ख थियरीनुसार महारक्ख तथा रक्षक परंपरेत सर्वच समाजघटकांचा --- जाती निर्माण होण्यापूर्वी -- समावेश होत असून त्याशिवाय जातीसंस्था निर्माण झाल्यावर जिथे महार समाजाची व्यक्ती उपलब्ध नसेल तिथे इतर समाजातील व्यक्तींना हे काम दिल्याचेही दाखले मिळतात.
    यावरून असा तर्क संभवतो कि, महारक्ख प्रमाणेच नाक हे पद देखील रक्षक वा तत्सम संस्थेच्या अधिकार प्रमुखास असावे व कालौघात त्याचे मूळ रूप लोपून नाक हे भ्रष्ट वा संक्षिप्त रूप शिल्लक राहिले असावे. कारण उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रे पाहता नाक हा शब्द महार जातीशी प्रामुख्याने निगडीत असला तरी तो सर्वच महारांना लावला जात नव्हता. तसेच रामोशी, बेरड समाजाच्या व्यक्तींना, प्रशासकीय/ लष्करी अधिकारी तसेच सावकार इ. ना नाकच्या ऐवजी वा त्यांस समकक्ष नाईक शब्द योजत त्यावरून असे अनुमान प्राप्त होते कि, नाक व नाईक हे दोन्ही शब्द समानार्थी वा एकच आहेत. पैकी, महारक्खांचे महार जातीत रुपांतर झाल्याने त्यांच्यातील प्रमुख व इतर जाती तसेच व्यवसाय, पडतील बहुमान / अधिकार दर्शक नाईक शब्दाचा भेद दर्शवण्यासाठी नाक व नाईक अशी योजना करण्यात आली.