गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

काश्मीरचा सम्राट ललितादित्य :- पुस्तक परिचय




जागतिक राजकारणाचे संदर्भ लक्षात घेत इतिहासलेखनाची परंपरा आपल्याकडे फारशी प्रचलित नाही. त्यामुळेच आमचे आजवरचे सर्व इतिहासलेखन म्हणजे ' कूपमंडूक वृत्तीने केलेले इतिहासलेखन ' या सदरात मोडणारे आहे. या देशावर वारंवार परकीय आक्रमकांच्या स्वाऱ्या होत होत्या. त्यामागील नेमके कारण काय असावे, याचा आम्हांला शोध घेण्याची कधी बुद्धीच झाली नाही व झाली त्यावेळी त्याला ' धार्मिक आक्रमणाचे ' लेबल चिटकवून आम्ही उरबडवेगिरीस जो आरंभ केला तो अद्यापि थांबलेला नाही.
या पार्श्वभूमीवर श्री. संजय सोनवणींनी ' काश्मीरचा सम्राट ललितादित्य ' या ऐतिहासिक ग्रंथातून आठव्या शतकातील एका भारतीय सम्राटाच्या चरित्राची, जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनातून केलेली मांडणी खरोखर कौतुकास्पद आहे ! कारण या सम्राटाविषयी काश्मीर सहित सर्वच भारतीयांना फारशी माहिती नाही. वैदिक इतिहासकारांना, त्याने अरबी आक्रमण परतवून लावले एवढेच माहिती असते व तेवढाच त्यांना कळवळा असतो. परंतु त्यासोबतच ललितादित्याचे साम्राज्य कुठवर विस्तारले होते, मध्य आशियातील किंबहुना आशिया खंडातील राजकारणात त्याचे नेमके स्थान काय होते याचा शोध घेण्याची बुद्धी त्यांना कधी झालीच नाही. 
या देशावर सर्वाधिक परकीय आक्रमणं पश्चिमोत्तर दिशेकडून झाली असली तरी पूर्वोत्तर दिशेने झालेली आक्रमणं तेवढीच घातक, अनर्थकारी असल्याचे आपण कधी लक्षातच घेतले नाही. पूर्वसुरींनी आपल्याला भगव्या न्  हिरव्या या दोनच रंगांच्या चष्म्यातून इतिहासाकडे बघायला शिकवल्याने इतिहासाचा खरा रंग कधी आपल्याला समजलाच नाही. त्यामुळेच आठव्या शतकात तिबेट सारखं बलवान साम्राज्य एकीकडे चीनला चेपत असताना दुसरीकडे कनौजपर्यंत धाव घ्यायला बघत होतं हे आपल्या वाचनात कधी आलंच नाही. त्याचप्रमाणे एक हिंदू सत्ताधीश -- अशा प्रांताचा राजा कि, ज्यातील लोकं स्वभावाने बुजरे, भित्रे, थंड हवामानातील निवासी असल्याने कमी शारीरिक क्षमतेचे असल्याचा अपप्रचार इतिहासकारांनी उगाचच केलाय -- आपल्या राज्याचा विस्तार अफगाणिस्तान पासून बल्ख, काशगर, तक्लमाकन वाळवंट, कनौज, बंगाल, ओरिसा, ग्वाल्हेर - उज्जैन ते गुजरात - सौराष्ट्रातील लाट देशाचा काही भाग असा चहूदिशांनी करत एका विशाल साम्राज्याची निर्मिती केल्याचे आपल्या खिजगणतीतही नसते.
आशियात नावाजलं गेलेलं चिनी साम्राज्य अरब तसेच तिबेटींच्या आक्रमणांनी त्रस्त होऊन एका हिंदू सत्ताधीशाकडे मदतीची मागणी करतंय हे देखील आपल्याला ठाऊक नसते. इतकेच काय, नंतरच्या काळात मुस्लिम धर्मात प्रवेशलेली कित्येक तुर्क टोळी राज्ये काश्मीर सम्राटाची मांडलिक असून एक तुर्की राजकन्या त्याची पत्नी तर एक तुर्की मनुष्य - चंकूण त्याचा सेनापती असल्याचेही आपल्याला माहिती नसते.
एकूणच काश्मीरच्या इतिहासाविषयी आपल्या अज्ञानावर प्रकाश टाकणारं असं ऐतिहासिक लेखन श्री. संजय सोनवणींनी केलं आहे. किंबहुना असेही म्हणता येईल कि, हि एक नियतीने सोपवलेली जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. कारण, हे पुस्तक अशा काळात प्रकाशित झालं आहे जिथे काश्मिरी लोकं, परंपरा, संस्कृती विषयी उर्वरित भारतीयांत कमालीचं अज्ञान व गैरसमज प्रचलित आहेत. काश्मिरींना भारत आपला वाटत नाही असं उर्वरित भारतीयांचं मत असलं तरी भारतीयांना काश्मिरी आपले वाटतात का ? हा खरा प्रश्न आहे व हाच प्रश्न उपस्थित करण्याचे ऐतिहासिक कार्य सोनवणींचा इतिहास करतो.
ऐतिहासिक एवढ्यासाठी कि, मुक्तापीड ललितादित्याचा काळ उलटून तेराशे वर्षे झाली. या तेराशे वर्षांत एकाही भारतीयाला या महान सम्राटाच्या कामगिरीची दखल घ्यावी वाटू नये ? याच्या इतिहासाचा, इतिहासात बजावलेल्या महनीय कामगिरीचा शोध घेण्याची बुद्धी होऊ नये ? कि आपला इतिहास अशोक, हर्ष, राणा प्रताप, अकबर - औरंगजेब ते शिवाजी - बाजीराव एवढ्यापुरताच मर्यादित आहे ?
वर्तमानकालीन समस्यांचे मूळ अनेकदा इतिहासात असल्याचे दिसून येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चीन - तिबेट. ललितादित्याच्या निमित्ताने सोनवणींनी जो काही चीन - तिबेटी संघर्षावर ओझरता प्रकाश टाकला आहे त्यावरून याची प्रचिती येते. त्याचप्रमाणे नंतरच्या काळात गंगा - यमुनेच्या दुआबात तसेच सध्याच्या बांग्लादेशादी भागात मुस्लिम धर्माचे प्रस्थ कसे वाढले याचाही यामुळे अंदाज येतो. तसं पाहिलं तर पूर्वोत्तर राजवटींच्या प्राचीन - मध्ययुगीन इतिहासाकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन या पुस्तकाच्या वाचनाने प्राप्त होतो व हे निःसंशय सोनवणींचे यश आहे.
इतिहासलेखनाच्या दृष्टीने पाहता ललितादित्यचा संशोधित इतिहास लिहिणे हे खरे तर अशक्यप्राय कर्म ! कारण एक कल्हण वगळता त्याचा अधिकृत इतिहास कोणा भारतीयाने लिहिला नाही व कल्हणने देखील ललितादित्यानंतर तीन चारशे वर्षांनी राजतरंगिणीचे लेखन केल्याने त्यात ऐतिहासिक सत्य किती असेल याचा वाचकांनीच अंदाज करावा. परंतु अशा अडचणींना जुमानण्याचा सोनवणींचा स्वभाव नाही. त्यांनी समकालीन चिनी दरबारातील नोंदी, तिबेटचा इतिहास तसेच अफगाणिस्तान, तोखारिस्तानादी प्रांतांचे इतिहास चालत बिटवीन द लाईन्स पद्धतीने ललितादित्याच्या इतिहासाची उभारणी केली आहे.
आरंभी म्हटल्याप्रमाणे देशी भाषेतील हा पहिलाच प्रयत्न असल्याने निश्चयाने कोणावर विसंबण्याची सवडच नसल्याने प्रत्येक बाब शक्यतेच्या, तर्काच्या कसोटीवर घासून पारखून उपलब्ध ऐतिहासिक नोंदींचा वापर करत निखळ ऐतिहासिक सत्याच्या जवळपास जाण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.
आठव्या शतकातील काश्मीरच नव्हे तर देशातही जातीव्यवस्था अस्तित्वात नसल्याचे त्यांनी यात सोदाहरण स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे वैदिक इतिहासकारांनी आपल्या धर्माचं मुळातच नसलेलं महत्त्व समजामनावर ठसवण्यासाठी काय काय लबाड्या केल्या आहेत याचाही त्यांनी संक्षेपात आढावा घेतला आहे. याच अनुषंगाने तत्कालीन अफगाण व शेजारील भूप्रदेशात टोळी - राज्यांशी काश्मीरचे असलेले राजनैतिक संबंध तसेच तेथील धार्मिक जीवनाची यातून बऱ्यापैकी माहिती मिळते व या दिशेने अद्यापही संशोधनाला भरपूर वाव असल्याचे दिसून येते.
या ग्रंथाचे अत्याधिक महत्त्व म्हणाल तर यामध्ये प्रामुख्याने चर्चिलेले पूर्वोत्तर भूप्रदेशातील राजकारण. वायव्येकडून प्रामुख्याने इस्लामी शासकांचेच आक्रमण झाल्याने वैदिकांना वायव्येचे अप्रूप जास्त. परंतु त्याजोडीला ईशान्येकडूनही देशावर परकीय आक्रमणं होत होती व एकप्रकारे या देशातील लहान - मोठे सत्ताधीश दोन्ही दिशांनी होणाऱ्या आक्रमणांनी खिळखिळे झाल्यानेच पुढे इस्लामी तुर्कांच्या हल्ल्यांना बळी पडल्याचे दुर्लक्षिलेलं सत्य या ग्रंथानिमित्त उजेडात येते. तिबेट व लगतच्या राज्यांनी वेळोवेळी भारतावर केलेल्या आक्रमणांची दखलच आपण घेतली नसल्याने आठव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत सरहद्दीशी थोपवलेला इस्लाम तेराव्या - चौदाव्या शतकात बंगालपर्यंत सहजरित्या कसा पोहोचला हा प्रश्नच आतापर्यंत वाचकांना पडला नव्हता. तो येथे उपस्थित करून सोनवणींनी अभ्यासाची ही एक दिशा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार थोडेच आहेत.
ज्ञात इतिहासानुसार हिमालयाच्या उत्तरेस लष्करी मोहिमा काढण्याचे साहस फक्त दोनच भारतीय सत्ताधीशांनी केले. पहिला ललितादित्य व दुसरा महंमद तुघलक. पैकी, तुघलकाची चीन स्वारी अयशस्वी ठरली मात्र ललितादित्याने हिमालयाच्या उत्तरेस चढाई करत काशगर, तक्लमाकन वाळवंटापर्यंत धडक मारली. विशेष म्हणजे या चढाईपूर्वी या प्रदेशावरील चीनचे नियंत्रण सुटल्याने निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा लाभ अरब वा तुर्कांनी घेण्याऐवजी आपण घ्यावा या शुद्ध राजनैतिक हेतूंनीच ललितादित्य मोहिमेस बाहेर पडल्याचे दिसून येते. तक्लमाकन पर्यंत यशस्वी मजल मारल्यानंतरचा मुक्तापीडचा इतिहास उपलब्ध नाही. जो आहे त्यानुसार तक्लमाकन परिसरात मरण पावला. मात्र मृत्यूपूर्वीच त्याने राजधानीत निरोप पाठवून राज्याच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती केल्याने त्याच्या पश्चात राज्यात बंडाळी वा गोंधळ - अव्यवस्था माजली नाही. 
स्थूलमानाने पाहता ललितादित्याचे हे चरित्र उद्बोधक आहे. त्याचे अंतर्गत तसेच बाह्य जगताविषयीचे राजकीय, भौगोलिक ज्ञान व त्याधारीत राजनीती ; काळाची पावलं ओळखून लष्कराची पुनर्रचना करत वर्षानुवर्षे चालणाऱ्या युद्ध मोहिमांकरता आवश्यक तो द्रव्य तसेच मनुष्यबळाचा अविरत पुरवठा होण्याच्या दृष्टीने केलेली उपाययोजना या बाबी विचारात घेण्यासारख्या आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रजेवर जादा करांचा बोजा पडू न देता व्यापार - शेती तसेच कला - कौशल्याधारीत उद्योग - व्यवसायांना उत्तेजन देणे ; स्वधर्मपालनासोबत इतरांना त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याची मुभा देणे या गोष्टी निश्चितच उल्लेखनीय आहेत. जागतिक इतिहासावर आपला ठसा उमटवणारा मुक्तापीड ललितादित्य हा एकमेव भारतीय सम्राट होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! 

 काश्मीरचा सम्राट ललितादित्य 
लेखक : संजय सोनवणी
मुखपृष्ठ : के. सय्यद
प्रकाशक : चिनार प्रकाशन
पृष्ठं : २५६
किंमत : २८० रु.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: