Sunday, July 6, 2014

महार आणि अस्पृश्यता  
    इतिहास हि संकल्पना किंवा विषय मोठा विचित्र आहे. एका कोड्याची उकल होत असतानाचा नवा प्रश्न दत्त म्हणून समोर उभा राहतो. उदाहरणार्थ पेशवेकाळातील लष्कराची व्यवस्था अभ्यासताना त्यांच्या सैन्यातील महार जातीच्या शिलेदारांची मला माहिती मिळाली व मूळ विषय बाजूला राहून नव्या विषयाच्या लेखनास सुरुवात झाली. 

    तसं पाहिलं तर महार समाजाला शौर्याची वा लष्करी सेवेची प्रदीर्घ परंपरा नाही असा अनेकांचा गैरसमज आहे. परंतु, वस्तुस्थिती तशी नाही. ‘ महार ‘ या जातीची निर्मिती होण्यापूर्वीपासून या समाजाला प्रदीर्घ लष्करी सेवेची परंपरा आहे. कालौघात विशिष्ट सेवा – व्यवसाय करणाऱ्या समूहाचे जसे जातींमध्ये रुपांतर होत गेले तद्वतच एका रक्षक संस्थेचे कार्य बजावणाऱ्या या समुहाचे ‘ महार ‘ जातीत रुपांतर झाले. मात्र, त्यामुळे त्यांच्या स्थानावर, अधिकारांवर वा दर्जावर कसलाही परिणाम झाला नाही. महार समाजाची अवनती ( सामाजिक दर्जाच्या दृष्टीने ) होण्यास बेदरच्या बहामनी बादशहा दुसरा महंमदशहा याने स. १४७५ साली दिलेली बावन्न हक्कांची सनद कारणीभूत ठरली असे मानले जाते. हि सनद ज्यावेळी महार समाजास मिळाली त्यावेळी दक्षिणेत खूप मोठा दुष्काळ पडला होता. अर्थात, मी या ठिकाणी मंगळवेढ्याचा कमावीसदार दामाजीपंत व विठू महार यांच्या विषयी बोलत आहे. दामाजीपंताने दुष्काळाचे भयाण स्वरूप पाहून सरकारी गोदामातील धान्य पूर्वपरवानगी शिवाय ( जी मिळणे शक्य शक्य नव्हते ) जनतेत वाटून टाकल्याने बहामनी बादशहा चिडला व त्याने दामाजीपंतावर भलामोठा आर्थिक दंड बसवला. सरकारी नोकर असून देखील दामाजीकडे तेवढी रक्कम नसल्याने मंगळवेढ्याचा वेसकरी – येसकरी – कोतवाल विठू महाराने आपल्या जवळील पैशातून दामाजीचा दंड भरून त्याची सुटका केली. त्यावेळी बहामानी बादशहा खुश झाला अन त्याच्याकडून विठू महाराने आपल्या समाजासाठी ५२ हक्कांची सनद मागून घेतली असा मूळ कथानकाचा थोडक्यात सारांश आहे तर, पंढरपूरच्या विठोबाचे मार्केटिंग करणाऱ्यांनी या दुष्काळी सत्यघटनेवर दैवी चमत्काराचे आवरण चढवून इतिहास विकृत केला. 

    परंतु, मूळ कथानकात देखील खूप असे मुद्दे आहेत कि ज्यामुळे वस्तुस्थितीचा बोध होण्याऐवजी गोंधळ मात्र अधिक निर्माण होतो. (१) दामाजीपंत हा सरकारी कमावीसदार आहे तर विठू हा कोतवाल आहे. (२) दामाजीने दुष्काळात जेव्हा धान्य वाटून टाकले त्यावेळी धान्याला सोन्याची किंमत आलेली असल्याने बादशहा नाराज झाला व त्याने दामाजीवर आर्थिक दंड बसवला. (३) सरकारी चाकर असूनही हा दंड भरण्याची दामाजीची ताकद नाही व तुलेनेने त्याचा दुय्यम असलेला विठू मात्र तेवढा पैसापाणी बाळगून आहे. (४) याचा अर्थ कमावीसदारापेक्षा कोतवालास अधिक पगार होता किंवा विठूकडे पिढ्यानपिढ्यांचा द्रव्यसंचय होता. यातील कोणती शक्यता ग्राह्य वाटते ? माझ्या मते, दुसरीच शक्यता ग्राह्य आहे व ती योग्य आहे. पण मग प्रश्न असा पडतो कि, महार हे अस्पृश्य कधी व कसे झाले ? आणि त्याहून अधिक मोठा प्रश्न असा आहे कि, बहामनी बादशाहने जी सनद दिली त्यामध्ये या विठू महाराचे नाव नसून अंबरनाक / अमरनाक महाराचे नाव आहे. मग हा विठू कोण ? 

    बहामनी बादशहाने दिलेल्या ५२ हक्कांच्या सनदेस भयंकर अशा दुष्काळाची पार्श्वभूमी आहे. त्या वेळी अन्नासाठी माणसे आपल्या मुलांना, स्वतःला विकून घेत होती. जे खाऊ नये ते खात होती. अशा काळात अंबरनाईकाने आपल्या समाजाच्या अस्तित्वासाठी बादशहाकडे अशा ५२ हक्कांची मागणी केली कि, या बावन्न हक्कांच्या / सेवांच्या बदल्यात गावकऱ्यांकडून महार समाजास पोटापुरते काहीना काही मिळावे. हे ५२ हक्क जर बारकाईने वाचले तर असे लक्षात येते कि, गावातील जवळपास असे कोणतेच काम किंवा सेवा सोडायची नाही असे ठरवूनच या बावन्न हक्कांची मागणी केली होती आणि हेच बावन्न हक्क पिढ्यानपिढ्या महारांनी उपभोगल्याने त्यांच्या गळ्यात गावकीच्या कामाची माळ पडली ती पडलीच. असो, अंबर नाईकाने ज्या ५२ हक्कांची मागणी केली त्यात काही हक्क वा सेवा या मृत मनुष्य – प्राण्यांशी संबंधित आहेत. परंतु, ज्यावेळी अंबरने या मागण्या केल्या त्यावेळी अन्नाअभावी बव्हंशी लोक हे मृताहाराकडे वळले होते हे विसरून चालता येत नाही. तसेच त्यावेळचे माहिती नाही पण पुढील काळात अनेकदा महारांना मिळालेल्या या ५२ हक्कांपैकी काही हक्कांवर इतर जातींनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे उपजीविका आणि असूया यातून हे संघर्ष उद्भवत आणी तत्कालीन शासक सत्ता त्यात हस्तक्षेप करून तंट्याचा निकाल करून देई. यावरून हे तर स्पष्ट होते कि, अस्पृश्यता व या ५२ हक्कांचा काही संबंध नाही मग ती आली कशी ? 

    धर्माने निषिद्ध मानलेल्या प्राण्यांचे मांस खाणे हा अस्पृश्यतेचा निकष असू शकतो का ? महार हे गोमांस खातात म्हणून ते अस्पृश्य असे मानले तर गोमांस खाणारे मुसलमान वा ख्रिश्चन हे अस्पृश्य का नाहीत ? बरे, सर्वच महार काही गोमांस खात असेही नाही. त्याशिवाय मध्ययुगात कित्येक नामवंत हिंदू घराणी मुसलमान होऊन मग हिंदू धर्मात परतली. धर्मांतरानंतर गोमांसभक्षण हा एक अनिवार्य विधी असल्याने त्यांनी तो पार पाडलाच असणार – नव्हे तो त्यांना पार पाडावा लागला असणार – मग ते अस्पृश्य का ठरले नाहीत ?

       
     शिवकाळातील महारांची स्थिती पाहिली तर ते शिवाजीच्या लष्करांत, गड – किल्ल्यांवर, आरमारात होते. काही किल्ल्यांवर किल्लेदार म्हणून त्यांची नियुक्तीही करण्यात आली होती. तसेच काही महार हे खाशांच्या अंगरक्षक पथकात देखील होते. अशा स्थितीत जर महार अस्पृश्य असते तर त्यांचा सैन्यात समावेश होऊ शकला असता का ? किंवा किल्लेदारी त्यांना मिळाली असती का ? तसेच गड – कोटांवरील महारांसाठी स्वतंत्र पाणवठ्याचा उल्लेख देखील आढळत नाही. असो, शिवाजीच्या नंतर संभाजी सत्तेवर आला पण परिस्थितीत काही फरक पडला नाही. पुढे संभाजीच्या राजकीय खुनानंतर राजाराम जिंजीस निघून गेला व सारा महाराष्ट्र मोगलांना मोकळा मिळाला. त्यावेळी स्वराज्यासाठी आणि उपजीविकेसाठी ज्यांनी हाती शस्त्र धारण करून व पदरी फौजफाटा बाळगून स्वातंत्र्ययुद्ध लढले त्यात महार सेनानायकांचाही समावेश होता. यापैकी सिदनाक या महार सेनानीस छत्रपती शाहूने मिरज जवळचे कळंबी हे गाव इनाम म्हणून दिले. या सिदनाकाच्या नातवाचे नाव देखील सिदनाकच होते व त्याने खर्ड्याच्या लढाईत पटवर्धन आणि पेशव्यांच्या वतीने सहभाग घेतला होता. पण हि पुढील काळातील गोष्ट झाली. तत्पूर्वी म्हणजे पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळातील महारांची लष्करातील स्थिती पुढीलप्रमाणे होती :-
      पेशव्यांच्या सैन्यात हुलस्वार म्हणून एक वर्ग असे. त्यात महार, मांग, चांभार, मेहतर इ. जातीचे लोक असत. हि बिनीची तुकडी असून लढाई व प्रवासात नेहमी आघाडीवर असे. प्रवासात रस्ता मोकळा करण्याचे तर लढाईत शत्रूवर पहिला हल्ला चढवण्याची यांच्यावर जबाबदारी असे. आरंभी हुलस्वार एकेकटा असे. त्यास प्रसंगोत्पात बढती मिळून तो शिलेदार बने व या शिलेदारीचे रुपांतर पथक्यात होत असे. स. १७३० च्या सुमारास चिमाजी आपाच्या दिमतीस असलेल्या हूलस्वारांचा जो जमाखर्च उपलब्ध झाला आहे त्यानुसार म्हाल ( भाल ? ) नाक व सिव नाक या दोघांचा उल्लेख आढळतो. प्रसिद्ध इतिहासकार आबा चांदोरकरांनी दिलेल्या माहितीनुसार हूल स्वारांना उच्च दर्जाच्या स्वारांप्रमाणे १२ ते २५ रु. पर्यंत दरमहा पगार असे. सये नाक मांग या शिलेदाराचा वार्षिक तनखा ४०० रु. असून त्याच्या हाताखालील ३ स्वारांना १००० रु. मिळत. शिवा कोळी शिलेदारास त्याच्या ३ स्वारांसह मिळून १२४७ रु. मिळत तर सिदनाक महार यास सालीना ४०० रु. रोख व १०० रु. चे कापड मिळे तर त्याच्या हाताखालील १२ स्वारांस दरमहा १५ ते २० रु. पगार असून या पथकाचा हिशेब ठेवणाऱ्या ब्राम्हण कारकुनास दरमहा १५ रु. वेतन मिळत असे. उपरोक्त सिदनाक हा मोठा पराक्रमी असून त्यास शाहूने कळंबी गाव इनाम दिल्याचा उल्लेख यापूर्वी आला आहेच. त्याशिवाय प्रसंगोत्पात त्यास अनेक सरकारी बक्षिसे देखील प्राप्त झाली होती. त्यात १५ तोळे सोन्याचे कडे व १५० रु. किंमतीच्या मोत्यांची जोडीही होती.
    
     तात्पर्य काय तर पेशव्यांच्या लष्करात – निदान थोरल्या बाजीरावाच्या काळात तरी स्पृश्य – अस्पृश्य भेद असल्याचे दिसून येत नाही. माझ्या मते, व्यवहारात याचा अर्थ असा होतो कि, महारांना अस्पृश्य म्हणून त्यावेळी मानलेच जात नव्हते. अन्यथा केळकर वा चांदोरकर सांगतात त्यानुसार ‘ लेंडी स्वारांत ‘ किंवा घोड्याबरोबर धावणाऱ्या लोकांत महारांचा प्रामुख्याने भरणा झाला नसता. या लेंडीस्वाराचे मुख्य कार्य म्हणजे स्वाराच्या सोबत घोड्याच्या वेगाने धावणे व झुंजीच्या वेळी स्वाराचे शरीररक्षक म्हणून काम करणे !
   
        चिमाजी आपाच्या वसई मोहिमेत तुकनाक, सिता, फकीरा इ. महार वीरांनी आपल्या शौर्याची चुणूक दाखवली होती. या काळात महार, मांग इ. जातीच्या सैनिकांचे गोट तसेच तंबू पेशव्याच्या डेऱ्याजवळ असे. अंगरक्षक म्हणून ! पुढे सवाई माधवरावाच्या खर्ड्याच्या मोहिमेपर्यंत हि परंपरा हळूहळू मोडीत निघू लागली. इतकी कि, त्या मोहिमेत सिदनाकाचा गोट मराठा – ब्राम्हण सरदारांच्या आसपास असल्याचे कित्येकांना रुचले नाही. त्यांनी पेशव्याकडे याविषयी तक्रार करताच त्याने हिरोजी पाटणकर या वृद्ध मुत्सद्द्यास सल्ला विचारला. त्याने स्पृश्य सरदारांची हि तक्रार फेटाळून लावली. पुढे दुसऱ्या बाजीरावाने जेव्हा इंग्रजांच्या विरोधात शस्त्र उपसले त्यावेळी रायगड किल्ल्यावर त्याची पत्नी मुक्कामास असून त्या किल्ल्यावर इंग्रजांनी हल्ला चढवला. तेव्हा रायगडचा प्रमुख रखवालदार असलेल्या रायनाकाने इंग्रजांच्या विरोधात १५ दिवस किल्ला लढवून अखेर युद्धांत आपला देह खर्ची पाडला. या सर्व घटना विचारात घेतल्या तर महारांना अस्पृश्य का व कसे मानण्यात येऊ लागले या प्रश्नाचे स्वरूप वा कोडे हे अधिक बिकट / अनाकलनीय असे बनत असल्याचे दिसून येते. 
       सवाई माधवराव पेशव्याच्या रोजनिशीतील काही नोंदी यासंदर्भात अभ्यासल्या असता थोडी वेगळीच माहिती मिळते. { या नोंदी व माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :- http://peshwekalinitihas.blogspot.in/2013/02/blog-post_6.html      http://peshwekalinitihas.blogspot.in/2013/02/blog-post_4.html      http://peshwekalinitihas.blogspot.in/2013/02/blog-post_2.html  }   या नोंदी लक्षात घेता महार पेशवेकाळात अस्पृश्य होते कि नाही याचा उलगडा होत नाही. महारांना मंदिरप्रवेश नाही म्हणावे तर मंदिराचे ते रक्षण कसे करणार ते समजत नाही. कोकणात ब्राम्हणांनी महारांचे लग्न लावण्याची रीत वा परंपरा नाही पण इतरत्र काही ठिकाणी ती लावली जात असल्याचा उल्लेख आहे. पण विटाळ वा अस्पृश्यतेचा यात अजिबात उल्लेख नाही. सवाई माधवरावाच्या रोजनिशीतील पंढरपूरविषयीच्या नोंदीत मात्र स्पर्श – अस्पर्शाचा उल्लेख आहे. पण महारांचा विटाळ होतो असा स्पष्ट उल्लेख त्यात नाही.
     हा सामाजिक स्थितीतील एक भाग झाला. दुसरा भाग थोडा विचित्र आहे. अनैतिक वा विवाहबाह्य संबंध हि पुरातन परंपरा आहे. त्यानुसार त्यावेळी स्त्री – पुरुष जात पात न पाहता एकमेकांशी चोरटे संबंध ठेवीत व उघडकीस आल्यावर प्रायश्चित वा शिक्षा भोगत असत. विशेष म्हणजे, पेशवाईत महार समाज अस्पृश्य होता असे म्हणावे तर गुलाम महार स्त्री – पुरुषांशी त्यांच्या मालक स्त्री – पुरुष वर्गाचे शरीरसंबंध घडत असत. अशा बाबी उघडकीस आल्यावर बहिष्कार, प्रायश्चित, शिक्षा इ. उपचार अंमलात आणले जात पण यातून महार अस्पृश्य असल्याचे सिद्ध होत नाही. विशेष म्हणजे, संबंध ठेवणाऱ्या दोन्ही पक्षांवर कारवाई केली जात असे. बरे, ब्राम्हण – महार संबंध होत असेही म्हणता येत नाही. ब्राम्हणेतरांचेही महारांशी संबंध होत पण त्यांनाही ब्राम्हणांप्रमाणेच बहिष्कार, प्रायश्चित व शिक्षा या सोपस्कारांना सामोरे जावे लागे. तात्पर्य, असे दिसून येते कि पेशवाईमध्ये महार हे अस्पृश्य होते असे ठामपणे म्हणता येत नाही. याविषयी आणखी खोलात जाऊन संशोधन होणे गरजेचे आहे. तत्कालीन रिवाजानुसार प्रत्येक जात आपापल्या जाती बंधनाशी व नियमांशी बद्ध झाली होती. जर ‘ अस्पृश्य ‘ या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला व तो एका जातीला लावायचा झाला तर ‘ ब्राम्हण ‘ हि जात त्यावेळी अस्पृश्य होती असेच म्हणावे लागेल. कारण ; ब्राम्हण इतरांच्या हातचे वा सोबत जेवण – खाणे करू शकत नव्हते. त्यांचे सोवळे – ओवळे असल्याने कोणाला स्पर्शू शकत नाहीत. मग अस्पृश्य कोण झाले ?
     
     व्यवसाय बंधनाने जाती बद्ध होत्या असे म्हणावे तर ब्राम्हण उपजीविकेसाठी विद्यादान, भिक्षुकी, पूजा – पाठ, युद्ध कर्म, व्यापार, धातूकाम इ. स्व आणि इतर जातींच्या व्यवसायात देखील होते. तीच बाब इतर जातींची. मग जातीनिष्ठ व्यवसाय पद्धती याच काळात मोडू लागली होती असे दिसून येते. मग प्रश्न असा पडतो कि अस्पृश्यता हि संकल्पना महार समाजाशी कशी निगडीत झाली असावी ? कोणतीही परंपरा वा रीत हि एका दिवसांत राजाज्ञेने अंमलात येऊन सर्वत्र बद्धमूल होत नाही. ज्याप्रमाणे रुजलेल्या बी ला अंकुर फुटून त्याचे रोपट्यात व नंतर वृक्षात रुपांतर होते तसेच या रूढी – परंपरांचे आहे. मग हाच नियम जर ‘ अस्पृश्य ‘ संकल्पनेस लावला तर महारांच्या ५२ हक्कांच्या सनदेशी या अस्पृश्यतेचा संबंध नाही असे लक्षात येते. मग याचे मूळ कशात असावे ? शिवशाही व पेशवाईत आपद्धर्म म्हणून जातींनी रूढ बंधने तोडली असे म्हणावे तर हा तर्क उपलब्ध पुराव्याच्या कसोटीवर टिकत नाही. म्हणजे अस्पृश्यता हि टप्याटप्याने आली हे निश्चित ! पण केव्हा ? पेशव्यांनी महारांच्या गळ्यात मडकी बांधली असे म्हणावे तर त्यांच्या वतीने लढणारे महार हे महाराष्ट्रातील होते कि इतर राज्यातील वा परग्रहावरचे ? दुसरे असे की, गळ्यात मडके बांधण्याची पद्धत वा सक्ती हि सर्वत्र सारखी नव्हती हे देखील स्पष्ट आहे. उदा :- शंकरराव खरातांचे ‘ तराळ अंतराळ ‘ वाचले तर त्यात महाराने गावात कधी व कसे यावे यासाठी काही विशिष्ट नियम असल्याचा व तशी वर्तणूक केल्याचा अजिबात उल्लेख नाही यास काय म्हणावे ? एका निश्चित अशा क्रमाने महार अस्पृश्य झाले असा जर तर्क केला व पुराव्यांच्या आधारे त्याची मांडणी करायची झाली तर असे म्हणता येईल की, पेशवाईत महारांना मंदिराच्या आवारात येण्याची बंदी झाली. पण हि बंदी देखील फक्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापुरती असल्याचे दिसते. इतरत्र हा प्रकार केव्हा प्रचलित झाला याची माहिती मिळत नाही. बाकी, रोटी – बेटी बंधने तर सर्वच जातीत प्रचलित होती. त्यामुळे त्यांचा इथे विचार करण्याची गरज नाही. व्यवसायबंदी देखील यावेळी नव्हती हे देखील अनेक इतिहासप्रसिद्ध उदाहरणांनी सिद्ध होते. म्हणजे पेशवाईत प्रचलित असलेली बंधने व विठ्ठल मंदिराच्या जवळ न येण्याची आज्ञा सोडल्यास महारांवर अस्पृश्यता लादणारे निर्बंध असल्याचे दिसत नाही. मग महार काय ब्रिटीश अंमलात अस्पृश्य बनले ?
                               ( तूर्तास येथेच समाप्त ! )

संदर्भ ग्रंथ :-
१)      सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी ( निवडक उतारे – अंक ३ )
२)      शिवकाळ व पेशवेकाळातील महारांचा इतिहास :- श्री. अनिल कठारे
३)      भूतावर भ्रमण :- श्री. य. न. केळकर
४)      महाराजा छत्रसालचा गजेंद्रमोक्ष :- श्री. आबा चांदोरकर
महार कोण होते ? :- श्री. संजय सोनवणी