Thursday, December 25, 2014

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग – ११ )


    दरम्यान अनेक राजकीय उलाढाली या २० – २५ दिवसांत घडून गेल्या होत्या. दि. ३० ऑक्टोबर १८०२ रोजी महाड मुक्कामातून बाजीरावाने मुंबईच्या गव्हर्नर जनरलला पुढील पत्र पाठवले :- ‘ आमचा चाकर होळकर व दुसरे कित्येक इसम आमचे विरुद्ध ऊठून बंडखोरी करू लागले, त्यांमुळे आम्हांस पुणे सोडून महाडास येणे भाग पडले. पण येथेही हे बंडखोर आम्हांस गांठून भलताच प्रकार करण्यास चुकणार नाहीत, या कारणास्तव आपला आश्रय करण्याचा इरादा धरून आम्ही आपणांस असे कळवितो, की या बंडखोरांपैकी कोणी आम्हांस आपले ताब्यांत मागतील तर तुम्ही ते बिलकूल मान्य करू नये ; किंवा तुम्ही आम्हांस आपले जवळून निघून जाण्यास सांगू नये ; किंवा आमचे मनांत निघून जाण्याचे आल्यास त्यास तुम्ही अटकाव करू नये. या अटी तुम्हांस मान्य असतील तर तुम्ही आमचे खर्चाची तजवीज करावी, म्हणजे आम्ही तुमच्या आश्रयास येऊन राहतो. तुमचे उत्तर आल्यावर आम्ही येथून निघण्याचे करू. मात्र या अडचणीच्या प्रसंगांतून निभावून जाण्यासाठी तुम्ही आपली मोठी लढाऊ जहाजे भरपूर दारुगोळा देऊन महाडच्या बंदरांत पाठवावी. त्यांजबरोबर एक सज्जन व शूर इंग्रज गृहस्थ आमच्या मर्जीनुसार वागेल असा पाठवावा. जास्त खुलासा हे पत्र घेऊन जाणार नारो गोविंद अनवटी ( आवटी ? ) हे करतील. यांचेच बरोबर महाडास गलबते पाठवावी. म्हणजे जरूर पडल्यास आम्ही त्यांचा उपयोग करून आपल्याकडे निघून येऊ. ‘  

    बाजीरावाचे हे पत्र मुंबईला गेले त्यावेळी लॉर्ड वेल्स्लीचा सेक्रेटरी मेजर
माल्कम तेथे हजर होता. गव्हर्नर डंकनने त्याच्यासोबत याविषयी चर्चा करून पुढील उपक्रमाची दिशा ठरवली. इकडे दि. ४ नोव्हेंबर १८०२ रोजी क्लोझने बाजीरावास पत्र पाठवून समुद्रकिनारी मुक्काम हलवण्याची सुचना केली. परंतु, होळकराच्या फौजा जोवर कोकणात उतरत नव्हत्या तोवर बाजीरावास महाडचा तळ उठवण्याची आवश्यकता वाटत नव्हती. त्याच्या मते, आदल्या वर्षी जसे आपण पामरचे बुजगावणे उभारून शिंद्याला गुडघ्यावर आणले तसेच यावेळी यशवंतरावाला इंग्रजांचा बागुलबुवा दाखवून पळवून लावू. इतकेच नव्हे तर त्याने दौलतरावास फिरून पत्रे पाठवण्याचा सपाटा लावून आपल्या मदतीस येण्याची विनवणीही आरंभली होती. दौलतरावानेही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अलीगड येथे पेराँच्या हुकुमतीखालील दोन कंपू पैकी एका कंपूला आपल्याजवळ उज्जैन येथे बोलावले. पेराँच्या कंपूला बाजीरावाच्या मदतीस पाठवण्याचा त्याचा विचार होता. परंतु, अलीकडे दौलतराव – पेराँ यांच्यात परस्परांविषयी अविश्वास निर्माण झाल्याने पेराँने दौलतरावाच्या मागणीनुसार फौज लवकर पाठवली नाही. परिणामी, शिंद्याची वाट पाहून बाजीरावाने वसईची बेडी पायात बांधून घेतली. आपल्या हुकुम नाफर्मानीचा परिणाम असा होऊ शकतो याची पेराँला कल्पना होती पण
तरीही त्याने दौलतरावाच्या आज्ञेला जुमानले नाही. यावेळी दौलतरावाकडे तीन कंपू होते. त्यांपैकी एक जर तो दक्षिणेत पाठवता तरी काम बनले असते. कारण, होळकराचा तळ पुण्यातून उठणे बाजीरावाच्या दृष्टीने आवश्यक होते. अमृतरावाची तो फारशी पर्वा करत नव्हता. दौलतरावास याची पुरेपूर कल्पना असूनही हाताशी असलेली फौज पेशव्याच्या मदतीस रवाना करण्याची त्यांस बुद्धी झाली नाही.


    बाजीराव महाडला काहीसा स्वस्थ बसून इंग्रजांचे बुजगावणे उभारत असताना यशवंतरावाने अमृतरावास पुण्यास आणले. त्यानंतर सर्व मुत्सद्यांच्या मसलती झडू लागल्या. अमृतरावाने मुख्य कारभार हाती घेण्यासाठी एक कोटी रुपयांचे आमिष दाखवून यशवंतरावास पुण्यास आणले खरे, पण ज्या पेशव्याचे त्यांस कारभारीपद हवे होते तो पेशवाच जाग्यावर नसल्याने कारभार हाती कसा घ्यायचा हा बालिश प्रश्न
त्यांस पडला. त्याने बाजीरावाला पुण्यास येण्यासाठी पत्रे पाठवली पण त्यांत कपट असेल या शंकेने बाजीरावानेच त्यांस महाडला बोलावले. परंतु, बाजीरावाच्या भीतीने अमृतरावही महाडला गेला नाही. तेव्हा प्राप्त स्थितीतून मार्ग काढण्याकरता बाजीरावास पदच्युत करून त्याच्याजागी अमृतरावाच्या मुलाची --- विनायकबापूची नेमणूक करावी असाही एक तोडगा मुत्सद्द्यांनी मांडला, तर विनायकबापूला सवाई माधवाच्या पत्नीला दत्तक देऊन बाळाजी माधवराव या नावाने त्यांस पेशवेपद द्यावे असा आणखी एक पर्याय पुढे आला. परंतु, यांपैकी एकही पर्याय अवलंबण्याची अमृतरावाची आरंभी तरी तयारी नव्हती. त्याच्या नजरेपुढे
नाना – बापूचा ‘ बारभाई मंडळाचा ‘ आदर्श तरळत असावा. त्याच्या मते, बाजीराव पुण्यास येईपर्यंत बारभाई प्रमाणे राज्यकारभार करावा असे होते. परंतु, यशवंतराव आणि इतरांना हा बेत पसंत पडला नाही. कारण, बारभाई यशस्वी होण्यामागे पेशवा त्यांच्या बाजूचा होता हे अमृतराव साफ विसरला होता.
अशा प्रकारे निव्वळ शाब्दिक चर्चांमध्ये पुणे दरबारातील मुत्सद्दी गुंतल्याचे पाहून व दरबारातील राजकीय स्थितीचा पुरेसा कानोसा घेऊन क्लोझने दि. २८ नोव्हेंबर रोजी पुणे सोडून मुंबईकडे प्रस्थान ठेवले. पुण्यातून इंग्रज रेसिडेंटने न जावे याकरता अमृतराव – यशवंतरावाने बरेच प्रयत्न केले पण एका मर्यादेपर्यंत क्लोझला अडवून धरणे त्यांना शक्य नसल्याने त्यांनी त्यांस जाऊ दिले.

    बाजीराव महाडला स्वस्थ बसल्याचे पाहून अमृतरावाने एकतर छातीठोकपणे पेशवेपद वा कारभार हाती घ्यायला हवा होता पण तसे काहीएक न करता तो निव्वळ शाब्दिक मसलती करण्यात दंग झाल्याचे पाहून होळकराने त्यांस एक कोट रुपये देण्याचा तगादा लावला. अमृतरावाकडे एवढी रक्कम नसल्याने त्याने पुणे शहरातून २५ लाखांची वसुली करून यशवंतरावास देण्याचे मान्य केले. त्यानुसार त्याने आपला सरदार हरिपंत भावे यांस वसुलीच्या कामी नियुक्त केले व त्याच्या मदतीला होळकराने आपले सरदार हरनाथ, नागो जिवाजी व शेखजी यांना नेमले. बाजीरावाच्या अमदानीत सर्जेरावीतून ज्यांच्याकडे काही पैसाअडका शिल्लक राहिला होता तो भाव्याने लुटून होळकराच्या हवाली केला. सुमारे चार महिने हरीपंताने पुण्यात धुमाकूळ घालून जवळपास ५०
लाखांचा भरणा होळकराकडे केल्याचे सरदेसाई लिहितात खरे, पण सर्जेरावीनंतर पुणे शहरातून एवढी वसुली होणे मला तरी अशक्य वाटते.
असो, पुण्यातून म्हणावी तशी अर्थप्राप्ती न झाल्याने अमृतरावाने होळकराला प्रतिनिधीच्या कर्नाटकातील मुलखातून दहा लाखांची वसुली करण्याची परवानगी दिली. यशवंताने त्या कामासाठी फत्तेसिंग मान्याला पाठवून दिले.

    या काळातील यशवंतरावाचे राजकारण अतिशय वास्तववादी असल्याचे दिसून येते. त्याची मुख्य मागणी होळकरांची सरदारी पूर्ववत राहून तिची वस्त्रे खंडेरावास
र मुतालकी आपणांस मिळावी अशी होती. हि मागणी पुरी करण्यास अमृतराव सध्या तरी असमर्थ असल्याने त्याने बाजीरावाशी परत एकदा संधान बांधले. परंतु, बाजीरावाचा काही त्यांस अनुकूल प्रतिसाद येईना. तेव्हा त्यांस ताब्यात घेतल्याशिवाय पुढील
राजकारण सुराला लागणार नाही हे पाहून होळकराने अमीरखानास बाजीरावाला पकडण्याची आज्ञा केली.
त्यानुसार अमीरखान महाडच्या दिशेने जाऊ लागला. हे पाहून आणि इंग्रज रेसिडेंट पुणे सोडून मुंबईला गेल्याचे कळाल्याने बाजीरावाने महाडचा मुक्काम आटोपता घेऊन प्रथम हर्णे व नंतर सुवर्णदुर्गास आपला तळ ठोकला.

    आपल्या ५ – ६ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक बऱ्या – वाईट प्रसंगांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या पेशव्याला यावेळी नेमकं कसं वागायचं हे जरी कळत नसलं तरी कसं वागू नये हे मात्र चांगलच समजत होतं. पेशव्याची मदत करण्यास इंग्रज कितीही आतुर असले व त्यांच्या मदतीची पेशव्याला अतिशय निकड असली तरी त्यांचा आश्रय केल्यास आपणांस आपल्या राजकीय स्वातंत्र्यास मुकावे लागेल याची त्यांस पुरेपूर जाणीव होती. त्यामुळेच इंग्रजांकडे मदतीची मागणी करत असताना प्रत्यक्ष त्यांचा आश्रय घेण्याचे तो लांबणीवर टाकत होता. त्याउलट दौलतराव शिंद्याला तातडीने दक्षिणेत येण्याचा वा फौजा पाठवण्याचा निरोपांवर निरोप धाडत होता. दौलतरावानेही त्यांस काही काळ निभावून नेण्याची सूचना करत लवकरच मदतीला येण्याचे आश्वासन देत इंग्रजांच्या आश्रयास न जाण्याचा सल्ला दिला. बाजीरावाला सर्व काही समजत होते पण,
मीरखानाची पथके जवळ येत असल्याचे पाहून पेशव्याने आपला व चिमाजीचा कुटुंब – कबिला सुवर्णदुर्गावर ठेवून रेवदंड्याकडे कूच केले. बाजीराव सुवर्णदुर्ग सोडून गेल्यावर मीरखानाने पेशव्याचे कुटुंब सुवर्णदुर्गातून हस्तगत केले व त्यांना बंदोबस्ताने पुण्यास रवाना करून रायगडावरील सवाई माधवाच्या पत्नीला --- यशोदाबाईला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, किल्लेदाराने त्याचे प्रयत्न हाणून पाडले व याच सुमारास इंग्रजांची लढाऊ जहाजे बाणकोटच्या खाडीत आल्याने अमीरखानाने पुण्याकडे माघार घेतली.

    रेवदंड्याला पोहोचल्यावर बाजीराव पेशव्याच्या हातून राजकारण व परिस्थिती या दोन्हीवरील नियंत्रण झपाट्याने सुटू लागले. जवळ मुत्सद्दी वा सरदार नाहीत कि पाठीशी प्रबळ सेना नाही. अशा स्थितीत राजधानी त्यागून पेशवा आपल्या धाकट्या भावासह व काही अनुयायांसोबत कोकणातील एका कोपऱ्यात आसरा घेऊन दौलतराव शिंद्याच्या मदतीची वाट बघत बसला. शिंदे जरी पेशव्याच्या मदतीला येण्याची आश्वासने देत असला तरी त्याला पुण्याजवळ येण्यास कमीत कमी दोन अडीच महिन्यांचा कालावधी लागणार होता व इकडे इंग्रज तर पेशव्याला मदत करण्यास अतिशय आतुर झाले होते. पुण्यातील राजकीय घडामोडींवर पेशव्याचे शक्य तितके लक्ष होतेच. पुण्यातील मुत्सद्द्यांचे एकमत होऊन त्यांनी एखादी मसलत उभारायच्या आत बाजीरावाला काहीतरी हालचाली करणे भाग होते. त्यानुसार त्याने आपल्या हातातील अखेरचा पर्याय अवलंबला व रेवदंड्याहून मुंबईला प्रयाण केले.
    मुंबईचा गव्हर्नर डंकन याने पेशव्याचे मोठ्या समारंभाने स्वागत करून त्यांस मेजवानी दिली. गव्हर्नरचा पाहुणचार घेऊन पेशवा लगेच वसईला निघून गेला. पेशव्याच्या या धावत्या मुंबई भेटीमागील मुख्य  हेतू म्हणजे, इंग्रजांची व आपली जवळीक पाहून अमृराव होळकराला पुण्यातून बाहेर काढेल वा दहशत खाऊन होळकर स्वतःच पुणे सोडून निघून जाईल व इंग्रजांची मदत घेण्याचा आपल्यावरील प्रसंग टळला जाईल. परंतु,
बाजीरावाच्या या हालचालींचा योग्य तो अर्थ घेऊन त्यावर उपाययोजना
करण्यात पुण्यातील मुत्सद्दी मंडळ --- विशेषतः अमृतराव कमी पडला. यशवंतराव होळकराने साताऱ्याहून मागवलेली पेशवाईची वस्त्रे स्वतःच्या मुलाला देणे किंवा स्वतः घेणे यांपैकी एक काहीही न करता रायगडावर पेशव्याच्या ताब्यात असलेल्या यशोदाबाईला सोडवून आणून तिच्या पदरात आपल्या मुलास दत्तक देण्याच्या अव्यवहार्य मसलतीवर तो अडून बसला.
सारांश, देशी – विदेशी इतिहासकारांनी अनुक्रमे, नावाजलेल्या व झोडपून काढलेल्या अमृत आणि बाजीरावाच्या अंगी फारशी कर्तबगारी तर नव्हतीच पण प्रसंगावर नजर देऊन एखादा निर्णय ठामपणे घेऊन त्यावर कायम राहण्याची धमक देखील नव्हती असेच म्हणावे लागेल. असो.

    पुणेकरांनी साताऱ्याहून वस्त्रे आणण्याचा उपक्रम चालवल्याचे पाहून बाजीरावाने अखेर इंग्रजांच्या गळ्यात गळे घालण्याचा निर्णय घेऊन दि. १८ डिसेंबर १८०२ रोजी क्लोझमार्फत तहाची वाटाघाट आरंभली. पेशव्याच्या राजकीय व लष्करी शक्तीचा इंग्रजांना अंदाज आल्याने त्यांनी आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर ठरतील अशा अटींवर तह घडवून आणण्याचा प्रयत्न केला. खुद्द बाजीरावालाही तहातील कित्येक अटी अमान्य होत्या. त्याने प्रत्येक कलमावर बराच काथ्याकूट केला पण पुण्यातील राज्यक्रांतीची टांगती तलवार आणि पुणेकर - इंग्रज एकत्र येण्याची आशंका तसेच दौलतरावाचे दूर उत्तरेत असणे इ. कारणांनी अखेर ता. ३१ डिसेंबर १८०२ रोजी खालील मुख्य अटींवर तह करून आपले पेशवेपद कायम राखण्यात यश मिळवले.

(१)  एकाचे शत्रुमित्र तेच दुसऱ्याचे शत्रुमित्र मानणे.

(२)  इंग्रजांनी स्वतःचे मुलखाप्रमाणेच बाजीरावाचे मुलखाचे सरंक्षण     करणे.

(३)  त्यासाठी सहा पलटणे, दर एकात एक हजार सैनिक व तोफा युद्धोपयोगी सामानासह बाजीरावाच्या मुलखांत ठेवणे.

(४)  या सैन्याच्या खर्चासाठी सव्वीस लक्ष उत्पन्नाचा प्रांत इंग्रजांस तोडून देणे.

(५)  इंग्रजांशी बिघाड करणाऱ्या इतर टोपकरांस पेशव्याने आपल्या
राज्यात न ठेवणे.

(६)  निजाम वगैरे ज्याच्याशी पेशव्याचा तंटा असेल त्याचा निकाल इंग्रज बहादूर करतील व तो सर्वांवर बंधनकारक राहील.

(७)  गायकवाडाने इंग्रजांशी केलेल्या दोस्तीच्या तहाला पेशव्याने
मान्यता द्यावी आणि गायकवाड दरबारशी पेशव्याचा जो काही दावा असेल त्याचा निकाल इंग्रज सरकार करेल. त्यांस पेशव्याने मान्यता द्यावी.

(८)  प्रसंगानुसार सहापेक्षा अधिक पलटणे देऊन इंग्रजांनी बाजीरावाची आणि बाजीरावाने इंग्रजांस आपली फौज देऊन एकमेकांचे साह्य करावे.

(९)  एकमेकांनी आगाऊ कळविल्याशिवाय परदरबारशी सवाल जबाब न करणे.

(१०)  सुरत शहर व तेथील सर्व हक्क पेशव्याने इंग्रजांस द्यावेत.

    वसईच्या तहातील या प्रमुख अटी वरवर पाहता देखील किती जाचक आहेत याची सहज कल्पना येते. महत्त्वाचे म्हणजे या तहातील नवव्या कलमाचे सभ्य आणि प्रामाणिक इंग्रजांनी पालन केल्याची नोंद मला तरी कुठे आढळली नाही.

    बाजीरावाने इंग्रजांशी तह केल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. वास्तविक, जरी बाजीराव आणि क्लोझ यांच्यातील तहाची वाटाघाट यशस्वी होऊन तात्पुरता तह ठरला असला तरी त्यावर मुख्य गव्हर्नर जनरलची सही होणे बाकी असल्याने  हा तह हाणून पाडण्यासाठी मराठी सरदार – मुत्सद्द्यांकडे भरपूर अवधी होता. परंतु, अमृतरावास काही शहाणपण आले नाही आणि दौलतरावाची पथके बऱ्हाणपुरास येऊन पोहोचल्याने अधिक काळ पुण्यात राहणे होळकरास देखील परवडणारे नव्हते. एकतर आधीच अमृतरावाच्या निमंत्राणवरून दक्षिणेत येऊन त्यांस युद्ध व सैन्याचा खर्च पदरात पडून वर आणखी इंग्रजांशी लढण्याचा प्रसंग उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली होती. अशा परिस्थितीत त्याने शिंद्यासोबत तडजोड करण्याचा निर्णय घेत स्वराज्याचा कोसळू पाहणारा डोलारा सावरून धरण्याचा यत्न चालवला. त्यासाठी त्याने नागपूरकर भोसल्यांची मदत घेतली. 


    इकडे बाजीरावाने अमृतरावाला पत्र लिहून आपल्या मुलासहित वसईला निघून येण्याची आज्ञा केली तर यशवंतरावाने परत एकदा पेशव्याला विनंती केली कि, ‘ होळकरांची सरदारी कायम ठेवून खंडेरावास सरंजामाची वस्त्रे द्यावी आणि त्यांस माझ्या ताब्यात द्यावे. आपणांस माझा विश्वास येत नसल्यास मी एकटाच आपल्या भेटीला येतो.’ परंतु बाजीरावाला यशवंताची मसलत पटली नाही. उलट क्लोझने यशवंतरावास पत्र लिहून कळवले कि, ’ बाजीरावाने आमच्यासोबत तह करून आमचे संरक्षण स्वीकारले आहे. तुमच्यात व पेशव्यात जो तंटा आहे तो मिटवून तुम्हां उभयतांची गोडी करून देण्याचा गव्हर्नर जनरलचा मानस आहे. तेव्हा तुम्ही आपल्या सैन्यासह पुणे प्रांतातून निघून जाल तर उत्तम. अन्यथा तुमचा व आमचा बिघाड होण्याची दाट शक्यता आहे.’ क्लोझची चढाक बोलणी पाहून पुणेकर मंडळी चपापून गेली. त्यांनी आपसांतील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने इंग्रजांशी सामना करण्याची तयारी आरंभली. परंतु, प्रत्येकाच्या मनात दुसऱ्याविषयी अविश्वास असल्याने या तयारीची केवळ चर्चाच घडून अंमलबजावणी फारच अल्प झाली.

    इंग्रजांशी सामना करण्यासाठी निजामाला आपल्या पक्षास वळवून घेण्याकरता बाबा फडके हैद्राबादला निघून गेला. वास्तविक, निजामला मराठे वा इंग्रज हे दोघेही सारखेच असले तरी इंग्रजांनी यापूर्वीच त्याचे हातपाय बांधल्याने इंग्रजाना थोडीशी भीती घालण्यासाठी त्याने पुणेकरांशी वरकरणी स्नेहाची बोलणी आरंभली. दरम्यान, इंग्रजांचा भक्कम आधार लाभल्याने निर्धास्त झालेल्या बाजीरावाने
पल्या विरोधकांचा समाचार घेण्यासाठी पावले उचलली. अमृतरावाने होळकरास हाताशी धरल्याचा राग मनी बाळगून त्याने अमृतरावाचा भिवंडी येथील वाडा लुटून घेतला. रामचंद्र पटवर्धन प्रभूती सरदारांना फौजफाटा घेऊन आपल्या --- पर्यायाने इंग्रजांच्या मदतीस येण्याची आज्ञापत्रे रवाना केली. तिकडे उत्तरेतून दौलतराव शिंदे बऱ्हाणपुरापर्यंत आला होता. अनिश्चित राजकीय स्थिती पाहून त्याने कोल्हापूरच्या छत्रपतींना पत्रे पाठवून आपल्या मदतीसाठी सैन्य पाठवण्याची त्याने विनंती केली. हा सर्व रागरंग पाहून स. १८०३ च्या फेब्रुवारी अखेर यशवंतरावाने पुण्यातील आपला मुक्काम आटोपता घेतला.  

    होळकराची फौज पुण्यातून निघून गेल्यावर वेल्स्लीच्या नेतृत्वाखालील इंग्लिश पलटणे पुण्याजवळ येईपर्यंत अमृतराव पुण्यातच राहिला. दरम्यानच्या काळात हरिपंत भाव्याला हाताशी धरून त्याने पुण्याची मनसोक्त लुट केली. इंग्रजी सैन्य जवळ आल्याचे कळताच त्याने पुणे सोडून नाशिककडे मोर्चा वळवला. मार्गाने गावांची लुटालूट, जाळपोळ चालूच होती. घराघरांत घुसून कसलाच विचार न करता पैशांसाठी माणसं विवस्त्र  करून बडवली जात होती. खणत्या लावून घरं जमीनदोस्त केली जात होती. सारांश, शत्रूलाही लाजवेल असे वर्तन अमृतराव पेशव्याने पुणे – नाशिक भागात यावेळी केले आणि इतिहासकारांनी या सर्व पापाचे खापर मुद्दामहून यशवंतराव होळकराच्या माथी मारले.  
    मधल्या काळात इंग्रजांनी वसईच्या तहाच्या अंमलबजावणी करता लष्करी व राजकीय डावपेचांचा वापर मराठी सरदारांवर करण्यास आरंभ केला होता. धोंडजी वाघावर चालून आलेली वीस हजारांची सेना ऑर्थर वेल्स्ली सोबत हरिहर मुक्कामी होती. निजामाकडील त्याची व तैनाती मिळून तेवीस हजार फौज कर्नल स्टीव्हनसनच्या हाताखाली परिंड्यास तळ ठोकून राहिली होती तर कलकत्त्याहून काही पथके जलमार्गाने मुंबईला फेब्रुवारी आरंभी रवाना करण्यात आली होती. याखेरीज सेनापती लेकच्या नेतृत्वाखाली एक मोठी तुकडी उत्तरेत कानपुरास सज्ज होऊ लागली होती. सारांश, उत्तर – दक्षिण मिळून सुमारे साठ हजार सैन्याची इंग्रजांनी सिद्धता चालवून मराठ्यांशी परत एकदा दोन हात करण्याची जय्यत तयारी चालवली होती. मात्र, युद्धातील अनिश्चितता व पूर्वानुभव लक्षात घेऊन गव्हर्नर जनरलने आपल्या समग्र सैन्याचे दोन मुख्य विभाग करून दक्षिणेची जबाबदारी अधिकार पदाने कनिष्ठ असताना
देखील केवळ गव्हर्नर जनरलचा भाऊ म्हणून ऑर्थर वेल्स्लीवर सोपवत उत्तरेतील सैन्याचे नेतृत्व जन्माने आयरिश पण वृत्तीने ब्रिटीशांशी एकनिष्ठ असलेल्या लॉर्ड लेकच्या हाती देत या दोघांनाही मर्यादित राजकीय अधिकार स्वातंत्र्यही दिले. या दोघांची समकालीन मराठी सरदारांशी तुलना केली असता निव्वळ युद्धकामांत ते त्यांच्या पासंगालाही पुरणारे नव्हते. ऑर्थर हा काहीसा अननुभवी तर लेकने नुकत्याच झालेल्या आयरिश युद्धांत बंडखोर सैन्याकडून तुलनेने व संख्येने अधिक सुसज्ज फौज हाताशी असताना देखील सपाटून मार खाल्ला होता. असे हे दोन इंग्रज सेनानी केवळ फंदफितुरी व दैवयोगाने दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धातील यशस्वी सेनापती म्हणून विख्यात झाले. 

 
    सर्व तयारी पूर्ण झाल्यावर दि. ९ मार्च १८०३ रोजी ऑर्थर वेल्स्ली हरिहरहून पुण्याच्या दिशेने निघाला तो, ता. २० एप्रिल रोजी पुण्यास दाखल झाला. तत्पूर्वी गव्हर्नर जनरलची वसईच्या तहावर सही होऊन तो कागद दि. १८ मार्च रोजी बाजीरावास मिळाला. इकडे सेनापती वेल्स्ली पुण्यास आल्यावर त्याने क्लोझला निरोप पाठवून बाजीरावास घेऊन पुण्यास येण्याची सूचना केली. त्यानुसार क्लोझ पेशव्याला घेऊन ता. १३ मे १८०३ रोजी पुण्यात आला व शनिवारवाड्यात मोठ्या समारंभाने इंग्रजांनी ‘ हिज हायनेस बाजीराव पंडित प्रधान बहादूर ‘ यांची मसनदीवर स्थापना केली. यानिमित्ताने पेशव्याने अधिकार धारण केल्याचा जाहीरनामा काढण्यात आला. खेरीज इंग्रजांनी पुण्यातील आपल्या तळावर तसेच मुंबई, कलकत्ता, मद्रास, सुरत व श्रीरंगपट्टण येथे खुशालीच्या तोफांची सरबत्ती करून हिंदुस्थानची अप्रत्यक्ष मालकी आपणांकडे आल्याचे सर्वांना जाहीर केले.

    बाजीरावास पेशवाईवर स्थापून इंग्रजांनी मराठी राज्य गिळण्याच्या दृष्टीने पहिले दमदार पाऊल उचलले. यातूनच दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाची निर्मिती होऊन त्यात अनुक्रमे शिंदे – भोसले पराभूत झाले व त्यांनी इंग्रजांशी तह करून आपल्या जहागिऱ्या व संस्थाने कायम ठेवण्यात यश मिळवले तर त्यानंतर यशवंतराव होळकराने स्वतंत्रपणे धडपड करून इंग्रजांना अक्षरशः रडकुंडीस आणले. तेव्हा एक स्वतंत्र सत्ताधीश या नात्याने तह करून त्याची मर्जी प्रसन्न करून घेतली.

दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाची तात्कालिक कारणे व मराठी सरदारांचे पराभव कसे झाले, तेच होळकरास यश प्राप्त कशामुळे झाले याची चर्चा प्रस्तुत विषयाच्या मर्यादे बाहेरची आहे. परंतु, या युद्धादरम्यान बाजीराव काय करत होता हे पाहणे मात्र आवश्यक आहे.
 

    वसईच्या तहाची नक्कल इंग्रजांनी मराठी सरदारांना पाठवून त्याची अंमलबजावणी करण्याकरता त्यांचे सहकार्य मागितले. त्याचप्रमाणे, बाजीरावानेही त्यांना पूरक अशी आज्ञापत्रे रवाना केलीच परंतु, अंतस्थरित्या गुप्त पत्रे पाठवून इंग्रजांच्या विरोधात एकत्र येऊन त्यांना रोखण्याची आज्ञाही त्याने आपल्या सरदारांना केली. बाजीरावाच्या या सर्व गुप्त (?) हालचालींची इंग्रजांना पुरेपूर कल्पना होती. परंतु, त्यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करून आपले सर्व लक्ष मराठी सरदारांचे लष्करी सामर्थ्य खच्ची करण्याकडे एकवटले. बाजीरावाने या काळात एक अतिशय महत्त्वाची चूक केली व ती म्हणजे वसईच्या तहाच्या बाजूने आपण आहोत कि विरोधात याविषयी त्याने ठाम अशी उघड भूमिका घेतली नाही. ज्याप्रमाणे इंग्रजांनी वडगावचा तह नाकारून पहिल्या इंग्रज – मराठा युद्धांत त्या तहाचे उल्लंघन केले होते त्याचप्रमाणे बाजीराव देखील करू शकत होता व त्याने तसे केले असते आणि इंग्रजांच्या विरोधात उभे राहण्यासाठी त्याने आपल्या सर्व सरदारांना उद्देशून आज्ञापत्रे काढली असती तर त्यांस कैद करण्याची इंग्रजांना अजिबात
हिंमत झाली नसती. तसेच स. १८१८ प्रमाणे छत्रपतींकडून त्यांस पेशवाईवरून हुसकावणे वा बडतर्फ करणेही शक्य नव्हते. कारण, सातारशी त्यांचे सूत्र अजून जुळले नव्हते. परिस्थिती पेशव्याला अजिबात प्रतिकूल होती असे नाही. कारण वसईचा तह हा बाजीरावालाच काय कोणत्याच मराठी सरदाराला मान्य नव्हता. पण त्यांना तहाच्या विरोधात उभं राहण्यासाठी एका समर्थ नेतृत्वाची गरज होती व तेच देण्यात बाजीराव नेमका कमी पडला !


    याबाबतीत बापू गोखल्याचे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपाचे म्हणता येईल. बापूला इतर सरदारांप्रमाणेच इंग्रजांच्या मदतीने बंडखोरांचा समाचार घेण्याची पेशव्याने आज्ञा केली होती. आता हे बंडखोर म्हणजे वास्तविक होळकर आणि अमृतराव होते पण ‘ जो वसईचा तह मानणार नाही तो बंडखोर ‘ अशी इंग्रजांनी बंडखोरीची नवी व्याख्या केल्याने शिंदे, भोसले हे देखील बंडखोर बनले होते. अशा या तथाकथित बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांनी लष्करी मोहिमा आखल्या व या स्वाऱ्या यशस्वी व्हाव्यात याकरता पेशव्याने बापू व इतर सरदारांना इंग्रजांच्या मदतीस जाण्यास सांगितले. पण त्यासोबत अंतस्थरित्या इंग्रजविरोधी फळी उभारून त्यांच्याशी बिघाड करण्याची सूचनाही दिली. पैकी, बापूने यांतील कोणत्याच आज्ञेचे मनापासून पालन केले नाही. फौज घेऊन तो इंग्रजांना सामील झाला खरा, पण त्याच्या मनाचा कल शिंदे, होळकर, भोसले यांच्याकडे असल्याने त्याने मोहिमेत झटून काम केलेच नाही. वेल्स्लीलाही त्याचा संशय आल्याने त्याने त्यांस मुख्य आघाडीपासून लांब ठेवण्याकडेच लक्ष पुरवले. बापूचे तथाकथित बंडखोर सरदारांशी अंतस्थ सूत्र होते खरे, पण जोवर स्वतः पेशवा इंग्रजांच्या विरोधात ठासून उभा राहत नाही तोवर बापू सारख्यांना  निमुटपणे हात बांधून गप्प बसणेच भाग होते. आपल्या अनाकलनीय मुत्सद्देगिरीने बाजीरावाने स्वतःचाच अशा प्रकारे घात करून घेतला.            
                                                                                     ( क्रमशः )


Sunday, December 21, 2014

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग – १० )
     . १८०१ च्या जुलैमध्ये सर्जेराव घाटगे उत्तरेत निघून गेल्यावर पुण्यात बाजीराव पेशवा बराचसा निर्धास्त निरंकुश बनला. विठोजीचा काटा काढून त्याने अमृतरावाच्या कारस्थानाचा दक्षिणेतील पाया कमकुवत केलाच होता. आता त्याची दृष्टी इतरांकडे वळली. सर्जेरावाच्या पलटणी पुण्यात असतानाच त्याने काहीतरी खुसपट काढून माधवराव रास्त्याला कैद केले होते. सरदार रास्त्यांचा बंदोबस्त होतो होतो तोच प्रतिनिधीचे प्रकरण अनावर झाले. वस्तुतः प्रतिनिधी हा छत्रपती नंतरचा महत्त्वाचा पेशव्याचा वरिष्ठ अधिकारी. परंतु कालांतराने पेशव्यांच्या सामर्थ्यापुढे जिथे खुद्द छत्रपती नामधारी बनले तिथे इतरांची काय कथा ! वंशपरंपरागत जहागिर पदे सांभाळत पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकत दिवस ढकलत होते. बाजीराव पेशव्याच्या वेळेस परशुरामपंत हा प्रतिनिधी असून लहानपणीच त्यांस नाना फडणीसने पुण्यात आणून ठेवले होते. आरंभी प्रतिनिधीचा कारभार पेशव्याने नियुक्त केलेले अधिकारी प्रतिनिधीची आई बघत असे. पुढे प्रतिनिधी वयात येताच त्याने कारभार आपल्या हाती घेतला पण त्याचा त्याच्या आईचा आपसांत विरोध पडून दोघेही परस्परांचा अंमल बसू देण्याकरता आपल्याच सरंजामी मुलखाची लूट करू लागले. याबाबतीत प्रतिनिधीने बरीच आघाडी मारली. खेरीज विवाहाच्या दोन स्त्रियांना त्यागून तेली जातीच्या रक्षेबरोबर तो अधिक काळ व्यतीत करू लागला. प्रतिनिधीच्या या कृत्यांची कागाळी पेशव्याकडे जाताच त्याने सर्जेरावाच्या मदतीने परशुरामाला अटक करून नजरबंदीत ठेवले. पुढे प्रतिनिधीने दौलत - सर्जेरावामार्फत पेशव्याकडून आपली सुटका करून घेतली परत पूर्वीचेच ढंग अधिक जोराने सुरु केले. रामोशांची पथके उभारून स्वतः त्यांचे नेतृत्व करत आपल्याच प्रांतात तो दरोडेखोरी करू लागला. तेव्हा बाळोजी कुंजीरा मार्फत पेशव्याने त्यास पकडून गोविंदराव काळ्याच्या वाड्यात नजरकैदेत ठेवले आणि त्याचा सर्व सरंजाम जप्त करून टाकला. वास्तविक प्रतिनिधीच्या सरंजामाची घालमेल करण्याचा अधिकार फक्त छत्रपतींना होता. परंतु आधीच्या पेशव्यांनी आणि नंतर नाना फडणीसने छत्रपतींना अगदीच गुंडाळून टाकल्याने बाजीरावास हा निर्णय अंमलात आणणे फारसे कठीण गेले नाही
 
    रास्ते, प्रतिनिधी यांची वासलात लावल्यावर पेशव्याने पटवर्धनांकडे लक्ष वळवले. रामचंद्र पटवर्धनाकडून सावनुर प्रांत काढून घेण्यासाठी याने बापू गोखले, चतुरसिंग भोसले कुंजीर मंडळींना . १८०१ च्या मध्यावर रवाना केले. पटवर्धन पुणेकरांचा झगडा वर्षभर चालला. दरम्यान हा लढा निकाली निघण्यापूर्वीच उत्तरेत शिंद्याच्या पलटणींचा निकाल लावून यशवंतरावाची विजयी सेना दक्षिणेकडे सरकू लागली. 
 

    मागील प्रकरणात सांगितल्याप्रमाणे यशवंतरावाच्या चढाईस आळा घालण्याकरता दौलतरावाने सर्जेरावास उत्तरेत पाचारण केले. सर्जेराव उत्तरेत निघाला त्याच वेळी बाजीरावानेही शिंदे होळकरांच्या दरम्यान समेट करण्याकरता उत्तरेत जाण्याचा मनोदय जाहीर केला खरा, पण त्यानुसार तो अंमलात न आणता त्याने कोपरगावी व इतरत्र जाऊन पर्यटनाचा आनंद मात्र लुटला. खेरीज, कचेश्वर येथे अमृतरावास भेटीला बोलावून घेऊन यशवंतरावा विषयी त्याचा अंदाज काढण्याचाही प्रयत्न केला. अमृतरावाच्या या भेटीपूर्वी होळकरांविषयी आपली कृपादृष्टी दाखविण्याकरता बाजीरावाने काशिराव होळकरचा जप्त केलेला सरंजाम मोकळा केला होता खरा पण, अमृतरावाच्या भेटीनंतर स. १८०१ च्या ऑक्टोबर महिन्यात होळकरांचे उत्तर दक्षिण हिंदुस्थानातील सर्व महाल जप्त करून टाकले. माझ्या मते, यशवंतरावाच्या बंडामागे अमृतरावाचीच प्रेरणा असल्याची पक्की खात्री झाल्यावर व हे दोघे मिळून आपणांस पदभ्रष्ट करतील या भीतीने त्याने हा निर्णय घेतला. परंतु, विठोजी प्रकरणी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती असेच पेशव्याच्या या निर्णयाच्या बाबतीत म्हणावे लागेल. 


    पेशव्याने समग्र होळकरशाही खालसा केल्याचे समजताच यशवंतराव आणि समस्त होळकरशाही अभिमानी सरदार चवताळून उठले. त्यांच्या व शिंद्याच्या फौजांच्या सबंध हिंदुस्थानभर चकमकी घडू लागल्या. या झगड्यावर उभयतांनी परस्परांच्या राजधान्यांचाही विध्वंस करून टाकला. परंतु, या आत्मघाती यादवीत शेवटी होळकरांची सरशी होण्याची चिन्हे दिसू लागली. दौलतरावाचे प्रचंड सैनिकी सामर्थ्य, आधुनिक शस्त्रास्त्र सामग्री वगैरे सर्व गोष्टी यशवंतरावापुढे कुचकामी ठरल्या. अर्थात, शिंद्याच्या घरातील व लष्करातील अंतर्गत वैमनस्यंही यांस तितकीच कारणीभूत असल्याचे विसरता कामा नये. असो, उत्तरेत शिंद्याला लोळवून व काशिराव होळकरची महेश्वरी व्यवस्था लावून आपल्या सेनासागरासह यशवंतराव पुण्याच्या दिशेने येऊ लागला. आपला निर्णय अंगलट येत असल्याचे पाहून पेशव्याने शिंदे होळकरांना उद्देशून आज्ञा काढली कि, ‘ उभयतांनी आपसांत सुरु असलेला संघर्ष तात्काळ थांबवावा. दोघांच्याही समजुतीचा तह सरकारातून ठरे पर्यंत शिंद्याने सर्व सैन्यासह बऱ्हाणपुरी तर होळकाराने थालनेरास राहावे.परंतु पेशव्याच्या या आज्ञेला उभयतांनीही भीक घातली नाही. दौलतराव पेशव्याला जुमानत नव्हता तर होळकराचा सर्व सरंजाम पेशव्यानेच जप्त केल्याने तांत्रिकदृष्ट्या तो आता पेशव्याचा नोकरच नव्हता !


    दौलतरावाला बगल देऊन यशवंतरावच्या आघाडीची पथके स. १८०२ च्या आरंभी दक्षिणेकडे सरकू लागली. पाठोपाठ यशवंतरावहे आपली मजबुती करत हळूहळू दक्षिणेकडे जाऊ लागला. संभाव्य लष्करी व राजकीय  आक्रमणाला तोंड देण्याकरता बाजीरावानेही तयारी चालवली. कर्नाटकात गेलेल्या सरदारांना पुण्यास येण्याची आज्ञापत्रे रवाना होऊ लागली. शिंदे उत्तरेत अडकल्याने नागपूरकर भोसल्यांना पुण्यास येण्याची गळ घातली जाऊ लागली. सवाई माधवाची पत्नी यशोदाबाईला जबरदस्तीने रायगडी रवाना करून तिथे नजरबंदीत ठेवण्यात आले. जोडीला स्वतःच्या व चिमाजीच्या बायकोलाही पाठवून दिले. यामागील पेशव्याचा हेतू उघड होता. यदाकदाचित आपल्याला पदभ्रष्ट करण्याचा अमृतराव यशवंतरावाने यत्न केला तर दत्तक विधानासाठी त्यांना भट घराण्यातील कोणत्याही स्त्रीचा आधार मिळू नये. अमृतराव व यशवंतराव हे एकविचाराने वागत असल्याची त्याची एव्हाना खात्री पटली होती परंतु, अमृतरावाला कैद करून संभाव्य राज्यक्रांती / बंडाचा लागलीच उपशम करण्याची त्यांस बुद्धी वा हिंमत झाली नाही.


    पुण्यास परतल्यावर पेशव्याने होळकराच्या संभाव्य स्वारीचा मुकाबला करण्यासाठी कसून तयारी चालवली. जुन्या सरदारांना पुण्यास येण्याची आज्ञापत्रे यापूर्वीच पाठवण्यात आली असली तरी रास्ते, पुरंदरे, घोरपडे, पानसे इ. वगळता बाकी कोणी आले नाही. बाजीराव गादीवर बसल्यापासून  आजवर जी काही विविध कट कारस्थाने घडली त्याची झळ बव्हंशी जुन्या सरदारांना बसल्याने त्यांनी यावेळी पेशव्याच्या मदतीला न जाण्याचे ठरवले. अर्थात याकरता प्रत्येकाकडे भरपूर कारणे होतीच. पेशव्याचा कर्नाटकातील अलीकडचा महत्त्वाचा सरदार बापू गोखले देखील येतो, येतो म्हणत अखेरपर्यंत आला नाही. उलट त्याने परस्पर यशवंतराव सोबत मैत्रीचा पत्र व्यवहार आरंभला. बापू किंवा इतरांचा वर्तनाची कारणे उघड व स्पष्ट होती. होळकराच्या बाबीतील पेशव्याचे वर्तन सर्वांनाच अन्यायी वाटत होते. तसेच कोणत्याही निमित्ताने पेशव्याने सरदारांचे सरंजाम जप्त करण्याही मोहीम चालवली होती त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या भवितव्याची काळजी लागून राहिली होती. यशवंतरावाची स्वारी यशस्वी होऊन अमृतराव कारभारात आला तर या स्थितीत फरक पडेल अशी त्यांची भावना होती. जुन्या सरदारांचे मनोगत ओळखून पेशव्याने नवीन सरदार उभे करण्यास आरंभ केला. आपल्या मावसभावास --- गोविंदराव परांजपेला नवीन तोफा ओतण्याची आज्ञा फर्मावली. दौलतराव शिंद्याकडे पत्रांवर पत्रे पाठवून होळकराविरुद्ध लढण्यासाठी लष्करी मदतीची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे यशवंतराव होळकराकडे पत्रे रवाना करून तहाची बोलणीही सुरु करण्यात आली. परंतु, होळकराशी वाटाघाट करून सन्माननीय तोडगा काढण्याची यावेळी बाजीरावास बिलकुल इच्छा नव्हती असे परिणामांवरून दिसून येते.


    यशवंतराव - अमृतराव हे एकविचाराने वर्तत असून कोणत्या न कोणत्या निमित्ताने दक्षिणेत उतरून आपणांस पदच्युत करण्याचा होळकराचा डाव आहे असेच त्यांस वाटत होते. त्याउलट होळकराची असली तरी ती अधिक मुत्सद्दीपणाची होती. जरी तो अमृतरावाच्या निरोपावरून दक्षिणेत उतरत असला तरी केवळ अमृतरावाच्या भीडेखातर तख्तनशीन पेशव्याशी वैर बांधण्याची त्याची इच्छा नव्हती. उलट पेशव्याकडे त्याने खास वकील पाठवून आपल्या प्रमुख मागण्या कळवल्या, त्या पुढीलप्रमाणे :-

(१)        मल्हारराव होळकराचा मुलगा व पत्नी अशीरगडावर शिंद्याच्या कैदेत आहेत त्यांना आपल्या स्वाधीन करण्यात यावे. तसेच होळकरांची सरदारी मृत मल्हाररावाच्या मुलाच्या नावे --- खंडेरावाच्या नावे करून त्याची मुतालकी यशवंतरावास द्यावी.

(२)        शिंदे होळकर दोघेही बरोबरीचे सरदार असताना अलीकडे पेशव्यांनी शिंद्याला दहा लाखांची जहागीर व एक किल्ला दिला आहे तर त्याप्रमाणे होळकरांना देखील देण्यात यावे. जर हे शक्य नसल्यास शिंद्याला दिलेली जहागीर व किल्ला सरकारात परत घ्यावे.

(३)        उत्तर हिंदुस्थानची वाटणी शिंदे, होळकर, पेशवे आणि पवार यांच्या विभागून असताना अलीकडे शिंदे इतरांचे --- विशेषतः होळकरांचे हक्क राजरोसपणे स्वतःच उपभोगत आहे तर असे नसावे. सर्वांचे हक्क पूर्ववत प्रमाणे चालावेत. 


    होळकराच्या या मागण्या न्याय्य नाहीत असे कोणी म्हणू शकेल  काय ? परंतु, या सध्या व न्याय्य मागण्या मान्य करण्याचेही पेशव्याने सौजन्य दाखवले नाही ! उलट यशवंतरावाशी लढण्याची त्याने कसून तयारी चालवली. इकडे दौलतरावाने पेशव्याच्या मदतीला पाठवण्याकरता कर्जवाम उभारून काही फौज सदाशिवराव बक्षीच्या नेतृत्वाखाली पुण्याकडे पाठवून दिली. यशवंतरावाचे या सर्व हालचालींवर बारीक लक्ष होते. त्याने बक्षीला अडवण्याकरता अमीरखानाची नेमणूक करून बारामतीला जमलेल्या पेशव्याच्या सैन्याचा समाचार घेण्याकरता फत्तेसिंग मानेची योजना केली. पैकी, अमीरखानाने बक्षीची ठिकठिकाणी अडवणूक केल्याने लढाई देत, मार्ग काढत तो कसाबसा दि. २२ ऑक्टोबर १८०२ रोजी वानवडीस दाखल झाला तर तत्पूर्वीच म्हणजे ता. ८ ऑक्टोबर १८०२ रोजी मान्याने पेशव्याच्या  पुरंदरे, घोरपडे, कुंजीर, पानसे इ. सरदारांचा बारामतीच्या लढाईत पराभव केला होता. 


    बारामतीची लढाई बिघडल्याचे समजताच बाजीरावाने पुणे सोडून कोकणात जाण्याचा निर्णय घेतला पण बाळोजी कुंजीरने भीड घातल्यामुळे व बक्षीच्या नेतृत्वाखाली शिंद्याच्या फौजा पुण्याजवळ आल्याने त्याने तो बेत तूर्त रहित केला. शिंदेशाही सैन्य पुण्यात दाखल होताच पाठोपाठ होळकरांची सेनाही पुण्याजवळ आली पण लागलीच युद्धाला तोंड न फोडता यशवंतरावाने फिरून एकदा समेटाची बोलणी आरंभली व बोलणी पक्की अन यशस्वी व्हावी याकरता पेशव्याने बाबुराव आंग्रे, निंबाजी भास्कर, दाजीबा देशमुख व बाळोजी कुंजीर यांना पाठवावे अशी मागणी केली. तसेच या चार मातबरांच्या जीवास अपाय होण्याची भीती वाटत असेल तर फातेसिंग माने वा पेशवा सांगेल त्या सरदारास ओलीस देण्याची  तयारीही दर्शवली. याशिवाय समेटाची बोलणी फिसकटून शिंद्यासोबत संग्राम झालाच तर त्यात पेशव्याने सहभागी न होण्याची व लढाई बिघडल्यास पेशव्याने पुणे न सोडण्याचीही सुचना यशवंतरावाने बाजीरावास केली. परंतु, यांपैकी एकही गोष्ट पेशव्याच्या मनास आली नाही. त्याच्या लेखी, यशवंतराव शत्रू होता व शत्रूच्या बोलण्यावर विश्वास तो काय ठेवायचा ? उलट होळकराच्या या समेटाच्या बोलण्याला वरवर तरी आपली अनुकुलता आहे हे दर्शवण्यासाठी पेशव्याने आपला मेव्हणा रघुनाथ भागवत, बाळोजी कुंजीरचा कारभारी आबाजी शंकर, पुण्यातील सावकार भिवजी नाईक कोलते व नागपूरकर भोसल्यांचा नारायणराव वैद्य या चौघांना यशवंतरावाकडे बोलणी करण्यास पाठवले. स. १७९६ साली पेशवाईवर आलेल्या बाजीरावाने स. १८०२ मध्ये इतका अपरिपक्वपणा दाखवावा याचे आश्चर्य वाटते !
  

    अखेर दि. २५ ऑक्टोबर १८०२ रोजी शिंदे पेशवे यांच्या संयुक्त सैन्याची गाठ यशवंतरावाच्या फौजेशी पडली. संग्राम अटीतटीचा होऊन उभयपक्षांची मिळून दहा हजार माणसे यात मारली गेल्याचे इतिहासकार नमूद करतात. या लढाईत बाजीराव नेमका कुठे होता याची अचूक अशी माहिती मिळत नाही. बव्हंशी इतिहासकारांच्या मते, त्या दिवशी प्रातःकाळीच भोजन आटोपून चिमणाजीला सोबत घेऊन लढाईची गंमत पाहण्याकरता तो वाड्यातून बाहेर पडला पण अर्ध्या वाटेतच लढाई बिघडल्याचे समजताच तो पुण्यातून बाहेर निघाला. रियासतकारांनी याविषयी दोन उल्लेख केले आहेत. पहिला उल्लेख उपरोक्त प्रमाणे असून दुसऱ्या टिकाणी त्यांनी बारा घटका दिवसास श्रीमंत उभयतां बंधु वानवडीस जरी पटक्याजवळ गेले. चार घटका तेथे होते. तों शिंद्याकडील पलटणे कचरली. धीर न धरता सरकारचा जरीपटका निघाला तेव्हां श्रीमंत सुद्धां शिंद्याची फौज पश्चिमेकडे पर्वतीचे अंगास आली. दोन घटका श्रीमंत पर्वतीस होते. होळकराचे फौजेच्या टोळ्या अंगावर येताना दिसू लागतांच श्रीमंत वडगांवचे बागेंत व तेथून डोणजास निघून गेले अशी माहिती दिली आहे. संबंधित उतारा त्यांनी कोठून घेतला याचा मात्र खुलासा त्यांनी केलेला नाही तेव्हा विश्वास कशावर ठेवावा ?
 

    यशवंतरावाचा मुख्य राग शिंद्यावर असल्याने रणातून पळणाऱ्या सरकारी फौजेस त्याने सुखरूप माघार घेण्याची मुभा दिली पण शिंद्याच्या फौजेला अजिबात दयामाया दाखवली नाही शिंद्याची माणसे त्याच्या सैनिकांनी टिपून मारली. त्याचे बुणगे व तोफखाना साफ लुटले गेले. बाजीरावाने पुणे सोडल्याचे समजताच त्याला परत आणण्यासाठी यशवंतरावाने हरनाथ होळकरला रवाना केले. परंतु, होल्कारी सेना आपल्या मागावर येत असल्याचे पाहून सावध श्रीमंत पर्वतीहून वडगाव व तेथून सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे येथे गेले. काही अंतर राखून होळकरांची पथके पाठीशी होतीच. पेशव्याला जबरदस्तीने कैद करण्याचे सामर्थ्य होळकराकडे निश्चित होते पण ते आततायी कृत्य त्याने केले नाही हाच दौलतराव शिंदे आणि यशवंतराव होळकर यांच्यातील महत्त्वाचा फरक आहे ! असो, यशवंतरावाची फौज आपला पिच्छा सोडत नसल्याचे पाहून बाजीरावाने महाडचा रस्ता धरला व कोकणात उतरणारे घाटरस्ते रोखण्याची जबाबदारी बाळोजी कुंजीरवर सोपवली.


    इकडे पेशव्याने पुणे सोडल्यावर यशवंतरावाने पुण्याची नाकेबंदी करून शहरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला. त्यासोबतच बाजीरावाच्या सल्ल्गार मंडळाच्या समर्थकांची  व शिंद्याच्या माणसांची घरे शोधून त्यांची चीजवस्त जप्त करण्यात आली. या व्यतिरिक्त इतर कोणालाही त्रास न देण्याची त्याची सैन्याला आणि सरदाराना सक्त आज्ञा होती. खेरीज, नानाचे जे पक्षपाती कैदेत होते त्यांची सुटका करण्यात येऊन अमृतरावास पुण्यात येण्याचे आमंत्रण धाडण्यात आले. अमृतरावला जुन्नरहून पुण्यात येण्यास नोव्हेंबरची ७ तारीख उजडावी लागली. अमृतरावाने या वेळी जी दिरंगाई केली त्याचा पुरेपूर फायदा बाजीराव आणि इंग्रजांनी घेतला.

  
    स. १८०१ च्या अखेरीस पुण्याच्या रेसिडेन्सीवर पामरच्या जागी बॅरी क्लोझची नेमणूक झाली होती व त्याचा असिस्टंट म्हणून एल्फिन्स्टनही तेथे येऊन दाखल झाला होता. स. १८०२ च्या सबंध वर्षातील घडामोडींवर यांचे बारीक लक्ष असून यशवंतरावाने पुण्याचा ताबा घेतल्यावर क्लोझने त्याची भेट घेऊन त्याच्या हेतूंची चाचपणी केली. वास्तविक, यशवंतरावाची यावेळी अतिशय विचित्र परिस्थिती झाली होती. पेशव्याने होळकरांची सरदारी जप्त केल्याने आता तो पेशव्यांचा सरदार न राहता एक बंडखोर बनला होता. ज्या अमृतरावाच्या भरवशावर तो पुण्यास आला तो अमृतराव जुन्नराहून पुण्यास येण्यास भलताच विलंब लावू लागला होता. खुद्द पेशवा यावेळी महाडला मुक्काम ठोकून राहिला होता. अशा स्थितीत पेशव्याच्या राजधानीचा ताबा आपल्या हाती घेणे राजकीयदृष्ट्या अडचणीचे असल्याचे न ओळखण्याइतपत यशवंतराव मूर्ख नव्हता. त्याने राजकीयदृष्ट्या आपल्या पक्षाची बळकटी करण्याकरता इंग्रजांशी सलोख्याची बोलणी आरंभली. पेशव्याशी आपले भांडण नसून फक्त शिंद्यांशी आपला तंटा आहे व पेशव्याने जरी राजधानी सोडली असली तरी पेशव्याच्या अनुपस्थितीत तिचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे व त्यामुळेच इंग्रज रेसिडेंटनेही पूर्ववतप्रमाणे पुण्यातच राहून या राजकीय भ्रमास पाठबळ द्यावे अशी त्याची राजकीय खेळी होती. परंतु, पेशवाईवर आपला अंकुश बसवण्यास आतुर असलेल्या इंग्रजांनी होळकराचा पक्ष का धरावा ?

                                                                                 ( क्रमशः )