गुरुवार, २० जून, २०१३

पेशवे - इंग्रज यांची आंग्रेविरुद्ध मोहीम ( भाग - ३ )

                                          ( उपसंहार )      
                विजयदुर्गच्या संग्रामात तुळाजीच्या अधिपत्याखालील असलेल्या आरमारापैकी बव्हंशी जहाजांचा निकाल लागून मराठी नौदलाची सत्ता खालावली. या दोषाचे खापर राज्यचालक या नात्याने पेशवा बाळाजी बाजीराव याच्यावर फोडणे कितपत योग्य आहे ? वस्तुतः या प्रश्नावर राजवाडे, शेजवलकर, सरदेसाई प्रभूती दिग्गज इतिहासकरांनी आपापली मते मांडली आहेत. प्रस्तुत ठिकाणी त्यांच्या मतांचा विचार न करता आपणांस या प्रश्नाची स्वतंत्रपणे चर्चा करायची आहे. 
                       सर्वप्रथम आंग्रे - पेशवे यांचे वितुष्ट पडण्याचे काय कारण होते याचा शोध घेणे योग्य ठरेल. दंतकथा, वदंता, प्रवाद इ. स्वरूपाच्या भाकडकथांना खरे मानण्याची एक थोर अशी परंपरा आपल्या इतिहासकरांनी मोठ्या निष्ठेने जपली आहे. तुळाजीवर पेशव्याची वक्रदृष्टी होण्याचे एक प्रमुख कारण काय तर म्हणे, तुळाजी हा चित्पावनी ब्राम्हणांचा द्वेष / छळ करत असे. या बाष्कळ, फालतू कारणावर सरदेसाईंच्यापासून एस. एन. सेन सारख्या इतिहासकारांचा देखील पूर्णतः नसला तरी काही प्रमाणात विश्वास असल्याचे दिसून येते. या विधानात कितपत तथ्य आहे ? उपलब्ध माहिती पाहता या विधानात अजिबात तथ्य नाही. हे विधान / कारण कोणाच्या सुपीक मेंदूतून बाहेर पडले आहे हे समजायला मार्ग नाही पण, आंगऱ्यांचा पराभव पेशव्यांनी केला व पेशवे हे चित्पावनी होते हाच धागा मनाशी घट्ट पकडून उपरोक्त तर्क मांडण्यात आला आहे. जणू काही पेशव्यांनी ' चित्पावनी तितुका मेळवावा ' अशी साद घालून सर्व चित्पावनी ब्राम्हणांचा संघ उभारून तुळाजीचा पराभव केला होता !  या हिशोबाने मग इंग्रज देखील चित्पावनीच ठरतात त्याचे काय ?
                 मुळात आंगऱ्यांचा नायनाट करण्याची इच्छा हि मूळची बाजीराव पेशव्याची होती याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जावे यासाठीच हा सर्व उपद्व्याप करण्यात आला असावा. कदाचित शिवाजीच्या बरोबरीने बाजीरावास उभे करण्याच्या कामी या आंग्रे प्रकरणाने अडथळा येत असल्याने याकडे मुद्दाम कानाडोळा केला जात आहे. असो, स. १७३४ मध्ये तर ना बाळाजी बाजीराव पेशवा होता ना तुळाजी आंग्रे सरखेल होता ! त्यावेळी बाजीराव पेशवा असून संभाजी आंग्रे सरखेल होता. संभाजीने चित्पावनी ब्राम्हणांचा छळ केल्याचे कोणी लिहित नाही मग बाजीरावास आंगऱ्यांचा विरोधात पोर्तुगीजांची मदत मागण्याची अवदसा का सुचावी ? याचे मूळ शाहू छत्रपती व सातार दरबारातील भानगडींमध्ये आहे. शाहू छत्रपती दुबळा असल्याची स्पष्ट जाणीव एव्हाना दरबारातील सर्व मुत्सद्द्यांना झाली होती आणि या गोष्टीचा फायदा घेऊन प्रत्येकजण छत्रपतीला आपल्या बगलेत मारून आपापले प्रस्थ वाढवण्याच्या प्रयत्नात होते. सारांश, मोगल व सातार दरबारात एकाच वेळी धन्याला गुंडाळून आपापले महत्त्व वाढवण्याची नोकरांची जीवघेणी व राज्यबुडवी स्पर्धा चालली होती. या स्पर्धेत दिल्ली दरबारात जे महत्त्व निजामाचे तेच साताऱ्यास आता बाजीरावाचे बनत चालले होते. मात्र निजामाला ज्याप्रमाणे दिल्लीपासून दूर दक्षिणेत निर्वेध असे कार्यक्षेत्र मिळाले तसे बाजीरावास मिळणे शक्य नव्हते. त्यासाठी त्याला आपला रस्ता साफ करणे भग होते. या कामात एक बाजीरावचं तेवढा पुढे होता असे नाही तर सेनापती दाभाड्यांची देखील तीच मनीषा होती. परिणामी डभईचा प्रसंग उद्भवून त्यात सेनापती दाभाडे बाजीरावसोबत लढताना मारला गेला. त्यामुळे पेशव्याच्या मार्गात उघडपणे आडवे येण्याचे धाडस करण्यास सातार दरबारातील मुत्सद्दी कचरु लागले. मात्र जो कोणी जबरदस्त असेल त्यास पेशव्याच्या विरोधात चिथावणी देण्याचा त्यांचा उपद्व्याप सुरुचं राहिला. इथपर्यंत तरी आंगऱ्यांचा व पेशव्याचा उघड वा सुप्त संघर्ष उद्भवला नव्हता. मात्र स. १७३३ मध्ये सेखोजी आंग्रेचा मृत्यू झाल्यावर संभाजी सरखेल बनला आणि बाजीरावाच्या महत्त्वकांक्षेला नवीन भक्ष्याचा वास येऊ लागला. 
                    सातारच्या दरबारातील दाभाडे, आंग्रे, जाधव, भोसले प्रभूती सरदार नाही म्हटले तरी जुन्या नामवंत घराण्यातील होते. तुलनेने भट घराण्याची बाजीरावाच्या रूपाने दुसरीचं पिढी स्वराज्याच्या सेवेत दाखल झाली होती. त्यामुळे नव्या - जुन्यांचा आपसांत खटका उडणे स्वाभाविक होते. अशा वेळी धनी दमदार असेल तर त्याचा सेवक वर्गावर दाब राहून असा संघर्ष मर्यादित राहतो वा जागच्या जागी जिरतो. पण शाहू तितका जोरदार नसल्याने त्याच्या सरदारांचे फावले. त्यातूनचं जाधव, भोसले, दाभाडे, पेशवे यांची प्रकरणे अनावर झाली. पैकी जाधवांचे तेज साफ मावळले होते तर भोसले दूर नागपुरात सवता सुभा मांडून बसल्याने तूर्त तरी बाजीरावाच्या आवाक्याच्या बाहेर होते. अशा स्थितीत बाजीरावास आपले हातपाय पसरण्यासाठी अगदी नजीकचे कोकण दृष्टीस न पडल्यास नवल नाही. कोकणात आपले वर्चस्व वाढवण्याची त्याची इच्छा होतीच, पण कान्होजी व सेखोजीच्या हयातीत हे त्यास साध्य झाले नाही. मात्र या दोघांच्या मृत्यूनंतर त्याने आपले धोरण आक्रमक केले. स्वतंत्र आरमार उभारणीकडे त्याने मुद्दाम लक्ष दिले. कारण, आंगऱ्यांना नमवण्यासाठी समुद्रात त्यांचा पराभव करणे गरजेचे होते. परंतु, आंगऱ्यांच्या नौदलाला सुमारे ६० - ७० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असल्याने काल - परवा उभारलेले आपले आरमार आंगऱ्यांचा पराभव करण्यास अजिबात समर्थ नाही हे तो ओळखून होता. अशा स्थितीत त्याने आंगऱ्यांच्या शत्रूंची म्हणजे पोर्तुगीजांची मदत मागितली. परंतु, पोर्तुगिजांचा मराठी सरदारांवर अजिबात भरवसा नसल्याने त्यांनी बाजीरावाच्या मागणीकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले. इंग्रजांचा जोर अजून बाजीरावाच्या दृष्टिस न पडल्याने त्याने इंग्रजांकडे मदत मागितली नाही. पोर्तुगीज आपणांस आंगऱ्यांच्या विरोधात मदत करत नाहीत हे पाहून बाजीराव काहीसा स्वस्थ बसला. पण लवकरचं आंग्रे बंधूंमध्ये दुफळी माजून त्यांचा तंटा निकालासाठी शाहूकडे आला. त्यात शाहूच्या आज्ञेने पेशव्याने मध्यस्थाची भूमिका घेत आंग्रे बंधूंची भांडणे सोडवण्याचा एक ' यशस्वी ' प्रयत्न केला. 
             यशस्वी या अर्थाने कि, त्याने आंग्रे बंधूंमध्ये आरमार व किल्ल्यांची वाटणी करून त्यांचे सामर्थ्य विभागून टाकले. या तोडग्याने घरगुती भांडणे कधी निकाली निघत नाहीत मग सरदारकीची कसली मिटणार ? पण बाजीरावास याच्याशी काही देणे - घेणे नव्हते. कलागत लावून तो अनुकूल संधीची वाट बघत बसला. पुढे वसईचा पाडाव झाल्यावर त्याने पोर्तुगीजांना आपले अंकित बनवले. याच वेळी इंग्रजांनी देखील त्याच्याशी मैत्रीचा करार केला. हीच संधी साधून या दोन बलिष्ठ नाविक सत्तांच्या मदतीने आंगऱ्यांना रगडण्याचे त्याने निश्चित केले. परंतु त्याच्या मृत्यूने त्याची धडपड थांबवली. मात्र त्याचा भाऊ चिमाजी अजून जिवंत होता. बाजीरावाच्या मागे त्याचा मोठा मुलगा नानासाहेब हा पेशवा बनला. चिमाजी व नानासाहेबाने बाजीरावाची अधुरी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी इंग्रज - पोर्तुगीज यांच्याशी आंग्रेविरोधी मैत्रीचे करार केले. 
           उपरोक्त आशयाचे करार स. १७४० मध्ये झाले असले तरी त्यांची अंमलबजावणी करण्याची वेळ लगेच आली नाही. चिमाजी आपाच्या अनपेक्षित मृत्यूने नानासाहेब एकाकी पडला आणि त्याला आपले आसन स्थिर करण्याकडे प्रथम लक्ष द्यावे लागले. इकडे संभाजीचा मृत्यू होऊन तुळाजी सरखेल बनला. स. १७५२ पर्यंत सातारची भानगड मिटून नानासाहेब जवळपास निरंकुश बनला होता. सातारच्या दरबारात आता त्याचे फक्त दोनचं बलिष्ठ प्रतिस्पर्धी उरले होते. एक नागपूरकर भोसले आणि दुसरे आंग्रे ! पैकी, भोसल्यांना त्याने आपल्या लष्करी व राजकीय सामर्थ्याची चुणूक दाखवून तात्पुरते गप्प बसवले होते. राहता राहिले आंग्रे, तर त्यांचा बंदोबस्त करून बापाचे आणि चुलत्याचे अपुरे राहिलेले स्वप्न पुरे करण्याचा त्याने विडा उचलला. स. १७४० च्या कराराच्या पार्श्वभूमीवर त्याची व इंग्रजांची मैत्री जुळून येण्यास फारसा वेळ लागला नाही. वास्तविक हा करार घडून एक दशकाहून अधिक काळ लोटला असला तरी आंग्रे व इंग्रजांचे कार्य व संचारक्षेत्र एकच असल्याने त्यांच्यातील वैरभाव अधिक तीव्र झाला होता. परिणामी, आंगऱ्यांचा बंदोबस्त करण्याची पेशव्यापेक्षाही अधिक उत्कंठा इंग्रजांना लागून राहिली होती. 
                पुढे यथावकाश पेशवा - इंग्रज यांची तुळाजी आंग्रेवर संयुक्त मोहीम होऊन त्यात आंगऱ्यांचा निकाल लागला. अर्थात, या दोघा बलदंड प्रतिस्पर्ध्यांना एकाच वेळी तोंड देणे तुळाजीच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे तुळाजीचा पराभव झाला यात अनपेक्षित असे काहीचं नाही. इथपर्यंत जे विवेचन करण्यात आले आहे त्यावरून एक गोष्ट निर्विवादपणे सिद्ध होते व ती म्हणजे आंगऱ्यांचा जो काही नाश झाला त्यास नानासाहेब पेशवा जबाबदार नसून यामधील खरा दोषी बाजीराव पेशवा हाच आहे ! या दोषाचे म्हणा वा गौरवाचे म्हणा खरे श्रेय बाजीरावाकडेचं जाते. नानासाहेबाने फक्त बापाने आखून दिलेल्या मार्गाने वाटचाल केली इतकेचं ! 
                          आता राहता राहिला प्रश्न आंगऱ्यांच्या जहाजांच्या विनाशाचा तर त्याची प्रत्यक्ष जबाबदारी इंग्रजांची असून अप्रत्यक्ष अशी बाजीरावाचीचं आहे. वाचकांना माझा हा निष्कर्ष धक्कादायक असा वाटेल आपण जे सत्य आहे ते सत्य आहे ! आंग्रेंचे सर्व सामर्थ्य त्यांच्या आरमारात होते. ते आरमारचं जर नष्ट करण्यात आले तर आंग्रेंचे महत्त्व ते काय शिल्लक राहणार होते ? त्यावेळी मैदानी लढायांमध्ये एखादा सैन्यविभाग नष्ट करून व सेनापती / राजाला ठार करून किंवा कैद करून प्रतिपक्ष्याला नामोहरम केले जात असे. नाविक युद्धाच्या बाबतीत बोलायचे झाले तर लढाऊ जहाजे म्हणजे सैन्यदल आणि सागरी किल्ले म्हणजे तोफखाना ! यातील एक घटक जरी उध्वस्त झाला तर त्या सागरी सत्तेचे सामर्थ्यचं खचले असे म्हणता येईल. आंगऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचे आरमार नष्ट करणे व किल्ले जिंकून घेणे हे पेशव्यांचे आणि इंग्रजांचे समान उद्दिष्ट होते. एकूण, आंगऱ्यांचा बळी घेण्याचे कारस्थान बाजीरावाने आधीच सिद्ध केले होते. त्याच्या दुर्दैवाने त्याला आपल्या हयातीत हे कार्य शेवटास नेण्याची संधी लाभली नाही पण त्याच्या मुलाने बापाची इच्छा शेवटी तडीस नेली. परंतु त्याचे दुर्दैव असे कि, प्रबल मराठी आरमार  करून युरोपियन सत्तांना येथे आपली पाळेमुळे रुजवण्याची व मजबूत करण्याची अमुल्य संधी उपलब्ध करून देण्याच्या दोषाचे धनी व्हावे लागले. बाजीराव पेश्याच्या समर्थकांना / चाहत्यांना माझी मते अजिबात पटणार नाहीत याची मला पुरेपूर कल्पना आहे. बाजीराव स. १७४० मध्ये मेला व आंगऱ्यांची वाताहत स. १७५६ मध्ये झाली. तेव्हा मृत व्यक्ती एखाद्या सत्तेचा वा घराण्याचा कसा विध्वंस करू शकते असा प्रश्न ते निश्चितचं उपस्थित करणार याची मला पूर्ण खात्री आहे. अशा लोकांना मला फक्त एवढेचविचारायचे आहे कि , आंगऱ्यांची जहाजे न पेटवता , त्यांचे सागरी किल्ले ताब्यात न घेत बाजीराव त्यांचा कसा बंदोबस्त करणार होता ? 

संदर्भ ग्रंथ :- 
१) मराठी रियासत, खंड - ४ :- गो. स. सरदेसाई 
२) मराठे व इंग्रज :- न. चिं. केळकर 
३) मराठ्यांची लष्करी व्यवस्था :-  डॉ. एस. एन. सेन    

५ टिप्पण्या:

Sahyadri म्हणाले...

chan vishleshan ahe acceptable

sanjay kshirsagar म्हणाले...

Sahyadri...

धन्यवाद !

deom म्हणाले...

मराठी इतिहासातील एक दुर्दैवी घटना. ब्रिटीशांच्या सत्तेची पाळेमुळे या घटनेने वाढत जाऊन पुढे एवढी घट्ट झाली कि जणू मगरमिठीच. आपला देश पारतंत्र्यात जाण्यास मराठ्यांनी एकप्रकारे मदतच केलि.
आपले विश्लेषण सत्याच्या जवळपास जाणारे पण कटू आहे. पण इतिहास हा असाच असतो - तो कधी कटू असतो तर कधी दैदिप्यमान असतो. यातूनच आपण सर्वाना एक धडा मिळत असतो. या आपली निस्पृह विश्लेषणासाठी आपले अभिनन्दन.

sanjay kshirsagar म्हणाले...

धन्यवाद, deom साहेब !

Unknown म्हणाले...

शेंडीने गळा कापला