गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा ( चिंतनात्मक लेख )



बाळाजी विश्वनाथ ते बाजीराव रघुनाथ पर्यंतच्या भट घराण्यातील पेशव्यांच्या यादीत जितका राजकीय अनुभव बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यास प्राप्त झाला तितका क्वचितच कोणाला प्राप्त झाला असेल. या पेशव्याने ज्याप्रमाणे बाजीरावाच्या पराक्रमाची चढती कमान पाहिली, पेशव्यांच्या राज्याचा उत्कर्ष पाहिला त्याचप्रमाणे त्यास पानिपतच्या धक्क्याने लागणाऱ्या उतरत्या कळेचा आरंभही पाहण्याचे भाग्य लाभले. हा पेशवा तलवारबहाद्दर नव्हता, बोरूबहाद्दरीत याचा कोणी हात धरू शकत नव्हता. कावेबाजपणात केवळ औरंगजेबाचा शिष्य शोभावा. मुत्सद्देगिरी पुरेपूर असली तरी तिचा विनियोग कशाप्रकारे करावा याची त्यास अखेरपर्यंत उमज पडली नाही. इतरांप्रमाणेच भौगोलिक ज्ञानास वैज्ञानिक दृष्टीकोनाची जोड नसल्याने बदलत्या काळाची पावलं, शस्त्रास्त्रांचे महत्त्व ओळखण्यात त्याचीही फसगत झाली. सर्व बाजूंनी विचार करता यास रियासतकार सरदेसायांप्रमाणेच राज्यकर्ता म्हणण्यापेक्षा राज्यचालकच म्हणणे योग्य ठरते. कारण राज्यकर्त्यास आवश्यक ते गुण केवळ याच नव्हे तर एकाही पेशव्याच्या अंगी असल्याचे दिसून येत नाही. राज्यचालकत्व म्हटलं तर ते फक्त पेशवाईपुरतेच म्हणावे लागते. कारण शाहूच्या पश्चात राज्याची सूत्रे जरी नानासाहेबाच्या हाती आली तरी त्याची दृष्टी मात्र तितकी विस्तारली नव्हती. पेशव्याच्या मर्यादांची जाणीव शाहूच्या निधनानंतर प्रकर्षाने दिसून येते. जोवर शाहू जिवंत होता तोवर दरबारी चुरस मर्यादेत राहिल्याने तिला पुढील काळात आलेलं गळेकापूपणाचे स्वरूप प्राप्त झालं नव्हतं.

पेशव्याची सत्तालालसा, राज्यवृद्धीची हाव दांडगी होती. किंबहुना राज्यकर्त्याच्या अंगी हे गुण असावेच लागतात. परंतु याचे प्रमाण जरुरीपेक्षा जास्त झाल्यास हे गुणच दोषासमान ठरतात. नानासाहेब पेशव्याच्या बाबतीत या विधानाची प्रचिती राजकीय व कौटुंबिक अशा दोन्ही आघाड्यांवर दिसून येते.
पेशवेपद प्राप्त होताच सर्व सूत्रे आपल्या तंत्राने चालली पाहिजेत हा नानाचा हेका आरंभापासून अंतापर्यंत कायम राहिला. पेशव्याच्या या भूमिकेने अनुभवी कारभारी महादोबा पुरंदरे दुखावून घरी बसला तर रघुनाथराव, सदाशिवराव हे अनुक्रमे सख्खे - चुलत बंधू आपल्या भवितव्याबाबत नेहमीच साशंक राहिले.

सत्तेच्या नसले तरी अधिकारांच्या बाबतीत आपले भाऊ प्रतिस्पर्धी असल्याची जाणीव पेशव्याच्या मनातून कधीच दूर झाली नाही. यामुळे त्याने गुणावगुणांची पारख करत रघुनाथास लष्करी क्षेत्र नेमून देत थोडेफार अधिकार स्वातंत्र्य दिलं तर सदाशिवरावास फडावरील कारभारात आपल्या नजरेखाली नेमून घेतलं. सावत्र बंधू समशेरबहाद्दरला त्याच्या वडिलोपार्जित जहागिरी प्रदेशात न पाठवता दरबारी कामकाजात गुंतवून ठेवलं. पेशव्याच्या या निर्णयांमागील धोरणात्मक भाव सदाशिव तसेच रघुनाथास कळत नव्हता अशातला भाग नाही. परंतु होता होईल तो अनुकूल संधीची वाट बघत बसणे एवढेच त्यांच्या हाती होते. पैकी, सदोबाला कोल्हापूरची पेशवाई प्राप्त होऊन स्वतंत्र होण्याची संधी चालून आली असता नानासाहेबाने त्यास मुख्य कारभारी पदावर घेत करवीरची पेशवाई स्वतःकडे घेत सदोबाच्या महत्त्वाकांक्षेचे पंख कातरून टाकले.
रघुनाथाने उचल खाल्ली ती नानासाहेबाच्या पश्चात. त्यात त्याचा सामना माधवराव व त्याच्या सल्लागारांसोबत होऊन शेवटी परागंदा होऊन निर्वासितांचे जिणे जगण्याची वेळ आली तेव्हा स. माधवरावांकडे शरणार्थी बनून येत नजरकैदेतील जगण्याचा त्याने मार्ग स्वीकारला व त्यातच त्याचा अंत झाला.   

राजकीय आघाडीवर पाहिले असता पेशव्यांच्या दौलतीची वृद्धी करण्याच्या भरात त्याने आंग्ऱ्यांची बळकट सत्ता देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरून उखडून काढत इंग्रजांचा मार्ग निष्कंटक केला. नागपूरकर भोसल्याचा बंगालमध्ये शिरकाव होऊ नये म्हणून त्याने दत्ताजी शिंद्याला बंगाल स्वारीची भर दिली. तो बिचारा दिल्लीजवळ यमुनेच्या किनारी मारला गेला. फिरून हि भानगड त्याने सदाशिवरावाच्या गळ्यात बांधली असता तो पानिपतावर बुडाला. पर्यायाने स. १७६० आरंभी पेशव्याच्या राज्याची हद्द अटकेला भिडली होती ती, स. १७६१ आरंभी झपाट्याने मागे माळव्यापर्यंत आली व माळव्यातही पेशव्याच्या सरदारांचा पाय टिकतो कि नाही अशीही शंका काही काळ उपस्थित झाली होती.

सातारकर छ्त्रपतींशी पेशव्याने दोनवेळा अप्रत्यक्ष संघर्ष करून आपला जोर आजमावून पाहिला. प्रथम शाहूच्या हयातीत. त्यावेळी शाहूने त्यास काही काळ पेशवेपदावरून बडतर्फ केले असता फिरून नियुक्तीकरता पेशव्याने त्यांस लष्करी बळाचा धाक घालत पदप्राप्ती करून घेतली. नंतर शाहूच्या पश्चात ताराबाईचा नातू रामराजा छत्रपती बनला. पण तो पेशव्याच्या तंत्राने चालू लागल्याचे पाहताच ताराबाईने त्यांस सातारच्या किल्ल्यावर कैदेत टाकत राज्यकारभार हाती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी किल्ल्याची घेराबंदी करून पेशव्याने तिला जेरीस आणले. परंतु मरेपर्यंत ताराबाईने छत्रपतीला पेशव्याच्या हाती लागू दिले नाही. विशेष म्हणजे नानासाहेबाचे निधन झाल्यावर काही महिन्यांतच ताराबाईही वृद्धापकाळाने मरण पावली. 
या छत्रपती - पेशवा संघर्षातूनच पुढे आंग्रे, गायकवाडांशी पेशव्याचे संग्राम उद्भवले. खेरीज याच काळात छत्रपतींच्या परवानगीशिवाय त्यांचा जामदारखाना ताब्यात घेत पेशव्याने एकप्रकारे लूटच केली. ( मराठी रियासत - पेशवा बाळाजीराव २, प्रकाशन वर्ष स. १९५३ )  

शाहूमुळे पेशव्यांना निजामाचा बंदोबस्त करता आला नाही हा काहींचा आवडता सिद्धांत आहे. परंतु शाहूच्या पश्चात भालकी, सिंदखेड, उदगीर सारख्या मोहिमांमध्ये संधी लाभूनही पेशव्याने निजामास बुडवले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे निजाम दख्खन सुभेदार असून बाळाजी विश्वनाथाने जी चौथाई - सरदेशमुखीची सनद प्राप्त केली होती, त्यान्वये छत्रपतींना दख्खन सुभेदाराच्या ताबेदारीत राहायचे होते. त्यामुळे शाहूच्या बोटचेप्या, नेभळट धोरणाने निजामाचा बचाव झाला वगैरे इतिहासकारांच्या बाजारगप्पा आहेत. उलट कर्नाटकीय राजकारणात पेशव्याने निजामाला अंतस्थ भर देऊन बाबूजी नाईक बारामतीकर, फत्तेसिंग भोसले, रघुजी भोसले वगैरे आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे पाय खेचत एकप्रकारे त्याच्या सत्तेस बळ प्राप्त करून दिले. पेशव्याच्या या आत्मघातकी धोरणातून म्हैसूरचे राज्य हैदरअलीस प्राप्त होऊन पुढे टिपूचा उदय झाला.

नानासाहेब पेशव्याची कारकीर्द इतिहासकारांना वैभवशाली वाटायचे एक कारण म्हणजे मराठी सत्तेचा अटकेपर्यँत झालेला फैलाव. परंतु हा प्रदेशविस्तारही अल्पकाळच टिकला. कारण स. १७५२ मध्ये होळकर - शिंद्यांनी केलेल्या तुर्की बादशहा समवेत करारान्वये आपणांस काय साधलंय याची उमजत पेशव्यास झाली नाही. तो आपला क्षुद्र दरबारी स्पर्धेत मग्न होऊन नागपूरकर भोसल्यांच्या हातून बंगाल कसा उपटता येईल याचे मनसुबे आखत बसला. पर्यायाने शिंदे - होळकरांना एकाचवेळी आग्रा, राजपुताना, पंजाब, बिहार एवढ्या विस्तीर्ण प्रदेशाच्या बंदोबस्ताचा भार शिरावर घ्यावा लागला व तो देखील माळवा आणि पेशव्याच्या दक्षिणेतील मोहिमा सांभाळून. यावरून पानिपतचा बार खुद्द नानासाहेब पेशव्यानेच कसा ठासून भरला होता हे कोणाच्याही ध्यानी यावे.

नानासाहेब पेशवा आपल्या हिशोबीपणाकरता प्रसिद्ध असला तरी पेशव्यांच्या एकूण कर्जाची तड काही त्याच्या हातून लागली नाही. उलट या वाढत्या कर्जापायी पेशव्याने आपली फौज कजामी करत एकप्रकारे स्वतःच्याच पायावर धोंडा हणून घेत सरदारांच्या ओंजळीने पाणी पिण्याचा प्रघात घालून दिला. पेशवाईच्या ऱ्हासास कारणीभूत ठरलेल्या अनेक कारणांपैकी हे देखील एक कारण आहे. पेशव्यांचे कर्जप्रकरण हा नेहमीच चर्चा व औत्सुक्याचा विषय राहिला आहे. थो. बाजीरावापासून ते स. माधवरावापर्यंत, सालोसाल पेशवे वा त्यांचे सरदार मोहिमांवर जातात, खंडण्या व लूट पदरात पाडून घेतात मात्र तरीही दौलतीचे कर्ज फिटत नाही कि दरातील शिपाई - देणेकऱ्यांचे धरणे उठत नाही.
काही जणांच्या मते, पेशव्यांचे सरदार, कमावीसदार याबाबतीत कामचुकारपणा करत होते. बरोबर हिशोब देत नव्हते. मग मालक या नात्याने पेशवे काय करत होते ? जर धन्याला धनीपणा गाजवता येत नसेल तर त्याने ती हौस तरी का करावी ?

शहरांत पेठा वसवणे, मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, आंबराया लावणे, तलाव - विहिरी बांधणे, नद्यांना घाट बांधणे, धर्मशाळा उभारणे वगैरे कामं पेशव्याने पार पाडली. परंतु त्याहीपलीकडे जाऊन देशी - परदेशी व्यापारास उत्तेजन देण्याचा उपक्रम त्याने राबवल्याचे दिसून येत नाही. ज्या वैदिक ज्ञान - विज्ञानाची महती आजकाल वैदिक विद्वान उठताबसता गात असतात, ते वैदिक ज्ञान - विज्ञान पेशव्यास का बरं प्राप्त झाले नसावे ? जयपुरास स. जयसिंग वेधशाळा निर्माण करतो तास एखादा उपक्रम युरोपियनांच्या निकट सानिध्यातून पेशव्यास का बरे सुचू नये ?

खुद्द नानासाहेब पेशवा श्रीरंगपट्टण पासून दिल्लीपर्यंतचा प्रदेश पायांखाली तुडवून आला होता. प्रांतागणिक बदलणारी भाषा, संस्कृती, परंपरा इ. चे त्यांस ज्ञानही झाले होते, परंतु आकलन झाल्याचे दिसून येत नाही.

ज्या लष्करी बळाच्या जोरावर राज्यसंथा टिकते, चालते त्या लष्करी बळाची देखील पेशव्याने एकप्रकारे उपेक्षाच केल्याचे दिसून येते. प्रथम खर्च अन् कर्जाच्या नावाखाली सैन्यकपात केली. नंतर इंग्रज - फ्रेंचांचे नवे युद्धतंत्र पाहून ते शिकून घेण्याचे वा तसलेच एखादे तंत्र विकसित करण्याचे सोडून फ्रेंच सेनानी बुसीलाच सेवेत घेण्याचा त्याने प्रयत्न करून पाहिला. तो अयशस्वी झाल्यावर त्याने बुसीचे सरदार नोकरीत घेतले. पैकी, एक पानिपतावर गेला तर दुसऱ्याने सदोबाच्या खुनाचा प्रयत्न करताच त्याचा निकाल लावण्यात आला. पुढे गारद्यांच्या महत्व कमी अधिक प्रमाणात स. माधवरावाच्या काळापर्यंत कायम राहिले. नंतर डिबॉइन, ड्रयूडनेक, पेरॉन सारख्या परदेशी नामवंतांपुढे हे साफ झाकोळून गेले.

स्थूलमानाने पाहता नानासाहेब पेशव्याची कारकीर्द म्हणजे हिंदुस्थानातील सर्वच आघाड्यांवरील बदलाची नांदी होती. या काळात राजकारण, युद्धतंत्र, विज्ञान, परंपरा सर्वच काही बदलू लागलं होतं. आपल्या पारंपारिक पोथीनिष्ठ शिक्षणामुळे केवळ नानासाहेबच नव्हे तर एकूण एक वैदिक विद्वान, मुत्सद्दी बदलत्या काळाची पावलं ओळखण्यात यशस्वी झाली नाही. जेव्हा हि हि जाणीव झाली तेव्हा वैदिक चाणाक्षांनी खांद्यावरील पेशवाईचे मढे बाजूला टाकून ब्रिटिशांची विजयीपताका मिरवण्यास घेत पेशवाईला स्वहस्तेच मूठमाती देऊन टाकली.     

संदर्भ ग्रंथ :-
१) निजाम - पेशवे संबंध १८ वे शतक :- त्र्यं. शं. शेजवलकर
२) मराठी रियासत :- गो. स. सरदेसाई
३) पुरंदरे दप्तर भाग १, :- कृ. वा. पुरंदरे  
४) शिंदेशाही इतिहासाची साधने  भाग :- आनंदराव भाऊ फाळके