हिंदुस्थानवरील मुस्लीम आक्रमणे - एक चिंतन ( भाग ४ )





    महंमद घोरीच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याचे तुकडे पडून ठिकठीकाणच्या प्रांतिक सुभेदारांनी आपापले स्वातंत्र्य जाहीर केले. त्यापैकी एक म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक. स. १२०६ मध्ये त्याने स्वतःस सुलतान म्हणून घोषित करत राजधानीकरता दिल्लीची निवड केली.


    कुतुबुद्दीन व त्याच्या वंशजांनी स. १२८८ पर्यंत दिल्लीचं तख्त संभाळलं. त्यानंतर खिलजी सुलतानांचा अंमल स्थापित होऊन त्यांनी स. १३२० - २१ पर्यंत दिल्लीचा कारभार पाहिला. पुढे दिल्लीची सत्ता स. १३२१ मध्ये तुघलकांच्या हाती जाऊन स. १४१६ मध्ये सय्यद घराण्याने दिल्लीवर आपलं वर्चस्व स्थापित्य केलं. त्यानंतर स. १४५० मध्ये लोदींनी तख्त काबीज करून स. १५२६ पर्यंत राज्य केलं. पुढे बाबरने लोदींच्या सत्तेचा नाश करत मोगल बादशाहीची स्थापना केली. यातील प्रत्येक राजवटीच्या उत्कर्ष - ऱ्हासाची चर्चा करण्याचे येथे प्रयोजन नाही.


    माझ्या मते, दिल्लीला पुढील इतिहासात जे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले त्याचे संपूर्ण श्रेय खिलजी सुलतानांकडे जाते. कारण कुतुबुद्दीनच्या वंशजांनी जरी गजनी, सिंध, पंजाब, बंगाल, राजपुताना, माळवा, गुजरात इ. प्रांतात धडक मारली असली तरी त्यांची राजवट विविध प्रांतांतील सरदारांच्या बंडाळ्या, स्थानिक सत्ताधीशांचा या सुलतानांशी वा त्यांच्या सरदारांशी होणारा संघर्ष व खुद्द सुलतानाच्या दरबारातील विविध पक्षांचे कलह इ. कारणांनी इथे तितकीशी स्थिर होऊ शकली नाही. त्याउलट खिलजी सुलतानांच्या काळात --- विशेषतः अल्लाउद्दिन खिलजीच्या शासनकाळात येथील मुस्लीम राजवटीस एकप्रकारचे स्थैर्य लाभून तिचा दक्षिण हिंदुस्थानात विस्तार झाला, जो तत्पूर्वी करण्यात आधीच्या सुलतानांना अपयश आले. त्याखेरीज अल्लाउद्दिनने देशाच्या विविध भागात मोहिमा काढण्याचा सपाटा लावल्यामुळे दिल्लीच्या सुलतानांना व्यवहारात एक वलय प्राप्त होत गेले. अल्लाउद्दिन पूर्वीच्या सुलतानांना अल्लाउद्दिन इतकी वा त्याहून अधिक कारकीर्द लाभूनही त्यांच्याच्याने हे कृत्य साधले नाही. विशेषतः सुलतानशाहीचा कारभार हाती घेण्यापूर्वी त्याने देवगिरी साम्राज्यावर जो मर्माघात करून त्यांस अगदीच हिनावास्थेस पोहोचवले, हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च बिंदू मानता येईल.


     खिलजींच्या पश्चात पुन्हा त्यांच्या साम्राज्याचे तुकडे पडणे व एका घराण्याची सत्ता दुसऱ्या घराण्यात हस्तांतरित होणे हे प्रकार जसे घडून आले त्याचप्रमाणे दक्षिणेत स्वतन्त्र मुस्लीम सत्ताही उदयास आल्याचे विसरता येत नाही. इथपासून मोगल बादशाही स्थापन होऊन औरंगजेबाच्या कारकिर्दी अखेरीस विविध मुस्लीम राजवटी मोगल साम्रज्यात विलीन होईपर्यंत येथील मुस्लीम सत्तांचे धोरण कधीही एकमत, एकविचाराने चालले नाही. अपवाद फक्त विजयनगर साम्राज्याचा विध्वंस करणाऱ्या मोहिमेचा !

     सारांश, ज्या आपसांतील संघर्षामुळे येथील हिंदूंना पारतंत्र्य लाभलं असे इतिहासकार सांगतात, त्याच आपसी संघर्षाच्या दुर्गुणापासून तत्कालीन मुस्लीम राजवटीही अलिप्त नसल्याचे सोयीस्कररित्या नजरेआड करतात. 


    कुतुबुद्दीन ते लोदी पर्यंतच्या सुलतानशाहीचा इतिहास सुमारे तीनशे वर्षांचा. या तीनशे वर्षांत बऱ्याच काही घडामोडी घडून आल्या. त्यांपैकी निवडकांची आपण येथे संक्षेपाने चर्चा करू.


     कुतुबुद्दीन हा तुर्की असून शहाबुद्दीनचा गुलाम सरदार होता. तसेच त्याच्या पश्चात गादीवर आलेला त्याचा जावई अल्त्माश हाही तुर्की गुलामच होता. पाश्चात्त्यांपेक्षा किंवा युरोपीयनांपेक्षा मुस्लिमांची गुलामगिरी थोडी वेगळ्या स्वरूपाची होती.


    तत्कालीन प्रघातानुसार गुलाम दोन मार्गांनी प्राप्त केले जात. प्रथम युद्धात पकडलेले कैदी व द्वितीय मनुष्य खरेदी - विक्री. पैकी यातील मनुष्याच्या खरेदी - विक्री व्यापारात तस्करीचाही प्रकार अंतर्भूत होता.


    शांततामय मार्गाने धर्मप्रसार करायचे म्हटल्यास त्यात कित्येक पिढ्या जाव्या लागतात. परंतु धर्मप्रसारार्थ जेव्हा शस्त्राचा आधार घेतला जातो तेव्हा कित्येक शतकांचा अवधी लागणारे कार्य काही वर्षांतच साध्य होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे महंमद पैगंबर स्थापित इस्लाम. ख्रिस्ती धर्मापेक्षाही इस्लामचा प्रसार वेगवान होऊन महंमद पैगंबराच्या पश्चात अवघ्या तीन चारशे वर्षांतच युरोपचा काही भाग, आफ्रिका खंडाचा दक्षिण भाग, मध्य व पूर्व आशियास इस्लामी वावटळीने ग्रासून टाकले. हा प्रकार घडून येण्यास रणभूमीवरील प्राप्त विजयाइतकाच जिंकलेल्या प्रदेशातील लोकांचेही धर्मांतरही कारणीभूत होते.


    धर्मांतरामुळे मूळ धर्माशी नाळ तोडली जात असे व यामुळे धर्मांतरित व्यक्तीकडून होणारा संभाव्य घात काही प्रमाणात टळला जात असे. अशा धर्मांतरितांपैकी उपयुक्त लोकांची निवड लष्कर, खासगी अंगरक्षक दल तसेच इतर कामांसाठी केली जात असे. अंगच्या कर्तबगारी, कर्तुत्वाच्या बळावर यातील गुलाम शासकाची मर्जी प्राप्त करून आपला उत्कर्ष साधत व कुतुबुद्दीन सारखे संधीसाधू मुत्सद्दी, पराक्रमी वीर अआपली स्वतंत्र सत्ताही स्थापत. त्यामुळेच इतिहासकार कुतुबुद्दीन स्थापित सुलतानशाहीचा उल्लेख गुलाम वंश असा करतात. परंतु माझ्या मते या राजवटीस गुलाम म्हणण्यापेक्षा तुर्की राजवट म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. कारण कुतुबुद्दीन, अल्त्माश व त्याचे वंशज हे सर्व तुर्की मुसलमान होते. खेरीज अल्तमशच्या वंशजांना बाजूला सरून पुढे आलेला बल्ब्न हा देखील तुर्कीच होता.


    सुलतान रजियाच्या इतिहासातील तिचे प्रेमप्रकरण व तिला दरबारातील सरदारांचा झालेला विरोध इ. गोष्टी सामान्यतः इतिहास वाचकांस ठाऊक असतात. परंतु तिचा प्रियकर किंवा विश्वासू सरदार हा हबशी गुलाम असल्यामुळे तुर्कांच्या तिरस्कारास पात्र व्हावा हि साधी बाब इतिहासकारांनीही दुर्लक्षित करावी याचे आश्चर्य वाटते.


    माझ्या मते, हबशी व्यक्तीशी जवळीक हेच रजियाच्या विनाशाचे मुख्य कारण बनले. कारण या हबशी - तुर्क वा दक्षिण हिंदुस्थानच्या इतिहासात हबशी म्हणजे दक्षिणी व हबशी आणि येथील धर्मांतरीत खेरीज ते परदेशी मुस्लिमांच्या रक्तरंजित संघर्षाने पानेच्या पाने रंगलेली आहेत.


    बल्बनच्या वंशजांना बाजुला सरून जलालुद्दीन खिलजीने सुलतानशाहीची सूत्रे आपल्या हाती घेतली. खिलजी हे पठाण अथवा अफगाण होते, याची निश्चित माहिती मिळत नाही. सामान्यतः अफगाण - पठाण या संज्ञा समानार्थी वापरल्या जातात परंतु त्यात भेद आहे. पख्तू भाषिक ते पख्तून व इकडील उच्चारानुसार पठाण व अफगाणिस्तानचे रहिवासी ते अफगाण हा उभय संज्ञांतला सामान्य भेद मानला जातो.


    खिलजी घराण्याची सत्ता फार काळ जरी टिकली नाही तरीही अल्लाउद्दिन खिलजीने आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत समस्त हिंदुस्थान ढवळून काढला. लुट, कत्तली, धर्मांतरे, वर्षानुवर्षे चालणाऱ्या मोहिमा यातच त्याची सर्व कारकीर्द निघून गेली.


    अल्लाउद्दिनच्या इतिहासातील देवगड तथा देवगिरी मोहिम महत्त्वाची मानली जात असल्याने त्याविषयी थोडी तपशीलवार चर्चा करणे भाग आहे.

    अल्लाउद्दिन खिलजी हा स. १२९३ मध्ये अलाहाबाद जवळच्या कुरा येथील सुभेदारीवर नियुक्त असून तेथून तो आपल्या चुलत्याला -- दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन यांस -- काहीएक न सांगता, विचारता सरळ देवगिरीच्या रोखाने चाल करतो. मार्गातील एकाही राजवटीकडून त्यांस अडथळा होत नाही. इतकेच काय तर देवगिरी साम्राज्यात प्रवेश करूनही देवगिरी नरेशला परराज्यातील सरदार सैन्यासह आपल्या प्रदेशात घुसल्याची खबर लागत नाही, यावर विश्वास बसणे अवघड आहे. 


    देवगिरीच्या यादवांचा जो काही तुटपुंजा इतिहास आजघडीला उपलब्ध आहे त्यावरून देवगिरीच्या यादवांच्या पराभवाची कारणे माझ्या मते कदाचित राजकीय असू शकतात. अर्थात हा देखील तर्क असून त्यांस फक्त एका पुराव्याचा आधार आहे व तो म्हणजे चुलत्याच्या पश्चात रामचंद्रदेव सत्तेवर आला व त्याने आपल्या चुलत्याच्या राजकीय धोरणात बदल करत माळव्यावर स्वाऱ्या करून तेथील हिंदू राजवटीचा उच्छेद आरंभला. विशेष म्हणजे दिल्लीचे तुर्की सुलतानही याच काळात माळवा जिंकण्याकरता प्रयत्नशील होते.


    रामचंद्राआधीचा यादव सम्राट महादेव यांस या गोष्टीची जाणीव असल्याने त्याने माल्व्याचे धक्केखाऊ राज्य बहुधा आपल्या सरहद्दीच्या रक्षणार्थ जिवंत ठेवणे आवश्यक मानले असावे. परंतु हा विवेक रामचंद्रदेवळा बाळगता आला नाही. माझ्या मते रामचंद्रदेवच्या माळव्यातील स्वाऱ्यांनी बाधित सत्ताधीशांनी अल्लाउद्दिन खिलजीला देवगिरी स्वारीची भर देत त्यांस आवश्यक ती सर्व मदत पुरवली असावी. अन्यथा इतिहासकार सांगतात त्यान्वये केवळ आठ हजार स्वारांनिशी देवगिरीचा किल्ला व यादव सम्राट जेर होणे शक्य नाही.


    देवगिरीच्या बचावाचा वृत्तांतही पूर्णतः अविश्वसनीय स्वरूपाचा आहे. रामचंद्रदेवच्या उपलब्ध इतिहासानुसार हा देखील अल्लाउद्दिन प्रमाणे युद्धखोर प्रवृत्तीचा असून दक्षिण हिंदुस्थानातील वारंगळ, होयसळ राज्यांवर त्याने वारंवार स्वाऱ्या केल्याचे दाखले सापडतात. तसेच ज्यावेळी अल्लाउद्दिन देवगिरीवर चालून आला तेव्हाही रामचन्द्राची मुख्य फौज, त्याचा मुलगा शंकरदेवसह कोणत्या तरी प्रांती स्वारीवर गेल्याचे इतिहासकार नमूद करतात.


    अल्लाउद्दिन चालून आला त्यावेळी प्रतिकारार्थ सैन्य जमवण्याची रामचंद्रदेवास मुश्कील पडून त्याने कशीबशी सैन्याची भरती करत अल्लाउद्दिन सोबत एक झुंज घेतले. त्यात रामचंद्रदेवाचा पराभव होऊन त्याने बचावार्थ किल्ल्याचा आश्रय घेतला. त्यावेळी किल्ल्याभोवती खंदकाची रचना नव्हती असे सरदेसाई म्हणतात.


    किल्ल्यात सुरक्षित राहून मदतीला फौज येईपर्यंत वेढा लढवण्याचा रामचंद्राचा बेत होता परंतु गडबडीमध्ये किल्ल्यात धान्याऐवजी मिठाची पोटी भरल्याने बचावाचा उपाय हरला. अशात अल्लाउद्दिनने मुख्य फौजेसह सुलतान आपल्या मदतीला येत असल्याची अफवा उठवल्याने रामचंद्राने अल्लाउद्दिनला पुष्कळ संपत्ती देऊन तह करत आपला बचाव साधला. दरम्यान देवगिरीची वार्ता ऐकून शंकरदेव स्वारीतून त्वरित माघारी फिरला व त्याने अल्लाउद्दिन सोबत एक झुंज घेऊन पाहिले. दुदैवाने त्यात त्याचा पराभव होऊन इलीचपूर व त्याच्या आसपासचे प्रांत व पुष्कळ द्रव्य देऊन रामचंद्रदेवाने अल्लाउद्दिनची शांती केली.


    रामचंद्रदेव व शंकरदेव यानी अल्लाउद्दिन सोबत ज्या लढाया केल्या त्यांचे वृत्तांत पूर्णतः अविश्वसनीय आहेत. प्रथमतः रामचंद्रदेवसारख्या महत्वाकांक्षी, युद्धखोर व्यक्तीकडे राजधानीच्या बचावासाठी नियमित फौज नसणे हेच मोठे आश्चर्य आहे.

    दुसरे असे कि, किल्ल्यात धान्याऐवजी मिठाची पोती भरली जाणे. मुळात कोणत्याही किल्ल्यात किमान महिना पंधरा दिवसांचा तरी शिलकी धान्यसाठा असतोच. त्यामुळे मिठाच्या पोत्यांची तरी थापच दिसते. परंतु त्यामध्ये थोडे जरी तथ्य असले तर मग हा सरळ फितुरीकडे निर्देश असून हि फितुरी कोणी केली ? हा प्रश्न उपस्थित होतो.

    तिसरी गोष्ट अशी कि, शंकरदेव अल्लाउद्दिन सोबत लढण्यासाठी मुख्य फौज घेऊन आला होता मग त्याचा पराभव कसा झाला ? शिवाय इतिहासकार सांगतात त्याप्रमाणे अल्लाउद्दिन फक्त आठ हजार स्वार घेऊन आला होता. या आठ हजार स्वारांपैकी कुरा ते देवगिरी प्रवास, रामचंद्रदेव सोबतचे प्रथम झुंज व वेढ्यातील काही दिवस हे प्रसंग निभावून कितीजण शंकरदेवाच्या सैन्याचा सामना करण्यास सक्षम होते ?


    महत्त्वाची बाब म्हणजे देवगिरीच्या विध्वंसाची दखल समकालीन संत साहित्यात अभावानेच घेतल्याचे दिसून येते, असे का व्हावे ? प्रस्थापित हिंदू राजवट उलथून तिथे इस्लामी राजवट येणे संतांना अपेक्षित होते का ? कि प्रस्थापित राजवट संतांच्या विरोधात होती ? तसेच यामध्ये रूढ इतिहासातील महानुभाव - शैव - वैष्णव वादाचा काही संदर्भ आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे अत्यावश्यक आहे.

         

1 टिप्पणी:

D-hox-x म्हणाले...

देवगीरी च्या युध्दात खिल्जी ने एक मानसिक धक्का तंत्राचा वापर केल्या. ज्यात त्यानी अशी मुलं उठवुन दिली की मागुन १लाख ची ताजी फौज येत आहेत. आणि २-२.५ हजारांचे राखीव सैन्य " ताजी फौज आगयी..." म्हणत अचानक युध्धात शिरले. ज्यामुळे यादव फौज गोंधळुन गेली. त्या २-२.५ हजार सैनिकांना लाखांची फौज समजुन यादव सैन्य पळाले. युध्दात मनाने हारलेले सैनिक लढुशकत नाही.