बुधवार, १९ जून, २०१३

पेशवे - इंग्रज यांची आंग्रेविरुद्ध मोहीम ( भाग - १ )

                                             ( पूर्वार्ध )
              स्वराज्याची स्थापना करताना छ. शिवाजी महाराजांनी मनाशी काही एक धोरण निश्चित आखूनचं आपल्या लष्करात आरमार विभाग निर्माण केला होता. सिद्दी, मोगल, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज, अरब इ. आरमारी सत्तांशी कधी संघर्ष करून तर कधी मिळते - जुळते घेत महाराजांनी आपले आरमार हळूहळू विकसित करत त्यास मजबुती आणली. पुढे त्यांच्या निधनानंतर संभाजीने आपल्या कारकीर्दीच्या आरंभी आरमाराकडे विशेष लक्ष पुरवले पण लवकरच औरंगजेबाची धाड स्वराज्यावर आल्याने पुढील काळात नाविक खात्याकडे त्याचे दुर्लक्ष झाले व तो काळ, परिस्थिती लक्षात घेत ते अपरिहार्य असेच होते. पुढे संभाजी मोगलांच्या कैदेत गेल्यावर राज्याची धूळदाण उडाली. नवा छत्रपती राजाराम जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात निघून गेला. शिवाजीराजांनी निर्माण केलेली मराठी राज्याची राजधानी शत्रूहाती सापडली. या काळात जिथे राजारामाचेच आसन डळमळीत होते तिथे आरमारास कोण पुसतो ? 
            याच धामधूमीच्या काळात दर्यावरील एका नव्या ' शिवाजी ' चा जन्म झाला. या नवीन शिवाजीने मोडकळीस आलेली मराठी राज्याची आरमारी सत्ता इतकी बलशाली बनवली कि, स. १७२० च्या सुमारास इंग्रज, पोर्तुगीज या तुलनेने बलवान युरोपियन सत्तांना देखील आपले कोकण किनाऱ्यावरील अस्तित्व धोक्यात येऊ लागल्याचे जाणवू लागले. स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराजांना ज्याप्रमाणे तत्कालीन शत्रूच्या दरबारी लेखांत किंवा पत्रांमध्ये शेलक्या विशेषणांचा आहेर मिळे, त्याचप्रमाणे पोर्तुगीज, इंग्रज इ. लोकांच्या पत्रांमधून या नूतन शिवाजीस उद्देशून मुक्ताफळे उधळली जात. अठराव्या शतकाच्या आरंभ काळाचा हा समय होता. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेत एकाच वेळी डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज या युरोपियन सत्तांसोबत सिद्दी, मोगल, वाडीकर सावंत इ. देशी शत्रूंच्या उरात धडकी भरवणाऱ्या मराठी आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा गौरव करावा तितका कमीच आहे. केवळ त्यांच्या अंगच्या पराक्रमाने इंग्रजांनी ' चांचा ' म्हणजे समुद्री लुटारू हि पदवी त्यांना  मोठ्या आणि मोकळ्या मनाने बहाल केली होती. मुद्दाम दखल घेण्यासारखी बाब म्हणजे स. १७०७ पासून मराठी राज्यात निर्माण झालेल्या वारसा कलहात स. १७११ च्या सुमारास कान्होजी आंग्रेने सहभाग घेतला होता आणि एकाच वेळी मैदानी व सागरी लढायांत त्याने  आपल्या लष्करी विजयाची परंपरा कायम राखली होती. पुढे स. १७१४ मध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथने कान्होजीला सातार दरबारी रुजू केले. येथून पुढे म्हणजे स. १७२९ पर्यंत कान्होजीने आपले सर्व लक्ष आणि सामर्थ्य सागरावर केंद्रित करून आपल्या नाविक सत्तेला विलक्षण बळकटी आणली. याचा परिणाम म्हणजे युरोपियन सत्तांच्या लेखी आता हे आरमार मराठी राजाचे व राज्याचे नसून ' आंगऱ्यांचे ' झाले होते. हा एक प्रकारे कान्होजीच्या पराक्रमाचा सन्मान असला तरी आंग्रे आणि सातार दरबारातील इतर मानकरी यांच्यात फूट पडण्यास हे एक कारण पुरेसे होते. मात्र कान्होजीने दरबारी भानगडीत फारसे लक्ष न घातल्याने त्याच्या हयातीत तरी सातार दरबारसोबत वा दरबारी मुत्सद्द्यांशी त्याचा सामना घडून आला नाही. मात्र त्याच्या निधनानंतर त्याचे वारस सातार दरबारातील भांडणातून फारसे अलिप्त राहू शकले नाहीत. त्यातचं सातारकर शाहू छत्रपतीचे दौर्बल्य लक्षात घेऊन दरबारातील इतर मराठी सरदारांवर बाजीराव पेशवा आपला शह बसवत चालला होता. मैदानी युद्धांत जरी त्याला तोड नसली तरी सागरी लढायांच्याविषयी त्याला काडीचेही ज्ञान नसल्याने आंगऱ्यांवर शह बसवणे तसे त्यास अवघडच होते. परंतु स. १७३२ ते ४० च्या दरम्यान केव्हातरी पेशव्याने आपले स्वतंत्र नाविकदल उभारण्यास आरंभ केला. आरमाराची निर्मिती करण्यामागे बाजीरावाचे काही विशिष्ट हेतू निश्चितच होते व त्यापैकी एक म्हणजे आंगऱ्यांवर आपले वर्चस्व बसवणे हा होय !  बाजीरावाने आपले आरमार उभारण्यास आरंभ तर केलाच पण स. १७३४ मध्ये त्याने पोर्तुगीजांकडे आंगऱ्यांच्या विरोधात मदत  मागितली होती. परंतु पोर्तुगीजांनी तिकडे दुर्लक्ष केल्याने बाजीरावास आपला डाव साधता आला नाही. पुढे वसईच्या पाडावानंतर इंग्रजांच्या दरम्यानगिरीने बाजीराव व पोर्तुगीजांचा एक तह घडून आला. त्यातील एका कलमानुसार पेशवे जेव्हा आंगऱ्यांशी बिघाड करतील तेव्हा इंग्रज - पोर्तुगीजांनी त्यांना मदत करावी असे ठरवण्यात आले. या तहाच्या वाटाघाटीस बाजीरावाच्या अखेरच्या काळात आरंभ झाला. मात्र त्याच्या हयातीत हा तह पूर्ण झाला नाही. पुढे नानासाहेबाच्या कारकीर्दीच्या आरंभी हा करारनामा मंजूर झाला. ( ७ सप्टेंबर १७४० )               
                       ता. २८ एप्रिल १७४० रोजी बाजीराव पेशवा मरण पावला व त्याचा मोठा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब हा पेशवा बनला. नानासाहेबाच्या राजकीय कारकिर्दीचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. पहिला स. १७४० - ४९ व दुसरा स. १७५० - ६१. पैकी पहिल्या भागात तो फारसा स्वतंत्र नसून त्याच्यावर काही प्रमाणात का होईना पण शाहू छत्रपतीचा अंकुश होता. पुढे स. १७४९ च्या अखेरीस शाहूचा मृत्यू झाल्याने पेशवा निरंकुश बनला. मात्र स. १७५० - ५१ हि दोन वर्षे त्याची ताराबाई व तिच्या हस्तकांसोबत लढण्यात गेली. आंगऱ्यांचा व पेशव्याचा पुढे जो उघड लढा जुंपला गेला त्याची बीजे याच काळात रुजली. ताराबाई - पेशवे संघर्षात ताराबाईने पेशव्याचे जेवढे म्हणून स्वकीय - परकीय शत्रू असतील त्या सर्वांना चिथावणी दिली. खुद्द पेशवे बंधूंमध्ये देखील तिने फूट पाडली. ताराबाईच्या या कारस्थानात तुळाजी आंग्रे तिच्या पक्षाला जाउन मिळाला. वस्तुतः तुळाजीचा मनापासून असा ओढा कोणत्याच पक्षाकडे नव्हता. मात्र अलीकडे पेशव्यांनी जो इतर मराठी सरदारांना दाबून टाकण्याचा उपक्रम चालवला होता तो त्यास पसंत नव्हता. त्यामुळे त्याने तात्पुरती का होईना पण ताराबाईची बाजू उचलून धरली.
                 याच ठिकाणी आंग्रे घराण्याची थोडी माहिती वाचकांना देणे योग्य ठरेल. कान्होजी आंग्रेला ३ विवाहित स्त्रियांपासून सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसाजी व धोंडजी असे ६ पुत्र होते. { मथुराबाई = सेखोजी व संभाजी , लक्ष्मीबाई = मानाजी व तुळाजी, गहिनाबाइ = येसाजी व धोंडजी } कान्होजीच्या पश्चात सर्व सत्ता वडील पुत्र या नात्याने सेखोजीच्या हाती आली. घरच्या कटकटींना तोंड देत त्याने जसेतसे निभावले पण स. १७३३ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर आंगऱ्यांचे घर फुटले. सेखोजीच्या मागे संभाजी कारभारावर आला पण संभाजी व मानाजी यांचे आपसांत अजिबात सख्य नव्हते. यामुळे आंगऱ्यांच्या घरच्या भांडणात सातार दरबारातील मंडळींना सहभाग घेण्याची संधी प्राप्त झाली. पैकी दरबारातील पेशवे विरोधकांनी बलवान अशा संभाजीचा पक्ष घेतला तेव्हा पेशव्यांनी मानाजीला उचलून धरले. बाजीरावाने मुत्सद्देगिरीने काम घेत दोघा भावांच्या भांडणात मध्यस्थाची भूमिका घेतली. मानाजीला ' वजारातमाब ' असा नवा किताब देऊन त्याने कुलाबा येथे राहावे असे ठरवून दिले आणि संभाजीला ' सरखेल ' किताब देऊन त्याची सुवर्णदुर्ग येथे स्थापना केली. एक प्रकारे आंगऱ्यांच्या सत्तेचे हे विभाजनच होते पण याहून अधिक काही करण्याची पेशव्याची शक्ती नव्हती आणि इच्छाही ! अर्थात संभाजीला हि अधिकार वाटणी पसंत पडली नाही व पेशव्यावर रुष्ट होऊन त्याने सातार दरबारातील पेशवेविरोधी कंपूत प्रवेश केला. त्याउलट मानाजी पेशव्यांना चिटकून राहिला पण त्याचा सख्खा भाऊ तुळाजी हा संभाजीच्या पक्षातच राहिला. दरम्यान स. १७४० च्या एप्रिलमध्ये बाजीराव मरण पावला, त्याच महिन्यात संभाजीने मानाजीवर चढाई केली. त्यावेळी नानासाहेबाने मानाजीची कुमक करून त्याचा बचाव केला. पुढे स. १७४२ च्या जानेवारीत संभाजीचा मृत्यू होऊन त्याच्या जागी तुळाजी आंग्रे सरखेल बनला. तुळाजी हा संभाजीपेक्षा अधिक पराक्रमी व काहीसा ताठर वृत्तीचा असल्याने पेशव्यांशी त्याचे जमले नाहीच पण सोबत सातारकर आणि कोल्हापूरकर छत्रपतींसोबत देखील त्याने  उद्दामपणाचे धोरण स्वीकारले. अर्थात असे असले तरी तत्कालीन परिस्थिती पाहता तो इतरांपेक्षा काही वेगळे वागल्याचे दिसून येत नाही. जो वर्तनक्रम दाभाडे, पेशवे, नागपूरकर भोसले इ. नी स्वीकारला त्याच मार्गाने तुळाजी चालला होता. आता स्वतंत्र वृत्तीच्या वाटचालीत त्यास अपयश आल्याने तो टीकेचा धनी बनला तर याच मार्गाने पुढे जाउन पेशवे, भोसले यशस्वी झाल्याने  गौरव होऊ लागला. 
                 आरमाराची सूत्रे हाती आल्यावर सातार दरबारातील पेशव्याचे वाढते प्रस्थ व त्याची सर्वांना आपले अंकित करून निरंकुश सत्ता गाजवण्याची महत्त्वकांक्षा तुळाजीच्या लक्षात आल्यावाचून राहिली नाही. मात्र सागरी सामर्थ्याच्या बाबतीत पेशवे अगदीच हलके असल्याने इंग्रज, फ्रेंच,  डच, पोर्तुगीज, सिद्दी इ. च्या मदतीशिवाय पेशवा आपल्यासोबत लढण्याचे साहस  नाही याची तुळाजीला जाणीव होती. परंतु, त्याचा ताठर व काहीसा अविचारी स्वभाव त्याच्या आणि पर्यायाने आंगऱ्यांच्या आरमारी सत्तेच्या विध्वंसास कारणीभूत ठरला. युद्ध मैदानी असो वा सागरी, एका वेळी एकच शत्रू हे तत्व कोणत्याही सेनापतीला क्षणभरही नजरेआड करून चालत नाही. तुळाजी नेमका याच धोरणात कमी पडला. पेशव्यांशी तर त्याने उभा दावा मांडलाच होता पण, पेशव्यांपेक्षाही त्याचे -- किंबहुना त्याच्या घराण्याचे -- इंग्रजांशी हाडवैर जुंपले होते याकडे त्याचे काहीसे दुर्लक्षचं झाले. त्याशिवाय वाडीचे सावंत, कोल्हापूरचे छत्रपती, अमात्य, प्रतिनिधी इ. सोबत देखील तुळाजीची भांडणे होतीच. अशा परिस्थितीत त्याला मदत करणारी दर्यावरील फक्त एकच प्रमुख युरोपियन सत्ता होती व ती म्हणजे पोर्तुगीज ! मात्र वसईच्या प्रसंगी त्यांची झालेली आर्थिक व लष्करी हानी अजून भरून न निघाल्याने पेशव्यासोबत उघड शत्रुत्व घेण्यास ते फारसे उत्सुक नव्हते. 
                        वाडीकर सावंत, कोल्हापूर दरबार हे जरी तुळाजीचे शरू असले ती तुळाजीला कमकुवत बनवून पेशव्याचे प्रस्थ वाढू देणे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. अशा परिस्थितीत पेशव्याला येऊन - जाऊन फक्त इंग्रजांच्या मदतीचाच काय तो आधार होता. आंग्रेविरोधी इंग्रज - पेशवा यांची युती बनली असली तरी या दोघांचेही हेतू पूर्णतः भिन्न होते. पेशव्याचा उद्देश साफ होता. ज्याप्रमाणे बाजीरावाने दाभाड्याची वाट लावून त्याला थंड केले होते त्याचप्रमाणे नानासाहेबाला आंगऱ्यांचे प्रकरण उलगडायचे होते. त्याच्या दृष्टीने आंग्रे हा सातार दरबारातील एक बलिष्ठ प्रतिस्पर्धी होता व त्याला आपल्या नियंत्रणाखाली आणणे वा त्याला नाहीसा करणे किंवा त्यास कैद करणे हेच त्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्याउलट इंग्रजांचे धोरण होते. त्यांना तुळाजी आंग्रे व त्याच्या आरमाराचा समूळ नाशचं करायचा होता. इतकेच नव्हे तर त्याच्या ताब्यातील महत्त्वाची बंदरे आणि मोक्याच्या ठिकाणी असलेले किल्ले देखील त्यांना बळकवायचे होते. पेशव्याला इंग्रजांच्या बेतांची जाणीव नव्हतीचं असे उपलब्ध पुरावे पाहता म्हणता येत नाही.  
                    
 

३ टिप्पण्या:

Sahyadri म्हणाले...

baryach diwsananter article,
chan mahiti ahe angre gharanyabadhal savister samjale, keep it up

sanjay kshirsagar म्हणाले...

Dhnayvad, Sahyadri !

Shree म्हणाले...

मला नानासाहेब पेशवे आणि तुळाजी आंग्रे वादात कोल्हापूर मधील मुडा गड तसेच पन्हाळा याठिकाणी झालेल्या युद्धाची सविस्तर माहिती हवी आहे....श्री.गणेश दळवी