गुरुवार, २० जून, २०१३

पेशवे - इंग्रज यांची आंग्रेविरुद्ध मोहीम ( भाग - २ )

                                        ( उत्तरार्ध ) 
             हिंदी महासागरातील तिन्ही युरोपियन राष्ट्रांस ( इंग्रजी, फिरंगी व डच ) पराक्रमाच्या कामात आंगऱ्यांनी खाली पाहण्यास लावले आणि कोणालाही त्यांची बरोबरी करता आली नाही. ---  डग्लस               
      तुळाजी आंग्रेविरुद्ध इंग्रज - पेशवा यांची युती बनण्यास स. १७५४ चे साल उगवावे लागले. पेशव्याच्या तर्फेने कोकण सुभ्यावर नेमलेला सरसुभेदार रामाजी महादेव बिवलरकर याने पेशवा व इंग्रज यांच्यात तह घडवून आणण्याचे कार्य पार पाडले. रामाजीचे व तुळाजीचे कार्यक्षेत्र एकच असल्याने त्यांचे आपसांत शत्रुत्व असणे स्वाभाविकच होते. त्यातच पेशवे जरी वरवर मानाजी आंगऱ्यास पाठीशी घालत असले तरी आतून त्याचेही सामर्थ्य खच्ची करण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच होता. पेशव्यांचा नोकर या नात्याने रामाजीला हे कार्य पार पाडणे भागचं होते. त्यामुळे प्रसंगी मानाजी विरोधी देखील त्यास कारस्थाने करावी लागत. सातार दरबारात शाहूच्या निधनाने बराच गोंधळ माजला होता. त्यामुळे कोकणची सर्व जबाबदारी पेशव्याने रामाजी महादेव वर सोपवली. तेव्हा त्याने पुढाकार घेऊन ता. १९ मार्च १७५५ रोजी मुंबईचा इंग्रज गव्हर्नर रिचर्ड बूर्शियर याच्याशी पेशव्याच्या तर्फेने व संमतीने तह केला. त्यातील प्रमुख अटी पुढीलप्रमाणे : - (१) सर्व आरमार इंग्रजांच्या ताब्यांत असावे, परंतु कारभार उभयतांच्या संमतीने व्हावा. (२) तुळाजी आंगऱ्याकडून जी जहाजे काबीज करण्यात येतील ती इंग्रज - मराठ्यांनी निमेनिम वाटून घ्यावी. (३) बाणकोट व हिंमतगड आणि नदीच्या दक्षिण काठावरील पाच गावे मराठ्यांनी इंग्रजांस कायमची द्यावी. (४) पश्चिम किनाऱ्यावरून आंगऱ्यांनी कोणत्याही किल्यास समुद्रातून मदत पोचवू नये असा बंदोबस्त इंग्रजांनी ठेवावा. (५) आंगऱ्यांच्या किल्ल्यांत जे द्रव्य, सामान, दारुगोळा, तोफा वगैरे सापडेल ते सर्व मराठ्यांस देण्यांत यावे. (६) मानाजीच्या मुलखावर उभयतांनी हल्ला केल्यास खांदेरी बेट, बंदर व कित्येक गांवे इंग्रजांस द्यावी. (७) जरुरीप्रमाणे जास्त कलमे नानासाहेबांच्या संमतीने ठरविण्यांत यावी. ( संदर्भ - मराठी रियासत खंड - ४ )      
        तहातील कलमे काळजीपूर्वक पाहिली असता असे लक्षात येते कि, हा तह पेशव्याच्या दृष्टीने मुळीच फायद्याचा नव्हता. छत्रपती शिवाजी महराजांनी मोक्याची स्थळी उभारलेले सागरी किल्ले आता आंगऱ्यांच्या ताब्यात होते व त्यावर कब्जा मिळवण्याची सुमारे पाउण शतकाची इंग्रजांची इच्छा आता पूर्ण होण्याचा योग जुळून आला होता. त्यामानाने पेशव्यांच्या पदरी काय पडणार होते ? आंगऱ्यांची काही जहाजे ; त्यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांमधील द्रव्य, तोफा, दारुगोळा वगैरे सामान इतकेचं ! हा तह घडून आला त्यावेळी पेशवा दूर कर्नाटकात होता. हि बाब एकप्रकारे इंग्रजांच्या पथ्यावरच पडली !, कारण मोहिमेच्या प्रसंगी काही भानगड उपस्थित झाल्यास त्याचा पेशव्याकडून त्वरित निकाल येणे समजतच होते. असो रामाजी महादेवने इंग्रजांच्यासोबत तह करण्यापूर्वी प्रथम मानाजीला आपल्या पक्षात वळवून घेतले. तुळाजीच्या विरोधात पेशवे - इंग्रज एकत्र येऊन युद्ध पुकारणार असल्याची त्याला कल्पना दिली. मात्र तुळाजीच्या ताब्यात असलेला सुवर्णदुर्ग जिंकून घेण्यासाठी पेशव्यांना मदत करण्याचे मानाजीने कबूल करून पुढील मोहिमेत सहभाग घेण्याचे साफ नाकारले. 
                        माझ्या मते, मानाजीने हि एक मोठीच चूक केली. एकतर त्याने या मोहिमेत पूर्णतः सहभाग घ्यायला हवा होता किंवा सरळ त्याने तुळाजीची बाजू उचलायला हवी होती अथवा तटस्थ राहण्याचा देखील पर्याय त्याच्यासमोर होता. जर त्याने त्यावेळच्या प्रघातास अनुसरून या मोहिमेत सहभाग घेतला असता तर युद्धानंतरचा नफा तिघांत वाटला गेला असता. तसेच त्याला आपले बळ वाढवता आले असते. जर त्याने तुळाजीला मदत केली असती तरी चालण्यासारखे होते पण, या भावाभावांचे आपसांत इतके फाटले होते कि अशा प्रसंगी त्यांचे एकत्र येणे शक्य नव्हते. तटस्थ राहून देखील मानाजीचा बराच फायदा झाला असता. पण त्याने सुवर्णदुर्ग जिंकण्यास पेशवे - इंग्रजांना मदत करून तुळाजीचा घात तर केलाच पण पर्यायाने स्वतःच्या पायावर देखील एकप्रकारे कुऱ्हाड मारून घेतली ! 
               कोकणात रामाजीच्या मदतीला जावजी गौळी / गवळी व खंडोजी माणकर हे दोन सरदार होतेच पण रामाजी महादेवच्या हालचालींना जोर यावा म्हणून पेशव्याने समशेरबहाद्दर व दिनकर महादेव यांना कोकणात रवाना केले. पोर्तुगीजांकडे वकील पाठवून ते तुळाजीची मदत करणार नाहीत याचा बंदोबस्त केला. पेशवा - इंग्रज करार होताच विल्यम जेम्सच्या नेतृत्वाखाली ता. २२ मार्च १७५५ रोजी इंग्लिश आरमार सुवर्णदुर्गाकडे झेपावले. जोडीला पेशव्यांचा आरमार प्रमुख नानापंत / नारोपंत हा आपल्या नौदलासह होता. त्याशिवाय जमिनीवरून समशेरबहाद्दर व दिनकर महादेव या आरमाराच्या साथीने सुवर्णदुर्ग जवळ करत होते. मार्गातील आंगऱ्यांच्या जहाजांना तडाखे देत पेशवे - इंग्रज यांचे संयुक्त नाविकदल २ एप्रिल रोजी सुवर्णदुर्गावर चाल करून गेले. सुवर्णदुर्गाच्या लढाईचा ब्रिटीश आरमार प्रमुखाने लिहिलेला वृत्तांत पुढीलप्रमाणे :- " …. ….  ता. २ एप्रिल रोजी मी सुवर्णदुर्गावर मारा सुरु केला. पेशव्यांची जहाजे निलाजरेपणाने आमची मजा पाहत उभी राहिली. कितीदां सांगितले तरी ती पुढे येऊन आम्हांस मदत करीनात. तेव्हा त्यांच्या मदतीची आशा सोडून मी एकट्यानेच हल्ल्याचे काम चालू केले. रात्री वादळ सुरु झाले, म्हणून आम्ही जर बंदराच्या बाहेर आलो असतां रामाजीपंताने मजकडे येऊन अशी बातमी सांगितली, कीं किल्ल्याचा किल्लेदार व आठ माणसे ठार झाली असून आतां तीनशेपेक्षा जास्त लोक किल्ल्यांत नाहीत. मी उत्तर दिले, असे आहे तर एक हजार लोक मजबरोबर द्या ; म्हणजे गलबतांवरील तोफांच्या आश्रयाने मी ते लोक घेऊन जमिनीवर उतरतो आणि एकदम हल्ला करून किल्ला काबीज करतो. हा बेत रामाजीपंतास पसंत पडला नाही. हाताखालचे लोक त्याचा हुकुम पाळतात, असे मला वाटत नाही. सर्व लोक त्यास हरएक बाबतीत अडवीत असावेत असे दिसले. एकंदर युद्धात पेशव्यांच्या आरमाराने पन्नास सुद्धां गोळे टाकले नसतील. माझ्या मदतनिसाची अशी परिस्थिती असल्यामुळे हाताशी आलेले काम टाकून यावे हे मला योग्य दिसेना, तेव्हां मी एकट्यानेच पुढे उद्योग चालवून ३ तारखेला आम्ही आपली जहाजे किल्ल्याच्या अगदी जवळ आणिली. किल्ल्यांतील लोकांचाही मारा काही कमी नव्हता. सकाळी नऊपासून तीन तास आमचा मारा चालला. बारा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यांतील दारूखाना आग लागून उडाला. तेव्हां किल्ल्यांतील लोक सैरावैरा पळू लागले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तहाचा बावटा घेऊन किल्ल्यांतील लोक रामाजीपंताकडे आले, तेव्हा आम्ही तोफा थांबविल्या. पुढे जमिनीवर उतरलो. रामाजीपंताने पूर्वी कळविलेली हकीकत खरी नव्हती. किल्ल्यांत बरीच फौज होती. ती मारली न जाता बरीचशी पळून गेली होती. कालचा दिवस बोलाचालीत गेला. बोलाचालीत अशी वेळ काढून शत्रूचे लोक बाहेरून मदत येण्याची वाट पहात आहेत, असा मला संशय आला. तेव्हां आम्ही एकदम आज १२ एप्रिलास सकाळी तोफांचा मारा करून किल्ल्यांत शिरलो, त्याबरोबर किल्ला आमच्या हातांत आला. लगेच हि आनंदाची बातमी मी आपणांस लिहून कळवीत आहे. जास्त लिहिण्यास मला आता अवकाश नाही. तरी पण इतके खरे की सुवर्णदुर्ग किल्ला आपणास वाटला होता त्यापेक्षां फारच बळकट आहे. किल्ला मजबूद खडकावर बांधला असून तटाला चार चार फूट लांबी रुंदीचे मोठाले लाल दगड आहेत. आमच्या तोफांचे गोळे ह्या दगडांवर आपटून ठिकऱ्या होऊन खाली पडत, पण दगडास भंग होत नसे. एकंदर सवाशेंवर तोफा किल्ल्यांत आहेत. …  …  आमचे एकंदर ७९० गोळे व ४० दारूची पिपें खर्च झाली. " ( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड - ४ ) 
  रामाजीपंताने मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरास पुढील पत्र लिहिले :- " आम्ही चौलाहून निघून श्रीवर्धनास पोचलो, आणि मार्चच्या २७ तारखेस हरणई जवळ आलो असतां आंगऱ्यांचे आरमार आमच्या दृष्टीस पडले ; त्याचा आम्ही जयगडपर्यंत पाठलाग केला. पुढे सुवर्णदुर्गास येऊन मी आपली फौज जमिनीवर उतरविली ; आणि किल्ल्यावर मारा सुरु केला. आपल्या आरमाराने समुद्रातून व आमच्या फौजेने जमिनीवरून मारा करितांच किल्ला जेरीस आला ; आणि आम्ही जमिनीवरून हल्ला करितांच तो माझ्या हस्तगत झाला. हा जय सर्वस्वी आपल्या मदतीचे फळ असून हा प्रकार मी पेशव्यास कळवीत आहे. अद्यापि आम्हांस आपली मदत घेऊन आंगऱ्याच्या ताब्यात असलेले सर्व किल्ले काबीज करावयाचे आहेत. " ( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड - ४ )  
        सुवर्णदुर्गाच्या लढाईची ब्रिटीश आरमार प्रमुखाने व रामाजीपंताने पत्रांद्वारे लिहिलेली माहिती वाचल्यावर काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात. (१) सागरी लढाईत पेशव्याचे आरमार अगदीच कुचकामी होते. (२) सुवर्णदुर्गावर सुमारे १०० - १२५ तोफा व तीनशेहून अधिक शिबंदी होती. (३) ३ एप्रिल रोजी जहाजांवरून केलेल्या तोफांच्या सरबत्तीत किल्ल्यातील दारूखाना आग लागून उडाला. त्यामुळे किल्ल्यातील लोकांनी तहाची वाटाघाट आरंभली. परंतु त्यात अनेक दिवस खर्ची पडू लागल्याने १२ एप्रिल रोजी इंग्रजांनी पाण्यातून व जमिनीवरून एकदम हल्ला चढवून किल्ला ताब्यात घेतला. (४) लढाईचे उपलब्ध वर्णन पाहता किल्ला लढून जिंकण्यापेक्षा फितुरीने घेण्यात आल्याचे दिसून येते. (५) या संग्रामात पेशव्याचे आरमारी दौर्बल्य इंग्रजांना दिसून आल्याने येथून पुढे या मोहिमेत पेशवे सरकार दुय्यम राहून इंग्रजांना पुढारपण प्राप्त झाले व त्याच्या त्यांनी भरपूर फायदा उचलला. 
                 सुवर्णदुर्ग पडताच बाणकोट, पालगड, रसाळगड इ. किल्ले देखील पेशव्याच्या हाती पडले. आंगऱ्यांची माणसे फितल्याने पेशव्याच्या फौजांना भराभर विजय मिळत गेले. आपली परिस्थिती पाहून तुळाजीने रामाजी महादेवकडे वकील पाठवून तहाची बोलणी सुरु केली. याच सुमारास पेशव्याने तुळाजीच्या ताब्यातील अंजनवेल आणि गोवळकोट हे दोन किल्ले तसेच दाभोळच्या हद्दीतील आंगऱ्यांचे सर्व किल्ले घेण्याचा रामाजी हुकुम दिला. रामाजीपंताने यासाठी इंग्रजांकडे मदतीची विनंती केली. परंतु पावसाळा तोंडावर आल्याने त्यांनी या मोहिमेत भाग घेण्यास साफ नकार दिला. इकडे समशेरबहाद्दर व दिनकर महादेव यांनी रत्नागिरीच्या किल्ल्यास वेढा घातला. पेशव्याला हि वार्ता कळताच त्याने हि बातमी इंग्रजांना देऊन त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. रामाजीपंताने देखील नाना प्रकारे इंग्रजांकडे कुमकेची याचना केली परंतु, पावसाळा तोंडावर असल्याचे निमित्त करून ते या मोहिमेत सहभागी होण्याचे टाळू लागले. वस्तुतः इंग्रजांचा आपल्या मराठी दोस्तांवर फारसा असा विश्वासचं नव्हता. युद्ध चालू असताना कोणत्याही प्रसंगी पेशवा - आंग्रे यांच्यात मैत्रीचा तह घडून येऊ शकतो याची त्यांना जाणीव होती. त्याचप्रमाणे युद्धात जर का ऐन वेळी पेशव्याच्या सरदारांनी आपणांस बाजू दिली तर आंग्रे आपणांस तेव्हाच लोळवेल याचीही त्यांना भीती होतीच ! त्यामुळे आपल्या आरमारी सामर्थ्याला बाधा येईल असे नसते धाडस स्वीकारण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. 
                                 इंग्रजांची साथ मिळत नाही हे पाहून रामाजीने भर पावसाळ्यात जमिनीवरून आंग्रे विरुद्ध मोहीम नेटाने चालवली. परिणामी स. १७५६ आरंभी अंजनवेलम गोवळकोट व पाठोपाठ रत्नागिरीचा किल्लादेखील ताब्यात घेण्यात त्यास यश प्राप्त झाले. रत्नागिरी पडताच   व किरकोळ गड - किल्ले देखील पेशव्यांना शरण गेले. रामाजी महादेवने निकराने मोहीम चालवल्याचे पाहून तुळाजीने स. १७५५ च्या नोव्हेंबर मध्ये पोर्तुगीजांशी मैत्रीचा तह करून त्यांची फौज मदतीस बोलावली. पोर्तुगीजांनी देखील प्रसंग पाहून ५०० सैनिकांची एक तुकडी तुळाजीच्या मदतीस रवाना केली. पेशव्याला हि बातमी समजताच त्याने गोव्याला वकील पात्वून पोर्तुगीजांना आपली फौज माघारी बोलावण्यास सांगितले. दरम्यान तत्पूर्वीचं पोर्तुगीज - आंग्रे यांच्या संयुक्त फौजांचा पेशव्यांच्या सरदारांशी ११ डिसेंबर १७५५ रोजी संग्राम घडून आला. तुळाजीचा भरवशाचा सरदार रुद्राजी धुळप हा नौदल व भूदलासह खारेपाटण येथे जावजी गवळी व इतर सरदारांवर बेधडक चालून आला. लढाई मोठी होऊन त्यात रुद्राजी धुळप, दुलबाजी माने व फिरंगी सरदार गोळ्यांनी जखमी झाले. खुद्द रुद्राजी पेशव्याच्या फौजेच्या हाती लागून त्याची फौज उधळून गेली. 
                इकडे राजकीय आघाडीवर देखील बरीच धामधूम चालली होती. पेशव्याच्या राजकारणाने तुळाजी आंग्रे आता पुरता एकाकी पडला होता. विजयदुर्ग अपवाद केल्यास मजबूत असे स्थळ त्याच्या हाती राहिले नव्हते आणि तेच काबीज करण्यासाठी रामाजी व पेशवा इंग्रजांकडे वारंवार मदतीची मागणी करत होते. इंग्रजांनाही आंगऱ्यांचा बंदोबस्त करण्याची उत्कंठा होतीच पण त्यांनी यावेळी सहेतुक वेळकाढू धोरण स्वीकारले होते. स. १७५५ च्या ऑक्टोबरमध्ये इंग्लंडहून रॉबर्ट क्लाइव्ह व बादशाही आरमारी सरदार वॉटसन सरकारी जहाजांसह मद्रासला येऊन दाखल झाले होते. हिंदुस्थानात व युरोपात यावेळी इंग्रज - फ्रेंचांचे उघड वैर जुंपल्याने हिंदुस्थानातील आपल्या वखारींच्या संरक्षणासाठी आणि फ्रेंचांचा हिंदुस्थानातून साफ उठवा करण्यासाठी इंग्लंडमधून हि ताज्या दमाची कुमक पाठवण्यात आली होती. या काळात फ्रेंच सरदार बुसी याचा दक्षिण हिंदुस्थानात विशेष बोलबाला झाला होता. तोफखाना व कवायती पायदळाच्या बळावर एतद्देशियांना तो एकप्रकारे अजिंक्य असा योद्धा भासू लागला होता. फ्रेंचांनी धूर्तपणे बुसीला निजामाच्या दरबारी चिकटवून आपले प्रस्थ वाढवण्यास आरंभ केला होता आणि हि गोष्ट इंग्रजांना हानिकारक असल्याने त्यांना फ्रेंचांचा नक्षा उतरवणे भाग होते. कारण हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता ! तेव्हा क्लाइव्ह आणि वॉटसन हिंदुस्थानात येऊन दाखल झाल्यावर इंग्रज - फ्रेंचांचा झगडा जुन्प्न्याची चिने दिसू लागली. मात्र यावेळी मद्रासच्या इंग्रजांनी सद्यस्थितीत आपली फ्रेंचांसोबत बिघाड करण्याची तयारी नसल्याचे सांगून युद्ध पुढे ढकलले. हि गोष्ट मुंबईकर इंग्रजांना समजताच त्यांनी मद्रासकरांना पत्र लिहून क्लाइव्ह व वॉटसन यांना मुंबईला पाठवण्याची विनंती केली. अर्थात मद्रासकरांनी त्यानुसार इंग्लंडहून आलेलं सैन्य व नौदल मुंबईला रवाना केले. क्लाइव्ह व वॉटसन मुंबईला आले आणि मुंबईचा गव्हर्नर बूर्शियर याच्याशी त्यांची भेट घडून विजयदुर्ग मोहिमेचा तपशील ठरवण्यात आला. . 
                 ब्रिटीश योजनेनुसार १४ जहाजे, ८०० इंग्रज व १००० देशी सैनिक या स्वारीत सहभागी होणार होते. ता. ६ फेब्रुवारी १७५६ रोजी बूर्शियरने क्लाइव्ह व वॉटसन यांस मोहिमेचा लेखी हुकुम पाठवला. त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे :- " तुळाजी आंगरे सापडल्यास मुंबईस आणावा. विजयदुर्ग घेतल्यावर आंगऱ्यांचे बाकीचे किल्ले घेण्यास आरमाराने पेशव्याच्या फौजेबरोबर जावे. बाणकोट व हिंमतगड पेशव्याने इंग्रजांस दिले आहेत, परंतु त्या प्रदेशाची हद्द ते अजून ठरवून देत नाहीत. ती ठरवून देईपर्यंत विजयदुर्ग किल्ला काबीज केल्यावर पेशव्यांच्या स्वाधीन करू नये. हरेश्वरचे ठिकाण आपणास पाहिजे आहे. सबब कोणत्या ना कोणत्या सबबीने ते घेण्याची तजवीज करावी. दुसरी जी ठिकाणे आपल्या व्यापाराच्या व आरमाराच्या सोयीची अशी तुम्हांस आढळतील, ती तहाच्या वेळी मिळवण्याचा प्रयत्न अवश्य करावा. तुळाजी आंगरे हा तुम्हांस लांच देऊ करील, किंवा स्वाधीन होतो म्हणेल, परंतु तुम्ही पक्के ध्यानांत ठेवा की, तो पहिल्या प्रतीचा लबाड आहे. त्याच्यावर विश्वास ठेवू नये. तो केव्हा काय करील त्याचा नेम नाही. दंड देतो म्हणेल तर, त्याने आजपर्यंत आमची मोठमोठी जहाजे नाहीशी केली आहेत, आणि नानाप्रकारे दरसाल तीन चार लाखांवर आज कित्येक वर्षे तो आमचे नुकसान करीत आहे, इतके सर्व नुकसान आमचे भरून निघेल इतका दंड ठरवावा. एवढा पैसा त्याजपाशी असणे शक्य नाही, सबब तुळाजीचा हा कांटा सबंध काढून टाकावा, हेच आपणांस श्रेयस्कर असून जिवंत सापडलाच तर त्यास मुंबईस आणावे. पेशव्याचे हाती त्यास देऊ नये ; कारण ते कदाचित त्यास पुनरपि मोकळा सोडतील आणि तो पुनः आपणास पहिल्यासारखा त्रास देऊ लागले. " ( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड - ४ )  
                        ता. ७ फेब्रुवारी १७५६ रोजी ब्रिटीश आरमार मुंबईहून विजयदुर्गाच्या दिशेने रवाना झाले. इंग्लंडहून मद्रासला येऊन दाखल झालेले इंग्रजी नाविकदल आपल्यावर चालून येत असल्याची बातमी आरंभी तुळाजीला नव्हती असे रियासतकार सरदेसाई लिहितात, पण त्याचे हे मत तर्काच्या कसोटीवर तर टिकत नाही आणि आपले मत सिद्ध करण्यासाठी आवश्यक तो पुरावा देखील ते देत नाहीत. त्यामुळे तुळाजी गाफील राहिला असे म्हणता येत नाही. मानाजी आंग्रे व पेशवे यांनी त्याचे मदतनीस फोडल्यामुळे विजयदुर्ग अखेरपर्यंत लढवणे वा तह करून आपला बचाव साधने हे दोनचं पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध होते. पैकी पेशव्याच्या सोबत त्याने तहाची बोलणी सुरु केलीचं होती आणि विजयदुर्ग लढवण्याची तयारीदेखील केली होती. 
        विजयदुर्गचा संग्राम :- ब्रिटीश आरमार प्रमुख वॉटसनने मुंबईला विजयदुर्गच्या संग्रामाचे ता. १४ फेब्रुवारी रोजी पाठवलेले बातमीपत्र  पुढीलप्रमाणे :- " ता. ११ रोजी सायंकाळी आमचे आरमार विजयदुर्गपुढे येऊन दाखल झाले. त्य वेळी तुळाजी आंगऱ्याचे व पेशव्यांचे तहाचे बोलणे चालले असल्याचे मला कळले. तेव्हा तुळाजीस ह्या बाबतीत अवकाश द्यावयाचा नाही, असा निश्चय करून एकदम किल्ला स्वाधीन करून देण्याविषयी मी त्यास निरोप पाठविला. ठरलेल्या वेळांत जबाब न आल्यामुळे आणि पेशवेही जरा कां कूं करीत आहेत असे पाहून, ता. १२ रोजी आम्ही किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु केला. चार वाजतां आमचा एक गोळा आंगऱ्यांच्या जहाजावर पडून त्याची सर्व लढाऊ जहाजे जळून खाक झाली. ता. १३ रोजी सकाळी आमचे कांही लोक जमिनीवर उतरले. पेशव्यांची फौजही उतरणार होती. तीस उतरू देऊ नये म्हणून आम्ही पुनः किल्ल्यावर मारा सुरु केला. कॅप्टन फोर्ड ६० लोक बरोबर घेऊन संध्याकाळी किल्ल्यांत शिरला आणि त्याने वर आमचे निशाण लाविले. आज सकाळी आमची सर्व फौज किल्ल्यांत गेली. आज रामाजीपंत आमच्या भेटीस येणार आहे, तेव्हा तुळाजीस मी आपल्या ताब्यात मागणार आहे. लढाईत म्हणण्यासारखे आमचे नुकसान झाले नाही."
( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड - ४ )
      रामाजीपंताच्या पत्रांत या संग्रामाची आलेली माहिती खालीलप्रमाणे आहे :- " आम्ही मनवरावरी इंग्रजांचे भेटीस गेलो, आंगरे तह करावयाबद्दल भेटीस येतात म्हणोन सांगितले. त्यांनी उत्तर केले, तह करावयाचा जनरलचा हुकूम नाही, तरी तुम्ही म्हणत असाल तर माझे तरांडियावर यावे. तेव्हां सरखेलांकडून चार भले माणूस मोघमच निरोप घेऊन जहाजावर आले. इंग्रजांनी त्यांस साफ सांगितले, तह करावयाचा असेल तर पांच सहा घटकांत रामाजीपंतास घेऊन यावे. न आले तर बंदरांत जाईन. पण सरखेलांच्या मनोदयाचा अर्थ ठरावास नये. इंग्रज तीन - चार घटका अधीकच वाट पाहोन बंदरांत आला. किल्ल्यांतून तोफा होऊ लागल्या तेव्हां इंग्रज तोफा मारो लागला. आम्ही आरमार घेऊन सड्याजवळ आलो. सूर्योदय होय तो मारगिरी होतच होती. गरनाळांचे मारांनी किल्ल्याजवळ बंदरांत आंगऱ्याचे आरमार होते त्यास जागांजागां अग्न लागली. सरकारचे निशाण किल्ल्यांत येणार हे वर्तमान इंग्रजांस कळतांच अतिशयास पेटून चहूंकडून उतरून आले. मीठगावण्याहून तुळाजी आंगरेही आम्हांजवळ न आले. इंग्रजांनी चार घटका अतिशय मारा केला, तेव्हा किल्ल्यांतील लोकांचा आव जाऊन त्यांनी इंग्रजांचे निशाण व लोक आंत घेतले. आमचा उपाय राहिला. दुसरे दिवशी मनवरावर इंग्रजांचे भेटीस गेलो. त्याने तुळाजीस हाती द्यावा अशी अट घातली. जनरलाचे पत्र आल्याविना किल्ला देववत नाही, तुमचे निशाण तेवढे आंत पाठवा, असे बोलो लागला. लोभी होऊन अशा गोष्टी सांगो लागला. कजिया करावा तरी इंग्रज पातशाही मनवराचा सरदार, आम्ही पातशाही चाकर तुमचे ऐकत नाही, ऐसे उत्तर आल्यावरून जनरलास पत्र लिहिले आहे. दरम्यान जनरल व तहनामा आहे म्हणोन उतावीळ न करतां आहों."  ( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड - ४ )
                   विजयदुर्गच्या लढाईचा प्रत्यक्षदर्शींनी लिहिलेला वृत्तांत वर दिलेला आहे. हा वृत्तांत पाहता असे दिसून येते कि, विजयदुर्ग घेण्याच्या कमी पेशव्याच्या आरमाराने व भूदलाने कसलाही सहभाग घेतला नाही. याचे कारण म्हणजे इंग्रज - पेशवा यांच्या संयुक्त फौजा व आरमार जेव्हा विजयदुर्गाजवळ आले तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तुळाजीने तातडीने तहाची वाटघाट रामाजीपंतासोबत सुरु केली. वस्तुतः स. १७५५ पासून तुळाजी पेशव्यासोबत तह करण्यासाठी आपले वकील पाठवत होता पण तो सर्व वेळकाढूपणाचा प्रकार होता. परंतु, जेव्हा विजयदुर्गावरचं शत्रूची धाड येउन पडली तेव्हा त्याचे अवसान गळून त्याने खऱ्या अर्थाने समेटाची बोलणी रामाजीसोबत सुरु केली. पण रामाजीने आरंभी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. इकडे तुळाजीचे वकील रामाजीकडे आल्याची बातमी क्लाइव्ह व वॉटसन यांना समजातच त्यांनी गव्हर्नरच्या आदेशानुसार वागण्याचे ठरवले. नाममात्र एक दिवसाची वाट पाहून तहाची वाटाघाट कोणत्या वळणाने होत आहे याचा त्यांनी अंदाज घेतला व दुसऱ्या दिवशी निकराने विजयदुर्गावर हल्ला चढवला. या हल्ल्यात इंग्लिश जहाजांवरील लांब पल्ल्याच्या तोफांनी विजयदुर्गाच्या आसऱ्यास उभे असलेल्या तुळाजीच्या आरमाराचा अपघाती वेध घेऊन त्यास भस्मसात केले. इंग्रजांनी तुळाजीचे आरमार निकामी केल्याचे समजताच रामाजी महादेवने दुसऱ्या दिवशी किल्ल्यावर हल्ला चढवण्याचे निश्चित केले. परंतु, क्लाइव्ह त्याचा बाप निघाला. गलबतांवरील तोफांच्या छायेत त्याने आपली फौज किनाऱ्यावर उतरवून विजयदुर्गावर चढाई केली. आरमार जळाल्याने किल्ल्यातील लोकांचे आधीच अवसान खचले होते. तरीही सायंकाळ पर्यंत त्यांनी झुंज दिली व निरुपाय जाणून अखेरीस शरणागती पत्करली. पांढरे निशाण किल्ल्यावर फडकताच इंग्लिश जहाजांवरील तोफा बंद झाल्या. इंग्रजांचा तोफखाना थंडावताच व किल्ल्यावर शरणागतीचा पंधरा बावटा चढताच मराठी फौजांनी किल्यात घुसण्याचा प्रयत्न केला पण तत्पूर्वीच ब्रिटिशांनी किल्ल्याचा ताबा घेऊन मराठी सैन्याची वाट रोखल्याने त्यांचा नाइलाज झाला. 
           विजयदुर्गाचा ताबा घेण्यावरून पुढे पेशव्याचे आणि इंग्रजांचे पत्रोपत्री मोठे युद्ध झाले पण तो भाग प्रस्तुत विषयाच्या मर्यादेत येत असला तरी लेखाच्या मर्यादेच्या बाहेर असल्याने त्याची चर्चा येथे अप्रस्तुत आहे. इथे फक्त एवढेचं नमूद करतो कि, स. १७५६ च्या ऑक्टोबरमध्ये विजयदुर्ग पेशव्याच्या हाती आला. 
                 विजयदुर्गावर इंग्रजांचा ताबा बसल्यावर तुळाजीने सहपरिवार रामाजी महादेवकडे शरणागती पत्करली. पेशव्याच्या आज्ञेने तुळाजी, त्याची आई, त्याच्या बायका व मुलांना निरनिराळ्या किल्ल्यांवर कैदेत ठेवण्यात आले. तुळाजीची प्रथम राजमाची किल्ल्यावर स. १७५६ च्या मे महिन्यात रवानगी झाली. तेथून मग विसापूर, अहमदनगर, चाकण, अहमदनगर, दौलताबाद, अहमदनगर, पुणे, वंदन अशा विविध ठिकाणी कैदेदाखल यात्रा घडून स. १७८६ मध्ये वंदन किल्ल्यावर त्याचा मृत्यू झाला. सागरावर प्रभुत्व गाजवणाऱ्या तुळाजीची ३० वर्षे अखेर कैदेत गेली. या ३० वर्षांत कैदेतून निसटण्याचे तुळाजीने अनेक प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले. तुळाजी व विजयदुर्ग ताब्यात आल्यावर तुळाजीच्या हाताखाली जे काही त्याचे उरले सुरले आरमार बाकी राहिले होते, ते  पेशव्याच्या नाविक दलात सामील करण्यात आले. पेशव्याने आपल्या तर्फेने धुळप यांस आरमारप्रमुख बनवून विजयदुर्गास आरमारी सुभा स्थापन केला. धुळपांनी आपले आरमारी सामर्थ्य वाढवण्याचा व आंग्रेकालीन मराठी नौदलाचा समुद्रावर असलेला दरारा कायम राखण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण मराठी आरमाराचे जे तेज स. १७५६ मध्ये तुळाजी आंग्रेच्या जहाजांसोबत जे जळून गेले ते गेलेचं ! इतउत्तर मराठी आरमाराची इंग्रजांना धास्ती राहिली नाही. कमजोर नाविक दलाचा फटका पुढे पहिल्या इंग्रज - मराठा युद्धांत पुणे दरबारला चांगलाच जाणवला. प्रबळ आरमाराच्या बळावर बंगाल, मद्रास, सुरत, मुंबई येथील ब्रिटीश पलटणी मराठी राज्यात चारी बाजूंनी जेव्हा घुसल्या तेव्हा त्यांना आवरून धरताना मराठी सरदारांच्या तोंडाला फेस आला होता हे विसरता येत नाही.                
       

1 टिप्पणी:

Shree म्हणाले...

नानासाहेब पेशवे आणि तुळाजी आंग्रे वादातील कोल्हापूर जिल्ह्यातील मुडागड गड युद्धाबद्दल मला माहिती हवी आहे.तुमच्याकडे याचे काही माहितीपर दस्ताऐवज मिळतील का?