मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

संभाजीची कैद, मृत्यू व राजारामाचे मंचकारोहण - संक्षिप्त चर्चा.





                     




    इतिहासाला दंतकथांचे वावडेही नाही व आकर्षणही. कारण खरं - खोटं तो जाणतो परंतु, इतिहास अभ्यासक - वाचकांना मात्र दंतकथांचे वरवर वावडे असूनही त्यांच्या मनात आख्यायिकांविषयी गूढ असं आकर्षण मात्र आहे. त्यामुळेच एखाद्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करताना वास्तव पुराव्यांवर अधिक भर देण्याऐवजी ते दंतकथांमध्ये वाहवून जातात. परिणामी अशा ऐतिहासिक घटना गूढ, प्रेरणादायी वा ठससती जखम बनल्या तरी ऐतिहासिकदृष्ट्या त्या विकृतच असतात.


    मराठी राज्याच्या इतिहासातील स्वराज्य संस्थापक शिवाजीपुत्र संभाजीच्या कैद - मृत्यूची व राजारामाच्या मंचकारोहणाची कथाही अशीच आहे. इस्लामधर्मीय औरंगजेबाचे आक्रमण. हिंदू राजा संभाजीचं त्यांस प्रत्युत्तर. फितुरीने केलेला घात. यवनाने धर्मांतराच्या मुद्द्यावर दाखवलेलं जीवदानाचं आमिष फेटाळून संभाजीने कवटाळलेला मृत्यू ! या प्रसंगांनी भल्याभल्या इतिहासकारांनाही कल्पनासृष्टीत विहार करून ऐतिहासिक सत्यास दुर्लक्षित करण्याचा मोह आवरला नाही.


    काही वर्षांपूर्वी श्री. संजय सोनवणी यांनी संभाजीच्या कैद व राजारामाच्या मंचकारोहण प्रसंगावरून काही मुद्दे उपस्थित केले होते. फितुरी झाली होती हे तोवर सर्वांना मान्य होतं. परंतु या फितुरीची लागण कोणा - कोणाला झाली यावरून मतभेद झाले व हा विषय पुन्हा दुर्लक्षित झाला. प्रस्तुत लेखात सोनवणींच्याच प्रश्नांचा संदर्भ घेत व मान्यवर इतिहासकारांचे संदर्भग्रंथ जमेस धरून काही घटनांचा आढावा घेण्याचे योजले आहे.


    शिवाजीच्या राज्याभिषेकानंतर त्याच्या परिवारात व दरबारात असलेली दुफळी विविध अंगांनी व्यक्त झाली होती. परंतु मुख्य झगडा हा संभाजी व शिवाजीचे काही मंत्रीगण असा होता. शिवाजीचे मंत्री व संभाजी या वादाची कारणे बव्हंशी राजकीय असली तरी त्याला आणखी दोन मुद्द्यांची जोड मिळत गेली. पहिलं म्हणजे राजारामाचं प्यादं पुढं ढकलून मंत्र्यांनी सोयराबाईला संभाजीच्या विरोधात उभं केलं व दुसरं मन्जे संभाजीचा शाक्तपंथाकडे झुकता कल.


    पैकी, शाक्तपंथाचा आश्रय खुद्द शिवाजीनेच राज्याभिषेकानंतर केला होता. ज्ञात इतिहासानुसार शिवाजीने दोन राज्याभिषेक करून घेतले. पहिला त्याचा वैदिक राज्याभिषेक होता व दुसरा तांत्रिक. पहिला राज्याभिषेक त्याने वैदिक धर्मियांकडून करून घेत स्वतःच क्षत्रियत्व सिद्ध केलं व तला वैदिकांची मान्यताही मिळवून घेत नंतर निश्चलपुरीकडून तांत्रिक अभिषेक करून घेत मूळ धर्माचाही मान राखला.


    या ठिकाणी वैदिक - अवैदिक चर्चेत तपशीलवार न शिरता इतकंच नमूद करतो कि, जर राज्यात हे दोन धर्म प्रबळ नसते तर शिवाजीने दोन दोन राज्याभिषेकांची उठाठेव केली नसती. सुज्ञांनी यातच काय ते समजून घ्यावे !


    संभाजीची छत्रपती म्हणून कारकीर्द पाहता त्याचा शाक्तांकडे झुकलेला कल स्पष्टपणे दिसून येतो. अर्थात युवराज असतानाच तो या पंथाकडे आकृष्ट झाला होता हे निश्चित व शिवाजीचे बव्हंशी मंत्रीगण वैदिक धर्मीय असल्याने त्यांना यातील धोका लक्षात येत होता. ज्याप्रमाणे दाराच्या ऐवजी औरंगजेब गादीवर येणे कट्टर मुस्लिमांना आवश्यक वाटत होते, त्याचप्रमाणे संभाजी ऐवजी राजाराम राज्यावर येणे शिवाजीच्या वैदिक मंत्र्यांना आवश्यक होते.

संभाजी - मंत्र्यांच्या या भांडणात राजारामाची पालक म्हणून सोयराबाई उतरल्याने यांस गृहयुद्धाचे स्वरूप लाभून वैदिक - अवैदिक हि महत्त्वाची बाब दुर्लक्षित राहिली. पुढे शिवाजीच्या मृत्यूसमयी संभाजी पन्हाळ्यावर असताना व राज्यकारभारात महत्त्वाची भूमिका बजावत असूनही त्याचा हक्क डावलून मंत्र्यांच्या सल्ल्याने व पाठिंब्यावर सोयराबाईने राजारामास शिवाजीच्या पश्चात गादीवर बसवले. अर्थात यामुळे संभाजी बिथरून जाऊन त्याने बंडखोरी करणं स्वाभाविक होतं व तसं घडलंही आणि सुदैवानं त्यास यश मिळून राज्य त्याच्या ताब्यात आलं. परंतु यांमुळे विरोधकांचे खेळ थांबले नाहीत. स. १६८० ते ८९ पर्यंत --- तब्बल नऊ वर्षे संभाजीला अंतर्गत, छुप्या शत्रूंच्या कारवायांना तोंड द्यावे लागले. या दरम्यान कित्येकांना कैद भोगावी लागली, जीव गमवावे लागले परंतु संभाजीला सत्तेवरून खेचून त्याच्याजागी राजारामाला आणण्याची धडपड मात्र थांबली नाही. याचा अर्थ असा होत नाही कि, संभाजीच्या तुलनेने राजाराम हा विशेष कर्तबगार, शूर, कर्तुत्ववान मुत्सद्दी होता.


    राजारामाचा जन्म स. १६७० च्या २४ फेब्रुवारीचा. शिवाजी मरण पावला त्यासमयी राजाराम दहा वर्षांचा होता. त्यानंतरची आठ - नऊ वर्षे त्याची नजरकैदेत गेली. संभाजीच्या मृत्यूनंतर सुमारे दहा - अकरा वर्षांची राजारामाची कारकीर्द पाहिली असता सर्व कारभार मंत्री - सरदारांच्या अधीन असल्याचे दिसून येते. एकूण, शिवाजी - संभाजी ज्याप्रमाणे स्वबळावर राज्यकारभार / मोहिमा उरकत होते तो भाग राजारामच्या कारकिर्दीत अपवादानेच दिसून येतो. तात्पर्य, संभाजीपेक्षा राजाराम गादीवर येण्याने औरंगजेबाविरुद्धचा लढा यशस्वी होईलच अशी स्थिती स. १६८२ ते ८९ दरम्यान अजिबात नव्हती. तरीही मंत्र्यांचा व काही सरदारांचा संभाजी ऐवजी राजारामाकडेच कल होता. असं का ?


    संभाजी व्यसनी होता. स्त्रीसंगाचा त्याला अतोनात नाद होता अशी वर्णनं, लेखन वाचनात येतात. मुळात दारू पिणं व दारूचं व्यसन असणं यांत जमीन आसमानचं अंतर आहे. त्याकाळात दारू पिणं हे ऐषाराम वा व्यसनीपणा समजला जात असेल असं गृहीत धरणंच मुळी चुकीचं आहे. तंबाखू, अफू, गांजा, दारू या लष्करी पेशाच्या लोकांच्या गरजेच्या वस्तू होत्या. चैनीच्या नव्हे ! समस्त पेशव्यांत ए बाजीरावच दारू पीत होता. त्याचं कारण तरी दुसरं काय ? परंतु, आपल्याला वास्तव कधी जाणूनचं घ्यायचं नसतं. त्यामुळेच दारू पिणारा संभाजी बदनाम होतो तर बाजीरावाच्या दारूचा मस्तानीशी संबंध जोडला जातो. असो.


    संभाजीला स्त्रीसंगाचा अतोनात नाद असेल, तर त्यात गैर ते काय ? हा नाद कोणाला नव्हता ? उपलब्ध कागदपत्रे पाहता संभाजीला दोन विवाहित स्त्रिया होत्या. नाटकशाळांचा उल्लेख नाही. त्याची मंत्री - सरदारांच्या स्त्रियांवर वाईट नजर होती असं म्हणतात. मग तसा उल्लेख दुसऱ्या बाजीरावाबाबतही मिळतो. मग दु. बाजीरावाला त्याच्या मंत्री - सरदारांनी कैद का केले नाही ? कि संभाजीच्या काळातील मंत्री - सरदार अब्रूदार होते व दु. बाजीरावाच्या काळातील निर्लज्ज ?


    संभाजी खरोखरच स्त्रीलंपट असता तर नऊ वर्षे तो छत्रपती म्हणून तख्तावर बसलाच नसता. त्याच्या पारच्या सरदार - मंत्र्यांनी केव्हाच त्याचा खून केला असता. परंतु संभाजीचा शाक्तपंथाकडे झुकलेला कल व त्यातील पूजाविधी यांचा जो विपर्यास्त व अतिरंजित उल्लेख नंतरच्या काळातील बखरींत आला, त्यामुळे संभाजीला स्त्रीलंपट ठरवणे बऱ्याचजणांना सोयीचं झालं


    स.१६८० - ८९ दरम्यान संभाजीचा शाक्तपंथाकडे वाढलेला अतोनात कल दरबारात शाक्तपंथीय कवी कलशचं वाढतं प्रस्थ यामुळे वैदिक मंत्र्यांचा एक गट संभाजीच्या विरोधात कारवाया करतच राहिला. याकरता त्यांनी नेहमी राजारामाचं बाहुलं पुढं केलं. आरंभीच्या काळात मंत्र्यांना दरबारातील सरदारांचं पाठबळ न लाभल्याने त्यांचे बव्हंशी कट उधळले गेले. त्यापैकी एक म्हणजे, औरंगजेबाच्या विरोधात बंडखोरी करून दक्षिणेत आश्रयार्थ आलेल्या शहजादा अकबरशी संधान बांधून त्याच्या मदतीने संभाजीचा काटा काढणे. परंतु अकबर संभाजीलाच अनुकूल असल्यानं हा कट फसला. यावेळी औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरला नव्हता हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.  संभाजीने कटवाल्यांची धरपकड करून काहींना कैद दाखवली तर काहींना ठार केले. त्यानंतरही अशा गोष्टी सुरूच राहिल्या परंतु, औरंगजेबाची स्वारी, पोर्तुगीज - सिद्दीचा उपद्रव, राज्यातील वतनदारांची बंडाळी इ. पुढे या गोष्टी तुलनेने क्षुद्रच भासतात व कित्येक अभ्यासू याकडे दुर्लक्षही करतात.


    औरंगजेब दक्षिणेत उतरल्यावर राजकारणाचे सर्व संदर्भ बदलले. प्रथम अकबराचे बंड मोडीत काढणं आवश्यक वाटल्याने औरंगचे सर्व सामर्थ्य व लक्ष संभाजीवर एकवटले. एखाद्या शहजाद्याला हाताशी धरून मोगल बादशाही पालथी घालण्याचा खेळ मोगल राजवटीत नवा नव्हता. किंबहुना तत्पूर्वीच्या सुलतानशाहीचा इतिहासही असाच होता. खुद्द दक्षिणेत संभाजीच्या घरातही हाच प्रयोग चालला होता ना ! त्यामुळं औरंग संभाजीच्या पाठी लागणं स्वाभाविक होतं. परंतु शिवाजी - संभाजीने अलीकडच्या काळात विजापूर - गोवळकोंड्याशी जे युतीचं राजकारण केलं होतं त्याचं फलित म्हणजे पहिली तीन वर्षे औरंगला यश बिलकुल लाभले नाही. तेव्हा स. १६८४ मध्ये त्याने संभाजीवरून आपलं लक्ष हटवून आदिलशाहीवर झडप घातली. मात्र, या काळात संभाजीवर त्याचे सरदार चाल करून जात होतेच. शिवाय सिद्दी, पोर्तुगीज, खेमसावंत सारखे राज्यातील लहान - मोठे सत्ताधीशही संभाजीला उपद्रव देतच होते. तरीही त्यातून सवड काढत संभाजीने आदिलशाही जागवण्याचा यत्न केला. कुतुबशहानेही विजापूरला मदत पाठवली परंतु, स. १६८६ च्या सप्टेंबरात औरंगने आदिशाही खालसा केली. त्यानंतर लगेचच त्याने कुतुबशाहीवर घाला घालून स. १६८७ च्या सप्टेंबरात तीही पालथी घातली. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात शहजादा अकबर राजापुरातून समुद्रमार्गे इराणला रवाना झाला होता. हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे.


    स. १६८७ च्या सप्टेंबर नंतर पुन्हा एकदा राजकारणाचे सारे संदर्भ बदलून गेले. पोर्तुगीजांना संभाजीने चेचलं असलं तरी ती सत्ता जिवंत होती. सिद्दीही वळवळ करतच होता. इंग्रज तटस्थतेची भाषा करत असले तरी त्यांची उपद्रवक्षमता फारशी नव्हती. परंतु ते विश्वासू मदतनीसही नव्हते. कर्नाटकातील सत्ताधीशही आपापल्या सत्तेच्या विस्ताराकरता धडपडत होते. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य हवं होतं, संभाजी वा औरंगजेबाची ताबेदारी नाही. अशा स्थितीत कर्नाटकातील प्रदेश ताब्यात घाय्वेत कि संभाजीचा बंदोबस्त करावा, हा प्रश्न औरंगसमोर पडला. कर्नाटकातील प्रदेशाची व्यवस्था लावावी तर संभाजी मागे उपद्रव दिल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा प्रथम संभाजीला पुरा करून मग कर्नाटकात जायचं वा तो भाग सरदारांवर सोपवून दिल्लीकडे जाण्याची योजना त्याने मनाशी आखली. शेवटी समस्त देशावर मोगल सत्तेचा बावटा फडकावणे हे त्याचं अनुवांशिक कर्तव्य होतं !


    अकबर जोवर संभाजीच्या जवळ होता तोवर तहास जागा राहिली होती. परंतु अकबराचं निघून जाणं व कुतुबशाहीचा बिमोड होणं यामुळे संभाजी - औरंगजेबात तह होण्याची शक्यता तशी फारशी उरलीच नव्हती. शिवाय दोन जुन्या, बलिष्ठ सत्ता अल्पावधीत धुळीस मिळाल्यानं संभाजीनं मांडलिकत्व पत्करल्यास तेवढ्यावरच संतुष्ट होणाऱ्यातला औरंगजेब नव्हता. त्यामुळे स. १६८७ नंतर संभाजी - औरंगजेब झगडा प्राणांतिक होणं अटळ होतं. स्वाभाविक होतं.


    औरंगजेबाच्या विजयांनी संभाजी विचलित झाला न झाला माहिती नाही परंतु राज्यातील वतनदार मंडळी मात्र भयभीत झाली. वतनदार कितीही छोटा असला तरी त्याचं वतन हेच प्रमुख सामर्थ्य असून यातूनचं राज्याचं सामर्थ्य, सत्ता निघते. शिवाजी - संभाजी कितीही बलिष्ठ असले तरी त्यांना होणारी लष्करभरती हि गावोगावच्या वतनदारांवर अवलंबून होती. औरंगने हेच हेरून आपला मोर्चा आरंभापासून त्यांच्याकडे वळवला होता. परंतु आदिल - कुतुबशाहीचा मोड होईपर्यंत त्याला म्हणावे तसे यश लाभले नव्हते. मात्र, स. १६८७ नंतर वतनदारही भविष्याच्या चिंतेने पटापट मोगलांना अनुकूल होऊ लागले.


    याला संभाजीचे नातलग, आप्तगण, मंत्री - सरदार, कारकूनही अपवाद राहिले नाहीत. जो जो भूप्रदेश मोगलांना अंकित होई, त्या त्या भागातील मंडळी मोगली गोटात जाऊन आपल्या भविष्याची तरतूद करू लागली. याला चिंचवडच्या देवांचाही अपवाद राहिला नाही. त्यांचे गाव मोगली कक्षेत येताच आधीच्या सत्तांकडून मिळालेले इनामाचे दाखले घेऊन त्यांनी मोगलाकडून सनद घेत आपले इनामगाव कायम राखले. असो.


    विजापूर - गोवळकोंड्याची सत्ता नष्ट करून औरंगजेबाने आपले बव्हंशी सामर्थ्य संभाजीवर केंद्रित केले. कुतुबशाही संपुष्टात आणून स. १६८८ च्या मार्चमध्ये औरंगजेब हैद्राबादहून विजापुरास आला. कुतुबशाहीच्या नाशानंतर लगेचच त्याने संभाजीविरुद्ध मोहीम आखली. त्यानुसार शहजादा आझमला त्याने गाजीउद्दिन फिरोजजंगसोबत संभाजीवर रवाना केले. त्यांनी मार्गात बेळगावचा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर आझम पावसाळी छावणीकरता विजापुरी निघून गेला तर बेंद्रेंच्या संभाजी चरित्रानुसार फिरोजजंग अदोनीचा किल्ला ताब्यात घेण्यास गेला. दोन्ही स्थलांतील अंतरे लक्षात घेता बेंद्रेंच्या लेखनात काहीतरी गोंधळ झाल्याचे दिसून येते. असो. फिरोजजंग ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये विजापुरास आला. मात्र त्याची फौज तशीच पुढे कोल्हापुरास निघून गेली. कारण, मार्च महिन्यात विजापुरी येत असतानाचा औरंगजेबाने निरनिराळे सरदार संभाजीच्या राज्यावर हल्ले करण्यासाठी पाठवले होते.


    सहा वर्षांच्या अनुभवाने औरंगजेब शहाणा झाला होता. मिर्झा राजाने ज्याप्रमाणे शिवाजीला गोटात चालून येण्यास भाग पाडले जवळपास तसाच काहीसा प्रकार त्याच्या मनात चालू होता. संभाजीचे किरकोळ किल्ले घेण्याच्या फंदात न पडता खुद्द त्यालाच ताब्यात घेण्याची त्याने तयारी आरंभली होती.


    स. १६८८ चा पावसाळा त्याने याच कट  कारस्थानांत घालवला. त्यानंतर कोल्हापूर प्रांती त्याने शेख निजाम हैद्राबादी उर्फ मुकर्रबखानाची नियुक्ती केली. चाकण मार्गे कोकणात उतरण्याची जबाबदारी फिरोजजंगकडे सोपवली. त्याचे प्रथम लक्ष्य त्या भागातील किल्ले ताब्यात घेणे, हे होते. शहजादा आझमला त्याने नाशिकमार्गे कोकणात पाठवण्याचे ठरवले. परंतु याचकाळात विजापुरी प्लेगाची साथ आल्याने व त्यात फिरोजजंगाचे डोळे गेल्याने आझमला त्याने चाकणची मोहीम दिली व जोडीला रायगडचाही भाग सोपवला. मातबरखान यावेळी कल्याण भागात होता.  त्याकडेच तूर्त त्या प्रदेशाची जबाबदारी सोपवल्याचे दिसते.    

    यावेळी संभाजीच्या बाजूची विश्वसनीय हकीकत मिळत नाही. त्याचा पेशवा निळो मोरेश्वर आरंभी राजमाचीस होता पण स. १६८८ च्या पावसाळ्यात कधीतरी त्यास संभाजीने कर्नाटकात पाठवल्याचे बेंद्रे सांगतात. धनाजी जाधव या काळात बुंदेलखंड, गुजरात, राजस्थानात असल्याचा मोघम उल्लेख त्यांनी केलाय. संभाजीचा सेनापती हंबीरराव मोहिते स. १६८७ च्या डिसेंबरात वाईच्या लढाईत मारला गेल्याने तूर्तास हे पद म्हलोजी घोरपडेला देण्यात आलं होतं. सैन्याची एक तुकडी यापूर्वीच कर्नाटकातील राज्यरक्षणासाठी हरजीराजे महाडीकच्या मदतीस जिंजीला केसो त्रिमलच्या नेतृत्वाखाली गेली होती. काही पथकं खालसा झालेल्या आदिल - कुतुबशाहीतील सरदारांच्या मदतीने मोडीत निघालेल्या बादशाह्यांच्या जीर्णोद्धारासाठी खपत होती. कुतुबशाही नष्ट होताच औरंगजेब घाईघाईने विजापुरी आला, तो याच कारणांमुळे. संभाजीची एक प्रबळ तुकडी राजधानीच्या रक्षणार्थ रायगडच्या परिसरात तैनात होती. त्याचा विश्वासू सेवक कवी कलशकडे मलकापूरची पागा असल्याचे उल्लेख मिळतात पण तिच्या सैन्यसंख्येचा निश्चित आकडा मिळत नाही व त्याचे विशिष्ट असे कार्यक्षेत्रही नेमल्याचे आढळून येत नाही. संभाजी सांगेल तिकडे जाऊन कामगिरी बजावणे हेच त्याचे कर्तव्य असल्याचे दिसून येते.


    स. १६८८ च्या उत्तरार्धात --- १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान शृंगारपुरचे शिर्के शेख निजामाला जाऊन मिळाले. त्या भागात कलशाचे वास्तव्य असल्याने कलशाने त्यांच्या बंदोबस्ताचे प्रयत्न केले. परंतु शिर्क्यापुढे त्याचा निभाव न लागल्याने त्याने विशाळगडी माघार घेत संभाजीकडे मदतीची मागणी केली. त्यानुसार स्वतः संभाजी कलशाच्या मदतीस गेला.


    औरंगजेबाचे एक पत्र वा. सी. बेंद्रेंनी दिले आहे. त्यावर तारीख नसली तरी थोड्या लोकांसह जहागीरदार ( संभाजी ) रायरीहून खेळण्यावर गेल्याची बातमी असून मुकर्रबखानाने त्यांस पकडण्याचे प्रयत्न करावेत अशी सुचनावजा आज्ञा आहे. शिवाय याच पत्रानुसार शिर्क्याच्या बंदोबस्ताकरता संभाजी खेळण्यास आल्याचे दिसून येते.

प्रश्न असा आहे कि, संभाजी प्रथम विशाळगडी गेला कि तिथं न थांबता तो थेट पन्हाळ्यास रवाना झाला. पण याहीपेक्षा महत्त्वाचे अनुत्तरीत प्रश्न पुढेच आहेत.


    दि. १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान कधीतरी प्रल्हाद निराजी व इतर कारकून - अधिकाऱ्यांनी फितुरी केल्याचे कलशाने सांगताच संभाजीने त्यांना कैदेत टाकले. प्रल्हादपंतास पन्हाळ्यावर कैदेत ठेवल्याचे बेंद्रे नमूद करतात.


    परंतु हि घटना घडण्यापूर्वी केव्हातरी --- कदाचित कलश - शिर्क्यांचा झगडा झाल्यावर वा तत्पूर्वी पन्हाळा अल्पकाळाकरता मोगलांकडे गेला होता. परंतु संभाजी तातडीने पुढं चालून आल्याने तो परत संभाजीच्या ताब्यात आला. या घटनेचा कालनिर्देश मिळत नाही परंतु हि याच काळातील असल्याचे बेंद्रेंचे मत आहे. असो.

प्रल्हाद निराजी व इतर कटवाल्यांची धरपकड करत असतानाच संभाजीची शिर्क्यांवरील स्वारी सुरूच होती. त्यांच्या प्रांताची त्याने बरीच नासाडी केली. परंतु याउपर तो शिर्क्यांचा बंदोबस्त करू शकला नाही.


    डिसेंबरात संभाजी कोल्हापूर प्रांती असताना दि. १४ डिसेंबर रोजी औरंगजेबाने विजापूरचा तळ उठवून अकलूजकडे कूच केले. जेधे शकावली नुसार शिर्क्यांना उधळून लावल्यावर संभाजी विशाळगडी परतला. परंतु रायगडाकडे जाण्यासाठी तो संगमेश्वरी थांबल्याची जी नोंद आहे, त्यात तो कोणत्या स्थलाहून संगमेश्वरी आला, याची स्पष्टता नाही.


    यासंदर्भात बेंद्रेंच्या संभाजी चरित्रातील स. १७११ च्या नरहर मल्हारच्या तकरीरची नोंद महत्त्वाची आहे. त्यानुसार --- ' सन तिसा समानिन ( १६८८ इ. स. ) राजश्री संभाजीराजे किले पनालियास आले. ते समयी कृष्णाजी कोन्हेर आमचे चुलत बंधू यानी हुजूर जाऊन महाजनकीचे वर्तमान आद्यंति विदित केले. त्यावरून राजश्री संभाजीराजे यांनी .... मनसफी करावयाची आज्ञा केली .... मनसुफी निवाडा करावा तो किले पनालाहून राजश्री संभाजीराजे रायगडास चालिले. संगमेश्वराचे मुक्कामी शेख निजाम गनीम आला. ते समयी वाताहात जाहले .... '


    याशिवाय आणखी एक अर्धवट नोंद बेंद्रेंनी दिली आहे ती पुढीलप्रमाणे :- " २० एप्रिल, १६८९ च्या सनदेत राजाराम महाराज लिहितात : ' सांप्रत सिरके याची सोबत केली. त्याप्रसंगी कवि कलश येऊन यापरी निमित्त ठेऊन यासी ( विठ्ठल नारायण ) विशालगडी बंदित ठेविले. घरदार लुटून गुरे, सैन्य आदि करून सर्वही दिवाणात नेले .... ' या नोंदीवरून संभाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या बंदोबस्तानंतर शिर्क्यांचा बंदोबस्त केला व नंतर ते खेळण्यास आले असे दिसते. "


    उपरोक्त दोन्ही नोंदी थोड्या गोंधळात टाकणाऱ्याच दिसतात. कारण तकरीरनुसार संभाजी पन्हाळ्याहून संगमेश्वरी आला तर राजारामाच्या सनदेवरून बेंद्रेंनी संभाजी विशाळगडावरून संगमेश्वरी आल्याचे नमूद केले आहे. काफिखानही विशाळगड ते संगमेश्वर यासच दुजोरा देतो. असो.


    आधी उल्लेख केल्यानुसार औरंगजेबाने मुकर्रबखानास पत्र पाठवून संभाजीला कैद करण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार त्याचे हेर संभाजीच्या पाळतीवर होतेच. गड - किल्ल्यावर संभाजीला कोंडण्यापेक्षा त्याला मार्गात छापा घालून धरणे मोगलांच्या दृष्टीने सोयीचं असल्याने त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न चालवले.


    स. १६८९ च्या जानेवारी महिन्यात संभाजीच्या हालचाली काय होत्या याची तपशीलवार माहिती मिळत नाही. मात्र यावेळी राजगड घेण्यासाठी मोगली फौजा त्या प्रांती आल्या होत्या व संभाजी कैद जाला त्याच सुमारास त्यांनी तो किल्ला ताब्यात घेतलाही होता. परंतु शंकराजी नारायणाने त्वरित प्रतिहल्ला चढवून परत तो किल्ला जिंकून घेतल्याचे उल्लेख मिळतात. शिवाय याच काळात शहजादा आझम रायगडकडे जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे कळते. परंतु त्यांस अपेक्षेप्रमाणे यश न लाभल्याने औरंगने झुल्फीकारखानाला रायगड ताब्यात घेण्यासाठी पाठवले. तो दि. ८ मार्च १६८९ रोजी महाडला पोहोचल्याची नोंद मिळते.


    यावरून मुख्य राजधानी वेढून संभाजीला वाटेतच गाठण्याचा वा कोल्हापूर ते रायगड दरम्यान चिमटीत पकडण्याचा मोगलांचा उद्देश स्पष्टपणे लक्षात येतो. मात्र, कोल्हापूर प्रांती असलेल्या संभाजी, कलश, सेनापती घोरपड्याच्या हालचालींची नोंद मिळत नाही. असो.


' माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजीराजे व कविकलश रायेगडास जावयास संगमेस्वरास आले असता सेक निजाम दौड करून येऊन उभयेतांस जिवंतच धरून नेले वरकड लोक रायेगडास गेले ' हि जेधे शकावलीतली नोंद बऱ्यापैकी संशयास्पद आहे. इंग्रजी कालगणनेनुसार या दिवसाची तारीख १ फेब्रुवारी १८९ येते. परंतु बेंद्रेंनी म्हटल्याप्रमाणे या काळातील शकावलीतल्या नोंदीत बऱ्यापैकी विसंगती आहे. उदाहरणार्थ - मार्गशीर्ष मासात ( १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर ) औरंगजेब विजापुराहून तुळापुर नजीक भीमा नदी तीरावर आल्याचे शकावली सांगते. पण औरंगजेब १४ डिसेंबर रोजी विजापुरातून निघाला. १५ फेब्रुवारीस तो बहादूरगडी होता व ३ मार्चला कोरेगावला आला. तेव्हा हि नोंद औरंगजेब विजापुराहून निघाल्याची असल्याचे सिद्ध होते व हे सांगून बेंद्रे असा सिद्धांत मांडतात कि, ' संभाजीराजे खेळण्याहून १ फेब्रुवारी १६८९ रोजी निघाले. ' विशाळगडाहून संगमेश्वरी काही कारणांस्तव संभाजीचा अल्पकाळ मुक्काम झाला, अशी बेंद्र्यांची मांडणी आहे.


    संभाजी पकडला जाण्यापूर्वीच्या दोन महत्त्वाच्या नोंदी बेंद्र्यांनी आपल्या संभाजी चरित्रात नमूद केल्या आहेत. त्यानुसार ---- (१) " प्रभावलीच्या देसाईपणाचा तिसरा भाग ५००१ होनास विकताना जोगण प्रभु ४ फेब्रुवारी १६८९ ला लिहितो कि, ' ऐसियासी भोसले यानी मुलूख लुटून खराब केला. या करिता हक लाजिमा सेत बाग कुळ बुडाले. बहुत नातवान जाहलो. त्यावरी मुलुखात पातशाही तरुफतीस आला. पुढे कीर्दीत आबादाणी करावे यासी आपणास कुवत नाही ...' "

(२) ' मौजे कोतुळक व मौजे ता| वेलब हे दोन्ही गाव विठोजी याची भावजय कुसाबाई हीस मुकासा संभाजीराजे यांनी दिल्हा होता ... शिर्के यांची पागा येऊन राहिली ... देसाई याचे माणसासी व सिर्के याचे राउतासी कटकट जाहाली .... ते वर्तमान देसाई यास कळल्यावर कोतुळास जाऊन सिर्के याची पागा होती ती मारून टाकिली आणि तैसेच संगमेश्वरास राजश्री संभाजीराजांपासी जाऊन वर्तमान निवेदन करून शिर्के याचकडे मोकासा काढून प्रांताप्रमाणे सरकारात गाव ठेविले. '


    उपरोक्त दोन नोंदींपैकी पहिल्या नोंदीची तारीख उपलब्ध आहे. ती लक्षात घेता कोल्हापूर भागात मोगलांचा अंमल स्थापित झाल्याचे लक्षात येते. सारांश, शिर्क्यांचा बंदोबस्त करूनही पन्हाळा प्रांती मोगलांची आगेकूच रोखण्यात संभाजीला अपयशच आल्याचे दिसून येते. पन्हाळ्यावरून संभाजी थेट संगमेश्वरी आला कि विशाळगडाहून याची निश्चिती तूर्तास होत नसली तरी तो संगमेश्वरी थांबणार असल्याची बातमी फारशी गुप्त राहिली नव्हती असं म्हणावं लागेल. कारण, उपरोक्त नोंद क्र. २ नुसार देसायाने कोतुळास जाऊन शिर्क्याची पागा मारली व घडल्या घटनेची माहिती त्याने संगमेश्वर मुक्कामी संभाजीला दिली. देसायाच्या या कामगिरीनंतरच संभाजीने शिर्क्यांचा मोकासा काढून टाकल्याचा उल्लेख आहे.


    मासिरीनुसार मुकर्रबखानास संभाजीची माहिती मिळताच कोल्हापुराहून तो ४५ कोस दूर अंतरावरील संगमेश्वरी रवाना झाला. बेंद्रेंनी संगमेश्वर ते कोल्हापूर अंतर ७० - ८० मैल धरलं आहे. किलोमीटर्सच्या भाषेत ते सुमारे ११२ ते १२८ इतके भरते. मुकर्रबखानासोबत नेमके किती सैन्य यावेळी होते याचीची स्पष्टता होत नाही. त्याची व त्याच्या नातलगांची मनसब जमेस धरून तो २० - २५ हजार सैन्याचा अधिपती होता. तेव्हा दुर्गम भागातील जंगली प्रदेशात शिरताना तो दोन तीन हजारच सैन्य सोबत घेईल हे संभवत नाही. कारण, पन्हाळा - विशाळगड व मलकापूर येथील कलशची पागा आणि खुद्द संभाजीची पथकं, यांना जरा जरी बातमी लागली असती तर खानाचाच चुराडा होण्याची शक्यता अधिक होती.

परंतु, पाच हजारांच्या आसपास असणारा त्याच्या सैन्याचा अंदाजे आकडा, शेसव्वाशे किलोमीटर्सची त्याने अल्पावधीत केलेली दौड पाहता नक्कीच त्याला कुठेतरी विजयाची खात्री जास्त असल्याचे दर्शवते.


    कोल्हापूर - संगमेश्वर मार्गाची तत्कालीन वर्णने वाचता शेसव्वाशे किमी अंतर, प्रतिदिन ३० - ४० किमी अंतर कापूनही इच्छित स्थळी पोहोचण्यास दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता अधिक आहे. अर्थात, मुख्य वाट टाळून आडवाटांनी जरी मुकर्रबखान पुढे चालून आला असं गृहीत धरलं तरी हे अंतर जास्तीत जास्त ३० - ४० किमी, इतकं कमी धरता येईल. तरीही प्रवासात दोन दिवस मोडतातच. पण तरीही आणखी एक प्रश्न दुर्लक्षित राहतो व तो म्हणजे मुकर्रबखानास संभाजीची बातमी केव्हा व कोठून मिळाली.

विशाळगड / पन्हाळ्याहून निघताना कि संगमेश्वरी ज्या दिवशी पोहोचला तेव्हाच ? कारण, हि बातमी कितीही वेगानं खानास मिळाली तरी बातमी येताच सैन्य व वाटाडे घेऊन संगमेश्वरी येण्यास दोन - अडीच दिवस तरी सहजी लागतील. तिथपर्यंत संभाजी संगमेश्वरीच राहील याची काय निश्चिती ? तो पुढे सटकला वा त्याच्या हेरांना खान आत शिरल्याचे समजताच उलट खानाच्याच जीवाला धोका नव्हता का ?  


    बेंद्रेंच्या मते, खानाचा छापा ३ किंवा ४ फेब्रुवारीस आला. यावेळी संभाजी सोबत खंडोबल्लाळ चिटणीस, कवि कलश व सेनापती म्हलोजी घोरपडे होते. परंतु या सर्वांजवळ असलेल्या सैन्याची निश्चित आकडेवारी मात्र समजायला मार्ग नाही. काफिखानाच्या मते, संभाजीसोबत २ ते ३ हजार स्वार होते. मासिरीनुसार ४ - ५ हजार दक्षिणी भालाईत होते. घोरपड्यांच्या कैफियत वगैरे कागदपत्रांचा संदर्भ देत बेंद्रे, म्हलोजी बरोबर ५०० - ६०० लोकं असल्याचे सांगतात. त्यातले २५० - ३०० म्हलोजी सोबत खानाच्या छाप्यात मारले गेले, त्याच कागदपत्रांच्या आधारे बेंद्र्यांनी नमूद केलंय.


    सेनापती सोबतच्या सैन्याचा आकडा मिळत असला तरी संभाजी - कलश बरोबरच्या लोकांची अंदाजे संख्याही उपलब्ध नाही. संभाजी रायगडाहून थोड्या लोकांनीशी निघाल्याचे औरंगच्या पत्रावरून स्पष्ट होत असले तरी हे थोडे लोक त्याचे अंगरक्षक म्हणून जमेस धरले तरी त्यांची भरती हजाराच्या खाली होत नाही. शिवाय म्हलोजी घोरपडे रायगडाहून येताना संभाजी सोबत होता, नव्हता याचीही स्पष्टता होत नाही.


    त्याहून मह्त्त्वाचे म्हणजे, रागडाला घेरण्यासाठी मोगल फौजा जात असल्याचे समजल्यावरून संभाजी तातडीने रायगडी निघाला होता असे बऱ्याच इतिहासकारांचे मत आहे. अशा स्थितीत मुठभर लोकांनीशी संभाजी रायगडास जाण्याची धडपड करतो हे जरा विसंगत वाटत नाही का ? 


    मासिरीतील माहिती पाहता, छापा पडताच कलशाने झुंज दिली व बाण लागून जखमी होताच तो संभाजीसह वाड्याच्या तळघरात लपून बसला. शत्रूचे हेर पाळतीवर असल्याने मुकर्रबखानाचा मुलगा इखलासखान वाड्यात शिरला व त्याने कलश - संभाजीला कैद केले.

काफीखानच्या मते, कलश व संभाजीने हल्ल्याला तोंड दिले. कलशाच्या हाताला बाण लागून तो घोड्यावरून खाली पडला. कलशाला मैदानातच कैद करण्यात आले. तर संभाजी पळून जाऊन देवळात लपला होता. तिथून त्यास पकडण्यात आले. या झुंजीत त्यांची चार पाच मराठे मारले गेले व बाकीचे पळाले असेही काफीखान म्हणतो.


    बेंद्रेंच्या संभाजी चरित्रांत उभयपक्षांची असलेली माहिती व इतर ग्रंथांतील नोंदी पाहता मुकर्रबखान अगदी जवळ आल्यावर संभाजीच्या हेरांनी शत्रू अंगावर आल्याची बातमी आणली. त्यानंतर निसटून जाण्याची तयारी न करता संभाजी प्रतिकाराची योजना करतो हेच मुळी विसंगत दिसते. कारण, त्याचे सैन्य इतिहासकार सांगतात त्यानुसार हजार - पाचशेच्या घरात असेल तर, संभाजीने बातमी मिळताच तडक निसटून जायला हवे. परंतु, कलश व घोरपडे शत्रूच्या मुकाबल्यास जातात याचा अर्थ, यावेळी संभाजीसोबत हजार पाचशे इतकं कमी सैन्य नसल्याचे सहज लक्षात येते.


    त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कलश व घोरपडे शत्रूला रोखण्यासाठी गेल्यावर संभाजी वाड्यातच का बसून राहिला ? त्याने निघून जाण्याची कसलीच तयारी केली नाही हे पाहता व तो वाड्यातील तळघरात कैद झाल्याची नोंद लक्षात घेता हाताशी बऱ्यापैकी फौज असल्याने विजयची त्याला एकप्रकारे खात्री असल्याचे दिसून येते. परंतु घोरपड्यांच्या कागदपत्रानुसार म्हलोजी पडताच त्याचे सैन्य पळून गेले. वास्तविक म्हलोजीचा मुलगा --- संताजी सोबत असताना म्हलोजी पडताच त्याच्या सैन्याने पळून जाणं पटण्यासारखं नाही. परंतु संताजी यावेळी नेमका कुठे होता याचीही स्पष्टता होत नाही. कलश तर हाताला बाण लागल्याने लढाईतच घोड्यावरून खाली आला व शत्रूहाती कैद झाला. पण कलश आणि संभाजीच्या सैन्याचे काय झाले, ते समजायला मार्ग नाही. लढाईत पराभव झाला तरी पाठीमागे असलेल्या राजाला सुरक्षित बाहेर काढण्याची जबाबदारी सैन्यावर होती. पण तसं घडून आल्याचं दिसत नाही.


    उपलब्ध माहितीनुसार संभाजी, कलश सोबत दहा ते अकराजण कैद झाले होते. ज्यांची पुढे या दोघांसह छळानंतर कत्तल झाली. मग ते वगळता इतरजण कुठे गेले ? 


    छापा पडतो. सेनापतीसह राजाचा विश्वासू मंत्री लढाईत उतरतो. परंतु सेनापती पडताच व मंत्री घायाळ होताच सैन्य पळून जातं. संताजी व खंडो बल्लाळ चिटणीस जीव घेऊन रायगडी जातात. संताजी जर लढाईत असेल तर तो हजर असताना घोरपड्यांची फौज बेजबाबदारपणे निघून कशी गेली समजत नाही. जर तो लढाईत नव्हता तर मग संभाजीला घेऊन बाहेर का पडला नाही, तेही कळायला मार्ग नाही. तीच बाब खंडो बल्लाळची. या स्थळी आणखी एक बाब नमूद करतो व ती म्हणजे संगमेश्वरापासून प्रचीतगड अगदी जवळ असून तिथे जाण्याची वाट शिर्क्यांच्या शृंगारपुराजवळून जाते. मात्र, प्रचीतगड यावेळी कोणाच्या ताब्यात होता, हे समजायला मार्ग नाही.


    संगमेश्वरची कामगिरी उरकताच मुकर्रबखान शाही कैद्यांना घेऊन औरंगजेबाच्या तळाकडे निघाला. त्याच्या परतीच्या मार्गाबद्दला संदिग्धता आहे. तो तसाच मधल्या रस्त्याने कराडवरून अकलूज / बहादूरगडास गेला कि परत आल्या पावली कोल्हापुरास जाऊन तसाच पुढे बहादुरगडी गेला हे समजायला मार्ग नाही. बेंद्रेंच्या मते, खान आल्या मार्गे परतला. त्यांची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु, पन्हाळा - विशाळगड - मलकापूर येथील लष्करी ठाण्यांना मोगल सैन्य आत शिरल्याची बातमी मिळताच त्यांचा छापा पडण्याची भीती होतीच. मधला रस्ता धरला असेल तर प्रचीतगड वाटेवर आहे. त्यावेळी तो कोणाच्या ताब्यात होता याची माहिती नाही. 

    संगमेश्वराची बातमी येताच वा तत्पूर्वीच औरंगजेब बहादूरगडाला निघाला होता. त्याने खानाला कैदी घेऊन तिकडे येण्यास सांगितले. शिवाय मदतीकरता हमीदुद्दिनखानासही पाठवले. पण यांची गाठ कुठे पडली याची निश्चिती नाही. दि. १५ फेब्रुवारी १६८९ रोजी बहादूरगड येथील मोगली छावणीत संभाजीला आणण्यात आल्याचा तसेच याच दिवशी बादशाहही बहादूरगडी आल्याचा उल्लेख मिळतो. तोपर्यंत रायगडी काय चाललं होतं ?


    बेंद्रेंच्या मते, संगमेश्वराच्या पळातील लोकं ८ फेब्रुवारीपूर्वीच रायगडी आले. त्यानंतर संभाजीचा वृत्तांत आला असावा. कारण, दि. ९ फेब्रुवारी रोजी येसाजी कंक व रायगडचा किल्लेदार चांगोजी काटकर यांनी राजारामास अदबखान्यातून बाहेर काढले. अर्थात, संभाजी गादीवर असेपर्यंत राजाराम हा नजरकैदेतच होता. संभाजी पकडल्याचे कळताच त्याची नजरकैदेतून सुटका झाली. परंतु दि. १२ फेब्रुवारी रोजी संभाजीच्या भवितव्याच्या दृष्टीने सर्वांत अनर्थकारी निर्णय घेण्यात आला.


    संभाजीने आपल्या गैरहजेरीत राज्यकारभाराची सर्व सूत्रे येसूबाईकडे सोपवली होती. महत्त्वाच्या पत्रांवर मोर्तब व शिक्के करण्याचेही अधिकार तिच्याकडे होते व राजपत्रे काढताना ' आज्ञा ' ऐवजी ' राजाज्ञा ' हा शब्द वापरण्याची मुभाही तिला होती. औरंगजेब दक्षिणेत उतरल्यापासून संभाजीला कारणपरत्वे राजधानीपासून दूर राहावे लागत असल्याने आपल्या गैरहजेरीत कचेरी व राज्यकारभाराची कामं सुरळीत चालवीत याकरता त्याने अशी व्यवस्था केली होती. हे सर्व लक्षात घेता, संभाजी मोगली कैदेत असताना राज्यकारभार त्याच्या नावेच पण येसूबाईच्या आज्ञेने करण्याचे सोडून गडावरील मुत्सद्द्यांनी राजारामास बाहेर काढून गादीवर बसवण्याचा सल्ला दिल्याचे ध्यानी येते. अर्थात, हा सल्ला नसून एकप्रकारे आग्रहच होता असं म्हणावं लागेल.


    संभाजी पकडला गेल्याचे समजताच रायगड व इतरत्र असलेले प्रमुख मुत्सद्दी - सरदार पुढीलप्रमाणे :- येसाजी कंक व चांगोजी काटकरचा उल्लेख आधीच आला आहे. शंकराजी नारायण हा मावळ भागात असून मोगलांनी जिंकलेला राजगड फिरून घेण्याची कामगिरी त्यानेच पार पाडली होती. रामचंद्रपंत हा बहुधा रायगडीच होता. पंडितराई पदावरील केशवभटही बहुधा रायगडी असावा. खंडो बल्लाळ चिटणीस व संताजी घोरपडे संगमेश्वरातून निघाले ते, थेट रायगडीच पोहोचले. पेशवा निळोपंत कर्नाटकात स. १६८८ च्या पावसाळ्यातच गेला होता. धनाजी जाधव गुजराथ - राजस्थानात भागात होता. न्यायाधीश प्रल्हाद निराजी फितुरीच्या आरोपामुळे पन्हाळ्याच्या कैदेत पडला होता.


    एकूण, राजारामाला गादीवर बसवण्यात यातील काही मंडळी प्रमुख होती हे निश्चित. यापैकी काही मुत्सद्यांचा आरंभापासूनच राजारामाकडे या ना त्या प्रकारे राजारामाकडेच ओढा होता. काहींचे सख्खे बाप - भाऊ तर संभाजीने फितुरीच्या आरोपावरून मारले होते वा कैद केले होते. संभाजी मोगलांचा कैदी असून येसूबाई महाराणी असतानाही राजारामास नजरकैदेतून काढून गादीवर बसवण्यात सदरांना ज्याअर्थी गैर वाटलं नाही, त्याअर्थी त्यांचीही या प्रकारास संमती असावी असंच म्हणावं लागेल.


    दि. ९ फेब्रुवारी रोजी नजरकैदेतून बाहेर पडलेल्या राजारामाचे मंचकारोहण होण्यास १२ तारीख उजडावी लागली. हा तीन दिवसांचा अवधी मुहूर्त वगैरे कारणांनी लागला असण्याची शक्यता आहे. परंतु यासोबत एक राज्यक्रांतीही रायगडी घडून येत होती, हे देखील दुर्लक्षित करता येत नाही. राजाराम गादीवर येताच, संभाजीने फितुरीच्या आरोपावरून अटक केलेल्या मुत्सद्दी - सरदारांची सुटका करण्यात आली. पन्हाळ्यावर अटकेत असलेल्या प्रल्हाद निराजी व मानाजी मोरेची मुक्तता झाली तर येसाजी व सिदोजी फर्जंदचा पन्हाळ्यावरून कडेलोट करण्यात आला. हे दोघे हिरोजी फर्जंदचे धाकटे भाऊ. यांचा कडेलोट कशासाठी करण्यात आला, याचा खुलासा होत नाही. जर ते राजारामाचे पक्षपाती असतील वा प्रल्हाद निराजी सोबत संभाजीविरुद्धच्या कटात सापडले असतील तर त्यांचीही सुटका व्हायला हवी होती. पण तसं तर दिसत नाही. कि हे संभाजीचे पक्षपाती होते म्हणून यांना ठार करण्यात आलं ?    


    राजारामच्या मंचकारोहणाचा निर्णय येसूबाईने घेतल्याचे इतिहासकार जरी सांगत असले तरी तसं घडलं असावं हे संभवत नाही. कारण, संभाजी शत्रूच्या कैदेत असताना राजारामच्या मंचकारोहणाचा अर्थ / परिणाम काय होतो, हे न समजण्याइतपत ती राजकारणात नवखी नव्हती. सरदार - मुत्सद्द्यांनी घेतलेल्या निर्णयास, केलेल्या राज्यक्रांतीस मूक संमती देण्यापलीकडे तिच्या हाती या काळात काहीच नसल्याचे दिसून येते. अन्यथा रायगडाहून औरंगजेबाच्या गोटात वकील लगोलग दाखल झाले असते. 


    दि. १२ फेब्रुवारी राजारामाचे मंचकारोहण होताच ता. १७ फेब्रुवारी रोजी औरंगजेबाने संभाजीचे डोळे काढले व दुसऱ्या दिवशी कलशाची जीभ तोडली. १७ फेब्रुवारी ते १० मार्च पर्यंत औरंगने संभाजी - कलशसह त्यांच्या दहा - अकरा साथीदारांचा छळ करून ११ मार्च १६८९ रोजी त्यांना ठार केले. मराठ्यांच्या या दुसऱ्या छत्रपतीची उपयुक्तता, सत्ता, अधिकार दि. १२ फेब्रुवारी रोजीच हिरावून घेण्यात आल्यानंतर या कैद्यांचा बादशाहलाही काय उपयोग होता ?


    रायगडावरील मुत्सद्द्यांनी राजारामास गादीवर बसवून एकप्रकारे औरंगजेबला संभाजीच्या बाबतीत मोकळा हात दिला होता. कारण, संभाजी कैद होताच रायगडावरील वकील तहाकरता औरंगजेबाच्या छावणीत येणे अपेक्षित होतं पण तसं न घडता राजाराम गादीवर येतो. त्यानंतरही त्याचे वकील जेव्हा मोगल छावणीत येत नाहीत तेव्हा या बेफिकिरीचा अर्थ न समजण्याइतपत औरंग व संभाजी दोघेही दुधखुळे नव्हते. औरंगने संभाजीचे डोळे काढले तर संभाजीने अन्नत्याग केला. अशा वेळी निरर्थक कैदी पोसण्याचा खर्च औरंगने तरी का उचलावा ? त्याने सर्वांना ठार करून त्यांची मुंडकी धडावेगळी केली.


    इकडे रायगड घेण्यासाठी आलेला झुल्फीकारखान मार्गाने लढाया करत महाडला ८ मार्च १६८९ रोजी पोहोचला व प्रत्यक्ष वेढा त्याने २५ मार्च रोजी आरंभला. तेव्हा परत एकदा रायगडी सल्ला मसलत होऊन येसूबाई व शाहूला रायगडी ठेवून उर्वरित प्रधान - सरदारांनी राजारामास घेऊन वेढ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय येसूबाईच्या संमतीने घेण्यात आल्याचे इतिहासकार म्हणत असले तरी दि. ९ फेब्रुवारी नंतर तिच्या हाती प्रत्यक्ष अधिकार आणि निर्णयस्वातंत्र्य कितपत राहिले, याविषयी शंकाच वाटते. खुद्द राजाराम तरी निर्णय घेण्यास स्वतंत्र व समर्थ कुठे होता ? मुत्सद्द्यांना त्यांच्या पसंतीचा राजा हवा होता, जो परिस्थितीमुळे त्यांना निवडता आला. ते आता त्याचा वापर करण्यास मोकळे होते. राहिला प्रश्न शत्रूचा तर, मोगलांची बल - दुर्बल स्थानं ते जाणून होते. त्यामुळे त्याची ते फारशी पर्वा करत होते असं दिसत नाही. राजघराण्यातील पुरुष हाताशी धरून त्याच्या नावे सत्ता उभारण्याचे खेळ शहाजी पासून ते अगदी शिवाजी - संभाजी पर्यंत त्यांनी पाहिले होते. अनुभवले होते. त्यामुळे प्रत्येकाच्या आकांक्षा जागृत झाल्यास त्यात नवल ते काय ! असो.


    एकूण पाहता काही कारणांनी मंत्रीमंडळ व सरदार वर्गात संभाजी हा प्रिय नसल्याचे दिसून येते. मंत्र्यांना त्याचे शाक्तप्रेम खटकत होते. कारण त्यामुळे वैदिक धर्माचे महत्त्व लोपण्याचा/ घटण्याचा दाट संभव होता. खेरीज मंत्री - सरदारांना अनर्थकारी बाब म्हणजे संभाजीचे वतनविषयक धोरण. वतन - जहागीऱ्यांचा लोभ मंत्री - सरदारांना नव्हताच असं बिलकुल म्हणता येत नाही. परंतु स. १७८७ पर्यंत स्थिती नियंत्रणाट होती. मंत्र्यांवर संभाजीची करडी हुकुमत होती तर सेनापती हंबीरराव त्याचा तगडा पाठीराखा होता. परंतु हंबीरराव मेल्यावर स्थितीने पलटी खाल्ल्याचे दिसून येते. मंत्र्यांचे कट तर चालूच होते. त्यांना आता सरदारांचीही जोड मिळाली. त्यामुळेच संभाजी संगमेश्वरी मुकर्रबखानाच्या तावडीत सापडला. या प्रकरणी शिर्क्यांना दोषी धरण्यात येतं खरं पण संभाजीला पकडायला आलेल्या व पकडून नेणाऱ्या मोगली सैन्यावर हल्ले होत नाहीत याचा अर्थ काय घ्यायचा ? मुकर्रब खान चार - सहा दिवस मलकापूर - विशाळगड - पन्हाळ्याच्या परिसरात येतो - जातो तरी या लष्करी ठाण्यांना त्याची चाहूल कशी लागत नाही ? छापा येण्यापूर्वी काही क्षणच आधी संभाजीला बातमी कशी लागते ? लढाईत संभाजीचे किती सैन्य लढून मेले ? त्याच्यासह कैद फक्त कवि कलश झाला. बाकीच्या दहा - अकरा जणांची नावं माझ्या वाचनात आली नाहीत. संभाजी कैदेत पडून राजाराम सत्तेवर आला तरी रायगडाचा वकील औरंगजेबाच्या छावणीत का येत नाही ? उलट पन्हाळ्याला कैदेत असलेल्या प्रल्हाद निराजी वगैरेंची सुटका याच काळात बरी होते. हे सर्व प्रश्न फक्त एकाच गोष्टीकडे निर्देश करतात व ती म्हणजे संभाजीचा जो घात झाला तो त्याच्याच माणसांनी केला. शिर्क्याचे नाव तर यात पूर्वीपासूनच आहे. परंतु संभाजीचे मंत्री - सरदारही या दोषापासून अलिप्त नाहीत.



संदर्भ ग्रंथ :-


(१) जेधे शकावली - करीना :- संपादक - डॉ. अ. रा. कुलकर्णी

(२) मराठी रियासत ( खंड - २ ) :- गो. स. सरदेसाई

(३) श्रीछत्रपती संभाजी महाराज :- वा. सी. बेंद्रे

(४) महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड ( भाग १ ) :- डॉ. वि. गो. खोबरेकर
(५) औरंगजेबाचा इतिहास :- जदुनाथ सरकार, मराठी अनुवाद :- डॉ. भ. ग. कुंटे