गुरुवार, ३ ऑगस्ट, २०१७

नाग, नाक व नाईक या संज्ञांविषयी चार शब्द .. ( भाग १ )




    प्राचीन तसेच मध्ययुगीन भारताच्या, विशेषतः महाराष्ट्रीय इतिहास अभ्यासकास नाग, नाक, नाईक या संज्ञा तशा अपरिचित नाहीत. यांपैकी प्रथम संज्ञा वंशवाचक, द्वितीय जातीवाचक तर तृतीय प्रथम सैन्य वा प्रशासनातील अधिकार पदाची निदर्शक असून आता ती व्यवहारात प्रामुख्याने आडनाव म्हणून वापरात आहे. प्रस्तुत लेखात या तीन संज्ञांची उपलब्ध संदर्भ ग्रंथांच्या आधारे चर्चा करण्याचे योजले आहे.

    प्रथमतः आपण नाग व नाक या दोन संज्ञांचा विचार करू. वस्तुतः या दोन्ही संज्ञा परस्परसंलग्न नसतानाही अर्थनिष्पतीच्या चुकीतून त्यांची परस्परांशी सांगड घालण्यात आली आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.
    उदाहरणार्थ, नाग हा प्राचीन भारतातील एक वंश, संस्कृती मानण्यात येऊन या वंशातील लोकांना नाग असे म्हणण्यात येऊन उच्चारी अपभ्रंशात नागाचे नाक बनण्यात आले अशी एक उपपत्ती मांडली जाते.   

    या सिद्धांतावर येणारा प्रथम आक्षेप म्हणजे नाग वंश / संस्कृतीचे नाक असे भ्रष्ट रूप झाल्याचे क्षणभर गृहीत धरले तर प्रस्तुत वंशाशी / संस्कृतीशी समकालीनांच्या बाबतीत असा अपभ्रंश झाला का ? दुसरे असे कि, नाग वंश, टोळी वा संस्कृतीशी संबंधित किंवा नागाचे प्रतीक वापरणारे सर्वच लोक थेट नागवंशीय किंवा नाक या जातीवाचक घटकांत मोडत नाहीत. उदाहरणार्थ लोणीकर शिंदे घराणे. गुलाबराव रविराव शिंदे लोणीकर वंशावळीनुसार यांचा कुलस्वामी शेष असून ध्वजामध्येही याचा समावेश होता.
    तिसरा मुद्दा असा आहे कि, जो द्वितीय मुद्द्याशीच एकप्रकारे संलग्न आहे व तो म्हणजे नागपूजा हि हिंदूधर्मातील एक संस्कृतीचा भाग आहे, सण आहे. मग हि पूजा करणारे सर्व नाग वंशीय ठरतात का ?

    याच स्थळी आपणांस नाक व नाईक या दोन परस्पर विरुद्ध वाटणाऱ्या संकल्पनांचाही विचार करणे भाग आहे. नाक हि संज्ञा प्रामुख्याने महारांच्या नावामागे लावली जात असे. नाक हे नागाचे अपभ्रष्ट रूप मानले जाते तद्वत ते नाईक या शब्दाचेही संक्षिप्त वा समकक्ष रूप असावे असे माझे मत आहे. माझे विधान स्पष्ट करण्यासाठी आपण प्रथम नाक व नाईक यांचा उपलब्ध पूर्वेतिहास पाहू.

    नाक, नाईक या शब्दांचं इतिहासात धांडोळा घेतला असता स. १४७५ मध्ये बेदरच्या बहामनी बादशहाने जी ५२ हक्कांची सनद महारांच्या नावे महारप्रमुखांना करून दिली त्यामध्ये अंबरनाक / अमरनाकचे नाव येते. महत्त्वाचे म्हणजे विठ्या महाराची कथा कल्पित असून मूळ सनदेत त्याचा उल्लेखही नाही. असो.

    नाक हा शब्द महार व्यक्तीच्या नावामागे जोडला जात असला तरी तो सर्वच महारांना उद्देशून वापरला जात नसे हे ऐतिहासिक कागदपत्रांवरून स्पष्ट होते. उदाहरणार्थ डॉ. नभा अनिल काकडे संपादित ' छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे ' या ग्रंथात लेखांक क्र. ६६ मध्ये शिवाजीने कोट उटळुरच्या नागोजी भोसल्यास तटसरनोबत, बारगीर यांची सरंजामी यादी पाठवली असून त्यात बारगीरांच्या यादीत ' नरसाजी हणवंत राऊ महारावर ' असा उल्लेख आहे. विशेष म्हणजे सात बारगीरांत याचीच जातीसह नोंद असून कानोजी जाऊजी सावंत याचा बारगीर म्हणून उल्लेख असून इतर पाच जणांची पूर्ण नावं देण्यात आली आहेत. तसेच या साठी असाम्यांचे पगार समान आहेत.

    ग. ह. खरे संपादित ऐतिहासिक फारसी साहित्य प्रथम खंडात ले. क्र. ३३ मध्ये बिरवाडी तप्याच्या देशमुखासंबंधी औरंगजेबाच्या अधिकाऱ्याचे पत्र असून त्यात बापुजी साबाजीराव देसाई हा मोगलांची चाकरी सोडून पळून जाऊ नये म्हणून दहा जणांची जामिनदारी असून त्यातील ५ मराठे व ५ परवरील नाउलकर आहेत. मराठ्यांतील दोन बारगीर, एक जमातदार असून उर्वरित दोघांची नावे आहेत. तर परवरील यादीत कोंडनाक वलद लखमनाक सोबत जाविलकर हे बहुधा गावाचे नाव जोडून इतर चौघांची फक्त नावं दिलेली आहेत. विशेष म्हणजे देसाई पळून गेल्यास त्यास पकडून हजर करण्याची व ते न जमल्यास ३१५० रु. दंडादाखल देण्याची जामीनदारांनी कबुली दिलेली आहे.

    नाईक शब्दाचा पूर्वेतिहास पाहता द. ब. पारसनिसंच्या ' मराठे सरदार ' या निबंधानुसार मुसलमान अमदानीत नाईक व बर्गे या नावांत मराठ्यांचा समावेश होत असे. म्हणजेच मराठ्यांना उद्देशून हे पद योजित.

    याखेरीज दक्षिण भारतातील इतिहास पाहता एखाद्या प्रांत वा जहागिरीच्या प्रमुखाला नाईक, नायकवडी असे संबोधण्यात येई. व हा प्रकार अगदी पेशवाईकाळातही प्रचलित होता. उदाहरणार्थ म्हैसूरचं राज्य बळकावणाऱ्या हैदरअलीचा मराठी कागदपत्रांत हैदर नाईक असाच उल्लेख येतो. खेरीज रामोशी, बेरड प्रमुखांनाही नाईक म्हटले जात असे. शिवाय सावकारांनाही नाईक म्हणून संबोधले जात असे. याखेरीज शिवकालीन सैन्यरचनेचा दाखला घेतला तर पायदळातील दहा शिपायांवरील अंमलदारास नाईक म्हणण्यात येई.

    यावरून असे दिसून येते कि, नाक व नाईक हे दोन्ही बहुमान वा अधिकार दर्शक पदनाम होते. परंतु प्रश्न असा आहे कि, नाक हे विशिष्ट जातिवाचक का बनावे व नाईक हे सर्व जातींकरता पदनाम तसेच आडनाव का बनून राहावे ? या प्रश्नाची चर्चा करण्यापूर्वी प्रथम आपण पदनाम व आडनाव बदलतील काही नोंदी पाहू.

    द. ब. पारसनीसांनी आपल्या ' मराठे सरदार ' या निबंधात फलटणच्या निंबाळकर घराण्याचा इतिहास दिला आहे. त्यानुसार यांचे उपनाम पवार असून ते मुळचे उत्तर हिंदुस्थानातील धारा नगरीचे रहिवासी होते. या घराण्याचा संस्थापक निंबराज पवार (मृ.१२९१) हा दक्षिणेत आला व त्याने एके ठिकाणी गाव वसवले त्यांस निंबळक म्हणतात तर त्याचे वंशज त्या गावी कायम झाल्याने त्यांस निंबाळकर म्हटले जाऊ लागले.

    निंबराजचा मुलगा जगदेवराव महंमद तुघलकाच्या सेवेत असून स. १३२७ मध्ये त्याचा एका लढाईत मृत्यू झाल्यावर तुघलकाने जगदेवचा मुलगा निंबराज यांस निंबळक गाव त्या भोवतीचा साडेतीन लक्षांचा मुलूख जहागीर म्हणून देत ' नाईक ' असा किताब दिला. यापुढे या घराण्यात नाईक हा किताब कायम राहून निंबाळकर आधी त्याची योजना केली जाते. उदा :- बजाजी नाईक निंबाळकर 

    नाक, नाईक संज्ञांचा पूर्वेतिहास पाहता त्यांची, माझ्या माहितीनुसार, ज्ञात मुळं चौदाव्या शतकापर्यंत जातात. याचाच अर्थ असा कि, हि पदनामं त्यापूर्वी किमान पन्नास शंभर वर्षे तरी व्यवहारात प्रचलित असावीत. परंतु मूळ प्रश्न असा आहे कि, यातील मूळ रूप कोणते ? कि दोन्ही एकाच वेळी प्रचलित होते ?

    श्री. संजय सोनवणींनी जवळपास याच आशयाचा प्रश्न आपल्या ' महार कोण होते ? ' या ग्रंथात उपस्थित केला आहे. सोनवणींच्या ग्रंथाधारेच आपण या प्रश्नाची उकल करण्याचा यत्न करू.
सोनवणींनी आपल्या ' महार कोण होते ? ' या संशोधनपर ग्रंथात महार शब्दाची व्युत्पत्ती महाराष्ट्री प्राकृतातील ' महारक्ख ' शब्दांत शोधली आहे. संस्कृत हि प्राचीन भाषा मानणाऱ्यांना हि उपपत्ती  पचणे अस्वाभाविक असले तरी याचा निर्णायक प्रतिवाद न झाल्याने मला सोनवणींचेच मत ग्राह्य वाटते. त्याचप्रमाणे सोनवणींच्या ' अंगविज्ज्या ' या कुशाणकालीन पहिल्या - दुसऱ्या शतकातील महाराष्ट्री प्रकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या ग्रंथावरील लेखांत इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत भारतात जातीव्यवस्था नसल्याचे म्हटले आहे. तसेच इसवी सनाच्या चौथ्या पाचव्या शतकात विकृत पूर्णावस्थेत पोहोचलेल्या मनुस्मृतिसारख्या वैदिक ग्रंथातही प्रचलित हिंदू जातींचा उल्लेख येत नसल्याचे मला आढळून आले आहे.

    सोनवणींच्या महारक्ख थियरीनुसार इसपू. २२० ते २३० या सुमारे साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ काळात महाराष्ट्रावर सातवाहनांची सत्ता असून नगर तसेच ग्राम सुरक्षा व्यवस्था प्रमुखास महारक्ख असे प्राकृत पदनाम होते. याच महारक्खाचा पुढे अपभ्रंश होत महार बनले. महत्त्वाचे म्हणजे सातवाहन काळात प्रांत विभागास रठ्ठ म्हणत असून या प्रांतप्रमुखास महारठ्ठी म्हटले जायचे. याच महारठ्ठीचा अपभ्रंश पुढे मराठा शब्दांत झाला. या सिद्धांतान्वये महारक्ख व महारठ्ठी, महारठ्ठ या दोन पदनामांचे अपभ्रंशीत जातीवाचक नावात रुपांतर झाल्याचे दिसून येते. मग हाच नियम नाक व नाईक यांना लागू पडत असेल का ?

    नाक हा शब्द नागाचा अपभ्रंश मानला तरी पाली शब्दकोशानुसार नाग या शब्दाचा अर्थ सर्प, हत्ती, नागवृक्ष, श्रेष्ठ, श्रेष्ठ पुरुष असा असून नाक या शब्दाचा अर्थ स्वर्ग आहे. अर्थात नाग - नाक हि व्युत्पत्ती टिकत नाही. मग नाक हा कशाचा अपभ्रंश वा संक्षेप असावा ?

    मराठी शब्दकोश खंड ४ नुसार नाक या शब्दाचे अर्थ पुढीलप्रमाणे :- स्वर्ग, नाईक याचे संक्षिप्त रूप हे महार, बेरड इ. च्या नावापुढे लावतात.

    तसेच याच शब्दकोशानुसार नायकडा म्हणजे महारजातीचा म्होरक्या, पुढारी म्हटलेलं आहे.
खेरीज नायकवडा, नायकवडी, नाईकवडा, नाईकवडी, नाईकवाडी, नायकवाडा, नायकवाडी या शब्दांचे अर्थ पुढीलप्रमाणे दिले आहेत :- (१) पूर्वीचा जमीन महसूल वसूल करणारा शिपाई (२) रामोशी, बेरड यांचा म्होरक्या, नाईक (३) जासूद (४) पायदळातील किंवा किल्ल्यावरच्या दहा वीस मनुष्यांवरचा अधिकारी (५) सेनापती, नायक (६) मुसलमानातील एक जात

    मराठी शब्दकोषानुसार नाक हे नायकवडाचे संक्षेप मानले तरी यासोबत इतर संज्ञांचा संक्षेप का झाला नाही हा प्रश्न उरतोच. त्याचप्रमाणे नाक हे पद बेरड, रामोशांनाही लावत असल्याचे शब्दकोश सांगत असल्याने याची व्याप्ती महार समाजापुरती राहत नाही हे उघड आहे.

     अर्थात सोनवणींच्या महारक्ख थियरीनुसार महारक्ख तथा रक्षक परंपरेत सर्वच समाजघटकांचा --- जाती निर्माण होण्यापूर्वी -- समावेश होत असून त्याशिवाय जातीसंस्था निर्माण झाल्यावर जिथे महार समाजाची व्यक्ती उपलब्ध नसेल तिथे इतर समाजातील व्यक्तींना हे काम दिल्याचेही दाखले मिळतात.
    यावरून असा तर्क संभवतो कि, महारक्ख प्रमाणेच नाक हे पद देखील रक्षक वा तत्सम संस्थेच्या अधिकार प्रमुखास असावे व कालौघात त्याचे मूळ रूप लोपून नाक हे भ्रष्ट वा संक्षिप्त रूप शिल्लक राहिले असावे. कारण उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रे पाहता नाक हा शब्द महार जातीशी प्रामुख्याने निगडीत असला तरी तो सर्वच महारांना लावला जात नव्हता. तसेच रामोशी, बेरड समाजाच्या व्यक्तींना, प्रशासकीय/ लष्करी अधिकारी तसेच सावकार इ. ना नाकच्या ऐवजी वा त्यांस समकक्ष नाईक शब्द योजत त्यावरून असे अनुमान प्राप्त होते कि, नाक व नाईक हे दोन्ही शब्द समानार्थी वा एकच आहेत. पैकी, महारक्खांचे महार जातीत रुपांतर झाल्याने त्यांच्यातील प्रमुख व इतर जाती तसेच व्यवसाय, पडतील बहुमान / अधिकार दर्शक नाईक शब्दाचा भेद दर्शवण्यासाठी नाक व नाईक अशी योजना करण्यात आली.    
  



३ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

महार, मांग आणि बेरड यांत फरक काय? त्यांचे समाज रचनेत कार्य काय होते? विशेषतः समर प्रसंगांच्या वेळी किती मेले, किती जखमी, मृतक सेनेतील जनावरांच्या शरीराची विल्हेवाट वगैरे काही कामांचे संदर्भ आहेत का? कुठे मिळतील?

Unknown म्हणाले...

"नाग, महार " या विषयी साधार माहिती कुठल्या ग्रंथातुन मिळेल?

Unknown म्हणाले...

प्राचीन भारतातील नाग ( शोध ग्रंथ)
लेखक एच. एल कोसारे.