बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२

पानिपत मोहिमेतील काही दुर्लक्षित मुद्दे



                   दिनांक १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर मराठी भाषेमध्ये पुष्कळ असे लेखन झाले आहे. अर्थात, यातून कथा, कादंबऱ्या, नाटके वर्ज्य केल्यास पानिपत मोहिमेचे विश्लेषण करणारी मराठी भाषेत पुरती पाच पुस्तके देखील नाहीत ! अमृतातही पैजा जिंकणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या मराठीची हि दैनावस्था मराठी माणसांसाठी निश्चित भूषणास्पद नाही. पानिपतच्या युद्धाचे वर्णन करताना ‘ घरटी बांगडी फुटली ‘ असे म्हटले जाते मग पानिपतविषयी लेखन करण्यामागे इतकी उदासीनता का ? पराभवाचा इतिहास हा भूषणास्पद किंवा गौरवास्पद नसतो हे काही यामागील कारण नाही. तसे असते तर संभाजीच्या खुनावर इतके विपुल लेखन झालेच नसते, पेशवाईच्या अस्तावर किंवा भारताच्या पारतंत्र्याच्या इतिहासावर खंडीभर ग्रंथ लिहिले गेले नसते ! मग पानिपतविषयीच असे का ?
                माझ्या मते या दोषास आपण सर्वचजण कुठेतरी कारणीभूत आहोत. एक पानिपतचं काय पण स्वराज्य संस्थापक छत्रपतींच्या दक्षिण दिग्विजयाचे पुराव्यानिशी वर्णन करणारे मराठी भाषेत असे किती ग्रंथ आहेत ? या दक्षिण दिग्विजयामागे काय हेतू होते, त्यातील किती साध्य झाले तर किती अपुरे राहिले याची कोणी चर्चा केली आहे ? मुळात रायगडावर राज्याभिषेक समारंभ घडवून आणणाऱ्या व्यक्तीला दक्षिणेत दूरवर जाऊन जिंजीसारखा, त्याकाळातील अभेद्य समजला जाणारा किल्ला घ्यावासा वाटला याचे वर्म किती जणांना समजले आहे ? अनेक जणांनी असे लिहून ठेवले आहे कि, पुढे - मागे औरंगजेब दक्षिणेत उतरणार याची शिवाजीने अटकळ बांधली होती. तेव्हा मोगलांच्या संभाव्य स्वारीला तोंड देण्याची पूर्वतयारी म्हणून शिवाजीने दक्षिणेत मोहीम आखली. हा तर्क चुकीचा आहे असे मी म्हणत नाही. पण औरंगजेब दक्षिणेत उतरण्याची वाट पाहत बसणाऱ्यांपैकी शिवाजी होता का ? याचाही विचार करायला पाहिजे. सारांश, ऐतिहासिक घटनांचे चाकोरीबाहेर जाऊन पण पुराव्यांच्या आधारे विश्लेषण करण्याची अजून आपणांस सवय नाही हेच यातून सिद्ध होते. त्यामुळेच जी उदासीनता शिवाजीविषयी तीच उदासीनता पानिपतच्या तिसऱ्या युद्धाविषयी असल्याचे दिसून येते.           
                    प्रस्तुत लेखनाचा हेतू पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आजवर झालेल्या संशोधनाचा धावता आढावा घेत अजूनही या विषयावर सखोल संशोधनास कसा वाव आहे हे वाचकांच्या निदर्शनास आणून देणे हा आहे. तसे पाहता या विषयावर श्री. शेजवलकर यांच्या ‘ पानिपत १७६१ ‘ या प्रसिद्ध ग्रंथानंतर मराठीमध्ये गेल्या ५० वर्षांत कोणी लेखन केल्याचे आढळून येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे शेजवलकरांनी या विषयावर लिहिण्यासाठी काही बाकीच ठेवले नाही असा वाचकांचा आणि इतिहास संशोधकांचा गोड गैरसमज होता. परंतु, परमेश्वराच्या कृपेने आणि श्री. संजय सोनवणी यांच्या सहकार्याने पानिपत सारख्या विषयावर मला ‘ पानिपत असे घडले ‘ हा ग्रंथ लिहून प्रसिद्ध करता आला. या ठिकाणी काहीशा गर्वाने मी नमूद करतो कि शेजवलकरांच्या पानिपत विषयक ग्रंथानंतर गेल्या ५० वर्षांत या विषयावर जरी फारसे लेखन झाले नसले तरी हि ५० वर्षांची पोकळी बऱ्याच प्रमाणात भरून काढण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. पण असे असले तरी संजय क्षीरसागरने लिहिलेले पानिपत म्हणजे काही या विषयावरचा अखेरचा शब्द होत नाही. आजही कित्येक मुद्दे असे आहेत कि ज्यांची मला माझ्या ग्रंथात चर्चा करता आली नाही. तसेच कित्येक मुद्दे मला माझा ग्रंथ प्रकाशित झाल्यावर सुचले. अशा सर्व मुद्द्यांचा व प्रश्नांचा मला या ठिकाणी थोडासा धावता आढवा घ्यायचा आहे.
              पानिपतच्या पराभवाची कारणे शोधताना मुळात ती मोहीम का उद्भवली गेली याचा कोणी विचार केला आहे ? बुराडी घाटावर दत्ताजी मारला गेल्यावर १३ मार्च १७६० रोजी शिंदे – होळकरांनी अब्दालीसोबत तह केल्याचे किती जणांना माहिती आहे ? या तहास पेशव्याने मान्यता दिली असती तर मराठी राज्याच्या इतिहासातील पानिपत नावाचे प्रकरण मुळातूनच खुडले गेले असते. परंतु दुर्दैवाने एक श्री. संजय सोनवणी यांचा अपवाद केल्यास या तहाचे महत्त्व एकाही मराठी इतिहास अभ्यासकाच्या, वाचकाच्या आणि प्रस्तुत लेखकाच्याही ध्यानी आले नाही.
          पानिपत मोहिमेवर भाऊच्या नियुक्तीमागील कारणांचा देखील आजवर शोध घेतला गेला नाही. इतकेच नव्हे तर उदगीरच्या यशाचा खरा शिल्पकार सदाशिव नसून रघुनाथ असल्याचे देखील आजवर इतिहास अभ्यासकांना उमगले नाही.
                 पानिपत स्वारीवर भाऊची नेमणूक झाल्यावर त्याला झपाट्याने आगऱ्यास का जाता आले नाही याकडेही अभ्यासकांचे, संशोधकांचे अक्षम्य असे दुर्लक्ष झाले आहे. लष्करासोबत बुणगे, यात्रेकरू व अवजड तोफखाना असल्यामुळे मराठी सैन्याचा वेग मंदावला अशीच अजून समजूत आहे. आता बुणगे काही प्रथमच लष्करासोबत जात नव्हते आणि दक्षिणेतून उत्तरेत वर्षाला एखाद दुसरी मोहीम स. १७३० पासून निघत होती. त्या हिशोबाने स. १७६० मध्ये यात्रेसाठी जाणारे असे कितीसे भाविक महाराष्ट्रात होते ? राहता राहिला प्रश्न अवजड तोफांचा तर गारद्यांचा तोफखाना आधुनिक असल्याने तो अवजड नव्हता आणि रघुनाथरावाने अटक स्वारीत वापरलेल्या तोफा माळव्यात ठेवल्या होत्या. हाच तोफखाना भाऊने पुढे पानिपत मोहिमेत वापरला. मग आता प्रश्न असा उद्भवतो की, आंबे – परतुड पासून माळवा गाठण्यास भाऊला उशीर का झाला ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे आव्हान आजही इतिहास अभ्यासकांच्या समोर आहे.
           भाऊने उत्तरेत न यावे यासाठी शिंदे – होळकर, विशेषतः मल्हारराव व त्याचा कारभारी गंगोबा हे प्रयत्नशील असल्याचा समज आहे. इतिहासाविषयी घोर अज्ञान असलेले संशोधक जगाच्या पाठीवर बहुतेक आपल्याच देशात आढळत असावेत. शिंदे – होळकर हे पेशव्यांचे सरदार असल्याचे सर्वांनाच माहिती आहे पण त्यांच्या पदरी कारभारी म्हणून कोणाला नेमायचे हा अधिकार पेशव्यांकडे होता हे किती जणांना माहिती आहे ? गंगोबा हा आपला विरोधक आहे अशी भाऊची व पेशव्याची समजूत असती तर त्यांनी त्याला केव्हाच बडतर्फ केला असता. पानिपतआधी कित्येक वर्षे भाऊ हा पेशव्याचा मुख्य कारभारी असून सरदारांच्या पदरी नेमलेल्या कारभाऱ्यांवर त्याची हुकुमत होती हे ऐतिहासिक सत्य आमच्या विद्वान इतिहास संशोधकांना दिसले नाही.
           राहता राहिला भाऊ व मल्हारराव यांच्यातील तंटा तर तो देखील जवळपास अशाच स्वरूपाचा आहे. भाऊ हा कितीही झाला तरी पेशव्याचा चुलत भाऊ, मुख्य कारभारी याअर्थी होळकराचा मालकचं होता. त्यामुळे भाऊने कुठे यावे व कुठे येऊ नये हे ठरवण्याचा अधिकार मल्हाररावास निश्चितच नव्हता. किंबहुना, असा काही अधिकार गाजवण्याचा त्याने प्रयत्न केल्याचे देखील इतिहासात नमूद नाही.
            होळकर भाऊने चंबळपार करून पुढे येऊ नये यासाठी जरूर प्रयत्नशील होता हे नाकारण्यात अर्थ नाही. परंतु त्यामागील कारण हे वेगळेच आहे. स. १७५९ – ६० मध्ये अब्दालीने नाही म्हटले तरी अनेक ठिकाणी मराठी फौजांचा पराभव केला होता. बुराडी घाटावर तर दत्ताजी सारख्या मातबर सरदाराचा त्याने बळी घेतला होता. अशा परिस्थितीमध्ये भाऊसारखा खासा स्वतः अब्दालीवर चालून गेला व त्यात जर त्याला पराभूत व्हावे लागले तर मग पेशव्याचे हिंदुस्थानावरील वर्चस्व ते काय राहिले ? अब्दालीने शिंदे – होळकरांचा एकदा नव्हे तर दहादा पराभव केला तरी मराठी सत्तेला जितका धक्का बसणार नाही तितका धक्का भाऊच्या एका पराभवाने बसेल हे अनुभवी होळकर जाणून होता. म्हणून त्याने भाऊला चंबळ पार न करण्याचा सल्ला दिला. परंतु दुर्दैवाने होळकरासारख्या इमानदार सरदाराच्या निष्ठेविषयी नाहक शंका निर्माण करण्याचे पातक आमच्या विद्वान इतिहास संशोधकांनी केले. होळकराच्या निष्ठेविषयी शंका घेणाऱ्यांनी जरा वसईची मोहीम अभ्यासून बघायला हवी होती. तिथे पोर्तुगीजांच्या एका दमदार सरदाराने मराठी फौजांचा लागोपाठ पराभव केल्यावर खास चिमाजी आपा त्याच्यावर चालून जाणार होता. परंतु त्यावेळी चिमाजीच्या सरदारांनी होळकराप्रमाणेच विचार करून चिमाजीला रोखले होते. { अभ्यासू वाचकांनी यासाठी श्री. य. न. केळकर यांचे ‘ वसईची मोहीम ‘ हे पुस्तक जरूर वाचावे.} आता त्या सरदारांच्या निष्ठेविषयी का शंका घेतली जात नाही ? जो न्याय पानिपत प्रकरणी मल्हाररावास लावला जातो तोच न्याय वसई मोहिमेतील मराठी सरदारांना का लावला जात नाही ?
                 मराठी राज्याच्या इतिहासात जे स्थान शिवाजी, संभाजी, शाहू, बाजीराव, माधवराव या मराठी नायकांना आहे ; जवळपास त्याच तोडीचे पण खलनायक म्हणून अफझलखान, औरंगजेब, नजीब इ. स्थान आहे. खरे तर इतिहासात नायक – खलनायक अशा संज्ञांना अजिबात स्थान नाही. किंबहुना ज्या इतिहासाची मांडणी नायक – खलनायक अशा धर्तीवर केली जाते त्याला इतिहास लेखन न म्हणता कादंबरीच समजले पाहिजे. शिवाजी – औरंगजेब हे एकमेकांचे शत्रू होते हे मान्य. पण सर्वकाळ त्यांच्या मनी परस्परांविषयी वैरभाव वसत होता का ? माझ्या प्रश्नाचा रोख व्यक्तिगत वैरभावनेकडे आहे. शिवाजी – औरंगजेब अथवा औरंगजेब – संभाजी यांचे व्यक्तिगत असे वैर होते का ? याचे कोणीही १०० % उत्तर होकारार्थी देऊ शकत नाही. नजीबखानाविषयी देखील असेच म्हणता येईल.
                   मुळात स. १७५२ पर्यंत नजीबखान हे नाव दिल्लीच्या राजकारणात होतेच कुठे ? स. १७५२ नंतर त्याचे नाव हळूहळू चर्चेत येऊ लागले. स. १७५८ – ६१ मध्ये त्याचा प्रभाव वाढला. परंतु पानिपतच्या विजयासोबत त्याच्या राजकीय कारकीर्दीस उतरती कळा लागली. स. १७६१ नंतर दिल्लीचा कारभार त्याच्या हाती असला तरी त्याचे जे महत्त्व स. १७५८ – ६० मध्ये होते, ते मात्र राहिले नाही. नजीबमुळे पानिपत घडले असा समज आहे, पण त्यात अजिबात तथ्य नाही. त्यावेळी सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमधून पानिपत सारखे प्रकरण उद्भवणे हे एक प्रकारे अनिवार्यचं होते. याची कल्पना किंवा जाणीव पानिपतपूर्व तसेच पानिपतनंतर मराठी सरदारांना व पेशव्यांना जितकी होती तितकी आपल्या इतिहास संशोधकांना नाही. त्यांनी पानिपतच्या इतिहासाची मांडणी करताना जाणीवपूर्वक नजीबला खलपुरुष ठरवले आहे. पण माझ्यासमोर प्रश्न असा आहे कि, त्यावेळचे मराठी सरदार व पेशवे नजीबला खरोखर खलपुरुष समजत होते का ? किंवा नजीबच्या विषयी पानिपतनंतर त्यांच्या मनात सुडाची भावना होती का ? माझ्या मते, अजिबात नाही ! नानासाहेब पेशवा किंवा माधवराव पेशव्याची नजीब विषयक व्यक्तिगत सुडाची भावना असल्याचे दिसून येत नाही.
           नजीबखानाशी व्यक्तिगत असे वैर जुळे ते फक्त शिंदे घराण्याचे ! पण त्यामागे बुराडी घाटच्या लढाईचा अजिबात संबंध नाही. तत्कालीन राजकारण लक्षात घेता मल्हारराव यमुनापारच्या रोहील्यांच्या प्रदेशात मोहिमा काढण्यास किंवा बंगालवर चालून जाण्यास तितकासा उत्सुक नव्हता. हा वयाचा परिणाम असू शकतो. यमुनापारचे राजकारण व बंगालस्वारी हाती घेण्यास शिंदे मंडळी मात्र कमालीची उत्सुक होती. अर्थात शिंद्यांची अशी स्वारी आल्यास त्यांची पहिली धाड आपल्या राज्यावर पडणार हे नजीब ओळखून होता व त्यासाठीच त्याने फक्त शिंद्यांच्या विरोधात कारवाया केल्या. इतर मराठी सरदारांना वा पेशव्यांना त्याने फारसे दुखावले नाही. यामुळेच कि काय, जेव्हा थोरल्या माधवराव पेशव्याच्या काळात उत्तर हिंदुस्थानात पुण्यातून मराठी फौजा गेल्या तेव्हा प्रसंगी नजीबखानाची मदत घेण्याची गरज पडल्यास बेलाशक तसे करण्याची मोकळीक पेशव्याने सरदारांना दिली होती. बहुतेक महादजी शिंदे वगळता इतर मराठी सरदारांना पेशव्याची हि आज्ञा मान्य होती असे दिसून येते.
          सारांश, पानिपत प्रकरणी नजीबला खलनायक ठरविण्यात आमच्या इतिहासकारांनी धन्यता मानल्यामुळे तत्कालीन राजकारणाचे बारकावे / धागेदोरे वाचकांना उलगडून सांगण्यास त्यांना साफ अपयश आले आहे. याचा परिणाम म्हणजे पानिपत मोहिमेचे खरे स्वरूप आजही लोकांसमोर तितकेसे स्पष्ट होऊ शकले नाही.
             भूगोलविषयी अज्ञान हा मराठी लष्कराचा एक मोठा दुर्गुण होता असेही कित्येकांचे मत आहे. परंतु, अशा मतांच्या लोकांना भूगोलाचे किती ज्ञान असते ? बागपत जवळ अब्दालीने यमुना नदी कशी पार केली याचे वर्णन करण्यासाठी शेजवलकर सारख्यांना एका पोवाड्याचा आधार घ्यावा लागला. माझ्या मते, यासारखी हास्यास्पद दुसरी कोणती गोष्ट नसेल. नदी किनारी वसलेल्या गावाजवळ नदीउतार असतो हि एक सामान्य बाब आहे. ती सिद्ध करायला पोवाड्याची गरजचं काय ? याहीपलीकडे जाऊन पानिपत युद्धाच्या वेळी मराठी सैन्याची रचना, सैन्याचा नेमका रोख, त्यादिवशीचा सूर्योदय – सूर्यास्त याविषयी देखील आपल्या इतिहाससंशोधकांनी काही संशोधन केल्याचे दिसून येत नाही. थोड्याशा अभिमानाने या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो कि, या व अशा आणखी अनेक प्रश्नांची उत्तर, संदर्भ साधनांच्या आधारे देण्याचा प्रयत्न मी माझ्या ‘ पानिपत असे घडले ‘ या ग्रंथात केला आहे.
        सध्या बहुजनांतील काही इतिहासकारांनी याविषयी लेखन करण्यास आरंभ केला आहे पण ब्राम्हणद्वेष वगळता त्यांच्या लेखांत बाकी काही आढळत नाही.
    पानिपतावर भाऊचा मुक्काम दोन – अडीच महिने होता. त्यावेळी पंजाबात काय परिस्थिती होती ? पुण्यात पेशव्याचे काय बेत होते ? खुद्द अब्दाली निर्णायक झुंजीसाठी किती उत्सुक होता ? पानिपतावर माघार घेऊन भाऊला आपला बचाव साधण्याची संधी होती का नव्हती ? पानिपत विजयाने उभयपक्षांचा खरोखर काय नफा / तोटा झाला ? पानिपतावर कैदी झालेल्या मराठी स्त्री – पुरुषांचे पुढे काय झाले ? इ. अनके प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. काहींची उत्तरे मिळण्याची अधून शक्यता आहे पण अभ्यासकांची तशी इच्छा नाही.
              पानिपत युद्धातून जिवंत परत आलेले सरदार हा एक मोठा वादाचा विषय बनून राहिला आहे. विंचूरकर, गायकवाड, होळकर, जाधव, पुरंदरे इ. सरदार जिवंत परत आले. पण, इतिहास अभ्यासक व वाचकांचा या सरदारांवर, विशेषतः होळकरावर अतिशय राग आहे ! अर्थात, याबाबतीत श्री. मुरलीधर अत्रे, शेजवलकर यांसारखे सन्माननीय अपवाद आहेत. तरीही ज्याप्रमाणे नजीबखान हा पानिपत युद्धाचा उत्पादक त्याप्रमाणे होळकर हा पानिपतच्या पराभवास कारणीभूत ठरला असा सर्वांचा आजही समज आहे. अर्थात, वाचकांच्या विषयी मला काही राग नाही. कारण इतिहासकारांनी जाणीवपूर्वक वस्तुस्थिती त्यांच्यापासून लपवून ठेवल्यामुळे वाचकांचे असे मत बनले आहे. पानिपत युद्धातील होळकराच्या सहभागाविषयी पुराव्यानिशी मी ‘ पानिपत असे घडले ‘ या ग्रंथात लेखन केले आहे. त्यामध्ये होळकरावरील निरर्थक आक्षेपांचे मी खंडन केले आहे. अर्थात, कित्येकांना आजही ते पचनी पडले नाही याची मला जाणीव आहे. कारण ; मल्हारराव हा पानिपत प्रकरणी दोषी आहे असे सांगणारे शेकडो इतिहासकार / अभ्यासक आहेत तर होळकर हा त्या बाबतीत निर्दोष आहे असे सांगणारे पुरते १० लोक देखील नाहीत !
         या ठिकाणी मी इतकेच नमूद करू इच्छितो कि, जर सर्व इतिहासकारांच्या मते होळकर पानिपत युद्धातून दुपारीच पळून गेला होता तर संध्याकाळी साडेचार – पाच वाजेपर्यंत नाना फडणीस, भाऊ हे पानिपतावर जिवंत कसे राहिले ? नाना पुरंदरेच्या दासी, बटकी, आचारी जिवंत कसे परतले ? बळवंतराव मेहेंदळेचा मुलगा दक्षिणेत कसा परतला ? होळकर दुपारीच परतला असता तर जे कोणी जगून – वाचून परत आले ते येऊ शकले असते का ? महत्त्वाचे म्हणजे मल्हारराव युद्धातून पळाला असा समज त्या लढाईत बघ्याच्या भूमिकेत असलेल्या नाना फडणीसचा देखील नव्हता. खुद्द नानासाहेब पेशव्याला देखील तसे वाटत नव्हते. पण आमचे इतिहासकार त्या दोन ‘ नानांपेक्षा ‘ अधिक विद्वान निघाले ! ज्यांना गोलाची लढाई म्हणजे काय ते नीट समजले नाही त्यांनी इतिहासाचे विकृतीकरण करून टाकले.
          पानिपत मोहिमेचा विचार करताना पेशवे घराण्यातील भाऊबंदकीचा देखील फारसा कोणी विचार केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वाचकांचा असा समज आहे कि  स. १७६१ पर्यंत पेशवे घराण्यात सर्व काही आलबेल होते पण नानासाहेब पेशवा मरण पावल्यावर पेशवे घराण्यात दुफळी माजली. अर्थात, वाचकांचा असा ग्रह करून देण्यास आमचे इतिहासकार प्रामुख्याने कारणीभूत आहेत. परिणामी मराठी राज्याचा मराठी भाषेत जो काही इतिहास लिहिला गेला आहे त्यातील काही भाग अपवाद केल्यास बराचसा भाग ‘ चांदोबा ‘ वा ‘ ठकठक ‘ या बालमासिकांमध्ये शोभून दिसणारा आहे !

बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१२

पेशवाईनंतरच्या ब्रिटीश अंमलातील पुण्यातील ओंकारेश्वराच्या संबंधी काही नोंदी



                प्रसिद्ध इतिहास संशोधक य. न. केळकर यांच्या ‘ मराठेशाहीतील वेचक – वेधक ‘ या ग्रंथातील पेशवाईनंतरच्या ब्रिटीश अंमलातील पुण्यातील ओंकारेश्वराच्या संबंधी काही नोंदी :-
          १)    “ शके १७४५ भाद्रपद वद्य ८ कोकणस्थ ब्राम्हण याची स्त्री राधाबाई इचा भ्रतार मृत्यू पावला म्हणून त्याबरोबर सहगमन करून सती निघाली ती ओंकारेश्वराजवळ नदीत सरणावर बसली. अग्नि लावला. नंतर सरणातून बाहेर अंग भाजले ( म्हणून आली ) प्राण गेला नाही. जिवंत होती. मग सरकारातून इंग्रजांनी तिला गावात आणून वाचवावयाकरता औषध उपाय केले. तीन दिवस होती. मग मृत्यू पावली. दुष्ट चिन्ह जाले.”
         २)     सन १८४४ मध्ये कंपनी सरकारकडे केलेल्या अर्जातील एक नोंद :- “ ‘ माजी ज्यडच्या मारियट साहेब ‘ यांचे मुलगे दोन प्रहर दिवसापासून रात्र पडेपर्यंत नदी किनारा, घाट व देवालय यात फिरतात, बरोबर ८ – १० महार असतात. मासे मारतात व जागोजागी थुंकून खराब करतात. देवालयात कोणी कधीही इंग्रजी अंमल झाल्यापासून साहेब लोक गेले नाहीत. फौजदारास जाहीर केले पण त्यांचे सांगणेही ऐकत नाहीत. आमच्या जातिधर्माप्रमाणे घाटावर संध्या करण्यास पाणी भरण्यास, आम्हाला अडचण होत आहे. तरी येविसीचा बंदोबस्त करून देण्याविषयी सरकार मुखत्यार आहे.”

संदर्भ ग्रंथ :- मराठेशाहीतील वेचक – वेधक
लेखक :- श्री. य. न. केळकर