शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

सुलतान नासिर-उद्दीन उर्फ खुस्रुखान




    मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील अनेक दुर्लक्षित ऐतिहासिक व्यक्तींपैकी एक म्हणजे मलिक खुस्रू उर्फ खुस्रुखान !
    खिलजी सुलतानांचा गुलाम व पूर्वाश्रमीच्या या हिंदू गृहस्थाचा पूर्वेतिहास उपलब्ध नाही. त्याच्या जाती विषयी इतिहासकारांत मतभेद असले तरी तो अस्पृश्य वा अंत्यज जातीसामुहातील होता यावर मात्र त्यांचे एकमत आहे.
    खुस्रु खिलजी सुलतानांच्या सेवेत कधी आला ? धर्मांतरापूर्वीचे त्याचे नाव काय होते ? त्याचा उत्कर्ष व अपकर्ष होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? याविषयी कसलीही तपशीलवार माहिती मिळत नाही. मान्यवर इतिहासकारांच्या ग्रंथांत फक्त त्याचे मुबारक खिलजीचे प्रीतिपात्र, मुबारकचा खून करून सत्ता बळकावणे व सुमारे पाच - सहा महिन्यांच्या शासन काळात इस्लाम विरोधी कारवाया करणे इ. उल्लेख येतात. या व अशा फुटकळ उल्लेखांच्या सहाय्याने व प्रामुख्याने गो. स. सरदेसाईंच्या मुसलमान रियासतीच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात आपण खुस्रुखानाविषयी चर्चा करणार आहोत.

    आधी सांगितल्याप्रमाणे खुस्रुखानाचा पूर्वेतिहास माझ्याजवळील साधनांत फारसा उपलब्ध नाही. जी काही माहिती प्राप्त झाली त्यावरून :- तो गुजरातमधील अंत्यज, अस्पृश्य, परीया, परवारी जातीचा असून दिल्लीवर सत्ता असलेल्या खिलजी घराण्यातील सुलतानांचा तो गुलाम होता. ज्याचे धर्मांतर करून त्यांनी आपल्या सेवेत घेतले होते. धर्मांतरानंतर त्याचे नाव हसन ठेवण्यात आले असून अल्लाउद्दिन खिलजीचा मुलगा -- मुबारक, याची हसनवर विशेष कृपादृष्टी होती.

    अल्लाउद्दिन खिलजी स. १३१६ मध्ये मरण पावल्यावर दरबारातील राज्यक्रांतीत प्रथम अल्लाउद्दिनचा विश्वासू सेनानी -- मलिक काफुरने बाजी मारत उमरखान नावाच्या अल्पवयीन शहजाद्यास हाताशी धरत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मलिक काफूर हा देखील खुस्रुप्रमाणे पुर्वाश्रमीचा हिंदू होता. परंतु राज्यक्रांतीच्या अस्थिर वातावरणात मलिकचा निभाव न लागता त्याचा खून करण्यात आला व अल्लाउद्दिनचा एक वारस -- मुबारक खिलजीने सुलतानपद धारण करत व इतर वारसदारांचा निकाल लावत राज्यपदावरील आपला मार्ग निष्कंटक केला.

    उपलब्ध इतिहासावरून असे दिसून येते कि, मुबारकची वर्तणूक काहीशी विचित्र होती. म्हणजे मान्यवर इतिहासकार त्याच्यावर -- नटव्याप्रमाणे सजून नर्तकींसोबत थोरांच्या घरी नाचकाम करण्याचा, व्यसन - ऐशोआरामात निमग्न राहण्याचा आरोप करतात. त्याचप्रमाणे अल्लाउद्दिनच्या काळात लोकांच्या दृष्टीने असलेले जाचक कर वगैरे बंद केल्याचाही उल्लेख करतात. परंतु या ठिकाणी हे देखील विसरता येत नाही कि, अशी व्यक्ती चार वर्षे का होईना सुलतानपदावर होती व जरी राज्यात बंडे होत असली तरी खुस्रूखानाखेरीज मुबारकला सत्तेवरून खाली खेचणे कोणाला जमले नाही.

    मुबारक खिलजीची इतिहासात नमूद असलेली महत्त्वाची कामगिरी म्हणजे स. १३१८ मध्ये त्याने दक्षिणेत स्वारी करून रामदेव राय जाधवाचा  जावई -- हरपाळदेव हा देवगड उर्फ देवगिरी येथे राज्य करत होता, त्यांस पकडून मुबारकने हाल हाल करून ठार केले व त्याचे राज्य आपल्या सल्तनतीस जोडले.

    मुबारक खिलजी सुलतान झाल्यावर किंवा तत्पूर्वी त्याने हसनला मलिक खुस्रु अशी पदवी दिली. खुस्रुने गुजरातमधून आपल्या जातीचे वीस हजार लोक आणवून त्यांस मोठमोठे अधिकार दिल्याचे रियासतकार सरदेसाई सांगतात. अर्थात, पुराव्याअभावी त्यांच्या विधानाची चिकित्सा करता येणे शक्य नसल्याने फारतर एवढे म्हणता येईल कि, खुस्रुने आणलेले लोक -- मग त्यांची संख्या किती का असेना -- हिंदू धर्मीय असून त्यात प्रामुख्याने खुस्रुच्या सजातीयांचा भरणा अधिक होता.

    स. १३१८ मधील मुबारक खिलजीच्या दक्षिण स्वारीत खुस्रु हजर असून मुबारकने त्याला मलबार प्रांतावरील स्वारीकरता नियुक्त केले होते. ती यशस्वीरित्या पार पाडून व अमाप लुट घेऊन खुस्रु स. १३१९ मध्ये दिल्लीला परतला. त्यावेळी सुलतानाने खुश होऊन त्याच्या हाती सर्व अधिकार सोपवला अशा आशयाचे विधान सरदेसाईंनी केले असले तरी फारतर त्याच्या अधिकारांत वा दर्जात वाढ केली असावी असे माझे मत आहे.  

    मलबार स्वारीहून परतल्यावर खुस्रुने संधी साधून सुलतान मुबारक खिलजीचा एके रात्री खून करून व स्वतः नासिरुद्दीन नाव धारण करत दिल्लीचे तख्त बळकावले. त्याने आपल्या नावाने खुत्बा वाचविला तसेच नाणीही पाडली. तसेच खिलजी घराण्यातील पुरुषांचा निकाल लावत मृत सुलतानाची पत्नी -- देवलदेवी हिच्याशी विवाहही केला.

    आपल्या या राज्यक्रांतीला लष्कराचा पाठिंबा असावा म्हणून त्याने शाही खजिन्यातून सैन्यात पैशाचे वाटप केले. जेणेकरून दरबारी मंडळी जरी त्याच्यावर नाखूष झाली तरी त्यांस त्याविरुद्ध फारशी हालचाल करता येऊ नये. तसं पाहिलं तर अल्लाउद्दिन खिलजीनेही दिल्लीचे तख्त चुलत्याकडून हिसकावून घेताना अशाच युक्तीचा अवलंब केला होता. परंतु परिणाम पाहता खुस्रुचा हा डाव काही प्रमाणातच यशस्वी ठरला असे म्हणावे लागते.

    दिल्लीतील खुस्रोचा सुलतानी अंमल सुमारे पाच महिने टिकला असे इतिहासकारांचे मत आहे. या अवधीत त्याने धार्मिक क्षेत्रात जी काही प्रचंड उलथापालथ केली त्याची तपशीलवार माहिती मिळत नाही. सरदेसाईंच्या रियासतीनुसार, खुस्रुने सत्ता हाती येताच स्वतःस हिंदू समजत त्यान्वये वर्तन चालवले. त्याच्या अनुयायांनी दिल्लीतील मशिदींत मुर्त्यांची स्थापना केली. कुराणावर ते बसू लागले. खिलजी सुलतान तसेच सरदारांच्या जनान्यातील स्त्रिया खुस्रुने आपल्या परीया अनुयायांच्या हवाली केल्या.

    सबळ पुराव्या अभावी सरदेसाईंच्या विधानांची चिकित्सा करता येणे शक्य नसले तरी या अनुषंगाने उद्भवणारे काही प्रश्न येथे उपस्थित करणे मी आवश्यक समजतो. उदा :- (१) खुस्रु व त्याचे अनुयायी कुराण - मशिदींच्या बाबत अनुचित वर्तन करत असताना दिल्लीतील मुस्लीम उमराव काय करत होते ? (२) कुत्बुद्दिन ऐबक पासून सुमारे शंभर वर्षे दिल्ली व आसपासचा प्रदेश मुस्लीम सत्ताधीशांच्या ताब्यात होता. परदेशी मुसलमानांचा यात भरणा अधिक होता. अशा स्थितीत खुस्रु व त्याचे वीस हजार अनुयायी इस्लामविरोधी कर्म करणे शक्य आहे का ? (३) खुस्रुने शाही खजिन्यातून रकमा देऊन फौजेचा पाठिंबा जरी मिळवला असला तरी खुस्रुच्या इस्लामविरोधी कारवायांनी फौजेत बंड वगैरे झाले होते का ? (४) खुस्रु स्वतःला हिंदू समजून वर्तन करू लागला तर त्याने नासिरुद्दीन किताब वा नाव का धारण केले ? कि त्याला पुन्हा हिंदू धर्मात यायचे नव्हते अथवा त्याचे हिंदू धर्मात धर्मांतर करण्यास शास्त्र वा समाज अनुकूल नव्हता ? असो.

    खुस्रुच्या सुलतानीस पंजाबातील खिलजी सुलतान नियुक्त सुभेदार गाजीबेग तुघलकने आव्हान देत दिल्लीवर स्वारी केली. त्याप्रसंगी झालेल्या संग्रामात खुस्रुचा पराभव होऊन तो शत्रूहाती सापडला असता गाजीबेगने त्यांस ठार करून दिल्लीवर तुघलक घराण्याची सत्ता स्थापन केली. ( स. १३२१ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: