हिंदुस्थानवरील मुस्लीम आक्रमणे - एक चिंतन ( भाग ५ )





    कुतुबुद्दीन ऐबकने स्थापन केलेल्या सुलतानशाहीचा अंत बाबरने करून त्याने आपल्या साम्राज्याची स्थापना केली. या अवधीत दिल्ली हे राजधानीचे केंद्र बनून यावर तुर्क, पठाण, अफगाण, सय्यद व पुन्हा बाबरच्या तुर्क घराण्याची सत्ता स्थापन झाली.

    ऐबक ते बाबरच्या काळादरम्यान सुमारे तीनशे वर्षांचे अंतर आहे. या तीनशे वर्षांत आपली गेलेली सत्ता परत मिळवण्याचे येथील सत्ताधीशांनी अजिबात प्रयत्न केले नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल. जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये तख्तासाठी सुलतानी घराण्यात, दरबारात संघर्ष झाले तेव्हा तेव्हा दिल्लीच्या मांडलिक हिंदुस्थानी सत्ताधीशांनी आपापलं गमावलेलं स्वातंत्र्य परत प्राप्त करण्याकरता प्रयत्न केल्याचे इतिहासात नमूद आहे.
    उदाहरणार्थ :- तैमुरच्या दिल्लीस्वारी आधी मेवाडच्या राजपुतांनी तुघलकांची दुर्बलता पाहून स. १३९० - ९४ च्या दरम्यान दिल्लीवर चाल केली होती. यात त्यांचा जरी पराभव झाला असला तरी ज्या वृत्तीने मुस्लीम आक्रमक बाहेरून येथे येऊन आपापली संस्थांनं उभारत होते, वावरत होते, ती वृत्ती येथील सत्ताधीशांतही कायम असल्याचे दिसून येते.
    
    परंतु असे असले तरी स्थानिक सत्ताधीशांना आपलं गेलेलं स्वातंत्र्य परत मिळवण्यामध्ये अपयश यावं आणि मुस्लिमांना मात्र येथे ठिकठिकाणी आपल्या राजवटी उभारण्यात यश प्राप्त व्हावं, असं का ?
    बंगाल, बिहार, गुजरात, माळवा, काश्मीर, दक्षिण हिंदुस्थानातील बव्हंशी भूभागावरील प्रथमतः बहामनी राजवट व नंतर त्या साम्राज्याच्या विघटनातून निर्माण झालेल्या पाच मुस्लीम शाह्या यांच्या यशाची कारणं काय असावीत ?
    या प्रश्नांची राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक संदर्भातून उत्तरं शोधण्याचे आजवर अनेक इतिहासकारांनी प्रयत्न करूनही अद्यापही त्यांस समाधानकारक उकल करता आली नाही, यावरून या प्रश्नांचे महत्त्व तसेच त्याची क्लिष्टता लक्षात यावी.   

     हिंदुस्थानातील स्थानिक सत्ताधीशांना इस्लामी आक्रमकांचा सामना करण्यात आलेल्या अपयशास्तव कारणांची जी परंपरा दिली जाते त्यामध्ये जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेचा हटकून उल्लेख असतो.

    वस्तुतः या दोन भिन्न धर्मीय संज्ञा आहेत. जातीसंस्था हिंदू धर्माशी निगडीत असून वर्णव्यवस्था हि वैदिकधर्मीय आहे. बव्हंशी इतिहासकारांनी या संज्ञांचा हेतुतः वा अज्ञानातून घोळ घातला आहे.
समस्त देशभर किंवा देशाच्या एका विशाल वा मर्यादित भूभागावर वैदिक धर्मीयांची मुळी सत्ताच नसल्याने त्यांची वर्णव्यवस्था सरसकट लागू होणे अशक्यच होते. म्हणजेच वर्णव्यवस्था हि फक्त त्या धर्मियांकरताच होती.

    जातीसंस्थेमुळे येथील समाजास एकसंधपणे इस्लामी आक्रमणाचा बंदोबस्त करता आला नाही, या दाव्यातही फारसे तथ्य नाही. व्यक्तिगत स्वार्थ, राजकीय कारणांना जातीभेदाचे लेबल लावून वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यात आला आहे. उदाहरणार्थ :- जातीभेदामुळे दाहीरला अरबांचा सामना करण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा पडल्याचे उल्लेख आढळतात का ? किंवा हाच प्रश्न राजपूतांच्या घोरी, ऐबक व त्यानंतरच्या सुलतानांशी झालेल्या युद्धांबाबतही उद्भवतो. त्याचप्रमाणे शिवाजी ते पेशवाईसंदर्भातही.

    स्थानिक सत्ताधीशांची आपसांतील वैमनस्यं हे एक पराभवाचे, अपयशाचे मुख्य कारण मानले जाते. इतकी हास्यास्पद कारणमीमांसा जगात क्वचितच कुठे आढळेल. जिथे प्रत्येक राज्य हे स्वतंत्र राष्ट्र मानले जाते अशा ठिकाणी आधुनिक राष्ट्रवाद किंवा धर्माधिष्ठित राष्ट्रवाद कल्पून मग अशा तऱ्हेची बावळट विधानं केली जातात.

    त्याचप्रमणे चालून आलेले मुस्लीम आक्रमकही आपसांतील संघर्षापासून अलिप्त नसल्याचे सोयीस्कररित्या दुर्लक्षित केले जाते. उदाहरणार्थ :- ख्रिस्ती - इस्लामी धर्मयुद्धांत तुर्क जितक्या अभिनिवेशाने लढले, सहभागी झाले तितके अरब झाले नाहीत, हे कितीजणांना माहिती असते ? महंमद गजनीची सत्ता उलथवून टाकणारे घोरी अफगाण कोण होते ? ऐबकनंतर दिल्लीच्या तख्तासाठी जे संघर्ष झाले ते कोणाकोणांत झाले ? अल्लाउद्दिन खिलजीने मोगलांच्या ज्या कत्तली केल्या त्याचे काय करायचे ? तैमुर ज्या तुघलक सत्तेचा पराभव करून दिल्लीत शिरला ती कोणत्या धर्माची होती ?

    तुल्यबळांच्या परस्परांतील संघर्षात तिसऱ्या बलवान किंवा दुर्बल राजांची मदत घेणे हा जगभरातील प्रघात असून आजही तो जर वापरला जातो तर मग तत्कालीन राजांना का दोष द्यावा ? तसेच त्यावेळी सर्वच सत्ताधीश स्वतंत्र वृत्तीचे होते, महत्त्वाकांक्षी होते. ते आपणहून पारतंत्र्याच्या बेड्या पायात अडकवून घेतील हे संभवत नाही.

    येथील सत्ताधीशांना इस्लामी आक्रमकांचा पराभव करण्यात, सामना करण्यात जे अपयश आले त्याची मूळ कारणपरंपरा भिन्न आहे. प्रथमतः एक लक्षात घेतले पाहिजे कि, इस्लामी आक्रमकांशी जी युद्धं लढली गेली ती सर्व येथील सत्ताधीशांच्या भूप्रदेशातच. येथील सत्ताधीश आक्रमकांच्या प्रदेशात खोलवर घुसल्याचे उदाहारण चुकुनही आढळत नाही. ज्याच्या पराक्रमाचे व हौतात्म्याचे गोडवे गाण्यात बेगडी इतिहासकार थकत नाहीत तो पृथ्वीराज चौहान प्रसंगी गुजरातमध्ये बेधडक घुसत होता पण दिल्लीच्या वर असलेल्या पंजाबात शिरून घोरीचा तेथून उठावा करण्याचे त्याचा मनात कधी आले नाही. उलट घोरीच्या दोन्ही आक्रमणांच्या वेळी त्याची भूमिका बचावकर्त्याचीच राहीली.

    उत्तर हिंदुस्थानातील या स्थितीपेक्षा विपरीत चित्र दक्षिण हिंदुस्थानात बघायला मिळते. तत्कालीन बलाढ्य हिंदूसत्ता विजयनगरची असून वेळोवेळी या सत्तेने प्रथम बहामनी व नंतर तिच्या विघटीत अवयवांवर हल्ले केल्याचे दिसून येते. एकाच देशातील दोन वेगवेगळ्या भूप्रदेशांत असे परस्परविरोधी चित्र का दिसावे ?

    इस्लामी आक्रमणाची चर्चा करताना आर्थिक बाजू लक्षात घेणेही अत्यावश्यक आहे. इस्लामी आक्रमणापूर्वी व आक्रमणे होत असताना येथील सत्ताधीशांचे आपसांत संघर्ष होत. लुटालूट, कत्तली होत. त्यांचा अर्थव्यवस्थेवर जरी परिणाम होत असला तरी व्यापक व दूरगामीदृष्ट्या तितकासा तो हानिकारक नव्हता. कारण येथे संपत्तीचे हस्तांतरण झाले तरी तिचा विनियोग इथेच केला जात होता. परंतु इस्लामी आक्रमकांनी प्रथमतः इथली संपत्ती लुटून नेण्याचा जो उपक्रम स्वीकारला, तो इथे बाधक ठरला. नंतरच्या काळातील पोर्तुगीज, फ्रेंच, डच, ब्रिटिशांनीही हेच संपत्ती अपहरणाचे धोरण पुढे राबवत हा देश जिंकण्याचा प्रयत्न केला. फरक इतकाच कि, मुसलमानांनी यासाठी रक्तपाताचा मार्ग स्वीकारला तर ख्रिस्त्यांनी व्यापाराचा.

    याखेरीज इस्लामी आक्रमकांनी आरंभी जे प्रदेश काबीज केले, त्यातील सर्वच्या सर्व माणसे मारली गेली वा धर्मांतरीत झाली असे नसून त्यांपैकी काहींनी आसपासच्या राज्यांत रक्षणार्थ धाव घेतल्याची बाब नजरेआड करून चालत नाही. अशा विस्थापितांच्या पुनर्वसनाचा आर्थिक बोजा तत्कालीन इस्लामी आक्रमण बाधित प्रदेशाच्या शेजारील राजसत्तांना कितपत उचलावा लागला हाही संशोधनाचा प्रश्न आहे.
    तसेच अधूनमधून पडणारे दुष्काळ व सततच्या युद्धांमध्ये शेती - व्यापाराचे होणारे नुकसानही जमेस धरणे आवश्यक आहे.
    या सर्व घटकांची, आपत्तींची झळ आक्रमकांपेक्षा स्थानिकांनाच बसणे स्वाभाविक आहे.

    इस्लामी आक्रमणाच्या यशाचे व स्थानिकांच्या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे येथील रहिवाशांनीच स्वहस्ते शत्रूला केलेली मदत ! जिचा उल्लेख कोणताही इतिहासकार स्पष्टपणे करत नाही व ती म्हणजे धर्मान्तरितांना परत स्वधर्मात घेण्याचा अजिबात प्रयत्न न करणे.

    युद्धांत होणारी मनुष्यहानी मोजता येते परंतु धर्मांतराने होणारी मोजण्यापलीकडे असते. याचे प्रत्यंतर हिंदुस्थानी सत्ताधीश व इस्लामी आक्रमकांच्या संघर्षात दिसून येते. उभय पक्षांच्या युद्धांत मनुष्यहानी दोन्ही बाजूंची होत असे. परंतु आपल्या पक्षाची हानी तात्काल भरून काढण्यासाठी मुस्लिमांकडे धर्मांतराचा पर्याय होता. त्याउलट स्थानिकांकडे नवीन जीव जन्माला घालण्याचा. परिणामी विजय कोणाचा झाला याची साक्ष इतिहासच देतो.

    इस्लामी आक्रमक रानटी, मागास होते. म्हणून त्यांना यश प्राप्त झाले असाही एक मतप्रवाह आहे. परंतु येथे चालून आलेले आक्रमक धर्मांतरीत असून तत्पूर्वी ते कोण होते ? तुर्कांचा हिंदू वा पेगन प्रमाणेच आदिम धर्म होता. अफगाणिस्तान पर्यंतचा प्रांत हिंदुस्थानी साताधीशांच्या अधीन असून तिथे आधी जैन, बौद्ध, हिंदू, वैदिक, पारसी इ. धर्मांचे अनुयायी होते. यातीलच कित्येक पुढे इस्लाम स्वीकारून मुसलमान बनून हिंदुस्थानवर चालून आले. जर हे धर्मांतरीत इस्लामी रानाटी, मागास म्हणायचे झाले तर मग त्यांचे पूर्वधर्मही मागास व रानटी ठरतात त्याचे काय ?

    परंतु हाही मुद्दा जरी बाजुला ठेवला तरी रानटी, मागास व प्रगत, सुसंस्कृत यांचे निकष कोणते ? तत्कालीन स्थानिक समाज जर खरोखर प्रगत होता तर या रानटी इस्लामी टोळधाडीस शरण का गेला ? तसेच येथील लोकं जर खरोखर प्रगत संस्कृतीची होती तर त्यांनी युद्धकला - शस्त्रसामर्थ्यात त्या प्रगतीचा वापर केल्याचे चित्र का दिसून येत नाही ?

    इस्लामी आक्रमक क्रूर होते असेही सांगितले जाते. मग इथले सत्ताधीश क्रूर नव्हते का ? मुळात युद्धखोर व्यक्ती वा युद्ध करणारा मनुष्यसमुदाय क्रूर नसतो असं म्हणणं मूर्खपणाचं लक्षण आहे.

    राजकीय व धार्मिक क्षेत्रात योग्य संधी साधण्यात एतद्देशियांपेक्षा इस्लामी आक्रमक अधिक यशस्वी झाल्याचे दिसून येते. राजपूत राजांमधील भांडणांचा फायदा जसा महंमद गजनी व घोरीला घेता आला तसा शिया - सुन्नी या पंथभेदाचा वा अफगाण - तुर्क झगड्याचा लाभ घेण्यात इथल्या सत्ताधीशांना अपयश आले.

    धार्मिक क्षेत्रात पाहिलं तर येथील सत्ताधीश प्रामुख्याने हिंदू - जैन धर्मांत विभागलेले होते. बौद्ध राजसत्ता यापूर्वीच नामशेष झाल्या असून वैदिकांना फक्त राजाश्रय लाभला होता. प्रत्यक्षात राजकीय सत्ता त्यांच्या हाती नसली तरी राजाश्रयामुळे त्यांच्या प्रभावात वाढ झाल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे समाजमन हे या तीन ते चार धर्मांत विभागलेलं होतं. त्याउलट आक्रमकांचा धर्म एकच होता. मात्र याचा अर्थ असा नाही कि, त्यांच्यात पूर्णतः ऐक्य, एकोपा होता.

    आक्रमकांना विपरीत परिस्थितीशी झुंजून - झगडून यश प्राप्त करायचे होते. जगायचे होते. त्यामुळे काही काळ त्यांचे आपसांतील तंटे मिटल्यासारखे दिसले तरी सुस्थिती दिसताच ते देखील परस्परांच्या उरावर बसल्याचे इतिहासात नमूद आहे. परंतु या संघर्षांनाहिये एकाच धर्म भावनेने आळा घातल्याचे नजरेआड करता येत नाही. हि सोय एतद्देशीयांना नव्हती.

    यास्थळी चर्चेत घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे घोरी पर्यंत किंवा ऐबकच्या आरंभीच्या काळापर्यंत इस्लामी आक्रमकांना यश प्राप्त होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांचे हितसंबंध इथे गुंतलेले नसणे. ज्याचा उपयोग पुढील काळात युरोपियन व्यापारी राष्ट्रांनाही इथे हात - पाय पसरण्यासाठी झाला. त्यामुळे घटकेत पक्ष - भूमिका बदल त्यांच्याकरता सोयीचे होते, जे स्थानिकांना केवळ अशक्य.

    इस्लामी आक्रमकांच्या स्वाऱ्यांची चर्चा करताना नेहमी अधोरेखित केली जाणारी बाब म्हणजे त्यांनी केलेल्या अमानुष कत्तली !
    ज्यावेळी आक्रमक अल्पसंख्य असतो तेव्हा बहुसंख्याकांवर दहशत बसवण्यासाठी त्याला या मार्गाचा वापर करावाच लागत्यो. याला प्रगत म्हणवली जाणारी जगातील कोणतीही राष्ट्रे अपवाद नाहीत. तसेच मुस्लीम शासकांनी येथे केलेल्या अमानुष कत्तली जर त्या आकडेवारीसह ग्राह्य धरल्या तर मग नंतरच्या काळात वेगळ्या पाकिस्तान निर्मितीची गरज का भासावी ? याचाही विचार नको का करायला.

    इस्लामी आक्रमकांनी केलेल्या धर्मांतर मोहिमेमुळे मुख्यतः हिंदू धर्माची हानी झाली असली तरी यामुळे धर्मांतरितांना तसेच इस्लामलाही तात्कालिक सोडला तर दुरगामी फायदा झाल्याचे दिसून येत नाही.
    धर्मांतरितांना आपल्या मूळ धर्माशी पूर्णतः नाळ तोडता आली नाही व संपूर्णपणे नवीन धर्मही स्वीकारता आला नाही. त्याचप्रमाणे इस्लामातही प्रचलित जातीभेदात या आयात हिंदूंची जातींसह भर पडून तो धर्मही विस्कळीत, विकृत स्वरुपाचा बनला.

    मलिक काफुर, खुश्रुखान, नगरचा निजामशहा, वऱ्हाडचा इमाद वगैरे व्यक्तीशः इस्लाम धर्म स्वीकृतीचा लाभ प्राप्त झालेल्या पूर्वाश्रमीच्या हिंदू व्यक्ती असल्या तरी त्यांची धर्मांतरे स्वेच्छेने वा सक्तीने झाली प्रथमतः वादाचा मुद्दा आहे. द्वितीय, त्यांच्या अभ्युदयाचा मुद्दा जरी विचारात घेतला तरी नवधर्मांतरीतांना नेहमीच उत्तेजन, प्रोत्सान्ह्न देण्याची प्रस्थापितांची पद्धत असल्याने त्याचा यांना लाभ होणे स्वाभाविक होते. परंतु असे नवधर्मांतरीत जेव्हा स्थिरावतात, उत्कर्ष पावतात तेव्हा ते आपसूकच प्रस्थापितांच्या नजरेत सलू लागतात व हाच नियम सर्वत्र प्रचलित असल्याचे दिसून येते.

    हिंदुस्थानातील सत्ताधीशांच्या पराभवामागे फितुरी हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. मुळात फितुरी म्हणजे काय हेच न समजल्याने या कारणाचा वापर केला जातो.

    राजसत्तांच्या उदय - अस्ताचा इतिहास सूक्ष्मरीत्या अभ्यासला तर असे दिसून येते कि, नवीन राजवट स्थापित झाल्यापासून ती प्रस्थपित होईपर्यंत तिच्याविषयी अल्प प्रमाणात असंतोष वगळला तर सर्वत्र सहकार्याची, पाठिंब्याची भावना दिसून येते. परंतु ती राजवट एकदा स्थिरावली कि आपसूकच तिच्या विनाशाकरता त्या राजवटीतील लाभधारकांकडून, असंतोषित व्यक्तींकडून प्रयत्न केले जातात.

    यामागे व्यक्तिगत कारणं काहीही असली तरी प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राज्सात्तांच्या उत्कर्ष - ऱ्हासात याच अलिखित नियमाचा वापर झाल्याचे दिसून येते. अगदी आत्ताही मतदानाद्वारे प्रस्थापित राजवट बदलण्याचे तसेच अविश्वास ठरावातून सरकार उलथवण्यासघा अधिकार अनुक्रमे जनता व विधेयकांना घटनेद्वारे प्राप्त झाले आहेत ते देखील वरील अलिखित प्राचीन नियमास अनुसरून. अन्यथा रक्तरंजित संघर्षाची परंपरा आजही कायम राहिली असती !   
                                                                    ( समाप्त )

३ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

नमस्कार, सुंदर शब्दात संदर्भासह विवेचन बाजू घेऊन आपले म्हणणे न दामटता केलेल्या विश्लेषण करण्याची हातोटी आवडली.

D-hox-x म्हणाले...

तुमच्या लेखनात एक फार मोठी गल्लत आहे. तुंम्ही ऐतिहासिक विवेचन जरी अभ्यासुन केले असले तरी त्या काळातील धार्मिक समाजाची मांडणी आणि आणि त्याचा अभ्यास फारसा केलेला नाही. जुन्या काळात जैन बुद्ध हे हिंदू धर्माचे एक वेगळे स्वरूप होते. त्या काळातील बुद्ध धर्मात हिंदू देवतांची पूजा होत होती. त्यामुळे त्या धर्मांना हिंदू धर्म पेक्षा वेगळे समजणे चूक.

D-hox-x म्हणाले...

इस्लामी आक्रमणे आणि त्यांची वागणूक यासाठी त्याला राजांचा इतिहास बघण्यापेक्षा इस्लाम धर्माचा इतिहास काय होता हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मोहम्मद पैगंबर पूर्व इतिहासात इस्लामी धर्माचे स्वरूप हे या सर्व बाबींवर प्रकाश टाकेल.