रविवार, ३० जून, २०१३

श्रीमंत रघुनाथराव पेशवे ( भाग - २ )

    
  माधवरावास पेशवेपदाची प्राप्ती आणि कुटुंब कलहास आरंभ :-  जून महिन्यात पुणे मुक्कामी नानासाहेब पेशव्याची खालावत जाणारी प्रकृती पाहून भावी घटनांचा अंदाज आल्याने दादाने स्वतःला पेशवेपद मिळवून घेण्याच्या दृष्टीने खटपटी चालवल्या. ज्यावेळी पेशवा मरण पावला तेव्हा तुळाजी आंग्रे हा पुण्यातच पेशव्यांच्या कैदेत होता. त्याने इब्राहीमखान गारद्याच्या भाच्याला फितवून कैदेतून निसटण्याचा व पुण्यात दंगा माजवण्याचा कट रचला. परंतु, सखारामबापूच्या जागरूकतेने हा कट फुटून कटवाल्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात आला असला तरी या कटाच्या उभारणीत दादा - बापूचा हात नसावा असे म्हणता येत नाही. या निमित्ताने पेशवेपदासाठी आपणचं कसे लायक आहोत हे सर्वांच्या नजरेस आणून देण्यात दादा तात्पुरता यशस्वी ठरला. परंतु, पती निधनातून गोपिकाबाई लवकरचं सावरली आणि तिच्या पुढाकाराने व नानासाहेबास मानणाऱ्या पुणे दरबारातील सरदारांच्या एका मोठ्या गटाच्या जोरावर तिने पेशवेपदासाठी माधवरावाचे नाव पुढे केले. माधवराव यावेळी १५ - १६ वर्षांचा असला तरी नानासाहेब पेशव्यांचा मुलगा होता आणि तत्कालीन प्रघातानुसार पेशवेपदावर रघुनाथापेक्षा त्याचाच अधिक हक्क पोहोचत होता. दादाने आपल्या पुतण्यास पेशवा करून त्याचा कारभार करावा अशी पुणे दरबारातील मुत्सद्द्यांची भावना होती. त्याउलट दरबाराचा अंदाज न आल्याने आपणास पेशवेपद मिळणार हे जवळपास गृहीत धरून दादाने पेशवेपद प्राप्त होताच उत्तरेत जाउन पानिपतचे अपयश धुऊन काढण्याचा बेत आखला आणि त्यानुसार गोपाळराव बर्व्याच्या मार्फत मोगल बादशहा व सुजाउद्दौला यांच्याशी पत्रव्यवहार देखील आरंभला. मात्र लवकरच त्यास वस्तुस्थितीची जाणीव होऊन त्याने आपल्या हालचाली आटोपत्या घेतल्या. 
                          इकडे दादाच्या खटपटींनी माधवरावाचे पक्षपाती सावध झाले व छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे घेण्यासाठी साताऱ्यास जाताना माधवरावाने दादाला सोबत घेऊन नये असे ठरवण्यात आले, पण नंतर हा बेत बदलून दादाला सोबत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. चुलते - पुतण्यात एकमेकांविषयी संशय निर्माण होण्यास या घटनेने आरंभ झाला असण्याची शक्यता आहे. ता. २० जुलै १७६१ रोजी माधवरावास पेशवेपदाची आणि सखारामबापूस मुख्य कारभाऱ्याची वस्त्रे प्राप्त झाली. बापूला पेशव्यांची दिवाणी मिळाल्याने पेशव्यांचे कारभारीपद अप्रत्यक्षपणे दादाच्या हाती गेले. पेशवेपदाची वस्त्रे प्राप्त झाल्यावर दादा - माधव पुण्यास परतले आणि उभयतांमध्ये कारभारावरून हळूहळू खटके उडू लागले. चुलते आणि पुतणे दोघेही महत्त्वाकांक्षी असल्याने व माधवराव हा स्वतंत्र वृत्तीचा असल्यामुळे दादाचे आणि त्याचे पटणे शक्य नव्हते. परंतु  याच वेळी निजामाचे प्रकरण उद्भवल्याने पेशवे कुटुंबातील हा कलह सध्या तरी अंतर्गत कुरबुरींपुरता मर्यादित राहिला.     
       माधवराव पेशवा दादाच्या नजरकैदेत :-   आधी सांगितल्यानुसार पटवर्धनांना निजामाच्या तोंडावर ठेवून दादा पुण्यास परतला होता. पटवर्धनांनी निजामाची चढाई आजवर थोपवून धरली होती आणि पुढील राजकारणाचा अंदाज घेत निजामदेखील एकदम एकेरीवर न येत हळूहळू कुरापत काढत होता. मात्र, नानासाहेब पेशव्याचे निधन झाल्याची बातमी मिळताच निजामाने उदगीरचा तह धाब्यावर बसवून पेशव्यांविरोधात रणशिंग फुंकले. निजामाच्या पारिपत्यासाठी दादा - माधव आपसांतील मतभेद विसरून एकत्र आले आणि २० ऑगस्ट १७६१ रोजी ते स्वारीसाठी पुण्यातून बाहेर पडले. निजामावरील मोहिमेसाठी सर्व सरदारांना आपापल्या सैन्यासह येण्याची ताकीदपत्रे रवाना करण्यात आली. इकडे निजाम कायगाव टोके, प्रवरा संगम इ. स्थळांना उपद्रव देत मराठी मुलखात बेधडक घुसला. शिंद्यांच्या चांभारगोंद्याची दैना उडवलीच पण त्यांची तेथील हवेलीही खणून काढली. निजामाचा हा जोर पाहून गोपिकाबाईने दादाला, निजामासोबत तह करण्याचा सल्ला दिला परंतु, त्याने तो जुमानला नाही. पुढे लवकरचं निजाम - पेशव्याच्या फौजांचा ठिकठीकाणी सामना जुंपला. पण त्यामुळे प्रकरण निकाली निघाले नाही. इकडे पेशव्यांनी निजामाच्या दरबारात फितुरीचे शस्त्र वापरून मीर मोगल आणि रामचंद्र जाधव यांना फोडण्यात यश मिळवले. त्याबरोबर निजामाचे अवसान गळून त्याने चाळीस लाखांचा मुलुख पेशव्यांना देऊन लढा आटोपता घेतला. ( दि. ५ जानेवारी १७६२ , उरळीचा तह )
                       मात्र असे असूनही दादाने मुद्दाम या प्रसंगी निजामाचा बचाव केला असा आरोप सरदेसाईंसारखे इतिहासकार करतात तेव्हा नवल वाटते ! त्यांच्या मते, यावेळी निजामाला साफ बुडवण्याची संधी चालून आली होती पण पुढे - मागे पेशवाई प्राप्त करण्यासाठी निजामाची मदत होईल या मनसुब्याने बापूच्या सल्ल्यावरून दादाने निजामाचा बचाव केला. वस्तुतः सिंदखेड असो, उदगीर असो कि राक्षसभवन वा खर्डा ! निजामाला पूरांथा नष्ट करण्याची लष्करी ताकद जरी पुणे दरबारात असली तरी त्यास नाहीसा करण्याची त्यांची इच्छा कधीच नव्हती.  उरळीचा तह करून दादाने निजामास जीवदान दिले असे म्हणण्यात काही अर्थ नाही. 
                     उरळीचा तह होऊन निजाम - पेशव्यातील संघर्ष तात्पुरता मिटला पण दादा - माधव यांच्यातील वाद परत उफाळून आला आणि माधवरावास वठणीवर आणण्यासाठी दादा व बापूने कारभारातून अंग काढून विरक्तीचे सोंग घेतले. परंतु, दोघांचेही अंतरंग माधवराव चांगलाच ओळखून होता. त्याने गोपिकाबाईच्या सल्ल्यानुसार बाबुराव फडणीस व त्रिंबकराव पेठ्यास कारभारावर घेतले. पण यामुळे कलह न मिटता निकालासाठी दोन्ही पक्षांनी गोपिकाबाईकडे धाव घेतली. गोपिकाबाईने यावर असा तोडगा काढला कि, सखारामाने कारभारात दखल देऊ नये आणि दादाच्या सल्ल्याने पेठे व फडणीस यांनी कारभार करावा. ( फेब्रुवारी १७६१ )  यामागील खोच अशी कि, दादाचा सर्व कारभार सखारामबापूच्या बुद्धिबळावर चालला होता. दादाच्या वैगुण्यास झाकून त्यास सांभाळून घेण्याची मल्हाररावाने जी चाल पाडली होती, त्यास अनुसरूनचं बापू देखील वागत होता. त्यामुळेच जोपर्यंत बापू, मल्हारराव, विठ्ठल विंचूरकर, दमाजी गायकवाड  आणि गंगोबातात्या प्रभूती मंडळी दादासोबत होती तोवर तो यशाची शिखरे पार करत होता. त्याउलट जेव्हा ही मंडळी त्याच्यापासून दुरावली वा काळाच्या पडद्याआड गेली दादाचे सर्व तपोबल, सर्व करमत नष्ट होऊन त्यास अपयशाचे धनी व्हावे लागले. असो, गोपिकाबाई दादाची सर्व करामत ओळखून असल्याने तिने हा तोडगा काढला, पण त्यामुळे ना दादा खुश झाला न माधव ! परंतु दोघांनीही तात्पुरता हा निकाल मान्य केला व दोघे कर्नाटकात हैदरच्या बंदोबस्तासाठी रवाना झाले खरे पण, मार्च महिन्यातच चिकोडी मुक्कामातून दादा मागे स्वारीतून फिरला. याचवेळी मल्हारराव होळकर देखील वाफगावास येऊन दाखल झाल्याने माधवरावास धास्ती पडून जून महिन्यात तो कर्नाटक स्वारी अर्ध्यात सोडून पुण्यास परतला. मल्हारराव होळकर आणि दादाची मैत्री जगजाहीर असल्याने होळकराचा पाठिंबा मिळवून दादा वर्दळीवर येतो कि काय याची माधवरावाच्या पक्षपात्यांना भीती पडली. परंतु पेशव्यांच्या गृहकलहात सक्रिय सहभाग घेण्याची मल्हाररावची मुळीच इच्छा नव्हती. उलट वडीलकीच्या नात्याने त्याने दादा - माधव यांच्यात समझोता घडवून आणण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला. त्यानुसार पेशव्याचे कारभारीपद त्रिंबकराव पेठ्याकडे कायम राहून आबा पुरंदरे व सखारामबापू या दादाच्या दोन हस्तकांच्या सरंजामाची पेशव्याने घालमेल करू नये असे उभयपक्षांनी मान्य केले. खरे, पाहता या तडजोडीने दोन्ही पक्षांचे समाधान झाले नाही. परंतु होळकराच्या भूमिकेचा अंदाज न आल्याने दोघांनीही तात्पुरता समझोता मान्य केला. माधवरावाचा अंदाज होता कि, होळकर दादास भर देऊन प्रकरण चिघळवून टाकेल वा दादा त्याची मदत घेऊन आपल्याविरोधात बंड पुकारेल. तर रघुनाथरावास होळकराच्या संपूर्ण पाठींब्याची अपेक्षा होती पण, मल्हाररावाने या दोघांच्याही अपेक्षांच्या विपरीत कार्य करून पेशवे घराण्यातील वाद मिटवण्याचा मनापासून प्रयत्न केला. असो, होळकराने काढलेला तोडगा कोणासही मान्य नव्हता आणि माधवपेक्षा दादा अधिक उतावीळ असल्याने जुलै - ऑगस्ट महिन्यात पेशव्याकडे पाच किल्ले व दहा लाखांच्या जहागिरीची मागणी केली. 
                            एक प्रकारे राज्याची वाटणी मागण्याचाच हा आरंभ होता. याच सुमारास गोपिकाबाईच्या आज्ञेवरून पटवर्धन मंडळी दादाला कैद करणार असल्याची बातमी उठली आणि त्यामुळे घाबरून जाऊन दादाने पुण्यातून पळ काढला. त्याची समजूत काढण्याचे माधवराव, गोपिकाबाई, मल्हारराव यांनी अनेक प्रयत्न केले पण दादाच्या मनातील भीती काही दूर झाली नाही. अखेर प्रकरण युद्धावर येणार याची सर्वांना कल्पना येऊन चुकली. रघुनाथरावाने आपल्या पक्षातील सरदारांना तसेच निजाम व भोसल्यांना आपल्या मदतीस येण्यासाठी पत्रे पाठवली. इकडे माधवरावाने देखील हाच उपक्रम चालवला आणि लष्करी तयारी पूर्ण होताच पेशवा स्वारीसाठी बाहेर पडला. स. १७६२ च्या नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वार्धात दादा - माधव यांच्यात अनुक्रमे घोडनदी व आळेगाव येथे दोन लढाया घडून आल्या. पैकी पहिल्या लढाईत माधवाचा विजय झाला तर दुसरीमध्ये दादाची सरशी झाली. मात्र, पेशव्याच्या फौजेतील बरेचसे सरदार फितूर झाल्यामुळे त्रिंबकराव पेठे, गोपाळराव पटवर्धन यांनी पेशव्यास तह करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार होळकरांच्या मध्यस्थीने दादा माधवमध्ये तह घडून आला. या तहान्वये पेशवेपद माधवाकडे कायम राहून त्याच्यावर आणि गोपिकाबाईवर नजरकैद लादण्यात आली. तसेच यापुढे माधवराव हा फक्त नामधारी पेशवा राहून कारभाराची सर्व सूत्रे दादाच्या हाती गेली. सत्ता हाती येताच प्रथम दादाने निजामाला सुमारे ५० ते ८५ लाख उत्पन्नाचा मुलुख व दौलताबादचा किल्ला देऊन त्याच्याशी असलेली मैत्री आणखी पक्की करण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर हैदरचा बंदोबस्त करण्यासाठी तो कर्नाटक प्रांती रवाना झाला. मार्गात मिरज येथे पटवर्धनांशी त्याचा खटका उडून त्याने मिरजेच्या किल्ल्याचा ताबा पटवर्धनांकडे मागितला. पटवर्धनांनी किल्ल्याचा कब्जा देण्यास नकार दिल्यामुळे मिरजेला वेढा घालून आपल्याच सरदारासोबत लढण्याची दादावर पाळी आली. ता. २९ डिसेंबर १७६२ ते ३ फेब्रुवारी १७६३ पर्यंत मिरजेचा संग्राम चालून अखेर किल्ला दादाच्या ताब्यात आला. दरम्यान दादा सूड घेईल या धास्तीने गोपाळराव पटवर्धनाने निजामाकडे संधान जुळवून तिकडे आश्रय घेतला. मात्र, पटवर्धनांशी युद्ध झाल्यावर देखील दादाने त्यांचा सूड न घेत त्यांच्यावर कृपावृष्टीचं केली. एक मिरज वगळता पटवर्धनांकडील सर्व प्रदेश त्याने त्यांच्याच ताब्यात परत दिला व तो पुढे कर्नाटकात रवाना झाला. 
               राक्षसभुवनवर निजामाचा पराभव, नजरकैदेतून माधवरावची सुटका :-  याच सुमारास निजाम - भोसल्यांनी एकत्र येउन पेशव्याच्या विरोधात साठ - चाळशीचा तह केला. या तहानुसार पेशव्याच्या विरोधात निजामाला सर्व तऱ्हेची मदत करण्याचे भोसल्यांनी मान्य केले. याबदल्यात पेशव्यांचा जो मुलुख मोहिमेनंतर हाती लागेल त्यात साठ टक्के वाटणी निजामाची तर चाळीस टक्के भोसल्यांची राहील असे ठरवण्यात आले. त्याशिवाय निजामाने जानोजी भोसल्यास सातारचे छत्रपतीपद मिळवून देण्याचे मान्य केले. नागपूरकर भोसल्यांशी हातमिळवणी होताच निजामाने दादाकडे आपल्या पुढील मागण्या पाठवल्या :- (१) भीमा नदीच्या पलीकडील सर्व मुलुख निजामाच्या ताब्यात देणे. (२) आजवर निजामाकडून जे काही किल्ले व महत्त्वाची स्थळे घेतली आहेत ती परत देणे. (३) पुणे दरबारने येथून पुढे निजामाच्या सल्ल्यानुसार आपला कारभार करावा.  
                निजामाच्या या चढेल मागण्यांनी दादाची धुंदी साफ उतरली. प्रसंग जाउन त्याने माधवासोबत मिळते - जुळते घेतले. माधवरावाने देखील मिळालेल्या संधीचा फायदा उचलण्याचे ठरवले. स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करण्याची हीच एकमेव वेळ असल्याचे त्या चाणाक्ष युवकाने जाणले. चुलत्याशी त्याने नम्रभाव स्वीकारून त्याच्यासोबत सख्य जोडले. दादा - माधव एकर येताच, नाराज सरदारांचे रुसवे काढून त्यांना मदतीस बोलावण्यास त्यांनी आरंभ केला. त्यानुसार पटवर्धन, होळकर वगळता बव्हंशी सरदार त्यांना येऊन मिळाले. पैकी होळकराचा यावेळी पेशव्याला मोठा आधार वाटत असून त्यास बोलावण्यासाठी दादाने नारोशंकरला वाफगावी पाठवले. पेशवा अडचणीत असून त्यास आपल्या मदतीची गरज आहे हे ओळखून होळकराने यावेळी आपल्या काही मागण्या पेशव्याकडून मान्य करून घेतल्या आणि मगच तो वाफगावातून बाहेर पडला. दरम्यान, दादा - माधव सैन्यासह निजामाच्या राज्यात घुसून औरंगाबादपर्यंत पोहोचले होते. दादाने शहरावर हल्ला चढवून शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. दादाचा मुक्काम औरंगाबादेस असताना दोन विलक्षण असे प्रसंग त्याच्या आयुष्यात घडून आले. (१) दादाचा १ वर्षाचा मुलगा भास्करराव हा त्र्यंबकेश्वर येथे मरण पावला. (२) एका गारद्याने दादावर कट्यार चालवून त्यास ठार करण्याचा प्रयत्न केला. या दोन प्रसंगांनी त्याच्यावर काय परिणाम झाले असावेत हा एक प्रकारे चर्चेचा आणि संशोधनाचाच विषय आहे पण तूर्तास इतकेच पुरे. इकडे पेशवे औरंगाबादेवर चालून गेल्याचे समजताच निजाम - भोसले त्यांच्या पाठीवर धावून आले. तेव्हा पेशव्यांची फौज औरंगाबाद सोडून वऱ्हाडात शिरली. मल्हाररावाच्या सल्ल्याने पेशवा यावेळी गनिमी काव्याचे युद्ध खेळत होता. होळकराच्या रणनीतीला तोंड देण्यासाठी निजामाने वेगळाच डाव रचला. त्याने आपल्या लष्कराचे तीन भाग करून एक त्याने नाशिक प्रांती रवाना केला. दुसरा विभाग घेऊन तो स्वतः नगरला तळ ठोकून राहिला तर तिसरा विभाग भोसल्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेला. 
                     निजाम - भोसल्यांच्या सरदारांनी पुण्याची राखरांगोळी करून टाकली. शहराचा बचाव करण्यासाठी पुणेकरांनी गोपाळराव पटवर्धनाकडे निरोप पाठवले खरे पण निजाम पटवर्धनाचे थोडी ऐकून घेणार ? कधी नव्हे ती पेशव्याची राजधानी लुटण्याची त्यास संधी मिळाली होती, हि संधी साधून त्याने पेशव्यांचे नाक कापून टाकले ! पुण्याच्या दुर्दशेची बातमी समजताच पेशव्याने हैद्राबादची वाट लावून टाकली. परंतु यामुळे दोन्ही पक्ष चीडीस पेटण्यापलीकडे काही साध्य झाले नाही. अखेर ता. १० ऑगस्ट १७६३ रोजी गोदावरीनजीक राक्षसभुवन येथे निजाम - पेशव्यांची एक मोठी लढाई घडून आली. तत्पूर्वी भोसल्याला निजामाच्या गोटातून फोडण्यास पेशव्याला यश मिळाले होते. भोसल्यांनी दगा दिल्याचे समजताच युद्धाच्या आदल्याच दिवशी निजाम गोदावरी पार करून गेला होता. परंतु त्याची मुख्य फौज अजून अलीकडेच होती. तेव्हा पेशव्याने तातडीने त्या सैन्यावर हल्ला चढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० ऑगस्ट रोजी मराठी पथके निजामाच्या फौजांवर तुटून पडली. पण युद्धाच्या पूर्वार्धात निजामाच्या फौजांनी मराठी पथकांचा चांगलाच समाचार घेत खुद्द दादाला कैद करण्याचा प्रयत्न केला. परंतु होळकर व माधवरावाने फिरून बळ बांधून चढाई केल्याने युद्धाचे पारडे फिरले. निजामाचा मुख्य सेनानी व दिवाण विठ्ठल सुंदर मारला गेल्याने  निजामाची फौज पळत सुटली व पेशव्याला मोठा विजय प्राप्त झाला. राक्षसभुवनच्या संग्रामानंतर भोसले - पेशवे यांची भेट घडून पेशव्याने त्यांना अशीरगडचा किल्ला व तीस लाखांचा मुलुख देऊन राजी राखले.   गोपाळराव पटवर्धन देखील निजामाचा पक्ष सोडून पेशव्याच्या गोटात परतला. इकडे निजामाने औरंगाबादेस जाउन तहाच्या वाटाघाटींना आरंभ करत आतल्या अंगाने फौजेची जुळवाजुळव चालवली. तेव्हा पेशव्याने औरंगाबादेवर चढाई केली. त्यावेळी उभयतांचे कित्येक संग्राम घडून आले व त्यात अनेकदा निजामाच्या सैन्याला मार खावा लागला. तेव्हा त्याने उदगीरच्या तहातील साठ लाखांचा व नव्याने आणखी बावीस लक्षांचा मिळून ब्याऐंशी लाख उत्पन्नाचा प्रदेश पेशव्याला देऊन समेट करून घेतला. 
              निजाम - पेशवे संघर्षाची चर्चा तपशीलवार करण्याचे मुख्य कारण म्हणजे, हाच तो प्रसंग होता कि, माधवरावाचे सुप्त तेज तळपून त्याच्यासमोर दादा काहीसा तेजोहीन झाला. निजामावरील मोहिमेत दादाने पेशव्यावर लादलेले सर्व निर्बंध हळूहळू सैल होत जाउन स्वकर्तुत्वाने पेशवा स्वतंत्र झाला. परिणामी, येथून पुढे त्यास कैदेत ठेवण्याची दादाची हिंमत झाली नाही. मात्र या ठिकाणी दादाच्या खुल्या मनाची तारीफ करावी लागेल. राक्षसभुवनचा संग्राम घडून गेल्यावर त्याने गोपिकाबाईला लिहिलेल्या पत्रात माधव विषयी पुढील गौरवोद्गार काढले आहेत :- " चिरंजीव रायांनी यंदा मेहनतीत व शिपाईगिरीत कमी केली नाही. आम्हांपेक्षा अधिक झाले." निजामासोबत तह घडून आल्यावर पेशवा २ नोव्हेंबर १७६३ रोजी पुण्यास परतला तर दादा नाशिकला निघून गेला. 
  दादा - माधव यांचे शीतयुद्ध :- नाशिक मुक्कामी स्नान - संध्या करून राहण्याचा दादाचा आरंभी निश्चय होता. स. १७६४ च्या पूर्वार्धात तो त्र्यंबकेश्वरी गेला. तेथून नाशिकजवळ चावंडस गावी त्याने स्वतःसाठी वाडा बांधून घेतला. नंतर अग्निहोत्र घेण्याचा मनोदय व्यक्त करून त्या तयारीस लागला खरा परंतु, संकल्प करण्याच्या वेळी त्याचे मन पालटले व त्याने अग्निहोत्र घेण्याचा बेत रद्द केला. या सुमारास हैदरचा बंदोबस्त करण्यासाठी माधवराव कर्नाटकात तळ ठोकून बसला होता. अशा वेळी पुरंदरचे प्रकरण उद्भवून दादा - माधव यांच्यातील कृत्रिम स्नेहभाव भंग पावून त्यांच्यात एकप्रकारे शीतयुद्धाचा भडका उडाला. 
                         पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी शिवपुत्र राजारामाने वंशपरंपरेने कोळी व बेरडांना स. १६९१ मध्ये दिली होती. स. १७६४  पर्यंत या किल्ल्याचे मालक बदलले पण संरक्षक कामगार मात्र तेच राहिले. पुढे आळेगावी माधव दादाच्या कैदेत पडल्यावर दादाने पुरंदर किल्ला आबा पुरंदरेच्या ताब्यात दिला.  स. १७६४ मध्ये पुरंदरावरील कोळी - बेरडांचे आणि आबा पुरंदरेचे काही कारणांनी खटकले व आबाने कोळी - बेरडांना नोकरीवरून दूर करून नवीन माणसे किल्ल्याच्या बंदोबस्ताला नेमली. यामुळे कोळी - बेरड बिथरले. त्यातच पुरंदरे कुटुंबातील भाऊबंदकीचा देखील या प्रकरणास संदर्भ आहे. त्यांनीही आबाच्या विरोधात कोळी - बेरडांना फूस लावली. दरम्यान स. १७६४ च्या उन्हाळ्यात आबा, दादाला भेटण्यास नाशिकला गेला असता, कोळी - बेरडांनी विसाजीपंत सानेच्या चिथावणीवरुन पुरंदरवर हल्ला चढवून पेशव्याच्या नावाने तो किल्ला ताब्यात घेतला. वस्तुतः यामागे माधवाचा अजिबात हात नव्हता. मात्र या कारस्थानात दादाचे अंग निश्चित होते.                                      
                   दादाचे एक स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे त्याचे एक मन नेहमी निवृत्तीकडे ओढ घेत असे तर दुसरे राजसत्तेकडे ! त्यामुळे त्यचे ठाम मत असे कधी बनलेच नाही. यावेळी देखील त्याच्या संन्यस्त मनावर राजकीय महत्त्वकांक्षेने मात केली. विसाजीपंतास हाताशी धरून दादाने पुरंदरचा किल्ला आपल्याच हस्तकाच्या ताब्यातून काढून घेतला. यामागे त्याचे अनेक हेतू होते. माधवरावाने आपणांस पूर्णतः निष्प्रभ करून सत्ता हाती घेतल्याचे शल्य त्याच्या पोटांत डाचत होते. माधवसोबत एखादी  निर्णायक लढाई झाल्याखेरीज आपल्याला पेशवाई वा राज्याची वाटणी मिळणार नाही हे तो पूर्णपणे जाणून असला तरी त्याचे संन्यस्त, धार्मिक मन राज्यलोभास्तव पुतण्यावर निकराने शस्त्र चालवण्यास धजत नव्हते. तरीही त्याचे सत्तालोलुप मन त्यास राजकीय खटपटी करण्यास प्रवृत्त करायचे आणि त्यावेळी तो सर्व धर्मशास्त्र बाजूला ठेऊन राजकारण खेळायचा.  दादाच्या मुख्य मनातील या पोटमनांचा संघर्ष अविरत चालला आणि अखेरपर्यंत बुद्धीऐवजी मनाच्या कलाने चालत दादाने सदैव अपयशाचे तोंड पाहिले. असो, पुरंदरचे प्रकरण देखील असेच त्याने उपस्थित केले. कोळी - बेरडांच्या दंग्याशी त्याचा संबंध नव्हता पण, त्या दंग्याचा त्याने फायदा उचलून पुरंदरसारखे बचावाचे भक्कम ठिकाण आपल्या ताब्यात घेतले. आबा पुरंदरेस दादाची हि खेळी समजताच तो पुरता खचला. त्याने दादाची भेट घेणे देखील टाळले इतका तो नाराज झाला. इकडे, माधवरावाच्या लक्षात आले कि, दादाला मोकळे सोडल्यास तो असेच उपद्व्याप करत बसणार. तेव्हा कर्नाटक स्वारीत सहभागी होण्यासाठी त्याने दादाला विनंती केली आणि त्यानुसार दादा कर्नाटकांत रवाना झाला. मात्र यावेळी माधवरावच्या विरोधात युद्ध पुकारण्याकडे त्याच्या मनाचा कल झुकत चालला होता हे निश्चित !  
                            स. १७६५ च्या जानेवारी अखेरीस दादा - माधव यांची हरपनहळळीला भेट झाली. यावेळी हैदरचा पुरता बंदोबस्त होण्याची वेळ आली होती. आणखी थोडा नेट केला असता ते संस्थान पेशव्याच्या ताब्यात आले असते परंतु, दादाने पेशव्यास हैदरसोबत तह करण्याची गळ घातली. हैदरदेखील यावेळी तहासाठी अत्यंत घायकुतीला आल्याने आणि मोहीम बराच काळ चालल्याने माधवरावाने तहास संमती दिली. त्यानंतर उभयतां पुण्यास परतले व काही दिवसांनी दादाने राज्याच्या अर्ध्या वाटणीची मागणी माधवरावाकडे केली. परंतु, माधवरावाने चुलत्याची समजूत काढून त्यांस स्वतंत्रपणे उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर रवाना करण्याचा निर्णय घेऊन प्रस्तुत प्रसंगी वेळ मारून नेली. स. १७६५ च्या सप्टेंबरात दादा उत्तरेत रवाना होण्यास डेरेदाखल झाला खरा पण, याच सुमारास नागपूरकर भोसल्यांचे प्रकरण वर्दळीवर आल्याने खासा माधवराव भोसल्यांवर चालून गेला व दादाने भोसल्यांशी संधान बंधू नये म्हणून त्यास देखील आपल्या सोबत घेतले. याच सुमारास निजाम - भोसल्यांचा लढा सुरु असून औरंगाबादच्या तहातील एका कलमानुसार निजामाने पेशव्याकडे कुमकेची याचना केली. तेव्हा निजाम, भोसले व दादा यांच्यावर एकाच चालीत शह बसवण्यासाठी पेशव्याने निजामाच्या साहाय्यास जाण्याचा निर्णय घेतला. निजाम - पेशवे एकत्र आल्याने भोसल्यांचा नाईलाज होऊन त्यांनी शरणागती पत्करली. स. १७६६ च्या जानेवारीत भोसले - पेशवे यांचा तह होऊन भोसल्यांनी चोवीस लाख उत्पन्नाचा प्रदेश पेशव्यास दिला . पैकी ९ लक्षांचा प्रांत माधवाने आपल्याजवळ ठेवून उर्वरीत पंधरा लाख उत्पन्नाचा मुलुख निजामाला देऊन त्याच्याशी मैत्री जोडली. 

रघुनाथरावाची अखेरची उत्तर स्वारी :- भोसल्यांचे प्रकरण निकाली निघाल्यावर दादा उत्तरेत रवाना झाला. यावेळी उत्तरेतील राजकीय परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची झाली होती. बंगाल - बिहारमध्ये इंग्रजांचे वर्चस्व वाढून तेथील संस्थानिक इंग्रजांच्या कह्यात गेले होते. खुद्द मोगल बादशहा देखील इंग्रजांच्या कच्छपी लागला होता. आगऱ्यात जाटांचे प्रस्थ अतोनात वाढले असून राजपूत संस्थानिक देखील पूर्वीसारखे मराठी सरदारांना वचकून राहात नव्हते. दिल्लीची वजिरी नावालाच गाजिउद्दिनकडे असली तरी तो स्वतः जीवाच्या भीतीने दिल्लीच्या बाहेर भटकत होता. दिल्लीत अब्दालीचा हस्तक नजीबखान सर्वाधिकारी होऊन बसला असला तरी मोडकळीस आलेल्या बादशाही डोलाऱ्यास सावरण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. पंजाबात शिखांचा उदय होऊन त्यांनी अब्दाली, मोगल व मराठे यांना तेथून बाहेर काढण्याचा उपक्रम चालवला  होता. सारांश, दादाच्या प्रथम उत्तर हिंदुस्थान स्वारीच्या वेळी जी राजकीय परिस्थिती होती,  जवळपास तशीच याही वेळी होती. फरक फक्त इतकाच होता कि, शिंदे - होळकर त्यावेळी पूर्ण भरात होते आणि पुणे दरबार देखील एकसंध होता. परंतु आता स्थिती पालटली होती. पानिपतावर शिंदे घराण्याचा निकाल लागून त्यांच्या सरदारीच्या वारसाचा प्रश्न अजून न सुटल्याने उत्तरेची सर्व जबाबदारी मल्हारराव होळकराच्या अंगावर येउन पडली. त्यानेही परिस्थिती पाहून बंगाल, बिहार, दिल्ली, पंजाब इ. आहाराबाहेरील प्रदेशांवर ताबा बसवण्याचा नाद सोडून माळवा, आग्रा, राजपुताना इ. प्रांतांतच आपले सर्व बळ व लक्ष केंद्रित केले. याकामी महादजी शिंदेची त्याला मदत असून, मल्हाररावाच्या मदतीने आपल्या घराण्यातील सरदारकीचा बचाव करण्याचा त्याचा प्रयत्न चालला होता. पानिपतपूर्व मराठी राज्याची प्रतिष्ठा व दरारा कायम राखण्याच्या प्रयत्नात होळकरास इंग्रज  - सुजा यांच्या झगड्यात पडावे लागले. याप्रसंगी  होळकराने इंग्रजांना चांगलाच हात दाखवला.   
                  उत्तरेत या घडामोडी घडत असताना दादाची स्वारी स. १७६६ च्या एप्रिलमध्ये झाशीजवळ आली. यावेळी मल्हारराव आणि महादजी गोहदला मोर्चे लावून बसले होते. पुढे यथावकाश शिंदे - होळकरांच्या सोबत दादाची भेट घडून आली खरी पण पुढील उपक्रम निश्चित करण्यापूर्वीच ता. २० मे १७६६ रोजी आलमपूर जवळ  मल्हारराव होळकराचे निधन झाले. त्यामुळे दादाच्या उत्तर स्वारीचा पुरता बोजवारा उडून गेला. कारण, महाभारतात ज्याप्रमाणे कृष्णावतार समाप्त झाल्यावर अर्जुन हा एक अतिसामान्य धनुर्धर बनून राहिला तद्वत मल्हाररावाच्या मृत्यूने राघोबाची सर्व भरारी संपुष्टात आली. असो, मल्हाररावच्या मृत्यूनंतर त्याची सुभेदारी मालेराव होळकर -- या त्याच्या नातवास प्राप्त झाली आणि त्याचा दिवाणी कारभार अहिल्याबाई तर लष्करी व्यवस्था तुकोजी होळकर पाहू लागले. इकडे शिंदे - होळकरांच्या फौजा गोहदला वेढा घालून बसलेल्या होत्या. उत्तरेत आल्यावर दादाने या मोहिमेची सूत्रे आपल्या हाती घेतली. दरम्यान राघोभरारी उत्तरेत आल्याचे समजताच मोगल बादशहाने त्यास त्वरेने आपल्या मदतीसाठी येण्याची पत्रे पाठवली. परंतु जाटाचा प्रश्न निकाली काढल्याखेरीज दादाला पुढे जाता येईना व जाट काही सहजासहजी ऐकेना ! तेव्हा दादाने कलकत्त्यास पत्रे पाठवून इंग्रजांकडे मदतीची मागणी केली. यावेळी विजयदुर्गचा ब्रिटीश विजेता रॉबर्ट क्लाइव्ह कलकत्त्यास अधिकारावर होता. त्याने दादाला मदत देण्याच्या बाबतीत आपली असमर्थता व्यक्त केली. दरम्यान मोहिमेत खंडणीची प्राप्ती न झाल्याने फौजेचा खर्च भागवणे मोठे जिकीरीचे बनले. अशा प्रसंगी दादाने पुण्याकडे पत्र पाठवून खजिन्याची मागणी केली, पण यावेळी खुद्द पेशवा आर्थिक संकटात असल्याने दादाची मागणी पूर्ण करण्यास तो असमर्थ होता. अशात स. १७६६ संपून १७६७ चे नवीन वर्ष उगवले. नव्या वर्षासोबत नवीन राजकारणांचा देखील उदय होऊन मराठ्यांच्या विरोधात बहुसंख्य जाट संस्थानिक एकत्र येउन त्यांच्या मदतीला रोहिला सरदार देखील येण्याची चिन्हे दिसू लागली. पंजाबात शिखांचा जोर वाढून ते दिल्लीवर चालून येण्याची शक्यता दिसत होती. अशा परिस्थितीत आपला निभाव लागणे शक्य नसल्याचे दादाने ओळखले. कसाबसा त्याने गोहदकराशी समझोता करून परतीचा रस्ता धरला. याच सुमारास म्हणजे ता. २७ मार्च १७६७ रोजी मालेराव होळकराचा मृत्यू होऊन होळकरशाहीचा नवा वारस नेमण्याची संधी दादासमोर चालून आली असे सामान्यतः म्हटले जाते परंतु त्यात तथ्य नाही.
                       मल्हाररावच्या मृत्युनंतर गंगोबाचे कारभारी म्हणून महत्त्व घटले होते. तसेच मल्हारबापेक्षा या गंगोबाशीच दादाची अधिक जवळीक होती. दादाची महत्त्वकांक्षा मल्हारी व गंगोबा दोघेही जाणून होते. परंतु दादाला आळ्यात ठेवण्याचा मल्हारबाचा उपक्रम असून त्याविपरीत दादाला चिथावणी देण्याचा गंगोबाचा क्रम होता. मालेराव मरण पावल्यावर होळकरशाही निराधार झाली. अहिल्याबाई राज्यकारभारात दक्ष असली तरी सरदारकी कोणाच्या नावे द्यायची हा एक मोठा प्रश्नचं होता. अशा परिस्थितीत होळकरांची सरदारकी आपल्या मर्जीतील इसमास देऊन होळकरांची दौलत व सैन्य सोबत घेऊन पेशवाईसाठी यत्न करण्याचा दादाचा मानस होता आणि गंगोबाचे त्यास अनुमोदन होते. त्यानुसार दादाने होळकरांचा सरंजाम जप्त करण्यासाठी शेट्याजी आयतोळा व आनंदराव गोपाळ या आपल्या दोन सरदारांना पाठवले. इकडे दादाची वाकडी चाल पाहून अहिल्याबाईने पुत्रशोक बाजूला ठेऊन युद्धाची तयारी चालवली. दादाच्या सरदारांना रोखण्यासाठी आपली पथके सरदार बुळेच्या नेतृत्वाखाली रवाना करून घडल्या प्रकाराची माहिती पत्राद्वारे माधवरावास कळवली. सरदार बुळे यांनी दादाच्या सैन्याचा पराभव करून लढाईमध्ये आयतोळा यास ठार केले. यामुळे दादाचा संताप अनिवार होऊन त्याने शिंदे, भोसले, गायकवाड या सरदारांना होळकरांवर चालून जाण्याची आज्ञा केली. परंतु, या सरदारांनी दादाची आज्ञा जुमानली नाही. दरम्यान माधवरावाने अहिल्याबाईस पत्र पाठवून, प्रसंग पडल्यास दादाच्या विरोधात शस्त्र उपसण्याची  दिली तसेच आपल्या मर्जीतील दोन इसम तातडीने पुण्यास पाठवून सरदारकीचा बंदोबस्त करून घेण्याचा हुकुम केला. इकडे दादाने सर्व रागरंग पाहून अहिल्याबाईसोबत तडजोड आरंभली आणि पुत्रनिधनाच्या सांत्वनार्थ ३० मार्च १७६७ रोजी इंदूर येथे तिची भेट घेतली. होळकरांच्या कारभारात हात घालून फजित पावल्यावर दादाने गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. गोपिकाबाईस लिहिलेल्या पत्रानुसार गायकवाडास जरब देण्याचा त्याचा मानस असल्याचे दिसून येते. परंतु, खरे पाहता हे सर्व नाटक होते. दमाजी गायकवाड हा दादाचा पक्षपाती असून त्याच्याशी संधान जुळवून पेशव्याच्या विरोधात लढा पुकारण्याचा दादाचा बेत होता. ठरवल्याप्रमाणे दादा गुजरातला गेला नाही. अंतस्थरित्या त्याने आपले कार्य साधून घेतले व स. १७६७ च्या जूनमध्ये तो आनंदवल्लीला परतला. याच सुमारास कर्नाटक स्वारी मर्यादित प्रमाणात यशस्वी करून विजयी पेशवा माधवराव देखील पुण्यास आला होता. 
             धोडप येथे दादाचा पराभव व कैद :-   पेशवा पुण्यास येताच दादाने परत एकदा राज्याच्या वाटणीचा विषय काढला व फौजांची जमवाजमाव सुरु केली. पेशव्यानेदेखील सैन्याची तयारी करत दादासोबत वाटाघाटींची तयारी दर्शवली. अखेर स. १७६७ च्या दसऱ्यास उभयतांचा तह घडून आला. त्यानुसार दादाने सातारा, नगर, शिवनेरी व अशीरगड हे चार किल्ले पेशव्याच्या ताब्यात देण्याचे मान्य केले. तसेच राज्यकारभारात हस्तक्षेप न करण्याची पेशव्याची अट देखील मंजूर केली. त्याबदल्यात दादाच्या उत्तर स्वारीत झालेले २५ लाखांचे कर्ज वारण्याची हमी पेशव्याने घेतली आणि दादाच्या निर्वाहासाठी दहा लक्ष उत्पन्नाची जहागीर तोडून देण्याचे मान्य केले. सारांश, परत एकदा दादा - माधव यांचा वरकरणी समेट होऊन पेशवा पुण्यास परतला. परंतु माधव पुण्यास रवाना झाल्यावर दादाने आपले हस्तक निजाम, भोसले, हैदर, इंग्रज, गायकवाड इ. कडे रवाना केले व पेशवाई प्राप्त करण्यासाठी आपणास सहकार्य करावे अशी विनंती केली. याच सुमारास हैदरच्या विरुद्ध मदत मागण्यासाठी इंग्रज वकील मॉस्टिन पुण्याला आला होता. दादा - माधव यांच्यातील संघर्ष इंग्रजांना माहिती असल्याने मॉस्टिनने आपला सहकारी ब्रोम यास दादाकडे पाठवून दादाचे मनोरथ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ब्रोम सोबत झालेल्या चर्चेत दादाने त्यास उघडपणे विचारले कि, पेशव्याच्या विरोधात लढण्यासाठी इंग्रज आपणांस तोफा व दारुगोळ्याचा पुरवठा करतील का ? परंतु, माधवराव पेशव्याच्या सामर्थ्याची कल्पना असल्याने ब्रोमने दादाला कसलेही आश्वासन दिले नाही. दरम्यान, दादाचे अंतस्थ बेत माधवास समजून त्याने चुलत्याच्या बाबतीत कडक धोरण स्वीकारण्याचे निश्चित केले. विना लढाई दादा हाती येणे शक्य नसल्याने माधवाने सर्व सरदारांना पत्र पाठवून आपल्या मदतीस येण्याची आज्ञा केली. दादाने देखील आपल्यातर्फेने सर्व सरदारांकडे आणि पुणे दरबारच्या शत्रूंकडे पत्रांची झोड उठवली. त्याचप्रमाणे स. १७६८ च्या एप्रिलमध्ये गोविंदपंत भुस्कुटे यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा दत्तक घेऊन त्याचे नाव अमृतराव असे ठेवले. दत्तकाची वस्त्रे व साखर त्याने माधवरावाकडे पाठवली पण त्याने त्यांचा स्वीकार केला नाही. 
                  दत्तकपुत्र घेऊन दादाने पेशवे कुटुंबातील कलहाग्नीत तेल ओतण्याचे कृत्य केले. दादा जेव्हा - जेव्हा राज्याच्या वाटणीचा विषय काढत असे तेव्हा तेव्हा माधवराव  त्याचा पुत्र म्हणवून विषयाला बगल देत असे. मात्र, दत्तक का होईना पण दादास आता पुत्रसंतान असल्याने माधवाची ती पळवाट बंद झाली. त्याचप्रमाणे दादाच्यामागे पेशवाईसाठी आणखी एक दावेदार उभा राहिला तो निराळाच ! 
                     दादाला लष्करी तयारीसाठी उसंत मिळू न देत पेशवा त्वरेने चालून येऊ लागला. हाताशी लागेल तेवढी फौज घेऊन दादा धोडप किल्ल्याच्या आश्रयास गेला. होळकरांची फौज गंगोबातात्याच्या नेतृत्वाखाली दादाच्या गोटात दाखल झाली. गायकवाडांची लष्करी पथके दमाजीपुत्र गोविंदरावाच्या नेतृत्वाखाली दादाच्या मदतीस धावली. शिंद्यांच्या सरदारकीचा औरस मालक केदारजी शिंदे देखील दादाला येउन मिळाला. उर्वरीत सरदार पेशव्याच्या निशाणाखाली गोळा झाले. धोडपजवळ संग्राम होणार हे उघड होते पण आयत्यावेळी दादाच्यात लपलेला शास्त्री - पुराणिक बाहेर आला आणि त्याने आपण संग्रामात सहभाग घेत नसल्याचे जाहीर केले. कारण युद्धात एकतर माधव राहील वा मी, आणि जर तो मारला गेला तर माझ्याकडून पुत्रहत्या घडेल अथवा उलट झाल्यास त्याच्याकडून पितृहत्या घडेल असा शास्त्रार्थ त्याने काढला. तेव्हा लढाईची सर्व जबाबदारी गंगोबा, चिंतो विठ्ठल रायरीकर, सदाशिव रामचंद्र इ. सरदारांवर येउन पडली. दि. १० जून १७६८ रोजी उभयपक्षांच्या फौजांचा संग्राम घडून त्यात दादाच्या सैन्याचा पराभव होऊन त्याचे कित्येक मदतनीस पेशव्याच्या ताब्यात आले. निरुपाय जाणून लढाईच्या दुसऱ्या दिवशी दादाने शरणागती पत्करली. २२ जून रोजी मोठ्या सन्मानाने पेशव्याने दादाला पुण्यास परत आणले. दादाच्या ताब्यातील सर्व किल्ले, प्रदेश जप्त करण्यात येउन त्यास शनिवारवाड्यात नजरकैदेत ठेवण्यात आले. मात्र, राजकीय प्रकरणात सहभाग न घेण्याचे बंधन वगळता त्यावर इतर कोणतेही निर्बंध लादले गेले नाहीत. येथून पुढे कैदेत असताना उपवास, व्रत, अनुष्ठान इ. धार्मिक कृत्ये करण्यात व कैदेतून पळून जाण्याचे उद्योग करण्यात दादाने काही दिवस घालवले. 
       माधवराव पेशव्याचा मृत्यू :- दादाला कैदेत टाकल्यावर माधवने राज्यकारभाराची घडी बसवण्याचे कार्य हाती घेतले. अजून त्याच्यापुढे कामांचे पुष्कळ डोंगर पडले होते परंतु, क्षयाचा विकार बळावल्याने माधवास आपल्या आयुष्याची मर्यादा समजून आली. आपल्या पश्चात मुत्सद्दी नानासाहेबांच्या वंशजास -- म्हणजे आपल्या धाकट्या भावास -- नारायणरावास गादीवर बसवण्याचा आग्रह धरणार आणि अनुभवशून्य व अविवेकी नारायणास हि जबाबदारी पेलवणार नाही याचीही माधवास कल्पना होती. भावी संकट जाणून त्याने स. १७७२ च्या मार्चमध्ये दादास कैदेतून मोकळे केले. सखारामबापूने नारायणरावास जवळ बसवून त्यास राज्यकारभार शिकवावा अशी आज्ञा केली. तसेच आपल्या माघारी दादाचे काय स्थान असावे यावर त्याने बराच विचार केला. ता. ३० सप्टेंबर १७७२ रोजी माधवरावाने जी नऊ कलमांची यादी लिहून त्यावर कारभाऱ्यांची काबुलात लिहुन घेतली, त्यातील एका कलमानुसार दादाच्या खर्चास पाच लाखांची जहागीर लावून द्यावी -- फार तर सात लक्षांची जहागीर द्यावी पण अधिक काही देऊ नये अशी त्याने कारभाऱ्यांना लेखी आज्ञा केली. 
                 पुढे लवकरच दि. १८ नोव्हेंबर १७७२ रोजी थेऊर मुक्कामी माधवरावाचे निधन झाले. त्याच्या अखेरच्या दिवसांत दादाचा मुकाम थेऊर येथेच होता.  मृत्युसमयी त्याने नारायणरावाचा हात दादाच्या हाती दिल्याची नोंद मिळते. परंतु त्यातून नारायणाने दादाच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार करावा असे सुचित होत नाही. आपल्या पश्चात दादाची व्यवस्था कशी असावी आणि त्याचे या राज्यात स्थान काय राहील हे माधवाने आपल्या मृत्यूपूर्वीचं  निश्चित केले होते. असो, ता. ३ डिसेंबर १७७२ रोजी नारायणराव पेशवेपदाची वस्त्रे घेण्यास साताऱ्यासनिघाला. त्यावेळी त्याने दादाला सोबत येण्याची विनंती केली असता दादाने २५ लाखांचा सरंजाम व चाकरीची संधी देण्याची मागणी केली. परंतु सर्व राज्य तुमचेचं आहे असे म्हणून नारायणाने दादाची मागणी फेटाळून लावली. नारायण व माधवच्या स्वभावात बरेच अंतर होते. माधव जितका कोपिष्ट तितकाच समजूतदार होता पण नारायणाचे तसे नव्हते. तापटपणाच्या बाबतीत तो माधवरावचे अनुकरण करत असे पण त्याचा समजूतदारपणा नारायणाकडे नव्हता. दादाने हे ओळखून असल्याने त्याने नारायणास फार न डिवचता, तूर्तास पड खाउन साताऱ्यास जाण्याचे मान्य केले. दि. ५ डिसेंबरला उभयतां साताऱ्यास गेले व ता. १३ डिसेंबर १७७२ रोजी नारायणास पेशवेपदाची व बापूस मुख्य कारभाऱ्याची वस्त्रे मिळून नाना आणि मोरोबा यांना फडणीशी प्राप्त झाली. ता. ३१ डिसेंबर १७७२ रोजी दादा - नारायण पुण्यास परतले. 
                                                                            ( क्रमशः ) 
                                 

      
                     
                            
                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: