शुक्रवार, ६ जानेवारी, २०१२

गनिमी कावा आणि उत्तर हिंदुस्थान ...!



 मराठी राज्याच्या इतिहासात पानिपत प्रकरणाचा अपवाद केल्यास उत्तर हिंदुस्थानात गनिमी काव्याच्या बळावर लष्करी मोहिमा यशस्वी होऊ शकतात कि नाही याविषयी फारशी चर्चा कोणत्याही इतिहासकाराने, विशेषतः मराठी इतिहास लेखकांनी, केल्याचे अजून तरी माझ्या निदर्शनास आले नाही.
     सामान्यतः उत्तर हिंदुस्थानात गनिमी कावा हा यशस्वी होऊच शकत नाही अशी कित्येक इतिहासलेखकांची व अभ्यासू वाचकांची समजूत आहे. परंतु, हि समजूत अथवा हा ग्रह साफ चुकीचा आहे. पेशवेकालीन मराठी राज्याचा पानिपतपूर्व अथवा पानिपत नंतरचा इतिहास पाहिल्यास हि बाब लक्षात येईल. पानिपतपूर्व काळात बाजीराव पेशव्याच्या जवळपास सर्व मोहिमा या गनिमी काव्याच्या बळावरचं यशस्वी झाल्याचे दिसून येते. बाजीराव पेशव्यानंतर नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीमधील सर्व मोहिमा गनिमी काव्याच्या बळावरचं पार पाडल्याचे लक्षात येते. यामध्ये रघुनाथरावाची अटकस्वारी देखील समाविष्ट आहे.
       पानिपत स्वारीचा विचार करताना, पानिपतपूर्व अटक मोहीम हि गनिमी काव्याच्या बळावर यशस्वी झाली होती हि बाब नेहमी दृष्टीआड केली जाते. निव्वळ गनिमी काव्याचा अवलंब करून रघुनाथराव, होळकर, विंचुरकर इ. सरदारांनी दिल्ली, पंजाब पादाक्रांत करून पुढे अटकेपार धडक मारली होती. तसेच या फौजेत गारदी सैन्य नव्हते हे लक्षात घेता उत्तर हिंदुस्थानात गनिमी काव्याचे धोरण यशस्वी होत नाही या विधानामधील फोलपणा स्पष्ट होतो. पानिपत मोहिमेत गारदी सैन्याचा समावेश केल्यामुळे गनिमी काव्याचे धोरण सदाशिवरावास स्वीकारता आले नाही असाही एक युक्तिवाद केला जातो पण त्यात अजिबात दम नाही. याचे कारण म्हणजे, उदगीर स्वारीत गारदी पथकाचा समावेश असूनही ती मोहीम मराठ्यांनी आपल्या परंपरागत गनिमी काव्याच्या सहाय्यानेचं यशस्वी केल्याचे दिसून येते. मग प्रश्न असा पडतो कि, पानिपत मोहिमेत गनिमी काव्याचे धोरण का स्वीकारले गेले नाही ?
          माझ्या मते, गनिमी कावा आणि कवायती पायदळाच्या सहाय्याने खुल्या मैदानात दिलेली लढाई यामध्ये निश्चित असा फरक आहे. पण हा फरक, त्या त्या पद्धतीचा अवलंब करून मिळणाऱ्या यशाच्या बाबतीत आहे हे प्रथम लक्षात घेणे गरजेचे आहे. गनिमी काव्याच्या सहाय्याने तुम्ही शत्रूला हैराण करू शकता परंतु त्याचा समूळ नाश करणे तुम्हाला शक्य होत नाही. उदाहरणार्थ पालखेड किंवा भोपाळ या ठिकाणी बाजीरावाने आपल्या कल्पक शक्तीचा पुरेपूर वापर करून निजामाला चांगलेचं कोंडीत पकडले होते पण .... पण निजामाच्या सैन्याचा तो पूर्णतः निःपात करू शकला नाही. परिणामी, निजामाचे लष्करी बळ कायम राहून मराठी राज्याला उपद्रव देण्यास तो मोकळा राहिला. नानासाहेब पेशव्याने देखील आपल्या कारकीर्दीमध्ये वेळोवेळी निजामावर मोहिमा काढून त्याचा पराभव केला. परंतु, निजामाचे लष्करी सामर्थ्य नष्ट करण्यात त्याला यश मिळाले नाही. सदाशिवराव हा कुशल सेनानी होता कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण गनिमी कावा व तोफखान्याच्या सहाय्याने खेळले जाणारे मैदानी युद्ध यातील फरक त्याच्या लक्षात आला असावा. गारदी पथके आणि सुसज्ज तोफखान्याच्या बळावर वारंवार दिल्लीवर चालून येणाऱ्या अफगाण टोळधाडीचा खरपूस समाचार घेण्याचा त्याचा विचार नसेलचं असे म्हणता येत नाही. त्यामुळेचं त्याने पानिपत मोहिमेत गनिमी कावा न स्वीकारता मैदानी युद्धाचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. वास्तविक, गनिमी कावा आणि कवायती पायदळ या दोन्हींचा उपयोग करून देखील तो पानिपत मोहीम चालवू शकत होता परंतु, तो काळ हिंदुस्थानातील लष्करी डावपेचांच्या संक्रमणाचा काळ होता हे लक्षात घेता सदाशिवरावास फारसा दोष देता येत नाही. या ठिकाणी दखल घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजांना मराठी सरदारांवर नियंत्रण बसवण्यात यश मिळाले याचे कारण म्हणजे मराठ्यांचा गनिमी कावा त्यांनी आत्मसात करून त्याला आपल्या कवायती पायदळ सैन्याची जोड दिली हे आहे. परंतु, हे लक्षात येण्यासाठी त्यांना पहिल्या इंग्रज – मराठा युद्धात सपाटून मार खावा लागला होता. असो, पानिपत युद्धानंतर उत्तर हिंदुस्थानात मराठी सरदारांनी अनेक मोहिमा पार पाडल्या. त्या सर्व मोहिमा या गनिमी काव्याच्या बळावर यशस्वी झाल्या. यापैकी एका मोहिमेची या ठिकाणी माहिती देऊन या प्रकरणाचा समारोप करतो.
    बक्सारची लढाई २३ ऑक्टोबर १७६४ रोजी घडून आली. त्यामध्ये सुजा, बंगालचा पदभ्रष्ट नवाब मीर कासीम व बादशहा शहाआलम यांचा इंग्रजांनी पराभव केला. हा पराभव जिव्हारी लागून सुजाने शिंदे – होळकरांची मदत मागितली.
सुजाने मदत मागितल्यावर होळकर त्याच्या सहाय्यास धावला. सुजा, होळकर व गाजीउद्दिन असे तिघेजण इंग्रजांविरुद्ध लढण्यास उभे राहिले. इंग्रजांच्या बाजून मेजर फ्लेचर हा लष्कराचे नेतृत्व करीत होता. तो अलाहाबादवरून या त्रिवार्गाच्या रोखाने चालून आला. त्यावेळी होळकराने गनिमी काव्याचा अवलंब करून त्याला पुष्कळ हैराण केले. होळकराचे धोरण लक्षात घेऊन फ्लेचर याने ३ मे १७६५ रोजी कुराच्या मैदानावर होळकरासोबत लढाई केली. त्या लढाईचे वर्णन आप्पाजीराम याने पुरंदऱ्यास २७ जून १७६५ च्या पत्रात लिहून कळवले आहे. ते पत्र खाली देत आहे.
“ तदनंतर फिरंगी चालोन आले, त्यांशीं झुंज मातबर झालें. चारपांचशें घोडे, चाळीस पन्नास उंटें व तीन तोफा आणल्या. तेही दम धरून मुक्कामास आले. आम्ही घेरा घालोन होतों, तों बातमी आली, रोहिले पठाण एकत्र होऊन बुणग्यावर आले. मग तैसेच चालोन काल्पीस बुणगे उतरून पुनः गंगाधरतात्यास फौज देऊन रवाना केलें. तेथें एक लढाई जाली. हरोळ तमाम बुडविला. फिरंग्यांची दोन पलटणें, हजार घोडे, चारशें उंटें, बाणांच्या कैच्या, वीस पंचवीस निशाणें आणलीं. ते गावाचा आश्रय करून राहिले. तेथें चार सहा कोस पावेतों फौजांस पाणी नव्हतें, यामुळें उलटोन ( तात्या ) काल्पीस आले, नाकेबंदी केली. मग चारपांच नावा मेळऊन रातबा धरून ( ते फिरंगी ) यमुना उतरले, तोफाखालीं मोर्चे उधळले. चारपांच घडी युद्ध जालें. परंतु बेदड ( चिखलांत रुतलेली वनस्पतींची मुळें ) भारी त्यामुळें घोड्यांचा नाइलाज झाला. म्हणून गनिमीकावा देऊन बेदड पुढें देऊन उभे राहिलों. इंग्रज काल्पींत ठाणें बसवून माघारे गेले. आम्ही उलटोन त्यांचें ठाणें काढून आपले ठाणें बसविलें. तेथून उमरगडचा बंदोबस्त करून ग्वाल्हेर प्रांतें चाललों आहों.” ( मराठी रियासत खंड – ५ )
   इंग्रजांच्या कवायती पलटणींना होळकराने निव्वळ गनिमी काव्याच्या बळावर चांगलेच हैराण केल्याचे उपरोक्त पत्रावरून तर सिद्ध होतेचं पण त्याशिवाय इंग्रजांना दहशत बसेल इतपत त्याने त्यांच्या पलटणींचा समाचार घेतल्याचे देखील वरील पत्रावरून लक्षात येते. होळकर आणि इंग्रज यांचा जिथे सामना घडून आला ती सर्व स्थळे उत्तर हिंदुस्थानातील आहेत व त्या ठिकाणी मल्हाररावाने गनिमी काव्याचा अवलंब करून इंग्रजांना जेरीस आणले हे लक्षात घेता उत्तर हिंदुस्थानची भूमी मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या धोरणास अजिबात अनुकूल नव्हती असे जे सांगितले जाते ते साफ चुकीचे असल्याचे दिसून येते. त्याशिवाय या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे व ती म्हणजे ब्रिटीश पलटणी या अफगाण सैन्यापेक्षा, लष्करी बाबतीत कितीतरी पटींनी श्रेष्ठ होत्या पण असे असूनही होळकरी फौजेपुढे त्यांना माती खावी लागली होती. यावरून होळकराच्या लष्करी नेतृत्वाचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे.