शनिवार, २९ जून, २०१३

श्रीमंत रघुनाथराव पेशवे ( भाग - १ )

  ' होणे जाणे ईश्वराधीन. आमचे स्वाधीन काय आहे ! '
                                                         -- रघुनाथ बाजीराव भट
       
                                                                           
               अटकेपार भगवा फडकवणारा बहाद्दर लढवय्या, मराठी राज्याला ग्रासणारा काळराहू, पेशवाईतील कलि पुरुष, भोळा सांब, हलक्या कानाचा, अक्कलशून्य राजकारणी  इ.  विशेषणांनी अनेक मराठी - अमराठी इतिहासकारांनी श्रीमंत रघुनाथराव पेशवे उर्फ दादासाहेब उर्फ राघोभरारी यांचा गौरव केला आहे. या राघोबादादांच्या चरित्राचा धावता आढावा घेण्याचा या लेख मालिकेमागील प्रमुख उद्देश आहे. 
                   दिनांक १८ ऑगस्ट १७३४ रोजी साताऱ्याजवळील माहुली येथे रघुनाथाचा जन्म झाला. रघुनाथराव ४ - ५ वर्षांचा असताना बाजीराव पेशव्याचे निधन झाले. बापाच्या पाठीमागे आपल्या बंधूंच्या शिक्षणाची व संगोपनाची सर्व जबाबदारी नानासाहेब पेशव्याने पार पाडली. परंतु रघुनाथ किंवा त्याचा धाकटा भाऊ जनार्दन यांच्या विषयी माहिती देणारी जी काही पत्रे उपलब्ध आहेत ती पाहता या मुलांच्या वर्तनावर फारसे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. पेशवे कुटुंबात यावेळी बाजीरावाची आई राधाबाई, तसेच बाजीरावाची पत्नी काशीबाई या प्रमुख स्त्रिया हयात होत्या पण त्यांचेही या मुलांवर फारसे बंधन नसल्याचे दिसून येते. रघुनाथ व सदाशिव यांचे लहानपणापासूनच आपसांत बनत नसल्याचे तत्कालीन एका पत्रावरून दिसून येते. असो, बाजीराव पेशव्याच्या पाठोपाठ काही महिन्यांनी चिमाजीआपा मरण पावला व त्यानंतर अवघ्या ८ - १० वर्षांत वरवर एकसंध दिसणाऱ्या पेशवे परिवारात सुप्त संघर्षास आरंभ झाला. 
         राजकारणात प्रवेश :- स. १७४९  अखेरीस सातारच्या छ. शाहू निधन झाल्यावर नवीन छत्रपती रामराजा पेशव्याच्या कह्यात गेला. ताराबाईस हा प्रकार मानवला नाही. तिने छत्रपती रामराजास -- म्हणजे आपल्या तथाकथित नातवास -- कैद करून सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी ताराबाई विरुद्ध नानासाहेब पेशवा असा संघर्ष उद्भवला. यावेळी पेशवे कुटुंबात नानासाहेबा व्यतरिक्त सदाशिव, रघुनाथ व समशेर बहाद्दर हे तिघे कर्ते पुरुष होते. पाकी सदाशिव हा बाकीच्या दोघांपेक्षा वयाने मोठा असला तरी तो चिमाजीआपाचा मुलगा असल्याने तसा दर्जाने दुय्यमचं होता. बाकी रघुनाथ व समशेर राजकारणात सक्रियपणे भाग घेण्यास अजून अप्रबुद्ध असल्याने त्यांचा राजकीय घडामोडींशी थेट असा संबंध अजूनपर्यंत आला नव्हता. बाजीरावाच्या काळात,  चिमाजी व बाजीराव दोघेही एकमेकांच्या विचाराने स्वाऱ्या - शिकाऱ्या पार पाडत असत. परंतु हि प्रथा निदान सदाशिवरावाच्या बाबतीत तरी पुढे चालू ठेवण्याचा नानासाहेब पेशव्याचा मानस असल्याचे दिसून येत नाही. नाही म्हणायला त्याने सदाशिवरावास उर्फ भाऊला काही मोहिमांवर पाठवले होते परंतु, त्या मोहिमांमध्ये भाऊला निर्णय आणि वर्तन स्वातंत्र्य असे फारसे दिले नसल्याने त्या मोहिम भाऊने पार पाडल्या काय आणि न पाडल्या काय दोन्ही सारखेच ! असो, पेशवे कुटुंबातील एक कर्ता पुरुष म्हणून भाऊ राज्यकारभारात भाग घेत होता पण,  अधिकारपदाचा जोर पाठीशी नसल्याने त्याची एकप्रकारे घरात कुचंबणाच होत होती. पेशवे घराण्यातील हि अस्वस्थता ताराबाईने अचूक हेरली आणि तिने नाना - भाऊमध्ये फूट पाडण्याचा एक प्रयत्न केला. अर्थात, त्यास फारसे यश आले नाही पण भाऊच्या महत्त्वकांक्षेस पंख फुटून त्याने कोल्हापूरची पेशवाई स्वीकारण्याचा खटाटोप आरंभला. त्यामुळे गडबडून जाऊन नानासाहेबाने त्यास आपले मुख्य कारभारीपद देऊ केले. घरातील हे शह - प्रतिशहाचे राजकारण रघुनाथराव अगदी तटस्थपणे पाहत होते. मात्र अजून तरी त्याच्या मनात वैषम्य आलेलं नव्हतं. कारण, स. १७५२ पासून नानासाहेबाने त्यास लष्करी मोहिमांवर पाठवण्यास आरंभ केला होता. नानासाहेबाने दादा - भाऊ यांच्याबाबतीत आरंभापासूनच थोडासा दुजाभाव ठेवल्याचे दिसून येते. दादा प्रमाणेचं भाऊ देखील प्रसंगी लष्करी मोहिम पार पाडत असला तरी स्वारीच्या दरम्यान मर्यादित का होईना पण निर्णय घेण्याचे जे स्वातंत्र्य दादाला होते, ते पेशव्याने भाऊला कधीच दिले नाही. 
  गुजरात व उत्तर हिंदुस्थानात दादाची भरारी  :-  स. १७५३ मध्ये दमाजी गायकवाडाच्या मदतीने दादाने अहमदाबाद शहर मोगलांकडून जिंकून घेत आपल्या पहिल्या वहिल्या लष्करी विजयाची नोंद केली. याचे फळ म्हणून कि काय याच वर्षाच्या उत्तरार्धात दादाची रवानगी उत्तर हिंदुस्थानात करण्याचा नानासाहेबाने निर्णय घेतला. गंमतीची बाब अशी कि, दादापेक्षा चार उन्हाळे - पावसाळे अधिक पाहिलेल्या व दादापेक्षा १ - २ मोहिम अधिक पार पाडलेल्या भाऊला उत्तरेत पाठवण्याचा विचार नानासाहेबाच्या मनात आला नाही. असो, स. १७५३ च्या ऑगस्टमध्ये थालनेर येथून दादाची स्वारी उत्तर हिंदुस्थानच्या दिशेने रवाना झाली ती स. १७५५ च्या ऑगस्टमध्येच -- म्हणजे तब्बल दोन वर्षांनीच पुण्यास परतली. या स्वारीत कुंभेरीचे प्रकरण उद्भवून त्यात खंडेराव होळकराचा त्यात बळी जाऊन जाटांचे वैर मराठ्यांच्या पदरात पडले. त्याशिवाय शिंदे - होळकरात या घटनेमुळे असलेल्या द्वैतभावात भर पडली ती वेगळीचं ! या व्यतिरिक्त म्हणावे असे फारसे यश दादाच्या पदरी पडले नाही. परंतु, स. १७५३ ते ५५ या दोन वर्षांच्या अवधीत त्यास जे विविध अनुभव आले आणि जे काही स्वातंत्र्य त्यास मिळाले, त्यामुळे त्याच्या सुप्त राजकीय आकांक्षांना पंख फुटू लागले. यावेळी शिंदे - होळकर या आपल्या बलदंड सरदारांना नियंत्रणाखाली आणण्यासाठी नानासाहेबाने या दोन सरदारांमध्ये फूट पाडण्याचे धोरण अवलंबले होते. या धोरणानुसार उभय सरदारांमध्ये द्वैत माजवून व प्रसंगी त्यांस रगडून, त्यांच्याकडून सरकारकाम करवून घेण्याची पेशव्याने दादास आज्ञा केली होती. परंतु, दादाने पेशव्यांची आज्ञा काहीशी अर्धवट पद्धतीने अंमलात आणत, बलाढ्य होळकरासोबत -- विशेषतः होळकरांचा कारभारी गंगाधर चंद्रचूड याच्याशी -- त्याने मैत्रीचे संबंध जोडले. दादाच्या या कृत्यामागील कारणपरंपरा उघड होती. पेशव्याचे कारभारीपद सदशिवाकडे म्हणजे, चुलतभावाकडे होते आणि पेशव्याचा सख्खा भाऊ मात्र एक लष्करी सरदार या नात्याने पेशव्याचा ताबेदार बनून राहिला होता. दादाच्या या विचारांना गायकवाड, होळकर या पेशव्याकडून दुखावलेल्या सरदारांनी व बापूसारख्या दादाच्या हितचिंतकांनी प्रोत्साहन दिलेचं नसेल असे म्हणता येत नाही.          
              रघुनाथरावाचा मुख्य स्वभाव देखील याच काळात सर्वांच्या दृष्टीस पडला. तो पराक्रमी, धाडसी, महत्त्वकांक्षी असला तरी प्रसंगी खंबीरपणे निर्णय घेणे व घेतलेल्या निर्णयांना घट्टपणे चिटकून राहणे त्याच्या कुवतीबाहेरचे होते. त्याखेरीज तो बुद्धीपेक्षा मनातील विचारांना - भावनांना अधिक किंमत देत असे. त्यामुळे त्याचा स्वभाव हा चंचल बनून राहिला. त्याच्या या स्वभावातचं त्याच्या पुढील आयुष्यातील भानगडींचे मूळ आहे आणि त्याचा  हाच स्वभाव त्याच्या मुलांमध्ये, बाजीराव - चिमाजी यांच्यात पुरेपूर उतरल्याचे दिसून येते. राहता राहिले वचनभंग, धरसोडपणा इ. दुर्गुण तर त्यांचा उगम त्याच्या स्वभावात नसून वडीलबंधू नानासाहेब पेशव्याच्या वर्तनात आहे. प्रसंग पडताच आपल्या धन्याचा खजिना त्याच्या परवानगीवाचून जप्त करणे, अभयवचन देऊन आपल्याच सरदाराचा गोट लुटणे, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी प्रसंगी राज्यहिताला तिलांजली देणे इ. सद्गुणपूर्वक वर्तनांचा जो आदर्श नानासाहेबाने आपल्या धाकट्या भावासमोर ठेवला होता त्याच मार्गाने दादाने आपली वाटचाल सुरु केली होती. 
                  गायकवाड किंवा होळकर हे आपणांस चढवून स्वतःचा स्वार्थ साधत असल्याचे दादास माहिती नव्हते अशातला भाग नव्हता, पण मानसी काहीतरी एक योजूनचं त्याने आपला वर्तनक्रम निश्चित केला होता. असो, स. १७५६ मध्ये विजयदुर्गाचा प्रसंग उद्भवून तुळाजी आंगऱ्याच्या आरमाराचा व सरदारकीचा निकाल लागला. त्यानंतर विजयदुर्गच्या हस्तांतरणावरून पेशवे - इंग्रज यांच्यात पत्रोपत्री मोठे युद्ध झाले. त्यावेळी इंग्रज वकील स्पेन्सर हा स. १७५६ च्या ऑक्टोबरमध्ये पुण्यास येऊन पेशवेबंधूंना भेटला. या भेटीमध्ये दादाने आपल्या नियोजित दिल्ली स्वारीकरता इंग्रजांकडून सैन्य व तोफखान्याच्या मदतीची मागणी केली. परंतु इंग्रज वकिलाने गोड शब्दांत या मागणीस नकार दिला. तसे पाहता हि क्षुल्लक बाब आहे. पण, मला काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे अभ्यासू वाचकांचे लक्ष वेधायचं आहे.  स. १७५६ मध्ये इंग्रजांची शक्ती खरोखर इतकी वाढली होती कि, त्यांची मदत असल्याशिवाय आपली दिल्ली स्वारी सहजासहजी यशस्वी होणार नाही असाच दादाचा आणि पेशव्याचा देखील समज होता. कारण, या चर्चेच्या प्रसंगी पेशवा तिथे हजर होता आणि त्याने इंग्रजांकडे मदतीची मागणी करण्यापासून दादाला रोखले नाही. याचा अर्थ असा होतो कि दादाला त्याचा पाठिंबा तर होता. म्हणजेचं मराठी राजकारणात इंग्रजांची हस्तक्षेप करण्याची इच्छा असो वा नसो पण पेशवेबंधू मात्र त्यांना घरात घेण्यास अगदीच आतुर झाले होते. 
   अटक स्वारी :- स. १७४८ पासून दिल्लीच्या राजकारणात अफगाण सत्ताधीश अहमदशहा अब्दालीने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली होती. राज्यविस्तारासाठी त्याला मोगल राजवटीत मोडणारे पंजाब व सिंध हे दोन प्रांत हवे होते आणि स. १७५२ च्या बादशाही संरक्षण करारानुसार मोगल बादशहाने याच दोन प्रांतांमधून चौथाई वसुलीचे हक्क मराठ्यांना दिले होते. परिणामी मराठे व अब्दाली यांचा सामना जुंपणे अपरिहार्य असेच होते. स. १७५६ च्या उत्तरार्धात अब्दाली दिल्लीच्या रोखाने येत असल्याच्या बातम्या समजल्यामुळे नानासाहेबाने नोव्हेंबर महिन्यात रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर यांना उत्तरेत पाठवले असे सामान्यतः मानले जाते. परंतु, दादाच्या पहिल्या उत्तर स्वारीत अपुरा राहिलेला कार्यभाग पुरा करण्यासाठी त्यास उत्तरेत पाठवण्याचा पेशव्याचा निर्णय आधीच ठरलेला होता हे मात्र सांगितले जात नाही. असो, दादा व मल्हारराव होळकर यांना उत्तरेत रवाना करून स्वतः पेशवा कर्नाटक प्रांती मोहिमेस निघून गेला. सुमारे पंधरा हजार सैन्य सोबत घेऊन दादा १४ फेब्रुवारी १७५७ रोजी इंदूरला पोहोचला. तोपर्यंत अब्दालीने दिल्लीची पुरती वाट लावून टाकली होती. परंतु मल्हाररावास यावेळी अफगाण प्रकरणात हस्तक्षेप करण्याची इच्छा नसल्याने त्याने दादाला दिल्लीचा रोख सोडून राजपुतान्यात जाण्याचा सल्ला दिला व दादाने तो अंमलात देखील आणला. दादा व होळकराच्या या बेजबाबदार वर्तनाबद्दल सर्वच इतिहासकारांनी त्यांना सडकून दोष दिला आहे. पण दुर्देवाची बाब म्हणजे त्यांना तत्कालीन राजकारणाचे मर्म न समजल्याने त्यांनी स्वतःच्या मूर्खपणाचे तेवढे जाहीर प्रदर्शन घडवून आणे आहे व मराठी इतिहास अभ्यासकांनी देखील आपल्या बुद्धीस कष्ट न देता मान्यवर इतिहासकारांनी लिहिलेला इतिहास प्रमाण मानून स्वस्थ बसण्यात धन्यता मानली. 
                   वास्तविक अब्दालीच्या दिल्ली स्वारी प्रसंगी त्याच्याशी उघड सामना करण्याचे टाळून दादा व मल्हाररावाने कित्येक महत्त्वाच्या गोष्टी साध्य केल्या याकडे आमच्या इतिहासकारांचे आजवर साफ दुर्लक्षचं झालेलं आहे. प्रथम आपण दादा व होळकराने दिल्लीला न जाण्याचा निर्णय का घेतला हे आधी पाहू :- (१) दादासोबत यावेळी फक्त पंधरा हजार फौज असून होळकराचे देखील जवळपास तेवढेच सैन्य असावे. इतक्या अल्प फौजफाट्याच्या बळावर अब्दालीचा सामना करणे यावेळी शक्य नव्हते. (२) तत्कालीन प्रघातानुसार स्वारीचा खर्च परस्पर बाहेर भागवायचा असल्याने फौज पोसण्यासाठी मार्गातील मांडलिक संस्थानिकांकडून खंडण्या वसूल करतचं पुढे जायचे होते आणि पेशव्यांचे मांडलिक असलेले संस्थानिक, लष्करी बळाचा वापर केल्याशिवाय खंडण्या देत नसत. (३) अब्दालीच्या आक्रमणाचे नेमके कसे पडसाद उमटतात, त्यावर हिंदुस्थानातील सत्ताधीशांची -- विशेषतः मुस्लिम उमरावांची -- काय प्रतिक्रिया व्यक्त होते याचा अजून अंदाज येत नव्हता. (४) प्रत्यक्ष दिल्ली दरबारातून अब्दालीला कितपत पाठिंबा आहे व तेथे त्याचे नेमके किती हस्तक कार्यरत आहेत याचाही अजून अंदाज आलेला नव्हता. (५) दादा व होळकर फेब्रुवारीत इंदूर मुक्कामी होते तेव्हा जवळचं मथुरेस जाट आणि अब्दालीचा झगडा जुंपला होता. अशा वेळी दादा - होळकर पुढे चालून आले असते तर जाटाच्या मदतीने अब्दालीचा काटा त्यांना काढता आला असता असे मानले जाते. परंतु, दादाच्या मागील स्वारीमध्ये मराठ्यांनी जाटांचे पुरेपूर वैर पदरात पाडून घेतले असल्याने जाटावर होळकराचा अजिबात विश्वास नव्हता. आयत्यावेळी जाटाने आपल्याला फशी पाडले तर …? हि भीती त्याच्या मनात सदैव होती. असो, इ. कारणांमुळे दादा - होळकर अब्दालीच्या सामन्यास समोर गेले नाहीत. 
              आता या दोघांनी अब्दालीसोबत लढा टाळून नेमके काय साध्य केले ते पाहू :- (१) स. १७५२ च्या बादशाही संरक्षण करारानुसार मराठ्यांना पंजाब व सिंध प्रांतांची चौथाई मिळाली होती, पण त्यातचं अब्दालीचा पाय शिरल्याने निव्वळ चौथाई वसुलीसाठी अफगाणांवर शस्त्र उपसण्याचा प्रसंग उद्भवला. (२) मोगल बादशहाने जरी रोहिले, अफगाण, राजपूत, जाट इ. देशी - विदेशी शत्रूंपासून आपले व आपल्या बादशाहीच्या बचावासाठी मराठ्यांच्या फौजा घरात घेतल्या असल्या तरी मराठ्यांची मान कापण्यास तो प्रसंगी मागे - पुढे पाहणार नाही याची होळकरास पूर्णतः खात्री होती. तेव्हा जोवर मोगल बादशहा अगतिक होऊन मदतीसाठी विनवणी करत नाही तोवर दिल्लीच्या राजकारणात फारसे मन न घालण्याचे त्याने धोरण आखले. पुढील काळात मल्हाररावाचा पट्टशिष्य महादजी शिंदे, याने देखील याच धोरणाचा पुरस्कार केल्याचे दिसून येते. (३) अब्दालीने दिल्लीत लुट व कत्तलीचे थैमान घातल्यावर मराठी फौजा दिल्लीत दाखल झाल्या, त्यावेळी अब्दालीच्या अत्याचारांनी टेकीस आलेल्या मोगल बादशहाने पंजाब व सिंध प्रांतांची निम्मी मालकी मराठ्यांना देऊन अब्दालीचा बंदोबस्त करण्याची गळ घातली. (४) जाट व अब्दालीचा झगडा जुंपला असला तरी ते दोघेही मराठ्यांचे वैरी होते. स. १७५२ च्या बादशाही संरक्षण करारानुसार आगऱ्याचा सुभा होळकरास मिळाला असून त्यातचं जाटांची बलवान राजवट उदयास आली होती. अशा परिस्थितीत जाट व अब्दाली हे दोघेही आपले प्रबळ शत्रू असल्याने ते जर आपापसांत लढून दुर्बल होत आहेत तर ती मल्हाररावाच्या दृष्टीने इष्टापत्तीच होती. जाट पराभूत झाला तर आगऱ्यावर पकड बसवण्यास होळकरास फार कष्ट पडणार नव्हते आणि अब्दालीचा जर परस्पर काटा निघाला तर पंजाबात फिरून येण्याचे त्यास सामर्थ्य राहणार नव्हते. असा व्यवहारी विचार मल्हाररावाने केला असल्यास नवल नाही. (५) अब्दालीच्या स्वारीत सर्वचं संस्थानिक भरडून निघाल्ये पुढे अटक स्वारीत मराठ्यांना अभूतपूर्व असे यश प्राप्त झाले. कारण, त्या स्वारीत रोहिले, शीख, मोगल या मराठेशाहीच्या शत्रुंनीच अब्दालीच्या विरोधात मराठ्यांना मदत केली हे विसरता येत नाही. 
                        असो, स. १७५७ च्या मे महिन्यात राजपुताना पालथा घालून दादा आगऱ्यास आला. तेव्हा जाट राजाने आपणहून मागील वर्षीची थकलेली खंडणी भरण्याचे मान्य करून त्याच्याशी सख्य जोडले. मोगल बादशहाने देखील आपल्या वजीरामार्फत दादाच्या सोबत बोलणी सुरु केली. परंतु, दिल्ली अजूनही अब्दालीचा पक्षपाती रोहिला सरदार नजीबखान, याच्या ताब्यात असल्याने दादाने या वाटाघाटींना दाद न देत दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला. तसेच लष्कराची एक तुकडी अंतर्वेदीतील नजीबच्या ताब्यातील प्रदेश जिंकण्यास पाठवून दिली. दादासाहेबाच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्य दिल्लीकडे निघाले असताना पेशव्याची आज्ञा आली की, दौलतीला झालेलं कर्ज वारण्यासाठी बिहार - बंगाल प्रांती मोहीम काढून द्रव्याची पैदास करावी. मात्र पेशव्याची हि सूचना / आज्ञा प्रस्तुत प्रसंगी अंमलात आणणे अव्यवहार्य असल्याने दादाने ती मानली नाही. पुढे, सप्टेंबर महिन्यात दादाच्या वतीने विठ्ठल शिवदेव विंचूरकराने दिल्ली जिंकून घेतली आणि नजीबला कैद केले. या पराक्रमाबद्दल मोगल बादशहाने त्यास बक्षीसादाखल जहागीर देऊन त्याचा गौरव केला. इकडे नजीब कैद झाल्यावर त्यास मारून टाकावे वा कैदेत ठेवावे असे सर्वांचेच मत पडले. पेशव्याचीही तशाच आशयाची आज्ञा होती. परंतु या सर्वांच्या विरुद्ध होळकराचे मत पडून त्याने नजीबला मोकळे करण्याची दादाकडे विनंती केली. त्यानुसार दादाने नजीबला जीवनदान देत त्यास त्याच्या जहागिरीत परतण्याची परवानगी दिली. दादा - होळकर यांच्या या मूर्ख निर्णयाबद्दल त्यांची सर्वचं इतिहासकारांनी निर्भत्सना केली आहे. परंतु, नजीबखान हा काही एकटाच अब्दालीचा हस्तक नव्हता हे सर्वजण विसरतात. राजपूत, मोगल परिवार, रोहिले - अफगाण सरदार, मोगल वजीर गाजीउद्दिन हे सर्व अब्दालीचेच तर हस्तक होते. गळे कापायचे तरी कोणा कोणाचे आणि कैदेत टाकायचे तरी कोणा कोणाला ? तसेच नजीबला नाहीसा करून गाजिउद्दिनला मोकळे रान मिळू देण्यास होळकर तयार नव्हता. याच धोरणाचा अवलंब पानिपत नंतर अब्दालीने देखील केल्याचे दिसून येते. असो, तात्पर्य काय, तर नजीबला जीवदान देऊन दादा - मल्हाररावाने फार मोठी राजकीय चूक केली असे म्हणता येत नाही. 
                            दिल्ली ताब्यात आल्यावर दादाने मोगल बादशहाकडे लष्कराच्या खर्चासाठी पैशाची मागणी केली. पण शक्य असूनही अब्दालीचा सामना न केल्याच्या कारणावरून गाजिउद्दिनने दादास पैसे देण्याचे नाकारले. तेव्हा दोन्ही पक्षांमध्ये काही काळ खटके उडाले. त्यानंतर गाजिउद्दिनने आपली पडती बाजू लक्षात घेऊन दादासोबत नव्याने करार करून त्यास पंजाब व सिंधच्या चौथाई ऐवजी प्रांताची निम्मी वाटणी देऊन टाकली. त्याबदल्यात अब्दालीचा बंदोबस्त करण्याचे दादाने मान्य केले. आणि विशेष म्हणजे दादाच्या स्वारीचा सर्व खर्च देण्याचे मोगल वजीराने कबूल केले. त्याखेरीज या मोहिमेत मोगल सरदार देखील आपापल्या सैन्यदलांसह सहभागी होणार होते ते वेगळेचं ! असो, करारानुसार मराठी फौजा पंजाबात रवाना झाल्या. दादाची दिल्लीकडे पाठ वळताच नजीबचे उपद्व्याप परत सुरु झाले पण सध्या त्याच्याकडे लक्ष देण्यास मराठी सरदारांना फुरसत नव्हती. लाहोरात अब्दालीपुत्र तैमुरच्या नेतृत्वाखाली तळ ठोकून बसलेल्या अफगाण सैन्याला पिटाळून लावणे हे त्यांचे सध्या तरी प्रमुख लक्ष्य होते. शीख व मोगल अंमलदार आदिनाबेगच्या मदतीने , तसेच स्थानिक लहान - मोठ्या जमीनदारांच्या साथीने मराठी सैन्याने तैमुरचा पराभव करून त्यास चिनाबपार पळवून लावले. मराठी सैन्याच्या पराक्रमाने भारावून गेलेल्या आदिनाबेगने  दादासाहेबांची स्वारी जेव्हा लाहोरात दाखल झाली तेव्हा त्यांच्या मुक्कामाची सोय मोगल बादशहाच्या वाड्यात केली. इतकेच नव्हे तर या विजयाप्रीत्यर्थ एक लक्ष रुपये खर्चून प्रचंड दीपोत्सव केला. मराठ्यांच्या शौर्याने केवळ मोगलचं भारावून गेले असे नाही, तर इराणी बादशहाने देखील यावेळी अब्दालीच्या विरोधात मराठ्यांची मदत मागितली. इतकेचं नव्हे तर खुद्द अब्दालीचा पुतण्या, अफगाण पातशाही प्राप्त करून घेण्यासाठी मराठ्यांच्या आश्रयास धावला. दादासाहेबाचे हे यश इतके भव्यदिव्य होते कि, एक नजीबखानाचा व काही राजपूत राजांचा अपवाद केल्यास उत्तर हिंदुस्थानातील बव्हंशी हिंदू - मुस्लिम संस्थानिक अब्दालीच्या विरोधात लढण्यासाठी मराठ्यांना मदत करण्यास तयार झाले होते. तशा आशयाची पत्रे त्यांनी दादाला पाठवून त्यास पंजाबातच तळ ठोकून राहण्याची त्यांनी विनंती देखील केली होती. परंतु, पेशव्याच्या आज्ञेवरून परत फिरणे दादाला भाग पडून अब्दालीच्या बंदोबस्ताची हि एक संधी यावेळी हुकली. मात्र, पंजाब ते दिल्ली या मार्गात त्याने ठिकठिकाणी मजबूत लष्करी पथके पेरून पंजाबचा बंदोबस्त उत्तम केला. त्याशिवाय पंजाबचा कारभार हाती घेण्यासाठी पेशव्याने शिंद्यांना उत्तरेत रवाना केले होतेच. त्यामुळे दादासाहेबाने तिथे थांबलेच पाहिजे असे काही नव्हते. इराणी आक्रमण, पुतण्याचे व जमीनदारांचे बंड यांमुळे अब्दाली व्यापलेला असल्याने नजीकच्या काळात तरी त्याच्या आक्रमणाची शक्यता दिसत नसल्याने मल्हारराव होळकर देखील पंजाबात थांबला नाही. 
          उदगीर मोहीम आणि भाऊची उत्तरेत रवानगी :-   दादाची स्वारी पुण्याच्या वाटेला लागली तेव्हा रस्त्यात त्याची शिंदे मंडळीं सोबत भेट झाली. नजीबला जीवनदान देऊन त्यास सुधारण्याची एक संधी दादाने दिलेली होती. पण त्याने आपले पूर्वीचेच रंगढंग सुरु केल्याने दादाने शिंद्यांना, नजीबचा बंदोबस्त करण्याची आज्ञा केली.  ता. १६ सप्टेंबर १७५८ मध्ये दादा अटक स्वारीचे यश पदरी पाडून पुण्यास परतला खरा, पण त्याच्या या यशाने पेशवे कुटुंबातील राजकारणास निराळाच रंग चढला. अलीकडे नानासाहेब पेशवा हा पडद्यामागून राजकारणाची सर्व सूत्रे चालवीत होता. त्याउलट कारभारी व सेनापती म्हणून अनुक्रमे सदोबा व राघोबा हे दोघे ;  जनता, परराष्ट्र दरबार, लष्कर यांच्यासमोर वारंवार नाचत होते. नानासाहेब पेशव्याच्या दृष्टीने नसली तरी त्याची पत्नी - गोपिकाबाईच्या दृष्टीने हि परिस्थिती चिंताजनक अशीच होती. सदाशिव व रघुनाथ यांचे महत्त्वाकांक्षी स्वभाव तिच्या चांगलेच परिचयाचे असल्याने तिला आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी पडणे स्वाभाविक होते. हल्ली जरी विश्वासराव हा राजकारण, मोहिम यांमध्ये सहभाग घेत असला तरी त्याचे स्वतंत्र कर्तुत्व अजून झळकायचे होते. त्याउलट दादा - भाऊंचे सरदारांवर असलेले वजन ती ओळखून होती. त्यामुळे भविष्यात काही बरा - वाईट प्रसंग उद्भवल्यास दादा वा भाऊ, या दोघांपैकी कोणीही सत्ता हाती घेऊन आपल्या मुलांना देशोधडीला लावेल ही भीती तिच्या पोटात होती. नानासाहेब पेशव्याला देखील हल्ली दादा - होळकर यांच्या वाढत्या मैत्रीचे संकट वाटू लागले होते. त्यामुळे पुढे - मागे उत्तरेत लष्कर पाठवायचे झाल्यास विश्वासरावासचं मोहिमेचा प्रमुख सेनापती म्हणून नेमायचे त्याने नक्की केले.
                     इकडे पंजाब, नजीब यांचा बंदोबस्त करून बंगालमध्ये जाण्याची आज्ञा घेऊन उत्तरेत गेलेल्या शिंद्यांच्या हातून कोणताच कार्यभाग पुरा होण्याची चिन्हे दिसेनात. पंजाबात होळकराचा पाय शिरल्याने त्यांना तिथे थांबायचे नव्हते. नजीबचा बंदोबस्त करण्याची खाशांची आज्ञा असूनदेखील नजीबच्या मदतीने बंगाल स्वारी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. परंतु त्यांची मजल गंगेपर्यंतच जाउन त्यांना हरिद्वारला तळ ठोकून बसावे लागले. नजीबने आपल्या भूलथापांनी शिंद्यांना गंगा किनारी रोखून त्यांच्याविरोधात गंगा - यमुनेच्या दुआबातील सत्ताधीशांचा संघ उभारला. या बातम्या दक्षिणेत पोचताच पेशव्याने परत एकदा दादाला उत्तरेत पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र याच वेळी निजामाचे प्रकरण वर्दळीवर येउन उदगीरची मोहीम उद्भवली. स. १७५९ च्या ऑक्टोबर पासून दि. ११ फेब्रुवारी १७६० पर्यंत हि मोहीम चालून त्यात रघुनाथरावाच्य पराक्रमामुळे पेशव्यांना विजय प्राप्त झाला. उदगीरच्या विजयाचा फायदा घेऊन कर्नाटकातून निजामाला पूर्णतः उखडून काढण्याचा पेशवेबंधूंचा मानस असतानाच उत्तरेत अफगाण फौजांकडून शिंद्यांचा मोठा पराभव झाल्याचे आणि दत्ताजी शिंदे मारला गेल्याचे वृत्त आल्याने पेशवा गडबडून गेला. दत्ताजी मारला गेल्यामुळे उत्तरेत अब्दालीचा प्रभाव वाढला होता. तेव्हा अब्दालीच्या सामन्यासाठी कोणाला पाठवावे हा त्याच्यासमोर प्रश्न पडला. वस्तुतः उत्तरेच्या स्वारीवर दादाचीच रवानगी होणार होती हे मागे सांगितले आहेचं. पण, तेव्हाची परिस्थिती निराळी होती.  त्यावेळी दत्ताजी शिंदे हयात होता. आता दत्ताजी जिवंत नाही याचा अर्थ होळकरांचे वर्चस्व वाढून शिंदे मागे पडले आणि दादा - होळकरांची मैत्री तर जगजाहीर होती. अशा परिस्थितीत दादाला उत्तरेत न पाठवता त्याच्या ऐवजी भाऊला पाठवण्याचे पेशव्याने ठरवले. त्यानुसार भाऊची उत्तर हिंदुस्थानात रवानगी करण्यात आली आणि आधी निश्चित केल्यानुसार विश्वासरावास या मोहिमेचा मुख्य सेनापती म्हणून सोबत पाठवण्यात आले. भाऊच्या गैरहजेरीत पेशव्याचे मुख्य कारभारीपद सांभाळण्याची जबाबदारी दादावर सोपवण्यात आली खरी ; मात्र स्वाऱ्या - शिकाऱ्या, नाटकशाळा, देवपूजा यांत रमणाऱ्या दादासाहेबाला फडावरला बैठा कारभार फारसा मानवला नाही. त्यामुळे त्याचा दुय्यम सखारामबापू याचे कारभारात महत्त्व वाढले. 
                 नानासाहेब पेशव्याचा मृत्यू :- भाऊ उत्तरेत गेल्यावर उदगीरच्या तहात निजामाने जो मुलुख पेशव्यांना देण्याचे मान्य केले होते त्यावर ताबा बसवण्याचे काम पेशव्याच्या आज्ञेनुसार दादाने हाती घेतले. कर्नाटकात यावेळी पेशव्याच्या वतीने पटवर्धन मंडळी खपत होती. स. १७६० च्या उत्तरार्धात स्वतः पेशवा या कामासाठी डेरेदाखल झाला. पण नोव्हेंबर नंतर भाऊची पत्रे यायची बंद झाल्याने चिंताग्रस्त होऊन तो उत्तरेकडे जाऊ लागला आणि उदगीरच्या तहात ठरल्यानुसार निजामाला आपल्या मदतीला आणण्याची जबाबदारी त्याने दादावर सोपवली. पेशव्यांबरोबर केलेला कोणताच तह अक्षरशः अंमलात आणण्याबद्दल निजामाची ख्याती नव्हतीचं. त्यामुळे दादासोबत उत्तरेत जाण्यास त्याने मुद्दाम टाळाटाळ करणे स्वाभाविक होते. बोलावल्याप्रमाणे निजाम त्वरेने मदतीला येत नाही हे पाहून पेशवा संतापला आणि त्याने दादाला आज्ञा केली कि, निजामाला कैद वा ठार करावे. परंतु, प्राप्त परिस्थितीत पेशव्याची आज्ञा अंमलात आणणे शक्य नसल्याने दादाने गोड बोलून पेशव्याची समजूत काढली. इकडे निजामानेही जास्त ताणून न धरता दादासोबत उत्तरेत जाण्यास आरंभ केल्याने पेशव्याचा कोप शांत झाला खरा, पण लवकरच त्यास आपल्या फौजांचा पानिपतावर सडकून पराभव झाल्याचे आणि पुत्र विश्वासराव युद्धात पडल्याचे वृत्त समजले. त्यामुळे उत्तरेत जाण्याची त्याची उमेद खचून पछोर येथे त्याने काही काळ मुक्काम ठोकला. पानिपतचे वर्तमान समजल्याने निजामाने आपले खरे स्वरूप प्रकट केले आणि उदगीरच्या तहाविरुद्ध वागण्यास आरंभ केला. पुणे दरबारची यावेळची हलाखी लक्षात घेऊन सखारामबापूने निजामासोबत समेटाचे धोरण अवलंबले पण पटवर्धन मंडळींना बापूचा हा उपक्रम पसंत पडला नाही. अजूनही त्यांचा व निजामाच्या सरदारांचा संघर्ष सुरूच होता. पानिपतावर अनेक अनुभवी सरदार व विश्वासराव मारले गेल्यामुळे आणि सदाशिवराव गायब झाल्याने पेशव्याच्या अनुपस्थितीत पुण्यास जाणे दादाला आवश्यक वाटून त्याने निजामाकडे साफ दुर्लक्ष करून पुण्याची वाट धरली. यामुळे पटवर्धन मंडळी निजामाच्या कचाट्यात सापडली खरी, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये दादासमोर तरी दुसरा कोणता पर्याय होता ? इकडे पछोरचा मुक्काम आवरून पेशव्यानेही पुण्याचा रस्ता धरला होता. सर्वांचे लक्ष आता पुणे दरबारकडे लागून राहिले होते. मात्र प्रकृती खालावल्याने ता. २३ जून १७६१ रोजी नानासाहेब पेशव्याचा मृत्यू झाला आणि पुणे दरबारात राजकारणापेक्षा घरगुती कारस्थानांना जोर चढला. 
                                                                                         ( क्रमशः )                                     

1 टिप्पणी:

Tribhuwan Prashant म्हणाले...

Khupch chan
Bhag don chi link pathva plz


Ani he share karu shakto ka?